Home Blog Page 127

उपमहापौरपद दिले पण सन्मान दिला जात नाही; परशुराम वाडेकरांचा गजब दावा

पुणे:महापालिकेच्या निवडणुकीत सत्ता आल्यानंतर भाजपने आरपीआयला उपमहापौरपद दिले. पण कधी कधी काही बैठकांना महापौरांच्या शेजारी उपमहापौरांची बसण्याची व्यवस्थाही केली जात नाही.अशी गजब खदखद उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी व्यक्त केली. दरम्यान वाडेकर देखील उपमहापौर पद मिळाल्यावर सिनिअर कार्यकर्त्यांना देखील विचारत नसल्याची चर्चा झडते आहे.जे लोक आज मान-सन्मानाची अपेक्षा करत आहेत, त्यांनी कधी सामान्य, प्रामाणिक आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना तो सन्मान दिला आहे का? लहान कार्यकर्ते, नवीन कार्यकर्ते किंवा अगदी वरिष्ठ कार्यकर्त्यांनाही योग्य मान दिला गेला का? असे ही सवाल केले जात आहेत.
दरम्यान, वाडेकर यांनी असेही म्हटले आहे की,शहरातील विविध भागात झालेल्या कार्यक्रमांमध्ये उपमहापौरांसाठी जागा न ठेवल्याने अनेक कार्यक्रमांसाठी प्रेक्षकांमध्ये बसून साक्षीदार झालो. या पदापर्यंत संघर्ष करत आलो. यापुढील काळातही संघर्ष करत राहणार आहे. उपमहापौर पदासाठी दिला जाणारा सन्मान दिला जात नाही.उपमहापौरपदावर काम करणाऱ्या व्यक्तीला यापूर्वी योग्य मान दिला जात होता. मात्र आता त्या सन्मानाचा विसर पडल्याची तक्रार महापालिकेचे उपमहापौर वाडेकर यांनी केली. वाडेकर यांच्या या विधानाने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध भागात आयोजित करण्यात आलेल्या ‘महापौर चषक क्रीडा’ स्पर्धांच्या निमित्ताने उपमहापौरपदाला जाणीवपूर्वक डावलले जात आहे. महापौर चषक क्रीडा स्पर्धेतील एक स्पर्धा औंध-बोपोडी या प्रभागात आयोजित करूनही त्या कार्यक्रमासाठी उपमहापौर म्हणून डावलण्यात आल्याचे परशुराम वाडेकर यांनी सांगितले. हे प्रकार नजरचुकीने होतात की जाणीवपूर्वक हेच समजत नाही, असेही वाडेकर यांनी सांगितले.

महापालिकेत सत्ताधारी झालेल्या भाजपने मित्रपक्ष असलेल्या आरपीआयच्या नगरसेवकांसाठी उपमहापौरपद सोडले असले तरी या पदासाठी असलेला सन्मान मात्र भाजपकडून मिळत नसल्याचे समोर आले आहे. महापौर कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या अनेक कार्यक्रमांना उपमहापौर यांना निमंत्रण पाठविले जात नाही. अनेकदा बैठका होऊन गेल्यानंतर ‘तुम्हाला निमंत्रण देण्यात आले नव्हते का?’ अशी विचारणा महापौरांकडून होते. महापौर कार्यालयातील संबधित व्यक्तींशी बोलून माहिती घेतली जाईल, असे सांगत महापौरांकडून केवळ समजूत काढली जाते. मात्र त्यानंतरही पुन्हा तशाच पद्धतीचे प्रकार घडत असल्याचे उपमहापौर वाडेकर यांनी सांगितले.

12,000 हून अधिक छापे टाकण्यात आले ; 15,000 हून अधिक एलपीजी सिलिंडर्स केले जप्त

भीतीपोटी बुकिंग करणे टाळण्याचे आणि एलपीजी सिलिंडर बुकिंगसाठी डिजिटल माध्यमांचा वापर करण्याचे नागरिकांना आवाहन

एलपीजी इंधनवाहू जहाज ‘शिवालिक’ काल भारतात पोहोचले ; ‘नंदा देवी’ आज पोहोचले , माल उतरवण्याचे काम सुरू

अर्मेनियामध्ये गेलेले सुमारे 130 भारतीय यात्रेकरू आज पोहोचणे अपेक्षित

नवी दिल्ली, 17 मार्च 2026

पश्चिम आशियातील घडामोडींबाबत आज राष्ट्रीय माध्यम केंद्रात आंतर-मंत्रालयीन पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. बदलत्या परिस्थितीबद्दल अद्ययावत माहिती देण्यासाठी अशा पत्रकार परिषदा नियमितपणे आयोजित केल्या जात आहेत. आजच्या पत्रकार परिषदेत, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग, आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयांनी इंधन पुरवठा, सागरी कारवाया, या प्रदेशातील भारतीय नागरिकांची सुरक्षा आणि त्यासंबंधी प्रयत्नांविषयी अद्ययावत माहिती दिली.

ऊर्जा पुरवठा आणि इंधन उपलब्धता

होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने, देशातील इंधन पुरवठ्याची सद्यस्थिती आणि पेट्रोलियम उत्पादने तसेच एलपीजीचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली .

मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार,

कच्चे तेल आणि रिफायनरी

देशातील सर्व तेल शुद्धीकरण प्रकल्प त्यांच्या सर्वोच्च क्षमतेने कार्यरत असून, कच्च्या तेलाचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादनाच्या बाबतीत देश आत्मनिर्भर असून, या दोन्ही इंधनांची देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी आयात करण्याची गरज नाही.

किरकोळ विक्री केंद्रे

देशातील कोणत्याही किरकोळ विक्री केंद्रांवर इंधन तुटवडा असल्याची माहिती नाही, असे तेल विपणन कंपन्यांनी स्पष्ट केले आहे. पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सगळीकडे सुरळीत सुरू आहे.

देशात सगळीकडे, पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा असून नागरिकांनी, घाबरून जात, घाईघाईने पेट्रोल डिझेल खरेदी करु नये, असा सल्ला देण्यात आला आहे.

नैसर्गिक वायू

प्राधान्य क्षेत्रांना, संरक्षित गॅस पुरवठा अव्याहतपणे सुरू असून, यात, पीएनजी आणि सीएनजीच्या 100 टक्के पुरवठ्याचा समावेश आहे. तर, औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांना होणारा पुरवठा सुमारे 80 टक्क्यांवर नियंत्रित केला जात आहे.

शहरी भागांमधील व्यावसायिक एलपीजी ग्राहकांना पीएनजीकडे वळण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे, आणि हॉटेल्स, उपहारगृहे, रुग्णालये आणि वसतिगृहे देखील, अधिकृत शहर गॅस वितरण कंपन्यांच्या डिलर कडून पीएनजी जोडण्या मिळवू शकतात.

आयजीएल, एमजीएल, गेल गॅस आणि बीपीसीएल यांसारख्या सीजीडी कंपन्या घरगुती आणि व्यावसायिक पीएनजी जोडणीसाठी प्रोत्साहन देत आहेत.

सरकार, सीजीडी जाळ्याचा विस्तार करत असून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सीजीडी पाइपलाइन टाकण्यासाठी प्रलंबित अर्जांना मंजुरी देण्याची व तांत्रिक परवानगी देण्याची,रस्ते दुरुस्ती आणि परवानगी शुल्क माफ करण्याची, कामकाजाच्या अटी शिथिल करण्याची आणि नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची विनंती केली आहे.

असून, नागरिकांनी घाबरून जाऊ नये अशी सूचना देण्यात आली आहे.

· आयव्हीआरएस, एसएमएस, व्हॉट्सअॅप, मोबाइल अॅप्लिकेशन्स आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म यासारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे एलपीजी सिलिंडर बुक करता येईल.

· नागरिकांनी भीतीपोटी एलपीजी नोंदणी टाळावी, डिजिटल पद्धतींचा वापर करावा आणि एलपीजी वितरकांकडे अनावश्यक भेट देऊ नये, असे आवाहन आहे.

· ग्राहकांना पीएनजी आणि इलेक्ट्रिक किंवा इंडक्शन कूकटॉप्स यासारख्या पर्यायी इंधनांचा वापर करायला आणि ऊर्जेची बचत करायला प्रोत्साहन दिले जात आहे.

· नागरिकांनी अचूक माहितीसाठी अधिकृत स्त्रोतांवर अवलंबून राहावे, आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन आहे.

सागरी सुरक्षा आणि नौवहन ऑपरेशन्स

प्राधिकरणाने ट्रान्सशिपमेंट कंटेनर्ससाठी उपलब्ध करून दिलेल्या सुमारे 90,000 चौरस मीटर इतक्या अतिरिक्त साठवणुकीच्या जागेचाही समावेश आहे.

·जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाच्या बाहेर कंटेनर पडून असल्याचे वृत्त निराधार आहे. सामान्य लॉजिस्टिक्स कामकाजाचा भाग म्हणून कंटेनर सध्या फ्रेट स्टेशन्स, गोदामे किंवा कारखान्यांच्या आवारात आहेत. 

·जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणातील कोंडी कमी होत असून नाशवंत माल असलेल्या कंटेनर्सची संख्या दोन हजारांवरून एक हजार इतकी कमी झाली आहे.

·जहाजे सलालाह आणि खोर फक्कनसारख्या बंदरांकडे रवाना झाली आहेत; तसेच, सुमारे 200 कंटेनर्स घेऊन जाणारे आणखी एक जहाज आज निघणार आहे. अडकून पडलेल्या कंटेनर्सची संख्या पुढील 24 ते 48 तासांत आणखी कमी होऊन, सुमारे 600 पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.

·पश्चिम आशियातील सातत्याने बदलणारी स्थिती पाहता बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालय, जलवाहतूक, बंदरांचे संचालन, भारतीय खलाशांची सुरक्षितता आणि जलवाहतुकीद्वारे होणाऱ्या व्यापाराचे सातत्य यांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

16 मार्च 2026 रोजी संयुक्त अरब अमिरातीमधील विविध विमानतळांवरून भारतात 55 उड्डाणे झाली आहेत, तर आज सुमारे 70 उड्डाणे अपेक्षित आहेत. प्रवाशांनी अद्ययावत वेळापत्रकासंबंधीच्या माहितीसाठी विमान कंपन्यांशी संपर्क साधावा, तसेच ते मदतीसाठी भारतीय दूतावासासोबतही संपर्क साधू शकतात असा सल्ला जारी केला गेला आहे. 

सौदी अरेबिया आणि ओमानमधून भारतातील विविध ठिकाणांसाठी उड्डाणे सुरू आहेत.

कतारची हवाई हद्द अंशतः खुली असून, 16 मार्च 2026 रोजी भारतात 3 उड्डाणे झाली, तर आज 3 उड्डाणे होण्याची अपेक्षा आहे.

कुवेतची हवाई हद्द 28 फेब्रुवारी 2026 पासून बंद आहे. जजीरा एअरवेजची विशेष बिगर-नियोजित उड्डाणे सौदी अरेबियातील अल कैसुमाह विमानतळावरून भारतात येण्याची अपेक्षा आहे.

बहरीन आणि इराक मधील हवाई हद्द अजूनही बंद असून, तिथल्या भारतीय नागरिकांकरता सौदी अरेबियामार्गे प्रवास करण्याची सुविधा अद्यापही उपलब्ध आहे.

13 मार्च 2026 रोजी सोहार येथे झालेल्या घटनेत प्राण गमावलेल्या दोन भारतीय नागरिकांचे पार्थिव जयपूरमधील त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात आले आहे. केंद्र सरकार याबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.

जखमी भारतीय नागरिकांच्या प्रकृतीवर देखरेख ठेवण्याकरता भारतीय दूतावास रुग्णालयाचे अधिकारी आणि संबंधित कंपनीच्या संपर्कात असून, त्यापैकी कोणीही गंभीर जखमी नाही.

सुखरूप सुटका गेलेल्या कर्मचारी पथकामधील 15 भारतीय सदस्यांना बसरा इथल्या भारताच्या दूतावासातर्फे मदत पुरवली जात असून, सध्या ते एका हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत. त्यांना लवकर मायदेशी परतता यावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

मृत भारतीय नागरिकांचे पार्थिव लवकरात लवकर मायदेशी आणण्यासाठी भारतीय दूतावास इराकी प्राधिकरणांसोबत समन्वय साधत आहे.

अलीकडील घटनांमध्ये पाच भारतीय नागरिकांनी आपला जीव गमावला असून, एक जण अद्याप बेपत्ता आहे. ओमानमधील दोन भारतीय नागरिकांचे पार्थिव आज मायदेशी आणले गेले आहे.

बेपत्ता व्यक्तीबाबत तसेच, उर्वरित नागरिकांचे पार्थिव आवश्यक औपचारिक कार्यवाही करून लवकर मायदेशी परत आणता यावे यासाठी ओमान, इराक आणि संयुक्त अरब अमिरातीमधील भारतीय दूतावास संबंधित प्राधिकरणांच्या संपर्कात आहेत.

त्या त्या वेळच्या घडामोडींवर केंद्र सरकार बारकाईने लक्ष ठेऊन आहे, तसेच संबंधित मंत्रालये आणि संस्थांमध्ये काटेकोर समन्वय राखला जात आहे. यासोबतच प्रमुख क्षेत्र आणि राष्ट्रीय हिताच्या रक्षणासाठी योग्य ती पावले उचलली जात असल्याची ग्वाही केंद्र सरकारने पुन्हा एकदा दिली.

उल्हासनगर येथील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी आता ‘एक खिडकी’ योजना – राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई, दि.१७ : उल्हासनगर येथील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी आता महसूल विभाग, महानगरपालिका आणि भूम‍ि अभिलेख विभागाची संयुक्त ‘एक खिडकी योजना’ सुरू करण्यात येईल, असे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत सांगितले. या प्रक्रियेत दिरंगाई करणाऱ्या किंवा निष्क्रियता दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेतही त्यांनी यावेळी दिले.

आमदार डॉ.बालाजी किणीकर यांनी ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहरासंदर्भात लक्षवेधी उपस्थित केली होती.

राज्यमंत्री माधुरी मिसाळ  म्हणाल्या की, यांनी २००५ पासूनच्या धोरणांचा आणि सद्यस्थितीचा आढावा मांडला.

राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या की, ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर  शहरातील अनाधिकृत बांधकामे नियमित करण्यासंदर्भात शासनाच्या  २००६ च्या अधिनियामातंर्गत  जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार दिले होते. बांधकामे नियमित करण्याबाबत त्यावेळी जिल्हाधिकारी यांच्याकडे २२,०१३ अर्जांपैकी १५,५८७ अर्ज तांत्रिक कारणांमुळे फेटाळले गेले होते आणि केवळ १३८ जणांना ‘डी’ फॉर्म (नियमितीकरणाचे प्रमाणपत्र) मिळू शकले होते. त्यानंतर २०१९ मध्ये हे अधिकार आयुक्तांकडे अधिकार सोपवण्यात आले. मात्र, कोरोना काळ आणि रेडिरेकनरच्या जाचक दरांमुळे या योजनेला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही.

राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या की, नागरिकांचा अल्प प्रतिसाद पाहून १४ मार्च २०२४ रोजी सरकारने नियमांत सुधारणा केली. आता रेडिरेकनरच्या केवळ १० टक्के शुल्क भरून बांधकामे नियमित करण्याची तरतूद केली. सुधारित धोरणानुसार सुमारे १ लाख ८० हजार मालमत्ताधारकांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. आतापर्यंत प्राप्त ४४५ प्रस्तावांपैकी १३ जणांना ‘डी’ फॉर्म देण्यात आले आहेत, तर ३५९ प्रस्तावांमध्ये कागदपत्रांच्या त्रुटी असल्याने त्यांना पूर्ततेसाठी वेळ देण्यात आला आहे नियमितीकरणाच्या प्रक्रियेत त्रुटी असल्यास त्या तपासल्या जातील आणि आवश्यक सुधारणा केल्या जातील. मात्र, जाणीवपूर्वक दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करू असेही त्यांनी स्पष्ट केले.

अतिवृष्टीग्रस्त शेतकरी बांधवांसाठी २ कोटींची मदत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निधी सुपूर्त

महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनची अतिवृष्टीग्रस्त शेतकरी बांधवांसाठी मदत

पुणे/ मुंबई (दि १७ ) : महाराष्ट्र राज्यातील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी तब्बल २ कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्त करण्यात आला. या उपक्रमातून राज्यातील आपत्तीग्रस्त शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत मिळणार असून, समाजाप्रती असलेली औषध व्यवसायिकांची बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

यावेळी राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई अजितदादा पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. श्री. चंद्रकांत दादा पाटील, कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. हेमंत रासने, अखिल भारतीय औषध संघटनेचे अध्यक्ष मा. श्री. जगन्नाथ उर्फ आप्पासाहेब शिंदे, खजिनदार श्री. वैजनाथ जागुष्टे, श्री. हुकुमराज मेहता, श्री. सुनीलजी छाजेड यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रभावी समन्वय केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टचे सचिव श्री. अनिल बेलकर यांनी केले.

महाराष्ट्र राज्य केमिस्टस् अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन ही राज्यातील १,२५,००० औषध विक्रेत्यांचे प्रतिनिधित्व करणारी संस्था आहे. संघटनेने आपल्या सभासदांकरिता कार्य करित असतांना नेहमीच सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवलेली आहे. देशावर अथवा राज्यावर ज्या ज्या वेळी नैसर्गिक आपत्ती ओढवली असेल अथवा कोरोना सारख्या विषाणुचा प्रादुर्भाव असेल अशा प्रत्येक वेळी संघटनेने मदतीचा हात पुढे केला आहे.

कंत्राटी शिक्षकांना मुदतवाढ:स्थायी समितीचा निर्णय


पुणे –
महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडील कंत्राटी शिक्षकांना मुदतवाढ देण्यात आली आहे. महापालिकेत सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी करार पद्धतीने भरती करण्यात आली होती. निवडयादीतील १८८ उमेदवारांपैकी १४५ उमेदवारांनी कागदोपत्रांची पडताळणी केली. त्यापैकी १०६ उमेदवार प्रत्यक्ष कामावर रूजू झाले होते. त्यांच्याशी करार करण्यात आला होता. पहिल्या टप्प्यात रूजू झालेल्या शिक्षकांची मुदत १६ मार्च २०२६ रोजी संपुष्टात आली. तर प्रतीक्षा यादीतील दुसऱ्या टप्प्यातील ६२ शिक्षकांची मुदत ३० एप्रिल २०२६ रोजी संपुष्टात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्यातील १०६ शिक्षकांची मुदत १६ मार्च रोजी संपुष्टात आल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता या शिक्षकांना १८ मार्च ते ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर सादर केला होता. त्याला स्थायी समितीने मान्यता दिल्याचे समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.
तसेच महापालिकेच्या विशेष मुलांसाठीच्या शाळेमधील (शाळा क्रमांक १४) तीन शिक्षकांची एकवट मानधनावर करार पद्धतीने सहा महिन्यांसाठी भरती करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

पुणे कँटोन्मेंटच्या प्रश्नांसाठी खा. मेधा कुलकर्णी केंद्रीय संरक्षण मंत्र्यांकडे…

पुणे/नवी दिल्ली: पुणे कँटोन्मेंट बोर्डातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या पुढाकारातून केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन शिष्टमंडळाने सविस्तर चर्चा केली. यावेळी खासदार निशिकांत दुबे आणि कंगना राणावत यांचीही भेट शिष्टमंडळाने घेतली. या शिष्टमंडळात माजी नगरसेवक दिलीप गिरमकर, भारतीय जनता पार्टी पुणे कॅंटोन्मेंटचे वरिष्ठ उपाध्यक्ष विनायक काटकर, चिटणीस विशाल ओव्हाळ व उपाध्यक्ष शशी पूरम यांचा समावेश होता. पुणे कँटोन्मेंटमधील नागरिकांच्या प्रश्नांबाबत केंद्र सरकार सकारात्मक भूमिका घेईल, असा विश्वास केंद्रीय मंत्र्यांनी दिला.

या बैठकीत कँटोन्मेंट क्षेत्रातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात आले. विशेषतः वाढीव चटई क्षेत्र (एफएसआय) किमान २.५ पर्यंत वाढवण्याची मागणी करण्यात आली. यामुळे नागरिकांना बांधकामासाठी मोठा दिलासा मिळणार असल्याचे प्रतिनिधींनी स्पष्ट केले. तसेच केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ कँटोन्मेंटमधील नागरिकांना मिळावा, यासाठीही पाठपुरावा करण्यात आला. ‘प्रधानमंत्री आवास योजना’ व शहरी गरीबांसाठीच्या योजनांचा प्रभावी अंमलबजावणीचा मुद्दा यावेळी मांडण्यात आला.

कँटोन्मेंट बोर्डाच्या विकासासाठी जीएसटीच्या थकीत सुमारे १००० कोटी रुपयांचा परतावा देण्याची मागणीही करण्यात आली. ही रक्कम मिळाल्यास प्रलंबित विकासकामे गतीने पूर्ण होऊ शकतील, असे सांगण्यात आले. याशिवाय २०१९ पासून थकीत असलेले कर्मचाऱ्यांचे वेतन, निवृत्ती वेतन, ग्रॅच्युटी तसेच सातव्या वेतन आयोगाचे हप्ते तातडीने देण्याची गरज असल्याचे प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी अधोरेखित केले.

प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “कॅंटोन्मेंटमधील जमिनींचे वारसाहक्क हस्तांतरित झालेले नाहीत. पुढील पिढ्यांकडे जागा हस्तांतरित करताना अनेक अडचणी आहेत. भाड्याने दिलेल्या जागा वक्फ जमिनी म्हणून नोंदणी करण्यात आली आहे. तसेच अनेक जागांमध्ये पोटभाडेकरू, अनधिकृत बांधकामे केलेली आहे. शाळेच्या बांधकामासाठी परवानगी दिली जात नाही. सर्वसामान्य नागरिकांना आपल्या घरांच्या दुरुस्तीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे जावे लागते. ते अधिकारी हा निर्णय लष्कर विभागाकडे ढकलतात. परिणामी अनेक प्रश्न प्रलंबित राहतात. यावर तातडीने निर्णय घेऊन ही कामे मार्गी लावली जातील. यासंदर्भात अधिकाऱ्यांशी बोलू, असे आश्वासन केंद्रीय मंत्र्यांनी दिला आहे.”

श्री स्वामी समर्थांच्या सूर्यमणी आणि पादुकांचे पुण्यात आगमन

श्री अक्कलकोट राजघराणे छत्री ट्रस्ट, सोलापूर ; इतिहासात प्रथमच राजवाड्याबाहेर पुण्यात सूर्यमणी व पादुकांचे दर्शन
पुणे : श्री स्वामी समर्थ… श्री स्वामी समर्थ… श्री स्वामी समर्थ महाराज की जय… च्या नामघोषात श्री स्वामी समर्थांचा सूर्यमणी आणि श्री स्वामी समर्थांच्या पवित्र पादुकांचे पूजन करीत विविध प्रमुख देवस्थानांतर्फे उत्साहात स्वागत देखील करण्यात आले. सूर्यमणी आणि पादुका या दोन्हींचे दर्शन इतिहासात प्रथमच अक्कलकोटच्या राजवाड्याबाहेर पुणेकरांना मिळत आहे.

श्री अक्कलकोट राजघराणे छत्री ट्रस्ट, सोलापूर यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला श्री स्वामी समर्थ सूर्यमणी व पादुका दर्शन सोहळा दि. १७ व १८ मार्च २०२६ रोजी सायं. ५ ते रात्री १० आणि दि. १९ मार्च २०२६ रोजी सकाळी ८ ते रात्री १० या वेळेत एरंडवणे डीपी रस्त्यावरील सिद्धी साज बँक्वेट, पुणे येथे संपन्न होत आहे. यावेळी पुणेकारांनी मोठ्या संख्येने गर्दी केली.

या दर्शन सोहळ्याची सुरुवात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात सूर्यमणी व पादुका बाप्पाच्या दर्शनासाठी आणून झाली. तेथून पुढे लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर, अक्कलकोट स्वामी समर्थ मठ तसेच श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग येथे भेट देत हा पवित्र सोहळा कार्यक्रमस्थळी पोहोचला. यावेळी सर्व देवस्थानांचे विश्वस्त, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अक्कलकोटचे राजे श्रीमंत मालोजीराजे संयुक्ताराजे भोसले (तिसरे) म्हणाले, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जीवनाशी आणि त्यांच्या अद्भुत लीलांशी संबंधित अनेक पवित्र वस्तू आजही भक्तांच्या श्रद्धेच्या केंद्रस्थानी आहेत. त्यामध्ये सर्वांत विशेष व दिव्य मानली जाणारी वस्तू म्हणजे सूर्यमणी. हाच श्री स्वामी समर्थांचा सूर्यमणी आणि श्री स्वामी समर्थांच्या पवित्र पादुकांचे दर्शन सर्वसामान्य भक्तांना घेता येणार आहे. विशेष म्हणजे या दोन्हींचे दर्शन इतिहासात प्रथमच अक्कलकोटच्या राजवाड्याबाहेर पुण्यामध्ये भक्तांना घेता येत आहे.

भक्तांना परिचित असलेल्या श्री स्वामी समर्थांच्या अनेक चित्रांमध्ये आणि प्रतिमांमध्ये स्वामी महाराज आपल्या दोन बोटांमध्ये एक तेजस्वी मणी धारण करून बसलेले दिसतात. हाच तो पवित्र सूर्यमणी होय. हा सूर्यमणी स्वामींच्या दिव्य शक्तीचे, आध्यात्मिक तेजाचे आणि त्यांच्या कृपाशक्तीचे प्रतीक मानला जातो. श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या आयुष्यभर भक्तांच्या कल्याणासाठी, त्यांच्या दुःखांचा नाश करण्यासाठी आणि आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी अनेक चमत्कारिक लीलांचा अविष्कार केला. त्या दिव्य लीलांचे स्मरण करून देणारा हा सूर्यमणी म्हणजे स्वामींच्या कृपेचा जिवंत साक्षीदार मानला जातो.

परंपरेनुसार हा सूर्यमणी स्वतः श्री स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोटच्या राजघराण्यास प्रदान केला होता. तेव्हापासून हा दिव्य ठेवा अत्यंत श्रद्धा, भक्ती आणि जतनाने अक्कलकोट राजघराण्याकडे सुरक्षित ठेवण्यात आला आहे. अनेक भक्तांच्या श्रद्धेनुसार या सूर्यमणीमध्ये स्वामींच्या उपस्थितीचे आणि कृपाशक्तीचे अद्वितीय स्पंदन आजही अनुभवता येते.

पुण्यात आयोजित करण्यात आलेला हा पवित्र दर्शन सोहळा श्री स्वामी समर्थ प्रकट दिन (२० मार्च) या अत्यंत पावन दिवसाच्या अगोदर आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे या माध्यमातून हजारो भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेचा लाभ घेण्याची संधी मिळणार असल्याचा आनंद असल्याचेही त्यांनी सांगितले.

या दर्शन सोहळ्याच्या दरम्यान आरती, अभिषेक, होम–हवन तसेच विविध धार्मिक विधीही संपन्न होणार आहेत. त्यामुळे भाविकांना केवळ दर्शनच नव्हे तर एक संपूर्ण आध्यात्मिक वातावरण अनुभवण्याची संधी मिळत आहे. सदर दर्शन सोहळ्यासाठी सुरेखा उत्तमराव बहिरट पाटील यांनी स्थळ प्रायोजकत्व स्वीकारले आहे. तरी पुणेकरांनी आणि स्वामीभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून इतिहासात प्रथमच पुण्यात होत असलेल्या या पवित्र सूर्यमणी व पादुका दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

हडपसर-काळबोराटेनगर पादचारी भुयारी मार्गास मान्यता

साडेपाच कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता
पुणे : हडपसर- काळेबोराटे नगर रस्त्यावरील पुणे मिरज रेल्वे मार्गिकेवर काळे बोराटेनगर (गेट क्रमांक  सहा) येथे पादचारी भुयारी मार्ग उभारण्याला स्थायी समितीने मान्यता दिली आहे. यासाठी पाच कोटी ३७ लाख रुपये खर्च अपेक्षित असून हे काम रेल्वेमार्फत केले जाणार आहे. त्यासाठी टप्प्याटप्प्याने रेल्वेला निधी देण्यास स्थायी समितीने मान्यता दिली,अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली. या रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूस शाळा असल्याने विद्यार्थ्यांची तसेच पालकांची मोठी वर्दळ असते तसेच वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना रेल्वेमार्ग ओलांडताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेवून हा भुयारी मार्ग उभारला जाणार आहे.
हडपसर व काळे बोराटेनगर येथील हे रेल्वे गेट पुणे- मिरज रेल्वे मार्गावर आहे. त्यामुळे दिवसभरात सातत्याने हे गेट बंद झाल्यास या भागातील शालेय मुले तसेच पालक जीव मुठीत घेवून या ठिकाणच्या वाहतूक कोंडीतून रस्ता ओलांडत होते. यात अनेकदा रुग्णवाहिकाही अडकल्या आहे. तसेच रेल्वे क्रॉसिंग करताना मुलांचे अपघातही घडलेले आहे. या पार्श्वभूमीवर येथे भुयारी मार्गाची मागणी सातात्याने केली जात होती. या रेल्वेगेटवर भविष्यात उड्डाणपूल उभारण्याचे नियोजन असले तरी, रस्ता अरूंद असल्याने तांत्रिक अडचणींमुळे त्याला उशीर होणार आहे. त्यामुळे, पादचारी नागरिकांच्या सोयीसाठी हा भुयारी मार्ग उभारला जाणार आहे. महापालिकेच्या अंदाजपत्रकात यासाठी  दोन कोटी रुपयांची तरतूद होती. याचबरोबर उर्वरित निधी  टप्याटप्प्याने रेल्वेला  उपलब्ध  करून दिला जाईल. महापालिकेकडून  रेल्वेला निधी  उपलब्ध करून देण्यात आल्यानंतर  रेल्वेकडून  काम सुरू होईल.  या  भुयारी मार्गामुळे येथील कोंडी कायमची  दूर होऊन स्थानिक रहिवाशांना  मोठा दिलासा मिळेल, असे भिमाले यांनी नमूद केले.

सदगुरु श्री जंगली महाराज १३६ वा पुण्यतिथी उत्सव गुरुवारपासून

श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट, पुणेच्या वतीने आयोजन ; व्याख्याने, संगीतसभा, भजने आणि विविध धार्मिक कार्यक्रम
पुणे : श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट, पुणेच्या वतीने ‘सदगुरु श्री जंगली महाराज १३६ वा पुण्यतिथी उत्सव’ साजरा करण्यात येणार आहे. गुरुवार, दि. १९ मार्च ते बुधवार, दि. १ एप्रिल २०२६ दरम्यान जंगली महाराज मंदिरात उत्सव होणार आहे. उत्सवात धार्मिक कार्यक्रम, भजने, व्याख्याने आणि संगीत सभा होणार आहेत.

ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र तांबेकर, उपाध्यक्ष चंद्रकांत शिरोळे, सेक्रेटरी शिरीष लोखंडे यांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्सवाचे नियोजन केले आहे. गुरुवार, दिनांक १९ मार्च रोजी सकाळी ६ वाजता आढाव बंधू यांचे सनईवादन होणार आहे. त्यानंतर सकाळी ७ वाजता समाधीस अभ्यंगस्नान, पूजा, श्री सद्गुरु जंगली महाराज भजनी मंडळाचे भजन आणि आरती होणार आहे.

दिनांक १० मार्च ते १ एप्रिल दरम्यान दररोज सकाळी ८ ते १० यावेळेत श्री ज्ञानेश्वरी पारायण आणि सकाळी १० ते सायंकाळी ५.४५ पर्यंत विविध महिला भजनी मंडळांचे भजनाचे कार्यक्रम होणार आहेत. तसेच दि. २६ मार्च रोजी सकाळी ८.३० ते दुपारी २ पर्यंत श्री गजानन महाराज परिवार संघ, पुणे तर्फे श्री गजानन विजय ग्रंथ अखंड पारायण आयोजित करण्यात आले आहे.

दररोज सायंकाळी ६ वाजता विविध विषयांवर मान्यवरांची व्याख्याने होणार आहेत. डॉ.सदानंद मोरे, ह.भ.प. प्रा. गणेश भगत, दिलीप महाजन, डॉ.शिरीष पटवर्धन, भूषण घाटपांडे, डॉ.सचिन जोशी, शर्मिष्ठा उत्पात – ताशी, डॉ.मालविका तांबे, डॉ. भावार्थ देखणे, प्रा.मिलिंद जोशी, डॉ.राजेंद्र घावटे, डॉ.अपर्णा बेडेकर, पराग लिमये, ह.भ.प.डॉ. चेतनानंद उर्फ पंकज महाराज गावडे आदी मान्यवरांची व्याख्याने होणार आहेत.

तसेच, दररोज रात्री ८ वाजता संगीत सभा अंतर्गत प्रसिद्ध गायक कलाकारांची भक्तीगीते आणि संगीताचे कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये नम्रता गायकवाड, प्राजक्ता काकतकर, सावनी रवींद्र, पं. राजेंद्र कंदलगावकर, शाहीर श्रीकांत शिर्के, राजीव बर्वे व प्रियांका बर्वे, मीना जोगळेकर, अली हुसेन, उ. अन्वर कुरेशी, प्रणव कुलकर्णी, विदुषी आरती अंकलीकर, जितेंद्र भुरूक, डॉ.शंतनु गोखले, पं.आनंद भाटे, डॉ.राजेंद्र दूरकर आदी कलाकार सादरीकरण करणार आहेत.

बुधवार, दि. १ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता सदगुरु श्री जंगली महाराजांच्या पादुकांचा पालखी सोहळा होणार आहे. त्यानंतर गुरुवार, दि.२ एप्रिल रोजी दुपारी १ नंतर मंदिरात महाप्रसाद देण्यात येईल. उत्सवात भाविकांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

तुळशीबागेतील २६५ व्या श्रीरामनवमी उत्सवास गुढीपाडव्याला प्रारंभ

श्री रामजी संस्थान तुळशीबाग ; विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम
पुणे : श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने श्रीराम जन्मोत्सवानिमित्त तुळशीबाग येथील श्रीराम मंदिरात दि. १९ मार्च ते २ एप्रिल दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवांतर्गत श्रीरामरक्षा, अथर्वशीर्ष पठण, श्री विष्णू सहस्त्रनाम, श्रीसूक्त व पुरुष सूक्त पठण, महापूजा, पालखी, श्री कौसल्या माता डोहाळजेवण, श्रीरामजन्म सोहळा, श्रीरामराज्याभिषेक सोहळा अशा धार्मिक कार्यक्रमांबरोबरच रामायण वाचन, रामायण प्रवचन, सांगितीक कार्यक्रम अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थानचे कार्यकारी विश्वस्त डॉ.रामचंद्र तुळशीबागवाले यांनी दिली.

संस्थानचे विश्वस्त भरत तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले, यांसह तुळशीबागवाले परिवाराने उत्सवाचे आयोजन केले आहे. पुणे प्रांताचे सरसुभेदार श्रीमंत नारो अप्पाजी तुळशीबागवाले यांनी सन १७६१ साली स्थापन केलेल्या देखण्या मंदिरामधे यंदाचे श्रीरामनवमी उत्सवाचे अखंडीत २६५ वे वर्ष साजरे होत आहे.

गुढीपाडव्याला गुरुवार, दिनांक १९ मार्च रोजी श्रीरामनवमी उत्सवास प्रारंभ होणार असून त्यादिवशी सकाळी ७ पासून श्रीरामास पवमान अभिषेक, श्रीरामरक्षा, अथर्वशीर्ष, श्रीविष्णूसहस्त्रनाम, श्रीसूक्त व पुरूषसूक्त पठण होणार आहे. तसेच दि. १९ ते २५ मार्च दरम्यान दररोज सकाळी ९ वाजता श्री गणेश्वर शास्त्री पारखी हे रामायण वाचन, दुपारी १२ वाजता श्रीरामांची महापूजा व आरती, सायंकाळी ७.३० वाजता श्रीरामांच्या छबिन्याची मिरवणूक व आरती महापूजा होणार आहे.

बुधवार, दि. २५ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता श्री कौसल्या माता डोहाळजेवण होणार आहे.
श्रीराम जन्मानिमित्त गुरुवार, दि. २६ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता ह.भ.प. दर्शनबुवा वझे यांचे श्रीरामजन्माचे कीर्तन होणार असून सकाळी ११ वाजता श्रीरामांच्या पोषाखाची मिरवणूक निघणार आहे. त्यानंतर श्रीरामजन्माचा मुख्य सोहळा दुपारी १२.४० वाजता साजरा होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ७.३० वाजता श्रीरामांच्या छबिन्याची मिरवणूक निघणार आहे.

शनिवार, दिनांक २८ मार्च रोजी सकाळी ७ वाजता ह.भ.प. दर्शनबुवा वझे यांचे लळीत व पायघडीचे कीर्तन आणि समस्त तुळशीबागवाले परिवाराकडून श्रीरामराज्याभिषेक सोहळा संपन्न होणार आहे. गुरुवार, दिनांक २ एप्रिल रोजी हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी ६ वाजता ब्रह्मवृंदाकडून श्रीहनुमंतास रुद्राभिषेक व सकाळी ६.३० वाजता ह.भ.प.दर्शनबुवा वझे यांचे श्रीहनुमान जन्माचे कीर्तन होणार आहे. सोमवार, दि. १३ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता श्रीसत्यनारायण महापूजेने श्रीरामजन्मोत्सव उत्सवाची सांगता होणार आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत विविध कलाकारांची गायनसेवा
उत्सवादरम्यान गुरुवार, दि. १९ मार्च रोजी  सयंकाळी ५.३० वाजता सानिका कुलकर्णी यांचा गायनाचा कार्यक्रम होणार आहे. तर, रविवार, दि. २२ मार्च रोजी आनंद भाटे यांचे सुश्राव्य गायन, मंगळवार, दि. २४ मार्च रोजी अविष्कार क्रिएशन भाग्यश्री कुलकर्णी प्रस्तुत रामगान हे कार्यक्रम सायंकाळी ५.३० वाजता होणार असून सर्व कार्यक्रम विनामूल्य आहेत. तरी पुणेकरांनी मोठ्या संख्येने उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. रामचंद्र तुळशीबागवाले यांनी केले आहे.

नदीत कचरा टाकण्याविरोधात विद्यार्थ्यांचा एल्गार कायम,लोकवस्तीत पाच दिवसांपासून कचऱ्याचे ढीग

लोणी-काळभोर ग्रामपंचायतीचा निर्णय रखडला
पुणे : पुणे शहराची जीवनवाहिनी असलेल्या मुळा-मुठा नदीपात्रात गेल्या अनेक वर्षांपासून लोणी-काळभोर, कदमवाकवस्ती ग्रामपंचायती तसेच परिसरातील काही गावांकडून बेकायदेशीरपणे दररोज कचरा टाकला जात असल्याच्या निषेधार्थ एमआयटी शिक्षण संकुलातील विद्यार्थ्यांचे ‘कचरा बंद’ आंदोलन पाचव्या दिवशीही कायम आहे. परिणामी, दोन्ही ग्रामपंचायतींच्या हद्दीतील लोकवस्तीत गेल्या पाच दिवसांपासून कचरा न उचलल्याने अक्षरशः कचऱ्याचे ढीग साचले आहेत.

पर्यावरण व सार्वजनिक आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणाऱ्या या प्रकाराविरोधात विद्यार्थ्यांनी प्रथम दि. ४ मार्च २०२६ रोजी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर ‘कचरा बंद’ आंदोलन करत कचरा वाहून नेणाऱ्या ग्रामपंचायतींच्या ट्रॅक्टरांना कॅम्पसमधून नदीपात्राकडे जाण्यास मज्जाव केला होता. त्यानंतर पोलिस उपआयुक्तांच्या मध्यस्थीनंतर विद्यार्थ्यांनी संबंधित ग्रामपंचायतींना कचरा प्रश्न निकाली काढण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली होती.
मात्र, मुदत संपूनही नदीपात्रात कचरा टाकणे सुरूच राहिल्याने विद्यार्थ्यांनी पुन्हा १३ मार्च २०२६ रोजी आंदोलन छेडत नदीपात्राकडे जाणाऱ्या कचऱ्याच्या गाड्यांना विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर अडविले. आंदोलन सुरू होऊन पाच दिवस उलटूनही कोणताही तोडगा न निघाल्याने विद्यार्थ्यांचे आंदोलन अद्याप कायम आहे.

दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी नदीपात्रात साठलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांना भीषण आग लागली होती. सलग चार दिवस ही आग धुमसत राहिल्याने परिसरात प्रचंड विषारी धूर पसरला. यामुळे एमआयटी शैक्षणिक संकुलातील ६ ते ७ विद्यार्थ्यांना श्वसनाचा त्रास व गुदमरल्याची लक्षणे जाणवल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. या घटनेनंतर विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप व असुरक्षिततेची भावना निर्माण झाली.
यानंतर हवेलीचे उपविभागीय अधिकारी यशवंत माने, लोणी-काळभोरचे अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते तसेच दोन्ही ग्रामपंचायतींचे माजी सरपंच व ग्रामसेवक यांनी नदीत थेट टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिली. मात्र, या गंभीर प्रश्नावर अद्यापही ठोस तोडगा निघालेला नाही.

गट क्रमांक ११३ नदीपात्रातच; पर्यायी व्यवस्था करावीच लागणार
विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर हवेली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शेखर शेलार यांनी लोणी-काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामपंचायतींना नोटीस बजावत शास्त्रोक्त पद्धतीने कचरा व्यवस्थापन, वर्गीकरण व विल्हेवाट लावण्याच्या सूचना दिल्या असून मुळा-मुठा नदीपात्रात कचरा टाकण्यास त्वरित बंदी घालत तातडीने पर्यायी जागेची व्यवस्था करावी, असे निर्देश दिले आहेत.
तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पुणे कार्यालयानेही पुणे जिल्हा परिषद तसेच दोन्ही ग्रामपंचायतींना नोटीस जारी केली आहे. नदीपात्रात कचरा टाकणे अत्यंत गंभीर बाब असून तो तातडीने थांबवून सदर प्रकरणी येत्या सात दिवसांत स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासह, उपअधीक्षक भूमिलेख, हवेली यांनी ११ मार्च २०२६ रोजी सद्यस्थितीत कचरा टाकल्या जाणाऱ्या जागेची मोजणी केली. त्यानंतर १६ मार्च २०२६ रोजी परिपत्रक काढत गट क्रमांक ११३ ही जागा मुळा-मुठा नदीपात्रातच असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता दोन्ही ग्रामपंचायतींना कचरा व्यवस्थापनासाठी तातडीने पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे.

कदमवाकवस्तीचा ग्रामसभेत ठराव
विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीने सामंजस्याची भूमिका घेत बुधवारी झालेल्या ग्रामसभेत कचरा व्यवस्थापनासाठी पर्यायी जागेची मागणी प्रशासनाकडे करण्याचा ठराव मंजूर केला. तसेच पर्यायी जागा उपलब्ध होईपर्यंत त्यांच्या हद्दीतील कचरा हडपसर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाकडे पाठविण्याचा निर्णयही सर्वानुमते घेण्यात आला. याउलट लोणी-काळभोर ग्रामपंचायतीची मंगळवार, दि. १७ मार्च २०२६ रोजीची ग्रामसभा गावकऱ्यांच्या अपुऱ्या उपस्थितीमुळे कोणताही ठराव न घेता तहकूब करण्यात आली.


“नदीपात्रात कचरा टाकणे अत्यंत चुकीची गोष्ट आहे. या गंभीर प्रश्नावर कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीने ग्रामसभेत सर्वानुमते घेतलेले ठराव अत्यंत स्तुत्य आहेत. याबद्दल त्यांचे आभार! लोणी-काळभोर ग्रामपंचायतदेखील या प्रश्नी लवकरच सामंजस्याची भूमिका घेऊन ग्रामसभा आयोजित करून पर्यायी व्यवस्था करेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे.”
— डॉ. महेश चोपडे, कुलसचिव, एमआयटी एडीटी विद्यापीठ, लोणी-काळभोर, पुणे

चितोड वाणी उद्योजक स्नेह मेळ्यात डॉ. नीलम गोऱ्हे यांचा सहभाग; सामाजिक एकात्मता व सातत्यपूर्ण परिश्रमांचे महत्त्व अधोरेखित

मुंबई, दि. १७ मार्च २०२६ : जळगावस्थित दै. लोकशाही माध्यम समूह आयोजित ‘चिवा उद्योजक स्नेह मेळा’ (चितोड वाणी) आणि ‘चिवा आयकॉन कॉफी टेबल पुस्तिका प्रकाशन सोहळा’ आज यशवंतराव चव्हाण सेंटर, रंगस्वर सभागृह येथे पार पडला. या कार्यक्रमाला विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे प्रमुख उपस्थित होत्या.

कार्यक्रमाला नित्यसेवा प्रतिष्ठान, डोंबिवलीचे प्रतिनिधी, चिवास राष्ट्रीय मराठी अध्यक्ष अविनाश खारुळ, संपादक शांता वाणी, राजेश यावलकर, सचिन पैठणकर, उमेश वाणी, सिने अभिनेता प्रदीप वेलणकर तसेच उद्योजक दिपक चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी समाजातील एकात्मता, परिश्रम आणि सातत्य यांचे महत्त्व अधोरेखित केले. विविध क्षेत्रांतील लोकांशी सातत्याने संवाद साधणाऱ्या वाणी समाजाच्या कार्याची त्यांनी प्रशंसा केली. “प्रत्येकाच्या यशामागे संघर्ष, कष्ट आणि सातत्यपूर्ण प्रयत्न असतात. प्रगतीच्या वाटेवर अडथळे येतात, मात्र त्यावर मात करून पुढे जाणे आवश्यक आहे,” असे त्या म्हणाल्या.

समाजातील जात-पात विचारांपलीकडे जाऊन कार्य करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. “आपण कोणत्या समाजाचे आहोत यापेक्षा आपण काय काम करतो हे महत्त्वाचे आहे. आजच्या काळात ग्राहक, सहकारी किंवा नागरिक यांची जात पाहून काम करता येत नाही. सर्वसमावेशक दृष्टिकोन ठेवणे ही काळाची गरज आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

व्यापार आणि पर्यटन क्षेत्रातील वाढीबरोबरच निर्माण होणाऱ्या आव्हानांकडे लक्ष वेधताना त्यांनी उद्योजकांनी शासनाशी समन्वय साधण्याचे आवाहन केले. “तुमच्या अपेक्षा, समस्या या शासनाच्या योजनांशी जोडून तुम्ही कशा प्रकारे योगदान देऊ शकता याबाबत ठोस प्रस्ताव द्यावा, सरकारकडून शक्य तेवढे सहकार्य केले जाईल,” अशी ग्वाही त्यांनी दिली.

समाजातील परस्पर सहकार्य आणि मदतीच्या भावनेचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी सांगितले की, “अडचणीच्या काळात आपल्या समाजातून मिळणारा मदतीचा हात माणसाला आयुष्यभर लक्षात राहतो. एकमेकांना साथ देणे हीच खरी प्रगतीची गुरुकिल्ली आहे.”

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी महापालिका सज्ज

पुणे- महानगरपालिकेतर्फे प्रतिवर्षी १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात येते. सन २०२६ च्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुणे शहरातील जयंती उत्सव मंडळांचे मा. पदाधिकारी व कार्यकर्ते, पोलीस प्रशासन व पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची एक सयुंक्त बैठक श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, पुणे महानगरपालिका (मुख्य इमारत) येथे आयोजित करण्यात आली होती.
सदर बैठकीस महापौर मंजुषा नागपुरे,महापालिका आयुक्त नवल किशोर राम,उपमहापौर परशुराम वाडेकर ,अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओम प्रकाश दिवटे नगसेविका अनिता इंगळे,अर्चना जगताप, हिमाली कांबळे,नगरसेवक निलेश आल्हाट ,नगरसेविका सपना छाजेड आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल २०२६ रोजी करावयाच्या व्यवस्थेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. जयंती मंडळांनी केलेल्या सुचनांच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे व्यवस्था करण्याच्या आदेश देण्यात आले.

  1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाबाहेर व उद्यानाच्या परिसरात सावली मंडप टाकणेची व्यवस्था करण्यात यावी. तसेच उद्यानामधील फरशीवर मँटींग टाकण्यात यावे.
  2. वाहतुकीस अडथळा होऊ नये या दृष्टीने नियोजन करणे.
  3. उद्यानातील पुतळा होर्डिंग्जमुळे झाकला जाणार नाही याची काळजी घेणे.
  4. अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करून ती काढणे.
  5. अतिक्रमण विभागाचा एक फिक्स पॉईट ठेवणे.
  6. अँम्ब्युलन्स व व्हीआयपी वाहनांसाठी मार्ग मोकळा ठेवणे.
  7. उद्यानाच्या परिसरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी.
  8. यासाठी यावर्षी ६ पिण्याचे पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच आवश्यकतेनुसार पाण्याचे टँकर वाढविण्यात यावेत.
  9. नागरिकांना पिण्याचे पेपर ग्लास पुरविणे.
  10. दिनांक १० एप्रिल २०२६ ते दिनांक १६ एप्रिल २०२६ पर्यंत उद्यान व आजूबाजूचा संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवणे.
  11. उद्यानाकडे जाणारे सर्व रस्त्यांची स्वच्छता राखणे.
  12. जीपीओकडून येणाऱ्या रस्त्यालगत मोबाईल टाँयलेट व पोर्टेबल टाँयलेटची व्यवस्था करणे (६ पोर्टेबल टाँयलेट- प्रत्येकी ८ सीट्सचे) व वेळोवेळी साफसफाई करून स्वच्छता राखणे.
  13. परिसर स्वच्छतेच्या कामी स्वतंत्र टीम तीन शिफ्टमध्ये नियोजित करणे.
  14. उद्यान व मेघडंबरीची स्वच्छतेची विशेष काळजी घेणे, सदर ठिकाणी वाहण्यात येणारे पुष्पहार हे वेळेत काढून घेऊन पुतळा नियमितपणे स्वच्छ राखावा.
  15. हवामान खात्याने केलेल्या अंदाजानुसार शहरामध्ये उष्माघाताची शक्यता विचारात घेऊन उद्यान परिसरात फिरता दवाखाना- क्लिनिक तसेच २ रुग्णवाहिका, २ डॉक्टर, फार्मासिस्ट व सहाय्यक यांची नियुक्ती करणे.
  16. उद्यानाच्या ठिकाणी पुरेशी प्रकाश व्यवस्था, तसेच माईक-साऊंड स्पीकर तसेच जनरेटर बॅकअपची व्यवस्था करण्यात यावी.
  17. १४ एप्रिल रोजी उद्यानासमोरील रस्त्यावरील लोखंडी रेलिंग काढण्यात यावे.
  18. उद्यान परिसरात तिन्ही शिफ्टमध्ये आवश्यक सुरक्षा रक्षकांचा बंदोबस्त ठेवावा.
  19. उद्यानात येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांचे पार्किंगसाठी आवश्यक उपाययोजना करावी.
  20. उद्यान परिसरात येणारे व्हीआयपी वाहने व अत्यावश्यक सेवेची वाहने, रुग्णवाहिका यांचे संचलन(ये-जा) करणेकामी योग्य ती व्यवस्था-मार्गिका तयार करून ठेवणे.
  21. उद्यान परिसरातीलरस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविण्यात यावेत
  22. उद्यानाकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यावरील राडारोडा उचलण्यात यावा.
  23. फुटपाथ स्वच्छ ठेवण्यात यावेत, त्यावरील निघालेले ब्लॉक लावून घ्यावेत
  24. वरील सर्व काम झाल्याचे खात्री करण्यासाठी खाते प्रमुखांनी प्रत्यक्ष जागेवर भेट देऊन कामाची पाहणी करावी.
  25. उद्यान परिसरात आवश्यक ती रंगरंगोटी तसेच मेघडंबरीची साफसफाई करणेत यावी.
  26. उद्यानातील झाडांचा अडथळा होणार नाही अशा पद्धतीने झाडांचे ट्रिमिंग करण्यात यावे.
  27. उद्यानातील परिसर जयंतीपूर्वी व जयंतीनंतर स्वच्छ करून घेण्यात यावा.
  28. उद्यानाच्या ठिकाणी अग्निशामक दलाची एक गाडी सर्व साधनांसह ठेवण्यात यावी. तसेच नजिकचे अग्निशामक केंद्र येथे एक गाडी स्टँडबाय सर्व इक्विपमेंटसह तयार ठेवावी.
  29. सर्व परिमंडळाचे उपायुक्त आणि सर्व क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक महापालिका आयुक्त यांनी दिलेले काम पूर्ण झाले आहे याची खातरजमा करण्यासाठी प्रत्यक्ष जागेवर पाहणी करावी.
  30. पुणे शहरात ज्या परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होते तेथे सहाय्यक महापालिका आयुक्त यांनी क्षेत्रीय स्तरावर नागरिकांना त्रास होऊ नये याकरिता योग्य ती व्यवस्था करावी.
  31. सर्व वॉर्ड ऑफिसर यांनी आपल्या क्षेत्रामधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ साफसफाई करून घ्यावी व पुरेसा सेवक वर्ग उपस्थित ठेवावा.

अखिल भारतीय पाली साहित्य संमेलन २२ मार्च रोजी पुण्यात

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे : पद्मपाणी फाउंडेशन आयोजित तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाली व बौद्ध अध्ययन विभागाच्या सहकार्याने अखिल भारतीय पाली साहित्य संमेलन रविवारी, २२ मार्च २०२६ रोजी पुण्यातील सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन, भवानी पेठ (टिंबर मार्केट) येथे आयोजित करण्यात आले आहे. सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत हे संमेलन पार पडणार आहे.

या संमेलनाचे उद्घाटन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमास भदंत हर्षबोधी महाथेरो, आंतरराष्ट्रीय धम्म प्रसारक गगन मलिक, अखिल भारतीय पाली साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. बिमलेंद्र कुमार, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे आणि विद्यमान उपमहापौर परशुराम वाडेकर हे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित राहणार आहेत.

संमेलनात देशभरातील पाली भाषा व बौद्ध अध्ययन क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये डॉ. महेश डेगावकर, अब्दुल मोमीन, डॉ. योजना भगत, धर्मदीप चावडे, डॉ. गौतम चाबुकस्वार आणि पद्मपाणी फाउंडेशनच्या संचालिका  सुवर्णा डंबाळे आदी मान्यवर प्रमुख मार्गदर्शक म्हणून सहभागी होणार आहेत.

पाली भाषा, बौद्ध साहित्य, संशोधन आणि सांस्कृतिक परंपरा यांवर विविध विषयांवर चर्चा व मार्गदर्शन करण्यात येणार असून पाली भाषेच्या प्रचार, प्रसार आणि संवर्धनासाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

मागील वर्षी झालेल्या संमेलनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. यंदाही या संमेलनाबाबत मोठी उत्सुकता असून १००० पेक्षा अधिक नागरिकांनी सहभागासाठी नोंदणी व चौकशी केल्याची माहिती आयोजकांनी दिली.

पाली भाषा व बौद्ध साहित्याविषयी रुची असलेल्या नागरिकांनी मोठ्या संख्येने या संमेलनात सहभागी व्हावे, असे आवाहन पद्मपाणी फाउंडेशनचे अध्यक्ष राहुल डंबाळे, संचालिका सुवर्णा डंबाळे आणि आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

वीज बिल वसुली दरम्यान महिला वीज कर्मचाऱ्यास धक्काबुक्की

लोणावळा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे, दि. १६ मार्च २०२६– वसुलीसाठी गेलेल्या महिला वीज कर्मचाऱ्याला शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी लोणावळा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे परिमंडलात महावितरण कंपनीची वीजबिल वसुली मोहीम जोरदार सुरू आहे. सोमवारी (दि.१६) दुपारी २.१० च्या सुमारास रवी पांगोळी सोसायटीमध्ये अनिकेत मालपुटे या कंत्राटी कामगारासह महिला वरिष्ठ तंत्रज्ञ करिश्मा मुकेश पाटील वसुलीसाठी गेल्या होत्या. शाम रामचंद्र पवार यांच्या नावाने असलेल्या वीज कनेक्शनचे फेब्रुवारीचे ९८० रुपये व मार्च महिन्याचे ९९० रुपये थकीत होते. करिश्मा पाटील यांच्या सांगण्यावरून अनिकेत मालपुटे कनेक्शन तोडत होते. त्यावेळी स्वतः ला मालक म्हणून सांगणाऱ्या जयनिल दोशी याने अनिकेतला विरोध केला. तेंव्हा करिश्मा पाटील स्वतः कनेक्शन तोडू लागल्या. त्यावेळी जयनिल दोशी याने त्यांना अटकाव करत श्रीमती पाटील यांना मागे ओढून जोरात धक्का दिला, ज्यामुळे त्या खाली पडल्या. इतकेच नाही तर, आरोपीने त्यांच्या सहकाऱ्याच्या दुचाकीची चावी काढून घेऊन त्यांना तिथून जाण्यास मज्जाव केला आणि वाद घातला.

त्यामुळे करिश्मा पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून, लोणावळा शहर पोलिसांनी आरोपी जयनिल दोशी याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम २२१ अन्वये सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार शशिकांत खोपडे करत आहेत.