Home Blog Page 128

आंतरराष्ट्रीय पाली भाषा दिवस अनागरिक धम्मपाल बौद्ध परंपरेतील दीपस्तंभ : डॉ. सिद्धार्थ धेंडे

0

पुणे : बौद्ध धम्म प्रसारक व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विद्वान अनागरिक धम्मपाल ( श्रीलंका ) यांची 161 व्या जयंतीचे औचित्य साधून आज येरवडा नागपूरचाळ येथील त्रिरत्न विहारात पद्मपाणि फाउंडेशनच्या वतीने माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या अध्यक्षतेखाली आंतरराष्ट्रीय पाली भाषा दिवस साजरा करण्यात आला.

यावेळी डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी आपले विचार व्यक्त करताना अनागारीक धम्मपाल हे श्रीलंकेतून भारतात येऊन भगवान बुद्धाच्या विचारांना पुढे घेऊन जाण्यासाठी संपूर्ण हयात भर भारतात राहिले व त्यांनी भगवान बुद्धाची जन्मभूमी ही बौद्धांच्या ताब्यात असावी असा महत्त्वपूर्ण विचार या देशात रुजवल्याने त्यांची धम्मा विषयीचे महत्त्व यातून स्पष्ट होत आहे. आज अनागरिक धम्मपाल यांची जयंती संपूर्ण देशभर पाली भाषा दिवस म्हणुन साजरी होत आहे असे सांगितले.

यावेळी पाली भाषेचे महत्व सांगणायासाठी विशेष अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. पद्मपाणी फाउंडेशनचे राहुल डंबाळे यांनी अनागरिक धम्मपाल यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत बौद्ध धम्म चळवळीतील त्यांचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच सध्या सुरू असलेल्या बोधगया बुद्ध विहार महामुक्ती आंदोलनाचे तेच एक मात्र प्रणेते असून सुमारे 130 वर्षांपूर्वी त्यांनी हा लढा सुरु केला असल्याची माहीती दिली. प्राचीन असलेल्या पाली भाषा संवर्धनासाठी अनागारिक धम्मपाल यांचे कार्य अतुलनीय स्वरूपाचे असल्याने ते बौद्ध धर्म चळवळीसाठी कायम दीपस्तंभ असल्याचे डंबाळे यांनी सांगितले.

दरम्यान अनागरिक धम्मपाल यांच्या जयंतीचे औचित्य साधून पालीभाषा संवर्धनासाठी करण्यात येणाऱ्या विविध उपयोजनांची माहिती यावेळी देण्यात आली.

लोकअदालतीमध्ये अधिकाधिक नागरिकांना लाभ देण्याकरिता अद्ययावत प्रणाली विकसित करणार- सोनल पाटील

पुणे, दि. १८ सप्टेंबर : येत्या १३ डिसेंबर रोजी लोकअदालतीचे आयोजन करण्यात येणार असून यामध्ये अधिकाधिक नागरिकांना सहभागी करण्याच्यादृष्टीने अद्ययावत कार्यप्रणाली विकसित करण्याचे काम सुरु आहे. नागरिकांनी या लोकअदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केले.

श्रीमती पाटील म्हणाल्या, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष एम.के. महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली १३ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. नागरीकांकडून या लोकअदालतीला उर्त्स्फूत प्रतिसाद मिळाला. राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये तडजोडीसाठी दाखल २ लाख ४३ हजार ४२४ प्रकरणांपैकी १ लाख २७ हजार ५४१ प्रकरणे आणि विशेष मोहिमेत १७ हजार ५६० याप्रमाणे १ लाख ४५ हजार १०१ प्रकरणे यशस्वीपणे निकाली काढत पुणे जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. या माध्यमातून ६६५ कोटी ४४ लाख ८१ हजार ६२१ रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले असून यामध्ये वाहन चलनाची संख्या मोठी होती. तसेच ५ ते ६ हजार प्रकरणे निकाली काढून सुमारे १ कोटी रुपयांहून अधिक दंडाची रक्कम वसूल करण्यात आली व २ लाखापेक्षा जास्त प्रकरणे अजून प्रलंबित आहेत.

वाहनमालक, चालकांना विनाहेल्मेट दुचाकी चालविणे, सीटबेल्ट न लावता चारचाकी चालविणे, सिग्नल तोडणे, वेगमर्यादा ओलांडणे, चुकीचे पार्किंग, वाहन चालविताना मोबाइलचा वापर, विनापरवाना, विनापीयूसी वाहन चालविणे, फिटनेस प्रमाणपत्र नसणे, चुकीच्या लेनमध्ये वाहन चालविणे, नंबरप्लेट नसणे या वाहतूक नियमभंगात सवलतीत दंड भरता येईल, म्हणजेच तडजोड करता येईल.

मद्यपान करुन वाहन चालविणे, अपघात करुन पळ काढणे, निष्काळजीपणे वाहन चालवून प्राणांतिक अपघातास कारणीभूत होणे, अल्पवयीन मुलाने वाहन चालविणे, अनधिकृत शर्यत, गुन्ह्यांसाठी वाहनांचा वापर, न्यायालयात सुनावणी प्रलंबित असलेली प्रकरणे आणि अन्य राज्यातील वाहतूक नियमभंगांची चलने, अशा गंभीर स्वरुपाच्या वाहतूक नियमभंगांचा दंड लोकन्यायालयात माफ होत नाही, अशीही माहिती श्रीमती पाटील यांनी दिली.

लोकन्यायालयाच्या माध्यमातून पक्षकारास वाहनावरील दंडामध्ये सूट मिळून वाहनावरचे चलन निघते व खटल्याचा कायदेशीर निपटारा होऊन वाहन विक्री करण्यास किंवा पुढील कार्यवाही करण्यास मदत होते. न्यायालयाकडून समन्स येणे थांबते व पक्षकाराला नोकरी, व्यवसाय सोडून न्यायालयात हजर रहावे लागत नाही. दोनशे रुपयांच्या चलनासाठी पाच हजार रुपयांच्या वकीलाच्या फी पासून सुटका होते. न्यायालयाकडून काय निर्णय होईल, शिक्षा होईल, की निर्दोष सुटका होईल, या मानसिक व शारीरीक त्रासातून पक्षकाराची सूटका होते. या सर्वातून मुक्तता म्हणजेच लोकन्यायालयातील प्रक्रिया हा उत्तम पर्याय नागरिकांसाठी असून एकाच दिवशी कायदेशीर चलन, गुन्हा, दंड यातून नागरिकांची सहज सुटका होते, असेही श्रीमती पाटील म्हणाल्या.

विकसित मराठवाड्यासाठी गावाशी नाळ जोडलेली ठेवा-जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव व्यंकटराव गायकवाड

मराठवाडा सेवक प्रतिष्ठानतर्फे राज्यस्तरीय ‌‘मराठवाडा रत्न‌’ पुरस्कार प्रदान सोहळा

पुणे : विकसित देशासोबत विकसित मराठवाड्याचे स्वप्न साकार करण्यासाठी आपल्या गावाची नाळ जोडलेली ठेवा. नव्या स्टार्टअपची एक शाखा मराठवाड्यात सुरू करा, ज्यामुळे समाजोपयोगी कार्य घडेल, असे प्रतिपादन राज्याच्या जलसंपदा विभागाचे माजी सचिव व्यंकटराव गायकवाड यांनी केले.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून मराठवाडा सेवक प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय मराठवाडा रत्न पुरस्कार वितरण समारंभात ते अध्यक्षपदावरून बोलत होते. कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आज (दि. 17) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., मराठवाडा सेवक प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनकर चौधरी, ज्येष्ठ गायक पं. अजय पोहनकर, औसा नाथ संस्थानचे (जि. लातूर) पाचवे पीठाधीश गुरूबाबा औसेकर महाराज, कार्याध्यक्ष दिनेश सास्तुरकर आदी व्यासपीठावर होते.
पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर (आरोग्य), डॉ. दिनकरराव मोरे (जलसंवर्धन आणि पर्यावरण), राजेंद्र डहाळे (प्रशासकीय सेवा), ह.भ.प. नारायण महाराज पालमकर (अध्यात्म), सुभाष देशपांडे (संतसाहित्य), देविदास पाठक (पत्रकारिता), धनंजय जोशी (गायन), महादेव जगताप (सामाजिक सुरक्षा), रामचंद्र पवार (उद्योग), प्रसाद पाटील (कृषी तंत्रज्ञान), गणेश खरात (शैक्षणिक क्षेत्र) यांचा राज्यस्तरीय मराठवाडा रत्न पुरस्कार 2025 प्रदान करून गौरव करण्यात आला. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. संस्थेचे हितचिंतक प्रवीण शेट्टी, प्रकाश जगताप, सुनील शिंदे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
मराठवाडा सेवक प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनकर चौधरी यांनी स्वागतपर प्रास्ताविक केले. गुरूबाबा औसेकर महाराज यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. स्मरणिकेचे संपादक दिनेश सास्तुरकर यांनी मनोगत व्यक्त केले.
व्यंकटराव गायकवाड पुढे म्हणाले, मराठवाडा जेव्हा महाराष्ट्रात आला तेव्हा अवघी अडीच हजार एकर जमीन सिंचनाखाली होती. अतिमागासलेपणाचे हे उदाहरण होते. हे चित्र बदलण्यासाठी मराठवाड्यातील नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे. आपल्या उद्योगाची, एक शाखा आपल्या गावात सुरू केली पाहिजे, समाजाला ते उपकारक ठरेल.
पृथ्वीराज बी. पी. म्हणाले, मी प्रशासकीय अधिकारी म्हणून मराठवाड्यात 6 वर्षे काम केले आहे. मराठवाड्याच्या विकासाची संधी आत्ताच आहे. सर्वांनी एकत्रित प्रयत्न केले तर विकास शक्य आहे.
ह. भ. प. औसेकर महाराज म्हणाले,‌‘मराठवाडा ही संतांची भूमी आहे. या भूमीला ज्ञान, कला, कौशल्याचा मोठा वारसा आहे. केवळ मराठवाड्याचा विकास अशी दृष्टी न ठेवता, भारतमातेचा विकास, हा विचार ठेवला पाहिजे. अध्यात्माला सामाजिक आयाम दिला पाहिजे. कुठेही गेलात तरी आपली जन्मभूमी विसरू नका, असे आवाहनही त्यांनी केले.
पुरस्कारप्राप्त मान्यवरांपैकी देविदास पाठक, दिनकरराव मोरे, नारायण महाराज पालमकर आणि डॉ. रमण गंगाखेडकर यांनी प्रातिनिधिक मनोगत व्यक्त केले.
स्वत:मधील न्यूनगंड काढून टाका, ध्येय निश्चित ठेवा आणि आपल्या कामाचा देशासाठी उपयोग कसा होईल, याचा विचार करा. फक्त आपल्यापुरते पाहू नका, असा सल्ला डॉ. गंगाखेडकर यांनी दिला. पं. अजय पोहनकर यांनी ‌‘गोविंद जय जय, गोपाल जय जय‌’ या रचनेची झलक ऐकवली.
शिल्पा देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या पूर्वार्धात धनंजय जोशी आणि सहकाऱ्यांनी भक्तिनाट्यरंग हा गाण्यांचा कार्यक्रम सादर केला. सुभाष देशपांडे यांनी आभार मानले.

वॅस्कॉन इंजिनीयर्सचे आर्थिक वर्ष 27 पर्यंत 4000 कोटी रु.ची ईपीसी ऑर्डर बुक आणि 2500 कोटी रु. बांधकाम क्षेत्रातील प्रकल्पांचे लक्ष्य

पुणे : चार दशकांची समृद्ध परंपरा असलेली ईपीसी आणि रिअल्टी क्षेत्रातील आघाडीची कंपनी वॅस्कॉन इंजिनीयर्स लिमिटेड (VASCONEQ) ने मजबूत ईपीसी ऑर्डर बुक आणि पुढील 12–24 महिन्यांत झपाट्याने गती घेतील असे बांधकाम क्षेत्रातील आगामी मजबूत प्रकल्प यांवर प्रकाश टाकत आपल्या धोरणात्मक वाढीच्या दृष्टीकोनाची रूपरेषा स्पष्ट केली.

कंपनी सध्या 13 शहरांमध्ये सक्रिय असून ईपीसी व्यवसायासाठी सरकारी आणि खाजगी संस्थांबरोबर ऑर्डर गुणोत्तर 75:25 या प्रमाणात काम करत आहे. महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये सुफल, बिहार येथील 606 कोटी रु. मूल्य असलेले वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम, चेन्नईतील 416 कोटी रु. मूल्य असलेले केपजेमिनी आयटी पार्क प्रकल्प आणि 260 कोटी रु. मूल्य असलेला वेदांता टाऊनशिप प्रकल्प यांचा समावेश आहे.

या घोषणेबद्दल भाष्य करताना वॅस्कॉन इंजिनीयर्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. सिद्धार्थ वासुदेवन मूर्ती म्हणाले, “वॅस्कॉन इंजिनीयर्सची ताकद आमच्या ईपीसी आणि रिअल इस्टेट व्यवसायाचा समतोल प्रमुख भौगोलिक क्षेत्रांमध्ये राखण्यात आहे. पुणे आणि मुंबई येथे सध्या काम सुरु असलेले मजबूत प्रकल्प आणि जवळजवळ 3,000 कोटी रु. ची ईपीसी ऑर्डर बुक तसेच चालू आर्थिक वर्षात अतिरिक्त 2000 कोटी रु.च्या ऑर्डरचे लक्ष्य ठेवून आम्ही आमच्या वाढीचा प्रवास वेगाने पार करू असा आम्हाला विश्वास आहे.

मुंबई बाजारपेठेत, आम्ही ब्रँडेड आणि कॉर्पोरेट कंपन्या मर्यादित प्रमाणात असलेल्या 1–1.5 लाख चौरस फुट रेंजमधील प्रकल्पांवर लक्ष केंद्रित केले आहे. यामुळे आम्हाला जलद गतीने पर्यावरण मंजुरी मिळते आणि बऱ्याचदा मोठ्या प्रकल्पांना उशीर करणाऱ्या क्लिष्ट मंजुरी चक्रांपासून बचाव होतो.

आमचे लक्ष उच्च-मूल्य ईपीसी करारांमध्ये आमचे स्थान वाढवण्यावर, शहरी केंद्रांमध्ये पुनर्विकास आधारित गृहनिर्माण वाढवण्यावर आणि वित्तीय शिस्त राखण्यावर आहे. जवळजवळ चार दशकांची परंपरा आणि भारतभर 225 पेक्षा जास्त प्रकल्प पूर्ण केल्यानंतर आम्ही गुणवत्ता, वेग आणि विश्वासाने सेवा वितरण करत आहोत.”

पुण्यात, वॅस्कॉन ने प्रमुख ईपीसी करारांद्वारे आपले स्थान मजबूत केले आहे. यात 262 कोटी रु. मूल्य असलेले पुणे पोलिस स्टाफ क्वार्टर्स आणि मोशी, पिंपरी चिंचवड येथील 277 कोटी रु. मूल्य असलेली रुग्णालय इमारत आणि 96 कोटी रु. मूल्य असलेला पीएमआरडीए मधील  गृहनिर्माण प्रकल्प यांचा समावेश आहे. या प्रकल्पांव्यतिरिक्त, ईपीसी ऑर्डर बुक जवळजवळ 3,000 कोटी रु. आहे. त्यामुळे पुढील 18–24 महिन्यांत निवासी, संस्थात्मक आणि औद्योगिक क्षेत्रांमध्ये स्पष्ट अंमलबजावणी दृष्टीपथात आहे. रिअल इस्टेट क्षेत्राच्या बाबतीत पुणे महत्त्वाचे विकास केंद्र राहिले आहे. त्यात खाराडीतील टॉवर ऑफ असेंड आणि तळेगाव येथील गुड लाईफ  प्रकल्प सुरू आहेत. कल्याणी नगर येथील नियोजित प्रकल्प 1700 कोटी रु. ची GDV भर घालण्याची शक्यता आहे. एकूणच, पुणे रिअल इस्टेट मधील काम सुरु असलेले प्रकल्प सुमारे 1.3 दशलक्ष चौरस फुट विकास दर्शवतात. त्यांची अपेक्षित विक्री किंमत जेव्ही मॉडेल अंतर्गत 1700-2000 कोटी रु. आहे.

मुंबईत सांताक्रुझ येथील वॅस्कॉन ऑर्चीडस आणि सांताक्रुझ पश्चिम येथील प्रकाश सीएचएस प्रकल्पांसह वॅस्कॉनने पुनर्विकास प्रणीत धोरण मजबूत केले आहे समावेश आहे. आगामी पवई निवासी प्रकल्प 425 कोटी रु. विक्री उत्पन्न देण्याची अपेक्षा आहे. सांताक्रुझ, पवई आणि इतर मायक्रो-मार्केट्समधील पुनर्विकास आगामी प्रकल्प सुमारे 0.4 दशलक्ष चौरस फुट असून त्यांची  अपेक्षित विक्री किंमत 1050 कोटी रु. आहे. आर्थिक वर्ष 27 पर्यंत मुंबईतील चालू आणि नियोजित प्रकल्प कंपनीच्या एकूण रिअल इस्टेट पोर्टफ़ोलिओमध्ये सुमारे 50 टक्के योगदान देतील अशी अपेक्षा आहे. रिअल इस्टेट पुनर्विकास व्यतिरिक्त, मुंबई आणि पश्चिम भारतातील ईपीसी संधी देखील सक्रियपणे शोधल्या जात आहेत. त्यात संस्थात्मक आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांमधील टेंडर कंपनीच्या दीर्घकालीन ऑर्डर पाईपलाईनमध्ये भर घालत आहेत.

एकत्रितपणे, समग्र नजीकच्या काळातील रिअल इस्टेट प्रकल्प 1.94 दशलक्ष चौरस फुट असून त्याची अपेक्षित विक्री किंमत 2,360 कोटी रु. आहे. मिळालेल्या करारांची मजबूत अंमलबजावणी आणि महाराष्ट्र तसेच इतर राज्यांमधील नवीन ऑर्डरचा सतत पुरवठा प्रतिबिंबित करत ईपीसी व्यवसाय जवळजवळ 85 टक्के क्षमता वापरावर कार्यरत आहे.

लोढा ग्रुपचे माजी संचालक राजेंद्र लोढा यांना अटक:85 कोटींची फसवणूक आणि मंगलप्रभात लोढा यांच्या मुलाला जीवे मारण्याच्या धमकीचा आरोप

0

मुंबई- पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने बांधकाम क्षेत्रातील प्रसिद्ध लोढा ग्रुपचे माजी संचालक राजेंद्र लोढा यांना फसवणुकीच्या आरोपाखाली अटक केली आहे. या अटकेमुळे बांधकाम आणि उद्योग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. अटकेपूर्वीच राजेंद्र लोढा यांनी लोढा ग्रुपच्या संचालक पदाचा राजीनामा दिला होता.मुंबई पोलिसांनी लोढा ग्रुपचे माजी संचालक राजेंद्र लोढा यांना वरळी परिसरातून अटक केली असून, कोर्टाने त्यांना 23 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. राजेंद्र लोढा यांच्यावर लोढा ग्रुपची 85 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी दाखल केलेल्या एफआयआरनुसार, राजेंद्र लोढा यांनी लोढा ग्रुपचे सध्याचे संचालक आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे पुत्र अभिषेक लोढा यांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली आहे. या गंभीर आरोपांमुळे या प्रकरणाने आणखी वेगळे वळण घेतले आहे.

राजेंद्र लोढा यांच्यावर कारवाई होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी अभिषेक लोढा यांच्याकडे एक हस्तकला पाठवून त्यांना धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या हस्तकाच्या माध्यमातून त्यांनी आपण ‘सुसाईड बॉम्बर’ असल्याचे सूचित करत, कारवाई झाल्यास अभिषेक लोढा यांचे बरेवाईट करण्याची धमकी दिली. राजेंद्र लोढा यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करत अनेक ठिकाणी जमीन अधिग्रहण केल्याचा आणि लोढा ग्रुपचे काही फ्लॅट्स परस्पर विकल्याचा आरोप आहे, ज्यामुळे त्यांनी मोठी मालमत्ता जमा केली. यामुळे लोढा ग्रुपने त्यांच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली.

लोढा डेव्हलपर्सने यापूर्वीच जाहीर केले होते की राजेंद्र लोढा यांनी 17 ऑगस्ट 2025 पासून कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला होता. कंपनीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे आणि त्यांच्या वर्तनाशी संबंधित काही बाबी कंपनीच्या नैतिकता समितीच्या निदर्शनास आल्या होत्या. याच कारणामुळे गेल्या महिन्यात त्यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

मुंबईचं लोढा अन् कंबोजीकरण सुरू, संजय राऊतांचा भाजपवर घणाघात

मुंबई-देवेंद्र फडणवीस यांना ठाकरे ब्रँडची चिंता नाही तर भीती आहे.बेस्टच्या निवडणुकीत काय झाले हे मी आधीच सांगितले आहे. मुंबईतील बेस्ट डेपोसह संपूर्ण मुंबई फडणवीसांच्या पंखा खालील बिल्डरांनी ताब्यात घेतली आहे. मुंबईचे लोढा आणि कंबोजीकरण कसे झाले आहे हे मीडियाने समोर आणले पाहिजे.असे शिवसेना नेते आणि खासदार नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. मुंबई भाजपा अध्यक्ष यांनी ठाकरेंना मुंबईचा महापौर खान ला करायचे आहे अशी टीका काल केली या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले ,मुंबईचा महापौर हा मराठी आणि शिवसेनेचाच होईल. त्यांना जर खानांचा तिटकारा असेल तर त्यांनी हसन मुश्रीफ यांना मंत्रिमंडळातून दूर करावे देवेंद्र फडणवीस यांचा इतिहासाचा अभ्यास कच्चा आहे. त्यांना इतिहास आणि सामाजिक ज्ञान नाही. ते महाराष्ट्रात मोदी यांनी चिकटवलेले मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांना इतिहास माहिती नाही..अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती कुणी केले? आरिफ मोहम्मद खान यांना बिहारचे राज्यपाल कुणी केले, असे अनेक उदाहरण मला देता येतील. देशाच्या राजकीय-सामाजिक जडण- घडणीत आणि स्वातंत्र्य लढ्यात भाजप आणि आरएसएस नव्हता. पण मुस्लीम समाज सामाजिक चळवळ आणि देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मोठ्या प्रमाणात सक्रिय होता. त्यांनी हमीद दलवाई यांच्यासारख्या नेत्याचा देवेंद्र फडणवीस यांनी अभ्यास करावा.

एकनाथ शिंदे यांनी जर काही बेकायदेशीर कामे केली असतील मुळातच ते स्वत:च बेकायदेशीर आहेत. सध्याच्या सरकारमधील त्यांचे उपमुख्यमंत्रिपद त्यांचा पक्ष आणि चिन्ह हे सर्व बेकायदेशीर आहे. असा बेकायदेशीर व्यक्ती कायदेशीर काम करेल यांची अपेक्षा महाराष्ट्राने ठेवू नये, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. तर नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. ते बेकायदेशीर व्यक्तीला मांडीवर घेऊन बसले आहेत.

संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, शहा, फडणवीस यांनी शिंदेंवर कारवाई केली पाहिजे. कोर्टाने सांगण्याची गरज नाही. असेही हे सरकार कोर्टाचे ऐकत नाही. ते त्यांच्या खिशात आहे. कोर्टाने आदेश दिले पाहिजे नगरविकास खात्याच्या मंत्र्यांवर कारवाई करा असे, संजय राऊत यांनी म्हटले आहे.

खासदार संजय राऊत म्हणाले की, काल जो प्रकार झाला तो दुर्दैवी होता. त्यांचे आम्ही कुठेही राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न केला नाही. समाजामध्ये काही माथेफिरु लोक असतात. देशभरात ते अशा स्मारकावर चुकीचे काम करत असतात. शिवसैनिकांनी स्मारकाचे शुद्धीकरण केले आहे. पोलिसांनी त्यासंदर्भात तपास करत एका व्यक्तीला अटक केली आहे. समाजात असेही माथेफिरू लोक असतात. ते कोणताही राग कुठेही काढतात. यावर राजकीय भांडवल न करता कारवाई केली पाहिजे.

संजय राऊत म्हणाले की, नगरविकास खाते हे पैसे खाण्याचे सर्वांत मोठे कुरण झाले आहे. एकनाथ शिंदे यांना जी आर्थिक सूज आली आहे ती नगरविकास खात्यामुळे आली आहे. हे कोर्ट आणि देवेंद्र फडणवीस यांना माहिती नाही का? हिंमत असेल तर त्यांच्यावर कारवाई करा, नुसती निरीक्षणे नोंदवू नका.

४ हजार ठेवीदारांची फसवणूक करून बाणेर मध्ये ऐषोरामात राहणाऱ्या अर्चाना कुटेला CID ने पकडले

पुणे- तब्बल ४००० हून अधिक ठेवीदारांची फसवणुक प्रकरणी ज्ञानराधा मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटीच्या संचालक अर्चना सुरेश कुटे हिला अटक केली आहे. गेली दीड वर्षापासून कुटे फरार होती. दरम्यान, सीआयडीने बाणेर येथुन तिला अटक केली आहे. ४ हजाराहून अधिक ठेवीदारांचे सुमारे २ हजार ४७० कोटी रुपयांची फसवणूक केली आहे.ज्ञानराधा मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटीचे चेअरमन सुरेश कुटे याला सीआयडीने यापूर्वीच अटक केली आहे. अर्चना कुटे ही सुरेश कुटे याची पत्नी आहे.२ कोटी १० लाख ७५ हजार ३२० रुपयांचा ऐवज यावेळी तिच्याकडून हस्तगत करण्यात आला आहे .

बीड, जालना, तसेच छत्रपती संभाजीनगरमधील ठेवीदारांची फसवणूक प्रकरणात गेले दीड वर्ष फरार असलेल्या ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या फरार संचालक अर्चना सुरेश कुटे, आशा पद्माकर पाटोदेकर (पाटील) यांच्यावर सीआयडीने कारवाई केली आहे. या प्रकरणात संचालक मंडळाविरुद्ध ९५ गुन्हे दाखल आहेत. गुन्हे दाखल झाल्यानंतर संचालक अर्चना कुटे, आशा पाटोदेकर या पसार झाल्या होत्या.

बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटीचे संचालक मंडळ, चेअरमन, व्हाईस चेअरमन, सचिव, अधिकारी यांच्या विरोधात मे ते सप्टेंबर २०२५ मध्ये एकूण ९५ गुन्हे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या(सीआयडी) छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राकडे तपासाकरीता आहेत. कुटे आणि पाटोदेकर या बाणेर परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाल्यानंतर सीआयडीच्या पथकाने त्यांना अटक केली,’अशी मााहिती राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी दिली.

कुटे ग्रुपची बिजनेस प्रमोटर अर्चना कुटे हिने अपहरीत रक्कमेतून मिळवलेली जंगम मालमत्ता, ज्यात सोने ८० लाख ९० हजार ९५० रुपयांचे ६० नग, ५६ लाख ७५ हजार ५०० रुपयांचे चांदीचे २७० नग, ६३ लाख रुपयांची रोकड तसेच १० लाख रुपयांची बीएमडब्ल्यु, स्कुटी असा २ कोटी १० लाख ७५ हजार ३२० रुपयांचा मालमत्तेचा समावेश असून ही मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

सुरेश कुटे आणि त्याची पत्नी अर्चना कुटे यांनी ज्ञानराधा मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून ४ लाखांहून अधिक ठेवीदारांचे सुमार २ हजार ४७० कोटी रुपये जमा केले होते. या प्रकरणात एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट (ईडी)ने सुरेश कुटे आणि इतर आरोपींच्या ३३३ कोटींच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत.

ज्ञानराधा मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी या गुन्ह्यांमध्ये एमपीआयडी अंतर्गत आर्थिक गुन्हे शाखा बीड व सीआयडी छत्रपती संभाजीनगर यांनी एकूण २०७ मालमत्तेचे प्रस्ताव तयार करुन पुढील कारवाईकरीता सादर केलेले आहे. एकूण १३ संचालकांपैकी ९ संचालक व मुख्य आरोपी सुरेश ज्ञानोबा कुटे याची पत्नी अर्चना सुरेश कुटे हिला अटक केली आहे.

अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनील रामानंद, पोलीस उपमहानिरीक्षक अमोल गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त अधीक्षक किरण पाटील, उपअधीक्षक स्वाती थोरात, पोलीस निरीक्षक विजय पणदे, कारभारी गाडेकर, देवचंद घुणावत, सय्यद रफीक यांनी ही कारवाई केली.

नेमकं प्रकरण काय?
गतवर्षी कुटे ग्रुपच्या सर्वच समुहांवर इन्कम टॅक्स विभागाच्या वतीने छापा घालण्यात आला होता. मोठ्या प्रमाणात करचोरी केल्याचे उघडकीस आले होते. ‘द कुटे ग्रुप’वर इन्कम टॅक्स विभागाकडून कारवाई झाल्यानंतर त्याचा परिणाम ज्ञानराधा मल्टिस्टेटच्या व्यवहारावर झाला. मोठ्या प्रमाणात ज्ञानराधामध्ये ठेवी ठेवलेल्या ठेवीदारांना पैसे मिळण्यास अडचणी येऊ लागल्या. पॅनिक होऊ नका, शांततेत घ्या, कुटे ग्रुपला लोन मंजूर झाले आहे, अशी दीशाभूल कुटे ग्रुपकडून करण्यात येत होती. मात्र, वास्तविक पाहाता एक रुपयादेखील त्यांनी दिला नाही.अखेर सुरेश कुटे, अर्चना कुटे, आशिष पाटोदकर, यशवंत कुलकर्णी यांच्यासहित संचालक मंडळ व कर्मचार्‍यांवर बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, धाराशिव, पुणे अशा विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले.

दरम्यान, या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात बैठक घेतली होती. यावेळी गंभीर दखल घेत सीआयडीवर नाराजी व्यक्त केली होती. तसेच बहुराज्य सहकारी संस्था नियंत्रक विभागामार्फत सोसायटीच्या २३८ मालमत्ता जप्त करण्यासाठी विशेष मोहीम राबवा, असे निर्देश फडणवीस यांनी दिले होते. तसेच फरार १९ आरोपी सापडत नसल्यानेही मुख्यमंत्र्यांनी तपास यंत्रणेला खडेबोल सुनावले होते.

पोलिसांनी अधिकृत रित्या दिलेली माहिती अशी कि,’राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, छत्रपती संभाजीनगर या परिक्षेत्राकडे तपासावर असलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट को. ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लिमीटेड, जि.बीड चे संचालक मंडळ, चेअरमन, व्हाईस चेअरमन, सचिव, अधिकारी यांच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी मे २०२५, जुन २०२५, जुलै २०२५ व सप्टेंबर २०२५ पासुन ९५ गुन्हे राज्य गुन्हे अन्वेषण विभागा छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राकडे तपासाकरीता आहेत. मुख्य आरोपी अध्यक्ष सुरेश गानोबा कुटे याला या पुर्वी अटक करण्यात आलेली आहे. सदर गुन्हयांमध्ये पाहिजे असलेली मुख्य आरोपी सुरेश ज्ञानोबा कुटे याची पत्नी सौ. अर्चना सुरेश कुटे, बिजनेस प्रमोटर (संचालक), कुटे ग्रुप, रा. कुटेवाडी, ता.जि. बीड व सौ. आशा पच्याकर पाटोदेकर (पाटील), संचालक, ज्ञानराधा मल्टीस्टेट को. ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लिमीटेड, जि.बीड, रा.पाटोदा ता. धाराशिव यांचा पुणे येथे गुन्हे अन्वेषण विभाग छत्रपती संभाजीनगर पथक यांनी शोध घेवुन आज दि.१६.०९.२०२५ रोजी दोन्ही पाहीजे असलेल्या आरोपीतास ताब्यात घेऊन अटकेची कारवाई केली.
यापुर्वी दि.११.०९.२०२५ रोजी गुन्हे अन्वेषण विभाग, छत्रपती संभाजीनगर पथक हे पाहिजे आरोपी सौ. अर्चना सुरेश कुटे, बिजनेस प्रमोटर (संचालक), कुटे ग्रुप हिच्या अटक करण्याच्या अनुषंगाने कारवाईकरीता पुणे गेले असता आरोपी सौ. अर्चना सुरेश कुटे हिने अपहरीत रक्कमेतुन मिळवलेली जंगम मालमत्ता ज्यात सोने एकुण नग-६० किंमत अंदाजे ८०,९०,९५०/- रुपये, चांदी एकुण नग-२७० किंमत अंदाजे ५६,७५,५००/- रुपये, रोकड एकुण ६३,००,०००/- रुपये तसेच बीएमडब्ल्यु स्कुटी किंमत अंदाजे १०,००,०००/- रुपये असा एकुण २,१०,७५,३२०/- रुपयांचा मुद्देमाल गुन्हयामध्ये जप्त केलेला आहे.
ज्ञानराधा मल्टीस्टेट को. ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लिमीटेड, जि.बीड या गुन्हयांमध्ये एमपीआयडी अंतर्गत आर्थिक गुन्हे शाखा, बीड व गुन्हे अन्वेषण विभाग, छत्रपती संभाजीनगर यांनी एकुण २०७ मालमत्तेचे प्रस्ताव तयार करुन पुढील कारवाईकरीता सादर केलेले आहे. तसेच एकुण १३ संचालक मडळांपैकी ०९ संचालक व मुख्य आरोपी सुरेश ज्ञानोबा कुटे याची पत्नी सौ. अर्चना सुरेश कुटे, बिजनेस प्रमोटर (संचालक), कुटे ग्रुप यांना अटक करण्यात आलेली आहे.
सदरची कारवाई CID चे अपर पोलीस महासंचालक सुनिल रामानंद, पोलीस उपमहानिरीक्षक अमोघ गावकर, पोलीस अधीक्षक यशवंत काळे, संभाजीनगर यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक श्रीमती किरण पाटील,पोलीस उप अधीक्षक श्रीमती स्वाती थोरात,पोलीस निरीक्षक विजय पोलीस हवालदार कारभारी गाडेकर,. देवचंद घुणावत, सय्यद रफिक, चालक/सफौ यांनी केली.

केवळ साईड दिली नाही म्हणून मध्यरात्री घायवळ टोळीकडून फायरिंग

एकीकडे PM मोदींचा वाढदिवस शहरात धुमधडाक्यात साजरा होत असताना दुसरीकडे, घायवळ टोळीकडून गोळीबाराच्या घटनेने कोथरूड हादरलं

पुणे-गाडीला साईड दिली नाही म्हणून कोथरुड मधील शिंदे चाळीत गोळीबार करण्यात आला आहे.हा गोळीबार निलेश घायवळ टोळीकडून करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत असून गोळीबारात एकजण गंभीर जखमी झाला आहे. कोथरुडमधील सह्याद्री रुग्णालयात जखमीवर उपचार सुरु आहेत‌. घायवळ टोळीतील मुसा शेख, रोहित आखाड, गणेश राऊत आणि मयुर कुंभारे यांनी गोळीबार केल्याची माहिती आहे. मध्यरात्री कोथरुड भागात ही घटना घडलीय आहे. प्रकाश दुरगुडे असं गोळीबार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. आरोपींपैकी मयुर कुंभारेने गोळीबार केलेला आहे. तीन गोळ्या झाडल्यात. मानेला आणि मांडीला गोळी लागलीय‌.
मिळालेल्या माहितीनुसार, एका वाहनचालकाने घायवळ टोळीच्या गुंडाना पुढे जाण्यास साईड दिली नाही. याच कारणातून हे तिघे संतापले आणि त्यांनी कारमधील प्रकाश धुमाळ नावाच्या व्यक्तीवर गोळीबार केला. सुरुवातील तीन राऊंड फायर केल्याची माहिती मिळत होती. मात्र आता रात्री एकच राऊड फायरिंग केल्याचं सांगितलं जातंय. ही घटना कोथरूडच्या शिंदे चाळ परिसरात घडली. या गोळीबारात प्रकाश धुमाळ जखमी झाले असून, त्यांच्या पायाला गोळी लागली आहे. जखमीवर पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची आता प्रकृती कशी आहे, याची माहिती अद्याप समोर आली नाही. मात्र एकीकडे आंदेकर टोळीने केलेल्या गोळीबाराची घटना ताजी असताना आता घायवळ टोळीने गोळीबार केल्याने पुणेकरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.कोथरूड परिसरात निलेश घायवळ गँगच्या सदस्यांनी केवळ रस्ता न दिल्याच्या किरकोळ वादातून फायरिंग करून दहशत माजवल्याने खळबळ उडाली आहे .

हजार ड्रोनमधून PM मोदींना भव्य दिव्य सलामी…पुण्याच्या आकाशात झळकली संस्कृतीची गाथा अन् विकसित भारताचा संकल्प…

0


पुणे – हॅप्पी बर्थडे मोदी जी असा संदेश देत हजार ड्रोनरूपी तारका आकाशात झळकताना पाहून पुणेकरांच्या डोळ्याचे पारणे फिटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृतमहोत्सवी म्हणजे ७५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या संकल्पनेतून या ड्रोन शोचे आयोजन एसपी महाविद्यालयाच्या मैदानावर केले होते.
तीन किमी परिसरातही हा शो दिसणार असे मोहोळ यांनी जाहीर केले होते. त्यामुळे मैदानावर जेवढी गर्दी होती, तितकीच गर्दी मैदानाच्या चारही दिशांना होती.

लोक रस्त्यावर आकाशातील हा शो पहात होते. महाराष्ट्रात अशाप्रकारच्या शो चे पहिल्यांदाच आयोजन केले होते.जागतिक पटलावर पोहोचलेला पुण्यातील गणेशोत्सव याचे प्रतिक म्हणून गणपती बाप्पा, मराठीजनांचे दैवत असलेले संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू तुकाराम महाराज, महाराष्ट्राची अस्मिता असलेले छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छबी ड्रोनमधून सादर करण्यात आल्या. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची १२ वर्षांची पंतप्रधानपदाची कारकीर्द, त्यांनी घेतलेले मोठे, ठळक आणि धाडसी निर्णय याचे चित्ररूप आकाशात ड्रोनने रेखाटले.

विकसित भारत, आत्मनिर्भर भारत, राममंदिर, स्वच्छ भारत अभियान, नोटबंदी, जागतिक योग दिवस, मोदी यांचा त्यांच्या आईबरोबरचा हृदय संवाद, ग्यारह साल बेमिसाल, राममंदिर, संपूर्ण भारताचा नकाशा, पुलवामा हल्ल्याला दिलेले उरीतील सर्जिकल स्ट्राइक हे उत्तर आणि पहलगाम हल्ल्याला दिलेले ऑपरेशन सिंदूर हे उत्तर, मंगलयान मिशन, मेक इन इंडिया आणि कॉमन मॅनच्या आवाक्यातील विमान प्रवास आणि मोहोळ यांची स्वत:ची छबी या सगळ्या गोष्टी आकाशात रेखाटण्यात आल्या होत्या.

ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन

पुणे – ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे (वय ७८) यांचे काल सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने पुण्यामध्ये निधन झाले. ते अविवाहित होते. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी आज (गुरुवार) सकाळी ११ वाजता भारत इतिहास संशोधक मंडळात ठेवण्यात येणार आहे व त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

गेली ५० वर्षे त्यांनी इतिहासाच्या संशोधन कार्याला वाहून घेतले होते. शिवचरित्र आणि युद्ध इतिहासाचे ते गाढे अभ्यासक होते. त्यांनी शिवचरित्रावर मराठी आणि इंग्लिशमध्ये खूप मोठे ग्रंथ लिहिले आहेत, जे आज इतिहास क्षेत्रामध्ये जगप्रसिद्ध आहेत. ते क्रियाशील संशोधक होते. फारसी, मोडी, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन अशा विविध भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. इतिहासातील सत्य आणि असत्य हे उघड करणं हा त्यांचा आवडता विषय होता. सध्या ते इस्लामची ओळख आणि औरंगजेब या विषयावर संशोधन आणि लिखाण करत होते. १९७१ च्या युद्धात बांगलादेश आणि पाकिस्तान या दोन्ही सीमेवर युद्ध पत्रकार म्हणून स्वतः हजर होते, आणि त्यांचा त्यावरही अभ्यास होता. ते मिलिटरी सायन्सचे द्विपदवीधर होते. त्यांचा अनेक भाषांवर आणि इतिहासातल्या लिप्यांचा अभ्यास होता. त्यांनी शिवाजी झाला नसता तर, टिपू ॲज अ वॉर, शिवाजी लाईफ अँड टाईम, शिवचरित्र, मराठ्यांचे आरमार अशी अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांचा भांडारकर संस्था, भारत इतिहास संशोधक मंडळ तसेच विविध संस्थांशी निकटचा संबंध होता. सध्या त्यांचे दुसऱ्या महायुद्धावरच्या पुस्तकाचे काम सुरू होते, ज्याची सुमारे पाच हजार पाने लिहून प्रकाशित होण्यासाठी तयार झालेली आहेत.

होंडाची पहिली इलेक्ट्रिक बाईक WN7 लाँच:

पुणे-जपानी दुचाकी वाहन कंपनी होंडा ने आज (१७ सप्टेंबर) युरोपियन बाजारपेठेसाठी त्यांची पहिली पूर्ण आकाराची इलेक्ट्रिक मोटरसायकल, WN7 लाँच केली. कंपनीचा दावा आहे की ही EV ६०० सीसी पेट्रोल बाईकइतकीच शक्तिशाली आहे आणि पूर्ण चार्जवर १३० किमीची रेंज देईल. तिची किंमत १२,९९९ युरो किंवा अंदाजे ₹१५.५६ लाख आहे.

नोव्हेंबर २०२५ मध्ये होणाऱ्या EICMA शोमध्ये संपूर्ण स्पेसिफिकेशन्ससह ही बाईक सादर केली जाईल. त्यानंतर डिलिव्हरी सुरू होतील. कंपनीने भारतात इलेक्ट्रिक बाईकच्या लाँचिंगबद्दल अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. या बाईकची किंमत ₹१०-१२ लाख (एक्स-शोरूम, भारत) दरम्यान असण्याची अपेक्षा आहे.

WN7 मध्ये काय खास आहे?

ही नवीन इलेक्ट्रिक बाईक EICMA २०२४ मध्ये दाखवण्यात आलेल्या कॉन्सेप्ट मॉडेलपासून प्रेरित आहे आणि त्यात एकसारखीच मिनिमलिस्ट आणि नेकेड स्टाइल आहे. एकूण डिझाइन स्लिम आणि फ्युचरिस्टिक आहे. ही बाईक तीन रंगांच्या पर्यायांमध्ये येते: कॉपर अॅक्सेंटसह ग्लॉस ब्लॅक, मॅट ब्लॅक आणि ग्रे. तिचे वजन २१७ किलो आहे.

कामगिरी: १५ अश्वशक्तीची शक्ती आणि १३० किमी रेंज

होंडा म्हणते की ही बाईक “मजेदार सेगमेंट” साठी डिझाइन केली आहे, म्हणजेच कंपनीचे लक्ष रायडिंग मजेदार बनवण्यावर आहे. कामगिरीच्या बाबतीत ही इलेक्ट्रिक बाईक 600cc पेट्रोल बाईकशी जुळते आणि टॉर्कच्या बाबतीत 1000cc मॉडेल्सशी स्पर्धा करते.

ही बाईक युरोपमध्ये दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. एका प्रकारात १८ किलोवॅट (२४.५ एचपी) मोटर आहे आणि दुसऱ्यामध्ये ११ किलोवॅट (१५ एचपी) इलेक्ट्रिक मोटर आहे. दोन्ही वॉटर-कूल्ड मोटर्स आहेत ज्या १०० एनएम टॉर्क जनरेट करतात.
मोटारला CCS2 फास्ट चार्जिंग सपोर्टसह लिथियम-आयन फिक्स्ड बॅटरी पॅक पॉवर देत आहे. एका चार्जवर १३० किमी पर्यंत रेंजचा अंदाज आहे.
जलद CCS2 चार्जर वापरून फक्त 30 मिनिटांत बाईक 20% ते 80% पर्यंत चार्ज करता येते, तर 6kVA वॉल-बॉक्स होम चार्जर वापरून 3 तासांपेक्षा कमी वेळात पूर्ण चार्ज करता येते.

वैशिष्ट्ये: ५-इंच TFT स्क्रीन आणि LED लाइटिंग

होंडा डब्ल्यूएन७ मध्ये होंडा रोडसिंक कनेक्टिव्हिटीसह ५ इंचाची टीएफटी स्क्रीन आहे – ज्यामध्ये नेव्हिगेशन, कॉल/एसएमएस अलर्ट आणि ईव्ही विशिष्ट मेनू सारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे.

EV मध्ये पूर्णपणे LED लाइटिंग आहे, ज्यामध्ये ड्युअल पॉड हेडलाइट्स आणि समोरील बाजूस क्षैतिज DRL आहेत.

आरामदायी प्रवासासाठी, EV मध्ये समोर USD फोर्क्स आणि मागील बाजूस मोनो-शॉक अ‍ॅब्सॉर्बर आहेत. ब्रेकिंग समोर ड्युअल डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस सिंगल डिस्कद्वारे हाताळले जाते.

मारुतीची नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्ही व्हिक्टोरिस भारतात लाँच

पुणे-मारुती सुझुकीने भारतात त्यांची नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्ही व्हिक्टोरिस लाँच केली आहे. २०२३ मध्ये लाँच झालेल्या ग्रँड विटारा नंतर ही मारुतीची दुसरी मध्यम आकाराची एसयूव्ही आहे. ती कंपनीच्या एरिना डीलरशिप नेटवर्कवर विकली जाईल. कंपनीने तिची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत १०.५० लाख रुपये ठेवली आहे.

हे ६ प्रकारांमध्ये उपलब्ध आहे – LXI, VXI, ZXI, ZXI(O), ZXI Plus आणि ZXI+(O). आकर्षक बाह्य डिझाइन आणि आधुनिक इंटीरियरसह, व्हिक्टोरिसमध्ये मोठ्या टचस्क्रीन, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, हायब्रिड आणि CNG पर्यायांसह लेव्हल-२ ADAS सुरक्षा वैशिष्ट्यासह अनेक नवीन वैशिष्ट्ये देखील आहेत.

भारत एनसीएपीने केलेल्या क्रॅश टेस्टमध्ये या कारला ५-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. त्याची रचना इलेक्ट्रिक एसयूव्ही ई-विटारा वरून घेतली आहे. कंपनीने ३ सप्टेंबर रोजी हे जाहीर केले. ही कार ह्युंदाई क्रेटा, किया सेल्टोस, टोयोटा अर्बन क्रूझर हायरायडर, एमजी अ‍ॅस्टर आणि होंडा एलिव्हेट सारख्या वाहनांशी स्पर्धा करेल.

डिझाइन: आधुनिक आणि ठळक लूक

व्हिक्टोरिसमध्ये समोर जाड एलईडी हेडलाइट्स आहेत, जे पातळ ग्रिल कव्हरशी जोडलेले आहेत आणि वर क्रोम स्ट्रिप आहे. संपूर्ण शरीराभोवती जाड प्लास्टिक क्लॅडिंग देण्यात आले आहे, जे तिला रफ आणि टफ लूक देते, तसेच सिल्व्हर स्किड प्लेट देखील देते.

साइड प्रोफाइलमध्ये १८-इंच अलॉय व्हील्स, सिल्व्हर रूफ रेल आणि स्क्वेअर-ऑफ बॉडी क्लॅडिंग आहे, जे त्याला एक स्पोर्टी लूक देते. मागील बाजूस सेगमेंटेड एलईडी लाईट बार आणि ‘व्हिक्टोरिस’ बॅजिंग आहे. एकंदरीत, डिझाइन आधुनिक आणि प्रीमियम दिसते, जे शहरातील रस्त्यांपासून ते महामार्गांपर्यंत सर्व गोष्टींना अनुकूल असेल.

इंटीरियरबद्दल बोलायचे झाले तर, डॅशबोर्ड तंत्रज्ञानावर केंद्रित आहे, ज्यामध्ये १०.२५-इंच इन्फोटेनमेंट टचस्क्रीन, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि तीन-स्पोक स्टीअरिंग व्हील आहे. यात एका कुटुंबासाठी पुरेशी जागा असलेले ५-सीटर केबिन आहे. लेदरेट सीट अपहोल्स्ट्री, अॅम्बियंट लाइटिंग आणि ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल सारख्या वैशिष्ट्यांमुळे ते आरामदायी बनते.

इंजिन : तीन पर्याय उपलब्ध

प्रत्येक ग्राहकाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी व्हिक्टोरिसमध्ये तीन पॉवरट्रेन पर्याय उपलब्ध आहेत:

सौम्य हायब्रिड पेट्रोल: १.५-लिटर ४-सिलेंडर इंजिन जे १०३hp पॉवर निर्माण करते. ते ५-स्पीड मॅन्युअल किंवा ६-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह येते. ऑटोमॅटिक व्हर्जनमध्ये ऑल-व्हील ड्राइव्ह (AWD) चा पर्याय देखील आहे, ज्यामुळे ते ऑफ-रोडसाठी तयार होते.
मजबूत हायब्रिड: १.५-लिटर ३-सिलेंडर सेटअप, जो ११६ एचपी पॉवर देतो. हे ई-सीव्हीटी गिअरबॉक्ससह येते, जे चांगले मायलेज आणि सुरळीत ड्रायव्हिंग देईल.
पेट्रोल-सीएनजी: १.५-लिटर इंजिनचे सीएनजी व्हर्जन जे ८९ एचपी पॉवर जनरेट करते. ते ५-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडलेले आहे आणि अंडरबॉडी सीएनजी टँक बूट स्पेस मोकळी ठेवते.
हे सर्व पर्याय इंधन-कार्यक्षम आहेत, जे मारुतीचे वैशिष्ट्य आहे. परिमाणांचे तपशील अद्याप पूर्णपणे निश्चित झालेले नाहीत, परंतु मध्यम आकाराची कार असल्याने, ती ब्रेझापेक्षा मोठी आणि ग्रँड विटारापेक्षा अधिक कॉम्पॅक्ट असेल.

वैशिष्ट्ये आणि सुरक्षितता: पॅनोरामिक सनरूफ आणि लेव्हल २ एडीएएस

व्हिक्टोरिस ही वैशिष्ट्यांच्या बाबतीत अव्वल दर्जाची आहे. इन्फोटेनमेंटमध्ये १०.२५-इंचाची टचस्क्रीन आहे, जी वायरलेस अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोला सपोर्ट करते. ८-स्पीकर साउंड सिस्टममध्ये डॉल्बी अॅटमॉस तसेच कनेक्टेड कार तंत्रज्ञान आहे.

आरामदायी वैशिष्ट्यांमध्ये व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, पॅनोरॅमिक सनरूफ, वायरलेस चार्जर, ८-वे इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, हेड-अप डिस्प्ले, केबिन एअर फिल्टर आणि पॉवर्ड टेलगेट यांचा समावेश आहे.

सुरक्षेबद्दल बोलायचे झाले तर, ही मारुतीची पहिली कार आहे ज्यामध्ये लेव्हल २ एडीएएस (अ‍ॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम) आहे. मानक वैशिष्ट्यांमध्ये ६ एअरबॅग्ज, ईबीडीसह एबीएस, ट्रॅक्शन कंट्रोल, ब्रेक असिस्ट, हिल होल्ड कंट्रोल आणि आयएसओफिक्स चाइल्ड सीट अँकरेज यांचा समावेश आहे. उच्च प्रकारांमध्ये ३६०-डिग्री कॅमेरा, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (टीपीएमएस) आहे. भारत एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये या कारला ५-स्टार सेफ्टी रेटिंग देण्यात आले आहे.

मराठा समाजाचे दिल्लीमध्ये अधिवेशन घेणार- मनोज जरांगे

0

धाराशिव -मराठा समाज देशभरात विखुरला आहे. सर्व राज्यांतील समाजाला संघटित करण्यासाठी दिल्ली येथे सकल मराठा समाजाचे अधिवेशन घेण्यात येणार आहे, अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली.

धाराशिव येथे जरांगे यांच्या उपस्थितीत बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात १०१ फुटी ध्वजस्तंभाचे भूमिपूजन करण्यात आले. या वेळी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत जरांगे पाटील बोलत होते. ते म्हणाले की, देशभरातील विविध प्रांतांमध्ये विखुरलेल्या मराठा समजाला एकत्र यावे म्हणून दिल्लीत अधिवेशन घेण्यात येणार आहे. यासाठी तेथे पाच ठिकाणी मैदानाची पाहणी झाली आहे.

भुजबळांकडून ब्लॅकमेलिंग

मंत्री छगन भुजबळ सरकारला ओबीसी नेते असल्याचे सांगत सातत्याने ब्लॅकमेल करत असतात. ही बाब मुख्यमंत्र्यांनी ध्यानात घेण्याची गरज आहे. भुजबळ यांनी हैदराबाद गॅझेटच्या शासन निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले आहे. यामुळे मराठ्यांनाही त्यांच्याप्रमाणे भूमिका घ्यावी लागणार आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

येत्या १ मे पर्यंत सेवा हमी कायद्यांतर्गत अकराशे सेवा डिजीटल करणार-देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सेवा पंधरवड्याचे उद्घाटन_

आधुनिक तंत्रज्ञानाच्या उपयोगाद्वारे सामान्य माणसाचे जीवन सुलभ करण्यावर शासनाचा भर

पुणे, दि. १७: महसूल विभागाच्या विविध सेवा देतांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या उपयोगाद्वारे सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन आणले जाईल आणि त्याची सुरूवात सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने करण्यात येईल. सामान्य माणसाचे जीवन अधिक सुलभ करताना त्याच्या समस्या वेगाने दूर करण्यासाठी सेवा हमी कायद्यांतर्गत अकराशे सेवा येत्या १ मेपर्यंत डिजीटल पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आयोजित ‘सेवा पंधरवड्या’च्या राज्यस्तरीय शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानांतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दरम्यान राज्यभरात ‘सेवा पंधरवड्या’चे आयोजन करण्यात आले आहे.

याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महसूल राज्यमंत्री योगेश कदम, खासदार मेधा कुलकर्णी, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जमाबंदी आयुक्त डॉ. सुहास दिवसे, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक रवींद्र बिनवडे, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, सामान्य माणसाचे जीवन सुखी आणि समृद्ध करण्यासाठी शासनाच्या सेवा सुलभ असणे गरजेचे आहे. सेवा पंधरवडा आणि छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान हा त्याचाच भाग असून त्यामुळे अनेकांच्या जीवनात परिवर्तन आणण्याचे कार्य होणार आहे. शेतकऱ्यांसाठी पाणंद रस्‍त्यांचे महत्त्व ओळखून आणि त्यासंदर्भातील वाद टाळण्यासाठी या रस्त्यांचे जीआयएस मॅपींग करण्यात येणार आहे आणि येत्या काळात हा रस्ता तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आपसातील वाद संपुष्टात येतील. या पाणंद रस्त्यांमुळे या गावांचे अर्थकारण बदलेल, नाम फाऊंडेशनच्या सहकार्याने हा उपक्रम एक लोकचळवळ होईल, असा विश्वास श्री.फडणवीस यांनी व्यक्त केला.

लोकअदालतीद्वारे प्रलंबित प्रकरणे निकाली काढावीत
ई-नोंदणीच्या माध्यमातून सामान्य माणसाला होणारा त्रास कमी होणार आहे, ही अतिशय चांगली व्यवस्था आहे. कार्यालयात नोंदणी करण्यासाठीही चांगल्या सुविधा देण्यात येणार आहे. लोकअदालतीच्या उपक्रमाद्वारे अनेक वर्ष प्रलंबित असलेली प्रकरणे निकालात काढण्यास मदत होणार आहे. महसूल विभागात डिजीटायझेशन होत आहे, ब्लॉक चेन तंत्रज्ञान येत आहे. मात्र नवे तंत्रज्ञान उपयोगात आणताना मानवी चुकांमुळे नवीन प्रकरणे तयार होणार नाहीत याची दक्षता सर्वांनी घ्यावी आणि जुनी प्रकरणे लोकअदालतीच्या माध्यमातून निकाली काढावीत, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

डिजीटल सेवेद्वारे नागरिकांचे जीवन सुसह्य करण्याचा प्रयत्न
सेवा हमी कायद्यांतर्गत अकराशे सेवा डिजीटली देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या सेवांसाठी नागरिकांना शासकीय कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. यातील ४४ सेवांसाठी ९० टक्के नागरिक अर्ज करतात. म्हणून पुढील तीन महिन्यात या ४४ सेवा डिजीटल असतील, तर २६ जानेवारीपर्यंत २०० सेवा आणि १ मे २०२६ पर्यंत सर्व १ हजार १०० सेवा डिजीटल पद्धतीने, व्हॉट्सॲपवर उपलब्ध करून देण्यात येतील. कुठल्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय पारदर्शी पद्धतीने या सेवा उपलब्ध करून देण्यात येतील. नागरिकांच्या जीवनात सुलभता आणण्यासाठी महसूल विभागाने पुढाकार घेतला आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

देशाला प्रगतीच्या महामार्गावर नेण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे काम
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला दिलेल्या नेतृत्वामुळे भारताची प्रगती जगाला चकीत करीत आहे. २५ कोटी लोकांची गरिबी दूर करण्याचे कार्य गेल्या १० वर्षात झाले. सामान्य माणसाच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी शाश्वत उपाययोजना करण्यावर या काळात भर देण्यात आला. सामान्य माणसाला विकासाच्या मूळ प्रवाहात आणण्याचाही प्रयत्न होत आहे. त्यामुळे आज भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाला आहे.येत्या काळात तिसऱ्या स्थानी येईल. प्रगतीच्या महामार्गावर भारताला नेण्याचे काम, देशाला आत्मनिर्भर बनविण्याचे काम प्रधानमंत्र्यांनी केले, असे मुख्यमंत्री म्हणाले.

सेवा पंधरवड्यात नागरिकांच्या समस्या दूर व्हाव्यात-अजित पवार
उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, लोककल्याणासाठी लोकाभिमुख कामकाजावर शासनाचा भर आहे. सेवा पंधरवड्याच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यात येणार आहे. त्यासोबतच त्यांच्या घरकुलांची समस्या दूर करण्यात येणार आहे. नागरिकांचा त्रास कमी करण्यावर महसूल विभागाचा भर आहे. शेतरस्त्यांची मोजणी, सीमांकन होणार आहे. प्रलंबित प्रकरणांचे निराकरण होणार असून प्रत्येक शेताला १२ फूट रुंदीचा रस्ता उपलब्ध होणार आहे आणि याबाबतीत महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरणार आहे, असे सांगून त्यांनी महसूल विभागचे अभिनंदन केले. या कामात सातत्य टिकवून नागरिकाच्या समस्या दूर करण्यावर अधिकाऱ्यांनी भर द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

महसूल विभागाला चांगले काम करता यावे यासाठी चांगली वाहने देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्यातील सर्व शासकीय वास्तू सर्व सुविधायुक्त व्हाव्यात असा प्रयत्न आहे. पुणे शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या शासकीय वास्तू उभ्या रहात आहेत. महसूल विभागाची कामे दर्जेदार व्हावीत यासाठी आवश्यक सर्व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

आडाची वाडी गावात सर्व पाणंद रस्ते खुले करण्यात आले असून त्याला महापुरुषांची नावे देण्यात आली आहे. सामाजिक उत्तरदायित्व निधीतून या रस्त्यांसह अन्य रस्ते सिमेंटचे करून वृक्षारोपणाचे काम करण्यात आले आहे. इतर गावांनीही या गावाचा आदर्श घ्यावा असे सांगून उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांचे उपमुख्यमंत्री पवार यांनी अभिनंदन केले.

नव्या तंत्रज्ञानाद्वारे महसूल विभाग गतिमान करण्यावर भर-चंद्रशेखर बावनकुळे
महसूल मंत्री श्री.बावनकुळे म्हणाले, महसूल विभाग लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी प्रयत्न सुरू असून विभागातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मागील सात महिन्यात या दिशेने उपयुक्त कामगिरी केली आहे. पाणंद रस्त्यांचे सीमांकन करण्याचे काम भूमी अभिलेख विभागाने केले आहे. आडाच्या वाडीने १५ पाणंद रस्ते तयार करून राज्याला मार्गदर्शक काम केले आहे. येत्या काळात विविध योजनांचे एकत्रिकरण करून राज्यातील सर्व पाणंद रस्ते तयार करण्यात येतील. पुढील पाच वर्षात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचा शासनाने निर्धार केला आहे. महसूल विभागात नवीन तंत्रज्ञानाच्या उपयोगासाठी शंभर कोटी रुपये देण्यात आले आहेत. महसूल अधिकाऱ्यांना नवीन वाहने उपलब्ध करून देण्यात येत आहेत. महसूल विभाग सामान्य नागरिकांना त्यांचे हक्क देण्यासाठी गतिमानतेने काम करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आकारी पड जमीनी परत करण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांना शैक्षणिक दाखले काढण्यासाठी स्टॅम्प पेपरची आवश्यकता लागणार नाही. शेतकऱ्यांचे आपसातील वाद मिटविण्यासाठी सलोखा योजना सुरू करण्यात आली. जिवंत सातबारा मोहीम यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. पाणंद रस्त्यासाठी मुरुमासाठी कुठलेही स्वामित्व धन न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तुकडेबंदी कायदा रद्द केल्यानंतर राज्यातील थांबलेले ५० लक्ष कुटुंबांचे दस्त पूर्ण होतील. आता राज्यात कुठल्याही भागातून इतर भागातील नोंदणी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग सुरू करण्यात येणार आहे. सद्या जिल्ह्यात कोठूनही दस्त नोंदणी करण्याचा नवा नियम केला. येत्या काळात संपूर्ण राज्यात कोठेही दस्त नोंदविता येईल असा नियम करू. राज्याने एम- सँड धोरण स्वीकारले आहे. घरकुलांसाठी ५ ब्रास वाळू मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील जनतेला पुढील डिसेंबरपर्यंत स्वामित्व देण्याचा प्रयत्न असल्याचे श्री.बावनकुळे यांनी सांगितले.

महसूल मंत्र्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या उपयोबाबाबत नोंदणी व मुद्रांक आणि जमाबंदी आयुक्त कार्यालयाचे अभिनंदन केले. शेतकऱ्यांची मागील ३० वर्षापासून प्रलंबित ११ हजार प्रकरणे लोक अदालतीच्या माध्यमातून निकाली काढल्याबद्दल विभागीय आयुक्त डॉ.पुलकुंडवार आणि जिल्हाधिकारी श्री.डुडी यांचेही त्यांनी अभिनंदन केले.

राज्यमंत्री कदम यांनी अभार प्रदर्शन केले. पाणंद रस्ते खुले करण्याचे महत्वाचे काम छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत होत आहे. यासोबत अनेक लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येत आहे. महसूल विभाग सर्व योजना यशस्वीरितीने राबवेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

श्री.पाटेकर यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. पाणंद रस्ते योजनेच्या माध्यमातून राज्यात चांगले रस्ते बनविण्यासाठी नाम फाऊंडेशन सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

अपर मुख्य सचिव श्री.खरगे यांनी सेवा पंधरवड्याविषयी माहिती दिली. महसूल विभाग अधिकाधिक नागरिकांशी थेट संबंध असलेला महत्वाचा विभाग आहे. सेवा पंधरवड्यात महसूल विभागाच्या सेवा नागरिकांपर्यंत थेट पोहोचविण्यात येणार आहेत. पाणंद रस्त्यांसारखा शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय, नागरिकांच्या घरकूलांच्या समस्या आणि जिल्हाधिकारी स्तरावरील सेवांचा समावेश छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानात करण्यात आला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्म दिनानिमित्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात व गावपातळीवर लोककल्याणाचे उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. महसूल विभाग तंत्रज्ञानाच्या उपयोगाद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले.

जमाबंदी आयुक्त डॉ.सुहास दिवसे यांनी त्यांच्या विभागाच्या उपक्रमांची माहिती दिली. महसूल विभागाच्या विविध उपक्रमांमध्ये जमाबंदी आयुक्त कार्यालयाद्वारे उन्नत तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत आहे. घर असलेल्या प्रत्येक नागरिकाला स्वामित्व कार्ड देण्यात येणार आहे. जमाबंदी आयुक्त कार्यालयाच्या कामकाजाची माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महसूल विभागाच्या विविध उपक्रमांचे उद्घाटन
मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते विविध योजनांचे लाभ वितरण करण्यात आले. पुणे जिल्ह्यातील दहा नाविन्यपूर्ण प्रकल्प, पाणंद रस्त्यासाठी ‘ई-ग्राम’ जीआयएस प्रणाली, जमाबंदी आयुक्त यांचेकडील ‘जमीन माहितीपीठ’ डॅशबोर्ड आणि नोंदणी मुद्रांक विभागाच्या ‘ई-प्रमाण’ प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नाम फाऊंडेशन आणि जिल्हाधिकारी कार्यालयात सामंजस्य करार करण्यात आला. या करारांतर्गत ई-ग्राम प्रणाली अंतर्गत सीमांकन करण्यात येणारे रस्ते तयार करण्यासाठी नाम फाऊंडेशनचे सहकार्य होणर आहे. महाविद्यालये व ग्रामपंचायतींना द्यावयाच्या प्रमाणपत्रांचे आणि घरकूल लाभार्थ्यांना दिलेल्या जमीनपट्ट्यांचे वितरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्री श्री.फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी अन्य मान्यवरांसह ‘एम -सँड’ एक्स्पोला भेट देऊन माहिती घेतली.

कार्यक्रमाला आमदार उमा खापरे, विक्रांत पाटील, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, चेतन तुपे, सुनिल शेळके, बाबाजी काळे,हेमंत रासने, शंकर जगताप, बापूसाहेब पठारे, महसूल अपर आयुक्त कविता द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आदी उपस्थित होते.

‘एम -सँड’ धोरणाबाबत परिसंवादाचे आयोजन
कार्यक्रमापूर्वी राज्याच्या ‘एम -सँड’ धोरणाबाबत परिसंवाद आयोजित करण्यात आला. यात ‘एम -सँड’ धोरणाबाबत खाण उद्योजक, बांधकाम व्यावसायिक, जमीन मालक आदींनी व्यक्त केलेल्या शंकांना उत्तरे देण्यात आली. सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपले ‘खनीकर्म आराखडा’ आणि ‘खनीकर्म झोन’ घोषित करावेत. खाणपट्ट्यांना ना-हरकत देण्याची कार्यपद्धती सुलभ करावी. बांधकाम व्यावसायिकांना बांधकामसाठीच्या उत्खननातून निघालेल्या गौणखनिजाच्या रिसायकलिंगसाठी ना हरकत कालावधी ‘रेरा’ परवानगीशी सुसंगत करावा, आदी निर्देश यावेळी महसूलमंत्र्यांनी दिले. ड्राय सँड बाबतही आगामी काळात धोरण आणले जाईल असेही ते म्हणाले.

डोळ्याचे आरोग्य जपण्यासाठी मोबाईलचा अतिवापर टाळा

महिलांसाठी मोफत नेत्र चिकित्सा शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी,पुणे (दि. १७ सप्टेंबर २०२५) मोबाईलच्या अतिवापरामुळे डोळ्यात कोरडेपणा वाढतो. चष्म्याचा नंबर सारखा बदलतो. हे टाळण्यासाठी मोबाईल,लॅपटॉप संगणकाचा वापर कमी करावा, पापणीची सतत उघडझाप करावी, भरपूर पाणी प्यावे, दर एक तासांनी डोळ्यांना विश्रांती द्यावी, आकाशाकडे पहावे अशा टिप्स ईशा नेत्रालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. वैभव अवताडे यांनी नेत्र तपासणी शिबिरात दिल्या.
ईशा नेत्रालय आणि वर्षा सातुर्डेकर सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिवंगत सौ. वर्षा नंदकुमार सातुर्डेकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ
बुधवारी ईशा नेत्रालय चिंचवड स्टेशन येथे महिलांसाठी मोफत नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. अवताडे बोलत होते.

नेत्रचिकित्सा शिबिराचे उद्घाटन ईशा नेत्रालयाचे चिंचवड शाखा प्रमुख दीपक कदम यांच्या हस्ते झाले. यावेळी संयोजक नंदकुमार सातुर्डेकर, डॉ. जयशील नाझरे, मार्केटिंग मॅनेजर यशवंत बो-हाडे, शिवानी शिंदे, दुर्वांक्षी पाटील, प्राची इनामदार, राधा सातुर्डेकर उपस्थित होते.
यावेळी आधुनिक पद्धतीने नेत्र तपासणी करण्यात आली त्याबरोबरच डोळ्यांचे आजार तसेच डोळ्यांची काळजी कशी घ्यावी याबाबत डॉ. वैभव अवताडे, डॉ. जयशील नाझरे यांनी मार्गदर्शन केले.
तपासणीसाठी आलेल्या महिलांनी विचारलेल्या विविध शंकांचे यावेळी डॉ. अवताडे यांनी निरसन केले. सकाळी उठल्यावर डोळ्यांना लाळ लावणे योग्य आहे का? या प्रश्नावर ते म्हणाले की,असे करणे अयोग्य आहे. कारण आपण ब्रश केलेला नसतो, बॅक्टेरिया वाढलेले असतात. काळे बुबुळ निकामी होऊ शकते.
डोळ्यांवर पाणी मारावे का ? असे विचारले असता डोळ्यात अश्रूचे प्रमाण कमी असते. पाणी मारून शिल्लक अश्रू आपण वाहून घालवतो त्यामुळे डोळ्यावर पाणी मारणे अयोग्य असल्याचे ते म्हणाले.
आपल्या भाषणात आहारात ओमेगा ३ फॅटीऍसिड असणे गरजेचे असल्याचे डॉ. अवताडे यांनी सांगितले. त्यावर हे कोणत्या पदार्थात असते असा प्रश्न केला असता यासाठी तीळ, जवस बदाम मासे खाल्ले पाहिजेत असे ते म्हणाले.
यावेळी सेंटर हेड दीपक कदम म्हणाले की, ईशा नेत्रालयाच्या महाराष्ट्रात आठ शाखा आहेत. नववी शाखा लवकरच वाकड येथे होत आहे. सर्व मशिनरी युएसइडीए मान्यताप्राप्त आहे. ॲडव्हान्स तंत्रज्ञान जर्मन टेक्नॉलॉजी, जागतिक व अत्याधुनिक सुविधा असलेले एनएबीएच प्रमाणित हे नेत्र रुग्णालय आहे. सन २००० पासून १६ लाख रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. तर दोन लाखाहून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. मोतीबिंदू शस्त्रक्रिया, रेटीना व कॉर्निया उपचार, लॅसिक व लेझर दृष्टी सुधारणा, ग्लॉकोमा व्यवस्थापन, बाल नेत्र चिकित्सा, ओक्यूलोप्लास्टि, ड्राय आय उपचार केले जातात. चिंचवड शाखेत दररोज शंभर हून अधिक रुग्णांची तपासणी केली जाते. महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू असलेले हे नेत्रालय आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेत तसेच हेल्थ इन्शुरन्स कंपन्यांसोबत टायप आहे. अठरा वर्षापेक्षा जास्त अनुभव असलेले सुपर स्पेशालिस्ट येथे कार्यरत आहेत. असे कदम म्हणाले
शिबिराच्या आयोजनासाठी यशवंत बो-हाडे , नंदकुमार सातुर्डेकर, राधा सातुर्डेकर, कोमल माटे, रेश्मा बोबडे यांनी पुढाकार घेतला होता.