Home Blog Page 125

महिलांचे शोषण करणारा अशोक खरात महाराष्ट्राचा ‘आसाराम बापू’, खरातला कोणाचा राजकीय आशिर्वाद?: हर्षवर्धन सपकाळ

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष भोंदूबाबाच्या पाद्यपुजा करतात हेच पुरोगामी महाराष्ट्राचे दुर्दैव, रुपाली चाकणकरांची हकालपट्टी करा.

रासपचे अध्यक्ष महादेव जानकरांनी घेतली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट, पोटनिवडणुकीसंदर्भात चर्चा..

मुंबई,
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी बेड्या ठोकल्या ते बरेच झाले पण हा भोंदूबाबा महाराष्ट्राचा आसाराम बापू आहे. आसाराम बापू, राम रहिम यांनी जे केले तेच या अशोक खरातने केले असून ५८ व्हिडिओ नाही तर सखोल चौकशी केली तर शेकडो व्हिडिओ उघड होतील. महिलांचे शोषण करणाऱ्या या भोंदूबाबाला कठोर शिक्षा तर झाली पाहिजे अशी मागणी करून आजपर्यंतचे त्याचे कारनामे पाहता त्याला कोणाचा तरी राजकीय आशिर्वाद असला पाहिजे, त्याच्या मागे ही कोणती राजकीय शक्ती आहे, ते महाराष्ट्राच्या जनतेला समजले पाहिजे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

गांधी भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, महाराष्ट्र हा शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचे राज्य आहे, राज्यात अंधश्रद्धेविरोधातील कायदा असतानाही अशोक खरात सारखा भोंदूबाबा त्याचे गोरखधंदे बिनदिक्कतपणे करतो व त्याची कोणालाच भनक लागत नाही हे विशेष. अशोक खरातच्या ट्रस्टवर असलेले व त्याला पाठबळ देणारे जे लोक आहेत त्यांचीही चौकशी झाली पाहिजे. आसाराम बापू सोबत नरेंद्र मोदी अनेकदा दिसले होते तीच विकृती महाराष्ट्रात फोफावली आहे. नाशिकमध्ये जी विकृती दिसली त्याचे नवल वाटत नाही. पुरोगामी राज्यात अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात असून असे विकृत लोक सत्तेच्या भरोशावर आपले धंदे राजरोसपणे करतात. भाजपाची खुशामतगिरी करणारी ही प्रवृती महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या विरोधात आहे. अंधश्रद्धा थांबावी यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना आयुष्यभर लढा दिला पण त्यांनाच गोळ्या घालून ठार करण्यात आले असे सपकाळ म्हणाले.

महिला आयोगाने महिला शोषणाच्या विरोधात काम करणे अपेक्षित आहे पण महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी अशोक खरातची पाद्यपूजा केली हे त्यांचे कृत्य खरातसारख्या भोंदूना पाठबळ देणारे आहे. असा प्रकार त्यांच्याकडून पहिल्यांदाच झालेला नाही तर पुण्यातील हगवणे प्रकरण असो वा साताऱ्यातील महिला डॉक्टरचे प्रकरण, चाकणकर आरोपीची पाठराखण करताना दिसल्य़ा आहेत. खरे तर त्यांचे कामकाज पाहता आतापर्यंत त्यांचा राजीनामा व्हायला पाहिजे होता, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

रासपचे महादेव जानकरांनी घेतली सपकाळांची भेट..
राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर यांनी आज गांधी भवन येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेऊन राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत सविस्तर चर्चा केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, राज्यात या आधी नांदेड, पुण्यातील कसबा, देगलूर मतदारसंघात पोटनिवडणुका झालेल्या आहेत. नांदेड लोकसभा व देगलूरच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने काँग्रेस विरोधात उमेदवार दिले होते त्याठिकाणी काँग्रेस विजयी झाली तर कसबा पोटनिवडणुकीतही काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते. त्यामुळे निवडणुका व सहानुभूती हे दोन वेगळे मुद्दे आहेत. अजित पवार यांचे अकाली व अपघाती निधन ही दुःखद घटना आहे. बारामतीचा विचार करता या मतदारसंघात विधानसभा व लोकसभा निवडणुकीत पवार विरु्दध पवार निवडणुका झाल्या आहेत व राज्यसभेलाही आठवा उमेदवार असता तर पवार विरुद्ध पवार निवडणूक झालीच असती. बारामती आणि राहुरी या दोन्ही जागेवर आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते. महाविकास आघाडी म्हणून या निवडणुकांसदर्भात त्यांच्याशी करू आणि त्यानंतर उमेदवार उभा करायचा की नाही, याचा निर्णय घेऊ असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

होर्मूज मधून भारतीय नौका सोडण्याचे श्रेय इराण कडून भारतीय जनतेस..!

इराण प्रतिनिधी मंडळाचा खुलासा सत्य वास्तवतेवर आधारित …..
⁃ काँग्रेस’चे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी
पुणे –

देशाचे (भाषणजीवी) पंतप्रधान मोदी हे देशहिताचे निर्णय तत्परतेने घेत नाही, तेंव्हा ‘जनता आणि विपक्ष विदेशनीती हातात घेऊन राष्ट्रहित जपते’ याचा प्रत्यय ईराण’च्या निर्णय प्रक्रियेतून आल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस’चे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले.
इराणने भारताचे दोन जहाज होर्मुज मधून सोडताना भारत सरकार’चा स्पष्ट अनुल्लेख करून, संपूर्ण श्रेय स्पष्टरित्या ‘भारतीय जनतेला’ दिले असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, भारताचा जुना मित्र इराणला जेंव्हा दुष्ट प्रवृत्तीचा इज्राइल धमक्या देत होता, तेंव्हा असंख्य देशांनी अटक वारंट काढलेल्या इज्राइलच्या नेतान्याहूने पंतप्रधान मोदींना तातडीने बोलावून घेतले व एक मेडल (पुरस्कार) *बहाल केला (गळ्यात बांधला) आणि आपल्या कुकर्मांना भारताची अप्रत्यक्ष स्वीकृती मिळवून घेत, दुसऱ्या दिवशी इराणवर इज्राइल आणि अमेरिकेने हल्ला केला, इराणचे सर्वोच्च नेते अली खोमेनींना मृत्यूस सामोरे जावे लागले, मात्र पारंपरिक मित्र असलेल्या भारत सरकारने, साधा शोक संदेश ही तत्परतेने दिला नसल्याचा तर *अत्यंत विलंबाने दिल्याचा आरोप ही त्यांनी केला.


भारतीय जनता’ मात्र इराणवर झालेल्या या अत्याचारामुळे दुखावली, इराणचे समर्थन आणि शहिद अली खोमेनी यांच्या समर्थनार्थ शोक संदेशांचा देशात पाऊस पडला.
भारत सरकारच्या अश्या वागण्यामुळे दुखावलेला इराण, ‘भारतीय जनतेच्या प्रेमाने’ मात्र निश्चितच सुखावला.
तसेच, इराण’चे पूर्णतः निशस्त्र युद्धक जहाज भारताच्या आमंत्रणावर विशाखापट्टण येथे आले होते, त्याच्या सैनिकांनी विशाखापट्टणमच्या रस्त्यावर भारतीय राष्ट्रपतींना सलामी दिली मात्र परतीच्या प्रवासात (भारताच्या जवळच) अमेरिकेने युद्ध नियम धाब्यावर ठेऊन, या निःशस्त्र जहाजाला बुडवले. जहाजातून आपत्तीचा एसओएस कॉल प्रथम भारताला देण्यात आला होता पण भारत सरकारला बुडणाऱ्या इराणी प्रवाशांना वाचवण्याची कदाचित अमेरिकडून अनुमती मिळाली नसावी म्हणूनच भारत सरकारने वा सैन्याने पावले उचलली नसावीत अशी उपहासात्मक टिका ही काँग्रेस वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.
त्याचवेळी लहानशा श्रीलंकेने मात्र कसल्याही अनुमतीची पर्वा न करता आपल्या छोट्याश्या कुवतीने जमेल तितक्या इराणी लोकांना वाचवले याकडे ही त्यांनी लक्ष वेधले.


भारत सरकारने पुन्हा साधा ‘शोक संदेश’ ही दिला नाही का अमेरिकेच्या दबावाखाली भारत सरकार हे करू शकले नाही.. (?) असा संतप्त सवाल की काँग्रेस’चे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला.
भारतीय जनता पुन्हा हळहळली, शोक संदेशांचा आणि आपल्याच सरकारच्या निर्भर्त्सनेचा देशात विविध माध्यमांवर पाऊस पडला. देशाच्या विदेशनीतीची व भारताच्या सार्वभौमत्वाची अशी दुर्गती पाहून, विपक्षाने सूत्रे आपल्या हातात घेतली.
ज्येष्ठ काँग्रेस नेत्या श्रीमती सोनिया गांधी यांनी यावर देशातील प्रमुख माध्यमातून विस्तृत लेख लिहून, ‘सद्य स्थितीतील भारत सरकारची नीती ही भारताची नीती नाही, भारतीय जनतेची ही नीती नाही, हा भारतीय जनमानसाचा दृष्टिकोन नाही, हे साऱ्या जगासमोर विशेषतः इराणसमोर स्पष्ट केले.
त्याचीच् परिणीती म्हणजे इराणने भारताचे दोन जहाज होर्मुजतून सोडले आणि हा ‘मित्रत्वाचा, संवेदनशीलता व आत्मियतेचा* भाव’ भारत सरकार मुळे नसून ‘भारतीय जनतेचा’ आहे हे अगदी इराण’ने स्पष्ट शब्दात सांगितले.
अश्या रितीने भारतातील जनता आणि विरोधी पक्ष’ यांनी विदेश नीतीत कृतीशील पुढाकार घेऊन युद्धजन्य परिस्थितीत ‘भारतास संभाव्य ऊर्जा संकटपासून काही काळ वाचवण्याचा प्रयत्न केला’ याचे श्रेय काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या व लोकसभेच्या माजी विरोधीपक्ष नेत्या श्रीमती सोनियाची गांधी यांना व देशातील संवेदनशील व मानवतावादी ईराणप्रेमी सामाजिक घटकांना जात असल्याचे काँग्रेस वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी दिलेल्या प्रसिद्धी निवेदनात म्हटले आहे.

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर समृद्धी, आरोग्य आणि सकारात्मकतेचा संदेश; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

हिंदू नववर्षानिमित्त समाजात एकोपा, जिव्हाळा आणि प्रगतीचे वातावरण निर्माण होण्याचे आवाहन

मुंबई, दि. १९ मार्च २०२६ : हिंदू नववर्षाचा पहिला दिवस असलेल्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्यातील जनतेला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रत्येक घरामध्ये गुढी उभारून नववर्षाचे स्वागत केले जाते. महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता भारतातील विविध राज्यांमध्ये हा सण वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

या पावन निमित्ताने सर्वांना वर्षभर यश, समृद्धी, उत्तम आरोग्य, मानसिक शांतता आणि अष्टलक्ष्मीची प्राप्ती होवो, अशा शुभेच्छा डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या. तसेच समाजामध्ये एकोपा, जिव्हाळा, आरोग्यदायी व उत्साहवर्धक वातावरण आणि सकारात्मक विचारांची वृद्धी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार विविध आव्हानांना सामोरे जात नागरिकांना सुखी ठेवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचे सकारात्मक परिणाम देशावर दिसून येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार कार्यरत असून सध्या सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये राज्यातील विविध प्रश्नांवर न्याय देण्यासोबतच अनेक महत्त्वपूर्ण विधेयके मंजूर केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

विधान परिषदेच्या उपसभापती, शिवसेना नेत्या तसेच स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा या नात्याने डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्यातील सर्व नागरिकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची बिनविरोध निवड- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

अध्यक्षपदी विरधवल कृष्णराव जगदाळे;उपाध्यक्षपदी विवेक प्रतापराव वळसे पाटील

पुणे- जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विरधवल कृष्णराव जगदाळे आणि उपाध्यक्षपदी विवेक प्रतापराव वळसे पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी, अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणूक जिल्हा परिषद यांनी जाहीर केले.

जिल्हा परिषदेच्या पाचव्या मजल्यावरील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित जिल्हा परिषदेची विशेष सभा आणि अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणूकीच्यावेळी उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-२०२५ च्या समन्वयक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी चारुशिला देशमुख-मोहिते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकात वाघमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात, भुषण जोशी, जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य, पंचायत समितीचे सभापती आदी उपस्थित उपस्थित होते.

श्री. डुडी म्हणाले, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६९ चे कलम ४५ (२) आणि महाराष्ट्र जिल्हा परिषदा (अध्यक्ष आणि उपाध्यक्ष व निवडणूक) नियम १९६२ प्रमाणे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली आहे, असे श्री. डुडी म्हणाले.

अध्यक्ष पदाकरिता विरधवल कृष्णराव जगदाळे आणि विजयसिंह बाबासाहेब शिंदे यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले, त्यापैकी विजयसिंह बाबासाहेब शिंदे यांनी माघार घेतली. तसेच उपाध्यक्ष पदाकरिता विवेक प्रतापराव वळसे पाटील आणि मंगेश गुलाबराव काकडे यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. त्यापैकी मंगेश गुलाबराव काकडे यांनी माघार घेतली. त्यामुळे अध्यक्षपदी विरधवल कृष्णराव जगदाळे तर उपाध्यक्षपदी विवेक प्रतापराव वळसे पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

सुरुवातीला श्री. डुडी यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाकरिता प्राप्त नामनिर्देशन पत्राचे वाचन केले. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाकरिता प्राप्त सर्व नामनिर्देशन पत्र वैध असल्याचे जाहीर करुन ते मागे घेण्याकरिता १५ मिनीटांचा कालावधी देण्यात आला.

सुरुवातीला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

सांस्कृतिक कार्य विभागाचा गौरवशाली उपक्रम : प्रथम क्रमांकाचा चित्ररथ गिरगावात प्रदर्शनासाठी

0

कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव

मुंबई, दि. १९ मार्च : नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावर पार पडलेल्या भव्य संचलनात प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाचे गिरगाव, मुंबई येथे नागरिकांसाठी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे दर्शन सर्वसामान्यांना घडत असून नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

महाराष्ट्राच्या लोकसंस्कृती, संत परंपरा, कला आणि परंपरागत वैभवाचे प्रभावी दर्शन घडविणाऱ्या या चित्ररथाने राष्ट्रीय पातळीवर विशेष छाप पाडत देशभरातील प्रेक्षकांची मने जिंकली होती. विविध सांस्कृतिक घटकांचे सजीव आणि आकर्षक सादरीकरण या चित्ररथातून करण्यात आले असून, राज्याच्या वैभवशाली वारशाचे दर्शन घडविणारा हा उपक्रम ठरला आहे.

या चित्ररथाच्या साकार प्रक्रियेत विविध कलाकार, तंत्रज्ञ आणि सांस्कृतिक क्षेत्रातील जाणकारांनी योगदान दिले असून त्यांच्या सर्जनशीलतेचा उत्कृष्ट आविष्कार या माध्यमातून पाहायला मिळतो. प्रजासत्ताक दिन संचलनात मिळालेल्या यशामुळे राज्याच्या सांस्कृतिक ओळखीला राष्ट्रीय स्तरावर नवे अधोरेखन प्राप्त झाले आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. मा. आशिष शेलार आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे.

गिरगाव परिसरातील या प्रदर्शनाला नागरिक, विद्यार्थी, सांस्कृतिक क्षेत्रातील अभ्यासक आणि पर्यटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घ्यावे, असे आवाहन संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई श्री. श्रीराम पांडे यांनी केले आहे.

तुळशीबाग राममंदिरात श्रीराम-लक्ष्मण-सीता मूर्तीस गुढीपाडव्यानिमित्त पवमान अभिषेक

श्री रामजी संस्थान तुळशीबाग तर्फे श्रीरामनवमी उत्सवाला प्रारंभ ; उत्सवाचे २६५ वे वर्ष

पुणे : पेशवेकालीन ऐतिहासिक तुळशीबाग श्रीराम मंदिरात गुढीपाडव्यानिमित्त श्रीराम जय राम जयजय राम… च्या निनादात श्रीराम-लक्ष्मण-सीता मूर्तीस पवमान अभिषेक करण्यात आला. अभिषेकानंतर मूर्तींना पोशाख व दागिने घालण्यात आले. दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी श्रीरामनवमी उत्सवास प्रारंभ होतो. पुणे प्रांताचे सरसुभेदार श्रीमंत नारो अप्पाजी तुळशीबागवाले यांनी सन १७६१ साली स्थापन केलेल्या देखण्या मंदिरामध्ये यंदाचे श्रीरामनवमी उत्सवाचे अखंडीत २६५ वे वर्ष साजरे होत आहे.

श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने श्रीराम मंदिरात दि. १९ मार्च ते २ एप्रिल विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी संस्थानचे कार्यकारी विश्वस्त डॉ.रामचंद्र तुळशीबागवाले, विश्वस्त भरत तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले, यांसह तुळशीबागवाले परिवार उपस्थित होता. 

उत्सवाच्या पहिल्या दिवशी श्रीरामरक्षा, अथर्वशीर्ष, श्रीविष्णूसहस्त्रनाम, श्रीसूक्त व पुरूषसूक्त पठण देखील मंदिरात झाले. प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्याकरीता पुणेकरांनी सकाळपासून मंदिरात गर्दी केली होती. त्यानिमित्ताने मंदिरात फुलांची आकर्षक आरास व विद्युतरोषणाई देखील करण्यात आली आहे.

डॉ.रामचंद्र तुळशीबागवाले म्हणाले, उत्सवांतर्गत श्रीरामरक्षा, अथर्वशीर्ष पठण, श्रीविष्णूसहस्त्रनाम, श्रीसूक्त व पुरुषसूक्त पठण, महापूजा, पालखी, श्री कौसल्या माता डोहाळजेवण, श्रीरामजन्म सोहळा, श्रीरामराज्याभिषेक सोहळा अशा धार्मिक कार्यक्रमांबरोबरच रामायण वाचन, रामायण प्रवचन, सांगितीक कार्यक्रम अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. तसेच रविवार, दि. २२ मार्च रोजी आनंद भाटे यांचे सुश्राव्य गायन, मंगळवार, दि. २४ मार्च रोजी अविष्कार क्रिएशन भाग्यश्री कुलकर्णी प्रस्तुत रामगान हे कार्यक्रम सायंकाळी ५.३० वाजता होणार असून सर्व कार्यक्रम विनामूल्य आहेत. तरी पुणेकरांनी मोठ्या संख्येने उत्सवात सहभागी व्हावे

टिळेकर यांच्या भावाच्या भूमी ग्रीन एनर्जी कंपनीला काम मिळावे, यासाठी आयुक्तांवर दबाव: काँग्रेसचा आरोप

पुणे, : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दबावाखाली आयुक्त नवल किशोर राम हे आमदार योगेश टिळेकर यांना मदत करत आहेत, असा आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे आणि महापालिकेतील गटनेते चंद्रकांत कदम यांनी बुधवारी केला.

स्थायीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या एका कंपनीचा प्रस्ताव प्रशासनाने सादर केला. त्यास समितीच्या सदस्यांनी विरोध केला. त्यावरून कॉंग्रेसने आज पत्रकार परिषदत घेत हे आरोप केले. मुख्यमंत्री हे टिळेकर यांच्या भावाच्या भूमी ग्रीन एनर्जी कंपनीला काम मिळावे, यासाठी प्रयत्न करत आहेत. आयुक्त देखील चुकीच्या पद्धतीने प्रस्ताव आणत आहेत. कचरा आणि प्रक्रिया प्रकल्पांची क्षमता यांची. तपासणी करावी, शहरातील सर्व प्रकल्पांचे ऑडिट करावे, अशी मागणी शिंदे आणि कदम यांनी केली.

आसावरी जगदाळे यांना मोठा दिलासा; पुणे महापालिकेत नोकरी, महापौरांच्या हस्ते दिले नियुक्ती पत्र

पुणे :जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या संतोष जगदाळे यांच्या कुटुंबासाठी दिलासादायक घडामोड घडली आहे. त्यांच्या कन्या आसावरी जगदाळे यांना पुणे महानगरपालिकेत प्रशासकीय अधिकारी म्हणून नोकरी देण्यात आली आहे. त्यांना वर्ग-२ पदाचे नियुक्तीपत्र मिळाले आहे. या निर्णयामुळे संतोष जगदाळे यांच्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळणार असल्याचे म्हणले जात आहे. वडिलांच्या निधनानंतर आसावरी यांच्यासाठी शासकीय नोकरीची मागणी होत होती. त्या उच्चशिक्षित असून प्रशासनात काम करण्याची तयारी त्यांनी यापूर्वीच दर्शवली होती.

मध्यंतरी अद्याप नोकरी मिळाली नाही म्हणून जगदाळे कुटुंबाने सरकारवर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर या प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही हस्तक्षेप करत संबंधित अधिकाऱ्यांना लवकर निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. त्यांच्या सूचनेनंतरच या प्रस्तावाला गती मिळाल्याचे सांगितले जात आहे.

आसावरी जगदाळे यांनी सुरुवातीला उच्च पदाची अपेक्षा व्यक्त केली होती. पण प्रशासकीय नियम आणि पात्रतेच्या चौकटीत राहूनच त्यांना वर्ग-२ पद देण्यात आले आहे. त्यामुळे “विशेष प्रकरण” असले तरी नियमांमध्ये बदल झाला नाही, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, आता आसावरी जगदाळे लवकरच आपल्या नव्या जबाबदारीची सूत्रे हाती घेणार आहेत. त्यांच्या कामगिरीकडे लक्ष लागले आहे. ही नियुक्ती एकीकडे मदतीचा हात म्हणून पाहिली जात असली, तरी दुसरीकडे प्रशासनातील नियम आणि संवेदनशीलतेचा समतोल कसा राखला जातो, याचाही हा एक महत्त्वाचा नमुना ठरत आहे.

मुख्यमंत्र्यांच्या फोनवरुन आसावरी यांना शुभेच्छा

दरम्यान, आसावरी जगदाळे यांना नियुक्तीपत्र देत असताना अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करुन दिला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आसावरी जगदाळे यांचे अभिनंदन केले. काही तांत्रिक कारणास्तव नियुक्ती रखडली होती. पण आपण एकाच दिवसात सर्व नियोजन केल्यानंतर विषय मार्गी लागला, असं मुख्यमंत्र्यांनी आसावरीच्या आईंना सांगितलं. यावेळी आसावरी जगदाळे यांच्या आईंनी मुख्यमंत्र्यांचे मनापासून आभार मानले.

“नमस्कार दादा, आज तुम्ही जास्त फॉलोअप घेतल्यामुळे माझ्या मुलीचं काम झालं आहे. खूप खूप धन्यवाद. माझी आता कुठलीही तक्रार नाही. मी आता खूप आनंदी आहे. तुमच्यामुळे हे सर्व झालं”, अशा शब्दांत आसावरी जगदाळे यांच्या आईंनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. यानंतर आसावरी जगदाळे यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोनवर आभार मानले.

भाजपचे दोन अर्ज बाद;8 स्वीकृत नगरसेवकांची निवड,त्याच उमेदवारांसाठी पुन्हा अर्ज प्रक्रिया


पुणे
अर्जासोबत धर्मादाय आयुक्तांकडील प्रमाणपत्र सादर करू शकले नाहीत म्हणून भाजपच्या स्वीकृत सदस्यपदासाठीचे दोन उमेदवारांचे अर्ज बाद झाले. त्यामुळे महापालिकेच्या मुख्यसभेत बुधवारी
१८) दहाऐवजी आठ सदस्यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड करण्यात आली. जयप्रकाश पुरोहित आणि प्रियांका शेंडगे असे अर्ज बाद झालेल्या भाजपच्या सदस्यांची नावे आहेत.

महापालिकेत दहा स्वीकृत नगरसेवक पदांसाठी राजकीय पक्षांकडून अर्ज मागविण्यात आले होते. नगरसेवकांच्या संख्याबळानुसार यामध्ये भाजपचे ७, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन आणि काँग्रेसच्या एक सदस्याची वर्णी लागणार होती.

भाजपने नीलेश कोंढाळकर, रवींद्र साळेगावकर, राजेंद्र काकडे, विश्‍वास ननावरे, उदय लेले, प्रियांका शेडगे आणि जयप्रकाश राजपुरोहीत या जुन्या कार्यकर्त्यांना संधी दिली होती. त्यानुसार, महापालिका आयुक्तांकडे अर्ज दाखल केले होते. अर्ज छाननीत शेंडगे आणि राजपुरोहीत यांनी अर्जासोबत धर्मदाय आयुक्तांकडील प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांचे अर्ज बाद झाले.

दरम्यान, बुधवारी सर्वसाधारण सभेत शेंडगे आणि राजपुरोहीत वगळता उर्वरित पाचही सदस्यांची नावे जाहीर केली. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दत्तात्रेय धनकवडे आणि राकेश कामठे, तर काँग्रेसतर्फे सुनील शिंदे यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली.

स्मार्ट सिटीवर दोन संचालक, तर सर्वसाधारण सभेत स्मार्ट सिटी कंपनीवर संचालक नेमण्याचा विषय होता. काँग्रेसतर्फे विशाल मलके, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे नगरसेविका अनिता इंगळे यांना संधी देण्यात आली.

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस युतीत निवडणुका लढल्या असून, एकत्रितच गटनोंदणी केली. या मुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन स्वीकृत नगरसेवक होऊ शकले. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने स्मार्ट सिटी कंपनीवर ‘शरदचंद्र पवार पक्षा’ला संधी दिली.

दहापैकी आठजणांची नियुक्ती झाल्याने उर्वरित दोन जागांसाठी अर्ज प्रक्रिया पुन्हा राबविली जाणार आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या मुख्यसभेत ही नियुक्ती होणार आहे.

यासाठी नव्याने अर्ज सादर करावे लागणार असल्याचे नगरसचिव योगिता भोसले यांनी सांगितले.

पीएमपीच्या संचालकपदी अजय खेेडेकर

पीएमपीएमएलच्या संचालक मंडळात नगरसेवकांपैकी एकाची नियुक्ती करण्यात येते. संख्याबळाच्या आधारे हे पद सर्वाधिक सदस्यसंख्या असलेल्या भाजपकडे जाते. भाजपतर्फे नगरसेवक अजय खेडेकर यांची संचालकपदावर नियुक्ती केली. खेडेकर हे शुक्रवार पेठ घोरपडी पेठ प्रभागातून सलग दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत.

अर्ज बाद , पण उमेदवार बदलणार नाही

भाजप सदस्यांची अर्जासोबतची कागदपत्रे वेळेत सादर झाली नसल्याने अर्ज बाद झाले. पुन्हा निवडीवेळी या उमेदवारांचे अर्ज भरले जातील. तसेच, याच दोन्ही उमेदवारांना संधी दिली जाणार असून, पुढील मुख्यसभेत त्यांची नियुक्ती होईल. तांत्रिक बाबीमुळे त्यांची निवड झाली नाही.

  • धीरज घाटे, भाजप शहराध्यक्ष

लिंगसमभाव हा केवळ सामाजिक विचार नसून सुप्रशासनाची गरज – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

शाश्वत विकास ध्येये आणि महिलांवरील हिंसाचार निर्मूलन: मुंबईत उपसभापती कार्यालय व स्त्री आधार केंद्र तर्फे आंतरराष्ट्रीय वेबिनार संपन्न

मुंबई, १८ मार्च २०२६: शाश्वत विकास उद्दिष्ट(SDG) गाठण्यासाठी महिलांवरील हिंसाचार रोखण्यासाठी साधन सामग्री , तंत्रज्ञान व त्यासाठी पुरेसा निधी देणे ही काळाची गरज आहे, असा सूर स्त्री आधार केंद्र आणि विधान परिषद उपसभापती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय वेबिनारमध्ये उमटला. ‘शाश्वत विकास उद्दिष्ट आणि महिलांवरील हिंसाचाराचे उच्चाटन: सक्षमीकरणाचे मार्ग’ या विषयावर आयोजित या चर्चेत देश-विदेशातील कायदेतज्ज्ञ, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.

  • डॉ. नीलम गोऱ्हे (उपसभापती, महाराष्ट्र विधान परिषद तथा स्त्री आधार केंद्र अध्यक्षा): महिलांवरील हिंसाचाराच्या विविध स्वरूपांना तोंड देण्यासाठी सर्वसमावेशक कायदेशीर सुधारणा आणि न्यायव्यवस्थेचे सक्षमीकरण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी आगामी वाटचालीची (Way Forward) दिशा स्पष्ट केली.त्यात विविध कार्यप्रणाली छोट्या , विशाल स्तरावर न्याय तथा विकास विषयक कार्यप्रणाली तयार करणे गरजेचे आहे.
  • डॉ. डी. पुरंदेश्वरी (खासदार, राजमहेंद्री): महिलांवरील हिंसाचार रोखण्यासाठी सर्वोत्तम अर्थसंकल्पीय पद्धती आणि ‘निर्भया’ योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर त्यांनी प्रकाश टाकला.
  • श्रीमती सुरमा पाधी (अध्यक्षा, ओडिसा विधानसभा): महिलांच्या दर्जेदार आरोग्य, शिक्षण आणि हिंसाचारापासून संरक्षणाचे अधिकार अधिक बळकट करण्यासाठी कायद्याची भूमिका त्यांनी मांडली.
  • डॉ. पॅम राजपूत (ज्येष्ठ विदुषी, दिल्ली): ‘सिडॉ’ (CEDAW) कराराच्या संदर्भात पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी भेदभावमुक्त व्यवस्था विकसित करण्यावर त्यांनी भर दिला.
  • श्रीमती रेणुका फडके (लंडन): आर्थिक साक्षरता आणि सुरक्षित सामुदायिक जागांद्वारे महिला सक्षमीकरण कसे साधता येईल, यावर त्यांनी जागतिक दृष्टीकोन मांडला.
  • स्त्री-आधार केंद्राच्या विश्वस्त श्रीमती जेहलम जोशी यांनी सांगितले की, महिलांच्या सुरक्षितता, समानता आणि न्यायासाठी भारतात अनेक कायदे आणि सर्वोच्च न्यायालयाचे ऐतिहासिक निकाल उपलब्ध आहेत. या कायद्यांची आणि निकालांची माहिती घेऊन महिलांनी आपले हक्क जपावेत आणि गरज पडल्यास कायदेशीर मदत घ्यावी असे त्यांनी प्रतिपादन केले .
  • श्री दत्तात्रय कराळे (विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक): पोलीस आणि शासकीय यंत्रणेला लिंगाधारित हिंसाचार व मानवी हक्कांचे प्रशिक्षण देण्याबाबत त्यांनी सविस्तर विवेचन केले.
  • श्री राहूल मोरे (उपायुक्त, महिला व बालविकास विभाग): लिंगसमभाव विचारधारा, विविधता आणि महिलांच्या ओळखीचे रक्षण या विषयावर त्यांनी तांत्रिक मार्गदर्शन केले.
  • क्षेत्रीय कार्यकर्ता अनुभव: पुण्याच्या श्रीमती अंजू वाघमारे आणि श्रीमती लहानु आबनावे यांनी ग्रामीण पातळीवरील आपले प्रत्यक्ष कामाचे अनुभव उपस्थितांसमोर मांडले.

कार्यक्रमाची सुरुवात स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त श्रीमती अपर्णा पाठक यांनी केली. त्यांनी सामाजिक, आर्थिक आणि हवामान बदलामुळे महिलांवर होणाऱ्या अन्यायावर भाष्य केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीमती मुग्धा केसकर यांनी केले.

महिलांना केवळ लाभार्थी म्हणून न पाहता त्यांना विकासाच्या प्रक्रियेत ‘नेतृत्व’ देणारी शक्ती म्हणून पाहणे आवश्यक आहे, असे सर्वसंमत निष्कर्ष या परिषदेत समोर आले.

एकनाथ शिंदे, रुपाली चाकणकर, विखे-पाटलांचे भविष्य पाहणारा अशोक खरात बलात्कार प्रकरणी गजाआड

नाशिक – कॅप्टन अशोक खरात या स्वयंघोषित ज्योतिषाला आज नाशिक पोलिसांनी बलात्कार प्रकरणी अटक केली आहे. त्याला आज नाशिक जिल्हा न्यायालयात हजर केले जाईल. अशोक खरात हा स्वयंघोषित ज्योतिष असून राजकीय नेते, सेलिब्रिटी हे त्यांच्याकडे भविष्य जाणून घेण्यासाठी येत असतात. या भोंदू बाबाने एका महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर नाशिक पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याशी देखील अशोक खरात या भोंदू बाबाचा संपर्क असल्याचा आरोप शिवसेना (ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.

पोलिसांनी त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या पेन ड्राईव्हमध्ये 58 आक्षेपार्ह व्हिडिओ हस्तगत करण्यात आले.कॅप्टन अशोक खरात अध्यक्ष असलेल्या श्री शिवनिका संस्थान, मिरगाव या संस्थेच्या ट्रस्टमध्येही रुपाली चाकणकर यांचा समावेश आहे. यामुळे राज्य महिला आयोगाच्या छत्रछायेखाली हे सर्व सुरु असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे. अशोक खरात हा मर्चंट नेव्हीतून निवृत्त झाला आहे. तो स्वतःला अंकशास्त्रज्ञ असल्याची बतावणी करतो. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री विखे पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी त्याच्या मिरगाव येथील मंदिरात भेट दिली आहे. रुपाली चाकणकर या तर त्याच्या मंदिर ट्रस्टमध्ये संचालक आहेत.
कॅप्टन अशोक खरात नावाच्या स्वयंघोषित ज्योतिषाला आज नाशिक पोलिसांनी अटक केली खरात याच्यावर बलात्कार योन शोषण यासारखे आरोप आहेत.
पोलिसांनी हस्तगत केलेल्या पेन ड्राईव्ह मधून 58 आक्षेपार्ह व्हिडिओ पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती समोर येत आहे.
हे उल्लेखनीय आहे की या स्वयंघोषित ज्योतिषाकडे अनेक राजकीय नेत्यांचा राबता होता. केसरकर तटकरे चाकणकर अशी काही राजकीय भक्तांची नावे यात घेतली जातात अनेक राजकीय नेत्यांनी या ज्योतिषाच्या सांगण्यावर वेगवेगळ्या पूजा करणे, स्वतःच्या हाताची करंगळी कापून घेणे असे अघोरी उद्योग सुद्धा केल्याचे लोक चर्चा करत आहेत.

सुट्ट्यांच्या दिवशीही दस्तनोंदणी कार्यालये सुरू राहणार

मुंबई : आर्थिक वर्ष २०२५-२६ संपत आल्यामुळे मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांमध्ये वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार मुंबई शहरातील सह जिल्हा निबंधक कार्यालयाच्या अधिपत्याखालील सर्व दुय्यम निबंधक कार्यालये सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीही सुरू ठेवण्यात येणार आहेत.

२६, २८, २९ आणि ३१ मार्च २०२६ या दिवशी सह जिल्हा निबंधक, मुंबई शहर यांच्या अधिपत्याखालील दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक १ ते १५ ही सर्व कार्यालये नियमित शासकीय कामकाजासाठी कार्यरत राहतील.

आर्थिक वर्षाच्या अखेरीस दस्तनोंदणीचे प्रमाण वाढत असल्याने गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला असून, नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन मुंबई शहरचे सह जिल्हा निबंधक भरत गरुड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

“मैं वापस आऊंगा”  12 जून ला चित्रपटगृहांमध्ये

टीझर रिलीज झाल्यापासून “मैं वापस आऊंगा” हा चित्रपट सातत्याने चर्चेत आहे आणि इम्तियाज अली यांच्या वैशिष्ट्यपूर्ण कथनशैलीची झलक प्रेक्षकांना देत आहे। समकालीन हिंदी चित्रपटसृष्टीत गुंतागुंतीचे आणि सखोल महिला पात्र निर्माण करण्यासाठी ओळखले जाणारे इम्तियाज अली यांच्या कामाची ओळख त्यांच्या नायिकांच्या गाभ्याशी जोडलेल्या व्यक्तिमत्त्वामुळे आहे।

या चित्रपटाद्वारे शर्वरी त्या विश्वात पाऊल ठेवत आहे, आणि तिच्या अभिनयाने आधीच प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे। हा सहयोग तिच्या करिअरमधील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे। टीझरभोवती वाढत असलेल्या चर्चांदरम्यान शर्वरीने इम्तियाज अलींसोबत काम करण्याचा अनुभव आणि त्यांच्या विश्वाचा भाग होण्याचे महत्त्व याबद्दल सांगितले।

शर्वरी म्हणाली,“माझ्या मते, इम्तियाज अली यांच्या चित्रपटातील नायिका होणे म्हणजे अशा जागेत प्रवेश करणे, जिथे पात्र आणि तुमच्या स्वतःच्या मनामधील सीमा अतिशय सुंदरपणे विरघळू लागतात। इम्तियाज सरांनी आपल्याला अनेक वर्षांपासून आवडणाऱ्या अप्रतिम नायिका दिल्या आहेत।

‘मी परत येईन’मध्ये त्यांच्या प्रमुख अभिनेत्री म्हणून निवडले जाणे हे माझ्यासाठी खरोखर स्वप्न साकार झाल्यासारखे आहे। आलिया, दीपिका, करीना, अनुष्का यांसारख्या कलाकारांनी त्यांच्या सोबत काम केले असताना त्यांनी मला त्यांच्या दृष्टीकोनातील नायिका म्हणून पाहिले, ही माझ्या कामाची आणि सिनेमाबद्दलच्या माझ्या आवडीची मोठी दखल आहे।”

ती पुढे म्हणाली,“त्यांच्या महिला पात्रे केवळ कथेतले भाग नसतात — तीच कथा असतात। ‘जब वी मेट’मधील गीत ढिल्लोंचा विचार केला तर तिच्यात एक मोकळेपणाची आनंदी वृत्ती आणि निडरपणा आहे, पण जीवन योजना प्रमाणे न चालल्यास एक शांत ताकदही दिसते।

‘तमाशा’मधील तारा महेश्वरी — तिच्यात प्रचंड भावनिक खोली, प्रेम आणि धैर्य आहे, जी दुसऱ्याच्या तुटलेल्या भावनांना सांभाळताना स्वतःच्या सत्याशीही प्रामाणिक राहते।

‘हायवे’मध्ये आलिया भट्टने साकारलेली वीरा ही खूपच रॉ, बेधडक आणि मनाला भिडणारी आहे। एका सुरक्षित वातावरणात वाढलेल्या मुलीपासून स्वतःच्या भीती आणि जखमांना सामोरे जाणाऱ्या व्यक्तीपर्यंतचा तिचा प्रवास अत्यंत प्रामाणिकपणे दाखवला आहे।

या सर्व पात्रांनी मला प्रेरणा दिली आहे आणि इम्तियाज अली यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणे हा अविश्वसनीय अनुभव आहे, कारण मला वाटते की यामुळे मी एक चांगली अभिनेत्रीच नाही तर एक चांगली व्यक्तीही झाले आहे।”

शेवटी ती म्हणाली “त्यांच्या वारशाचा भाग होणे हे नम्र करणारे आणि अत्यंत वैयक्तिक अनुभव आहे। हे एखाद्या चौकटीत बसण्याबद्दल नाही, तर त्या चौकटीतून बाहेर पडण्याबद्दल आहे।

हे तुम्हाला कधी कधी अस्वस्थ करणाऱ्या भावनांसोबत — शांतता, विरोधाभास, अपूर्ण इच्छा — यांच्यासोबत राहायला शिकवते।

आणि असे करताना तुम्ही फक्त अभिनेता म्हणूनच नव्हे, तर एक व्यक्ती म्हणूनही विकसित होता। माझ्यासाठी हे एखाद्या अतिशय खास आणि वैयक्तिक जगात विश्वासाने प्रवेश करण्यासारखे आहे — जिथे भावना सोप्या किंवा सजवलेल्या नसतात, तर खऱ्या अर्थाने अनुभवल्या जातात।

यामुळे तुमच्या कामाकडे पाहण्याची दृष्टी बदलते, कारण मग ते परफेक्ट अभिनय करण्याबद्दल नसून प्रामाणिकपणे त्या क्षणात जगण्याबद्दल असते। मला वाटते अशी कथा सांगण्याची पद्धत तुमच्यासोबत राहते… ती तुमचे निर्णय, तुमचा आवाज आणि पुढे तुम्ही कोणत्या प्रकारच्या कथा सांगू इच्छिता, हे ठरवते।”

चित्रपट “मैं वापस आऊंगा” हा 12 जून 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे।

पुण्याच्या मध्यवर्ती व्यावसायिक भागात १७लाख चौ. फुटांचा मोठा‘अ’दर्जाचा प्रकल्प…

पुणे, १८ मार्च २०२६ : अवांते स्पेसेस लिमिटेड या किर्लोस्कर उद्योगसमुहातील कंपनीने आज पुण्याच्या ‘सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट’मध्ये १७ लाख चौ. फूट क्षेत्रफळाचा उच्च दर्जाचा व्यावसायिक प्रकल्प उभारीत असल्याची घोषणा आज केली. या प्रकल्पाचे नाव ‘अवांते बिझनेस पार्क – कोथरूड’ असे असेल. व्यावसायिक रिअल इस्टेट क्षेत्रात कंपनीच्या विस्तारासाठी हा प्रकल्प एक महत्त्वाचा टप्पा आहे. पुण्यातील व्यावसायिक परिसराचा भविष्यातील विकास घडवण्याच्या उद्देशाला कंपनीच्या या प्रकल्पामुळे अधिक बळ मिळणार आहे.

हा प्रकल्प मोठ्या व्यावसायिक कॅम्पसच्या स्वरूपात विकसित केला जात आहे. कंपनीने जागेची निवडही धोरणात्मक पद्धतीने केली असून, देशी आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांना मध्यवर्ती ठिकाणी उत्तम कार्यालयीन सुविधा मिळाव्यात, हा त्यामागचा उद्देश आहे. या प्रकल्पातून कंपनीला सुमारे २०० कोटी रुपयांचे वार्षिक उत्पन्न अपेक्षित आहे.

तीन बेसमेंट, ग्राउंड फ्लोअर आणि त्यावर २० मजले (३बी+जी+२०) अशी या प्रकल्पाची रचना आहे. प्रत्येक मजल्यावर साधारण ८५,००० ते ९५,००० चौ. फूट इतकी भाड्याने देता येणारी जागा उपलब्ध असेल. तसेच, एकाच मजल्याचे चार भाग करता येतील. यामध्ये प्रत्येक भाग १३,००० ते ३०,००० चौ. फूट इतका असेल. त्यामुळे कंपन्यांना त्यांच्या गरजेनुसार जागा घेण्याची लवचिकता मिळेल.

प्रकल्पाभोवती भरपूर हिरवळ असणार असल्यामुळे आधुनिक सुविधा आणि नैसर्गिक वातावरण यांचा चांगला समतोल मिळेल. ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स (जीसीसी), आयटी, बीएफएसआय, अभियांत्रिकी व उत्पादन क्षेत्रातील कंपन्या, तसेच को-वर्किंग आणि फ्लेक्सिबल स्पेस देणाऱ्या संस्थांसाठी आणि दीर्घकाळासाठी जागा शोधणाऱ्या मोठ्या कंपन्यांसाठी हा प्रकल्प योग्य ठरेल. प्रकल्प २०२७च्या मध्यापर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

पुण्याच्या मध्यभागी असलेल्या या ‘अवांते बिझनेस पार्क’ला उत्तम कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. कर्वे रस्त्यावरील स्वतंत्र बोगद्यामुळे, तसेच कर्वे रस्ता, कॅनॉल रस्ता आणि नव्याने बांधलेल्या डीपी रोडमार्गे येथे ये-जा करणे सोपे होईल. या प्रकल्पात सुमारे एक लाख चौ. फूट क्षेत्रात खाद्यपदार्थ व रिटेल या सुविधा असतील. यामध्ये ‘फूड कोर्ट’चाही समावेश आहे. याशिवाय बहुपयोगी प्रशिक्षण कक्ष, सामायिक बैठक कक्ष, व्यायामशाळा, पाळणाघर आणि क्लिनिक यांसारख्या सुविधा दिल्या जातील. प्रकल्पात मोकळी हिरवी जागा, झाडा-झुडपांची जागा आणि ‘ओपन एअर अॅम्फीथिएटर’ही असेल. त्यामुळे कामासाठी एक संपूर्ण, आरामदायी आणि उत्पादक वातावरण तयार होईल. त्यातून कर्मचाऱ्यांचे समाधान होऊन त्यांची कार्यक्षमता वाढेल.

या प्रकल्पाच्या डिझाइनमध्ये सुरुवातीपासूनच पर्यावरणपूरकता लक्षात घेण्यात आली आहे. हा प्रकल्प ‘आयजीबीसी प्लॅटिनम’ आणि ‘यूएसजीबीसी प्लॅटिनम’ या दर्जांसाठी प्री-सर्टिफाइड असून, ‘वेल प्रमाणपत्र’ मिळवण्याचे लक्ष्य त्यात ठेवण्यात आले आहे. यामुळे पर्यावरणाची काळजी आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचीही काळजी याबाबतची कंपनीची बांधिलकी दिसून येते. ऊर्जा कार्यक्षम अशी सेंट्रलाइज्ड एचव्हीएसी प्रणाली, उष्णता कमी राहील व नैसर्गिक प्रकाश जास्त मिळेल अशा पद्धतीने केलेले साधे फ्लोअर डिझाइन, उत्तम इनडोअर-आउटडोअर वातावरण आणि मोठ्या प्रमाणात हिरवी मोकळी जागा अशी या प्रकल्पाची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. यामुळे परिसरातील वातावरण संतुलित ठेवण्यास मदत होणार आहे.

या प्रकल्पाबाबत अधिक माहिती देताना ‘अवांते स्पेसेस लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक पोरायथ म्हणाले, “अवांते स्पेसेसच्या वाढीच्या प्रवासात ‘अवांते बिझनेस पार्क – कोथरूड’ हा प्रकल्प एक महत्त्वाचा टप्पा आहे. मोठ्या शहरांमध्ये जागतिक कंपन्या आणि जीसीसी यांच्याकडून मोठ्या ऑफिस स्पेसची मागणी वाढत आहे. ही गरज लक्षात घेऊन, उच्च दर्जाची आणि पर्यावरणाची जबाबदारी जपणारी व्यावसायिक पायाभूत सुविधा उभारण्याची ही मोठी संधी आम्ही घेतली. पुण्यातील आमच्या पहिल्या प्रकल्प वन अवांते या प्रकल्पाच्या अनुभवाच्या आधारावर आम्ही हा पुढील प्रकल्प विकसित करीत आहोत. आमचे हे प्रकल्प किर्लोस्कर समुहाच्या मूल्यांशी आणि दीर्घकालीन दृष्टीकोनाशी सुसंगत असतील. तसेच, परिसरातील भरपूर हिरवळ जपून, संतुलित आणि शाश्वत वातावरण तयार करण्यावरही आमचा भर असेल.”

या प्रकल्पासाठी दीर्घकालीन भाडेपट्ट्याचे, म्हणजे लिजिंगचे धोरण अवलंबले जाणार आहे. शहरातील मध्यवर्ती भागात उच्च दर्जाच्या ऑफिस सुविधा शोधणाऱ्या मोठ्या आणि संस्थात्मक कंपन्यांवर याकरीता विशेष लक्ष दिले जाईल. प्रकल्पाच्या बांधकामाच्या काळात आणि तो सुरू झाल्यानंतरच्या कामकाजाच्या काळात मिळून सुमारे १५ हजार जणांना थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळण्याची अपेक्षा आहे.

‘अवांते बिझनेस पार्क – कोथरूड’ या प्रकल्पामुळे ‘अवांते स्पेसेस’ची प्रीमियम कमर्शियल रिअल इस्टेट क्षेत्रातील पकड अधिक मजबूत होईल. तसेच, मोठ्या प्रमाणावर वाढवता येणारे, पर्यावरणपूरक प्रकल्प उभारणीच्या कंपनीच्या धोरणाला आणखी बळ मिळेल.

स्वराज्य रक्षक धर्मवीर श्री संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्र्याचे अभिवादन

पुणे, दि.१८: स्वराज्य रक्षक धर्मवीर श्री संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथी-३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी श्री क्षेत्र तुळापूर येथील समाधीस्थळी जावून अभिवादन केले आणि समाधीचे दर्शन घेतले.

यावेळी आमदार ज्ञानेश्वर कटके, बापुसाहेब पठारे, जिल्हा परिषद सदस्य किरण साकोरे, मोनिका हरगुडे, पंचायत समिती सदस्य, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, उप विभागीय अधिकारी यशवंत माने, अपर तहसीलदार तृप्ती कोलते, शिरुरचे तहसील बाळासाहेब म्हस्के, वढू.बु. चे सरपंच कृष्णा आरगडे, तुळापुरच्या प्रशासक संरपच ॲड. गुंफा इंगळे आदी उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त तुळापूर येथे आयोजित मुकज्योत पदयात्रेत गावकऱ्यांसोबत सहभागी झाल्या.तुळापूर येथील संगमस्थळी जावून संगमेश्वराचे दर्शन घेतले. तुळापूर स्मारकाच्या अनुषंगाने सुरु असलेल्या विविध विकासकामांबाबत माहिती घेवून ही कामे दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्याच्या श्रीमती पवार यांनी सूचना दिल्या. .