Home Blog Page 121

राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण:बारा हजाराहून अधिक विद्यार्थिनी व शिक्षकांनी घेतला लाभ

मुलींच्या स्वसंरक्षणाच्यादृष्टीने महत्त्वाचा उपक्रम- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

पुणे, दि. 22: ‘राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत मिळणारे मार्गदर्शन केवळ मुलींसाठी कराटे प्रशिक्षण नसून एक स्वसंरक्षण, आत्मविश्वास व सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा उपक्रम म्हणून मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला.

सर परशुराम महाविद्यालय पुणे येथे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाअंतर्गत आयोजित राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्धाटनप्रसंगी ते बोलत होते. पुणे शहराच्या महापौर मंजुषा नागपुरे, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे संचालक डॉ .हेमंत वसेकर, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. महेश पालकर, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, संचालक योजना श्रीकृष्ण कुमार पाटील, एससीआरटी सहसंचालक तथा राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण कार्यक्रमाचे राज्य समन्वयक डॉ.कमलादेवी आवटे, पुणे मनपा शिक्षण समितीचे अध्यक्ष अरुण राजवाडे उपाध्यक्ष अतुलजी तरवडे आदी उपस्थित होते .

श्री. भुसे म्हणाले, स्वसंरक्षण हे केवळ शारीरिक प्रशिक्षण नसून ते विद्यार्थिनींच्या आयुष्यातील एक महत्त्वाची शिस्त आहे. प्रत्येक मुलीने स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःचे रक्षण करण्यास सक्षम झाले पाहिजे. शिक्षण म्हणजे केवळ चार भिंतींमध्ये मिळणारे शिक्षण नसून आयुष्यातील प्रत्येक संकटांना धैर्याने तोंड देणारे शिक्षण असावे, याच बाबीचा विचार करुन आजच्या युगात मुलींनी आत्मरक्षा, आत्मसंरक्षणाचे उत्तम धडे गिरवविण्याकरिता शालेय शिक्षण विभागाने ‘राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम’ हे विशेष अभियान सुरू आहे.

राज्याच्या शाळांमधील इयत्ता 6 वी ते 12 वीपर्यंतच्या विद्यार्थिनींसाठी या शैक्षणिक वर्षांपासून पासून हे प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. यामध्ये मार्शल आर्ट, माजी सैनिकांमार्फत प्रशिक्षण आणि योगा अशा विविध बाबींचा समावेश असून प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यार्थिनींना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. महिला सबलीकरण, आत्मसंरक्षण आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी हा शासनाचा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम असणार आहे. प्रत्येक महिला स्वतःच्या पायावर व सुरक्षित उभी राहण्यासाठी सर्व शाळांतील मुलींनी हे प्रशिक्षण घ्यावे. शिक्षणाबरोबर कला व क्रीडा उपक्रमाना प्राधान्य दिले जाईल. शाळेतील विद्यार्थिनींना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम करणे हे आमचे प्राधान्य आहे, या प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांनीमध्ये मनोबल वाढेल असा विश्वास मंत्री श्री. भुसे यांनी व्यक्त केला.

श्रीमती नागपुरे म्हणाल्या, मुलींच्या स्वसंरक्षणासाठी ‘राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण व जीवन कौशल्य यासारख्या उपक्रम ही काळाची गरज आहे. तसेच हे एका दिवसाचे प्रशिक्षण नाही तर आयुष्यभरासाठीचे शिक्षण असावे असे मत व्यक्त केले. तसेच आपल्या मधील शक्ती पुन्हा एकदा जागृत करण्याची आवश्यकता आहे, असेही त्या म्हणाल्या.

यावेळी प्रशिक्षणामध्ये हभप अक्षय महाराज भोसले यांनी “जीवनकौशल्य ” विषयक तसेच आर्ट ऑफ लिविंग च्या मनीषा चंद्रा यांनी आत्मशांती व स्वनियंत्रण या विषयावर मार्गदर्शन केले. प्रशिक्षक शेफुजी शौर्य भारद्वाज यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण देण्यात आले.

या प्रशिक्षण वर्गासाठी पुणे मनपा व पिंपरी चिंचवड मनपा या दोन्ही महानगरपालिकेच्या जवळपास 416 पेक्षा जास्त शाळांनी आणि 12 हजारापेक्षा जास्त विद्यार्थिनी आणि शिक्षक यांनी या प्रशिक्षणात सहभाग नोंदवून या प्रशिक्षणाचा लाभ घेतला.

पुणे विभागाचे उपसंचालक गणपत मोरे, पुणे मनपा शिक्षणाधिकारी डॉ. सुनंदा ठुबे, शिक्षण सहसंचालक हरून आतार, पुणे विभागाच्या सहसंचालक डॉ .ज्योती परिहार, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.विकास गरड, पुणे मनपा माध्यमिक शिक्षण विभाग शिक्षणाधिकारी आशा उबाळे, प्रशासनाधिकारी पिंपरी-चिंचवड मनपा संगीता बांगर, माध्यमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक डॉ अरुण जाधव आदी उपस्थित होते.

रिपब्लिकन पक्षाला राष्ट्रीय पक्ष मान्यता मिळवून देणार:रामदास आठवले यांचा निर्धार

पुणे ;  रिपब्लिकन पक्षाला सर्वसमावेशक स्वरूप प्राप्त करून देऊन राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवून देण्याचा निर्धार आठवले गटाचे प्रमुख व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला. पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकींपैकी चार राज्यात रिपब्लिकन पक्ष आपले उमेदवार उभे करणार असल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

यावेळी आरपीआय चे पुणे शहर अध्यक्ष संजय सोनवणे, प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरोदे, जनरल सेक्रेटरी गौतम सोनवणे,  सचिव बाळासाहेब जानराव, चंद्रकांता सोनकांबळे, सूर्यकांत वाघमारे, महिपाल वाघमारे, नीलेश अल्हाट, हिमाली कांबळे, निशा मानवतकर, बसवराज गायकवाड, विशाल शेवाळे, जयदेव रंधवे, नीलेश रोकडे, सचिन मानवतकर, विरेन साठे तसेच उपमहापौर परशुराम वाडेकर आदि पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.  

रिपब्लिकन पक्ष हा सर्व जाती धर्मांचा, समाजातील उपेक्षित वर्गाचा, तरुणांचा महिलांचा पक्ष असून त्याला सर्वसमावेशक स्वरूप देण्याचे कार्य हाती घेणार असल्याचे आठवले यांनी सांगितले. तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पद्दूचेरी या राज्यात आपला पक्ष विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभा करणार आहे, असेही ते म्हणाले.

रिपब्लिकन पक्षाच्या निवडक कार्यकर्त्यांचा मेळावा पोर्ट ब्लेअर येथे आयोजित केला जाणार असून त्यात पक्ष विस्ताराच्या दृष्टीने धोरण निश्चित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पुण्यात देखील बैठक घेऊन पक्ष विस्ताराच्या दृष्टीने नियोजन करण्यात येणार आहे, असेही आठवले यांनी सांगितले. समाजातील भेदभाव दूर करण्यासाठी राजकीय पक्षांबरोबरच स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्व नागरिकांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता ही त्यांनी व्यक्त केली.

मुंबई महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला महायुतीकडून जागा मिळाल्या नसल्या तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेची एक जागा, दोन महामंडळाचे अध्यक्षपद आणि पुरेशा प्रमाणात महामंडळांची सदस्य पदे देण्यात येतील अशी ग्वाही दिली असल्याचेही आठवले यांनी नमूद केले.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत घातपाताची शक्यता आपल्याला वाटत नाही. मात्र, या विमान अपघाताची सखोल चौकशी व्हावी, संबंधित विमान कंपनीवर कठोर कारवाई व्हावी अशीच आपली देखील मागणी असल्याचे आठवले यांनी सांगितले.

भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणाबाबत बोलताना, राज्यातील सर्वच भोंदू बाबांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करतानाच मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यासाठी पुढाकार घेतल्याचे आठवले म्हणाले. कॅप्टन खरात याच्या गुन्ह्यांची व्याप्ती बघता त्याला फाशीची शिक्षा व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

संजय सोनवणे हेच पक्षाचे अधिकृत शहराध्यक्ष

पुणे शहरात रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे दोन शहराध्यक्ष असल्याबाबत विचारणा केली असता, संजय सोनवणे हेच निवडून आलेले पक्षाचे अधिकृत शहराध्यक्ष असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले. इतर कोणी शहराध्यक्ष पदाचा दावा करीत असेल तर ते घटनाविरोधी आहे. सोनवणे हे कार्यकर्त्यांनी निवडून दिलेले अध्यक्ष असून त्यांचा तीन वर्षाचा कालावधी आहे. त्यापैकी पावणे दोन वर्ष पूर्ण झाली आहे. तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर निवडणुकीद्वारेच नवीन शहराध्यक्ष निवडला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

अनेक कार्यकर्त्यांचा रिपब्लिकन पक्षात प्रवेश

आज मदासजी आठवले यांच्या हस्ते विविध पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा रिपब्लिकन पक्षात प्रवेश झाला. यामध्ये  हुलगेश मर्याप्पा चलवादी. (माजी प्रदेश प्रभारी, बीएसपी )  अनिल कुमार त्रिपाठी. पुणे जिल्हा प्रभारी, बीएसपी. भीम सिंह चलवादी. (अध्यक्ष, कर्नाटक आंध्र तेलंगणा राज्य, चलवादी माळा विकास महासंघ), दीप चिंचोलीकर (हायकोर्टाचे वकील) मूळ, लातूर बीएसपी चे लोकसभा उमेदवार, अविनाश इंद्रजीत मस्के (निवृत्त, आयपीएस अधिकारी.), विकास जावळे (निवृत्त, प्रॉव्हिडंट फंड कमिशनर) महाराष्ट्र राज्य., प्रकाश सोनवणे.  सुधीर वाघमोडे. संतोष आरडे. (माजी नगरसेवक) यांचा समावेश आहे. हे पक्ष प्रवेश  घडवून आणन्यासाठी प्रदेश सचिव बालासाहेब जानराव ,पुणे शहर अध्यक्ष संजय सोनवणे यानी विशेष प्रयत्न केले.

निसर्गोपचार आश्रमाचे शारीरिक-मानसिक आरोग्याबरोबरच ग्रामीण विकासातही मोलाचे योगदान- उपराष्ट्रपती

पुणे, दि. २२: महात्मा गांधीजींनी स्थापन केलेल्या निसर्गोपचार आश्रमाने केवळ व्यक्तींना शारीरिक-मानसिक आरोग्यच प्रदान केले नाही, तर ग्रामीण विकासातही मोलाचे योगदान दिले आहे. ग्रामीण लोकांशी संस्थेने जोडून घेतलेले नाते आणि त्यांना शाश्वतता व स्वावलंबनाचे धडे देण्यासाठी देण्यात येत असलेले प्रशिक्षण अत्यंत प्रशंसनीय आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.

उरुळी कांचन (ता. हवेली) येथील निसर्गोपचार आश्रमाच्या ८१ व्या स्थापना दिवस कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्यपाल जिष्णू देव वर्मा, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार माऊली उर्फ ज्ञानेश्वर कटके, आश्रमाचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. नारायण हेगडे, वैद्यकीय संचालक आणि विश्वस्त सचिव डॉ. अभिषेक देवीकर, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदीचे मुख्य विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे उपस्थित होते.

उपराष्ट्रपती म्हणाले, उरुळी कांचन या गावात महात्मा गांधीजींनी मणिभाई देसाई, बाळकोबा भावे, श्रीमती गंगाबेन भाटे आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने १९४६ या वर्षी या आश्रमाची स्थापना केली. ही संस्था आता जागतिक स्तरावर सन्मानित होणाऱ्या एका केंद्रात रूपांतरित झाली आहे. या आश्रमाद्वारे मानवतेसाठी दिल्या जाणाऱ्या महान सेवेमुळे आज हे छोटेसे गाव संपूर्ण जगात ओळखले जाते. ‘निसर्गोपचार आश्रम’ ही एक चळवळ आहे, एक तत्त्वज्ञान आहे आणि गांधीजींच्या कालातीत दृष्टिकोनातून प्रेरित झालेली एक जीवनपद्धती आहे. निसर्ग हाच सर्वश्रेष्ठ उपचारक आहे, असा गांधीजींचा दृढ विश्वास होता. नियमित शारीरिक व्यायाम, मानसिक शांतता आणि निसर्गाशी सुसंगत जीवनशैली स्वीकारण्याची प्रेरणा हा आश्रम आपल्याला देतो, असेही ते म्हणाले.

खरे आरोग्य हे गुंतागुंतीच्या वैद्यकीय उपचारांमध्ये नसून साधेपणा, शिस्त आणि निसर्गाशी सुसंवाद साधून जगण्यामध्ये सामावलेले असते अशी गांधीजींची शिकवण होती. त्यानुसार हा आश्रम निसर्गोपचार, योगसाधना तसेच प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेप्रती असलेल्या आपल्या दृढ कटिबद्धतेच्या माध्यमातून हजारो लोकांची सेवा करत आहे. आज संपूर्ण जग जीवनशैलीशी संबंधित आजारांचा सामना करत आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि तणावाशी संबंधित विकार यांचे प्रमाण आज अत्यंत चिंताजनक वेगाने वाढत आहे. आजकाल प्रत्येकजण तणावाचा सामना करत मर्यादित गरजा आणि निसर्गाशी मेळ साधणाऱ्या जीवनशैलीद्वारे त्यावर मात करता येते, असे श्री. राधाकृष्णन म्हणाले.

आरोग्य म्हणजे केवळ रोगाचा अभाव नव्हे, याची हा आश्रम आपल्याला आठवण करून देतो. आरोग्य ही संपूर्ण शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्याची अवस्था होय. साधेपणा, कष्ट आणि प्रामाणिक मार्गाने आपण काम केले, तर आनंद आपोआपच आपल्या मनात प्रवेश करेल आणि आरोग्य चांगले राहील.

आज संपूर्ण जग, आरोग्य आणि स्वास्थ्यासह आधुनिक काळातील विविध आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी आपल्याकडे आशेने पाहत आहे. जागतिक दृष्टिकोन आता बदलला आहे. केवळ पाश्चात्य वैद्यकशास्त्रच सर्वश्रेष्ठ मानले जात होते, तो काळ आता आपण मागे टाकला आहे. आपल्या पारंपरिक उपचारपद्धती आजारांच्या मुळावर उपचार करतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली, भारताने आपल्या पारंपारिक वैद्यकीय पद्धती, योग आणि तत्सम सर्वच क्षेत्रांचे पुनरुज्जीवन होत असून त्यांना जागतिक स्तरावरील मान्यता मिळत आहे. भारत आता ‘जागतिक वेलनेस पर्यटनाचे’ एक प्रमुख केंद्र म्हणून उदयास येत आहे. या आश्रमासह देशातील निसर्गोपचार केंद्रांमध्ये आजकाल मोठ्या संख्येने परदेशी पर्यटक उपचारांसाठी आवर्जून येत आहेत. आयुर्वेदिक उपचार, सिद्ध, युनानी उपचारपद्धतींना महत्व आले आहे. आज संपूर्ण जग ‘योग दिन’ साजरा करत आहे. आपण जेव्हा ‘विकसित भारत’ या संकल्पनेकडे पाहतो, तेंव्हा त्यासोबतच ‘स्वस्थ भारत’ असणेही आपल्यासाठी तितकेच आवश्यक ठरते. या प्रवासात आपल्या आश्रमासारख्या संस्थांची भूमिका अधिकच महत्त्वपूर्ण ठरते. निसर्गोपचार आश्रमाचे प्रयत्न आणि राज्य व केंद्र सरकारचे प्रयत्न यांच्या समन्वयातून होणारे कार्य हे हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने अत्यंत मोलाचे ठरेल., असे उपराष्ट्रपती म्हणाले.

जेव्हा व्यक्ती निरोगी असतात, तेव्हा कुटुंबे बळकट होतात आणि समाजाची भरभराट होते. तसेच राष्ट्राचा उत्कर्षही होतो. अशा वेळी, ‘विकसित भारत २०२७’ हे उद्दिष्ट त्याही आधी गाठणे शक्य होते. म्हणूनच, आपण सर्वांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे. आपल्या सर्वांकडे संयम असणे आवश्यक आहे. आपण आपले मन नेहमीच एका ‘प्रवाही’ अवस्थेत ठेवले पाहिजे, जेणेकरून ते अधिकाधिक गोष्टी ग्रहण करू शकेल. ‘निसर्गोपचार आश्रमा’ ही संस्था पुढील पिढ्यांनाही असेच मार्गदर्शन, उपचार आणि प्रेरणा देत राहो, तसेच संपूर्ण मानवतेला संयमाचा धडा शिकवत राहील असा विश्वासही श्री. राधाकृष्णन यांनी व्यक्त केला.

डॉ. नारायण हेगडे यांचे ‘आनंदाची रहस्ये’ हे पुस्तक आनंदी जीवनाविषयी भाष्य करणारे आहे, असे त्यांनी सांगितले.

राज्यपाल श्री. वर्मा म्हणाले, महात्मा गांधी हे निसर्गोपचाराचे महान पुरस्कर्ते होते. स्वातंत्र्याच्या वर्षी ३३ कोटी लोकसंख्येवरून आपण १४० कोटी लोकसंख्या गाठली असून आयुर्मयादा दुप्पट झाली आहे. आपण अन्नाच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालो आहे. मात्र, अन्नाची गुणवत्ता, विषयुक्त अन्नामुळे जीवनशैलीशी संबंधित आजारांसह अनेक आजारांचा प्रादुर्भाव वाढला आहे. निसर्गोपचार, आयुर्वेद, योगा, युनानी, आधुनिक उपचारपद्धतीं आपला समृद्ध वारसा आहे. स्वस्थ भारतासाठी निसर्गोपचार महत्वाचे आहेत. समग्र उपचार पद्धती आज महत्वाची असून निसर्ग हा आजारांवरील महान उपचारक आहे, असेही ते म्हणाले. या संदर्भातील महात्मा गांधी यांचे विचार आजही महत्वाचे आहेत असेही राज्यपाल म्हणाले.

निसर्गोपचार आश्रम गेली ८ दशके समाजाची सेवा करीत आहे. पर्यावरण प्रदूषण, व्यसनधीनता आणि अयोग्य आहारामुळे विविध आजार वाढत आहेत. अशा परिस्थितीत देशभरात निसर्गोपचाराचा प्रसार केल्यास रोजगार निर्मिती होण्यासोबत नागरिकांना निरोगी जीवनशैली स्वीकारण्यास प्रोत्साहित करता येईल. विकसित भारताचे स्वप्न स्वस्थ भारताच्या माध्यमातूनच पूर्ण होऊ शकेल.निसर्गोपचार आश्रमाने विद्यापीठांसोबत समन्वय साधून भारतीय पारंपरिक उपचार पद्धतीचा प्रसार करावा. त्याद्वारे अशा उपचारासाठी कुशल मनुष्यबळ प्राप्त होईल, असे श्री. वर्मा म्हणाले.

शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणे हे मोठे आव्हान आहे. त्यासाठी हा आश्रम प्रयत्न करत आहे. आश्रमाला परत भेट द्यायला तसेच आश्रमाच्या आदिवासी भागात सुरू असलेल्या कार्याला भेट द्यायला आवडेल असेही राज्यपाल म्हणाले.

राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह म्हणाले, देशाला आत्मनिर्भर बनविण्यात स्वदेशी उपचारपद्धती महत्वाची आहे. त्यामुळे केंद्र सरकारने २०१४ नंतर केंद्र सरकारनेदेखील म.गांधीजींच्या या आश्रमासारख्या प्रयोगांचा विस्तार करण्याच्या कामाला वेग दिला आहे. केंद्राने आयुष मंत्रालयाची स्थापना केली असून प्रत्येक वर्षी मंत्रालयाची आर्थिक तरतूद ४ हजार ४०० कोटीहून अधिक आहे.

जगात रोगोपचार खर्चिक होत असतांना सेवाभाव ही या आश्रमाची विशेषतः आहे. इथली कार्यपद्धती लक्षात घेतल्यास त्यात महात्मा गांधीजींच्या विचारांचा सुगंध दरवळतो आहे असे म्हणता येईल. माती, पाणी, ऊन, हवा या माध्यमांतून या ठिकाणी उपचार होत आहेत. इथली शिस्त इतरांनाही मार्गदर्शक आहे. साधे जीवन, स्वयंशिस्त आणि निसर्गाचा सन्मान करीत गांधीजींना अभिप्रेत असलेली आनंदी जीवनशैली स्वीकारता येईल, असे त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री श्रीमती पवार म्हणाल्या, निसर्गोपचार आश्रम केवळ एक आरोग्य केंद्र नसून जीवन जगण्याचा महत्वपूर्ण मार्ग आहे.  राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या प्रेरणेतून स्थापन झालेला हा आश्रम नैसर्गिक उपचारपद्धतीच्या माध्यमातून आरोग्य, स्वावलंबन आणि साधेपणाच्या जीवनाचा संदेश देतो. केवळ आजारांवरील उपचार नव्हे तर सुदृढ जीवनशैली आणि निसर्गासोबत संतुलन राखण्याची प्रेरणा देखील देत आहे. निसर्ग आणि महात्मा गांधी यांचे अतूट नाते होते. ग्रामीण भागाचा विकास हा त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू होता. भारताचा खरा आत्मा गावात वसतो, या विचारावर त्यांचा ठाम विश्वास होता. म्हणूनच त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात ग्रामीण उन्नती, स्वावलंबन आणि साधेपणाचा मार्ग स्वीकारला आणि समाजासमोर आदर्श निर्माण केला.

निसर्गाच्या सानिध्यात प्रत्येक आजार बरा करण्याची ताकद असते, हा गांधीजींचा संदेश आजही मार्गदर्शक आहे. या विचारांची प्रत्यक्ष अंमलबजावणी उरळी कांचन निसर्गोपचार आश्रम येथे पाहायला मिळते. गांधीजींचे हे विचार केवळ आरोग्यापुरते मर्यादित नाहीत, तर ते साधेपणा, स्वावलंबन आणि ग्रामीण विकासाचा व्यापक संदेश देणारे आहेत. ‘खेड्याकडे चला’ हा त्यांचा संदेश आजही तितकाच कालसुसंगत आहे, असेही त्या म्हणाल्या.

डॉ. हेगडे यांनी प्रास्ताविकात आश्रमाची माहिती दिली. ते म्हणाले, राष्ट्रपिता महात्मा गांधी हे याच दिवशी १९४६ येथे आले आणि सहकाऱ्यांच्या मदतीने निसर्गोपचार आश्रम स्थापन केला व स्थानिकांवर निसर्गोपचार केले. येथे आश्रमाचे तत्कालीन संस्थापकांनी आश्रमाच्या विस्तारासाठी प्रयत्न केले. तसेच येथील शेतकऱ्यांसाठी गाईंच्या वंशसुधारासाठी प्रयत्न केले.

यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त डॉ. देखणे यांनीही मनोगत व्यक्त केले.

यावेळी डॉ. हेगडे लिखित ‘आमच्या आनंदाचे रहस्य’ अर्थात ‘सिक्रेट्स ऑफ आवर हॅपीनेस’ या पुस्तकाचेही यावेळी प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमाला आश्रमाचे विश्वस्त, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

‘चैत्र चाहूल २०२६’ : ‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा भावपूर्ण सोहळा रवींद्र नाट्यमंदिरात संपन्न!

मुंबई : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या ‘ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा हा सोहळा यावर्षी गुरुवार, १९ मार्च २०२६ रोजी रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात अभिनेता वैभव मांगले यांच्या प्रभावी कथावाचनाने झाली. त्यांनी प्रख्यात लेखक विद्याधर पुंडलिक यांच्या ‘माळ’ या गाजलेल्या कथेचे वाचन सादर केले. मानवी नातेसंबंध, एकटेपणा आणि भावनिक पोकळी यांचे सूक्ष्म दर्शन घडवणाऱ्या या कथेचे त्यांनी केलेले सादरीकरण इतके जिवंत होते की, सभागृहातील रसिक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. ‘माळ’ ही केवळ ओसाड जागेची प्रतिमा नसून, मनातील रिकामेपणाचे प्रतीक आहे, हे त्यांनी आपल्या वाचनातून प्रभावीपणे उलगडले. मास्तर आणि काशीताई यांसारख्या व्यक्तिरेखा जणू रंगमंचावर सजीव झाल्याचा भास रसिकांना झाला. उपस्थितांनी या वाचनाला उत्स्फूर्त दाद दिली.

यानंतर ‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचे वितरण करण्यात आले. पुण्यातील ‘सुदर्शन रंगमंच’च्या शुभांगी दामले यांना ‘ध्यास सन्मान’ प्रदान करण्यात आला, तर प्रख्यात लेखक व भाष्यकार सुरेश गोसावी यांना ‘रंगकर्मी सन्मान’ देऊन गौरविण्यात आले. सन्मान स्वीकारताना शुभांगी दामले यांनी सांगितले की, नाट्यदर्पण रजनीकार सुधीर दामले यांच्या प्रेरणेतून सामाजिक कार्याची दिशा मिळाली आणि इतरांना संधी उपलब्ध करून देण्याच्या ध्यासातून आपली वाटचाल घडली. तर सुरेश गोसावी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले, “आजपर्यंत लिहिले खूप, पण बोलण्याचा प्रसंग पहिल्यांदाच आला. बाजुस पडलेल्या दगडाला मोठे पण द्यायचा आज उत्सव आहे. नमस्कार”

या प्रसंगी निलेश जाधव यांनी पद्मश्री डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांना स्वतः तयार केलेल्या विठोबाच्या तैल चित्राची आकर्षक फोटोफ्रेम भेट दिली. तसेच त्यांना सापडलेल्या सोन्याच्या दागिन्यांतून मिळालेली रक्कम सामाजिक कार्यासाठी देण्याचा उदात्त निर्णय घेत, पेण येथील दिव्यांग मुलांसाठी कार्यरत ‘सुहित जीवन ट्रस्ट’च्या संचालिका सुरेख पाटील यांच्याकडे ती रक्कम सुपूर्द करण्यात आली. यावेळी ‘ॲड फिझ’ निर्मित ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ या कॉफीटेबल पुस्तकाची झलकही सादर करण्यात आली.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पद्मश्री डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांनी ‘रंग विठ्ठल’ हा खास ‘चैत्र चाहूल’साठी सादर केलेला अभंग रसिकांसमोर सादर केला. त्यांच्या सुरेल गायनाला तबल्यावर यती भागवत, संवादिनीवर ज्ञानेश्वर सोनवणे, तालवाद्यावर सूर्यकांत सुर्वे, पखवाजवर हनुमंत रावडे, बासरीवर अमर ओक तसेच स्वरसाथीसाठी निमिष कैकाडी, स्वरांगी मराठे आणि स्वराली जोशी यांनी समर्थ साथ दिली.

सुर-संगीताने रंगले पं.  जितेंद्र अभिषेकी महोत्सवाचे चौथे सत्र

पुणे : अवीट गोडीच्या चालींनी सजलेल्या बंदिशी, गायकांचे अप्रतिम सादरीकरण, सरोदच्या तारांवर उमटणारे मधुर सूर आणि रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अशा सुरेल संगमाने पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव रंगून गेला.

तरंगिनी सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि ‘आपला परिसर’ संस्थेतर्फे कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित विसाव्या पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात निषाद व्यास (गायन), अनुपम जोशी (सरोद) आणि जयंत केजकर (गायन) यांनी आपल्या कलेचा अप्रतिम आविष्कार सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.

सकाळच्या सत्राची सुरुवात निषाद व्यास यांच्या गायनाने झाली. त्यांनी राग गुजरी तोडीमध्ये सादर केलेल्या ‘सरस्वती चे मागत हो’ या बंदिशीने रसिकांना सुरेल आनंदाची अनुभूती दिली. त्यानंतर ‘साधू रचना राम बनाई रे’ या सादरीकरणातून त्यांनी बनारस घराण्याच्या गायकीचा ठसा उमटवला. त्यांच्या सादरीकरणाला कौशिक केळकर (तबला) आणि माधव लिमये (संवादिनी) यांची समर्थ साथ लाभली.

यावेळी बोलताना निषाद व्यास यांनी, “जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवात सादरीकरणाची संधी मिळणे ही माझ्यासाठी मोठी गौरवाची बाब आहे. येथे गायन करणे म्हणजे पंडित अभिषेकी यांच्या चरणी संगीत सेवा अर्पण करण्यासारखे आहे,” असे सांगितले.

यानंतर अनुपम जोशी यांच्या सरोद वादनाने मैफिलीत वेगळाच रंग भरला. त्यांनी राग बसंतने वादनाची सुरुवात केली. सरोद हे वाद्य मुख्यतः राजस्थान आणि पश्चिम बंगालमध्ये प्रचलित असले तरी मराठी संगीत परंपरेशी त्याचा संगम घडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. ‘खेळ मांडीयेला वाळवंटी दारी, नाचती वैष्णव ठायी रे’ हा अभंग सरोदवर सादर करत त्यांनी वातावरण भक्तिमय केले. त्यांच्या सादरीकरणाला महेशराज साळुंखे आणि संजय प्रधान (तबला) यांची साथ लाभली. यावेळी आयोजक उज्वल केसकर यांनी कलाकारांचा सत्कार केला.

महोत्सवातील ‘पंडित जितेंद्र अभिषेकी प्रथितयश कलाकार’ पुरस्कार प्राप्त जयंत केजकर यांनीही आपल्या गायनाने रसिकांची मने जिंकली. त्यांनी राग जौनपुरीने मैफिलीची सुरुवात करत विविध रागांच्या सादरीकरणातून अभिजात संगीताची मेजवानी दिली. त्यांच्या सादरीकरणाला अभिजीत जायदे (तबला) आणि लीलाधर चक्रदेव (संवादिनी) यांनी समर्थ साथ दिली.

संपूर्ण सत्रभर रसिकांनी टाळ्यांच्या गजरात कलाकारांना दाद देत महोत्सवाची रंगत अधिक खुलवली.

सार्वत्रिक निवडणुका आणि पोटनिवडणुका 2026: सर्व मतदान केंद्रांवर किमान आवश्यक सुविधा आणि मतदार सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार

1. भारत निवडणूक आयोगाने (इसीआय) 15 मार्च 2026 रोजी आसाम, केरळ, पुडुचेरी, तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या विधानसभांच्या सार्वत्रिक निवडणुकांचे तसेच 6 राज्यांतील पोटनिवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले.

2. इसीआयने राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना (सीईओ) निर्देश दिले आहेत की, प्रत्येक 2,18,807 मतदान केंद्रांवर किमान आवश्यक सुविधा (एएमएफ) आणि मतदानाच्या दिवशी मतदार सहाय्य उपलब्ध करून द्यावे.

3. एएमएफ अंतर्गत पिण्याचे पाणी, सावलीसह प्रतीक्षा क्षेत्र, पाण्याची सुविधा असलेले स्वच्छतागृह, पुरेसे प्रकाश, दिव्यांग मतदारांसाठी योग्य उताराचा मार्ग, मानक मतदान कक्ष आणि योग्य दिशादर्शक फलक यांचा समावेश आहे. तसेच, रांगेत उभ्या असलेल्या मतदारांना विश्रांती घेता यावी यासाठी ठराविक अंतरावर बाक ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

4. मतदार जागरूकता वाढवण्यासाठी, प्रत्येक मतदान केंद्रावर चार एकसमान आणि प्रमाणित मतदार सुलभता भीत्तीपत्रक (व्हीएफपी) ठळकपणे प्रदर्शित केले जातील. यामध्ये मतदान केंद्राची माहिती, उमेदवारांची यादी, करावयाच्या आणि टाळावयाच्या गोष्टी, मान्य ओळखपत्रांची यादी आणि मतदान प्रक्रिया यांचा समावेश असेल.

5. प्रत्येक मतदान केंद्रासाठी मतदार सहाय्य केंद्रे (व्हीएबी) स्थापन केली जातील. येथे मतदान केंद्र स्तर अधिकारी (बीएलओ) किंवा इतर अधिकारी मतदारांना त्यांच्या मतदान केंद्राचा क्रमांक आणि मतदार यादीतील अनुक्रमांक शोधण्यात मदत करतील. व्हीएबीवर स्पष्ट दिशादर्शक फलक असतील आणि मतदान केंद्राकडे येताना ते सहज दिसतील.

6. मतदारांच्या सोयीसाठी इसीआयने घेतलेल्या उपक्रमांपैकी एक म्हणून, मतदान केंद्राच्या प्रवेशद्वाराबाहेर मोबाईल फोन ठेवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. मतदार मतदान केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी आपला फोन (बंद अवस्थेत) नियुक्त स्वयंसेवकाकडे देऊ शकतात आणि मतदान केल्यानंतर तो परत घेऊ शकतात.

7. आयोगाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की एएमएफ आणि संबंधित सुलभता उपायांची अंमलबजावणी अनिवार्य आहे आणि सर्व मतदान केंद्रांवर त्याचे काटेकोरपणे पालन केले जाईल. सर्व संबंधित अधिकाऱ्यांना मतदानाच्या तारखेपूर्वी आवश्यक कामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, जेणेकरून सर्व मतदारांना सुरळीत आणि आनंददायी मतदानाचा अनुभव मिळेल.

एकविसाव्या शतकातही सुरू असलेली युद्ध दुर्दैवी:केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे प्रतिपादन

पुणे-सध्या जगभरात युद्धग्रस्त परिस्थिती असल्याचे आढळून येत आहे. एकविसाव्या शतकातही सुरू असलेली युद्ध दुर्दैवी असून या परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘युद्ध नको, बुद्ध हवा’, हा संदेश जगासाठी उद्बोधक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

पद्मपाणी फाउंडेशन आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पाली व बौद्ध अध्ययन विभाग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या पाली साहित्य संमेलनाचे उद्घाटन आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संमेलनाध्यक्ष बनारस हिंदू विश्वविद्यालयाच्या पाली विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. बिमलेन्द्र कुमार, गगन मलिक, भदंत हर्षबोधि महाथेरो, डॉ योजना भगत, धम्मदीप वानखेडे, डॉ. करुणा जाधव, डॉ नीरज बोधी, स्वागताध्यक्ष डॉ सिद्धार्थ धेंडे, डॉ. गौतम चाबुकस्वार, उपमहापौर परशुराम वाडेकर, संयोजक राहुल डंबाळे, सुवर्णा डंबाळे, आदी मान्यवर उपस्थित होते.

पाली भाषेने जगाला ज्ञान प्रदान केले आहे. विज्ञानवाद, समानता, मानवता आणि शांततेचे ज्ञान, बौद्ध तत्त्वज्ञान पाली भाषेतूनच जगभरात पोहोचले आहे. पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आपण प्रयत्न केले असून यापुढे पाली भाषेचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणावर व्हावा यासाठी शासकीय पातळीवर सर्व प्रकारची मदत करू, अशी ग्वाही आठवले यांनी यावेळी दिली. जगभरातील युद्धस्थिती, समाजातील असमानता, हिंसाचार दूर करण्यासाठी पाली भाषेचा प्रसार आवश्यक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान आणि समृद्ध भारतीय परंपरेचे भांडार पारिभाषेत उपलब्ध असून दुःखातून बाहेर पडून समाधान प्राप्त करण्याचा, चित्तशुद्धीचा मार्ग पाली भाषाने दाखवला आहे. त्यामुळे शालेय अभ्यासक्रमापासून पालीचा समावेश ऐच्छिक भाषा म्हणून होणे आवश्यक आहे, असे मत बिमलेंद्र कुमार यांनी व्यक्त केले. बौद्ध तत्त्वज्ञानाप्रमाणेच सामाजिक, आर्थिक, राजनैतिक अशा सर्व विषयांवरील व्यापक साहित्य पाली भाषेत उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असला तरी त्याचे संवर्धन व प्रसार व्हावा यासाठी कोणताही कार्यक्रम हाती घेण्यात आला नाही. राष्ट्रीय संस्कृत संस्थानच्या धर्तीवर पाली भाषेच्या संवर्धनासाठी राष्ट्रीय विद्यापीठ किंवा संस्थेची स्थापना करण्यात यावी. महाविद्यालयांमध्ये पाली भाषेच्या प्राध्यापकांची अनेक पदे रिक्त असून ती ताबडतोब भरण्यात यावी, अशा मागण्याही त्यांनी यावेळी केल्या.

सध्याच्या काळात केवळ पाली भाषाच नव्हे तर बौद्ध धम्म धोक्यात आला असल्याची भीती गगन मलिक यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली. सर्वसामान्यांना ज्ञान देण्याची जबाबदारी असलेल्या प्रथम पाली भाषेचा अभ्यास करणे आवश्यक आहे. बौद्ध धर्माचे संवर्धन व प्रसार करणाऱ्या भिक्षूची संख्या मर्यादित आहे. समाजातील सुशिक्षित आणि कर्तृत्ववान युवक भिक्षू होण्यास तयार नाहीत, अशी खंत व्यक्त करतानाच मलिक यांनी भिक्षू होण्याची तयारी असलेल्या युवकांच्या थायलंड मधील पंधरा वर्षाच्या प्रशिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेण्याची तयारी देखील दर्शविली.

पाली भाषा ही माणसांना जोडणारी, मैत्रीची आणि परिवर्तनाची भाषा असल्याचे भदंत हर्षबोधी महाथेरो यांनी नमूद केले. बौद्ध धर्माचा, गौतम बुद्धांच्या आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानाचा, विचाराचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी भिख्खू संघाने एकत्र येऊन पुढाकार घेण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. पाली भाषेतील समृद्ध साहित्य सर्व भारतीय भाषांमध्ये अनुवादित केले जावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. डॉ बाबासाहेब आंबेडकर हे चिवर धारण न केलेले संन्यासी होते, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

पाली भाषेच्या प्रचार आणि प्रसाराची जबाबदारी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी हाती घेतली पाहिजे, असे आवाहन सुवर्ण डंबाळे यांनी प्रास्ताविकात केले. यावेळी डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी पाली भाषेच्या प्रसारासाठी निधी मिळावा आणि प्राथमिक शिक्षणात पाली भाषेचा समावेश करावा, अशा मागण्या केल्या. राहुल डंबाळे यांनी पाली भाषेच्या ऑनलाइन प्रशिक्षणासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याची तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे समग्र साहित्य पालीमध्ये अनुवादित करण्याची घोषणा यावेळी केली. साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सत्रात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाली व बौद्ध अध्ययन विभागाचे विभाग प्रमुख डॉ. महेश देवकर यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले.  त्याचप्रमाणे पाली भाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणारे गायक पावा, गगन मलिक, अतुल भोसेकर आणि संमेलन अध्यक्ष बीमलेन्द्र कुमार यांचाही सत्कार करण्यात आला.

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे पुणे विमानतळावर स्वागत

पुणे, दि. २२ – भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे आज पुणे विमानतळ येथे आगमन झाले. राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी उपराष्ट्रपती महोदयांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनीही उपराष्ट्रपतींचे स्वागत केले.

यावेळी राज्यसभेचे उप सभापती हरिवंश सिंग, लेफ्टनंट जनरल धीरज सेठ, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आदी उपस्थित होते.

पकडला गेला तरच ‘भोंदू’ का ? भक्तांच्या आंधळेपणाचे काय? डोळस श्रद्धा की वैचारिक गुलामगिरी ?

नाशिकच्या खरात प्रकरणावरून अतुल कुलकर्णींचा सवाल

मुंबई-स्वत:ला देवाचा अवतार सांगून महिलांचे शोषण करणारा भोंदूबाबा ‘कॅप्टन’ अशोक खरात सध्या गजाआड आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 58 व्हिडिओ जप्त केले असून, यात अनेक बडे नेते आणि हस्तींचे चेहरे उघडे पडण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर प्रश्नांची सरबत्ती करत समाजाला आरसा दाखवला आहे.

अतुल कुलकर्णी यांनी उपस्थित केलेला पहिलाच प्रश्न काळजाला भिडणारा आहे. ते विचारतात, एखादा बाबा पकडला गेला कीच त्याला ‘भोंदू’ का म्हणायचे? त्याआधी तो काय असतो? आणि जे कधीच पकडले जात नाहीत, त्यांचे काय? हा प्रश्न केवळ खरातपुरता मर्यादित नसून, गल्लीबोळात उभे राहिलेल्या स्वयंघोषित महाराजांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आहे.
अतुल कुलकर्णी म्हणाले की, जेव्हा एखाद्या महाराजाचे काळे कारनामे चव्हाट्यावर येतात, तेव्हा त्याचे अनुयायी स्वतःला ‘पीडित’ मानतात. पण , हे भक्त नेमके कोण असतात? भागीदार, पीडित, अंधळे, अंधश्रद्धाळू की मूर्ख?अंध होण्याला कारणीभूत कोण? फसवणारा की स्वतःहून फसणारा? असा सवाल कुलकर्णी यांनी केला आहे. हे सगळं जितकं धर्मकारणाला लागू होतं, तितकंच ते राजकारणालाही लागू होतं का?” ज्याप्रमाणे आपण डोळे मिटून एखाद्या बाबावर विश्वास ठेवतो, तसाच विश्वास आपण राजकीय नेत्यांवरही ठेवतो का? असा बोचरा सवाल त्यांनी केला आहे.

ट्रम्प यांचा इराणला अल्टिमेटम- 48 तासांत होर्मुझ उघडा:नाहीतर पॉवर प्लांट उद्ध्वस्त करू; इराण म्हणाला- अमेरिका-इस्त्रायलचे वॉटर प्लांट उडवून देऊ

तेहरान

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणला कठोर इशारा दिला आहे. त्यांनी सांगितले की, जर ४८ तासांच्या आत होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली केली नाही, तर अमेरिका इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला करेल.

ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रविवारी लिहिले, ‘जर इराणने ४८ तासांच्या आत होर्मुझची सामुद्रधुनी खुली केली नाही, तर अमेरिका इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला करून त्यांना उद्ध्वस्त करेल आणि सर्वात मोठ्या प्रकल्पापासून सुरुवात होईल.’

त्याचबरोबर, इराणने इशारा दिला आहे की, जर त्याच्या ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य केले गेले, तर तो मध्य पूर्वेतील अमेरिका आणि इस्त्राईलशी संबंधित सर्व ऊर्जा पायाभूत सुविधांवर हल्ला करेल.

इराणच्या खातम अल-अनबिया सेंट्रल कमांडचे प्रवक्ते इब्राहिम झुल्फाघारी यांनी सांगितले की, इराण अमेरिका आणि इस्त्राईलशी संबंधित समुद्राचे पाणी गोडे करणाऱ्या प्रकल्पांवर (डिसेलिनेशन प्लांट) आणि आयटी पायाभूत सुविधांवरही हल्ला करेल.
इराणचा इस्रायली शहरावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने हल्ला

इराणने शनिवारी रात्री इस्रायलच्या दक्षिणेकडील डिमोना शहरावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने हल्ला केला, ज्यात सुमारे 20 लोक जखमी झाले. डिमोना हे तेच शहर आहे जिथे इस्रायलचे अणु कार्यक्रम केंद्र आहे.
राणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पझेशकियान यांनी शनिवारी पंतप्रधान मोदींशी फोनवर चर्चा केली. यावेळी ते म्हणाले की, ब्रिक्सने इराणवर होणारे हल्ले रोखण्यात भूमिका बजावली पाहिजे.

ते म्हणाले की, ब्रिक्सने कोणत्याही दबावाशिवाय, स्वतःच्या बळावर काम केले पाहिजे आणि या प्रकरणात पुढे आले पाहिजे.

इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी असेही सुचवले की, मध्य पूर्वेतील देशांनी एकत्र येऊन एक नवीन सुरक्षा प्रणाली तयार केली पाहिजे. यामुळे या प्रदेशात शांतता आणि स्थिरता टिकून राहील आणि बाहेरील देशांचा हस्तक्षेप कमी होईल.
इराणकडून इस्रायलच्या दिशेने क्षेपणास्त्रे डागण्यात आली
इस्रायली लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, इराणकडून नवीन क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत.

लष्करी निवेदनानुसार, हा धोका टाळण्यासाठी हवाई संरक्षण यंत्रणा सक्रिय करण्यात आली असून, क्षेपणास्त्रांना रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

इस्रायलमधील इराणी हल्ल्यांमध्ये १५० हून अधिक लोक जखमी
इस्रायलच्या आर्मी रेडिओनुसार, दिमोना आणि अराद येथील हल्ल्यांनंतर १५० जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

इस्रायलमधील हल्ल्यानंतर हे सर्व लोक उपचारासाठी सोरोका रुग्णालयात दाखल झाले आहेत. जखमींची प्रकृती आणि हल्ल्यांमुळे झालेल्या एकूण नुकसानीची माहिती अद्याप उपलब्ध नाही.
इराणमध्ये ११० गॅस-आधारित वीज प्रकल्प, अमेरिकेकडून हल्ल्याचा इशारा
ट्रम्प यांनी इशारा दिला आहे की, जर ४८ तासांच्या आत होर्मुझची सामुद्रधुनी उघडली नाही, तर इराणच्या वीज प्रकल्पांवर हल्ला केला जाईल. इराणच्या वीज पायाभूत सुविधांविषयी माहिती समोर आली आहे.

या माहितीनुसार, इराणमध्ये अंदाजे ११० गॅस-आधारित वीज प्रकल्प आहेत, त्यापैकी काही हायब्रीड आहेत. याव्यतिरिक्त, देशात सौर, जल, पवन, तेल, डिझेल, कोळसा, भू-औष्णिक आणि अणुऊर्जेवर चालणारे प्रकल्प देखील आहेत.

इराणचे तीन सर्वात मोठे वीज प्रकल्प गॅसवर चालणारे आहेत:

दमावंद कंबाईन्ड सायकल पॉवर प्लांट: तेहरानच्या आग्नेयेला सुमारे ७० किमी अंतरावर स्थित, क्षमता २,८६८ मेगावॅट.

शहीद सलीमी पॉवर प्लांट: माझंदरान प्रांतात कॅस्पियन समुद्राजवळ स्थित, क्षमता २,२१५ मेगावॅट.

शहीद रझाई पॉवर प्लांट: तेहरानच्या ईशान्येला सुमारे ११० किमी अंतरावर स्थित, क्षमता २,०४३ मेगावॅट.

अमेरिकेतील फ्लोरिडा येथील वेस्ट काउंटी एनर्जी सेंटर हा ३,७५० मेगावॅट क्षमतेचा सर्वात मोठा गॅस ऊर्जा प्रकल्प आहे.

इराण आपल्या विजेचा बहुतांश भाग जीवाश्म इंधनातून निर्माण करतो. २०२३ मध्ये, यातून अंदाजे ३४०,००० गिगावॅट-तास वीज निर्माण झाली, तर अंदाजे २८,००० गिगावॅट-तास वीज नवीकरणीय ऊर्जेतून मिळाली.

अणुऊर्जेबद्दल माहिती अशी कि , इराणमध्ये सध्या फक्त एकच कार्यरत अणुभट्टी आहे – बुशेहर अणुऊर्जा प्रकल्प. इराण सध्या आणखी एका अणुभट्टीचे बांधकाम करत आहे. २०२३ मध्ये, इराणने अणुऊर्जेतून ५,७४० गिगावॅट-तास वीज निर्माण केली.

शिवणे ते खराडी कर्वेनगर हद्दीमधील १२० फुटी डीपी रस्त्यांचे काम सुरु करणार -नगरसेवक स्वप्नील दुधानेंना आश्वासन

0

पुणे- महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ३० मधील विविध कामे तसेच शिवणे ते खराडी कर्वेनगर हद्दीमधील १२० फुटी डीपी रस्त्यांचे काम जिथे जिथे भूसंपादन झालेले आहे ,किंवा महापालिकेच्या मालकीची जागा आहे तिथे तिथे तातडीने सुरु करण्याची कार्यवाही करू असे आश्वासन येथे पुणे महापालिका पथ विभागाचे मुख्य अभियंता राजेश बनकर यांनी त्यांच्या सर्व पथ विभागाचे अधिकारी यांच्यासमवेत या प्रभागातील विविध रस्त्यांची तब्बल दोन ते अडीच तास पाहणी केल्यानंतर दिले,

महापालिका शहर सुधारणा समितीचे सदस्य , नगरसेवक स्वप्नील देवराम दुधाने यांनी सांगितले कि अधिकाऱ्यांनी आपल्या समवेत केलेल्या पाहणी दरम्यान खालील कामे सत्वर पूर्ण करण्यासाठी कार्यवाही सुरु करत असल्याचे आश्वस्त केले आहे.

पहा नेमकी कोणती कामे.

  • शिवणे ते खराडी कर्वेनगर हद्दीमधील १२० फुटी डीपी रस्त्यांमधील नव्याने ताब्यात आलेल्या जागेवर रस्त्याचे काम चालू करण्यात यावे. तसेच सनसिटी ते कर्वेनगर या उड्डाणपूलाच्या अनुषंगाने कर्वेनगर हद्दीमधे विविध उपाययोजना खालील प्रमाणे करण्यात याव्या.
  • ट्री हाउससमोरील १२ मी. डीपी रस्ता तसेच भालेकर उद्यानासमोरील १२ मी. डीपी रस्ता वनवे करण्याकरिता वाहतूक विभागाची परवानगी घ्यावी.
  • जावळकर वस्तीमधील ३० मी. रस्ता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे जोडणे
  • शाहू कॉलनी लेन नं. १ मधील १२ मी. रस्ता पूर्ण करणे
  • शंभर फुटी डीपी रोडलगत असणाऱ्या कुलश्री कॉलनी, यशश्री कॉलनी, वेदांत नगरी, विदिशा सोसायटी या रस्त्यांवर जड वाहतूक बंद करण्याकरिता वाहतूक विभागास पत्रव्यवहार करावा व त्याप्रमाणे अंमलबजावणी करण्यात यावी.
  • ⁠वारजे महामार्ग चौक ते कात्रजकडे जाणाऱ्या १२ मी. रस्त्यावरील ओढ्यावरील बॉक्स कलव्हर्ट रस्त्याचे काम दि. ३१ मे २०२६ म्हणजेच पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणे
  • तिरुपतीनगर येथील लाईटहाऊस समोरील अर्धवट डीपी रस्त्याचे काम पूर्ण करण्यात यावे.
  • वारजे हद्दीमधील सागर हॉटेल ते अक्षय कॉलनीपर्यंत उर्वरित पदपथचे काम चालू करण्यात यावे.
  • ⁠पश्चिम रंग सोसायटी बाहेरील २४ मी. रस्ता पुणे महानगरपालिकेच्या मालकीच्या असल्याने सदर रस्त्याचे काम सुरू करणे
  • शाहू कॉलनी लेन नंबर २ ते लेन नंबर ११ पर्यंत बरेच दिवस रखडलेला पाणंद रस्ता पूर्ण करणे
  • कर्वेनगर स्मशानभूमीच्या बाहेर चालू असलेल्या आरसीसी बॉक्स कलव्हर्टचे काम ३१ एप्रिल २०२६ पूर्वी पूर्ण करणे

केदार शिंदे – सना शिंदे घेऊन येत आहेत ‘आई भाड्याने हवी?’

मराठी चित्रपटसृष्टीत स्त्रीप्रधान आणि कुटुंबप्रधान विषयांना वेगळी ओळख देणारे दिग्दर्शक केदार यशोधरा शिंदे आता आणखी एका वेगळ्या आणि विचार करायला लावणाऱ्या संकल्पनेसह प्रेक्षकांसमोर येत आहेत. ‘अगंबाई…अरेच्चा!’, ‘बाईपण भारी देवा’ आणि ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ या यशस्वी चित्रपटांनंतर आता ‘आई भाड्याने हवी?’ या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.

सनफ्लॉवर स्टुडिओ निर्मित या चित्रपटाची कथा आणि लेखन वैशाली शशी नाईक आणि ओंकार वसुंधरा दत्त यांनी केले असून छायांकन व संकलनाची जबाबदारी मयुर संजिवनी हरदास यांनी सांभाळली आहे. विशेष म्हणजे ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?’नंतर निर्माती सना शिंदे, दिग्दर्शक केदार शिंदे, लेखिका वैशाली शशी नाईक, लेखक ओंकार वसुंधरा दत्त ही चौकडी पुन्हा एकदा एकत्र येत असल्याने चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

दिग्दर्शक केदार शिंदे सांगतात, “स्त्रीप्रधान विषय हाताळणे ही नेहमीच जबाबदारीची आणि आव्हानात्मक गोष्ट असते. जोपर्यंत एखादी कथा मनापासून भिडत नाही, तोपर्यंत अशा चित्रपटाची सुरुवात करायची नाही, असा माझा ठाम निर्धार होता. ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ आणि ‘आई भाड्याने हवी?’ या दोन्ही चित्रपटांचे काम २०२३ पासून सुरू झाले. ‘आई भाड्याने हवी?’ हा चित्रपट मी ज्यांना आदर्श मानतो त्या राजकुमार हिरानी यांच्या शैलीची झलक देणारा आहे. हा केवळ विनोदी चित्रपट नाही, तर ‘आई’ या नात्याचा गाभा मांडणारा, मनाला स्पर्श करून जाणारा अनुभव आहे. मनोरंजनासोबतच विचार करायला लावणं हे माझं ध्येय असतं आणि या चित्रपटात ते प्रकर्षाने जाणवेल. शीर्षकातूनच आजच्या काळातील भावनिक तगमग जाणवते. सध्या कलाकारांची निवड सुरू असून, विविध वयोगटातील ‘आई’ प्रेक्षकांना पाहायला मिळतील. जून-जुलैमध्ये चित्रीकरणाला सुरुवात होईल.”

निर्माती सना शिंदे म्हणतात, “पहिल्या चित्रपटाला प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमामुळे या नव्या चित्रपटाबद्दलही तितकीच उत्सुकता आहे. पहिला चित्रपट भावनिक अंगाने साकारण्यात आला होता, तर ‘आई भाड्याने हवी?’ हा पूर्णपणे मनोरंजनप्रधान, रंगतदार आणि मल्टीस्टारर आहे. यात नातेसंबंध, भावना आणि विनोद यांचा सुरेख संगम अनुभवायला मिळेल. मला वैयक्तिकरित्या स्त्रीकेंद्री कथा आवडतात, त्यात ‘आई’ ही प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात सक्षम आणि प्रभावी व्यक्तिरेखा असते. प्रेक्षकांना आशयघन आणि मनाला भिडणारे चित्रपट देण्याचा आमचा प्रयत्न कायम असतो, आणि हा चित्रपट त्याच दिशेने टाकलेले आणखी एक पाऊल आहे.”

‘आई भाड्याने हवी?’ या वेगळ्या शीर्षकातूनच प्रेक्षकांच्या मनात कुतूहल निर्माण होत आहे. आजच्या बदलत्या कुटुंबव्यवस्थेत ‘आई’ या नात्याची गरज, त्याची उणीव आणि त्यामागची भावनिक पोकळी यावर हा चित्रपट हलक्याफुलक्या तरीही परिणामकारक पद्धतीने भाष्य करणार असल्याचे दिसते. एकीकडे धमाल, हसवणूक आणि मनोरंजन, तर दुसरीकडे अंतर्मुख करणारा आशय या दुहेरी ताकदीमुळे ‘आई भाड्याने हवी?’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक वेगळाच अनुभव ठरणार, यात शंका नाही. आता या ‘आई’च्या शोधाची कथा नेमकी कशी उलगडते, हे पाहाणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

एपस्टिन फाईल प्रकरणी संघाच्या नागपूर मुख्यालयावर सोमवारी काँग्रेस-‘वंचित’चा मोर्चा.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात धडक मोर्चा.

मुंबई, दि. २१ मार्च २०२६

एपस्टिन फाईलमध्ये आलेला नरेंद्र मोदींच्या नावाचा उल्लेख व अमेरिकेशी तडजोड करणारे नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदावर कायम का ठेवले? याचा जाब विचारण्यासाठी सोमवार दिनांक २३ मार्च रोजी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी व समविचारी पक्षांचा संयुक्त मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे. नागपुरातील संविधान चौक ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयापर्यंत हा धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली हजारो पदाधिकारी या मोर्चात सहभागी होणार आहेत.

अमेरिकेच्या न्याय विभागाने एपस्टिन फाईलची जी माहिती जाहीर केली आहे, त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा उल्लेख झालेला आहे. मोदी यांच्या मंत्रिमंडळातील एक मंत्री हरदीप पुरी यांचेही अनेकवेळा एपस्टिन फाईलमध्ये नाव आलेले आहे. अमेरिकेशी केलेल्या व्यापारी करारानेही भारतातील शेतकरी व शेती क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. भारताने अमेरिकेशी तडजोड केली असून नरेंद्र मोदी यांनी भारताचे सार्वभौमत्व व स्वाभिमान गहाण ठेवल्याचे चित्र निर्माण झाले आहे. एपस्टिन फाईलच्या निमित्ताने नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षाचे चाल, चलन, चेहरा व चारित्र्य उघड झाले आहे. रा. स्व. संघ ही भाजपाची मातृसंस्था असून भाजपासाठी निवडणूक प्रक्रियेत सक्रीय भाग घेत असते. भारताची जगात नाच्चकी होत असताना रा. स्व. संघाने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधापदावर अद्याप का ठेवले आहे, या मागणीसाठी हा संयुक्त मोर्चा आयोजित करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने दिली आहे.

युवा कलाकारांच्या सादरीकरणाने रंगले  पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाचे दुसरे सत्र

पुणे – विविध रागांनी नटलेले शास्त्रीय गायन, मन तल्लीन करणारी पखवाज वादनाची जुगलबंदी आणि रसिकांच्या टाळ्या-वाहव्यांच्या गजरात पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवातील ‘युवोन्मेश’ ही खास युवा कलाकारांची मैफिल रंगली.

तरंगिनी सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि ‘आपला परिसर’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २० व्या पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्राची सुरुवात गायिका डॉ. शर्वरी डिग्रजकर-पोफळे यांच्या सुरेल गायनाने झाली. त्यांनी राग गुजरी तोडीमध्ये विलंबित ख्याल आणि द्रुत बंदिश सादर करत रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या सादरीकरणाला गीत इनामदार, उमेश पुरोहित (तबला) आणि सुकन्या जोशी (तानपुरा) यांनी समर्पक साथ दिली.

यावेळी बोलताना डॉ. शर्वरी डिग्रजकर-पोफळे म्हणाल्या, “या प्रतिष्ठित महोत्सवात सादरीकरणाची संधी मिळणे हे माझे भाग्य असून, हे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे आशीर्वादच आहेत.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋषिकेश रामदासी यांनी केले, तर रश्मी अभिषेकी यांनी प्रास्ताविक केले. त्या म्हणाल्या, “अभिजात संगीताचा प्रचार-प्रसार करण्यासाठी पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी मोठे योगदान दिले आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून भारतीय शास्त्रीय संगीत तरुणांपर्यंत पोहोचावे, यासाठी ‘युवोन्मेश’ हा विशेष विभाग सुरू करण्यात आला आहे.”

या प्रसंगी देवश्री कचरे आणि मंगल गवळी यांच्या हस्ते डॉ. शर्वरी डिग्रजकर-पोफळे यांचा सत्कार करण्यात आला.

दुसऱ्या सत्रात पखवाज वादक पार्थ भूमकर आणि प्रथमेश तारळकर यांनी दमदार पखवाज वादन सादर केले. त्यांच्या प्रत्येक थापेसह मैफिल रंगत गेली आणि सभागृहात भक्तीमय वातावरणाची अनुभूती निर्माण झाली. अथर्व कुलकर्णी (संवादिनी) यांनी त्यांना साथ दिली.

महोत्सवाच्या शेवटच्या सत्रात आसामच्या गायिका श्रुती बुजरबारूआ यांनी अप्रतिम गायन सादर केले. त्यांनी राग शुद्ध सारंगमध्ये ‘धरणी धरोहर’ ही रूपक मध्य तालातील बंदिश सादर करत रसिकांची मने जिंकली. त्यांच्या सादरीकरणाला पार्थ ताराबादकर (तबला) आणि सौमित्र क्षीरसागर (संवादिनी) यांनी समर्थ साथ दिली.

यावेळी भावना व्यक्त करत श्रुती बुजरबारूआ म्हणाल्या, “या महोत्सवात सादरीकरणाची संधी मिळणे हे माझे भाग्य आहे. आसामहून महाराष्ट्रात आल्यानंतर मी पंडित विजय कोपरकर यांच्याकडे गायनाचे शिक्षण घेतले. त्यामुळे पुण्यात सादरीकरण करणे म्हणजे माझ्यासाठी माहेरच्या ठिकाणी संगीत सेवा करण्यासारखे आहे.”

युवा कलाकारांच्या उत्स्फूर्त आणि दर्जेदार सादरीकरणामुळे ‘युवोन्मेश’ मैफिलीने महोत्सवात विशेष रंग भरला.

व्हायरल फोटो खरातच्या मुलीच्या लग्नातील… मात्र, त्यांच्या वैयक्तिक दूषकृत्यांबद्दल मला कोणतीही माहिती नव्हती.

0

केवळ फोटो आले म्हणून आरोप करणे चुकीचे:अशोक खरातसोबतच्या फोटोबाबत दीपक केसरकरांचे स्पष्टीकरण

महिला लैंगिक अत्याचारातील आरोपी भोंदूबाबा अशोक खरात याच्या अटकेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. खरातसोबतचे फोटो व्हायरल झाल्याने टीकेचे धनी ठरलेले माजी मंत्री आणि शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी अखेर या प्रकरणावर मौन सोडले आहे. “अशोक खरातचे कृत्य घृणास्पद असून त्याचा मी निषेधच करतो, मात्र केवळ फोटोंच्या आधारे राजकीय नेत्यांवर आरोप करणे चुकीचे आहे,” असे स्पष्टीकरण केसरकर यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून दिले आहे.

अशोक खरातसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे आणि दीपक केसरकर यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावर स्पष्टीकरण देताना दीपक केसरकर म्हणाले, मी मुंबईच्या बाहेर असल्याने अशोक खरात प्रकरणावर काही खुलासे करु शकलो नाही. त्यामुळे, व्हिडिओच्या माध्यमातून मी माझी भूमिका मांडत आहे.

दीपक केसरकर महणाले, नाशिकमधील ईशान्येश्वर मंदिरासाठी रस्ता बनवण्याच्या संदर्भात अशोक खरात हे एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी माझी त्यांची पहिली ओळख झाली. खरात यांचा खगोलशास्त्रात (Astronomy) चांगला अभ्यास असल्याने माझ्यासारख्या अनेक लोकांची त्यांच्याशी ओळख होती. व्हायरल झालेला दुसरा फोटो त्यांच्या मुलीच्या लग्नातील आहे. मात्र, त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल किंवा कृत्यांबद्दल मला कोणतीही माहिती नव्हती.
या प्रकरणावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला होता. “दीपक केसरकर शिक्षणमंत्री असताना अशोक खरात हा बाबा शिक्षण खात्यात लक्ष घालायचा. बदल्या, बढत्या आणि महत्त्वाची कामे करण्यासाठी हा बाबा केसरकरांना सांगायचा. ‘ट्रायडंट’ हॉटेलमध्ये बसून ही सर्व कामे व्हायची आणि खरातच शिक्षण खाते चालवायचा,” असा खळबळजनक आरोप राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला होता.

संजय राऊतांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना दीपक केसरकर म्हणाले, “संजय राऊत यांचे आरोप पूर्णपणे बिनबुडाचे आहेत. अशोक खरात कधीही माझ्या कार्यालयात किंवा मंत्रालयातील दालनात आलेले नाहीत. त्यामुळे त्यांनी माझे खाते चालवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. माझ्या कार्यकाळात शिक्षण आणि मराठी भाषा विभागात जे ऐतिहासिक निर्णय झाले, ते यापूर्वी कधीही झाले नव्हते. केवळ एखाद्या कार्यक्रमातील फोटोंवरून अशा प्रकारचे गंभीर आरोप करणे राजकीय संस्कृतीला धरून नाही.”

अशोक खरात याला पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाद्वारे (SIT) सुरू आहे. या तपासात खरातच्या राजकीय संबंधांबाबत काही ठोस निष्पन्न होते का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, केसरकर यांच्या या स्पष्टीकरणामुळे या वादाला नवे वळण मिळाले आहे.