Home Blog Page 1266

एका रात्रीतून केले खडकी – औंध रस्त्याचे दुप्पट रुंदीकरण..अतिरिक्त आयुक्त आणि पथ विभागासह अतिक्रमणाची दमदार कामगिरी

पुणे- अगर मुझसे मोहब्बत है…या उक्तीप्रमाणे जर तुमचे कामावर खरोखर प्रेम असेल तर अशक्य काही नाही अगदी हेच पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी एखादी गोष्ट मनावर घेतली तर अशक्य ते शक्य कसे होऊ शकते,याचे उदाहरण काल रात्रीतून दाखवून दिले.अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे आणि पथ विभागाचे अधिकारी अनिरुद्ध पावसकर, साहेबराव दांडगे आणि दिनकर गोजारे यांनी प्रयत्नांची शिकस्त करत अवघ्या रात्रभरात खडकी औंध असा चारपदरी रस्ता तयार केला आहे.त्यासाठी हे अधिकारी रात्रभर जागेवर तळ ठोकून होते.अतिरिक्त आयुक्तांनी या अधिकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन केले आहे.औंध परिसरातील साई चौक,जयकर पथ येथे काल उपायुक्त संतोष वारुळे आणि औंध बाणेर क्षेत्रीय अधिकारी गिरीश दपकेकर यांनी अतिक्रमण कारवाई पूर्ण केली.खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड व पुणे मनपाच्या वतीने ही संयुक्त कारवाई करण्यात आली.यामध्ये जवळपास ४४ अनधिकृत स्टॉल हटवण्यात आले. दरम्यान रस्ता मोकळा झाल्याने काल रात्रीच रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार असून हा रस्ता चौपदरी केला जाणार, असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी दिले होते. त्यानुसार हि कार्यवाही करण्यात आली.सध्या जो उपलब्ध होता 12 मी रुंदीचा रस्ता सुमारे 24मी पर्यंत रुंदीचा डांबरीकरणसह झाला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास निश्चित मदत होणार आहे.

आज पहाटेपर्यंत पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर,अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे आणि दिनकर गोजारे हे अधिकारी खडकी साई चौक ते स्पायसर,औंध रस्ता करायला तळ ठोकून होते.एका रात्रीतून राडारोडा काढणे,फीडर बॅाक्स आणि लाईटपोल काढणे,झाडे ट्रांन्सप्लांट करणे आणि रोड बनवणे ही अशक्य गोष्टी शक्य करून दाखविली.याबद्दल अतिरिक्त आयुक्तांनी पथ विभागाच्या कामाबाबत अभिमान असल्याची भावना व्यक्त करत त्यांचे कौतुक केले.

हा भाग खडकी कॅन्टोन्मेंट व पुणे म.न.पा हद्दीवर येत असून, कॅन्टोन्मेंट हद्दीत येतो.खडकी रेल्वे स्टेशन पिछाडीस हा चौक येतो.औंध,बोपोडी हद्दीतील नागरिक याचा मोठ्या प्रमाणात वापर करतात.या चौकामध्ये सुमारे 44 स्टॉल धारकांनी अनेक वर्षापासून अतिक्रमण केले होते.त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.त्याबाबत पुणे जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रारी आल्या होत्या.त्याबाबत खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड व पुणेमहापालिकेला संयुक्त कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. खडकी कॅन्टोन्मेंट मुख्याधिकारी यांनी पुणे महापालिकेकडे अतिक्रमण कारवाई व रस्ता दुरूस्ती साठी मदत मागितली. महापालिका आयुक्त यांनी आवश्यक सहकार्य करणेचे मान्य केले.त्यानुसार काल संयुक्त कारवाई करणेत आली. त्यामध्ये सर्व 44 स्टॉल काढून टाकण्यात आले.त्यामुळे साई चौक मोकळा झाला.रात्री त्याचे डांबरीकरण करून,ज्यादा उपलब्ध रस्त्याचे तातडीने रूंदीकरण करणेत आले.  

भारतीय संगीत क्षेत्रातील तेजस्वी प्रभा निमाली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांना श्रद्धांजली

मुंबई, दि. १३ : – भारतीय संगीत क्षेत्राला मिळालेलं सृजनशील, अलौकीक प्रतिभा यांचं अनोखं वरदान म्हणता येईल, अशी एक तेजस्वी गान प्रभा आज निमाली आहे, अशा शोकमग्न भावना व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

भारतीय संगीत क्षेत्राचं क्षितीज उजळवून टाकणाऱ्या व्यक्तिमत्वात ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचा समावेश करावा लागेल. शास्त्रीय संगीतातील त्यांचं योगदान उच्चकोटीचे राहीले आहे. संगीतातील विविध प्रवाहांना सामावून घेऊन, हे क्षेत्र त्यांनी समृद्ध केलं. आपल्या अलौकिक प्रतिभेनं त्यांनी गायनातील मानदंड प्रस्थापित केले. त्यांचं गाण स्वर्गीय आणि मंत्रमुग्ध करणारं होतच. पण आपल्या संगीत क्षेत्राचं देखणेपण आणि नजाकत प्रकट करणारं होते. त्यांनी भारतीय संगीताचं हे रुप आपल्या प्रसन्न, हसतमुख व्यक्तिमत्त्वातून देश-विदेशातही पोहचवलं. आपल्या प्रसन्न, वैशिष्ट्यपूर्ण अशा स्वरांनी त्या अजरामरच आहेत. आवाजाच्या रुपात त्या आपल्या अवतीभवतीच राहतील. पण संगीत क्षेत्राला मात्र त्यांची निश्चितच पोकळी जाणवेल. ही भारतीय संगीत क्षेत्राची आणि रसिकांसाठी मोठी हानी आहे. भारतीय संगीतामध्ये होणारे विविध बदल सहजपणे आत्मसात करीत संगीत क्षितिजावर अढळ स्थान निर्माण करणाऱ्या स्वरयोगिनीच्या रुपातील एक तेजस्वी तारा निखळला आहे, अशा भावना व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
दरम्यान डॉ. अत्रे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार व्हावेत असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

रस्त्यांच्या सौंदर्यीकरणाच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने नागरी सहभाग आणि नाविन्यता यांचा योग्य मेळ घालणे आवश्यक

पिंपरी, दि. १२ जानेवारी २०२४ :- शहरातील रस्त्यांच्या सौंदर्यीकरणाच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने नागरी सहभाग आणि नाविन्यता यांचा योग्य मेळ घालणे आवश्यक असून सार्वजनिक परिसर पादचाऱ्यांसाठी, लहान मुलांसाठी आणि रहिवाशांसाठी उत्साहवर्धक बनवण्याचा महापालिकेचा उद्देश आहे. त्यासाठी देशातील अनुभवी तज्ञांच्या सहकार्याने आम्ही हरित सेतू नावाचा अभिनव उपक्रम अंमलात आणणार आहोत. या उपक्रमाच्या यशस्वी पुर्ततेसाठी ‘शहरी रस्ते व सार्वजनिक परिसर विकास राष्ट्रीय कार्यशाळा नक्कीच उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन आयुक्त शेखर सिंह यांनी केले.

भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने स्मार्ट सिटीज मिशन अंतर्गत शहरी रस्ते आणि सार्वजनिक परिसर नागरिकांना केंद्रबिंदू मानून विकसित करण्यासाठी देशातील विविध शहरांमध्ये ‘शहरी रस्ते व सार्वजनिक परिसर विकास’ या राष्ट्रीय कार्यशाळांच्या मालिकेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळांचा उद्देश प्रत्यक्ष सादरीकरणाद्वारे तसेच चर्चेद्वारे रस्ते बांधणीच्या आधुनिक उपाययोजनांवर चर्चा करणे, रस्ते बांधणीच्या टिकाऊपणावर लक्ष केंद्रित करणे आणि रहदारी टाळण्यासाठी विविध उपाययोजना करणे हा आहे. पिंपरी चिंचवड शहरातही या मालिकेतील तिसऱ्या राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन निगडी येथील ग.दि.माडगूळकर प्रेक्षागृह येथे दि. १२ व १३ जानेवारी २०२४ रोजी करण्यात आले आहे. या कार्यशाळेचा पहिला दिवस आज पार पडला, त्यावेळी आयुक्त सिंह बोलत होते.

या कार्यशाळेदरम्यान अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, शहर अभियंता मकरंद निकम, स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, सहशहर अभियंता प्रमोद ओंभासे, मनोज सेठीया, उपआयुक्त मनोज लोणकर, कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड, शिरीष पोरेडी, लक्ष्मीकांत कोल्हे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कंपनी सेक्रेटरी चित्रा पंवार, परवानाकृत व्यावसायिक वाहतूक संचालन अभियंता प्रताप भोसले, सुनील पवार, अभिमान भोसले, पर्यावरण शिक्षण केंद्राचे वरिष्ठ कार्यक्रम समन्वयक अमर करण, स्मार्ट सिटी सल्लागार विकास ठाकर, प्रांजली देशपांडे, प्रसन्न देसाई यांच्यासह १०० शहरांमधील स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त यासह उच्चपदस्थ अधिकारी आदी उपस्थित होते.

आयुक्त सिंह म्हणाले, पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांमध्ये पायी चालणे, सायकल चालविणे आणि धावणे या दैनंदिन आरोग्यदायी सवयींचे महत्व रुजविण्यासाठी तसेच त्यांना प्रोत्साहित करून शहरांमधील उपलब्ध सार्वजनिक पायाभूत सुविधांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध पैलूंवर काम करण्यात येत आहे. त्यामध्ये रस्त्यांचा आणि सार्वजनिक परिसरांचा विकास होणे गरजेचे असून या कार्यशाळेच्या माध्यमातून हे ध्येय साध्य होण्यास नक्कीच मदत मिळेल, असा विश्वासही आयुक्त शेखर सिंह यांनी यावेळी व्यक्त केला तसेच हरित सेतूची शाश्वत अंमलबजावणी करण्यासाठी ग्रीन बॉण्ड आणि सायकल इन्फ्रास्ट्रक्चर आणि कनेक्टिव्हिटी इम्प्रूव्हमेंट (बीआयसीआय) चा वापर केला जाईल, असेही ते यावेळी म्हणाले.

इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सपोर्टेशन अँड डेव्हलपमेंट पॉलिसीच्या शाश्वत मोबिलिटीच्या प्रांजली देशपांडे आणि ट्रॅफिक ऑपरेशन्स व्यावसायिक प्रताप भोंसले यांसारख्या तज्ञांच्या नेतृत्वाखालील सत्रांनी, रस्त्याच्या डिझाइनमध्ये डेटाची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली. स्मार्ट सिटी सल्लागार अमर करण यांनी पिंपरी चिंचवड येथील तिसऱ्या राष्ट्रीय कार्यशाळेत प्रभावी स्ट्रीट डिझाईन प्रकल्प राबविण्याच्या गुंतागुंतीवर अभ्यासपुर्ण सादरीकरण केले. त्यांनी धोरणात्मक आव्हाने नमूद करत, कार्यक्षम आणि उपयुक्त रस्ते तयार करण्याच्या दृष्टीकोणांवर भर दिला. विकास ठकार यांनी रस्त्यावरील डिझाईन प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी आव्हाने कमी करण्यासाठी अंमलात येणाऱ्या धोरणांची माहिती दिली.

या कार्यशाळेत निखील कन्स्ट्रक्शन, शिवम इंडस्ट्रीज आणि स्नेह प्रीकास्ट यांच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात रस्ते सौंदर्यीकरण आणि विकासकामांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सिमेंट, काँक्रीटच्या साहित्याचे प्रदर्शनही भरविण्यात आले आहे.

कार्यशाळेच्या १३ जानेवारी रोजीच्या सत्रात फ्रीडम टू वॉक सायकल रन कार्यक्रमातील विजेत्या शहरांना बक्षिसे दिली जाणार आहेत.

डॉ. प्रभाताई अत्रे यांचे निधन ही देशाच्या संगीत, कलाक्षेत्राची मोठी हानी -उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 13 :- “ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभाताई अत्रे यांच्या निधनाने ज्ञान, विज्ञान, विधी, कला, साहित्य, संगीत अशा अनेक क्षेत्रात सर्वोच्च कर्तृत्व गाजवणारं प्रतिभावंत व्यक्तिमत्वं हरपलं आहे. भारतीय शास्त्रीय संगीतातील वैभवशाली युगाचा अंत झाला आहे. डॉ. प्रभाताई अत्रे यांनी आठ दशकांहून अधिक काळ आपल्या अप्रतिम गायनानं भारतीय संगीतक्षेत्र समृद्ध केलं. कोट्यवधी रसिकांची मन जिंकली. ठुमरी, दादरा, गझल, भजन, भावसंगीत, नाट्यसंगीत, उपशास्त्रीय संगीतासारख्या गायकीतून गानरसिकांच्या मनावर अधिराज्य केलं. पुण्यात जन्मलेल्या डॉ. प्रभाताई महाराष्ट्रासाठी, देशासाठी, जागतिक संगीतक्षेत्रासाठी भूषण होत्या. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्कारांनी गौरवलेल्या डॉ. प्रभाताई अत्रे यांचे निधन ही देशाच्या संगीत, कलाक्षेत्राची फार मोठी हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. अजित पवार यांनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

महिन्याचा टोल पास तब्बल 79 हजार रुपयांचा :अन या वाहनांना नो एन्ट्री …अटल सेतू प्रवास सुरु

मुंबई- MMRDA मार्फत बांधण्यात आलेला अटल सेतू म्हणजेच शिवडी न्हावाशेवा सागरी सेतू अखेर वाहतुकीसाठी सज्ज झाला आहे. आजपासून हा अटल सेतू सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. शनिवारी सकाळपासूनच अटल सेतूवर वाहतूक सुरू झाली आहे. यावेळी सर्वसामान्य नागरिकांनी अटल सेतूवरून प्रवास करण्यास सुरुवात केली.मात्र वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटल सेतूवरुन दुचाकी वाहने, ऑटो रिक्षा, टॅक्टर , मोपेड, तीन चाकी टेम्पो, कमी वेगानं चालणारी वाहनं, बैलगाडी अथवा घोडागाडी, मुंबईकडे जाणारी मल्टी एक्सल जड वाहनं, ट्रक आणि बसला जाण्यास परवानगी नसेल.मात्र हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होताच सर्व प्रथम चर्चा रंगली आहे ती केल्या जाणाऱ्या टोल वसुलीची. वडी-न्हावाशेवा सागरी सेतूवर कमीत कमी 250 रुपयांचा टोल आकारला जाणार आहे. तर या मार्गावर अवजड वाहनासाठी मासिक पास हा तब्बल 79000 रुपये इतका आहे.

अटल सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबई शहरांना जोडणारा नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. हा ‘अटल सेतू’ शनिवार 13 जानेवारीच्या सकाळी आठ वाजल्यापासून सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे, असे एमएमआरडीएच्यावतीने कळविण्यात आले होते. त्याप्रमाणे आज सकाळपासूनच अटल सेतूवर वाहने धावत असल्याचे पाहायला मिळत आहे.

2 तासांचा प्रवास केवळ 20 मिनिटांत
एकूण 22 किमीचा हा मार्ग असून त्यातील 16.80 किमी रस्ता समुद्रातून आहे. हा भारतातील सर्वाधिक लांबीचा समुद्री पुल असून जगात हा 12 व्या स्थानी आहे. तब्बल 18 हजार कोटी रुपये खर्चून बनवण्यात आलेला हा प्रकल्प मुंबईसह, नवी मुंबई, रायगड आणि इतर शहरांमधील अंतर केवळ 20 मिनिटांवर आणणार आहे. यामुळे तब्बल दोन तासांचा वेळ वाचणार आहे, त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासासाठी हा पूल मैलाचा दगड असेल.

अटल सागरी सेतूची वैशिष्ट्ये काय आहेत?

  • देशातील सर्वात मोठा 22 किमी लांब सागरी सेतू
  • मुंबई ते नवी मुंबई 2 तासांचा प्रवास अवघ्या 20 मिनिटांत शक्य
  • 22 किमीच्या सागरी सेतूवरून प्रवासासाठी 250 रुपये टोल
  • मुंबईतून नवी मुंबई, पुणे, कोकणाकडे लवकर जाता येणार
  • अटल सेतूवर अत्याधुनिक वाहतूक नियंत्रण यंत्रणा कार्यान्वित
  • सागरी सेतूवर विविध प्रकारचे सुमारे 400 सीसीटीव्ही कॅमेरे
  • वेगमर्यादेचे उल्लंघन करणारी वाहने कॅमे-यात कैद होणार
  • समुद्रातील लाटा आणि भूंकपाचा विचार करून सेतू तयार
  • शंभर वर्षांपर्यंत सागरी सेतू सुस्थितीत राहणार

हा सागरी सेतू उभारण्यासाठी जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. ओपन रोड टोलिंग यंत्रणा असलेला हा देशातील पहिला मार्ग ठरणार आहे. या पुलावर कार, टॅक्सी, मिनी बस, हलकी वाहनं, मिनी बस, टू एक्सल बस, छोटे ट्रक प्रवास करु शकतात. प्रत्येक वाहनाकडून वेगवेगळा टोल आकारला जाणार आहे. त्यानुसार सिंगल, रिटर्न, डेली आणि मासिक पास उपलब्ध करुन दिला जणार आहे. त्यानुसार कार साठी सिंगल टोल हा 250 रुपये आहे. तर, कारसाठी मासिक पास हा 12 हजार रुपयांचा असणार आहे. तर, अवजड वाहनासाठी सिंगल टोल 1580 रुपये तर, मासिक पास काढायला असल्यास तब्बल 79 हजार रुपये मोजावे लागणार आहे.

ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांचे निधन

ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे पुण्यातील राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. त्या 92 वर्षांच्या होत्या. प्रभा अत्रे यांचे गायकीसोबतच ठुमरी, गझल, उपशास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, भजन व भावसंगीत गायकीवरही प्रभुत्व होते. त्यामुळे त्यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्रातील एक अनुभवी सूर हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

प्रभा अत्रे यांना शनिवारी पहाटे झोपेत असताना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तत्पूर्वीच त्यांचे निधन झाले. प्रभा अत्रे यांचे नातलग अमेरिकेत आहेत. त्यामुळे ते मायदेशी परतल्यानंतर त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

नुकताच मिळाला होता अटल संस्कृती पुरस्कार

डॉ. प्रभा अत्रे यांना नुकताच संस्कृती प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात येणारा अटल संस्कृती पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. बहुधा ही त्यांची सार्वजनिक कर्यक्रमातील शेवटची उपस्थिती ठरली. त्यांचा एक हात मोडला होता. पण त्यानंतरही केवळ अटलजींच्या नावाचा पुरस्कार असल्यामुळे त्या या पुरस्कार सोहळ्याला आल्या होत्या. त्यांनी स्वतःच आपल्या छोटेखानी मनोगतात हे सांगितले होते.

प्रभा अत्रे यांचा जन्म 13 सप्टेंबर 1932 रोजी पुण्यात झाला. वयाच्या 8 व्या वर्षी त्या शास्त्रीय गायनाकडे वळल्या. संगीत शिकत असताना त्यांनी विज्ञान व कायदा विषयाची पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी संगीतात डॉक्टरेटही केली. एक प्रतिभावंत गायिका, संगीत रचनाकार, लेखिका, प्राध्यापिका म्हणून त्यांचा नावलौकिक होता. प्रभा अत्रे यांची संगीत क्षेत्राशी संबंधित तब्बल 11 पुस्तके प्रकाशित आहेत. या पुस्तकांमुळे संगीत रसिकांना संगीतकला समजून घेण्यास मदत झाली. त्यांच्या संगीत क्षेत्रातील या भरीव योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांचा पद्मश्री, पद्मभूषण व पद्मविभूषण आदी नागरी पुरस्कारांनी सन्मान केला होता.

किराणा घराण्याच्या गायनकलेला नवीन दिशा
प्रभा अत्रे यांनी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताला विशेषतः किराणा घराण्याच्या गायनकलेला नवीन दिशा दिली. भारतीय संगीत कलेला पाश्चिमात्य देशात लोकप्रियता मिळवून देणाऱ्या त्या पहिल्या गायिका होत्या. 1969 पासून त्या पूर्णवेळ संगीत मैफिली करू लागल्या. आवाज लावण्याची पद्धत, सुस्पष्ट शब्दोच्चारण व परिणामकारक भावना अविष्कार यांच्या माध्यमातून त्यांनी शास्त्रीय संगीतात नवीन जाणीव आणली.

प्रभा अत्रे यांनी ‘डॉक्टर प्रभा अत्रे फाउंडेशन’ची स्थापना करून आपले सामाजिक व सांस्कृतिक भान जपले. प्रतिभावान विद्यार्थ्यांना व्यावसायिक कलाकार म्हणून आकार देण्यासाठी तसेच संगीत रसिकांना शिक्षण देण्यासाठी त्यांनी ‘स्वरमयी गुरुकुल’ची स्थापना केली. डॉ. प्रभा अत्रे यांना 1990 मध्ये पद्मश्री, 1991 मध्ये संगीत नाटक अकादमी, 2002 मध्ये पद्मभूषण आदी प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.

‘एशियन कल्चर’ पुरस्काराने दिग्दर्शक रमेश सिप्पी सन्मानित

२० व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाला प्रारंभ

एशियन फाऊंडेशन, महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक विभाग‌ आणि फिल्मसिटी यांच्या सहकार्याने आयोजित २० व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाला प्रारंभ झाला असून या महोत्सवाचे उद्‌घाटन महाराष्ट्र फिल्म स्टेज अँड कल्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे (MFSCDC) अविनाश ढाकणे यांनी केले. यावेळी महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांताराम, चैतन्य शांताराम, दिग्दर्शक जब्बार पटेल, ज्युरी मेंबर स्मिता तांबे, ज्ञानेश  झोटिंग आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी  चित्रपट  क्षेत्रातील अव्दितीय योगदानाबद्दल ‘एशियन कल्चर’  या विशेष पुरस्काराने ज्येष्ठ दिग्दर्शक रमेश सिप्पी तसेच ‘सत्यजित रे’ पुरस्काराने फिल्म चळवळीचे कार्यकर्ते सुभाष देसाई यांना महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांताराम यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

सिनेमा  हे माझं  जग आहे  थिएटर  हे माझं घर या  गोष्टीपासून मी कधीच  दूर जाऊ शकत नाही.  ‘एशियन कल्चर’ पुरस्काराने मला सन्मानित केल्याबद्दल मी एशियन फिल्म फाऊंडेशनचा ऋणी असून हा पुरस्कार मी विनम्रपणे स्वीकारतो असे ज्येष्ठ दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी सांगितले.  

या महोत्सवाच्या माध्यमातून आजच्या पिढीपर्यंत जागतिक दर्जाचा चित्रपट पोहचावा तसेच कलेची वेगवेगळ्या संस्कृतीची ओळख आजच्या तरुण पिढीला करून देणे हे या महोत्सवाचे उद्दिष्ट असल्याचे मत  चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश ढाकणे यांनी यावेळी व्यक्त केले. नवे तंत्रज्ञान  आत्मसात करत वेगळ्या कलाकृतींना प्रोत्साहन दिले पाहिजे यासाठी सगळ्यांनी एकत्र काम करणं गरजेचं असल्याचं  देखील त्यांनी आवर्जून नमूद केले. 

यंदाच्या महोत्सवातील सर्वच कलाकृती दर्जेदार असून त्याचा आस्वाद रसिकांनी घ्यावा असे आवाहन फेस्टिव्हल डिरेक्टर संतोष पाठारे यांनी केले. महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांताराम यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. ‘आंद्रागोजी’ चित्रपटाने महोत्सवाची शानदार सुरुवात झाली.१८जानेवारीपर्यंत चालणाऱ्या सात दिवसांच्या महोत्सवात विविध आशियाई देशांतील चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. या महोत्सवा दरम्यान अनेक दर्जेदार कलाकृती रसिकांना पाहण्यास मिळणार आहेत.

राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंदांनी लढण्याची प्रेरणा दिली – ना. चंद्रकांतदादा पाटील.

मुकुलमाधव फाउंडेशन आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी बेंच प्रदान

पुणे:. राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद या दोघांनीही लढण्याची प्रेरणा दिली आणि आज त्यांच्या जयंती दिनी समोर बसलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांकडे बघून ही शिकवण ह्या मुलांनी अंगीकरल्याचे दिसून येते असे ना. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले. आपल्या शरीरात काहीतरी व्यंग आहे त्याच्यावर मात करून जिद्दीने जगणाऱ्या ह्या विद्यार्थ्यांना सलाम करतानाच त्यांना मदत करणाऱ्या क्रिएटिव्ह फाउंडेशन, मुकुलमाधव फाउंडेशन आणि ग्लोबल ग्रुप सारख्या संस्थांचे ही मी अभिनंदन करतो आणि समाजाच्या वतीने त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो असेही चंद्रकांतदादा म्हणाले.
मुकुलमाधव फाउंडेशन आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने वानवडीतील दिव्यांग कल्याणकारी केंद्र आणि संशोधन संस्था येथे विद्यार्थ्यांसाठी तब्ब्ल 120 बेंच भेट देण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी क्रिएटिव्ह फौंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, फिनोलेक्स चे प्रदीप विदुला (अध्यक्ष सेल्स आणि मार्केटिंग), ग्लोबल ग्रुप चे संचालक मनोज हिंगोरानी,आ. सुनील कांबळे,मुकुलमाधव फाउंडेशन चे जितेंद्र जाधव,फिनोलेक्स चे पृथ्वीराज भागवत काळे,संस्थेचे अध्यक्ष प्रदीप रावत, कार्याध्यक्ष मुरलीधर कचरे, मुख्याध्यापक शिवानी सुतार व इतर मान्यवर उपस्थित होते.
आहे रे आणि नाही रे यांच्या मधील जे अंतर आहे / दरी आहे त्यावरील सेतू चे काम क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि मुकुलमाधव फाउंडेशन करत असते आणि अनेक कंपन्याचे सी एस आर निधी हे योग्य ठिकाणी पोहोचावे यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो असे फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले.दिव्यांगांना सहानुभूती ची नाही तर मदतीचा हाथ आणि साथ देण्याची गरज असून त्या आधारावर ते सक्षम पणे समाजात उभे राहू शकतात आणि सामान्य माणसाप्रमाणे समाजात जगू शकतात असेही संदीप खर्डेकर म्हणाले.
मुकुलमाधव फौंडेशन, क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि ग्लोबल ग्रुप हातात हात घालून समाजासाठी काम करतात आणि जेथे जेथे गरज आहे तेथे मदतीचा हात देऊन समाजाप्रती चे कर्तव्य पूर्ण करत असतात असे श्री. प्रदीप विदुला आणि श्री. मनोज हिंगोरानी यांनी आपल्या संबोधनात स्पष्ट केले.
संस्थेचे कार्याध्यक्ष मुरलीधर कचरे यांनी संस्थेच्या कार्याची माहिती देताना येथे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देत असून त्यांना सक्षम करणे आणि स्वतःच्या पायावर उभे करण्याचे कार्य करत असते आणि असे सर्व विषय हे समाजातील दानशूरांवर अवलंबून असते असे सांगितले. ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी दिव्यांग विद्यापीठाच्या स्थापनेत महत्वाची भूमिका निभावली आहे, त्याचा गौरवपूर्ण उल्लेख करून श्री. मुरलीधर कचरे यांनी त्यांचा विशेष सन्मान केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप खर्डेकर यांनी केले, प्रदीपदादा रावत यांनी उपस्थितांचे स्वागत तर मुरलीधर कचरे यांनी समारोप व आभार प्रदर्शन केले. दिव्यांग मुलांनी विविध वेशभूषेत स्वागत गीत व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
आपला,
संदीप खर्डेकर.
अध्यक्ष, क्रिएटिव्ह फाउंडेशन.
मो – 9850999995

पंतप्रधानांच्या हस्ते नवी मुंबईत अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचे उद्घाटन

सुमारे 17,840 कोटी रुपये खर्चून बांधलेला, अटल सेतू हा भारतातील सर्वात लांब पूल आणि देशातील सर्वात लांब सागरी पूल देखील आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी मुंबईत अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचे उद्घाटन केले. मोदींनी छायाचित्र दालन आणि अटल सेतूच्या प्रदर्शनीय प्रतिकृतीचा आढावा घेतला.

एमटीएचएल अटल सेतू 17,840 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून बांधला गेला आहे आणि सुमारे 21.8 किमी लांबीचा 6-पदरी पूल आहे ज्याची लांबी समुद्रावर सुमारे 16.5 किमी आहे आणि जमिनीवर सुमारे 5.5 किमी आहे.

पंतप्रधानांनी असे म्हटले आहे कि,“आमच्या नागरिकांसाठी ‘जीवन सुलभता’ वाढवण्याच्या दृष्टीने एक पुढचे महत्त्वपूर्ण पाऊल असलेल्या अटल सेतूचे उद्घाटन करताना आनंद होत आहे. हा पूल प्रवासाचा वेळ कमी करेल आणि कनेक्टिव्हिटी वाढवेल ज्याद्वारे दैनंदिन प्रवास सुरळीत होईल.”

पंतप्रधानांच्या समवेत राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते.

अटल बिहारी वाजपेयी शिवडी – न्हावा शेवा अटल सेतू

शहरी वाहतूक पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटी बळकट करून नागरिकांची ‘प्रवास सुलभता’ सुधारणे हे पंतप्रधानांचे ध्येय आहे. या संकल्पनेनुसार, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल), आता ‘अटल बिहारी वाजपेयी शिवडी – न्हावा शेवा अटल सेतू’ नामकरण झालेला पूल बांधण्यात आला आहे. डिसेंबर 2016 मध्ये पंतप्रधानांच्या हस्ते पुलाची पायाभरणी करण्यात आली होती.

एकूण 17,840 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून अटल सेतू बांधण्यात आला आहे. हा सुमारे 21.8 किमी लांबीचा 6-पदरी पूल आहे ज्याची लांबी समुद्रावर सुमारे 16.5 किमी आहे आणि जमिनीवर सुमारे 5.5 किमी आहे. हा भारतातील सर्वात लांब पूल आहे आणि भारतातील सर्वात लांब सागरी पूल देखील आहे. हा मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जलद कनेक्टिव्हिटी प्रदान करेल आणि मुंबई ते पुणे, गोवा आणि दक्षिण भारत दरम्यानचा प्रवासाचा वेळ देखील कमी करेल. यामुळे मुंबई बंदर आणि जवाहरलाल नेहरू बंदर यांच्यातील कनेक्टिव्हिटी देखील सुधारेल.

भारताला नारीमुक्तीची नाही, तर नारी शक्तीची गरज – साध्वी ऋतंभरा

0

पुणे, १२ जानेवारी : आपल्या देशात नारी मुक्तीचा विचार सातत्याने मांडला जात असला, तरी भारताची श्रेष्ठ परंपरा लक्षात घेता आपल्या देशाला नारी मुक्तीची नव्हे, तर नारी शक्तीची गरज असल्याचे स्पष्ट प्रतिपादन साध्वी ऋतंभरा दीदी यांनी शुक्रवारी केले.
राजमाता जिजाऊ यांची ४२५ वी जयंती आणि स्वामी विवेकानंद यांच्या १६१ व्या जयंतीच्या निमित्ताने स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान आणि माय होम इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना ‘राजमाता जिजाऊ गौरव पुरस्कार’ तसेच युवकांना ‘स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी साध्वी ऋतंभरा दीदी बोलत होत्या.
‘माय होम इंडिया’चे संस्थापक सुनील देवधर यांच्या संकल्पनेतून संपन्न झालेल्या या पुरस्कार प्रदान सोहळ्यात यावेळी व्यासपीठावर राम मंदिर निर्माण आंदोलनाच्या अग्रणी नायिका दीदी साध्वी ऋतंभरा, स्वामी जितेन्द्रानंद सरस्वती, जेएनयुच्या कुलपति शांतिश्री धूलिपुडी पंडित, पद्मश्री मिलिंद कांबळे, सुनील देवधर आणि दिनेश होले उपस्थित होते. यावेळी पुण्याच्या माजी महापौर आणि आमदार स्व. मुक्ता टिळक यांना राजमाता जिजाऊ गौरव पुरस्काराने मरणोत्तर सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार कुणाल टिळक यांनी स्वीकारला.
याप्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय कार्यकर्ते दादा वेदक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी
मा. का. देशपांडे, विज्ञान भारतीचे काशीनाथ देवधर, जनसेवा बँकेचे संस्थापक वसंतराव देवधर, उद्योजक गजेंद्र पवार, ईशान्य भारतातील कार्यकर्ते प्रशांत जोशी, अॅड. सत्यम सुराणा यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
स्त्रिया स्वतंत्र असल्याचे चित्र जगभरातील इतर देशात निर्माण केले गेले असले तरी भारतातील स्त्रियांना जो सन्मान दिला जातो, तसा सन्मान मला विश्वात कुठेही दिसला नाही. असे सांगून साध्वी ऋतंभरा दीदी म्हणाल्या समाजात स्वतःचे स्थान महिलांना स्वतः निर्माण करता येते, तप, साधनेने हे शक्य आहे. अनाथाश्रम, वृद्धाश्रम, बालकाश्रम ही व्यवस्था समाजासाठी आदर्श व्यवस्था होऊ शकत नाही. कुटुंब आणि संस्कार यातून महिला आदर्श निर्माण करू शकतील.

अयोध्येत श्रीराम मंदिर भूमिपूजन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दंडवत प्रणाम केला, परंपरेचा असा सन्मान करणारे ते पहिले पंतप्रधान आणि देशाचे सुपुत्र आहेत. असे साध्वी ऋतंभरा दीदी म्हणाल्या. अयोध्येत २२ जानेवारी रोजी राम येत आहेत. माझ्या आनंदाला खरोखरच पारावार राहिलेला नाही, असेही त्या म्हणाल्या.

कार्यक्रमात स्व. मुक्ता टिळक (मरणोत्तर) – क्षेत्र राजकीय, डॉ. सुचित्रा कराड-नागरे – शैक्षणिक, ममता सपकाळ – सामाजिक, उषा माळी – शैक्षणिक, उषा वाजपेयी – राजकीय, पुष्पाताई वागळे – राजकीय, सीमा चांदेकर – चित्रपट , शुभांगी भालेराव – सामाजिक, अंजली व नंदिनी गायकवाड गायिका – संगीत, शैला नाईक – प्राणीमित्र, डॉ. सुप्रिया पुराणिक – वैद्यकीय, प्रतिभा चंद्रन – पत्रकारिता, गीता पेडणेकर – उद्योग, नंदाताई बराटे – सामाजिक, सी. ए. रचना रानडे – आर्थिक, डॉ. जयश्री तोडकर – वैद्यकीय, पुष्पाताई वागळे – राजकीय, शैला देशपांडे – क्षेत्र समाजसेवा, यांना राजमाता जिजाऊ गौरव पुरस्काराचे सन्मानित करण्यात आले. यासोबत वीव्ध क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या १४३ महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला.
त्याचप्रमाणे तुषार दामगुडे, सुखदेव अडागळे, किशोर चव्हाण, शिवशंकर स्वामी, आशुतोष मुगळीकर, निलेश भिसे,अविनाश तायडे, आशुतोष झा, दत्तात्रेय मिरगणे पाटील, निलेश धायरकर, आनंद जाधव, महेश पवळे यांना विवेकानंद युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

स्वामी विवेकानंद आणि हिंदुत्व यांना आम्ही एक दुसऱ्याचा पर्याय मानतो. महिलांना सर्व भौतिक स्वातंत्र्य पश्चिमी देशात आहे. मात्र सन्मान आणि खरे स्वातंत्र्य भारतातच आहे, असे ठाम प्रतिपादन स्वामी जितेंद्रानंद सरस्वती यांनी केले.

राजमाता जिजाऊ ह्या एक माता आणि थोर आचार्य होत्या. पुणे शहर माझी कर्मभूमी आहे. पुण्यासारखे चांगले लोक मी इतर ठिकाणी पाहिले नाहीत. पुण्यासारख्या सुसंस्कृत शहराचे नेतृत्व सुनील देवधर यांनी करावे, अशी अपेक्षा डॉ. शांतिश्री धुलीपुडी पंडित यांनी व्यक्त केली.
माय होम इंडियाचे संस्थापक सुनील देवधर यांचे कार्य देशभर सुरु आहे आणि पुणे हे ही त्यांचे ‘होम’च आहे. पंतप्रधान मोदी यांच्या धोरणांचा परिणाम आहे की, तरूणांनी स्टार्टअपच्या माध्यमातून क्रांती केली आहे, साडे चार लाख लोकांना रोजगार एकशे सोळा स्टार्टअप युनिकॉन आहेत. नव्या युगातला हेच तरूण उद्योजक जगाला दिशा देतील, शिखरावर पोहचवतील. असे प्रतिपादन पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे यांनी केले.


राष्ट्राच्या उद्धारासाठी सर्व महिलांनी राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेण्याची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊंनीच हिंदवी स्वराज्याची प्रेरणा दिली. भारताला विकसित करण्यासाठी, आपल्या युवा पिढीसमोर जिजाऊंचाच आदर्श आहे. युवक आणि युवतींनी जिजाऊंचा आदर्श घेऊनच जीवनात वाटचाल करावी.

  • सुनील देवधर

(NIA)राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीकडुन पुणे पोलीसांना प्रशस्तीपत्रक-ज्यांच्यावर १० लाखाचे इनाम आहे असे फरार आरोपी पकडून दिले…

पुणे- ज्यांच्यावर १० लाखाचे इनाम आहे असे देशविघातक कृत्ये करणारे फरार आरोपी पकडून दिल्याबद्दल राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी (NIA) यांचेकडुन पुणे पोलिसांचे कौतुक करून प्रशस्तीपत्रक देण्यात आले आहे.

या संदर्भातील माहिती अशी कि,’ दिनांक १८/०७/२०२३ रोजी शास्त्रीनगर बीट मार्शलवरील पोलीस अंमलदार, प्रदिप चव्हाण व अमोल नजन हे शास्त्रीनगर पोलीस चौकी हद्दीत रात्रगस्त घालत असताना, रात्रौ ०२/३० वा. त्यांनी तीन संशयित दुचाकी चोरांना ताब्यात घेतले होते. सदर रात्रौ कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार, बाला रफी शेख, अनिकेत जमदाडे, ज्ञानेश्वर पांचाळ, वैभव शितकाल यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर इसम रहात असलेल्या ठिकाणीची घरझडतीसाठी नेले असताना, त्यांचे घरझडती मध्ये एक जिवंत काडतुस, चार मोबाईल, एक लॅपटॉप व इतर कागदपत्रे मिळुन आली होती. त्यामध्ये संशईत हे देशविघातक कृत्यास सहभागी असल्याचा संशय आल्याने, त्यांचेकडे अधिक तपास करता ते राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी (NIA) फरार आरोपी असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांचेविरूध्द कोथरूड पो स्टे येथे गुरनं. १७५/२०२३, भा.दं. वि.सं.कलम ४६८, ३७९,५११,३४, भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५), ४ (२५), महाराष्ट्र पोलिस अॅक्ट क.३७ (१) ३७ (३),१३५अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
संशयित इसम हे देशविघातक कृत्यास सहभागी असल्याचे व त्यांना राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी यांचेकडुन फरार घोषित केल्याचे निष्पन्न झाले होते. राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी (NIA) यांचेकडुन सदर आरोपींवर रोख १० लाख रुपयांचे बक्षिस घोषित केले होते. आज दि. १२/०१/२०२४ पुणे शहर पोलीसांनी केलेल्या उत्कृष्ठ कामगिरी बाबत राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी (NIA) चे पोलीस अधिकारी, श्री. इंगवले व पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार यांचे हस्ते पोलीस अंमलदार, अमोल नजन, प्रदिप चव्हाण, बाला रफी शेख, अनिकेत जमदाडे, ज्ञानेश्वर पांचाळ यांना पोलीस आयुक्त कार्यालय, पुणे शहर याठिकाणी बोलावुन सन्मान करण्यात आला.
राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी (NIA) चे पोलीस अधिकारी, श्री. इंगवले हे मुंबई येथुन खास नमुद पोलीस अमंलदार अमोल नजन, प्रदिप चव्हाण, बाला रफी शेख, अनिकेत जमदाडे, ज्ञानेश्वर पांचाळ यांना रोख रक्कम व प्रमाणपत्र अदा करणेकरीता आयुक्तालयात उपस्थित राहीले. पोलीस आयुक्त, श्री. रितेश कुमार, राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी (NIA) चे पोलीस अधिकारी, इंगवले यांचे हस्ते कोथरुड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हेमंत पाटील, पोलीस निरीक्षक निलिमा पवार यांचा देखील यावेळी प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. सदरवेळी पोलीस सह आयुक्त (अति. कार्यभार) रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त, प्रशासन अरविंद चावरिया, हे उपस्थित होते.

माजी मंत्री विश्वजित कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीर

पुणे : राज्याचे माजी मंत्री, आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्या वाढदिवसानिमित्त बिबवेवाडी येथील आधार मुकबधिर विद्यालयातील मुकबधिर विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य शिबीर राबवण्यात आले. सारथी फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल सुरवसे-पाटील यांच्या पुढाकाराने व भारती हॉस्पिटल रिसर्च सेंटरच्या माध्यमातून हे शिबीर घेण्यात आले. यासह विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. भारती हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून मुकबधिर विद्यार्थ्यांच्या विविध आरोग्य तपासण्या करण्यात आल्या.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक, भारती हॉस्पिटलचे डॉ. प्रवीण जाधव, सारथी फाउंडेशनचे राज्य उपाध्यक्ष दीपक चौघुले, सामाजिक कार्यकर्त्या अमीना भोसले, सुषमा कोंडे, सोनाली फाले, पवन दुर्वे आदी उपस्थित होते. वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून, सामाजिक जाणीवेतून विविध सामाजिक उपक्रम राबवत असल्याचे अनिल सुरवसे-पाटील यांनी सांगितले.

मेधा कुलकर्णींनी उठवला कोथरूडच्या पप्पू चा बाजार , बेटिंग अड्ड्यावर स्वतःच मारला छापा .. उघडा पडला पोलीसांचा कारभार…

पुणे-पुण्यातील गुन्हेगारी वाढलीये,पोलीस मकोका लावतात आणि नंतर काढून घेतात ..असा अनुभव कोथरूडमध्ये आहेच , पण हजारावर तरुणाईला गुन्हेगारीच्या जाळ्यात मकोका ,MPDA लावून जखडवून देखील पुण्याच्या गुन्हेगारीचा काळिमा काही पुसला जाईनात .. अलीकडे पुण्यात आलेल्या दोन पोलीस आयुक्तांनी १८ ते २४ वयोगटातील काही शे टोळ्यांवर कारवाई केल्याचे चित्र रंगविले आहे. पण … मटका , बेटिंग, गैरधंदे … सर्वत्र सुरूच आहेत … त्यात तर काहीच फरक पडलेला नाही, नाही चोऱ्या कमी झाल्या ,नाही व्यसनाधीनता कमी झाली … अखेरीस आज कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णींनी जणू प्रतीकात्मक झाशीच्या राणीचा अवतार घेतला ..आणि कोथरूडच्या पप्पुचा बाजार उठवला …. सुस रस्त्यावरील फेमस असलेल्या बालाजी चौकात अतिक्रमण करून सुरु असलेला हा पप्पूचा बेटिंग अड्डा मेधा कुलकर्णी यांनी असा उध्वस्त केला आणि पोलिसांचे चेहरे पाहण्यासारखे झाले ….पहा व्हिडीओ

हि बातमी समजताच आता पुण्यातून अनेकांनी अशा गैरधंद्यां विरोधात मेधा कुलकर्णी यांनी रणरागिणी बनून आवाज उठवावा त्यांच्या समवेत राहण्यास हि आता काही लोक तयार होत आहेत.

को’वॉर’ हे पुस्तक लढण्यासाठी बळ देणारे – अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात प्रकाशन

पुणे (दि १२ जानेवारी २०२४) संग्राह्य मूल्य असणारे ‘को’वॉर’ हे पुस्तक कोणत्याही संकटावर मात करण्यासाठी आत्मविश्वास देणारे, लढण्यासाठी बळ देणारे म्हणून उपयुक्त ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.
पिंपरी चिंचवड महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे आणि ज्येष्ठ पत्रकार राजन वडके यांच्या ‘को’वॉर लढा जीवन मरणाचा या पुस्तकाचे प्रकाशन गुरुवारी (दि११) अजित पवार यांच्या हस्ते पुणे विधान भवनात करण्यात आले. त्यावेळी त्यांनी या पुस्तकासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, लेखक अण्णा बोदडे, राजन वडके, माजी नगरसेवक अजित गव्हाणे, राहुल भोसले, शाम लांडे, शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
“पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना संकटाचा सामना करताना सामूहिक जबाबादारीने केलेल्या कार्याची माहिती ‘को’वॉर पुस्तकात शब्दबद्ध करण्याचा बोदडे आणि वडके यांचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. या काळात आपला जीव धोक्यात घालून लढलेल्या कोरोना योद्ध्यांचा सन्मान या पुस्तकामुळे होणार आहे,” असे पवार यांनी सांगितले.
“कोरोना संकटकाळातील पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांवर ओढवलेल्या परिस्थितीचा आणि त्या काळात महापालिका, वैद्यकीय, पोलिस आदी प्रशासकीय यंत्रणा आणि राजकीय व सामाजिक संघटनांनी केलेल्या कार्याचा आढावा घेणारे हे पुस्तक आहे. कोरोना बाधितांचे जीव वाचविण्यासाठी अक्षरशः प्राणांची बाजी लावत उपचार करणारे डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, मावशा या कोरोना वॉरियर्सनी केलेल्या सेवेचं अभूतपूर्व दर्शन घडले. सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, कामगार, भाजी, फळ बाजार, किराणा व्यवसाय, शैक्षणिक, चित्रपट, नाट्य, सांस्कृतिक, क्रिडा, प्रसिद्धी माध्यम आदी सर्वच क्षेत्रांना या भयावह महामारीचा फटका बसला. या आव्हानात्मक परिस्थितीतून पिंपरी चिंचवड शहराला सावरण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा कामाला लागल्या होत्या. कोरोना बाधितांचे प्राण वाचवण्यासाठी, त्यांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी आणि गरीब, गरजूंच्या पोटाची भूक भागविण्यासाठी शहरातील सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संस्था संघटना कार्यरत झाल्या होत्या. शहरावर आक्रमण केलेल्या या महामारीच्या विरोधात सर्व जण एकजुटीने आणि एकदिलाने लढत होते. एकीकडे कोरोनाची लागण झाल्यानं कुटुंबच्या कुटुंब जग सोडून जात होती. तर दुसरीकडं या ही परिस्थितीत लोक एकमेकांना धीर आणि आधार देत होते. हृदय पिळवटून टाकणारी अशी ही दृष्ये होती. पिंपरी चिंचवड मधील ही परिस्थिती आम्ही अनुभवत होतो. शहरावर ओढवलेल्या या संकटाचा आणि परिस्थितीचा विचार करता, ती देशाचे प्रातिनिधिक दर्शन घडवित होती. कोरोना काळातील सामाजिक वास्तव नजरेत, मनांत साठवत होतो. या संकटावर मात करत जगण्यासाठी लोकांच्या या लढ्याची कायमस्वरुपी नोंद झाली पाहिजे, या विचारातूनको-वॉर लढा जीवन मरणाचा या पुस्तकाचा जन्म झाला,” असे मनोगत लेखक बोदडे व्यक्त केले.

धर्माच्या नावाने भाजपाचे राजकारण- नाना पटोले

राजमाता जिजाऊ, झाशीची राणी, सावित्रीबाईंचा विचार अंगिकारा.

टिळक भवनमध्ये सेल व विभागातील महिलांचा सन्मान.

मुंबई, दि. १२ जानेवारी

छत्रपती शिवाजी महाराजांनी सुराज्य स्थापन केले तर संत महंतांनी अध्यात्माचे कार्य केले. शिवाजी महाराजांनी राजकारणात धर्म आणला नाही. छत्रपतींच्या सुराज्यात शेतकऱ्याच्या भाजीच्या देटालाही हात लावू नका अशी शिकवण होती पण आज भाजपाच्या राज्यात शेतकरी दररोज मरत आहे आणि सत्ताधाऱ्यांना त्याचे काहीच देणेघेणे नाही. अनेक पक्षांची सरकारे आली व गेली पण त्यांनी राजकारणासाठी धर्माचा वापर केला नाही परंतु भारतीय जनता पक्ष धर्माचा वापर आपल्या राजकारणासाठी करत आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधून प्रदेश काँग्रेसचे कार्यालय टिळक भवन येथे सेल व विभागाच्या महिलांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे, सोशल मीडीयाचे प्रमुख विशाल मुत्तेमवार, प्रज्ञा वाघमारे आदी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना नाना पटोले पुढे म्हणाले की, अयोध्येत राम मंदिर व्हावे यासाठी आपणही यापूर्वी देगणी दिली, विटा दिल्या, राम मंदिरासाठी न्यास आहे पण भाजपा मात्र राम मंदिराचे राजकारण करत आहेत. अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम अर्धवट आहे ते पूर्ण होण्यास आणखी तीन वर्षे लागणार आहेत परंतु निवडणुकीच्या तोंडावर राजकीय फायदा उठवण्यासाठी अर्धवट बांधकाम असलेल्या मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्याची घाई भाजपाला झाली आहे. हिंदू धर्माचे सर्वोच्च असलेल्या चारही शंकराचार्यांचा अशा पद्धतीच्या प्राणप्रतिष्ठेला विरोध आहे. अर्धवट बांधकामाच्या मंदिरात प्राण प्रतिष्ठा करणे चुकीचे आहे असे शंकराचार्य सांगत आहेत पण भाजपा त्यांचेही ऐकत नाही. भारतीय जनता पक्ष धर्म भ्रष्ट करत आहे आणि आरोप मात्र काँग्रेस पक्षावर करत आहे.

राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रिबाई फुले, झाशीची राणी यांचा काळ वेगळा होता व आताचा काळ वेगळा आहे. त्यावेळी अत्याचारी व्यवस्थेविरोधात लढा देताना पारतंत्र्य होते, अशा विपरीत परिस्थितीतही त्यांनी मोठ्या धैर्याने लढा दिला, त्यांचे विचार आजही प्रेरक आहेत, याच आपल्या प्रेरणास्रोत आहेत, त्यांचे विचार घेऊन पुढे जावा. आज आपण स्वातंत्र्यात आहोत आपल्याला मत मांडण्याचा अधिकार आहे. भाजपाच्या अत्याचारी व्यवस्थेविरोधात उभे राहिले पाहिजे, आवाज उठवला पाहिजे. नारीशक्ती मोठी शक्ती आहे, या शक्तीने भाजपाच्या अत्याचारी व्यवस्थेविरोधात आवाज उठवला पाहिजे. काँग्रेसच्या विविध विभाग व सेलच्या माध्यमातून ही नारीशक्ती गावागावात काँग्रेसचा विचार रुजवत आहेत हा प्रचार व प्रसार असाच कायम ठेवा व अत्याचारी व्यवस्था संपुष्टात आणून पुन्हा काँग्रेसचे सरकार आणा, असे आवाहन पटोले यांनी केले.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने ‘Donate for Desh’ हे अभियान सुरु केले आहे. या अभियानात महिलांनीही मोठ्या संख्येने भाग घेऊन १३८ रुपयांच्या पटीत ऑनलाईन देणगी द्यावी, असे आवाहनही पटोले यांनी केले.