Home Blog Page 127

बेकायदा बांधकामांवरील महापालिकेच्या कारवाई नोटिशींना कोणत्या अधिकारात स्थगिती दिली? हायकोर्टाची एकनाथ शिंदेंना विचारणा

0

मुंबई-नवी मुंबईतील बेकायदा बांधकामांच्या नोटिशींना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या स्थगितीवर मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र आक्षेप घेतला आहे. महापालिका कायद्यानुसार कारवाई करत असताना, नगरविकासमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांनी नोटिशींना स्थगिती कोणत्या अधिकारात दिली, असा थेट सवाल न्यायालयाने विचारला आहे. तसेच, या प्रकरणावर 20 सप्टेंबरपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेशही न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.

वाशीमधील अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन कंडोमिनियम नंबर-14 आणि नैवेद्य को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी कंडोमिनियम नंबर-3 या सिडकोच्या इमारतींचे बांधकाम 2003 मध्ये विनापरवानगी पाडण्यात आले. असोसिएशनने स्थानिक नगरसेवक व शिवसेनेचे बेलापूर विधानसभा क्षेत्राचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटकर यांच्याशी हातमिळवणी करून हा प्रकार केला. सिडकोने याची गंभीर दखल घेत असोसिएशन व संबंधितांना नोटिसा बजावल्या. त्यानंतर हे क्षेत्र नवी मुंबई महापालिकेच्या अखत्यारित गेले.

महापालिकेने नवीन इमारतींच्या बांधकामाला तात्पुरती परवानगी दिली, परंतु बांधकाम आराखड्यानुसार झाले नाही. त्यामुळे पालिकेने इमारतीला बांधकाम पूर्णत्वाचे व निवासी प्रमाणपत्र (OC) दिले नाही. यानंतरही, असोसिएशनने नियमांचे पालन केले नाही, म्हणून महापालिकेने 3 मार्च 2025 रोजी महाराष्ट्र प्रदेश शहर नियोजन (MRTP) कायद्याच्या कलम 53-अ अंतर्गत बेकायदा बांधकाम तोडण्याची नोटीस बजावली.

महापालिकेने नोटीस पाठवल्यानंतर, त्याविरोधात सोसायट्यांनी थेट नगरविकास खाते सांभाळणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धाव घेतली. शिंदे यांनी लगेचच या नोटिशींना स्थगिती दिली. उपमुख्यमंत्र्यांच्या या आदेशाला ‘कॉन्शस सिटीझन्स फोरम’ या स्वयंसेवी संस्थेने उच्च न्यायालयात आव्हान दिले. उपमुख्यमंत्र्यांनी दिलेला आदेश बेकायदेशीर असून, तो रद्द करावा आणि महापालिकेने बजावलेल्या नोटिशीची अंमलबजावणी करावी, अशी मागणी संस्थेने केली.

न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अश्विन भोबे यांच्या खंडपीठाने सुनावणीवेळी प्रकरणाच्या सर्व बाबी तपासल्यानंतर या प्रकाराची गंभीर दखल घेतली. नवी मुंबई महापालिकेने या संदर्भात नोटीस बजावलेली असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणत्या अधिकारात स्थगिती दिली? याची विचारणा उच्च न्यायालयाने केली. जर महापालिकेकडून ही इमारत पाडण्याची नोटीस दिली आहे तर मग उपमुख्यमंत्र्यांनी कोणते अधिकार स्थगितीसाठी वापरले? असा प्रश्न विचारत न्यायालयाने सरकारी वकिलांना यावर स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणावर आता 20 सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

इन्फोसिस, टीसीएस, विप्रो आणि ह्युडांई मोटर्स मध्ये नौकरीची खोटी आश्वासने देऊन बेरोजगारांची फसवणूक

बेरोजगार युवकांनी फसवणुकीपासून सतर्क राहावे-सहाय्यक कामगार आयुक्तांचे आवाहन

पुणे, दि. 18: पुणे जिल्ह्यात वाढत्या औद्योगिकीकरणामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असतानाही काही बेरोजगार युवकांना नोकरी लावून देण्याच्या आमिषाने आर्थिक फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत.
इन्फोसिस, टीसीएस, विप्रो आणि ह्युडांई मोटर्स आदी नामांकित उद्योगांमध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देऊन युवकांची फसवणूक केली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे बेरोजगार तरुण-तरुणींनी अशा आमिषाला बळी न पडता स्वतःची आर्थिक फसवणूक टाळावी, सरकारी अथवा खाजगी नोकरीसाठी कोणत्याही प्रकारची आर्थिक रक्कम कोणत्याही कंपनी, कंत्राटदार, सल्लागार किंवा कंत्राटदारांनी देवू नये, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त, पुणे जिल्हा यांनी केले आहे.

नवरात्रीच्या काळात पुणेकरांचा पाणीपुरवठा बंद, अश्विनी कदम संतापल्या …म्हणाल्या,पाणीपुरवठा प्रमुखांना समज देण्याची गरज

पुणे- नवरात्री सारख्या सणाच्या काळात पुणेकरांचा पाणीपुरवठा बंद ठेवणे योग्य आहे का? असा सवाल करत माजी स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम पाणीपुरवठा विभागाच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे , त्या म्हणाल्या पाणीपुरवठा प्रमुखांना महिलांनी आता समज देण्याची गरज आहे असे वाटते पुण्यात मुसळधार पाऊस सुरू आहे… नदी-नाले ओसंडून वाहत आहेत…तरीही महापालिकेने पाणी बंद करण्याचा घेतलेला निर्णय म्हणजे प्रशासनाचा दृष्टीहीन व असंवेदनशील कारभार चव्हाट्यावर आला आहे.इतक्या पावसात पाणीटंचाईचा प्रश्न नसताना नागरिकांना पाणीपुरवठा बंद करून अडचणीत टाकणे हा सरळसरळ प्रशासनाचा अपयश व निष्काळजीपणा आहे.

  • नवरात्रमध्ये प्रत्येक घरात स्वच्छता, नवे-जुने कपडे धुणे, उत्सवाची तयारी मोठ्या प्रमाणात केली जाते.
  • पण ! महापालिकेने या काळातच पाणी बंद करण्याचा निर्णय घेऊन नागरिकांच्या भावनांशी खेळ केला आहे.
– विशेषतः महिला वर्गामध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.
  • नगरसेवक / लोकप्रतिनिधी निवडून आले असते तर, प्रशासनाला सणासुदीच्या काळातील संवेदनशीलता समजली असती.
  • चुकीच्या वेळेस पाणीपुरवठा बंद करून PMC प्रशासनाने स्वतःचं दुर्बल आणि असंवेदनशील व्यवस्थापन चव्हाट्यावर आणलं आहे.

पुणेकरांच्या मूलभूत गरजा दुर्लक्षित करून उत्सवाच्या काळात अन् भर पावसात पाणी बंद करून नागरिकांना अडचणीत टाकणाऱ्या या निर्णयाचा निषेध करत त्यांनी महिलांनी याबद्दल जाब विचारायलाच हवा असेही म्हटले आहे

अनुसूचित जाती कल्याण समितीचा पुणे जिल्हा दौरा : विविध विभागांच्या कामांचा घेतला आढावा

पुणे दि. १८ सप्टेंबर : महाराष्ट्र विधानमंडळाच्या अनुसूचित जाती कल्याण समितीचा दौरा आज पुणे जिल्ह्यात झाला. या समितीच्या अध्यक्ष आमदार नारायण कुचे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली.

या वेळी आमदार भीमराव रामजी केराम, नानाजी सखारामजी मुटकुळे, डॉ. अशोक माने , शाम खोडे, मंगेश कुडाळकर, नरेंद्र भोंडेकर, सचिन पाटील, गजानन लवटे, अमित गोरखे, अमोल मिटकरी, डॉ. प्रज्ञा सातव, जगन्नाथ अभ्यंकर आणि संजय मेश्राम उपस्थित होते.
बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, विधानमंडळ सचिवालयाचे सहसचिव सुभाष नलावडे, अवर सचिव श्रीमती सीमा तांबे, कक्ष अधिकारी श्री. राहुल लिंगरवार, समिती प्रमुख यांचे स्वीय सहाय्यक रणजित गमरे, सहाय्यक कक्ष अधिकारी संदीप माने तसेच जिल्हा प्रशासनातील नगर परिषद, नगर पंचायत, वन विभाग, महावितरण, महापारेषण, समाजकल्याण विभाग आदींचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत जिल्ह्यात अनुसूचित जातींसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा आढावा घेण्यात आला. शिक्षण, आरोग्य, निवासस्थान, वसतिगृह सुविधा, पाणीपुरवठा, वीजपुरवठा आणि रोजगार निर्मिती या विषयांवर समिती सदस्यांनी विशेष चर्चा केली. अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत मंजूर निधीचा वापर, दुरुस्ती आणि सोयीसुविधा याबाबत विचारणा करण्यात आली.

महावितरण आणि महापारेषण अधिकाऱ्यांना अनुसूचित जाती बहुल वस्त्यांमध्ये वीजपुरवठा सुरळीत राहावा यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नगर परिषद आणि नगर पंचायत अधिकाऱ्यांना पाणीपुरवठा व स्वच्छता व्यवस्थेसाठी प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश समितीने दिले. तसेच वन विभागाकडून अनुसूचित जाती लाभार्थ्यांसाठी सुरू असलेल्या वैयक्तिक व सामूहिक वनहक्क योजनांची अंमलबजावणीबाबत माहिती घेण्यात आली.

समितीने जिल्हा प्रशासनाला अनुसूचित जाती कल्याणाशी संबंधित सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली काढून त्याचा तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

कोंढव्यात बेकायदा इमारतींवर कारवाईचा धडाका सुरूच …

पुणे- महापालिकेच्या वतीने बेकायदा बांधकामांच्या वरती कोंढव्यात कारवाईचा धडाका सुरूच आहे. आज कोंढवा खुर्द परिसरामध्ये अनाधिकृत बांधकाम कारवाई साठी नियुक्त केलेल्या विशेष पथकामार्फत आज दि.18/9/2025 रोजी कोंढवा खुर्द , संत ज्ञानेश्वर नगर, काकडे वस्ती, s.no 44 मध्ये P+7 मजल्याच्या एक इमारत सुमारे 4500 चौ. फुट आर सी सी बांधकामावर कारवाई करण्यात आली आहे.
सदर कारवाई साठी 6 बिगारी, 5 पोलीस, 1 jcb , 4 brekar, 2 गॅस cutter, 5 कनिष्ठ अभियंता, 2 उपअभियंता उपस्थित होते.
त्यामुळे सदर अनधिकृत बांधकाम हे कारवाई झाल्यामुळे धोकादायक झालेले आहे.त्याचा वापर करण्यात येऊ नये व सदर इमारतीत सदनिका विकत घेऊ नये.असे आवाहन पुणे महानगरपालिका तर्फे करण्यात येत आहे.

पुणे,पेठ बालेवाडी गावठाण शाळेलगत इलियट सोसायटी समोरील अनधिकृत शॉप टपऱ्या ,दसरा चौक, बालेवाडी हाय स्ट्रीट येथील लेन्स कार्ड, हिप्पी अँड हॉट, लॅक्मे सलून, हिडन प्लेस हँगाउट ,हबीबस, हॉटेल इंडिपेंडेंस, बालेवाडी सर्वे न 17 चौपाटी, मोझे कॉलेज परिसर व अष्टविनायक चौक येथे अनधिकृत दुकाने, हॉटेल्स, पत्रा शेड व पक्क्या स्वरूपाच्या अनधिकृत बांधकामांवर तसेच बाणेर येथील कॅफे बडीज एक्सप्रेस या हॉटेलच्या फ्रंट मार्जिन मधील पत्रा शेड वर

बांधकाम विकास विभाग झोन ३ यांचेमार्फत पोलीस स्टाफच्या मदतीने कारवाई करण्यात आली आहे.सदर कारवाई मध्ये सुमारे 54375 चौ.फूट विनापरवाना अनधिकृत क्षेत्र निष्कासित करण्यात आले आहे.सदर कारवाई पुणे महानगरपालिकेचे अधिक्षक अभियंता,बांधकाम विभाग झोन क्र.३ चे कार्यकारी अभियंता यांचे मार्गदर्शनाखाली
उप अभियंता, कनिष्ठ अभियंता व इतर स्टाफ, सहा. पोलिस निरीक्षक यांच्या पथकाने व तीन जेसीबी, एक गॅस कटर, दहा अतिक्रमण कर्मचारी यांचे सहाय्याने कारवाई पूर्ण करण्यात आली.

समाजवादी आंदोलनाची ९० वर्षे : पुण्यात समाजवादी एकजूट परिषदेचे उद्घाटन

पुणे : समाजवादी आंदोलनाला ९० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने पुण्यात भव्य समाजवादी एकजूट परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्घाटन आज (दि. १९ सप्टेंबर) सायं. ४ वाजता सिंहगड रोडवरील साने गुरुजी स्मारक येथे होणार आहे. ही परिषद १९ ते २१ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे.या परिषदेचे आयोजन राष्ट्र सेवा दल, एस. एम. जोशी सोशलिस्ट फाऊंडेशन, युसुफ मेहेरअली सेंटर, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी व समाजवादी समागम यांनी संयुक्तपणे केले आहे.

उद्घाटन समारंभात उत्तर प्रदेश विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते व अध्यक्ष माता प्रसाद पांडेय उद्घाटन करतील. १०० वर्षीय ज्येष्ठ समाजवादी व माजी खासदार पंडित रामकिशन ध्वजारोहण करतील. समाजवादी आंदोलनावरील विशेष प्रदर्शनाचे लोकार्पण राष्ट्र सेवा दलाचे माजी अध्यक्ष पन्नालाल सुराणा यांच्या हस्ते होणार आहे.

या उद्घाटन सत्रात प्रा. आनंद कुमार प्रमुख वक्ते असतील. सुभाष वारे संविधानाची प्रस्तावना वाचतील, तर स्वागतपर भाषण ॲड. सविता शिंदे करतील. अध्यक्षस्थानी रमाशंकर सिंह (कुलपती, आयटीएम विद्यापीठ) असतील. प्रमुख पाहुणे म्हणून हरभजनसिंग सिद्धू (महामंत्री, हिंद मजदूर सभा) उपस्थित राहणार आहेत.

या प्रसंगी आयोजक संस्था आपली मते मांडतील. स्मारिका व पुस्तकांचे प्रकाशन होणार असून पंडित रामकिशन शर्मा, पन्नालाल सुराणा, प्रा. राजकुमार जैन, हिम्मत सेठ, चंद्रा अय्यर, भीमराव पाटोले, रावसाहेब पवार, वर्षा गुप्ते, प्रमिला ठाकूर फुले, उमाकांत भावसार या ज्येष्ठ समाजवाद्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेतील विविध सत्रांमध्ये समाजवादी विचारांची चिकित्सा व आव्हानांवर चर्चा होणार असून देशभरातून समाजवादी कार्यकर्ते या संमेलनात सहभागी होणार आहेत.

भारत फोर्जचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बाबा कल्याणी प्रतिष्ठित ‘ पी.डी. पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025’ने सन्मानित

पुणे, 18 सप्टेंबर 2025: भारत फोर्ज लिमिटेडचे ​​अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. बाबा
कल्याणी यांना ‘माननीय पी. डी. पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025’ ने सन्मानित करण्यात आले आहे.
राज्यातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांमध्ये याचा समावेश होतो. जागतिक स्तरावर महाराष्ट्राला सन्मान
आणि प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो.
कराड (सातारा) येथील माननीय पी. डी. पाटील गौरव प्रतिष्ठान यांनी २०११ मध्ये या पुरस्काराची
सुरुवात केली. हा पुरस्कार विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामाची दखल घेतो. बाबा कल्याणी यांचे
औद्योगिक क्षेत्रातील काम आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना सन्मानित
करण्यात आले.
या सत्कार समारंभाला महाराष्ट्रातील मान्यवर नेते उल्हास दादा पवार आणि माननीय
बाळासाहेब पाटील उपस्थित होते.
देशाच्या प्रगतीसाठी उद्योगांची शिक्षण, ज्ञान आणि तंत्रज्ञानाशी सांगड घालणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे
यावेळी बाबा कल्याणी यांनी सांगितले. भारतातील तरुणांनी केवळ तयार उपायांवरच अवलंबून न राहता
नवोपक्रमावर लक्ष केंद्रित करावे, असा सल्ला कल्याणी यांनी यावेळी तरुणांना दिला. केवळ नफ्यासाठीच
नव्हे तर गाव, समाज आणि राष्ट्राच्या विकासासाठी देखील काम केले पाहिजे यावर त्यांनी भर दिला.
आपल्या मातृभूमीशी जोडलेला सन्मान मिळाल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

बजाज अलियांझ लाइफ’तर्फे युलिप ग्राहकांसाठी ‘बीएसई५०० एन्हान्स्डव्हॅल्यू ५० इंडेक्स फंडा’ची घोषणा


‘एनएफओ’चा कालावधी २० सप्टेंबर २०२५ संपणार रोजी

पुणे, 18 सप्टेंबर २०२५ :
 देशातील आघाडीच्या खासगी आयुर्विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या बजाज अलियांझ लाइफ कंपनीने ‘बजाज अलियांझ लाइफ बीएसई ५०० एन्हान्स्ड व्हॅल्यू ५० इंडेक्स फंड’ हा नवा फंड (एनएफओ) सुरू केला आहे. हा फंड केवळ युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन्सअंतर्गत (युलिप) उपलब्ध असून, ‘बीएसई ५०० एन्हान्स्ड व्हॅल्यू ५० इंडेक्स’मधील समभागांत गुंतवणूक करून भांडवल वृद्धी साधण्याचे उद्दिष्ट या फंडाने ठेवले आहे. त्याचबरोबर गुंतवणूकदारांना आयुर्विम्याचे संरक्षण मिळत असल्याने नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध गुंतवणुकीची संधी त्यांना यातून मिळणार आहे.

या फंडाची निवड प्रक्रिया बुक-टू-प्राइस रेशो, अर्निंग्ज-टू-प्राइस रेशो आणि सेल्स-टू-प्राइस रेशो या तीन महत्त्वाच्या आर्थिक गुणोत्तरांवर आधारित आहे. या निर्देशकांच्या एकत्रित वापरामुळे एखाद्या कंपनीचे मूल्यांकन सर्वंकष पद्धतीने होऊ शकते. मालमत्ता, नफा आणि उत्पन्न या सर्व बाबींचा विचार यात केला जातो. त्यामुळे एखाद्या एकाच निर्देशकावर अवलंबून न राहता संतुलित गुंतवणूक पद्धत शक्य होते.

·         बुक-टू-प्राइस रेशो : या गुणोत्तराची जास्त किंमत म्हणजे कंपनीकडे तिच्या बाजारमूल्याच्या तुलनेत मजबूत मालमत्ता ताळेबंद आहे, असे दर्शवते.

·         अर्निंग्ज-टू-प्राइस रेशो : कंपनीच्या मूल्यांकनाच्या तुलनेत जास्त नफ्याची क्षमता हा रेशो दर्शवतो.

·         सेल्स-टू-प्राइस रेशो : कंपनीच्या बाजार भांडवलाच्या तुलनेत तिची उत्पन्ननिर्मिती किती मजबूत आहे, हे या गुणोत्तरावरून कळते.

‘बजाज अलियांझ लाइफ बीएसई ५०० एन्हान्स्ड व्हॅल्यू ५० इंडेक्स फंड’ हा एक पॅसिव्हली (अप्रत्यक्षपणे) व्यवस्थापित फंड आहे. तो ‘बीएसई ५०० एन्हान्स्ड व्हॅल्यू ५० इंडेक्स’शी समांतर ठेवण्यात आला आहे. बाजारातील प्रवाह आणि आकडेवारीशी सुसंगत राहण्यासाठी हा फंड दर तिमाहीत अद्ययावत केला जातो. या रचनेमुळे गुंतवणूकदारांना शिस्तबद्ध पद्धतीने, दीर्घकालीन कालावधीत, उच्च संभाव्यता असलेल्या मूल्याधारित समभागांत गुंतवणुकीची संधी मिळते आणि त्याचवेळी सक्रिय व्यवस्थापनाशी संबंधित जोखीमही कमी राहते.

नव्या फंडाच्या सादरीकरणाप्रसंगी ‘बजाज अलियांझ लाइफ इन्शुरन्सचे मुख्य गुंतवणूक अधिकारी श्रीनिवास राव रवुरी म्हणाले, “बजाज अलियांझ लाइफ बीएसई ५०० एन्हान्स्ड व्हॅल्यू ५० इंडेक्स फंड’ हा गुंतवणूकदारांना ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग’ या धोरणाचा लाभ शिस्तबद्ध पद्धतीने घेण्याची संधी देतो. या धोरणाने नेहमीच संयम आणि दीर्घकालीन बांधिलकीला चांगला परतावा दिला आहे. मोठ्या, मध्यम आणि लहान अशा विविध भांडवली वर्गातील आकर्षक मूल्यांकन असलेल्या कंपन्यांमध्ये टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करून हा फंड गुंतवणूकदारांना विविधीकृत इक्विटी गुंतवणुकीची संधी देतो. यामध्ये जोखीम आणि परतावा यांचे संतुलित नाते टिकवले जाते. आम्हाला विश्वास आहे की ही पद्धत गुंतवणूकदारांना काळानुसार टिकाऊ संपत्ती उभारण्यासाठी महत्त्वाची ठरेल.”

हा फंड विशेषतः दीर्घकालीन भांडवल वृद्धी साध्य करू इच्छिणाऱ्या, उच्च जोखीम स्वीकारण्याची तयारी असलेल्या आणि शिस्तबद्ध, नियमाधारित गुंतवणूक पसंत करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी उपयुक्त आहे. ‘बजाज अलियांझ लाइफची युलिप उत्पादने, ज्यामध्ये बजाज अलियांझ लाइफ बीएसई ५०० एन्हान्स्ड व्हॅल्यू ५० इंडेक्स फंड समाविष्ट आहे, पॉलिसीधारकांना त्यांच्या आयुष्याची उद्दिष्टे साध्य करण्यात मदत करतात; याचे कारण आयुर्विम्याचे संरक्षण आणि संपत्ती निर्माण करण्याची संधी ती एकाच वेळी उपलब्ध करून देतात.

या निर्देशांकाच्या ऐतिहासिक कामगिरीवरून त्याची क्षमता स्पष्ट होते. मध्यम ते दीर्घ कालावधीत त्याने व्यापक बाजार भांडवल निर्देशांकांच्या तुलनेत अधिक परतावा दिला आहे. तथापि, यापूर्वीची कामगिरी भविष्यातील निकालांची हमी देत नाही, हे गुंतवणूकदारांनी लक्षात घ्यावे.

PMPML विजेत्या महिलांना पैठणी व एक महिन्याच्या मोफत बस प्रवास पासचे वितरण.

रक्षाबंधन सणानिमित्त आयोजित ‘लकी-ड्रॉ’ योजनेतील बक्षीस वितरण सोहळा संपन्न

पुणे –
रक्षाबंधन सणानिमित्त पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (पीएमपीएमएल) तर्फे दि. ०९ ऑगस्ट २०२५
रोजी, पीएमपीएमएल चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांच्या संकल्पनेतून महिला प्रवाशांसाठी
‘लकी-ड्रॉ’ योजनेचे आयोजन करण्यात आले होते. या योजनेची सोडत दि. २९ ऑगस्ट २०२५ रोजी संगणकीय पद्धतीने
करण्यात आली होती.या ‘लकी-ड्रॉ’ योजनेचा बक्षीस वितरण सोहळा आज दिनांक १८ सप्टेंबर २०२५ रोजी स्वारगेट येथील प्रशिक्षण
हॉल येथे संपन्न झाला.
या सोहळ्यात पीएमपीएमएल चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांच्या हस्ते, तसेच
मुख्य कार्यकारी अधिकारी आशा राऊत, कलाक्षेत्रम सिल्क अँड सारीज, लक्ष्मी रोड, पुणे या भव्य दालनाचे
मालक सागर पासकंठी, रेडिओ मिरचीचे आर. जे. निमी, केतन धस यांच्या उपस्थितीत सर्व विजेत्या महिला
प्रवाशांना कलाक्षेत्रम सिल्क अँड सारीज, लक्ष्मी रोड, पुणे यांचेकडून पैठणी व पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून एक
महिन्याचा सर्व मार्गासाठी मोफत बस प्रवास पास प्रदान करण्यात आले.
यावेळी शितल माचुत्रे, माया बर्वे, रंजना कांबळे, कविता चव्हाण, पौर्णिमा भोसले, सुनिता मुरंबे, अंचली
गोणारकर, पूजा वैद्य, ऋतुजा सावंत, मिना बोदरे, प्रेरणा पवार, रेखा यरमवार, तनिष्का निकम या ‘लकी-ड्रॉ’ योजनेतील
महिला विजेत्यांना पैठणी व एक महिन्याचा सर्व मार्गासाठी मोफत बस प्रवास पास प्रदान करण्यात आला.
या प्रसंगी पीएमपीएमएलच्या विविध विभागांचे विभागप्रमुख तसेच कर्मचारी उपस्थित होते.
पीएमपीएमएलतर्फे या उपक्रमाद्वारे महिला प्रवाशांना प्रोत्साहन देण्याचा आणि प्रवासी सेवेत गुणवत्तावृद्धी करण्याचा
संकल्प व्यक्त करण्यात आला.

धर्मवीरांना सामूहिक तर्पणः अरुंधती फाऊंडेशनतर्फे २१ सप्टेंबर रोजी विशेष कार्यक्रम

पुणेः गेल्या १२०० वर्षांत परकीय आक्रमणांत वीरगती प्राप्त झालेल्या ज्ञात-अज्ञात हिंदू धर्मवीरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अरुंधती फाऊंडेशनने यंदाही सामूहिक तर्पण आणि श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी म्हणजेच रविवार दिनांक २१ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी 10.00 ते 2.00 दरम्यान हा कार्यक्रम पत्रकार भवन, नवी पेठ येथे पार पडणार आहे. अशी माहिती अरुंधती फाऊंडेशनचे श्री. आदित्य गुप्ते यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

कार्यक्रमा नंतर बहुचर्चित ‘His Story of इतिहास’ ह्या सत्यघटनेवर आधारीत भारतीय इतिहासातल्या अफरातफरीवर भाष्य करणाऱ्या चित्रपटाचे विनामूल्य प्रदर्शन होणार आहे.

गेल्या वर्षी श्री देव ओंकारेश्वर मंदिरात झालेला हा स्तुत्य उपक्रम सर्व हिंदू बांधवांच्या सहकार्याने यशस्वी झाला होता. त्यामुळे यंदाही मोठ्या संख्येने धर्मप्रेमींनी या कार्यक्रमात सहभागी होऊन हुतात्यांच्या बलिदानाचे स्मरण करावे, असे आवाहन आदित्य गुप्ते यांनी केले आहे.

या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश सनातन धर्माच्या रक्षणासाठी प्राणार्पण केलेल्या या धर्मवीरांचे स्मरण करणे, त्यांना सामूहिक तर्पण अर्पण करून कृतज्ञता व्यक्त करणे आणि त्यांच्या त्यागाचा वारसा जपण्याची धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जबाबदारी पार पाडणे हा आहे.

गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही सर्व हिंदू संघटना आणि नागरिकांनी या ऐतिहासिक कार्याला सहकार्य करावे, असे विनम्र आवाहन फाऊंडेशनतर्फे करण्यात आले आहे.

दिव्यांगांनी साकारलेल्या वस्तूंचे प्रोत्साहन प्रदर्शन २० सप्टेंबर पासून

दृष्टीहिन व्यक्तींची वस्तू प्रात्यक्षिके आणि कला सादरीकरण ; प्रदर्शनाला प्रवेश विनामूल्य

पुणे : दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्या सोबतच त्या स्वावलंबी व्हाव्या, तसेच समाजाला त्यांच्यातील कौशल्यांची ओळख व्हावी, या उद्देशाने पुण्यातील समविचारी मैत्रिणींनी एकत्र येऊन प्रोत्साहन २०२५  या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. शनिवार, दिनांक २०  सप्टेंबर ते रविवार, दिनांक २१  सप्टेंबर रोजी सकाळी  १० ते ८ यावेळेत कर्वे रस्त्याजवळील अश्वमेध हॉल येथे हे प्रदर्शन होणार आहे. महाराष्ट्रातील विविध भागातील ३१  दिव्यांग व्यक्ती आणि ९ संस्था या प्रदर्शनात सहभागी होत आहेत.

प्रदर्शनाचे संयोजन रंजना आठल्ये, रेखा कानिटकर, आरती पटवर्धन, माधुरी पाटणकर, शुभदा करंदीकर, गीता पटवर्धन, आबेदा खान, नीलम भाटवडेकर, अमृता पटवर्धन, रोहिणी अभ्यंकर यांनी केले आहे.  प्रदर्शनाचे उद््घाटन शनिवार, दिनांक २० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता दिव्यांगांसाठी कार्यरत असलेल्या इंटिग्रेटेड एज्युकेशन सेंटरच्या अमृता भागवत आणि गती मंद असलेल्या पूजा मुनोत यांच्या हस्ते होणार आहे. फक्त दिव्यांग व्यक्तिंचाच सहभाग असलेल्या या प्रदर्शनात त्यांनी साकारलेल्या उपयुक्त कलात्मक वस्तू आणि खाद्यपदार्थ यांचे  प्रदर्शन व विक्री केली जाते. त्यांच्या कलागुणांचे सादरीकरण हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे.

रंजना आठल्ये म्हणाल्या, सन २००३ पासून हे प्रदर्शन दरवर्षी आयोजित केले जाते. प्रदर्शनात सर्व वयोगटातील दिव्यांग व्यक्ती सहभागी होतात. दिव्यांग व्यक्ती, त्यांच्यासाठी काम करणा-या संस्था आणि सामान्य नागरिक यांच्यात परस्पर संवाद व सहकार्य स्थापन करणे, हा या मागचा उद्देश आहे. दृष्टिहीन व्यक्ती आपले दैनंदिन आयुष्य कसे व्यतीत करत असतील याचे कौतुक आणि कुतूहल प्रत्येकाला असते. याबाबतीत त्यांच्याशी संवाद साधण्यात येणार आहे. दिव्यांगाना सक्षम करणे हाच प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे.

प्रदर्शनात विद्या ज्योती स्पेशल स्कूल, प्रिझम फाउंडेशन, शिर्डी साईबाबा अंध महिला वृद्धाश्रम, संवाद, नंदनवन, स्मित फाऊंडेशन, उन्मेष फाउंडेशन, मैत्र फाऊंडेशन, मोहोर एंटरप्रायझेस इत्यादी भाग घेणार आहेत. प्रदर्शना दरम्यान धायरी येथील दृष्टीहिन वृद्ध महिला वायरचे बास्केट, मण्यांचे शोपीस तयार करण्याचे प्रात्यक्षिक सादर करतील . त्याशिवाय वेळोवेळी  दिव्यांग कलाकार करमणुकीचे कार्यक्रम सादर करतील. प्रदर्शनाला प्रवेश विनामूल्य असून पुणेकरांनी मोठया संख्येने प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

महिंद्राने ओज ट्रॅक्टरची पुढील श्रेणी ऑस्ट्रेलियामध्ये लाँच केली

स्मार्ट शेतीच्या नवीन युगाची सुरुवात

महिंद्राच्या ऑस्ट्रेलियातील पदार्पणाला 20 वर्षे झाली आहेत. त्याच वेळी लाँच झालेल्या या ओज ट्रॅक्टरमुळे आनंद द्विगुणित झाला आहे. यामुळे ऑस्ट्रेलियात ताकद, आराम आणि स्मार्ट शेतीच्या नवीन युगाची सुरुवात झाली आहे.

ब्रिस्बेन18 सप्टेंबर 2025: जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर उत्पादक कंपनी असलेल्या महिंद्रा अँड महिंद्राने भविष्याच्या दृष्टीने तयार केलेली ट्रॅक्टर श्रेणी महिंद्रा ओज ऑस्ट्रेलियामध्ये लाँच केली.

ऑस्ट्रेलियामध्ये महिंद्रा कंपनीला 20 वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने कंपनीने सब-कॉम्पॅक्ट आणि कॉम्पॅक्ट श्रेणीतील ओज 1100 आणि 2100 मालिकेतील तीन नवीन ट्रॅक्टर मॉडेल सादर केले. ऑस्ट्रेलियन शेतकऱ्यांच्या अद्वितीय गरजा पूर्ण करण्यासाठी ते विचारपूर्वक डिझाइन केलेले आहेत. हे नवीन ट्रॅक्टर मॉडेल आहेत ओज 1123 एचएसटी (हायड्रोस्टॅटिक ट्रान्समिशन), ओज 1126 एचएसटी आणि शक्तिशाली ओज 2126 एचएसटी.

मजबूत बांधकामासह ऑस्ट्रेलियातील परिस्थितीसाठी तयार करण्यात आलेली ओजची ही श्रेणी दीर्घकाळासाठी तयार करण्यात आली आहे. महिंद्राचे उत्पादन असल्याने विश्वासार्हता आहेच तसेच वापरणाऱ्यांना सोयीचे जाईल असे त्याचे आरामदायी डिझाइन आहे.

ऑस्ट्रेलियन शेतकरी आणि मालमत्ता धारकांसाठी नवीन मानके निश्चित करणारी आहे. ही ओज श्रेणी प्रगत तंत्रज्ञान, शक्तिशाली इंजिन तंत्रज्ञान, बटन-ऑपरेटेड पीटीओ आणि क्लास-लीडिंग लिफ्ट क्षमतेसह लोडर सारख्या नवकल्पनांसह एर्गोनॉमिक प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले पॅनल, प्रगत हायड्रॉलिक्स, पॉवर स्टीअरिंग सिस्टम आणि पर्यायी केबिन कॉन्फिगरेशन सारख्या वैशिष्ट्यांनी नवीन महिंद्रा ट्रॅक्टर सज्ज आहेत. यामुळे अतुलनीय आराम मिळतो तसेच नियंत्रण ठेवता येते.

प्रोजेक्टर स्टाईलचे हेडलाइट्स सकाळी लवकर किंवा रात्री उशिरापर्यंतच्या कामांसाठी स्पष्ट दृश्यमानता देतात. फोल्डेबल आर्मरेस्टसह महिंद्राची आलिशान एमकम्फर्ट सीट आणि ड्रायव्हर-फ्रेंडली कलर-कोडेड कंट्रोल्ससह, चिरस्थायी मूल्यासह आधुनिक शेतीसाठी ओजला एक योग्य भागीदार बनवते.

संस्कृत शब्द “ओजस”म्हणजे ऊर्जेचा साठा, त्यावरून हे नाव देण्यात आले आहे. ओज हा महिंद्राचा सर्वात महत्त्वाकांक्षी, हलका ट्रॅक्टर आहे. महिंद्रा ऑटो अँड फार्म सेक्टर (एएफएस) साठीचे संशोधन आणि विकास केंद्र असलेली महिंद्रा रिसर्च व्हॅली, आणि जपानमधील मित्सुबिशी महिंद्रा कृषी यंत्रसामग्री यांच्या सहयोगी प्रयत्नातून ही नवीन ओज श्रेणी विकसित केली गेली आहे. हलक्या वजनाच्या 4WD ट्रॅक्टर डिझाइनमध्ये ही श्रेणी एक परिवर्तनकारी बदल सुचवते. यात अत्याधुनिक नवकल्पना आहेत ज्या ऑस्ट्रेलियामधील शेतीची पुनर्परिभाषा करण्यासाठी सज्ज आहेत.

महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या फार्म इक्विपमेंट बिझनेसचे अध्यक्ष श्री. विजय नाक्रा म्हणाले, महिंद्रा ब्रँड ऑस्ट्रेलियातील पदार्पणाची 20 वर्षे साजरी करत असतानाच जागतिक स्तरावर कौतुक झालेला महिंद्रा ओज ट्रॅक्टर या महत्त्वाच्या बाजारपेठेत सादर करताना आम्हाला आनंद होतो आहे. जपानच्या मित्सुबिशी महिंद्रा ऍग्रीकल्चर मशिनरीसोबतच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेल्या आमच्या प्रगत ग्लोबल लाइटवेट 4डब्ल्यूडी ट्रॅक्टर प्लॅटफॉर्मवर तयार केलेलीओजची ही श्रेणी महिंद्राची नावीन्यपूर्णताटिकाऊपणा तसेच ग्राहक-केंद्रित डिझाइनसाठीची वचनबद्धता दाखवते. जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीसहहे  नवीन उत्पादन कामगिरी आणि विश्वासार्हतेला महत्त्व देणाऱ्या ऑस्ट्रेलियातील शेतकरी तसेच मालमत्ता धारकांना आवडेलअसा आम्हाला विश्वास आहे.”

महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे ​​ग्लोबल प्रोडक्ट प्लॅनिंग अँड इंटरनॅशनल ऑपरेशन्स (आसियान अँड आरओडब्ल्यू) प्रमुख श्री. रवींद्र एस. शहाणे म्हणाले, ऑस्ट्रेलियासाठीसब-कॉम्पॅक्ट आणि कॉम्पॅक्ट श्रेणींमधील ओज ११०० आणि २१०० मालिकेतील ओज मॉडेल्स महिंद्रा लाँच करत आहे. स्मार्ट आणि विचारपूर्वक तयार केलेल्या या अग्रगण्यतंत्रज्ञानातील पहिलाच प्रयोग असलेली ओज श्रेणी एक शक्तिशाली मल्टीटास्किंग सोल्यूशन देतेजे तेथील जगण्यासाठी योग्य आहे. तसेच लहान जमीन मालकांसाठी आवश्यक असे बहुआयामीवापरणाऱ्यांची सोय पाहणारे तसेच हाताळणी सोपी असेल असे डिझाइन केलेले आहे. नावीन्यपूर्णता आणि मूल्य यांचा योग्य समन्वय साधत तयार करण्यात आलेली ही नवीन श्रेणी आजपासून संपूर्ण ऑस्ट्रेलियामध्ये उपलब्ध होईल.”

ऑपरेटर अनुभव आणि कृषी नवोपक्रमातील एक धाडसी झेप असलेली महिंद्रा ओज श्रेणी दक्षिण भारतातील महिंद्राच्या अत्याधुनिक कारखान्यात तयार केली जाते. या मालिकेतील मॉडेल्स अमेरिकाकॅनडाथायलंड तसेच भारतातील बाजारपेठांसाठी देखील उपलब्ध आहेत.

यातील आणखी एक दिलासादायक गोष्ट म्हणजे, महिंद्रा ऑस्ट्रेलिया एक विस्तृत वॉरंटी पॅकेज देते: 3 वर्षांचे बंपर-टू-बंपर कव्हरेजतर पॉवरट्रेनवर अतिरिक्त 3 वर्षे वॉरंटी. महिंद्राच्या कटिबध्दतेच्या पाठिंब्याने, ही वॉरंटी त्याच्या श्रेणीत नवीन बेंचमार्क स्थापित करते. तसेच ट्रॅक्टर मालकांना मोठ्या प्रमाणात दिलासा देते.

महिंद्रा ओज 1100 सीरिज

ओज 1100 सबकॉम्पॅक्ट मालिकेत, महिंद्रा दोन मॉडेल्स सादर करेल – ओज 1123 HST आणि ओज 1126 HST. ओज सब-कॉम्पॅक्ट ट्रॅक्टरमध्ये स्टायलिश डिझाइन आणि वापरण्यासाठी सोयीचे असे हायड्रोस्टॅटिक ट्रान्समिशन, क्रूझ कंट्रोल आणि हीटर कॅब आहे, जे कॉम्पॅक्ट उपाय शोधणाऱ्या मालमत्ता धारकांसाठी आदर्श आहे. 

  • 1123 HST: 3,000 आरपीएम वर 23 एचपी पॉवर निर्माण करणारे 3-सिलेंडर डिझेल इंजिन
  • 1126 HST: 3,000 आरपीएम वर 26 एचपी पॉवर निर्माण करणारे 3-सिलेंडर डिझेल इंजिन
  • कार्यक्षमतेने चालण्यासाठी सहज नियंत्रणे
  • ड्रायव्हिंगच्या सोयीसाठी टिल्ट आणि टेलिस्कोपिक स्टीअरिंग
  • लोडर लिफ्ट क्षमता: 420 किलो
  • रीअर हिच लिफ्ट क्षमता: 350 किलो
  • वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य हाताळणीसाठी पर्यायी मिड-माउंट मॉवर
  • स्टॅंडर्ड 540 आरपीएम रीअर पीटीओ – बटणावर चालणारे
  • विविध भौगोलिक प्रदेशांसाठी टर्फ आणि औद्योगिक टायर पर्याय

महिंद्रा ओज 2100 सीरिज

ओज 2100 कॉम्पॅक्ट मालिकेतील महिंद्रा ओज 2126 HST महिंद्रा सादर करत आहे. मोठ्या प्लॅटफॉर्मवर बनवलेले, ओज 2126 अधिक शक्तिशाली कामांसाठी डिझाइन केलेले आहे. ज्यामध्ये पूर्णपणे एकात्मिक HVAC (हीटर + एअर-कंडिशनर) कॅब पर्याय म्हणून उपलब्ध आहे, ज्यामुळे ते विश्वासार्ह तर ठरतेच पण सर्व हवामानासाठी योग्य ट्रॅक्टर ठरते. ट्रॅक्टरमध्ये सर्वोत्तम-इन-क्लास लोडर लिफ्ट क्षमता आणि कार्यक्षम लोडर ऑपरेशन्ससाठी सायकल टाइम  देखील आहे.

  • 2126 HST: 2,500 आरपीएमवर 26 एचपी उत्पादन करणारे 3-सिलेंडर डिझेल इंजिन
  • कार्यक्षमतेने चालण्यासाठी सहज नियंत्रणे
  • 3-रेंज एचएसटी ट्रान्समिशन
  • ड्रायव्हिंगच्या उत्तम अनुभवासाठी टिल्ट स्टीअरिंग
  • सोप्या हालचाली आणि सुलभतेसाठी रुंद फ्लॅट ऑपरेटर प्लॅटफॉर्म
  • लोडर लिफ्ट क्षमता: 580 किलो
  • रीअर हिच लिफ्ट क्षमता: 800 किलो
  • स्टॅंडर्ड 540 आरपीएम रीअर पीटीओ – बटणावर चालणारे

17 सप्टेंबर रोजी ऑस्ट्रेलियातील महिंद्राच्या डीलर्सना ओज श्रेणी सादर केली जाईल, आणि त्याच्या बुकिंगला सुरुवात होईल.

गोंधळी कलाकारांसाठी त्रिसूत्री कार्यक्रम राबविणार: परेश गरुड

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोंधळी व भटक्या विमुक्त जाती जमाती विकास संघातर्फे मेळाव्याचे आयोजन

पुणे: गोंधळी कलाकारांचा अपघाती विमा, कागदपत्रे मिळण्यात येणाऱ्या अडचणी सोडवणे आणि त्यांच्या मुलांचे शिक्षण, माता-भगिनींचे सक्षमीकरण हा त्रिसूत्री कार्यक्रम राबविला जाणार आहे. गोंधळी, डवरी व जागरण गोंधळाशी संबंधित अन्य भटक्या विमुक्तांसाठी आवश्यक कागदपत्रे, प्रमाणपत्र आणि कलाकारांचे मानधन यावरही काम करणार असल्याचे गोंधळी व भटक्या विमुक्त जाती जमाती विकास संघाचे अध्यक्ष परेश गरुड यांनी सांगितले.

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोंधळी व भटक्या विमुक्त जाती जमाती विकास संघातर्फे गोंधळी कलाकारांच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. नवी पेठेतील पत्रकारसंघाच्या सभागृहात झालेल्या या मेळाव्यात भटके विमुक्त विकास परिषदेचे स्वामी धनगर, सद्भाव गती विधी पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे रवी ननावरे, आयुर्विमा प्रतिनिधी विद्या गुगळे, राज्याच्या सांस्कृतिक मंत्रालयातील लोककला अनुदान विभागाचे सदस्य खोडे आदी उपस्थित होते. ४५ पेक्षा अधिक कलाकारांनी मेळाव्याला उपस्थित लावली.

परेश गरुड म्हणाले, “प्रामुख्याने कलाकार, त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी काम करण्याचे ठरले. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या अडचणी दूर करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासह किमान पदवीचे शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. २२ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवात गोंधळी कलावंतांचा एक लाख रुपयांचा अपघाती विमा संस्थेमार्फत उतरवण्यात येणार आहे. कलाकारांचे आरोग्य, जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, बँक अकाउंट, रहिवासी दाखला, उत्पन्नाचे दाखले व कलाकार पेन्शन या विषयात काम करायचे निश्चित करण्यात आले आहे. डिसेंबर २०२५ पर्यंत पुणे शहर व जिल्ह्यातील ५०० कलाकारांची नोंदणी करून शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील.”

विद्या गुगळे यांनी आयुर्विमाचे महत्व याविषयी माहिती दिली. स्वामी धनगर यांनी भटके विमुक्त विकास परिषदेच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या योजनांविषयी सांगितले. खुडे यांनी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना कलाकारांना अवगत केल्या. जितेंद्र वाईकर यांनी सूत्रसंचालन केले. हरीश पाचंगे यांनी प्रास्ताविक केले. श्रीकांत रेणके यांनी आभार मानले.

‘आयव्हीएफ’च्या माध्यमातून पुण्यातील दांपत्याला जनुकदोषमुक्त अपत्यप्राप्ती

पुणे18 सप्टेंबर २०२५ : कराड येथील एका दांपत्याला अपत्यप्राप्तीचे सुख मिळत नव्हते. त्यांना झालेली दोन बाळे जन्मानंतर काही दिवसांतच दगावली होती. या बाळांना आई–वडील दोघांकडूनही आलेल्या अनुवांशिक जनुकदोषामुळे गंभीर आजार झाला होता. मात्र अखेर पुण्यातील इंदिरा आयव्हीएफ येथे ‘इन विट्रो फर्टिलायझेशन’च्या (आयव्हीएफ) उपचारांमुळे या दांपत्याला जनुकदोषमुक्त निरोगी बाळ प्राप्त झाले आहे.

लग्नाला दहा वर्षांहून अधिक काळ उलटून गेला तरीही या दांपत्याला अपत्यप्राप्ती होत नव्हती. त्यांच्यावर ‘स्पायनल मस्क्युलर अ‍ॅट्रॉफी’ (एसएमए) या दुर्धर आजाराची छाया होती. हा आजार दोन्ही पालकांकडून पुढे सरकतो आणि अपत्याच्या जिवंत राहण्याच्या शक्यतांवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो. अपत्यप्राप्तीमध्ये जोखीम घ्यावी लागणार हे स्पष्ट दिसत असले, तरी निरोगी अपत्य प्राप्त करण्याची या दांपत्याची जिद्द कायम होती. वैज्ञानिक आणि वैद्यकीय प्रगतीने या अडचणीवर मार्ग निघाला. जनुकीय तपासणी, गुणवत्ता नियंत्रणाचे प्रोटोकॉल्स आणि सततचे वैद्यकीय मूल्यमापन यांवर आधारित खास तयार केलेल्या उपचारयोजनेमुळे या दांपत्याने अशक्य वाटणाऱ्या अडथळ्यांवर मात केली.

इंदिरा आयव्हीएफ येथील आयव्हीएफ तज्ज्ञ डॉअमोल सुभाष लुंकड म्हणाले, “एसएमएसारख्या जनुकदोषातून मार्ग काढणे म्हणजे केवळ वंध्यत्वावर उपचार करणे नसते, तर व्यापक उपचारयोजना, काटेकोर वैद्यकीय देखरेख आणि सातत्यपूर्ण मूल्यमापन त्यामध्ये गरजेचे असते. आम्ही जनुकीय तपासण्या केल्या आणि रुग्णांना विश्वासात घेतले. त्यातून पालकत्वाकडे आत्मविश्वासाने जाणारा मार्ग उभा राहिला.”

या उपचारांमध्ये यशाची शक्यता वाढवण्यासाठी टप्प्याटप्प्याने योजना आखण्यात आली :

·         दांपत्याचा वैद्यकीय इतिहास तपासून, त्यांना त्यांच्या अनुवांशिक आजाराची, त्यातील चाचण्यांची माहिती दिली, जोखीम सांगितली आणि समुपदेशन केले,

·         अंडाशय सक्रियतेची पद्धत वापरून आयव्हीएफ पद्धतीने अंड्यांची वाढ तपासली,

·         प्रयोगशाळेत भ्रूण तयार करून त्याची जनुकीय तपासणी केली आणि दोष निर्माण होऊ शकणारे भ्रूण वगळले,

·         निरोगी भ्रूणाची निवड करून गर्भाशयात प्रत्यारोपण करणे आणि पुढील देखरेख सुरू केली.

या उपचारांनंतर रुग्णाला गर्भधारणा झाली आणि निरोगी, जनुकदोषमुक्त बाळाचा जन्म झाला. अनेक वर्षांची झुंज संपली आणि तिच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

आयव्हीएफचे उपचार, जनुकीय तपासणी आणि सातत्यपूर्ण देखरेख यांचा संगम झाल्यास, जनुकदोषाचा धोका असलेल्या दांपत्यांनाही पालकत्वाचा सुरक्षित व विश्वासार्ह मार्ग उपलब्ध होऊ शकतो, हे या अनुभवावरून दिसून येते.

पुणे शहरातील 4 बडे बिल्डर ED च्या रडारवर, रिअल इस्टेट क्षेत्रात खळबळ…

-दानवीर, धर्मवीर कर्मवीर म्हणविणारे देखील जाळ्यात ? प्रमोद रांका प्रकरणाचा तपास ED कडे

पुण्यातील ख्यातनाम लोकांच्या कंपन्यांवर आर्थिक गैरव्यवहारासंदर्भात आयकर विभागाने धाडी टाकल्यानंतर आता सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने याची चौकशी आपल्या हाती घेतली आहे.दिल्लीमधे स्पेशल कनेक्शन्स तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील घनिष्ट संबंध असल्याचे सांगणारे पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर प्रमोद रांका यांच्या गैरव्यवहारांचा तपास ED कडे देण्यात आला आहे. रांका यांच्यासह पुणे शहरातील 4 बडे बिल्डर ED च्या रडारवर असून या सगळ्यांनी मिळून केलेले गैरव्यवहार आता उघडकीस आले आहेत. काही सेवानिवृत्त उच्चपदस्थ अधिकारी देखील या गैरव्यवहारात सहभागी आहेत, त्यांची देखील चौकशी करण्यात येणार असल्याचे वृत्त ‘मिरर’ने दिले आहे

रांका यांच्यासह साॅलिटायर ग्रुप, कोहिनूर डेव्हलपर्स आणि मित्तल बंधूंच्या कंपन्यांवर आयकर विभागाने टाकलेल्या मोठ्या छाप्यानंतर इडीने यासंदर्भातील चौकशी सुरू केली आहे. ‘सीविक मिरर’च्या संपादिका अर्चना मोरे यांनी या कारवाईची माहिती सर्वप्रथम प्रसिद्ध केली. यामुळे पुण्याच्या रियल इस्टेट क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.

मिरर च्या वृत्तात असे म्हटले आहे कि,’ आयकर विभागाच्या चौकशीत काही नामांकित बांधकाम कंपन्या आणि सरकारी अधिकाऱ्यांमधील संदिग्ध संबंध उघड झाले असून यात येस बँक कर्ज घोटाळा आणि इंडियाबुल्स आर्थिक गैरव्यवहार यांचेही धागेदोरे गुंतले असल्याचे समोर आले आहे.प्रमोद रांका हे रिव्हरफ्रंट रिअ‍ॅल्टी पुणे, स्टारव्ह्यू हाउसिंग, प्रोमार्क प्रॉपर्टीज, एक्झर्बिया एपॉक क्रिएशन्स, एम्ब्लेम रिअ‍ॅल्टी, साक्षी शाह रिअ‍ॅल्टी, रांका गारमेंट्स आणि पार्श्वनाथ क्लोदिंग या कंपन्यांमध्ये भागीदार किंवा संचालक आहेत.ईडीचा तपास अजून सुरू आहे. मात्र प्राथमिक तपासात प्रमोद रांका हे या संपूर्ण घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट होत आहे. स्थगित प्रकल्प, टाउनशिप धोरणांचा गैरवापर आणि संशयास्पद आर्थिक व्यवहारांमुळे पुण्याच्या रिअल इस्टेट क्षेत्रसमोर विश्वासार्हतेचे मोठे संकट उभे ठाकले आहे.रांका यांनी वारंवार आपल्या राजकीय ओळखींचा दाखला दिल्याचे सांगितले जाते. त्यांनी स्वतःला दिल्लीतील उच्च पातळीवरील मंडळींशी, केंद्रीय गृहमंत्र्यांशी तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक असल्याचा दावा केल्याचे तपासात समोर आले आहे. त्यांचे नागपूरचे राज्यसभा खासदार अनिल संचेती यांच्याशीही संबंध असल्याचे बोलले जाते. या ओळखींचा त्यांच्या व्यावसायिक फायद्यासाठी वापर झाला काय, याचा तपास सुरू आहे.

त्यांचा प्रभाव केवळ व्यवसायापुरता मर्यादित नसून राजकीय ओळखही मोठी आहे. त्यांच्या मेहुण्यांनी राजस्थानच्या माजी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून काम केले असून त्यांचे संबंध डीएचएफएल घोटाळा तसेच इंडियाबुल्स प्रकरणाशी असल्याचे तपास यंत्रणांनी सांगितले.
ईडीच्या तपासात एका जटील आर्थिक गैरव्यवहाराचे जाळे उघड झाले आहे. एका बिगर बँकिंग वित्तीय संस्थेतून मध्यपूर्वेतील फंडांकडे मोठ्या प्रमाणात निधी वळवण्यात आला. हा पैसा नंतर परदेशी गुंतवणुकीच्या नावाखाली पुन्हा भारतात आणला गेला. त्यानंतर तो कॉर्पोरेट डिपॉझिट म्हणून दाखवून प्रत्यक्षात मुंबईतील लोअर परळमधील प्रकल्पांसह विविध मालमत्ता खरेदीसाठी वापरला गेला. याच संदर्भात व्हीटीपी रिअॅल्टी, गोदरेज प्रॉपर्टीज आणि ऑनेस्ट शेल्टर्स या कंपन्यांनी तब्बल शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त कॉर्पोरेट डिपॉझिट्स घेतल्याचा संशय ईडीला आहे.

रांका यांचा साॅलिटायर ग्रुप, मित्तल बंधू आणि व्हीटीपी रिअॅल्टी यांच्यात मतभेद झाल्याने अनेक प्रकल्प अडकून पडले आहेत. यात मार्केट यार्डमधील साॅलिटेयर वर्ल्ड प्रकल्पाचाही समावेश आहे. या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक केलेल्या घर खरेदी करणारे आणि भागधारकांना निधी परत मिळवण्यासाठी हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे. टाउनशिप धोरणांचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर झाला आहे. माण, हिंजवडी व मांजरी येथील प्रकल्प वेगवेगळ्या डेव्हलपर्समध्ये विभागले गेले आहेत. नियमांनुसार एका डेव्हलपरकडे पाणीपुरवठा, वीज, शाळा, अग्निशमन केंद्र यांसारखी पायाभूत सोयी पुरवण्याची जबाबदारी असते, मात्र हे नियम पाळले गेले नाही, असा आरोप आहे.ईडीच्या अधिकाऱ्यांच्या तपासात असे आढळल्याचे सांगितले जाते की, एका नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर पैसे मध्यपूर्वेतील एका कंपनीकडे वळवण्यात आले आणि त्यानंतर लगेचच थेट परकीय गुंतवणुकीच्या नियमांच्या आडोशाने हे पैसे भारतातील एका कंपनीकडे परत पाठवण्यात आले.पुढील चौकशीत हेही आढळले की त्याच भारतीय कंपनीने हे पैसे खोट्या ठेवी म्हणून दाखवून विविध मालमत्ता खरेदीसाठी वापरले, ज्यामध्ये मुंबईतील लोअर परळ परिसरातील एक प्रकल्प समाविष्ट आहे. चौकशीत असेही सुचवले गेले की व्हीटीपी रिअॅल्टी, गोदरेज प्राॅपर्टीज आणि ऑनेस्ट शेल्टर्स यांनी संगनमत केले आहे. त्यामुळे ईडीला मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहाराचा संशय आला आणि सर्व संबंधित कपन्यांवर छापे टाकण्यात आले.प्रमोद रांका, सॉलिटेअर ग्रुप, मित्तल ब्रदर्स आणि व्हीटीपी रिॲल्टी यांच्यात मोठा वाद झाला असल्याचे कळते. त्यामुळे या गटांच्या काही प्रकल्पांमध्ये अडथळे निर्माण झाले आहेत. यामध्ये मार्केट यार्ड येथील सॉलिटायर वर्ल्ड प्रकल्पाचा समावेश आहे, जिथे अनेक गुंतवणूकदार आणि हितसंबंधी अडकले आहेत. आपले पैसे परत मिळवण्यासाठी ते धावपळ करत आहेत.रांका यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये सेवा दिलेल्या अनेक माजी मुख्य सचिवांचा प्रभावी वापर केला. त्यापैकी काही जण सेवानिवृत्तीनंतर रिअल इस्टेट क्षेत्रात कार्यरत असल्याचे सांगितले जाते.प्रमोद रांका हे सॉलिटेअर ग्रुपचे भागीदार असून अनेक रिअल इस्टेट कंपन्यांमध्ये ते डिझाईनेटेड पार्टनर आहेत. यामध्ये खालील कंपन्यांचा समावेश आहे.

रिव्हरफ्रंट रिअल्टी पुणे एलएलपी : ११ फेब्रुवारी २०११ पासून डिझाईनेटेड पार्टनर
स्टारव्ह्यू हाऊसिंग एलएलपी : १ एप्रिल २०१२ पासून डिझाईनेटेड पार्टनर
प्रोमार्क प्रॉपर्टीज एलएलपी : २४ जून २०१४ पासून डिझाईनेटेड पार्टनर
साक्षी शाह रिॲल्टी एलएलपी : २३ एप्रिल २०२४ पासून डिझाईनेटेड पार्टनर
एक्झर्बिया-एपॉक क्रिएशन्स एलएलपी : १२ जून २०१७ पासून पार्टनर
एम्ब्लेम रिॲल्टी एलएलपी : १५ ऑक्टोबर २०२३ पासून डिझाईनेटेड पार्टनर
रांका गारमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड : २५ नोव्हेंबर २००२ पासून संचालक