Home Blog Page 122

अंडर ग्राऊंन्ड केबल चोरी करणा-या टोळीला केले जेरबंद

महापालीकेचे मजुर वापरत असलेले हेल्मेट, रिफलेक्टींग जॅकेट, लाईट बॅटन, बॅरीकेटस चा वापर करून चोऱ्या

पुणे- दिल्लीतून येऊन पुण्यातील अंडर ग्राऊंन्ड केबल चोरी करणाऱ्या टोळीला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या त्यांना मदत करणाऱ्या पुण्यातील एका भामट्याला देखील पोलिसांनी अटक केली आहे .त्यांच्याकडून २९ लाखाचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे.

या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दि. १७/०९/२०२५ रोजी सायंकाळी १७/३० वा ते दि.१८/०९/२०२५ रोजी सकाळी १०/३० वा.चे दरम्यान परिहार चौक, औंध पुणे येथील चेंबरमधुन बी.एस.एन.एल. ऑफीसची अंन्डर ग्राऊंन्ड असेलली फिनोलॅक्स कंपनीची २०० मीटर लांबीची काळ्या रंगाची व त्यामध्ये कॉपर असलेली केबल ही कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरी करुन नेली, म्हणुन फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल आहे.
दाखल गुन्हयाचा पुढील तपास हा वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अधिकारी व अंमलदार करीत असताना यातील आरोपीची गोपनीय बातमीदारामार्फत माहिती घेवुन शोध घेत असताना यातील आरोपी हे संगमवाडी पुणे येथे असल्याची माहिती प्राप्त झाल्याने त्यांचा शोध घेवुन १) नसरुल बिलाल मोहम्मद, वय २३ वर्ष, रा.१५७ हरिजन कॅम्प मंडावली फाजलपुर, लक्ष्मी नगर, नवी दिल्ली २) संजीव कुमार श्रीसेवाराम वर्मा, वय ३७ वर्ष, रा. साऊथ गणेशनगर नवी दिल्ली ३) फईम अहमद शरीफ अहमद शेख, वय ४२ वर्ष, रा. कलवड वस्ती, लोहगाव पुणे ४) वारीस फकीर मोहम्मद, वय ३५ वर्ष, रा. हरिजन कॅम्प मंडावली, फाजलपुर लक्ष्मी नगर, नवी दिल्ली यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांचेकडे अधिक तपास केला असता त्यांनी दाखल गुन्हा हा त्यांचे इतर दोन साथीदार यांचेसह केल्याचे कबुली दिल्याने नमुद आरोपी यांना दाखल गुन्हयात अटक करुन त्यांचेकडुन गुन्हा करताना वापरलेला एक टेम्पो, एक रिक्षा, एक क्रेन व चोरीस गेला मुददेमाल त्यासोबत महापालीकेचे मजुर वापर असलेले हेल्मेट, रिफलेक्टींग जॅकेट, लाईट बॅटन, बॅरीकेटस, हातोडा, करवत, पहार, लोखंडी सत्तुर व इतर वस्तु असा एकुण २९,३५,७५०/-रु. किं. चा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे. दाखल गुन्हयाचा अधिक तपास हा सहा. पोलीस निरीक्षक पोटे हे करीत आहेत.
तसेच सदरची कामगिरी ही अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर मनोज पाटील, मा.पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ४ पुणे शहर सोमय मुंडे, सहायक पोलीस आयुक्त, खडक विभाग पुणे शहर विठठल दबडे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती आश्विनी ननावरे यांचे सुचनेप्रमाणे तपास पथकाचे अधिकारी, सहा. पोलीस निरीक्षक पोटे, पोलीस अंमलदार श्रीधर शिर्के, इरफान मोमीन, श्रीकांत वाघवले, बाबुलाल तांदळे, बाबासाहेब दांगडे, वाघेश कांबळे व तुषार गिरंगे यांनी केली आहे.

भारती विद्यापीठ पूना कॉलेज ऑफ फार्मसीचे तीन संशोधक जागतिक यादीत

पुणे : 

भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय पुना कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयाचे तीन जण स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीने जाहीर केलेल्या जागतिक दोन टक्के संशोधकांच्या या वर्षीच्या यादीत  झळकले आहेत.प्राचार्य डॉ.आत्माराम पवार, उपप्राचार्य डॉ.वर्षा पोखरकर,डॉ.अमरजीतसिंग राजपूत यांचा या जागतिक यादीमध्ये समावेश झाला आहे. स्टॅनफर्ड विद्यापीठ दरवर्षी जगातील सर्वोत्तम २ टक्के शास्त्रज्ञांची यादी प्रसिद्ध करते, जी एल्सविअर (Elsevier) या प्रकाशन संस्थेच्या सहकार्याने तयार केली जाते.या यादीत २ लाखांहून अधिक शास्त्रज्ञांचा समावेश असून संशोधनावर आधारित प्रभाव, उद्धरणे आणि  एच इंडेक्स(H-Index) यांचा विचार केला जातो. जॉन इओनिडिस व त्यांच्या सहकाऱ्यांनी तयार केलेल्या मानक पद्धतीने हे मूल्यांकन केले जाते आणि स्कोपस(Scopus) डेटाबेसचा आधार घेतला जातो.ही यादी  संपूर्ण कारकिर्दीतील प्रभाव आणि एका वर्षातील कामगिरी या दोन भागांत प्रसिद्ध केली जाते.त्यामुळे या यादीतील समावेश हा सन्मान समजला जातो. या यशाबद्दल कुलपती डॉ.शिवाजीराव कदम, संस्थेचे कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम ,कुलगुरू डॉ. विवेक सावजी यांनी अभिनंदन केले.

नुकतेच भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाचे घटक असलेल्या पूना कॉलेज ऑफ फार्मसीने भारतातील फार्मसी संस्थांमध्ये राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ) २०२५ मध्ये ३४ वे स्थान मिळवले आहे.महाविद्यालयlमध्ये ४५००० चौरस मीटर क्षेत्रफळाचा संशोधन विभाग आहे, जो अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज आहे आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय १६०० शोधनिबंध, १५ मंजूर पेटेंट्स, जवळपास २० औषध कंपन्यांसाठी सल्ला व प्रकल्प या महाविद्यालयातून पूर्ण केले आहेत. २१ कोटी रिसर्च ग्रँट या महाविद्यालयाच्या नावावर आहेत.महाविद्यालयास  चौथ्या वेळा एनबी ए  व नॅक द्वारे A++ ग्रेडसह मानांकन प्राप्त झाले आहे.  

राज्यातील साखर कारखान्यानी शेतकऱ्यांच्या उसाला अधिकाधिक दर देण्याचा प्रयत्न करावा -कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

कृषीमंत्र्यांच्या हस्ते द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनच्या ७० व्या वार्षिक अधिवेशन आणि साखर प्रदर्शनाच्या उद्घाटन

पुणे, दि.२२ :: देशात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाला उच्चांकी दर देणाऱ्या साखर कारखान्यांच्या कामकाजाची माहिती घेऊन इतर साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचा उसाला अधिकाधिक दर देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाला भाव, कामगारांना वेळेत वेतन, बोनस देणाऱ्या साखर कारखान्यांना राज्य शासनाच्यावतीने सहकार्य येईल, असे प्रतिपादन राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनच्या ७० व्या वार्षिक अधिवेशन आणि साखर प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार अभिजित पाटील, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकचे प्रशासक विद्याधर अनास्कर, सहकार आयुक्त दीपक तावरे, यशदाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. शेखर गायकवाड,द वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बी.बी. ठोंबरे, द साऊथ इंडियन शुगरकेन अँड शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष एन. चिनप्पन, द डेक्कन शुगर टेकनोलॉजिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष एस. बी. भड, उपाध्यक्ष सोहन शिरगावकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

श्री. भरणे म्हणाले, साखर व्यवसायात काम करीत असताना विविध अडअडचणी येत असतात, या अडचणीवर मात करण्याकरिता उपाययोजना केल्या पाहिजे. या क्षेत्राच्या प्रगतीकरिता नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. नवीन वाण विकसित आणि त्या माध्यमातून अधिकाधिक ऊस उत्पादन तसेच साखरेचा उतारा वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, या सर्व बाबींचा शेतकऱ्यांना लाभ झाला पाहिजे, यादृष्टीने असोसिएशनने मार्गदर्शन केले पाहिजे.

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई देणार

राज्यात अतिवृष्टीमुळे ६६ लाख एकर क्षेत्राचे नुकसान झाले असून या नुकसानीचे प्रशासनाच्यावतीने पंचनामे करण्यात येत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनो घाबरू नका, या संकटाच्याकाळात राज्य शासन आपल्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहे, येत्या दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई देण्यात येईल,असे आश्वासन श्री. भरणे यांनी दिले.

द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन

जागतिक पातळीवर असलेल्या नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर साखर व्यवसायात झाला पाहिजे, अधिकाधिक ऊसाचे उत्पादन आणि बाजारभाव मिळण्याच्यादृष्टीने लालचंद हिराचंद यांनी द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनची स्थापना केली. या असोसिएशनच्या माध्यमातून राज्यासह इतर राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी आणि कारखानदारांना मार्गदर्शन होत असल्याबद्दल श्री. भरणे यांनी असोसिएशनचे अभिनंदन केले.

साखर उत्पादनासोबतच उपपदार्थाची निर्मिती काळाची गरज-बाबसाहेब पाटील

श्री. पाटील म्हणाले, भारत देश हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो, साखर हा राज्यातील मोठा उद्योग आहे. देशाच्या प्रगतीत साखर उद्योगाच्या माध्यमातून खूप मोठी आर्थिक क्रांती झाली आहे. साखर कारखान्यांनी एफआरपी आणि एमएसपी यांचा मेळ घालून व्यवसाय करावा. संचालक मंडळाने निर्णय घेतांना कारखान्याची आर्थिक परिस्थिती, उत्पादन, कामगाराचे वेतन, मुकादम, ऊसतोड कामगार, ऊस वाहतूक, उसदर आदी घटक विचारात घेऊन निर्णय घेतले पाहिजे. साखर कारखान्यांना येणाऱ्या अडअडचणी सोडवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करुया.

उत्कृष्ट काम करणाऱ्या साखर कारखान्यांच्या इतर कारखान्यांनी अनुकरण करत पारदर्शकपणे कारभार केला पाहिजे तसेच शेतकऱ्यांचेहीतही जपले पाहिजे. साखर उत्पादनासोबतच पेट्रोल, विमान इंधन असे विविध उपपदार्थ निर्माण करणे ही काळाची गरज आहे, याकरीता राज्य शासनाच्यावतीने सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन श्री. पाटील म्हणाले.

साखर आणि संबंधित उद्योगाच्या सर्व पैलूंचा समावेश असलेली कार्यक्षमता आणि उत्पादकता यामध्ये सुधारणा करण्याकरिता समर्पित असलेली द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन आहे. ७० व्या वार्षिक अधिवेशनाच्या माध्यमातून साखर कारखान्यांकरिता विविध कल्पना, प्रक्रिया आणि तंत्रज्ञानाचा विकास होईल आणि यामाध्यमातून रासायनिक आणि प्रक्रिया घटकात खर्च कमी होण्यास मदत होईल. या अधिवेशनात नवीन तंत्रज्ञान आणि संशोधनाचे आदान प्रदान होईल, असा विश्वास श्री. पाटील यांनी व्यक्त केला.

श्री. अनास्कर म्हणाले, साखर कारखान्याकरिता आर्थिक नियोजन महत्वपूर्ण असल्याने कारखान्यांनी व्यावसायिक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून वाटचाल केली पाहिजे, याबाबत असोसिएशनने तांत्रिक बाबीसोबतच आर्थिक नियोजनाबाबतही आगामी काळात मार्गदर्शन केले पाहिजे, याकरीता सहकारी बँकेच्यावतीने सहकार्य करण्यात येईल, असेही श्री. अनास्कर म्हणाले.

कार्यक्रमापूर्वी मंत्री श्री.भरणे आणि श्री. पाटील यांच्यासह मान्यवरांनी साखर प्रदर्शनाअंतर्गत असलेल्या दालनाला भेट देऊन तंत्रज्ञान, उत्पादन आदी बाबी विषयी माहिती घेतली.

यावेळी श्री. भरणे यांच्या हस्ते ७० व्या वार्षिक अधिवेशनानिमित्त कार्यवृत्त पुस्तिकेचे (प्रोसीडिंग्ज बुक) प्रकाशन यावेळी करण्यात आले.

मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित

श्री. भरणे यांच्या हस्ते द साऊथ इंडियन शुगरकेन अँड शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनचा साखर उद्योग गौरव पुरस्कार, सर्वोत्तम साखर कारखाना पुरस्कार, तांत्रिक उत्कृष्टता पुरस्कार, औद्योगिक उत्कृष्टता पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार आणि उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांना पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.
श्री. भड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल रिसर्च सेंटरचे बुधवारी (ता. २४) शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन

‘भारतीय संविधान: संसदीय लोकशाहीपुढील आव्हाने’ विषयावर परिसंवाद; बाबा आढाव अध्यक्षस्थानी

ॲड. जयदेव गायकवाड यांची माहिती; सत्यशोधक समाजाच्या १५२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजन

पुणे: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल रिसर्च सेंटरचे उद्घाटन माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांच्या हस्ते, समता समाजवादी चळवळीचे मार्गदर्शक व ज्येष्ठ विचारवंत बाबा आढाव यांच्या अध्यक्षाखाली होणार आहे. हा उद्घाटन समारंभ येत्या बुधवारी (ता. २४) सायंकाळी ५.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे होणार आहे, अशी माहिती ॲड. जयदेव गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, सेंटरचे उपाध्यक्ष विजय जाधव, दत्तात्रय गायकवाड, दीपक म्हस्के आदी उपस्थित होते.

ॲड. जयदेव गायकवाड म्हणाले, “या उ‌द्घाटन समारंभाचा एक भाग म्हणून भारतीय संविधान: संसदीय लोकशाहीपुढील आव्हाने’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले आहे. ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, राजकीय अभ्यासक प्रा. डॉ. सुहास पळशीकर, महात्मा फुले समता प्रतिष्ठानच्या सरचिटणीस अ‍ॅड. शारदा वाडेकर यात सहभागी होणार आहेत.”

“बाबासाहेबांनी १९४६ ते १९४८ या तीन वर्षांच्या काळात आपल्या प्रकृतीची तमा न बाळगता जे भारतीय संविधान निर्माण केले आणि या देशातील लोकशाहीला बळ देणारा सामाजिक न्यायाचा पाया रचला. त्या संविधानावर आज काही फॅसिझमवादी शक्ती आक्रमण करू लागल्या आहेत. आजचे हे वर्तमान लक्षात घेता या सोशल सेंटरच्या माध्यमातून जिल्हा स्तरावर संविधान संरक्षण समिती स्थापन करण्यात येणार आहे,” असे अ‍ॅड. जयदेव गायकवाड यांनी सांगितले.

“डॉ. आंबेडकर सोशल रिसर्च सेंटरच्या माध्यमातून हा एक प्रमुख उपक्रम टप्प्याटप्प्याने राबवण्याचा आमचा मानस आहे. यासाठी जो थिंकटॅक आम्ही उभा करीत आहोत. त्याचे मार्गदर्शन या उपक्रमात प्राधान्याने देण्यात येईल. यात आपण सर्वांनी सहभागी व्हावे,” असे अरुण खोरे यांनी नमूद केले.

संविधानाची नैतिकता अधोरेखित करण्याचा आमच्या सामाजिक अभ्यास केंद्राचा प्रयत्न राहणार आहे. संयुक्त राष्ट्रसंघ (युनो) आणि बाबासाहेबांनी उच्च शिक्षण घेतले ते कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थांशी समन्वय साधून अभ्यास प्रकल्पासंदर्भात चर्चा, संवाद करणे, यावर भर दिला जाणार आहे, असे विजय जाधव यांनी सांगितले.

——————————
रिसर्च सेंटरची वैशिष्ट्ये:
– डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार व प्रचार
– बाबासाहेबांच्या स्मरणार्थ समता व्याख्यानमाला
– आंबेडकर जयंतीनिमित्त अनियतकालिक सुरु करणे
– आंबेडकरांसंबंधी सुरु असलेल्या अभ्यास व संशोधनावर प्रकल्प निर्मिती
– चळवळीतील तरुण कार्यकर्त्यांना एकत्र करून त्यांना प्रशिक्षण देणे
– आंबेडकरी विचारांचा थिंकटॅंक उभारणे

– विविध संस्था-संघटनांशी संपर्क आणि समन्वय
– विविध जाती-जमातीच्या समकालीन प्रश्नांवर संशोधन प्रकल्प राबवणे

सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरात पारंपरिक पद्धतीने घटस्थापना 

श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबागतर्फे आयोजित ‘सार्वजनिक नवरात्रोत्सव’ ; धार्मिक विधींसह मान्यवरांची उपस्थिती 

पुणे : सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिराच्या वतीने आयोजित सार्वजनिक नवरात्रोत्सवात पारंपरिक पद्धतीने सांगली संस्थानचे राजे गोपालराजे पटवर्धन आणि पद्माराजे गोपालराजे पटवर्धन यांच्या हस्ते घटस्थापना झाली. धार्मिक कार्यक्रमांसोबतच सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम देखील उत्सवात आयोजित करण्यात आले आहेत. 

घटस्थापनेला ट्रस्टचे प्रमुख संस्थापक आणि विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त ॲड. प्रताप परदेशी, डॉ. तृप्ती अग्रवाल, भरत अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर आदी उपस्थित होते. मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली असून त्रिशक्ती महालामध्ये देवी विराजमान झाली आहे. 

धार्मिकतेला सामाजिकतेची जोड देणारा, समाजातील सर्व घटकांना सामावून घेणारा सार्वजनिक नवरात्रोत्सव महालक्ष्मी मंदिरात दर वर्षीप्रमाणे यंदाही साजरा होत आहे. याशिवाय श्रीसूक्त अभिषेक, श्री विष्णु सहस्रनाम पाठ, महालक्ष्मी महायाग, महाआरती असे धार्मिक कार्यक्रम देखील मंदिरामध्ये होणार आहेत. सर्व धार्मिक कार्यक्रमांचे पौरोहित्य मिलिंद राहूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

सामूहिक श्रीसूक्त पठण कार्यक्रम 

नवरात्राच्या दुसऱ्या दिवशी दि. २३ सप्टेंबर रोजी सकाळी ५ वाजता सामूहिक श्रीसूक्त पठण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. तर, सायंकाळी ५.३० वाजता लेखिका/ कवयित्री सन्मान सोहळा आणि डॉ. कल्याणी हर्डीकर यांच्या ‘जागर विश्वजननीचा’ या पुस्तकाचे प्रकाशन मूर्तिशास्त्र अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. मंजिरी भालेराव यांच्या शुभहस्ते होणार आहे. 

गुजरातमधून आणलेली 51 लाख रुपयांची रोकड पुणे रेल्वे स्थानकावर जप्त!

0

पुणे : पुणे रेल्वे स्थानकावर बॅग स्कॅनर मध्ये तपासणी करताना एका प्रवाशाकडे तब्बल 51 लाख रुपयांची रोकड सापडली असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे . रोकड जप्त केल्यानंतर आरोपीला पुढील तपासासाठी आयकर विभागाकडे देण्यात आले आहे.संबंधित तरुण हा गुजरात राज्यातील असून त्याच्या दोन बॅगेमध्ये पैसे भरलेले होते. रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) संबंधित तरुणाला ताब्यात घेतले असून ही रोकड जप्त करून आयकर विभागाला याची माहिती देण्यात आली आहे फरीद खान जफर उल्लाखान मोगल ( वय 24 राहणार मेहसाणा गुजरात) असे ताब्यात घेण्यात आलेल्याचे नाव आहे .आरपीएफ ने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी 20 सप्टेंबर अम्ब्रेला गेट समोरील सरकता जिना चढून पादचारी पुलावर बॅगेज स्कॅनर मशीन द्वारे प्रवाशांच्या सामानाची तपासणी सुरू होती.

यावेळी फरीद खान याच्या जांभळ्या रंगाच्या बॅगेत सुमारे 22 लाख रुपये तर लाल रंगाच्या बॅगेत सुमारे 29 लाख रुपये आढळले . आरपीएफ निरीक्षक सुनील कुमार यादव यांच्या नेतृत्वाखाली एएसआय प्रदीप चौधरी ,एएसआय संतोष जायभाये , एएसआय विलास दराडे संतोष पवार कृष्णा भांगे यांनीही कारवाई केली. रोकड जप्त केल्यानंतर आरोपीला पुढील तपासासाठी आयकर विभागाकडे देण्यात आले आहे

चतुःशृंगी मंदिरात घटस्थापना

पुणे-श्री देवी चतुःशृंगी मंदिर ट्रस्टतर्फे यावर्षीचा शारदीय नवरात्रोत्सव पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहात सुरू झाला.
नवरात्रोत्सवाची घटस्थापना सकाळी नऊ वाजता मंदिर व्यवस्थापक विश्वस्त रविंद्र अनगळ यांच्या हस्ते करण्यात आली. त्या नंतर अभिषेक, रुद्राभिषेक, महावस्त्र अर्पण आणि महापूजा आणि महाआरती करण्यात आली. या सर्व पूजाविधीचे पौरोहित्य श्रीराम नारायण कानडे गुरूजी यांनी केले.

आज पहाटेपासून भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. मागील शंभर वर्षांपासून चालत आलेली परंपरा कायम ठेवत, मंदिर ट्रस्टने भाविकांसाठी विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांची या वर्षी ही आखणी केली आहे.

रस्ते दुरूस्तीच्या कामातील मलिदा नेमकं खातंय तरी कोण?

रस्त्याच्या कामाबाबत श्वेतपत्रिका काढण्याची ‘आपले पुणे, आपला परिसर’ची पथविभागप्रमुख पावसकरांकडे मागणी

पुणे : पुणे शहरात रस्त्यांवर खड्ड्यांमुळे पुणेकर त्रासले आहेत. दररोज मोठ्या खड्ड्यांमधून जीव घेणा प्रवास वाहन चालकांना करावा लागत आहे. अवघ्या अर्धा इंचाच्या खड्ड्यामुळे वाहन चालकाला जीव गमवावा लागला आहे. परंतु त्यानंतरही पुणे महापालिकेला जाग येत नसल्याचे चित्र आहे. सातत्याने रस्त्याची कामे काढली जावून पुणेकरांचे कररुपी पैसे खर्च केले जात आहे. त्यामुळे पुणे शहरातील रस्ते कामांबाबत गेल्या काही वर्षांपासून एक गंभीर प्रश्न नागरिकांसमोर आहे. नागरिकांच्या करातून कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही रस्ते प्रश्न सुटण्याऐवजी तिच तिच कामे नावे बदलून पुन्हा केली जात आहेत, असल्याचा आरोप ‘आपला परिसर’ संस्थेने केला आहे.

शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची महती राष्ट्रपती कार्यालयापर्यंत पोहचली आहे. राष्ट्रपती कार्यालयाकडून नाराजी व्यक्त केल्यानंतर महापालिकेने खड्डे बुजविण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. त्यानंतर रस्त्यांवर करण्यात आलेल्या पॅच वर्कमुळे वाहन चालकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी पुढे आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पॅच वर्क काढून सरसकट रस्ते तयार करण्यासाठी अधिक आर्थिक तरतूद करण्याचे आदेश दिले होत. त्यानंतर महापालिकेने आर्थिक तरतूद करुन आदर्श रस्त्यासह खड्डे मुक्त रस्ते तयार करण्याचे काम हाती घेतले होते. परंतु आदर्श असलेले खड्डे मुक्त रस्ते आहेत तरी कुठे असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे.

सार्वजनिक पैशांचा अपव्यय थांबवण्यासाठी व पारदर्शक कारभार महापालिकेच्या पथ विभागाने करावा, तसेच प्रशासकराज असताना पथ विभागाने जी कुठली काम केली त्या सर्व कामांची एक “श्वेतपत्रिका” तयार करावी अशी मागणी आपले पुणे आणि आपला परिसरचे आणि माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी, माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी केली आहे. यासोबतच या “स्पर्धेच्या” मार्गावर “दुचाकी” वरून फिरून काय वस्तुस्थिती आहे हे पाहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

संस्थेने उपस्थित केलेले मुद्दे…..

१. वारंवार दुरुस्ती व प्रकल्पांची नावे बदलणे : २०२२-२३ मध्ये २५० कोटींच्या पॅकेज कामांतून रस्ते दुरुस्ती झाली. २०२३-२४ मध्ये जी-२० परिषद निमित्ताने शहरातील प्रमुख रस्ते दुरुस्त करण्यात आले. २०२४-२५ व २०२५-२६ मध्ये ‘आदर्श रस्ते प्रकल्प’ या नावाखाली दोन वर्षांपासून प्रमुख १५ रस्त्यावर रोड फर्निचर व इतर कामे केली जात आहेत. याशिवाय दरवर्षी मोबाईल व्हॅनद्वारे रिस्टेटमेंट व रोड मेंटेनन्ससाठी सुमारे ४० कोटी रुपयांचा खर्च केला जातो. प्रश्न असा की, नावे बदलून तीच तीच कामे का केली जात आहेत? नागरिकांच्या पैशांचा अपव्यय थांबवणे आवश्यक आहे.

२. डांबर प्लांटचा उपयोग : महापालिकेचा स्वतःचा डांबर प्लांट वर्षभर चालू आहे, अगदी पावसाळ्यात सुद्धा केला जातो. रोज सुमारे ४५० टन माल तयार होतो. हा माल १५ वॉर्ड ऑफिसमध्ये किती प्रमाणात दिला जातो व कोणत्या रस्त्यांवर वापरला जातो, याची माहिती आजपर्यंत पारदर्शकपणे देण्यात आलेली नाही.

३. पालिकेची यंत्रणा व कर्मचारी : महापालिकेच्या पथ कोठ्यांमध्ये आधीपासूनच कायम सेवक, बिगारी, शेवाळेवाले, रोलर, डंपर, पेव्हर उपलब्ध आहेत. मग अशी पूर्ण यंत्रणा असूनही पुन्हा पुन्हा बाहेरून ठेकेदारांना कामे देण्यासाठी नवीन टेंडर काढायची गरज का भासते? हे नागरिकांसाठी मोठे कोडे आहे.

संस्थेच्या मागण्या….

१) २०२२ पासून आजवर झालेल्या रस्ते दुरुस्ती, रिस्टेटमेंट व आदर्श रस्ते प्रकल्पांतर्गत झालेल्या सर्व कामांची वर्षनिहाय व रस्त्यानिहाय सविस्तर माहिती प्रसिद्ध करावी.
२) डांबर प्लांटमधून रोज किती उत्पादन होते, ते किती व कुठे वापरले जाते, याची पारदर्शक नोंद व तपशील जाहीर करावा.
३) पथ कोठ्यांतील कर्मचारी व यंत्रणा प्रत्यक्षात किती काम करत आहेत, याचा ऑडिट अहवाल सादर करावा.
४) पुन्हा पुन्हा टेंडर काढून निधी खर्च करण्यामागे ठेकेदारधार्जिणी हेतू आहे का? याची चौकशी करून सत्य नागरिकांसमोर आणावे.
५) कुठल्या सल्लागाराने १४५ कोटी रुपयांचे इस्टिमेट तयार केले त्या सल्लागाराचे असे नाव.
६) ज्या अधिकाऱ्यांनी तयार केलेले इस्टिमेट तपासले त्या अधिकाऱ्याचे नाव.
७) सल्लागाराने सुचवलेले काम प्रत्यक्ष जागेवर काय परिस्थिती आहे हे बघितले असेल तर त्या अधिकाऱ्याचे नाव.
८) जी २०, अडीचशे कोटी रुपयाचे टेंडर यात या स्पर्धेच्या रस्त्याची किती कामे झाली आहेत हे तपासले आहे का.
९)प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयासाठी ठेवलेला निधी प्रत्यक्षात टेंडर मुख्य खाते काढते, त्या त्यात गेल्या तीन वर्षात केलेली कामे कोणती आहे त्याची यादी.
१०) पुणे ग्रँड सायकल स्पर्धा ही अतिशय महत्त्वाची पुणे शहराचं नाव मोठं करणारी स्पर्धा आहे यात दुमत नाही. परंतु या स्पर्धेच्या नावावर सार्वजनिक निधीचा अपव्यय होणार नाही याची खाते प्रमुख म्हणून खात्री करणे आवश्यक आहे.

पुणे ग्रॅंड सायकल टूर हा उपक्रम सुमारे ६८९ किलोमीटर अंतरावर पुणे जिल्ह्यात पार पडणार आहे. यात पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि नऊ तालुक्यांचा समावेश आहे. नेमका मार्ग अद्याप निश्चित झालेला नसला तरी हा उपक्रम शहरी, ग्रामीण तसेच डोंगराळ अशा विविध भूप्रदेशांमधून जाणार आहे.

या कार्यक्रमातील काही महत्त्वाचे तपशील:

अंतर : ६८९ किलोमीटर, चार स्पर्धात्मक टप्प्यांमध्ये विभागलेले

भूप्रदेश : शहरी, ग्रामीण आणि डोंगराळ भाग

ठिकाणे : पुणे शहर, पिंपरी-चिंचवड तसेच नऊ तालुके — यामध्ये बारामती, मुळशी, मावळ, भोर आणि वेल्हे यांचा समावेश

अद्याप रूट फायनल नाही मग तरीही पुणे महापालिकेकडून या सायकलिंग मार्गावरील शहरातील रस्त्यांचे नूतनीकरण व दुरुस्ती करण्यासाठी ₹१४५.७५ कोटींच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. हा काय प्रकार आहे ? हा प्रकल्प नोव्हेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.

पुणे विमानतळावर सव्वा पाच किलो ड्रग्ज जप्त; एक अटकेत

पुणे-पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंटेलिजन्स विभागाने मोठी कारवाई करत सव्वा पाच किलो ड्रग्ज जप्त केले आहे. जप्त करण्यात आलेल्या या अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत दोन कोटी एकसष्ठ लाख रुपये इतकी आहे. मॅथा केलॉन नावाचे हे अमली पदार्थ परदेशातून पुण्यामध्ये आणले जात होते. इंटेलिजन्सच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून, त्याची कसून चौकशी सुरू आहे.

अमली पदार्थांच्या तस्करीचे जाळे शोधण्यासाठी तपास यंत्रणा अधिक सक्रिय झाल्या आहेत. पुणे विमानतळावर झालेली ही कारवाई अमली पदार्थ विरोधी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जमुळे आंतरराष्ट्रीय तस्करीच्या शक्यतांवरही तपास केला जात आहे. या घटनेमुळे अमली पदार्थ विरोधी पथकाची सतर्कता पुन्हा एकदा समोर आली आहे.एअर इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांनी 18 सप्टेंबर 2025 रोजी बँकॉकहून एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट क्रमांक IX-241 वरून येणाऱ्या एका प्रवाशाची चेक-इन लगेज बॅगची बारकाईने तपासणी केली असता अत्यंत धक्कादायक गोष्ट समोर आली. प्रवाशाच्या बॅगमध्ये पावडर आणि क्रिस्टल स्वरूपात एकूण 5 किलो 234 ग्रॅम वजनाचा पांढरा पदार्थ आढळून आला.
फील्ड टेस्टिंग करण्यात आले असता हा पदार्थ मेथाकॅलोन असल्याचे निश्चित झाले.याची किंमत अंदाजे 2 कोटी 61 लाख रुपये इतकी आहे. एअर इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ या प्रकरणाची नोंद घेतली आणि नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स (NDPS) कायदा, 1985 अंतर्गत प्रवाशाला अटक केली.

पत्नीच्या त्रासामुळे तरुणाची आत्महत्या:लग्नानंतर सहा महिन्यांतच उचलले पाऊल; पत्नीसह तिच्या आईविरोधात गुन्हा

पुणे -लग्नानंतर अवघ्या सहा महिन्यातच पत्नीच्या सततच्या त्रासामुळे तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना येरवडा परिसरात घडली. पोलिसांनी याबाबत तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन पत्नीसह तिच्या आईविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

अक्षय विजय साळवे (वय २६, रा. गणेशनगर, येरवडा,पुणे) असे आत्महत्या केलेल्या मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याची पत्नी दीपाली अक्षय साळवे (वय २४), तिची आई संगीता अशोक अडागळे (रा. भगवाननगर, गेवराई, जि. बीड) यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत मयत अक्षय याची आई लक्ष्मी विजय साळवे (वय ५२) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षयचा दीपालीशी सहा महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. विवाहानंतर दीपाली आणि तिची आई संगीता यांनी अक्षयला आई-वडिलांपासून वेगळे राहण्यास वेळोवेळी सांगितले. त्याने वेगळे राहण्यासाठी त्याच्यावर सतत दबाब आणला. त्याच्याविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात तक्रारी देखील दिल्या. पत्नी आणि सासूच्या त्रासामुळे अक्षयने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

पत्नी आणि सासूच्या त्रासामुळे मुलगा अक्षयने आत्महत्या केल्याचे त्याची आई लक्ष्मी साळवे यांनी फिर्यादीत सांगितले आहे. पोलीस उपनिरीक्षक एस दळवी पुढील तपास करत आहेत.

बेवारस आत्म्यांनाही मिळाली मुक्ती…

बेवारस मृतांच्या अस्थींचे विधिवत विसर्जन :  राष्ट्रीय कलाकादमी तर्फे आयोजन

पुणे : हिंदू परंपरेनुसार मृत्यूनंतर अस्थी विसर्जन ही आत्म्याच्या शांतीची शेवटची पायरी मानली जाते. परंतु अनेकदा अपघात अथवा इतर कारणांनी रस्त्यावर मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या देहाची ओळख पटत नाही. अशा मृतदेहांना कुणीही वारस नसल्याने ते बेवारस अवस्थेतच राहतात. अशा बेवारस आत्म्यांना सन्मानाने निरोप मिळावा, या हेतूने राष्ट्रीय कला अकादमीतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्वपित्री अमावास्येनिमित्त बेवारस अस्थींचे विधिवत विसर्जन करण्यात आले. गीतेच्या पंधराव्या अध्यायाचे पठण, मंत्रोच्चारात अस्थी विसर्जन विधी पार पडला.

आरटीओ जवळील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर संगम घाटावर विधिवत पूजन करून अस्थींचे विसर्जन करण्यात आले. या उपक्रमासाठी पुणे महानगरपालिका ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाचे विशेष सहकार्य मिळाले. यावेळी नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पराग ठाकूर, डॉ. मिलिंद भोई, विनायक घाटे, राजेंद्र बलकवडे, शिरीष मोहिते, नितीन पंडित, पियुष शहा, आशिष जराड, राजाभाऊ कदम, दिलीप काळोखे, लता राजगुरू, पुणे महानगरपालिका परिमंडळ एक उपायुक्त माधव जगताप, ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक आयुक्त भास्कर महाडिक, आरोग्य निरीक्षक विक्रम सरवदे, मुकादम नागेश बाराथे, नागेश लांडगे आणि सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संयोजन अकादमीचे मंदार रांजेकर, रोमा लांडे, अमर लांडे, सदाशिव कुंदेन, अतुल सोनवणे, सुनील सोनटक्के, सचिन देसाई, बाला शुक्ला, किरण फाळके, राजेश निकम, सुप्रिया दळवी, प्रिया भोंडवे, मनोज गवळी यांनी केले.

माधुरी मिसाळ म्हणाल्या, सर्वपित्री अमावस्येला आपल्या पूर्वजांना आपण स्मरतो, पण बेवारस आत्म्यांनाही शांती लाभावी ही भावना मनात ठेवून राबविलेला हा उपक्रम म्हणजे  खरी माणुसकी आहे. धर्म-जात न पाहता अस्थींचे विधिवत पूजन आणि विसर्जन करणे या माध्यमातून एकतेचा संदेश राष्ट्रीय कला अकादमीच्या माध्यमातून समाजात जात आहे.

राष्ट्रीय कला अकादमीचे अध्यक्ष मंदार रांजेकर म्हणाले, बेवारस मृतांना कोणी नसते, त्यामुळे त्यांचे शेवटचे संस्कार होणे कठीण होते. गेली १५ वर्षे आम्ही हा उपक्रम राबवतो आहोत. कोणताही धार्मिक अडसर न ठेवता केवळ माणुसकीच्या भावनेतून हा उपक्रम अकादमीच्या वतीने केला जातो.

स्वच्छतोत्सव २०२५ अंतर्गत जागतिक स्वच्छता दिनानिमित्त बोपोडीत स्वच्छता व जनजागृती उपक्रम

पुणे : स्वच्छतोत्सव २०२५ (१७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोंबर) निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या मुळा-मुठा नदी प्रदूषण नियंत्रण (PARMM) प्रकल्पांतर्गत बोपोडी आरोग्य कोठी ते महादेव घाट नदीपात्र या परिसरात श्रमदानातून स्वच्छता अभियान राबविण्यात आला आणि पथनाट्य, गाणी या माध्यमातून विद्यार्थ्यांसोबत जनजागृती करण्यात आली.

या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालयाकडून जॉईंट सेक्रेटरी करण सिंग शास्त्रज्ञ श्री.अंजनी प्रसाद सिंग, सहाय्यक विभाग ऑफिसर वसीम अहमद आणि.पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री.पृथ्वीराज बी.पी. (आय.ए.एस.), प्रकल्प व्यवस्थापक व मुख्य अभियंता जगदीश खानोरे, कैलास काराळे श्री.भूषण सोनवणे.व NJS -FP कडून सुयोग साळुंखे हे मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शेल्टर असोसिएट्सच्या सहाय्यक कार्यकारी संचालक सौ. धनश्री गुरव, प्रकल्प व्यवस्थापक डॉ. नीलिमा गावडे, टीम लीडर सौ. सुबोधिनी कांबळे ,राहुल राठोड आणि इकोसन फाउंडेशनचे प्रकल्प व्यवस्थापक अजय रामाणे टीम लीडर सुभाष लाटे, राम साठे ,मुनकीन मुजावर, संदीप एडकेवार व प्रतिनिधी तसेच औंध-बाणेर विभागाचे सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक विजय भोईर, आरोग्य निरीक्षक विनायक चोपडे, मुकादम संतोष शेलार, सफाई कर्मचारी यांनी उत्साहाने सहभाग घेतला.

स्वच्छता उपक्रमासोबतच आकांक्षा फाउंडेशन व स्व. अनंतराव पवार मेमोरियल इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद साधला, कचरा वर्गीकरणावर आधारित खेळ खेळले आणि विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. यावेळी सौ. धनश्री गुरव यांनी विद्यार्थ्यांना जागतिक स्वच्छता दिनाचे महत्त्व पटवून दिले.

विद्यार्थी, शिक्षक, पालक, स्थानिक नागरिक आणि महापालिकेचे कर्मचारी यांच्या सक्रिय सहभागामुळे उपक्रम उत्साहात पार पडला. हा संपूर्ण कार्यक्रम पुणे महानगरपालिका मलनिःसारण विभाग आणि NJS-FP सल्लागार संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला.

संदेश :
“स्वच्छता हीच सेवा – चला, एकत्र येऊन स्वच्छ व निरोगी परिसर घडवूया!”

गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून किडनी प्रत्यारोपणासाठी ५१ हजार रुपयांची मदत

प्रथम दगडूशेठ गणपतीची मूर्ती असणाऱ्या अकरा मारुती चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांचा पुढाकार
पुणे : गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते केवळ उत्सव साजरा करण्यासाठी वर्गणी गोळा करत नाहीत तर किडनी प्रत्यारोपण सारख्या शस्त्रक्रियेसाठी देखील कार्यकर्ते एकत्र येऊन मदत
 गोळा करतात आणि उत्सवाच्या आनंदासोबतच समाजसेवा देखील तितक्याच तत्परतेने करतात. असाच एक आदर्श शुक्रवार पेठेतील अकरा मारुती चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी निर्माण केला आहे. मयूर येनपुरे या रुग्णाच्या किडनी प्रत्यारोपणासाठी मंडळाचे कार्यकर्ते आणि गणेश भक्त मित्र परिवाराने ५१ हजार रुपयांची मदत जमा केली आहे.

प्रथम दगडूशेठ गणपतीची मूर्ती असणाऱ्या अकरा मारुती चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना केलेल्या आवाहनानंतर ही रक्कम जमा करण्यात आली. मयूर येनपुरे याला किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेची गरज असून त्याच्या आईनेच आपली किडनी देण्याचा संकल्प केला असून सर्व टेस्ट्स पॉझिटिव्ह आल्यानंतर लवकरच भारती हॉस्पिटल येथे शस्त्रक्रिया होणार आहे. यासाठी ६ लाख रुपयांची गरज होती. या पार्श्वभूमीवर मंडळाचे कार्यकर्ते व गणेश भक्त मित्र परिवार यांनी एकत्रितपणे ५१ हजार रोख मदत या कुटुंबाकडे सुपूर्द केली.  या कार्यक्रमाला अॅड. प्रताप परदेशी, किरण सोनीवाल, सुधीर ढमाले, डॉ. विजय पोटफोडे, राजाभाऊ कदम, दिलीप पवार, दिलीप काळोखे, मंडळाचे अध्यक्ष रवी मोरे, कार्याध्यक्ष विनायक घाटे आदी मान्यवर तसेच मंडळाचे कार्यकर्ते निखिल घुमे, प्रथमेश घाटे, संकेत जाधव, अभिषेक थिटे, सागर गोरड, चंदू वर्डेकर उपस्थित होते.

विनायक घाटे म्हणाले, गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते हे फक्त उत्सव साजरा करण्यापुरते मर्यादित नसून वर्षभर विविध सामाजिक उपक्रमात सक्रिय राहून गरजूंना मदत करण्यासाठी सदैव तत्पर असतात.

साहित्यिक डॉ. अविनाश सांगोलकर यांच्या 

‘विश्वबंधुतेची प्रकाशवाट’ पुस्तकाचे प्रकाशन

पुणे: ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अविनाश सांगोळेकर लिखित आणि बंधुता प्रकाशन प्रकाशित ‘विश्वबंधुतेची प्रकाशवाट’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी आयोजिला आहे. गुरुवार, दि. २ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता रयत शिक्षण संस्थेच्या औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात हा प्रकाशन सोहळा होणार आहे. रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन व माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते, तर ज्येष्ठ समाजनिष्ठ उद्योजक कृष्णकुमार गोयल यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमावेळी स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, बंधुताचार्य प्रकाश रोकडे, प्रा. चंद्रकांत वानखेडे, प्रा. शंकर आथरे, संगीता झिंजुरके यांची प्रमुख उपस्थिती असेल, अशी माहिती प्रकाशक मंदाकिनी रोकडे यांनी दिली.
बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी पाच दशकांहून अधिक काळ बंधुता, राष्ट्रबंधुता आणि विश्वबंधुता या तीन टप्प्यांवर केलेल्या यशदायी आणि प्रेरणादायी कार्याचे दस्तावेजीकरण म्हणजे हे पुस्तक आहे. डॉ. सांगोलेकर यांच्यासह प्राचार्य राम शेवाळकर, डॉ. निर्मलकुमार फडकुले, डॉ. रावसाहेब कसबे फादर फ्रान्सिस दिब्रिटो, अॅड. भास्करराव आव्हाड, डॉ. अश्विनी धोंगडे, पत्रकार जीवराज चोले, प्रा. शंकर आथरे, नानासाहेब लडकत आणि बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांच्या लेखनाचा यामध्ये अंतर्भाव असल्याचे मंदाकिनी रोकडे यांनी नमूद केले.

सोशल मीडिया व मोबाईल व्यसनावरबापू ट्रस्टतर्फे पथनाट्याचे सादरीकरण

पुणे: एकटेपणा, नैराश्य, भीती, चिंता, मानसिक भावनिक आघात अशा व मानसिक समस्यांवर  बापू ट्रस्ट फॉर रिसर्च ऑन माइंड अँड डिस्कोर्स संस्था वस्ती पातळीवर  काम करीत आहे, संस्थेच्या वतीने या सर्व मानसिक समस्यांवर जनजागृती करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून बापू ट्रस्टकडून ‘सोशल मीडिया व मोबाईल व्यसन’ या विषयावर पथनाट्याचे सादरीकरण केले. या सादरीकरणाने प्रेक्षकांना स्वतःच्या सवयींकडे नव्या नजरेने पाहण्याची आणि संतुलित जीवनशैली अंगीकारण्याची प्रेरणा दिली. यलो रिबन फेअरमध्ये बापू ट्रस्टच्या वतीने मानसिक आरोग्याबाबत जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आले.

याबाबत बोलताना बापू ट्रस्टच्या ट्रस्टी सौ. सुमंगला कुमार म्हणाल्या, “एकट्या महिला, किशोरवयीन मुले-मुली, गर्भवती महिला, घरगुती हिंसाचाराचे बळी ठरलेल्या व्यक्ती, आणि मानसिक आघातातून गेलेल्या लोकांना बापू ट्रस्टचा मोठा आधार मिळाला आहे. ‘सेहर’ हा पर्वती व गोखलेनगर वस्त्यांमध्ये कार्यरत असलेल्या उपक्रमातून रोजच्या एकटेपणा, बहिष्कार आणि ताणतणावासारख्या समस्यांवर लक्ष केंद्रित केले जात आहे. मानसिक आरोग्यसेवा म्हणजे केवळ औषधोपचार नसून नातेसंबंध जपत स्वतःची काळजी घेणे, समाजात सहभागी होणे, आणि व्यक्तींची सर्वसमावेशकता वाढवणे महत्वाचे आहे.”

“आज एकटेपणा सर्वत्र पसरलेली गंभीर समस्या आहे. सोशल मीडिया आणि मोबाईल व्यसनाचे मूळ कारण एकटेपणा असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे. विशेषतः तरुणांमध्ये त्यामुळे नैराश्य व आत्महत्येच्या घटना वाढत आहेत. तंत्रज्ञानामुळे आभासी नाती जोडणी वाढली असली तरी प्रत्यक्ष मानवी नात्यांची खोली आणि विश्वास कमी झाले आहेत. यावर उपाय करण्यासाठी केवळ वैद्यकीय किंवा मानसोपचार सेवा पुरेशा नाहीत. लोकांना पुन्हा जोडण्यासाठी आणि आपलेपणाची भावना परत मिळवण्यासाठी मजबूत मनोसामाजिक आधार यंत्रणा आवश्यक आहे,” असेही त्यांनी सांगितले.

गेल्या दशकापासून बापू ट्रस्ट यलो रिबन फेअरमधून मध्यमवर्गीय समाजापर्यंत पोहोचत आहे. या व्यासपीठावरून आम्ही खेळ, उपक्रम, पुस्तके, संवाद आणि प्रकाशनांद्वारे मानसिक आरोग्याविषयी जागरूकता वाढवतो, कलंकाला आव्हान देतो आणि खुलेपणाला प्रोत्साहन देतो. अधिक माहितीसाठी https://baputrust.com/ या वेबसाईट वर भेट द्या व मानसिक आधारासाठी bt.admfin09@gmail.com, 87679 73272 यावर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.