Home Blog Page 121

कोथरूड बनलंय गुन्हेगारी टोळ्यांची नगरी

पुणे :सदाशिव पेठ,नारायण पेठ, शनवार पेठ येथील नागरिक जेव्हा कोथरूड सारख्या ठिकाणी स्थलांतरित होऊ लागले तेव्हा कोथरूड हा शहरातील शांत, सुसंस्कृत तसेच वैचारिक आणि सुशिक्षित लोकांचा परिसर म्हणून ओळखला जाऊ लागला.पण हेच कोथरूड आता टोळ्यांच्या गुन्हेगारी कृत्यांनी बदनाम होऊ लागले आहे. कोथरूड गुन्हेगारी टोळ्यांची नगरी बनली आहे.ज्या कोथरूडमध्ये एक केंद्रीय राज्यमंत्री, राज्य सरकारचे कॅबिनेट मंत्री,एक खासदार नेतृत्व करतात त्याच कोथरूडमध्ये राज्याला हादरवून टाकणारे गुन्हेगारी टोळ्यांचे आकडे समोर आलेत. पुण्यातील ७६ टोळ्यांपैकी ३६ टोळ्या या कोथरुडमधल्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.निलेश घायवळ,गजा मारणे,गणेश मारणे,शरद मोहोळ,बंटी पवार अशा टोळ्यानी कोथरूड चे नाव खराब केले असून यातील काही जन तुरुंगात असले काही मयत असले तरी काही अद्यापही वावरत आहेत अस्तित्व राखून आहे या टोळ्यांच्या सदस्यांची संख्या तब्बल २२८ असल्याचे पोलीस रेकॉर्ड मध्ये नमूद आहे .
एकेकाळी पुण्यातली महात्मा फुले मंडई ही गुन्हेगारीचे विद्यापीठ म्हणून नावाजलेली होती या विद्यापीठात माळवदकर, बोडके, मिसाळ,रामपुरी यासारख्या टोळ्यांची पाळमुळं रुजलेली होती. उपनगरांबरोबर अनेक टोळ्या उदयाला आल्या. मात्र या टोळ्यांच्या कारवाया स्थानिक स्वरूपाच्या होत्या.पण महापालिकेच्या हद्दीत येणार म्हणून पुण्याच्या अवतीभवती असलेल्या गावांमधल्या जमिनींना सोन्याचा भाव आला आणि बिल्डर बनलेल्या राजकीय कार्यकर्त्यांनी आपल्या अनेक मित्रांना गुन्हेगारीकडे वळवले.त्यातली महत्त्वाची नावे म्हणजे मोहोळ,मारणे,बोडके टोळी अशा टोळ्या कोथरूड आणि आसपासच्या परिसरामध्ये फोफावल्या. गजा मारणेचा कधीकाळी सहकारी असलेल्या निलेश घायवळ याने पुढे फुटून गेल्यानंतर स्वतःची टोळी सुरू केली. मात्र एवढं सगळं झालं तरी गेल्या चार-पाच वर्षापर्यंत पुण्यातल्या गुन्हेगारी टोळ्यांची संख्या ही स्थानिक आणि मर्यादित स्वरूपाची होती.आंदेकर, माळवदकर,रामपुरी हे पुण्याच्या गुन्हेगारी विश्वातील या सर्वांच्या पूर्वीचे जुने नाव.काही राजकारण्यांनी गुन्हेगारीला राजाश्रय दिला आणि या गुन्हेगारी टोळ्यांची धार कमी होत गेली पण त्याबरोबर नव्या टोळ्या उभ्या होत गेल्या.अर्थात त्यांनाही काही प्रमाणात राजाश्रय मिळत गेलाच.

खरे तर येरवडा हे शिक्षा गृह नाही तर सुधारगृह आहे असे सुरुवातीच्या काळात महासंचालका सारखे अधिकारी नेहमी सांगत पण नंतर उलटी गंगा वाहू लागली येरवडा हे गुन्हेगारीचे विद्यापीठ बनू लागले गेल्या काही वर्षांत गुन्हेगारीच्या आकर्षणाने गुन्हे करणाऱ्या अनेक तरुणांवर पोलिसांनी मकोकासारख्या कठोर कायद्याचा अवलंब केला. शेकडो तरुण गुन्हेगार येरवडा नावाच्या या विद्यापीठात गेले आणि बाहेर आले ते थेट गुन्हेगारी टोळ्या चालवायचं तयार करायचं प्रशिक्षण घेऊन…त्याचा परिणाम असा झाला आहे की शहराच्या उपनगरांमध्ये नव्याने जवळपास 80 टोळ्यांचा उदय झालाय आणि सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे या टोळ्यांचा आगार ठरलंय ते म्हणजे कोथरूड..आणि त्याच्या आसपासचा परिसर.पुण्यातील ७६ टोळ्यांपैकी सुमारे ३६ टोळ्या या कोथरूड आणि परिसरातल्या आहेत. त्यामुळे महात्मा फुले मंडई नंतर आता कोथरूड हे पुण्याच्या गुन्हेगारीच नवं आगर ठरतंय.
या यादीतून झोन-तीन म्हणजेच पुणे पोलिसांच्या प्रशासकीय हद्दीचा तिसरा प्रभाग ज्यात प्रामुख्याने कोथरूड चा समावेश होतो. तिथेच तब्बल 36 नव्या टोळ्या गेल्या पाच वर्षात उदयाला आल्याचे समोर आले आहे. ही आकडेवारी धक्कादायक तर आहेच मात्र कोथरूड सारख्या उच्चभ्रू उपनगरात जिथे समाजातले अनेक नावजलेल्या व्यक्ती, कलेचे उपासक राहतात तिथे इतक्या मोठ्या संख्येने होणारा गुन्हेगारी टोळ्याचा उदय हा गंभीर विषय आहे.
मुख्य गँग-निलेश घायवळ
प्रमुख / म्होरक्या
निलेश बन्सीलाल घायवळ रा. संत ज्ञानेश्वर कॉलनी शास्त्रीनगर कोथरुड पुणे ( जेल बाहेर)
एकूण सदस्य संख्या
५१
मुख्य गँग-गजा मारणे
कोथरुड पुणे (जेलमध्ये ) प्रमुख / म्होरक्या
-गजानन पंढरीनाथ मारणे वय- ५७ रा. हमराज चौक शास्त्रीनगर
एकूण सदस्य संख्या– ७७
गणेश मारणे( जेलमध्ये) प्रमुख / म्होरक्या-गणेश निवृत्ती मारणे रा. फ्लॅट नं.१५ सरगम सोसायटी गल्ली
एकूण सदस्य संख्या-४४
शरद मोहोळ-प्रमुख / म्होरक्या-शरद हिरामण मोहोळ रा. सुतारदरा (दि.०५/१/२०२४ रोजी खुन झाला)
महेश उर्फ बंटी प्रकाश पवार रा. तुकाईनगर वडगाव बुद्रुक सिंहगडरोड पुणे (जेलमध्ये )
एकूण सदस्य संख्या-२६

आंदेकरांचा सुपडा साफ करणारी जोरदार कारवाई सुरु

पुणे – पुण्यातील माळवदकर गँग कधीच संपली,Dगँग ची सहायक समजली जाणारी रामपुरी गँगहि संपली,कलमाडींच्या काळात अनेक गुंडांना राजकीय आश्रय मिळाला आणि त्यांचे गुंडगिरीतून राजकीय पुनर्वसन झाले तेव्हा वत्सला आंदेकर महापौर झाल्यावर आंदेकर यांची टोळीही संपुष्टात आली असे वाटले तरीही अलीकडच्या वनराज आंदेकर याच्या खुनाने आंदेकर गँग हि अन्य कुठल्या गँगशी वॉर करताना आढळून आली नसली तरी त्यांच्या घरातील नातलगांच्या कलहातून आंदेकर गँग अजूनही तग धरून बसल्याचे निष्पन्न झाले त्यात टिपू पठाण टोळीने पुण्यात लहान वयातील मुलांना हत्यारे पुरविण्याचे काम सुरु केल्याचेही दिसून आले.वनराज ची हत्या,नंतर बदला म्हणून आयुष कोमकर या आंदेकर यांच्या नातवाची हत्या या दोन्ही प्रकरणात २० /२० हून अधिक जणांना पोलिसांनी तुरुंगात घातले आहे.आता या सर्व पार्श्वभूमीवर आंदेकर नावाचा सुपडा साफ करण्याचा विडा च जणू पोलीस आणि प्रशासनाने उचलल्याचे दिसत आहे.आंदेकर यांच्या घरावरील छाप्यात अवघ्या १ ते दीड कोटीचा ऐवज सापडला पण पुढील तपासात आंदेकर टोळीने चक्क २० कोटीची खंडणी वसूल केल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.त्याचबरोबर आंदेकर यांच्या कुटुंबात माजी लोकप्रतिनिधी जरी होते तरी त्यांची छायाचित्रे,नावे,असलेली फलके पाणपोई हे सारे काही उखडून या टोळीचा सुपडा साफ करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत.अर्थात आता मूळापासून हो टोळी खरोखर या प्रयत्नांतून साफ होणार कि आणखी फोफावणार हे मात्र येणारा काळच सांगू शकणार आहे.

गेल्या दहा वर्षांपासून गणेश पेठ येथील मच्छि मार्केटमधील व्यापाऱ्यांकडून बंडू आंदेकरने तब्बल 20 कोटींपेक्षा जास्त रकमेची खंडणी उकळल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आल्याचे पोलीस सांगत आहेत.या प्रकरणी आंदेकर कुटुंबातील सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यापाऱ्यांमध्ये दहशत माजवून बंडू आंदेकर,कृष्णा आंदेकर,शिवम आंदेकर,अभिषेक उदयकांत आंदेकर, सोनाली वनराज आंदेकर आणि शिवराज उदयकांत आंदेकर यांनी दरमहा 15 ते 20 लाख रुपये खंडणी उकळल्याचे निष्पन्न झाले आहे. बंडू आंदेकर याने व्यापाऱ्यांकडून तब्बल 20 कोटींची खंडणी घेतल्याची माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे आता त्याच्यावर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. पोलिसांकडून या प्रकरणी आता इत्यंभूत तपास केला जात आहे.विशेष म्हणजे पुणे पोलिसांना हत्येच्या काही दिवसांपूर्वी आंदेकर टोळी वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी तयारी करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार आंदेकर टोळीच्या आरोपींना पोलिसांनी रेकी करताना रंगेहातदेखील पकडलं होतं. पण बंडू आंदेकर हा स्वत:च्याच नातवाला संपवेल, अशी कल्पना पोलिसांना देखील नव्हती. त्यामुळे पोलीस देखील या घटनेने अवाक झाले. या प्रकरणी पोलिसांनी गोळीबार करणाऱ्यांपासून बंडू आंदेकरच्या कुटुंबातील सदस्यांना अटक केली आहे, पोलीस तपासातून याबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे.

आंदेकर टोळीवर १२ वर्षापासून संघटीरीत्या खंडणी उकळल्याप्रकरणी गुन्हा दाखल

फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशस्त भस्मे यांनी कळविले आहे की, गणेश पेठ मच्छि मार्केट, पुणे येथील मासे व्यापाऱ्यांना धमकावून व दहशतीने मागील १२ वर्षांपासून संघटीतरीत्या खंडणी उकळल्याप्रकरणी सुर्यकांत ऊर्फ बंडू आंदेकर याचेसह इतर ११ त्यात आंदेकर याच्या घरातील महिलेसह टोळी सदस्यांविरुध्द फरासखाना पोलीस ठाणे येथे दिनांक २०/०९/२०२५ रोजी गुरनं १८२/२०२५, भारतीय न्यायसंहिता कलम ३०८ (खंडणी), ३०८ (४) (जीवे मारण्याची धमकी देवून खंडणी घेणे), १११ (संघटीतरीत्या गुन्हे करणे), ३(५) (सामाईक उद्देश) या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
पुणे शहर पोलीस यांनी पुण्यातील टोळीयुध्दाविरुध्द केलेल्या सक्षम व कठोर कारवाईमुळे दहशतीला घाबरून तक्रार न देणाऱ्या नागरीकांमध्ये अत्यंत सकारात्मक संदेश गेला असून, या कारवाईमुळे मनोबळ वाढल्याने एका तक्रारदारने गेल्या १२ वर्षापासून सुर्यकांत ऊर्फ बंडू आंदेकर टोळीचा दरमहा प्रोटेक्शन मनीच्या नावाने चालू असलेला खंडणी उकळण्याचा प्रकार उघड केलेला असून, त्याबाबत त्याने फरासखाना पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केलेली आहे. सदरबाबत वर नमुद प्रमाणे विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर खंडणी प्रकरणात बंडूअण्णा आंदेकर टोळीने आजपर्यंत २० कोटीपेक्षा जास्तची रक्कम मासे व्यापाऱ्यांकडून व्यवसायाकरीता जागा व इतर सहकार्य करण्याबाबत प्रोटेक्शन मनी म्हणून उकळली असल्याचे दिसून येत आहे. या प्रकारामुळे मासे विक्रेते व व्यापारी अक्षरक्षः कर्जबाजरी झाले असून, बंडू आंदेकर टोळीचा गुन्हेगारी इतिहास व दहशतीमुळे ते सर्व प्रकार निमुटपणे सहन करीत होते. परंतू अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर यांचे मार्गदर्शन व नेतृत्वाखाली पुणे शहर पोलीसांनी संघटीत गुन्हेगारी टोळीविरुध्द आक्रमक व कठोर कारवाई सुरू केल्याने सामान्य नागरीकांमध्ये अत्यंत सकारात्मक संदेश गेला असून पुणे शहराची शांतता, कायदा व सुव्यवस्था राखणेबाबत पुणे शहर पोलीस प्रतिबध्द आहे. नागरीकांनी देखील कोणत्याही दहशतीला न घाबरता होणाऱ्या किंवा घडलेल्या गुन्हयांबाबत पोलीसांना माहिती द्यावी असे अवाहन करण्यात येत आहे. दाखल गुन्हयाचा पुढील तपास अजित जाधव, पोलीस निरीक्षक, गुन्हे, फरासखाना हे करीत आहेत.
पुणे शहरामध्ये असे आरोपी, त्यांची टोळी व त्यांना सहकार्य करणाऱ्या लोकांविरुध्द जोपर्यंत अश्या टोळयांचे समूळ उच्चाटन होत नाही तोपर्यंत अशीच कठोर कारवाई सुरू राहील.असे त्यांनी म्हटले आहे.

ड्रंक अँड ड्राईव्ह २ तरुणांना कारावासासह मोठ्या दंडाचीही शिक्षा

पुणे- मद्य प्राशन करुन वाहन चालवणा-या २ तरुण चालकाना कारावासाची व दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे अशी माहिती येथे वाहतूक पोलीस उप आयुक्त हिंमत जाधव यांनी दिली

ते म्हणाले,’पुणे शहरातील खडकी वाहतूक विभागाकडुन रोहित शैलेंद्र वर्मा, वय २९ वर्षे, रा. विद्यानगर, लेन क्र. २, पिंपळे गुरव, पुणे याचेवर खटला क्र. ४९७९/२०२४ गोटार वाहन कायदा कलम १८४,१८५,३/१८१ SSC No. १५०३९५/२०२५ अन्वये खटला दाखल करण्यात आला होता.
दि. २२.०९.२०२५ रोजी न्यायाधीश एस. बी. पाटील साो, मोटार वाहन न्यायालय शिवाजीनगर पुणे यांनी सदर खटल्यामध्ये आरोपी रोहित शैलेंद्र वर्मा, वय २९ वर्षे, रा. विद्यानगर, लेन क्र. २, पिंपळे गुरव, पुणे यास १५ दिवसाची साधी कैद व १२,०००/- रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. त्याचप्रमाणे
पुणे शहरातील नांदेड सिटी वाहतूक विभागाकडुन आरोपी राजकुमार मंगिणी कुलाळ वय-३१ वर्षे रा. मंगलभैरव नांदेड सिटी पुणे याचेवर खटला क्र. ०१/२०२५ मोटार वाहन कायदा कलम १८४,१८५ SSC N०. १६५४३७/२०२५ अन्वये खटला दाखल करण्यात आला होता.
दि. २२.०९.२०२५ रोजी न्यायाधीश एस. बी. पाटील साो, मोटार वाहन न्यायालय शिवाजीनगर पुणे यांनी सदर खटल्यामध्ये आरोपी राजकुमार मंगिणी कुलाळ वय-३१ वर्षे रा. मंगलभैरव नांदेड सिटी पुणे यास १५ दिवसाची साधी कैद व १०,०००/- रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
ही कामगिरी पोलीस प्रॉसिक्यूटर वर्षाराणी जाधव तसेच पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला, पोउनि विकास पाटील नेमणुक खटला विभाग यांनी खटल्याचे कामकाज केले आहे.

सन २०२० ते सन २०२५ मधील ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह केसेस- सन २०२० एकुण २०१७, -सन. २०२१ एकुण ६९, -सन २०२२- एकुण ३७, -सन २०२३ एकुण ५६२, -सन २०२४- एकुण ५२९३. -आता सप्टेबर २०२५ पर्यंत एकुण ३९४८ केसेस करण्यात आलेल्या आहेत.

“स्वदेशी” हाच आता सर्वांचा मूलमंत्र आणि धर्म _ महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

३१व्या पुणे नवरात्रौ महोत्सवाचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते दिमाखात उद्घाटन

पुणे, _
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना नुकतेच एक जीएसटी दर कमी करून मोठे गिफ्ट दिले आहे. नागरिकांच्या दैनंदिन जीवनात त्यामुळे आमूलाग्र बदल घडणार आहे. २८ टक्के जीएसटी काही ठिकाणी थेट पाच टक्के पर्यंत कमी केला आहे. गरिब आणि मध्यम नागरिकांचे कल्याण डोळ्यासमोर ठेऊन ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान यांनी केला आहे. त्यामुळे काही कोटीचा महसूल कमी होईल याची जाणीव मला आहे पण नागरिकांसाठी हा निर्णय महत्वाचा आहे. नागरिकांनी आता स्वदेशी वस्तू वापर करण्यावर भर दिला पाहिजे. देशातील पैसा परदेशात न जाता देशातच राहिला पाहिजे.२०४७ चा विकसित भारत त्यातून निर्माण होईल. यापुढे “स्वदेशी” हाच मूलमंत्र आपला सर्वांचा राहील आणि तोच आपला धर्म आहे असे मत राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.

कला, संस्कृती, गायन, वादन, भजन, नृत्य, संगीत यांचा मनोहारी संगम असणाऱ्या ३१ व्या पुणे नवरात्रौ महोत्सवाचे उद्घाटन सोमवारी राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते गणेश कला क्रीडा रंगमंच येथे संपन्न झाले. याप्रसंगी ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत व माजी आमदार उल्हास पवार, राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, अप्पर पोलीस आयुक्त संजय पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
माजी उपमहापौर आणि पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल, जयश्री बागुल यांनी मान्यवरांचे स्वागत केले . मराठी सिनेतारका भार्गवी चिरमुले, तेजा देवकर, सानिया चौधरी, राधा सागर, स्मिता तांबे, प्राजक्ता गायकवाड, ऋतुजा जुन्नरकर, अमृता धोंगडे, वैष्णवी पाटील या सिनेतारकांची विशेष उपस्थिती यावेळी होती.

सोमवारी घटस्थापनेच्या दिवशी सहकारनगर, शिवदर्शन येथील श्रीलक्ष्मीमाता मंदिरात आबा बागुल व जयश्री बागुल यांच्या हस्ते सकाळी ६.४१ मि. या शुभमुहूर्तावर विधिवत घटस्थापना करण्यात आली. या मंदिराच्या प्रांगणात यंदा मदुराई येथील ७२ फुट उंचीचे मीनाक्षी मंदिर हा भव्य देखावा साकारला आहे त्याचे लोकार्पण देखील मंत्री बावनकुळे यांनी केले.
या उद्घाटन सोहळ्यात भटक्या विमुक्त समाजातील मुलांचे संगोपन शिक्षण व संस्कार यासाठी अविरत काम करणारे जेष्ठ समाजसेवक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांना महर्षी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.तसेच श्री लक्ष्मीमाता जीवन गौरव पुरस्काराने डॉ. पराग काळकर (प्र-कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ), राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, सामजिक कार्यकर्त्या डॉ. मेघा पुरव सामंत, बुलढाणा सहकारी बँकेचे सहसंस्थापक शिरीष देशपांडे आणि लोककलावंत प्रमिला लोदगेकर यांना गौरविण्यात आले. याशिवाय डॉ. मयूर कर्डिले आणि डॉ. अरविंद खोमणे यांनाही विशेष सन्मानित केले गेले.

बावनकुळे म्हणाले, अनेक वर्षापासून पुणे नवरात्र महोत्सव यशस्वीपणे आबा बागुल आणि जयश्री बागुल राबवत आहे. या धार्मिक कामाला पुढे नेण्याचा योग त्यांना आला आहे. मी नागपूर मध्ये ३५ वर्ष महालक्ष्मी देवीचा महोत्सव मध्ये कार्यरत असून प्रथमच नागपूर सोडून याकाळात पुण्यात आलो. आबा बागुल यांनी ज्याप्रकारे आपले जीवन समर्पित केले आहे ते प्रेरणादायी आहे. त्यातून अनेक गोष्टी शिकण्यास मिळतात.जीवनात कोणी व्यक्ती परीपूर्ण नाही,प्रत्येकजण अनुभव मधून शिकत असतो. प्रत्येकाला परमेश्वर याने एक विशेष गुण दिला त्याचा आविष्कार आपण करत असतो. त्यामुळे एकमेकाकडून आपण अनुभवातून शिकत असतो. मनुष्याच्या जीवनात पत,प्रतिष्ठा, पैसा कधी मागे उरत नाही तर आपल्या जीवनातील काम महत्त्वपूर्ण ठरते. याठिकाणी ज्याप्रकारे नवरात्र उत्सव साजरा होत आहे तो आगामी काळात अधिक समृद्ध व्हावा. जीवनात देव, देश, धर्म यासाठी काम केले तर देश खऱ्या अर्थाने विकसित होईल. वैभवशाली विविध धार्मिक परंपरा भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य ठरली आहे.
पुढे ते म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमचे सरकार पुण्यावर विशेष लक्ष्य ठेवून आहे. मुख्यमंत्री सातत्याने पुण्यात कामानिमित्ताने येत असतात. त्यांनी सन २०२९, २०३५ आणि २०४७ मधील विकसित पुण्याचे दीर्घकालीन नियोजन केले आहे.महाराष्ट्रात सर्वाधिक चांगले शहर पुणे होईल आणि पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात निर्माण होतील असे काम सध्या सुरू आहे. पुणे मध्ये आमचे विविध नेते एकत्रित काम करत आहे. पुणे बाबत आतापर्यंत जी संकल्पना देखील केली नसेल त्यापेक्षा अधिक चांगलं काम आगामी काळात होईल.

आबा बागुल म्हणाले, पुणे नवरात्र महोत्सव मध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्ष न पाहता आज महोत्सव मध्ये आले त्यांचे मी स्वागत करतो. बावनकुळे यांचे कार्य मोठे आहे अनेक वर्ष ते विविध काम करत आहे. धोरणात्मक निर्णय ते तातडीने मार्गी लावतात. पुण्यात वाहतूक समस्या असून त्याबाबत माझे मायक्रोप्लॅनिंग आहे त्याबाबत विचार व्हावा. मनपा मध्ये जकात बंद झाल्यावर जीएसटी आले आणि बजेट दहा हजार कोटी आणि सहा हजार कोटी जमा होत नाही अशी स्थिती आहे. एकदा ठराविक कर सर्व मनपा यांचा जमा करून त्याआधारे व्याज वापर करून विकासकामे केली जावी आणि कर्मचारी यांचा सुयोग्य वापर करावा.

उद्घाटन सोहळा दरवर्षी प्रमाणे भव्य आणि नेत्रदीपक करण्यात आला. यामध्ये सितार, व्हायोलिन, बासरी व तबला यांची जुगलबंदी असणारा ‘आनंद तरंग’ हा कार्यक्रम डॉ. नीलिमा राडकर आणि माधवी करंदीकर व ग्रुप यांनी सादर केला. नृत्यगुरु पं. शमा भाटे व सहकारी ‘शरण्ये रुद्र चंडिके’ कथ्थक हा कार्यक्रम सादर केला. विनोद धोकटे, स्वाती धोकटे व सहकलाकार ‘जागर शक्ती पिठांचा’ देवीचा गोंधळ हा कार्यक्रम सादर केला. उद्घाटन सोहळ्याचा आकर्षण ठरणारा मराठी सिनेतारका भार्गवी चिरमुले, तेजा देवकर, सानिया चौधरी, राधा सागर, स्मिता तांबे, प्राजक्ता गायकवाड, ऋतुजा जुन्नरकर, अमृता धोंगडे, वैष्णवी पाटील या सिनेतारकांचा ‘जल्लोष’ हा नृत्याविष्काराने रसिकांना मंत्रमुग्ध केले. याचे नृत्यदिग्दर्शन निकिता मोघे यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे यांनी तर घनश्याम सावंत यांनी आभार व्यक्त केले.

आबा बागुल अनेकदा भेटले पण… भाजपचे बावनकुळे नेमके काय म्हणाले…

पुणे -आज कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून आपल्या राजकीय आयुष्याची कारकीर्द घालविलेले आबा बागुल यांच्या पुणे नवरात्रो महोत्सवाला भाजपच्या नेत्यांनी हजेरी लावली. आबा बागुलांना गेल्या विधानसभेत उमेदवारी दिली नाही आणि सहयोगी पक्षाच्या उमेदवारा विरोधात बंडखोरी केली म्हणून कॉंग्रेसने पक्षातून निलंबित केले आहे. या पार्श्वभूमीवर ७ वेळा नगरसेवक म्हणूनच निवडून आलेल्या आणि आहे त्याच राजकीय स्तरावर आयुष्य घालविलेल्या आबा बागुल यांनी यंदा भाजपचे केंद्रीय मंत्री शहर अध्यक्ष,राज्यातील २ मंत्री असे अनेक भाजपा नेते आपल्या पुणे नवरात्रो महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाला निमंत्रित केले होते केवळ रमेश बागवे आणि उल्हास पवार हे दोनच कॉंग्रेस चे नेते यावेळी उपस्थित होते.चंद्रशेखर बावनकुळे,माधुरी मिसाळ हे राज्यातील २ मंत्री आणि भाजपा शहर अध्यक्ष धीरज घाटे यावेळी उपस्थित होते.केंद्रीय मंत्री मोहोळ काही उपस्थित नव्हते.आबा बागुलांना कॉंग्रेसच्या असंख्य नेत्यांनी आमदारकीची स्वप्ने दाखविली पण ठेवले नगरसेवक पदावरच, त्यानंतर आबा बागुल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती पण माधुरी मिसाळ याच पर्वतीतून भाजपच्या विद्यमान आमदार असल्याने त्यांच्याबाबत त्यावेळी फडणवीस यांनीही काही निर्णय दिला नव्हता.त्यानंतर आता चंद्रकांतदादा पाटील यांनी आबा यांना महापौर पदाचे आश्वासन दिल्याची चर्चा रंगलेली असताना नवरात्रो महोत्सवाच्या उद्घाटनाची वेळ आली आणि अनेक भाजपा नेत्यांना बागुलांनी आमंत्रित केले.या सर्व पार्श्वभूमीवर पत्रकारांनी बावनकुळे यांना,आबा बागुलांच्या राजकीय करिअर बाबत सवाल केला,आबा बागुलांचे काय होणार ? माधुरी मिसाळ यांचा त्यांना पक्षात घ्यायला विरोध आहे काय ? अशा प्रश्नांवर बावनकुळे यांनी उत्तरे दिली पण ओरीजनल भाजप सदस्यांचे काय होणार ? या प्रश्नाला त्यांनी परस्पर बगल दिली..पहा आणि ऐका बावनकुळे नेमके काय म्हणाले.

पुणे महानगरपालिकेच्या ८४२ कोटींच्या मलनि:स्सारण प्रकल्पाला राज्य सरकारची मंजूरी

0

पुणे – केंद्र सरकारच्या अमृत 2.0 अभियानातून राज्यातील 44 शहरांमध्ये मलनि:स्सारण प्रकल्प हाती घेण्यात आले असून त्यामध्ये पुण्याचा प्रकल्पही समाविष्ट झाला आहे. पुणे महानगरपालिकेच्या ८४२ कोटींच्या मलनि:स्सारण प्रकल्पाला राज्य सरकारची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. HAM मॉडेल अंतर्गत हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. याबाबतचे आदेश राज्याच्या नगर विकास विभागाकडून पारित करण्यात आले आहेत. दरम्यान या प्रकल्पाला केंद्र सरकारने आधीच मंजुरी दिली होती. मात्र राज्य सरकारकडे हा प्रस्ताव गेल्या वर्षभरापासून पडून होता. अखेर सरकारने या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. अशी माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी यांनी दिली.

या प्रकल्पात पुणे महापालिकेचे अस्तिवातील मैलापाणी शुद्धीकरण केंद्र (Existing STP) यांचा अद्ययावतीकरण/नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव आहे. त्यानुसार ६ मैलापाणी शुद्धीकरण केंद्रांचा यात समावेश आहे. त्यासाठी ८४२ कोटीच्या प्रस्तावाला केंद्र कडून आधीच मंजुरी देण्यात आली आहे. यात 252.86 कोटी केंद्र सरकारकडून, 210.71 कोटी राज्य सरकारकडून, ३५८.७९ कोटी भागीदाराने आणि 20.49 कोटी पुणे महानगरपालिकेकडून हिस्सा घेतला जाणार आहे. या प्रकल्पात महापालिकेला जास्त आर्थिक तोशिष सहन करावी लागणार नाही.पुणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये निर्माण होणाऱ्या मैलापाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी पुणे महानगरपालिकेचे ०९ मैलापाणी शुद्धीकरण केंद्र कार्यान्वित असुन त्याची स्थापित क्षमता ४७७ MLD इतकी आहे. अस्तित्वातील मैलापाणी शुद्धीकरण केंद्र हे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या जुन्या नियमावली नुसार म्हणजे BOD-30, COD-100 प्रमाणे असून Phosphate व Nitrate मैलापाण्यातून वेगळे करता येत नाही. पहिल्या टप्प्यातील प्रकल्प सुमारे १० ते १५ वर्षापुर्वीचे आहेत. त्यामुळे त्याचे अद्ययावतीकरण/ नुतनीकरण करण्याबरोबरच इलेक्ट्रोमेकॅनिकल इक्विपमेंट्स बदलावे लागणार आहेत. ही बाब तांत्रिक स्वरूपाची असल्याने अस्तित्वातील प्रकल्पांचा अभ्यास करून त्यामध्ये अद्ययावतीकरण/नुतनीकरण करणे, क्षमता वाढविण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी सल्लागार नेमण्यात येऊन सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केले आहेत.विठ्ठलवाडी, एरंडवणे, बोपोडी व नवीन नायडू या प्रकल्पांसाठी IFAS तसेच बहिरोबा व तानाजीवाडी या प्रकल्पांसाठी Sequential Batch Reactor या तंत्रज्ञानावर सांडपाणी शुद्धीकरण प्रकिया प्रस्तावित आहे. त्यामुळे राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचे निकष साध्य करता येणार आहेत.०९ प्रकल्पांपैकी बाणेर, खराडी व मुंढवा या तीन प्रकल्पांमध्ये SBR या आधुनिक तंत्रज्ञानावर सांडपाणी शुद्धीकरण प्रकिया होत असल्याने या प्रकल्पांसाठी अद्ययावतीकरण/ नुतनीकरण करणे प्रस्तावित नाही.दरम्यान JICA हा महापालिकेचा दुसरा प्रकल्प आहे. त्यात नवीन ११ मैलापाणी शुद्धीकरण केंद्र बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी केंद्र सरकारला जपान सरकारच्या जायका कंपनीने कर्जपुरवठा केला आहे. तर आता राज्य सरकार ने मंजूर केलेला हा प्रकल्प देखील काही मैलापाणी शुद्धीकरण केंद्र पडून नवीन बांधण्याचा आणि काही अद्ययावत करण्याचा आहे. त्यामुळे आता शहरातील नदी स्वच्छ होण्यास मदत होणार आहे.

सहा प्रकल्पांचा तपशील – फेज १ १) १३० MLD बहिरोबा मैलापाणी शुद्धीकरण केंद्राचे अद्ययावतीकरण करून याची क्षमता 200 MLD केली जाणार आहे. यात जुने केंद्र पाडून नवीन केंद्र तयार केले जाणर आहे. यासाठी ३३९,५१,१४,६३९/- एवढा खर्च अपेक्षित आहे.२) १७ MLD तानाजीवाडी मैलापाणी शुद्धीकरण केंद्राचे अद्ययावतीकरण करून हा प्रकल्प २६ MLD इतका केला जाणार आहे. हे देखील जुने केंद्र पाडून नवीन केंद्र बांधले जाणार आहे. त्यासाठी ४३,१९,६३,६२३.३२/- इतका खर्च अपेक्षित आहे.३) १८ MLD बोपोडी मैलापाणी शुद्धीकरण केंद्राचे नुतनीकरण करून तो २८ MLD चा केला जाणार आहे. त्यासाठी ४५,७२, ५३, ४९८. १५/- इतका खर्च अपेक्षित आहे.४) ५० MLD एरंडवणा मैलापाणी शुद्धीकरण केंद्राचे अद्ययावतीकरण केले जाणार आहे. त्यासाठी ६३,२८,४९,०२५/- इतका खर्च होणार आहे.फेज – २५) ३२ MLD विठ्ठलवाडी मैलापाणी शुद्धीकरण केंद्राचे अद्ययावतीकरण / नुतनीकरण करणे यासाठी ४८,४०,२६,०९९/- इतका खर्च येणार आहे.६) ११५ MLD नायडू मैलापाणी शुद्धीकरण केंद्राचे नुतनीकरण करण्यासाठी १३४,३२,२१,६३७ इतका खर्च येणार आहे. दरम्यान हा प्रकल्प महापालिकेची दोन खाती करत आहेत. मलनिस्सारण विभाग आणि विद्युत विभाग हे काम करत आहेत. मलनिस्सारण विभागाकडे बहिरोबा आणि तानाजीवाडी केंद्राची जबाबदारी आहे. तर बाकी ४ केंद्राची जबाबदारी ही विद्युत विभागाची आहे. यासाठी पुणे महानगरपालिकेकडून आधीच निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून १७/०६/२०२५ रोजी या कामाचे “अ” पाकीट उघडण्यात आले असता ०३ ठेकेदारांनी निविदा सादर केली आहे. सदर ठेकेदारांच्या कागदपत्रांची तांत्रिक छाननी या कामाचे सल्लागार प्रायमूव्ह इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कन्सल्टंट प्रा.लि. पुणे यांचेमार्फत चालू आहे. प्रकल्पाचा कालावधी साधारण २-३ वर्षाचा असेल. अस्तित्वातील मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पांची निविदा मान्यता प्रकिया पूर्ण झाल्यानंतर खालील तक्त्याप्रमाणे प्रकल्पांच्या क्षमतेत सुधारणा व मे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या निकषानुसार मैलापाण्यावर प्रकिया होणार आहे. प्रकल्पाचे पूर्ततेनंतर सदर ४७७ MLD मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पांची क्षमता ८९ MLD वाढून ५६६ MLD होणार आहे.केद्र शासन पुरस्कृत अमृत २.० अभियानाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार केंद्र शासन हिश्याचा निधी हा तीन टप्यात (२० % + ४० % + ४० %) वितरीत केला जाणार आहे. त्यानुसार केंद्र शासनाकडून वितरीत निधीच्या प्रमाणात राज्य हिश्याचा निधी केंद्र हिस्सा वितरीत करताना सोबत वितरीत केला जाईल. असे सरकारच्या आदेशात म्हटले आहे.

पुणे महापालिकेचे अस्तिवातील मैलापाणी शुद्धीकरण केंद्र (Existing STP) यांचा अद्ययावतीकरण/नूतनीकरण करण्याचा हा प्रस्ताव आहे. त्यानुसार ६ मैलापाणी शुद्धीकरण केंद्रांचा यात समावेश आहे. त्यासाठी ८४२ कोटीच्या प्रस्तावाला केंद्र कडून आधीच मंजुरी देण्यात आली आहे. आता राज्य सरकारने या प्रकल्पाला मंजूरी दिली आहे. दरम्यान यासाठीची टेंडर प्रक्रिया करण्यात आली असून अ पाकीट उघडण्यात आले आहे. त्यानुसार तीन निविदा आल्या आहेत. याची छाननी महापालिकेची समिती करत आहे.

पृथ्वीराज बी पी, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका.

पुणे विभागीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेचे भव्य उद्घाटन

पुणे : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे व पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे विभागीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा (१७ वर्षांखालील मुले व मुली) दिनांक २२ व २३ सप्टेंबर २०२५ रोजी भवानी पेठ येथील जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडियमवर सुरू झाली.

या स्पर्धेचे उद्घाटन पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी गृहराज्यमंत्री श्री. रमेशदादा बागवे यांच्या शुभहस्ते, तर अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार गौतम चाबुकस्वार होते.

यावेळी पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष नगरसेवक अविनाश बागवे, पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे कार्याध्यक्ष भरतकुमार व्हावळ, पिंपरी-चिंचवड बॉक्सिंग संघटनेचे सचिव मनोज यादव, पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष अशोक मेमजादे व जीवनलाल निंदाने, तसेच स्पर्धेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ओंकार कौले आदी मान्यवर उपस्थित होते.

या विभागीय स्पर्धेत पुणे जिल्हा, पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, अहिल्यानगर जिल्हा, अहिल्यानगर शहर, सोलापूर जिल्हा व सोलापूर शहर या सात संघांतील १८८ खेळाडू (९० मुले व ९८ मुली) सहभागी झाले आहेत. या स्पर्धेत विजेते ठरणारे खेळाडू अलिबाग (रायगड) येथे २५ ते २८ सप्टेंबर २०२५ दरम्यान होणाऱ्या राज्य शालेय बॉक्सिंग स्पर्धेत पुणे विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहेत, अशी माहिती पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे कार्याध्यक्ष भरतकुमार व्हावळ यांनी प्रास्ताविकात दिली.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचे स्वागत पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे सचिव विजय गुजर यांनी केले. पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे महासचिव अभिमान सुर्यवंशी यांनी आभार मानले. पिंपरी-चिंचवडचे राष्ट्रीय पंच ऋषिकांत वचकल यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन केले.

गब्बरसिंग टॅक्स..मधून मुक्ततेचे श्रेय राहुल गांधींनाच..मोहन जोशी

जाचक जीएसटीतून मुक्तता करण्याचे श्रेय राहुल गांधींनाच’ – माजी आमदार मोहन जोशी
भर पावसात असंख्य कार्यकर्त्यांचा आभार कार्यक्रमात सहभाग


पुणे : जातीय जनगणनेची मागणी असो, नोटाबंदीचा मुद्दा असो, एच-१बी व्हिसाचा प्रश्न असो किंवा आता जीएसटीचा जाच — प्रत्येक वेळी राहुल गांधीच आधी आवाज उठवतात आणि सरकारला जागे करतात.पुण्यातून राहुल गांधींनी सातत्याने जीएसटीचा मुद्दा मांडला. २०१७ पासून २०२५ पर्यंत सर्वसामान्य नागरिकांकडून झालेली कोट्यवधी रुपयांची लूट त्यांनी उघड केली. अखेर त्यांच्या सातत्यपूर्ण संघर्षामुळे जनतेला दिलासा मिळाला.
या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र साहित्य परिषद चौक, टिळक रोड, पुणे येथे विशेष आभार प्रदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष व माजी आमदार मोहन जोशी यांनी यावेळी बोलताना सांगितले की –
“जीएसटीत बदल घडवून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचे श्रेय राहुल गांधींनाच द्यावे लागेल. मोदी सरकारने जनतेवर लादलेल्या गब्बर सिंग टॅक्सविरुद्ध राहुल गांधींनी सातत्याने आवाज उठवला. हजारो कोटी रुपयांच्या लुटीबद्दल प्रश्न विचारून जनतेचा आवाज बनले. आज जीएसटीतून मिळालेली मुक्तता ही त्यांच्या संघर्षाचीच देण आहे.”
फलकावरील घोषणा
कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी हातात फलक घेतले होते. त्यावर – “झुकता है नरेंद्र मोदी, जब बोलता है राहुल गांधी”, “गब्बरसिंग टॅक्स हटवल्याबद्दल राहुल गांधींना आभार”, “जीएसटीतून मुक्तता – श्रेय राहुल गांधींना आणि काँग्रेसलाच”, “जातीनिहाय जनगणनेला मंजुरी – राहुल गांधींमुळे”, “जीएसटीतून मुक्तता, आता पाळी मत चोरीची” अशा घोषणा लिहिलेल्या होत्या.
मोदी सरकारवर टीका
मोदी सरकारने जीएसटी आणताना पाच स्लॅब लादले होते. त्यावेळीच राहुल गांधींनी याला “गब्बरसिंग टॅक्स” असे नाव देत तीव्र टीका केली होती. काँग्रेसने सुचविलेल्या जीएसटीमध्ये फक्त दोनच स्लॅब होते आणि जीवनावश्यक वस्तू त्यातून वगळलेल्या होत्या. मात्र मोदी सरकारने मनमानी करून जाचक कर प्रणाली लागू केली आणि जनतेची ८ वर्षे लूट केली, असा आरोप मोहन जोशी यांनी यावेळी केला.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवर व कार्यकर्ते
भर पावसातही असंख्य कार्यकर्त्यांनी ठामपणे सहभाग नोंदवला. त्यामध्ये – संजय बालगुडे, सुनील मलके, प्रशांत सुरसे, सौरभ अमराळे, प्रथमेश आबनावे, यशराज पारखी, स्वाती शिंदे, चेतन अगरवाल, आयुब पठाण, सुरेश कांबळे, प्रवीण करपे, शाबीर खान, भोला वांजळे, संकेत गलांडे, हसीना सय्यद, इंद्रजीत केंद्रे, गोरख पळसकर, अश्पाकभाई शेख, अनिकेत सोनावणे, अक्षय कांबळे, विकास सुपनार, मंगेश थोरवे, महेश विचारे, राजेश अल्हाट, महेंद्र चव्हाण, अविनाश राठोड, गणेश उबाळे, बाबा शिरसागर, महेश हराळे, विशाल मलके, अनिल आहेर आदी कार्यकर्त्यांचा सहभाग होता.

आधुनिक तंत्रज्ञानामुळे कुटुंब व्यवस्था मोडकळीस

डॉ. पराग काळकर यांचे मत ; श्री शिवाजी कुल तर्फे ‘आपलं घर’ संस्थेला बाल कार्य सन्मान पुरस्कार प्रदान 

पुणे : आज इंटरनेट आणि बदलत्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपली कुटुंब व्यवस्था जाणीवपूर्वक मोडकळीस आणली जात आहे. समाजामध्ये लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना सामावून घेण्याची क्षमता असून समाज म्हणून आपण कुठेतरी कमी पडतो आहे का? याचा विचार करायला हवा. आपण नेहमी म्हणतो माणसाने माणसाशी माणसासम वागणे. परंतु आपल्या व्यवहारांमध्ये अशी गोष्ट दिसत नाही, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी व्यक्त केले.

सदाशिव पेठेतील श्री शिवाजी कुल, पुणे या स्काऊट गाईड खुल्या पथकाचे यंदा १०८ वे वर्ष आहे. त्यानिमित्ताने श्री शिवाजी कुल व माजी कुलवीर संघातर्फे महात्मा फुले पेठेतील टिंबर मार्केटजवळील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन येथे कुलरंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये यंदाचा बाल कार्य सन्मान ‘आपलं घर’ या संस्थेला प्रदान करण्यात आला. 

कार्यक्रमाला शिक्षण प्रसारक मंडळी नियामक मंडळ सदस्य व ढोल ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, ज्येष्ठ कुलवीर माधव धायगुडे, माजी कुलवीर संघाच्या अध्यक्षा अर्पणा जोगळेकर, कुलाचे कुलमुख्य यश गुजराथी, कार्यकारी कुलमुख्य श्लोक मराठे, सहाय्यक कुलमुख्य साक्षी वाडकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. 

‘आपलं घर’ या संस्थेचे संस्थापक विजय फळणीकर व साधना फळणीकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. सन्मानचिन्ह, भेटवस्तू, स्मरणिका असे पुरस्काराचे स्वरूप होते. कुलाचे माजी कुलवीर नरेंद्र धायगुडे यांनी शंखवादनात केलेल्या विश्वविक्रमाच्या कामगिरीबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. 

डॉ.पराग काळकर म्हणाले,  शाश्वत मूल्य असल्याशिवाय एखादी संस्था शंभरी गाठत नाही. संस्था क्षणिक मूल्यावर आधारित असेल तर फार काळ टिकत नाही. चारित्र्यसंपन्न पिढी घडविण्यासाठी १०८ वर्षे सुरू असलेले श्री शिवाजी कुलाचे काम महत्त्वाचे आहे. मुले संध्याकाळच्या वेळी मैदानावर खेळायला जात होती, परंतु टोलेजंग इमारतींनी मैदानांची जागा घेतली आणि मैदानावर जाणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे.

पराग ठाकूर म्हणाले, श्री शिवाजी कुलाची चळवळ १०८ वर्षे सुरू आहे. आजकाल संस्था एक-दोन वर्ष झाली की पुरस्कर द्यायला सुरुवात करतात. आणि त्याविषयी अनेकांच्या मनात तिरस्कार निर्माण होतो. कारण पुरस्कार उदंड झाले आहेत. श्री शिवाजी कुलाने शंभर वर्षानंतर पुरस्कार द्यायला सुरुवात केली आहे, याचे विशेष कौतुक करायला हवे.

विजय फळणीकर म्हणाले, श्री शिवाजी कुल ही संस्था पुण्यात अतिशय जोमाने आणि तळमळीने काम करत आहे. काम कसे करावे ही शिकवण पुरस्काराच्या माध्यमातून श्री शिवाजी कुलाकडून घेतली आहे, असेही त्यांनी सांगितले. संस्थेतर्फे आयोजित बाल कार्य सन्मान सोहळ्यासोबत कुलरंग महोत्सवांतर्गत कुलवीरांचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम देखील झाले.पुणे शहर भारत स्काऊट आणि गाईड स्थानिक संस्थेचे कार्यक्रमाला विशेष सहकार्य मिळाले. कार्यक्रमाला श्री शिवाजी कुलाचे आजी-माजी कुलवीर, मुले-मुली व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

पुरस्कार प्राप्त शिक्षक हे राज्याचे ब्रँड ॲम्बेसेडर-उपमुख्यमंत्री अजित पवार

0

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गौरव पुरस्कारांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण

आदर्श शैक्षणिक कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यास पाच कोटींचा पुरस्कार देणार-शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मुंबई दि. 22 :- विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश देण्याचे काम शिक्षक करतात. त्यामुळे शिक्षकांचा सन्मान हा राष्ट्रनिर्मितीचा सन्मान आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकापुरते न शिकवता, कौशल्याधारित शिक्षण, समस्यांचे निराकरण, टीमवर्क आणि मूल्याधारित शिक्षण, ज्ञानासोबत सद्गुणांची शिकवणूक देऊन स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांमध्ये विश्वास निर्माण होईल अशी सशक्त पिढी घडवावी. पुरस्कार प्राप्त शिक्षक हे राज्याचे ब्रँड ॲम्बेसेडर आहेत, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गौरव पुरस्कार वितरित करण्यात आले. एनसीपीएच्या टाटा थिएटर मध्ये झालेल्या या समारंभात राज्यातील 111 गुणवंत शिक्षकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर, आमदार ज.मो.अभ्यंकर, ज्ञानेश्वर म्हात्रे, मनीषा कायंदे, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह यांच्यासह पुरस्कारप्राप्त शिक्षक आणि त्यांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते.

‘शिक्षकांचे कार्य महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी’- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शिक्षक केवळ पुस्तकातील धडा शिकवत नाहीत, तर विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देतात. आत्मविश्वास, संस्कार आणि प्रामाणिकपणाची बीजे त्यांच्या मनात पेरतात. शिक्षकांचे कार्य महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पुरस्कार वितरणाच्यावेळी दिलेल्या व्हीडिओ संदेशात केले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, कोविड काळात शिक्षकांनी दाखवलेले समर्पण कौतुकास्पद होते. मोबाईल, लॅपटॉप, ऑनलाईन क्लासेस, व्हॉट्सअॅप ग्रुप्स अशा साधनांचा वापर करून शिक्षण अखंड सुरू ठेवणाऱ्या शिक्षकांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे. राज्यात शिक्षण क्षेत्रात सकारात्मक आणि गुणात्मक बदल घडवण्याचा शासनाचा निर्धार असल्याचे स्पष्ट करताना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. अलीकडेच राज्य शासन आणि केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड ॲसेसमेंट इंडिया यांच्यात सामंजस्य करार झाला असून, त्याद्वारे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण कार्यक्रम, डिजिटल साक्षरता, हवामान शिक्षण, जीवन कौशल्ये व मूल्य शिक्षणाशी संबंधित अभ्यासक्रम राज्यातील शाळांमध्ये राबविले जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ग्रामीण तसेच शहरी शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अध्यापन पद्धतींचा लाभ विद्यार्थ्यांना मिळणार असून, शिक्षकांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशिक्षण होणार आहे. राज्याची शिक्षण व्यवस्था अधिक गुणवत्तापूर्ण, समावेशक आणि जागतिक मानकांशी अनुरूप करण्यासाठी निर्णायक पावले उचलली जात आहेत. यात शिक्षकांचे योगदान मोलाचे ठरणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले.

उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी बदलत्या काळानुसार शिक्षणामध्ये अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज यावेळी अधोरेखित केली. पूर्वी साक्षर-अनाक्षर यावर भर होता, नंतर संगणक साक्षरतेचा काळ आला. आता कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआय) युग आहे. यामुळे प्रत्येकाने एआय साक्षर होणे, डिजिटल शिक्षण पद्धती आत्मसात करणे आवश्यक आहे. पुरस्कारामुळे शिक्षकांची जबाबदारी वाढली असून शिक्षकांनी स्वत:ला अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे. राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळविलेल्या शिक्षकांचे कौतुक करुन अधिका‍धिक संख्येने शिक्षकांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर लौकिक मिळवावा, यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. जिल्हा परिषद शाळा आता कात टाकत असल्याबद्दल त्यांनी यावेळी समाधान व्यक्त केले. शासनाने मुलींना मोफत व्यावसायिक शिक्षण उपलब्ध करून दिल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. शिक्ष‍क पुरस्कारांच्या निमित्ताने त्यांनी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याचा कृतज्ञतेने उल्लेख करुन भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी शिक्षक दिनाच्या दिवशीच (5 सप्टेंबर) पुरस्कार वितरण व्हावे, अशी सूचना त्यांनी शिक्षण विभागाला केली.

देशाच्या प्रगतीमध्ये शिक्षकांचे मोठे योगदान – ॲड.राहुल नार्वेकर

भारत हा युवकांचा देश आहे. भारताला कौशल्ययुक्त युवकांचा देश बनवले तर एकही देश भारतीय मनुष्यबळाशिवाय काम करू शकणार नाही आणि जगाचे ग्रोथ इंजिन म्हणून भारत पुढे येईल, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी केले. भारत तिसरी मोठी अर्थव्यवस्था होईल आणि देशांच्या या प्रगतीमध्ये शिक्षकांचे मोठे योगदान असेल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणे हा शासनाचा संकल्प – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात शिक्षकांच्या कार्याचा गौरव करताना शिक्षकांच्या कार्यगाथा महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद असल्याचे सांगितले. कोविडसारख्या कठीण काळात जग थांबले, पण शिक्षकांनी शिक्षण थांबू दिले नाही. ज्ञानदानाची अखंड धारा सुरू ठेवत त्यांनी समाजाला प्रेरणा दिली, अशा शब्दात त्यांनी शिक्षकांचे कौतुक केले. शिक्षक हा समाजाला दिशा देणारा दीपस्तंभ असल्याचे नमूद करत, सावित्रीमाई फुले यांच्या कार्यामुळेच स्त्रीशिक्षणाची दारे उघडली आणि शिक्षणाचा प्रवास पुढे सरसावला, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार म्हणजे शिक्षकवृत्तीतील त्याग, कष्ट आणि समर्पणाचा उत्सव आहे. राज्य शासन शिक्षणाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून शाळांची पायाभूत सुविधा, डिजिटल शिक्षणाला चालना, शिक्षक प्रशिक्षण, आधुनिक व रोजगाराभिमुख अभ्यासक्रम तसेच ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत समान संधी पोहोचवणे या बाबींवर शासन सातत्याने काम करीत आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणे हा शासनाचा संकल्प असून पुरस्कारप्राप्त शिक्षकांनी घडवलेली पिढीच उद्याचा महाराष्ट्र व भारत उज्ज्वल करेल, असे उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी नमूद केले.

आदर्श शैक्षणिक कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यास पाच कोटींचा पुरस्कार देणार – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

पुढील वर्षापासून कला आणि क्रीडा क्षेत्रात कार्य करणाऱ्या शिक्षकांनाही सन्मानित केले जाणार आहे. तसेच जिल्हा स्तरावर आदर्श शैक्षणिक कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांना अनुक्रमे पाच कोटी, तीन कोटी आणि दोन कोटी रुपयांची पारितोषिके दिली जातील, असे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी जाहीर केले.

शब्द घडवतो विचार, विचार घडवतो माणूस आणि माणूस घडवतो देश. या प्रवासाची सुरुवात शिक्षकांकडून होते आणि म्हणूनच शिक्षक हे समाज व राष्ट्राचे खरे शिल्पकार आहेत. शाळा बदलते पण त्यासाठी एक जिद्दी शिक्षक लागतो अशा शब्दात मंत्री श्री. भुसे यांनी पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या कार्याचे कौतुक केले.

शालेय शिक्षण मंत्री श्री.भुसे म्हणाले, शिक्षकांचा प्रवास हा विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठीच नाही तर समाजाच्या जडणघडणीसाठी महत्वाचा आहे. महाराष्ट्र ही संत, समाजसुधारक आणि शिक्षणतज्‍ज्ञांची भूमी असून त्यांच्या कार्यातून समाजात परिवर्तन घडले. आजचे शिक्षक या परंपरेचे वारस आहेत. महाराष्ट्रातील अनेक शिक्षकांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर लौकिक मिळवला आहे. वारे गुरुजी, केशव गावित सर, दिलीप नाकाडे यांसारख्या शिक्षकांनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून दाखवली आहे. राज्यात गुणवत्तापूर्ण व आनंददायी शिक्षण दिले जात असल्याचे सांगून आदर्श शिक्षकांची बँक स्थापन करून त्यांच्या उत्तम कामांचा अनुभव विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यावर तसेच निपुण महाराष्ट्र अभियानाद्वारे वाचन, लेखन व अंकज्ञान कौशल्य वाढवण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन- डॉ.पंकज भोयर

महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रात मोठ्या उत्साहात नव्या योजनांची अंमलबजावणी सुरू असून, राज्य शासनाकडून शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जात असल्याचे राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या पीएम श्री स्कूल योजनेप्रमाणेच राज्यातही निवडक शाळांची निवड करून या योजनेचा विस्तार करण्यात येणार आहे. ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रम, केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड ॲसेसमेंट इंडिया यांच्यासोबत करण्यात आलेला सामंजस्य करार आदींबाबत त्यांनी यावेळी माहिती दिली. राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पारितोषिक रकमेतील वाढ करण्यात आली आहे. याशिवाय तालुकास्तरीय स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना सी. व्ही. रमण सायन्स सेंटर (नागपूर), जिल्हास्तरीय विजेत्यांना इस्रो (बेंगळुरू) तर राज्यस्तरीय गुणवंत विद्यार्थ्यांना थेट नासाला भेट देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह यांनी प्रास्ताविकात पुरस्कारांविषयी माहिती दिली. तर संचालक महेश पालकर यांनी आभार मानले.

“आदिशक्तीच्या उत्सवात महिला सक्षमीकरणाचा ध्यास – डॉ. नीलम गोऱ्हे यांची आकाशवाणीवर विशेष मुलाखत”

पुणे, दि. 22 सप्टेंबर : नवरात्रीच्या पावन पर्वावर आदिशक्ती मातेच्या उत्सवानिमित्त विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची महिला सक्षमीकरण या विषयावरची विशेष मुलाखत आज सकाळी १०.४५ वाजता आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होत आहे.

या मुलाखतीत केंद्र सरकारच्या गेल्या ११ वर्षांतील महिला सक्षमीकरणावरील कामकाजाचा आढावा सादर करण्यात आला असून, महिला व बालकल्याणाच्या विविध उपक्रमांमुळे महिलांच्या जीवनमानात झालेल्या बदलांवर डॉ. गोऱ्हे यांनी प्रकाश टाकला आहे.

ही मुलाखत आकाशवाणीच्या प्रतिनिधी डॉ. स्वाती महाळंक यांनी घेतली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्याचा महिलांच्या जीवनावर झालेला परिणाम या संदर्भात सखोल माहिती व विचार मांडले गेले आहेत.

“जनहिताय, बहुजन सुखाय” या ध्येयातून साकार झालेली ही विशेष वार्ता महिला सक्षमीकरणाच्या वाटचालीत दिशादर्शक ठरणारी आहे.

All India Radio Air Pune 792 AM live stream — listen online https://share.google/bnExgh0KhadFnG99w

फिलिपाइन्समध्ये नेत्यांचा भ्रष्टाचार:संतप्त जेन-झी उतरली रस्त्यांवर… 17 खासदारांनी 25% कमिशन घेतल्याची बांधकाम अब्जाधीशांची माहिती

0

नेपाळमधील भ्रष्टाचाराविरुद्ध जेन-झी लाटेनंतर, फिलीपाइन्समधील लोकही सरकारविरुद्ध रस्त्यावर उतरत आहेत. रविवारी राजधानी मनिलामध्ये हजारो लोकांनी निदर्शने केली. निदर्शकांच्या हातात फिलिपाइन्सचे झेंडे व बॅनर होते. त्यावर लिहिले होते, “आणखी काही नाही, त्यांना तुरुंगात टाका.”जेन-झीचा राग केवळ घोटाळ्यावर नाही तर सोशल मीडियावर त्यांच्या भव्य जीवनशैलीचा अभिमान बाळगणाऱ्या भ्रष्ट राजकारणी आणि कंत्राटदारांच्या मुलांवर, “नेपो बेबीज” वर देखील आहे. वर्षानुवर्षे पूर परिस्थितीशी झुंजणाऱ्या लोकांचा राग उफाळून आला आहे.आंदोलकांचे म्हणणे आहे की त्यांचे कर लक्झरी कार व परदेश दौऱ्यांवर वाया घालवण्यात आले.अब्जाधीश बांधकाम जोडपे पॅसिफिको व सारा डिस्काया यांनी सिनेटमध्ये साक्ष दिल्यावर घोटाळा उघडकीस आला,त्यंानी कंत्राटासाठी खासदार,अधिकाऱ्यांना २५% पर्यंत कमिशन द्यावे लागल्याचे सांगितले.

घोस्ट प्रोजेक्ट : ७६ हजार कोटींचे बांधकाम फक्त फायलींवर

डिस्कायांनी साक्ष दिली की त्यांना कंत्राटे मिळवण्यासाठी १७ खासदार व अधिकाऱ्यांना २५% कमिशन द्यावे लागले. या प्रकल्पांची किंमत अंदाजे ₹७६,००० कोटी होती. या जोडप्याने आरोप केला की अनेक प्रकल्प फक्त कागदावरच होते. यामुळे फिलीपिन्सच्या राजकारणात राजकीय गोंधळ निर्माण झाला. अध्यक्ष फर्डिनांड मार्कोस ज्युनियर यांनी चौकशी आयोग स्थापन केला आहे.

फिलिपाइन्स : प्रत्येक मान्सून, वादळात लोक निर्वासित

आंदोलकानुसार, कराचे पैसे सार्वजनिक सुरक्षेवर आणि पायाभूत सुविधांवर खर्च करायला हवे होते, परंतु ते राजकारण्यांच्या ऐषोआरामावर वाया घालवले गेले.

फिलिपाइन्समध्ये गत ३ वर्षांत मृत्यू
वर्ष मृत्यू निर्वासित
2023 38 4 लाख
2024 110 5 लाख
2025 30 3.5 लाख

जीएसबी संयुक्त कोंकणी सभेतर्फे पुण्यात भव्य शारदोत्सव28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरदरम्यान धार्मिक कार्यक्रमांसह दांडियाचे आयोजन

पुणे : जीएसबी संयुक्त कोंकणी सभा, पुणेतर्फे रविवार, दि. 28 सप्टेंबर ते गुरुवार, दि. 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत पुण्यात शारदोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू आणि गुजरातमधील सांस्कृतिक परंपरांचा संगम साधत हा शारदोत्सव साजरा केला जाणार आहे. शारदोत्सवाचे यंदाचे दुसरे वर्ष आहे, अशी माहिती जीएसबी संयुक्त कोंकणी सभेचे खजिनदार बिपिन पंडित यांनी दिली.

सरस्वती नदीच्या काठी असलेल्या गौड या गावी समाजाची पाळेमुळे रुजलेली असून यातूनच या समाजाला गौड सारस्वत ब्राह्मण अशी ओळख मिळाली. उद्योग-व्यवसायाच्या निमित्ताने गौड सारस्वत ब्राह्मण (जीएसबी) समाज अनेक प्रांतांमध्ये विखुरला गेला. महाराष्ट्रातही गौड सारस्वत ब्राह्मण समाजाची संख्या लक्षणीय असून पुण्यातही अनेक कुटुंबांचे वास्तव्य आहे. समाजाच्या एकत्रिकरणासाठी पुण्यात जीएसबी संयुक्त कोंकणी सभेची स्थापना 1983 मध्ये करण्यात आली. समाजातील रूढी-परंपरा पुढील पिढीपर्यंत प्रवाहित ठेवण्यासाठी या वर्षी शारदोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. यंदाचा शारादोत्सव नवरात्र कालावधीतील पंमची ते दशमीदरम्यान शुभारंभ लॉन्स, डी. पी. रोड म्हात्रे पुलाजवळ येथे आयोजित करण्यात आला आहे. हा महोत्सव सर्वांसाठी खुला असतो.
महोत्सवादरम्यान धार्मिक कार्यक्रमात प्रार्थना, सुप्रभात भजन, प्राणप्रतिष्ठापना, पंचदुर्गा, चंडिका हवन, कन्यापूजन, सुहासिनी पूजन, श्री सुक्त हवन, रामनामतारक मंत्र हवन, तुलभारसेवा, कुंकुमार्चन, पूर्णाहुती, माध्यान महापूजा, अन्न संतार्पण, दुर्गा नमस्कार, रंगपूजा, रात्रीपूजा, दीपलंकार सेवा, रामनाम पठण, रात्री भजन यांसह दि. 28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत दांडियाचे देखील आयोजन करण्यात आले आहे.
शाडू मातीपासून साकारली राजस मूर्ती
कर्नाटकातील उत्सवाप्रमाणेच पुण्यात शारदोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या उत्सवासाठी देवी सरस्वतीची सुमारे साडेचार फूट उंचीची राजस मूर्ती शाडू मातीपासून साकारण्यात आली आहे. मूर्तीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे शाडू माती कर्नाटकातूनच पुण्यात आणण्यात आली आहे. तसेच कर्नाटकातील कलाकारांनी ही मूर्ती घडविली आहे.

चीनने के-व्हिसा सुरू केला:जगभरातील प्रतिभावान तरुणांना आमंत्रित करण्याचे उद्दिष्ट; 1 ऑक्टोबरपासून लागू होईल

0

जगभरातील प्रतिभा आकर्षित करण्यासाठी चीनने “के-व्हिसा” सुरू करण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेच्या एच-१बी व्हिसाला पर्याय म्हणून त्याचे वर्णन केले जात आहे. हा नवीन व्हिसा १ ऑक्टोबर २०२५ पासून लागू होईल.

साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या मते, के-व्हिसा हा तरुण आणि कुशल व्यावसायिकांसाठी आहे. जे STEM (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित) क्षेत्रात गुंतलेले आहेत आणि ज्यांनी एखाद्या प्रसिद्ध विद्यापीठातून किंवा संशोधन संस्थेतून शिक्षण पूर्ण केले आहे किंवा सध्या तिथे शिक्षण घेत आहेत किंवा संशोधन करत आहेत.

अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. अधिक तपशील चिनी दूतावास आणि वाणिज्य दूतावासांकडून जाहीर केले जातील. चीन सरकारने ऑगस्टमध्ये या निर्णयाला मान्यता दिली.

चीन सध्या १२ प्रकारचे व्हिसा जारी करतो. सध्या, चीनमध्ये काम करण्यासाठी आर-व्हिसा आणि झेड-व्हिसा वापरले जातात. झेड-व्हिसा एका वर्षासाठी वैध आहेत, तर आर-व्हिसा फक्त १८० दिवसांच्या वास्तव्यास परवानगी देतात. आर-व्हिसासाठी कोणतेही शुल्क नाही, परंतु अर्ज प्रक्रिया लांब आणि गुंतागुंतीची आहे, म्हणूनच ते यशस्वी झालेले नाहीत.

दरम्यान, के व्हिसामुळे परदेशी नागरिकांना चीनमध्ये जास्त काळ राहण्याची परवानगी मिळते. तथापि, हे किती काळ टिकेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. के व्हिसामुळे काही फायदे मिळतात जे सध्याच्या झेड व्हिसामध्ये नाहीत. चीनमध्ये काम करू इच्छिणाऱ्या झेड व्हिसा असलेल्या परदेशी व्यक्तीला प्रथम चिनी कंपनी किंवा संस्थेकडून नोकरीची ऑफर किंवा प्रायोजकत्व मिळवावे लागते.

पण के-व्हिसासाठी ही अट नाही. अर्जदारांना स्थानिक कंपनीत नोकरी करण्याची आवश्यकता नाही. फक्त वय, शिक्षण आणि कामाचा अनुभव यासारख्या पात्रता विचारात घेतल्या जातील. यामुळे परदेशी व्यावसायिकांना अर्ज करणे सोपे होईल.

तुम्ही चिनी कंपनीत नोकरीसाठी अर्ज करू शकाल

झेड-व्हिसासाठी चिनी कंपनीत नोकरी आवश्यक आहे आणि व्हिसा फक्त त्या कंपनीसाठी वैध आहे. नोकरी बदलल्यास नवीन व्हिसा आवश्यक आहे. ही आवश्यकता के-व्हिसासाठी लागू होणार नाही. शिक्षण आणि अनुभवाच्या आधारे थेट अर्ज करता येतात.

के-व्हिसा शुल्काबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. तथापि, वेगवेगळ्या देशांच्या नागरिकांसाठी झेड-व्हिसा शुल्क वेगवेगळे असते.

भारतीय नागरिकांसाठी ते २.९ हजार रुपये, अमेरिकन नागरिकांसाठी २.३ हजार रुपये, कॅनेडियन नागरिकांसाठी ८.५ हजार रुपये आणि ऑस्ट्रेलियन नागरिकांसाठी ५.५ हजार रुपये आहे.

याशिवाय, व्हिसा अर्ज प्रक्रियेत सेवा शुल्क देखील जोडले जाते, जे भारतीयांसाठी २ ते ३ हजार रुपयांपर्यंत असते.

चीनने परदेशी प्रतिभेसाठी दोन कार्यक्रम सुरू केले

अहवालांनुसार, चीन २०३५ पर्यंत जागतिक तांत्रिक शक्ती बनू इच्छित आहे. हे साध्य करण्यासाठी त्याला परदेशी तज्ञ आणि कुशल कामगारांची आवश्यकता आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी चीनने दोन कार्यक्रम सुरू केले आहेत.

प्रतिभावान तरुण शास्त्रज्ञ कार्यक्रम – हा आशिया आणि आफ्रिकेतील ४५ वर्षांपर्यंतच्या संशोधकांसाठी चीनमध्ये काम करण्यासाठी आणि संशोधन करण्यासाठी आहे.

उत्कृष्ट तरुण शास्त्रज्ञ निधी प्रकल्प – हे ४० वर्षांपर्यंतच्या उच्च दर्जाच्या शास्त्रज्ञांना आणि अभियंत्यांना चीनमध्ये येऊन काम करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी आहे.

याशिवाय, चीनमधील प्रमुख विद्यापीठे आणि संशोधन संस्था देखील सर्वोत्तम विद्यार्थी आणि संशोधकांना आकर्षित करण्यासाठी चांगले पगार आणि बोनस देत आहेत.

अमेरिकेने एच-१बी व्हिसाचे शुल्क वाढवले

दोनच दिवसांपूर्वी अमेरिकेने नवीन एच-१बी व्हिसासाठी अर्ज करण्याचे शुल्क १ लाख डॉलर्स म्हणजेच सुमारे ८८ लाख रुपये वाढवले ​​आहे.

आता, हे शुल्क वर्षभराच्या H-1B व्हिसासाठी फक्त एकदाच आकारले जाईल. नूतनीकरणावर हे शुल्क आकारले जाईल की नाही हे स्पष्ट नाही.

पूर्वी, H-1B व्हिसाची किंमत ₹५.५ लाख ते ₹६.७ लाख दरम्यान होती. ती तीन वर्षांसाठी वैध होती आणि वेगळी फी भरून आणखी तीन वर्षांसाठी नूतनीकरण करता येत असे.

या व्हिसावर जगभरातून लोक अमेरिकेत काम करण्यासाठी जातात.

शाहिरी कला ही काळाची गरज :आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे

शाहीर हिंगे युवा कला गौरव पुरस्कार प्रदान 

पुणे :  आजची तरुण पिढी काही करत नाही, अशी केवळ ओरड करण्यापेक्षा या तरुण पिढीला योग्य दिशा दाखविण्याची गरज आहे. शाहिरी ही केवळ कला नाही तर महाराष्ट्राची परंपरा आहे. ही परंपरा तरुणांच्या माध्यमातून पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे ही काळाची गरज आहे, असे मत आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे यांनी व्यक्त केले.

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी तर्फे शाहीर हिंगे युवा कलागौरव पुरस्कार युवाशाहीर अजिंक्य लिंगायत यांना कर्वे रस्त्यावरील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह येथे प्रदान करण्यात आला. यावेळी मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. निवेदिता एकबोटे, अभिनेते तेजस बर्वे, प्रा. संगीता मावळे उपस्थित होते.

शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले, जोपर्यंत समाजामध्ये समस्या आहे, तोपर्यंत शाहिरी ही कला जिवंत राहणार आहे. आजही महाराष्ट्राच्याच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात शाहिरीच्या माध्यमातून अनेक जण समस्या मांडत आहेत. शाहिरी कला विविध माध्यमातून तरुणांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. तरच खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास तरुणांपर्यंत पोहोचू शकेल.

डॉ. निवेदिता एकबोटे म्हणाल्या, शाहिरी कला आत्मसात करणे ही मोठी जबाबदारी आहे. या कलेच्या माध्यमातून केवळ स्वतःच्या सुखासाठी कला सादर करणे महत्त्वाचे नाही, तर या कलेच्या माध्यमातून समाजामध्ये सकारात्मक बदल कशा प्रकारे करू शकतो याची जाणीव कलाकारांना असते. त्यामुळे कलाकार हे केवळ कलाकार राहत नाही तर ते एक प्रकारे सामाजिक कार्य करणारे कार्यकर्ते असतात. आजच्या तरुणांना संस्कारक्षम करण्यासाठी शाहिरी अत्यंत उपयोगी आहे.

तेजस बर्वे म्हणाले, नवीन पिढीपर्यंत शाहिरी प्रशिक्षण मोफत पोहोचवण्याचे अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य शाहीर हेमंतराजे मावळे हे आपल्या सहकाऱ्यांसह करत आहेत. केवळ त्यांच्या संस्थेसाठीच नव्हे तर समाजासाठी ही अत्यंत गौरवास्पद गोष्ट आहे. आजच्या तरुणांना योग्य दिशा दाखवण्यासाठी शाहिरीच्या माध्यमातून शिक्षण दिले जात आहे हे निश्चितच कौतुकास्पद बाब आहे.

प्रा. संगीता मावळे यांनी प्रास्ताविक केले. नंदिनी देवकर यांनी सूत्रसंचालन केले व सौ. प्रिती खोसे यादव यांनी आभार मानले. पुरस्कार वितरण समारंभानंतर स्वर्गीय रघुनाथराव कचरे स्मृती रुपये ११,०००/- (रुपये अकरा हजार) कलागौरव निधी प्रदान करण्यात आला, तसेच अजिंक्य लिंगायत यांचा शाहिरीचा कार्यक्रम झाला.