Home Blog Page 118

मुख्यमंत्र्यांकडून सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी

0

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या प्रत्येक नागरिकाला मदत करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

सोलापूर, दि. २४ :- जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले शेती पिकांचे, जनावरांचे, घरांचे व व्यावसायिकांचे खूप मोठे नुकसान झाले असून राज्य शासन संकटकाळात पूरग्रस्तांच्या पूर्णपणे पाठीशी असून नागरिकांना सर्वतोपरी मदत केली जाणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पूरग्रस्त नागरिकांनी अशा संकटाच्या काळात धीर धरावा, असे आवाहनही त्यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील निमगाव तसेच दारफळ सीना या गावाला भेट देऊन पुरामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली, त्यांनी दोन्ही गावातील नागरिकांशी संवाद साधला. याप्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार रणजीतसिंह मोहिते-पाटील, आमदार अभिजीत पाटील, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर, माजी आमदार राम सातपुते, जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अतिवृष्टी व पूर आल्यामुळे ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या सर्वांना शासनाकडून मदत दिली जाणार आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून दोन हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यापुढेही पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत देण्यात येणार आहे. टंचाई काळात ज्या निकषाप्रमाणे मदत करण्यात येते त्याप्रमाणेच अतिवृष्टी, ओल्या दुष्काळातही मदत केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

दारफळ गावात पुरामुळे मोठे  नुकसान झाले असून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने नदीने पात्र बदलले आणि  गावाचा मोठा भाग पाण्यात गेला, तसेच ग्रामस्थांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे घरांचे, अन्नधान्याचे, शेती, जनावरांचे नुकसान झाले आहे. शेती, घरादारांकरिता, अन्नधान्य आदींसाठी शासन मदत करणार असून रस्ते, शाळा, शेतरस्ते, वीजव्यवस्था आदी सुविधांसाठीही आवश्यक ती सर्व मदत करणार आहे. व्यावसायिकांनाही नुकसानीलाही स्वतंत्र मदत करण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

दौऱ्याच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माढा तालुक्यातील निमगाव येथे झालेल्या नुकसानीची पाहणी केली आणि नागरिकांच्या व्यथा जाणून घेतल्या. या संकटातून बाहेर पडण्यासाठी नागरिकांना आवश्यक मदत करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

GST वरील व्यापारी संवाद अभियानावर केंद्रीय मंत्री मोहोळांचे स्पष्टीकरण

0

हा उत्सव नाही, अभियान आहे GST वरील व्यापारी संवाद अभियानावर केंद्रीय मंत्री मोहोळांचे स्पष्टीकरण

पुणे – GST कमी केल्याने , ‘धन्यवाद मोदिजी ‘ असे व्यापारी संवादाचे अभियान सुरु करणाऱ्या केंद्रीय मंत्री मोहोळांना, एकीकडे तुमचे नेते पूरग्रस्त शेतकऱ्यांना भेटायला जात असताना तुम्ही GST कमी केला म्हणून व्यापाऱ्यांसमवेत उत्सव साजरा करता काय ? अशा प्रश्नाला तोंड द्यावे लागले यावेळी पहा मोहोळ यांनी काय उत्तर दिले …

GST कमी केल्याने ‘धन्यवाद मोदीजी’ पुण्यात व्यापारी संवादाचे भाजपचे अभियान

अजितदादांचा मोठा निर्णय; राष्ट्रवादीचे सर्व मंत्री, आमदार-खासदार एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी देणार

0

मुंबई, २४ सप्टेंबर २०२५ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व मंत्री, खासदार, आमदार आणि विधानपरिषद आमदार आपला एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार आहेत. पक्षाचे राज्याध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही माहिती दिली असून, महाराष्ट्रातील महापुराच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

संकटाच्या या कठीण काळात प्रत्येक नेत्याने महाराष्ट्राच्या जनतेसोबत उभं राहणं गरजेचे असल्याचे तटकरे यांनी सांगितले. दरम्यान, उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी पूर्वनियोजित सर्व कार्यक्रम रद्द करत थेट पूरग्रस्त भागात भेट दिली. आज ते सोलापूर, धाराशीव आणि बीड या जिल्ह्यांना स्वतः भेट देत असून, स्थानिक मंत्र्यांसोबत पूरपरिस्थितीची पाहणी करत आहेत.

अजित पवार यांनी आज पीडित नागरिकांशी संवाद साधला आणि प्रशासनाला तातडीने शेतकऱ्यांसाठी मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच सर्व राष्ट्रवादीचे मंत्री आणि आमदारांनी आपापल्या भागात मदतीचे काम सुरु करावे अशीही सूचना केली आहे.

पुणे नवरात्रौ महिला महोत्सवात पाककला स्पर्धा संपन्न

पुणे-पुणे नवरात्रौ महिला महोत्सवातील पाककला स्पर्धा शिवदर्शन येथील श्री लक्ष्मीमाता मंदिर प्रांगणात संपन्न झाली. यात तिखट पदार्थ भागात कोथिंबीर वडी ,सुरळी वडी ,पाट वडी आणि आळू वडी व गोड भागात रबडी मालपुवा ,उपवास मोदक , लाल भोपळा बासुंदी ,मकाणा लाडू ,शिंगाडा नानकटाई ,उपवास धोंडस हे पदार्थ होते. २५० हून अधिक महिलांनी यात सहभाग घेतला होता. या सर्व स्पर्धक महिलांनी सुंदर सजावट करीत तयार करून आणलेले पदार्थ मांडले होते. प्रमुख पाहुणे म्हणून सरितास् किचनच्या सरिता पद्मन होत्या. परीक्षक म्हणून किशोर सरपोतदार आणि कोमल पारखे यांनी काम पाहिले.

पाककला स्पर्धेत गोड पदार्थांमध्ये प्रथम क्रमांक – स्वाती पंडित द्वितीय क्रमांक – सीमा नलावडे तृतीय क्रमांक – विद्या ताम्हणकर उत्तेजनार्थ – १. दिपाली धस २. राजश्री सिद्धेश्वर ३. मनीषा जाळीन्द्रे. यांनी पटकावला. तिखट पदार्थांमध्ये प्रथम क्रमांक – पूनम परमार द्वितीय क्रमांक -शीतल भळकर तृतीय क्रमांक – पुण्या सोनी उत्तेजनार्थ – १.मंगला हंकारे ,२. वर्षा तन्ना . यांनी पटकावला. पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष व पुण्याचे माजी उपमहापौर आबा बागुल व पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. प्रत्येक विभागात रु. ५०००, रु. ३०००, रु. २००० असे बक्षिसाचे स्वरूप होते. या प्रसंगी छाया कातुरे , संगीता बागुल , प्राजक्ता ढवळे यांची विशेष उपस्थिती होती.

लोकमान्य नगर पुनर्विकासावरील स्थगिती उठवा-

रवींद्र धंगेकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
पुणे दी २४:लोकमान्य नगर येथील इमारतींच्या पुनर्विकासाला शासनाने दिलेली स्थगिती उठवावी अशी मागणी माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुखमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
धंगेकर यांनी मुख्यमंत्र्याना पाठवलेल्या पत्रात म्हठले आहे की,लोकमान्य नगर येथील म्हाडा वसाहत सन 1961 ते 62 च्या दरम्यान म्हणजे साधारणपणे साठ वर्षांपूर्वी पानशेत धरणाच्या पुरानंतर स्थापन करण्यात आली. या वसाहतीमध्ये सर्वसाधारण मध्यमवर्गीय नागरिक राहत असून सद्यस्थितीत सदर नागरिक हे अत्यंत दुरावस्था झालेल्या इमारतींमध्ये राहत आहेत. या ठिकाणी 53 इमारती असून सर्व इमारतीमधील नागरिकांनी नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन केल्या आहेत. यातील काही गृहनिर्माण सहकारी संस्थांचा पुनर्विकास अंतिम टप्प्यात आला आहे.
येथील इमारती अत्यंत जीर्ण झाल्या असून मूलभूत सोयी सुविधा देखील येथील नागरिकांना मिळत नाहीत. येथील इमारतींचा पुनर्विकास लवकरात लवकर झाल्यास नागरिकांची होणारी परवड थांबणार आहे. परंतु काही घटक एकात्मिक विकासाच्या नावाखाली या ठिकाणची जागा आणि पुनर्विकासात मिळणारा लाभ विचारात घेऊन येथील रहिवाशांनी सुरू केलेले पुनर्विकासाचे प्रयत्न हाणून पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. या घटकांनी शासनाची दिशाभूल करून एकात्म विकासाचा कुठलाही आराखडा नसताना देखील पुनर्विकासाला खीळ घातली आहे. शासनाने स्थानिक रहिवाशांची भावना विचारात घेऊन पुनर्विकासाला दिलेले‌ स्थगिती तातडीने उठवावी व स्थानिक रहिवाशांना न्याय द्यावा. अशी मागणी धंगेकर यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

अडीच कोटीची फसवणूक सायबर चोराला तेलंगणात पकडले

पुणे – मुंबई आयआयटीतील एका प्रतिष्ठित प्राध्यापकाचे नाव वापरून, शासनाच्या एआय आणि ड्रोन प्रकल्पांचे आमिष दाखवून एका प्रसिद्ध अभियांत्रिकी शिक्षण संस्थेच्या प्रमुखाची २ कोटी ४६ लाखांची फसवणूक करणाऱ्या सायबर चोराला पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपीला हैदराबाद येथून अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून मोठी रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, सितैया किलारु (वय ३४, रा. हैदराबाद, तेलंगणा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी ६ सप्टेंबर २०२५ रोजी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडित शिक्षण संस्थेच्या प्रमुखाला आरोपीने वारंवार ईमेल आणि व्हॉट्सॲप कॉल करून दिशाभूल केली. मुंबई आयआयटीच्या प्राध्यापकाचे नाव वापरून त्याने शासनाच्या मोठ्या प्रकल्पांमध्ये सहभाग देण्याचे आश्वासन दिले आणि त्यासाठी वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास भाग पाडले.

या गुन्ह्याचा तपास सायबर गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सुरू केला. तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपीची ओळख पटली. तांत्रिक तपासामध्ये आरोपी हैदराबाद येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर, तपास पथकाने तात्काळ हैदराबादला धाव घेतली. साईनगर, प्रगतीनगर, निजामपेठ, गच्चीबावली आणि याप्रल यांसारख्या विविध ठिकाणी शोध घेतल्यानंतर, पोलिसांनी याप्रल येथे सापळा रचून सितैया किलारुला शिताफीने अटक केली.

चौकशीदरम्यान आरोपीनेच या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार असल्याचे कबूल केले. त्याच्याकडून १० डेबिट कार्ड्स, १३ पासबुक, १५ चेकबुक, ५ सिम कार्ड्स, सोन्याच्या खरेदीच्या पावत्या, इतर महत्त्वाची कागदपत्रे आणि ७० हजार रुपये किमतीचे चार मोबाईल फोन, एक टॅब, एक लॅपटॉप असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याशिवाय, त्याच्याकडून १ लाख ५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, ४० लाख रुपये किमतीची टोयोटा इनोव्हा कार आणि ८ लाख रुपयांची किया सोनेट कारही जप्त करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या एकूण मुद्देमालाची किंमत ४९ लाख ७५ हजार रुपये आहे.

न्यायालयाने आरोपीला २८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, जेणेकरून या प्रकरणाचा अधिक तपास करता येईल. या घटनेमुळे सायबर फसवणुकीच्या धोक्यांबद्दल पुन्हा एकदा जागरूकता निर्माण झाली आहे.

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच मदत – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

0

सोलापूर, दि. २४ :- सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी व सीना नदीला आलेल्या पुरामुळे शेती, घर व पशुधनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, बाधित शेतकऱ्यांना शासनातर्फे लवकरच मदत दिली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

कोर्टी (ता. करमाळा), मुंगशी (ता. माढा), लांबोटी (ता. मोहोळ) या भागांतील पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी उपमुख्यमंत्री पवार यांनी केली. यावेळी आमदार नारायण आबा पाटील, अपर जिल्हाधिकारी मोनिकासिंह ठाकुर, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी सुशांत बनसोडे, प्रांताधिकारी जयश्री आव्हाड, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, करमाळा, माढा, मोहोळ तालुक्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे प्रचंड नुकसान झाले असून राज्यशासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. पुरात अडकलेल्या नागरिकांचे सुरक्षित स्थळी पुनर्वसन करावे, त्यांना अन्न, पाणी, वीज व औषधांची सुविधा पुरवावी, तसेच ज्यांचे धान्य भिजले आहे त्यांना तत्काळ धान्य उपलब्ध करून द्यावे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी प्रशासनाला दिल्या.

अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे उडीद, मका, सोयाबीन, तूर आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, घरांचे व पशुधनाचेही नुकसान झाले आहे. सर्व नुकसानग्रस्त घटकांचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत, असे निर्देशही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले.

पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांसाठी महामुनी मंगल कार्यालय, संगोबा रोड, करमाळा येथे तात्पुरते पुनर्वसन केंद्र उभारण्यात आले असून उपमुख्यमंत्री पवार यांनी त्या ठिकाणी भेट देऊन  नागरिकांशी संवाद साधला. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.

अमली पदार्थांविरोधात पुण्यात ‘पुणे वर्ल्ड मॅरेथॉन २०२५’ चे आयोजन

पुणे : अंमली पदार्थांविरोधात एकत्रितपणे लढा देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून यंदाची बहुचर्चित ‘आपलं पुणे’ मॅरेथॉन जागतिक स्वरूपात झळकणार आहे. पुण्याच्या अद्वितीय मॅरेथॉन परंपरेला पुढे नेण्यासाठी ‘पुणे वर्ल्ड मॅरेथॉन २०२५’ ही स्पर्धा १२ ऑक्टोबर रोजी रविवारी पहाटे चारपासून (प्रत्येक गटानुसार) श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथून सुरू होणार आहे.

या मॅरेथॉनमध्ये सुमारे १०,००० धावपटूंचा सहभाग अपेक्षित आहे. त्यामध्ये नामवंत आंतरराष्ट्रीय धावपटू, देशभरातील धावपटू, रनिंग ग्रुप, कॉर्पोरेट संघ, लष्कर, पोलिस कर्मचारी, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांचा आणि फिटनेसप्रेमींचा समावेश आहे. ही स्पर्धा लोहा फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आली असून, पंचशील रियल्टी हे मुख्य प्रायोजक आहेत. यंदा विजेत्यांना एकूण १९.५३ लाख रुपयांची पारितोषिक देण्यात येणार आहेत. ही पारितोषिके नामांकित खेळाडूंना; तसेच विविध वयोगटातील विजेत्यांना देण्यात येणार आहेत. पुण्यातील पीवायसी हिंदू जिमखान्याच्या आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली, यावेळी लोहा फाउंडेशन’चे सचिव आणि आयोजक रवींद्र वाणी,लोहा फाउंडेशनच्या अध्यक्षा संजना लाल,सहाय्यक पोलिस आयुक्त,पुणे श्री.साईनाथ ठोंबरे, आयर्न मॅन डॉ. कौस्तुभ राडकर उपस्थित होते.

‘Say No to Drugs, Say Yes to Run’ या परंपरेला पुढे घेऊन जाऊन ‘पुणे वर्ल्ड मॅरेथॉन’ समाजात अमली पदार्थमुक्त जीवनशैलीचा प्रसार करणार असून, आरोग्य, फिटनेस आणि सकारात्मकतेची संस्कृती रुजवण्याचा संदेश देणार आहे, असे संयोजकांनी नमूद केले.

‘लोहा फाउंडेशन’चे सचिव आणि आयोजक रवींद्र वाणी म्हणाले, की “पुण्यात आधीपासूनच धावण्याची संस्कृती आहे. यंदाचा आंतरराष्ट्रीय दर्जाची ही स्पर्धा म्हणजे धावण्याच्या परंपरेचा आणि संस्कृतीचा गौरव आहे. पुणे वर्ल्ड मॅरेथॉन शहराला जागतिक व्यासपीठावर नेईल आणि संपूर्ण समाजाला अमली पदार्थांविरोधात एकत्रित करण्यास आणि निरोगी जीवनशैलीकडे घेऊन जाण्यास मदत करील.”

लोहा फाउंडेशनच्या अध्यक्षा संजना लाल म्हणाल्या, की ‘मॅरेथॉन म्हणजे फक्त धावणे नाही. फिटनेसचा सण साजरा करताना आपली सामाजिक जबाबदारीही ओळखली पाहिजे. मुलांचे आरोग्य आणि शिक्षणात गुंतवणूक करून आपण समाजाचे देणे फेडण्यासारखे आहे.’

मार्ग

‘पुणे वर्ल्ड मॅरेथॉन’ची सुरुवात श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथून होईल. त्यानंतर धावपटू राधा चौकातून बाणेर रोडने साई हाउलँडकडे जाऊन बालेवाडी हाय स्ट्रीट – दसरा चौक या मार्गाने धावतील. त्यानंतर धावपटू औंध–बाणेर लिंक रोड – बाबासाहेब आंबेडकर पूल – नवीन डीपी रोड – कास्पटे चौक – बीआरटी मार्ग – जगताप फेरीलँड– डांगे चौक – पुनावळे चौक – संत तुकाराम महाराज पूल – आदर्शनगर बीआरटी – निगडी ब्रिज असा प्रवास करून पुन्हा श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे परततील.

इच्छुक नोंदणीसाठी http://www.puneworldmarathon.com/ या संकेतस्थळावर नोंदणी करू शकतात.

गुलटेकडीच्या वसुंधरा मसाज सेंटर वर छापा,6 पिडीत महिलांची सुटका

0

पुणे-कल्याणीनगर , विमाननगर,आणि कोरेगाव पार्क पाठोपाठ आता स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हद्दीतही स्पा सेंटर्स सुरू झाले आहेत. आयुर्वेदिक मसाजच्या नावाखाली सुरु असलेल्या दोन स्पा सेंटरवर छापा टाकून सामाजिक सुरक्षा विभागाने आठ महिलांची सुटका केली. स्वारगेट पोलीस स्टेशनच्या Recovery ची जबाबदारी साभाळणार्या एका कर्मचाऱ्याच्या आशिर्वादाने हे स्पा सेंटर्स सुरू असल्याचे वृत्त येथे पसरले आहे.

दरम्यान पोलिसांनी दिलेली अधिकृत माहिती अशी कि,’आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणा-या मसाज सेंटरवर छापा कारवाई करुन ०६ पिडीत मुलींची सुटका करण्यात आली आहे या संदर्भात अधिक माहिती अशी कि,’दिनांक २३/०९/२०२५ रोजी अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा पुणे शहर यांना आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करत असलेबाबत गोपनिय माहिती पोलिसांना प्राप्त झाली.या माहितीच्या अनुषंगाने नमुद ठिकाणी अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा पुणे शहर कडील व स्वारगेट पोलीस स्टेशन कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी दि. २३/०९/२०२५ रोजी वसुंधरा आयुर्वेदिक मसाज सेंटर गुलटेकडी परिसर येथे छापा कारवाई करुन ०६ पिडीत महिलांची सुटका करुन आयुर्वेदिक मसाज सेटर मॅनेजर नामे वैशाली रंगनाथ विसपुते वय ३१ वर्षे रा. इंद्रप्रस्थ सोसा. टिळेकरनगर कोंढवा, पुणे हिच्यावर स्वारगेट पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २५०/२०२५ भा.न्या.स. क. १४३, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ३,४,५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन ०६ पिडीत मुलींची सुटका करण्यात आलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वारगेट पोलीस स्टेशन पुणे शहर यशवंत निकम हे करीत आहेत.
सदरची कारवाई अपर पोलीस आयुक्त गुन्हे पुणे शहर पंकज देशमुख, पोलीस उप-आयुक्त गुन्हे, पुणे शहर निखील पिंगळे यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्षाकडील पोलीस निरीक्षक श्रीमती आशालता खापरे, मसापोफौ छाया जाधव, सपोफौ अजय राणे, पोलीस अंमलदार तुषार भिवरकर, इम्रानखान नदाफ, अमेय रसाळ व किशोर भुजबळ व स्वारगेट पोलीस स्टेशन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. यशवंत निकम व पोलीस अंमलदार यांनी केली आहे.

१८६९४ पुणेकरांच्या छतावर होतेय ९१ मेगावॅट विजेची निर्मिती

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना-१५१ कोटींचे अनुदान झाले प्राप्

पुणे, दि. २४ सप्टेंबर, २०२५ – उन्हामुळे घराचे छत तापून एसीचे वीजबिल वाढविण्यापेक्षा त्याच छतावर प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून सौर प्रकल्प साकारुन आपले वीजबिल शून्य करण्याचा पर्याय १८६९४ पुणेकरांनी पसंत केला आहे. या योजनेतून त्यांना १५१ कोटींचे अनुदान देखील मिळाले असून, ९०.६२ मेगावॅट इतकी वीजनिर्मिती होत आहे. या कुटुंबांची भविष्यातील विजबिलाची चिंता आता मिटली आहे.

घरगुती वीज ग्राहकांना त्यांच्या दरमहाच्या वीजबिलापासून मुक्तता देण्यासाठी तसेच त्यांना विजेबाबत स्वयंपूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूर्यघर योजनेची सुरुवात केली आहे. देशभरात या योजनेतून ५८८९ मेगावॅट इतकी क्षमता विकसित झाली आहे. तर महाराष्ट्रात २९१८११ घरांवर प्रकल्प साकारले असून, त्याची क्षमता ११०० मेगावॅटवर पोहोचली आहे. पुणे परिमंडलातही या योजनेचा टक्का दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत ३१६४९ घरगुती ग्राहकांनी सूर्यघरसाठी नोंदणी केली असून, पैकी १८६९४ घरांवर प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. त्यातून ९०.६२ मेगावॅट वीजनिर्मिती होत आहे. ७३९७ प्रकल्पांचे काम अंतिम टप्प्यात आहे. ते देखील लवकरच कार्यान्वित होण्याच्या मार्गावर आहे.

महावितरण पुणे परिमंडलात गणेशखिंड मंडलामध्ये ७३१२, पुणे ग्रामीण मंडल ५१४६ व रास्तापेठ मंडलात ६२३६ प्रकल्प कार्यान्वित झाले असून, त्यांची स्थापित क्षमता अनुक्रमे ३८.२१, २१.०७ व ३१.३४ मेगावॅट इतकी आहे. अनुदानावितरणामध्येही अनुक्रमे गणेशखिंडमध्ये ६३५६ लाभार्थींना ६२.४ कोटी, पुणे ग्रामीण ४४८० लाभार्थींना ३६.४ कोटी व रास्तापेठ मंडलातील ५३५० लाभार्थींना ५२.५८ कोटी असे एकूण १५१ कोटींचे अनुदान पुणे परिमंडलातील लाभार्थींना मिळाले आहे.

·        अनुदानाचे स्वरुप : ज्या ग्राहकांचा वीजवापर ३०० युनिटच्या घरात आहे, त्यांच्यासाठी ३ किलोवॅट क्षमतेचा सूर्यघर प्रकल्प पुरेसा आहे. यातून साधारणपणे ३०० ते ३६० युनिट वीज महिन्याला तयार होते. पहिल्या दोन किलोवॅटपर्यंत प्रतिकिलोवॅट ३० हजार रुपये तर ३ किलोवॅट प्रकल्पाला ७८ हजारांचे अनुदान केंद्र सरकारकडून मिळते. तर गृहनिर्माण संस्थांना या योजनेतून प्रतिकिलोवॅट १८ हजार रुपये प्रमाणे ५०० किलावॅट क्षमतेपर्यंतचे अनुदान दिले जाते.

·        स्वस्तात कर्ज उपलब्ध – ज्यांना प्रकल्प बसविण्याची इच्छा आहे. परंतु, आर्थिक नियोजनामुळे शक्य होत नाही. अशांसाठी केंद्रसरकारने ‘जनसमर्थ’ पोर्टल विकसित केले आहे. सूर्यघर प्रकल्पाची नोंदणी महावितरणच्या https://www.mahadiscom.in/ismart/ या पोर्टलवर केल्यानंतर https://www.jansamarth.in/register पोर्टलवर कर्जाची मागणी करता येते. नामांकित राष्ट्रीय बँका ‘जनसमर्थ पोर्टल’द्वारे ९० टक्के कर्ज उपलब्ध करुन देतात. विशेष म्हणजे याचा व्याजदर गृहकर्जापेक्षाही कमी आहे.

पुणेकरांनी लाभ घ्यावा- सुनिल काकडे

पुणेकर सूर्यघर योजनेचे महत्व जाणतात. त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करुन या योजनेत सामील व्हावे. महावितरणने ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन केली आहे. अनुदानही तातडीने प्राप्त होते. तसेच यासाठी लागणारे वीजमीटर सुद्धा महावितरणतर्फे मोफत दिले जात आहे.

पुणे जिल्ह्यातील मंजूर प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देश

पुणे दि.२४ सप्टेंबर:: पुणे जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग, शहर बाह्य वळण रस्ते, इतर मंजूर प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेला गती देऊन प्रकल्प पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आज दिले.

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली भूसंपादन आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस सर्व भूसंपादन अधिकारी, कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पुणे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे तसेच इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत राष्ट्रीय महामार्ग विभाग पुणे व भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पुणे यांच्याशी संबंधित खालील प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला.
१) रा.म. ६० – भिमाशंकर – तळेघरवाडा – राजगुरुनगर व रा.म. ६१ – बनकर फाटा – जुन्नर – घोडेगाव – तळेघर रोड.
२) रा.म. ७६१ बेल्हे – अळकुटी, निघोजे – राळेगाव – थेरपाळ रुंदीकरण व रा.म. ५४८ डी बेल्हे – अळकुटी, निघोजे – राळेगाव – थेरपाळ रुंदीकरण.
३) महाड – पंढरपूर रस्ता, भोर – वरंधा घाट (किमी ३३/५५० ते ९५/५५०).
४) नाशिक फाटा ते खेड एलीव्हेटेड कॉरिडॉर.
५) उंडवडी क.प. ते देशमुख चौक बारामती रस्ता.

या प्रकल्पांमधील प्रलंबित मोजणीप्रक्रिया तात्काळ करावी; आवश्यक त्या ठिकाणी पोलिस बंदोबस्तात मोजणी करावी, तसेच प्रकल्प पूर्ण करण्याच्या अनुषंगाने भूसंपादन प्रक्रिया अचूक व पारदर्शक पद्धतीने करून शेतकऱ्यांशी समन्वय साधून बहुतांश भूसंपादन संमतीने करण्याच्या सूचना बैठकीत दिल्या.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे यांच्याशी संबंधित पुढील प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला:-
१) पुणे इनर रिंगरोड.
२) चाकण शहरातील वाहतूक कोंडीसाठी बाह्यवळण रस्ता.
३) उसे येथील १५ मीटर रुंदीचा सेवा रस्ता.
४) नऱ्हे येथील नवले पुलाच्या दोन्ही बाजूने १२ मीटर सेवा रस्ता.

या प्रकल्पांसाठीही प्रलंबित मोजणी तात्काळ करून शेतकऱ्यांच्या संमतीने व पारदर्शक पद्धतीने भूसंपादन प्रक्रिया करावी तसेच ‘पीएमआरडीए’ विभागाने भूसंपादन हे टीडीआर द्वारे करण्यासाठी संबंधित खातेदारांसमवेत बैठक घेण्याची सूचनाही जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाशी संबंधित प्रकल्पांचा आढावा घेताना चाकण टप्पा क्र. ५, चाकण जोडरस्ता, तळेगाव औद्योगिक क्षेत्र टप्पा क्र. २, ४ व ५ तसेच जोडरस्ते, वाहनगाव औद्योगिक क्षेत्र, भोर – उत्रोली – वडगाव डाळ प्रस्तावित औद्योगिक क्षेत्र आणि अतिरिक्त कुरकुंभ (पाटस) औद्योगिक क्षेत्र या प्रकल्पांसाठी बहुतांश भूसंपादन प्रक्रिया संमतीने करण्यावर भर द्यावा,यासाठी संपादन मंडळ म्हणून महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ व संबंधित भूसंपादन अधिकारी यांनी खातेदारांसमवेत वेळोवेळी बैठकांचे आयोजन करावे, असे निर्देशही दिले.
तसेच इतर प्रकल्पांमध्ये विद्युत विभागाचा ७६५ के.व्ही. शिक्रापुर – बाभळेश्वर – पुणे शहर – शिरूर, बाभळेश्वर – कडूस – जुन्नर – आंबेगाव हा वीजप्रकल्प तसेच राजमाता सईबाई स्मृतीस्थळ विकास आराखडा या प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला.

सदर प्रकल्पांच्या भूसंपादन प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी तात्काळ दूर करून प्रक्रिया अचूक व पारदर्शकरितीने पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना बैठकीत देण्यात आल्या.

मासे व्यापाऱ्यांकडून खंडणी वसुली:आंदेकर टोळीच्या चौघांना अटक

पुणे- गणेश पेठ मच्छी मार्केटमधील मासे व्यापाऱ्यांकडून खंडणी वसुलीप्रकरणी फरासखाना पोलिसांनी बंडू आंदेकर टोळीच्या चार सदस्यांना अटक केली आहे. शेखर दत्तात्रय अंकुश, मनिष वर्धेकर, सागर बाळकृष्ण थोपटे आणि रोहित सुधाकर बहादुरकर यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणात वनराज आंदेकर यांची पत्नी सोनाली हिलाही आरोपी करण्यात आले आहे.टोळीने मागील 12 वर्षांत व्यापाऱ्यांकडून प्रोटेक्शन मनीच्या नावाखाली 20 कोटींहून अधिक रकमेची वसुली केली आहे. प्रत्येक व्यापाऱ्याकडून 15 ते 50 हजार रुपयांपर्यंत रक्कम वसूल केली जात होती. या प्रकरणी 60-65 व्यापाऱ्यांनी आतापर्यंत तक्रारी नोंदवल्या आहेत.

पोलिसांनी आंदेकर टोळीविरुद्ध खंडणी, जीवे मारण्याची धमकी, संघटित गुन्हे आणि संगनमताने गुन्हे करणे या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. टोळीच्या अतिक्रमणावर पालिकेच्या मदतीने कारवाई सुरू आहे.टोळीच्या चौकशीदरम्यान कोट्यवधींची मालमत्ता आढळली आहे. मात्र, त्यांनी कधीही आयकर भरलेला नाही. याबाबत पुणे पोलिसांनी आयकर विभागाशी पत्रव्यवहार केला आहे. वनराज आंदेकर खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी गणेश कोमकर, सोमनाथ गायकवाड यांच्या अवैध मालमत्तेवरही कारवाई होणार आहे.

आंदेकर टोळीकडे करण्यात आलेल्या चौकशीत व घर झडतीत कोट्यवधींची मालमत्ता सापडली आहे. परंतु, आजतागायत त्यांनी एकदाही इन्कम टॅक्स भरलेला नाही. एकदाही इन्कम टॅक्स न भरता कोणी एवढी माया कशी जमवू शकते? ही बाब निदर्शनास आल्यानंतर इन्कम टॅक्सच्या कारवाईच्या अनुषंगाने पुणे पोलिसांनी आयकर विभागाशी पत्र व्यवहार केला असल्याचे सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी सांगितले.

एकीकडे आंदेकर टोळीवर सर्वच प्रकारे कारवाई सुरू असताना दुसरीकडे वनराज आंदेकर खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींच्या अवैध मालमत्तेवरही अशाच पध्दतीने कारवाई केली जाणार आहे. त्यामध्ये गणेश कोमकर, सोमनाथ गायकवाड या टोळीशी संबंधीत सर्वावर पोलिसांकडून लक्ष ठेवले जात असून त्यांच्याही अवैध मालमत्ता लक्ष केल्या जाणार आहेत.

गेल्या पंधरा वर्षापासून रस्त्याबाबतचा सुरु असलेला वाद संपुष्टात-तहसीलदार सुनील शेळके

पुणे, दि. २४ सप्टेंबर: सेवा पंधरवडा उपक्रमाअंतर्गत तालुक्यातील शेतरस्त्यांबाबतचे प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याकरिता तहसिल कार्यालय जुन्नर येथे महसूल लोक अदालत व रस्ता अदालत आयोजित करण्यात आली, यामध्ये शेतरस्त्यांबाबत एकूण १०४ प्राप्त प्रकरणापैकी १९ प्रकरणे जागेवरच निकाली काढण्यात आली, यामध्ये मौजे भोरवाडी (हिवरे बु) येथील गेल्या पंधरावर्षावासून रस्त्याबाबतचा असलेला वाद संपुष्टात आला असल्याची माहिती माहिती तहसीलदार सुनील शेळके यांनी दिली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सेवा पंधरवडा उपक्रमात जुन्नर तालुक्यातील १८५ गावामध्ये शिव, पाणंद वहिवाटीच्या रस्त्यांबाबत शिवारफेरी काढून ग्रामस्तरीय समिती समन्वयातून रस्त्यांचे युध्द पातळीवर सर्वेक्षण आले आहे. त्यामध्ये नकाशावर नोंद असलेल्या व नसलेल्या रस्त्यांच्या याद्या तयार करण्यात आल्या असून ग्रामसभेमध्ये त्यास मंजूरी घेण्यात आली आहे. तालुक्यातील नकाशावर असलेले व नसलेल्या अंदाजे २ हजार ९८६ रस्त्यांना विशेष सांकेतांक क्रमांक देण्यात आले आहेत.

या १८५ गावांपैकी १५ गावांपैकी बोरी बु गावामध्ये रस्त्यांचे सीमांकन करणेत येऊन जीआयएस पध्दतीने गाव नकाशावर चिन्हांकित करण्यात आले आहेत, उर्वरित राजुरी, पिंपरीकावळ, वैशाखखेडे, पिंपळगाव त नारायणगाव, खानापुर, राळेगण, मंगरुळ, अलदरे, गायमुखवाडी, सितेवाडी, चावंड, मांजरवाडी, कुमशेत, कुसुर या १४ गावांतील रस्त्यांच्या याद्या आणि त्यानुसार ग्रामपंचायतीच्या ठरावासह रस्ते सीमांकन व जीआएस पध्दतीने गाव नकाशावर नोंद घेण्याकरिता उपअधिक्षक भूमी अभिलेख जुन्नर यांना कळविण्यात आले आहे, असेही श्री. शेळके यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

चौकट मौजे भोरवाडी (हिवरे बु) येथील आपापसातील खातेफोड, वाटपाबाबत ‘शेरताटी ते वनदेवी ‘ ह्या रस्त्याबाबत गेली १५ वर्षांपासून सुरू असलेला वाद महसूल लोक अदालतीत संपुष्टात आला. सेवा पंधरवडा उपक्रमात रस्त्याबाबतचे वादविवाद संपुष्टात आणून शेतकऱ्यांच्या जीवनमान सुखकर व्हावे, पर्यायाने ग्रामीण अर्थकारणात वद्धी व्हावी, यासाठी प्रशासनाच्यावतीने प्रयत्न करण्यात येत आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय येथे सुरक्षा रक्षकांची कंत्राटी भरती

पुणे दि. २४ : महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्या. (मेस्को), पुणे यांच्यामार्फत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, बारामती येथे कंत्राटी पध्दतीने बिनहत्यारी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे.

यासाठी माजी सैनिक, माजी सैनिक पाल्य, पत्नी तसेच निम-लष्करी सेना (BSF, Assam Rifles, ITBF, TA, GREF, CISF, CRPF, SRPF) मधील निवृत्त कर्मचारी व त्यांच्या पत्नी पात्र राहतील.

इच्छुक उमेदवारांनी दिनांक ०५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे येथे संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी यशवंत बांदल, पर्यवेक्षक (मो.क्र. ९४२२८३०४७५) यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन ले.क. हंगे स. दै. (नि.), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे यांनी केले आहे.

आमदार बापूसाहेब पठारे यांचा धानोरी वडगाव शेरी खराडी भागातील रस्ते पाहणी दौरा

पुणे: मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यांची दुरावस्था झाल्याने वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी वडगावशेरी, धानोरी, पोरवाल रोड खराडी खांदवे नगर परिसरातील रस्त्यांची पाहणी केली. यावेळी त्यांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांना रस्त्यांची रखडलेली कामे तातडीने पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.

पाहणी दरम्यान वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याबाबत अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. “वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो, त्यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी विविध माध्यमातून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे,” असे पठारे यांनी सांगितले.

यात पुढील रस्ते व संबंधित सुधारणांबाबत सूचना देण्यात आल्या. धानोरी येथील धानोरी गावठाण चऱ्होली जोड रस्ता, भारत माता रस्ता, मंत्रा मोटोना सोसायटी जवळील रस्ता, या तीनही रस्त्यांचे अंदाजपत्रक करणे, वडगावशेरी येथील जुना मुंढवा रस्ता ते वडगाव शेरी भाजी मंडई रस्त्याचे बांधकाम विभागाकडून मार्किंग करून पथ विभागाने पुढील कार्यवाही करणे, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक ते (रामवाडी) नगर रस्ता, खराडी शिवणे रस्त्यातील वडगावशेरी येथील स.न.५७ मधील वन विभागाच्या हद्दीतील प्रलंबित रस्त्याबाबत वनविभागाकडे पाठपुरावा करणे, खराडी येथील खराडी बायपास हडपसर रस्ता (प्रेस्टीज कंपनी येथे युवानकडून येणाऱ्या रस्त्याला ये जा करण्यासाठी सुरू करणे, खराडी बायपास रस्ता ते रेडिसन हॉटेल शेजारून सातव वस्ती, निर्मला शाळेकडे जाणारा रस्ता सुरू करणे, पीपीपी तत्त्वावर सुरू असलेल्या रस्त्यांवर मुख्य चौकामध्ये चॅम्पर करणे, खराडी जकात नाका येथे जोडणाऱ्या रस्त्यांची कामे पूर्ण करणे, खांदवेनगरकडे नगर रस्त्यापासून जाणारा मुख्य रस्ता करणे, खराडी जकात नाका ते ग्रँड रोडला आवश्यक ठिकाणी मुख्य चौकात चॅम्पर करणे, खराडी मुंढवा पूल नदी किनारचा रस्ता व त्याला जोडणारे रस्ते करणे.
“उद्या धानोरी–चऱ्होली फॉरेस्ट पार्क परिसरातील ३२० मीटर रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन होणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या रस्त्याच्या परवानगीसाठी वनविभागाशी सातत्याने पाठपुरावा केला होता. काल वनमंत्री गणेश नाईक साहेब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्याचा निर्णय झाला. अखेरीस वनविभागाची परवानगी मिळाली असून, वनविभागाच्या या जागेचा मोबदला म्हणून पुणे महानगरपालिकेने १६ लाख ८० हजार रुपये वनविभागास अदा केल्याचे पठारे यांनी स्पष्ट केले.

या पाहणीवेळी महापालिका पथ विभागाचे कार्यकारी अभियंता संजय धारव, उपअभियंता पुनम गायकवाड, सायली सुर्यवंशी, कनिष्ठ अभियंता सुशिल मोहिते, सारंग देवरे, मनोहर माळी, बांधकाम विभागाचे अभियंता उमेश घाडगे, उपअभियंता प्रशांत महिंद्रकर, कनिष्ठ अभियंता भुषण कोकाटे आदी अधिकारी उपस्थित होते.