Home Blog Page 126

अॅक्सिस म्युच्युअल फंडातर्फे अॅक्सिस BSE इंडिया सेक्टर लीडर्स इंडेक्स फंड सादर

0

मुंबई,: भारतातील आघाडीच्या मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांपैकी एक असलेल्या अॅक्सिस म्युच्युअल फंडातर्फे Axis BSE इंडिया सेक्टर लीडर्स इंडेक्स फंड ही त्यांची नवीन फंड ऑफर सादर करण्यात आली आहे. हा एक ओपन-एंडेड इंडेक्स फंड असून तो BSE इंडिया सेक्टर लीडर्स इंडेक्स मधील घटकांमध्ये गुंतवणूक करतो. या फंडाचा एनएफओ 23 जानेवारी 2026 रोजी सदस्यत्वासाठी खुला होईल आणि 06 फेब्रुवारी 2026 रोजी बंद होईल. या फंडाचे व्यवस्थापन कार्तिक कुमार (फंड व्यवस्थापक) करणार आहेत. किमान गुंतवणूक रक्कम 100 रु. इतकी आहे. हा फंड गुंतवणूकदारांना दीर्घकालीन संपत्ती निर्मितीचा उपाय पुरविण्याचे उद्दिष्ट ठेवतो.

हा नवीन फंड गुंतवणूकदारांना BSE 500 इंडेक्स मधील 21 क्षेत्रांमधील भारतातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये व्यापक बाजारातील सहभाग मिळवून देण्यासाठी एक सूज्ञ मार्ग उपलब्ध करून देतो. या फंडातील घटकांमध्ये BSE 500 इंडेक्स मध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रत्येक 21 क्षेत्रांमधील सरासरी सहा महिन्यांच्या दैनंदिन एकूण बाजार भांडवलावर आधारित अग्रणी तीन कंपन्यांचा समावेश असेल. यामुळे गुंतवणूकदारांना भारतीय अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रांतील प्रस्थापित बाजारपेठ अग्रणीपर्यंत पोहोच मिळते. हा फंड गुंतवणूकदारांना निर्देशांकातील केवळ प्रबळ क्षेत्रांमध्येच नव्हे तर अर्थव्यवस्थेतील विशेष आणि वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रांमध्येही योगदान देण्यास मदत करतो.

फंडाच्या सादरीकरणाबाबत बोलताना अॅक्सिस एएमसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बी. गोपकुमार म्हणाले, “बाजार विकसित होत असताना गुंतवणूकदार नाविन्यपूर्ण गुंतवणूक उपाय शोधत आहेत. अॅक्सिस म्युच्युअल फंडामध्ये आम्हाला विश्वास आहे की जे उद्योग आपल्या क्षेत्रात आघाडीवर असतात, ते मजबूत मूलभूत घटक आणि लवचिकता दर्शवतात. अॅक्सिस BSE इंडिया सेक्टर लीडर्स इंडेक्स फंड वैविध्यपूर्ण चौकटीद्वारे त्यांच्या स्वतःच्या क्षेत्रातील आघाडीच्या आणि विश्वासार्ह कंपन्यांपर्यंत पोहोचतो. हा फंड गुंतवणूकदारांना भारताच्या विकासाभिमुख अर्थव्यवस्थेत आणि भविष्यात सहभागी होण्याची संधी देईल असा आम्हाला विश्वास आहे.”

फंडाची प्रमुख वैशिष्ट्ये:

·         क्षेत्रातील अग्रणी कंपन्यांमध्ये वाटप: विविध क्षेत्रांतील प्रस्थापित कंपन्यांमध्ये व्यापक बाजार सहभाग शोधत असणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा फंड डिझाइन करण्यात आला आहे. BSE 500 इंडेक्स मधून निवड करून, हा फंड 21 क्षेत्रांमधील प्रत्येकी अव्वल तीन कंपन्यांमध्ये गुंतवणूक करेल. या निर्देशांकातील क्षेत्रांमध्ये वित्तीय सेवा, माहिती तंत्रज्ञान, औद्योगिक क्षेत्र, कमोडिटीज, FMCG, आरोग्यसेवा इत्यादींचा समावेश आहे.

·         इंडेक्स संरचना: हा फंड मोठ्या, मध्यम आणि लहान भांडवलाच्या कंपन्यांमध्ये वैविध्यपूर्ण गुंतवणूक सादर करतो. त्यामुळे एकाच ठिकाणी सगळी गुंतवणूक करण्यामधील जोखीम कमी होते आणि एखादे क्षेत्र किती लहान मोठे आहे यापेक्षाही  योग्य वजन दिले जाते. हा फंड अर्धवार्षिक आधारावर पुनर्रचित केला जाईल. त्यामुळे पोर्टफोलिओचे वेळोवेळी पुनर्संतुलन करता येईल.

·         संतुलित जोखीम: या निर्देशांकामध्ये किमान स्टॉक वजन 1% आणि कमाल स्टॉक वजन 5% निश्चित करण्यात आले असून ते तिमाही आधारावर रीसेट केले जाते.

याबाबत भाष्य करताना अॅक्सिस एएमसीचे मुख्य गुंतवणूक अधिकारी (CIO) आशिष गुप्ता म्हणाले, “अॅक्सिस BSE इंडिया सेक्टर लीडर्स इंडेक्स फंड साठीची कार्यपद्धती अशा प्रकारे तयार करण्यात आली आहे की तिचे बेस युनिव्हर्स भारतीय बाजाराच्या संपूर्ण विस्तारातील कंपन्यांचा समावेश करते. प्रत्येक क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांची सुसूत्रपणे ओळख करून, हा फंड पारदर्शक आणि नियमाधारित पॅसिव्ह पद्धतीद्वारे गुंतवणूकदारांना प्रस्थापित व्यवसायांमध्ये वैविध्यपूर्ण सहभाग पुरविण्याचा प्रयत्न करतो.”

स्रोत: अॅक्सिस MF रिसर्च दिनांक 16 जानेवारी 2026 रोजीचे BSE इंडायसेस

महावितरणचा ‘अन्नदाता ते ऊर्जादाता’ चित्ररथ ठरला संचलनाचे आकर्षण

प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजवंदन कार्यक्रम

मुंबई, दि. २७ जानेवारी २०२६: प्रजासत्ताक दिनाच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे आयोजित ध्वजवंदन व संचलनाच्या शासकीय कार्यक्रमात महावितरणचा चित्ररथ आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. मा. मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी ‘अन्नदाता ते ऊर्जादाता’ या संकल्पनेवर आधारीत महावितरणच्या या चित्ररथाचे कौतुक केले आहे.

मा. प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांनी देशात सौर ऊर्जेला चालना देण्यासाठी व शेतकऱ्यांना शाश्वत व मोफत वीज उपलब्ध करून देण्यासाठी अन्नदाता ते ऊर्जदाता ही संकल्पना राबवली आहे. मा. मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना व मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० च्या प्रभावी अंमलबजावणीतून राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज उपलब्ध करून देत या संकल्पनेच्या पुर्ततेला मोठी गती दिली आहे. या योजनांमधून राज्यातील ४५ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्रजासत्ताक आयोजित कार्यक्रमात चित्ररथाच्या माध्यमातून महावितरणने केवळ तंत्रज्ञान नव्हे, तर पर्यावरणाभिमुख व समृद्ध महाराष्ट्राचे चित्र मांडले आहे. देशातील पहिले सौरग्राम ठरलेल्या सातारा जिल्ह्यातील मान्याची वाडीचा देखावा चित्ररथात लक्षवेधक ठरला.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत १६ हजार मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प प्रस्तावित असून आत्तापर्यंत ३ हजार ३०० मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. यातून ८ लाख शेतकऱ्यांच्या ४० लाख एकर शेतीला दिवसा व शाश्वत वीजपुरवठा सुरू आहे. तर मागेल त्याला सौर कृषी पंप योजने अंतर्गत ११ लाख शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देण्याचे उद्दिष्ट मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येत आहे. या योजनेंतर्गत एकाच महिन्यात ४५ हजार ९११ शेतकऱ्यांना सौर कृषिपंप बसवण्याचा विश्वविक्रम ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंदवला गेला आहे. याशिवाय प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत ४ लाख २५ हजार घरगुती ग्राहकही विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण व स्वावलंबी झाले आहेत.

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ : हवेली तालुक्यात EVM FLC प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण

हवेली : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने हवेली तालुक्यात वापरण्यात येणाऱ्या EVM मशीनच्या FLC (First Level Checking) प्रक्रियेचे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. ही प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
EVM तपासणीची संपूर्ण जबाबदारी तहसीलदार तृप्ती कोलते व तहसीलदार अर्चना निकम यांच्या नियंत्रणाखाली राबविण्यात आली. EVM कक्ष अधिकारी सचिन आखाडे, किशोर पाटील व गजानन किरवले यांनी या प्रक्रियेचे काटेकोर नियोजन व प्रभावी अंमलबजावणी केली.
प्राप्त माहितीनुसार, नुकतीच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी प्राप्त झालेल्या सर्व EVM मशीनची FLC प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. तपासणीदरम्यान कंट्रोल युनिट (CU) पैकी एकूण ४२५ युनिट्सची तपासणी करण्यात आली बॅलेट युनिट (BU) बाबत पाहता, एकूण १०१३ युनिट्सची तपासणी करण्यात आली.
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित व विश्वासार्ह राहावी यासाठी FLC ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून, तांत्रिक तज्ज्ञांच्या उपस्थितीत प्रत्येक मशीनची सखोल तपासणी करण्यात आली. FLC मध्ये अपात्र ठरलेल्या मशीन पुढील वापरासाठी वगळण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने, तहसीलदार तृप्ती कोलते, तहसीलदार अर्चना निकम तसेच EVM कक्ष अधिकारी यांच्या समन्वयामुळे ही प्रक्रिया वेळेत व शांततेत पूर्ण झाल्याचे नमूद करण्यात आले. आगामी निवडणुका निर्भय व विश्वासाच्या वातावरणात पार पडाव्यात यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

हवेली जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारांची झुंबड; माघारी नगण्य, थेट लढती अटळ

पुणे : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी सुरू असलेल्या नामनिर्देशन प्रक्रियेत उमेदवारांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने स्थानिक राजकारण चांगलेच तापले आहे. नामनिर्देशन छाननीनंतर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी एकूण ६२ नामनिर्देशने वैध ठरली असून त्यामध्ये 12 पुरुष व 32 महिला अशा 44 उमेदवारांचा समावेश आहे. माघारीचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने अनेक प्रभागांमध्ये थेट व चुरशीच्या लढती अटळ ठरल्या आहेत.
पुणे, कोरेगाव मूल, उरुळी कांचन, थेऊर, लोणी काळभोर व खेड-शिवापूर या विभागांतून मोठ्या संख्येने नामनिर्देशने दाखल झाली. नामनिर्देशन माघारीनंतर जिल्हा परिषद निवडणुकीत एकूण 25 उमेदवार निवडणूक रिंगणात कायम राहिले असून त्यामध्ये १७ महिला उमेदवार आहेत. आकडेवारीवरून महिला उमेदवारांचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून येत आहे.
दरम्यान, पंचायत समिती निवडणुकीसाठी नामनिर्देशन प्रक्रियेला आणखी मोठा प्रतिसाद मिळाला आहे. पंचायत समितीसाठी एकूण ११२ वैध नामनिर्देशने दाखल झाली असून त्यात 43पुरुष व 38 महिला अशा 81उमेदवारांचा समावेश आहे. माघारीनंतर 42 उमेदवार निवडणूक रिंगणात कायम असून त्यामध्ये केवळ २२ महिला उमेदवार आहेत. अशी माहिती सागर तडके व अंकुश गुरव या महसूल कर्मचाऱ्यांनी दिली.महिला सक्षमीकरणाच्या घोषणांच्या पार्श्वभूमीवर ही आकडेवारी राजकीय वास्तव अधोरेखित करणारी ठरते.
लोणी काळभोर, पेरणे, केसनंद, कोरेगाव मूल, उरुळी कांचन, सोरतापवाडी, थेऊर, आळंदीवाडी, कालवाडी, खेड-शिवापूर व खाणापूर या विभागांमध्ये निवडणुकीची चुरस शिगेला पोहोचली आहे. बिनविरोध निवडीची शक्यता जवळपास संपुष्टात आली आहे.
निवडणूक अधिकारी डॉ. यशवंत माने यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तहसीलदार तृप्ती कोलते, अर्चना निकम आणि सचिन आखाडे यांच्या उपस्थितीत संपूर्ण नामनिर्देशन प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडली. वाढती स्पर्धा लक्षात घेता आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी प्रशासनाने कडक भूमिका घेण्याचे संकेत दिले असून निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

आठ लाखांहून अधिक भारतीय, युरोपियन युनियनच्या देशांमध्ये राहत आहेत..पंतप्रधान म्हणाले….

भारत-युरोपियन युनियन संयुक्त पत्रकार परिषदेतील पंतप्रधानांचे निवेदन

महोदय,

अध्यक्ष  अँटोनियो कोस्टा आणि अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयन,

दोन्ही देशांचे प्रतिनिधी,

माध्यमांमधील सहकारी,

नमस्कार!

या अभूतपूर्व भारत भेटीसाठी आलेले, माझे दोन जवळचे मित्र, अध्यक्ष  कोस्टा आणि अध्यक्ष  वॉन डेर लेयन यांचे स्वागत करताना मला आनंद वाटत आहे. कोस्टा जी, हे आपली साधी जीवनशैली आणि समाजावरील प्रेमासाठी “लिस्बनचे गांधी” म्हणून ओळखले जातात आणि उर्सुला जी, या जर्मनीच्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री आणि  युरोपियन युनियन कमिशनच्याही पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून संपूर्ण जगासाठी प्रेरणास्थान आहेत.

काल एक ऐतिहासिक क्षण होता, जेव्हा युरोपियन युनियनचे नेते प्रथमच भारताच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले. आज आणखी एक ऐतिहासिक प्रसंग आला आहे, जेव्हा जगातील दोन सर्वात मोठ्या लोकशाही शक्ति आपल्या संबंधांमध्ये निर्णायक अध्याय जोडत आहेत.

मित्रहो,

गेल्या काही वर्षांत भारत आणि युरोपियन दरम्यानच्या संबंधांमध्ये लक्षणीय प्रगती झाली आहे. सामायिक लोकशाही मूल्ये, आर्थिक ताळमेळ आणि दोन्ही देशांच्या जनतेमधील मजबूत संबंधांच्या आधारावर आमची भागीदारी नवी उंची गाठत आहे. आज आमच्यात 180 अब्ज युरोचा व्यापार आहे. आठ लाखांहून अधिक भारतीय, युरोपियन युनियनच्या देशांमध्ये राहत आहेत आणि सक्रिय योगदान देत आहेत. आम्ही धोरणात्मक तंत्रज्ञानापासून ते स्वच्छ ऊर्जेपर्यंत, डिजिटल प्रशासनापासून ते विकास भागीदारीपर्यंत प्रत्येक क्षेत्रात सहकार्याचे नवे आयाम स्थापित केले आहेत. या कामगिरीच्या आधारावर आजच्या शिखर परिषदेत आम्ही समाजाच्या सर्व घटकांना लाभ देणारे अनेक निर्णय घेतले आहेत.

मित्रहो,

आज भारताने आपल्या इतिहासातील सर्वात मोठा मुक्त व्यापार करार केला आहे. आज 27 तारीख आहे आणि हा एक सुखद योगायोग आहे की या दिवशी भारत युरोपियन युनियनच्या 27 देशांबरोबर एफटीए करत आहे. या ऐतिहासिक करारामुळे आमच्या शेतकरी आणि छोट्या उद्योगांना युरोपियन बाजारपेठेत प्रवेश करणे सोपे होईल, उत्पादन क्षेत्रात नवीन संधी निर्माण होतील आणि आमच्या सेवा क्षेत्रातील सहकार्य आणखी मजबूत होईल. एवढेच नाही, तर या मुक्त व्यापार करारामुळे भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातील गुंतवणुकीला चालना मिळेल आणि नवीन नवोन्मेषी भागीदारी निर्माण होईल. हा करार जागतिक स्तरावर पुरवठा साखळी मजबूत करेल. म्हणजेच हा केवळ व्यापार करार नाही, तर सामायिक समृद्धीची ही नवी ब्लू प्रिंट आहे.

मित्रहो,

या महत्वाकांक्षी एफटीए बरोबरच आम्ही गतिशीलतेसाठी एक नवीन आराखडाही तयार करत आहोत. यामुळे भारतीय विद्यार्थी, कामगार आणि व्यावसायिकांसाठी युरोपियन युनियनमध्ये नवीन संधी खुल्या होतील. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात आमचे दीर्घकाळापासून व्यापक सहकार्य आहे. आज आम्ही हे महत्त्वाचे संबंध आणखी मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे.

मित्रहो,

संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य हा कोणत्याही धोरणात्मक भागीदारीचा पाया असतो आणि आज आम्ही सुरक्षा आणि संरक्षण भागीदारीद्वारे त्याला औपचारिक स्वरूप देत आहोत. यामुळे दहशतवादविरोधी, सागरी आणि सायबर सुरक्षेतील आमची भागीदारी आणखी दृढ होईल. यामुळे नियमाधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेप्रति आमची सामायिक वचनबद्धता देखील अधिक दृढ होईल. हिंद-प्रशांत क्षेत्रात आमच्या सहकार्याची व्याप्ती वाढेल. आणि यामुळे आमच्या संरक्षण कंपन्यांना सह-विकास आणि सह-उत्पादनासाठी नव्या संधी मिळतील.

मित्रहो,

आज या कामगिरीच्या  आधारे आम्ही पुढील 5 वर्षांसाठी अधिक महत्वाकांक्षी आणि समग्र धोरणात्मक अजेंडा  जारी  करत आहोत. सध्याच्या जटिल जागतिक वातावरणात हा कार्यक्रम स्पष्ट दिशा देईल, आपल्या सामायिक समृद्धीला चालना देईल, नवोन्मेषाला गती देईल, सुरक्षा सहकार्य अधिक मजबूत करेल आणि लोकांमधील परस्पर संबंध  अधिक घट्ट करेल.

मित्रहो,

भारत आणि युरोपियन युनियन यांचे सहकार्य ‘जागतिक कल्याणासाठी एक भागीदारी’ आहे. आम्ही हिंद-प्रशांत क्षेत्रापासून ते कॅरेबियन पर्यंत, त्रिपक्षीय प्रकल्पांचा विस्तार करू. यामुळे शाश्वत शेती, स्वच्छ ऊर्जा आणि महिला सक्षमीकरणाला भक्कम समर्थन मिळेल. आम्ही एकत्रितपणे IMEC कॉरिडोरला, जागतिक व्यापार आणि शाश्वत विकासाचा एक प्रमुख दुवा म्हणून स्थापित करू.

मित्रहो,

आज जागतिक व्यवस्थेत बरीच उलथापालथ होत आहे. अशा स्थितीत भारत आणि युरोपियन युनियनची भागीदारी आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत  स्थैर्याला बळकटी देईल.  या संदर्भात आज आम्ही यूक्रेन, पश्चिम आशिया, हिंद-प्रशांत सह अनेक जागतिक मुद्द्यांवर विस्तृत चर्चा केली. बहुपक्षवाद आणि आंतरराष्ट्रीय निकषांचा आदर याला आमचे सामायिक प्राधान्य आहे. आजच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी जागतिक संस्थांमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे यावर आमचे एकमत आहे.

मित्रहो,

राष्ट्रांमधील संबंधांमध्ये कधी-कधी असा क्षण येतो, जेव्हा इतिहास स्वतःच सांगतो, येथून दिशा बदलली, येथून एका नवीन युगाची सुरुवात झाली. भारत आणि युरोपियन युनियनमधील आजची ही ऐतिहासिक शिखर परिषद हा तसाच क्षण आहे. मी पुन्हा एकदा, या अभूतपूर्व भेटीबद्दल, भारताप्रती असलेल्या तुमच्या मैत्रीबद्दल आणि आपल्या सामायिक भविष्याप्रति  तुमच्या वचनबद्धतेबद्दल अध्यक्ष  कोस्टा आणि अध्यक्ष  वॉन डेर लेयन यांचे मनापासून आभार मानतो.

यूरोपीय परिषदेचे अध्यक्ष आणि यूरोपीय आयोगाच्या अध्यक्ष यांच्या भारत भेटीदरम्यान झालेल्या करार, घोषणा, इत्यादींची सूची

क्रदस्तऐवजक्षेत्रे
1.2030 च्या दिशेने : भारत -यूरोपीय संघ संयुक्त सर्वसमावेशक धोरणात्मक कार्यक्रमभारत यूरोपीय संघ धोरणात्मक भागीदारीच्या सर्व पैलूंविषयीचा सर्वसमावेशक दस्तऐवज.
2.भारत- यूरोपीय संघ मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटी पूर्ण झाल्याची संयुक्त घोषणाव्यापार व अर्थव्यवस्था; आणि वित्त
3.भारतीय रिझर्व बँक आणि युरोपियन सिक्युरिटीज अँड मार्केट अथॉरिटी (ईएसएमए) यांच्यात सामंजस्य करार
4.प्रगत इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरी आणि शिक्का संबंधी प्रशासकीय व्यवस्था
5.सुरक्षा आणि संरक्षण भागीदारीसंरक्षण आणि सुरक्षा
6.भारत- यूरोपीय संघ माहिती सुरक्षा करारासाठी वाटाघाटींचा प्रारंभ
7.गतिशीलतेवरील सहकार्यासाठी सर्वसमावेशक चौकटीबाबत सामंजस्य करारकौशल्य आणि गतिशीलता
8.भारतात कौशल्य गतिशीलतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने यूरोपीय संघाचे प्रायोगिक लीगल गेटवे ऑफिस स्थापन करण्याची घोषणा
9.आपत्ती जोखीम व्यवस्थापन आणि आपत्कालीन प्रतिसाद यातील सहकार्यासंबंधी एनडीएमए आणि यूरोपीय नागरी संरक्षण आणि मानवतावादी मदत कार्यांसाठीचे महासंचालनालय (डीजी-ईसीएचओ) यांच्यात प्रशासकीय व्यवस्थाआपत्ती व्यवस्थापन
10.हरित हायड्रोजन कृती दलाची स्थापनास्वच्छ ऊर्जा
11.वैज्ञानिक आणि तांत्रिक सहकार्य यावरील भारत-ईयू कराराचे 2025- 2030 या कालावधीसाठी नूतनीकरणविज्ञान व तंत्रज्ञान आणि संशोधन व नवोन्मेष
12.होरायझन यूरोप कार्यक्रमासह सहकार्य करारात भारताच्या प्रवेशासाठी प्रारंभिक चर्चा सुरू
13.महिला आणि तरुणांसाठी डिजिटल नवोन्मेष आणि कौशल्य केंद्र; कृषी आणि अन्न प्रणालींमध्ये महिला शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी सौर-आधारित उपाययोजना; पूर्वइशारा देणाऱ्या प्रणाली; आणि आफ्रिका, हिंद-प्रशांत व कॅरिबियन क्षेत्रातील लहान द्वीपसमूहात्मक विकसनशील राष्ट्रांमध्ये सौर-आधारित शाश्वत ऊर्जा संक्रमण यावर भारत-ईयू त्रिपक्षीय सहकार्याअंतर्गत चार प्रकल्पांची संयुक्त अंमलबजावणी करण्याचा करारकनेक्टीव्हिटी

ब्लूमबर्ग म्हणाला- ट्रम्प यांना सडेतोड उत्तर, NYT ने म्हटले- टॅरिफच्या छायेत भारत-EU ने संबंध मजबूत केले

भारत आणि युरोपियन युनियन (EU) ने मंगळवारी मुक्त व्यापार करारावर (FTA) स्वाक्षऱ्या केल्या. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा व्यापार करार मानला जात आहे. युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डर लेयेन यांनी याला ‘मदर ऑफ डील’ म्हटले आहे.युरोपपासून अमेरिकेपर्यंत माध्यमांनी या FTA ला कव्हर केले आहे.

ब्लूमबर्गने लिहिले – ट्रम्प यांना सडेतोड उत्तर

ब्लूमबर्गने लिहिले की, ट्रम्प यांना सडेतोड उत्तर देत युरोपियन युनियन आणि भारताने ‘सर्वात मोठा करार’ केला. जवळपास दोन दशकांच्या वाटाघाटीनंतर युरोपियन युनियन आणि भारताने मुक्त व्यापार करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

हा करार आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याच्या प्रयत्नांचा भाग आहे, ज्याला ट्रम्प प्रशासनाच्या आक्रमक शुल्क धोरणांमुळे गती मिळाली आहे.

युरोपियन आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन यांनी मंगळवारी सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये म्हटले, “आम्ही सर्वात मोठा करार केला आहे. यामुळे दोन अब्ज लोकांचा एक मुक्त व्यापार क्षेत्र तयार झाला, ज्यामुळे दोन्ही पक्षांना फायदा होईल.”

या खास प्रसंगी युरोपीय परिषदेचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा देखील उर्सुलासोबत नवी दिल्लीत उपस्थित होते.
अमेरिकन वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्सने FTA वर लिहिले की, ट्रम्प यांच्या छायेत भारत-युरोपीय संघाने व्यापारी संबंध मजबूत केले आहेत. सुमारे दोन दशके चाललेल्या वाटाघाटीनंतर अखेर एक मोठा व्यापार करार झाला आहे. मंगळवारी दोन्ही बाजूंनी या मुक्त व्यापार कराराची घोषणा केली.

हा करार अशा वेळी झाला आहे, जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांमुळे जागतिक व्यवस्था आणि जुन्या युतींवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

त्याचबरोबर चीन स्वस्त वस्तूंनी जगाची बाजारपेठ भरत आहे आणि अमेरिकेला आता पूर्वीसारखा विश्वासार्ह आर्थिक भागीदार मानले जात नाहीये.

युरोपीय आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन आणि युरोपीय परिषदेचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा यांनी सोमवारी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली. याच दरम्यान या करारावर सहमती झाली.
बीबीसीने (BBC) लिहिले की, भारत आणि युरोपीय संघाने (European Union) सुमारे दोन दशके थांबून थांबून चाललेल्या चर्चेनंतर एका ऐतिहासिक व्यापार कराराची घोषणा केली आहे. दोन्ही बाजूंनी अमेरिकेसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संबंध अधिक दृढ करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

युरोपीय आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन यांनी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत सांगितले की, “आम्ही ते करून दाखवले, आम्ही आतापर्यंतचा सर्वात मोठा करार करून दाखवला आहे.” भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कराराला “ऐतिहासिक” म्हटले.

यामुळे २७ युरोपीय देशांचा समूह आणि जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशादरम्यान वस्तूंचा मुक्त व्यापार शक्य होईल, जे एकत्रितपणे जागतिक जीडीपीच्या सुमारे २५% आणि दोन अब्ज लोकांचे बाजारपेठ तयार करतात.

या करारामुळे शुल्कात (टॅरिफ) लक्षणीय घट होण्याची आणि दोन्ही बाजूंसाठी बाजारपेठेत प्रवेश वाढण्याची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे, सध्या मोटर वाहनांवर असलेला ११०% पर्यंतचा टॅरिफ कमी करून १०% केला जाईल.
अलजजीराने लिहिले की, भारत आणि युरोपियन युनियन एका मोठ्या व्यापार करारावर सहमत झाले आहेत. युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन आणि भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची घोषणा केली.

मंगळवारी लेयेन यांनी X वर एका पोस्टमध्ये म्हटले की, दोन्ही पक्ष आज इतिहास घडवत आहेत. त्यांनी पुढे म्हटले, “आम्ही आतापर्यंतचा सर्वात मोठा करार पूर्ण केला आहे. आम्ही दोन अब्ज लोकांचे एक मुक्त व्यापार क्षेत्र तयार केले आहे, ज्यामुळे दोन्ही पक्षांना फायदा होईल.”

मोदी म्हणाले की, सुमारे दोन दशके थांबून थांबून चाललेल्या वाटाघाटीनंतर ऐतिहासिक करार झाला आहे. त्यांनी वॉन डेर लेयेन आणि युरोपियन परिषदेचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा यांच्यासोबतच्या बैठकीपूर्वी याच्या फायद्यांचे कौतुक केले.

ते म्हणाले, “हा करार भारताच्या 1.4 अब्ज लोकसंख्येसाठी आणि युरोपियन युनियनमधील लाखो लोकांसाठी अनेक संधी घेऊन येईल.”

महापौर अन सभागृह नेत्याअगोदर महापालिकेचा विरोधी पक्ष नेता मैदानात.. निलेश निकम राष्ट्रवादीचे गटनेते

पुणे- राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहरच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक पक्षकार्याालयात आज संपन्न झाली. या बैठकीत सर्वांनुमते ॲड. निलेश निकम यांची पुणे महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली.
सदर प्रसंगी आ. चेतन तुपे शहराध्यक्ष सुनिल टिंगरे , सुभाष जगताप, प्रदीप देशमुख, दिपक मानकर , अक्रुर कुदळे , बाबूराव चांदेरे , दत्ता बहिरट व पक्षाचे इतर नवनिर्वाचीत नगरसेवक उपस्थित होते.
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याची व पुढील काळातील कामकाजाचे स्वरूप याविषयीचे विचारमंथन करण्यात आले , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची भूमिका विकासाभिमुख, लोकाभिमुख आणि जबाबदार असल्याचे सांगत, त्याच धर्तीवर पुणेकरांनी दिलेल्या विश्वासाला न्याय देणे ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले . अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे शहराच्या हितासाठी, नागरिकांच्या प्रश्नांसाठी आणि मजबूत महापालिकेसाठी सर्वांनी एकसंघपणे काम करत राहण्याचा संकल्प केला.

निलेश निकम यांचे वडील ॲड. N. T. निकम हे देखील नगरसेवक होते , उपमहापौर पद त्यांनी भूषविले होते. यामुळे वडिलांपासून च त्यांच्या घरात राजकारण आणि वकिली या दोन्ही क्षेत्राचा वावर राहिला .

निलेश निकम यांनी 1992 साली पहिल्यांदा नगरसेवक म्हणून महानगरपालिकेत प्रवेश केला. त्यानंतर 1992 ते 2012 या कालावधीत त्यांनी सलग 4 वेळा नगरसेवकपद भूषवून पुणे शहराच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे.
सन 2009-10 मध्ये स्थायी समिती अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना त्यांनी सर्वसामान्य, गरीब व गरजू घटकांसाठी महत्त्वपूर्ण ठरलेली “शहरी गरीब योजना” महानगरपालिकेत त्यांच्या अध्यक्षतेखाली प्रभावीपणे राबवली. ही योजना आजही पुणे महानगरपालिकेमध्ये यशस्वीपणे सुरू असून, त्याचा लाभ मोठ्या प्रमाणात पुणेकर नागरिक घेत आहेत, हे त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचे उत्तम उदाहरण आहे.
तसेच 2010-11 मध्ये सभागृह नेता म्हणून त्यांनी महापालिकेच्या कामकाजात सुसूत्रता, शिस्त आणि लोकहिताचा दृष्टिकोन ठेवत प्रभावी भूमिका बजावली.
त्यानंतर तब्बल 14 वर्षांनंतर, 2026 मध्ये पुन्हा एकदा नगरसेवक होण्याचा मान निलेश निकम यांना मिळाला आहे. त्यांच्या अनुभव, कार्यक्षमता आणि नेतृत्वावर विश्वास ठेवत अजितदादांच्या सूचनेनुसार पुन्हा एकदा त्यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

निलेश निकम यांच्या या नियुक्तीमुळे पुणे महानगरपालिकेतील / सत्ताधारी गटाला सक्षम, अनुभवी आणि लोकाभिमुख नेतृत्व लाभले असून, पुणे शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या प्रश्नांसाठी ते अधिक प्रभावीपणे काम करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे…

आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करा.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची राज्य निवडणूक आयुक्तांकडे पत्राद्वारे तक्रार.

मुंबई, दि. २७ जानेवारी २०२६

राज्यात सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहिता लागू आहे, असे असताना सत्ताधारी पक्षातील मंत्री जाणीवपूर्वक आणि उघडपणे या आचारसंहितेचे उल्लंघन करत असल्याचे गंभीर प्रकार समोर येत आहेत. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेच्या पूर्वसंध्येला सांगली जिल्ह्यात झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात, “जिल्हा परिषद निवडणुकीत विरोधकांचा टिकाव लागणार नाही, वेळ आणि पैसा कशाला वाया घालवता, अर्ज मागे घ्या” असे विधान केले आहे. हे विधान विरोधी पक्षांच्या उमेदवारांवर थेट दबाव टाकणारे असून निवडणूक प्रक्रियेला बाधा आणणारे आहे, याची तातडीने आणि गांभीर्याने दखल घेऊन चंद्रकांत पाटील यांच्यावर आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल गुन्हा दाखल करावा तसेच निवडणूक प्रक्रिया प्रभावित होऊ नये यासाठी त्यांना निवडणूक प्रचार सभा घेण्यास प्रतिबंध घालण्यात यावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

राज्य निवडणुक आयुक्त दिनेश वाघमारे यांना पाठवलेल्या पत्रात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणतात की, लोकशाही व्यवस्थेमध्ये निवडणुका निष्पक्ष, पारदर्शक आणि निर्भय वातावरणात पार पाडल्या जाव्यात, ही निवडणूक आयोगाची घटनात्मक जबाबदारी आहे. त्यासाठीच निवडणूक आयोग आदर्श आचारसंहिता लागू करतो. मात्र राज्य सरकारमधील वरिष्ठ मंत्री जाहीर सभेतून विरोधी पक्षांच्या उमेदवारांना उमेदवारी मागे घेण्याचे आवाहन करत असतील, तर तो केवळ आचारसंहिता भंग नसून निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करून प्रक्रिया प्रभावित करण्याचा गंभीर प्रकार आहे.

चंद्रकांत पाटील हे राज्याचे मंत्री असून त्यांच्या हातात प्रशासकीय व राजकीय सत्ता आहे. अशा पदावर असलेल्या व्यक्तीकडून केलेले असे विधान विरोधी पक्षांच्या उमेदवारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करते. उमेदवारांवर दहशत निर्माण करून त्यांना उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडणे किंवा प्रचारापासून परावृत्त करणे, हा लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांवर घाला आहे. यापूर्वी नगरपालिका व महानगरपालिका निवडणुकांच्या काळातही सत्ताधारी पक्षाच्या लोकांकडून अशाच प्रकारे दबावतंत्राचा वापर झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या. आता त्याचीच पुनरावृत्ती जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये होताना दिसत आहे, ही बाब अत्यंत गंभीर आहे. लोकशाही, संविधान आणि निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेचे रक्षण करणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे. त्या कर्तव्याची पूर्तता या प्रकरणात कठोर कारवाईद्वारे व्हावी असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

लक्झरी कारवरील टॅरिफ 110% ने घटून 10%, प्रीमियम मद्यावर 150% ऐवजी 20% टॅक्स

भारत आणि युरोपियन युनियनमध्ये मुक्त व्यापार कराराची घोषणा करण्यात आली आहे. युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो लुईस सॅंटोस दा कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन यांच्या संयुक्त अध्यक्षतेखाली झालेल्या १६ व्या भारत-ईयू शिखर परिषदेदरम्यान ही घोषणा करण्यात आली.

दोन्ही नेते सध्या भारताच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत आणि ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले आहेत. या करारामुळे व्यापार, सुरक्षा आणि स्वच्छ ऊर्जा यासारख्या क्षेत्रात सहकार्य बळकट होईल.

मंगळवारी एका कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी घोषणा केली की भारत आणि युरोपियन युनियनमध्ये मुक्त व्यापार करारावर सहमती झाली आहे. जगभरात त्याची “सर्व करारांची जननी” म्हणून चर्चा होत आहे.

दरम्यान, अमेरिकेने या व्यापार करारावर नाराजी व्यक्त केली आहे. अर्थमंत्री स्कॉट बेसंट म्हणाले की युरोप स्वतःविरुद्धच्या युद्धाला निधी देत ​​आहे.

परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सांगितले की, दोन्ही बाजूंच्या 100 हून अधिक सीईओंनी भारत-ईयू बिझनेस फोरमला हजेरी लावली. गेल्या दशकात भारत-ईयू संबंध सातत्याने मजबूत झाले आहेत.

मिस्री म्हणाले की, वेगाने बदलणाऱ्या जगात, भारत-ईयू धोरणात्मक भागीदारी केवळ द्विपक्षीयच नव्हे, तर जागतिक स्तरावरही महत्त्वाची बनली आहे, विशेषतः अशा वेळी जेव्हा जागतिक अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि धोरणात्मक संतुलन वेगाने बदलत आहे.

त्यांनी नमूद केले की, जगातील दुसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्था म्हणून, भारत आणि ईयू अनेक प्रमुख जागतिक मुद्द्यांशी थेट जोडलेले आहेत.
भारत-ईयू बिझनेस फोरममध्ये पंतप्रधान मोदींनी विश्वास व्यक्त केला की व्यवसाय या मुक्त व्यापार कराराद्वारे सादर केलेल्या संधींचा पुरेपूर फायदा घेतील. त्यांनी सांगितले की, हा करार भारत आणि ईयू दोघांच्याही प्राधान्यांशी सुसंगत आहे आणि व्यापार भागीदारीला देखील फायदा देईल.

मोदी म्हणाले की, आजच्या जगात, व्यापार तंत्रज्ञान आणि दुर्मिळ पृथ्वीवरील खनिजांचे शस्त्रीकरण केले जात आहे आणि दबाव आणण्यासाठी वापरले जात आहे, म्हणून भारत आणि ईयूने त्यांचे अवलंबित्व कमी करण्यासाठी एकत्र काम केले पाहिजे.

त्यांनी सांगितले की, दोन्ही बाजू बाह्य अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि इलेक्ट्रिक वाहन बॅटरी चिप्स आणि औषधी कच्चा माल यासारख्या क्षेत्रात विश्वसनीय पुरवठा साखळी तयार करण्यासाठी एकत्र काम करू शकतात.

त्यांनी सांगितले की, भारत आणि ईयू दोन्ही संरक्षण उद्योग आणि नवीन तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करत आहेत आणि व्यवसायांना संरक्षण, अवकाश, दूरसंचार आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) सारख्या क्षेत्रात भागीदारी वाढविण्याचे आवाहन केले.

पंतप्रधानांनी सांगितले की, शाश्वत भविष्य देखील भारत आणि ईयूसाठी एक सामायिक प्राधान्य आहे. त्यांनी ग्रीन हायड्रोजन, सौर ऊर्जा आणि स्मार्ट ग्रिड्स सारख्या क्षेत्रात संशोधन आणि गुंतवणूक वाढविण्याचे आवाहन केले. यासोबतच, लहान मॉड्यूलर रिअॅक्टर, शाश्वत वाहतूक, पाणी व्यवस्थापन, वर्तुळाकार अर्थव्यवस्था आणि शाश्वत शेती यासारख्या क्षेत्रात एकत्र काम करण्यावरही भर देण्यात आला.
युरोपियन युनियनमध्ये भारताची गुंतवणूक ₹४ लाख कोटींपेक्षा जास्त आहे.
भारत-युरोपियन युनियन बिझनेस फोरममध्ये पंतप्रधान मोदींनी सांगितले की, युरोपियन युनियनमध्ये भारताची गुंतवणूक आता जवळजवळ ४० अब्ज युरो (₹४३६,००० कोटी) पर्यंत पोहोचली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, भारतीय आणि युरोपियन कंपन्या संशोधन, उत्पादन आणि सेवांसह प्रत्येक क्षेत्रात एकत्र काम करत आहेत आणि यामध्ये व्यावसायिक नेते महत्त्वाची भूमिका बजावतात.

पंतप्रधानांनी सांगितले की, या भागीदारीचे समाजव्यापी भागीदारीत रूपांतर करण्याची वेळ आली आहे. या दृष्टिकोनासह, भारत आणि युरोपियन युनियनमधील मुक्त व्यापार करार आज अंतिम झाला आहे.

त्यांनी सांगितले की, या करारामुळे भारतीय कामगार-केंद्रित उत्पादनांना युरोपियन बाजारपेठेत सहज प्रवेश मिळेल. कापड, रत्ने आणि दागिने, ऑटो पार्ट्स आणि अभियांत्रिकी वस्तूंना फायदा होईल. फळे, भाज्या, प्रक्रिया केलेले अन्न आणि सीफूडसाठी देखील नवीन संधी खुल्या होतील, ज्याचा थेट फायदा शेतकरी आणि मच्छीमारांना होईल.

पंतप्रधान मोदींनी सांगितले की, या करारामुळे सेवा क्षेत्राला, विशेषतः आयटी, शिक्षण, पारंपारिक औषध आणि व्यवसाय सेवांना देखील फायदा होईल.

ते म्हणाले की, जागतिक व्यापारात सध्या लक्षणीय बदल होत आहेत आणि कंपन्या त्यांच्या धोरणांचा आणि भागीदारीचा पुनर्विचार करत आहेत. अशा वेळी, हा एफटीए व्यावसायिक समुदायाला एक स्पष्ट आणि सकारात्मक संदेश देतो.

कारवाईच्या नावाखाली पोलिसांनीच घातला दरोडा:15 तोळे सोने, 25 लाख लंपास; एपीआयसह 5 जणांवर गुन्हा

बांगलादेशींवर कारवाईच्या नावाखाली पोलिसांकडून लूट
पुणे- घुसखोर बांगलादेशींवर कारवाई करण्याच्या गृहविभागाच्या आदेशाचा काही पोलिस अधिकाऱ्यांनी चक्क ‘धंदा’ मांडल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. खाकी वर्दीतील दरोडेखोरांचा नवी मुंबई आणि कल्याण परिसरात उच्छाद पाहायला मिळत असून, घुसखोर बांगलादेशींविरोधातील कारवाईचा फायदा घेत त्यांनाच लुटणाऱ्या एका सहायक पोलिस निरीक्षकासह (API) चार पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईच्या नावाखाली घरात घुसून रोख रक्कम आणि दागिने असा सुमारे २५ ते ३० लाखांचा ऐवज लुटल्याचा खळबळजनक प्रकार चेंबूरच्या आरसीएफ पोलिस तपासात उघडकीस आला आहे.

नवी मुंबईतील एका बारमध्ये काम करणारी अस्मा पॉली (मूळची बांगलादेशी) ही २ जानेवारी २०२६ रोजी कोपरखैरणे येथील तिच्या घरी असताना, साध्या वेशात काही पोलिस एका एजंटसह तिच्या घरी आले. त्यांनी अस्माची चौकशी केली आणि तिला बळजबरीने पोलिसांच्या गाडीत बसवले. अस्मा गाडीत असताना पोलिसांनी तिच्या घराची झडती घेतली. मात्र, पोलिस ठाण्यात नेल्यानंतर अस्माला तिच्या बहिणीकडून समजले की, घरातील सर्व सामान गायब आहे. अस्माच्या दाव्यानुसार, पोलिसांनी तिच्या घरातून १५ तोळे सोने आणि २० ते २५ लाख रुपयांची रोकड लंपास केली होती.

लूट केल्यानंतर हे प्रकरण अंगाशी येईल, या भीतीने पोलिसांनी अस्मा काम करत असलेल्या बारच्या मालक रमेश अण्णाला मध्यस्थीसाठी बोलावले. पोलिसांनी चोरलेल्या रकमेपैकी केवळ ५ ते ६ लाख रुपये आणि काही दागिने बार मालकाकडे सुपूर्द करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. तसेच, पोलीस शिपाई खांडके याने अस्माला “याबद्दल कुणालाही काही सांगायचे नाही,” अशी धमकीही दिली. मात्र, आपल्या कष्टाची मोठी रक्कम आणि दागिने गेल्याने अस्माने हिंमत करून आरसीएफ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

तपासादरम्यान समोर आले की, याच पोलिस पथकाने २५ डिसेंबर २०२५ रोजी कल्याणमधील शर्मिण खातून या बांगलादेशी महिलेच्या घरात घुसून तिलाही कारवाईची भीती घातली आणि ५ लाख रुपये उकळले होते. पोलिसांसोबत एक अज्ञात एजंट असायचा, जो बांगलादेशींच्या घरांची माहिती काढून त्यांना घाबरवण्याचे काम करायचा. आरसीएफ पोलिसांनी याप्रकरणी ४ पोलिस कर्मचारी आणि १ अज्ञात व्यक्तीवर BNS कलम ३०५ (A), ३०८(२), ३५१(२) आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

ज्या घुसखोरांमुळे देश धोक्यात असल्याचे सांगून गृह विभाग कारवाईचे आदेश देत आहे, त्याच घुसखोरांना लुटण्यासाठी पोलिस दलातील अधिकारी दरोडे टाकत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारवाईच्या नावाखाली लुटमार करणाऱ्या या पोलिसांवर आता कोणती कठोर विभागीय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पुण्यात ताडीवाला रस्त्यावर दोन गटांत हाणामारी:बंडगार्डन पोलिसांनी १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला

पुणे :स्टेशन परिसरातील ताडीवाला रस्त्यावर किरकोळ वादातून दोन गटांमध्ये मारामारीची घटना घडली. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी दोन्ही गटांतील एकूण १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यात पाच महिलांचा समावेश असून, पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारी नोंदवल्या आहेत.

ही घटना २५ जानेवारी रोजी सायंकाळी प्रायव्हेट रोड येथे आयोजित केलेल्या महाप्रसादाच्या वेळी घडली. किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर मारामारीत झाले. आरोपींनी जेवणासाठी ठेवलेल्या खुर्च्या आणि ताटे फेकून दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी अजय आनंद भालशंकर (वय २९, रा. प्रायव्हेट रोड, ताडीवाला रस्ता, पुणे स्टेशन) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात पहिली फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, सोनू काळे, दस्तूर नदाफ, गणेश काळे, रफीक नदाफ, इस्माइल नदाफ, साहिल नदाफ आणि भूषण भंडारी यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी घरातील महिलांना मारहाण केली आणि अजय यांचा भाऊ अमर याच्या दुचाकीची तोडफोड केल्याचे भालशंकर यांनी म्हटले आहे.

दुसरीकडे, अक्षय उर्फ सोनू हरिश्चंद्र काळे (वय ३३, रा. प्रायव्हेट रोड, ताडीवाला रस्ता, पुणे स्टेशनजवळ) यांनीही परस्परविरोधी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, अक्षय भालशंकर, अजय भालशंकर, अमर भालशंकर, आम्रपाली अक्षय भालशंकर, पूनम अजय भालशंकर, अरुणा भालशंकर, दीपाली आणि रुपाली यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाप्रसादाच्या वेळी किरकोळ वादातून आरोपींनी काळे आणि त्यांचा मित्र भूषण भंडारी यांना मारहाण केली, तसेच गीता घाटे यांनाही मारहाण झाल्याचे काळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

बंडगार्डन पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या तक्रारींची नोंद घेतली असून, या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर गर्कळ करत आहेत.

पुण्यात काँग्रेसचे काही नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांच्या संपर्कात ?

राजकीय वर्तुळात खळबळ माजविणारी बातमी

पुणे- चंद्रपूरात कॉँग्रेसचे नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याचे एकीकडे सुधीर मूनगुंटीवार यांनी म्हटले आहेत तर दुसरीकडे पुण्यात एकहाती मोठे बहुमत मिळविलेल्या भाजपा च्या नेत्याशी कॉँग्रेसचे अनेक नगरसेवक संपर्कात असल्याचे वृत्त येथे हाती आले आहे.आता हा संपर्क हि हातमिळवणी ठरणार, पक्ष बदल स्वरूपात होणार कि अन्य हे मात्र येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे .पुणे महापालिकेत कॉँग्रेसचे 15 नगरसेवक निवडून आले आहेत.भाजपचे 119 नगरसेवक निवडून आले आहेत.अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे 30 नगरसेवक निवडून आलेत ठाकरेंच्या शिवसेनेचा 1 निवडून आला आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांना भुईसपाट करण्यात मोहोळ आणि गणेश बिडकर यांची कुशल राजनीती असल्याचे मानले जाते आहे.कॉँग्रेसचे पूर्वीचे 9 नगरसेवक आता 15 संख्येवर पोहोचले असल्याने कॉंग्रेस पक्ष वाढला असे दिसत असले तरी यामागे मोठे राजकीय षड्यंत्र असल्याचे सांगितले जाते आहे.त्याचाच भाग म्हणून भाजपच्या मातब्बर नेत्यांच्या विरोधात भाजपचेच चेहरे ,कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून उभे राहिल्याचे दिसले होते . दोन्ही राष्ट्रवादी निवडणुकीपूर्वी एकत्र येण्यासाठी जे घडले ते राजकारण ज्या दोघांनी घडवून आणले ते दोघे आता नगरसेवक उरलेले नाहीत आणि त्यांनी शरद पवार गटाचा व्यवस्थित सफाया केला आहे असा आरोप राष्ट्रवादीतून कॉंग्रेस मध्ये गेलेल्या माजी महापौरांनी केला आहेच . दरम्यान अजित पवार गटाला योगायोगाने अमोल बालवडकर,नीलेश निकम आणि बाबूराव चांदेरे यांसारखे नगरसेवक मिळाले . स्वप्न जरी साकार झाले नाही तरी अजित पवार स्वतः राज्यात महायुतीत आहेत, उपमुख्यमंत्री म्हणून सत्तेत आहेत .या पार्श्वभूमीवर केवळ काँग्रेस हाच विरोधी पक्ष अशी अनेकांची भावना असताना मोठ्या कौशल्याने मोहोळ यांनी आखलेली राजनीति आता कदाचित समोर येईल असे अनेकांना वाटते आहे.काँग्रेस मधील मातब्बर या निवडणुकीत घरी बसल्याने किंवा बसविल्याने अनेकांनी तोंडात बोटे घातली ही यामागील कारण आहे. ज्यांनी कधी कोणाचे रेशन कार्ड काढून दिले नाही आधार कार्ड काढून दिले नाही असे चेहरे केवळ कमळ चिन्ह घेऊन आता महापालिकेत नगरसेवक म्हणून झळकणार आहेत ज्यांची संख्या ६० टक्के एवढी असणार आहे. काँग्रेस मध्ये केवळ शहर अध्यक्ष असलेले अरविंद शिंदे यांच्या हाती विरोधी पक्ष म्हणून खरी मदार आहे. आणि त्यांच्या कुशलतेची पुढील काळात कसोटी लागणार आहे. कॉंग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना त्यांचाच आसरा असणार आहे, काँग्रेस गटनेता पद आणि एकूणच काँग्रेस पक्ष आता तेच चालवतील असे दिसत असताना भाजपा नेत्यांनी ‘मोठा गळ ‘ टाकला आहे.ज्याकडे काँग्रेसचे अनेक नगरसेवक खेचले गेले नाहीत तर नवलच . काँग्रेस भवनात निंवडणुका झाल्यावर शहर अध्यक्षांनी 2/ 3 वेळ सर्व निवडून आलेल्या नगरसेवकांच्या बैठक घेतल्या.पण महापालिकेतील उपमहापौर पदा पासून ते स्थायी समितीचे सदस्य पद,शिक्षणविभाग आणि विविध समित्या यांचे सदस्यपद एवढेच नव्हे तर वॉर्ड स्तरीय निधी मध्ये भाजपच्या सीनियर नेत्या प्रमाणे तरतूद मिळणे आशा विविध बाबी बद्दल गेल्या टर्म मधील अनुभव आणि राजनीति पाहता त्या अनुषंगाने काँग्रेसच्या 10 नगरसेवकांना खेचले जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. काँग्रेस मध्ये राहून 5 वर्षे नगरसेवक पदावरून काय करता येईल आणि भाजपात जाऊन 5 वर्षात नगरसेवक पदावरून काय करता येईल यांचा अंदाज बांधून आता हालचाली होण्याची शक्यता नाकारता येत नाही.भाजपा नेत्यांच्या म्हणण्यानुसार आम्हाला बहुमत असल्याने आशा गोष्टींची गरज नसल्याचे म्हटले जात असले तरी शिंदे सेना,मनसे पेक्षा काँग्रेस कमजोर करण्याची जबाबदारी पुण्यातील भाजपा नेत्यावर आहे.आणि 9 चे 15 नगरसेवक जरी निवडून आले तरी संबंधित भाजपा नेत्यांनी काँग्रेस कमजोर करण्याची ७ ० टक्के जबाबदारी पार पाडल्याचा दावा भाजपच्या राजकीय स्तरावर होतो आहे. आता आणखी काही नगरसेवक भाजपा नेत्याशी हातमिळवणी करत असल्याचे वृत्त आल्याने कोणाला काही फारसे नवल वाटेनासे झाले आहे.

6 महिन्यांनंतरही माजी उपराष्ट्रपती धनखड ‘बेघर’

नवी दिल्ली-

राजीनामा देऊन 6 महिने आणि अर्ज करून 5 महिने उलटले आहेत, परंतु माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड अजूनही एका खाजगी फार्म हाऊसमध्ये राहत आहेत. बंगला मिळण्यास विलंब झाल्याने धनखड यांच्या जवळचे लोक म्हणतात, ‘सप्टेंबरमध्ये सांगण्यात आले होते की त्यांच्या नावाने बंगला अलॉट झाला आहे. दुरुस्तीला सुमारे 3 महिने लागतील. नोव्हेंबरमध्ये आणि नंतर जानेवारीत बंगल्याची स्थिती विचारली असता, पुन्हा दुरुस्तीचीच गोष्ट सांगण्यात आली.’
माजी उपराष्ट्रपतींना वाटप करण्यात आल्याचे सांगितले जात असलेल्या बंगला क्रमांक 34 वर प्रत्यक्षात मात्र कसलीही दुरुस्ती दिसलेली नाही दिल्लीत हा टाईप-8 बंगला अगदी ओस पडला आहे. हे पाहून स्पष्टपणे लक्षात येते की येथे अनेक वर्षांपासून कोणीही आलेले नाही. येथे ना साफसफाई झाली आणि ना दुरुस्ती. तेथे ना कोणताही कामगार दिसतो आणि ना गवंडी…यावरून हे स्पष्ट होते की बंगल्याची दुरुस्ती सुरू नाही
. येथील गार्डनेही यास दुजोरा दिल आहे.
गृहनिर्माण आणि शहरी मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार , ‘21-22 ऑगस्ट रोजी धनखड यांच्याकडून विभागाला बंगल्यासाठी अर्ज मिळाला होता. आधी चर्चा झाली होती की ते सरकारी बंगला मिळाल्यानंतरच सध्याचे सरकारी घर सोडतील. मात्र, त्यांनी सप्टेंबर 2025 मध्ये नवीन ठिकाण मिळाल्याशिवायच बंगला सोडला.ते त्यावेळी दाबवाखाली होते की नाही आम्हास माहिती नाही यापूर्वीही कोणत्याही माजी उपराष्ट्रपतीला बंगल्यासाठी 5-6 महिने वाट पाहावी लागली होती का? याबाबतचा तपशील विचार घेतला तर दोघांना एक महिन्याच्या आत बंगला मिळाला होता.इतरांना तातडीने मिळाले होते.

मग त्यांना बंगला मिळायला उशीर का होत आहे? हे प्रकरण खूप संवेदनशील आहे. कोणतीही माहिती लीक झाली, तर गोंधळ होईल. या प्रकरणात कोणालाही माहिती देऊ नये, असे विभागाला सक्तीने सांगण्यात आले आहे.’

पुणेकरांना कळलं तरी वळणार नाही, मरायला लागलं तरी ‘विकासखोर’ पक्षालाच मतं देणार…नदीचे गटार बनविल्याचा आरोप करत विश्वंभर चौधरींचा संताप

पुणे- नदी सुधारणा प्रकल्पावरून पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणवादी विश्वंभर चौधरी यांनी महापालिका , प्रशासकीय अधिकारी आणि थेट पुणेकरांवर देखील संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियातून त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. त्याचे झाले असे काही हजार कोटींच्या नदी सुधार प्रकल्पात नदीच्या प्रदूषणावर मात करणे आणि नदी सुशोभित करणे याबाबतचा प्रकल्प गेली काही वर्षे महापालिका राबवीत आहे. यासाठी आता पर्यंत सुमारे १००० कोटी रुपये खर्च देखील झालेले आहेत . आता लवकरच महापालिका यातील पूर्ण झालेल्या १.५० कि.मी. ट्रॅकचे लोकार्पण पुणे महानगरपालिका वर्धापन दिनानिमित्त १५.०२.२०२६ रोजी करण्यात येणार असून, नागरिकांसाठी सकाळी ६ ते ९ व संध्याकाळी ५ ते ८ या वेळेत वापरासाठी उपलब्ध करणार आहे.त्या अनुषंगाने महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आज संबधित ठिकाणी भेट देऊन फोटो सेशन करत हे जाहीर करून टाकले आहे. हे फोटो पाहूनच आपली प्रतिक्रिया विश्वंभर चौधरी यांनी व्यक्त केली आहे … पहा त्यांच्याच शब्दात त्यांनी काय म्हटले आहे.

पुणे महापालिकेच्या अधिकृत पेजवरचा फोटो. नदीचं किती वाटोळं केलं ते पुणेकरांना कळलं तरी वळणार नाही. मरायला लागलं तरी विकासखोर पक्षालाच मतं देणार.

नैसर्गिक काठ उद्ध्वस्त केलेत दोन्ही बाजूंचे आणि मोठी झाडं तोडून सिमेंटच्या पायर्‍या बनवल्या आणि त्यात मग तुरळक छोटी झाडं लावून पर्यावरणप्रेम दाखवलंय. इतका भंपक विकास जगात कुठेही नसतो. टेंडर आणि पैसा यांनी उद्युक्त झालं की एवढाच विकास होणार.

पुणेकरांनो आता उन्हाळ्यात बूड पोळवत बसा या या सिमेंटच्या कट्ट्यावर आणि बघत रहा गटार केलेल्या नदीकडे. पण प्रश्न विचारू नका. लाडक्या पक्षाला भंपक विकासासाठी मत देऊन नैसर्गिक आपत्ती ओढवून घ्या पुरासारख्या पण प्रश्न नका विचारू.

काय म्हणतोय हे कळत नसेल तर अहमदाबादला जाऊन साबरमती बघा. तिचे असेच हाल केलेत. साबरमतीच्या नदीपात्रात तापमान गांधींच्या आश्रमापेक्षा दोन-तीन डिग्री जास्त वाटतं. नदीचं वाळवंट केलंय. मुठेचंही वेगळं काही होणार नाही.

नदी कधीच एकटी नसते. तिच्या काठावरची पूर नियंत्रणात आणणारी झाडी, तिनं तयार केलेल्या छोट्या पाणथळ जागा, तिथले किडे, पक्षी, वाळू आणि बरंच काही मिळून बनते ती नदी. अन्यथा सिमेंटचं बंदीस्त गटार.

पुणे महानगरपालिकेचे वतीने भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन संपन्न

पुणे महानगरपालिकेचे वतीने भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन संपन्न करण्यात आला.
प्रशासक तथा महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पुणे महानगरपालिकेच्या प्रांगणातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्टीत पुतळ्यास पुष्प अर्पण केले. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्प अर्पण केले. त्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
तसेच सकाळी ८.०५ वाजता प्रशासक तथा महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांचे हस्ते ध्वजारोहण व ध्वजवंदन करण्यात आले व संविधानाच्या प्रास्ताविकाचे सामुहिक वाचन करण्यात आले.
याप्रसंगी अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट) पृथ्वीराज बी. पी. , अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) पवनीत कौर , अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे तसेच विविध विभागांचे उपआयुक्त व खातेप्रमुख तसेच इतर अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.