Home Blog Page 120

जनता वसाहत कॅनॉल रोड येथे श्रमदानातून स्वच्छता व जनजागृती उपक्रम

पुणे (२३ सप्टेंबर) : स्वच्छतोत्सव २०२५ (१७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर) निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या मुळा-मुठा नदी प्रदूषण नियंत्रण (PARMM) प्रकल्पातर्गत निलायम पूल जनता वसाहत कॅनॉल रोड ते आपला चौक या परिसरात स्वच्छता व जनजागृती उपक्रम राबविण्यात आला.

श्रमदानातून स्वच्छता करण्यात आली तसेच पथनाट्य, गाणी व घोषणांद्वारे जनजागृती करण्यात आली.या वेळी शेल्टर असोसिएट्सच्या सहाय्यक कार्यकारी संचालिका सौ. धनश्री गुरव यांनी (PARMM) प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली व स्वच्छतोत्सव २०२५ चे महत्त्व पटवून सांगितले.

कार्यक्रमास माजी नगरसेविका सौ. प्रिया गदादे-पाटील, स्वच्छतेचे ब्रँड अँबेसेडर श्री.अविनाश निमसे पुणे महानगरपालिकेच्या सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक श्री. मंगलदास माने,श्री. आशिष सुपनार, आरोग्य निरीक्षक, मुकादम, आणि शेल्टर असोसिएट्सच्या प्रकल्प व्यवस्थापक डॉ. नीलिमा गावडे, टीम लीडर सौ. सुबोधिनी कांबळे, यार्दी संस्था व स्वच्छ संस्थेचे प्रतिनिधी, तसेच सफाई कर्मचारी व स्थानिक नागरिक यांनी उत्साहाने सहभाग घेतला.यावेळी सर्वांनी स्वच्छतेची शपथ घेतली.

संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन शेल्टर असोसिएट्सतर्फे करण्यात आले. स्थानिक नागरिक व महापालिकेचे कर्मचारी यांच्या सक्रिय सहभागामुळे उपक्रम उत्साहात पार पडला. हा उपक्रम पुणे महानगरपालिका मलनिःसारण विभाग व NJS-FP सल्लागार संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या संपन्न झाला.

संदेश :
“स्वच्छता हीच सेवा – चला, एकत्र येऊन स्वच्छ व निरोगी परिसर घडवूया!”

मुंबई महापालिकेच्या श्रीमंतीला उतरती कळा:3 वर्षांत मुदत ठेवी 12 हजार कोटींनी घसरल्या

0

मुंबई- महापालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाते. पण आता गत काही वर्षांत बीएमसीच्या मुदत ठेवींमध्ये मोठी घट झाल्याची बाब माहिती अधिकारात उजेडात आली आहे. बीएमसीच्या सातत्याने घटणाऱ्या या निधीवर संशय व्यक्त केला जात आहे.

सामाजिक कार्यकर्ते गॉडफ्रे पिमेंटा यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत मुंबई महापालिकेच्या गत काही वर्षांतील मुदत ठेवींचा तपशील मागितला होता. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई महापालिकेच्या 2021-22 मध्ये 91 हजार 690.84 कोटी रुपयांच्या मुदत ठेवी होत्या. त्यात आता 12 हजार 192 कोटींची घट झाली. त्यामुळे हा आकडा 79 हजार 498.59 कोटींवर घसरला आहे. यंदाचा अर्थसंकल्प जाहीर झाला तेव्हा या ठेवी 81 हजार कोटींवर होत्या. पण आता ताज्या आकडेवारीमुळे अवघ्या 8 महिन्यांतच त्यात तब्बल 2 हजार कोटींची घट झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

महापालिकेच्या विविध विभागांच्या अधिशेष रकमेच्या मुदत ठेवी विविध बँकांमध्ये ठेवलेल्या असतात. विविध बँकांचे व्याजदर मागवन सर्वाधिक व्याजदर असणाऱ्या बँकांमध्ये या ठेवी ठेवण्यास प्राधान्य दिले जाते. 79 हजार कोटींच्या मुदत ठेवींपैकी 39 हजार 543 कोटींची रक्कम पीएफ, निवृत्ती वेतन, उपदान, विशेष निधी आदींसाठी वापरली जाते. तसे करणे बंधनकारकही असते.

गत काही वर्षांत पालिका प्रशासनाने पायाभूत सुविधांचे मोठे प्रकल्प हाती घेतले आहेत. या प्रकल्पांचे नियोजन व अंमलबजावणी यामुळे मुदतठेवी झपाट्याने कमी होत असल्याचा युक्तिवाद केला जात आहे. बीएमसीएचे आयुक्त भूषण गगराणी यांनी अर्थसंकल्प मांडताना मुदत ठेवींची रक्कम मुंबईच्या पायाभूत सुविधांसाठीच वापरली जात असल्याचे स्पष्ट केले होते हे विशेष. सध्या मुंबईत सागरी किनारा प्रकल्प, गोरेगाव – मुलुंड जोडरस्ता, मलनिस्सारण प्रकल्प आदी मोठ्या खर्चाचे व दीर्घकाळ चालणारे प्रकल्प मुदत ठेवींमधील राखीव निधीशी संलग्न करण्यात आलेत. त्यामुळे या प्रकल्पांची देणी देताना मुदत ठेवींची रक्कम कमी होत जाते. पालिकाने गेल्या काही वर्षांपासून राखीव निधी वापरण्यास सुरुवात केली आहे.

खाली पहा कोणत्या बँकेत किती गुंतवणूक?

बँकेचे नाव रक्कम (कोटींमध्ये)
स्टेट बँक ऑफ इंडिया
40,579.70
एचडीएफसी बँक
21,982.30
आयसीआयसीआय
21,988.25
युनियन बँक ऑफ इंडिया
12,528.00

राज्य सरकारचा मोठा निर्णय:पीक नुकसानीसाठी 2 हजार 215 कोटींची मदत मंजूर

0

जून ते ॲागस्टमधील नुकसानीसाठी असणार मदत,शेतकऱ्यांना पैसे मिळण्यासाठी दहा ते बारा दिवसांचा कालावधी

मुंबई -मराठवाडा आणि विदर्भात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीच्या पाहणीनंतर आता राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. राज्य सरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी पीक नुकसानभरपाई जाहीर केली आहे. खरीप 2025 मधील पिकांच्या नुकसानीसाठी 2215 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मदत आणि पुनर्वसन विभागाने याबाबतचा शासन निर्णय आजच जाहीर केला असून, ही रक्कम आजपासूनच वितरीत केली जाणार आहे.

गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये मराठवाड्यासह विदर्भातील शेतकरी सर्वाधिक बाधित झाले होते. सरकारने केलेल्या पंचनाम्यानुसार, एकूण 31 लाख 64 हजार शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकारने तातडीने पाऊल उचलले आहे.

पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते. अशा परिस्थितीत त्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. जाहीर झालेली मदत आजच वितरित केली जाणार असून, यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची भरपाई मिळण्यास मदत होईल. मराठवाड्यासह राज्यातील ज्या-ज्या भागात अतिवृष्टी झाली आहे, त्या सर्व भागांतील शेतकऱ्यांचा या मदतीमध्ये समावेश करण्यात आला आहे. जून 2025 ते ॲागस्ट 2025 या कालावधीत अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे झाले होते. त्याकरिता ही मदत असणार आहे.

दरम्यान, जुलै महिन्यापासून छत्रपती संभाजीनगरमध्ये 721 कोटी, नाशिकमध्ये 13.77 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. ऑगस्टमध्ये पुणे विभागासाठी 14.29, नागपूर विभागाला 23.85 कोटी आणि अमरावती विभागाला 565.60 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. तर कोकणाला 10.53 कोटी रुपये देण्याचे निर्देश देण्यात आले होते. ही सगळी मिळून राज्य सरकारने खरीप हंगामासाठी आतापर्यंत 2200 कोटी रुपये देण्याचे निर्देश दिले असल्याचे मंत्री मकरंद पाटील यांनी सांगितले होते.

राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी 2 हजार 215 कोटींची मदत आतापर्यंत रिलीज करण्यात आली आहे. मात्र हे सर्व पैसे एकाच जीआरने नाही तर वेगवेगळ्या प्रकारच्या जीआरच्या माध्यमातून देण्यात येत आहे. तसेच ही प्रक्रिया अद्याप थांबलेली नाही. आत्तापर्यंत 2,215 कोटी रुपयांची मदत आम्ही केली आहे. त्यातले 1,829 कोटी रुपये पोहोचले आहेत. वाटप झाल्यानंतर देखील शेतकऱ्यांना पूर्ण पैसे मिळण्यासाठी दहा ते बारा दिवसांचा कालावधी लागेल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

नेमबाजी खेळाच्या निवासी प्रशिक्षणाच्या प्रवेशासाठी गुरुवारी निवड चाचणी

पुणे, दि. २३: खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्रात नेमबाजी (शुटींग) या क्रीडा प्रकारामध्ये प्रवेश देण्यासाठी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी पुणे येथे गुरुवार २५ सप्टेंबर २०२५ रोजी निवड चाचणी घेण्यात येणार असून इच्छुक खेळाडूंनी सकाळी ९ वाजेपर्यंत उपस्थित रहावे, असे आवाहन क्रीडा व युवक सेवा उपसंचालक युवराज नाईक यांनी केले आहे.

खेळाडूंची तज्ज्ञ समितीमार्फत निवड चाचणी घेण्यात येणार असून गुणानुक्रमे प्रवेश निश्चित करण्यात येणार आहे. निवड प्रक्रियेसाठी शुटींग खेळाचे राज्य स्तरावर प्राविण्य प्राप्त किंवा राष्ट्रीय स्तरावर सहभाग घेतलेले खेळाडूच पात्र असतील. दर्जात्मक खेळाडूंच्या निवड चाचणीसाठी मानके तयार करण्यात आली आहेत. पात्र खेळाडूंनी kiscepune@gmail.com या ईमेल पत्त्यावर २४ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत अर्ज पाठवावेत.

निवड चाचणीसाठी येणाऱ्या खेळाडूंनी निवास व भोजनाची व्यवस्था स्वत: करावयाची आहे. चाचणीस येताना राज्य, राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा प्राविण्य प्रमाणपत्रे, आधार कार्ड, जन्म दाखला व शैक्षणिक कागदपत्रांच्या छायांकित व मूळ प्रती सोबत आणावी. खेळाडूंचा प्रवेश निश्चित झाल्यावर निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात येईल. खेळाडू १ जानेवारी २००५ नंतर जन्मलेला असावा. चाचणीस येताना खेळाडूंनी जन्मतारखेची नोंद असलेल्या शाळेच्या जनरल रजिस्टरची छायांकित प्रत सोबत आणावी, असेही श्री. नाईक यांनी कळविले आहे.

रांजणगाव गणपती, कारेगाव, ढोकसांगवीसह हिवरे ग्रामपंचायतींच्या पायाभूत सुविधांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली रांजणगाव गणपतीसह पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या प्रश्नांवर बैठक

पुणे दि. 23:- पुणे जिल्ह्यातील रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीची मूळ लोकसंख्या केवळ अकरा हजार इतकी आहे. मात्र लगतच्या एमआयडीसी क्षेत्रामुळे येथे स्थलांतरित लोकसंख्या तब्बल दोन लाखांवर पोहोचली आहे. या वाढलेल्या लोकसंख्येमुळे ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा, जलनिस्सारण, रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांवर प्रचंड ताण येत आहे. त्यामुळे या भागातील पायाभूत सुविधांचे प्रश्न सोडविण्यासह गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तातडीने आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. तसेच याच परिसरातील कारेगाव, ढोकसांगवीसह हिवरे ग्रामपंचायतींचे प्रश्न सुध्दा तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

रांजणगाव गणपती, कारेगाव, ढोकसांगवी, हिवरे या ग्रामपंचायतींच्या हद्दीतील विविध प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री मंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री, आमदार दिलीप वळसे-पाटील, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव (नवि-2) डॉ. के. एच. गोविंदराज, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, एमआयडीसीचे सह-व्यवस्थापक डॉ. कुणाल खेमनार, मानसिंग पाचुंदरकर-पाटील यांच्यासह दृकश्राव्य माध्यमाद्वारे पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त योगेश म्हसे-पाटील, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील उपस्थित होते.

या बैठकीत रांजणगाव गणपती, ढोकसांगवी, कारेगावसह हिवरे ग्रामपंचायतींच्या प्रश्नांवर विशेष चर्चा झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, रांजणगाव गणपती हे गाव अष्टविनायकांपैकी एका गणपतीचे स्थान असल्यामुळे धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे. दररोज हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. शिवाय या गावाच्या लगत एमआयडीसी असल्यामुळे येथे असणारे कामगार तसेच हे गाव प्रमुख रस्त्यालगत असल्याने बाहेरील लोकांची स्थलांतरीत लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. या पार्श्वभूमीवर गावातील पायाभूत सुविधा सक्षम करणे ही अत्यावश्यक गरज असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले. या भागातील वाढती लोकसंख्या आणि भाविकांचा सततचा ओघ लक्षात घेऊन एमआयडीसीने या भागात विकास कामे करताना जिल्हा परिषदेशी समन्वय ठेवून काम करण्याचे निर्देश दिले.

या बैठकीत रांजणगाव गणपतीसह कारेगाव, ढोकसांगवी, हिवरे या ग्रामपंचायतींच्या प्रतिनिधींनी पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, जलनिस्सारण आदी विषयांवरील अडचणी मांडल्या. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित विभागांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. या बैठकीला संबंधित ग्रामपंचायतींचे पदाधिकारी, एमआयडीसी अधिकारी, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शिवराज मोरे यांच्या हस्ते अभ्रृणी धनलक्ष्मी मातेची प्राणप्रतिष्ठा संपन्न

पुणे-सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षीही धनलक्ष्मी प्रतिष्ठाण, मंडई येथे शारदिय नवरात्रौ उत्सवाचे आयोजन केले आहे त्या निमित्ताने विविध सामाजिक व धार्मिक उपक्रम पुढील नऊ दिवसात घेण्यात येणार आहेत. 

सायं ६ वा ढोल-ताशांच्या गजरात धनलक्ष्मी मातेची प्राणप्रतिष्ठापना आणि अभिषेक महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष शिवराज मोरे यांच्या हस्ते करण्यात आली.प्रतिष्ठानचे संस्थापक बाळासाहेब अमराळे यावेळी म्हणाले कि,’ आपल्या प्रतिष्ठान ला विविध सामाजिक, शैक्षणिक तसेच गरजूंना मदत स्वरुपात केलेली लक्ष्मीसेवा याला २१ वर्षांची परंपरा आहे, यंदा प्रतिष्ठान २२ व्या वर्षात पदार्पण करीत आहे, आपण वर्षभर अनेक समाजोपयोगी उपक्रम घेतो, यंदा आपण महिलांचे श्रीलक्ष्मी सूक्त पठन, नवदुर्गा सन्मान तसेच विविध समाजोपयोगी कार्यक्रम घेत आहोत. 

सदर कार्यक्रमास पुणे शहर युवक काँग्रेस अध्यक्ष सौरभ अमराळे , तुषार पठारे, आनंद  खन्ना, ऋषि सणस , सचिन चारोळी, स्वप्नील अमराळे, आशिष हिंगमिरे तसेच प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते, या वेळी युवक काँग्रेसचे शहरातील पदाधिकारी व प्रतिष्ठान चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संगीत नाटकांचा समृद्ध ठेवा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे गरजेचे – डॉ. वंदना घांगुर्डे

पुणे (दि. २३ सप्टेंबर २०२५) संगीत रंगभूमीला १८२ वर्षांची समृद्ध परंपरा लाभली आहे. हा समृद्ध ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपली आहे, त्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ गायिका व अभिनेत्री डॉ. वंदना घांगुर्डे यांनी केले .
पिंपरी चिंचवड महानगरपालिका, थिएटर वर्कशॉप कंपनी, पैस कल्चरल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘रंगानुभूति: पूर्वरंग ते उत्तररंग’ या नाट्य महोत्सवात संगीत रंगभूमीवरील विशेष योगदान व मराठी संगीत रंगभूमी या ग्रंथ निर्मितीच्या निमित्ताने डॉ. वंदना घांगुर्डे यांची प्रकट मुलाखत लेखक व निवेदक श्रीकांत चौगुले यांनी घेतली.
प्रास्ताविक प्रभाकर पवार, स्वागत संस्थेचे रंगकर्मी सतीश एकार यांनी केले. जेष्ठ रंगकर्मी सुरेश कोकीळ, रमेश वाकनीस आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. वंदना घांगुर्डे यांनी संगीत रंगभूमी विषयी सांगितले की, संगीत नाटकाचा प्रारंभ विष्णुदास भावे यांच्यापासून झाला असला तरी संगीत रंगभूमीचा सुवर्णकाळ अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या शाकुंतल पासून झाला. त्यानंतर नटसम्राट बालगंधर्व, संगीत सूर्य केशवराव भोसले, मास्टर दिनानाथ मंगेशकर यांच्या गायकीने रंगभूमी अधिक समृद्ध झाली. त्यांच्या गायकीची वैशिष्ट्ये सांगताना त्यांनी काही पदे सादर केली‌. या तीन महान गायकांचा व त्यांच्या गायन विचारधारांचा रसिकांनी पुरस्कार केला. त्यामुळे पुढे अनेकांनी त्यांचे अनुकरण केले.
“संगीत रंगभूमी मुळे दरबारी, रागदारी संगीत सामान्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचले. ‌त्यासठी अनेक संगीतकारांनी नवनवीन प्रयोग केले. उडत्या चालीचा अंतर्भाव केला. गरबा, लावणी, ठुमरी यांचा वापर केला. संगीत नाटक हे काळानुसार बदलत गेले. तंत्रज्ञानात बदल झाला. तसेच सामाजिक परिस्थितीनुसार नाटकाच्या विषयातही बदल झाला. सुरुवातीला पौराणिक कथाच फक्त मांडणाऱ्या संगीत नाटकांनी एकच प्याला, कीचकवध, संगीत शारदा अशा विविध नाटकातून स्वातंत्र्य चळवळीला पोषक व सामाजिक सुधारणांचा विचार मांडला.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी तीन नाटके लिहिली, संगीत रंगभूमीसाठी त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे. त्यांचे संन्यस्त खड्ग हे नाटक वेगळ्या धाटणीचे आहे .
नाटककारांच्या काही आठवणी, घटना, प्रसंग तसेच सुरेल नाट्यपद यामुळे रंगानुभूति: महोत्सवाच्या उत्तररंगातील ही मुलाखत महोत्सवात सहभागी झालेल्या अभ्यासकांच्या, रसिक श्रोत्यांच्या दृष्टीने अधिक महत्वपुर्ण ठरली. डॉ. वंदना घांगुर्डे यांनी ‘पंचतुंड नररुंड मालधर’ या नांदीने सुरुवात केली आणि ‘शतजन्म शोधताना’ या नाट्यपदाने मुलाखतीची सांगता केली. चिन्मय कुलकर्णी व सार्थक भोसले यांनी संगीत साथ केली.
सूत्र संचालन मिलिंद बावा, तेजस्विनी गांधी यांनी आणि आभार अमृता ओंबळे यांनी मानले.

राज्यातील 4783 तृतीयपंथीय व्यक्तींना ओळखपत्र

सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती

पुणे-तृतीयपंथीयांच्या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने राज्यातील अर्ज केलेल्या 5686 व्यक्तींपैकी 4783 व्यक्तींना तृतीयपंथी ओळखपत्र देण्यात आल्याची माहिती सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली आहे.

11 मार्च 2024 रोजी राज्य सरकारने तृतीय पंथीयांविषयीचे धोरण जाहीर केले. या धोरणाच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी सामाजिक न्याय विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती.

मिसाळ म्हणाल्या, “तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण, आरोग्य आणि रोजगार यावर विशेष भर देण्यात येत आहे. नोंदणी केलेल्या 3901 तृतीयपंथीयांना आधार कार्ड आणि 1240 व्यक्तींना आयुष्मान भारत कार्ड वितरित करण्यात आले आहे. अर्ज केलेल्या उर्वरित व्यक्तींची प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल.”

तृतीयपंथीयांसाठी महत्त्वाचे निर्णय

  • हक्काचे संरक्षण करण्यासाठी विभाग आणि जिल्हास्तरावर समिती
  • जिल्हानिहाय सर्वेक्षण मोहीम राबवणार
  • जिल्हास्तरावर वैद्यकीय मंडळामार्फत विनामूल्य समुपदेशन, उपचार आणि शस्त्रक्रिया
  • शासकीय भरती, शिक्षण संस्थांच्या अर्ज/आवेदनावर तृतीयपंथी हा पर्याय
  • तृतीयपंथीयांना मोफत उच्च शिक्षणाची सुविधा (विद्यापीठाच्या स्वनिधीतून)
  • गृहनिर्माण धोरणामध्ये समावेश
  • कौशल्य विकास प्रशिक्षण शिष्यवृत्ती आणि प्लेसमेंट

तृतीयपंथीयांना ओळखपत्र, आधार कार्ड आणि आयुष्यमान भारत कार्ड वितरित केल्याचा राज्याचा तक्ता

“पंढरीचा राजा पंढरीनाथ, विश्व माऊली विश्वनाथ” कार्यक्रमाचे सादरीकरण-विद्यार्थ्यांनी सादर केली भक्ती गीते व ९ रसांवर आधारित नृत्य

पुणे २३ सप्टेंबरः संगीतातून निर्माण होणारा भक्तिरस, आत्म्याला भिडणारा अनुभव, लय व माधुर्य आणि आध्यात्मिक अनुभव या सर्वांची अनुभूती तसेच नृत्याच्या माध्यमातून भारतीय अध्यात्मातील ९ रसांची अनुभूती घटस्थापनेच्या मुहूर्तावर माईर्स एमआयटीच्या प्रांगणात जाणवली.
निमित्त होते माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या ‘फनकार फोरमच्या माध्यमातून सादर करण्यात अलेल्या “पंढरीचा राजा पंढरीनाथ, विश्व माऊली विश्वनाथ” या अध्यात्मिक गीत आणि नृत्याच्या कार्यक्रमाचे. भारतीय संस्कृती, परंपरा व अध्यात्माची महती युवक व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचा मुख्य उद्देश्य ठेऊन याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण, डब्ल्यूपीयूचे कुलसचिव प्रा.गणेश पोकळे, सीएओ डॉ. प्रसाद खांडेकर, पीस स्टडीजचे डॉ. मिलिंद पात्रे, डॉ. अंजली साने, डॉ.रोहिणी काळे व डॉ. महेश थोरवे यांची प्रमुख उपस्थिती होते.
विठोबा व ज्ञानेश्वर माऊली या थीम वर आधारित ‘कानडा राजा पंढरीचा’,‘जरा ज्ञानदेवा मुक्ताईचे ऐका’, सारखे अनेक भक्ती गितांचे सादरीकरणाने उपस्थितांना साक्षात माऊलीचे दर्शन घडल्यासारखे झाले. सुयश चांडोलकर व सर्वेश रोटकर त्यांच्या चमुने ही भक्ती गिते सादर केली. नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने नवरस जसे श्रृंगार, हास्य, करुणा, रौद्र, वीर, भयानक, बीभत्स, अभ्दुत आणि शांत रसांवर आधारित नृत्य भरतनाट्यम् व कथ्थकच्या माध्यमातून सादर करण्यात आले. त्याच प्रमाणे माँ कालीच्या नृत्य सादरीकरणाने सर्वांना मंत्रमुग्ध केले. कोरिओग्राफर वेल्लरी व श्रेया या विद्यार्थी चमूने या संपूर्ण नृत्यांचे नियोजन केले.
या प्रसंगी विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा.कराड यांनी ‘फनकार फोरम’च्या सर्व सदस्यांचा सत्कार केला. तसेच, फोरमच्या पदाधिकार्‍यांनी प्रा.डॉ. विश्वनाथ दा कराड यांचा विशेष सत्कार केला.
डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“या सृष्टीवर एकच व्यक्ती विश्व माऊली होऊ शकते, ती म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊली. यांच्या तत्वज्ञानावर आज प्रत्येक व्यक्ती जीवन व्यतीत करीत आहे. विश्वशांतीसाठी विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून दिले जाणारे ज्ञान हेच सर्वश्रेष्ठ आहे. येथील विद्यार्थ्यांना दिले जाणारे ज्ञान हे विश्वगुरूच्या दिशेने वाटचाल करणार आहे. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या या कार्यक्रमातून हे सिद्ध होते की देश विश्वशांतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.”
डॉ. मिलिंद पात्रे म्हणाले,“जगप्रसिद्ध संगणक शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर सांगतात की ज्या दिवशी या देशात शिक्षित विद्यार्थी हा भजन, कीर्तन, व वारीत माऊलीच्या तालावर नाचतील तेव्हाच भारत खर्‍या अर्थाने विश्वगुरू म्हणून उद्यास येईल. ”
‘फनकार फोरम’चे संस्थापक सदस्य  सुदीप दहीफळे, प्रज्वल गुप्ता, आदिती, जिज्ञासा व प्रतिक्षा यांनी कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन केले.
डॉ. सचीन गाडेकर यांनी सूत्रसंचालन केले.

भाविकांच्या सोयीसाठी एकविरा मंदिरासमोरील सभा मंडप उभारण्याचा डॉ. नीलम गोऱ्हे यांचा संकल्प

लोणावळा | २३ सप्टेंबर २०२५

मावळ तालुक्यातील कार्ला परिसरातील प्राचीन आणि पवित्र असलेल्या एकविरा मातेच्या पायथ्याशी असलेल्या मंदिराला विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भेट देऊन दर्शन घेतले. या वेळी त्यांनी प्रसाद, साखर नैवेद्य आणि महावस्त्र अर्पण करून भाविकांसाठी सोयीसुविधा आणि सुरक्षिततेविषयी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या.

डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, वाहनतळाचा प्रश्न, खड्डेमय रस्ते आणि भाविकांच्या सोयीशी निगडित अनेक कामे अद्याप प्रलंबित आहेत. पीएमआरडीए आणि एमएमआरडीएने काही प्रमाणात लक्ष घातले असले तरी अधिक समन्वय साधून ही कामे वेगाने पूर्ण होणे गरजेचे आहे. दिवाळीनंतर विधानभवनात विशेष बैठक घेऊन संबंधित विभागांच्या प्रलंबित प्रश्नांवर निर्णय घेण्यात येणार असून अनेक वर्षे थांबलेली कामे गतीमान करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

शिवसेना स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार एकविरा देवी मंदिराच्या पायथ्याशी भाविकांसाठी सभा मंडप उभारण्यासाठी डॉ. गोऱ्हे यांनी आपल्या आमदार निधीतून १५ लाख रुपये देण्याची घोषणा केली. पीडब्ल्यूडीकडून ‘नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट’ मिळताच या कामाला तातडीने सुरुवात होईल.

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवस्थानातील तयारीचाही आढावा घेण्यात आला. पायरी मार्गावर रेलिंग बसविणे, मधमाशांच्या हल्ल्यापासून संरक्षण, लाकडी डोलीतून दर्शन घेणाऱ्या भक्तांची सुरक्षितता, आरोग्य सेवा सुविधा आणि पार्किंगच्या समस्येचे निराकरण यावर विशेष भर देण्यात आला.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “भाविकांची सुरक्षितता आणि सोय ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे. एकविरा मातेकडे प्रार्थना करते की, सर्व ग्रामस्थ व भक्तांना सुरक्षितता, सौख्य, लक्ष्मी आणि विजय लाभो.”

या प्रसंगी डॉ. गोऱ्हे यांच्यासोबत भगिनी जेहलम जोशी, शिवसेना महिला आघाडी संपर्कप्रमुख कांताताई पांढरे, जिल्हाप्रमुख राजेश खांडभोर, उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, जिल्हा संघटक अंकुश देशमुख, मावळ तालुकाप्रमुख राम सावंत, युवासेना मावळ लोकसभा अध्यक्ष विशाल हुलावळे, मावळ संघटक चंद्रकांत भोते तसेच ग्रामपंचायत सदस्य सचिन व सागर हुलावळे आदी मान्यवर उपस्थित होते.

सकारात्मक समाजकार्य उभारण्यासाठी मोठी स्वप्ने पहा-रोटरी इंटरनॅशनलचे माजी अध्यक्ष शेखर मेहता यांचे आवाहन

रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवनचा रौप्य महोत्सव सांगता सोहळा

पुणे : कुठलेही समाजोपयोगी काम हाती घेताना, ते साकारण्याचे मोठे, विशाल स्वप्न पहा. स्वप्ने पाहताना काळाच्या चौकटीची पर्वा करू नका. सकारात्मक कार्याची परिपूर्ती काळाच्या पटलावर नक्कीच होते. त्यामुळे आपली स्वप्ने विशाल आणि मोठी ठेवा, असे आवाहन रोटरी इंटरनॅशनलचे माजी अध्यक्ष रोटोरियन शेखर मेहता यांनी केले.

रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवनच्या रौप्य महोत्सव सांगता समारंभाच्या निमित्ताने आयोजित विशेष कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात रोटरी क्लब गांधीभवनच्या अध्यक्ष रोटेरियन अश्विनी शिलेदार, ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री गिरीश प्रभुणे, सचिव रोटेरियन शामल मराठे, रोटेरियन आणि कार्यक्रमाचे समन्वयक गणेश जाधव आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रारंभी क्लबच्या २५ वर्षांतील विविध उपक्रमांची माहिती देणारी ध्वनिचित्रफीत दाखविण्यात आली. रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवनच्या वाटचालीत ज्या संस्था, नागरिकांचे मोलाचे सहकार्य लाभले, अशा व्यक्तींचा व संस्थांचा या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. रोटरी क्लब ऑफ गांधीभवनच्या ‘पसायदान’ या बुलेटीनचे तसेच ‘पढो भारत’ या प्रकल्पाच्या पोस्टरचे प्रकाशनही याप्रसंगी करण्यात आले. ‘पढो भारत’ या प्रकल्पाद्वारे पुस्तक संकलन मोहीम राबविण्यात येणार असून या द्वारे संकलित झालेली पुस्तके गरीब मुलांना वितरित करण्यात येणार आहेत.
रोटेरियन शेखर मेहता पुढे म्हणाले, देशभक्तांनी, क्रांतिकारकांनी, संशोधकांनी, समाजसुधारकांनी वेळोवेळी विशाल स्वप्ने पाहिली. ती साकार होण्याच्या दिशेने अखंडित काम केले. अनेक जण त्या स्वप्नांची परिपूर्ती स्वतःच्या हयातीत पाहू शकले नाहीत, पण ज्या समाजाच्या उन्नतीसाठी ते झटले, त्या समाजाने ती स्वप्ने साकार होताना अनुभवली, हे महत्त्वाचे आहे. रोटरी क्लब गांधीभवनचे गेल्या २५ वर्षांतील कार्य उल्लेखनीय, कौतुकास्पद आहे. यापुढेही क्लब सर्वोत्कृष्टतेचा ध्यास घेऊन कार्य करत राहील, असा विश्वास वाटतो.
प्रभुणे म्हणाले, समाज आणि देश प्रगतीच्या वाटा नक्कीच चालत आहे, पण अजूनही समाजातील काही घटक वंचित, मागास, अशिक्षित आणि अभावग्रस्त अवस्थेत जगत आहेत. स्त्रियांची स्थिती असहाय आहे. आपले पीडित, दलित, मागास, वंचित बांधव विकासाच्या मुख्य प्रवाहात येणे आवश्यक आहे. सन २०४७ पर्यंतचे देशाच्या विकासाचे स्वप्न पंतप्रधान मोदी यांनी पाहिले आहे. हा काळ अमृतकाळ आहे, अशी धारणा आहे. ती धारणा प्रत्यक्षात उतरवीणे ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. रोटरी क्लब गांधीभवनचे कार्य अमृतकाळाशी सुसंगत पद्धतीने सुरू आहे.
रोटेरियन अश्विनी शिलेदार म्हणाल्या, अध्यक्षपद स्वीकारल्यापासून अनेक सेवा प्रकल्पांचा संकल्प केला आहे. पुण्यातील महिलांच्या सुरक्षेसंदर्भात पोलिसांच्या मदतीने काही ठिकाणी सीसीटिव्हीचे काम सुरू होत आहे. ‘भवानी’ या नावाने हा प्रकल्प सुरू होत आहे. तसेच या कार्याच्या उद्देशाशी तरुणाई जोडली जावी, यासाठी ‘कवच’ हा प्रकल्पही नुकताच सुरू झाला आहे. दिव्यांगांसाठी ‘साऊंड गार्डन’ उभारण्याची योजना आहे. तसेच पर्यावरणाशी संबंधित कार्य आणि गाव दत्तक घेण्याचा उपक्रम सुरू आहे.
रोटेरियन प्रसाद पुजारी यांनी आभार मानले. डॉ. उज्ज्वला बर्वे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‌‘ज्याचा त्याचा विठ्ठल‌’ हा संगीत-चित्र-नाट्य अभिवाचनाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

…तर अजित पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा-रामदास तडस यांची मागणी

मनमानी कारभाराविरोधात महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या विरोधात आंदोलन

राज्य क्रीडा संघटनांना मतदानाचा अधिकार मिळावा, भ्रष्टाचाराची चौकशी यासाठी संदीप भोंडवे यांचे उपोषण

पुणे: महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेमध्ये महासचिव नामदेव शिरगावकर यांच्या मनमानी, भ्रष्टाचारी कारभाराबाबत अध्यक्ष अजित पवार यांच्याकडे अनेकदा तक्रार करूनही त्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. अजित पवार यांना संघटनेच्या कामात लक्ष देण्यासाठी वेळ नसेल, तर त्यांनी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माजी खासदार रामदास तडस यांनी केली. संघटनेच्या भ्रष्ट व भोंगळ कारभारामुळे खेळाडूंचे नुकसान होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार नाकारल्यानंतर राज्यभरातील २५ ते ३० क्रीडा संघटना व खेळाडू आक्रमक झाले असून, मंगळवारी रामदास तडस यांच्या नेतृत्वाखाली बंडगार्डन पोलीस स्टेशनसमोर तीव्र आंदोलन करण्यात आले. कुस्ती, कबड्डी, तायक्वांदो, बॉक्सिंग, हँडबॉल, स्विमिंग, कुराश अशा विविध २५ ते ३० संघटनांचे पदाधिकारी, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू, पुरस्कारप्राप्त खेळाडू या निषेध आंदोलनात सहभागी झाले. नामदेव शिरगावकर यांनी तीन नॅशनल गेम्समध्ये केलेला भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी व महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेच्या निवडणुकीत सर्व संलग्न ५० राज्य क्रीडा संघटनांना मतदानाचा अधिकार मिळावा, यासाठी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष व भाजप क्रीडा आघाडी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पै. संदीप भोंडवे आमरण उपोषणाला बसले आहेत. यावेळी हिंदकेसरी पै. योगेश दोडके, कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष विलास कथुरे, हँडबॉल संघटनेचे सरचिटणीस राजाराम राऊत, सायकलिंग असोसिएशनचे संजय साठे, तायक्वांदो खेळाडू मिलिंद पाठारे, प्रवीण बोरसे, सुभाष पाटील, सल्लाउद्दीन अन्सारी, संदीप गाडे, तात्या भिंताडे आदी उपस्थित होते. 

रामदास तडस म्हणाले, “संघटनेला ५० खेळांच्या संघटनांना मान्यता असतानाही केवळ २२ संघटना मतदानासाठी पात्र ठरवणे, हे लोकशाहीला काळिमा फासणारे आहे. नामदेव शिरगावकर यांची ही मुजोरी आणि भ्रष्ट कारभार खेळाडूंच्या आयुष्याशी खेळ आहे. खेळाडूंच्या कल्याणासाठी आमचे हे आंदोलन आहे. ‘नामदेव हटाव’ ही एकच सर्वांची मागणी आहे. त्यासाठी संदीप भोंडवे उपोषणाला बसले आहेत. यासह आम्ही या दोन्ही गोष्टींवर हरकती नोंदवल्या असून, २५ तारखेपर्यंत याचा निकाल लागला नाही, तर २७ तारखेपासून माझ्यासह अन्य खेळाडू व पदाधिकारी महाराष्ट्रभर आमरण उपोषणाला बसतील.”

“गुजरात, गोवा, उत्तराखंड येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धांसाठी राज्य शासनाने १२ कोटी रुपये दिले. मात्र, त्याचा हिशोब अद्यापही दिलेला नाही. यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. महाराष्ट्रातील खेळाडूंना मागे खेचण्याचे काम संघटनेकडून सुरु आहे. अजित पवार केवळ नावापुरते पदावर आहेत की काय, अशी शंका आम्हाला येत आहे. माझ्यासह केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही वारंवार तक्रारी केल्या आहेत. मात्र, त्याची दखल घेतली जात नाही. पवार यांना संघटनेच्या कार्यात लक्ष घालायला वेळ नसेल, तर त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आहे.”

उपोषणाला बसल्यानंतर संदीप भोंडवे म्हणाले, “खेळासाठी वेळ देऊ शकणारे, खेळाडूंचा विचार करणारे लोक संघटनेत येण्यासाठी सर्व संघटनांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे. नामदेव शिरगावकर यांच्यासारखे भ्रष्ट लोक संघटनेतून बाहेर काढण्यासाठी हा आमचा लढा आहे. भ्रष्टाचाराची चौकशी, सर्वाना मतदानाचा अधिकार आणि नामदेव शिरगावकर यांना हटवत नाही, तोवर माझे उपोषण सुरु राहणार आहे. खेळाडूंच्या नावावर स्वतःच्या व कुटुंबियांच्या नावाने कंपन्या काढून शिरगावकर यांनी मोठ्या प्रमाणात पैसे लाटले आहेत.”

यावेळी आंदोलनात सहभागी खेळाडूंचे रौद्र रूप पाहायला मिळाले. संघटनेच्या भोंगळ कारभारामुळे खेळांमध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवूनही आम्हाला योग्य संधी मिळत नसल्याची खदखद खेळाडूंनी व्यक्त केली. कुस्ती, तायक्वांदो खेळांची प्रात्यक्षिके करून हलगीच्या निनादात झालेल्या या आंदोलनाने सर्वांचेच लक्ष वेधले.

वीजभार वाढीच्या ऑनलाइन अर्जांना स्वयंचलित मंजूरी

0

महावितरणकडून तत्पर ग्राहकसेवेचा नवा अध्याय सुरू

मुंबई: महावितरणच्या लघुदाब वर्गवारीतील सर्व औद्योगिक, व्यावसायिक, घरगुती व इतर ग्राहकांच्या १५७ केडब्लूपर्यंत वीज भार वाढीच्या ऑनलाइन अर्जांना महावितरणकडून स्वयंचलित पद्धतीने मंजुरी देण्यास प्रारंभ झाला आहे. महावितरणच्या संकेतस्थळावर ही स्वयंचलित प्रणाली कार्यान्वित झाली आहे. त्यामुळे पायाभूत यंत्रणा उभारण्याची गरज नाही अशा ठिकाणी ग्राहकांनी नियमानुसार शुल्काचा भरणा केल्यानंतर केवळ २४ ते ४८ तासांमध्ये मागणीप्रमाणे वाढीव वीजभार स्वयंचलित पद्धतीने मंजूर व कार्यान्वित होणार आहे.

राज्याचे मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस यांनी वीजग्राहकांना ‘इज ऑफ लिव्हिंग’नुसार (राहणीमान सुलभता) सेवा देण्याची सूचना केली आहे. त्यानुसार महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी लघुदाब वर्गवारीतील सर्व ग्राहकांसाठी वीज भारात वाढ किंवा कमी करण्याची प्रक्रिया ऑनलाइनद्वारे स्वयंचलित करण्याचे निर्देश दिले. त्यासाठी ऑनलाइन प्रणाली विकसीत करून दि. १७ सप्टेंबरते दि. २ ऑक्टोबरच्या सेवा पर्वाचे औचित्य साधून ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.

सध्या अस्तित्त्वात असलेल्या जोडणीच्या वीजभारामध्ये (Load Change/Demand Change) करारापेक्षा आणखी वाढ करणे किंवा कमी करण्याची सोय महावितरणच्या www.mahadiscom.in संकेतस्थळावर किंवा मोबाइल अॅपवर ग्राहकांना स्वतःच्या लॉगीनद्वारे उपलब्ध आहे. मात्र मंजूरीची प्रक्रिया स्वयंचलित नसल्याने पुढील कार्यवाहीसाठी बराच वेळ लागत होता. आता १५७ किलोवॅटपर्यंतच्या वीज भाराच्या वाढीसाठी स्वयंचलित मंजूरी देण्यात येणार आहे. वीज भार वाढीबाबत ऑनलाइन मागणी नोंदविल्यानतंर संबंधित ग्राहकांना स्वयंचलित पद्धतीने कोटेशन देण्यात येईल. तर कोटेशनचे शुल्क भरण्याची देखील ऑनलाइन सोय आहे.

लघुदाब वर्गवारीमध्ये शून्य ते ७.५ किलोवॅट, ७.५ ते २० किलोवॅट आणि २० ते १५७ किलोवॅट असे वीजभाराचे तीन गट आहेत. या तिनही गटात वीज भार वाढीच्या मंजूरीसाठी स्वयंचलित प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. ग्राहकांना केवळ संकेतस्थळ किंवा मोबाईल अॅपद्वारे ऑनलाइन अर्ज करावा लागेल व नियमानुसार शुल्क भऱावे लागेल. त्यापुढील सर्व प्रक्रिया महावितरणकडून स्वयंचलित पद्धतीने होणार आहे. त्याची माहिती संबंधित ग्राहकांना नोंदणीकृत मोबाईल क्रमांक किंवा ई-मेलद्वारे कळविण्यात येणार आहे.

वीजग्राहकांनी आवश्यक शुल्काचा भरणा केल्यानंतर नवीन मीटर बसविण्याची किंवा पायाभूत वीजयंत्रणा उभारण्याची गरज नसेल अशा नसेल, अशा वीजजोडणीचा वाढीव वीज भार स्वयंचलित प्रणालीने मंजूर होईल व केवळ २४ तासांत कार्यान्वित होईल. वाढीव वीजभाराच्या आवश्यकतेनुसार किंवा सिंगलऐवजी थ्री फेजची मागणी असल्यास नवीन मीटर लावण्यात येते. अशा ठिकाणी नवीन वीज मीटर लावण्याचा आदेश स्वयंचलितपणे संबंधित एजन्सीला देण्यात येईल. त्यामुळे नवीन वीजमीटरची आवश्यकता असलेल्या ठिकाणी देखील साधारणतः ४८ तासांमध्ये वीज भार वाढीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

यासह ज्या वीजजोडणीचा करारापेक्षा अधिक वीज भार वाढविण्यासाठी पायाभूत यंत्रणा उभारण्याची आवश्यकता आहे, त्याठिकाणी महावितरणद्वारे पायाभूत यंत्रणा उभारण्यात येईल. त्याबाबत स्वयंचलितपणे निवडसूचीवरील संबंधित एजन्सीला कळविण्यात येईल. पायाभूत यंत्रणा उभारण्याचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात येईल. या प्रक्रियेची माहिती वेळोवेळी संबंधित ग्राहकांना कळविण्यात येईल.

लघुदाब वर्गवारीमध्ये वीज भार वाढीच्या ऑनलाइन अर्जांना स्वयंचलित पद्धतीने मंजूरी देण्याच्या निर्णयामुळे महावितरणच्या ग्राहकसेवेचा नवा अध्याय सुरू झाला आहे. त्याचा प्रामुख्याने प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेसाठी घरगुती ग्राहकांना तसेच प्रामुख्याने औद्योगिक, व्यावसायिक व इतर लघुदाब ग्राहकांना मोठा लाभ होणार आहे.

सर्व कलांना सन्मान आणि व्यासपीठ देणारा महोत्सव:ज्येष्ठ कथक नृत्यांगना, गुरू विदुषी शमा भाटे यांचे उदगार

दीप्ती भोगले आणि अर्चना देशमाने यांना
‘तेजस्विनी पुरस्कार’ प्रदान

पुणे – पुणे नवरात्र महिला महोत्सवात सर्व शास्त्रीय कलांचा सन्मान केला जातो आणि या कलेच्या उपासकांना सातत्याने व्यासपीठ दिले जाते. याचे श्रेय महोत्सवाचे प्रवर्तन, आयोजक जयश्री बागुल आणि आबा बागुल यांचे आहे, असे उद्गार ज्येष्ठ नृत्यांगना, गुरू, संरचनाकार विदुषी शमा भाटे यांनी मंगळवारी येथे काढले.

पुणे नवरात्रौ महोत्सवात दरवर्षी संपन्न होणारा आणि हजारो महिलांचा सहभाग असणारा ‘पुणे नवरात्रौ महिला महोत्सव’ यंदा वैभवशाली २७वे वर्ष साजरे करीत आहे. या महिला महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी शमा भाटे बोलत होत्या. त्यांच्याच हस्ते यावेळी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेत्री गायिका दीप्ती भोगले आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या अनाथ मुला-मुलींचे शिक्षण व संगोपन करणाऱ्या आळंदी येथील ‘स्नेहवन’ संस्थेच्या अर्चना देशमाने यांना तेजस्विनी पुरस्कार प्रदान करण्यात आला. ५ हजार रुपये, गौरवचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तसेच याप्रसंगी पुणे महानगरपालिकेच्या २५०हून अधिक महिला सफाई कामगारांचा गौरवचिन्ह व भेटवस्तू देऊन विशेष गौरव करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

श्री लक्ष्मीमाता मंदिर प्रांगण, मुक्तांगण शाळेजवळ, शिवदर्शन, पुणे येथे हा कार्यक्रम महिलांच्या प्रचंड प्रतिसादात संपन्न झाला. याप्रसंगी पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल, प्रवर्तक आबा बागुल, तसेच निर्मला जगताप, छाया कातुरे, प्रांजली गांधी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

विदुषी शमा भाटे पुढे म्हणाल्या, ‘पुणे नवरात्र महिला महोत्सवाशी मी गेल्या अनेक वर्षांपासून जोडलेली आहे. या व्यासपीठावरून दरवर्षी नृत्याच्या माध्यमातून देवीच्या विविध रूपांचा शोध घेण्याचा प्रयत्न आम्ही करत आलो आहोत. जयश्रीताई आणि आबा बागुल यांना नाही म्हणता येत नाही, इतक्या आत्मीयतेने ते हे कार्य करतात. या महोत्सवात सर्व कलांना सन्मानाचे स्थान असते. मान्यवर कलाकारांचा सहभाग असतो. एक कलाकार म्हणून मला हे फार महत्त्वाचे वाटते’.

मनोगत व्यक्त करताना दीप्ती भोगले म्हणाल्या, ‘मी एक भाग्यवान कलाकार आहे. नवरात्र महोत्सवात मी सातत्याने येत आहे. बागुल कुटुंब हे घरची माणसे असावीत, इतके जवळचे आहे कारण कोणत्याही अडचणीत ते धावून येतात. या महोत्सवाच्या माध्यमातून आबा आणि जयश्रीताई, विविध कलांना एका व्यासपीठावर आणून रसिकांना आनंद देतात’.

अर्चना देशमाने म्हणाल्या, ‘स्नेहवनच्या कार्याविषयी शब्दांतून सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष भेट देऊन कार्य पाहणे अधिक आनंदाचे आहे’.

जयश्री बागुल यांनी प्रास्ताविक करताना नवरात्र महिला महोत्सवाची माहिती दिली. शक्तीचे जागरण आणि शक्तीला अभिवादन, ही भावना असून, या निमित्ताने समाजातील विविध महिलांना एकत्र आणणे, संवाद साधणे आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचा हेतू असतो, असे त्या म्हणाल्या.

स्वच्छता कर्मचार्यांच्या वतीने आशा भोसले यांनी प्रातिनिधिक मनोगत मांडले. ‘आबा आणि जयश्रीताईंनी आमची आठवण ठेवली आणि सत्कार केला, याचा फार आनंद झाला’, असे त्या म्हणाल्या. सुरवातीला नृत्याविष्काराच्या माध्यमातून देवीवंदना सादर करण्यात आली. तसेच मान्यवरांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. नम्रता जगताप यांनी आभार मानले तर गौरी स्वकुळ यांनी सूत्रसंचालन केले.

स्वारगेट परिसरात ‘दुधानी’ टोळीचा हैदोस

पुणे : स्वारगेट परिसरात ‘दुधानी’ टोळीने दहशत माजवल्याची घटना समोर आली आहे. मकोका कारवाईनंतर जामीनावर सुटून आलेल्या आरोपीसह सराईत गुन्हेगारांनी डायस प्लॉट परिसरात भर वस्तीत एकावर कोयत्याने वार करत त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाहीतर या टोळक्याने हवेत हत्यारे फिरवलीत त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. भक्तिसिंग दुधानी, शक्तिसिंग दुधानी, गोविंदसिंग टाक, आकाशसिंग दुधानी यांच्यासह सात जणांविरोधात विविध कलमांन्वये ‘आर्म्स अॅक्ट आणि क्रिमिनल लॉ अमेंडमेंट’ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय. या प्रकरणी आबा सरोदे (वय ३९) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिलीय.शनिवारी रात्री तक्रारदार डायस प्लॉटमधील कॅनॉलजवळ उभे असताना आरोपींनी त्यांना गाठले. सुरुवातीला त्यांना हाताने मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर टोळक्याने कोयत्याने सपासप वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. हल्ल्यानंतर परिसरात कोयते हवेत फिरवून आरोपींनी दहशत माजवलेली. अचानक झालेल्या या हल्ल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यानंतर आरोपी टोळके पसार झाले. सर्व आरोपींवर खुनाचा प्रयत्न, आर्म्स अॅक्टसह गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समजत आहे.गोविंदसिंग टाकवर ‘मकोका’ कारवाई झालेली असून, तो एप्रिल २०२५ मध्ये कारागृहातून बाहेर आला आहे. दुधानी टोळीतील सदस्यांवरदेखील खुनाचा प्रयत्न, शस्त्र बाळगणे अशा अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. तक्रारदारांशी आरोपींची केवळ तोंडओळख असून, जुन्या वादातून हल्ला झाल्याचा अंदाज आहे. घटनेनंतर पोलिसांनी छापेमारी करून परिसरात तपास सुरू केला आहे. आरोपींचा शोध सुरू असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक निकिता पवार करत आहेत.टोळक्यांवर ‘मकोका’सारखे कठोर कायदे लावले जात असले, तरी कारागृहातून बाहेर पडल्यानंतर ते पुन्हा गुन्हेगारीकडे वळतात. टोळीतील गुंड गंभीर गुन्ह्यांसाठी अल्पवयीन मुलांना टोळीत सहभागी करून घेत असल्याचे समोर आले आहे.