Home Blog Page 1268

पंतप्रधान मोदींनी काळाराम मंदिरात घेतले दर्शन

नाशिक-देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी मोदींनी नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शन घेतले. तसेच मंदिरात पूजाही आणि आरती केली. मोदी मंदिरात पोहोचताच मंदिरातील पुजाऱ्यांकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. मोदींकडून रामकुंड येथे जलपूजन आणि गोदावरीची आरतीही करण्यात आली. यावेळी मंदिरात येवल्याच्या पैठणीचा शेला देत मोदींचे स्वागत करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी नाशिकमध्ये पोहोचल्यानंतर रोड शो केला. त्यानंतर स्थानिक रामकुंडावर जाऊन जलपूजन केले. मोदींनी काळाराम मंदिरात जाऊन काळारामाचे दर्शनही घेतले. त्यानंतर त्यांनी नाशिक येथे आयोजित राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन केले. या भरगच्च कार्यक्रमानंतर मोदी आता अटल सेतूचे लोकार्पण करण्यासाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले.

नाशिककर भारावले:दर्शनाला मोदी आले….

नाशिक, दि. १२ : राष्ट्रीय युवा महोत्सवाचे औचित्य साधत नाशिक दौऱ्यावरील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे हजारो नाशिककरांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून उत्स्फूर्त स्वागत केले. प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या नाशिक येथील आगमनाने उल्हसित झालेल्या नागरिकांनी स्वागताचे फलक हाती घेत ‘भारत माता की जय’चा जयघोष करत आसमंत दुमदुमून टाकला. प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या या ‘रोड शो’ची जादू नाशिककरांवर झाल्याचं चित्र आज सगळीकडे पाहायला मिळाले.

सकाळी ठीक १०-३० वाजता प्रधानमंत्री श्री. मोदी यांचे निलगिरी बाग हेलिपॅड येथे आगमन झाले. त्यानंतर हॉटेल मिर्ची चौकातून केशरी रंगाच्या आणि फुलांनी सजवलेल्या खुल्या जीपमधून त्यांच्या ‘रोड शो’ला प्रारंभ झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, चंद्रशेखर बावनकुळे हे देखील रोड शोमध्ये सहभागी झाले होते.

नाशिकच्या युवा वर्गाने केलेली गर्दी, महिला वर्गाचा प्रचंड प्रतिसाद, दुतर्फा सजलेले रस्ते अशा वातावरणात तपोवनाच्या दिशेने निघालेल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना ठिकठिकाणी या आपुलकी आणि प्रेमाने केलेल्या स्वागताचा अनुभव आला. उपस्थितांच्या दिशेने हात उंचावत तसेच उपस्थितांना अभिवादन करत प्रधानमंत्री श्री. मोदी यांचा ताफा तपोवन कडे निघाला.

लेझिम पथक, ढोलपथक, पारंपरिक वाद्ये यांच्या साहाय्याने आणि नृत्य करत विविध पथके या मार्गावर प्रधानमंत्री श्री. मोदी यांचे स्वागत करत होती. हॉटेल मिर्ची ते तपोवन पर्यंतचा संपूर्ण रस्त्यावर उत्साह, चैतन्य, आनंदाचे वातावरण होते. हातात तिरंगा घेऊन  युवकांनी प्रधानमंत्री श्री. मोदी यांचे स्वागत केले. त्याचबरोबर विविध ठिकाणच्या युवा मंडळांनी मल्लखांब प्रात्यक्षिके,  पारंपरिक कलांचा आविष्कार यावेळी सादर केला. त्र्यंबकेश्वर येथून आलेल्या आणि बाल वारकऱ्यांच्या समावेश असलेल्या दिंडीने विशेष लक्ष वेधले. आदिवासी आणि पारंपरिक लोकनृत्य, पंजाबी नृत्य, अशा विविध पद्धतीने आणि विविध रंगी वेशभूषा करून नागरिकांनी प्रधानमंत्री श्री. मोदी यांचे स्वागत केले.

“देवाने मला भारतातील सर्व लोकांचे प्रतिनिधित्व करण्याचे निमित्तमात्र बनवले आहे-PM नाशकात

श्री रामललांच्या प्राणप्रतिष्ठेसाठीच्या 11 दिवसांच्या विशेष विधीचा पंतप्रधानांकडून आज प्रारंभ

अयोध्या धाम येथील मंदिरात 22 जानेवारी रोजी श्री रामललांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यासाठीच्या 11 दिवसांच्या विशेष विधीला सुरूवात केली आहे. ‘ही खूप मोठी जबाबदारी आहे. आपल्या धर्मग्रंथांमध्ये म्हटल्याप्रमाणे, आपण यज्ञासाठी आणि त्याच्या पूजेसाठी स्वतःमध्ये दैवी चेतना जागृत केली पाहिजे. यासाठी धर्मग्रंथांमध्ये उपवास आणि कठोर नियम विहित करण्यात आले आहेत, जे प्रतिष्ठापनेपूर्वी पाळावे लागतात.म्हणून, काही धर्मात्मा आणि आध्यात्मिक प्रवासातील थोरांकडून मला मिळालेल्या मार्गदर्शनानुसार आणि त्यांनी सुचवलेल्या ‘यम-नियमां’ नुसार, मी आजपासून 11 दिवसांचा एक विशेष विधी सुरू करीत आहे.

राममंदिर प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर रामभक्तीच्या भावनोत्कटतेत सारा देश दंग असल्याची दखल पंतप्रधानांनी आपल्या भावनिक संदेशात घेतली आहे. हा क्षण सर्वशक्तिमान ईश्वराचे आशीर्वाद असल्याचे सांगून पंतप्रधान म्हणाले, “माझे मन भरुन आले आहे! माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मी अशा भावनोत्कटतेचा अनुभव घेत आहे, मी भक्तीची एक आगळी भावना अनुभवत आहे. माझ्या अंतर्मनाचा हा भावनिक प्रवास अभिव्यक्तीची नव्हे तर अनुभवाची संधी आहे.तो मांडण्याची  माझी इच्छा असली तरी त्याची सखोलता, व्यापकता आणि तीव्रता मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. यासंदर्भात माझी मनोस्थिती तुम्हीही चांगल्या प्रकारे समजू शकता.

“अनेक पिढ्यांनी वर्षानुवर्षे संकल्पाप्रमाणे हृदयात जपलेल्या  स्वप्नपूर्ततेच्या वेळी उपस्थित राहण्याचा बहुमान मला मिळाला आहे.  देवाने मला भारतातील सर्व लोकांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी एक साधन बनवले आहे.  ही खूप मोठी जबाबदारी आहे.” असे सांगत पंतप्रधान मोदींनी या संधीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

पंतप्रधानांनी या उपक्रमासाठी लोक, संत आणि देव यांचे आशीर्वाद मागितले आणि प्रभू रामाने महत्त्वपूर्ण काळ  व्यतित केलेल्या नाशिक धाम – पंचवटी येथून अनुष्ठानाची सुरुवात करणार असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.  आज स्वामी विवेकानंद आणि माता जिजाबाई यांच्या जयंतीचा  आनंददायी योगायोग असल्याचीही त्यांनी दखल घेतली आणि राष्ट्र चेतनेच्या दोन दिग्गजांना आदरांजली वाहिली. सीता-राम  भक्तीने सदैव ओतप्रोत भरलेल्या आपल्या आईची यावेळी पंतप्रधानांनी आठवण काढली.

प्रभू रामाच्या भक्तांच्या त्यागाला मानवंदना देत पंतप्रधान म्हणाले, “शारीरिकदृष्ट्या मी त्या पवित्र क्षणाचा साक्षीदार असेन, पण माझ्या मनात, माझ्या हृदयाच्या प्रत्येक स्पंदनात, 140 कोटी भारतीय माझ्या पाठीशी असतील.  तुम्ही माझ्यासोबत असाल… प्रत्येक राम भक्त माझ्यासोबत असेल आणि जाणीवेचा तो क्षण आपल्या सर्वांसाठी एक सामायिक अनुभव असेल. राममंदिरासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या अनेकजणांची  प्रेरणा मी माझ्यासोबत घेईन.

आपल्यासमवेत  देशाने जोडले जावे असे सांगत पंतप्रधानांनी लोकांचे आशीर्वाद मागितले आणि त्यांना त्यांच्या भावना आपल्यासोबत सामायिक करण्यास सांगितले. देव ‘निराकार’ आहे हे सत्य आपल्या सर्वांना माहीत आहे. पण देव, भौतिक स्वरूपातही, आपला आध्यात्मिक प्रवास मजबूत करतो.  लोकांमध्ये देव वसतो  हे मी व्यक्तिश: पाहिले आणि अनुभवले आहे. पण लोक जे माझ्यासाठी देवासारखे आहेत ते जेव्हा त्यांच्या भावना शब्दात व्यक्त करतात आणि आशीर्वाद देतात तेव्हा माझ्यात नवीन ऊर्जा संचारते. आज मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे,” असे पंतप्रधान म्हणाले.

महावितरणच्या औद्योगिक ग्राहकांसाठी पुणे परिमंडलात ‘स्वागत सेल’ कार्यान्वित

पुणे, दि१२ जानेवारी २०२४महावितरणच्या सर्व औद्योगिक ग्राहकांना तत्पर सेवा देण्यासाठी पुणे परिमंडल अंतर्गत रास्तापेठ, गणेशखिंड व पुणे ग्रामीण मंडलस्तरावर स्वतंत्र ‘स्वागत सेल’ कार्यान्वित करण्यात आले. पुणे प्रादेशिक संचालक श्री. अंकुश नाळे यांच्याहस्ते या सेलचे उद्घाटन झाले. यावेळी मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्यासह उद्योजक व औद्योगिक संघटना प्रतिनिधींची उपस्थिती होती.

रास्तापेठ येथे ‘प्रकाशदूत’ सभागृहात गुरुवारी (दि. ११) आयोजित कार्यक्रमात महावितरणचे वरिष्ठ अधिकारी तसेच उद्योजक, औद्योगिक संघटना प्रतिनिधी यांच्यात संवाद कार्यक्रम झाला. यावेळी ‘स्वागत सेल’बाबत सादरीकरणातून सविस्तर माहिती देण्यात आली. ‘तत्पर ग्राहकसेवा व पायाभूत वीजयंत्रणेचे विस्तारीकरण, सक्षमीकरणामुळे औद्योगिक ग्राहकांमध्ये महावितरणबाबत विश्वासार्हता वाढीस लागली आहे. पूर्वीपेक्षा वरिष्ठ पातळीवर खुला संवाद व संपर्क वाढला आहे. तात्काळ उपाययोजनांमुळे तक्रारींचे प्रमाण कमी झाले आहे. या तीनही ‘स्वागत सेल’मुळे ग्राहकसेवेचे आणखी तत्पर व्यासपीठाचे स्वागत आहे,’ असे प्रातिनिधिक मनोगत उद्योजक व औद्योगिक प्रतिनिधींनी व्यक्त केले.

प्रादेशिक संचालक श्री. अंकुश नाळे म्हणाले, ‘महावितरणच्या महसूलाचा औद्योगिक ग्राहक प्रमुख स्त्रोत आहे. ‘स्वागत सेल’मुळे औद्योगिक ग्राहकांना वीजसेवा व तक्रारींसाठी स्थानिक कार्यालयाऐवजी आता थेट मंडलस्तरावर संपर्क साधता येईल. स्थानिक कार्यालयांच्या औद्योगिक ग्राहकसेवांसाठी या सेलकडून समन्वय व दैनंदिन देखरेख राहणार आहे.’ यावेळी मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार म्हणाले, ‘पुणे परिमंडलामध्ये एमआयडीसी विद्युत सुधारणा योजनेतून ४५ कोटींच्या पायाभूत वीजयंत्रणेची विविध कामे वेगाने सुरू आहेत. सोबतच औद्योगिक ग्राहकांसाठी आणखी १०० कोटी रूपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. मंजूरीनंतर त्यातील सर्व कामे येत्या मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. दर्जेदार वीजपुरवठा व तत्पर ग्राहकसेवामध्ये कोणतीही तडजोड करण्यात येणार नाही’, अशी ग्वाही श्री. पवार यांनी दिली.

कार्यक्रमाला अधीक्षक अभियंता सर्वश्री अरविंद बुलबुले, युवराज जरग, संजीव राठोड, अमित कुलकर्णी तसेच उद्योजक व औद्योगिक संघटना प्रतिनिधी सर्वश्री दिलीप बटवाल, नरेश राठी, शांताराम जाधव, संदीप बेलसरे, प्रमोद राणे, नवनाथ वायाळ, प्रशांत खानखोजे, राम जोगदंड आदींसह महावितरणचे अभियंता, अधिकारी उपस्थित होते. ‘स्वागत सेल’चे प्रमुख म्हणून कार्यकारी अभियंता व वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त व लेखा) काम पाहतील. त्यांना ८ ते १० अभियंता व कर्मचारी सहकार्य करतील. या सेलकडे संपर्क साधल्यानंतर औद्योगिक ग्राहकांच्या बिलिंग व वीजपुरवठ्याच्या तक्रारींचे ताबडतोब निराकरण करण्यात येईल. तसेच नवीन वीजजोडणी, भार वाढ व इतर सेवा देण्यासाठी थेट ग्राहक दारी जावून कागदपत्रांची पूर्तता करण्यासह विनाविलंब सेवा मिळणार आहे.

‘स्वागत सेल’ संपर्क क्रमांक व ईमेल– पुणे ग्रामीण मंडल- ७८७५७६७९३३ व swagatcell_prc@mahadiscom.in, गणेशखिंड मंडल- ७८७५२३२९२९ व swagatcell_ganeshkhind@mahadiscom.in, रास्तापेठ मंडल– ७८७५७६७०९५ व swagatcell_rastapeth@mahadiscom.in

तेजस्विनी पंडित साकारणार ‘स्वराज्य कनिका – जिजाऊ’

राष्ट्रमाता, राजमाता जिजाबाई शहाजीराजे भोसले… यांनी हिंदवी स्वराज्याची पायाभरणी करून या मुलुखाला छत्रपती शिवाजी महाराज दिले .बुद्धिमत्ता, चातुर्य, पराक्रम, शौर्य, दूरदृष्टी, कुशल राजनिती, कुटुंबवत्सल असे सगळेच गुण त्यांच्यात होते. शिवबाचे शिवराय घडवताना या माऊलीने अनेक वादळं पेलली पण या वादळात ही तेजस्वी ज्योत आणखी प्रखर झाली. प्रत्येक कसोटीवर खऱ्या उतरून या माऊलीने स्त्रीशक्ती व मातृशक्तिचे चिरंतन उदाहरण आपल्या सर्वांस दिले. जगाला दिशा देणाऱ्या या जगत्जननीच्या आयुष्यावर आधारित ‘स्वराज्य कनिका जिजाऊ’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटात जिजाऊंची भूमिका तेजस्विनी पंडित साकारणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर झळकले असून राजमाता जिजाऊ यांची करारी मुद्रा यात दिसत आहे. ६ फायरफ्लाईज प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन अनुजा देशपांडे या करत आहेत.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शिका अनुजा देशपांडे म्हणतात, “राजा नंतर घडतो, आधी घडते ती राजमाता’’ राजमाता जिजाऊसाहेब या लोकजीवनाला जोडणारी अस्मिता तर आहेतच पण त्याचबरोबर मराठी माणसाला त्याच्या अस्तित्वाची-सामर्थ्याची जाणीव करून देणारी एक शक्ती आहेत . हा अभिमान व जाणीव उराशी बाळगून वीरकन्या ते वीरमातेच्या जीवनकाळचे कथानक २-२.३० तासात मांडणे एक लेखिका म्हणून माझ्यासाठी आव्हानात्मक होते . जिजाऊसाहेबांच्या आयुष्यावरील वेगळ्या धाटणीचा हा चित्रपट आहे. जिजाऊसाहेबांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व ,त्यांच्या आयुष्यातील न उलगडलेले प्रसंग-घटना आम्ही प्रेकक्षकांना दाखवणार आहोत.
एक युगपुरुष घडविणाऱ्या ह्या विलक्षण वात्सल्यमुर्तीला मानाचा मुजरा व साष्टांग प्रणिपात. जिजाऊसाहेबांचे व्यक्तिमत्व अभ्यासत /लिहित असताना माझ्या डोक्यात सारखा विचार असायचा की, ही असामान्य भूमिका साकारण्यासाठी उत्तम व्यक्तिमत्व, उत्तम अभिनय असणारी अभिनेत्री मला हवी होती . तेजस्वीनी एक दर्जेदार अभिनेत्री तर आहेच शिवाय एक व्यक्ति म्हणून ती प्रेमळ आहे. त्याचसोबत एक उत्तम मार्गदर्शक व सहाय्यक आहे. तिच्या कामाप्रती ती खूप समर्पित व प्रामाणिक आहे. जिजाऊंचा करारीपणा तिच्यात झळकतो. मला पूर्ण खात्री आहे ती जिजाऊसाहेबांची भूमिका अगदी चोखपणे साकारेल.’’

तेजस्विनी पंडित आपल्या भूमिकेबद्दल म्हणाली, ‘’ज्या स्त्रीने गुलामगिरीच्या काळोखात जखडलेल्या हिंद प्रांताला स्वतंत्र राज्य – स्वराज्य मिळावे हे स्वप्न पहिल्यांदा पाहिले, त्यासाठी वर्षानुवर्ष त्या झिजल्या, त्या भूमिकेवर अटल राहिल्या. कुठलीही गोष्ट प्रवाहाच्या विरोधात जाऊन करणे म्हणजेच क्रांती होय !! अशा राजमाता स्वराज्य जननी जिजाऊसाहेबांची भूमिका करायला माझी निवड केली ह्याबद्दल मी अनुजा ताईंची शतशः आभारी आहे. ही भूमिका करायला मिळणं ही निश्चितच आनंदाची बाब आहे मात्र त्याहून जास्त जबाबदारी आहे ह्याची मला पूर्ण जाणीव आहे. ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला, त्यांना घडवले ती माऊली स्वतः निश्चितच त्याच ताकदीची, पराक्रमी, अत्यंत कुशल राजनैतिक आणि मुख्य म्हणजे दूर दृष्टीची असणार यात कसलेच दुमत नाही .अशा ह्या विलक्षण वीरमातेला पडद्यावर साकारणे हे माझे अहोभाग्यच !’’

शालेय स्तरावर ऑलिंपिया गेम्सचे आयोजन क्रिडा क्षेत्रासाठी उपयुक्त – ऑलिंपिक वीर पै. मारुती आडकर

पिंपरी, पुणे : महाराष्ट्रात प्रथमच माध्यमिक व उच्च माध्यमिक शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात जिल्हास्तरीय ऑलिंपिया गेम्स क्रिडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे हे क्रिडा क्षेत्रासाठी उपयुक्त आहे असे प्रतिपादन ऑलिंपिक वीर पै. मारुती आडकर यांनी केले.
बुधवारी (दि.१०) यांच्या हस्ते डॉ. हेडगेवार क्रिडा संकुल येथे माध्यमिक व उच्च माध्यमिक शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळ पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात प्रथमच जिल्हास्तरीय ऑलिंपिया गेम्स क्रिडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन ऑलिंपिक वीर पै. मारुती आडकर यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. तत्पूर्वी महामंडळाचे अध्यक्ष फिरोज शेख, सचिव डॉ. पुरुषोत्तम उपर्वट, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती धनवटे, महामंडळाचे संचालक निवृत्ती काळभोर यांच्या हस्ते क्रिडा ज्योत संचालन करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी महामंडळाचे सचिव महादेव फपाळ, खजिनदार निळकंठ कांबळे तसेच रज्जाक पानसरे, सरजीत कौर, आशा पालवे, कीर्ती पाल, सीमा भोसले, विद्याराणी वाल्हेकर, नितीन काकडे, राजेश यादव, अनिल जगताप, मुकेश बिरांजे, राकेश प्रसाद, आशिष मालुसरे, राम मुदगल, राधिका काळे, वैशाली इंदलकर, रेणू शर्मा आदी उपस्थित होते.
फुटबॉल (मुले) स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. पहिला सामना एस. बी. पाटील पब्लिक स्कूल (रावेत) विरुद्ध एसएनबीपी (मोरवाडी पिंपरी) संघ यांच्यात झाला. हा सामना एसएनबीपी संघाने दोन गोल करून एस. बी. पाटील पब्लिक स्कूल विरुद्ध विजय मिळवला. यामधे आतिफ कर्नलकर आणि दिप पाटील यांनी प्रत्येकी एक गोल केला. दुसऱ्या सामन्यात एस. पी. एम. विजयी विरुद्ध अभिषेक विद्यालय (२ गोल प्रणव गायकवाड याने केले). प्रियदर्शनी स्कूल विजयी विरुद्ध क्रिएटिव्ह पब्लिक स्कूल (श्रेयस पाटील याने एक गोल केला). गुरुवारी झालेल्या सामन्यात एसएनबीपी (बी) मोरवाडी, पिंपरी विजयी विरुद्ध होली मिशन स्कूल ( ईशान जोधा आणि आर्यन कुमार यांनी प्रत्येकी एक गोल केला). एसएनबीपी (ए) विजयी विरुद्ध एसपीएम स्कूल (आतिफ कर्नलकर, दीप पाटील आणि विनय कांबळे यांनी प्रत्येकी एक गोल केला). प्रतिभा स्कूल विजयी विरुद्ध गणेश स्कूल ने हा सामना दोन विरुद्ध एक गोलने जिंकला.
या क्रिडा महोत्सवात बास्केटबॉल (१०,१२,१४ वर्षे मुले, मुली); क्रिकेट (१२ वर्षे मुले, १४ वर्षे मुले, मुली)

हँडबॉल (१२ वर्षे मुले, १४ वर्षे मुले, मुली); हॉकी (१२, १४ वर्षे मुले, मुली); खो-खो (१२,१४ वर्षे मुले, मुली) व लंगडी (१०, १२, १४ वर्षे मुले, मुली) या स्पर्धा आणि वैयक्तिक गटात मैदानी स्पर्धा कराटे (८ ते १४ वर्षे मुले, मुली); रोप स्किपिंग (१०, १२, १४ मुले, मुली) व स्केटिंग (५ ते १४ वर्षे मुले, मुली) या स्पर्धा होणार आहेत. विजेत्या खेळाडू व संघाना रोख बक्षीस, स्मृतीचिन्ह, मेडल व प्रमाणपत्र देऊन बक्षीस वितरण समारंभात सन्मानित करण्यात येणार आहे. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून महामंडळाचे मान्यताप्राप्त काम पाहणार आहेत. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन, ऑफलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करण्यासाठी www.mahamandal@games.com ऑफलाईन नोंदणी करण्यासाठी निवृत्ती काळभोर (९८८१३६५११३) किंव्हा महादेव फपाळ (९८२२६१६७४९) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन महादेव फपाळ यांनी केले आहे.

१० बिल्डरांवर गुन्हे दाखल करूनही अनधिकृत बांधकामांची जाहिराती करत विक्री सुरूच

आंबेगावमध्ये कारवाई मात्र कात्रज,जांभूळवाडी, मांगडेवाडी,धनकवडीतील राजकीय संबधीतांच्या बेकायदा बांधकामांकडे दुर्लक्ष

पुणे- अनधिकृत बांधकामांनी बकाल बनविलेल्या दक्षिण पुण्यात १० बिल्डरांवर गुन्हे दाखल करूनही आजही जाहिराती करत अनधिकृत बांधकामांच्या विक्रीचा सपाटा सुरूच असल्याचे दिसून आले आहे. महापालिकेने आंबेगाव येथे काही दिवसांपूर्वी कारवाई केली त्यानंतर पुन्हा अशा असंख्य कारवाया केल्या तरी येथील अनधिकृत बांधकामे संपणार नाहीत अशी अवस्था आहे. आंबेगाव मध्ये कारवाई एकाच कारवाई नेच महापालिका काय करू शकते याचे संकेत दिले असले तरी आता मोहीम थांबली तर त्याचे अर्थपूर्ण अर्थ निष्कर्ष निघतील या शिवाय कात्रज,जांभूळवाडी, मांगडेवाडी,धनकवडी कडे येथील कनिष्ठ अभियंते दुर्लक्ष का करत आहेत? असाही सवाल केला जातो आहे.

दरम्यान बांधकाम व्यावसायिक मे. श्रावणी डेव्हलपर्सचे अतुल सुभाष मांगडे,साईनाथ डेव्हलपर्सचे प्रवीण सुरेश कोंढरे,मे. मोरया डेव्हलपर्सचे संतोष महादेव वांजळे आणि महेश नारायण कोंढरे तसेच अनिल भानुदास भवर, मे. साई गणेश डेव्हलपर्सचे अविनाश काळुराम वांजळे, श्री गणेश डेव्हलपर्सचे धनाजी पोपट घाडगे, मे. श्री डेव्हलपर्सचे सुशांत सुभाष वाडेकर, मे. समर्थ डेव्हलपर्सचे जयप्रकाश ब्रिजराज चौव्हान, दत्तात्रेय सहदू करपे, या १० जणांवर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. महेश कोंढरे यांच्या या ठिकाणी दोन इमारती होत्या. कनिष्ठ अभियंता उमेश गोडगे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.आंबेगाव बुद्रूक येथे महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता बहुमजली निवासी इमारती बांधून त्यांची विक्री केली. या ठिकाणी महापालिकेने कारवाई करून ११ इमारती जमीनदोस्त केल्यानंतर याप्रकरणी १० बिल्डरांवर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन नगररचना अधिनियमातील कलम १९६६ मधील ४३ आणि ५२ या कलमान्वये हे गुन्हे दाखल झाले आहेत, अशी माहिती शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी दिली.आंबेगाव बुद्रूक येथे सिंहगड महाविद्यालयाच्या लगत ११ अनधिकृत निवासी मिळकती बांधल्या होत्या. त्यामधील फ्लॅटची संख्या सुमारे ५०० इतकी आहे. या इमारतींचे काम सुरू असताना २०२१ मध्ये बांधकाम विभागाने नोटीस बजावून कारवाई केली होती. त्यानंतर पुन्हा या ठिकाणी प्रत्येकी सहा मजली इमारती उभ्या राहिल्या. या काळात अनेक नागरिकांनी तेथे १८ लाखांपासून ते २० लाखांपर्यंत सदनिका विकत घेतल्या होत्या. महापालिकेच्या बांधकाम विभागाने डिसेंबरच्या अखेर या ठिकाणी कारवाई करून ४५ हजार ५० चौरस फुटाचे बांधकाम पाडून टाकले. या कारवाईमुळे सामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. महापालिकेने वेळीच कारवाई केली असती तर आमची फसवणूक झाली नसती, अशा शब्दात सदनिकाधारकांनी नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, या कारवाईनंतर महापालिका प्रशासनाने संबंधित बिल्डरांवर गुन्हा दाखल करण्यासाठी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार गुन्हे दाखल झाले आहे.

उजनी धरणातून कालव्याद्वारे एक आवर्तन सिंचनासाठी देण्यात यावे – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे-सोलापूरला ११ जानेवारी ते ११ फेब्रुवारी या कालावधीत उजनीतून कालव्याद्वारे शेतीसाठी एक सिंचन आवर्तन देण्यात यावे, तसेच पिण्यासाठी पाणी पुरविण्यास प्राधान्य देऊन उपलब्ध पाण्याचे अत्यंत सुक्ष्म नियेाजन करण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज दिले.

उजनी प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत, मोहोळचे आमदार यशवंत माने, करमाळाचे आमदार संजय शिंदे, पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता एच.टी.धुमाळ, अधिक्षक अभियंता धीरज साळे यावेळी उपस्थित होते.

गतवर्षी पाऊस कमी झाला असून, उपलब्ध पाणी येणाऱ्या पावसाळयापर्यत पुरविण्यासाठी सिंचन विभागाने नियोजन करावे असे सांगून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पिण्याचे पाणी पुरविण्यास प्राधान्य देण्यात यावे अशी सूचना केली. यापूर्वी कालवा सल्लागार समितीने मंजूरी दिल्याप्रमाणे पाण्याच्या आवर्तनाचे नियेाजन संबधितांनी केले नसल्यास त्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीकडून चौकशी करण्यात येईल असे सांगून, आवश्यकतेनुसार  आढावा घेऊन कालवा सल्लागार समितीची पुन्हा बैठक घेण्यात येईल असे सांगितले.

उजनी प्रकल्पात सध्या ५.३४ टीएमसी (९.५८ टक्के) उपयुक्त पाणीसाठी आहे. उजनी भिमा प्रकल्पाद्वारे सन २०२२-२३ मध्ये प्रत्यक्ष भिजलेले क्षेत्र २ लाख ५४ हजार २५३ हेक्टर (८४.५० टकके) होते अशी माहिती यावेळी देण्यात आली.

अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी उपलब्ध पाणीसाठा,कालव्यावरील आठमाही प्रकल्पीय पीक रचना, निर्मित सिंचन क्षमता व प्रत्यक्ष सिंचित क्षेत्र, मागील पाच वर्षातील पाणीपट्टी वसूली, खरीप व रब्बी हंगाम २०२३-२४ मधील प्रत्यक्ष पाणी वापर, उर्वरित कालावधीसाठी पाण्याचे नियोजनाविषयीची सविस्तर माहिती बैठकीत सादर केली.

यावेळी जिल्ह्यातील लोकप्रतिनीधींनी समान पध्दतीने उपलब्ध पाणी वाटप करण्याची सूचना लोकप्रतिनिधींनी यावेळी केली. माढयाचे आमदार बबनदादा शिंदे, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाषबापू देशमुख, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री.कपोले  हे दृकश्राव्य माध्यमातून बैठकीत सहभागी झाले होते.

एआय मध्ये पारदर्शकता हवी; फोटो,व्हिडीओ ला बळी पडू नका

डॉ. शेहला रशीद यांचे प्रतिपादन
भारतीय छात्र संसदेचे तिसरे सत्र संपन्न
पुणे, दि. ११ जानेवारी : एआय (अख) मध्ये नैतिक पारदर्शकता आणली पाहिजे. बनावट व्हिडिओ आणि फोटोंना बळी पडू नये. असे प्रतिपादन नीती सल्लागार आणि संशोधक  डॉ. शेहला रशीद यांनी केले.
एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटने आयोजित केलेल्या १३व्या भारतीय विद्यार्थी संसदेच्या तिसर्‍या सत्रात लोकशाही २.० एआय आणि सोशल मीडिया गेम कसे बदलत आहेत? या विषयावर व्याख्यान झाले.अध्यक्षस्थानी कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष यूटी खादर फरीद हे होते.
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून एड. सोमनाथ (विधानसभा सदस्य, दिल्ली), अपूर्व सिंग (सोशल मीडिया प्रभारी राष्ट्रीय बीजेवायएम ११ राज्य) उपस्थित होते.
डॉ. शैला रशीद म्हणाल्या की, डिजिटल इंडिया पूर्णपणे धर्मनिरपेक्ष असावा. त्याचा उपयोग चांगल्या विचारांसाठी व्हायला हवा. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक सक्रिय आहेत.
खादार फरीद म्हणाले की, प्रत्येक क्षेत्रात सुधारणा करणे हे केवळ नेत्याच्याच हातात असते.राजकारण हे गणित नसून रसायन आहे.राजकारण समाधान देत नाही तर प्रतिक्रिया देते.
अपूर्व सिंह म्हणाले की, सोशल मीडिया सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही परिणाम देतो. पूर्वी लोकांना काहीतरी जाणून घेण्यासाठी किंवा त्यांचा संदेश पोहोचण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत होती. पण आजच्या काळात घरात बसून सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती मिळवता येते.
तुम्ही तुमची समस्या सरकारपर्यंत पोहोचवू शकता.सोशल मीडियाची ताकद अशी आहे की जर आपण घरी बसून काहीतरी ट्रेंड केले तर लाखो लोकांपर्यंत पोहचते. मात्र त्याचाही काही वेळेस नकारात्मक प्रभाव पडतो. व्हिडिओ एआय द्वारे मॉर्फ केला जातो, त्यामुळे तो योग्य की अयोग्य हे आम्हाला समजू शकत नाही. मात्र वस्तुस्थिती तपासल्यानंतर  माहिती समोर येते.

एड. सोमनाथ भारती म्हणाले की, ज्यांच्या हातात सोशल मीडियाचे साधन आहे, त्यांनी ज्याला पुढे न्यायचे आहे ते पुढे जाईल.सोशल मीडिया आणि एआय हे केवळ सक्षम करणारे आहेत, पुढे काय चालणार हे ज्याच्या हातात हे साधन आहे त्याच्या नियंत्रणात आहे. अशा अनेक गोष्टी सोशल मीडियावरून पसरतात ज्यामुळे द्वेष पसरतो, त्यामुळे काहीही व्हायरल करण्यापूर्वी त्याबद्दल जाणून घेणे आवश्यक आहे.पण सोशल मीडिया आणि एआयचेही फायदे आहेत.
मॉडेल यंग एमएलए पुरस्कार हरियाणाच्या आमदार भव्य बिश्नोई यांना प्रदान करण्यात आला.विद्यार्थी वक्ते हिमांशू जिंदाल (दिल्ली), सेजल सिंग (महाराष्ट्र), अक्षरा एच (आंध्र प्रदेश), ऋषी वैभव मिश्रा (उत्तर प्रदेश) सोशल मीडिया आणि एआय गेम कसा बदलत आहे…? पण आपले मत व्यक्त केले.
डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले

अमिन सयानी, गौतम घोष, लीला गांधी एम. एम. कीरवानी यांना ‘पीफ’चे पुरस्कार जाहीर

अ ब्रायटर टुमारो’ चित्रपटाने महोत्सवाची सुरुवात होणार

पुणे, दि. ११ जानेवारी २०२४ : ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट (पीफ) महोत्सव २०२४’चा उद्घाटन सोहळा गणेश कला क्रीडा मंच येथे १८ जानेवारीला संध्याकाळी ५ वाजता होणार असून, यावेळी भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल प्रसिद्ध रेडीओ उद्घोषक अमिन सयानी, दिग्दर्शक-अभिनेते गौतम घोष आणि प्रसिद्ध नृत्यांगना-अभिनेत्री लीला गांधी यांना ‘पीफ डिस्टींग्वीश अॅवार्ड’, तर संगीत संयोजक, गायक आणि गीतकार एम. एम. कीरवानी यांना संगीत क्षेत्रातील योगदानासाठी संगीतकार एस. डी. बर्मन पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची घोषणा, आज महोत्सवाचे संचालक डॉ, जब्बार पटेल यांनी केली.

उद्घाटन सोहळ्यानंतर ‘अ ब्रायटर टुमारो’ (इटली, दिग्दर्शक – नानी मोरेत्ती) हा उद्घाटनाचा चित्रपट (ओपनिंग फिल्म) दाखवण्यात येणार आहे, तर ‘कीडनॅप्ड’ (इटली, दिग्दर्शक – मार्को बेलोचिओ) या चित्रपटाने महोत्सवाची (क्लोजिंग फिल्म) सांगता होणार असल्याचे डॉ. पटेल यांनी सांगितले.

हे वर्ष सदाबहार अभिनेते देव आनंद (२६ सप्टेंबर १९२३), गायक मुकेश (२२ जुलै १९२३), दिग्दर्शक मृणाल सेन (१४ मे १९२३), प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक एनटीआर (२८ मे १९२३), संगीत दिग्दर्शक सलिल चौधरी  (१९ नोव्हेंबर १९२३) आणि गीतकार शैलेन्द्र (३० ऑगस्ट १९२३) यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्यात येणार असल्याचे  डॉ. जब्बार पटेल यांनी सांगितले.

यावेळी महोत्सवाच्या आंतरराष्ट्रीय ज्यूरींच्या नावाचीही घोषणा करण्यात आली. यामध्ये पेट्र झेलेन्का – (झेक प्रजासत्ताक – नाटककार आणि दिग्दर्शक), शाई गोल्डमन (इस्रायल – सिनेमॅटोग्राफर आणि चित्रपट निर्माता), सुधीर मिश्रा (भारत – चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक), मंजू बोराह (भारत – चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक), सेतारेह इस्कंदरी (इराण – अभिनेत्री), उमरान सफ्तेर (तुर्कस्तान – चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता), सू प्राडो (फिलिपाईन्स – अभिनेत्री) आणि विसाकेसा चंद्रसेकरम (श्रीलंका – चित्रपट दिग्दर्शक, लेखक, नाटककार) यांचा समावेश आहे. 

या महोत्सवात विकास खार्गे, अविनाश ढाकणे, जानू बरुआ, शाई गोल्डमन, मनोज वाजपेयी यांचे विविध विषयांवर मास्टर क्लास होणार आहेत. ‘नव्या मराठी सिनेमाच्या शोधात’ या विषयावर परिसंवाद होणार असून, त्यामध्ये निखिल महाजन, वरून नार्वेकर, रितेश देशमुख, मंगेश देसाई आणि संजय कृष्णाजी पाटील सहभागी होणार आहेत. तसेच चित्रपट महोत्सवांचे भविष्य आणि महत्त्व या विषयावरील परिसंवादामध्ये सैबल चटर्जी, बीना पॉल, एडवीनास पुकास्ता सहभागी होणार असल्याचे डॉ. पटेल यांनी सांगितले.

१८ ते २५ जानेवारी दरम्यान ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट (पीफ) महोत्सव २०२४’ होणार आहे. सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हेलियन मॉलमधील पीव्हीआर आयकॉन (६ स्क्रीन), कॅम्प परिसरातील आयनॉक्स (३ स्क्रीन) आणि औंध भागातील वेस्टएंड मॉलमधील सिनेपोलीस चित्रपट गृहात (२ स्क्रीन) या तीन ठिकाणी एकूण ११ स्क्रीनवर चित्रपट दाखविले जाणार आहेत.

महोत्सवासाठीची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया www.piffindia.com या महोत्सवाच्या अधिकृत संकेतस्थळावर सुरू झाली असून, चित्रपटगृहांवर स्पॉट रजिस्ट्रेशन प्रक्रियाही सुरू झाली आहे. रसिक प्रेक्षकांसाठी चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी संपूर्ण महोत्सवासाठी नोंदणी शुल्क रुपये ८०० फक्त आहे.

पुरस्काराचे मानकरी

अमीन सयानी

अमीन सयानी हे भारतातील लोकप्रिय माजी रेडिओ उद्घोषक आहेत. रेडिओ सिलोनवर ‘बिनाका गीतमाला सादर करीत अमीन सयानी यांनी संपूर्ण भारतीय उपखंडात प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळवली. पारंपरिक “भाईयो और बहनो”च्या विरूद्ध “बहनों और भाइयों” प्रेक्षकांना संबोधित करण्याची त्यांची शैली अजूनही लोकप्रिय मानली जाते. त्यांनी १९५१ पासून ५४ हजारांहून अधिक रेडिओ कार्यक्रम आणि १९ हजार जिंगल्सची निर्मिती केली आहे.

सीबाका/ बिनाका त्यांनी अगोदर रेडिओ सिलोनवर आणि नंतर विविध भारतीवरून एकूण ४२ वर्षांहून अधिक काळ प्रसारीत केले आणि ऑल इंडिया रेडिओ लोकप्रिय करण्यात मदत केली.

महात्मा गांधींच्या सूचनेनुसार सुरू झालेले ‘राहबर’ या पाक्षिकाचे संपादन, प्रकाशन आणि छापण्यात सयानी यांनी त्यांची आई कुलसुम सयानी यांना मदत केली होती.

गौतम घोष

अनेक राष्ट्रीय पुरस्कार नावावर असणारे गौतम घोष हे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, अभिनेते, संगीत दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर आहेत. त्यांनी प्रामुख्याने बंगाली चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांना १९९७ मध्ये इटलीतील “व्हिटोरियो डी सिका” हा पुरस्कार मिळाला असून, हा पुरस्कार प्राप्त करणारे ते एकमेव भारतीय आहेत. २०१२ मध्ये, पश्चिम बंगाल सरकारने त्यांना ‘बंग बिभूषण’ देऊन सन्मानित केले आहे. चित्रपटातील त्यांच्या योगदानाची दखल घेऊन, त्यांना जुलै २००६ मध्ये ‘स्टार ऑफ द इटालियन सॉलिडॅरिटी नाइटहूड’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

लीला गांधी

१९५१ साली नृत्य दिग्दर्शक म्हणून कारकीर्द सुरू केलेल्या लीला गांधी यांनी पुढे मास्टर भगवान यांच्या ‘रंगीला’ (१९५३), ‘हल्लागुल्ला’ (१९५४) व ‘भला आदमी’ (१९५८) या चित्रपटांत नृत्य करत पदार्पण केले. ‘बस कंडक्टर’ या चित्रपटात तर त्यांनी हेलनबरोबर नृत्य केले होते. राजा ठाकूर यांच्या ‘रेशमाच्या गाठी’ या कार्यक्रमात ‘इष्काच्या रंगात वीज भरे अंगात’ या गाण्यावर त्यांनी नृत्य केले होते. त्यानंतर ‘प्रीतिसंगम’ (१९५७)मधील त्यांचे नृत्य गाजले.

‘सांगत्ये ऐका’पासून (१९५९) त्यांनी अनेक चित्रपटांचे नृत्यदिग्दर्शन केले, तर ‘केला इशारा जाता जाता’ (१९६५) या चित्रपटाच्या त्या सहनायिका होत्या. चित्रपटांबरोबरच त्यांचा नाट्यप्रवासही चालू होता. ७५ चित्रपटात व २५ नाटकांत त्यांनी काम केले आहे.

एम. एम कीरवानी

पद्मश्री कोडुरी मारकथमणी कीरवानी हे एम. एम. कीरवानी म्हणून प्रसिद्ध आहेत. संगीत संयोजक, रेकॉर्ड निर्माते, गायक आणि गीतकार अशा अनेक भूमिकांमध्ये त्यांचे काम आहे. त्यांनी प्रामुख्याने तेलुगू चित्रपटात काम केले आहे.

कीरवानी यांनी हिंदी, तमिळ, कन्नड आणि मल्याळम चित्रपटांसाठीही काम केले. क्षाना क्षनम, घराना मोगुडू, अल्लारी प्रियुडू, क्रिमिनल, सुभा संकल्पम, पेल्ली संदादी, देवरागम यांसारख्या रचनांसाठी ते प्रसिद्ध आहेत. तसेच अन्नमय्या (१९९७), जख्म (१९९८), स्टुडंट नंबर १ (२००१), जिस्म (२००३), पहेली (२००५), मगधीरा (२००९), बाहुबली (२०१५), आणि आरआरआर (२०२२), हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. त्यांच्या बहुतेक रचना एस. पी. बालसुब्रह्मण्यम आणि के. एस. चित्रा यांनी जिवंत केल्या आहेत.

त्यांना ११ नंदी पुरस्कार, ८ फिल्मफेअर पुरस्कार, २ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, एक अकादमी (ऑस्कर) पुरस्कार, एक गोल्डन ग्लोब पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. २०२३ मध्ये, भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित केले आहे.

हिट अँड रन बाबत चालक-मालकांच्या प्रतिनिधी सोबत चर्चा करावी :- बाबा कांबळे,

लोणावळा येथे रिक्षा चालक मालकांचा मेळावा संपन्न

पुणे-रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करून त्यांना म्हातारपणी पेन्शन मिळाली पाहिजे , मुक्त रिक्षा परवाना बंद झाला पाहिजे, इ चलन बंद झालं पाहिजे, याबरोबर देशभरामध्ये सध्या सुरू असलेल्या हिट अँड रन प्रकरणी सरकारने रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या चालक-मालकांच्या प्रतिनिधी सोबत चर्चा करावी, चालक-मालकांच्या प्रतिनिधी सोबत चर्चा केल्याशिवाय, व आमचे प्रश्न सोडवल्याशिवाय माघार घेणार नाही, महाराष्ट्र सह देशभरामध्ये स्टेरिंग छोडो आंदोलन सुरू झाले असून देशातील चालक-मालक हे रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत, आंदोलन करणाऱ्या संघटना प्रतिनिधी सोबत चर्चा करण्याऐवजी सरकार मात्र उद्योगपती आणि भांडवलदार ट्रान्सपोर्टस सोबत चर्चा करत आहेत, यामुळे देशभरातील 25 करोड चालक मालकांमध्ये तीव्र नाराजी पसरली यामुळे पुन्हा 9 जानेवारीपासून स्टेरिंग छोडो आंदोलन सुरू करण्यात आले असून सरकारने चालक-मालकांच्या प्रतिनिधी सोबत चर्चा करावी असे आवाहन बाबा कांबळे यांनी सरकारला केले आहे,

लोणावळा येथे महाराष्ट्र रिक्षा पंचायत व लोणावळा शहरातील विविध संघटनेच्या वतीने रिक्षा चालक मालकांचा मेळावा मोठ्या उत्साहांमध्ये संपन्न झाला यावेळी बाबा कांबळे बोलत होते,

यावेळी प्रादेशिक परिवहन विभागाचे प्रदीप शिंगारे, महाराष्ट्र रिक्षा पंचायत महाराष्ट्र उपाध्यक्ष बाबुभाई शेख अध्यक्ष, आनंद सदावर्ते, गुजरात येथील सतीश जागडा आदी उपस्थित होते,

यावेळी बाबा कांबळे म्हणाले महाराष्ट्रातील पंचवीस करोड चालक मालकांनी देशभरामध्ये एक तारखेपासून आंदोलन सुरू केले परंतु सरकारने मात्र ट्रान्सपोर्ट धारकांचे मोठे उद्योगपती ऑल इंडिया मोटर काँग्रेस यांच्याशी चर्चा करून आंदोलन माघार घेतले असे जाहीर केलं ऑल इंडिया मोटर काँग्रेसने देशातील 25 करोड ड्रायव्हर यांची दिशाभूल करून ज्यांनी आंदोलन सुरूच केले नाही त्यांना आंदोलन माघार घेण्याचा अधिकार नाही हे आंदोलन देशातील 25 कोटी चालक-मालकांनी सुरू केले आहे परंतु त्यांच्याशी चर्चा न करता ऑल इंडिया मोटर्स काँग्रेसच्या वतीने परस्पर हे आंदोलन मागे घेतले असे जाहीर करण्यात आले यामुळे देशभरातील 25 करोड चालकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे,या मुळे त्यांनी पुन्हा 09 जानेवारी 2024 मध्ये रात्रीपासून महाराष्ट्रात देशभरामध्ये स्टेरिंग छोडो करून चक्काजाम करण्याचा निर्णय देशातील चालक मालकांने घेतला, आहे, असे बाबा कांबळे यावेळी म्हणाले

कार्यक्रमाच्या संयोजनासाठी आनंद सदवरते , विनय बच्चे, भगवान घनवट, विकास खेंगरे, भाऊ शिवेकर वासिम खान चल्लरभाई शेख यांनी परिश्रम घेतले.

राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात यशस्वी करु – नाना पटोले

टिळक भवनमध्ये काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक संपन्न.

आमदार अपात्रतेच्या लोकशाहीविरोधी निर्णयाचा काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत निषेध.

मुंबई, दि. ११ जानेवारी
भारतीय जनता पक्षाच्या सरकारविरोधात देशभरात मोठा आक्रोश आहे. देशाची एकता व अखंडता मोडीत काढण्याचे काम भाजपा सरकारने मागील दहा वर्षात केले आहे. जातीय तणाव निर्माण करून भाजपा सामाजिक सौहार्द बिघडवत आहे. विरोधीपक्षांना घाबरवण्यासाठी ईडी, सीबीआयचा गैरवापर केला जात आहे पण भाजपाच्या या दडपशाहीसोर काँग्रेस डगमगली नाही. महाराष्ट्र हे काँग्रेस विचाराचे राज्य आहे. एकजुटीने काम केले तर महाराष्ट्रात व देशात पुन्हा काँग्रेसची सत्ता येईल, असा विश्वास प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला आहे.
काँग्रेस कार्यकारिणीच्या विस्तारित बैठकीत रमेश चेन्नीथल्ला यांनी मार्गदर्शन केले व त्यानंतर पत्रकार परिषदेला संबोधित केले. रमेश चेन्नीथला पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुका दोन महिन्यात होत आहेत, यासाठी काँग्रेस पक्ष सर्व ताकदीने मैदानात उतरत आहे. राज्यातील सहा विभागात आढावा बैठका घेतल्या जाणार आहेत, त्यानंतर जिल्हा स्तरावर, ब्लॉक स्तरावरही बैठका घेऊन पक्ष संघटनेच्या तयाराची आढावा घेतला जाणार आहे. देशपातळीवर भाजपाविरोधी पक्षांची इंडिया आघाडी काम करत असून सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचे काम सुरु आहे, महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या माध्यमातून जागा वाटपावरही चर्चा झाली असून ही चर्चा सकारात्मक झालेली आहे, लवकरच जागा वाटपाचा निर्णय होईल. २०१९ च्यानिवडणुकीत भाजपाला ३० टक्के मिळाली होती म्हणजे ७० टक्के मते विरोधात होती या सर्व पक्ष एकत्र आले तर भाजपाचा पराभव करणे शक्य आहे. भाजपा व आरएसएसच्या विचारधारेविरोधात ही लढाई असून भाजपा देशाचा इतिहास, परंपरा, लोकशाही, संविधान व सर्व व्यवस्था मोडीत काढत आहे. भाजपा सरकारला सत्तेतून खाली खेचने हेच काँग्रेसचे लक्ष्य आहे. महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार विजयी करण्यासाठी काम केले पाहिजे.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या फोडा व राज्य करा नितीच्या विरोधात देशात संताप आहे. भाजपा सरकारने सर्व व्यवस्था मोडीत काढल्याने राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली होती त्या यात्रेला अभूतपूर्व यश आले तसेच यश आता भारत जोडो न्याय यात्रेलाही येईल. महाराष्ट्राने भारत जोडो यात्रा यशस्वी केली होती. जनतेने या यात्रेला मोठा प्रतिसाद दिला होता तसाच प्रतिसाद भारत जोडो न्याय यात्रेलाही मिळेल. महाराष्ट्रात ही यात्रा पाच दिवस सहा जिल्हे ४७९ किमी असून यात्रेचा शेवट मुंबईत होणार आहे. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. देशातील ७० कोटी जनतेचे उत्पन्न किमान वेतनापेक्षा कमी आहे. एवढी मोठ्या लोकसंख्येचे जीवनमान खालावले आहे. शेतकरी बेहाल आहे, बरोजगारी प्रचंड वाढली आहे, स्पर्धा परिक्षांचे पेपर फुटत आहेत, महागाई वाढली आहे आणि केवळ मुठभर मित्रांचा फायदा होत आहे. आर्थिक, सामाजिक, राजकीय न्याय देण्यासाठी भारत जोडो न्याय यात्रा मणिपूर पासून मुंबईपर्यंत ६९०० किमीचा प्रवास करणार आहे व मुंबईत महारॅली होणार आहे.
अशोक चव्हाण म्हणाले की, सध्या वन नेशन वन इलेक्शनची चर्चा जोरात सुरु असून भाजपा लोकसभेबरोबरच विधानसभेच्या निवडणुकाही घेऊ शकते. निवडणुका केव्हाही होऊद्या पण आपण त्यासाठी तयार असेल पाहिजे. तेलंगणात निवडणुकीच्या चार महिने आधी काँग्रेस पक्ष चौथ्या क्रमांकावर असेल अशी चर्चा केली जात होती पण चित्र बदलले सर्वांनी झोकून देऊन काम केले व तेलंगणात काँग्रेसची सत्ता आली. कर्नाटकातही काँग्रेसने भाजपाचा पराभव करत मोठा विजय मिळवला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला आमदार अपात्रतेचा निकाल हा लोकशाहीला घातक आहे. अशा पद्धतीने देशातील सर्वच राज्यात राजकीय अस्थिरता माजेल, हा निर्णय राजकीय होता. या निर्णयाचा काँग्रेस पक्ष निषेध करत आहे.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, २०२४ वर्षात आव्हाने आहेत, लोकसभा निवडणुका आहेत त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका आहेत. या दोन्ही निवडणुकीमध्ये चांगले यश मिळाले पाहिजे. भाजपा विरोधात एकजूट करून निवडणुका लढवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत सर्वांनी एकत्र काम केले तर विजयाची पताका नक्की फडकेल. भारत जोडो यात्रेने एक चैतन्य निर्माण केले होते त्याप्रमाणेच भारत जोडो न्याय यात्राही यशस्वी करून दाखवू.
पत्रकार परिषदेत राम मंदिरासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रेमश चेन्नीथला म्हणाले की, मंदिराचे बांधकाम अर्धवट झाले आहे अशा अर्धवट बांधकामाच्या मंदिरात प्राण प्रतिष्ठा करणे चुकीचे आहे. हिंदू धर्माचे सर्वोच्च असलेल्या चारही शंकराचार्यांनी हेच म्हटले आहे, ते सुद्धा या कार्यक्रमाला जाणार नाहीत. काँग्रेसला निमंत्रण होते पण हा कार्यक्रम राजकीय फायद्यासाठी आहे व अर्धवट मंदिरात प्राणप्रतिष्ठा करणे अयोग्य आहे. असे उत्तर चेन्नीथला यांनी दिले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली व प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत टिळक भवन येथे प्रदेश काँग्रेसच्या विस्तारीत कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली. या बैठकीला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री व काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परीक्षेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, गोवा दिव दमनचे प्रभारी माणिकराव ठाकरे, खासदार कुमार केतकर, माजी मंत्री नितीन राऊत, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, चंद्रकांत हांडोरे, बस्वराज पाटील, प्रणिती शिंदे, कुणाल पाटील, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, डॉ. विश्वजित कदम, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आमदार वर्षा गायकवाड, AICC चे सचिव सोनल पटेल, आशिष दुआ, संपतकुमार, माजी खासदार हुसेन दलवाई, संजय निरुपम, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, एससी विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबीरे, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आ, वजाहत मिर्झा, NSUI चे प्रदेशाध्यक्ष आमीर शेख, उपाध्यक्ष नाना गावंडे, सरचिटणीस प्रमोद मोरे, प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांच्यासह सर्व प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आमदार अभिजित वंजारी यांनी केले तर आभार प्रदर्शन महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांनी केले. तर पत्रकार परिषदेत भारत जोडो न्याय यात्रेच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

‘एक्सेल इंडिया प्रोटेक्टिव्ह पेंट्स प्रायव्हेट लिमिटेड’च्या सदानंद कुंदर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान!

मुंबई, – ‘एक्सेल इंडिया प्रोटेक्टिव्ह पेंट्स प्रा. ली. चे प्रवर्तक सदानंद कुंदर यांना ‘आयसीटी’ मुंबई (पूर्वीचे UDCT) आणि ‘द कलर सोसायटी’ यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या परिषदेत कलर इंडस्ट्रीतील प्रतिष्ठेच्या ‘जीवनगौरव पुरस्काराने नुकतेच मुंबई येथे सन्मानित करण्यात आले. श्री. कुंदर यांना ‘पेंट’ उद्योग क्षेत्रातील भरीव कार्यासाठी हा पुरस्कार माननीय श्री. जे.बी. जोशी, पद्मभूषण व आयसीटीचे माजी संचालक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
सौजन्य कलर च्या संचालिका सुश्री प्रिया भूमकर, उडुपी कोचीन शिपयार्ड लिमिटेडचे सीईओ श्री. हरी कुमार आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
‘पेंट’ (रंग) निर्मिती उद्योग क्षेत्रातील महनीय व्यक्तिंना त्यांच्या अद्वितीय कार्याची दखल म्हणून हा जीवन गौरव पुरस्कार प्रदान केला जातो. यापूर्वी एशियन पेंट्स चे श्री. अश्वीन दाणी, कॅमलीन चे श्री. सुभाष दांडेकर आदि मान्यवरांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
सदानंद कुंदर यांच्या पेंट क्षेत्रातील नाविन्यपूर्ण योगदानांबद्दल त्यांना हा विशेष प्रेरणादायी ‘जीवनगौरव पुरस्कार’ बहाल करण्यात आला आहे. सदानंद कुंदर हे पेंट उत्पादन क्षेत्रात गेली ४० वर्षे धडाडीने कार्यरत असून त्यांचे पेंट निर्मिती, जहाजबांधणीसाठी पेंट कॉन्ट्रॅक्टिंग आणि ONGC या क्षेत्रांमध्ये मध्ये मोलाचे योगदान आहे.
1981 मध्ये, वयाच्या 18½ व्या वर्षी, घरच्या आर्थिक अडचणींमुळे श्री. कुंदर उडुपीहून मुंबईत आले आणि त्यांनी अवघ्या 9/- रुपये रोजंदारीवर कनिष्ठ पेंट पर्यवेक्षक म्हणून कारकीर्द सुरू केली. 1984 मध्ये स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरु करून घोडबंदर, ठाणे येथील शिपयार्ड कंपनीचे पहिले कंत्राट मिळविण्यात ते यशस्वी झाले. तेव्हापासून गेली चार दशके पेंट उद्योग क्षेत्रात त्यांनी आपले वर्चस्व निर्माण केले असून त्यांची घोडदौड अविरत सुरु आहे. माझगाव डॉक लिमिटेड, एल अँड टी, चौगुले ग्रुप, भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दल यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांकडून त्यांना अग्रक्रमाने प्राधान्य दिले जाते.
पुरस्कार मिळाल्यावर कृतज्ञता व्यक्त करताना, सदानंद कुंदर म्हणाले “पेंट उत्पादन क्षेत्रात मी केलेल्या कार्याची दखल घेऊन मला जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल मी ऋणी आहे. नव्या भारताच्या विकासात भरीव योगदान देण्याऱ्या तरुण उद्योजकांसाठी माझा अनुभव नक्कीच प्रेरणादायी ठरेल, त्यातून भावी प्रतिभावंत उद्योजक या क्षेत्राला लाभतील अशी मला अशा आहे.”
एक्सेल इंडिया प्रोटेक्टिव्ह पेंट्स प्रायव्हेट लिमिटेड बद्दल:
एक्सेल पेंट्स, हाय परफॉर्मन्स कोटिंग्ज उत्पादनातील एक अग्रगण्य कंपनी आहे , भारतीय नौदल, भारतीय तटरक्षक दल, माझगाव डॉक, L&T, चौगुले ग्रुप, भारत फोर्ज, ONGC व संरक्षण क्षेत्रातील अनेक OEM आस्थापनांसाठी विश्वासू भागीदार म्हणून काम करते.

सीएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगसाठी व्हायाकॉम18 असणार स्ट्रीमिंग आणि ब्रॉडकास्ट पार्टनर

पहिल्या सीझनसाठी जारी केले मास्टर कॅलेंडर

पुणे११ जानेवारी २०२४ : सीएट आयएसआरएलने आज Viacom18 ची स्ट्रीमिंग आणि ब्रॉडकास्ट पार्टनर म्हणून घोषणा केली असून, त्यामुळे सुपरक्रॉस रेसिंगचा थरार देशभरातील चाहत्यांपर्यंत पोहोचणार आहे. लीगने आपल्या पहिल्या हंगामासाठी एक मास्टर कॅलेंडरचेही अनावरण केले आहे. त्यानुसार देशभरातील प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी पुणे, अहमदाबाद आणि दिल्ली येथे तीन थरारक शर्यती होणार आहेत. सुपरक्रॉस रेसिंगचा रोमांच उभा करणारा थरारा देशभरातील लाखो चाहत्यांपर्यंत पोहोचवणे, अभूतपूर्व पाहण्याचा अनुभव सुनिश्चित करणे हे या भागीदारीचे उद्दिष्ट आहे.

सीझन वन साठी मास्टर कॅलेंडर खालीलप्रमाणे आहे:

शर्यतीचे ठिकाणतारीख
पुणे (श्री शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सबालेवाडी)२८ जानेवारी २०२४
अहमदाबाद (ईकेए अरेनाट्रान्सस्टेडिया)११ फेब्रुवारी २०२४
दिल्ली२५ फेब्रुवारी २०२४

सीएटी इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगचे सहसंस्थापक आणि संचालक श्री वीर पटेल म्हणाले कीViacom18 सोबतची आमची भागीदारी भारतातील सुपरक्रॉस रेसिंगची पोहोच वाढवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. JioCinema आणि Sports18 द्वारे, खेळाला नवीन उंचीवर नेऊन, विविध आणि उत्साही प्रेक्षकांपर्यंत आमच्या शर्यतींचा थरार आणि उत्साह नेण्याचे आमचे ध्येय आहे. लाइव्ह स्पोर्ट्स स्ट्रीमिंग आणि ब्रॉडकास्टिंगमध्ये Viacom18 च्या व्यापक पोहोच आणि कौशल्यामुळे, आम्हाला खात्री आहे की ही भागीदारी देशभरातील चाहत्यांसाठी सीएट आयएसआरआएल अनुभव वाढवेल.”

Viacom18 चे प्रवक्ते म्हणाले की“आम्हाला सीएट इंडियन सुपरक्रॉस लीगच्या उद्घाटनाच्या सीझनमध्ये भागीदारी केल्याचा अभिमान वाटतो. आमच्या क्रीडा क्षेत्रातील एकूण भागांमध्ये याची भर पडली असून, ​​आम्ही चाहत्यांना डिजिटल आणि टीव्ही प्लॅटफॉर्मवर सर्वोच्च आंतरराष्ट्रीय प्रतिभेशी स्पर्धा करणार्‍या भारतीय रायडर्सचे सर्वोत्तम वितरण करू.”

सीएट आयएसआरएलची Viacom18 सोबतची भागीदारी शर्यतींचे स्ट्रीमिंग JioCinema वर सुलभ करेल. त्याद्वारे लाखो लोकांपर्यंत हा थरार पोहोचेल. त्यांना जाता जाता, त्यांच्या सोयीनुसार आणि त्यांच्या आवडीच्या उपकरणांवर सर्व थेट थरार पाहता येईल. याव्यतिरिक्त, लीगचे Sports18 नेटवर्कवर थेट लाइव्ह प्रक्षेपणदेखील केले जाईल, त्यातूनही दर्शक संख्या वाढेल.

JioCinema लाइव्ह स्पोर्ट्स स्ट्रीमिंगमध्ये गेल्या वर्षभरात सातत्याने नवीन बेंचमार्क सेट करत आहे. JioCinema वरील IPL 2023 च्या फायनलने लीगसाठी एक नवीन पीक कॉन्करन्सी रेकॉर्ड प्रस्थापित केला. कारण ३२.१ दशलक्ष दर्शकांनी हा खेळ पाहिला.

महायुतीचा रविवारी संयुक्त मेळावा

पुणे-भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आरपीआय (ए) शिव संग्राम आणि मित्र पक्षांचा पुणे जिल्ह्याचा पहिला संयुक्त मेळावा रविवारी तारीख 14 म्हात्रे पुलाजवळील डीपी रस्त्यावरील शुभारंभ मंगल कार्यालयात दुपारी चार वाजता आयोजित करण्यात आला असल्याची माहिती भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.मुरलीधर मोहोळ,दीपक मानकर,धीरज घाटे,संदीप खर्डेकर,सुरेश घुले,प्रदीप गारटकर,प्रमोद तथा नाना भानगिरे,संजय मशीलकर,किरण साळी,भरत लगड,आर पी आय (ए) परशुराम वाडेकर,संजय सोनवणे उपस्थित होते .

महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील सर्व 38 जिल्ह्यांमध्ये संयुक्त मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. त्यानुसार हा मेळावा होणार आहे. प्रत्येक जिल्ह्याचा पालकमंत्री मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार या मेळाव्यात मार्गदर्शन करतील.

लोकसभा निवडणुकीचे कामाचे व्यवस्थापन करणे, मोदी सरकारच्या लोकोपयोगी योजना, देशातील महायुती सरकारच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविणे तसेच पुणे जिल्ह्यातील लाभार्थ्यांची संवाद साधणे आणि विविध प्रकल्प व विकास कामांची माहिती नागरिकांना देणे अशा प्रकारचे नियोजन मेळाव्यात करण्यात आले आहे. घटक पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये समन्वयाने काम व्हावे हाही मेळाव्याचा उद्देश आहे.