Home Blog Page 119

महाराष्ट्राच्या विकासाला गती देणारा अर्थसंकल्प-केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ

पुणे- खासदार आणि सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया नोंदविताना हा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या विकासाला गती देणारा असून विमान वाहतुकीलाही गती देईल आणि सहकारालाही चालना देईल असे म्हटले आहे. मोहोळ यांनी अर्थसंकल्पावर काही मुद्दे विशद केले आहेत ते पुढील प्रमाणे

विकसित भारतासाठी दमदार पाऊल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा विकसित भारताच्या दिशेने जाणारा एक दमदार पाऊल आहे.

युवाशक्तीने प्रेरित अर्थसंकल्प
विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग 2026 अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर सादर करण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण कल्पना आतून प्रेरणा घेण्यात आली आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प युवाशक्तीने प्रेरित आणि चालीत असा आगळा वेगळा अर्थसंकल्प ठरतो.

महाराष्ट्राच्या विकासाला गती देणारा अर्थसंकल्प
उद्योग क्षेत्रात गुंतवणूक वाढवणे आणि रोजगारनिर्मिती करणे हे या अर्थसंकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे. सात प्राधान्य क्षेत्रांमध्ये मोठ्या सवलती दिल्यामुळे गुंतवणुकीला चालना मिळेल. मॅन्युफॅक्चरिंगचे केंद्र असलेल्या महाराष्ट्राला याचा मोठा लाभ होईल. मुंबई–पुणे आणि पुणे–हैदराबाद हाय-स्पीड कॉरिडोरमुळे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. डिव्होल्युशन ऑफ टॅक्सेसमधून यावर्षी महाराष्ट्राला एक लाख कोटी रुपये केंद्र सरकारकडून मिळणार आहेत. मुंबई–अहमदाबाद हायस्पीड कॉरिडोरसाठी ६,१०३ कोटी, मुंबई मेट्रोसाठी १,७०२ कोटी, पुणे मेट्रोसाठी ५१७ कोटी, एमयूटीपी-३ अंतर्गत मुंबईसाठी ४६२ कोटी, एमएमआर परिसरातील ग्रीन मोबिलिटीसाठी १५५ कोटी आणि महामार्गांवरील आयटीएससाठी ६८० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. एकूणच हा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या विकासाला गती देणारा, रोजगार निर्माण करणारा आणि देशाला तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवण्याच्या दिशेने नेणारा आहे.

पुणे ग्रोथ हब व हायस्पीड रेल्वेचा पुणे परिसराला लाभ पुणे महानगर प्रदेशाच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठीच्या ‘पुणे ग्रोथ हब’ला पाच वर्षात पाच हजार कोटींचा निधी मिळणार असून त्यामुळे या परिसराचा सर्वांगीण विकास होईल. तसेच पुणे-मुंबई व पुणे-हैदराबाद या ‘हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर’मुळे पर्यावरणपूरक, गतिमान प्रवास साध्य होईलच परंतु, या संपूर्ण पट्ट्यातील परिसराचा वेगाने विकास होईल. त्याचा फायदा विविध क्षेत्रांना होईल.

अर्थमंत्र्यांनी पुढील पाच वर्षांसाठी प्रत्येक ग्रोथ हबला पाच हजार कोटींचा निधी मंजूर केला आहे. पुणे ग्रोथ हबसाठी मिळणाऱ्या निधीचा फायदा पुणे महानगराच्या विकासासाठी होईल. यात पुणे जिल्हा, पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका, ३ कॅन्टोन्मेंट, ७ नगरपालिकांसह एमएसआरडीसी, एमआयडीसीसह अन्य समाविष्ट क्षेत्र अशा ६,९१४.२६ चौरस किलोमीटर क्षेत्राचा समावेश आहे. महाराष्ट्र सरकार, नीती आयोग आणि पुणे इंटरनॅशनल सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या या प्रकल्पाअंतर्गत पुणे महानगर प्रदेश आर्थिक बृहत आराखडा तयार केला जात असून त्यासाठी आवश्यक त्या तीन समित्यांचीही स्थापना झाली आहे. हा आराखडा ८० हजार कोटींचा असेल.

तंत्रज्ञान, उद्योग-उत्पादन, शिक्षण, सांस्कृतिक वारसा आणि एआय या क्षेत्रांमध्ये पुण्याला जागतिक स्तरावर एक प्रमुख केंद्र बनवणे, रोजगार निर्मिती करणे आणि पायाभूत सुविधा विकसित करणे आहे, हे पुणे ग्रोथ हबचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या, उत्पादनाच्या, शिक्षणाच्या आणि पर्यटनाच्या क्षेत्रात मोठी वाढ होईल. या प्रकल्पामुळे पुणे महानगर प्रदेशात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होईल आणि रोजगारसंधीही निर्माण होतील. पुण्याला देशातील एक महत्त्वाचे औद्योगिक आणि आर्थिक केंद्र म्हणून विकसित करणारा हा प्रकल्प आहे. देशाचे ग्रोथ इंजिन म्हणून जी शहरे विकसित केली जात आहेत, त्यात पुण्याचाही समावेश आहे. त्यामुळे अर्थसंकल्पातील तरतुदीचा पुण्याला मोठा फायदा होईल.

पुणे-मुंबई व पुणे-हैदराबाद या हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरमुळे अनेक फायदे होतील. प्रवासाच्या वेळेत घट होईल. व्यावसायिक कारणांसाठीचा प्रवास सुलभ होईल. पर्यटनाला चालना मिळेल. उद्योग, आरोग्य,शिक्षण, संशोधनालाही गती मिळेल. याकडेही मोहोळ यांनी लक्ष वेधले.

सहकारालाही चालना
प्राथमिक सहकारी संस्थांना कर सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे या संस्था आर्थिकदृष्ट्या मजबूत होतील. एका सहकारी संस्थेला दुसऱ्या सहकारी संस्थेतून मिळालेल्या लाभांशावर करसवलत (डिडक्शन) घेता येईल.त्यामुळे दुहेरी कर आकारणी टळेल. सूचीबद्ध राष्ट्रीय सहकारी महासंघांना त्यांनी कंपनीत केलेल्या गुंतवणुकीवर मिळालेल्या लाभांशावर काही अटींवर तीन वर्षांसाठी करमुक्ती दिली जाईल.त्यासह महासंघांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल.
राष्ट्रीय सहकार विकास महामंडळासाठीच्या निधीमध्ये भरीव वाढ केली जाणार असून त्यामुळे सहकारी संस्थांना अधिक निधी उपलब्ध होईल.

विमान वाहतुकीलाही गती
नागरी तसेच संरक्षण विमानवाहतूक क्षेत्रातील देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी महत्त्वाच्या सीमाशुल्क सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे भारतातील एअरोस्पेस आणि संरक्षण उत्पादन क्षेत्राला मोठा आधार मिळेल. नागरी प्रशिक्षण विमाने आणि इतर नागरी विमानांच्या निर्मितीसाठी
लागणाऱ्या घटकांवरील सीमाशुल्क माफ करण्यात येणार आहे. यामुळे भारतात विमाननिर्मितीचा खर्च कमी होऊन स्थानिक उत्पादकांना स्पर्धात्मक लाभ मिळेल. संरक्षण विमानांच्या सुट्या भागांसाठी आवश्यक कच्च्या मालावरील सीमाशुल्कही रद्द करण्यात आले आहे. याचा फायदा संरक्षण क्षेत्रातील उत्पादन, दुरुस्ती व देखभाल उद्योगाला होणार असून आयातवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल. या सवलती ‘मेक इन इंडिया’ धोरणाशी सुसंगत असून, देशांतर्गत उत्पादन, गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीला प्रोत्साहन देण्याचा सरकारचा उद्देश यातून स्पष्ट होतो. विमानवाहतूक आणि संरक्षण क्षेत्रात भारताला जागतिक उत्पादन केंद्र म्हणून उभे करण्याच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल आहे.

अजितदादांचा अपघात की घातपात?:ऐनवेळी पायलट का बदलले? पाच मृत्यू तर सहावी बॉडी कुठंय?- रुपाली पाटलांनी उपस्थित केले सवाल

पुणे- अजित पवारांच्या विमान अपघाताच्या आदल्या दिवशी अनेक घडामोडी घडल्या, त्यामुळे त्यांच्या विमान अपघातामागे काही घातपात आहे का याची चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली आहे. तसेच अपघाताच्या दिवशी ऐनवेळी दोन्ही पायलट का बदलले असा सवालही ठोंबरे यांनी उपस्थित केला आहे.रुपाली ठोंबरे म्हणाल्या, आज पाच दिवस झाले, आमचा मेंदू बधीर झाला आहे. अजित पवार सकाळी 8 वाजता ज्या विमानाने येणार होते, त्याचे पायलट आणि को पायलट दोघेही ट्रॅफिकमध्ये अडकले आणि ऐनवेळी बदलले गेले. ते का करण्यात आले? विमान खाली घेण्याची सूचना कोणी केली? आधी सहा माणसं या विमानात असल्याचे सांगितले गेले. मृत्यू पाच जणांचा झाला. मग सहावा माणूस कुठे गेला? असा प्रश्न ठोंबरे यांनी उपस्थित केला आहे.

पुढे बोलताना रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या, लँडिंगच्या वेळी अडचण असताना ते विमान खाली घेण्याची सूचना कोणी दिली? अडचण असेल तर ते विमान पुणे, सोलापूर किंवा इतर ठिकाणी उतरवायला हवे होते. मात्र तसे न करता बारामतीमध्येच का उतरवले? विमान अपघातात सगळ्या बॉडी जळाल्या, पण कागदपत्रे तशीच राहिली. त्यामुळे हा अपघात आहे की त्यामागे काही कटकारस्थान आहे, याची चौकशी झालीच पाहिजे. आपण हा अपघात असल्याचे म्हणू आणि दुसरीकडे ज्याने हे कटकारस्थान केले आहे तो मोकाट सुटायला नको.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला पाच दिवस उलटले असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि अजित पवारांचे कट्टर समर्थक अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेल्या पाच प्रश्नांनी संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. दादा गेले हे मन मान्य करायला तयार नाही. मृत्यूचे राजकारण करण्याचे पाप मी करणार नाही, पण प्रश्नांचा आगडोंब उसळतोय, असे म्हणत अमोल मिटकरींनी थेट अपघाताच्या ठिकाणच्या विसंगतींवर आणि तपास यंत्रणांच्या माहितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे

करदात्यांची काळजी आणि विकसित भारताचा संकल्प…!- ना. चंद्रकांतदादा पाटील

पुणे-

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत मांडलेला अर्थसंकल्प भारताच्या विकासाचा जणू रोडमॅपच आहे.करदात्यांची काळजी आणि विकसित भारताचा संकल्पआहे अशा शब्दात उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रतिक्रिया नोंदविली आहे . ते म्हणाले,’
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या कल्पनेतला विकसित भारत साकार करण्यासाठी या अर्थसंकल्पात काही महत्त्वपूर्ण तरतुदी आहेत. त्या दृष्टीने नियोजनबद्ध शहरीकरणावर भर देण्यात येईल. उद्योग आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याचं काम हा अर्थसंकल्प करेल. तसंच गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीसाठी अनेक ठोस उपाय या अर्थसंकल्पातून केंद्रीय अर्थमंत्र्यांनी मांडले आहेत.

चंद्रकांतदादा पाटील यांनी या अर्थसंकल्पातील खालील मुद्द्यांकडे लक्ष वेधले आहे.

  • पायाभूत सुविधा क्षेत्रात होणार 12 लाख कोटींची गुंतवणूक
  • शेती, पशुपालन, मत्स्यव्यवसाय आणि सिंचनासारख्या महत्त्वाच्या विभागांसाठी भरीव तरतुदी
  • लखपती दिदी योजना यशस्वी ठरल्याने महिलांसाठी आणखी महत्त्वाच्या योजनांची तरतूद
  • महिलांसाठी स्वतंत्र मॉल्स आणि उद्योगांच्या संधी निर्माण करणारी महत्त्वाची योजना
  • शिक्षण आणि उच्चशिक्षण घेणाऱ्या मुलींचं देशातलं प्रमाण दिवसेंदिवस वाढतं आहे. त्यामुळे देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात उच्चशिक्षण घेणार्‍या मुलींसाठी वसतीगृहांची योजना
  • ⁠उच्च शिक्षण क्षेत्रातील गुंतवणुकीअंतर्गत नवे संस्थान, विद्यापीठ टाउनशिप आणि टेलिस्कोप इन्फ्रास्ट्रक्चर सुविधांसारख्या मूलभूत सोयी उभारण्याच्या दिशेने अनेक पावले
  • प्रत्येक जिल्हा रुग्णालयात प्रगत चिकित्सा व्यवस्था उभारण्याचा मैलाचा दगड ठरू शकेल असा निर्णय
  • मुंबई-पुणे, पुणे-हैदराबाद हायस्पीड कॉरिडॉरद्वारे जीडीपीमध्ये वाढीसाठी संजीवनी
  • प्रत्येक ग्रोथ हबसाठी दर पाच वर्षांत 5000 कोटी देणारी तरतूद महत्त्वाची आहे. या तरतुदीचा लाभ मुंबई महानगर (एमएमआर), पुणे महानगर तसेच नागपूरसह देशातील अनेक महानगरांच्या ग्रोथहबसाठी निश्चितच होणार आहे.
    एकुणात देशाची अर्थव्यवस्था योग्य दिशेने पुढे जाईल, हे सुनिश्चित करणारा हा अर्थसंकल्प आहे, असचं म्हणता येईल.
    भारतीय अर्थव्यवस्था प्रगत होऊन देशवासीयांचे जीवनमान उंचावणे सुकर करणाऱ्या या अर्थसंकल्पाबद्दल पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांचे आभार!

महाराष्ट्राला मिळणार सुमारे 1 लाख कोटी! पुण्याला 12,355 कोटी

विकसित भारताकडे दमदार पाऊल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १:- पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विकसित भारताकडे दमदार वाटचाल करणारा आहे. केंद्रीय करातून महाराष्ट्राला मिळणारा वाटा हा 98,306 कोटी रुपये इतका असणार आहे. याशिवाय अर्थसंकल्पाचे प्राथमिक आकलन करता, 12,355 कोटी विविध प्रकल्पांसाठी आहेत. त्यामुळे सुमारे 1 लाख कोटी महाराष्ट्राला मिळतील, असे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.

केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना माध्यमांशी ते बोलत होते. शहरीकरणाला नियोजनबद्ध करुन, उद्योग आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देऊन, गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीसाठी खंबीर उपाययोजना या अर्थसंकल्पातून करण्यात आल्या आहेत. पायाभूत सुविधा क्षेत्रात 12 लाख कोटींची गुंतवणूक सरकार करणार आहे, पूर्वी जी केवळ 1 लाख कोटी असायची. 5 लाख लोकसंख्या असलेल्या शहरातील विकासाचा विचार करुन शहरीकरणाच्या एकात्मिक विचार करण्यात आला आहे. यातून विविध क्षेत्रांना दिशा, गती आणि निधी प्राप्त होणार आहे. याचा मोठा लाभ महाराष्ट्राला होणार आहे. शेती, पशुपालन, मत्स्यव्यवसाय आणि सिंचन यासाठी भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत. लखपती दिदी योजनेच्या यशानंतर महिलांसाठी स्वतंत्र मॉल्स आणि उद्योगांच्या संधी तयार करण्याची योजना अत्यंत महत्त्वाची आहे. प्रत्येक जिल्ह्यात उच्च शिक्षण घेणार्‍या मुलींसाठी वसतीगृहांची योजना तयार करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयात आपात चिकित्सा व्यवस्था उभी करण्याचा निर्णय आरोग्य क्षेत्रात मोलाचा ठरेल. मुंबई-पुणे, पुणे-हैदराबाद हायस्पीड कॉरिडॉरमुळे जीडीपीत मोठी वाढ होईल. पुणे-हैदराबाद कॉरिडॉरचा मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राला मोठा लाभ होईल. ग्रोथहबसाठी 5000 कोटी प्रत्येकी 5 वर्षांत प्राप्त होणार आहेत, याचा लाभ मुंबई महानगर (एमएमआर), पुणे महानगर, नागपूर महानगर ग्रोथहबला होणार आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

महाराष्ट्रासाठी काय?

  • महाराष्ट्र ग्रामीण रस्ते प्रकल्प : 378.38 कोटी
  • महाराष्ट्र अ‍ॅग्रीबिझनेस प्रकल्प : 167.28 कोटी
  • सर्वसमावेशक विकासासाठी इकॉनॉमिक क्लस्टर : 283.77 कोटी
  • महाराष्ट्र टर्शरी केअर आणि वैद्यकीय शिक्षण विकास कार्यक्रम : 385.78 कोटी
  • उपसा सिंचन योजनांचे सौर ऊर्जीकरण : 207.10 कोटी
  • शेती आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प : 646.24 कोटी
  • मानवी विकासासाठी कौशल्य आणि अप्लाईड नॉलेज प्रकल्प : 313.65 कोटी
  • जिल्ह्यांमध्ये संस्थात्मक संरचना क्षमतावृद्धीसाठी : 240.90 कोटी
  • मुंबई-अहमदाबाद हायस्पीड कॉरिडॉर : 6103 कोटी
  • मुंबई मेट्रो : 1702 कोटी
  • एमयुटीपी 3 : 462 कोटी
  • एमएमआरमध्ये ग्रीन मोबिलिटी : 155.32 कोटी
  • समृद्धी महामार्गावर आयटीएस : 680.79 कोटी
  • पुणे मेट्रो : 517.74 कोटी
    (ही केवळ मुंबई, पुण्यातील प्राथमिक आकडेवारी आहे. एकूण : 12,355 कोटी)

पुण्यात आता कोयता गँग मध्ये महिलाही होताहेत सामील…

बी. टी. कवडे रोडवर तरुणीसह टोळक्याचा थरार
पुणे-पुण्यातल्या ‘कोयता गँग’मध्ये केवळ तरुण मुलांचा समावेश पाहायला मिळत होता. मात्र, एका महिलेने हातात शस्त्र घेऊन तोडफोड केल्याचे समोर आल्याने आता शहरातील गुंडगिरी किती खोलवर रुजू पाहते आहे हे दिसून येते आहे. शहरात बेरोजगारी, महागाई ने हैराण आणि संतप्त तरुणाईमधील काही गुन्हेगारीकडे वळत आहेत यातील विविध टोळक्यांच्या थैमानाने आणि त्यांना मिळणाऱ्या राजकीय आश्रयाने गुंडागर्दी वाढली असून, हडपसरमधील बी. टी. कवडे रोडवर शनिवारी रात्री एका शस्त्रधारी टोळक्याने अक्षरशः धुमाकूळ घातला. या घटनेमुळे स्थानिक रहिवाशांची झोप उडाली असून, परिसरात भीतीचे सावट पसरले आहे.

रात्रीच्या शांत वेळेत अचानक आरडाओरडा करत आलेल्या चार तरुण आणि एका तरुणीने हातात धारदार हत्यारे घेऊन रस्त्यावर नंगानाच सुरू केला. तोंडाला कापड बांधून आलेल्या या हल्लेखोरांनी दिसेल त्याला धमकावत आणि शस्त्रांचा धाक दाखवत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या अनपेक्षित प्रकारामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांची आणि वाहनचालकांची भंबेरी उडाली, ज्यांना जिकडे वाट मिळेल तिकडे त्यांनी पळ काढला.केवळ धमकावून हे टोळके थांबले नाही, तर त्यांनी आपला मोर्चा व्यावसायिक प्रतिष्ठानांकडे वळवला. रस्त्यालगत असलेल्या अर्ध्या डझन दुकानांवर त्यांनी कोयत्याने सपासप वार करत शटर आणि काचा फोडल्या. तसेच रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या अनेक दुचाकी आणि चारचाकी गाड्यांचेही मोठे नुकसान केले. या तोडफोडीमुळे व्यापाऱ्यांचे आणि वाहनमालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

सर्व समाजघटकांना निराश करणारा दिशाहीन अर्थसंकल्प

कृषी, मध्यम, छोटे व लघु उद्योग, शेतकरी यांच्यासाठी काहीच नाही; रोजगार निर्मितीसाठी ठोस योजना नाही

देशावर वाढलेल्या कर्जाच्या डोंगरामुळे राज्यांना केंद्राकडून निधी व सबसिडी मिळणे कठिण; ‘आत्मनिर्भर’ घोषणा म्हणजे ‘गाजराची पुंगी’

मुंबई, दि. १ फेब्रुवारी २०२६

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा मागील अर्थसंकल्पापेक्षा काहीही वेगळा नाही. हा अर्थसंकल्प कोणत्याही समाजघटकाचे समाधान करणारा नसून केवळ मोठे आकडे आणि दावे मांडण्यापुरताच मर्यादित आहे. अर्थसंकल्पात आकड्यांची जुमलेबाजी करण्यात आली असून तो पूर्णतः दिशाहीन आहे, अशी तीव्र टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

देशात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीसाठी ठोस धोरण आखण्याची गरज असताना या अर्थसंकल्पात रोजगार निर्मितीसाठी कोणतीही स्पष्ट दिशा दिसत नाही. शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणतीही भरीव तरतूद करण्यात आलेली नाही. आयकर भरणाऱ्या नोकरीपेशा वर्गाला आणि मध्यमवर्गालाही कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही. जाहीर करण्यात आलेली विकासदराची उद्दिष्टे गाठणेही अशक्यप्राय असून केंद्र सरकारचा हा अर्थसंकल्प केवळ घोषणाबाजीपुरताच मर्यादित आहे, असे सपकाळ म्हणाले.

अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले की, नोटबंदी आणि जीएसटीमुळे देशातील लघु, मध्यम आणि छोटे उद्योग अक्षरशः मोडकळीस आले आहेत. या क्षेत्राला अद्यापही उभारी मिळालेली नाही आणि या अर्थसंकल्पातूनही त्यांना कोणताही ठोस आधार मिळालेला नाही. देशात सर्वाधिक रोजगार निर्मिती याच क्षेत्रातून होते; मात्र सरकारने या वास्तवाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. मोदी सरकारच्या काळात बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढली असून ताज्या आकडेवारीनुसार दोन पदवीधरांपैकी एक बेरोजगार आहे, म्हणजेच बेरोजगारीचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीच्या बाबतीत मोदी सरकार पूर्णतः अपयशी ठरले आहे, असेही त्यांनी नमूद केले.

भारत हा कृषीप्रधान देश असतानाही या अर्थसंकल्पाने शेतकऱ्यांची घोर निराशा केली आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट गेल्या १२ वर्षांत पूर्ण झालेले नाही. उलट शेतीवरील खर्च दुप्पट झाला आहे, शेतमालाला योग्य दर मिळत नाही, हमीभावाबाबत कोणताही ठोस निर्णय घेतला जात नाही आणि शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. या गंभीर प्रश्नांवर अर्थसंकल्पात कोणतीही ठोस तरतूद नाही. वर्षाला ६ हजार रुपये देऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत, हे सरकारने लक्षात घ्यावे, असे सपकाळ म्हणाले.

सरकार १० वर्षांत २५ कोटी लोक गरिबीतून बाहेर येतील असा दावा करत आहे; मात्र प्रत्यक्षात ८० कोटी जनतेला पाच किलो धान्य द्यावे लागत आहे. मग २५ कोटी लोकांची गरिबी कशी संपली, हा मोठा प्रश्न आहे. ही संपूर्ण आकडेमोड बनवाबनवी आहे. सोन्याचा दर दोन लाख रुपये तोळा आणि चांदीचा दर चार लाख रुपये किलोपर्यंत पोहोचला असतानाही या किमतींवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारकडे कोणतीही योजना नाही. महागाई आटोक्यात आणण्यासाठीही कोणतेही ठोस धोरण दिसत नाही.
केंद्र सरकार कर्जाच्या बोझ्याखाली दबले आहे कर्ज काढून योजना राहयबवल्या जात आहेत पण लोकांच्या जीवनमानात यामुळे काही बदल झालेला दिसत नाही.
आज भारतात उत्पन्न आणि संपत्तीची विषमता ऐतिहासिक पातळीवर पोहोचली आहे. देशाच्या उत्पन्नातील जवळपास ५८ टक्के हिस्सा वरच्या १० टक्के लोकांकडे, तर खालच्या ५० टक्क्यांच्या वाट्याला केवळ १५ टक्के उत्पन्न आहे. देशाच्या एकूण संपत्तीपैकी सुमारे ४० टक्के संपत्ती फक्त वरच्या १ टक्क्यांकडे एकवटली आहे. ही केवळ आकडेवारी नसून देशाच्या आर्थिक रचनेतील गंभीर असंतुलन दर्शवणारी स्थिती आहे. ही असमानता दूर करण्याबाबत या अर्थसंकल्पात एक शब्द ही नाही असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले.

‘मराठी वगनाट्य परंपरा आणि योगदान’वर मुंबई विद्यापीठात परिसंवाद

मुंबई (प्रतिनिधी) – भारत सरकारच्या साहित्य अकादेमीच्या आयोजनाखाली मुंबई विद्यापीठाच्या शाहीर अमरशेख अध्यासन आणि लोककला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि. ५ फेब्रुवारी रोजी ‘मराठी वगनाट्य परंपरा आणि योगदान’ या विषयावर प्रथमच परिसंवाद आयोजित करण्यात येणार आहे.
मराठी लोकनाट्य परंपरेतील वगनाट्याचा ऐतिहासिक प्रवास, त्याचे सांस्कृतिक योगदान आणि समाजजीवनावर झालेला प्रभाव यावर या परिसंवादात सखोल चर्चा होणार आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवर अभ्यासक, कलावंत आणि तज्ज्ञ या चर्चासत्रात सहभागी होणार आहेत.
हा परिसंवाद कलिना येथील मुंबई विद्यापीठाच्या सांस्कृतिक भवनाच्या तिसऱ्या मजल्यावर दोन सत्रांमध्ये आयोजित करण्यात आला आहे.
सकाळी १०.३० ते ११.४५ या वेळेत होणाऱ्या पहिल्या उद्घाटनपर सत्रात ९९ व्या अखिलभारतीय मराठी साहित्यसम्लनाचे अध्यक्ष, विश्वास पाटील,मुंबई विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा रवींद्र कुलकर्णी ,पद्मश्री वामन केंद्रे, डॉ. प्रा. प्रकाश खांडगे, साहित्य अकादेमीच्या मुंबई प्रादेशिक कार्यालयाचे प्रभारी अधिकारी ओम प्रकाश नागर उद्घाटनपर भाषण करणार आहेत. यावेळी मुंबई विद्यापीठाचे मानद प्रा. तमाशा सम्राट रघुवीर खेडकर यांना भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्या बद्दल विशेष सत्कार आयोजित विद्यापीठातर्फे करण्यात आला आहे .

मौखिक परंपरा’ विषयावर निबंधवाचन…!

यानंतर ‘मराठी वगनाट्याची मौखिक परंपरा’ या विषयावर ज्येष्ठ अभ्यासक प्रभाकर ओव्हाळ यांच्या अध्यक्षतेखाली निबंधवाचन होणार असून यामध्ये अभ्यासक श्यामल गरुड, लोककलेचे अभ्यासक संतोष खेडलेकर, मंत्रालयातील ज्येष्ठ पत्रकार,लोककलेचे अभ्यासक आणि महाराष्ट्र शासनाच्या राज्य सांस्कृतिक पुरस्कार सन्मानित खंडूराज गायकवाड हे सहभागी होणार आहेत.

सत्र दुसरे
मराठी वगनाट्य परंपरा:शाहीरांचे योगदान…!

दुपारच्या दुसऱ्या सत्रात ‘मराठी वगनाट्य परंपरा : शाहीरांचे योगदान’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या चर्चा सत्रात लोककलेचे अभ्यासक सोपान खुडे, सुप्रसिद्ध मराठी अभिनेते आदेश बांदेकर आणि रणधीर शिंदे सहभागी होणार आहेत.
मराठी लोककलेच्या इतिहासात वगनाट्यावर प्रथमच अशा स्वरूपाचा परिसंवाद होत असून पार्श्वभूमी लोककला व लोकसाहित्याचे अभ्यासक,तज्ञ्, विचारवंत, कलावंत, कला रसिक यांनी या चर्चा सत्रात सहभागी व्हावे.असे आवाहन मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे विभाग प्रमुख प्रा.डॉ.गणेश चंदनशिवे यांनी केले आहे.

मुख्य सचिवांनी घेतला नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रण कार्यालयाचा आढावा; नव्या नोंदणी भवनाची केली पाहणी

पुणे, दि. १ फेब्रुवारी :
राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी शनिवारी सकाळी १० ते दुपारी १२.३० या वेळेत नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रण कार्यालयाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी कार्यालयाच्या प्रशासकीय, तांत्रिक तसेच नागरिक सेवा विषयक विविध बाबींची माहिती त्यांनी घेतली.

या आढावा बैठकीदरम्यान नोंदणी व मुद्रांक विभागामार्फत नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा, दस्तऐवज नोंदणीची प्रक्रिया, संगणकीकरण, ऑनलाईन सुविधा तसेच तक्रार निवारण यंत्रणा याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक व कालबद्ध करण्यासाठी आवश्यक त्या सुधारणा राबविण्याच्या दृष्टीने मुख्य सचिवांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

यानंतर मुख्य सचिवांनी नव्या प्रशासकीय इमारतीच्या शेजारी उभारण्यात येत असलेल्या नोंदणी भवनाची पाहणी केली. या इमारतीच्या बांधकामाची सद्यस्थिती, उपलब्ध होणाऱ्या सुविधा, कार्यालयीन जागेचे नियोजन, नागरिकांसाठी प्रतिक्षालय, पार्किंग व्यवस्था तसेच आधुनिक पायाभूत सुविधांबाबत त्यांनी माहिती घेतली. बांधकामाचे काम नियोजित कालमर्यादेत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

या आढावा बैठकीस राज्याचे जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे, राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक रवींद्र बिनवडे, सह नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक राजेंद्र मुठे यांच्यासह नोंदणी व मुद्रांक नियंत्रण कार्यालयातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान विभागाच्या कामकाजातील अडचणी, भविष्यातील गरजा तसेच सुधारणा योजनांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली.

समाजमाध्यमातील कंपूशाहीमुळे उत्तम साहित्य दुर्लक्षित राहण्याचा धोका : परिसंवादातील सूर

साहित्यदीप प्रतिष्ठान आयोजित काव्य महोत्सवात ‘समाजमाध्यमांचा कवितेवर होणारा परिणाम’ या विषयावर परिसंवाद

पुणे : कविता समाजमाध्यमांवर गेली की तिचे लोकशाहीकरण, संक्षिप्तीकरण तसेच सरसकटीकरण आणि सुमारीकरणही होते. ज्या योगे तिचा स्मरणकालही कमी होतो. केलेले लिखाण समाजमाध्यमांवर टाकण्याची घाई असल्यामुळे त्यातील वैचारिक आणि शिकण्याची प्रक्रिया खुंटते. समाजमाध्यमांमुळे वाचनाचे माध्यम बदलताना दिसत असले ती त्यावर मिळणारी लोकप्रियता याविषयी अभ्यास होणे आवश्यक आहे, असा सूर परिसंवादात उमटला. अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळे समाजमाध्यमांवर आलेले साहित्य सहजपणे चोरले जाऊ शकते तसेच दुसरीकडे कंपूशाहीमुळे उत्तम साहित्य देखील दुर्लक्षित राहू शकते, असा धोकाही दर्शविण्यात आला.

कला, साहित्य क्षेत्रात १५ वर्षांपासून कार्यरत असलेल्या साहित्यदीप प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवस कवितेसाठी या काव्य महोत्सवात आज (दि. १) ‘समाजमाध्यमांचा कवितेवर होणारा परिणाम’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात मान्यवर वक्त्यांनी आपली भूमिका रोखठोकपणे मांडली. यात आश्लेषा महाजन, अभिजित थिटे, प्रणव सखदेव, डॉ. वर्षा तोडमल यांचा सहभाग होता तर सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. राजा दीक्षित अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवयित्री निरुपमा महाजन यांनी केले. भारत इतिहास संशोधन मंडळातील वि. का. राजवाडे सभागृहात काव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

डॉ. वर्षा तोडमल म्हणाल्या, नवसमाज माध्यमांचा कवितेवर सकारात्मक व नकारात्मक परिणाम होतो. व्यक्त होण्यास व्यासपीठ लाभल्यामुळे ग्रामीण भागातील कवी देखील आपल्या बोली भाषेत संवेदना व्यक्त करत दबलेला आवाज पुढे आणू शकतात. तसेच प्रकाशक-संपादक या दालनातून पुढे पुस्तक प्रकाशन ही प्रक्रिया टाळता येऊ शकते. परंतु समीक्षकाच्या हाताखालून तावून सुलाखून निघालेले काव्य समाजमाध्यमातून प्रकट होत नाही त्यामुळे त्याचे अस्तित्व काही काळच टिकू शकते.

अभिजित थिटे म्हणाले, समाजमाध्यमांवर व्यक्त होणाऱ्या साहित्याला कंपूशाहीचा फायदा व तोटाही होतो. ठराविक व्यक्तीचे काव्य, साहित्य समाजापर्यंत पाहोचते तर माध्यमे योग्य पद्धतीने हाताळली न गेल्यास अस्सल भावना समाजापर्यंत पोहोचू शकत नाहीत. कविता मेंदूतून हृदयात झिरपत जाण्याला लागणारा कालावधी समाजमाध्यमांमुळे कमी झाला आहे. समाजमाध्यमांचा वापर व्यावसायिक दृष्टीने होण्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

आश्लेषा महाजन म्हणाल्या, शिक्षणाचे व अभिव्यक्तीचे लोकशाहीकरण झाल्यामुळे स्त्रियांचे समाजमाध्यमांवर व्यक्त होण्याचे प्रमाण जास्त दिसते. पिढी बदलानुसार अभिव्यक्तीची निकड बदलेली जाणवते ज्यातून लेखनाची भाषा, प्रतिक्रियेचा कालावधी बदलताना जाणवतो.

प्रणव सखदेव म्हणाले, समाजमाध्यमांवर व्यक्त होत असताना भाषा आणि शब्दांचा वापर यावर विचार होणे गरजेचे आहे. मानवी स्वभाव, गटबाजी जाणवत असताना सत्तास्थाने भेदण्याचे कार्य समाजमाध्यमांद्वारे केले गेले, त्यामुळे नव कवींना आपली बंडखोरी दाखवत स्वतंत्र मार्ग शोधणे सोपे होत गेले.  

कृत्रिम बुद्धीमत्तेकडे सर्जनशीलता नाही..

कृत्रिम बुद्धीमत्तेतून उमटणारे साहित्य हा आत्म्याचा आवाज नाही, प्रतिभेला चालना दिल्याशिवाया पेशी उत्तेजित होत नाहीत आणि सर्जनशीलतेतून व्यक्त होणे शक्य नाही, असे मत मांडून कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर अनुवादासाठी तसेच इतर भाषेतील साहित्याचा अभ्यास करण्यासाठी होऊ शकतो, असे वक्त्यांची सूचित केले.

तो पर्यंत मानवाचे कवी असणे अबाधित : डॉ. राजा दीक्षित..

अध्यक्षपदावरून बोलताना डॉ. राजा दीक्षित म्हणाले, समाजमाध्यमांचा संदर्भ जागतिकीकरणाच्या प्रक्रियेशी जोडला गेला आहे. संज्ञापन क्रांती, ज्ञानविस्फोट, माहिती तंत्रज्ञान यांचा फक्त कवितेवरच नव्हे तर मानवी जीवनावरही मोठा परिणाम झाला आहे. या विषयी आस्था आणि चिंता वाटते. कवितेतून जोपर्यंत जगण्याचा अनुभव, चिंतनशीलता प्रकट होत राहील तो पर्यंत मानवाचे कवी असणे अबाधित राहणार आहे. समाजमाध्यमांचा वापर करताना विवेकवल्लीची लावणी करणे आवश्यक आहे.

मान्यवरांचे स्वागत साहित्यदीप प्रतिष्ठानच्या अध्यक्ष ज्योत्स्ना चांदगुडे, कार्याध्यक्ष धनंजय तडवळकर, वि. सु. चव्हाण, डॉ. संदीप अवचट यांनी केले.

या गँगने घेतली रोहित शेट्टीच्या घरावरील फायरिंगची जबाबदारी, म्हटले पुढच्या वेळी बेडरूम मध्ये फायर होईल

संपूर्ण बॉलिवूडला इशारा

मुंबई- ‘पुढच्या वेळी बेडरूममध्ये गोळी चालेल’;रोहित शेट्टीच्या घरी हल्ल्याच्या प्रकरणाची जबाबदारी शुभम लोणकर नामक आरजू बिश्नोई गँगच्या एकाने घेतली आहे. एका शोषल मीडियातील पोस्टमध्ये याची माहिती देण्यात आली आहे.असे काही माध्यमांतून वृत्त प्रसारित झाले आहे. या संदेशात असेही म्हटले आहे कि,’ त्यांनी पुढे सुधारणा न झाल्यास वाईट परिणाम भोगावा लागेल अशी धमकीही दिली आहे.मुंबई: प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या जुहू येथील निवासस्थानावर उशिरा रात्री गोळीबार झाल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणानंतर परिसरातील सुरक्षितता वाढवण्यात आली आहे. दरम्यान, लॉरेंस बिश्नोई गँगने या प्रकरणाची जबाबदारी घेतली आहे. शुभम लोणकर आरजू बिश्नोई या नावाच्या फेसबुक आयडीवर घटनेबाबत पोस्ट करून जबाबदारी घेतली आहे. या पोस्टमध्ये बॉलिवूडमधील इतर अभिनेत्यांना धमकी देण्यात आली आहे. यात स्पष्टपणे सांगितले आहे की, वेळीच सुधरून जा अन्यथा खूप वाईट हाल होईल. जर पुढेही आपली बोलणी समजली नाही आणि मानली नाही तर आता घराबाहेर नाही तर आत बेडरूममध्ये गोळी चालेल.संपूर्ण बॉलिवूडला धमकी
शुभम लोणकर आरजू बिश्नोई या नावाच्या फेसबुक आयडीवरच्या पोस्टमध्ये लिहिले आहे, “राम राम जय बजरंग बाली सर्व भाऊंना… आज मुंबईत (शेट्टी टॉवर) चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरी जे गोळीबार झाले त्याची जबाबदारी SHUBHAM LONKER AARZOO BHISHNOI HARI BOXER HARMAN shandu आम्ही घेतो. आम्ही त्याला अनेकदा मेसेज दिले की आमच्या कामात हस्तक्षेप करू नका पण त्याला समजले नाही. त्याला हा छोटासा ट्रेलर दिला आहे. जर पुढेही आमची बोलणी समजली नाही आणि मानली नाही तर आता घराबाहेर नाही तर त्याच्या बेडरूममध्ये छातीवर गोळी चालेल आणि पुढे संपूर्ण बॉलिवूडला इशारा आहे की वेळीच सुधरून जा अन्यथा खूप वाईट हाल होईल तुमचा. बाबा सिद्दीकीपेक्षा वाईट हाल करू तुमचे.”जागा कमी पडेल
पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे, “ज्यांना आम्ही फोन केले आहेत त्यांना वेळीच लाइनवर या अन्यथा लपायला जागा कमी पडेल तुम्हाला आणि जितनेही आमचे शत्रू आहेत तयार राहा लवकरच भेट होईल तुमची wait and watch !! (NOTE= एकच होता एकच आहे आणि एकच राहील Lawrence BHISHNOI group !!) जय श्री राम… जय बालकरी.”शुभम लोंकार आणि आरजू बिश्नोई कोण आहेत?

शुभम लोणकर हाच तो गँगस्टर आहे जो बाबा सिद्दीकी हत्याकांडात वॉंटेड आहे. एजन्सींना बाबा सिद्दीकी हत्याकांडानंतर शुभम लोणकर ची शेवटची लोकेशन नेपाळमध्ये मिळाली होती, त्यानंतर त्याचा काही पत्ता लागला नाही. प्रसिद्ध गायक B PRAK ला आरजू बिश्नोईने नुकतेच धमकी दिली होती, १० कोटी मागितले होते. दरम्यान, रोहित शेट्टीच्या घरी हल्ल्याच्या प्रकरणात अद्याप मुंबई पोलिसांच्या टीमने पुण्यातून पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. या संशयितांची चौकशी सुरू आहे. गोळीबार प्रकरणात या संशयितांची काही भूमिका आहे का हे तपासले जात आहे. पुणे पोलिसांनी या संशयितांची माहिती मुंबई क्राइम ब्रांचशी शेअर केली आहे.

वैयक्तिक आयातीवरील कस्टम ड्युटी निम्मी,परदेशातून खरेदी करणे तुलनेने स्वस्त

नवी दिल्ली- अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (1 फेब्रुवारी) केंद्रीय अर्थसंकल्प 2026–27 सादर केला. या अर्थसंकल्पात देशांतर्गत उत्पादनाला चालना देणे, कररचना सोपी करणे आणि ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा देणे यावर भर देण्यात आला. यामध्ये स्मार्टफोन, टॅबलेट, टीव्ही आणि एअर कंडिशनर (AC) यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर होणाऱ्या परिणामाकडे सर्वसामान्यांचे विशेष लक्ष आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील आयात कर कमी करून ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. विशेषतः स्मार्टफोन, टॅबलेट, टीव्ही आणि एसी या वस्तू आयात करताना करभार कमी होणार आहे.

या अर्थसंकल्पातील सर्वात मोठा निर्णय म्हणजे वैयक्तिक वापरासाठी आयात होणाऱ्या वस्तूंवरील कस्टम ड्युटी 20% वरून 10% करण्यात आली आहे. यामुळे परदेशातून थेट खरेदी केलेल्या किंवा ऑनलाइन आंतरराष्ट्रीय वेबसाइटवरून मागवलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरचा कर कमी होणार आहे.

करकपात झाली म्हणजे दुकानातील किंमत त्वरित कमी होईलच असे नाही. पण आयातीवेळी लागणारा कर कमी झाल्यामुळे एकूण खर्चात फरक पडतो.

एअर कंडिशनर (AC)
समजा एखाद्या ग्राहकाने ₹40,000 किंमतीचा एसी आयात केला:
पूर्वी (20% ड्युटी):
बेसिक कस्टम ड्युटी = ₹8,000
इतर कर (IGST वगैरे) धरून एकूण कर ≈ ₹27,584
आता (10% ड्युटी):
बेसिक कस्टम ड्युटी = ₹4,000
इतर कर धरून एकूण कर ≈ ₹21,952
एकूण बचत सुमारे ₹5,632
म्हणजेच फक्त ड्युटी कमी झाल्यामुळे एसी आयात करताना हजारो रुपयांची बचत शक्य आहे.


स्मार्टफोन आणि टॅबलेट

मोबाईल आणि टॅबलेट या सर्वाधिक आयात होणाऱ्या वस्तूंमध्ये येतात.
₹30,000 किंमतीचा मोबाईल आयात केल्यास
फक्त बेसिक कस्टम ड्युटीतच सुमारे ₹1,500 ची बचत होऊ शकते.
इतर कर धरले तरी एकूण बचत ₹1,500 ते ₹2,000 पर्यंत जाऊ शकते.
यामुळे परदेशातून मागवलेले फोन आणि टॅबलेट तुलनेने स्वस्त पडू शकतात.
तसेच, मोबाईल बनवण्यासाठी लागणारे काही पार्ट्स स्वस्त पडल्यास भारतात तयार होणाऱ्या फोनच्या किंमतीतही स्पर्धात्मक घट होण्याची शक्यता आहे.
टीव्ही
टीव्हीवरही हीच ड्युटी कपात लागू होते.
₹50,000 किंमतीचा आयात केलेला टीव्ही घेतल्यास
फक्त बेसिक ड्युटीतच सुमारे ₹2,500 ची बचत होऊ शकते.
तरीही, टीव्हीच्या किंमतीवर जागतिक बाजारातील घटकांचा (उदा. चिप्स, मेमरी पार्ट्स महाग होणे) परिणाम होत असल्याने प्रत्यक्षात किंमत किती कमी होईल हे कंपनीनुसार बदलू शकते.
स्मार्टफोन आणि टॅबलेट

आयात ड्युटी कमी झाल्यामुळे स्वस्त पडण्याची शक्यता
आयात केलेल्या उपकरणांवर ₹1,500–₹2,000 किंवा अधिक बचत शक्य
टीव्ही
आयातीत काही हजार रुपयांची बचत
पण जागतिक बाजारभावामुळे अंतिम किंमत बदलू शकते
एअर कंडिशनर (AC)
ड्युटी कपातीचा स्पष्ट फायदा
₹40,000 एसीवर सुमारे ₹5,600 पर्यंत बचत शक्य
मात्र दुकानातील किंमत कंपनी किती फायदा पुढे देते यावर अवलंबून
इतर इलेक्ट्रॉनिक्स
देशांतर्गत उत्पादन वाढल्यास भविष्यात किंमती स्थिर राहण्यास मदत
ऑनलाइन शॉपिंग आणि परदेशातून खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाचे
ही ड्युटी कपात फक्त व्यापारी आयातीपुरती नाही.
परदेशातून प्रवास करताना आणलेल्या वस्तूंवर किंवा आंतरराष्ट्रीय वेबसाइटवरून मागवलेल्या वस्तूंवरही याचा परिणाम होतो. त्यामुळे ई-शॉपर्स आणि परदेशातून गॅझेट खरेदी करणाऱ्यांना थेट फायदा होऊ शकतो.

 रोहित शेट्टीच्या घरावर 4 राउंड गोळीबार:पुण्यातल्या पाच जणांना पकडले

0

मुंबई- हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार झाला आहे. शनिवारी मध्यरात्री रोहितच्या जुहू येथील बिल्डिंगवर हा गोळीबार करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच जुहू पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. या घटनेची गंभीर दखल घेत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला आहे.गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. हा एफआयआर अज्ञात व्यक्तींविरोधात BNS आणि आर्म्स अ‍ॅक्टच्या संबंधित कलमांखाली नोंदवण्यात आलाय. आरोपींचा शोध घेण्यासाठी क्राइम ब्रांचकडून 12 विशेष पथकं तयार करण्यात आली असून, त्यांच्या अटकेसाठी तपास अधिक वेगाने सुरू झाला आणि काही वेळेपूर्वीच पुण्यातल्या ५ जणांना पोलिसांनी याप्रकरणी ताब्यात घेतल्याचे समजले आहे. अमान आनंद मारोटे वय 27 माळआळी कर्वेनगर, आदित्य ज्ञानेश्वर गायकी वय 19 , गल्ली न 2 कर्वेनगर पुणे. सिद्धार्थ दीपक येनपुरे वय 20 त्रिमूर्ती हॉस्पिटल शेजारी फ्लॅट न 7 आम्रपाली बिल्डिंग धायरी पुणे,समर्थ शिवशरण पोमाजी वय 18 रायकर मळा गुलमोहर सोसायटी धायरी आणि स्वप्नील बंडू सकट वय 23 ,रा. धायरी पुणे अशी याप्रकरणी पकडलेल्या तरुणांची नावे आहेत Shubham lonker Aarzo Bishnoi या नावाने सोशल माध्यामातून या हल्ल्याची जबाबदारी घेण्यात आल्याचे वृत्त आहे


मुंबईतील जुहू परिसरात आज (1फेब्रुवारी) बॉलिवूड दिग्दर्शक-निर्माता रोहित शेट्टीच्या निवासस्थानाबाहेर गोळीबाराची घटना घडली. अज्ञात व्यक्तींनी पाच राउंड गोळीबार केल्याची माहिती आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची नोंद नाही.घटनेची माहिती मिळताच जुहू पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि गुन्हे शाखेची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. परिसराची पाहणी करून तपासाला सुरुवात करण्यात आली असून, सर्व शक्यता गृहीत धरून तपास केला जात आहे. गोळीबार करणारे नेमके कोण होते आणि त्यांनी हा हल्ला का केला, याचा शोध पोलीस घ्यायला सुरुवात केली . या घटनेनंतर रोहित शेट्टी यांच्या जुहूतील इमारतीभोवती कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, साक्षीदारांची चौकशीही सुरू आहे. पोलीस अधिक तपशील गोळा करत असून पुढील माहितीची प्रतीक्षा आहे.

आयटी ‘सेफ हार्बर’सेवांसाठी 300 कोटी रुपये वरून 2000 कोटी रुपये इतकी वाढ

नवी दिल्‍ली, 1 फेब्रुवारी 2026

केंद्रीय अर्थ व कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प 2026–2027 सादर केला.

अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी सांगितले की भारत सॉफ्टवेअर विकास सेवा, माहिती तंत्रज्ञान सक्षम सेवा, ज्ञान प्रक्रिया आऊटसोर्सिंग सेवा तसेच सॉफ्टवेअर विकासाशी संबंधित कराराधारित संशोधन व विकास सेवांमध्ये जागतिक स्तरावर आघाडीवर आहे. हे सर्व व्यवसाय विभाग परस्परांशी अत्यंत जोडलेले आहेत. या सर्व सेवांना एकाच “माहिती तंत्रज्ञान सेवा” या श्रेणीखाली समाविष्ट करण्याचा प्रस्ताव आहे आणि सर्वांसाठी समान 15.5 टक्के ‘सेफ हार्बर’ मार्जिन लागू केले जाईल. केंद्रीय अर्थसंकल्प 2026–27 मध्ये माहिती तंत्रज्ञान सेवांसाठी ‘सेफ हार्बर’चा लाभ घेण्याची मर्यादा 300 कोटी रुपये वरून 2000 कोटी रुपये इतकी मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आली आहे.अर्थमंत्र्यांनी पुढे सांगितले की माहिती तंत्रज्ञान सेवांसाठी ‘सेफ हार्बर’ हा कोणत्याही कर अधिकाऱ्यांकडून अर्जाची तपासणी किंवा स्वीकृती आवश्यक नसलेल्या स्वयंचलित, नियमाधारित प्रक्रियेद्वारे मंजूर केला जाईल. एकदा एखाद्या माहिती तंत्रज्ञान सेवा कंपनीने अर्ज केल्यानंतर, तिच्या इच्छेनुसार तोच ‘सेफ हार्बर’ सलग 5 वर्षे लागू ठेवता येईल.

माहिती तंत्रज्ञान सेवा कंपन्या ज्या अ‍ॅडव्हान्स प्रायसिंग अ‍ॅग्रीमेंट (एपीए) करु इच्छितात, त्यांच्यासाठी अर्थमंत्र्यांनी फास्ट ट्रॅक एकतर्फी एपीए प्रक्रिया जाहीर केली असून ती 2 वर्षांच्या आत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. करदात्याच्या विनंतीवर ही मुदत पुढील 6 महिने वाढवता येईल. एपीएमध्ये सहभागी संस्थेला तिच्या संबद्ध संस्थांसाठी उपलब्ध असलेल्या सुधारित विवरणपत्रांच्या (मॉडिफाइड रिटर्न्स) सुविधेचाही विस्तार करण्यात आला आहे.

संरक्षण अर्थसंकल्पात‘फ्युचर फोर्स’चा 7.84 लाख कोटींचा ॲक्शन प्लॅन..गेल्यावार्षाहून १ लाख कोटी अधिक

नवी दिल्ली – देशाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत 2026-27 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री सीतारामन यांनी एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची म्हणजेच 7.84 लाख कोटींचा विक्रमी तरतूद केली आहे. भारताच्या वाढत्या सुरक्षा आव्हानांच्या पार्श्वभूमीवर संरक्षण क्षेत्रासाठी राखीव ठेवलेला यंदाचा बजेट एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने रविवारी 2026-27 या आर्थिक वर्षासाठी संरक्षण खर्चापोटी 7,84,678 कोटी रुपये राखून ठेवले आहेत, तर गेल्या वर्षी यासाठी 6,81,210 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.राष्ट्रीय सुरक्षा, लष्करी आधुनिकीकरण आणि स्वावलंबी भारताचे ध्येय बळकट करण्यासाठी ही वाढ करण्यात आली असून शेजारील देशांसोबतचा तणाव, सीमा परिस्थिती आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ यासारख्या अलीकडील लष्करी कारवायांमुळे मजबूत आणि आधुनिक सशस्त्र दलांची गरज आणखी अधोरेखित झाली आहे.

यंदाचे बजेट विशेषतः भांडवली खर्च, म्हणजेच नवीन शस्त्रे, उपकरणे आणि प्लॅटफॉर्म खरेदीला हायलाइट करते. ड्रोन, लढाऊ विमाने, आधुनिक तोफखाना, नौदल जहाजे आणि सीमावर्ती भागात पायाभूत सुविधांच्या विकासात अधिक गुंतवणूक करण्याचा सरकारचा मानस असून याव्यतिरिक्त भारतीय कंपन्यांकडून 75% पेक्षा जास्त संरक्षण खरेदी वस्तूंचे स्रोत तयार करण्याचे धोरण अवलंबले जात आहे, ज्यामुळे देशांतर्गत संरक्षण उद्योग मजबूत होईल आणि आयातीवरील अवलंबित्व कमी होईल.
दरवर्षी संरक्षण बजेटचा मोठा भाग लष्करी पेन्शन, पगार आणि ऑपरेशनल खर्चासाठी जातो. सैनिकांच्या सुविधा आणि कल्याणात कोणतीही तडजोड केली जाणार नाही असे सरकारचे म्हणणे आहे. येत्या काळात संरक्षण खर्च जीडीपीच्या अंदाजे 2.5% पर्यंत वाढवण्याचा सरकारचा मानस आहे, जो सध्या सुमारे 1.9% आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे भारताची लष्करी ताकद वाढेल आणि भविष्यातील आव्हानांसाठी तयारी होईल, असा संरक्षण सूत्रांचा भरवसा आहे. पण सुधारित अंदाजांसह विविध सैन्यांसाठी (जमीन, समुद्र आणि हवाई) अंतिम खर्च आणि प्रत्यक्ष वाटपाचे चित्र स्पष्ट होईल. 2026-27 च्या संरक्षण बजेटवरून असे दिसून येते की सरकार राष्ट्रीय सुरक्षा, स्वावलंबी संरक्षण उत्पादन आणि लष्करी तयारीबद्दल गंभीर आहे.

यावेळी सरकारने संरक्षण क्षेत्रासाठी पूर्वीपेक्षा अधिक मजबूत तयारी दर्शविली असताना एकूण संरक्षण बजेट अंदाजे 7.8 लाख कोटी पर्यंत वाढवण्यात आले आहे, जे मागील वर्षाच्या तुलनेत अंदाजे 1415 टक्के जास्त आहे. लष्करी आधुनिकीकरणावर विशेष लक्ष केंद्रित करून भांडवली बजेटमध्ये लक्षणीय वाढ करण्यात आली जे अंदाजे 1.80 लाख कोटींवरून 2.19 लाख कोटींपर्यंत वाढवले आहे. हा पैसा आधुनिक शस्त्रे, अत्याधुनिक उपकरणे, नवीन तंत्रज्ञान खरेदी करण्यासाठी आणि भविष्यातील युद्ध गरजा पूर्ण करण्यासाठी वापरली जाईल.

लढाऊ विमानांपासून ते ड्रोन तंत्रज्ञानापर्यंत अर्थसंकल्पातील वाढीव तरतुदीअल एक प्रमुख उद्देश स्वावलंबी भारताला बळकटी देण्याचा आहे. सरकार स्वदेशी संरक्षण उत्पादनाला प्रोत्साहन, देशांतर्गत कंपन्यांना संधी आणि संरक्षण निर्यातीला नवीन उंचीवर नेण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. वाढत्या जागतिक अस्थिरतेच्या काळात ही वाढ झाली आहे. रशिया-युक्रेन युद्ध, मध्य पूर्वेतील तणाव, चीनची आक्रमक रणनीती आणि पाकिस्तानसोबतच्या सीमा वादामुळे सुरक्षा चिंता वाढल्या आहेत परिणामी भारताने ड्रोन तंत्रज्ञान, क्षेपणास्त्र प्रणाली, आधुनिक लढाऊ विमाने आणि सायबर सुरक्षेत गुंतवणूक करणे अत्यंत महत्त्वाचे बनले आहे.

सरकारकडे सध्या अनेक प्रमुख संरक्षण कार्यक्रम अंतिम टप्प्यात आहेत किंवा अंमलात आणण्याच्या मार्गावर आहेत. अशा स्थितीत, नव्या अर्थसंकल्पातील तरतुदी या योजनांना गती देतील आणि सशस्त्र दलांच्या क्षमतांमध्ये लक्षणीय वाढ करेल. सागरी सुरक्षा मजबूत करण्यासाठी, नौदल आपल्या ताफ्यात अतिरिक्त अत्याधुनिक लढाऊ विमाने जोडण्याची तयारी करत आहे. विमानवाहू जहाजांमधून चालवण्यास सक्षम असलेल्या नवीन लढाऊ विमानांसाठी करार सुरू आहे, ज्यामुळे भारताची सागरी क्षमता आणखी वाढेल. पाण्याखालील क्षमता वाढवण्यासाठी नवीन पिढीच्या स्टेल्थ पाणबुड्यांमध्ये महत्त्वपूर्ण गुंतवणूक केली जात असून आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज, या पाणबुड्या पृष्ठभागावर न येता लांब अंतर चालवू शकतील, ज्यामुळे शत्रूवर लक्ष ठेवणे आणि रोखणे सोपे होईल.

आधुनिक युद्धाच्या गरजा लक्षात घेता ड्रोन आणि मानवरहित प्रणालींवर लक्षणीय भर दिला जात आहे. उच्च-उंचीचे ड्रोन, स्वदेशी यूएव्ही आणि ड्रोन प्रति-उपक्रमांना प्राधान्य दिले जात आहे, कारण ते अलिकडच्या संघर्षांमध्ये निर्णायक सिद्ध झाले आहेत. याशिवाय स्वदेशी लढाऊ विमाने, हल्ला हेलिकॉप्टर, क्षेपणास्त्र प्रणाली, हवाई संरक्षण प्रणाली आणि प्रगत रडारशी संबंधित असंख्य प्रकल्प देखील प्रगतीपथावर आहेत. या सर्व कार्यक्रमांमध्ये देशांतर्गत संरक्षण कंपन्यांचा सहभाग वाढवला जात आहे, ज्यामुळे केवळ लष्करच बळकट होणार नाही तर देशाच्या संरक्षण उद्योगाला नवीन उंचीवर नेईल.

बजेट 2026, स्वस्त-महाग- कर्करोगाची 17 औषधे स्वस्त:EV, सौर पॅनेलचे दर कमी होतील; वैयक्तिक वापराच्या परदेशी वस्तूही स्वस्त

प्रश्न 1: जर बजेटमध्ये आज ड्युटी बदलली, तर दुकानात वस्तू उद्यापासूनच स्वस्त मिळतील का?

उत्तर: नाही. हा सर्वात मोठा गैरसमज आहे. अर्थसंकल्पात कर बदलण्याचा परिणाम ‘नवीन स्टॉक’वर होतो. जो माल दुकानदाराच्या शेल्फवर आधीपासून ठेवलेला आहे, तो जुन्या किमतीतच विकला जाईल. अर्थसंकल्पाचा परिणाम दिसण्यासाठी वेळ लागतो. तसेच, किमती कमी होतील की वाढतील हे निश्चित नसते. हे पूर्णपणे कंपन्यांवर अवलंबून असते.अनेक वेळा सरकार शुल्क कमी करते, पण कंपन्या आपला नफा वाढवण्यासाठी किमती कमी करत नाहीत. त्याचप्रमाणे, जर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा माल महाग झाला, तर कर कमी होऊनही किमती स्थिर राहू शकतात किंवा वाढूही शकतात. म्हणजे, काहीही निश्चित नसते.

आज, आपल्या ताटातील भाज्यांपासून ते हातातल्या स्मार्टफोनपर्यंत, बहुतेक गोष्टींचे दर जीएसटी कौन्सिल ठरवते. अर्थसंकल्पात तर फक्त आयात शुल्काच्या कमी-जास्त होण्यामुळे वस्तूंच्या किमती थोड्याफार वर-खाली होतात. या अर्थसंकल्पातून काय स्वस्त झाले आणि काय महाग झाले ते पहा …

  1. कर्करोगाची औषधे स्वस्त: 17 जीवनरक्षक औषधांवरील कस्टम ड्युटी रद्द

सरकारने कर्करोगाच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या 17 औषधांवरील मूलभूत कस्टम ड्युटी रद्द केली आहे. याव्यतिरिक्त, 7 दुर्मिळ रोगांच्या उपचारांसाठी परदेशातून मागवल्या जाणाऱ्या औषधांवर आणि विशेष खाद्यपदार्थांवरही आता कोणताही कर लागणार नाही. यामुळे ज्या कुटुंबांना उपचारांसाठी महागड्या परदेशी औषधांवर अवलंबून राहावे लागते, त्यांना मोठी आर्थिक मदत मिळेल.

  1. मायक्रोवेव्ह ओव्हन स्वस्त: सुट्या भागांवरील ड्युटी कमी झाली, घरगुती उत्पादन वाढेल

घरगुती उत्पादन वाढवण्यासाठी सरकारने इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात काही महत्त्वाचे बदल केले आहेत. आता मायक्रोवेव्ह ओव्हन बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विशिष्ट भागांवरील कस्टम ड्युटी कमी करण्यात आली आहे. यामुळे येत्या काळात मायक्रोवेव्हच्या किमती कमी होऊ शकतात. ग्राहक इलेक्ट्रॉनिक्सच्या बाबतीत भारताने जगाचे केंद्र बनावे, हे सरकारचे उद्दिष्ट आहे.

  1. ईव्ही बॅटरी आणि सोलर पॅनल स्वस्त: ते बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल करमुक्त झाला

ऊर्जा संक्रमणाचा विचार करता, सरकारने लिथियम-आयन बॅटरी बनवणाऱ्या यंत्रसामग्रीवर (कॅपिटल गुड्स) मिळणाऱ्या कर सवलतीची व्याप्ती वाढवली आहे. आता बॅटरी ऊर्जा साठवणूक प्रणालीसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंवरही शुल्क लागणार नाही. तसेच, सोलर ग्लास बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘सोडियम अँटीमोनेट’वरील शुल्कही हटवण्यात आले आहे, ज्यामुळे देशात सोलर पॅनल बनवणे स्वस्त होईल.

  1. सी-फूड, बूट, कपडे स्वस्त होण्याची शक्यता: निर्यात वाढवण्यासाठी कच्च्या मालावर सूट

निर्यात वाढवण्यासाठी सरकारने सागरी उत्पादने, चामडे आणि वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी घोषणा केल्या आहेत.

सी-फूड निर्यातीसाठी शुल्कमुक्त इनपुटची मर्यादा 1% वरून वाढवून 3% करण्यात आली आहे.
चामड्याच्या आणि सिंथेटिक शूजसोबतच आता ‘शू अपर्स’च्या निर्यातीवरही कर सवलत मिळेल.
निर्यातीचा माल तयार करण्याच्या वेळेची मर्यादा 6 महिन्यांवरून वाढवून 1 वर्ष करण्यात आली आहे.

  1. हवाई प्रवास आणि विमानाची देखभाल स्वस्त: सुट्या भागांवरील कस्टम ड्युटी हटवली

नागरी विमान वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी विमान बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सुट्या भागांवर आणि घटकांवर कस्टम ड्युटी हटवण्यात आली आहे. संरक्षण क्षेत्रातही विमानांच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी (MRO) मागवल्या जाणाऱ्या कच्च्या मालावर आता कर भरावा लागणार नाही. यामुळे देशात विमान बनवण्याचा आणि त्यांची दुरुस्ती करण्याचा खर्च कमी होईल.

  1. परदेशातून मागवलेल्या वस्तू स्वस्त होतील: वैयक्तिक वापराच्या वस्तूंवरील कर कमी झाला

परदेशातून आपल्या वैयक्तिक वापरासाठी वस्तू मागवणाऱ्यांसाठीही एक चांगली बातमी आहे. सरकारने अशा वस्तूंवर लागणारा कराचा दर 20% वरून थेट 10% पर्यंत कमी केला आहे. याव्यतिरिक्त, परदेशातून परतणाऱ्या प्रवाशांसाठी सामान (बॅगेज) क्लिअरन्सचे नियमही सोपे केले जातील आणि मोफत भत्त्याची (फ्री अलाउंस) मर्यादा वाढवली जाईल.

GST कौन्सिल ठरवते बहुतांश वस्तूंच्या किमती

आज तुमच्या ताटातील भाजीपासून ते तुमच्या हातातील स्मार्टफोनपर्यंत, बहुतांश वस्तूंच्या किमती GST कौन्सिल ठरवते, वित्तमंत्री नव्हे. 22 सप्टेंबर 2025 पासून GST चे चार स्लॅब कमी करून दोन केले होते.

आता केवळ 5% आणि 18% च्या स्लॅबमध्ये GST लागतो. GST कौन्सिलच्या 56व्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात आला होता. यामुळे तूप, पनीर खरेदी करण्यापासून ते कार आणि AC खरेदी करणेही स्वस्त झाले आहे.