Home Blog Page 126

शंभरी पूर्ण करणाऱ्या रा. स्व. संघाने नथुराम व विखारी विचार सोडून संविधान व गांधी विचार स्विकारावा: हर्षवर्धन सपकाळ.

0

दिनांक २८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दिक्षाभूमी ते सेवाग्राम संविधान सत्याग्रह यात्रा; रा. स्व. संघाला संविधान भेट देणार.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी पुराव्यासह मतचोरी उघड केली, मुख्यमंत्री फणविसांनी निवडणूक आयोगाची दलाली बंद करावी.

मुंबई,

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी २ ऑक्टोबर रोजी विजयादशमीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण होत असून हा नियतीचा एक संकेत आहे. १०० वर्ष पूर्ण करणाऱ्या रा. स्व संघाने आता तरी नथुराम व विखारी विचार सोडून समता, बंधुता व सामाजिक न्यायाचे संविधान व गांधी विचार स्विकारावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.

टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, भारताचे संविधान ही ऐतिहासिक घटना असून संविधान भारताची प्रेरणा आहे. संविधान हे मनुस्मृतीवर आधारीत असावे अशी रा. स्व. संघाची अपेक्षा होती, गोलवलर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना तसे पत्र पाठवले होते. पण आम्ही विशिष्ट लोक हा संघाचा विचार आहे तर संविधानाचा विचार हा आम्ही भारताचे लोक असा आहे. गोलवलकर यांचे बंच ऑफ थॉट हे रा. स्व. संघ व भाजपाचे बायबल आहे. संविधान नाकारणारा विचार भाजपाचा आहे. स्वातंत्र्यानंतर पन्नास वर्ष रा. स्व. संघाने त्यांच्या कार्यालयावर राष्ट्रध्वज तिरंगा सुद्धा फडकवला नव्हता. आता शंभर वर्ष होताना संघाने विखारी व विषारी विचार सोडून संविधानाचा विचार स्विकारला पाहिजे असे सपकाळ म्हणाले.

काँग्रेस पक्षाची नेहमीच संविधान रक्षणाची भूमिका राहिली आहे. महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्या पुढाकाराने २८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान संविधान सत्याग्रह यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा नागपूरच्या दिक्षाभूमीपासून सुरु होऊन सेवाग्रामपर्यंत जाणार आहे. २८ तारखेला महान क्रांतीकारी भगतसिंह यांच्या बलिदानदिनी मशाल मोर्चा काढला जाणार आहे तसेच नागपूरच्या संविधान चौकात एका सभेचे आयोजन करण्यात आले आहे. २९ तारखेपासून यात्रेला सुरुवात होणार आहे. यावेळी रा. स्व. संघाला संविधान भेट देणार असल्याचेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

फडणवीस, निवडणूक आयोगाची दलाली बंद करा.
एका प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरी झाल्याचे पुरावे दिले आहेत, मुख्यमंत्री फडणवीसांकडे गृहमंत्रालयही आहे, त्यांच्या पोलिसांनी राजुरा विधान सभेतील मतचोरी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे तरिही देवेंद्र फडणवीस हे निवडणूक आयोगाची दलाली करत आहेत, त्यांनी ही दलाली बंद करावी. देवेंद्र फडणवीस हे चोर मुख्यमंत्री आहेत, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्याबद्दल भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या विधानावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, पूर्वी सुसंस्कृत, सभ्य, विचारवंत व कवी पदरी असायचे पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही नालायक व विकृत लोक पदरी ठेवले आहेत. जयंत पाटील यांच्याबद्दल केलेले विधान हे बेलगामपणाचा कळस असून फडणवीस हे लाचार व अधर्मी मुख्यमंत्री आहेत असे सपकाळ म्हणाले.

पनवेलच्या भाजपा नगरसेवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश..
पनवेल महानगरपालिकेतील भाजपाचे नगरसेवक हरिश केणी, रविकांत म्हात्रे, कैलास घरत यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सपकाळ यांनी या सर्वांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले.

काँग्रेस तालुकाध्यक्ष पदासाठी मुलाखती…
टिळक भवन दादर येथे काँग्रेस तालुकाध्यक्ष पदासाठी निरीक्षकांनी शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य खासदार चंद्रकांत हांडोरे, नसीम खान, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप, यु. बी. व्यंकटेश, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ॲड गणेश पाटील उपस्थित होते.

मयुर गुलाब कुंबरेसह कोथरूडच्या घायवळ टोळीतील ५ गुंडांना अटक

पुणे- गेल्या १७ सप्टेंबर रोजी रात्री पावणेबारा वाजता रस्त्यावरील एका ३६ वर्षीय नागरिकाला विनाकरण दमदाटी करत त्याच्यावर गोळीबार करणाऱ्या घायवळ टोळीतील कोथरूडच्या शास्त्रीनगर आणि ,माथवड चालीत राहणाऱ्या ५ गुंडांना पोलिसांनी पकडले आहे. १. मयुर गुलाब कुंबरे वय २९ वर्षे रा. कुंबरे चाळ, सागर कॉलनी, शास्त्रीनगर कोथरुड पुणे २. गणेश सतीश राऊत वय ३२ वर्ष रा डी पी रोड आशिष गार्डन, कोथरुड पुणे ३. मयंक ऊर्फ मॉन्टी विजय व्यास वय ३० वर्षे रा. शास्त्रीनगर कोथरुड पुणे ४. दिनेश राम फाटक वय २८ वर्ष रा माथवड चाळ कोथरुड पुणे संत ज्ञानेश्वर कॉलणी, कोथरुड पुणे ५. आनंद अनिल चांदळेकर वय २४ वर्ष व्यवसाय मॅकेनिक रा. श्रीराम कॉलणी शास्त्रीनगर, कोथरुड पुणे अशी या पाच गुंडांची नावे आहेत

दिनांक १७/०९/२०२५ रोजी रात्रौ २३/४० वा. तिरुपती फॅब्रिकेटर दुकाना समोर, मुठेश्वर चौका जवळ, कोथरुड, पुणे येथे यांनी प्रकाश धुमाळ जे आपल्या मित्राला घरी सोडवायला इथे आले होते त्यास विनाकारण धमकावुन, शिवीगाळ करून त्यांना जिवे ठार मारणेचे उद्देशाने त्यांच्यावर पिस्टल मधून गोळी झाडून गंभीर जखमी केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरिक्षक रविद्र आळेकर मो नं ८४२५८५०३३१ अधिक तपास करत आहेत.

२२ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबरला रंगणार पुणे लोकमान्य फेस्टिवल !

पुणे -शहरातील लोकप्रिय असणाऱ्या पुणे लोकमान्य फेस्टिवलचे उद्घाटन बुधवार २२ सप्टेंबर रोजी सायं. ५.०० वा. होणार असून या पुढील १० दिवसात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

फेस्टिवलचे हे २८ वे वर्ष आहे. मंगळवार दि. २३ सप्टेंबर रोजी सुप्रसिध्द निवेदक, अभिनेता, खेळांचा बादशहा बाळकृष्ण नेहरकर प्रस्तुत सिनेअभिनेत्रींसह होम मिनिस्टर खेळ- गप्पा- गोष्टी- गाणी-नृत्य प्रश्नोत्तरे आणि उखाणे, बुधवार दि. २४ सप्टेंबर रोजी जितेंद्र भुरुक प्रस्तुत गीतों का सफर मराठी-हिंदी गाण्यांचा सहकुटुंबानी पहावा असा कार्यक्रम, गुरुवार दि. २५ सप्टेंबर २०२५ मल्हार प्रस्तुत धर्म, परंपरा, संस्कृती जपणारा मराठी गितांचा नृत्त्याविष्कार गर्जना सह्याद्रीची, लोकधारा महाराष्ट्राची सोनाली कोतवाल निर्मित, शुक्रवार दि. २६ सप्टेंबर जगप्रसिध्द जादू‌गार जितेंद्र रघूवीर यांचा कार्यक्रम होणार आहे.

शनिवार दि. २७ सप्टेंबर रोजी सोलो डान्स कॉम्पिटिशन, रविवार दि. २८ सप्टेंबर स्वर संजीवण ‘म्युझिकल’ प्रस्तुत स्वर सम्राज्ञी स्व. लतादीदीच्या ९५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांना दिलेली स्वरांजली गायक: अर्चना पोतनीस, रश्मी बडे, संजय पोतनीस संकल्पना डॉ. भाग्यश्री कश्यप, सोमवार दि. २९ सप्टेंबर रुपान देखणी लावणी सम्राज्ञी माया खुटेगावकर, मंगळवार दि. ३० सप्टेंबर सादरकर्ते-निर्माता: समीर वीर सुरसंगम प्रेझेंट दांडीया विथ लाईव्ह ऑर्केस्ट्रा बुधवार दि. १ ऑक्टोबर ग्रुप डान्स कॉम्पिटिशन, गुरुवार दि. २ ऑक्टोबर दसऱ्यानिमित्त रावणदहन आर्टिस्ट एम. शेखर, सोमवार दि. ६ ऑक्टोबर कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दुग्धपान व तेजस्विनी अँड मुकेश देढिया प्रस्तुत टोटल म्युझिक धमाका असे कार्यक्रम पार पडणार आहे.

या लोकमान्य फेस्टीव्हलचे संस्थापक अध्यक्ष ॲड. गणेश सातपुते असून उत्सवाचे अध्यक्ष नरेश मित्तल आहेत आणि संयोजन महेश महाले, सौ. शुभांगी सातपुते, अदित्य सातपुते, गौरव सैतवाल, ऋषीकेश भोसले, चेतन सोनवणे, इ. करणार आहेत. सदरील सर्व सांस्कृतिक कार्यक्रम लोकमान्यनगर, जॉगिंग पार्क, नवी पेठ, येथे पार पडणार आहेत. सर्व कार्यक्रम पुणेकरांसाठी विनामूल्य असून जास्तीत जास्त पुणेकरांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पास राज्यस्तरीय तांत्रिक समितीची मंजुरी!

  • पिंपरी-चिंचवडच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय
  • भाजप आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश

पिंपरी- चिंचवड |

पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागातील सुमारे 50 लाख नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत असलेल्या आणि महाराष्ट्राच्या वारकरी सांप्रदायामध्ये श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला आता चालना मिळाली आहे. राज्य सरकारच्या नगर विकास विभागाच्या राज्यस्तरीय तांत्रिक समितीच्या (SLTC) मान्यतेचा प्रस्तावाला अखेर मान्यता मिळाली. त्यामुळे नदी सुधार प्रकल्पाचे काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला.

इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला चालना देण्यासाठी आणि पर्यावरण प्रेमी व स्वयंसेवी संस्था प्रकल्पाचा सुधारीत विकास आराखडा तयार करावा यासाठी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. विधानसभा अधिवेशनामध्ये राज्य सरकारचे लक्ष वेधले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 2022 मध्ये मागणी लावून धरली होती.

इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प अर्थात ‘‘नमामी इंद्रायणी’’साठी सर्व प्रशासकीय व तांत्रिक मान्यता, निधीची उपलब्धता याबाबत सातत्त्याने केलेले पाठवायला अखेर यश मिळाले आहे.

विशेष म्हणजे, शहर आणि परिसरातील पर्यावरण प्रेमी संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींनी नदी सुधार प्रकल्पाचा विकास आराखडा अंतिम करताना महानगरपालिकेच्या Master plan मध्ये दर्शवल्यानुसार विविध ठिकाणी 60 एमएलडी क्षमतेचे मैलाशुद्धीकरण केंद्र सदर कामामध्ये प्रस्तावित केले आहे. तसेच, Water ATM, Public Toilet, Street Furniture, Chain link fencing compound wall आणि बायोडायव्हर्सिटी पार्क इत्यादी कामांचा समावेश करण्यात आला आहे.

केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.० अभियानांतर्गत अंतर्गत राज्यस्तरीय तांत्रिक समितीची अपर मुख्य सचिव, (नवि-२) यांच्या अध्यक्षतेखाली सदर प्रकल्पांचा अनुषंगाने आज बैठक झाली. सदर बैठकीत इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाचा सविस्तर विकास आराखड्याला तांत्रिक समिमीची मान्यता मिळाली आहे.

इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पातून नदीसंवर्धन, पूरनियंत्रण, पाण्यावर प्रक्रिया आणि सौंदर्यीकरण अशा चारही बाबी साध्य केल्या जाणार आहेत. एकूण 526 कोटींचा हा प्रकल्प असून, अमृत 2.0 अभियानांतर्गत तो राबविला जाणार आहे. 40 आणि 20 एमएलडीचे हे दोन प्रकल्प असतील. यात पावसाचे पाणी साठवण्यासाठी जलनि:स्सारण प्रणाली, प्रदूषित पाणी मलनि:स्सारण प्रकल्पाकडे वळविण्यासाठी इंटरसेप्टर, पूर नियंत्रणासाठी दगडी बांधकाम करुन नदीच्या तटांचे सक्षमीकरण आणि नदीपात्राचे तटबंदीकरण, तसेच नदी तटावर हरित क्षेत्राचा विकास व वनसंवर्धनाद्वारे सुशोभिकरण अशी कामे एकत्रितपणे करण्यात येणार आहेत.

  • देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री.


राज्यातील तमाम वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान आणि पिंपरी-चिंचवडकरांची जीवनवाहिनी असलेल्या इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यस्तरीय तांत्रिक समितीची मान्यता मिळाली. यापूर्वी प्रशासकीय मान्यता देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकार्य केले. भाजपा महायुतीच्या सरकारने पिंपरी चिंचवड करांना दिलेल्या शब्द खरा केला. मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि सरकारचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.

  • महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

वनराजची पत्नी सोनालीला पकडायला गेलेल्या पोलिसांना प्रतिकार करणाऱ्या प्रियांका आंदेकर सह १२ महिलांवर गुन्हा दाखल

 सोनाली आंदेकर येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार होत्या. निवडणुकीसाठी तयारीही सुरू झाल्याची माहिती होती. मात्र, या खूनप्रकरणात तिचे नाव पुढे आल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे

पुणे-आयुष कोमाकर खून प्रकरणात चौकशीसाठी माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या पत्नी सोनाली आंदेकरला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांना प्रतिकार करणाऱ्या प्रियांका आंदेकर यांच्यासह १३ जणांविरुद्ध समर्थ पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यातील फौजदार प्रियांका गोरे यांनी फिर्याद नोंदविली आहे दरम्यान हा सर्व विरोध मोडून त्यांनी सोनाली आंदेकरला अटक केली त्यानंतर सोनालीला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

फौजदार प्रियांका गोरे यांच्या तक्रारीवरून सोनाली वनराज आंदेकर (वय ३६, रा. डोके तालमीजवळ, नाना पेठ) हिच्यासह प्रियंका कृष्णराज आंदेकर, माया देवळे, येल्लबाबाई कित्तुरकर, लक्ष्मीबाई बेडगिरी, संगीता शिंदे, शारदा साळुंखे, बेबी दोडके, सरुबाई निसारे, कल्पना शिंदे, पूजा शिंदे, स्वाती दोडके आणि मोहन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आयुष कोमाकर हा सोनाली आणि प्रियंका आंदेकर यांचा भाचा होता. विसर्जन मिरवणुकीच्या पूर्वसंध्येला नाना पेठेत गोळ्या झाडून त्याचा खून करण्यात आला होता. कौटुंबिक वाद आणि टोळीयुद्धातून हा खून झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह १५ जणांना यापूर्वीच अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगार नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आली आहे. कोमाकरच्या खुनापूर्वी आरोपींची वानवडी परिसरात एकत्रित बैठक झाली होती आणि ते एकमेकांना मोबाइल घरी ठेवून भेटत होते.

या खून प्रकरणात सोनाली आणि प्रियंका यांची यापूर्वी चौकशी करण्यात आली होती. तपासात सोनाली खून प्रकरणाचा कट रचण्यात सामील असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तिला गुरुवारी (१८ सप्टेंबर) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास चौकशीसाठी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला.यावेळी सोनाली आणि प्रियंका यांना ताब्यात घेण्यापासून पोलिसांना रोखण्यात आले. पोलिसांशी हुज्जत घालून शासकीय कामात अडथळा आणल्याने सोनाली आणि प्रियंका आंदेकरसह १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस फौजदार संतोषी जाधव (8554918025) या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

टिपु पठाण टोळीतील उबेद खानाला शिंगोटे पार्कात पकडला

पुणे- मोका गुन्हयामधील WANTED असलेला आरोपी टिपु पठाण टोळीमधील उबेद खानाला पुण्याच्या पोलिसांनी अखेरीस हडपसरच्या शिंगोटे पार्कात पकडला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी सांगितले कि,’पुणे शहरातील पोलीस स्टेशनचे अभिलेखावर असलेल्या पाहिजे/फरारी आरोपींचा शोध घेवुन त्यांना ताब्यात घेणेबाबत मा. वरिष्ठांनी आदेशीत केलेले होते. त्याप्रमाणे गुन्हे शाखा युनिट ०५ पुणे शहर पथक पाहिजे/फरारी आरोपींचा शोध घेत होते.
काळेपडळ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर १००/२०२५ भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम ३०८ (२), ३२९(३),३५१ (२),३५२,१८९(१), १८९ (२), १९१(२) सह ६१ (२), १११ सह महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायदा १९९९ चे ३ (१),३ (२), ३(४) या गुन्हयामधील WANTED असलेला आरोपी उबेद अन्सार खान हा शिंगोटे पार्क, मांजरी बुा पुणे येथे राहत असल्याची माहिती पोलीस अंमलदार अकबर शेख, विनोद शिवले व प्रताप गायकवाड यांना मिळालेली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी उबेद अन्सार खान, वय, २७ वर्षे, रा. फ्लॅट नंबर २०३ युग कौशल्य सोसायटी, गल्ली नंबर ३, चिंतामणी नगर, हडपसर, पुणे यास शिंगोटे पार्क, मांजरी बु पुणे येथुन कायदेशीर प्रक्रिया राबवुन ताब्यात घेवुन पुढील कार्यवाही कामी काळेपडळ पोलीस स्टेशनचे ताब्यात दिलेले आहे.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त, गुन्हे पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त गुन्हे निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे २ राजेंद्र मुळीक यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस निरीक्षक संजय पतंगे, गुन्हे शाखा युनिट ०५, पुणे शहर, पोलीस अंमलदार प्रताप गायकवाड, प्रमोद टिळेकर, विनोद शिवले, स्वाती तुपे, पल्लवी मोरे, अकबर शेख व राहुल ढमढेरे यांचे पथकाने केली.

निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या…-माजी आमदार मोहन जोशी

पुणे : पुणे विभागात चार हजारहून जास्त मतदान यंत्रे नादुरुस्त असल्याची माहिती उघड झाली आहे. ही परिस्थिती पहाता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर (मतपत्रिकेवर) घ्याव्यात, अशी मागणी माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी राज्य निवडणूक आयुक्तांकडे आज (शुक्रवारी) केली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुमारे चार, पाच वर्षांनी होत आहेत. ते सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने, राज्य सरकारला निवडणुका घ्या, असा आदेश दिल्याने होणार आहेत. सत्ताधारी भाजप सरकारला अपयशाची भीती वाटत असल्याने ते निवडणुका पुढे ढकलण्याच्याच प्रयत्नात आहेत. या निवडणूक यंत्रणेत गडबडी होऊ नयेत, यासाठी काँग्रेस पक्ष लक्ष ठेवून आहेच, असे मोहन जोशी यांनी पत्रात म्हटले आहे.

पुण्यासह पुणे विभागातील पाच जिल्ह्यांत साडेचार हजार मतदान यंत्रे (ईव्हीएम मशीन) नादुरुस्त असल्याची माहिती उघड झाली आहे. अशी नादुरुस्त यंत्रे दुरुस्त करून मतदान घेतले जाणार आहे. पण, या पद्धतीबद्दलच आम्हाला शंका आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी ‘वोट चोरीचे’ घोटाळे अलीकडेच पुराव्यानिशी उघड केले आहेत. निवडणूक आयोग त्यावर समाधानकारक उत्तर देऊ शकलेले नाही, अशा पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्हाला ईव्हीएम मशीनवर नकोतच, बॅलेट पेपरवरच व्हाव्यात, अशी स्पष्ट मागणी मोहन जोशी यांनी केली आहे.

‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमांद्वारे अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न – रुपाली चाकणकर

0

जनसुनावणीत महिलांच्या ६८ तक्रारींवर कार्यवाही

नागपूर, : लग्नसंस्था ही आपल्या भारतीय समाजाचा पाया आहे. ती टिकवण्यासाठी घटस्फोटांच्या वाढत्या प्रमाणावर गंभीरपणे काम करणे आवश्यक आहे. त्यामुळे लग्नानंतर वाद झाल्यास होणाऱ्या समुपदेशनाबरोबरच लग्नाच्याआधी, तरुण वर्गाचे विवाहपूर्व समुपदेशन यावर भर देणे आवश्यक आहे.  येत्या काळात राज्य महिला आयोग विवाहपूर्व समुपदेशन केंद्राबाबत अग्रक्रमाने काम करणार असल्याचे  राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी आज येथे सांगितले

राज्य महिला आयोगाच्या वतीने ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत महिलांच्या समस्या व तक्रारींचा निपटारा करण्यासाठी सदर येथील जिल्हा नियोजन भवन येथे जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे, जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर, जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी., जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव ॲड. प्रवीण उन्हाळे, महिला व बालविकास विभागीय उपायुक्त दत्तात्रय मुंडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील मेसरे यांच्यासह संबंधित वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, समुपदेशक, तक्रारदार, पॅनलमध्ये समाविष्ट विधीतज्ञ, पोलीस अधिकारी, सेवाभावी संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

राज्य महिला आयोगाचे मुख्यालय मुंबईत आहे. राज्यातील कानाकोपऱ्यातल्या महिलांना आर्थिक, सामाजिक तसेच विविध कारणांमुळे मुंबईत येणे शक्य होत नाही. तेव्हा त्यांच्या तक्रारी ऐकण्यासाठी, मदत करण्यासाठी आयोगच जिल्हास्तरावर जात असतो. जिल्हास्तरावरच महिलांच्या तक्रारींचे निराकरण करण्याकरीता प्रत्येक जिल्ह्यात  महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमांतर्गत जनसुनावणीचे आयोजन करण्यात येत आहे. जनसुनावणीमुळे वेळ वाचून खर्चाची बचत होण्यासोबतच महिलांवर होणा-या अन्याय व अत्याचाराला न्याय मिळेल, असे आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यावेळी म्हणाल्या.

महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमांतर्गत गडचिरोलीपासून जनसुनावणीला सुरुवात करण्यात आली. गेल्या चार वर्षात संपूर्ण महाराष्ट्रात अनेकदा सुनावणी घेण्यात आल्या आहेत. केंद्र आणि राज्य शासनाने महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक चांगले कायदे तयार केले आहेत. महिलांना भक्कमपणे साथ देत देण्याची तसेच महिलांवर होणा-या अन्याय व अत्याचाराला न्याय देण्याची आयोगाची भूमिका आहे. यात महिलांचाही सहभाग महत्वाचा असल्याचे आयोगाच्या अध्यक्ष चाकणकर यावेळी म्हणाल्या.

आजच्या जनसुनावणीदरम्यान एकूण 68 तक्रारी प्रत्यक्ष उपस्थित राहून नोंदवण्यात आल्या. ज्यामध्ये कौटुंबिक स्वरुपाच्या तक्रारींचे प्रमाण सर्वाधिक होते. महिलांच्या तक्रारी निवारणाकरीता आयोजित जनसुनावणीसाठी चार पॅनल तयार करण्यात आले होते. पहिल्या पॅनलमध्ये आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासह जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर, जिल्हा पोलिस अधीक्षक ग्रामीण हर्ष पोद्दार, महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे, नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी., जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव ॲड. प्रवीण उन्हाळे, पोलिस उपायुक्त राहुल माकणीकर यांचा समावेश होता. अन्य पॅनलमध्ये विधीज्ञ, पोलिस अधिकारी, सेवाभावी संस्थेचे प्रतिनिधी महिला व मुलांच्या सहाय्य कक्षाचे समुपदेशक तसेच अन्य अधिकारी, सदस्यांचा समावेश होता. या पॅनलने महिलांच्या समस्या जाणून घेतल्या. ज्या तक्रारींवर आजच कार्यवाही पूर्ण झाली नाही त्यांना योग्य त्या संबंधित यंत्रणांकडे पाठविण्याची शिफारस करण्यात आली असून त्याबाबत आयोग आढावा घेणार आहेत.

जनसुनावनीत महिलांच्या 68 तक्रारी

जनसुनावनीत एकूण 68 तक्रारी दाखल झाल्या. त्यात वैवाहिक व कौटुंबिक स्वरुपाच्या 37 तक्रारींचा समावेश आहे. तसेच सामाजिक स्वरुपाच्या 14, आर्थिक आणि मालमत्ता विषयक 7, कामाच्या ठिकाणी महिलांना होणारा त्रास 8 व इतर स्वरुपाच्या २ तक्रारींचा समावेश आहे. सर्वांची आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि पॅनेलच्या सदस्यांनी आस्थेने विचारपूस केली.

जनसुनावणीस महिलांचा प्रतिसाद

आयोगाच्या या जनसुनावणीस जिल्ह्यातील महिलांनी उपस्थिती दर्शवित चांगला प्रतिसाद दिला. बाहेरून आलेल्या प्रत्येक महिलेस सुरुवातीस कक्षाच्या बाहेर लावण्यात आलेल्या नोंदणी टेबलवरून टोकन नंबर देण्यात आले. त्यानंतर देण्यात आलेल्या पॅनलसमोर उपस्थित राहून महिलांनी आपल्या लेखी तक्रारी, समस्या सादर केल्या. प्रत्येक महिलेचे म्हणणे पॅनल सदस्यांनी आत्मियतेने ऐकून घेतले व त्यावर कार्यवाही केली.

जनसुनावणीसाठी चार पॅनेल

महिलांच्या तक्रारींचे निराकरण करण्याकरीता आयोजित जनसुनावणीसाठी चार पॅनल तयार करण्यात आले होते. या पॅनलमध्ये विधी तज्ञ, पोलीस अधिकारी, सेवाभावी संस्थेचे प्रतिनिधी, महिला व मुलांच्या सहाय्य कक्षाचे समुपदेशक तसेच अन्य अधिकारी, सदस्यांचा समावेश होता. या पॅनलने महिलांच्या समस्या जाणून घेतल्या.

माध्यमांशी साधला संवाद

जनसुनावणीपुर्वी माध्यम प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला. छळ प्रतिबंध कायदा म्हणजेच पॉश कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी सर्व कार्यालयांमध्ये पॉश ऑडिट अनिवार्य करावे अशी मागणी राज्य महिला आयोगाने शासनाकडे केली होती. शासनाने याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन २२ ऑगस्ट २०२५ रोजी शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. यानुसार सर्व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कामासाठी बाहेर पडणाऱ्या ‘ वर्किंग वुमन फोर्स’ ला सुरक्षित वातावरण देणे ही आपली जबाबदारी असल्याचे अध्यक्ष चाकणकर यांनी सांगितले.

रुग्णसेवेचा विचार करून डॉक्टरांनी संप मागे घ्यावा

0

मुंबई, : रुग्णसेवेवर होणाऱ्या परिणामांचा विचार करून राज्यातील डॉक्टरांनी संप मागे घेण्याचे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. रुग्णहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याची वैद्यकीय संघटनेची परंपरा पुढे चालू ठेवावी, अशी अपेक्षाही वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ यांनी  व्यक्त केली आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशन यांना आवाहन करताना मंत्री मुश्रीफ यांनी म्हटले आहे की, विधी व न्याय विभाग व महाधिवक्ता यांच्या अभिप्रायास अनुसरुन, आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (CCMP) उत्तीर्ण करणाऱ्या राज्यातील नोंदणीकृत होमिओपॅथी वैद्यकीय व्यावसायिकांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अधिनियम, १९६५ मधील अनुसूचीच्या नोंद २८ करिता महाराष्ट्र वैद्य‌कीय परिषदेने स्वतंत्र नोंदणी पुस्तक ठेवून दि. २५.०६.२०१४ रोजीच्या शासन अधिसूचनेन्वये केलेल्या सुधारणेची अंमलबजावणी, रिट याचिका क्र.७८४६,७८४७/२०१४ मधील दि.१४.०३.२०१६ चे अंतरिम आदेश व याचिकेच्या अंतिम निर्णयांच्या अधीन राहून करण्याबाबत दि.०५.०९.२०२५ रोजीच्या शासन पत्रान्वये महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेस निर्देश देण्यात आले आहेत. ही बाब न्यायप्रविष्ट असल्याने याबाबत उच्च न्यायालय जो अंतिम निर्णय देईल त्याप्रमाणे राज्य शासन पुढील कार्यवाही करेल. यावास्तव राज्यातील सर्व आरोग्य सेवा सुरळीत चालु राहण्यासाठी पुकारलेला संप मागे घेण्यात यावा, असे आवाहन मंत्री  मुश्रीफ यांनी केले आहे.

होम लोन: आयसीआयसीआय बँकेची ५.२७ कोटी रुपयांची फसवणूक,दोघांवर गुन्हा दाखल

पुणे- बनावट कागदपत्रांच्या आधारे गृहकर्ज घेऊन आयसीआयसीआय बँकेची ५.२७ कोटी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी आयसीआयसीआय बँकेचे क्षेत्रीय प्रमुख अर्जुन अथोली (वय ३९) यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.त्यानुसार मोहम्मद युनुस शरीफ शेख आणि दरिऊस सोलोमन राफत या दोन आरोपींविरोधात भारतीय दंडसंहितेच्या कलम ४२० (फसवणूक), ४०६ (विश्वासघात), ४६७, ४६८ (खोटे दस्तऐवज तयार करणे), ४७१ (बनावट दस्तऐवजांचा वापर करणे) आणि १२० (ब) (गुन्हेगारी कट रचणे) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार जुलै २०२३ ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत घडला. आरोपी मोहम्मद शेख आणि दरिऊस राफत यांनी आयसीआयसीआय बँकेकडे गृहकर्जासाठी अर्ज केला होता. त्यांनी बनावट कागदपत्रे सादर करून ती खरी असल्याचे भासवले आणि बँक अधिकाऱ्यांचा विश्वास संपादन केला.

मोहम्मद शेखने मागील तीन वर्षांचे आयकर विवरणपत्र आणि जमीन खरेदीबाबतची बनावट कागदपत्रे बँकेला दिली होती. या आधारे बँकेने त्याला १४ जुलै २०२३ रोजी पाच कोटी रुपयांचे गृहकर्ज मंजूर केले. ३० सप्टेंबर २०२३ रोजी ही रक्कम पुण्यातील सोपानबाग येथील मालमत्तेचे मालक दरिऊस राफत यांच्या नावाने चेकद्वारे देण्यात आली. मात्र, नंतर ही मालमत्ता प्रेम फतेचंद वजरानी यांच्या नावावर असल्याचे निष्पन्न झाले.

सुरुवातीला काही महिने युनुस शेखने कर्जाचे हप्ते भरले, परंतु मार्च २०२४ पासून त्याने हप्ते भरणे बंद केले. बँकेचे वसुली अधिकारी तपासणीसाठी गेले असता, त्यांना संबंधित मालमत्ता दुसऱ्याच्याच नावावर असल्याचे आढळले. बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन खरेदी केल्याचे भासवून कर्ज घेतल्याचे समोर आले.

सदर मालमत्तेची मालकी प्रेम फतेचंद वजरानी यांची असून, त्यात दोन्ही आरोपींचा कोणताही हक्क नाही. चौकशीदरम्यान, शेखने १९८७ सालातील एका डीडच्या आधारे बनावट कागदपत्रे तयार केली आणि ती खरी असल्याचे भासवून हा आर्थिक व्यवहार केल्याचे उघड झाले आहे. फरासखाना पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

मंत्री आणि अधिकाऱ्यांसाठी वाहन खरेदीची किंमत मर्यादा निश्चित…

0

राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना किंमतीची मर्यादा नाही
मुंबई-सरकारी अधिकारी आणि मंत्र्यांसाठी वाहन खरेदीच्या नियमांमध्ये महाराष्ट्र सरकारने मोठे बदल केले आहेत. अर्थ विभागाने 17 सप्टेंबर 2025 पासून लागू होणारा एक नवीन शासन निर्णय जारी केला आहे, ज्यानुसार आता मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या वाहन खरेदीसाठी खर्चाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. यापूर्वीचे सर्व संबंधित आदेश रद्द करण्यात आले आहेत. मात्र, राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या वाहनांच्या खरेदीवर कोणतीही किंमत मर्यादा ठेवण्यात आलेली नाही.

वाहन उत्पादन खर्च, वाढती महागाई आणि बीएस-6 (BS-VI) मानकांची नवीन वाहने यांच्या वाढलेल्या किमती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. या नवीन नियमांमुळे सरकारी खर्चावर नियंत्रण आणण्यास मदत होणार असून, वाहनांच्या खरेदी प्रक्रियेत अधिक स्पष्टता येणार आहे. या निर्णयामुळे प्रशासनात आर्थिक शिस्त आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे.

राज्य सरकारच्या नवीन नियमानुसार, सरकारी अधिकारी आणि मंत्र्यांच्या वाहन खरेदीसाठी खर्चाची मर्यादा ठरवण्यात आली आहे. या मर्यादेमध्ये जीएसटी, वाहन कर आणि नोंदणी शुल्क यांचा समावेश नाही. या नियमानुसार, राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांच्या वाहनांसाठी कोणतीही किंमत मर्यादा नाही, तर मंत्री आणि मुख्य सचिवांना 30 लाखांपर्यंतचे वाहन घेता येणार आहे. त्याचप्रमाणे, अपर मुख्य सचिव आणि प्रधान सचिवांना 25 लाख, तर राज्य माहिती आयुक्त आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांना 20 लाखांपर्यंतच्या गाड्या घेता येतील. राज्यस्तरीय विभागप्रमुख, आयुक्त, महानिदेशक आणि विभागीय आयुक्त यांच्यासाठी 17 लाखांची मर्यादा असून, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांना 15 लाखांपर्यंतचे वाहन घेता येणार आहे. इतर अधिकाऱ्यांसाठी ही मर्यादा 12 लाख निश्चित करण्यात आली आहे, पण यासाठी राज्य वाहन पुनरावलोकन समितीची मंजुरी आवश्यक असेल.

महाराष्ट्र शासनाच्या ईव्ही पॉलिसी-2025 नुसार, सरकारी अधिकाऱ्यांना त्यांच्यासाठी निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा 20 टक्के अधिक किमतीचे इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याची मुभा देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना 12 लाख रुपयांपर्यंतचे मल्टी-युटिलिटी व्हेईकल (MUV) खरेदी करण्याची परवानगी असेल, असेही या धोरणात स्पष्ट करण्यात आले आहे.

सरकारी वाहने खरेदी करण्यापूर्वी जुन्या वाहनाला ‘महावाहन’ प्रणालीत अधिकृतपणे स्क्रॅप घोषित करणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. हा नवीन नियम केवळ शासकीय विभागांपुरता मर्यादित नसून, सर्व स्वायत्त संस्था, सरकारी कंपन्या, मंडळे आणि महामंडळांनाही लागू असेल. सर्व विभागप्रमुखांना या नियमांचे काटेकोर पालन करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे, जेणेकरून वाहन खरेदी आणि विल्हेवाट लावण्याच्या प्रक्रियेत सुसूत्रता येईल.

नवीन धोरणानुसार, राज्यपाल यांच्यासारख्या सर्वोच्च संवैधानिक पदासाठी त्यांच्या ताफ्यात लक्झरी गाड्यांचा समावेश कायम ठेवण्यात आला आहे. तर, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी त्यांच्या रँकनुसार एसयूव्ही किंवा मध्यम आकाराची वाहने वापरतील, ही आधीपासून असलेली पद्धत नव्या नियमावलीतही कायम ठेवण्यात आली आहे. या निर्णयामुळे सरकारी यंत्रणेतील वाहन खरेदी प्रक्रिया अधिक पारदर्शक होईल आणि वाढत्या तांत्रिक व पर्यावरणीय निकषांशी सुसंगत वाहनांची खरेदी करणे शक्य होईल.

पुण्यात रंगणार भारतातील सर्वात मोठी तंत्रज्ञान स्पर्धा- रोबोटेक्स इंडिया स्पर्धेचे आयोजन

पुणे, : तंत्रज्ञान, सर्जनशीलता आणि नवोन्मेषाचा भव्य उत्सव म्हणून रोबोटेक्स इंडिया नॅशनल चॅम्पियन येत्या २० आणि २१ सप्टेंबर रोजी पुण्यातील MIT-ADT विद्यापीठ, लोणी काळभोर येथे रंगणार आहे. देशभरातून ७ हजारांहून अधिक विद्यार्थी आणि ५०० हून अधिक रोबोट्सच्या सहभागाने ही स्पर्धा यंदा ऐतिहासिक ठरणार आहे. शासकीय शाळा, खाजगी संस्था तसेच वंचित समाजघटकातील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होत आहेत. विशेष म्हणजे, यावर्षीच्या स्पर्धेत ग्रामीण आणि आदिवासी भागातील ५० टक्क्यांहून अधिक विद्यार्थी सहभागी होत असल्याने STEM आणि रोबोटिक्स शिक्षणाला खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक व्यासपीठ मिळाले आहे.

दोन दिवसीय या महोत्सवात लाईन फॉलोअर, मेझ सॉल्व्हर, मिनी सुमो, ड्रोन एव्हिएशन, फोल्क रेस तसेच बहुचर्चित एंटरप्रेन्युअरशिप चॅलेंज अशा विविध रोमहर्षक स्पर्धांचा समावेश आहे. १२ लाख रुपयांपर्यंत पारितोषिक निधी असलेल्या या स्पर्धेत विजेत्यांना केवळ पदक आणि ट्रॉफीच नव्हे, तर युरोपातील एस्टोनियामध्ये होणाऱ्या २०२५ च्या रोबोटेक्स इंटरनॅशनल चॅम्पियनमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.

रोबोटेक्स इंडिया ही केवळ स्पर्धा नाही तर विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीचा उत्सव आहे. गाव, शहर, खेड्यातील मुले तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जेव्हा समस्यांचे निराकरण करतात, तेव्हा ‘विकसित भारत’ घडण्याचे दर्शन घडते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर आणि डिजिटल भारताच्या दृष्टीकोनाशी सुसंगत राहून, ही स्पर्धा भारताच्या तरुण नवोन्मेषकांना जागतिक स्तरावर घेऊन जाण्याचे काम करते,” असे रोबोटेक्स इंडियाच्या संचालिका पायल राजपाल यांनी सांगितले.

या स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे “Girls Who Build Robots” या उपक्रमाद्वारे हजारो मुलींना STEM क्षेत्रात आत्मविश्वासाने पुढे येण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.

वीजग्राहकांचे समाधान हे महावितरणच्या अभियंत्यांचे कर्तव्य अन् परमार्थ; राष्ट्रीय अभियंता दिन उत्साहात

0

मुंबई,: मूलभूत गरज बनलेल्या वीजक्षेत्रामध्ये महावितरण अभियंत्यांच्या कामगिरीचा उज्ज्वल व ऐतिहासिक वारसा आहे. राज्याच्या प्रगतीमध्ये योगदान देण्यासह अंधारलेल्या वाटा, घरे प्रकाशाने उजळण्याचे भाग्य महावितरणचे अभियंत्यांना मिळाले आहे. वीजजोडणीद्वारे विजेचा लखलखाट झाल्यावर घरगुती, शेतकरी, औद्योगिक, व्यावसायिक व इतर ग्राहकांच्या सामाजिक व आर्थिक प्रगतीला सुरवात होते. या सेवेचा ग्राहकांना जो आनंद व समाधान मिळतो तोच खरा परमार्थ आहे आणि ग्राहकांना कायम समाधान देणारी सेवा देणे आपले कर्तव्य आहे असे मार्गदर्शन महावितरणच्या संचालकांनी मनोगतांमधून केले.

भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंती निमित्ताने महावितरणच्या प्रकाशगड मुख्यालयात गुरुवारी (दि. १८) राष्ट्रीय अभियंता दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून संचालक श्री. सचिन तालेवार (प्रकल्प/संचालन), श्री. राजेंद्र पवार (मानव संसाधन), सहव्यवस्थापकीय संचालक श्री. दिलीप जगदाळे (कोकण विभाग), कार्यकारी संचालक सर्वश्री प्रसाद रेशमे, धनजंय औंढेकर, परेश भागवत, भुजंग खंदारे, दत्तात्रेय पडळकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

संचालक श्री. सचिन तालेवार म्हणाले, महावितरणचे अभियंते व कर्मचाऱ्यांनी डोंगरदऱ्या, अतिदुर्गम भागात वीजयंत्रणा उभारून राज्याच्या प्रगतीला वेग दिला आहे. वीजग्राहकांशी प्रकाशाचे नाते जोडले आहे. हे नाते ग्राहकसेवेतून भक्कम व अतूट राहावे यासाठी सामाजिक जबाबदारीच्या जाणीवेने अभियंता म्हणून कार्यरत राहावे.

संचालक श्री. राजेंद्र पवार म्हणाले, कोणत्याही व्यक्तीचा किंवा प्रदेशाचा सामाजिक व आर्थिक विकास हा विजेअभावी शक्य नाही. वीज क्षेत्र अनन्यसाधारण महत्वाचे आहे. या क्षेत्रात काम करताना कंपनीहित व ग्राहकहितासाठी योगदान देत राहणे, ही आपली महत्वाची जबाबदारी आहे. अत्यंत प्रतिकूल व खडतर परिस्थितीत महावितरणचे अभियंते व कर्मचारी वीज सेवा देण्यासाठी ज्या धैर्याने, गतीने, सांघिकतेने काम करतात त्याचाही राज्यात नावलौकिक आहे.

सहव्यवस्थापकीय संचालक श्री. दिलीप जगदाळे म्हणाले, अभियंत्याचा वारसा हा प्राचीन काळातील विश्वकर्मा यांच्यापासून ते डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्यापर्यंतचा आहे. नव तंत्रज्ञानातून हा वारसा सध्याच्या अभियंता पिढीकडूनही आणखी समृद्ध होत आहे. यावेळी कार्यकारी संचालक सर्वश्री प्रसाद रेशमे, धनजंय औंढेकर, परेश भागवत, भुजंग खंदारे, दत्तात्रेय पडळकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपकार्यकारी अभियंता डॉ. संतोष पाटणी यांनी केले व आभार मानले. कार्यक्रमाला क्षेत्रीय मुख्य अभियंते, अधीक्षक अभियंते तसेच मुख्यालयातील अभियंते, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पुणे जिल्हास्तर शालेय बॉक्सिंग स्पर्धेचे उद्घाटन संपन्न

पुणे-

पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्हास्तर शालेय बॉक्सिंग स्पर्धा (१७ वर्षे मुले व मुली) दिनांक १८ व १९ सप्टेंबर २०२५ रोजी जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडियम, भवानी पेठ येथे आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेचे उद्घाटन पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक अविनाश बागवे यांच्या हस्ते झाले.
उद्घाटन सोहळ्यास पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे कार्याध्यक्ष भरतकुमार व्हावळ, उपाध्यक्ष कृष्णदेव क्षीरसागर, कुणाल राजगुरू, शिवछत्रपती पुरस्कार विजेते विजय यादव, राष्ट्रीय तांत्रिक अधिकारी अजित ओसवाल, पुणे शहर संघटनेचे उपाध्यक्ष जीवनलाल निंदाने, पुणे शहर बॉक्सिंग संघटना सचिव विजय गुजर, तसेच पुरंदर तालुका संघटनेचे कार्याध्यक्ष विनोद कुंजीर, राष्ट्रीय खेळाडू विशाल गव्हाणे, ऑफिशियल मनोज यादव उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे महासचिव अभिमन्यू सुर्यवंशी यांनी केले.

या स्पर्धेत पुणे ग्रामीण भागातील तब्बल ७६ खेळाडूंनी सहभाग नोंदवला. यावेळी नुकतीच नोएडा येथे झालेल्या बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित राष्ट्रीय तांत्रिक अधिकारी परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाल्याबद्दल अजित ओसवाल यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

या जिल्हास्तर स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंची निवड येत्या २२ ते २३ सप्टेंबर रोजी पुणे येथे होणाऱ्या विभागीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा (जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडियम, भवानी पेठ) साठी करण्यात येणार आहे.

फडणवीसांच्या बंगल्यात किचन दुरुस्तीसाठी 19.53 लाखाचा सरकारी खर्च

राज्यावर 9.5 लाख कोटींचे कर्ज -रोम जळत आहे आणि निरो बासरी वाजवत आहे

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय बंगल्यात तब्बल 20.47 लाख रुपयांचा सोफा खरेदी करण्यात येणार असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एका पोस्टद्वारे हा दावा केला आहे. राज्यावरील कर्जाचा बोजा 9.5 लाख कोटींवर गेला असताना सरकार अशी उधळपट्टी करत आहे. कदाचित मुख्यमंत्र्यांना हे माहिती नसेल, पण हे असेच सुरू राहिले तर ‘रोम जळत असताना निरो बासरी वाजवत होता’ असाच याचा अर्थ निघेल, असे त्यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नुकतेच वर्षा या आपल्या शासकीय निवासस्थानी शिफ्ट झाले. त्यानंतर आता या बंगल्यात काही डागडुजी केली जात आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इलाखा शहर विभागाने एक ई-निविदा काढली आहे. त्यात मलबार हील मुंबई येथील वर्षा बंगला येथे डबल बेड मॅटर्स, सोफा व इतर कामे करण्यासाठी 20.47 लाख रुपयांची अंदाजित रक्कम ठरवण्यात आली आहे. याशिवाय इतरही काही ठिकाणच्या कामांचा उल्लेख निविदेवर आहे.

आमदार रोहित पवार यांनी एका सोफ्यासारख्या तत्सम गोष्टीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात येत असल्यावर आक्षेप घेतला आहे. ते या प्रकरणी आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की, आज संपूर्ण राज्यात अतिवृष्टीने शेतकरी उध्वस्त झालेला असताना, सरकारकडे पैसे नसल्याने शेतकऱ्यांना मदत, कर्जमाफी दिली जात नसताना, राज्यावरील कर्जाचा बोझा 9.5 लाख कोटींच्या वर गेला असताना मुख्यमंत्र्यांच्या शासकीय घरी म्हणजेच वर्षा निवासस्थानी double bed matress, सोफा यासाठी 20.47 लाख रुपये तर किचन दुरुस्तीसाठी 19.53 लाख असा एकूण 40 लाखाहून अधिक पैसा खर्च केला जात असेल तर यास जनतेच्या पैशाची उतमात म्हणावं की वाढलेली महागाई?

मुख्यमंत्री यांना कदाचित हे माहित नसेल, पण हे असंच चालू राहिलं तर ‘रोम जळत आहे आणि निरो बासरी वाजवत आहे’ असाच त्याचा अर्थ निघेल… मंत्र्यांच्या घरांच्या दुरुस्तीची कामं केली पाहिजेत पण केंव्हा आणि त्यासाठी किती खर्च करावा याचाही ताळमेळ असला पाहिजे ना, असे ते म्हणाले.