Home Blog Page 120

​आयकर स्लॅब ‘जैसे थे’! नोकरदारांच्या अपेक्षांवर पाणी

कॅन्सरच्या 17 औषधांवर कस्टम ड्यूटी नाही, 3 आयुर्वेदिक एम्स, 7 हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर बनणार

नवी दिल्ली- अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज, 1 फेब्रुवारी रोजी, संसदेत अर्थसंकल्प सादर केला.भू-राजकीय तणाव आणि जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर सादर करण्यात आलेला यंदाचा अर्थसंकल्प देशांतर्गत मागणीला आर्थिक विकासाचे प्राथमिक इंजिन बनवण्यावर भर देणारा आहे.2025-26 च्या आर्थिक सर्वेक्षणातील सकारात्मक आकडेवारीवर आधारित, ज्यामध्ये भारताचा संभाव्य विकास दर 7% असल्याचा अंदाज आहे, अर्थमंत्र्यांनी पायाभूत सुविधा, आरोग्यसेवा आणि मध्यमवर्गाला दिलासा देण्यासाठी अनेक दूरगामी घोषणा केल्या. मात्र, अर्थसंकल्पात आयकरदाते किंवा सामान्य माणसाला थेट फायदा होईल अशा कोणत्याही घोषणांचा केल्या गेल्या नाही.

बजेट 2026 च्या प्रमुख घोषणा

मालगाडीसाठी नवीन कॉरिडॉर: पश्चिम बंगालमधील डानकुनीसाठी एका नवीन फ्रेट कॉरिडॉरची घोषणा करण्यात आली आहे.
पायाभूत सुविधांवर मोठा खर्च: पुढील आर्थिक वर्षासाठी (2026-27) 12.2 लाख कोटी रुपयांचा कॅपेक्स (भांडवली खर्च) निश्चित करण्यात आला आहे. हा मागील वर्षाच्या 11.2 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
रेअर अर्थ कॉरिडॉर: केरळ, तामिळनाडू आणि ओडिशा येथे दुर्मिळ खनिजांसाठी विशेष कॉरिडॉर तयार केले जातील. यामध्ये आंध्र प्रदेशलाही जोडले जाईल जेणेकरून खनिज समृद्ध राज्यांना फायदा होईल.
टेक्सटाईल क्षेत्र: देशात मोठे टेक्सटाईल पार्क तयार केले जातील.
औषध क्षेत्रातील ‘शक्ती’: 10,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह ‘बायो-फार्मा शक्ती’ योजना सुरू होईल, ज्या अंतर्गत तीन नवीन संस्था उघडल्या जातील.
चिप उत्पादन: भारत आपले सेमीकंडक्टर मिशन ISM 2.0 सुरू करेल.
इलेक्ट्रॉनिक्सवर भर: मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक्सचे सुटे भाग बनवण्यासाठी बजेट वाढवून 40,000 कोटी रुपये करण्यात आले आहे.
या 6 मोठ्या क्षेत्रांवर सरकारचे लक्ष राहील

धोरणात्मक उत्पादन: नवीन आणि आवश्यक क्षेत्रांमध्ये उत्पादन क्षमता वाढवणे.
जुन्या उद्योगांना पुनरुज्जीवित करणे: जुन्या झालेल्या औद्योगिक क्षेत्रांना पुन्हा जिवंत करणे.
लघु उद्योग (MSME): लघु आणि मध्यम उद्योगांना जागतिक स्तरावर अग्रेसर बनवणे.
पायाभूत सुविधा: रस्ते, रेल्वे आणि इतर पायाभूत सुविधांना प्रचंड बळकटी देणे.
सुरक्षा आणि स्थिरता: देशात दीर्घकालीन आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करणे.
शहरांचा विकास: शहरांना व्यापार आणि आर्थिक केंद्र म्हणून विकसित करणे.
अर्थसंकल्पाचे 3 मुख्य व्हिजन

वेग: उत्पादकता वाढवून आर्थिक विकासाचा वेग वाढवणे.
क्षमता: लोकांची क्षमता वाढवणे जेणेकरून ते देशाच्या प्रगतीत भागीदार होतील.
सबका साथ : प्रत्येक कुटुंब आणि क्षेत्राकडे उत्पन्नाचे पुरेसे स्रोत आणि संधी असाव्यात.
अर्थव्यवस्थेवरील सरकारचा अहवाल

आत्मनिर्भरता: भारताने स्वतःचे उत्पादन आणि ऊर्जा सुरक्षा वाढवली आहे, ज्यामुळे परदेशातून वस्तू मागवण्यावरील अवलंबित्व कमी झाले आहे.
विकास दर: मागील सुधारणांमुळे भारताने 7% विकास दर गाठला आहे, ज्यामुळे गरिबी कमी करण्यास मदत झाली आहे.
12 वर्षांचा प्रवास: अर्थमंत्र्यांनी सांगितले की, गेल्या 12 वर्षांत भारताची अर्थव्यवस्था स्थिर राहिली आहे आणि महागाई नियंत्रणात आहे.
जागतिक आव्हाने: जगात व्यापार आणि पुरवठा साखळीत अडचणी येत आहेत, परंतु भारत ‘विकसित भारत’ च्या दिशेने पाऊल टाकत राहिल


आरोग्य क्षेत्राप्रती संवेदनशीलता दाखवत अर्थमंत्र्यांनी 17 कर्करोगाच्या औषधांवरील मूलभूत सीमाशुल्क रद्द करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. तसेच सर्वसामान्यांसाठी वैद्यकीय उपचार परवडणारे बनवण्यासाठी आणखी सात दुर्मिळ आजारांवरील औषधे शुल्कमुक्त यादीत समावेश केला आहे. शिक्षणाला रोजगाराशी जोडण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यासोबतच पुढील पाच वर्षांत 150,000 जेरियाट्रिक केयर गिवर्स आणि 1,00,000 आरोग्य व्यावसायिकांना प्रशिक्षित करण्याच्या योजनेवर काम केलेलं जाणार आहे.
भारताला जागतिक तंत्रज्ञान केंद्र बनवण्यासाठी इंडिया सेमीकंडक्टर मिशन (आयएसएम) 2.0 सुरू करण्यात आले आहे, ज्यामध्ये 40000 कोटी रुपयांची तरतूद केली असून भारताचा कणा असलेल्या एमएसएमई क्षेत्रासाठी 10000 कोटी रुपयांचा एसएमई ग्रोथ फंड आणि आत्मनिर्भर भारत फंडमध्ये 2000 कोटी रुपयांचा टॉप-अप जाहीर केला गेला आहे. याशिवाय 2047 पर्यंत परदेशी तंत्रज्ञान कंपन्यांना कर सवलत देऊन भारत क्लाउड सेवांसाठी जागतिक केंद्र बनण्यास सज्ज आहे.
अर्थमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात महिलांसाठी ‘लखपती दीदी’ योजना सुरु ठेवायची घोषणा केली. या योजनेअंतर्गत महिला बचत गटांना 5 लाखांपर्यंतचे व्याजमुक्त कर्ज मिळते, ज्यामुळे आर्थिक स्वातंत्र्य मिळते आणि या कर्जांवर सरकारी अनुदान देखील मिळते. याशिवाय अर्थमंत्र्यांनी सात रेल कॉरिडॉरसोबत दिव्यांग सहारा योजना जाहीर केली.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची अर्थसंकल्पात रस्ते अपघाताच्या विमा दाव्यांवरील व्याजावर आता टीडीएस कापला जाणार नाही, अशी मोठी घोषणा केली. रस्ते अपघात प्रकरणांमध्ये न्यायालयीन कामकाज अनेकदा लांबतात. या प्रक्रियेत अपघाताची तारीख आणि अंतिम निकाल यामध्ये अनेकदा अनेक वर्षांचे अंतर असते. अशा परिस्थितीत, प्रत्यक्ष परिस्थिती लक्षात घेता पीडितेला दाव्याची रक्कम वेळेवर मिळाली असती तर तो ती इतरत्र गुंतवू शकला असता असे न्यायालयाला वाटते.
पीडितेच्या बाजूने निकाल देताना न्यायाधिकरण सहसा दावा दाखल केल्याच्या तारखेपासून ते देयकाच्या तारखेपर्यंत 6% ते 9% साधे व्याज देण्याचा आदेश देते. याआधी 50,000 रुपयांपेक्षा जास्त व्याजावर टीडीएस कापला जायचा आणि इतर स्रोतांमधून मिळणारे उत्पन्न मानले जायचा आणि त्यावर कर आकारला जायचा. म्हणजे या भरपाईवर मिळणारी संपूर्ण व्याजाची रक्कम करमुक्त असेल.

‘७ हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर बांधले जातील’

कनेक्टिव्हिटीसाठी-देशातील सागरी विमान उत्पादकांना पाठिंबा दिला जाईल.

मुंबई ते पुणे, पुणे ते हैदराबाद, हैदराबाद ते बेंगळुरू, हैदराबाद ते चेन्नई, सिलिगुडी ते वाराणसी यासह ७ हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर बांधले जातील.

विकसित भारतासाठी एक उच्चस्तरीय बँकिंग समिती स्थापन केली जाईल.

खासगी ऑनलाईन बैठकीचे बेकायदा रेकॉर्डिंग केल्याप्रकरणी विनोद कुलकर्णी यांच्याविरोधात सायबर पोलिसांकडे तक्रार

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या साहित्य संवर्धन आघाडीने प्रचारासाठी आयोजित केलेल्या खासगी ऑनलाईन बैठकीचे बेकायदा रेकॉर्डिंग करून ते प्रसारित करीत बदनामी केल्याप्रकरणी प्रतिस्पर्धी परिवर्तन उत्कर्ष आघाडीचे उमेदवार विनोद कुलकर्णी यांच्याविरोधात जळगाव येथील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. संबंधित बैठकीत काहीही आक्षेपार्ह नसताना विनाकारण गवगवा करत कुलकर्णी यांनी आपली बदनामी केली असून, गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन केल्याचा आरोप बैठकीच्या आयोजकांनी केला असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

राजेंद्र लखीचंद नन्नावरे (वय ५६, रा. जळगाव) यांनी या विषयी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यामध्ये विनोद कुलकर्णी यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५६ (बदनामी), कलम ४९९ व ५०० (मानहानी) आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ ई व ७२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

​तक्रारदारांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ जानेवारी २०२६ रोजी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या नियोजनासाठी खाजगी ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या रेकॉर्डिंगसाठी कोणतीही संमती देण्यात आली नव्हती. मात्र, विनोद कुलकर्णी यांनी या बैठकीचे गुपचूप रेकॉर्डिंग केल्याने गोपनीयतेचा भंग झाला. त्यानंतर कुलकर्णी यांनी या रेकॉर्डिंग चा वापर करून पुण्यात पत्रकार परिषद घेत खोटी व बदनामीकारक विधाने केली, असे तक्रारीत म्हटले आहे.

​’या अनधिकृत रेकॉर्डिंगचा आधार घेत माझ्या विरोधात चुकीची आणि बदनामीकारक विधाने करण्यात आली आहेत. यामुळे माझ्या सामाजिक आणि व्यावसायिक जीवनावर गंभीर परिणाम झाला आहे,’ असे तक्रारदारांनी अर्जात नमूद केले आहे. जळगाव ​सायबर गुन्हे शाखा या प्रकरणाची तांत्रिक चौकशी करत आहे.


महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत अभिजात मराठी भाषेतील साहित्य संवर्धनाविषयी उहापोह होणे अपेक्षित आहे. याच प्रकारचा प्रचार साहित्य प्रेमी मतदारांना अपेक्षित आहे. परंतु विरोधक उणीदुणी काढत, यात राजकारण आणत आहेत.

  • राजेश पांडे

बोपोडी येथे अजित पवार यांना श्रद्धांजलीसाठी सर्वपक्षीय शोकसभा, भावनिक वातावरणात नागरिकांची मोठी उपस्थिती

ॲड. निलेश निकम यांच्या भावुक अनुभवाने उपस्थितांचे डोळे पाणावले

पुणे-

बोपोडी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आज स्वर्गीय अजित पवार यांच्या दुःखद निधनानिमित्त सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.या शोकसभेत विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, धार्मिक प्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. हिंदू, मुस्लिम, शीख, बौद्ध, ख्रिश्चन समाजातील लोक एकत्र येत अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करताना दिसून आले.

कार्यक्रमास प्रामुख्याने ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ॲड. एस. के. जैन सर, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते ॲड. निलेश निकम, नगरसेवक परशुराम वाडेकर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील, माजी नगरसेवक आनंद छाजेड, माजी नागसेवक प्रकाश ढोरे, माजी नगरसेवक कैलास गायकवाड, माजी नगरसेवक नंदलाल धीवर, ज्ञानेश्वर मुरकुटे (माजी अध्यक्ष पीएमटी), राजेंद्र भूतडा , ॲड. रमेश पवळे, विनोद रणपिसे, अनिल भिसे, विशाल जाधव,अनवर शेख उपस्थित होते.

तसेच करिम शेख, अमित जावीर, विजय जाधव, शशिकांत पांडुळे, प्रशांत टेके, इंद्रजित भालेराव, रविंद्र गायकवाड, पोपट खंडागळे, दत्तात्रय सूर्यवंशी, दादासाहेब रणपिसे, रोहित भिसे, केतन गायकवाड, गणेश सारवान, विकास कांबळे, निलेश मोरे, अजित थेरे, आदित्य ओव्हाळ, कुशल घागट, विठ्ठल आरुडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

याशिवाय अशोक गायकवाड, जीवन घोंगडे, सुरेश ससाणे, काका लगड, भरत शेळके, राजू सिंग, राजू पिल्लं, कुणाल जाधव, रोहित परदेशी, शैलेंद्र पवार, विजय ढोणे, शिवाजी आंग्रे, जय चव्हाण, संदीप भिसे, अमोल जाधव, निलेश रूपंटक्के, मयुरेश गायकवाड, बाबा तांबोळी, अनिकेत भिसे, चेतन भुतडा, अकील मोगल यांनीही उपस्थिती लावली.

महिलांमध्ये मनिषा ओव्हाळ, अंजली दिघे, ज्योती परदेशी, सुंदर ओव्हाळ, रेश्मा कांबळे, अख्तरी शेख, भाग्यश्री गाढवे, ज्योती भिसे, शेंवता नाटेकर, दिलशाद अत्तर, फरिदा शेख, तृप्ती घोडके, रविंद्र कांबळे आणि मुस्कान अत्तर सहभागी झाल्या.

धार्मिक प्रतिनिधींमध्ये मौलाना, बौद्धाचार्य, फादर व इतर धर्मगुरू उपस्थित होते. तसेच सुनील टकावणे, श्रीधर गायकवाड, विनोद मुरार, अफजल शेख आणि बाळासाहेब रानवडे यांनीही शोकसभेत सहभाग घेतला.

यावेळी ॲड. निलेश निकम यांनी आपल्या भाषणात एक हृदयस्पर्शी अनुभव सांगितला. त्यांनी सांगितले की, गटनेतेपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर ते दररोज रात्री आठ वाजता अजित पवार यांच्याशी फोनवर संवाद साधत असत. मात्र एका दिवशी कामाच्या व्यापामुळे फोन होऊ शकला नाही.

दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु अजित पवार यांचा मोबाईल सतत स्विच ऑफ येत होता. सकाळी नऊ वाजेपर्यंत अनेक वेळा फोन करूनही संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर त्यांना अजित पवार यांच्या हवाई प्रवासादरम्यान अपघात झाल्याची व त्यात त्यांचे निधन झाल्याची माहिती मिळाली.

ही आठवण सांगताना ॲड. निलेश निकम भावुक झाले आणि सभास्थळी उपस्थित अनेक नागरिकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. काही काळ संपूर्ण परिसरात शांतता पसरली होती.

या सर्वपक्षीय शोकसभेमधून अजित पवार हे केवळ एका पक्षाचे नेते नसून सर्व समाजाचे लोकनेते होते, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी दोन मिनिटांचे मौन पाळून दिवंगत आत्म्यास श्रद्धांजली अर्पण केली व त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करण्यात आली.

सुनेत्रा पवार यांनी म्हटले,’ राज्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेणे, हाच माझा संकल्प

पुणे- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शपथविधी नंतर जनतेसाठी एक संदेश पाठवीला आहे यात त्यांनी पहा नेमके काय म्हटले आहे.

आदरणीय अजितदादांचा लोकाभिमुख वारसा पुढे नेत महाराष्ट्राच्या सेवेसाठी कर्तव्य भावनेने सज्ज…

आज महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना मन अत्यंत भावुक झाले आहे. आदरणीय अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि समाजातील वंचित घटकांसाठी जगण्याचा मंत्र दिला. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेताना ‘शिव–शाहू–फुले–आंबेडकर’ यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून कर्तव्यभावनेने ही जबाबदारी स्वीकारत आहे.
दादांच्या अकाली जाण्याने वैयक्तिक आयुष्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या मनावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. मात्र त्यांनी दिलेली कर्तव्यनिष्ठा, संघर्षाची ताकद आणि जनतेप्रतीची प्रामाणिक बांधिलकी हाच माझा खरा आधार आहे. त्यांच्या स्वप्नातील न्यायप्रिय, समताधिष्ठित आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी अखंड प्रामाणिकपणे, पारदर्शकतेने आणि लोकाभिमुखतेने काम करत राहीन, हा विश्वास मी आज या निमित्ताने देते.
या कठीण काळात महाराष्ट्रातील जनतेने दिलेले प्रेम, विश्वास आणि पाठिंबा हेच माझे सर्वात मोठे बळ आहे. आपल्या विश्वासाच्या जोरावर, दादांच्या विचारांना उजाळा देत, नव्या आशेने आणि नव्या ऊर्जेने पुढे चालत राहीन. शेतकऱ्यांच्या हितासाठी, युवकांच्या संधींसाठी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या प्रत्येक योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणे हे माझे सर्वोच्च प्राधान्य असेल.
देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या ‘विकसित भारत 2047’ या संकल्पनेला बळ देण्यासाठी तसेच देशाचे गृह व सहकारमंत्री आदरणीय अमित शाह साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधण्यास राज्य शासन सदैव तत्पर राहील. तसेच, नव महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचा वारसा समर्थपणे पुढे नेण्याची जबाबदारी आम्ही सर्वजण अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडू.
महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या साथीने महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी, सामाजिक समता, आर्थिक प्रगती आणि सर्वसमावेशक समृद्धी साधण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन. जनतेच्या अपेक्षांना न्याय देणे, शासन-प्रशासन अधिक संवेदनशील व लोकाभिमुख बनवणे आणि राज्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेणे, हाच माझा संकल्प आहे.
पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेचे, सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सहकाऱ्यांनी माझ्यावर ठेवलेल्या विश्वासास पात्र ठरण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्य करीन, हा शब्द देते.

-उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

सुनेत्रा पवार म्हणाल्या ,मोदींच्या शुभेछ्या प्रेरणादायी ….

कुटुंबाअगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सुनेत्रा पवारांना मिळाल्या शुभेछ्या

पुणे- एकीकडे रोहित पवार यांनी काकी आभाळा एवढे दुखः समोर असताना तुला कशा देऊ शुभेछ्या असे म्हटले आणि कुटुंबातून केवळ युगेंद्र पवार यांच्याकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना शुभेछ्या मिळाल्या असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होताक्षणी त्यांना शुभेछ्या देणारे संदेश सोशल मिडियातून दिले आहेत. ज्याची दखल तातडीने सुनेत्रा पवार यांनी देखील घेतली आहे. आणि मोदी यांच्या शुभेछ्या प्रेरणादायी असल्याचे म्हटले आहे.

नरेंद्र मोदी यांनी या शुभेछ्या संदेशात असे म्हटले आहे कि,’महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ सुरू करणाऱ्या सुनेत्रा पवार जी यांना शुभेच्छा. मला विश्वास आहे की त्या राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी अथक परिश्रम करतील आणि दिवंगत अजितदादा पवार यांचे स्वप्न पुढे नेतील.

सुनेत्रा पवार यांनी तातडीने या शुभेछ्या स्वीकारत सोशल मिडिया तूनच यावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत .

त्यांनी म्हटले आहे कि ,’आपण दिलेला आशीर्वाद माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. महाराष्ट्राच्या सेवेसाठी नव्या जबाबदारीची सुरुवात करताना आपल्या शब्दांनी जनकल्याणाच्या कामासाठीचा आत्मविश्वास वाढला. राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी प्रामाणिकपणे, समर्पित भावनेने कार्य करण्याचा संकल्प यामुळे अधिक बळकट झाला आहे. आपल्या विश्वासाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद…

या शिवाय योगी आदित्यनाथ यांनीही सुनेत्रा पवार यांना शुभेछ्या दिल्या आहेत.

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी एक खिडकी कक्ष कार्यान्वित

५ फेब्रुवारीपर्यंत परवानग्या मिळवण्याची अंतिम संधी
हवेली, पुणे : हवेली तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार व राजकीय पक्षांना आवश्यक विविध परवानग्या सुलभ, जलद व पारदर्शक पद्धतीने मिळाव्यात, यासाठी हवेली तहसील कार्यालयात ‘एक खिडकी कक्ष’ कार्यान्वित करण्यात आला आहे. या सुविधेमुळे निवडणूक प्रक्रियेत गती येत असून उमेदवारांना एकाच ठिकाणी सर्व आवश्यक परवानग्यांची पूर्तता करता येत आहे. 7 फेब्रुवारीला निवडणूक असल्याने हा कक्ष ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत कार्यरत राहणार आहे.
या एक खिडकी कक्षाचे संचालन उपविभागीय अधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने तसेच तहसीलदार तृप्ती कोलते, तहसीलदार अर्चना निकम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. कक्षामध्ये नोडल अधिकारी स्वाती नरोटे, डी. एम. मानकर, स्वाती ढोले, जयश्री सरगर, सुविद्य पवार, अक्षय लडकत, रोहन देवरे, सचिन जाधव, सारंग वाडेकर, संतोष हत्ते, सूर्यकांत राऊत व सुवर्णा भोसले हे अधिकारी कार्यरत आहेत.
या कक्षामार्फत प्रचार सभा, प्रचार रॅली, वाहन परवाने, ध्वनिक्षेपक वापर, पदयात्रा तसेच अन्य निवडणूकविषयक परवानग्या एकाच ठिकाणी देण्यात येत आहेत. उमेदवारांच्या अर्जांतील त्रुटी तात्काळ दूर करून आवश्यक मार्गदर्शन केले जात असल्याने परवानगी प्रक्रिया अधिक सुलभ व वेळेची बचत करणारी ठरत आहे.
या उपक्रमासाठी आरटीओ विभाग तसेच सर्व संबंधित पोलीस विभागांचे सहकार्य लाभत आहे. विविध विभागांच्या समन्वयामुळे हा कक्ष प्रभावीपणे कार्यरत असून आतापर्यंत अंदाजे १५० परवाने वितरित करण्यात आले आहेत.
निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी सर्व उमेदवार व राजकीय पक्षांना आवाहन केले आहे की, निवडणूक प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ नये यासाठी ५ फेब्रुवारीपर्यंत आवश्यक सर्व परवानग्या एक खिडकी कक्षातून पूर्ण करून घ्याव्यात.

३ तारखेलाच समजणार पुण्याचे महापौर कोण ? अन उपमहापौर कोण?

पुणे- ३ तारखेलाच समजणार पुण्याचे महापौर कोण ? अन उपमहापौर कोण? त्यांची नावे जाहीर होऊन ते आपापले उमेदवारी अर्ज या दिवशी दाखल करतील असे वृत्त आहे. याबाबत भाजपच्या ११९ नगरसेवकांचे नेते बनलेले सभागृह नेते गणेश बिडकर यांनी मोठे महत्वपूर्ण वक्तव्य केले आहे . पहा आणि ऐका नेमके बिडकर काय म्हणाले ….

“हा कर्तव्याचा क्षण; सुनेत्राताई पवार यांची भूमिका धैर्याची”– उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई | दि. ३१ जानेवारी २०२६ :
कैलासवासी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी आणि न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या जाण्याने पवार कुटुंबावरच नव्हे, तर संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली असल्याची भावना विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली आहे.

या अत्यंत कठीण आणि वेदनादायी काळात, अजितदादांच्या पत्नी श्रीमती सुनेत्राताई पवार यांनी आज खासदारकीचा राजीनामा देत लोकभवन, मुंबई येथे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. हा प्रसंग कोणत्याही अर्थाने आनंदाचा नसून, तो जबाबदारीचा, कर्तव्याचा आणि सेवाभावाचा असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.

वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून राज्याच्या हितासाठी पुढे येणे हे मोठ्या धैर्याचे आणि मानसिक बळाचे द्योतक आहे. कैलासवासी अजितदादांच्या कार्याचा, विचारांचा आणि जनसेवेचा वारसा पुढे नेण्याची महत्त्वाची जबाबदारी आता सुनेत्राताई पवार यांच्यावर आली असल्याचेही त्यांनी नमूद केले.

कैलासवासी अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना, सौ. सुनेत्राताई पवार यांना पुढील वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा देत, ईश्वर त्यांना हे दायित्व पेलण्याची शक्ती देवो, अशी भावना विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

डोक्यावर डोंगराएवढं दुःख असताना आणि सर्वजण शोकाकूल असताना त्यांना शुभेच्छा तरी कशा द्याव्यात, हे कळत नाही..!

पुणे- सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच रोहित पवार यांनी ट्विटर अर्थात X वर व्यक्त केलेली प्रतिक्रिया मोठी चर्चेत आहे. रोहित पवार यांनी असे म्हटले आहे कि,’राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्राकाकी यांनी शपथ घेतली, याचा आनंद आहे. खरं म्हणजे अजितदादांची जागा कुणीच घेऊ शकत नाही पण किमान सुनेत्राकाकींच्या रुपात तरी आम्ही तिथं अजितदादांना पाहू..! डोक्यावर डोंगराएवढं दुःख असताना आणि आम्ही सर्वजण शोकाकूल असताना त्यांना शुभेच्छा तरी कशा द्याव्यात, हे कळत नाही..!

तर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच युगेंद्र पवार यांनी मात्र त्यांचे अभिनंदन केले आहे. युगेंद्र यांनी ‘एक्स’वर काही फोटोंसह एक पोस्ट केली आहे. त्यात ते म्हणतात, ‘सुनेत्राकाकी अजित पवार यांनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. आदरणीय अजितदादांनी ज्या निर्धाराने, कर्तव्यनिष्ठेने आणि जनहिताला केंद्रस्थानी ठेवून महाराष्ट्राची सेवा केली, त्याच मूल्यांवर आपणही वाटचाल कराल आणि महाराष्ट्राच्या विकासात मोलाचे योगदान द्याल, हा विश्वास आहे.’

नव्या वाटांचा शोध आणि प्रवास हवाहवासा : गुरू ठाकूर 

साहित्यदीप काव्य महोत्सवात कलादीप पुरस्काराने गुरू ठाकूर यांचा गौरव

पुणे : मी काही ठरवून प्रवासाला निघालोच नाही. जे अवगत आहे, त्यातच न रमता, तोचतोचपणा टाळून, नव्या वाटा शोधायला आणि त्यावरून चालायला मला आवडते. आता दिग्दर्शनाची वाट चालायला सुरवात केली आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी आणि गीतकार गुरू ठाकूर यांनी केले. शब्दांवर प्रेम करणारा संगीतकार आणि सुरांवर प्रेम करणारा गीतकार असेल, तर रसिकत्व जागे करणारे गीत नक्की जन्माला येते, असेही ते म्हणाले.

साहित्यदीप प्रतिष्ठान आयोजित दोन दिवसीय काव्य महोत्सवात (दि. ३१) गुरू ठाकूर यांचा कलादीप पुरस्काराने गौरव करण्यात आला. पुरस्काराचे वितरण काव्य महोत्सवाच्या अध्यक्षा डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांच्या हस्ते झाले. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, रोख रक्कम आणि पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी प्रतिष्ठानच्या अध्यक्ष ज्योत्स्ना चांदगुडे, कार्याध्यक्ष धनंजय तडवळकर, मुलाखतकार डॉ. पंडित संदीप अवचट उपस्थित होते. त्यानंतर गुरू ठाकूर यांच्याशी डॉ. संदीप अवचट यांनी संवाद साधला. भारत इतिहास संशोधन मंडळाच्या वि. का. राजवाडे सभागृहात काव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

गुरू ठाकूर म्हणाले, लहानपणापासून घरातल्या वडिलधाऱ्यांचे संस्कार, संतसाहित्याचे वाचन आणि माझी वाचनाची आवड, यातून मी शब्दांकडे ओढला गेलो. माझी पहिली आवड चित्रकलेची. मी राजकीय अर्कचित्रे रेखाटत असे. सोबत त्या चित्रांना साजेसे भाष्यही करत असे. ते भाष्य आवडल्याने दिलीप प्रभावळकर, शं. ना. नवरे अशा मान्यवरांची दाद मिळाली आणि त्यातूनच सदर लेखन आणि मग मालिका लेखनाची सुरवात झाली. हसा चकटफु, गंगाधर टिपरे अशा अनेक मालिकांना उत्तम प्रतिसाद मिळाला. मग चित्रपटलेखन, संवादलेखन आणि शेवटी गीतलेखन असा प्रवास सुरू झाला.

मला आयुष्यात तोचतोचपणा फार कंटाळवाणा वाटतो. जोपर्यंत आनंद वाटतो, तोपर्यंतच मी एखादी गोष्ट करतो. त्यामुळेच नटरंग नंतर तब्बल १२ वर्षे पुन्हा लावणी लिहिली नाही. माझ्यातील या वृत्तीमुळेच मी एखाद्या गोष्टीला नाही म्हणण्याची श्रीमंती टिकवून ठेवली आहे, असे सांगून गुरू ठाकूर म्हणाले, कविता स्वयंस्फूर्त असते, तर गाणे घडीव असते. गाण्यात मला परकायाप्रवेश करायचा असतो. कवितेत मी स्वतःपुरता व्यक्त होऊ शकतो. गाण्यात मला वेगवेगळी रूपे धारण करता येतात, त्यामुळे मला गीतलेखन अधिक आव्हानात्मक वाटते. कविता माझ्यासाठी, माझ्यापुरती असू शकते पण गाणे हे टीमवर्क असते. गीतलेखन करताना ॲक्टरपेक्षा कॅरेक्टर महत्त्वाचे असते. ती व्यक्तिरेखा कोणत्या प्रांतातील आहे, कोणत्या बोलीत संवाद साधणारी आहे, शिक्षण किती आहे असे अनेक मुद्दे लक्षात घेत गीत लिहिण्याचे आव्हान असते. नव्याने लिहिणाऱ्यांचे वाचन आणि अभ्यास कमी पडत असावा. त्या तुलनेत बुजुर्ग मंडळींचा आदर्श जरूर घ्यावा, असे निरीक्षणही गुरू ठाकूर यांनी नोंदवले. गाणे गीतकाराचे, संगीतकाराचे, गायकाचे असते, पण शेवटी ते रसिकांचे होऊन जाते. गीतकाराने पाण्यासारखे असावे, पात्रानुरूप आकार धारण करावा, असेही ते म्हणाले.

सूत्रसंचालन, सन्मानपत्राचे लेखन आणि वाचन धनंजय तडवळकर यांनी केले.

गझलकार भूषण कटककर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित गझल मुशायरा या कार्यक्रमात प्रमोद खराडे, शिवदादा डोईजोडे, डॉ. स्नेहल कुलकर्णी, श्याम खामकर, डॉ. माधुरी चव्हाण-जोशी, तेजस भातकुलकर, प्राजक्ता पटवर्धन, मीना शिंदे, राहुल कुलकर्णी, किरण वेताळ, वैशाली माळी, वैजयंती आपटे यांचा सहभाग होता. त्यानंर बालसाहित्यकार एकनाथ आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली ‘किलबिल किलबिल’ हा बाल कविता व गीतांचा कार्यक्रम प्रांजली बर्वे व सहकलाकारांनी सादर केला. प्राजक्ता वेदपाठक यांनी सूत्रसंचालन केले.

सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री : ६ मिनिटांचा सोहळा; शरद पवारांची अनुपस्थिती

मुंबई-अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. शनिवारी दुपारी 2 वाजता त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्या म्हणून निवड झाली. सायंकाळी 5 वाजता त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली.

सुनेत्रा पवार यांची पक्षनेते म्हणून निवड करण्यासाठी विधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्ष आणि विधानपरिषद सदस्यांची बैठक बोलावण्यात आली होती. तिथे दिलीप वळसे पाटील यांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला.

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी सुनेत्रा यांनी राज्यसभेतील खासदारपदाचा राजीनामा दिला. 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर उपमुख्यमंत्रीपद रिक्त झाले होते.
अजित पवार अमर रहे, एकच वादा अजित दादा, अशा घोषणा सभागृहात देण्यात आल्या. अत्यंत साध्या पद्धतीने हा शपथविधी सोहळा पार पडला.
महायुतीचे महत्त्वाचे नेते उपस्थित-प्रफुल्ल पटेल,सुनील तटकरे,छगन भुजबळ,हसन मुश्रीफ,नरहरी झिरवाळ,इंद्रनील नाईक,चंद्रशेखर बावनकुळे,आशिष शेलार,धनंजय मुंडे,विक्रम काळे,संजय खोडके,अनिल पाटील,हिरामण खोसकर

मुळा–मुठा नदीतील प्रदूषण ही गंभीर समस्या-केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री राज भूषण चौधरी

‘नमामी गंगा’ चळवळीप्रमाणे ‘नमामी मुळा–मुठा’ अशी योजना आणणार

लोणी–काळभोर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भारत सरकार देशातील सर्वच नद्यांच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष देत आहे. त्यानुसार पुण्याची जीवनवाहिनी असणाऱ्या मुळा–मुठा नदीतील प्रदूषण ही गंभीर समस्या आहे. नदीत प्रक्रिया न करता सोडण्यात येणारे सांडपाणी, तसेच थेट नदीपात्रात टाकण्यात येणारा कचरा या अत्यंत गंभीर बाबींची नोंद सरकार घेत आहे. भविष्यात स्थानिक महापालिकांच्या समन्वयातून ‘नमामी गंगा’ चळवळीप्रमाणे ‘नमामी मुळा–मुठा’ अशी योजना आखून नदी सुधार प्रकल्पांतर्गत ठोस पावले उचलणार आहोत, अशी माहिती केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री राज भूषण चौधरी यांनी दिली.

ते येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, पुणे अंतर्गत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र नौदल शिक्षण व प्रशिक्षण अकादमी, पुणे (मॅनेट) या संस्थेच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमापूर्वी येथे पत्रकारांशी आयोजित वार्तालाप प्रसंगी बोलत होते. याप्रसंगी एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा प्र.कुलपती प्रा. डॉ. मंगेश कराड, प्रोव्होस्ट सायली गणकर, कुलसचिव डॉ. महेश चोपडे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी पुढे बोलताना चौधरी म्हणाले की, मुळा–मुठा नदीच्या प्रदूषणामुळे पुणे शहरातील भूजल पातळी, शेती तसेच नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. ही समस्या भविष्यात अधिक गंभीर होऊ नये, यासाठी केंद्र सरकारकडून सर्वंकष नदी सुधार प्रकल्प राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची क्षमता वाढविणे, अवैध सांडपाणी जोडण्या तोडणे, तसेच औद्योगिक घटकांकडून होणाऱ्या प्रदूषणावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.मुळा–मुठा नदी स्वच्छतेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, जलगुणवत्ता तपासणीसाठी नियमित निरीक्षण यंत्रणा, तसेच नदीकाठावरील गावांकडून पात्रात कचरा टाकला जाऊ नये यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांशी समन्वय साधण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुळा–मुठा नदी ही केवळ पाण्याचा स्रोत नसून ती सांस्कृतिक व पर्यावरणीय वारसा आहे. त्यामुळे नदीचे संवर्धन ही केवळ सरकारी जबाबदारी नसून स्थानिक नागरिकांची सामूहिक जबाबदारी आहे, असेही त्यांनी नमूद केले.याशिवाय, एमआयटी एडीटी विद्यापीठासारख्या शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संघटना आणि युवकांचा सहभाग घेऊन व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येईल. “स्वच्छ नदी, सुरक्षित भविष्य” या संकल्पनेतून मुळा–मुठा नदीला पुन्हा एकदा निर्मळ व प्रवाही करण्याचा संकल्प केंद्र सरकारने केला असल्याचे राज्यमंत्री चौधरी यांनी सांगितले.


एमआयटी एडीटी विद्यापीठ आणि प्रशासनाने कायमच मुळा–मुठा नदीचे वाढते प्रदूषण, तसेच नदीपात्रात मोठ्या प्रमाणात टाकला जाणारा कचरा या गंभीर विषयांकडे सातत्याने लक्ष वेधले आहे. त्यासाठी विद्यापीठाकडून सातत्याने राज्य, केंद्र सरकार आणि स्थानिक प्रशासनाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मुळा–मुठा ही पुण्याची जीवनवाहिनी असून तिच्या रक्षणासाठी व स्वच्छतेसाठी सरकार व प्रशासनाला आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची विद्यापीठाची भूमिका आहे.
— डॉ. महेश चोपडे,
कुलसचिव, एमआयटी एडीटी विद्यापीठ, लोणी–काळभोर, पुणे

राष्ट्र सेवा दल घटना दुरूस्तीचा प्रस्ताव फेटाळला  

कपिल पाटील, नितीन वैद्य यांचा अर्ज फेटाळला

पुणे धर्मादाय आयुक्तांचा महत्वपूर्ण आदेश

पुणे:

राष्ट्र सेवा दल या संघटनेचे विश्वस्त असल्याचे  भासवत  राष्ट्र सेवा दलाच्या घटनेत बदल करण्याचा प्रस्ताव ज्येष्ठ पत्रकार ,राष्ट्र सेवा दल माजी अध्यक्ष नितीन वैद्य, माजी आमदार कपिल पाटील आणि अबेद खान यांनी धर्मादाय आयुक्तांकडे दाखल केलेला प्रस्ताव सत्य कागदपत्रांची पुर्तता करता न केल्याने धर्मदाय सहाय्यक आयुक्तांनी फेटाळून लावला आहे.  गेली काही वर्ष संघटनेत चाललेल्या बेकायदा हस्तक्षेपामुळे उद्भवलेला वाद आता संपुष्टात येणार आहे.या प्रकरणी घटना बदलाच्या प्रस्तावाविरुद्ध धर्मादाय आयुक्तांकडे आक्षेप घेणारे राष्ट्र सेवा दलाचे सदस्य आणि  माजी पूर्ण वेळ कार्यकर्ते श्याम निलंगेकर(नांदेड) यांनी पुण्यात पत्रकाद्वारे ही माहिती दिली. 

नितीन वैद्य, माजी आमदार कपिल पाटील आणि अबेद खान यांनी  १८ नोव्हेंबर २०२२ रोजी सहाय्यक   धर्मादाय आयुक्त कार्यालय पुणे यांच्याकडे दाखल केला होता. राष्ट्र सेवा दलातील पदाधिकारी नियुक्ती आणि कालावधी या संदर्भात ही घटना दुरुस्ती होती. मात्र सेवा दलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्याम निलंगेकर यांनी या घटना दुरुस्तीबाबत आक्षेप अर्ज दाखल केला होता. कपिल पाटील हे विश्वस्त नाहीत, संघटनेचे सदस्य नसलेल्या व्यक्तींना  पदाधिकारी करण्यात आले होते. बेकायदेशीरपणे पदे  मिळवत ही मंडळी आर्थिक गैरव्यवहार करत असल्याचा आक्षेप श्याम निलंगेकर यांनी घेतला होता.

घटना दुरुस्तीच्या योजना प्रस्तावाला श्याम निलंगेकर यांनी आक्षेप घेतल्यानंतर कपिल पाटील, नितीन वैद्य, अबेद खान यांची अडचण झाली. ते किंवा त्यांचे वकील हे सहाय्यक धर्मादाय आयुक्तांसमोर एकाही तारखेला हजर झाले नाहीत. आपला दावा सिद्ध करणारी कागदपत्रही त्यांना सादर करता आली नाहीत, श्याम निलंगेकर मात्र प्रत्येक तारखेला हजर राहून या प्रकरणाचा पाठपुरावा करत होते.अखेर चार वर्षांनी म्हणजे १३ जानेवारी २०२६ रोजी सहाय्यक धर्मदाय आयुक्त पुणे यांनी कपिल पाटील आणि इतरांनी दाखल केलेला प्रस्ताव फेटाळून लावला. तसा आदेशही जारी केला आहे.

‘कपिल पाटील आणि मंडळी आड मार्गाने राष्ट्र सेवा दलात शिरले. आपली राजकीय ताकद वापरून त्यांनी संघटना ताब्यात घेत अरेरावी चालवली. सेवा दलाचे अनेक ज्येष्ठ पदाधिकारी, सेवाभावी पूर्णवेळ कार्यकर्ते यांना अपमानास्पद वागणूक देत संघटनेतून बाहेर काढलं. पाटील यांनी आपली माणसं घुसवली. बेकायदेशीरपणे आर्थिक व्यवहार केला. यावरून संघटनेत संघर्ष सुरू झाला. आता या मंडळींची हुकूमशाही संपली आहे,’ असे  श्याम निलंगेकर यांनी  प्रसिद्धी पत्राद्वारे कळवले आहे.

सोरतापवाडी येथील दीप्ती मगर-चौधरी संशयास्पद मृत्यू प्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांना निवेदन

पुणे. दि.३१: पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या हद्दीतील सोरतापवाडी (ता. हवेली) येथील इंजिनिअर दीप्ती मगर-चौधरी यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सखोल तपासासाठी आणि आरोपींवर कठोर कारवाईसाठी, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले आहे. हे प्रकरण हुंडा, शारीरिक-मानसिक छळ आणि बेकायदेशीर गर्भलिंग तपासणीशी संबंधित असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले असून, हा ‘पीसीपीएनडीटी’ कायद्याचा गंभीर भंग असल्याचे म्हटले आहे. तसेच हे प्रकरण ‘विशेष केस’ म्हणून हाताळण्याची मागणी केली आहे.

डॉ. गोऱ्हे यांच्या निवेदनात या प्रकरणात, ठोस पुरावे गोळा करण्याचे, तांत्रिक पुराव्यांवर भर देण्याचे आणि पीडित कुटुंबीयांना संरक्षण देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. “या प्रकरणात पुरावे नष्ट होण्याची किंवा साक्षीदारांवर दबाव येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तपासाची व्याप्ती वाढवावी,” असे त्यांनी म्हटले आहे. तसेच, दोषारोपपत्र लवकर आणि त्रुटीमुक्त सादर करण्याची विनंती केली आहे.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या प्रकरणाच्या अनुषंगाने दिलेल्या निवेदनात खालील मु‌द्यांकडे प्रामुख्याने लक्ष वेधले आहे.

या घटनेत शारीरिक व मानसिक छळ, हुंड्याची मागणी आणि प्रदीर्घ काळापासून सुरू असलेल्या जाचाचे पुरावे समोर येत आहेत. अशा संवेदनशील प्रकरणांत आरोपींना ‘अर्नेशकुमार’ निकालाचा आधार घेऊन पळवाटेची संधी मिळू नये, यासाठी पोलिसानी घटनाक्रमातील विसंगती शोधून ठोस पुरावे गोळा करावेत.

या प्रकरणात बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी आणि पीडितेवर सक्तीने गर्भपात केल्याचा गंभीर संशय व्यक्त केला जात आहे. हा ‘पीसीपीएनडीटी’ (PCPNDT) कायद्याचा मोठा भंग असून, या गुन्ह्यातील सहभागी डॉक्टर किवा केंद्रांचा शोध घेऊन त्यांना सह-आरोपी करावे.

आरोपीकडून पुरावे नष्ट करणे किंवा साक्षीदारांवर दबाव आणण्याचे प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा प्रकरणांत तपासाची व्याप्ती वाढवून तांत्रिक पुराव्यांवर (उदा, कॉल डिटेल्स, वैद्यकीय अहवाल) भर द्यावा.

पीडितेच्या माहेरच्या व्यक्तींना धमकावण्यात येत असल्यास त्यांना तातडीने पोलीस संरक्षण पुरवण्यात यावे.

दीप्ती मगर-चौधरी मृत्यू प्रकरणाचा तपास हा एक ‘विशेष केस’ म्हणून हाताळला जावा, जेणेकरून गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण होईल. या प्रकरणातील दोषारोपपत्र (Charge-sheet) लवकरात लवकर आणि त्रुटीमुक्त सादर होईल याची खबरदारी घ्यावी, ही विनंती.

सुनेत्रा पवारांचा राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा:NCP च्या गटनेतेपदी एकमताने निवड, मुख्यमंत्र्यांकडे सोपवले नियुक्तीचे पत्र

0

मुंबई-

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाने मोठी पावले उचलली आहेत. अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली असून, आज सायंकाळी ५ वाजता त्या राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तत्पूर्वी सुनेत्रा पवार यांनी आपल्या राज्यसभेच्या खासदारीचा राजीनामा दिला.

आज दुपारी २ च्या सुमारास विधीमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आमदारांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडला आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, ज्याला छगन भुजबळ यांनी अनुमोदन दिले. पक्षाच्या सर्व आमदारांनी या प्रस्तावाचे एकमताने समर्थन केले. या निवडीनंतर सुनेत्रा पवार आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ गटनेत्या म्हणून अधिकृतपणे काम पाहतील.

पक्षाच्या या बैठीकमध्ये दोन प्रस्ताव मांडण्यात आले होते. पहिला प्रस्ताव हा सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या गटनेतेपदी निवड करण्यासंदर्भात होता, तर दुसरा प्रस्ताव हा सुनेत्रा पवार यांना पक्षातील सर्व निर्णय घेण्याचे संविधानिक अधिकार मिळण्यासंदर्भात होता. दोन्ही प्रस्ताव या बैठीकत मंजूर करण्यात आले आहेत.

उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करत सुनेत्रा पवार यांनी आपल्या राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे. सुनेत्रा पवार यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती सीपी राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामा सोपवला. सुनेत्रा पवारांच्या गटनेतेपदी निवडीनंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सुनेत्रा पवार यांच्या निवडीचे अधिकृत पत्र सुपूर्द केले. मुख्यमंत्री हे पत्र राज्यपालांकडे सोपवणार असून, आज संध्याकाळी राजभवनावर शपथविधी सोहळा पार पडणार आहे. अवघ्या 10 मिनिटांत साधेपणाने हा शपथविधी सोहळा पार पडणार असल्याची माहिती मिळत आहे.
अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदासोबतच राज्याचे महत्त्वाचे ‘अर्थमंत्रीपद’ देखील होते. आता सुनेत्रा पवार हे खाते स्वतःकडेच ठेवणार की पक्षातील अन्य ज्येष्ठ नेत्याकडे ही जबाबदारी सोपवली जाणार, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.