पुणे : जय भवानी जय शिवाजी चा जयघोष… ढोल ताशा ंचा गजर… लाठी काठींचे मर्दानी खेळ… विद्यार्थ्यांच्या हातांमध्ये फडकणारे भगवे झेंडे अशा उत्साहपूर्ण वातावरणात बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद घेऊन कार्यरत असणाऱ्या श्री शिवाजी मराठा सोसायटीमध्ये शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला.
श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या वतीने शिवजयंती उत्सव आणि मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवार पेठेतील सोसायटीच्या प्रांगणातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पोलिस उपायुक्त संदीप सिंह गिल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन मिरवणुकीला प्रारंभ झाला. सोसायटीचे मानद सचिव अण्णा थोरात, उपाध्यक्ष राजेंद्र जगताप, सहसचिव विकास गोगावले, खजिनदार जगदीश जेधे, नियामक मंडळ अध्यक्ष सत्येंद्र कांचन, कारभारी मंडळ अध्यक्ष विलास गव्हाणे, कमलताई व्यवहारे, शाखाप्रमुख, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी तब्बल १५०० पेक्षा अधिक विद्यार्थी पांरपारिक वेशात तसेच शिवाजी महाराज आणि मावळ्यांच्या वेशात सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी पर्यावरण जागृती, राष्ट्रीय एकात्मता, स्वच्छ पुणे -स्वच्छ भारत संदेश मिरवणुकीत दिला. यावेळी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
श्री शिवाजी मराठा सोसायटी – बाजीराव रस्त्यामार्गे चितळे बंधू मिठाईवाले – महात्मा फुले मंडई – शिवाजी रोड मार्गे पुन्हा श्री शिवाजी मराठा सोसायटीमध्ये मिरवणूकीचा समारोप झाला. जिजाऊ आणि बाल शिवरायाची मूर्ती असलेला फुलांनी सजलेला रथ मिरवणुकीच्या अग्रभागी होता. मिरवणुकीत जयंत नगरकर यांचा नगारा, शिवगर्जना पथकाचे ढोल ताशा वादन आणि गंधर्व बँडचे वादन झाले.
अण्णा थोरात म्हणाले, श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची ३९४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांनी साहसी खेळ सादर केले. शिवरायांचे नेतृत्वगुण, त्यांचे शौर्य स्वराज्यासाठी त्यांनी केलेले कार्य विद्यार्थ्यांना कळावे आणि त्यांनी ते अंगिकारावे यासाठी विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष सहभागातून मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या वतीने भव्य शिवजयंती मिरवणूक-तब्बल १५०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी मिरवणूकीत दिला स्वच्छ पुणेचा संदेश
निवडणूक आयोग 5 वर्षे काय करतो?:राज ठाकरेंचा शिक्षकांना कामाला जुंपण्यावरून थेट सवाल
मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची सकाळीच भेट घेतली. यामुळे भाजप आणि मनसे यांच्यातील युतीची चर्चा सुरु झाली होती. या बाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, राज ठाकरे यांनी उत्तर देणे टाळले. आज मी राजकीय विषयावर बोलणार नाही. जेव्हा त्या विषयी बोलायचे, तेव्हा बोलणार असल्याचे राज ठाकरे म्हणाले. एकंदरीत त्यांनी या विषयावर कोणतेही भाष्य करणे टाळले.
मुंबई-शारदाश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक आणि शिक्षक यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. शिक्षकांना निवडणुकीच्या कामाला लावू नका, अशी मागणी या पालक आणि शिक्षकांनी राज ठाकरे यांच्याकडे केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता या पालकांनी व्यक्त केली होती. यावर राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला प्रश्न विचारला आहे. या शिक्षकांना निवडणुकीच्या कामात घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना शिकवण्याची जबाबदारी कोणाची? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. असे असेल तर निवडणूक आयोग पाच वर्ष काय करते? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
निवडणूक आयोगाकडे पाच वर्ष काय काम असते? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. निवडणुका तोंडावर आल्या की घाईघाईने शिक्षकांना कामाला लावायचे, असे का केले जाते? असा प्रश्नही राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. पहिली ते चौथीच्या शिक्षकांना निवडणुकीच्या कामाला बोलावण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. कोणत्याही शिक्षकाने निवडणुकीच्या कामावर रुजू होऊ नये, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे. त्यामुळे अशा शिक्षकांवर कोण शिस्तभंगाची कारवाई करतो, ते आम्ही पाहणार असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. या संदर्भात आम्ही निवडणूक आयोगाकडे भेटण्यासाठी जाणार आहोत. ते पाच वर्ष काय काम करतात? असा प्रश्न आम्ही त्यांना विचारणार असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. ही काही देशातील पहिली निवडणूक नाही, त्यामुळे सर्व नियोजन का केले जात नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यासाठी निवडणूक आयोगावरच कडक कारवाई करायला हवी, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे. लवकरच आमचे नेते निवडणूक आयोगाशी चर्चा करणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.
मराठा आरक्षणावर होणाऱ्या विशेष अधिवेशनाचा काहीही परिणाम होणार नाही. हे सर्व दिखावा केला जात आहे. हा विषय राज्याचा नाहिच. यामध्ये तांत्रिक अडचणी आहेत. त्याबाबत केंद्रामध्येच तोडगा निघु शकतो, त्यामुळे हे सर्व मराठा समाजाला झुरवण्याचे काम सुरु असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. मी मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीच्या वेळीच त्यांना सर्व सांगितले होते. राज्य सरकारच्या माध्यमातून या बाबत काहीच होणार नसल्याचा दावा पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी केला आहे.
आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू – आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत
पुणे: आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या पुढाकाराने आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून उमेदवारांना संपूर्ण कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर त्याच दिवशी आदेशही दिले जात आहेत.
ही भरती प्रक्रिया गतीने व पारदर्शकपणे पूर्ण करण्यासाठी आरोग्य मंत्री डॉ.सावंत यांनी भरती कंपनीच्या प्रतिनिधी समवेत वेळोवेळी बैठका घेऊन प्रक्रिया संपूर्ण पारदर्शी आणि सुरळीत पडण्याविषयी निर्देश दिले होते. आरोग्य विभागातील गट ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील १० हजार ९४९ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. संपूर्ण परीक्षा प्रक्रिया राबविण्यासाठी टीसीएस संस्थेची निवड करण्यात आली होती.

परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता येण्यासाठी टिसीएसकडून सीसीटिव्ही रेकॉर्डिंग, बायोमेट्रीक्स हजेरी, फिंगर प्रिंट व आयरीस तपासणी सुविधा वापरण्यात आल्या आहेत . तसेच ईलेक्ट्रॉनिक्स कार्पोरेशन ऑफ इंडिया लि. (ईसीआयएल) यांच्याकडून परीक्षा केंद्रामध्ये परीक्षेच्या कालाधीत ५-जी मोबाईल जॅमर्स ची व्यवस्थाही करण्यात आलेली होती. परीक्षेत होणारा गैरप्रकार रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व व्यवस्था करण्यात आल्या होत्या.
परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी विभागनिहाय राज्यभर सुरू असून पुणे विभागातील आरोग्य भवन, राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग, प्रबोधन हॉल पुणे येथे या विभागातील समुपदेशन व नियुक्तीचे आदेश तात्काळ देण्यात येत आहेत. यामध्ये उमेदवारांना विभागाच्यावतीने संपूर्ण सहकार्य करण्यात आले. उमेदवारांना असणाऱ्या विविध समस्यांचे निवारण करण्यात येत आहे. ही भरती प्रक्रिया २ मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सर्व पदांची भरती प्रक्रिया अगदी पारदर्शी आणि सुरळीतरित्या पार पडल्याबद्दल निवड झालेल्या उमेदवारांनी प्रा. डॉ. सावंत यांचे आणि आरोग्य विभागाचे आभार मानले. काही उमेदवारांना प्रातिनिधिक स्वरूपात आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्ती आदेश देण्यात आले. यावेळी उमेदवारांनी भरती प्रक्रिये बाबत समाधान व्यक्त केले.
यावेळी आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांनी भरती प्रक्रियेची माहिती दिली.
वर्षानुवर्षे रिक्त असलेल्या जागा भरणे आरोग्यमंत्री प्रा.डॉ. सावंत यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे शक्य झाले आहे.
अवंतिका पासून अनेक उत्तोत्तम महिला-केंद्रित भूमिकांपर्यंत तमन्ना भाटियाच्या कलाकारी प्रवासाची अनोखी झलक
पॅन इंडियाची स्टार तमन्ना भाटिया हिने “बाहुबली: द बिगिनिंग” मधील कुशल लढाऊ अवंतिकाच्या भूमिकेने तिच्यासाठी भारतीय चित्रपटसृष्टीत एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरलं ज्यामुळे ती अधिक महिला-केंद्रित भूमिकांकडे वळली. एका महिला योद्धाच्या भूमिकेने केवळ प्रेक्षकांनाच भुरळ घातली नाही तर अनेक उत्तोत्तम सिनेमात महिला पात्रांना तिने सशक्त केलं.
अवंतिका नंतर तमन्नाने विविध चित्रपट आणि वेब सिरीजमधील तिच्या भूमिकांमधून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. बबली बाउन्सर या डिजिटल चित्रपटाद्वारे तिने महिलांचा बाउन्सर होण्याचा स्टिरियोटाइप मोडला तर नोव्हेंबर स्टोरीज या तमिळ वेब सीरिजसह OTT वर पदार्पण केलं. तमन्ना याआधी कधीही न पाहिलेल्या सशक्त स्त्री-केंद्रित प्रकारात उतरली. तिची पुढची वेब सिरीज “जी कर्दा,” तिने लावण्यची भूमिका साकारली, तिच्या अभिनयातील अष्टपैलुत्व आणि खोली दाखवून तिला एक सशक्त महिला कलाकार म्हणून सिद्ध केले. “आखरी सच” मधील इन्स्पेक्टर अन्या स्वरूप आणि “लस्ट स्टोरीज 2” मधील शांतीच्या भूमिकेत तमन्नाच्या अभिनयाने एक अभिनेता म्हणून तिची अष्टपैलुत्व दाखवली, गुंतागुंतीच्या पात्रांना संबोधित केले, स्वतःला तिच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर ढकलले आणि कृपेने परफॉर्मन्स दिला.भारतीय चित्रपटसृष्टीतील तिचे योगदान तिच्या वैयक्तिक कामगिरीच्या पलीकडे आहे; ती व्यवसायातील महिलांच्या सक्षमीकरणाचे आणि प्रतिनिधित्वाचे प्रतीक बनली आहे, ज्यामुळे तिच्या संपूर्ण भारतातील लोकप्रियतेत भर पडली आहे. तमन्ना भाटियाचा अवंतिका ते जी करदा लस्ट स्टोरीज 2 आणि आखरी सच मधील तिच्या अलीकडील भूमिकांपर्यंतचा प्रवास तिच्या स्त्री सक्षमीकरण भूमिकांना अनोखा न्याय देतात. वर्क फ्रंटवर तमन्ना निखिल अडवाणी दिग्दर्शित जॉन अब्राहमच्या विरुद्ध हिंदी चित्रपट वेदा आणि पोंगल 2024 च्या रिलीजसाठी तमिळ चित्रपट अरनामनाई 4 मध्ये दिसणार आहे.
शिवाजीराव सावंत स्मृती दालनाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत लोकार्पण
कोल्हापूर: थोर, प्रतिभावंत साहित्यिक शिवाजीराव सावंत यांच्या स्मृती जतन करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा येथे जिल्हा वार्षिक योजनेतून 50 लाख रुपये व जिल्हा परिषदेच्या 30 लाख रुपयांच्या निधीतून साकारण्यात आलेल्या ‘मृत्युंजय’ कार शिवाजीराव सावंत स्मृती दालनाचे लोकार्पण पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते पार पडले, यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार प्रकाश आबीटकर, आमदार राजेश पाटील, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, स्वर्गीय शिवाजीराव सावंत यांच्या पत्नी मृणालिनी शिवाजीराव सावंत, मुलगा अमिताभ सावंत, पत्रकार तथा निर्धार संस्थेचे समीर देशपांडे व मृत्यंजय प्रतिष्ठान चे सागर देशपांडे तसेच सावंत कुटुंबीय व तालुक्यातील मान्यवर उपस्थित होते. हे दालन उभारण्यासाठी सहकार्य करणाऱ्या विविध मान्यवरांचा व कुटुंबीयांचा सन्मान यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
पालकमंत्री श्री मुश्रीफ म्हणाले, अत्यंत प्रतिकूल शेतकरी कुटुंबात शिवाजीराव सावंत जन्मले होते. लहानपणी एका निबंधामध्ये त्यांनी ‘आपण लेखक होणार’ असे लिहिले होते आणि याच दिशेने प्रवास करत जिद्दीने ते थोर प्रतिभावंत साहित्यिक बनले. शिवाजीराव सावंत हे हयात असते तर साहित्य क्षेत्राला आणखी झळाळी मिळाली असती अशा शब्दात त्यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करुन शिवाजीराव सावंत स्मृती दालन जतन होण्यासाठी आणि त्यांच्या स्मृती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले. पारगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
शिवाजीराव सावंत स्मृती दालनाच्या माध्यमातून नवोदित साहित्यिकांना प्रेरणा मिळेल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले, प्रख्यात साहित्यिक शिवाजीराव सावंत यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या केवळ आठवणी न जपता समाजात चांगले काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम पुण्यात सुरु केला आहे, हे प्रेरणादायी आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हे उत्कृष्ट स्मृती दालन उभारण्यात आले असून त्याची देखभाल दुरुस्तीही वेळोवेळी व्हायला हवी. शिवाजीराव सावंत स्मृती दालनाच्या माध्यमातून नवोदित साहित्यिकांना प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त करुन या दालनामध्ये राज्यातील नामांकित साहित्यिकांच्या उपस्थितीत वर्षातून एक तरी साहित्यिक सोहळा आयोजित करावा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
आमदार प्रकाश आबीटकर म्हणाले, सध्या केवळ सोशल मीडियातील मजकुराच्या वाचनावर आपला भर असल्यामुळे वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. आजऱ्यात उभारण्यात आलेले हे स्मृतती दालन सध्याच्या तरुण पिढीला प्रेरणादायी ठरेल. या दालनाचा उपयोग तरुण पिढीला जास्तीत जास्त पद्धतीने कशा प्रकारे होईल यासाठी प्रयत्न व्हावेत. शासकीय इमारती दालने यांचा उपयोग जास्तीत जास्त लोकांना करून देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नियोजनबद्ध प्रयत्न व्हावेत. स्वर्गीय सु.रा. देशपांडे यांच्याप्रमाणे त्यांची दोन्ही मुले पत्रकार सागर व पत्रकार समीर देशपांडे हे सामाजिक कार्यासाठी झटत असून हे दालन उभारण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केल्याबद्दल त्यांचे कौतुक आहे.
शिवाजीराव सावंत स्मृतीदालन हे जिल्ह्यासह राज्यभरातील युवकांना माहितीपूर्ण व मार्गदर्शनपर ठरेल, असा विश्वास आमदार राजेश पाटील यांनी व्यक्त केला.
साहित्यिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे प्रख्यात साहित्यिक शिवाजीराव सावंत यांचे स्मृतीदालन युवकांना प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त करुन विविध क्षेत्रात नाव उंचावणाऱ्या आजरा तालुक्यातील प्रतिभावंतांच्या माहितीवर आधारित कलादालन उभारण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी मिळावा, अशी अपेक्षा प्रास्ताविकातून निर्धार संस्थेचे समीर देशपांडे यांनी व्यक्त केली.
मृत्युंजय प्रतिष्ठानचे सागर देशपांडे यांनी साहित्यिक शिवाजीराव सावंत यांचे जीवनचरित्र उलगडले. शिवाजीराव सावंत यांचे साहित्य वाचून प्रेरणा घेवून अनेक व्यक्तींनी आत्महत्येचा विचार बाजूला सारला, तर अनेकांना सीमेवर लढण्याचे बळ मिळाल्याचे दाखले त्यांनी मनोगतातून दिले. साहित्यकृती जगण्याचे बळ देतात, जवानांना देशासाठी लढण्याचे बळ देतात. वाचन संस्कृती जपण्यासाठी, साहित्यिकांच्या स्मृती जपण्यासाठी शासन सहकार्य करत असून समाजानेही यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
शिवाजीराव सावंत स्मृतीदालनाविषयी
कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात जिल्हा वार्षिक योजना व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या शिवाजीराव सावंत स्मृती दालनामध्ये साहित्यिक शिवाजीराव सावंत यांची सचित्र माहिती देण्यात आली आहे. त्यांनी लिहिलेल्या मृत्युंजय कादंबरी विषयीची माहिती, छावा कादंबरी चे पूजन केल्याच्या प्रसंगाचे छायाचित्र बालपण शिक्षण व विवाह मृत्युंजय कादंबरी ला मिळालेला भारतीय ज्ञानपीठ संस्थेचा 1995 चा मूर्ती देवी पुरस्कार जाहीर झाल्याचे व तत्कालीन उपराष्ट्रपती के.आर. नारायणन यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केल्याचे व विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींसोबतची छायाचित्रे, भावमुद्रा, पत्रव्यवहार शासनाच्या वतीने व विविध संस्थांच्या वतीने मिळालेले पुरस्कार, विविध ग्रंथसंपदा त्याचबरोबर त्यांच्या निधनाची वृत्तपत्रीय कात्रणे व शोकसंदेश देण्यात आला आहे. तसेच प्रतिभावंतांचे आजरे या दालनामध्ये कलामहर्षी बाबुराव पेंटर, प्रतिभावंत शिक्षणतज्ञ जे. पी. नाईक, वनस्पतीशास्त्रज्ञ श्रीपाद लक्ष्मण आजरेकर, केसरीचे युरोप प्रतिनिधी द. वि. ताम्हणकर, ,’ झुंजार’ चे संपादक बाबुराव ठाकूर, संयुक्त महाराष्ट्राचा लढा गाजवणारे शाहीर गव्हाणकर, ‘सोबत’ कार ग.वा. बेहेरे, संस्कृत पंडित के. ना. वाटवे यांचीही सचित्र माहिती याठिकाणी देण्यात आली आहे.
गडकोट, किल्ले हा आपला ठेवा; तो जपण्याचे काम करु – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पुणे, दि. १९: छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकोट किल्ले हा आपला ठेवा असून तो जपण्याचा प्रयत्न नक्की करु. पहिल्या टप्प्यात शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित विविध २० पर्यटन स्थळे विकसित होत आहेत, त्यात किल्ले रायगडाप्रमाणेच शिवनेरीचाही विकास करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
किल्ले शिवनेरीवर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी वास्तुकला, अभियांत्रिकी, किल्ल्यावरील प्रत्येक थेंब पाण्याचा उपयोग करून घेण्याची दूरदृष्टी त्या काळी दाखवली. शिवछत्रपती म्हणजे पराक्रम, शौर्य, त्याग, समर्पण आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व होते. ते सर्वव्यापी होते आणि त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन काम केले. ते युगपुरुष, युगप्रवर्तक आणि रयतेचे राजे होते. अठरापगड जातीचे, धर्माचे लोक त्यांनी एकत्र आणले. प्रजेच्या दुःखापुढे, कल्याणापुढे स्वतःचे दुःख, आराम कवडीमोल मानला. त्यांनी तलवार हाती घेतली पण निष्पापांच्या रक्ताने रंगू दिली नाही. त्यामुळे त्यांच्या तलवारीला रक्ताचा वास येत नाही तर मानवतेचा सुगंध येतो. ते केवळ व्यक्ती नाही तर विचार होते.
शिवरायांकडील एक तरी गुण आपण सर्वांनी घेतल्यास शिवजयंती साजरी करताना त्यांना हेच खरे अभिवादन ठरेल. त्यामुळे समाज, राज्य, देश आणि माणूस म्हणून आपण अधिक प्रगती करू, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मध्यंतरी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीदेखील नौदलाच्या कार्यक्रमात त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केले तसेच नौदलाच्या ध्वजावर शिवप्रतिमेला समाविष्ट केले ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. कुपवाडा येथे भारत पाकिस्तान सीमेवर शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यात आला. आग्र्याला देखील दिवाण-ए- आम येथे शिवाजी महाराज यांची जयंती गतवर्षीपासून साजरी करतो, असेही त्यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रधानमंत्री यांनी शिफारस केली आहे. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. जुन्नर हा पर्यटन तालुका असून बिबट सफारी विकसित करण्याचे घोषित केले आहे. येथील सुकाळवेढे, बोरघर, डूचकेवाडी, खेतेपठार मार्गे शिवजन्म भूमी आणि भीमाशंकर ही तीर्थक्षेत्रे जोडण्याचा प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले.
निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना नुकसान भरपाईची घोषणा
निसर्ग चक्रीवादळामुळे हिरडा पिकाचे झालेल्या नुकसान भरपाईचे १५ कोटी रुपये विशेष बाब म्हणून देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करतानाच उपोषणकर्त्यांना उपोषण सोडण्याचे आवाहन केले.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मंगळवारी विशेष अधिवेशन
मराठा समाजाला इतर कुणाचेही नुकसान न करता, कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता टिकणारे, कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देण्यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन उद्या घेण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले. ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यभरात शिवाजी महाराजांच्या कार्यावर कार्यक्रम घेतले आहेत. ‘जाणता राजा’ महानाट्याचे कार्यक्रम जिल्हावार घेत आहोत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

किल्ल्यांच्या विकासाकरिता एएसआयचे नियम शिथिल करण्यासाठी केंद्र शासन सकारात्मक – देवेंद्र फडणवीस
राज्यातील किल्ल्याचे संवर्धन करीत असताना भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून (एएसआय) येणाऱ्या अडचणींबाबत केंद्र शासन स्तरावर पाठपुरावा करून बैठक आयोजित करण्यात आली. त्यामध्ये पुरातत्व खात्याची प्रमाणित कार्यपद्धती सोपी करण्याबाबत आश्वासन देण्यात आले. पद्धत सोपी झाल्यानंतर किल्ले संवर्धन कामाला गती येईल. छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्ले म्हणून जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश करण्यासाठी शिफारस करण्यात आली आहे, असे उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवराज्याभिषेक करुन स्वराज्य स्थापन केले. महाराजांनी राज्यभिषेक केला; परंतु राजा म्हणून एकही दिवस विश्रांती घेतली नाही. त्यांची प्रेरणा घेऊनच शासन काम करत आहे. जो पर्यंत चंद्र-सूर्य आहे तोपर्यंत शिवाजी महाराज यांचा जयजयकार या भारत भूमीत होतच राहील. शिवराज्यभिषेक सोहळ्यानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून शिवाजी महाराज यांचे विचार, चरित्र बालकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करण्यात येत आहे. प्रत्येक विभागीय मुख्यालयी शिवसृष्टी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिणामी पुढील पिढीमध्ये त्यांचे तेज बघायला मिळेल, असा विश्वासही श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज ही आपली प्रेरणा असल्याचे सांगितले आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन काम करण्यात येत आहे. त्यामुळे रयतेने विश्वस्त म्हणून आम्हाला संधी दिली असून त्यांच्या कल्याणकरिता प्रयत्न करु, असे आश्वासन श्री. फडणवीस यांनी दिले.
माँ जिजाऊ यांच्या प्रेरणेने शिवाजी महाराजांनी समाजात हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याच्या मूलमंत्राचे रोपण केले. समाजातील अतिशय सामान्य व्यक्ती आणि अठरा पगड जातीला एकत्र करून, त्यामधील पुरुषत्व जागृत केले. मुगलासारख्या बलाढ्य शत्रूचा नि:पात केला. शिवरायांनी अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याची शिकवण दिली, असेही त्यांनी सांगितले.

किल्ल्याच्या संवर्धनासाठी निधी कमी पडून देणार नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा इतिहास, आदर्श सर्वांच्या डोळ्यासमोर राहावा यासाठी राज्यातील विविध किल्ले संवर्धनाचे काम राज्य शासनाने हाती घेतले आहे. किल्ले शिवनेरीच्या संवर्धनासाठी ८३ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. किल्ल्याच्या संवर्धनासाठी राज्य शासन निधी कमी पडून देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती सर्वत्र उत्साहात साजरी करीत आहोत. शिवाजी महाराजांनी ३५० वर्षांपूर्वी रायगड किल्यावर स्वतःचा राज्याभिषेक करून अखंड हिंदुस्थानसोबत युरोपातील राज्यसत्तांना अचंबित केले. हा शिवराज्याभिषेक सोहळा राज्यभरात विविध कार्यक्रमांनी साजरा करत आहोत. त्यांचा सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा, एकतेचा विचार येत्या पिढीला कळण्याचा निर्धार या जयंतीनिमित्त करुया. सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यातील सर्व जातीधर्माच्या नागरिकांमध्ये गुलामगिरीच्या विरुद्ध झुंजण्याचा विचार त्याकाळात शिवरायांनी पेरला. परकीय सत्तेसमोर सार्वभौम स्वराज्याची स्थापन करत रयतेला आपले वाटावे असे राज्य, स्वराज्य त्यांनी स्थापन केले, याची प्रेरणा राज्य शासन घेऊन काम करीत आहे.
जून २०२० मध्ये निसर्ग चक्रीवादळाने हिरडा पिकाचे नुकसान झालेल्या जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना १५ कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्याबाबत उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सूचना केली.
प्रारंभी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिवजन्मस्थानी पारंपरिक वेशातील महिलांनी शिवरायांची महती सांगणारा पाळणा गायला. राष्ट्रगीत तसेच ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताची धून पोलीस बँड पथकाने वाजवून सलामी दिली. त्यानंतर पोलीस पथकाने बंदुकीच्या तीन फैरी झाडून छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली. यावेळी जिल्हा परिषद शाळा मुथळने येथील विद्यार्थ्यांच्या बाल पथकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील प्रसंग सुंदर पद्धतीने सादर केले.
त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बालशिवाजी व जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पालखी वाहिली.
कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते किल्ले शिवनेरी विकास मंडळाच्या माध्यमातून देण्यात येणारे पुरस्कार प्रदान करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांना प्रदान करण्यात आला. शिवनेरी भूषण पुरस्कार कारगिल युद्धात विशेष कामगिरी बजावलेल्या निवृत्त ब्रिगेडियर अनिल काकडे आणि अंटार्क्टिका मोहिमेचे नेतृत्व केलेले डॉ. अरुण रामचंद्र साबळे यांना प्रदान करण्यात आला. विजय घोगरे यांनी प्रास्ताविक केले.
कार्यक्रमास प्रांताधिकारी गोविंद शिंदे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मुळे यांच्यासह शिवभक्त उपस्थित होते.

‘शिवाई देवराई‘ आणि वन उद्यानाचे लोकार्पण
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत किल्ले शिवनेरी येथे ‘शिवाई देवराई’ आणि वन उद्यानाचे लोकार्पण करण्यात आले.
शिवनेरी संवर्धन आणि विकास प्रकल्पांतर्गत वन विभागाच्यावतीने किल्ले शिवनेरीवर अडीच एकर क्षेत्रावर तीन वनोद्यान व स्वतंत्र ‘शिवाई देवराई’ विकसित करण्यात आली आहे. देवराईची संकल्पना सह्याद्री गिरीभ्रमण संस्थेची असून संस्थेच्या माध्यमातून जैन इरिगेशनच्या सामाजिक दायित्व निधीतून सूक्ष्म आणि ठिबक सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पुण्यात तिघांकडून ४ कोटीचे ड्रग्ज पकडले:पुणे पोलिसांची कारवाई
पुणे–पुणे पोलिसांनी ड्रग्स तस्करांविरोधात मोठी कारवाई करत तिघांना अटक केली आणि त्यांच्याकडून तब्बल साडेतीन कोटी रूपयांचे ड्रग्स जप्त केले आहेत. आणखी काही पोत्यांची तपासणी करण्यात येत आहे जी पोती मिठाची असल्याचे सांगण्यात येते मात्र याबाबत तपास सुरु आहे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. पोलिसांनी जवळपास साडेतीन कोटी रूपयांचे पावणे दोन किलो एमडी जप्त केले आहे. कार व तदनुषंगिक बाबींसह ४ कोटीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात आणखी काही लोकांचा समावेश असून एका परदेशी नागरिकाच्या शोधात पोलीस आहेत.
पोलीस आयुक्त यांनी अंमली पदार्थाची तस्करी करणारे गुन्हेगार यांचे समुळ उच्चाटन करण्यासाठी कठोर पाऊल उचलणेबाबत दिलेल्या सुचनांप्रमाणेअपर पोलीस आयुक्त सो गुन्हे पुणे व पोलीस उप आयुक्त गुन्हे पुणे शहर यांनी मार्गदर्शन करुन त्याप्रमाणे आदेश दिले होते.त्याप्रमाणे आज दिनांक १९/०२/२०२४ रोजी गुन्हे शाखा युनिट १ कडील वरिष्ठ पोलीसनिरीक्षक शब्बीर सय्यद, त्यांचेकडील अधिकारी व अंमलदार असे रात्रीचे वेळी हद्दीत गस्त घालीत असताना पोलीस अंमलदार विठ्ठल सांळुखे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, २७६, सोमवार पेठ, पुणे चे समोर एक पांढरे रंगाची इर्टीगा कार नं. एम एच. १२ यु.जे. ४०८१ यामध्ये ड्रायव्हींग सिटवर एक इसम बसलेला दिसला व त्याचे शेजारच्या सिटवर पोलीस अभिलेखावरील आरोपी नामे वैभव उर्फ पिंटया भारत माने रा. पुणे हा बसलेला दिसला. सदरचा आरोपी हा रेकॉर्डवरील असल्याने व त्याच्या हालचाली संशयास्पद असल्याचे बातमी प्राप्त झाली. त्याप्रमाणे युनिट-१ कडील अधिकारी व स्टाफने सदर ठिकाणी जावुन सदरची कार थांबवून अधिक चौकशी केली असता त्यांचे बोलणे अधिक संशयास्पद वाटल्याने त्यांची पंचा समक्ष झडती
घेतली असता त्यांचे कब्जात म्हणजे रेकॉर्डवरील आरोपी वैभव उर्फ पिटया भारत माने याचे कब्जात किं रु १,००,००,०००/- चा ५०० ग्रॅम इतके वजनाचा मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ मिळून आल्याने रेकॉर्ड वरील आरोपी वैभव उर्फ पिंटया भारत माने व कार चालक नामे अजय आमरनाथ करोसिया वय ३५ वर्ष रा. पुणे यांना जागीच ताब्यात घेण्यात आले सदर दोन्ही आरोपींकडे कसुन चौकशी केली असता वैभव उर्फ पिटया भारत माने यास सदरची एम डी देणारा इसमाचे नाव हैदर शेख रा. विश्रांतवाडी, पुणे याने काही वेळा पुर्वी दिल्याचे सांगीतल्याने गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार त्यांच्या एकुण ५ टिम्स विश्रांतवाडी भागात विविध ठिकाणी रवाना केल्या असता हैदर नुर शेख, वय-४० वर्षे रा. विश्रांतवाडी, पुणे हा विश्रांतवाडी परिसरात मिळून आल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले त्याची झडती घेतली असता त्याचे कब्जात १,००,००,००० /- किं रू क्रिस्टल पावडर स्वरुपातील ५०० ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ मिळुन आला. त्याच प्रमाणे त्याचे झडतीमध्ये एक चावी
मिळून आली त्याबाबत त्याचेकडे अधिक तपास करता सदरची चावी ही त्याचे विश्रांतवाडी, परिसरात असलेल्या एक पत्र्याचे गोडाऊनची आहे असे सांगितल्याने सदर ठिकाणी गोडाऊनची पहाणी केली असता त्यामध्ये १,५०,००,०००/- रू किं चे ७५० ग्रॅम वजनाचे एमडी गोडाऊनमध्ये मिळून आले त्याच प्रमाणे सदर ठिकाणी २०० ते ३०० संशयास्पद पोती मिळून आली असून त्यामध्ये मीठ असल्याचे आढळून आले आहे. परंतु सर्व पोत्यांमध्ये एम.डी. आहे किंवा नाही याबाबत गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी तपासणी करीत आहेत.
हैदर नुर शेख याचेकडे नमुद मेफेड्रॉन अंमली पदार्थ कोणाकडुन आणला ? याबाबत विचारणा केली असता, त्याने सदरचा एमडी अंमली पदार्थ हा परदेशी नागरीक यांनी मला विक्रीकरिता दिला असल्याचे सांगितले.
परदेशी नागरीक यांचा शोधा करीता गुन्हे शाखेकडील टिम रवाना केल्या आहेत.
यातील ३ अटक आरोपीपैकी १. वैभग ऊर्फ पिटया माने २. हैदर शेख हे पुणे पोलीस अभिलेखावरील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त, पुणे शहर प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे श्री शैलेश बलकवडे पोलीस उप- आयुक्त, गुन्हे, पुणे अमोल झेंडे मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-१, पुणे सुनिल तांबे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे २, पुणे सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद युनिट ०१, अजय वाघमारे, राजेंद्र लांडगे, अनिता हिवरकर, विनायक गायकवाड, सपोनि बाबर, गायकवाड, पोलीस उप निरीक्षक रमेश तापकीर, शेळके, गोरे, कोळेकर, मगदुम, देव, नाईक, जाधव, शिंदे, मोकाशी, पोलीस अंमलदार विठ्ठल सांळुखे, अभिनव लडकत, दता सोनावणे, निलेश साबळे, राहुल मखरे, अनिकेत बाबर, शशीकात दरेकर, शुभम देसाई, शंकर कुंभार, आय्याज दड्डीकर, सुजित वाडेकर, संतोष देशपांडे, निखिल जाधव यांनी केली आहे.
‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’ ला विद्यार्थी आणि उद्योजकांनी भेट द्यावी-उद्योगमंत्री उदय सामंत
पुणे दि.१८: संरक्षण उत्पादन क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना सक्षम करणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या आणि महाराष्ट्रातील अशा प्रकारच्या पहिल्या ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’ ला महाविद्यालयीन विद्यार्थी, उद्योजक आणि नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले.
इंटरनॅशनल एक्झिबिशन ॲण्ड कन्व्हेनशन सेंटर, मोशी येथे ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’च्या पूर्वतयारीची श्री. सामंत यांनी पहाणी केली. यावेळी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल, गणेश निबे, किशोर धारिया, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू,महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य अभियंता प्रकाश चव्हाण, नितीन वानखेडे आदी उपस्थित होते.
श्री. सामंत म्हणाले, मोशी येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि कन्व्हेन्शन सेंटर येथे २४ फेब्रुवारी पासून सुरू होणाऱ्या या प्रदर्शनात भारतीय नौसेना, लष्कर आणि वायुसेना या तिन्ही सुरक्षा दलांचा महत्वाचा सहभाग आहे. प्रदर्शनातील विविध सत्रात भारताची संरक्षण सिद्धता, विविध शस्त्रास्त्रांची निर्मिती, संरक्षण क्षेत्रातील संधी याविषयी विद्यार्थ्यांना उपयुक्त माहिती मिळणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना शस्त्रास्त्रांविषयी कुतूहल असते. त्यांना आधुनिक शास्त्रासोबत संरक्षण साहित्य जवळून पाहण्याची ही संधी आहे.
संरक्षण अभियांत्रिकी उद्योगांनाही प्रदर्शनात सहभागी करून घेण्यात येणार आहे. या क्षेत्राशी संबंधित स्टार्ट अप्स आणि इतर उद्योगांना उद्योग विस्तार आणि या क्षेत्रातील संधीविषयी प्रदर्शनातून माहिती मिळणार असल्याने उद्योग क्षेत्राशी निगडित प्रतिनिधींनी प्रदर्शनात सहभागी व्हावे, असे आवाहनही श्री.सामंत यांनी केले.
प्रदर्शनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या एमएसएमईना निःशुल्क दालन उपलब्ध करून द्यावे. सर्व उद्योग संघटनांच्या बैठका घेऊन त्यांना आमंत्रित करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.
प्रदर्शनातील चार दालनांना शिवनेरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पन्हाळा असे नाव देण्यात येणार आहे. संपूर्ण परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या संरक्षण सिद्धतेची संकल्पना प्रदर्शित करण्यात येणार आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयातील १ लाखाहून अधिक विद्यार्थी या प्रदर्शनाला भेट देणार आहे. त्यांना १ हजार प्रकारचे तंत्रज्ञान पाहण्यासोबत भारतीय सुरक्षा दलाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन मिळणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
बैठकीस विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
००००
चीनच्या खेळाडूंवर मात करण्याची पुण्याच्या टेबल टेनिसपटू कडे क्षमता – राजीव बोडस
जिल्हा टेबल टेनिस संघटनेतर्फे विविध खेळाडूंचा गौरव
ज्येष्ठ खेळाडूंची मांदियाळी
पुणे – भारताच्या युवा खेळाडूंनी जागतिक टेबल टेनिस स्पर्धेत चीनच्या खेळाडूंवर मात करण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे. चीनच्या खेळाडूंना पराभूत करण्याची क्षमता पुण्याच्याही खेळाडूंमध्ये आहे आणि ते लवकरच हे ध्येय साध्य करतील असा आत्मविश्वास पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष राजीव बोडस यांनी व्यक्त केला.
जिल्हा टेबल टेनिस संघटनेतर्फे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दाखवणाऱ्या पुण्याच्या खेळाडूंचा तसेच माजी राष्ट्रीय विजेत्या खेळाडूंचा सत्कार श्री. राजीव बोडस व बालुफ ॲटोमेशन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक उदय भालचंद्र यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी टेबल टेनिस संघटक श्रीकांत अंतुरकर, श्रीराम कोनकर, प्रकाश तुळपुळे, स्मिता बोडस आदी उपस्थित होते. अनेक ज्येष्ठ खेळाडूंच्या उपस्थितीमुळे हा समारंभ म्हणजे जणू काही ज्येष्ठ खेळाडूंची मांदियाळीच ठरला.
श्री. बोडस यांनी पुढे सांगितले,” पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या वाटचालीमध्ये आणि खेळाच्या प्रगतीमध्ये माजी खेळाडूंच्या प्रयत्नांचा मोठा वाटा आहे. पूर्वी मुंबईच्या खेळाडूंना पराभूत करणे ही अवघड कामगिरी मानली जात असे. आमच्या खेळाडूंनी त्यावेळी प्रयत्न करून हे यश संपादन केले. आता तर पुण्याचे अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दाखवित आहेत ही अतिशय अभिमानास्पद कामगिरी आहे.
उदय भालचंद्र यांनी सांगितले की, खेळामुळे आत्मविश्वास निर्माण होतो आणि कोणत्याही प्रसंगांना धैर्याने सामोरे जाण्याची वृत्ती निर्माण होते. त्याचा फायदा एरवीदेखील जीवनामध्ये अनेक क्षेत्रात होऊ शकतो हा अनुभव मी स्वतः घेतला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर उच्च यश मिळवण्यासाठी खेळाडूंनी शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती, पोषक आहार याकडे अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.
खेळाडूंच्या सत्कार प्रसंगी जिल्हा संघटनेतर्फे आंतरराष्ट्रीय पदक विजेती तसेच १९ वर्षाखालील गटात राष्ट्रीय विजेतेपद मिळवणारी पृथा वर्टीकर हिला ५० हजार रुपये रोख बक्षीस तर आंतरराष्ट्रीय पदक विजेती पॅरा खेळाडू पृथ्वी बर्वे व राष्ट्रीय कनिष्ठ विजेती नैशा रेवसकर यांचा प्रत्येकी २० हजार रुपये तर राष्ट्रीय कास्य पदक विजेता नील मुळ्ये याचा पंधरा हजार रुपये देऊन सत्कार करण्यात आला. बालुफ कंपनीतर्फेही या खेळाडूंना तसेच खेळाडूंचे पालक व प्रशिक्षकांचा भेट वस्तु देऊन सत्कार करण्यात आला.
माजी राष्ट्रीय विजेते खेळाडू सुनील बाब्रस, सुजाता बाब्रस, आश्लेषा बोडस, अनिकेत कोपरकर, पूजा सहस्त्रबुद्धे-कोपरकर, उपेंद्र मुळ्ये यांचाही गौरव करण्यात आला.
या समारंभास ज्येष्ठ संघटक डॉक्टर सतीश ठिगळे, अरविंद नातू, अजेय तुळपुळे, डॉक्टर मनोज उचगांवकर, अजय सिधये, सुरेंद्र देशपांडे, मनीषा बोडस, रोहित चौधरी, शुभंकर रेणावीकर, अविनाश जोशी इत्यादींचा सत्कार करण्यात आला.
पृथा वर्टीकर हिला एक लाख रुपयांचे बक्षीस
आंतरराष्ट्रीय स्तरावर अर्धा डझन पेक्षा जास्त पदके जिंकणारी पुण्याची खेळाडू पृथा वर्टीकर हिला येथील व्यावसायिक मोहिनीदेवी भिवलाल बिश्नोई यांच्यातर्फे एक लाख ११ हजार एकशे अकरा रुपये देऊन सत्कार करण्यात आला. रायझिंग स्टार क्लब तर्फे तिला वीस हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले.
आशिष बोडस यांनी स्वागत केले तर प्रकाश तुळपुळे यांनी आभार मानले.
हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४ अंतर्गत ‘द्राक्ष महोत्सव २०२४’ चे उद्घाटन
पुणे, दि.१८: पर्यटन संचालनालय आयोजित ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४’ अंतर्गत कृषी विभाग, जुन्नर पर्यटन विकास संस्था, जुन्नर तालुका द्राक्ष उत्पादक संघ आणि कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जुन्नर येथे ‘द्राक्ष महोत्सव २०२४’ चे कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष कृषीरत्न अनिल मेहेर यांच्या उद्घाटन करण्यात आले.
यावेळी पर्यटन संचालनालय पुणे विभागाच्या उपसंचालिका शमा पवार, ग्रामोन्नती मंडळ नारायणगावचे अध्यक्ष प्रकाश पाटे, कृषी विज्ञान केंद्र नारायणगावचे प्रमुख डॉ. प्रशांत शेटे, कृषी तंत्रनिकेतनचे प्राचार्य राधाकृष्ण गायकवाड आदी उपस्थित होते.
द्राक्ष किंग २०२४ स्पर्धेचे आयोजन
पर्यटकांसाठी द्राक्षबागा भेटी, द्राक्ष, बेदाणे आणि द्राक्षज्यूस विक्री तसेच द्राक्ष उत्पादकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी द्राक्ष पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रथम क्रमांक द्राक्षकिंग आणि उत्तेजनार्थ चार पारितोषिके देण्यात येणार आहेत. द्राक्षकिंग २१ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व सपत्नीक सन्मान तसेच चार उतेजनार्थ शेतकऱ्यांना प्रत्येकी ११ हजार रुपये, सन्मानचिन्ह व सपत्नीक सन्मान बक्षिसाचे स्वरूप आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक कृषीभूषण जितेंद्र बिडवई यांनी दिली.
गेल्या सहा वर्षांपासून हा द्राक्ष महोत्सव जुन्नर तालुक्यात होत असून आता हा ‘हिंदवी स्वराज्य महोत्सवाचा’ भाग झाला आहे. तालुक्यात निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन होत असून यामुळे तालुक्याचे ग्रीन झोन म्हणून वेगळे महत्त्व प्रस्थापित होत आहे. हा महोत्सव १९ फेब्रुवारी पर्यंत सुरु राहणार असून याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
००००
राष्ट्रनिर्मानामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे योगदान महत्वाचे : व्ही शांताक्का
पुणे : देशाच्या ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी आजवर राष्ट्रनिर्मानामध्ये महत्वाची भूमिका पार पाडली असून ग्रामीण , आदिवासी भागाच्या विकासासाठी व शिक्षीत, प्रगतशील व सशक्त भारत राष्ट्रनिर्मितीसाठी या विद्यार्थ्यांचे योगदान खूप महत्वाचे असल्याचे मत राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका श्रीमती व्ही शांताक्का यांनी व्यक्त केले.
निरगुडे (खानगाव), ता जुन्नर येथे सह्यसखा फौंडेशन च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या संशोधन आणि इंनोवेशन प्रयोगशाळा, गुरुजनांचा सन्मान आणि मिशन सह्याद्री प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी श्रीमती व्ही शांताक्का या प्रमुख उद्घाटक म्हणून बोलत होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून राष्ट्र सेविका समितीच्या माजी प्रमुख संचालिका श्रीमती प्रमिलाताई मेढे व राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख कार्यवाहिका श्रीमती चित्राताई जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती तर अध्यक्षस्थानी सह्यसखा फौंडेशनच्या विश्वस्त श्रीमती सुषमा इंगळे या होत्या.भारतासारख्या तरुणांच्या देशात राष्ट्रनिर्मानामध्ये हातभार लावणाऱ्या तरुणांची संख्या वाढणे आवशयक असून सह्यसखाचे संस्थापक अध्यक्ष अमित इंगळे यांच्यासारखे तरुण अभियात्रीकीचे शिक्षण घेऊन परदेशातील ऐशोआरामात चाललेले आयुष्य थांबवून राष्ट्रप्रेमापोटी , राष्ट्रसेवेसाठी मायदेशी परतून जुन्नरसारख्या आदिवासी भागामध्ये येऊन या परिसराचा कायापालट करण्यासाठी करीत असलेल्या कार्याची दखल घेत असे अनेक समाजहिताचे उपक्रम राबविण्यासाठी जनतेने सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्र सेविका समितीच्या माजी प्रमुख संचालिका श्रीमती प्रमिलाताई मेढे यांनी केले.यंदाचे वर्ष हे युगपुरुष, अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे तीनशे पन्नासावे वर्ष असून त्यानिमित्ताने जुन्नर येथे सह्यसखाच्या माध्यमातून शुभारंभ करण्यात आलेल्या सह्याद्री मिशन सह राबविण्यात येत असलेले इतर सर्व समाजोपयोगी उपक्रम हे स्तुत्य असून जुन्नर परिसरातील विद्यार्थी, शाळा व आदिवासी लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी सह्यसखा अगदी सख्यासारखा जनतेच्या पाठीसाठी उभे राहील अशी अपेक्षा राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख कार्यवाहिका श्रीमती चित्राताई जोशी यांनी व्यक्त केली.
यावेळी या तिन्ही मान्यवरांना सह्यसखाच्या वतीने त्यांच्या आयुष्यभराच्या राष्ट्रनिर्मितीमधील त्याग व योगदानासाठी विशेष मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले तसेच तिन्ही मान्यवरांच्या हस्ते प्रा अनिल पौल, प्रा चेतन दिवाण, प्रा महेश ठाकूर, प्रा प्रवीण पारगावकर, प्रा राजेश पाटील, प्रा आनंद गोरे, प्रा उज्वला कवडे, तसेच संत तुकाराम विद्यालय निरगुडेचे शिक्षकवृंद यां गुरुजनांचा सह्यसखाच्या योगदानाबद्दल विशेष सन्मान करण्यात आला.
संत तुकाराम विद्यालय निरगुडेमध्ये उद्गाटन करण्यात आलेल्या संशोधन व इनोव्हेशन प्रयोगशाळेची पाहणी श्रीमती प्रमिलाताई मेढे, श्रीमती व्ही शांताक्का व श्रीमती चित्राताई जोशी यांच्याकडून करण्यात आली व त्यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सह्यसखा फौंडेशन चे संस्थापक अध्यक्ष अमित इंगळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रसाद कात्रे यांनी केले तर आभार सौ प्रीती इंगळे यांनी मानले.
कार्यक्रमास निरगुडे गावचे ग्रामस्थ, संत तुकाराम विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी तसेच सह्यसखा फौंडेशन चे सर्व विश्वस्त, स्वयंसेवक आदी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
अभय छाजेड,मोहन जोशी आणि आबा बागुल यांच्यातच लोकसभेसाठी रस्सीखेच?
मोहोळ – मुळीक भाजपकडून असतील तर..सहज बाजी मारणार कॉंग्रेस..
पुणे-कसब्याच्या विधानसभेचा निष्कर्ष लोकसभेला लावता येणार नाही असे सांगत,मोहोळ -मुळीक भाजपकडून असतील तर..सहज बाजी मारणार कॉंग्रेस अशाही पैंजा लावत कॉंग्रेस मधील लोकसभा इच्छुकांमधील स्पर्धा आता तीव्र होत असून यात अभय छाजेड,मोहन जोशी आणि आबा बागुल यांची नावे आघाडीवर आहेत.दिल्लीतील कॉंग्रेसच्या सूत्रांनी एका बड्या नेत्याच्या पुत्राच्या नावाचा हट्ट त्यांच्याच सूचनेवरून सोडल्यावर आता दिल्ली कॉंग्रेस वर्तुळात पुणे लोकसभेचा कानोसा घेतला असता पुण्यातून बहुजन समाजाचा उमेदवार द्यावा अशी सूचना होती असे सांगण्यात आले. मात्र याबाबत पुण्यातील एका माजी मंत्र्याचे नाव येताच ते स्वतःच इच्छुक नसल्याचे सांगण्यात आले.एकूण २० जणांनी उमेदवारीसाठी अर्ज केलेले असताना आता त्यातील अवघी ४ नावे उरलीत आणि त्यातील देखील एकाने असमर्थता दर्शविली आहे.
काँग्रेसकडून कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी लोकसभेसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे.मात्र त्यांनी कसबाच व्यवस्थित सांभाळावा असे दिल्लीतील सूत्रांनी सांगितले कि वरिष्ठ नेत्यांची अशी धारणा आहे. माजी आमदार मोहन जोशी, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी नगरसेवक अभय छाजेड हे उमेदवार म्हणून प्रमुख दावेदार आहेत. लोकसभेच्या निवडणुकीचा अनुभव असलेले माजी आमदार मोहन जोशी यांना आहे यापूर्वी त्यांनी १९९९ मध्ये आणि २०१९ मध्ये लोकसभेची निवडणूक लढविली आहे.
भाजप कडून ब्राह्मणेतर उमेदवार दिली जाण्याची शक्यता आहे. अशावेळी अत्यंत योग्य उमेदवार देण्यासाठी पक्ष नेतृत्वाची कसरत होणार आहे. सर्व गटांना एकत्र घेऊन जाणारा उमेदवार हवा आहे.दलित समाजाचे माजी मंत्री असलेले पुण्यातून लोकसभा विजयी होऊ शकतात असा अहवाल असताना त्यांचाच नकार आल्याने मराठा समजाचा पर्याय देखील ठेवला गेला मात्र तोही बाजूला करून आता अभय छाजेड आणि मोहन जोशी यांच्यात आणि आबा बागुल यांच्यात रस्सीखेच होईल असे दिल्लीतील कॉंग्रेस जणांचे म्हणणे आहे. बागुल यांनी गेली ३५ वर्षे नगरसेवक पदावर काम केल्याने त्यांची प्रशासन आणि जनतेला चांगली ओळख निर्माण झालेली आहे. छाजेड यांच्यामागे केवळ पुणेकरच नव्हे तर भाजपकडे वळणारा वर्ग देखील येईल असा दावा केला जातो आहे. मोहन जोशी निष्ठावंत म्हणून परिचित आहेतच . बारामती बरोबर पुण्यात शरद पवार यांच्या समवेत गांधी घराण्यातील नेते प्रचारासाठी येतील असाही त्यांना विश्वास आहे
मोहोळ -मुळीक भाजपकडून असतील तर..सहज बाजी मारणार कॉंग्रेस
पुणे महापालिकेतील सत्ताकारकीर्द स्थायी समिती अध्यक्ष आणि महापौर पदावरून केलेली शायनिंग हीच मोहोळ यांचा सहज पराभव करेल आणि मुळीक यांच्याबाबतही तसेच घडेल असा कॉंग्रेस जणांचा दावा आहे.भाजपमधून या दोघांमधून एकाला उमेदवारी मिळेल असे माध्यमातून वृत्त येत असते असे झाले तर कॉंग्रेसचा विजय अगदी अलगद होईलअसा कॉंग्रेस जणांचा दावा आहे.
श्री महालक्ष्मी मंदिराच्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त ‘ब्रह्मोत्सव’
श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग तर्फे आयोजन ; तीन दिवसीय उत्सवाचे आयोजन ; शालेय गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रम
पुणे : श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट, श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागच्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त ब्रह्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान मंदिरात हा उत्सव होणार असून त्यामध्ये धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा पुण्यातील विविध शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देखील देण्यात येणार आहे, अशी माहिती ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता राजकुमार अग्रवाल यांनी दिली. राजस्थान डिडवाना येथील अनंत श्री विभुषित जगतगुरु रामानुचार्य झालरिया पीठाधीपती पूज्य श्री श्री १००८ स्वामीजी घनश्यामाचार्यजी महाराज यांच्या उपस्थितीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. धार्मिक कार्यक्रमामध्ये होम-हवन, महाअभिषेक, अर्चना, पालखी सोहळा व फुलांची होळी तसेच सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये शालेय विद्यार्थी मदत व उत्सव मूर्तीची धान्यतुला करुन ते धान्य अनाथ मुलांच्या संस्थेस वाटप अशा उपक्रमांचा समावेश आहे. ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल म्हणाले, उत्सवाच्या पहिल्या दिवशी बुधवार,दिनांक २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता मंदिरात गरुड स्थापना, कलश स्थापना व यज्ञ स्थापना होणार आहे. गुरुवार, दि. २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता १०८ कलश अभिषेक होईल. त्यानंतर रात्री ८ वाजता श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती, श्री महाकाली व श्री विष्णू या उत्सवमूर्तींची धान्य व पुस्तकतुला होणार असून हे साहित्य गरजूंना देण्यात येणार आहे. रात्री ८.३० वाजता सुवर्ण कमल आणि रजत कमल अर्चना म्हणजेच उत्सवमूर्तींना सोन्याची व चांदीची फुले अर्पण करण्यात येतील. उत्सवाच्या शेवटच्या दिवशी शुक्रवार, दिनांक २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता केशर दूध अभिषेक, सकाळी ११.३० वाजता विविध शाळांतील गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रम व सायंकाळी ७ वाजता पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. देवीच्या उत्सवमूर्तींची पालखी प्रदक्षिणा मंदिर परिसरात होणार आहे. तर, सायंकाळी ७.३० वाजता पुष्पउत्सव म्हणजेच फुलांची होळी होणार आहे. सर्व कार्यक्रमांमध्ये पुणेकरांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
भाजपकडून संजय काकडेंना लोकसभेची मिळू शकते उमेदवारी…?
पुणे :केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मताचा विचार करून भाजपच्या नेतृत्वाने राज्यसभेवर मेधा कुलकर्णी यांना संधी दिल्याने आता पुणे लोकसभेच्या इच्छुकांच्या वर्तुळात अमुलाग्र बदल होत आहेत,माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार जगदीश मुळीक आणि खुद्द दिल्लीतून थेट आले अशी ज्यांची वल्गना होत होती ते सुनील देवधर यांची नावे आता मागे पडलीत. इच्छूकांनी आता बदलत्या समीकरणानुसार आपले डावपेच आखण्यास सुरूवात केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गोटातले आणि मर्जीत असलेले माजी खासदार संजय काकडे यांचे आता इच्छूकांच्या स्पर्धेत नाव पुढे आले आहे. भाजपच्या नेतृत्वाला देखील पुण्याच्या महापालिकेची सत्ता अबाधित राखणाऱ्या नेत्याची निकड काकडे पूर्ण करू शकतील असा विश्वास भाजपच्या नेत्यांना असल्याने त्यांची इच्छुकांमधील गणना वरच्या क्रमांकावर होऊ लागली आहे.लोकसभा क्षेत्रातील सर्वच विधानसभा मतदार संघातून भाजपने संजय काकडेना उमेदवारी दिली तर कॉंग्रेसच्या कडून कोणताही उमेदवार असला तरी त्याचा पराभव निश्चित होईल असेही अनेकांना वाटते आहे.
कसब्याचा बालेकिल्ला हरल्यानं आणि गिरीश बापट यांच्या निधनामुळे आता भाजपच्या नेत्यांना पुण्याबाबत योग्य निर्णय घ्यावा लागणार आहे. महापालिकेत ७ वर्षे सत्ता होती काकडेंनी पुणे महापालिकेत भाजपची सत्ता आणण्यामध्ये मोलाची भूमिका बजावली होती याशिवाय अनेक पक्षांमधील नगरसेवकांना भाजपमध्ये आणून मोठे बहुमत पक्षाला मिळवून देण्यामागे काकडेंचा सिंहाचा वाटा होता . संजय काकडे गेली 10वर्ष राज्यातील भाजपची राजकीय रणनीती ठरवण्यामध्ये आघाडीवर होते.पुणे लोकसभा मतदार संघात त्यांनी भाजपचे दीड लाख सभासद केले आहेत.बापटांना निवडून आणण्यात त्यांचा मोठा वाटा होता .या शिवाय देखील काकडेंनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत केलेल्या राजकीय खेळींचा भाजपला फायदा झाला होता.आणि सहा पैकी पाच विधानसभा मतदार संघात भाजपचे उमेदवार निवडून आले पुणे कॉन्टेंमेंट, शिवाजीनगर,आणि कोथरूड या प्रमुख मतदार संघांमध्ये त्यांनी ऐनवेळी काँग्रेसचे काही नेते भाजपकडे वळवले होते. त्यामुळे भाजपचे आमदार येथे निर्धोकपणे निवडून येऊ शकले. याशिवाय उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या मर्जीतील असल्यामुळे त्यांना सहजपणे उमेदवारी मिळेल अशी आशा अनेकांना वाटत आहे.
पुणे शहरातील लोकसभेची निवडणूक ही काँग्रेस विरूद्ध भाजप अशीच होणार आहे. त्यामुळे जर काकडे रिंगणात असतील तर, काँग्रेसमधील नाराज गट काकडेंच्या मदतीला येऊ शकतो असेही काही राजकीय समीक्षकांना वाटत आहे. 2014 मध्येदेखील राज्यसभा निवडणुकीत अपक्ष आमदारांना गोळा करत निवडून जाण्याचा मोठा चमत्कार काकडेंनी केलेला होता. त्यामुळे जर पुण्यातून काकडेंना संधी मिळाल्यास काकडे आणखीन काहीतरी वेगळी राजकीय गणिते पुणे शहरासाठी येत्या विधानसभा निवडणुकीत मांडतील असेही वाटत आहे.महापालिकेतील सत्तेच्या काळात ७ वर्षे जे पदाधिकारी होते त्यांना कसब्याप्रमाणे लोकसभेलाही उमेदवारी देऊन पक्ष नेतृत्व रिस्क घेणार नाही असाही राजकीय समीक्षकांचा अंदाज आहे
काकडे हे सर्व धर्मियांत उठबस असणारेच नव्हे तर चांगले संबध प्रस्थापित केलेले नेते मानले जातात , पी ए इनामदार असतील बाबा आढाव असतील मराठा , बहुजन , सवर्ण अशा सर्व समाजातील नेते कार्यकर्ते यांना धरून त्यांनी आपली राजकीय वाटचाल ठेवली आहे . हेही त्यांच्या पथ्यावर पडू शकणार आहे. निवडून येण्याची क्षमता हा निकष लावला तर काकडे यांचेच नाव सर्वात पुढे असणार आहे.
गरिबांना आणि श्रीमंतांना वेगवेगळी शाळा हे घोरण समाजाला घातक: आप
आरटीई कायद्यातील बदलाने वंचित दुर्बलांच्या शिक्षण हक्काला बाधा: आप
पुणे-राज्य शासनाने शिक्षणात कायद्यात सुधारणा करून ‘खाजगी शाळांच्या परिसरात जर सरकारी अथवा अनुदानित शाळा असल्यास त्यांनी 25 टक्के राखीव मोफत प्रवेश करण्याची गरज नाही’ असा आदेश काढला आहे. या आदेशाला विरोध करण्यासाठी आम आदमी पार्टी तसेच विविध पालक संघटना आणि पालक यांनी रविवारी पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर चौकामध्ये तीव्र निदर्शने केली.
या नव्या बदलामुळे गरीब मुलांना कुठल्याही खाजगी इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता आता पूर्णपणे दुरावली आहे. या बदलामुळे वंचित आणि दुर्बल घटतातील मुले यांच्यासाठी सरकारी शाळा आणि श्रीमंतांसाठी खाजगी इंग्रजी शाळा अशी विभागणी होणार असून या पद्धतीमुळे शिक्षणातील सामाजिकीकरणाच्या उद्देशाला हरताळ फासला जाईल असा आरोप करण्यात आला. आर्थिक, सामजिक स्तरामुळे येणाऱ्या अडचणी दूर करत खाजगी शाळांमध्ये वंचित दुर्बल घटकासाठी 25% राखीव जागा ठेवणे हेच न्यायपूर्ण आहे. त्यामुळे सरकारने केलेली दुरुस्ती ही न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करणारी आहे असा आरोप आप प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी केला.
नवीन शिक्षण धोरणात पूर्व प्राथमिक शाळेपासूनच दहावीपर्यंत शिक्षण हे दर्जेदार आणि सर्वांना परवडणारे असावे व त्याची जबाबदारी सरकारवर असेल असे म्हटले आहे. त्यामुळे सरकारने सर्वप्रथम अनुदानित आणि सरकारी शाळांमध्ये इंग्रजीची सोय तसेच त्याचा दर्जा सुधारणे यावर लक्ष द्यायला हवे. असर , क्राय तसेच इतर संस्थांच्या सर्वे मधून सरकारी शाळांची दयनीय स्थिती उघड झालेली आहे, असे यावेळेस शहर अध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांनी संगितले.
खाजगी शाळांची प्रतिपूर्ती रक्कम वेळेत द्यायला हवी, त्यात उशीर झाल्यास खाजगी संस्थांना व्याज द्यायला हवे व कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी योग्य ती काळजी सरकारने घ्यायला हवी, केंद्र सरकारकडून आलेला निधी इतरत्र वापरू नये अशी मागणी यावेळेस करण्यात आली. इतर राज्यांना जे जमते ते महाराष्ट्रात फुले शाहू आंबेडकरांचा वारसा सांगणाऱ्या सरकारला का जमत नाही असा सवाल पालक आघाडी च्या ललिता गायकवाड यांनी केला.
सरकारने हा बदल करणारा आदेश मागे घ्यावा अन्यथा अधिक तीव्र आंदोलन पालक करतील असा इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनात आप राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत, शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे, पालक आघाडी अध्यक्ष ललिता गायकवाड, सुरेखा भोसले, आरती करंजावणे, अमोल काळे, संतोष काळे, अविनाश केंदळे, श्रीकांत भिसे, चंद्रकांत गायकवाड, शिवाजी डोलारे, आसिफ मोमीन, सुनील सौदी, विकास गोलांडे, गिरीश नाईक, विकास चव्हाण, महेंद्र जाधव, संदीप सूर्यवंशी, प्रीतम कोंढाळकर, गोपी जोशी, विकास लोंढे, बिपिन अहिवळे, साहिल परदेशी, उमेश बोदले, अभिजीत वाघमारे, संदीप खरात, शिवराम ठोंबरे, उमेश बागडे, गुणाजी मोरे, राहुल तिवारी, रिजवान शेख, किरण कद्रे, अर्जुन साकोरे, अभिजीत मोरे, विक्रम गायकवाड, सोमनाथ गोडांबे, प्रदीप माने, शंकर थोरात, ज्ञानेश्वर गायकवाड, सुनील भोसले, उमेश दीक्षित, कुमार धोंगडे, हिना अन्सारी, समीना शेख, मनोज शेट्टी, किरण कांबळे, शमीम बागवान, मुमताज शेख, श्रद्धा शेट्टी, रेधान बागवान, अमित मस्के, मयूर कांबळे, निलेश वांजळे, संजय कटारनवरे, एम अली सईद, संजय रणधीर,अविनाश भाकरे, क्षमा गायकवाड, ॲनी अनिश, शितल कांडेलकर, स्नेहा लावंड, मंजुनाथ मनोरे, अक्षय शिंदे, सतीश यादव, प्रभाकर कोंढाळकर,संदीप धाडगे, ऋषिकेश मारणे, गणेश थरकुडे, मोहसीन अन्सारी इत्यादी पालक व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
