Home Blog Page 119

महाराष्ट्र राज्य फिन स्विमिंग स्पर्धा:गुरु व शिष्य एकाच वेळी पदकांच्या व्यासपीठावर!!

पुणे २४ सप्टें. : गुरु व शिष्य यांनी एकाच वेळी पदकांच्या व्यासपीठावर उभे राहण्याचा दुर्मिळ योग येथे नुकताच पहावयास मिळाला.‌ निमित्त होते महाराष्ट्र राज्य फिन स्विमिंग अजिंक्यपद स्पर्धा. या स्पर्धेमध्ये नांदे येथील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या खेळाडूंनी सुवर्ण चौकारांसह आठ पदकांची कमाई केली. त्याचबरोबर त्यांच्या प्रशिक्षकांनीही तीन सुवर्णपदके जिंकून चमकदार कामगिरी केली

श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल, महाळुंगे, पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये निया पतंगे‌ हिने २०० बाय फिन, २०० मोनो फिन व १०० मोनो फिन प्रकारात सुवर्णपदक पटकावले तर १०० बाय फिन प्रकारात तिला कांस्यपदक मिळाले. रेवा चौगुले हिने ५० अपनिया व २०० मोनोफिन प्रकारात रौप्यपदक मिळविले तर १०० मोनोफिन प्रकारात कांस्यपदक जिंकले. अनया वानखेडे हिने ५० बाय फिन प्रकारात सुवर्णपदक पटकावले.‌ या खेळाडूंना प्रशिक्षक स्मिता काटवे, उमा जोशी, रुपाली अनाप आणि केशव हजारे यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रशिक्षक श्रीमती स्मिता काटवे यांनी या स्पर्धेत ५० मीटर बाय फिन, १०० मीटर बाय फिन, ५० मीटर सरफेस मोनो फिन या तीनही क्रीडा प्रकारात सोनेरी कामगिरी केली.
खेळाडू व प्रशिक्षकांनी मिळवलेल्या या यशाबद्दल ध्रुव ग्लोबल स्कूलचे संचालक यशवर्धन मालपाणी व प्राचार्य संगीता राऊतजी यांनी सर्व खेळाडू तसेच प्रशिक्षकांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.

पुणे नवरात्रौ महोत्सव मध्ये जेष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांच्या आठवणीना उजाळा

पुणे-मराठी चित्रपटसृष्टी मध्ये तब्बल ६० वर्ष सुरेल संगीत गायन करणारे पद्मभूषण ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त रंगभूमीवरील त्यांच्या कार्याची दखल घेणाऱ्या आठवणींना उजाळा देण्यात आला. ३१व्या पुणे नवरात्रौ महोत्सव मध्ये श्रीनिवास खळे यांच्या प्रतिमेचे पूजन करून गायन कार्यक्रमास सुरवात झाली. पुणे नवरात्रौ महोत्सवात २००० साली श्री लक्ष्मीमाता कलासंस्कृती पुरस्कार देऊन श्रीनिवास खळे यांना सन्मानित करण्यात आले होते तसेच त्यांनी त्यावेळी कार्यक्रम देखील सादर केला होता या आठवणींना याप्रसंगी उजाळा देण्यात आला. तसेच त्यांच्याशी संबंधित गाणी देखील गाण्यात आली.

३१वा पुणे नवरात्रौ महोत्सव मध्ये स्वारगेट येथील श्री गणेश कला क्रीडा रंगमंच याठिकाणी १९९०च्या काळातील सुरेल गाण्यांचा ‘नाईनटीज मेलडी’या कार्यक्रमाचे देखील आयोजन यावेळी करण्यात आले होते. पुणे नवरात्रौ मोहत्सवचे आयोजक अध्यक्ष आणि माजी उपमहापौर आबा बागुल आणि जयश्री बागुल यांनी या सुरेख सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अँकर आर. जे. बंड्या याने आपल्या ओघवत्या शैलीने करत प्रेक्षकांना संपूर्ण कार्यक्रमात खिळवून ठेवले.

१९९०च्या काळातील सुरेल गाण्यांचा ‘नाईनटीज मेलडी’या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक अभिषेक सराफ, अक्षय घाणेकर कल्याणी घाणेकर, तन्वी दाते यांनी वेगवगेळया सुरेल गाण्यांचे गायन करत प्रेक्षकांची मने जिंकली. नामांकित गायक ए. आर. रहमान , कुमार सानू, उदित नारायण, सोनू निगम, अल्का याज्ञिक, श्रेया घोषाल यांच्या विविध गाण्यांचा समावेश यामध्ये होता. प्रेक्षकांनी १९९० च्या दशकातील सुरेल गाणी पुन्हा एकदा ऐकण्यास मिळाल्याने आनंद व्यक्त करत टाळ्या वाजवून तसेच आवडती गाणी गुणगुणत जल्लोषपूर्ण प्रतिसाद दिला. ए. आर. रहमान यांचे “दिल से रे…” हे गाणे गायक अभिषेक घाणेकर यांनी उत्साहपूर्ण वातावरणात गातच प्रेक्षकांनी त्याला मोठा प्रतिसाद देत “वन्स मोअर” म्हणत गाणे पुन्हा गाण्यास लावले. श्रेया घोषल यांनी गायलेल्या ” जादू है नशा है” गाणे गायिका कल्याणी देशपांडे यांनी सुमधुर आवाजात गात उपस्थितांची मने जिंकली. गायक अक्षय घाणेकर आणि गायिका कल्याणी देशपांडे यांनी एकत्रित गायलेल्या सुप्रसिद्ध आशिकी चित्रपटातील गाण्याला तर प्रेक्षकांनी शिट्या वाजवून जोरदार प्रतिसाद दिला. बॉम्बे चित्रपटातील ए.आर.रहमान यांचे अजरामर गाणे “तू ही रे..तेरे बिना में कैसे जिऊ” गाण्यात तर प्रेक्षक ताल्लिन झाल्याचे पाहावयास मिळाले, गायका सोबत एकत्रित गाणे गात त्यांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला. प्रथमच नवरात्रौ उत्सव मध्ये गायन करत असलेल्या तन्वी दाते हिच्या सुरेल गाण्यांनी देखील सर्वांना मंत्रमुग्ध केले.

यावेळी नामांकित गायकांना संगीत वाद्य कलाकारांनी देखील उत्कृष्ट साथ दिली. ड्रम वादनअभिजित भदे, रिदम मशीनओंकार इंगवले, सॅक्सोफोनपीयुष तिवारी, पियानोशंतनु जहागिरदार आणि भारत ढोरे, गिटार वादन अजय थोरात तर तबला वादन मंगेश जोशी यांनी केले. यावेळी आबा बागुल, नंदकुमार कोंढालकर, नंदकुमार बानगुडे, घनश्याम सावंत, रमेश भंडारी, सुनील महाजन, निकिता मोघे, विलास रत्नपारखी, ॲड. चंद्रशेखर पिंगळे, द.स.पोळेकर उपस्थित होते.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते आदिशक्ती माता सच्चीयाय देवीची आरती संपन्न

पुणे : पुण्यनगरीच्या वैभवशाली सांस्कृतिक परंपरेत या वर्षी आदिशक्ती माता सच्चीयाय देवीच्या नवरात्री पावन पर्वानिमित्त श्रीमद् भागवत कथा तथा नवरात्री कीर्तन महोत्सव भव्यदिव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे. नाम-ज्ञान-प्रेम-दानाचा संगम घडविणाऱ्या या धार्मिक उत्सवात भक्तीसंगीत, पारायण, हरिपाठ, कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन श्री दगड जीवदया संस्था जवळ,आगम जैन मंदिर समोर, कात्रज,पुणे येथे करण्यात आले आहे. आज पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मातेचे दर्शन घेऊन पुणेकरांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी श्री सुसवाणीमाता सच्चीयायमाता चॅरिटेबल ट्रस्टचे आयोजक प्रमोद दुगड, मोनल दुगड आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, पुणेकरांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा ,आज दुगड परिवाराच्या निमंत्रणांवरून माता सच्चीयाय देवीची आरती करण्याचा योग आला, मंदिरात येऊन अतिशय प्रसन्न वाटले. दुगड परिवार राबवत असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांचेही पोलिस आयुक्तांनी यावेळी कौतुक केले.

मोनल दुगड म्हणाल्या, माणिकशेठ दुगड यांनी 35 वर्षांपूर्वी आदिशक्ती माता सच्चीयाय देवीच्या मंदिराची उभारणी केली. येथे नवरात्री मध्ये विविध धार्मिक कार्य करत आहोत, यामध्ये ज्ञानेश्वरी पारायण, स्त्री सूक्त पठण , याशिवाय येथे गोशाला आहे, चारशे हून अधिक गायांचा सांभाळ आम्ही करत असून इतरांच्या आजारी गायींना इथे आणले तरी आम्ही त्यांच्यावर योग्य ते उपचार करतो त्यांची काळजी घेतो, अन्नछत्र 24 तास सुरू असते, आज दुगड यांची चौथी पिढी देवीच्या सेवेत आहे.

प्रमोद दुगड म्हणाले, आदिशक्ती माता सच्चीयाय देवीच्या नवरात्री पावन पर्वानिमित्त दरवर्षी विविध धार्मिक उपक्रम आम्ही घेत असतो. यंदाही धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल आहे. आदिशक्ती माता सच्चीयाय देवीच्या नवरात्री पावन पर्वानिमित्त श्रीमद् भागवत कथा तथा नवरात्री कीर्तन महोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करत आहोत. अष्टमीच्या दिवशी महाकुंभ महोत्सव होत आहे, यामध्ये 108 जोडपी हवन करणार आहेत. सर्व उपक्रम गौरव दुगड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याचे प्रमोद दुगड यांनी नमूद केले.

संवेदनक्षम मनाची क्षमता न ओळखणे ही आधुनिक अस्पृश्यता : डॉ. मोहन आगाशे

0
मुंबा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलची दिमाखदार सुरुवात
तरुणांचा प्रचंड प्रतिसाद

पुणे : बुद्धिवादी शिक्षण हे स्वयंकेद्रीत असल्यामुळे जगण्याविषयी संवेदना निर्माण झालेल्या नाहीत. जीवनाच्या सर्वात जवळ जाणारे आणि भावनेचे माध्यम वापरणारे एकच साधन आहे ते म्हणजे चित्रपट. चित्रपटासाठी आधुनिक तंत्रज्ञान हाताळणे सोपे असले तरी त्याचे व्याकरण समजून घेणे आवश्यक आहे. आधुनिक बुद्धिवादी शिक्षण पद्धतीतून फक्त वाचक निर्माण झाले; परंतु उत्तम प्रेक्षक, श्रोते निर्माण होऊ शकले नाहीत. बुद्धिची भाषा शिकविली जाते परंतु संवेदनांची भाषा शिकविली जात नाही, अशी खंत ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी व्यक्त केली. संवेदनक्षम मनाची क्षमता ओळखू न येता एखाद्याला वाळीत टाकणे ही आधुनिक अस्पृश्यता आहे, अशी टिप्पणीही त्यांनी केली.
मुंबा फिल्म फाऊंडेशन आयोजित सहाव्या मुंबा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलचे उद्घाटन बुधवारी (दि. 24) ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे तसेच चित्रपट निर्माते उमेश कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्यावेळी डॉ. आगाशे बोलत होते. ‌‘आता थांबायचे नाय‌’ या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाने फिल्म फेस्टिव्हलचा शुभारंभ झाला. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, लॉ कॉलेज रोड येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
महोत्सवाचे आयोजक जय भोसले, महोत्सव संयोजक वीरेंद्र चित्राव, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील मराठी भाषा समन्वयक किरण गायकवाड, एमआयटी कॉलेजच्या दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय फिल्म स्कूलचे विभाग प्रमुख डॉ. अरुण प्रकाश, मराठवाडा मित्र मंडळाच्या कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्राचार्य डॉ. गणेश पठारे मंचावर होते.
बुद्धिवादी शिक्षण हे स्वयंकेंद्रीत; संवेदनांचा अभाव
आधुनिक शिक्षण पद्धतीवर मार्मिक भाष्य करताना डॉ. मोहन आगाशे म्हणाले, बुद्धी आणि संवेदना असणारे, लेखक आणि कवी झाले, तर बुद्धिवादी नुसते वाचकच राहिले. या शिक्षण पद्धतीमुळे बोलणारा शब्द फक्त लिहिता झाला आणि त्यामुळे दोन पाय आणि दोन डोळ्यांचा मानव एक पाय आणि एका डोळ्यावर आला. चित्रपट हे माध्यम करमणूक आणि शिक्षण या दोन्ही करिता वापरले गेले तर मानव दोन्ही पाय आणि दोन्ही डोळ्यांचा वापर करू लागेल. बुद्धिवादी शिक्षण हे स्वयंकेंद्रीत असल्याने यात संवेदनक्षमता नाही त्यामुळे भावना ओळखणे, हाताळणे घडू शकत नाही. यातूनच युद्धासारखे प्रसंग उद्भवले आहेत.
डॉ. मोहन आगाशे पुढे म्हणाले, चित्रपट करणेच नव्हे तर बघणे देखील शिका आणि त्यातून स्वत:ची परीक्षा करा. चित्रपट निर्मिती करताना माध्यमाची कुवत जाणून घेणे गरजेचे आहे. जिवंत माणसाचा मुदडा करून तो साठविणे याला आठवण म्हणत नाहीत हे चित्रपटाच्या माध्यमातून शिकणे महत्त्वाचे आहे. निव्वळ मनोरंजनात्मक चित्रपटातून योग्य ते शिक्षण मिळत नसल्यामुळे प्रेक्षकांची मानसिक प्रकृती खराब झाली आहे.
मुंबा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव संवेदनांचा उत्सव : उमेश कुलकर्णी
उमेश कुलकर्णी म्हणाले, लघुपट हे माध्यम प्रभावी आणि स्वातंत्र्य देणारे आहे. या माध्यमाद्वारे मनातील भावना प्रकट होऊ शकतात. आपल्या मनात नक्की काय घडते आहे हे आजची तरुणाई लघुपटाच्या माध्यमातून मांडत आहे. कलेच्या माध्यमातून सामाजिक विषयांवर भाष्य करणे, प्रश्न निर्माण करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात चित्रपट माध्यमांविषयी अपेक्षेएवढे लोकशिक्षण झालेले दिसत नाही. चांगला प्रेक्षक घडविण्याचे कार्य अशा चित्रपट महोत्सवातून वारंवार होणे गरजेचे आहे. फक्त पुणे-मुंबईच नव्हे तर गावागावांमध्ये अशा स्वरूपाचे कार्य व्हावे, ज्या योगे उत्तमोत्तम चित्रपट, लघुपट प्रतिभावान युवा पिढीपर्यंत पोहोचतर,. मुंबा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव संवेदनांचा उत्सव आहे. यातून समाजभान निर्माण व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
चित्रपट महोत्सव आनंदयात्रा ठरेल

प्रास्ताविकात वीरेंद्र चित्राव म्हणाले, माध्यम क्रांती झाल्यामुळे चित्रपट महोत्सवाला युवा वर्गाचा वाढता प्रतिसाद लाभत आहे. चित्रपट, लघुपट निर्मितीतून संवेदशीलता आणि जाणीवा जागृत झाल्यास युवा पिढीकडून या क्षेत्रात प्रभावी कार्य घडेल. मुंबा फिल्म फेस्टिव्हलच्या माध्यमातून सकस निर्मिती करणाऱ्या चित्रपट, लघुपटांना मंच उपलब्ध करून दिला जात आहे. निर्माते, दिग्दर्शक, अभ्यासक आणि प्रेक्षकांसाठी हा महोत्सव आनंदयात्रा ठरेल.

लघुपट निर्मितीसाठी एनएफडीसीने आर्थिक सहाय्य द्यावे

चित्रपट निर्मितीसाठी एनएफडीसीने आर्थिक सहाय्य केल्यामुळे अनेक लेखक, दिग्दर्शक, कलावंतांना त्याचा फायदा झाला. लघुपट हा सुद्धा महत्त्वाचा भाग आहे. लघुपट निर्मितीच्या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या तरुणांना एनएफडीसीने अनुदान द्यावे, अशी मागणी फेडरेशन ऑफ सोसायटीज्‌‍ ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष वीरेंद्र चित्राव यांनी या प्रसंगी केली.

डॉ. गणेश पाठारे, किरण गायकवाड यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. महोत्सवाचे सचिव विश्वास शेंबेकर, विरेंद्र चित्राव, बाळासाहेब रास्ते यांनी स्वागत केले. महोत्सवाचे संचालक अभिषेक अवचार यांनी सूत्रसंचालन केले.
दि. 24 ते 28 सप्टेंबर 2025 या कालावधीत राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, पंडित नेहरू नाट्यगृह आणि मराठवाडा मित्र मंडळाचे कॉमर्स कॉलेज या तीन नामांकित ठिकाणी चित्रपटांचे स्क्रीनिंग होणार आहे. महोत्सव सर्वांसाठी खुला आहे. यावर्षीच्या फेस्टिव्हलमध्ये केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालय तसेच नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनएफडीसी) यांचाही सहभाग आहे.

निवडणुका 30 जानेवारीच्या आतच घ्या,आता कोणतीही मुदतवाढ नाही

0

डिसेंबरमध्येच जिल्हा परिषदेच्या निवडणुका; आयोगाचे आदेश

सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला स्पष्ट आदेश दिला आहे की, महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि महापालिकांच्या निवडणुका 30 जानेवारीच्या आत संपन्न केल्या पाहिजेत. कोर्टाने हेही स्पष्ट केले आहे की, आयोगाला या मुदतीसाठी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पहिले मोठे पाऊल उचलले आहे. आयोगाने मतदार यादीची तयारी सुरु केली असून त्यासाठी हरकती व सूचना मागवण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामुळे आगामी निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुगमता राखण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, प्रारुप मतदार यादीवर 8 ते 14 ऑक्टोबर या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील. आयोगाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, विधानसभेची मतदार यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी लागू राहील आणि ती जशीच्या तशी संबंधित प्रभागांमध्ये विभागली जाईल. यामुळे प्रत्येक मतदाराला आपली माहिती तपासण्याची संधी मिळेल. आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रक्रियेत हरकती व सूचना दाखल करणारे मतदार स्वतःचे नाव, पत्ता व मतदार कार्ड तपासून आवश्यक दुरुस्ती सुचवू शकतील

अंतिम मतदार यादी 27 ऑक्टोबरला जाहीर केली जाणार

आयोगाने याच प्रारुप मतदार यादीवर हरकती व सूचना मागवल्यामुळे जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार यादी 8 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. यावर मतदारांनी 14 ऑक्टोबरपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. अंतिम मतदार यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी 27 ऑक्टोबरला जाहीर केली जाणार आहे. यामुळे निवडणुकीसाठी आवश्यक तयारी वेळेवर पूर्ण होईल आणि कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक अडचणी टाळल्या जाऊ शकतील.

हरकती व सूचना मागविल्यानंतर निवडणुका

जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी हरकती व सूचना मागविल्यानंतर राज्यातील महापालिका निवडणुका त्यानंतर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महापालिकांच्या निवडणुका जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांनंतर सुरू होतील. झेडपी व पंचायत समित्यांच्या निवडणुका नोव्हेंबरच्या अखेरीस किंवा डिसेंबरमध्ये होऊ शकतात, तर महापालिकांच्या निवडणुकांसाठी मतदार यादीवर हरकती व सूचना याच कालावधीत मागविली जाऊ शकतात. यामुळे सर्व स्तरांवर निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडणे शक्य होईल.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणूक प्रक्रियेस सुरुवात

या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केल्याने राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणूक प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. प्रत्येक मतदाराला आपली माहिती तपासून हरकती व सूचना दाखल करण्याची संधी मिळत असल्याने निवडणूक पारदर्शक पद्धतीने होईल, असे निवडणूक आयोगाचे अधिकाऱ्यांचे मत आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्या व महापालिकांच्या निवडणुकीत वेळेवर मतदार यादी तयार होणे अत्यंत महत्त्वाचे असून, या प्रक्रियेमुळे सर्व मतदारांना मतदानाचा अधिकार सुरक्षित राहील आणि आगामी निवडणुका सुगमता आणि पारदर्शकतेने पार पाडल्या जातील.

विधानसभेची मतदार यादी या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार

राज्यातील 32 जिल्हा परिषदा व 336 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने आज मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार प्रारुप मतदार यादीवर 8 ते 14 ऑक्टोबर 2025 या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील. राज्य निवडणूक आयोगाने 1 जुलै 2025 हा अधिसूचित दिनांक निश्चित केला आहे. त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहे. जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार यादी 8 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध केली जाईल. त्यावर 14 ऑक्टोबर 2025 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. अंतिम मतदार यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी 27 ऑक्टोबर 2025 रोजी जाहीर केली जाईल.

सेवा पंधरवडा उपक्रमात इंदापूर तालुक्यातील रस्त्यांना सिमांकन करण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरु-तहसीलदार जीवन बनसोडे

पुणे, दि. २४ सप्टेंबर: सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतात जाण्याकरिता त्यांची कायमस्वरुपी सोय व्हावी याकरिता १५ गावांमध्ये शेत,पाणंद, शिव रस्त्यांना सिमांकन करावयाचे कामकाज युद्धपातळीवर सुरु असल्याची माहिती तहसीलदार जीवन बनसोडे यांनी दिली आहे.

इंदापूर तालुक्यात थोरातवाडी (रुई), भोडणी, व्याहळी, कपरवाडी (वा), सरडेवाडी, गलांडवाडी नं. २, गोखळी, म्हसोबाचीवाडी, जंक्शन, डाळज नं.१, जाधववाडी, तावशी, अगोती नं.१, वकीलवस्ती आणि करेवाडी १५ गावांमध्ये शेत,पाणंद, शिव रस्त्याचे सिमांकन कार्यवाही सुरु आहे. या गावांमध्ये पहिल्या पाच दिवसामध्ये शिवारफेरी घेण्यात येणार असून मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, मोजणी विभागाचे कर्मचारी व पोलीस पाटील यांच्यामार्फत गाव नकाशावर असलेले आणि नसलेले रस्त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. याबाबत १७ सप्टेंबर रोजी आयोजित विशेष ग्रामसभेत रस्त्यांची प्राथमिक यादी तयार करुन मान्यता घेण्यात आली आहे. त्याप्रमाणे ग्रामसभेत ठरावही घेण्यात आले आहेत.

ग्रामसभेत घेण्यात आलेल्या ठरावानुसार १५६ पाणंद रस्त्याबाबत गावपातळीवरुन प्रस्ताव प्राप्त झाले आहेत, या रस्त्यांचे सिमांकन करण्याकरिता उप अधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे पाठविण्यात आहे आहेत. भूमी अभिलेख विभागामार्फत या रस्त्यांची मोजणी व सिमांकनासाठी शुल्क आकारण्यात येणार नाही. येत्या काळात रस्त्यांना विशिष्ट सांकेतांक क्रमांक निश्चित करण्यात येणार आहेत, असे तहसीलदार जीवन बनसोडे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

वैभव नावडकर, उपविभागीय अधिकारी: शेतकऱ्यांना शेतात ये-जा करणे, शेतीउपयोगी व यांत्रिकी साहित्य शेतात ने-आण करणे तसेच बाजारपेठेमध्ये शेतमाल वेळेत पोहचविण्याकरिता शेतरस्ते महत्वाचे आहे. राज्यात मुळ जमाबंदीवेळी तयार करण्यात आलेल्या नकाशामध्ये तसेच एकत्रीकरण योजनेच्यावेळी तयार करण्यात आलेल्या गट नकाशामध्ये त्यावेळी अस्तित्वात असलेले ग्राम रस्ते, शिवरस्ते व गाडीमार्ग दर्शविण्यात आलेले आहेत. मात्र त्यानंतर नवीन रस्त्याच्या नोंदी न झाल्यामुळे रस्त्यांच्या वापराबाबत तक्रारी, अतिक्रमण यांसारख्या समस्या उद्भवत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेता नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिनी १७ सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीमध्ये विभागात सेवा पंधरवडा उपक्रम राबविण्यात येत आहे, या उपक्रमामुळे रस्त्यांच्या अधिकार अभिलेखामधील नोंदी अद्यावत होतील आणि शेतरस्त्यांच्या समस्यांचे निराकारण होईल. या उपक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. नावडकर यांनी केले आहे.

बावनकुळे यांच्या हस्ते श्री रेणुकामातेचा आरती सोहळा संपन्न

पुणे.

श्री रेणुका माता मंदिर केशवनगर, मुंढवा,भंडारी समाजसेवक ट्रस्ट, पुणे 25 वे रौप्य महोत्सवी वर्ष विशेष जल्लोषात साजरा होत आहे.

या पर्वाला विशेष महत्त्व देत, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते श्री रेणुकामातेचा आरती सोहळा पार पडला.या प्रसंगी चंद्रशेखर बावनकुळे यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान केला.

या प्रसंगी आमदार टिळेकर,युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष अनुप मोरे,माजीनगरसेविका वंदना भिमाले, माजी नगरसेवक उमेश गायकवाड,भाजप पुणे शहर सरचिटणीस रवींद्र साळेगावकर, भाजपा सरचिटणीस प्रियंकाताई शेंडगे,सरचिटणीस बाप्पू मानकर,पुणे शहर युवामोर्चा सरचिटणीस अभिषेक भिमाले,प्रसाद शेठ भिमाले,विश्वस्त डॉक्टर श्रमकांत अकाले,एकनाथ शेठ भंडारी, सुभाष भंडारी,दत्तात्रय वाल्हेर, नारायण बत्ताले,प्राचार्य महादेव वाल्हेर,भीमराव मिट्टले,देवेंद्र उडताले,शिवाजी भंडारी,लक्ष्मण अकाले,कैलास अकाले तसेच भंडारी समाजसेवा ट्रस्ट चे सर्व सभासद व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

श्रीनाथ भिमाले यांच्या कार्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी तोंडभरून केले कौतुक

चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी भाजपचे पुण्यातील ज्येष्ठ नगरसेवक आणि समाजसेवक श्रीनाथ भिमाले यांच्या कार्याची प्रशंसा करताना म्हटलं की, “मुख्यमंत्री फडणवीस यांच्या व्हिजनला पुढे नेण्याचं काम श्रीनाथ भिमाले निष्ठेने आणि ताकदीनं करीत आहेत.”

बावनकुळे यांनी सांगितले की, “देवेंद्र फडणवीस यांचे ‘विकसित महाराष्ट्र २०२९, २०३५ आणि २०४७’ हे दूरदृष्टीपूर्ण व्हिजन आहे, आणि त्या दिशेने काम करणाऱ्या नेतृत्वामध्ये श्रीनाथ भिमाले यांचे योगदान निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार आहे.”

त्यांनी पुढे म्हटलं, “मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हृदयात विशेष स्थान असलेले भिमाले हे सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि समाजातील शेवटच्या घटकासाठी कार्य करणारे एक असामान्य कार्यकर्ते आहेत.”

कामावरून काढून टाकल्याने २ बिहारी तरुणांनी केली मालकाच्या ३ वर्षीय मुलीचे अपहरण ,पोलिसांनी अवघ्या चार तासात दोघांना पकडून मुलीची केली सुटका

पुणे- कामावरून काढून टाकल्याचा राग मनात धरून दोन बिहारी तरुणांनी पुण्यातील आपल्या मालकाच्या ३ वर्षाच्या मुलीचे अपहरण करून पळ काढल्याची घटना काल सायंकाळी निदर्शनास आली तत्क्षणी पोलिसांनी हालचाली करून या दोन्ही भुरट्याना कल्याण रेल्वे स्थानकावर पकडले आणि त्यांच्या ताब्यातून या ३ वर्षीय मुलीचीही सुटका केली .

या प्रकरणाची हकीकत पोलिसांनी अशी सांगितली कि,’ दि.२२/०९/२०२५ रोजी विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर येथे ‘फिर्यादी’ यांनी विमानतळ पोलीस स्टेशन येथे येवुन माहिती दिली की, त्यांची लहान मुलगी वय ०३ वर्ष हिस सायंकाळी ०५/०० वाजले पासुन गायब आहे व ती प्रिन्स पॉल (वय २५ वर्ष )व ओमनारायण पासवान यांनी\ पळवुन नेले असण्याची शक्यता आहे.कारण मी त्यांना कामावरून काढून टाकले . अशी तक्रार प्राप्त होताच विमानतळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव यांनी पोलीस स्टेशनचे तपास प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक नितीन राठोड व तपास पथकातील स्टाफ, सपोनि संतोष शिंदे, सपोनि शिरसाट यांना बोलावुन घेवुन दोन वेगवेगळी पथके तयार करुन तात्काळ मुलीचा शोध सुरु केला. तक्रारदार राहत असलेल्या लेबर कॅम्पच्या आजुबाजुचे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरु केली. आरोपींचे प्राप्त मोबाईल नंबरचे तात्काळ सीडीआर, लोकेशनची माहिती घेण्यात आली. आरोपींचे लोकेशन प्रथम तळेगाव दाभाडे येथे आले होते. म्हणुन तळेगाव दाभाडे एमआयडीसी पोलीस ठाणेशी संपर्क करुन त्यांना महिती दिली व तपास सुरु केला. परंतु त्यानंतर आरोपीचे लोकशन लोणावळ्याचे आसपास आल्याने सदरचे इसम मुलीला घेवुन रेल्वेने प्रवास करीत असल्याचे समजले. त्या अनुषंगाने पोलीस उप निरीक्षक नितीन राठोड यांचेसह एक तपास पथक मुंबईचे दिशेने रवाना करण्यात आले होते.
आरोपी यांचे मोबाईल नंबरचे लोकेशनवरुन सदर आरोपी हे इंद्रायणी एक्सप्रेसने प्रवास करीत असल्याचे लक्षात येताच रेल्वे पोलीसांना सदर बाबत माहिती देवुन आरोपी व लहान मुलीचे फोटो देण्यात आले होते. कल्याण रेल्वे पोलीस स्टेशनचे पोलीसांचे मदतीने यातील आरोपी १. प्रिन्स संजय पाल वय २१ वर्ष २. ओमनारायण छोटेलाल पासवान वय २० वर्ष दोघे रा. लेबरकॅम्प म्हाडा कॉलनी विमाननगर पुणे मुळ बिहार यांना कल्याण रेल्वे स्टेशन येथे मुलीसह ताब्यात घेण्यात आले .मुलगी वय ०३ वर्ष हिस सुखरुप तिचे आई वडीलांचे ताब्यात देण्यात आले. सदर बाबत विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर येथे गु.र.नं. ४६४/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १३७ (२) (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत माने हे करीत आहेत.
सदरची कारवाई ही अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उपायुक्त परि ४, सोमय मुंडे, सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग श्रीमती प्रांजली सोनवणे, यांचे आदेशान्वये वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विमानतळ पोलीस स्टेशन गोविंद जाधव व पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद शेळके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक नितीन राठोड पोलीस अंमलदार अंकुश जोगदंडे, लालु क-हे, रुपेश पिसाळ, राकेश चांदेकर, शैलेश नाईक, सचिन मांजरे, दादासाहेब बर्डे, योगेश थोपटे, श्रीमंत यंपाळे, ज्ञानदेव आवारी, हरीप्रसाद पुंडे, शंकर वाघुले यांचे पथकाने केली.

अंद्रोथ ही एकात्मिक पाणबुडीविरोधी युद्धनौका श्रेणीतील दुसरी युद्धनौका भारतीय नौदलात होणार दाखल

0

अंद्रोथ भारताच्या वाढत्या सागरी आत्मनिर्भरतेचे प्रतीक

नवी दिल्ली, 23 सप्टेंबर 2025

अंद्रोथ ही भारतीय नौदलाची दुसरी अत्याधुनिक पाणबुडीविरोधी उथळ पाण्यातील युद्धनौका 6 ऑक्टोबर 2025 रोजी विशाखापट्टणम येथील नौदल गोदीत (Naval Dockyard) नौदलात सामील होणार आहे. पूर्व नौदल कमांडचे ध्वज अधिकारी कमांडिंग इन चीफ, व्हाईस ॲडमिरल राजेश पेंढारकर यांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडेल. या सोहळ्याच्या माध्यमातून भारतीय नौदलात सामील होणार असलेल्या अत्याधुनिक पाणबुडीविरोधी उथळ पाण्यातील 16 युद्धनौकांपैकी हे दुसरे जहाज औपचारिकरित्या नौदलात सामील होणार आहे.

अंद्रोथ या युद्धनौकेची बांधणी कोलकात्याच्या गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेडने केली आहे. या जहाजासाठीचे 80% पेक्षा जास्त बांधकाम हे स्वदेशी घटकांसह झाले आहे. यातून केंद्र सरकारच्या आत्मनिर्भरतेच्या दृष्टिकोनाची प्रचिती येते. तसेच हे जहाज भारताच्या वाढत्या सागरी आत्मनिर्भरतेचे प्रतीक ठरले आहे. जहाज उत्पादन संचालनालय आणि कोलकात्याच्या युद्धनौका निरीक्षण पथकाच्या मार्गदर्शनाखाली बांधण्यात आलेली अंद्रोथ ही युद्धनौका 13 सप्टेंबर 2025 रोजी भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली होती.

अंद्रोथ हे नाव लक्षद्वीप द्वीपसमूहातील अंद्रोथ बेटावरून दिले गेले आहे. धोरणात्मक आणि प्रतीकात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या या नावातून भारताच्या विशाल सागरी सीमांचे रक्षण करण्याच्या वचनबद्धता अधोरेखित होते.

यापूर्वी आयएनएस अंद्रोथ (P69) या नावाने कार्यरत असलेली युद्धनौका 27 वर्षांहून अधिक काळ देशाची सेवा करून नौदलातून निवृत्त झाली होती. नवीन अंद्रोथच्या नौदलातील समावेशामुळे तिच्या आधीच्या युद्धनौकेचा वारसा आणि भावना कायम राखली जाणार आहे.

प्रगत शस्त्रे आणि संवेदक प्रणाली, आधुनिक दळणवळण यंत्रणा आणि वॉटरजेट प्रणोदनाने सुसज्ज असलेली अंद्रोथ ही युद्धनौका, पाण्याखालील धोके अचूकपणे शोधून काढण्याच्या, त्यांचा मागोवा घेण्याच्या आणि त्यांना निष्क्रिय करण्याच्या क्षमतेने सुसज्ज आहे. या युद्धनौकेच्या अत्याधुनिक क्षमतांमुळे सागरी पाळत ठेवणे, शोध आणि बचाव कार्ये आणि किनारपट्टी संरक्षण मोहिमांसारखी विविध प्रकारची कार्ये पार पाडण्यासही ती सक्षम आहे.

अंद्रोथ ही युद्धनौका नौदलात दाखल होणे, हे भारताची सागरी सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. या युद्धनौकेमुळे नौदलाची पाणबुडीविरोधी युद्धक्षमता वाढण्यासोबतच, स्वदेशी प्रयत्नांतून जागतिक दर्जाच्या युद्धनौकांचे डिझाइन, विकास आणि बांधकाम करण्याच्या राष्ट्राच्या संकल्पालाही दुजोरा मिळाला आहे.

जुलै 2025 मध्ये ईपीएफओ सदस्यांच्या संख्येत 21.04 लाखांची भर; महाराष्ट्र आघाडीवर

0

ईपीएफओकडे 9.79 लाख नवीन सदस्यांची नोंदणी

नवीन सदस्यांपैकी 60% हून अधिक जण 18 ते 25 वयोगटातील

नवी दिल्ली, 23 सप्टेंबर 2025

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) ने जुलै 2025 ची प्राथमिक वेतनपट आकडेवारी जारी केली आहे, या महिन्यात संघटनेच्या सदस्यांची संख्या 21.04 लाखांनी वाढल्याचे दिसून आले आहे. या आकडेवारीच्या वर्ष-दर-वर्ष विश्लेषणानुसार, वेतनपटावरील कर्मचारी संख्या जुलै 2024 च्या तुलनेत 5.55% नी वाढल्याचे दिसून आले असून, ही वाढ नोकरीच्या वाढत्या संधी आणि कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या लाभांबद्दलच्या वाढत्या सजगतेचे द्योतक असून ईपीएफओच्या प्रभावी आउटरीच उपक्रमांचीही त्याला मदत झाली आहे. वेतनपटावरील कर्मचाऱ्यांच्या संख्येतील वाढीत महिनाभरात 20.47% योगदान देऊन महाराष्ट्र आघाडीवर आहे.

ईपीएफओच्या वेतनपट आकडेवारीची (जुलै 2025) ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणेः

नवीन सदस्य:

जुलै 2025 मध्ये ईपीएफओकडे सुमारे 9.79 लाख नवीन सदस्यांनी नोंदणी केली. नवीन सदस्यांच्या संख्येतील या वाढीस नोकरीच्या वाढत्या संधी, कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या लाभांबद्दलची वाढलेली जागरूकता आणि ईपीएफओच्या आउटरीच कार्यक्रमांचे यश कारणीभूत असल्याचे म्हणता येईल .

नवीन सदस्यांमध्ये 18-25 वयोगटाचे अधिक्य:

18 ते 25 वयोगटातील सदस्यांचे सर्वाधिक प्रमाण हा डेटाचा एक उल्लेखनीय पैलू आहे. ईपीएफओकडे 18-25 वयोगटातील 5.98 लाख नवीन सदस्यांनी नोंदणी झाली असून जुलै 2025 मध्ये समाविष्ट झालेल्या एकूण नवीन सदस्यांमध्ये त्यांचे प्रमाण 61.06% आहे.

याशिवाय, जुलै 2025 मध्ये वेतनपटात समाविष्ट झालेल्या 18 ते 25 वयोगटातील सदस्यांची निव्वळ संख्या अंदाजे 9.13 लाख असून ती मागील वर्षाच्या म्हणजे जुलै 2024 च्या तुलनेत 4.09% नी वाढल्याचे आढळते. ही वाढ पूर्वीच्या ट्रेंडशी सुसंगत असून संघटित कार्यबलात सामील होत असलेल्या बहुतांश व्यक्ती तरुण असल्याचे आणि प्रामुख्याने प्रथमच नोकरी करणाऱ्या असल्याचे सूचित होते.

पुन्हा सामील झालेले सदस्य:

यापूर्वी बाहेर पडलेले सुमारे 16.43 लाख सदस्यांनी जुलै 2025 मध्ये पुन्हा ईपीएफओमध्ये नोंदणी केली आहे. ही संख्या जुलै 2024 च्या तुलनेत 12.12% एवढी लक्षणीय वाढल्याचे दिसते. हे सदस्य नोकऱ्या बदलून ईपीएफओच्या कार्यकक्षेत समाविष्ट असलेल्या उपक्रमांमध्ये पुन्हा सामील झाले असून त्यांच्या नावे जमा झालेली रक्कम मिळण्यासाठी अर्ज करून खाते बंद करण्याऐवजी आपल्या दीर्घकालीन आर्थिक हिताचा विचार करून ती पुढे हस्तांतरित करण्याच्या पर्यायाची निवड करून आपली सामाजिक सुरक्षा आणखी वाढेल याची काळजी घेतली आहे.

महिला सदस्यांच्या संख्येत वाढ:

जुलै 2025 मध्ये सुमारे 2.80 लाख नवीन महिला सदस्यांनी ईपीएफओच्या सदस्यत्वासाठी नोंदणी केली. शिवाय, जुलै 2024 च्या तुलनेत वर्षभरात 0.17% वाढीसह महिन्याभरात वेतनपटावरील महिला सदस्यांची संख्या सुमारे 4.42 लाख झाली. नवीन सामील झालेल्या महिला सदस्यांच्या संख्येतील वाढीतून कार्यबलात अधिकाधिक समावेशकता आणि वैविध्यपूर्ण येत असल्याचे सूचित होते.

राज्यनिहाय योगदान:

वेतनपट आकडेवारीचे विश्लेषण केले असता प्रमुख पाच राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचा एकंदर वेतनपटात सुमारे 60.85% वाटा असल्याचे आढळले असून या राज्यांमधून महिन्याभरात सुमारे 12.80 लाख सदस्यांची भर पडली आहे. या राज्यांमध्ये, वेतनपटावरील कर्मचाऱ्यांच्या संख्येतील वाढीत महिनाभरात 20.47% योगदान देऊन महाराष्ट्र आघाडीवर आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात, हरियाणा, दिल्ली, तेलंगण आणि उत्तर प्रदेश या राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये महिन्याभरात वेतनपटात 5% हून अधिक नवीन सदस्यांची भर पडली.

उद्योगानिहाय ट्रेंड:

उद्योग-निहाय आकडेवारीची महिना-दर-महिना तुलना करता वेतनपटावरील सदस्य संख्येतील वाढीत उद्योग क्षेत्रातील आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या सदस्यांची संख्या लक्षणीय असल्याचे दिसते उदा.

i. लोह खनिज खाणी

ii. विद्यापीठ

iii.विडी उद्योग

iv. तयार कपड्यांची निर्मिती

v. रुग्णालये

vi. इतर

vii. व्यापार – व्यावसायिक संस्था

viii. ट्रॅव्हल एजन्सीज

ix. छत-जमिनीसाठी वापरल्या जाणाऱ्या दगडाच्या खाणी इ.

निव्वळ सदस्यांमधील एकूण वाढीत तज्ञ सेवांमधील व्यक्तींचे प्रमाण अंदाजे 40.21% आहे.

कर्मचाऱ्यांच्या नोंदी अद्ययावत करणे, हे अखंडपणे चालणारे काम असल्याने डेटा तयार करणे, ही एक सतत सुरू राहणारी प्रक्रिया असते, त्यामुळे हा पेरोल डेटा तात्पुरता आहे. मागील डेटा दर महिन्याला यावर पुढील गोष्टींनुसार अद्ययावत केला जातो:

i.वेतन अहवाल तयार केल्यानंतर मागील महिन्यांचे ईसीआर दाखल केले जातात.

ii.वेतन अहवाल तयार केल्यानंतर पूर्वी दाखल झालेल्या ईसीआरमध्ये सुधारणा करण्यात येतात.

iii.मागील महिन्यांची बाहेर पडण्याची तारीख पेरोल अहवाल तयार केल्यानंतर नोंदविली जाते.

एप्रिल 2018 पासून, ईपीएफओ सप्टेंबर 2017 नंतरच्या कालावधीचा समावेश असलेला वेतनपट डेटा जारी केला जात आहे. मासिक पेरोल डेटामध्ये, आधार प्रमाणित युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) द्वारे प्रथमच ईपीएफओ मध्ये सामील झालेल्या सदस्यांची संख्या, ईपीएफओच्या कक्षेतून बाहेर पडलेले विद्यमान सदस्य आणि ज्यांनी बाहेर पडल्यानंतर पुन्हा सदस्य म्हणून नोंदणी केली आहे अशांना मासिक वेतनपटावरील सदस्य म्हणून विचारात घेतले जाते.

‘अर्थासहित संघ प्रार्थना’ या विशेष उपक्रमाद्वारे विविध भाषांमध्ये जाणून घेता येणार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रार्थना

पुणे, दि. २३ सप्टेंबर, २०२५ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधत आता संघ प्रार्थना विविध भाषांमध्ये नागरिकांना समजून घेता येणार आहे. निमित्त आहे पुण्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे आणि चितळे समूहाचे संचालक इंद्रनील चितळे यांची निर्मिती असलेल्या ‘अर्थासहित संघ प्रार्थना’ या विशेष प्रकल्पाच्या विमोचनाचे.  दि. २७ सप्टेंबर रोजी नागपूर येथे या प्रकल्पाचे औपचारिक प्रकाशन सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती सिद्धार्थ शिरोळे व इंद्रानील चितळे यांनी कळविली आहे. युट्यूब आणि इतर माध्यमांद्वारे सदर संघ प्रार्थना नागरिकांपर्यंत पोहोचेल.

याविषयी अधिक माहिती देताना आमदार सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, “संघ प्रार्थना ही लहानपणापासून कायमच मला प्रेरणा देत आली आहे. या प्रार्थनेचा अर्थ हा सार्वत्रिक असून त्यातून मिळणारी उर्जा माझ्यासाठी विशेष आहे. ही प्रार्थना विविध भाषिक नागरिकांपर्यंत पोहोचावी हा आमचा या प्रकल्पाच्या संकल्पनेमागील उद्देश आहे. पहिल्या टप्प्यात आम्ही हिंदी, मराठी, इंग्रजी, गुजराथी, तामिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम या ८ भाषांमध्ये प्रार्थनेच्या अर्थाचे निवेदन केले आहे. येत्या २७ सप्टेंबर रोजी हिंदी निवेदन असलेल्या संघ प्रार्थनेचे प्रकाशन करण्यात येईल व त्यानंतर पुढील काळात संघ प्रार्थनेचे इतर भाषांमधले निवेदन प्रकाशित करण्यात येईल.”  
 
चितळे समूह हा गेल्या काही पिढ्यांपासून व्यवसायात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा देखील काही पिढ्यांपासून राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात आपले योगदान देत आहे, त्यामुळे हा समान दुवा लक्षात घेत आम्ही या प्रकल्पात सहभागी झालो.असे सांगत इंद्रनील चितळे म्हणाले, “संघाच्या विचारधारेला १०० वर्षे पूर्ण होत असताना संघ प्रार्थनेचा वैश्विक भाव जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचावा, येणाऱ्या पिढ्यांना आपल्या मागील पिढ्यांचे योगदान माहिती व्हावे हा या संकल्पनेच्या निर्मितीमागील उद्देश आहे.”
सामान्य नागरिकांपर्यंत संघाची प्रार्थना आणि त्याचा योग्य अर्थ पोहोचावा या उद्देशाने संगीत दिग्दर्शक राहुल रानडे यांनी दोन वर्षांच्या अथक प्रयत्नाने ही प्रार्थना तयार केली असून याचे गायन राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक शंकर महादेवन यांनी केले आहे. प्रार्थनेचे हिंदी भाषेतील लेखन आणि निवेदन हरीश भिमाणी यांनी केले आहे. मराठी अर्थ विवेक आपटे यांनी लिहिला असून निवेदन सचिन खेडेकर यांनी केले आहे.

‘अर्थासहित संघ प्रार्थना’ या प्रकल्पाची मूळ संकल्पना हरीश भिमाणी यांची असून राहुल रानडे यांनी प्रकल्प प्रमुख व संगीत दिग्दर्शक म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. या प्रार्थनेचे संगीत संयोजन कमलेश भडकमकर यांनी केले असून लंडन येथील रॉयल फिलहार्मोनिक ऑर्केस्ट्राच्या वादकांनी याला स्वरसाज चढविला आहे. प्रार्थनेचे ध्वनीमुद्रण लंडन येथील ॲबी रोड स्टुडिओज आणि मुंबई येथील यशराज फिल्म्स या ठिकाणी पूर्ण झाले असून ध्वनीमिश्रण व मास्टरिंग विजय दयाळ यांनी केले आहे.

कोंढव्यातील दूषित व विस्कळीत पाणीपुरवठ्याबाबत आयुक्तांना मनसे साकडे….

पुणे- कोंढव्यातील दूषित व विस्कळीत पाणीपुरवठ्याबाबत महापालिका आयुक्तांना मनसेने आज निवेदन देत साकडे घातले. मनसे प्रमुख साईनाथ बाबर यांनी हे निवेदन दिले आहे. बाबर यावेळी म्हणाले ,’ कोंढवा परिसरातील अजमेरा पार्क, ग्रीन पार्क, रॉयल पार्क व अश्रफ नगर या भागातील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून पाणीपुरवठ्याच्या गंभीर समस्येला सामोरे जात आहेत. या भागात मिळणारे पाणी हे केवळ कमी दाबानेच येते असे नाही तर त्यात ड्रेनेजचे पाणी मिसळून नागरिकांना आरोग्याच्या भयंकर संकटाला तोंड द्यावे लागत आहे. ही बाब इतकी गंभीर आहे की, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला यांचे जीवन धोक्यात आले आहे.महानगरपालिकेने या समस्येकडे आजवर केलेले दुर्लक्ष हे नागरिकांच्या सहनशीलतेची परीक्षा घेणारे आहे. नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी केल्या, निवेदने दिली, तरीसुद्धा प्रशासनाने याकडे काणाडोळाच केला आहे. पुणे महानगरपालिका ज्या जोमाने, ज्या ताकदीने आणि ज्या पद्धतीने मालमत्ता कर, विविध कर आणि दंड वसूल करण्यासाठी उत्साह दाखवते, त्याच जोमाने नागरिकांच्या पाणीपुरवठ्याच्या मूलभूत प्रश्नांवर लक्ष का देत नाही? नागरिकांकडून कर वसूल करताना प्रशासनास कोणतीही अडचण वाटत नाही, मग त्याच नागरिकांना जगण्यासाठी लागणारे शुद्ध पाणी देताना महापालिका मौन का बाळगते?
हे नागरिकांसोबतचे उघड अन्यायकारक वर्तन आहे. नागरिकांना त्यांच्या पैशाचा, कराचा, अधिकाराचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे. पाणी हा माणसाचा प्राथमिक हक्क आहे. पुणे सारख्या शहरात २०२५ मध्ये सुद्धा नागरिकांना दूषित व अपुरा पाणीपुरवठा सहन करावा लागणे हे अत्यंत लाजिरवाणे व प्रशासनाच्या अपयशाचे स्पष्ट निदर्शक आहे.

म्हणूनच आयुक्तांनी तातडीने पुढील गोष्टी करणे आवश्यक आहे :
१) वरील परिसरातील संपूर्ण पाणीपुरवठा लाईनची तातडीने तपासणी करून दुरुस्ती करावी.
२) ड्रेनेजचे पाणी मिसळण्याची समस्या कायमस्वरूपी थांबवावी.
३) नागरिकांना नियमित व पुरेशा दाबाने शुद्ध पाणीपुरवठा होईल याची खात्री करून द्यावी.
४) या सर्व कामांसाठी निश्चित कालमर्यादा जाहीर करून नागरिकांना माहिती द्यावी.

साईनाथ बाबर यांनी पुढे असेही म्हटले आहे कि,’याकडे तातडीने लक्ष दिले नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहराच्या वतीने आम्ही नागरिकांना घेऊन तीव्र आंदोलन उभारू. त्यातून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याची पूर्ण जबाबदारी पुणे महानगरपालिकेवर राहील.नागरिकांचा संयम आता संपत आला आहे. पुणे महापालिकेने जर नागरिकांकडून कर वसूल करताना दाखवलेली तत्परता, प्रामाणिकपणे या समस्यांवर दाखवली नाही, तर रस्त्यावर उतरून उत्तर मागितले जाईल.

जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत साडेसात ते आठ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

पुणे – .महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभाग व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय मैदानी
स्पर्धेचे आयोजन दिनांक २३/९ /२०२५ रोजी कै. बाबुराव सणस मैदानावर करण्यात आले . या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी व खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी उपायुक्त (शिक्षण) वसुंधरा बारवे, उपायुक्त सामान्य प्रशासन विजयकुमार थोरात
प्रशासकीय अधिकारी सुनंदा वाखारे, क्रीडा प्रमुख माणिक देवकर , तसेच सर्व सहाय्यक प्र अधिकारी व क्रीडा अधिकारी उपस्थित होते.
उद्घाटन प्रसंगी उपायुक्त वसुंधरा बारवे यांनी मुलांना स्पर्धेत यश मिळविण्या साठी शुभेच्छा दिल्या. सुनंदा वाखारे मॅडम यांनी मुलांना खेळाचे महत्व सांगितले आणि आनंदाने खेळात सहभागी होऊन स्पर्धेचा आनंद लुटा अशा शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेमध्ये सुमारे साडेसात ते आठ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून पुढील पाच दिवस या स्पर्धा पार पडणार आहेत.

उद्यापासून नितीन गडकरींच्या कुकर्मांची पोलखोल मालिका सुरु करणार अंजली दमानिया…

मुंबई-सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उद्यापासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कुकर्मांची मालिका सुरू करण्याचा इशारा दिला आहे. अंजली दमानिया गत काही दिवसांपासून सातत्याने गडकरींच्या मुलाच्या कंपनीच्या नफेखोरीवरून त्यांच्यावर निशाणा साधत आहेत. त्यातच आता त्यांनी थेट गडकरींच्या कुकर्माची मालिका जाहीर करण्याचा इशारा दिल्यामुळे राज्याच्या राज्यासह देशाच्या राजकारणात मोठी खळबळ माजण्याची चिन्हे आहेत.

अंजली दमानिया यांनी मंगळवारी सकाळी एका ट्विटद्वारे नितीन गडकरी यांचा मुलगा दिवसाकाठी तब्बल 144 कोटी रुपयांनी श्रीमंत होत असल्याचा दावा केला होता. त्यांच्या ट्विटची राज्याच्या राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली होती. तत्पू्र्वी परवा त्यांनी आपण एका मोठ्या प्रोजेक्टवर काम करत असल्याचे सूतोवाच केले होते. त्यानुसार, त्यांनी उद्यापासून आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची पोलखोल मालिका सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. उद्या दुपारपासून मी नितीन गडकरी यांच्या विरुद्ध पोल खोल करायला सुरवात करणार आहे. त्यांच्या सगळ्या कुकर्मांची पूर्ण मालिकाच सुरू करणार आहे, असे त्या आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्यात.नितीन गडकरींनी काही दिवसांपूर्वीच माझ्या बुद्धीचे मूल्य प्रत्येक महिन्याला 200 कोटी रुपये इतके आहे, असे विधान केले होते. अंजली दमानिया यांनी त्यांच्या या विधानाचा दाखला देत आज म्हणाल्या होत्या की, गडकरी म्हणतात की, त्यांना पैशांची गरज नाही. त्यांच्याकडे पुरेसे पैसे आहेत. त्यांच्या मेंदूचे मूल्य दर महिन्याला 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. खरेतर त्यांनी स्वतःला खूप कमी लेखले आहे. कारण, गडकरींचे सुपुत्र दररोज 144 कोटी रुपयांनी श्रीमंत होत आहेत.

आपल्याला माहिती आहे की, गडकरींच्या मुलाची सियान अॅग्रो नामक कंपनी आहे. 25 जून रोजी सियान अॅग्रोमध्ये 1,89,38,121 प्रमोटर होल्डिंग शेअर्स होते. या शेअरच्या किंमतीत आज 76 रुपयांची वाढ झाली. म्हणजेच एका दिवसात 143.92 कोटी रुपये त्यांनी कमावले. निखील व सारंग गडकरी दिवसाला इतके पैसे कमावत आहेत, असे दमानिया म्हणाल्या.

निवडणुकांची तयारी:मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर, हरकतींसाठी 8 ते 14 ऑक्टोबरपर्यंत मुदत

0

मुंबई–राज्यातील 32 जिल्हा परिषदा व 336 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने आज मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार प्रारुप मतदार यादीवर 8 ते 14 ऑक्टोबर 2025 या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील.

राज्य निवडणूक आयोगाने 1 जुलै 2025 हा अधिसूचित दिनांक निश्चित केला आहे. त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहे. जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार यादी 8 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध केली जाईल. त्यावर 14 ऑक्टोबर 2025 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. अंतिम मतदार यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी 27 ऑक्टोबर 2025 रोजी जाहीर केली जाईल.

निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून निवडणूक विभाग किंवा निर्वाचक गण बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या हरकीत व सूचनांच्या अनुषंगाने करण्यात येतात.

काही दिवसांपूर्वीच अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राज्यातील 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर झाले. ठाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असणार असून, छत्रपती संभाजीनगरची जागा सर्वसाधारण गटासाठी सुटली. सरकारने जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदासह उपाध्यक्ष, सभापतींचे आरक्षणही जाहीर केले.

34 जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण

ठाणे -सर्वसाधारण (महिला)
पालघर – अनुसुसूचित जमाती
रायगड- सर्वसाधारण
रत्नागिरी- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
सिंधुदुर्ग – सर्वसाधारण
नाशिक -सर्वसाधारण
धुळे -नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
नंदूरबार-अनुसूचित जमाती
जळगांव – सर्वसाधारण
अहिल्यानगर अनुसूचित जमाती (महिला)
पुणे -सर्वसाधारण
सातारा- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
सांगली – सर्वसाधारण (महिला)
सोलापूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग
कोल्हापूर- सर्वसाधारण (महिला)
छत्रपती संभाजीनगर -सर्वसाधारण
जालना – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
बीड – अनुसूचित जाती (महिला)
हिंगोली -अनुसूचित जाती
नांदेड – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
धाराशिव – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
लातूर – सर्वसाधारण (महिला)
अमरावती – सर्वसाधारण (महिला)
अकोला – अनुसूचित जमाती (महिला)
परभणी – अनुसूचित जाती
वाशिम अनुसूचित जमाती (महिला)
बुलढाणा -सर्वसाधारण
यवतमाळ सर्वसाधारण
नागपूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग
वर्धा- अनुसूचित जाती
भंडारा – नागरिकांचा मागास प्रवर्ग
गोंदिया – सर्वसाधारण (महिला)
चंद्रपूर – अनुसूचित जाती (महिला)
गडचिरोली -सर्वसाधारण (महिला)
31 जानेवारीपर्यंत निवडणुका घेण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश

दरम्यान, मागील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र निवडणूक आयोगाला (एसईसी) पालिका निवडणुका 3 वर्षांनी पुढे ढकलल्याबद्दल फटकारले होते. तसेच न्यायमूर्ती सूर्यकांत आणि जयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत घेण्याचे निर्देश दिले. प्रभागांचे सीमांकन 31 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावे. निवडणुका घेण्यासाठी आवश्यक असलेल्या मशीन्स आणि कर्मचाऱ्यांची संख्या राज्याच्या मुख्य सचिवांना तात्काळ कळवावी, असेही न्यायालयाने म्हटले होते.

ओबीसी आरक्षणाच्या वादामुळे 2022 पासून महाराष्ट्रात जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि नगरपालिकांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. यापूर्वी 6 मे रोजीही याच प्रकरणात न्यायालयाने आयोगाला 4 आठवड्यांच्या आत निवडणुकांबाबत अधिसूचना जारी करण्यास सांगितले होते.