Home Blog Page 122

युवा कलाकारांच्या सादरीकरणाने रंगले  पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाचे दुसरे सत्र

पुणे – विविध रागांनी नटलेले शास्त्रीय गायन, मन तल्लीन करणारी पखवाज वादनाची जुगलबंदी आणि रसिकांच्या टाळ्या-वाहव्यांच्या गजरात पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवातील ‘युवोन्मेश’ ही खास युवा कलाकारांची मैफिल रंगली.

तरंगिनी सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि ‘आपला परिसर’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २० व्या पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्राची सुरुवात गायिका डॉ. शर्वरी डिग्रजकर-पोफळे यांच्या सुरेल गायनाने झाली. त्यांनी राग गुजरी तोडीमध्ये विलंबित ख्याल आणि द्रुत बंदिश सादर करत रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या सादरीकरणाला गीत इनामदार, उमेश पुरोहित (तबला) आणि सुकन्या जोशी (तानपुरा) यांनी समर्पक साथ दिली.

यावेळी बोलताना डॉ. शर्वरी डिग्रजकर-पोफळे म्हणाल्या, “या प्रतिष्ठित महोत्सवात सादरीकरणाची संधी मिळणे हे माझे भाग्य असून, हे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे आशीर्वादच आहेत.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋषिकेश रामदासी यांनी केले, तर रश्मी अभिषेकी यांनी प्रास्ताविक केले. त्या म्हणाल्या, “अभिजात संगीताचा प्रचार-प्रसार करण्यासाठी पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी मोठे योगदान दिले आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून भारतीय शास्त्रीय संगीत तरुणांपर्यंत पोहोचावे, यासाठी ‘युवोन्मेश’ हा विशेष विभाग सुरू करण्यात आला आहे.”

या प्रसंगी देवश्री कचरे आणि मंगल गवळी यांच्या हस्ते डॉ. शर्वरी डिग्रजकर-पोफळे यांचा सत्कार करण्यात आला.

दुसऱ्या सत्रात पखवाज वादक पार्थ भूमकर आणि प्रथमेश तारळकर यांनी दमदार पखवाज वादन सादर केले. त्यांच्या प्रत्येक थापेसह मैफिल रंगत गेली आणि सभागृहात भक्तीमय वातावरणाची अनुभूती निर्माण झाली. अथर्व कुलकर्णी (संवादिनी) यांनी त्यांना साथ दिली.

महोत्सवाच्या शेवटच्या सत्रात आसामच्या गायिका श्रुती बुजरबारूआ यांनी अप्रतिम गायन सादर केले. त्यांनी राग शुद्ध सारंगमध्ये ‘धरणी धरोहर’ ही रूपक मध्य तालातील बंदिश सादर करत रसिकांची मने जिंकली. त्यांच्या सादरीकरणाला पार्थ ताराबादकर (तबला) आणि सौमित्र क्षीरसागर (संवादिनी) यांनी समर्थ साथ दिली.

यावेळी भावना व्यक्त करत श्रुती बुजरबारूआ म्हणाल्या, “या महोत्सवात सादरीकरणाची संधी मिळणे हे माझे भाग्य आहे. आसामहून महाराष्ट्रात आल्यानंतर मी पंडित विजय कोपरकर यांच्याकडे गायनाचे शिक्षण घेतले. त्यामुळे पुण्यात सादरीकरण करणे म्हणजे माझ्यासाठी माहेरच्या ठिकाणी संगीत सेवा करण्यासारखे आहे.”

युवा कलाकारांच्या उत्स्फूर्त आणि दर्जेदार सादरीकरणामुळे ‘युवोन्मेश’ मैफिलीने महोत्सवात विशेष रंग भरला.

व्हायरल फोटो खरातच्या मुलीच्या लग्नातील… मात्र, त्यांच्या वैयक्तिक दूषकृत्यांबद्दल मला कोणतीही माहिती नव्हती.

0

केवळ फोटो आले म्हणून आरोप करणे चुकीचे:अशोक खरातसोबतच्या फोटोबाबत दीपक केसरकरांचे स्पष्टीकरण

महिला लैंगिक अत्याचारातील आरोपी भोंदूबाबा अशोक खरात याच्या अटकेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. खरातसोबतचे फोटो व्हायरल झाल्याने टीकेचे धनी ठरलेले माजी मंत्री आणि शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी अखेर या प्रकरणावर मौन सोडले आहे. “अशोक खरातचे कृत्य घृणास्पद असून त्याचा मी निषेधच करतो, मात्र केवळ फोटोंच्या आधारे राजकीय नेत्यांवर आरोप करणे चुकीचे आहे,” असे स्पष्टीकरण केसरकर यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून दिले आहे.

अशोक खरातसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे आणि दीपक केसरकर यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावर स्पष्टीकरण देताना दीपक केसरकर म्हणाले, मी मुंबईच्या बाहेर असल्याने अशोक खरात प्रकरणावर काही खुलासे करु शकलो नाही. त्यामुळे, व्हिडिओच्या माध्यमातून मी माझी भूमिका मांडत आहे.

दीपक केसरकर महणाले, नाशिकमधील ईशान्येश्वर मंदिरासाठी रस्ता बनवण्याच्या संदर्भात अशोक खरात हे एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी माझी त्यांची पहिली ओळख झाली. खरात यांचा खगोलशास्त्रात (Astronomy) चांगला अभ्यास असल्याने माझ्यासारख्या अनेक लोकांची त्यांच्याशी ओळख होती. व्हायरल झालेला दुसरा फोटो त्यांच्या मुलीच्या लग्नातील आहे. मात्र, त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल किंवा कृत्यांबद्दल मला कोणतीही माहिती नव्हती.
या प्रकरणावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला होता. “दीपक केसरकर शिक्षणमंत्री असताना अशोक खरात हा बाबा शिक्षण खात्यात लक्ष घालायचा. बदल्या, बढत्या आणि महत्त्वाची कामे करण्यासाठी हा बाबा केसरकरांना सांगायचा. ‘ट्रायडंट’ हॉटेलमध्ये बसून ही सर्व कामे व्हायची आणि खरातच शिक्षण खाते चालवायचा,” असा खळबळजनक आरोप राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला होता.

संजय राऊतांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना दीपक केसरकर म्हणाले, “संजय राऊत यांचे आरोप पूर्णपणे बिनबुडाचे आहेत. अशोक खरात कधीही माझ्या कार्यालयात किंवा मंत्रालयातील दालनात आलेले नाहीत. त्यामुळे त्यांनी माझे खाते चालवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. माझ्या कार्यकाळात शिक्षण आणि मराठी भाषा विभागात जे ऐतिहासिक निर्णय झाले, ते यापूर्वी कधीही झाले नव्हते. केवळ एखाद्या कार्यक्रमातील फोटोंवरून अशा प्रकारचे गंभीर आरोप करणे राजकीय संस्कृतीला धरून नाही.”

अशोक खरात याला पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाद्वारे (SIT) सुरू आहे. या तपासात खरातच्या राजकीय संबंधांबाबत काही ठोस निष्पन्न होते का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, केसरकर यांच्या या स्पष्टीकरणामुळे या वादाला नवे वळण मिळाले आहे.

खरात फाईल ओपन करा .. चाकणकरसह सर्वांवरच कारवाई करा

पुणे शहर महिला काँग्रेसचे ‘जोडे मारो’ आंदोलन

पुणे : भोंदूबाबा खरात यांच्याशी संबंध असलेल्या मंत्र्यांची त्वरीत चौकशी करा आणि महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकरांना अटक करा, अशा मागणीसाठी पुणे शहर महिला काँग्रेसच्या वतीने आज शनिवारी सकाळी फर्ग्युसन कॉलेज रोड येथे आंदोलन करण्यात आले. या बाबाच्या अनेक गैरकृत्यात सहभागी असलेल्या सर्व मंत्र्यांची त्वरीत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी यावेळी पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा स्वाती शिंदे यांनी केली.

स्वाती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. रूपाली चाकणकर यांनी महिलांच्या चारित्र्याशीच खेळ केला, हा गुन्हा अक्षम्य आहे. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा भंग आणि महिलांचे शोषण केलेल्या खरात या भोंदू बाबाला संरक्षण दिल्याबद्दल रुपाली चाकणकरांना अटक झालीच पाहिजे.त्याचबरोबर बाबाच्या अनेक गैरकृत्यात सहभागी असलेल्या सर्व मंत्र्यांची त्वरीत चौकशी झाली पाहिजे, महाराष्ट्रातील एपस्टीन खरात याची ३० दिवसांत चौकशी करा.

फुले, शाहू, आंबेडकर यांची परंपरा मानणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रुपाली चाकणकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून काढून टाकावे, अशी मागणी स्वाती शिंदे यांनी आंदोलकांच्या वतीने केली.

आंदोलन फर्ग्युसन कॉलेज रोड येथे जोषपूर्ण झाले. ‘मंत्र्यांनो खुर्चा खाली करा’, ‘भोंदूबाबा खरातला कडक शासन करा’, अशा आशयाच्या घोषणांचे फलक आंदोलकांनी हाती घेतले होते. भोंदूबाबा खरात आणि रुपाली चाकणकर यांच्या प्रतिमांना जोडे मारण्यात आले.

पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा स्वाती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात अर्चना शाह, अनिता मकवाना, प्राजक्ता जाधव, रेखा जैन, अंजली सोलापूरे, राजश्री दामले-चव्हाण, रुपाली पवार, मनोरमा चौधरी, कल्पना शिंदे, ज्योती अडागळे, अंजली देसाई, सुवर्णा माने, सुरेखा मारणे, गीतांजली तसेच इतर महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून आंदोलन यशस्वी केले.

भूमी ग्रीन एनर्जीला कचरा प्रकल्प विनानिविदा देण्याचा प्रस्ताव मागे….

पुणे, : देवाची उरुळी येथे ५०० टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी विनानिविदा काढण्यात आलेला प्रस्ताव मागे घेण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी येथे दिली.कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे आणि गटनेते चंद्रकांत कदम यांनी याप्रकरणी आयुक्त नवल किशोर राम यांच्यावर ते दबावाखाली काम करत असल्याचे आरोप केले होते .
स्थायी समितीच्या बैठकीमध्ये ऐनवेळी उरुळी येथील कचरा डेपोच्या आवारात ओल्या कचऱ्यावर ५०० टन क्षमतेचा प्रकल्प करण्याचे काम भूमी ग्रीन एनर्जी या कंपनीला देण्याचा प्रस्ताव ऐनवेळी आणला होता. २० वर्षे ६९० रुपये प्रति टन टिपिंग फी व दरवर्षी १० टक्के वाढ असे या प्रस्तावात नमूद केले होते. परंतु ऐनवेळी बैठकीत काँग्रेस सदस्य प्रशांत जगताप यांनी एवढ्या दीर्घकाळासाठी विनानिविदा प्रस्ताव आणण्यास विरोध करत, तो कार्यपत्रिकेवर घेण्याची मागणी केल्याने हा विषय बारगळला. मात्र, विनानिविदा आणलेल्या या प्रस्तावावरून प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
यासंदर्भात आयुक्त नवल किशोर राम म्हणाले, “हडपसर येथील उघड्यावरील कचऱ्याचा प्रश्न गंभीर झाला असून, याबाबत न्यायालयात खटला सुरू आहे. ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावायची असल्याने तातडीने प्रक्रिया करणे गरजेचे आहे. प्रकल्प उभारण्यासाठी येणारा ४० ते ५० कोटी रुपये खर्च संबंधित ठेकेदारानेच करायचा आहे. परंतु यासाठी १० वर्षे अधिकचे काम देण्याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर कालावधी जास्त होत असल्याचे निदर्शनास आले, त्यामुळे प्रस्ताव मागे घेण्याचा निर्णय झाला होता. परंतु तत्पूर्वीच प्रस्तावावर माझी स्वाक्षरी झाल्याने तो स्थायी समितीमध्ये गेला होता.”

सुप्रिया सुळे यांच्या कन्येचा लग्नमुहूर्त ठरला:पवार कुटुंबात सोहळ्याची लगबग; रेवती सुळे 20 जूनला विवाहबंधनात

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची नात आणि खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. रेवती सुळे आणि नागपूरचे उद्योगपती सारंग लखानी यांचा विवाह 20 जून रोजी मुंबईत पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. या विवाहसोहळ्यामुळे पवार कुटुंबात सध्या आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून तयारीलाही वेग आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा विवाहसोहळा मुंबईतील एका प्रतिष्ठित ठिकाणी भव्य स्वरूपात आयोजित केला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी राज्यातील आणि देशातील अनेक नामांकित राजकीय नेते, उद्योगपती तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पवार आणि लखानी कुटुंबीयांकडून या सोहळ्याची जोरदार तयारी सुरू असून प्रत्येक गोष्ट विशेष ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

विवाहानंतरही विविध ठिकाणी स्वागत समारंभांचे आयोजन करण्यात येणार आहे. पहिला रिसेप्शन मुंबईत पार पडेल, तर वरपक्ष नागपूरचा असल्याने तेथेही खास कार्यक्रम ठेवण्यात येणार आहे. याशिवाय, पवार कुटुंबाचे राष्ट्रीय स्तरावरील महत्त्व लक्षात घेता दिल्लीतही एक भव्य स्वागत समारंभ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा विवाहसोहळा केवळ कौटुंबिक न राहता राजकीय आणि सामाजिक दृष्ट्याही चर्चेचा विषय ठरणार आहे.

सारंग अरुण लखानी हे नागपूरचे रहिवासी असून ते विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असलेल्या अरुण लखानी यांचे सुपुत्र आहेत. सारंग हे केवळ उद्योग क्षेत्रातच नव्हे, तर क्रीडा क्षेत्रातही सक्रिय असून ते एक कुशल बॅडमिंटनपटू आहेत. त्यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या विवाह जुळवण्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मध्यस्थी महत्त्वाची ठरल्याचे सांगितले जाते.

पवार कुटुंबात आनंदाचे वातावरण

रेवती सुळे यांनीलंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून शिक्षण पूर्ण केले आहे. त्या शैक्षणिकदृष्ट्या सक्षम असून बारामती लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी प्रथमच आई सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता. रेवती सुळे आणि विजय सुळे अशी दोन मुले सुप्रिया सुळे यांना आहेत. आता रेवती सुळे यांच्या विवाहामुळे पवार कुटुंबात आनंदाचे वातावरण असून हा सोहळा राज्यातील चर्चेचा प्रमुख विषय ठरत आहे.

भोंदू अशोक खरात प्रकरणात अधिवेशनापूर्वीच SIT:पण अर्धे मंत्रिमंडळ अडकण्याच्या भीतीने प्रकरण दाबण्याचा प्रयत्न, भास्कर जाधवांचा दावा

मुंबई-भोंदू अशोक खरात प्रकरणाच्या चौकशीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच एसआयटी नेमली. पण निम्मे मंत्रिमंडळ यात अडकण्याची शक्यता असल्याने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला, असा खळबळजनक दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे.

नाशिकच्या भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे अवघ्या राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणी अडचणीत सापडलेल्या रुपाली चाकणकर यांनी आपल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आता त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन अटकेची टांगती तलवार उभी राहिली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार भास्कर जाधव यांनी उपरोक्त दावा केला आहे. ते म्हणाले, रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेतला हे चांगलेच झाले. पण हे प्रकरण केवळ त्यांच्यापुरतेच मर्यादित नाही. या प्रकरणात अनेक उच्चपदस्थ अधिकारी आहेत.

भास्कर जाधव म्हणाले, अशोक खरात प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच एसआयटी नेमण्यात आली. पण निम्मे मंत्रिमंडळ यात असल्याने हे प्रकरण बाहेर येऊ द्यायचे नव्हते. केवळ पत्रकार व पीडित महिलेमुळे हे प्रकरण बाहेर आले. अन्यथा हे प्रकरण सरकारने केव्हाच दाबले असते. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही एसआयटी केव्हा स्थापन केली? याची माहिती द्यावी.
सरकारने अधिवेशन काळात या प्रकरणाची वस्तुस्थिती मांडणे गरजेचे होते. कारण, यात फक्त रुपाली चाकणकर किंवा इतर राजकीय पुढारी आहेत असे नाही. यात उच्चपदस्थ अधिकारीही आहेत. अशोक खरातची उठबस करण्यात ते गुंतलेत. त्यामुळे केवळ चाकणकरांचा राजीनामा घेऊन सरकारने या विषयावरील लक्ष इतरत्र वळवू नये. राजीनामा झाला म्हणजे हे प्रकरण संपणार नाही. सरकारमधील अनेक मंत्री व अधिकारी यात असल्यामुळे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत आहे. या प्रकरणात आयएएस, आयपीएस अधिकारी असल्याचे पोलिसांनाही ठावूक होते.

आता हे प्रकरण तडीस जावे असा आमचा प्रयत्न आहे. पण सरकारची एकूण वृत्ती पाहता या प्रकरणात काही पुढारी व अधिकाऱ्यांच्या फायली आपल्या बुडाखाली दाबून त्याचा राजकीय स्वार्थासाठी केला जाईल, असे ते म्हणाले.

भास्कर जाधव पुढे म्हणाले, राजकीय पुढाऱ्यांना अघोरी विद्या व अघोरी प्रकार का लागतात हे कळत नाही. फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घेऊन असे शेण खाणाऱ्या लोकांना चांगला धडा शिकवला पाहिजे. या सरकारकडून आम्हाला कोणतीही अपेक्षा नाही. आमचा महाराष्ट्र पुरोगामी असल्याचे आम्ही सांगतो. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज म्हणून उर बडवतो. अंधश्रद्धा निर्मुलनाचे कायदे करतो. आणि दुसरीकडे हे काय सुरू आहे याचा गंभीरपणे विचार करणे गरजेचे आहे. या प्रकरणाचे धागेदोर खोलवर गुंतले असून, राज्यकर्ते अनेकांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत.

पावसाळी अधिवेशनात नाशिकच्या हॉटेलचा उल्लेख झाला तेव्हा राज्यकर्त्यांनी मागचा पुढचा विचार न करता त्या प्रकरणात क्लीनचिट दिली. नाशिकचे प्रकरण समजण्यास एवढा उशीर का? असा सवालही भास्कर जाधव यांनी या प्रकरणी उपस्थित केला.

तुळशीबाग राम मंदिरातील स्वर मैफलीत रसिकांना ‘ध्यान लागले रामाचे’ 

गायिका सानिका कुलकर्णी यांचे गायन ; श्री रामजी संस्थान तुळशीबाग तर्फे श्रीरामनवमी उत्सव ; उत्सवाचे २६५ वे वर्ष

पुणे : ठुमक चलत रामचंद्र… राम रतन धन पायो…ध्यान लागले रामाचे… यांसह प्रभू श्रीरामांचे वर्णन करणाऱ्या विविध गीतांचा आनंद घेताना रसिकांनी जणू श्रीरामांचे ध्यान लागले. पेशवेकालीन ऐतिहासिक तुळशीबाग श्रीराम मंदिरात आयोजित स्वरमैफलीत गायिका सानिका कुलकर्णी यांच्या गायनाने पुणेकरांना मंत्रमुग्ध केले. 

श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने श्रीराम मंदिरात श्रीरामनवमी उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवाचे अखंडीत २६५ वे वर्ष साजरे होत आहे. संस्थानचे कार्यकारी विश्वस्त डॉ.रामचंद्र तुळशीबागवाले, विश्वस्त भरत तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवाराने उत्सवाचे आयोजन केले आहे. 

‘वंदे गणपतीम’ या गणेश वंदनेने मैफलीला प्रारंभ झाला. त्यानंतर ‘रूप पाहता लोचनी’ या संत ज्ञानेश्वरांच्या अभंगाचे सानिका कुलकर्णी यांनी केलेले सादरीकरण रसिकांच्या विशेष पसंतीस पडले. ‘जानकी नाथ सहाय करे जब’ या भजनाला उपस्थितांनी टाळ्यांनी साथ दिली. संत तुकाराम महाराजांच्या ‘लक्ष्मी वल्लभा’ या रचनेच्या सादरीकरणाने पुणेकर मंत्रमुग्ध झाले. 

डॉ.रामचंद्र तुळशीबागवाले म्हणाले, पुणे प्रांताचे सरसुभेदार श्रीमंत नारो अप्पाजी तुळशीबागवाले यांनी सन १७६१ साली स्थापन केलेले हे देखणे मंदिर आहे. यंदा दि. २ एप्रिल पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवांतर्गत श्रीरामरक्षा, अथर्वशीर्ष पठण, श्री विष्णू सहस्त्रनाम, श्रीसूक्त व पुरुषसूक्त पठण, महापूजा, पालखी, श्री कौसल्या माता डोहाळजेवण, श्रीरामजन्म सोहळा, श्रीरामराज्याभिषेक सोहळा अशा धार्मिक कार्यक्रमांबरोबरच रामायण वाचन, रामायण प्रवचन, सांगितीक कार्यक्रम अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. सर्व कार्यक्रम विनामूल्य आहेत. तरी पुणेकरांनी मोठ्या संख्येने उत्सवात सहभागी व्हावे

हिंदुजा फाउंडेशनच्या ‘जल जीवन’ उपक्रमाचा महाराष्ट्रातील 1.5 लाख लोकांना फायदा; दरवर्षी 690 दशलक्ष लिटर पाण्याची बचत

  • पाणलोट क्षेत्र विकासनदी पुनरुज्जीवन आणि पर्जन्यजल संधारणाद्वारे सुमारे 690 दशलक्ष लिटर वार्षिक जलसंवर्धनाची क्षमता निर्माण करण्यात आली आहे.

मुंबईजागतिक जल दिनाच्या निमित्ताने, हिंदुजा समूहाची सामाजिक उपक्रम राबवणारी शाखा असलेल्या ‘हिंदुजा फाउंडेशन’ने आपल्या ‘जल जीवन’ या प्रमुख जल-व्यवस्थापन कार्यक्रमाचा किती लोकांना फायदा झाला, त्याची घोषणा केली. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये पाणलोट क्षेत्र विकास, भूजल पुनर्भरण, नदी पुनरुज्जीवन आणि पर्जन्यजल संचयन यांसारखे प्रकल्प राबवून, 1.5 लाखांहून अधिक लोकांना लाभ पोहोचवण्यात आला आहे.

चेक डॅम्स, पुनर्भरण संरचना, जलाशयांचे पुनरुज्जीवन आणि पर्जन्यजल संचयन प्रणाली अशा एकत्रित उपक्रमांद्वारे, या फाउंडेशनने दरवर्षी सुमारे 69 कोटी लिटर पाण्याची बचत साध्य केली आहे. या उपाययोजनांमुळे पाणीटंचाईग्रस्त भागातील 1,020 एकरांहून अधिक शेतजमिनीसाठी सिंचन व्यवस्था भक्कम झाली आहे; त्याच वेळी, ग्रामीण आणि आदिवासी समुदायांना पिण्याच्या पाण्याचा खात्रीशीर पुरवठा उपलब्ध होणेही सुनिश्चित झाले आहे.

हिंदुजा फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), श्री. रमन कल्याणकृष्णन म्हणाले: “शाश्वत ग्रामीण विकासासाठी जलसुरक्षा ही एक मूलभूत बाब आहे. संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या आमच्या कामाचा मुख्य भर हा नैसर्गिक जलप्रणालींचे पुनरुज्जीवन करणेभूजल पुनर्भरणात सुधारणा घडवून आणणे आणि शेतीघरगुती वापर तसेच भावी पिढ्यांसाठी पाण्याची खात्रीशीर उपलब्धता सुनिश्चित करणारेसमुदायाच्या पुढाकाराने साकारले जाणारे उपाय विकसित करण्यावर आहे. पाणलोट क्षेत्र विकासनद्यांचे पुनरुज्जीवन आणि पर्जन्यजल संवर्धन या माध्यमातूनपाणीटंचाईचा सामना करणाऱ्या भागांमध्ये दीर्घकालीन जलसक्षमता निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”

या विविध उपक्रमांमुळे भूजलाची उपलब्धता सुधारली आहे, हंगामी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे आणि पावसावरील अवलंबित्व कमी झाले आहे; परिणामी, शेतीची उत्पादकता आणि सामाजिक परिस्थिती सुधारली आहे.

विभागवार प्रभाव:

  • धाराशिव: पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्प
  • सातारा: नदी पुनरुज्जीवन उपक्रम
  • भंडारा: भूजल पुनर्भरण उपाययोजना
  • पालघर: जलसुरक्षा कार्यक्रम
  • पुणे: पर्जन्यजल संवर्धन आणि सांडपाणी पुनर्वापर प्रणाली

या प्रतिष्ठानचे प्रयत्न हे समुदाय सहभाग, तांत्रिक नियोजन आणि दीर्घकालीन देखरेख यावर आधारित आहेत. जलस्रोतांच्या स्थानिक व्यवस्थापनाला चालना देऊन, जल जीवन उपक्रम शाश्वत जलवापरास सातत्याने पाठिंबा देत आहे आणि हवामान बदलांविरुद्धची लवचिकता अधिक बळकट करत आहे.

पंतप्रधान मोदींनी इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला, ईदच्या शुभेच्छा दिल्या

नवी दिल्ली- आज शनिवारी, पंतप्रधानांनी इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी फोनवर संवाद साधला आणि त्यांना ईद व नवरोजच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी ही माहिती सोशल मीडियावर दिली.

पंतप्रधानांनी लिहिले, “मी इराणचे राष्ट्राध्यक्ष डॉ. मसूद पाझाश्कियान यांच्याशी बोललो. या सणासुदीच्या काळात मध्य-पूर्वेत शांतता आणि स्थैर्य नांदेल, अशी आशा आम्ही व्यक्त केली.”

इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी झालेल्या संभाषणात, मोदींनी मध्य-पूर्वेतील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवरील (जसे की तेल, वीज इत्यादी) हल्ल्यांचा निषेध केला, कारण याचा परिणाम प्रदेशातील शांततेवर आणि जागतिक पुरवठ्यावर होतो.

ते म्हणाले की, सुरळीत व्यापारासाठी सागरी मार्ग खुले आणि सुरक्षित ठेवणे महत्त्वाचे आहे. इराणमध्ये राहणाऱ्या भारतीयांच्या संरक्षणासाठी केलेल्या मदतीबद्दल त्यांनी इराणचे आभारही मानले.

ट्रम्प यांनी NATO देशांना भित्रे म्हटले

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण युद्धात साथ न दिल्याबद्दल NATO सहयोगी देशांवर नाराजी व्यक्त केली आहे. ट्रम्प म्हणाले की NATO देश भित्रे आहेत आणि अमेरिकेशिवाय ही युती फक्त कागदी वाघ आहे.

ट्रम्प यांनी होर्मुज स्ट्रेटचा उल्लेख करत म्हटले की, ते खुले ठेवण्यासाठी लष्करी मदत देणे सोपे आहे, परंतु सहयोगी देश यातही मागे हटत आहेत. ते म्हणाले, “ही एक खूप सोपी लष्करी कृती आहे, ज्यात खूप कमी धोका आहे, पण त्यांना मदत करायची नाही. ते भित्रे आहेत आणि आम्ही हे लक्षात ठेवू.”
अमेरिकेने म्हटले- तेल विकूनही इराणला फारसा फायदा होणार नाही.
अमेरिकेने म्हटले आहे की, इराणला तेल विकण्याची परवानगी दिली तरी, त्याला फारसे पैसे मिळणार नाहीत. अमेरिकेने इराणला अंदाजे १४० दशलक्ष बॅरल तेल विकण्याची तात्पुरती परवानगी दिली आहे, परंतु ही परवानगी केवळ जहाजांवर आधीच भरलेल्या तेलालाच लागू होते.

अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनी म्हटले आहे की, इराणला हे पैसे मिळवणे कठीण जाईल. ही सूट केवळ अल्प कालावधीसाठी असून ती १९ एप्रिलपर्यंत लागू राहील.

होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तणावामुळे पुरवठ्यावर परिणाम झाल्याने तेलाच्या वाढत्या किमती कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अहवालानुसार, इराणचे बहुतेक तेल चीनला पाठवले जाते, परंतु आता ते इतर आशियाई देशांनाही पाठवले जाऊ शकते.
इराणचा हिंद महासागरातील अमेरिकी तळावर हल्ला
इराणने शुक्रवारी सकाळी हिंद महासागरातील अमेरिका-ब्रिटन संयुक्त लष्करी तळ असलेल्या डिएगो गार्सियावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. सीएनएनच्या वृत्तानुसार, अमेरिकी अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार, इराणने दोन क्षेपणास्त्रे डागली, परंतु त्यापैकी एकही तळावर आदळले नाही. हा तळ इराणच्या किनारपट्टीपासून सुमारे ३,८१० किलोमीटर आणि तेहरानपासून ५,००० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर आहे.

डिएगो गार्सिया हा अमेरिकेसाठी एक महत्त्वाचा लष्करी तळ आहे. त्याचा वापर अमेरिकी बॉम्बर्सद्वारे केला जातो. येथून मोठी टँकर विमाने (जसे की KC-135) आणि निगराणी विमाने देखील कार्यरत राहू शकतात.

आसावरी संतोष जगदाळे यांनी घेतली उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट

शिवसेना कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आसावरी जगदाळे यांचा डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते सत्कार

पुणे. दि.२१: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या संतोष जगदाळे यांच्या कन्या आसावरी जगदाळे यांनी पुणे महानगरपालिकेत नोकरी मिळाल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष प्रयत्नांचे कौतुक करत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट घेतली. या भेटीत डॉ. गोऱ्हे यांनी आसावरी यांचा सत्कार केला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एप्रिल २०२५ मध्ये कुटुंबाला भेट देऊन शासकीय सेवेत नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी विशेष प्रक्रिया राबवून आसावरी जगदाळे यांना प्रशासकीय अधिकारी (वर्ग-२) पदावर नियुक्ती दिली. या पार्श्वभूमीवर २० मार्च रोजी आसावरी यांनी उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले. यावेळी संतोष जगदाळे यांच्या पत्नी प्रगती जगदाळे उपस्थित होत्या.

डॉ. गोऱ्हे यांनी आसावरी यांना शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यांनी पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या आणि भविष्यातही कुटुंबाला पूर्ण सहकार्य असल्याचे सांगितले. आसावरीने नोकरी मिळाल्याबद्दल कुटुंबीयांच्या भावना व्यक्त करत डॉ. गोऱ्हे यांचे विशेष आभार मानले.याप्रसंगी बाळासाहेब भांडे, आनंद गोयल, एकनाथ ढोले, विठ्ठल तांबे, ज्योती गाडे, सोनाली लांडगे, रिंकू मोरे आदी शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.

२६ मार्च हा संतोष जगदाळे यांचा स्मृतिदिन असून, सरकारने दिलेली ही नोकरी त्यांना आदरांजली असल्याचे जगदाळे कुटुंबीयांनी सांगितले.

पहलगाम हल्ल्यात २२ एप्रिल २०२५ रोजी संतोष जगदाळे यांच्यासह २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. उपस्थित शिवसेना कार्यकर्त्यांनी सांगितले की, पहलगाम हल्ला असो वा इराण युद्धासारखे संकट असो, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेहमीच पीडित नागरिकांच्या मदतीला धावून जातात आणि त्यांना सुखरूप बाहेर काढतात.

फुलगावमध्ये शाळेच्या मैदानासाठी माजी आमदार दीपक पायगुडे यांचे धरणे आंदोलन नवव्या दिवशीही सुरू

रस्ता प्रकल्प व अतिक्रमणाच्या विरोधात आंदोलन; प्रशासनाकडून ठोस प्रतिसाद नसल्याचा आरोप

पुणे :  प्रशासनाकडून ठोस प्रतिसाद मिळाला नसल्याने माजी आमदार दीपक पायगुडे यांचे फुलगाव, पुणे येथील लोकसेवा प्रतिष्ठान संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेच्या मैदानातून जाणाऱ्या रस्त्याबाबत तसेच अतिक्रमणाबाबत धरणे आंदोलन सलग नवव्या दिवशीही सुरूच आहे.

दीपक पायगुडे यांनी फुलगाव येथील शाळेच्या जागेच्या प्रश्नावर धरणे आंदोलन सुरू केले आहे. सरकारने शाळेची शैक्षणिक जागा रस्ता बांधकामासाठी ताब्यात घेतल्याच्या तसेच विविध भागात अतिक्रमण केल्याच्या निषेधार्थ त्यांनी आंदोलन सुरू केले होते. दीपक पायगुडे गेल्या नऊ दिवसांपासून फुलगावमधील शाळेच्या परिसरात धरणे आंदोलन करत आहेत. स्थानिक नागरिक आणि पालकांच्या मते, ही जागा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उपयोगासाठी राखीव होती. मात्र, रस्ता प्रकल्पासाठी ती घेण्यात आल्याने व अतिक्रमण केल्याने भविष्यात विद्यार्थ्यांच्या सुविधांवर परिणाम होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या निर्णयाचा निषेध करत पायगुडे यांनी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन सुरू केले आहे. मात्र नऊ दिवस उलटूनही प्रशासन किंवा सरकारकडून कोणतीही ठोस दखल घेण्यात आलेली नसल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, धरणे आंदोलनामुळे दीपक पायगुडे यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. तरीदेखील सरकारकडून अद्याप कोणतीही सकारात्मक प्रतिक्रिया मिळाली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

भविष्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान तेथे होऊ शकते पण याच अतिक्रमण आणि बेकायदेशीर रस्त्यामुळे ते होऊ शकणार नाही, अशी भितीदेखील दीपक पायगुडे यांनी व्यक्त केली आहे.
या आंदोलनाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन तोडगा काढावा, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

खरातबरोबर अनेकांचे फोटो, मलाच का टार्गेट केले ? त्यांची दुसरी बाजू मला माहिती नव्हतीच

अवघ्या एका दिवसांत घेतला राजीनामा , अजीतदादा असते तर चित्र वेगळे दिसले असते, अजितदादांच्या विश्वासातल्या पहिल्या महिला नेत्याचा राजकीय बळी,कसलीही शहानिशा न करता केवळ दिवसभर चालविलेल्या बातम्या च्या आधारे राजीनाम्याचे आदेश

पुणे- भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की एक महिला म्हणून मला सॉफ्ट टार्गेट केले जात आहे. मी व माझ्या कुटुंबाने खरातला गुरु मानले होते. परंतु, त्यांची दुसरी बाजू आम्हाला माहीत नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

रुपाली चाकणकर म्हणाल्या, शिवनिका संस्थान या संस्थानात जे महादेव मंदिराचे ट्रस्ट आहे, मी प्रदेशाध्यक्ष होते तेव्हापासून सदस्य म्हणून काम केले आहे. माझ्यासमवेत समाजातील अनेक प्रतिष्ठित नागरिक, अनेक मान्यवर ट्रस्टवर होते. त्यानंतर मी आयोगाची अध्यक्षा झाले. आणि मला हे सांगायचे आहे की या ट्रस्टचा कार्यकाल हा 8 ऑगस्ट 2025 रोजी संपलेला आहे.

पुढे बोलताना रुपाली चाकणकर म्हणाल्या, समाजात आपण आयुष्य जगत असताना कोणाला तरी गुरु मानत असतो. खरात पती-पत्नीला आमच्या कुटुंबाने गुरु मानले होते. काही वेळा तिथे होत असलेला कार्यक्रम, मग तो महाशिवरात्रीचा असेल, गुरुपौर्णिमेचा असेल, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्याचे वाटप असेल, या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहत होतो. यात एखाद्या व्यक्तीला आपण गुरु मानले आहे आणि त्या निमित्ताने आम्ही संपूर्ण कुटुंब तिथे उपस्थित राहत होतो.

माध्यमांमधून सातत्याने दाखवले जाणारे फोटो किंवा व्हिडिओ हे काही वर्षांपूर्वीचे आहेत. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अनेकांनी पाद्यपूजा केली, तशी मी माझ्या पतीने देखील केली होती. 5-6 वर्षांपूर्वी ज्यावेळेस आपण ज्या लोकांच्या संपर्कात असतो, ते 5-6 वर्षानंतर एखाद्याचे आयुष्य, कृत्य, वागणूक याबाबत आपल्याला कल्पना नसते. आज आपण ज्यांच्यासोबत असतो, ते पुढे जाऊन कसे वागणार आहेत, ही कल्पना आपल्या कोणाला नसते. त्यामुळे मी ही घटना समजली तेव्हा मला धक्का बसला. त्यामुळे मी सुरुवातीला ट्विट देखील केले होते की या ट्रस्टसोबत आमचे संबंध आहे. पण खरात आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही माहीत असायचे कारण नव्हते. यात पोलिसांनी खोलवर निष्पक्ष तपास करावा. त्यासाठी आज मी पोलिस महासंचालकांची भेट घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. या घटनेचा तपास पारदर्शकपणे व्हावा, अशी मागणी केल्याची माहिती रुपाली चाकणकर यांनी केली.

रुपाली चाकणकर म्हणाल्या, आपण काही लोकांवर विश्वास ठेवतो, एक आध्यात्मिक श्रद्धा असते. माझे संपूर्ण कुटुंब हे वारकरी कुटुंब आहे, त्यामुळे आमची जी श्रद्धा होती ती आध्यात्मिक दृष्टीने होती आणि त्यामुळेच आम्ही त्या देवस्थानशी जोडले गेलो होतो. पण याची दुसरी जी बाजू आहे, ती कधी आमच्यासमोर आली नाही. आम्ही कार्यक्रमांसाठी काही काळासाठीच तिथे असायचो. त्यामुळे जे काही घडले आहे, ते अत्यंत चुकीचे आणि घाणेरडे कृत्य आहे. पोलिसांनी सखोल तपास करावा आणि आरोपीला कठोर कारवाई करावी, अशी मागणी चाकणकर यांनी केली.

पुढे बोलताना रुपाली चाकणकर म्हणाल्या, एका दैनिकाचे पत्रकार आहेत, त्यांनी त्यांच्या वर्तमानपत्रात एक बातमी दिली होती 19.03.2025 रोजी. ही बातमी आमच्या समुपदेशकांकडे आली. त्यानंतर समुपदेशकाने त्यांना एक पत्र पाठवले होते 8 तारखेला. त्या पत्रात स्पष्ट दिले आहे की, आपल्या बातमीमध्ये काही मोघम गोष्टी आल्या आहेत. या संदर्भात तुमच्याकडे काही माहिती असेल तर सविस्तर आयोगाला कळवावी. दुसरे पत्र आहे पोलिस आधीक्षकांना, त्यांच्याकडे जी काही माहिती असेल त्यानुसार कारवाई करावी. तसेच आम्ही कोणाला काही अडचण असेल तर थेट पोलिसांकडे जाऊन तक्रार करावी. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी आम्हाला सांगितले की कोणतीही तक्रार आली नाही, कोणत्याही महिलेची तक्रार नाही. त्यानंतर त्या पत्रकाराने पत्र पाठवले की आमच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत. मागील दोन दिवसांपासून ज्या बातम्या चालवल्या, त्याचा मी तीव्र निषेध करते.

रुपाली चाकणकर म्हणाल्या, दुसरी गोष्ट मला दाखवायची आहे म्हणजे माझ्याकडे 5 तारखेला एका मुलीचा मेल आला. या मेलमध्ये त्या मुलीने खरातच्या ऑफिसमध्ये पूर्वी काम करणाऱ्या एका माणसाच्या संदर्भात तक्रार होती. खरातचा यात कुठेही उल्लेख नाही. तातडीने त्याच दिवशी आमचे पत्र पोलिसांना गेले आहे. मी स्वतः हे पत्र पाठवले. यात जे कोणी असेल त्याचा तपास करावा, अशी सूचना आम्ही दिली. त्यानंतर पोलिसांनी स्वतः पत्र दिले की आम्ही कारवाई करत आहोत. कोणालाही, कुठल्याही संस्थेला पाठीशी घातले नाही. तोपर्यंत खरातचे कुठेही नाव नव्हते. त्यानंतर 17 तारखेला तेजस्वी सातपुते यांचे पत्र आले आणि त्यांनी सांगितले की आम्ही कारवाई करत आहोत.

चुकीच्या बातम्या सुरू आहेत. त्या व्यक्तीसोबत अनेकांचे फोटो आहेत. पण केवळ महिला म्हणून सॉफ्ट टार्गेट केले जात आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. काही लोकांनी पत्रकार परिषद घेत चुकीच्या बातम्या पसरवल्या, असे म्हणत रुपाली चाकणकर यांनी सुषमा अंधारे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. माझे फोटो चुकीच्या तारखेला दाखवण्यात आले आहेत. माझ्या सोशल मीडियावर अजूनही ते फोटो आहेत, तुम्ही पाहू शकता. कायद्याच्या चौकटीतून आम्ही या लोकांना नोटीस पाठवू, खोट्या बातम्या पसरवणे या विरोधात आम्ही कायदेशीर कारवाई करू, असा इशारा चाकणकर यांनी दिला आहे.

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा राजीनामा:उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे सोपवला

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाला आता मोठे राजकीय वळण लागले असून, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा खरातची पाद्यपूजा करतानाचा व्हिडिओ आणि त्याच्यासोबतचे काही फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. या गंभीर प्रकारामुळे चाकणकर यांच्यावर चोहोबाजूंनी टीकेची झोड उठली होती. तसेच विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची आग्रही मागणी लावून धरली होती. अखेर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन चाकणकरांनी राजीनामा दिला असल्याचे समोर आले आहे. तसेच वैयक्तिक कारणाने राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना आपले पद गमवावे लागले असून, राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी सकाळीच त्यांना राजीनामा देण्याच्या सूचना केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार चाकणकर यांनी प्रथम महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून, आता त्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा देणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
रुपाली चाकणकर यांनी नुकतीच पुणे डीजींची भेट घेतली होती. तसेच सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी जाण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांनी वर्षा बंगल्यावर भेट घेतली होती. त्यानंतर रात्री उशिरा चाकणकर यांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली व या भेटीत त्यांनी राजीनामा दिला आहे.

उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार रस्त्यांवरील खड्डे आणि चेम्बर यामुळे अपघात होता कामा नये-नवल किशोर राम यांचे स्पष्ट आदेश

पुणे- उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार रस्त्यांवरील खड्डे आणि चेम्बर, वा वाळू तदनुषंगिक बाबी यामुळे अपघात होता कामा नये, त्या दृष्टीने शहर आणि परिसरातील सर्व रस्त्यांची कामे वेगाने आणि उत्कृष्ट रित्या पूर्ण करा असे स्पष्ट आदेश आज महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनि महापालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत. शहर परिसरातील रस्त्यां वरील चेंबर्स समपातळीत करणे, पदपथ दुरुस्ती करणे इत्यादी कामाबाबत आज दि.२०.०३.२०२६ रोजी मा. नवल किशोर राम, महापालिका आयुक्त यांचेमार्फत बैठक आयोजित करण्यात आली.या बैठकीस अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष)ओमप्रकाश दिवटे, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, मुख्य अभियंता (विद्युत)मनीषा शेकटकर, मुख्य अभियंता (पथ)राजेश बनकर अधीक्षक अभियंता अशित जाधव (पथ), बांबळे इत्यादी तसेच पथ व विद्युत विभागाकडील अभियंते व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
पुणे शहरात मध्यंतरी पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या मार्गावर २ हजार सर्व प्रकारचे चेंबर्स झाकणे रस्त्याच्या समपातळीत आणून मार्ग व्यवस्थित करण्यात आला आहे. मात्र, स्पर्धेच्या मार्गापुरतेच काम मर्यादित राहिले आहे. शहरातील इतर भागातील रस्त्यावरील पावसाळी व ड्रेनेजची झाकणे समपातळीत न आल्याने त्यांच्या खड्ड्यात वाहने आदळून अपघात होत आहेत.पुणे महानगरपालिके मार्फत सुरु असलेल्या कार्यवाही बाबतची वस्तुस्थिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी खालीलप्रमाणे सांगितले :
• पुणे महानगरपालिकेच्या पथ विभागामार्फत रस्त्यावरील खड्ड्यांच्या अनुषंगाने उच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज संस्थाना दिलेल्या निर्देशांनुसार रस्ते खड्डे मुक्त अभियान पुणे महानगरपालिकेने सुरु केले.
• या बरोबरच रस्त्यावरील पावसाळी लाइन चे चेंबर्स रस्त्याच्या सम पातळीत आणणे याबाबतचे या अभियानाचे रितसर उद्घाटन दिनांक १५ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आले असून त्या दिवसापासून संपूर्ण शहरभर पुणे महानगरपालिकेच्या पथ विभागामार्फत या बाबतचे कामकाज सुरु आहे.
• पुण्यात पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या वेळी चेंबर समापतळीत आणण्याबाबतची जी एस.ओ.पी. तयार करण्यात आली होती, त्यानुसारच चेंबर समापतळीत आणण्याची कार्यवाही सुरू आहे.
• संपूर्ण शहरात पथ विभागाकडील कडील झोन वाईज वेगवेगळ्या ठेकेदार यांना महाराष्ट्र महानगर पालिका अधिनियम 5 2.2 अन्वये नेमणुकी करून चेंबर समापतळीत आणण्याचे कामकाज सुरू आहे. याबाबत दैनंदिन केलेल्या कामाचा आढावा घेऊन केलेल्या कामाची आकडेवारी दरोरोज महापालिका आयुक्त यांच्याकडे सादर करण्यात येत आहे.
• दिवसा असलेली वाहतूक विचारत घेऊन रात्री एस.ओ.पी नुसार चेंबर समपातळीमध्ये आणण्याचे काम करीत असताना, रस्ता कटरच्या साह्याने व ब्रेकरच्या साह्याने कट करीत असताना होणा-या आवाजाचा नागरिकांना, विद्यार्थ्यांना परीक्षा कालवधी असल्याने त्रास होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असल्याने रात्री काम करताना अडचणी निर्माण होत आहेत.आवश्यक त्या दक्षता घेऊन ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी कामे करण्यात येत आहेत.
• सद्यस्थिती संपूर्ण शहरात पावसाळी ,लाईन वरील आज मितीस सुमारे १२८३ एवढे चेम्बर्स समपातळी घेण्याची कार्यवाही करण्यात आलेली आहे. पावसाळी वाहिन्यांवरील चेम्बर्स पथविभागामार्फत तर ड्रेनेजची गोल चेम्बर्स ड्रेनेज विभागाकडून समपातळीवर करण्यात येत आहेत.
• रस्त्याचे डांबरीकरण काम पूर्ण झाल्यानंतर अस्तित्वातील चेम्बर्सची पातळी खाली गेल्याने त्याठिकाणी निर्माण होणा-या खड्यांमुळे होणारे अपघात हे यामुळे टाळता येणार आहेत.
• महापालिका आयुक्त यांनी आज दिनांक २० मार्च २०२५ रोजी स्वतः या विषयाची बैठक घेऊन दररोज जास्तीत जास्त चेंबर्स सम पातळीवर आणण्याची कार्यवाही अधिक गतीने करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.

वर्गमित्रांकडून ‘सहजीवन’ वृद्धाश्रमाला ७५ हजारांची मदत

डॉ. दिलीप देवधर यांच्या पंचत्तरीनिमित्त आयोजित सत्कार सोहळ्यात मदत

पुणे : डॉ. दिलीप देवधर यांच्या पंचत्तरीनिमित्त आयोजित सत्कार सोहळ्यात त्यांच्या वर्गमित्रांकडून ‘सहजीवन’ या वृद्धाश्रमासाठी ७५ हजार रुपयांची देणगी देण्यात आली. सामाजिक बांधिलकी जपत वृद्धांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या या उपक्रमाला या मदतीमुळे एक आगळावेगळा पंचाहत्तरीचा सोहळा साजरा झाला.

शहरातील प्रसिद्ध फॅमिली डॉक्टर आणि ‘सहजीवन’ या वृद्धाश्रमाचे संस्थापक डॉ. दिलीप देवधर यांच्या पंचत्तरीनिमित्त त्यांच्या रुग्णांकडून व चाहत्यांकडून कर्वे रस्त्याजवळील अश्वमेध कार्यालय येथे भव्य सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक सतीश आळेकर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी माजी खासदार व केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, डॉ. अविनाश भोंडवे, तसेच ज्येष्ठ गायक रविंद्र साठे आदी मान्यवर देखील उपस्थित होते.

सतीश आळेकर म्हणाले, वैद्यकीय सेवेबद्दल विविध प्रवाद होत असताना डॉ. देवधर यांच्यासारखे अचूक निदान करून अनावश्यक चाचण्या टाळणारे डॉक्टर दुर्मिळ होत आहेत. कोविड काळात कोणतीही बुवाबाजी न करता त्यांनी रुग्णांना दिलेला आधार अत्यंत मोलाचा ठरला, असेही त्यांनी सांगितले.

ग्राहक पेठेचे संचालक आणि डॉ. देवधर यांचे वर्गमित्र सूर्यकांत पाठक म्हणाले, चार-पाच पिढ्यांचे कौटुंबिक डॉक्टर म्हणून देवधर यांनी असंख्य कुटुंबांशी स्नेहाचे नाते निर्माण केले आहे. अनेक रुग्णांना आर्थिक अडचणीतही त्यांनी विनामूल्य उपचार देऊन मोठा आधार दिला, याचीही त्यांनी उदाहरणे सांगितली.

डॉ. दिलीप देवधर म्हणाले, पंचाहत्तरीनंतर काय करणार, असा प्रश्न अनेक जण विचारतात. पण माझे उत्तर एकच अजून कामच करणार. स्वामी विवेकानंद यांनी सांगितल्याप्रमाणे इतरांसाठी जगणे हेच खरे जीवन आहे. त्यामुळे माझ्या कुटुंबासाठी, रुग्णांसाठी आणि वृद्धाश्रमातील बांधवांसाठी कार्यरत राहण्याची शक्ती मिळो, हीच प्रार्थना. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आलोक देवधर आणि सुप्रसिद्ध गायिका मंजुषा पाटील यांनी केले.