Home Blog Page 123

नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे कलावंत गुढी

पुणे : नवीन वर्षात उत्तमोत्तम नाट्य कलाकृतींची निर्मिती व्हावी आणि रसिकांना त्यांचा भरभरून आनंद घेता यावा. कलाकार, तंत्रज्ञ आणि रसिक यांना सांस्कृतिकदृष्ट्या हे वर्ष सुखसमृद्धीचे जावो, अशा शुभेच्छा प्रसिद्ध अभिनेते, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष योगेश सोमण, प्रसिद्‌ध अभिनेते आनंद इंगळे यांनी दिल्या.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे गुरुवारी (दि. १९) कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात दरवर्षीप्रमाणे यंदाही कलावंत गुढी उभारण्यात आली. त्या वेळी सोमण आणि इंगळे यांनी शुभेच्छा दिल्या. ‘गोष्ट इथे संपत नाही’ या कार्यक्रमाचे सादरकर्ते सारंग मांडके, सारंग भोईरकर यांच्यासह नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन, कार्यवाह सत्यजित धांडेकर, उपाध्यक्ष समीर हंपी, कोषाध्यक्ष दीपक गुप्ते, अनुराधा हटकर, गणेश भोसले आदी उपस्थित होते.

प्रास्ताविकात समीर हंपी यांनी उपक्रमाविषयी माहिती विशद केली तर सत्यजित धांडेकर यांनी आभार मानले. कलाकरांचा सत्कार सत्यजित धांडेकर, दीपक गुप्ते, सुनील महाजन, अनुराधा हटकर, गणेश भोसले यांनी केला. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल, योगेश सोमण,  सुनील महाजन यांचा सत्कार आनंद इंगळे यांच्या हस्ते करण्यात आला.

रा.स्व.संघाची – संघ शताब्दीच्या माध्यमातून यशोगाथा मांडत मध्य पुण्यात भव्य शोभायात्रा

हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे गुढीपाडव्यानिमित्त आयोजन ; विविध चित्ररथांचा सहभाग

पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त संघाची यशोगाथा सांगणारा संघ शताब्दी रथ…जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या ३५० व्या पुण्यतिथीनिमित्त विशेष रथ…क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे मराठी शाळा याविषयी माहिती देणारा समरसता रथ, छत्रपती शिवाजी महाराज रथ, सो. क्ष. कासार श्री कालिकादेवी संस्थान, पुणे यांचा रथ अशा एकापाठोपाठ एक आलेल्या चित्ररथांचा सहभाग गुढीपाडव्याच्या मंगलमय सकाळी पुण्यात अनुभवायला मिळाला. याचसोबत पारंपारिक नगारा, ढोल-ताशा पथक, शंख पथक, बँड, मर्दानी खेळ, मल्लखांब, वेत्रचर्म पथक, लहान मुलींचे साहसी आणि धाडसी खेळ इ. या भव्य शोभायात्रेत सहभागी झाले होते.

गुढीपाडव्यानिमित्त हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे शहराच्या मध्यभागात भव्य शोभायात्रेचे आयोजन  करण्यात आले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्ताने यंदाच्या वर्षी संघाचे ज्येष्ठ प्रचारक पंत फडके आणि भाऊराव क्षीरसागर यांच्या हस्ते तांबडी जोगेश्वरी मंदिर येथे गुढी उभारण्यात आली. त्यांच्यासोबत कसबा भागाचे संघचालक प्रशांत यादव, मोतीबाग नगराचे संघचालक शरद चंद्रचूड, मोतीबाग नगराचे कार्यवाह प्रमोद वसगडेकर, अश्विन देवळणकर, प्रदीप कदम इ. मान्यवर उपस्थित होते.

या भव्य दिव्य शोभायात्रेत खा. मेधा कुलकर्णी, आ. हेमंत रासने, नगरसेवक राघवेंद्र (बाप्पू) मानकर, कुणाल टिळक, स्वप्नाली पंडित, स्वरदा बापट, निवेदिता एकबोटे इ. मान्यवर उपस्थित होते. त्याचसोबत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष संजीव जावळे, श्री तुळशीबाग गणपती मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, कोषाध्यक्ष नितीन पंडित, गजानन मित्र मंडळाचे सागर दहिभाते, जोगेश्वरी मंदिराचे बेंद्रे, जिलब्या मारुती मंडळाचे राजाभाऊ धावडे, सो. क्ष. कासार कालिका माता देवस्थान समितीचे भांडेकर, नवनीत मित्र मंडळाचे संतोष फडतरे, अखिल शनिवार पेठ नवरात्र उत्सव समितीचे निलेश खडके, अमर भालेराव, इ. चा उत्स्फूर्त सहभाग होता. यावेळी हिंदू नववर्ष स्वागत समितीचे संयोजक राघवेंद्र मानकर व सहसंयोजक चैतन्य कुसुरकर, यात्रा प्रमुख गौरव पावटेकर, अथर्व दातार यांसह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

एकत्र होऊनिया सारे… गुढी उभारु हिंदुत्वाची असे म्हणत पारंपरिक वेशात सहभागी पुणेकरांनी शहराच्या मध्यभागात भव्य शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभाग घेतला. परिसरातील गणेश मंडळांचाही तितकाच उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ ट्रस्ट, मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग गणपती मंडळ, नवनीत मित्र मंडळ, अखिल शनिवार पेठ नवरात्र उत्सव समिती, कालिका माता देवस्थान समिती, अखिल शनिवार पेठ रामनवमी उत्सव समिती, श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर, ट्रस्ट यांनी देखील सहभाग घेतला. लोकमान्य टिळक पुतळ्यापासून सुरु झालेली शोभायात्रा तुळशीबाग राममंदिर, शनिपार, अप्पा बळवंत चौक मार्गे तांबडी जोगेश्वरी मंदिर पर्यंत काढण्यात आली.  यावेळी गुढी देखील उभारण्यात आली.

‘पिंक रिक्षा’ योजनेत ४०० कोटींचा घोटाळा; महिलांच्या नावावर निकृष्ट ई-रिक्षे थोपवून शासनाची व लाभार्थ्यांची फसवणूक – डॉ. बाबा कांबळेंचा आरोप

पुणे: महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘पिंक रिक्षा’ योजनेत गंभीर तांत्रिक उल्लंघन आणि कोट्यवधींच्या आर्थिक अनियमिततेचा आरोप महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांनी केला आहे. ४०० कोटी रुपयांच्या या निविदा प्रक्रियेत (RFP) नमूद केलेल्या अटींचे सर्रास उल्लंघन करून लाभार्थी महिलांना सुरक्षिततेची कोणतीही खात्री नसलेली निकृष्ट वाहने पुरवण्यात आली आहेत, असा आरोप डॉ. बाबा कांबळे यांनी आज पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आला.

नेमका प्रकार काय?

डॉ. बाबा कांबळे म्हणाले की, “या योजनेअंतर्गत १०,००० महिलांना सक्षम करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, प्रत्यक्षात संबंधित कंपनीने (Kinetic Green) निकृष्ट दर्जाची वाहने देऊन महिलांची फसवणूक केली आहे. 3.98, लाख रुपये किंमत असूनही या रिक्षे साध्या चढणीवरही मागे येतात. एकदा चार्ज केल्यावर ११० किमी चालणे अपेक्षित असताना अवघ्या ७० ते ८० किमीमध्ये बॅटरी संपते. अनेक रिक्षेंना तर अद्याप RTO पासिंगही मिळालेले नाही. हा थेट ४०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार असून याची CBI किंवा उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी झाली पाहिजे.”

पिंक ‘ऑटो’ ऐवजी ‘ई-रिक्षा’ देऊन फसवणूक: योजनेचे नाव ‘पिंक रिक्षा’ असताना व शासनाचा जो पहिला जीआर आहे त्यामध्ये तीन प्लस वन रिक्षा असा उल्लेख असताना , नंतर टेंडर मध्ये मात्र ई रिक्षाचा उल्लेख करून, टेंडर मध्ये मोठा घोळ करण्यात आला आहे,.

महिलांना व्यावसायिक दृष्ट्या सक्षम “L 5 , ‘ऑटो रिक्षा’ मिळणे अपेक्षित होते, परंतु त्यांना अत्यंत कमी क्षमतेच्या L 3,’ई-रिक्षा’ देण्यात आल्या. यामुळे महिलांना रस्त्यावर व्यवसाय करणे अशक्य झाले असून, कमाई शून्य आणि बँकेचे हप्ते मात्र सुरू, अशा कात्रीत त्या अडकल्या आहेत.

या रिक्षांमुळे आमच्या आयुष्य उध्वस्त झाले.

यावेळी उपस्थित पीडित महिलांनी रडत आपले अनुभव कथन केले. “स्वावलंबनाचे स्वप्न दाखवून भंगार गाड्या आमच्या गळ्यात मारल्या,” अशी संतप्त भावना त्यांनी व्यक्त केली. शासनाने पुढील १५ दिवसांत या प्रकरणाची दखल घेऊन तांत्रिक ऑडिट करावे आणि आम्हाला रिचार्ज चेंज करून ठेवा,L5, ऑटो रिक्षा मिळाव्यात आणि दोषींवर कारवाई करावी, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र रिक्षा पंचायत संस्थापक अध्यक्ष गोरगरीब कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा पिंक रिक्षा चालक महिलांनी पत्रकार परिषदेमध्ये दिला.

योजनेतील तांत्रिक व टेंडर घोटाळ्याचे प्रमुख मुद्दे (Technical Highlights):
शासकीय निविदा (RFP No: CWCD/WD/01/2024) आणि प्रत्यक्ष पुरवलेली वाहने यात खालील गंभीर तफावत आढळली आहे:

  • आर्थिक तफावत: बाजारात उपलब्ध असलेल्या दर्जेदार ई-रिक्षेंच्या तुलनेत या रिक्षेची किंमत बाजार भाव मूल्य दोन लाखापेक्षा अधिक कमी असताना, प्रत्यक्ष मात्र (₹३,९८,००३) जवळपास दुप्पट आकारून सरकारी तिजोरीची लूट करण्यात आली.
  • बॅटरी व रेंज: टेंडरनुसार १०० Ah क्षमतेची बॅटरी अनिवार्य आहे, मात्र प्रत्यक्षात कमी क्षमतेची बॅटरी दिल्याने अपेक्षित ११० किमी ऐवजी केवळ ७० ते ८० किमीच रेंज मिळत आहे.
  • सुरक्षा मानके (AIS-156): ई-रिक्षेसाठी अनिवार्य असलेली बॅटरी सुरक्षा मानके पूर्ण केलेली नाहीत, ज्यामुळे उन्हाळ्यात बॅटरीला आग लागण्याचा धोका वाढला आहे.
  • चढणीची क्षमता (Gradeability): नियमानुसार ७ डिग्री चढण चढणे आवश्यक आहे, परंतु या रिक्षे पुलावर अर्ध्यावरच बंद पडतात, जो प्रवाशांच्या व महिलांच्या जीवाशी खेळ आहे.
  • बॉडी व मजबुती: ३५० किलो म्हणजेच L5 कॅटेगरी वजनाचे निकष असताना गाड्या अत्यंत हलक्या “L3,पत्र्याच्या आहेत, ज्याचा अपघात झाल्यास मोठा धोका संभवतो. ई रिक्षाचे सतत अपघात होत आहे ,अनेक महिला रिक्षा पलटी होऊन अपघातामध्ये जखमी झाल्या आहेत,
  • कायदेशीर अडथळे: ARAI/ICAT प्रमाणपत्राच्या अभावामुळे शेकडो रिक्षेंची RTO नोंदणी रखडली असून महिलांना रस्त्यावर दंड भरावा लागत आहे.

स्वारगेट–कात्रज मेट्रोचा विस्तार शिवापूर टोलनाका ते प्रस्तावित रिंगरोडपर्यंत : शहर सुधारणा समितीची महत्त्वपूर्ण शिफारस

नगरसेविका वर्षा तापकीरांची मागणी पूर्ततेच्या दिशेने मार्गस्थ

पुणे: पुणे शहराच्या वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडवून आणणारा स्वारगेट–कात्रज मेट्रो मार्ग पुढे शिवापूर टोलनाका परिसरातून प्रस्तावित रिंगरोडपर्यंत वाढविण्याच्या महत्त्वपूर्ण प्रस्तावास पुणे महानगरपालिकेच्या शहर सुधारणा समितीने आज झालेल्या बैठकीत मंजुरी दिली असून अंतिम निर्णयासाठी हा प्रस्ताव मुख्य सभेकडे शिफारस करण्यात आला आहे.

याबाबत बोलताना शहर सुधारणा समितीच्या अध्यक्षा स्मिता वस्ते यांनी सांगितले की, “दक्षिण पुणे, कात्रज परिसर तसेच शिवापूर टोलनाका आणि प्रस्तावित रिंगरोडलगत झपाट्याने वाढणारी वसाहत व वाढता वाहतूक ताण लक्षात घेता मेट्रो विस्तार अत्यंत आवश्यक आहे. या प्रकल्पामुळे नागरिकांना जलद, सुरक्षित व पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहे.”

त्या पुढे म्हणाल्या की, “प्रस्तावित रिंगरोडशी मेट्रोचे प्रभावी कनेक्टिव्हिटी निर्माण झाल्यास शहरातील वाहतूक वितरण अधिक संतुलित होईल आणि भविष्यातील शहरी नियोजनाला मोठी चालना मिळेल.”

या विस्तारामुळे कात्रजच्या पुढील भाग, शिवापूर टोलनाका परिसर तसेच रिंगरोडलगतच्या विकसित होत असलेल्या भागांना मोठा फायदा होणार असून खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होणार आहे.

शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून शहर सुधारणा समितीने सदर प्रस्तावास मंजुरी देऊन अंतिम मान्यतेसाठी तो मुख्य सभेकडे शिफारस केला आहे,अशी माहिती समितीकडून देण्यात आली.

विमाननगरमध्ये प्रथमच सामूहिक गुढी उभारणीचा सोहळा उत्साहात संपन्न

पुणे: गुढीपाडव्याच्या निमित्ताने ‘मराठी माझा अभिमान असोसिएशन, विमाननगर’ यांच्या वतीने आयोजित सामूहिक गुढी उभारणीचा सोहळा दत्त मंदिर चौक येथे उत्साहात पार पडला. सकाळी ९ ते ११ या वेळेत झालेल्या या कार्यक्रमाला वरिष्ठ पोलिस अधिक्षक विमानतळ पोलिस स्टेशन गोविंद जाधव सर, माजी नगरसेवक अर्जुन जगताप,सामाजिक कार्यकर्त्या मीना काकी सातव,उद्योग पती श्रीराम माने इत्यादी मान्यवर उपस्थित होते. तसेच नागरिकांचा मोठ्या संख्येने प्रतिसाद लाभला. विशेष म्हणजे, प्रथमच संस्थेतील पुरुष सभासदांनी कार्यक्रमाचे नियोजन व आयोजनात सक्रिय सहभाग घेतला.
पारंपरिक वेशभूषेत गुढी उभारून विधीपूर्वक पूजा करण्यात आली. शंखनादाने वातावरण मंगलमय झाले असून सर्व वयोगटातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामागे कार्यकारिणी सदस्यांचे नियोजन व समन्वय महत्त्वाचा ठरला. स्नेहा सांडभोर अनिता लोखंडे, रेखा वाबळे, वृषाली मिरजगावकर, मुक्ताताई जगताप, ॲड. नीलिमा चव्हाण आणि अश्विनी देसाई कार्यकारणी सदस्य तसेच संस्थेचे सभासद प्रशांत देशपांडे यांच्या योगदानाने कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला. संस्थेच्या या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले. कार्यकर्मा दरम्यान दरवर्षी हा कार्यक्रम करावा अशी अपेक्षा सर्वांनी व्यक्त केली.
अशा प्रकारे मोठ्या थाटामाटात मराठी नववर्षाच्या स्वागताचा सोहळा पार पडला.

एमआयटी एडीटी विद्यापीठ–रायन समूहात शैक्षणिक सहकार्याचा करार

विद्यार्थ्यांना नवोन्मेष, डिझाईन व तंत्रज्ञानाधारित शिक्षणाची नवी दारे खुली
पुणे : एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ, लोणी-काळभोर, पुणे आणि रायन आंतरराष्ट्रीय संस्था समूह यांच्यात शैक्षणिक सहकार्य, नवोन्मेषाधारित शिक्षण आणि विद्यार्थ्यांना अनुभवात्मक शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. एमआयटी शैक्षणिक संकुलातील इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनच्या प्रा. एच. के. व्यास सभागृहात दोन्ही संस्थांच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा करार औपचारिकरीत्या संपन्न झाला.

या सहकार्याद्वारे शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षण यांमध्ये शैक्षणिक दुवा निर्माण करण्यावर भर देण्यात येणार असून, डिझाईन थिंकिंग, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष यांचा प्रारंभिक शिक्षणात समावेश करण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. त्यामाध्यमातून कार्यशाळा, प्राध्यापकांचे मार्गदर्शन, शैक्षणिक भेटी तसेच एमआयटी एडीटी विद्यापीठातील मेकर्स्पेस व इनोव्हेशन लॅब्ससारख्या आधुनिक सुविधा विद्यार्थ्यांसाठी खुल्या करण्यात येणार आहेत.

या कार्यक्रमास रायन इंटरनॅशनल ग्रुपतर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद शर्मा, समूहाच्या शैक्षणिक बाबींच्या उपाध्यक्षा निधी थापर, उपाध्यक्ष तथा व्यवसाय प्रमुख जॉन अ‍ॅलेक्स उपस्थित होते. एमआयटी एडीटी विद्यापीठातर्फे प्र-कुलगुरू डॉ. नचिकेत ठाकूर, सहयोगी अधिष्ठाता डॉ. दंडेश्वर बिसोयी, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. महेश चोपडे यांच्यासह इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनचे सर्व प्राध्यापक यावेळी उपस्थित होते.

रायन इंटरनॅशनल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स ही देशातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था असून, देशातील २० राज्ये व ४० शहरांमध्ये १५० हून अधिक शाळांद्वारे सुमारे २.५ लाख विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहे. शैक्षणिक गुणवत्ता, व्यक्तिमत्त्व विकास आणि क्रीडा, कला, नेतृत्व व सामाजिक सहभाग यांसारख्या सहशैक्षणिक उपक्रमांद्वारे सर्वांगीण शिक्षण देण्यासाठी ही संस्था ओळखली जाते.

यावेळी विनोद शर्मा म्हणाले, “उत्कृष्ट शिक्षण हे केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित नसून विद्यार्थ्यांना व्यापक अनुभव देणे तितकेच महत्त्वाचे आहे. एमआयटी एडीटी विद्यापीठासोबतचे हे सहकार्य विद्यार्थ्यांना डिझाईन, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष यांचा प्रत्यक्ष अनुभव देणारे ठरेल. या भागीदारीमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळेल, याचा आम्हाला अभिमान आहे.”

याप्रसंगी बोलताना डॉ. नचिकेत ठाकूर म्हणाले, “विद्यापीठाचे कार्याध्यक्ष डॉ. मंगेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या सामंजस्य करारातून दोन्ही संस्थांची भविष्योन्मुख, सर्जनशील व कौशल्याधारित शिक्षण देण्याची सामायिक दृष्टी स्पष्ट होत असून, विद्यार्थ्यांना डिझाईन-आधारित समस्या निराकरण पद्धती आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा लवकर परिचय मिळणार आहे. बदलत्या जागतिक करिअर संधींसाठी विद्यार्थ्यांना सक्षम करण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.”
विश्वशांती प्रार्थनेने सुरू झालेल्या या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रन्शिल मल्होत्रा यांनी परिश्रम घेतले.

राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षणासाठी माजी सैनिकांची आवश्यकता

पुणे, दि. 20 : समग्र शिक्षा अभियानांतर्गत राज्यातील २१ हजार २७९ शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता ६ वी ते १२ वीतील मुलींसाठी ‘राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम’ राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाअंतर्गत स्वसंरक्षण, जीवनकौशल्य, योगा, सैनिकी प्रशिक्षण व प्रेरणादायी व्याख्याने यांचा समावेश करण्यात आलेला आहे.
सदर प्रशिक्षणाची अंमलबजावणी M/s. Indus Edutrain Private Limited यांच्यामार्फत करण्यात येत असून, राज्यातील शाळांमध्ये सैनिकी प्रशिक्षण देण्यासाठी माजी सैनिकांची आवश्यकता आहे.
यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात नोंदणीकृत माजी सैनिकांची यादी संबंधित संस्थेला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. इच्छुक माजी सैनिकांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे येथे आपली नोंद करावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी प्रोजेक्ट मॅनेजर श्री. प्रफुल हिवाळे (मो. ८६५७४६८७९५) किंवा ईमेल bd.edu@indusecutrain.com वर संपर्क साधावा.

अग्निवीर सैन्य भरती (पुरुष) – २०२७ साठी ऑनलाइन नोंदणी सुरू

पुणे, दि. 20 : अग्निपथ योजनेअंतर्गत वर्ष २०२७ साठी अग्निवीर भरती प्रक्रियेकरिता अविवाहित पुरुष उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. याबाबतची अधिसूचना www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ऑनलाइन नोंदणीची मुदत १ एप्रिल २०२६ अशी असून सामाईक प्रवेश परीक्षा जून २०२६ मध्ये होण्याची शक्यता आहे.
पुणे भरती कार्यालय (मुख्यालय) कार्यक्षेत्रातील अहिल्यानगर, बीड, लातूर, धाराशिव, पुणे व सोलापूर जिल्ह्यांतील पात्र उमेदवारांनी ०१ एप्रिल २०२६ पूर्वी ऑनलाइन नोंदणी करून अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

अशोक खरातची सुमारे २०० कोटींची संपत्ती

नाशिक-येथील बलात्कार प्रकरणात अटकेत असलेल्या अशोक खरात उर्फ ‘कॅप्टन’ याच्या संपत्तीची चौकशी सुरू असून, तपासात त्याच्याकडे कोट्यवधींची मालमत्ता असल्याचे उघड झाले आहे. घर व फार्महाऊस झडतीत पिस्तूल, काडतुसे आणि रोकड सापडली. नाशिक, सिन्नर व इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमिनी, फार्महाऊस व मालमत्ता आढळली. अंकशास्त्राच्या माध्यमातून प्रभाव निर्माण करत सुमारे २०० कोटींची संपत्ती जमवल्याचा अंदाज आहे. SIT तपास सुरू आहे.
भोंदुबाबा अशोक खरातच्या आतापर्यंत बाहेर आलेल्या संपत्तीचा तपशील

🔸 अंदाजे 150 कोटी रुपये बाजारमूल्य असलेली नाशिकमधील पाथर्डी येथे 30 एकर जमीन

🔸2 कोटींवर किंमत असलेली सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी मीरगाव येथे 45 एकर जमीन

🔸30 कोटींहून अधिक बाजारभाव असलेले खरेदीखत, पत्नी आणि दोन मुलींच्या नावे पाथर्डी, गौळाणे शिवारात स्वतंत्र जमिनीचे खरेदीखत

🔸10 कोटींवर किंमत असलेलं सिन्नर तालुक्यातील मीरगाव येथे मंदिराच्या मागे भव्य फार्महाऊस

🔸 अंदाजे 2 कोटी रुपये इशान्येश्वर मंदिर ट्रस्टची वर्षाला उलाढाल

🔸अंदाजे 5 कोटीच्या ओझर विमानतळाजवळ, जानोरी, दहावा मैल भागात जमिनी

🔸 अंदाजे 5 कोटीचा कर्मयोगीनगरचा बंगला, तर कॅनडा कॉर्नरचे ऑफिस 1 कोटीचे

🔸याव्यतिरिक्त शिर्डी येथे अतिशय मोक्याच्या ठिकाणी शेतजमीन आहे. या जमिनीची किंमतही करोडोंमध्ये आहे.

देवकर, भोसेकर, कुमार, गगन मलिक यांना ‘पद्मपाणी पाली राष्ट्रीय गौरव पुरस्कार’

0

पुणे : अखिल भारतीय पाली साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पाली भाषेत उल्लेखनीय व अतुलनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना ‘पद्मपाणी पाली राष्ट्रीय गौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये डॉ. महेश देवकर, अतुल भोसेकर, प्रा.बिमलेंद्र कुमार तसेच आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म प्रसारक गगन मलिक यांचा समावेश आहे.

रविवार, दिनांक २२ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता भवानी पेठ येथील सावित्रीबाई फुले सभागृहात होणाऱ्या दुसऱ्या अखिल भारतीय पाली साहित्य संमेलनात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते हा गौरव सोहळा पार पडणार असल्याची माहिती संमेलनाचे आयोजक राहुल डंबाळे व स्वागताध्यक्ष डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी दिली.

पाली भाषेच्या संवर्धन व प्रसारासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्याच्या उद्देशाने ‘पद्मपाणी पाली राष्ट्रीय गौरव पुरस्कार’ सुरू करण्यात आला असून, यंदाचे हे पहिलेच वर्ष आहे. पाली भाषेत अद्वितीय योगदान देणाऱ्या मान्यवरांची निवड करून त्यांना हा सन्मान प्रदान केला जात आहे.

या पुरस्कारामध्ये स्मृतिचिन्ह, गौरवपत्र आणि रोख रक्कम असा समावेश असून, संमेलनाच्या माध्यमातून पाली भाषेच्या अभ्यासकांना आणि संशोधकांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आयोजकांकडून करण्यात येत आहे.

बाटलीबंद पाणी व्यवसायात गुंतवणुकीच्या आमिषाने 2 कोटींची फसवणूक

पुणे-पुण्यात बाटलीबंद पाणी व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष दाखवून एका पेट्रोल पंप व्यावसायिकाची २ कोटी ३४ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.याबाबत हडपसर परिसरातील हांडेवाडी येथे राहणाऱ्या एका व्यावसायिकाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी हे हडपसर भागातील रहिवासी असून त्यांचे वस्त्रदालन आहे. आरोपी आणि फिर्यादी व्यावसायिक एकमेकांच्या ओळखीचे होते.

आरोपींनी फिर्यादीला बाटलीबंद शुद्ध पाणी विक्री व्यवसायात गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल, असे आमिष दाखवले. यानुसार, १७ फेब्रुवारी २०२५ रोजी त्यांच्यात भागीदारी करार झाला. या व्यवसायात गुंतवणुकीच्या नावाखाली फिर्यादीकडून १ कोटी ७८ लाख ७५ हजार रुपये घेण्यात आले.

जून ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत बाटलीबंद पाणी विक्री व्यवसायातून मिळालेले ५५ लाख ४८ हजार रुपये आरोपींनी स्वतःच्या बँक खात्यात जमा करून घेतले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पेट्रोल पंप व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिली. लोणी काळभोर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, सहायक पोलीस निरीक्षक बाबर पुढील तपास करत आहेत.

लंडनमध्ये 2 भारतीय रस्त्यावर पान खाऊन थुंकले:दीड लाख रुपयांचा दंड ठोठावला

लंडनच्या ब्रेंट परिसरात सार्वजनिक ठिकाणी पान थुंकल्याप्रकरणी भारतीय वंशाच्या दोन व्यक्तींना 1,391 पाउंड (सुमारे 1.45 लाख रुपये) दंड ठोठावण्यात आला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोन्ही व्यक्तींना पहिल्यांदाच 100 पाउंड दंड भरण्यास सांगितले होते, परंतु त्यांनी तो भरला नाही. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात पोहोचले आणि दंड अनेक पटींनी वाढला.

ब्रेंट सिटी कौन्सिलने पान थुंकण्याविरोधात कठोर मोहीम सुरू केली आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की यामुळे सार्वजनिक जागा अस्वच्छ होतात आणि स्वच्छतेवर खूप खर्च वाढतो. रिपोर्टनुसार, कौन्सिलला दरवर्षी सुमारे 30,000 पाउंड (जवळपास 30 लाख रुपये) फक्त पानाचे डाग साफ करण्यासाठी खर्च करावे लागतात.

पहिले प्रकरण एडग्वेअर परिसरात राहणाऱ्या अक्षीतकुमार भद्रे पटेल यांचे आहे. त्यांनी जून 2025 मध्ये किंग्सबरी रोडवरील एका मेट्रो स्टेशनजवळ पान थुंकले होते. ते कोर्टात हजर झाले नाहीत, त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीतच त्यांच्याविरुद्ध निकाल सुनावण्यात आला. वेळेवर दंड न भरल्यामुळे त्यांची रक्कम 10 पटींहून अधिक वाढली.

दुसरे प्रकरण रुईस्लिप परिसरात राहणाऱ्या हितेश पटेल यांचे आहे. त्यांनी वेम्बली हिल रोडवर पान थुंकले होते. तेही न्यायालयात हजर झाले नाहीत आणि त्यांच्याविरुद्धही गैरहजेरीतच निकाल लागला, त्यामुळे त्यांनाही मोठा दंड ठोठावण्यात आला.

वायव्य लंडनच्या ब्रेंट आणि आसपासच्या परिसरात पान थुंकण्याची समस्या वाढत आहे, ज्यावर स्थानिक प्रशासन कठोर झाले आहे. बीबीसीच्या अहवालानुसार, पानाचे डाग काढणे कठीण आणि महागडे असते, यासाठी खास पद्धतीने स्वच्छता करावी लागते.

कौन्सिलने ‘झिरो टॉलरन्स’ (शून्य सहनशीलता) धोरण अवलंबले आहे. या अंतर्गत जागोजागी इशारा देणारे फलक लावले जात आहेत, अधिकारी गस्त घालत आहेत आणि जागेवरच 100 पाउंडपर्यंतचा दंड आकारला जात आहे.

लैंगिक शोषण आरोपी अशोक खरातचे ५८ नव्हे १०० व्हिडिओ सापडले, SIT च्या तपासात धक्कादायक माहिती

नाशिकच्या बड्या पत्रकारांना कसा लागला नाही थांगपत्ता ? हाही सवाल झाला उपस्थित

नाशिक-येथील लैंगिक शोषण प्रकरणी आरोपी अशोक खरातवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी आता आणखी व्हिडिओ समोर आले आहेत. लैंगिक शोषणाचे ५८ नाहीतर १०० व्हिडिओ असल्याची धक्कादायक बाबत समोर आली आहे.नाशिकमध्ये सुरु असलेल्या एसआयटीच्या बैठकीतील पोलिस सूत्रांची माहिती आहे. आयपीएस तेजस्विनी सातपुतेंच्या उपस्थितीत ही बैठक सुरु आहे. यामध्ये आरोपी कॅप्टन अशो खरातवर लैंगिक शोषणाचे आरोप आहे. खरातच्या झाडाझडतीत 2 लॅपटॉप, 8 लाखांची रोकड, पिस्तुल, जीवंत काडतुसे आणि मालमत्तांची कागदपत्रे मिळाली आहेत. शिर्डी प्रकरणातील आरोपी नीरज जाधवने हे व्हिडीओ काढल्याचा संशय आहे. SIT च्या पथकात नाशिक शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील १२ वरीष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचीही माहिती समोर आली आहे.कॅप्टन खरात प्रकरणात दाखल 3 गुन्ह्यांचा वेगाने तपास सुरु आहे. व्हिडीओतून तांत्रिक विधीच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करत असल्याचं समोर आले आहे.

माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो कामाचा पीएमआरडीए महानगर आयुक्तांकडून ‘ऑन ग्राउंड’ आढावा!

मे २०२६ पर्यंत पहिल्या टप्प्यात १२ स्थानके सुरू करण्याचे उद्दिष्ट!

पुणे : पुणेकर आणि विशेषतः हिंजवडी आयटी पार्कमधील कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची ठरणारी ‘मेट्रो लाईन ३’ आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गिकेवरील पहिल्या टप्प्याचे काम मे २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पीएमआरडीए प्रशासनाने निश्चित केले आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी गुरुवारी (दि. १९) प्रत्यक्ष ‘ऑन ग्राउंड’ जात पाहणी केली, व या प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेतला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार, या प्रकल्पाचे काम आता ‘मिशन मोड’वर सुरू झाले आहे. पीएमआरडीएच्या औंध येथील कार्यालयात बुधवारी झालेल्या बैठकीनंतर, गुरुवारी सकाळी महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह माण ते शिवाजीनगर या मार्गावरील २३ स्थानकांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी महानगर मुख्य अभियंता रिनाज पठाण आणि ‘पीआयटीसीएमआरएल’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार सैनी उपस्थित होते. “कामाचा वेग वाढवताना सुरक्षितता आणि गुणवत्तेशी कोणतीही तडजोड करू नका,” अशा कडक सूचना महानगर आयुक्तांनी कंत्राटदार कंपन्यांना दिल्या आहेत. त्यांनी २३.२ किलोमीटरच्या संपूर्ण मार्गिकेची पाहणी केली. केवळ कागदोपत्री अहवालावर अवलंबून न राहता, त्यांनी प्रत्यक्ष कामाचा दर्जा, तांत्रिक अडचणी आणि स्थानकांची सद्यस्थिती जाणून घेतली. पहिल्या टप्प्यात १२ स्थानके कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्यादृष्टीने कामाला गती देण्याचे निर्देशही महानगर आयुक्तांनी दिले आहेत.

हिंजवडीतील वाहतूक कोंडीमुळे आयटी कर्मचाऱ्यांना होणारा मनस्ताप कमी करण्यासाठी ही मेट्रो धावणे आवश्यक आहे. मेट्रोमुळे खासगी वाहनांवरील ताण कमी होऊन शिवाजीनगर ते हिंजवडी हे अंतर अवघ्या काही मिनिटांत पार करणे शक्य होईल. सध्या प्रकल्पाचे ९४.२० टक्के काम पूर्ण झाले असून, सिग्नलिंगची तांत्रिक चाचणी सुरू आहे. तसेच आरडीएसओ (RDSO) आणि सीएमआरएस (CMRS) तपासणीची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे.

“मे २०२६ पर्यंत १२ स्थानकांचा पहिला टप्पा पूर्ण करण्याचे आमचे लक्ष्य आहे. त्यादृष्टीने सर्व स्थानकांची प्रत्यक्ष पाहणी करून कामाला गती देण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकल्पासाठी ‘पीएमआरडीए’कडून सर्व आवश्यक सहकार्य तत्परतेने दिले जाईल.”

— डॉ. अभिजित चौधरी, महानगर आयुक्त, पीएमआरडीए

प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये:
१. स्वरूप: सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावरील देशातील पहिली मेट्रो.
२. मार्गिका: हिंजवडी ते शिवाजीनगर (२३.२ किमी, उन्नत मार्ग).
३. भागीदार: टाटा समूहाची ‘टीआरआयएल’ (TRIL) आणि सीमेन्स प्रोजेक्ट व्हेंचर्स.
४. एकूण खर्च: ८,३१३ कोटी रुपये.

शहीद भगत सिंग हे मानवतावादी, समतावादी – किरणजीत सिंग

पिंपरी येथे “शहीद भगत सिंग आणि आर्य समाज” विषयावर व्याख्यान

पुणे शहीद भगत सिंग हे मानवतावादी, समतावादी होते. बंदूक आणि तलवारीच्या जोरावर, ब्रिटिशांना भारतातून घालवून खरे स्वातंत्र्य मिळणार नाही, तर पूर्ण व्यवस्थाच बदलली पाहिजे. आत्ताचे स्वातंत्र्य हे भगत सिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद या क्रांतीकारकांच्या स्वप्नातील स्वातंत्र्य नाही. त्यांना जातवाद, धर्मवाद, प्रांतवाद, भ्रष्टाचार मान्य नव्हता. आता होणाऱ्या शेतकरी आत्महत्यांमुळे ते व्यथीत झाले असते. शहीद भगत सिंग यांच्या तीन पिढ्यांना बलिदानाचा इतिहास आहे. २७ सप्टेंबर १९०७ साली भगत सिंग यांचा जन्म झाला. बालपणी त्यांच्यावर गुरुगोविंद सिंग, आर्य समाज संस्थापक महर्षी दयानंद सरस्वती, छत्रपती शिवाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई यांचा प्रभाव होता. आत्ताच्या पिढीने अशा महान क्रांतिकारकांचे चरित्र अभ्यासावे आणि महर्षी दयानंद सरस्वती यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त आर्य समाजाचे विचार पुढे न्यावे असे आवाहन भगत सिंग यांचे पुतणे किरणजीत सिंग यांनी पिंपरी येथे केले.
शुक्रवारी (दि.२० मार्च) पुणे, पिंपरी कॅम्प येथील आर्य समाज भवन येथे “शहीद भगत सिंग आणि आर्य समाज” या विषयावर सिंग यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी पिंपरी आर्य समाज अध्यक्ष सुरेंद्र करमचंदानी, मंत्री हरेश तिलोकचंदानी, सचिव संजय वासवानी, समन्वयक उत्तम दंडीमे, डॉ. नयनकुमार आचार्य, नलिनी देशपांडे, राजाभाऊ गोलांडे, मारुती भापकर, अतुल आचार्य, सुहास पोफळे आदी उपस्थित होते.
शहीद भगत सिंग १२ वर्षाचे असताना ब्रिटिश सरकारने १३ एप्रिल १९१९ रोजी मार्शल लॉ लागू केला. त्यावेळी जालियनवाला बाग येथे जनरल डायर याने हजारो निरपराध नागरिकांवर बेछूट गोळीबार करून त्यांची हत्या केली. या घटनेनंतर भगत सिंग हे लाहोर येथून जालियनवाला बाग येथे आले आणि तेथील माती स्वतःच्या घरी घेऊन गेले. त्यानंतर त्यांनी भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची शपथ घेतली. कानपूर येथे एका वृत्तपत्रात काम करीत असताना चंद्रशेखर आझाद आणि इतर क्रांतीकारकांशी त्यांचा संपर्क झाला. ब्रिटिशांनी नेमलेल्या सायमन कमिशनमध्ये एकही हिंदू प्रतिनिधी नाही. याच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यामध्ये लाला लजपतराय सारख्या ज्येष्ठ क्रांतीकारकांचा बळी गेला. या घटनेमुळे भगतसिंग खूप व्यथीत झाले.
बलिदानाशिवाय संघर्ष पूर्ण होणार नाही. एका भगत सिंगाला फाशी दिली, तरी लाखो भगत सिंग जन्म घेतील आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून देतील यावर त्यांचा विश्वास होता. भगत सिंग, सुखदेव, राजगुरू या क्रांतिकारकांना २४ मार्च १९३१ रोजी फाशी देण्याचे आणि त्यांच्या बरोबरच्या इतर १५ क्रांतीकारकांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. त्यामुळे देशभर तीव्र आंदोलन सुरू झाले. यानंतर ब्रिटिश सरकारने घाबरून भगत सिंग यांना एक दिवस अगोदरच फाशी दिली. फाशी देण्यापूर्वी भगत सिंग यांच्या आईला त्यांची भेट घेऊ दिली नाही आणि इतर कुटुंबीयांना अनेक अटी घातल्या. त्यावेळी पुण्यातून शहीद क्रांतीकारक राजगुरू यांच्या मातोश्री पार्वतीबाई लाहोर तुरुंगात या क्रांतीकारकांना भेटण्यासाठी आल्या होत्या. परंतु भगत सिंग यांच्या आईला भेटू दिले नाही याच्या निषेधार्थ राजगुरू यांच्या आई देखील राजगुरू यांना भेटल्या नाही. देश प्रेमासाठी आणि एका मातेचा सन्मान राखण्यासाठी पार्वतीबाई या मातेने राजगुरू या स्वतःच्या मुलाची अंतिम भेट घेतली नाही. पार्वतीबाई या राष्ट्रप्रेमी मातेला नमन करण्यासाठी आणि त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी पुणे मुक्कामी आलो आहे असे भावूक उद्गार किरणजीत सिंग यांनी काढले.
प्रास्ताविक, स्वागत सुरेंद्र करमचंदानी, सूत्रसंचालन उत्तम दंडीमे आणि आभार अतुल आचार्य यांनी मानले.