Home Blog Page 129

अतिक्रमणे, बेकायदा बांधकामे यावर कारवाई होत नसल्याचे चित्र – पोलीस आणि महापालिका आयुक्ताना त्यांच्या घोषणेचा विसर पडलाय काय ?

पुणे – शहर, उपनगरे आणि परिसरातील बेकायदा बांधकामे आणि अतिक्रमणाबाबतच्या महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त या दोहोंनी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत पण प्रत्यक्ष चित्र वेगळेच दिसते आहे असा ठपका ठेवत क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी बेकायदा बांधकामे आणि अतिक्रमणाबाबतच्या प्रश्नांना पुन्हा चव्हाट्यावर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

याबाबत त्यांनी महापालिका आयुक्त यांना दिलेल्या पत्रकात म्हटले आहे कि,’
गेल्या आठवड्यात आपण संयुक्त पत्रकार परिषद घेऊन अतिक्रमणा बाबत कठोर भूमिका घेत असल्याचे जाहीर केले त्यामुळे पुणेकरांमध्ये आनंदाची लाट पसरली व आता किमान पदपथ रिकामे होतील आणि वाहतूक कोंडी सुटण्यास ही मदत होईल अशी आशा निर्माण झाली.
मात्र प्रत्यक्षात परिस्थिती ” जैसे थे ” असल्याचे निदर्शनास येत आहे. प्रशासनाच्या अकार्यक्षमते मुळे लोकप्रतिनिधी आणि राजकारण्यांची मात्र नाहक बदनामी होतं असल्याचे चित्र आहे. काल रविवारी सायंकाळी सिटी पोस्ट चौकाची अवस्था बघितली. शब्दश: पायी चालायला देखील जागा नव्हती. पदपथ तर पथारीवाल्यांनी व्यपले होतेच पण रस्ता अडवून रिक्षा व चारचाकी बिनधास्त उभ्या होत्या. हेच चित्र शहरातील अनेक भागात दिसून आले.
फर्ग्यूसन रस्ता आणि जंगली महाराज रस्त्यावरील कारवाईच्या फार्स च्या सुरस कथा आता पुणेकरांना तोंडपाठ झाल्या आहेत पण अगदी वानगी दाखल सांगायचे तर…
1) नदीपात्रातील रस्ता मनपा ने नुकताच गुळगुळीत केला, त्या रस्त्यावर मोठी बाजारपेठच उभारली असल्याचे चित्र आहे.
2) म्हात्रे पुल ते राजाराम पुल दरम्यान ची परिस्थिती ही अशीच. पूर्णपणे विक्रेत्यांनी व्यापलेले रस्ते आणि वेडीवाकडी वाहने उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणारे खरेदीदार.
3) फ्रंट मार्जिन, साईड मार्जिन, पार्किंग स्पेसेस चा गैरवापर व त्यामुळे रस्त्यावर होणारे पार्किंग याकडे बांधकाम खाते सोयीस्कर दुर्लक्ष करते.
अशी शेकडो उदाहरण देता येतील.
माझ्या भागातील लोकप्रतिनिधी प्रशासनाला वारंवार सूचना करून देखील कारवाई होतं नसल्याचे विदारक चिन्ह आहे.
यात निश्चितच इच्छाशक्ती चा अभाव आणि कर्मचाऱ्यांचे लागेबांधे असल्याचा दाट संशय येतो.
प्रशासनाच्या मर्यादांची कल्पना आहे मात्र कारवाई पूर्वी पथारीवाल्यांना माहिती देणारे कर्मचारी, ज्या भागात सातत्याने अतिक्रमण होतं आहे तेथील अधिकारी यांच्यावर कामचुकारपणा केल्यास कारवाईचे जरब बसविल्याशिवाय ही समस्या सुटणे अवघडच.
त्यातून जर लोकप्रतिनिधी कारवाई करू नका असे सांगत असतील तर त्यांचे नाव जाहीर करावे अशी ही मागणी ह्या निवेदनातून करत आहे.
विक्रेत्यांचे जप्त केलेले सामान त्वरित परत न देणे, वारंवार अतिक्रमण करणाऱ्यांवर खटला भरणे,अश्या विविध कायदेशीर बाबींचा ही अभ्यास करून कारवाई व्हावी.
आपली घोषणा ही फक्त लोकप्रियतेसाठीची नाही याची प्रचिती पुणेकरांना यावी एवढीच माफक अपेक्षा.असे संदीप खर्डेकर यांनी म्हटले आहे.

.

स्त्रीशिक्षणाच्या माध्यमातूनच स्त्री सक्षमीकरण शक्य

एस. एन. डी. टी. विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांचे प्रतिपादन

स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था आयोजित नारी शक्ती – सन्मान आणि संवाद उपक्रम

पुणे : स्त्री सक्षमीकरणाचा मार्ग स्त्रीशिक्षणाच्या माध्यमातूनच पुढे जाऊ शकतो. शिक्षित स्त्री अधिकाधिक कौशल्ये प्राप्त करू शकते. शिक्षणामुळे तिला आर्थिक स्वावलंबन मिळू शकते. व्यक्ती, कुटुंब आणि समाज, अशा सर्व स्तरांवर स्त्रीला निर्णयाचे स्वातंत्र्य मिळते आणि खऱ्या अर्थाने स्त्री सक्षमीकरण साध्य होते, असे प्रतिपादन एस. एन. डी. टी. विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांनी येथे केले. ‘महर्षी कर्वे यांच्या द्रष्टेपणामुळेच एस. एन. डी. टी. महाविद्यालयाची स्थापना होऊन, अनेक पिढ्यांतील स्त्रियांच्या सक्षमीकरणाला दिशा मिळू शकली’,  असेही त्या म्हणाल्या.

स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था, हिंदुस्थान आयोजित नारी शक्ती – सन्मान आणि संवाद – २०२६(महिला दिन सप्ताह समारोप) या विशेष कार्यक्रमात त्या बोलत होत्या. याप्रसंगी कला, क्रीडा, उद्योग,शिक्षण, समाजसेवा अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय  कामगिरी केल्याबद्दल कर्तबगार स्त्री शक्तीचा सन्मान करण्यात आला. यामध्ये बालकीर्तनकार अग्रणी साठे हिचा बाल सावरकर पुरस्काराने गौरव करण्यात आला. विशेष सन्मानार्थी म्हणून प्रेरणा सहाणे दीक्षित (कलाक्षेत्र),  गौरी गाडगीळ (क्रीडाक्षेत्र),  रक्षा देशपांडे (शिक्षण आणि समाजकार्य क्षेत्र), सुजाता शहा (उद्योजिका) यांचा समावेश होता. एमईएस गावडे सभागृह, भावे विद्यालय सदाशिव पेठ, येथे झालेल्या या कार्यक्रमात कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांच्यासह, श्री गुरुकुलम् न्यास, कल्याणच्या संस्थापक अध्यक्ष मंजिरी फडके, उद्योजिका आणि ‘देणे समाजाचे’ या अभिनव उपक्रमाद्वारे समाजकार्य करणाऱ्या वीणा गोखले आणि प्रसिद्ध अभिनेत्री, दिग्दर्शिका स्नेहल तरडे यांच्याशी संवादाचा उपक्रम आयोजिण्यात आला होता. डॉ. शुभा साठे आणि अनुराधा मुन्शी यांनी त्यांच्याशी संवाद साधला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास कुलकर्णी हेही व्यासपीठावर उपस्थित होते. दीपप्रज्ज्वलन करून तसेच भारतमाता, छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरवात झाली.

डॉ. चक्रदेव म्हणाल्या, महर्षी कर्वे यांनी ज्या काळात स्त्रीशिक्षणासाठी प्रयत्न सुरू केले आणि महाविद्यालयाच्या माध्यमातून ते प्रत्यक्षात आणले, तो काळ सर्वस्वी प्रतिकूल होता. त्यामुळे महर्षींना अतोनात परिश्रम करावे लागले. मात्र, कालांतराने स्त्रीशिक्षणाचा त्यांचा आग्रह किती योग्य होता, हे समाजमनाने जाणले आणि आज काही लाख मुली एस. एन. डी. टी. महाविद्यालयाच्या विविध शैक्षणिक संकुलांतून २०० पेक्षा अधिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहेत. कुटुंबापासून विश्वकुटुंबापर्यंत स्त्रियांचे कर्तृत्व विस्तारत आहे. मुलींच्या अनेक पिढ्या महर्षींना अभिप्रेत असलेल्या सक्षम आणि सबल स्त्रिया झाल्या आहेत, याचे समाधान मोठे आहे.

मंजिरी फडके यांनी भगवद्गीतेतील स्त्री सबलीकरणाच्या विचाराची माहिती सांगितली. सृजनशक्ती केवळ स्त्रीपाशीच असून, श्री, धृती, वाणी, मेधा, क्षमा यांच्या रूपाने स्त्रीशक्तीच्या विविध पैलूंचे गीतेत वर्णन आहे, असे त्या म्हणाल्या.

स्त्रीपाशी असलेल्या सृजनशक्तीचा, निर्मितीचा नकारात्मक अर्थ न घेता, ते वरदान मानण्याची मानसिकता निर्माण केला पाहिजे. कुटुंब हे केवळ स्त्रीचे नसून, ते प्रत्येक घटकाचे असते, याचे भान नव्या पिढीत आता दिसते आहे, हे चित्र आशादायी असल्याचे निरीक्षण स्नेहल तरडे यांनी नोंदवले.

वीणा गोखले यांनी देणे समाजाचे या उपक्रमाच्या माध्यमातून समाजमनात दातृत्वाचे संस्कार निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. डॉ. शुभा साठे यांनी प्रारंभी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्त्रीविषयक विचारांची माहिती दिली. सावरकरांचे कोणत्याही विषय़ावरील विचार समजून घेण्यासाठी त्यांचा राष्ट्रविचार आधी समजून घेणे आवश्यक आहे, असे त्या म्हणाल्या.

श्रीनिवास कुलकर्णी यांनी स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेच्या निर्मितीची व उद्देशांची माहिती दिली.

भक्ती कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. स्नेहा गाडगीळ यांनी आभार मानले.

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सार्वजनिक आरोग्य सेवांना मिळणार नवे बळ:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्य शासन व वाधवानी एआय यांच्यात सामंजस्य करार

मुंबई, दि. 16 : राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम, तंत्रज्ञानाधिष्ठित आणि लोकाभिमुख करण्याच्या दिशेने राज्य शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) आधारित आधुनिक उपाययोजनांचा प्रभावी वापर करण्यासाठी राज्य शासन आणि वाधवानी एआय (LEHS AI Unit) या सामाजिक हेतूने कार्य करणाऱ्या ना-नफा-ना-तोटा संस्थेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या संकल्पनेतून करण्यात आलेल्या या सामंजस्य कराराअंतर्गत क्षयरोग (TB), मातृ, नवजात व बाल आरोग्य (MNCH), प्राथमिक आरोग्य सेवा, ई-हेल्थ आदी क्षेत्रांमध्ये एआय तंत्रज्ञानाचा समावेश करून आरोग्य सेवांचा दर्जा अधिक उंचावण्यात येणार आहे. राज्यातील शेवटच्या घटकापर्यंत दर्जेदार, वेळेवर आणि प्रभावी आरोग्य सेवा पोहोचवणे हा या भागीदारीचा मुख्य उद्देश आहे.

डिजिटल महाराष्ट्र आता पुढील टप्प्यात प्रवेश करत असून कृत्रिम बुद्धिमत्ता सार्वजनिक आरोग्यासाठी ‘फोर्स मल्टिप्लायर’ ठरणार आहे. वाधवानी एआयच्या सहकार्याने एआय सक्षम आरोग्य व्यवस्था उभारणार असल्याचे श्री फडणवीस म्हणाले.

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, क्षयरोग, प्राथमिक आरोग्य सेवा आणि मातृ-बाल आरोग्यासाठी एआय साधनांचा वापर केल्यास लवकर निदान, सुलभ सेवा आणि अग्रिम कर्मचाऱ्यांना वेळेवर मार्गदर्शन मिळेल. ही भागीदारी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम व सक्षम बनवेल.

वाधवानी एआयचे प्रमुख शेखर शिव सुब्रमणियन यांनीही या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त करताना सांगितले की, महाराष्ट्र शासनाबरोबरची ही भागीदारी नवोन्मेष, समता आणि दीर्घकालीन परिणाम साधणाऱ्या आरोग्य सुधारणांसाठी महत्त्वाची ठरेल.

या सामंजस्य करारामध्ये पुढील बाबींचा समावेश आहे.
क्षयरोग निर्मूलनासाठी एआयचा प्रभावी वापर

या उपक्रमांतर्गत क्षयरोग रुग्णांमध्ये उपचार सोडून देण्याचा धोका, उपचारातील अडथळे व मृत्यूची शक्यता उपचाराच्या सुरुवातीलाच ओळखण्यासाठी एआय आधारित प्रणाली वापरण्यात येणार आहे. त्यामुळे उच्च जोखमीच्या रुग्णांवर वेळेत लक्ष देऊन योग्य उपचार करता येणार आहेत.

‘Cough Against TB’ या एआय आधारित अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून खोकल्याच्या आवाजाचे विश्लेषण करून क्षयरोगाची प्राथमिक ओळख आरोग्य संस्थांमध्ये जलदगतीने करता येणार आहे.

याशिवाय, उपगाव पातळीवर (५०० मी. × ५०० मी.) क्षयरोगाचा धोका दर्शविणारे व्हल्नरेबिलिटी मॅपिंग तयार करण्यात येणार असून, लोकसंख्या घनता, आरोग्य सुविधा, प्रदूषण, कुपोषण यांसारख्या घटकांचा अभ्यास करून सक्रिय रुग्ण शोध (ACF) मोहिमा अधिक परिणामकारक रितीने राबविता येणार आहेत.

ई-हेल्थ व प्राथमिक आरोग्य सेवांना गती

राज्याच्या ई-संजीवनी टेलिमेडिसीन सेवेमध्ये एआय आधारित Clinical Decision Support System (CDSS) समाविष्ट करण्यात येणार आहे. यामुळे डॉक्टरांना अचूक निदान व रुग्णांच्या तक्रारींचा संक्षिप्त आढावा घेणे सुलभ होणार आहे. मधुमेही रुग्णांसाठी ‘मधुनेत्रा’ या एआय प्रणालीद्वारे डोळ्यांच्या तपासणीस मदत होणार असून आवश्यकतेनुसार तज्ज्ञांकडे रुग्णांना संदर्भित करता येणार आहे.

‘हेल्थ वाणी’ या एआय आधारित संवाद सहाय्यकाच्या माध्यमातून आशा, एएनएम यांसारख्या अग्रिम आरोग्य कर्मचाऱ्यांना मोबाईलवरच प्रशिक्षण, मार्गदर्शन व प्रमाणित माहिती सहज उपलब्ध होणार आहे.
मातृ व बाल आरोग्यासाठी अभिनव तंत्रज्ञान

‘शिशु मापन’ या एआय आधारित अ‍ॅप्लिकेशनमुळे केवळ स्मार्टफोन व साध्या मोजमापाच्या साधनांच्या सहाय्याने नवजात शिशूचे वजन, लांबी, डोके व छातीचा घेर मोजणे शक्य होणार आहे. घरभेटीद्वारे ४२ दिवसांपर्यंत नवजात शिशूंची काळजी अधिक प्रभावीपणे घेता येणार आहे.
नेतृत्वाचे मत

समावेशक व तंत्रज्ञानाधारित आरोग्य महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल

सध्या देशभरात वाधवानी एआयच्या उपाययोजनांद्वारे १५ कोटीहून अधिक लोकांपर्यंत सेवा पोहोचत असून, आरोग्य, शेती व शिक्षण क्षेत्रात सामाजिक परिवर्तन घडविण्यात संस्थेचा मोलाचा वाटा आहे. या सामंजस्य करारामुळे राज्यात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने अधिक सक्षम, समावेशक आणि लोककल्याणकारी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
0000

भारतात एका वर्षात 24 अब्जाधीश वाढले: लक्ष्मी मित्तल दररोज ₹274 कोटी कमावून देशातील चौथे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले

नवी दिल्ली-फोर्ब्स वर्ल्ड्स बिलियनेअर्स 2026 च्या यादीनुसार, भारतात एका वर्षात 24 अब्जाधीश वाढले आहेत. त्यांची संख्या वाढून 229 झाली आहे. देशातील चौथे सर्वात श्रीमंत लक्ष्मी मित्तल यांच्या संपत्तीत यावर्षी सर्वात वेगाने वाढ झाली.

त्यांच्या आर्सेलरमित्तल कंपनीच्या शेअर्समध्ये 80% पेक्षा जास्त वाढ झाल्यामुळे त्यांची एकूण संपत्ती 31 अब्ज डॉलर, म्हणजेच 2.87 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. गेल्या एका वर्षात त्यांच्या संपत्तीत 20 अब्ज डॉलर, म्हणजेच 1.85 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

यानुसार, मित्तल यांनी वर्षभरात दररोज सरासरी 274 कोटी रुपयांची विक्रमी कमाई केली आहे. या यादीत फिजिक्सवालाचे संस्थापक अलख पांडे आणि प्रतीक बूंब यांचाही समावेश झाला आहे.
तिसऱ्या क्रमांकावर ओपी जिंदल ग्रुपच्या अध्यक्षा सावित्री जिंदल आहेत. त्या भारतातील सर्वात श्रीमंत महिला बनलेल्या आहेत. या यादीत 20 भारतीय महिला अब्जाधीशांचा समावेश आहे.

कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक उदय कोटक या वर्षी टॉप-10 मध्ये समाविष्ट झाले आहेत. त्यांना नुकताच पद्मभूषण पुरस्कार मिळाला होता. त्यांच्या प्रवेशामुळे डीएलएफच्या मागे असलेले प्रॉपर्टी डेव्हलपर कुशल पाल सिंह 12व्या क्रमांकावर घसरले.

एडटेक प्लॅटफॉर्म फिजिक्सवालाचे संस्थापक अलख पांडे आणि प्रतीक बूंब हे देखील नवीन अब्जाधीशांमध्ये समाविष्ट आहेत. नोव्हेंबरमध्ये कंपनीच्या आयपीओनंतर ते या क्लबमध्ये आले.

पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा तीन वर्षांनंतर पुन्हा यादीत परतले आहेत. पेटीएमचे शेअर्स गेल्या वर्षी सुमारे 60% वाढले, तरीही ते अजूनही आयपीओच्या जवळपास निम्म्या किमतीवर ट्रेड करत आहेत.

धर्मांतरविरोधी कायदा सर्वात वाईट:असदुद्दीन ओवेसी यांची टीका

मुंबई-महाराष्ट्रात प्रस्तावित असलेल्या धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026 वरून राजकीय वातावरण तापले आहे. अखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी या विधेयकावर तीव्र टीका केली आहे. भारतातील विविध राज्यांमध्ये लागू असलेल्या धर्मांतर विरोधी कायद्यांपेक्षाही महाराष्ट्राचा प्रस्तावित कायदा अधिक कठोर असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सामाजिक माध्यमावर केलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी या विधेयकाला सर्वात वाईट, अशा कायद्यांपैकी एक असे संबोधले. त्यांच्या मते, अशा प्रकारचे कायदे खऱ्या अर्थाने स्वेच्छेने होणाऱ्या धर्मांतरालाही गुन्हा ठरवू शकतात.

ओवेसी यांनी सांगितले की, अनेक राज्यांतील धर्मांतर विरोधी कायद्यांमुळे आधीच आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांवर दबाव निर्माण होतो. धर्मांतर करण्यासाठी आधी परवानगी घेण्याची अटही काही ठिकाणी आहे. आता महाराष्ट्रातील प्रस्तावित कायद्यात आणखी काही कठोर तरतुदी करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. विशेषतः ‘शिक्षणाद्वारे ब्रेनवॉश करून धर्मांतर घडवणे’ या शब्दप्रयोगावर त्यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांच्या मते हा शब्दप्रयोग अतिशय व्यापक आणि अस्पष्ट असल्याने त्याचा गैरवापर होण्याची शक्यता आहे.

यासंदर्भात उदाहरण देताना ओवेसी म्हणाले की, एखादी व्यक्ती एखाद्या धर्माचा पवित्र ग्रंथ वाचते किंवा एखाद्या विद्वान व्यक्तीकडून त्या धर्माविषयी माहिती घेते, तर त्यालाही ‘ब्रेनवॉश’ मानले जाईल का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अशा प्रकारचे शब्द वापरल्यामुळे लोकांना मनमानी पद्धतीने अटक करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो, असा त्यांचा दावा आहे. त्यामुळे या विधेयकाचा उद्देश लोकांना घाबरवणे आणि धर्मांतराच्या स्वातंत्र्यावर बंधने आणणे असा असल्याचा आरोप त्यांनी केला.

या विधेयकातील आणखी एका तरतुदीवरही ओवैसी यांनी टीका केली आहे. प्रस्तावित कायद्यानुसार पोलिसांना कोणतीही तक्रार नोंदवली नसतानाही संशयित बेकायदेशीर धर्मांतराच्या प्रकरणात स्वतःहून कारवाई करण्याचा अधिकार दिला जाणार आहे. याचा अर्थ असा की, एखाद्या व्यक्तीच्या कुटुंबीयांनीही आक्षेप घेतला नसला तरी पोलिसांना त्या प्रकरणात अटक करण्याची मुभा मिळू शकते, असे त्यांनी म्हटले. अशा तरतुदीमुळे नागरिकांच्या खासगी आयुष्यात हस्तक्षेप होण्याचा धोका असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, ओवेसी यांनी या प्रस्तावित कायद्याला संविधानातील मूलभूत अधिकारांचे उल्लंघन असल्याचेही म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने खासगी आयुष्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार असल्याचे स्पष्ट केले असून त्यामध्ये व्यक्तीला कोणता धर्म स्वीकारायचा किंवा स्वीकारायचा नाही याचे स्वातंत्र्यही समाविष्ट आहे, असे त्यांनी सांगितले. संविधानाच्या प्रस्तावनेत प्रत्येक नागरिकाला विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा, विश्वास आणि उपासनेचे स्वातंत्र्य दिले आहे, याची आठवण त्यांनी करून दिली.

आंबेडकरांनी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होतामहाराष्ट्र ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमी असून त्यांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता, याकडेही ओवेसी यांनी लक्ष वेधले. दरम्यान, राज्याच्या विधानसभेत ग्रामीण विकास राज्यमंत्री पंकज भोयर यांनी हे धर्मस्वातंत्र्य विधेयक मांडले असून बेकायदेशीर धर्मांतर रोखणे हा त्यामागचा उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. प्रस्तावित कायद्यानुसार काही गुन्हे दखलपात्र आणि अजामीनपात्र असणार असून नियमांचे पालन करून स्वेच्छेने धर्मांतर करण्यास परवानगी दिली जाईल.

ट्रम्प यांची रविवारी नाटो (NATO) देशांना धमकी


दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील इंधन टॅंकवर हल्ला:अनेक उड्डाणे डायव्हर्ट, ट्रम्प म्हणाले – नाटोने मदत न केल्यास भविष्य वाईट

युद्धाच्या दरम्यान यूएईमध्ये १९ भारतीयांना अटक, फेक न्यूज पसरवल्याचा आरोप-युद्धाच्या दरम्यान यूएईने ३५ जणांना अटक करण्याचे आदेश दिले, ज्यात १९ भारतीय आहेत. पीटीआय वृत्तसंस्थेनुसार, त्यांच्यावर सोशल मीडियावर फेक व्हिडिओ आणि माहिती पसरवल्याचा आरोप आहे.यूएईचे ॲटर्नी जनरल डॉ. हमद सैफ अल शम्स यांनी सांगितले की, हे पाऊल डिजिटल प्लॅटफॉर्मच्या निगराणीनंतर उचलण्यात आले आहे, जेणेकरून खोटी माहिती पसरवून अशांतता किंवा भीती निर्माण करण्यापासून रोखता येईल.

तेल अवीव/तेहरान:ट्रम्प यांनी रविवारी नाटो (NATO) देशांना धमकी दिली. ते म्हणाले की, जर मित्र राष्ट्रांनी होर्मुझ सामुद्रधुनी खुली ठेवण्यास मदत केली नाही, तर नाटोचे भविष्य खूप वाईट असू शकते.ट्रम्प म्हणाले, “आपल्याकडे नाटो (NATO) नावाची एक व्यवस्था आहे. आम्ही त्यांच्यासोबत खूप चांगले वागलो आहोत. आम्हाला युक्रेनच्या बाबतीत त्यांची मदत करण्याची गरज नव्हती. तरीही आम्ही त्यांना मदत केली. आता ते आम्हाला मदत करतात का, हे पाहायचे आहे.”

त्यांनी असेही सांगितले की, जर चीनने होर्मुझ सामुद्रधुनी खुली ठेवण्यास मदत केली नाही, तर ते या महिन्याच्या अखेरीस चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत होणारी त्यांची शिखर परिषद पुढे ढकलू शकतात. ट्रम्प ३१ मार्च रोजी चीनला जाणार आहेत. ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनीचा वापर करणाऱ्या देशांना या मार्गाचे संरक्षण करण्यासाठी युद्धनौका आणि आवश्यक मदत पाठवण्याची मागणी केली होती. जगभरातील २०% तेल याच मार्गातून जाते.
आज सकाळी दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ एका इंधन टाकीला लक्ष्य करण्यात आले. यापूर्वीही युद्धादरम्यान येथे हल्ला झाला होता. मात्र, या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने सांगितले की, इस्त्रायलच्या लष्करी आणि संरक्षण सुविधांना लक्ष्य करण्यात आले आहे. हे घन इंधनावर चालणारे सामरिक क्षेपणास्त्र आहे, जे 2000-2500 किलोमीटरपर्यंत हल्ला करू शकते.

द नॅशनल इंटरेस्ट मासिकाच्या मते, या क्षेपणास्त्राची पोहोच इजिप्त, सुदानच्या काही भागांपर्यंत, युक्रेनच्या मोठ्या भागांपर्यंत, दक्षिण रशिया, पश्चिम चीन, भारत आणि हिंद महासागर तसेच भूमध्य समुद्राच्या मोठ्या क्षेत्रांपर्यंत असू शकते.

ट्रम्प म्हणाले, “अमेरिकन मीडिया आणि इराण बनावट बातम्या पसरवत आहेत”
ट्रम्प यांनी इराण युद्धाबाबत वृत्तांकन करणाऱ्या अमेरिकन मीडियावर तीव्र हल्ला चढवला. त्यांनी चुकीची माहिती पसरवणाऱ्या मीडिया आउटलेटवर देशद्रोहाचा खटला चालवण्याची मागणी केली.त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, ट्रुथ सोशलवरील एका पोस्टमध्ये ट्रम्प यांनी आरोप केला की इराण अमेरिकन मीडियावर प्रभाव पाडत आहे आणि इराण चुकीची माहिती पसरवण्यासाठी एआयचा वापर करत आहे.त्यांनी म्हटले की इराण आणि फेक न्यूज मीडिया अमेरिकेच्या युद्धनौका यूएसएस अब्राहम लिंकनला समुद्रात जळत असल्याचे दाखवण्यासाठी संगनमत करत आहेत. ट्रम्प यांच्या मते, जहाजाला आग लागली नव्हती किंवा हल्लाही झाला नव्हता.ट्रम्प म्हणाले की ही बातमी जाणूनबुजून खोटी आहे आणि अशा बातम्या देणाऱ्या मीडिया आउटलेटवर देशद्रोहाचा आरोप लावला पाहिजे.त्यांनी असेही म्हटले की सत्य हे आहे की इराणचे मोठे नुकसान होत आहे आणि ते एआयने तयार केलेल्या खोट्या कथांद्वारेच विजयाचा दावा करत आहे, ज्या भ्रष्ट मीडिया आउटलेट पसरवतात.

मसाप मध्ये सत्तापालट :साहित्य संवर्धन ला बहुमत

मिलिंद जोशी ,सुनीताराजे पवार यांचा पराभव करत योगेश सोमण आणि स्वाती महाळंक विजयी

पुणे : राज्यातील आद्य साहित्य संस्था असलेल्यामहाराष्ट्र साहित्य परिषद,पुणे या संस्थेच्या बहुचर्चित आणि चुरशीच्या निवडणुकीत साहित्य संवर्धन आघाडी विजय झाला.साहित्य संवर्धन आघाडीच्या उमेदवारांनी अध्यक्ष,प्रमुख कार्यवाह आणि कोषाध्यक्ष या तीनही पदांवर विजय मिळवत संस्थेत सत्तापालट घडवून आणला.परिवर्तन उत्कर्ष आघाडीचे तीन आणि विरोधकांच्या साहित्य संवर्धन आघाडीचे चार उमेदवार निवडून आले. साहित्य संवर्धन आघाडीला भाजपच्या नेत्यांनी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला होता. ‘मसाप’च्या विद्यमान पदाधिकाऱ्यांनी परिवर्तन उत्कर्ष आघाडी म्हणून ही निवडणूक लढवली होती; तर विरोधकांनी साहित्य संवर्धन आघाडी या नावाने निवडणूक लढवली.
‘मसाप’च्या निवडणुकीचे निकाल रविवारी रात्री उशिरा जाहीर झाले. सकाळी साडेअकरापासून सुरू झालेली मतमोजणी रात्री साडेनऊच्या सुमारास संपल्यानंतर निकालाची घोषणा दहा वाजता झाली. साहित्य संवर्धन आघाडीच्या योगेश सोमण, स्वाती महाळंक आणि प्रदीप निफाडकर यांनी अनुक्रमे अध्यक्ष, प्रमुख कार्यवाह आणि कोषाध्यक्ष या पदांवर विजय मिळवताना प्रा. मिलिंद जोशी, सुनीताराजे पवार आणि विनोद कुलकर्णी यांचा पराभव केला.

निवडणुकीचा निकाल
अध्यक्ष :
योगेश सोमण (मते ५३६५)विजयी. विरुद्ध प्रा. मिलिंद जोशी (मते ५३२०)
प्रमुख कार्यवाह : स्वाती महाळंक
(मते ५४१४) विजयी.
विरुद्ध सुनीताराजे पवार(मते ५२८५)
कोषाध्यक्ष : प्रदीप निफाडकर (मते ५५३६)विजयी. विरुद्ध विनोद कुलकर्णी (मते ५१६८)

अन्य विजयी उमेदवार
सुनील महाजन:८३९ मते (साहित्य संवर्धन आघाडी)
अंजली कुलकर्णी : ८०८ मते (परिवर्तन उत्कर्ष)
सुनेत्रा मंकणी:८१४ मते (साहित्य संवर्धन आघाडी)
प्रसाद मिरासदार:८३९ मते (साहित्य संवर्धन आघाडी)
माधव राजगुरू:७६६ मते (परिवर्तन उत्कर्ष )
नितीन संगमनेरकर:८०७ मते (साहित्य संवर्धन आघाडी)
डॉ. आशुतोष जावडेकर :८४७ मते (परिवर्तन उत्कर्ष )



या निवडणुकीत तीन शीर्ष पदांसाठी एकूण १६,६०७ मतांपैकी १०,९०१ मतदान झाले होते. यातील १०,७१३ मते वैध ठरली; तर १८८ अवैध ठरली. पुण्यातील स्थानिक कार्यवाह पदांसाठी १६३१ तर पुणे जिल्हा प्रमुख पदासाठी १५०६ एवढे मतदान झाले. मात्र प्रत्येक पदासाठी अगदी चुरशीची निवडणूक झाली.अध्यक्ष ,प्रमुख कार्यवाह आणि कोषाध्यक्ष या पदांचाही विजयाचा फरक अनुक्रमे अवघ्या ४५, १३० आणि ३६८ मतांचा ठरला.
पुणे जिल्हा प्रमुख पदांचा निकाल दुपारी दीड वाजताच स्पष्ट झाला; तर पुण्यातील सात स्थानिक कार्यवाह पदांचा निकाल दुपारी साडेतीनच्या सुमारास स्पष्ट झाला. तीन शीर्ष पदांच्या निकालाला मात्र रात्री दहा वाजले. यात जवळपास साहित्य संवर्धन आघाडीचे प्रत्येक उमेदवार आघाडीवर होते. त्यांच्या मतांची आघाडी एकवेळ १३०० मतांपर्यंत गेली होती. मात्र, शेवटच्या दोन फेऱ्यांमध्ये ही आघाडी ३०० मतांपर्यंत कमी झाली. मात्र शेवटच्या फेरीत साहित्य संवर्धन आघाडीच्या उमेदवारांनो आघाडी कायम ठेवत विजय मिळविला. या निवडणुकीसाठी अॅड. प्रताप परदेशी यांनी मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून, तसेच संजीव खडके आणि गिरीश केमकर यांनी सह निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.

साहित्य संवर्धन आघाडी ही समविचारी साहित्यप्रेमी आणि वाचककेंद्रित अशी आघाडी होती. निवडणुकीत आमचे उमेदवार बहुमताने विजयी झाले, याचा आनंद आहे. आमच्या आघाडीसाठी काम केलेल्या सर्वांचा हा विजय आहे. त्यांना हा विजय समर्पित करतो. यापुढे ‘मसाप’मध्ये कायद्याप्रमाणे, नियमानुसारच कारभार होईल.
-योगेश सोमण, मसापचे नवनिर्वाचित अध्यक्ष

महाराष्ट्र साहित्य परिषद ही संस्था मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचेजतन-संवर्धन करणारे मोठे व्यासपीठ आहे. ‘साहित्य संवर्धन आघाडी’ला मिळालेला हा विजय म्हणजे साहित्यप्रेमी, लेखक, वाचक आणि कार्यकत्यांनी व्यक्त केलेला विश्वास आहे. पुढील काळात परिषद अधिक सक्रिय, सर्वसमावेशक आणि तरुण पिढीला जोडणारी बनवण्याचा आमचा प्रयत्न असेल. मराठी साहित्याच्या
समृद्धीसाठी परिषद कटिबध्द असेल.-राजेश पांडे, मुख्य संयोजक, पुणे पुस्तक महोत्सव


जुन्या,प्रदूषण करणाऱ्या वाहनांना पुण्यात रस्त्यावर दिसताच प्रदूषण शुल्क आकारण्याचा प्रस्ताव

पुण्यात शिवाजीनगर आणि पेठ परिसरात ‘लो एमिशन झोन’ लागू करण्याबाबत प्रशासनाचे मंथन

पुणे, दि. १५ – पुणे शहरातील वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी शिवाजीनगर व पेठ परिसरात ‘लो एमिशन झोन’ (कमी प्रदूषण क्षेत्र) लागू करण्याबाबत प्रशासनाकडून विचारमंथन सुरू आहे. या क्षेत्रात जास्त प्रदूषण करणाऱ्या वाहनांना प्रवेशासाठी विशेष प्रदूषण शुल्क आकारण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात विविध तज्ञ संस्था आणि संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, पुणे महानगरपालिकेचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी व वाहतूक नियोजन क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते.

पुणे शहरातील वायू प्रदूषणाचे प्रमुख कारण वाहने असल्याचे विविध अभ्यासांमधून स्पष्ट झाले आहे. २०२० मध्ये झालेल्या अभ्यासानुसार पुणे महानगर परिसरातील एकूण सूक्ष्म कण (पीएम २.५) प्रदूषणापैकी सुमारे ४६ टक्के प्रदूषण वाहनांमुळे होत असल्याचे आढळून आले आहे. हे सूक्ष्म कण मानवी आरोग्यास अत्यंत घातक ठरतात.
तसेच २०२३ मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील पेट्रोल, डिझेल व सीएनजीवर चालणाऱ्या सुमारे ७० टक्के वाहनांमध्ये ‘भारत स्टेज-४’ किंवा त्यापेक्षा जुने इंजिन तंत्रज्ञान असल्याचे दिसून आले आहे. केंद्र शासनाने वाहनांमधून होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘भारत स्टेज’ उत्सर्जन मानके लागू केली असून सध्या ‘भारत स्टेज-६’ हे तुलनेने सर्वात कमी प्रदूषण करणारे इंजिन तंत्रज्ञान मानले जाते.

अभ्यासानुसार २००० पूर्वी नोंदणी झालेली एक कार जवळपास ११ आधुनिक ‘भारत स्टेज-६’ कारइतके प्रदूषण करते, तर जुन्या तंत्रज्ञानाच्या एका ट्रकमुळे सुमारे १४ आधुनिक ट्रकांइतके प्रदूषण होते. तसेच ‘भारत स्टेज-६’ डिझेल कारमधून होणारे सूक्ष्म कणांचे उत्सर्जन ‘भारत स्टेज-३’ डिझेल कारपेक्षा सुमारे ९० टक्के कमी असल्याचेही नमूद करण्यात आले.

या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर व पेठ परिसरात ‘लो एमिशन झोन’ लागू करण्याचा विचार आहे. या क्षेत्रात ‘भारत स्टेज-३’ किंवा त्यापेक्षा जुन्या इंजिन तंत्रज्ञानाच्या वाहनांना प्रवेशासाठी दररोज प्रदूषण शुल्क आकारले जाऊ शकते. संबंधित शुल्क आगाऊ भरले नसल्यास नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. पुढील टप्प्यात ही अट ‘भारत स्टेज-४’ वाहनांनाही लागू करण्याचा तसेच लो एमिशन झोनचा विस्तार शहरातील इतर भागांमध्ये करण्याचा विचार प्रशासन करत आहे. या व्यवस्थेची अंमलबजावणी कॅमेऱ्यांच्या माध्यमातून करण्याचा प्रस्तावही बैठकीत मांडण्यात आला.

बैठकीत जास्त प्रदूषण करणाऱ्या वाहनांच्या वापरावर नियंत्रण ठेवण्याबरोबरच शहरातील पदपथ अधिक चालण्यायोग्य करणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करणे, बससेवा वाढविणे तसेच नागरिकांना स्वच्छ व पर्यायी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देणे यांसारख्या उपाययोजनांवरही चर्चा करण्यात आली.

स्वच्छ हवा आणि आरोग्यदायी शहर निर्माण करण्याच्या दृष्टीने या उपाययोजना महत्त्वाच्या ठरणार असून याबाबत पुढील कार्यवाहीसाठी संबंधित विभागांकडून सविस्तर आराखडा तयार करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले.

‘झेन कथा’तून सत्याचे तर ‘कात्रजचा घाट’ पुस्तकातून सत्तेचे दर्शन : डॉ. श्रीपाल सबनीस

पुणे : बहुधार्मिक समाजात संवादाशिवाय मानवाचे अस्तित्व शक्य नाही. धार्मिकता वेगळी असली तरी गौतम बुद्ध, भगवान महावीर आणि महात्मा गांधी यांनी जगाला शांतता, करूणा आणि मावनतेचा संदेश दिला, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. ‘झेन कथा’तून सत्याचे तर ‘कात्रजचा घाट’ या पुस्तकातून सत्तेचे दर्शन घडते, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

झेन मास्टर सुदस्सन लिखित ‘झेन कथा’ आणि प्रा. सुधीर भालेराव लिखित ‘कात्रजचा घाट’ पुस्तकांचे प्रकाशन आज (दि. १५) डॉ. सबनीस यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. सदाशिव पेठेतील भारत इतिहास संशोधन मंडळाच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सिने कला दिग्दर्शक संतोष संखद, मैत्री प्रकाशनच्या मोहिनी कारंडे मंचावर होते.

जीएसटी अधिकारी प्रज्ञा बनसोडे-शिंदे, रमाई स्मारक समितीचे मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड यांची उपस्थिती होती. डॉ. सबनीस पुढे म्हणाले, संत आणि महापुरुषांनी जगाच्या कल्याणासाठी आपले आयुष्य वेचले. त्यांनी दाखविलेल्या मार्गाने गेल्यास जगात शांतता नांदेल.

संतोष संखद म्हणाले, झेन कथा या पुस्तकातून आयुष्याचे सार सांगितले आहे तर कात्रजचा घाट पुस्तकातील कथांमधून आपल्यासमोर खरीखुरी पात्रे उभी राहतात.

लेखनाविषयी बोलताना प्रा. सुधीर भालेराव म्हणाले, समाजात चांगली-वाईट माणसे असतात मात्र सकारात्मक दृष्टीकोनातून लिखाण केले आहे. झेन मास्टर सुदस्सन म्हणाले, बोधकथांची सूत्रबद्ध मांडणी पुस्तकात केली आहे. झेन कथा या अत्यंत प्रेरणादायक आहेत, अंर्तगामी मन विकासासाठी त्या अत्यंत आवश्यक असतात. प्रास्ताविक मोहिनी कारंडे यांनी केले. ललिता उबाळे यांनी सूत्रसंचालन केले.

अजून किती ‘वैष्णवी’ मृत्यूला कवटाळणार?:सासरच्या छळाला आणि पैशांच्या मागणीला कंटाळून 22 वर्षीय तरुणीची आत्महत्या

पुणे-लोणीकंद येथील बकोरी रोडवरील गोकुळ पार्क परिसरात एका 22 वर्षीय विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वैष्णवी लाटे असे मृत तरुणीचे नाव आहे.लग्नानंतर ८ महिन्यातच या २२ वर्षीय विवाहितेनेआत्महत्या केलीय.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, वैष्णवीचं यशवंत लाटे याच्याशी ११ मार्च २०२५ रोजी लग्न ठरलं होतं. लग्न ठरल्यानंतर त्यांनी नवीन घराचं बांधकाम केलं होतं. त्या घरात फर्निचरसाठी २ लाखांची मागणी यशवंत लाटे यानं केली होती. ते पैसेही यशवंतला देण्यात आले होते. तर ७ मे रोजी लग्नात मानपान आणि इतर संसार उपयोगी वस्तू दिल्या होत्या. लग्नानंतर काही महिन्यातच यशवंतने वैष्णवीचा छळ सुरू केला.

पती यशवंतचे मुलीसोबत चॅटिंग सापडल्यानंतर वैष्णवीने जाबही विचारला होता. तेव्हा तिला मारहाण करत माहेरी पाठवून दिलं होतं. आता पुन्हा नांदवायचं असेल तर पाच लाख रुपये आणि चारचाकी गाडी घेऊन ये असं म्हणत तिचा छळ केल्याचा आरोप माहेरच्या कुटुंबियांनी केला. शेवटी माहेरच्या लोकांनी १७ जानेवारी २०२६ रोजी पाच लाख रुपये रोख रक्कम दिली असंही वैष्णवीच्या कुटुंबियांनी म्हटलंय.

दरम्यान, घरात इंटेरियर करण्यासाठी २० लाखांची मागणी केली जात आहे. पैसे आणले नाही तर तोंड दाखवू नकोस अशी धमकी पतीने दिल्याचा फोन वैष्णवीने गेल्या आठवड्यात आईला केला होता. यानंतर वैष्णवीचे कुटुंबिय पतीच्या घरी गेले होते. पैसे आणले नाही तर मुलाचे दुसरे लग्न लावून देऊ असं वैष्णवीच्या सासरच्यांनी तिच्या आईला सांगितलं.

वैष्णवीचे आई भेटून गेल्यानंतर दुसर्‍याच दिवशी वैष्णवीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिने राहत्या घरात ओढणीने गळफास घेतला. या प्रकरणी तिच्या आईने पोलिसात तक्रार दिली असून पतीसह सासू सासऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

या घटनेमुळे विवाहित महिलांवरील छळाचा आणि हुंडाबळीचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. लग्नानंतर अवघ्या काही काळातच एका 22 वर्षीय तरुणीला कौटुंबिक छळामुळे आपला जीव गमवावा लागल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. सासरच्या जाचाला कंटाळून अजून किती ‘वैष्णवी’ अशा प्रकारे मृत्यूला कवटाळणार? असा संतप्त सवाल या निमित्ताने उपस्थित होत असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची चंद्रकांतदादा पाटील,नितेश राणे , महापौर नागपुरे यांनी घेतली भेट; तब्येतीची केली विचारपूस

पुणे-“आण्णा काळजी घ्या, लवकर बरे होऊन पुन्हा जोमाने कामाला लागा!” अशा शब्दात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना शुभेच्छा दिल्या.त्याचबरोबर नितेश राणे आणि पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनीही रुग्णालयात जाऊन मोहोळ यांची भेट घेतली .

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना २९ वर्षांपूर्वी कुस्ती खेळताना पायाला दुखापत झाली होती. त्यावर नुकतीच एक शस्त्रक्रिया करण्यात आली. या पार्श्वभूमीवर चंद्रकांतदादा पाटील यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी उपस्थित डॉक्टरांशीही चर्चा करून मोहोळ यांच्या प्रकृतीबाबत माहिती जाणून घेतली.

“आण्णा, स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्या आणि लवकरात लवकर बरे होऊन पुन्हा त्याच उत्साहाने जनसेवेच्या कामात सक्रिय व्हा,” अशी सदिच्छा चंद्रकांत दादा पाटील यांनी आणि मान्यवरांनी यावेळी व्यक्त केली.

हिंजवडी – शिवाजीनगर मेट्रोचा पहिला टप्पा मे, तर दुसरा टप्पा जुलैमध्ये सुरू होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

पुणे-पुण्यात सध्या ३३ किमी मेट्रो सुरू असून रोज अडीच लाख लोक तिचा वापर करत आहेत. गणपती उत्सवादरम्यान दररोज पावणेसहा लाख प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला. आता हिंजवडी ते शिवाजीनगर या २३ किमी लांबीच्या मेट्रो मार्गाचा पहिला टप्पा मे महिन्यात (११ किमी) आणि दुसरा टप्पा जुलै महिन्यात (१२ किमी) सुरू करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे मेट्रो भवनचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार मेधा कुलकर्णी, महापौर मंजुषा नागपुरे,सभागृहनेते गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, असीम गुप्ता आणि मेट्रोचे सीईओ श्रावण हर्डीकर उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पुणे मेट्रोला आज एक नवीन घर मिळाले आहे. कामाला सुरुवात होण्यास काही उशीर झाला असला तरी, त्यानंतर देशात सर्वाधिक वेगाने पुणे मेट्रोचे काम झाले आहे. मेट्रो स्टेशन आणि इतर उपाययोजना चांगल्या प्रकारे उभारण्यात आल्या आहेत. मेट्रोच्या सुचारू कामकाजासाठी सुसज्ज मेट्रो भवन आवश्यक आहे.
पुण्याच्या वाहतुकीला गती देण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. पुणे हे आयटी हबनंतर आता जीसीसी (ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स) क्रेझच्या दिशेने वाटचाल करत आहे, ज्यामुळे भविष्यात उच्च पगाराच्या नोकऱ्या उपलब्ध होतील. शहरात लवकरच जमिनीखालील रस्ते नेटवर्कही तयार केले जाईल, ज्यामुळे पुणे वाहतूक कोंडीमुक्त शहर बनेल.

पुणे हे सर्वाधिक नागरीकरण दर असलेले शहर आहे. त्यामुळे सर्व कामे एकत्रितपणे करावी लागतील आणि त्यासाठी आवश्यक निधीही दिला जाईल. पुण्याला सक्षम वाहतूक व्यवस्था दिली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितले की, पुणे मेट्रोचे काम मार्गी लावण्यासाठी अनेकांचा हातभार लागला आहे. दिवंगत अजित पवार यांनी पुण्याच्या प्रशासकीय वैभवात भर घालण्यासाठी विविध दर्जेदार इमारतींच्या उभारणीवर लक्ष केंद्रित केले होते. एकेकाळी सायकलींचे शहर म्हणून ओळखले जाणारे पुणे आता आधुनिक मेट्रो शहर म्हणून ओळखले जाईल, असेही त्या म्हणाल्या.

पुणे मेट्रोचे महाव्यवस्थापक श्रावण हर्डीकर यांनी माहिती दिली की, पुणे मेट्रोची स्थापना २०१५-१६ दरम्यान झाली. त्यानंतर विविध ठिकाणी कार्यालये स्थलांतरित करण्यात आली. अखेर आज शिवाजीनगर येथील सिव्हिल कोर्ट परिसरात हक्काचे ठिकाण मिळाले आहे.

बारामती व राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक जाहीर

मतदान 23 एप्रिलला तर 4 मे 2026 रोजी मतमोजणी होणार

मुंबई, दि. १५ : भारत निवडणूक आयोगाने देशातील सहा राज्यांतील आठ विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील राहुरी (जि. अहमदनगर) आणि बारामती (जि. पुणे) या दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.

राहुरी मतदारसंघाचे आमदार शिवाजी भानुदास कर्डिले आणि बारामती मतदारसंघाचे आमदार अजित अनंतराव पवार यांच्या निधनामुळे या जागा रिक्त झाल्या असून त्यासाठी ही पोटनिवडणूक घेतली जाणार आहे.

निवडणूक आयोगाने या निवडणुकांसाठी आवश्यक कार्यक्रम जाहीर केला असून मतदानासाठी सर्व मतदान केंद्रांवर इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) आणि व्हीव्हीपॅट (VVPAT) यांचा वापर करण्यात येणार आहे.

मतदारांची ओळख पटवण्यासाठी मतदार फोटो ओळखपत्र (EPIC) हा मुख्य पुरावा असेल. याशिवाय आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, बँक किंवा पोस्ट ऑफिस पासबुक, मनरेगा जॉब कार्ड, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड आदी कागदपत्रेही ग्राह्य धरली जाणार आहेत.

दरम्यान, निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच राहुरी आणि बारामती मतदारसंघात आचारसंहिता तत्काळ लागू झाली आहे. तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांची माहिती उमेदवार आणि राजकीय पक्षांनी प्रचार काळात तीन वेळा प्रसिद्ध करणे बंधनकारक असल्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

भारत निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार मतदान 23 एप्रिल 2026 रोजी होणार असून मतमोजणी 4 मे 2026 रोजी केली जाणार आहे.

जाहीर कार्यक्रमानुसार 30 मार्च 2026 (सोमवार) रोजी निवडणुकीसाठी राजपत्र अधिसूचना जारी केली जाईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 6 एप्रिल 2026 (सोमवार) निश्चित करण्यात आली आहे. दाखल झालेल्या अर्जांची छाननी 7 एप्रिल 2026 (मंगळवार) रोजी होणार आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 9 एप्रिल 2026 (गुरुवार) आहे. त्यानंतर संबंधित मतदारसंघांमध्ये 23 एप्रिल 2026 (गुरुवार) रोजी मतदान पार पडेल.

मतदानानंतर 4 मे 2026 (सोमवार) रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल. तर संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 6 मे 2026 (बुधवार) पर्यंत पूर्ण केली जाणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने सर्व यंत्रणांना आवश्यक तयारी करण्याच्या सूचना दिल्या असून आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

पुण्यात मेट्रोचे २०० किमीचे जाळे उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे मेट्रो भवनचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे, दि. १५ – पुणे मेट्रो प्रकल्पामुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना मिळाली असून पुणेकरांनी मेट्रो सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. सध्या दररोज सुमारे अडीच लाख प्रवासी मेट्रोचा वापर करत आहेत. भविष्यात पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पीएमआरडीए क्षेत्राचा समावेश असलेले जवळपास २०० किलोमीटरचे मेट्रो जाळे उभारण्याचे नियोजन असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. वेगाने विकसित होणाऱ्या नागरी विकासाचा विचार करून पुणे मेट्रो आणि नगर विकास विभागाने या संपूर्ण नेटवर्कचे सविस्तर नियोजन तातडीने करण्याचे निर्देश त्यांनी दिले. त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाहीदेखील श्री. फडणवीस यांनी दिली.

पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळकटी देणाऱ्या पुणे मेट्रो प्रकल्पाच्या प्रशासकीय मुख्यालय असलेल्या ‘मेट्रो भवन’चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

या प्रसंगी राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे,सभागृहनेते गणेश बिडकर , स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले , खासदार मेधा कुलकर्णी, आमदार योगेश टिळेकर, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, हेमंत रासने, बापू पठारे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार तसेच महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पुणे मेट्रो प्रकल्पाचे काम सुरुवातीला काही अडचणींमुळे उशिरा सुरू झाले असले तरी एकदा गती मिळाल्यानंतर अत्यंत वेगाने हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला. देशातील सर्वाधिक गतिमानतेने पूर्ण होणाऱ्या मेट्रो प्रकल्पांमध्ये पुणे मेट्रोचा उल्लेख केला जातो. मेट्रो स्थानकांचे आधुनिक डिझाइन, मल्टीमॉडल कनेक्टिव्हिटी, प्रवासी सुविधा तसेच अत्याधुनिक तांत्रिक प्रणाली या सर्व बाबींमध्ये उत्कृष्ट नियोजन करण्यात आले आहे.

सध्या पुणे शहरात सुमारे ३३ किलोमीटरचा मेट्रो मार्ग कार्यान्वित झाला आहे. टाटा समूहाच्या सहकार्याने देशातील पहिल्या सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) असलेल्या २३ किलोमीटरच्या मेट्रो प्रकल्पाचे कामही अंतिम टप्प्यात असून त्यापैकी १२ किलोमीटर मार्गाचे उद्घाटन मे महिन्यात, तर उर्वरित ११ किलोमीटर मार्ग जुलै महिन्यात सुरू करण्याचे नियोजनआहे. या दोन्ही प्रकल्पांसह पुण्यातील मेट्रोचे एकूण जाळे सुमारे ५६ किलोमीटरपर्यंत पोहोचणार आहे. याशिवाय आणखी ५५ किलोमीटरचे काम सुरू असून सुमारे ८० किलोमीटरचा विस्तार प्रस्तावित आहे. भविष्यात पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पीएमआरडीए क्षेत्राचा समावेश असलेले जवळपास २०० किलोमीटरचे मेट्रो नेटवर्क उभारण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुण्याचा वेगाने होणारा नागरी विकास लक्षात घेता या संपूर्ण २०० किलोमीटर नेटवर्कचे सविस्तर नियोजन तातडीने पूर्ण करावे, सर्व मार्गांचे डीपीआर एकत्रितपणे तयार करावेत तसेच भविष्यातील ग्रोथ सेंटर्स, नवीन विमानतळ, औद्योगिक क्षेत्रे आणि वाढती उपनगरे यांचा विचार करून मेट्रोचे जाळे विकसित करावे, अशा सूचना त्यांनी महामेट्रो प्रशासनाला दिल्या. पुढील काळात जमिनीवर, आकाशात आणि भुयारी मार्गांद्वारे वाहतूक व्यवस्था विकसित करून पुणे शहर वाहतूक कोंडीरहित आणि शाश्वत शहर बनविण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

पुणे मेट्रो भवन अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या, पुणे मेट्रो भवन केवळ प्रशासकीय मुख्यालय नसून आधुनिक पुण्याच्या प्रगतीचे प्रतीक आहे. अत्याधुनिक अभियांत्रिकी आणि सुयोग्य नियोजनाचा उत्कृष्ट नमुना असलेली ही इमारत पुण्याच्या प्रशासकीय वैभवात महत्त्वाची भर घालणारी ठरेल. पुणे मेट्रोसाठी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या कामाचेही त्यांनी स्मरण केले.

मुळा-मुठा नदीकाठावर उभारलेले हे भवन पर्यावरणाशी सुसंगत अशा पद्धतीने विकसित करण्यात आले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड ही राज्याच्या विकासाची महत्त्वाची केंद्रे असल्याने येथे वाढत्या लोकसंख्येमुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने रिंग रोड, रुंद रस्ते, सेवा रस्ते, भुयारी मार्ग, पूल तसेच मेट्रोसारखे मोठे प्रकल्प राबवून वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ठोस पावले उचलली असल्याचेही श्रीमती पवार यांनी नमूद केले.

स्वारगेट–कात्रज, पिंपरी-चिंचवड–भक्तीशक्ती चौक, वनाज–चांदणी चौक, रामवाडी–वाघोली, खडकवासला–खराडी, वारजे–नळस्टॉप तसेच हडपसर–सासवड आणि हडपसर–लोणी काळभोर या महत्त्वाच्या मेट्रो मार्गांना गती देण्यात आली आहे. भविष्यात पुणे विमानतळ आणि चाकण एमआयडीसी यांनाही मेट्रोने जोडण्याचा विचार पुढे नेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी प्रास्ताविकात पुणे मेट्रो प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली. मेट्रो भवनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या विविध सुविधांची माहितीदेखील त्यांनी दिली. आता पुणे मेट्रोला सुसज्ज असं मेट्रो भवन मिळालं आहे, निश्चितपणे अधिक गतीने आम्ही काम करु.

मेट्रो भवन, पुणे – ठळक वैशिष्ट्ये

▪️एकूण क्षेत्रफळ सुमारे ८,१५० चौ. मीटर.
▪️भव्य स्वागत कक्ष व पुण्याच्या सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडविणारी कला स्थापना.
▪️अनुभव केंद्रात पुणे मेट्रोचे जाळे व प्रकल्पाची मॉडेल्स.
▪️३१२ आसनक्षमतेचे सभागृह व बॅकअप संचालन नियंत्रण केंद्र, सिग्नलिंग व दूरसंचार सुविधा.
▪️काच दर्शनी भागामुळे नैसर्गिक प्रकाश, ऊर्जा कार्यक्षम व पर्यावरणपूरक रचना.

बंगालमध्ये 23 व 29 एप्रिलला मतदान:तामिळनाडूत 23 एप्रिल, आसाम-केरळ-पुद्दुचेरीत 9 एप्रिलला मतदान, सर्वांचे निकाल 4 मे रोजी

नवी दिल्ली-निवडणूक आयोगाने रविवारी आसाम, केरळ, पुदुच्चेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. तामिळनाडूमध्ये २३ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान होईल. दरम्यान, बंगालमध्ये मतदान दोन टप्प्यांत—२३ एप्रिल आणि २९ एप्रिल रोजी—पार पडेल. केरळ, आसाम आणि पुदुच्चेरी या तीन राज्यांमध्ये ९ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान घेण्यात येईल. या निवडणुकांचे निकाल ४ मे रोजी जाहीर केले जातील.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितले की, या पाच राज्यांमध्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात मिळून एकूण १७.४ कोटी मतदार आणि ८२४ जागांचा समावेश आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांनी पुढे नमूद केले की, गेल्या १२ महिन्यांत निवडणूक आयोगाने पारदर्शकता वाढवण्यासाठी अनेक नवीन उपक्रम राबवले आहेत. यातील पहिला उपक्रम ‘SIR’ हा होता; ही एक अशी उपाययोजना आहे जी मतदार यादीमध्ये कोणताही अपात्र व्यक्ती समाविष्ट राहणार नाही, याची खात्री करते. दुसऱ्या उपक्रमांतर्गत, मतदान केंद्राच्या बाहेर मोबाईल फोन जमा करणे अनिवार्य करण्यात आले आहे; मतदार आपले मतदान पूर्ण केल्यानंतर ते फोन परत घेऊ शकतात.

या घोषणेसह, या पाचही राज्यांमध्ये ‘आचारसंहिता’ (Model Code of Conduct) तात्काळ प्रभावाने लागू झाली आहे. २०२१ मध्ये, या पाचही राज्यांच्या निवडणुकांची घोषणा २६ फेब्रुवारी रोजी करण्यात आली होती. त्यावेळी, बंगालमधील निवडणुका आठ टप्प्यांत पार पडल्या होत्या, तर आसाममध्ये तीन टप्प्यांत मतदान झाले होते; तामिळनाडू, केरळ आणि पुदुच्चेरीमध्ये मात्र एकाच टप्प्यात मतदान घेण्यात आले होते. या पाचही राज्यांच्या विधानसभांची मुदत मे महिन्यात संपुष्टात येत आहे.