Home Blog Page 116

‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाच्या तनू भानची ऐतिहासिक कामगिरी!सर्वोत्तम एनसीसी कॅडेट; पंतप्रधानांच्या हस्ते सुवर्णपदक प्रदान

पुणे : येथील एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय छात्र सेनेची (एनसीसी) कॅडेट, कनिष्ठ अंडर ऑफिसर (जेएनओ) तनू भान हिने नुकत्याच नवी दिल्ली येथे झालेल्या प्रतिष्ठित एनसीसी प्रजासत्ताक दिन कॅम्पमध्ये (आरडीसी) ३६ महाराष्ट्र बटालियनचे प्रतिनिधित्व करत भारतातील सर्वोत्तम कॅडेट होण्याचा बहुमान पटकावत ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल तिला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले.

तनू भानसह एमआयटी एडीटी विद्यापीठाचा व्यंकटेश अय्यर यानेही एनसीसी ३६ महाराष्ट्र बटालियनमध्ये स्थान मिळवत प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले असून, महाराष्ट्रासह एमआयटी एडीटी विद्यापीठाचा मान उंचावला आहे.

एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या या दोन्ही कॅडेट्सची महाराष्ट्रातून बेस्ट कॅडेट्स म्हणून निवड झाल्यानंतर देशातील १७ डायरेक्टरेट्समधील २० लाखांहून अधिक कॅडेट्समध्ये त्यांनी सर्वोच्च स्तरावर स्पर्धा केली. त्यामध्ये तनू भान हिने उत्कृष्ट शिस्त, नेतृत्वगुण आणि प्रचंड मेहनतीच्या जोरावर सुवर्णपदकावर आपले नाव कोरले, तर व्यंकटेशनेही दाखवलेली जिद्द उल्लेखनीय ठरली.

२८ जानेवारी रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तनू भान हिला सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. तिची ही ऐतिहासिक कामगिरी महाराष्ट्र डायरेक्टरेट, संपूर्ण एनसीसी तसेच एमआयटी एडीटी विद्यापीठासाठी अभिमानास्पद ठरली आहे.

या दोन्ही कॅडेट्सना एमआयटी एडीटी विद्यापीठातील एनसीसी विभागाचे संचालक ब्रिगेडियर मंगेश विटेकर (नि.) तसेच कॅडेट्सच्या असोसिएट एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट अक्षता परदेशी यांचे मार्गदर्शन लाभले. दोन्ही कॅडेट्सच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर विद्यापीठाचे कुलपती तथा अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, प्रा. डॉ. सुनीता कराड, कुलगुरू डॉ. राजेश एस. तसेच कुलसचिव डॉ. महेश चोपडे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीकरिता २९ लाख ७२ हजार मतदार-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

येत्या ७ फेब्रुवारी रोजी मतदानाचा हक्क बजाविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे मतदारांना आवाहन

पुणे, दि.३: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ करिता जिल्ह्यात ३ हजार ६०५ मतदान केंद्र असून याअंतर्गत पुरुष १५ लाख २२ हजार २५६, स्त्री १४ लाख ५० हजार १४ आणि इतर ९१ असे एकूण २९ लाख ७२ हजार ३५९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे, येत्या ७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतदानाकरिता जिल्ह्यातील अधिकाधिक मतदारांनी मतदान केंद्रावर जावून मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

बारामती तालुक्यात २ लाख ६४ हजार ६४२, मावळ २ लाख ३१६, मुळशी १ लाख ७३ हजार ४०१, शिरुर ३ लाख १ हजार ७८६, हवेली २ लाख ५१ हजार ५३३, दौंड २ लाख ७३ हजार १००, इंदापूर ३ लाख २१ हजार २, पुरंदर १ लाख ८९ हजार ४०३, भोर १ लाख ५४ हजार ८१०, वेल्हे ५५ हजार २३०, आंबेगाव १ लाख ८४ हजार ५२, जुन्नर ३ लाख ७ हजार २६० आणि खेड तालुक्यात २ लाख ९५ हजार ८२४ असे एकूण २९ लाख ७२ हजार ३५९ मतदार आहेत.

बारामती तालुक्यात २९९, मावळ २४३, मुळशी २२७, शिरुर ३३७, हवेली २६३, दौंड ३१७, इंदापूर ४००, पुरंदर २३५, भोर २३७, वेल्हे १०५, आंबेगाव २३९, जुन्नर ३६६ आणि खेड ३३७ तालुक्यात असे एकूण ३ हजार ६०५ मतदान केंद्र आहेत. यामध्ये प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे १३ आदर्श व महिला मतदान केंद्र आहेत, अशी माहिती श्री. डुडी यांनी दिलीआहे.

सुनेत्रा पवार पुणे आणि बीड जिल्ह्यांच्या पालकमंत्री

मुंबई-उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार, सुनेत्रा पवार या पुणे आणि बीड जिल्ह्यांच्या पालकमंत्री म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अल्पावधीतच त्यांच्याकडे दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांची धुरा देण्यात आल्याने प्रशासनातही याची चर्चा सुरू आहे.

पुणे जिल्हा हा राज्यातील सर्वात मोठ्या आणि राजकीयदृष्ट्या प्रभावी जिल्ह्यांपैकी एक मानला जातो, तर बीड जिल्हा मराठवाड्यातील महत्त्वाचा जिल्हा आहे. या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आल्याने त्यांच्या भूमिकेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. अजित पवार यांच्या कार्यशैलीचा वारसा पुढे नेत, जिल्हास्तरावरील विकासकामांना गती देण्याची अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सुनेत्रा पवार यांचे राज्यातील राजकीय आणि प्रशासकीय स्थान अधिक बळकट झाल्याचे मानले जात आहे.
सुनेत्रा पवार यांच्याकडे पुणे आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली असून, यासंदर्भातील परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने जारी केले आहे. उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर अर्थखाते वगळता अजित पवारांकडे असलेली इतर सर्व खाती सुनेत्रा पवार यांच्या ताब्यात देण्यात आली आहेत. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांच्याकडे सोपवली जाणार असल्याची माहिती प्रफुल पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या भूमिकेचे राजकीय महत्त्व आणखी वाढले आहे.

पुणे आणि बीड या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची सूत्रे त्यांच्या हाती देण्यात आल्याची अधिकृत घोषणा शासनाकडून करण्यात आली. दरम्यान, सुनेत्रा पवार 9 फेब्रुवारी रोजी मंत्रालयातील कार्यालयात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार मंत्रालयातून राज्यभरातील कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत असत, त्याच पद्धतीने सुनेत्रा पवारही कामकाज पाहतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीसह बीड जिल्ह्यातही बंद पाळण्यात आला होता. बारामती हे त्यांचे कार्यक्षेत्र आणि जन्मभूमी असल्याने स्थानिकांनी स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून शोक व्यक्त केला. त्याचप्रमाणे बीडमध्येही नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत श्रद्धांजली वाहिली. गेल्या काही महिन्यांत बीडचे पालकमंत्री म्हणून अजित पवार यांनी जिल्ह्यातील जनतेशी जवळीक साधली होती. त्यांच्या कामाच्या शैलीमुळे बीडकरांमध्ये त्यांच्याविषयी आत्मीयता निर्माण झाली होती. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर बीडमध्ये उमटलेली प्रतिक्रिया लक्षवेधी ठरली. आता त्या जिल्ह्याच्या पालकत्त्वाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे येत असल्याने त्या नात्याची सातत्याने जपणूक होणार का, याकडेही लक्ष लागले आहे.

अमेरिकेच्या व्यापार करारावर राहुल म्हणाले- मोदींनी देश विकला:अदानीवरील खटला आणि एपस्टीन फाइल्समुळे पंतप्रधान घाबरले आहेत

नवी दिल्ली- लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आरोप केला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या व्यापार करारात देशाला विकले आहे. तुमच्या मेहनतीला, घाम आणि रक्ताला विकले आहे, कारण त्यांनी तडजोड केली आहे.

राहुल म्हणाले – नरेंद्र मोदी घाबरले आहेत, कारण ज्यांनी त्यांची प्रतिमा तयार केली, तेच आता ही प्रतिमा तोडत आहेत. अमेरिकेत अदानीवर खटला आहे, तो खरं तर मोदींवरचा खटला आहे. ते मोदीजींच्या आर्थिक संरचनेला लक्ष्य करत आहेत.

राहुल यांनी आरोप केला की, एपस्टीन फाइल्समध्ये अजूनही बरेच काही आहे जे अमेरिकेने अद्याप प्रसिद्ध केले नाही. त्यामुळेही पंतप्रधानांवर दबाव आहे. हे दोन दबावाचे मुद्दे आहेत. देशाने हे समजून घेतले पाहिजे की पंतप्रधानांनी तडजोड केली आहे.

राहुल म्हणाले की, इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रपतींच्या भाषणावर विरोधी पक्षनेत्याला बोलू दिले नाही. जनतेला याबद्दल विचार करण्याची गरज आहे.
जयराम रमेश म्हणाले- वॉशिंग्टनमध्ये मोगॅम्बो खुश

अमेरिका आणि भारतादरम्यान व्यापार कराराच्या घोषणेनंतर काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी X वर लिहिले- वॉशिंग्टनमध्ये मोगॅम्बो खुश आहे. असे दिसते की पंतप्रधान मोदींनी अखेर हार मानली आहे.

त्यांनी लिहिले की, भारताला स्वतःच्याच सरकारच्या कृतींची माहिती ट्रम्प किंवा त्यांच्या नियुक्त प्रतिनिधींकडून मिळते. आता हे नित्याचेच झाले आहे.

काँग्रेसच्या X पोस्टमध्ये लिहिले होते की, युद्धविरामाप्रमाणे (ऑपरेशन सिंदूर) व्यापार कराराची घोषणाही ट्रम्प यांच्याकडून करण्यात आली. ‘मोदींच्या विनंती’वरून व्यापार करार केला जात असल्याचे सांगण्यात आले.

काँग्रेसने लिहिले की, मोदी रशियाकडून तेल खरेदी करणार नाहीत, तर अमेरिका आणि व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करतील असेही सांगण्यात आले. व्यापार करारामध्ये मोदी सरकार रशियाची साथ सोडण्यास सहमत झाले आहे का? अमेरिकेकडून अधिक वस्तू खरेदी करण्याचीही चर्चा झाली, जर असे असेल तर ‘मेक इन इंडिया’चे काय झाले?

खरं तर, ट्रम्प यांनी सोमवारी भारत आणि अमेरिकेदरम्यानच्या व्यापार कराराची घोषणा केली. ते म्हणाले की, अमेरिकेने भारतावर लावलेले 50% शुल्क कमी करून 18% केले आहे. ट्रम्प यांनी असेही म्हटले की, भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणे बंद करेल.

एसबीआय लाइफ इन्शुरन्सला डिसेम्बर अखेर मिळाला ₹31,326 कोटी रुपयांच्या नवीन प्रीमियम

पुणे-

देशातील अग्रगण्य जीवन विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या एसबीआय लाइफ इन्शुरन्सने 31 डिसेंबर, 2025 रोजी संपलेल्या कालावधीसाठी ₹31,326 कोटींचा नवीन व्यवसाय प्रीमियम नोंदवला आहे, तर 31 डिसेंबर, 2024 रोजी संपलेल्या याच कालावधीसाठी हा आकडा ₹26,256 कोटी होता. 31 डिसेंबर, 2024 रोजी संपलेल्या संबंधित कालावधीच्या तुलनेत नियमित प्रीमियममध्ये 15% वाढ झाली आहे.

संरक्षणावर स्पष्ट लक्ष केंद्रित करून, एसबीआय लाइफचा संरक्षण विभागाचा नवीन व्यवसाय प्रीमियम 31 डिसेंबर, 2025 रोजी संपलेल्या कालावधीसाठी ₹3,411 कोटी होता, ज्यात 22% वाढ नोंदवली गेली. संरक्षण वैयक्तिक नवीन व्यवसाय प्रीमियम 31 डिसेंबर, 2025 रोजी संपलेल्या कालावधीसाठी ₹651 कोटी आहे. वैयक्तिक नवीन व्यवसाय प्रीमियम ₹22,545 कोटी असून, 31 डिसेंबर, 2024 रोजी संपलेल्या याच कालावधीच्या तुलनेत त्यात 14% वाढ झाली आहे.

31 डिसेंबर, 2025 रोजी संपलेल्या कालावधीसाठी एसबीआय लाइफचा करानंतरचा नफा ₹1,666 कोटी होता. 31 डिसेंबर, 2024 रोजी संपलेल्या याच कालावधीच्या तुलनेत त्यात 4% वाढ झाली.

31 डिसेंबर, 2025 रोजी कंपनीचा सॉल्व्हन्सी रेशो रेग्युलेटरी गरजेच्या 1.50 च्या तुलनेत 1.91 इतका मजबूत होता.

एसबीआय लाइफच्या व्यवस्थापनाधीन मालमत्तेतही (AUM) वाढ झाली. 31 डिसेंबर 2024च्या ₹4,41,678 कोटींवरून त्यात 31 डिसेंबर 2025 पर्यंत 16%ची वाढ होऊन ती ₹5,11,708 कोटी झाली, ज्यामध्ये कर्ज-इक्विटीचे प्रमाण 59:41 होते. कर्ज गुंतवणुकीपैकी 94.97% गुंतवणूक एएए (AAA) आणि सार्वभौम घटकांमध्ये करण्यात आली आहे.

कंपनीकडे 3,53,506 प्रशिक्षित विमा व्यावसायिकांचे एक वैविध्यपूर्ण वितरण जाळे आहे आणि देशभरात 1,176 कार्यालयांसह तिची उपस्थिती मोठ्या प्रमाणात आहे, ज्यात मजबूत बँकाशुरन्स चॅनल, एजन्सी चॅनल, कॉर्पोरेट एजंट, दलाल, पॉइंट ऑफ सेल व्यक्ती (पीओएस), विमा विपणन कंपन्या, वेब एग्रीगेटर्स आणि थेट व्यवसायाचा समावेश असलेल्या इतर माध्यमांचा समावेश आहे.

31 डिसेंबर2025 रोजी संपलेल्या कालावधीतील कामगिरी

  • वैयक्तिक नवीन व्यवसाय प्रीमियम आणि वैयक्तिक रेटेड प्रीमियममध्ये मार्केटमधील अनुक्रमे 28.1% आणि 25.6% हिश्शासह खासगी बाजारात नेतृत्व.
  • वार्षिक प्रीमियम समतुल्य (APE) ₹18,519 कोटी असून त्यात 16% ची वाढ.
  • एकूण नवीन व्यवसायाची विमा रक्कम 10,83,360 कोटी असून त्यात 68.8% वाढ झाली आहे.
  • 13 महिन्यांची पॉलिसी टिकून राहण्याच्या दरात 101 बीपीएसने सुधारणा.
  • नवीन व्यवसायाचे मूल्य (VoNB) ₹5,042 कोटी असून त्यात 17% वाढ झाली आहे.
  • VoNB मार्जिन 27.2% आहे.
  • भारतीय एम्बेडेड मूल्य (IEV) ₹80,129 कोटी असून त्यात 18% वाढ झाली आहे.
  • करानंतरचा नफा (PAT) ₹1,666 कोटी असून त्यात 4% वाढ झाली आहे.
  • 1.91चा मजबूत सॉल्व्हन्सी रेशो.
  • व्यवस्थापनाखालील मालमत्ता 5,11,708 कोटी असून त्यात 16वाढ झाली आहे.

तिसऱ्या मुंबईच्या गोंडस नावाखाली भांडवलशाही रायगडच्या उंबरठ्यावर, जिल्हा परिषद निवडणूक भूमिपुत्रांच्या हक्कांची: हर्षवर्धन सपकाळ

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यास भाजपाकडून टाळाटाळ, विमानतळाला नरेंद्र मोदींचे नाव देऊनच दाखवा.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा रायगड जिल्ह्यात झंझावाती प्रचार.

मुंबई, दि. ३ फेब्रुवारी २०२६

हा देश मुठभर लोकांचा किंवा उद्योगपतींचा नाही तर सर्वसामान्यांचा आहे पण भूमिपुत्रांचा गळा आवळण्यासाठी भांडवलदार आसुसलेले आहेत, दोन गुजराती विकत आहेत तर दोन खरेदी करत आहेत असे चित्र देशात आहे. आता तिसऱ्या मुंबईच्या नावाखाली भांडवलदार रायगडच्या उंबरठ्यावर आले आहेत. जिल्हा परिषदेची ही निवडणूक भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी आहे, आपली परंपरा कायम राखण्यासाठी एकसंध रहा आणि काँग्रेस मविआच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज रायगड जिल्ह्यातील जासई, चिरनेर, सातिर्जे, चोंढी येथे प्रचार रॅलीत सहभाग घेतला. यावेळी ते म्हणाले की, जिल्हा परिषद निवडणुकीतील कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता विजय आपलाच आहे हे आत्ताच दिसून येत आहे. रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस मविआला चांगले यश मिळेल व सत्तेच्या चाव्या काँग्रेसच्या हातात असतील. लोकनेते दि. बा. पाटील यांनी भूमिपुत्रांसाठी मोठा लढा दिला, आता पुन्हा भूमिपुत्रांसमोर भांडवलदारांचे मोठे संकट उभे ठाकले आहे. या भांडवलशाहीला थांबवण्यासाठी काँग्रेस मविआला विजयी करा असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

एका प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा पाटील यांचे नाव द्यावे ही मागणी काँग्रेस पक्षाने पहिल्यापासूनच केली आहे. पण देवेंद्र फडणवीस मात्र दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळास देण्यास टाळाटाळ करत आहेत. आताच विमानतळाचे एनएम नाव दिसत आहे पण एनएमच्या आडून नरेंद्र मोदी हे नाव देण्याचा घाट घातला तर तो खपवून घेतला जाणार नाही, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. यावेळी रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र घरत, राजाभाऊ ठाकूर यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

भाजपच्या मंजुषा नागपुरे महापौर:परशुराम वाडेकर उपमहापौर; उमेदवारी अर्ज दाखल

पुणे- महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) मंगळवारी नामनिर्देशन अर्ज दाखल केले. महापौरपदी मंजुषा नागपुरे आणि उपमहापौरपदी परशुराम वाडेकर यांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. महापौरपदासाठी भाजपतर्फे मंजुषा नागपुरे आणि वर्षा तापकीर यांच्यात चुरस होती. मात्र, पक्षश्रेष्ठींनी मंजुषा नागपुरे यांच्या नावावर अंतिम मोहोर उमटवली. उपमहापौरपदी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) पक्षाचे परशुराम वाडेकर यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. त्यांनी निवडणुकीत कमळ चिन्हावर निवडणूक लढवली होती. विशेष म्हणजे, परशुराम वाडेकर यांच्या पत्नी सुनीता वाडेकर याही यापूर्वी पुण्याच्या उपमहापौर होत्या.त्यानंतर आता त्यांच्या पतीला संधी देण्यात आली आहे. त्यामुळे वाडेकर दाम्पत्य हे उपमहापौर होणारे पहिले दाम्पत्य ठरले आहे. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, गटनेते गणेश बीडकर, माजी मंत्री दिलीप कांबळे,भाजप प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, आणि श्रीनाथ भिमाले यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते.

मंजुषा नागपुरे या प्रभाग क्रमांक ३५ मधून तिसऱ्यांदा नगरसेवकपदी निवडून आल्या आहेत, तर वर्षा तापकीर या चौथ्यांदा नगरसेवक झाल्या आहेत. यंदाच्या निवडणुकीत मंजुषा नागपुरे बिनविरोध निवडून आल्या आहेत. भारतीय जनता पक्षाने मनपा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्याशी युती केली होती. या युतीअंतर्गत आरपीआयला नऊ जागा देण्यात आल्या होत्या. संबंधित जागांवर आरपीआयचे उमेदवार कमळ चिन्हावर लढून विजयी झाले आहेत. यामध्ये पुण्याच्या माजी उपमहापौर सुनीता वाडेकर यांचे पती आणि आरपीआयचे ज्येष्ठ नेते परशुराम वाडेकर यांचे नाव उपमहापौर पदासाठी आघाडीवर होते. दरम्यान, भाजपने गटनेतेपदी ज्येष्ठ नगरसेवक गणेश बिडकर यांची निवड केली आहे. स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी श्रीनाथ भिमाले यांचे नाव आघाडीवर आहे. यावेळी बोलताना भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले, “नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पुणेकरांनी भाजपला घवघवीत यश दिले आहे. या यशाच्या माध्यमातून नवनिर्वाचित सदस्यांना पुणेकरांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. पुण्याचे महापौरपदी मंजुषा नागपुरे आणि उपमहापौरपदी परशुराम वाडेकर यांना संधी देण्यात येत आहे.” गणेश बीडकर म्हणाले, “भाजपच्या तीन पिढ्यांनी केलेल्या कामामुळे आज पक्षाला शहरात यश मिळाले आहे. अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी तळागाळात जाऊन काम केले, ज्यामुळे आज पक्षाला सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.”

कॉंग्रेस म्हणते , चिंता नाही हारण्याची,कर्तव्यपूर्ती लढण्याची तर राष्ट्रवादीचे मात्र तळ्यात मळ्यात …

पुणे- महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाने तब्बल ११९ जागांवर विजय मिळविला आणि भाजपचाच महापौर होईल हे अधोरेखित झाले . असे असले तरी लोकशाही मध्ये आम्हाला चिंता नाही हारण्याची मात्र कर्तव्यपूर्ती असेल लढण्याची अशी भूमिका घेत कॉंग्रेस पक्षाने आज महापालिकेत येऊन नगरसचिव योगिता भोसले यांच्याकडे महापौर पदासाठी अश्विनी लांडगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला तर उपमहापौर पदासाठी साहिल शिवाजी केदारी या ओब्क तरुण नगरसेवकाचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी लांडगे यांनी आपणास महापौर पदाची उमेदवारी देऊन हा आपला सन्मानच कॉंग्रेस पक्षाने केल्याचे म्हटले आहे. तर शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी महापालिका निवडणुकीत सहमतीच्या विचाराचा पक्ष म्हणून आम्ही ज्यांना सन्मान दिला त्यांची आता भाजपा विरोधात लढण्याची मानसिकता दिसत नाही , निवडणुकीत ते भाजपा विरोधात लढले आणि आता मात्र ते वेगळी भूमिका घेत असल्याचा ठपका ठेवत आम्ही सांगत होतो घड्याळाला मत म्हणजे भाजपला मत तसेच आता सिद्ध होत असल्याचे म्हटले आहे आणि भाजपच्या विरोधात फक्त कॉंग्रेस पक्षच लढू शकतो असेही म्हटले आहे. यावेळी कॉंग्रेसचे नेते रमेश बागवे, मोहन जोशी , प्रशांत जगताप, अविनाश बागवे आदी मान्यवर कार्यकर्ते ,पदाधिकारी उपस्थित होते.

दुसरीकडे अजितदादा गटाच्या राष्ट्रावादी कॉंग्रेस पक्षाने आज आपल्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क केला होता पण निर्णय होऊ शकला नाही , दरम्यान विरोधी पक्ष नेते म्हणजेच राष्ट्रवादीचे गटनेते निलेश निकम यांनी सांगितले कि, तूर्तास आम्ही स्थानिक पाळीवर भाजपच्या विरोधात महापौर पदासाठी शितल सावंत तर उपमहापौर पदासाठी दत्ता बहिरट यांना उमेदवारी देऊन त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत . मात्र याबाबत वरिष्ठ नेते सांगतील त्याप्रमाणे भूमिका घेण्यात येईल. आम्ही पुणेकरांना बांधील आहोत , जिथे चूक दिसेल तिथे विरोध करू , कॉंग्रेसच्या शहर अध्यक्षांच्या टिप्पणीवर निकम म्हणाले , सध्या तरी त्यांना तेवढेच काम उरलेले आहे. यावेळी आमदार चेतन तुपे पाटील , माजी आमदार सुनील टिंगरे,सुभाष जगताप ,मुकारी अलगुडे आदी मान्यवर उपस्थित होते.

राज ठाकरे, वाकरे…हे माझ्या पक्षाशी संबंधित आहेत का?

मी राष्ट्रवादीचा अध्यक्ष होणार नाही:प्रफुल्ल पटेल यांची स्पष्टोक्ती
मुंबई – सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर आपण पक्षाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट केले आहे.त्याचबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पोस्टवर बोलताना म्हणाले, राज ठाकरे वाकरे हे माझ्या पक्षाशी संबंधित आहेत का? माझ्या पक्षाचा विधीमंडळ नेता कोण व अध्यक्ष कोण हे आम्ही ठरवणार.अजित पवार यांच्या निधनानंतर कोण? काय? कसे? कुठे हे पाहण्याची जबाबदारी माझी आहे. त्यामुळे मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष होणार नाही हे स्पष्ट आहे, असे ते म्हणालेत. आज आमच्यापुढे विलीनीकरणाचा कोणताही प्रश्न नसल्याचेही त्यांनी यावेळी प्रामुख्याने अधोरेखित केले. त्यामुळे अजित पवारांच्या पश्चात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत सुरू असणारी विलीनीकरणाची कथित चर्चा पुढे सरकणार नसल्याचे हे आता स्पष्ट झाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या केंद्रीय कार्यालयात आज अजित पवारांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना प्रफुल्ल पटेल म्हणाले, आम्ही आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते, सुनील तटकरे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे आदी नेत्यांशी संवाद साधून आम्ही सुनेत्रा पवार यांच्या घरी गेलो. त्यांची पार्थ व जय पवार ही दोन्ही मुले तिथे होती. आम्ही त्यांचे सांत्वन करत राष्ट्रवादी काँग्रेस खंबीरपणे तुमच्या व तुमच्या कुटुंबाच्या पाठिशी आहे. ही आमची व जनतेचीही भावना आहे की, आपण ही जबाबदारी स्वीकारावी. त्यावर सुनेत्रा पवारांनी आमच्या विनंतीला मान दिला.

सुनेत्राताई मुंबईला आल्या. त्यांनी पवार कुटुंबात 3 दिवसांचा दुखवटा असल्याचे सांगितले. त्यानंतर चौथ्या दिवशी त्या आल्या. त्यानंतर आम्ही त्यांची निवड केली. त्यानंतर त्यांचा शपथविधी झाला. आमच्या अंतर्गत प्रश्नांवर सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहेत. आम्ही आमच्या पक्षाचे नेते निवडणार की, दुसरा एखादा व्यक्ती निवडणार? आम्ही एक पक्ष आहोत. त्याचे दोन पार्ट आहेत. पहिला पार्ट आहे विधीमंडळ व दुसरा पार्ट आहे राजकीय पक्ष. विधीमंडळाचा पार्ट संपला. आता अनेक लोकांची विधाने येत आहेत, असे ते म्हणाले.

प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी अजित पवारांच्या निधनानंतर पक्षाची सर्व प्रक्रिया व्यवस्थितपणे पार पाडण्याची जबाबदारी आपल्यावर असल्याचेही यावेळी स्पष्ट केले. ते म्हणाले, एका केंद्रीय मंत्र्याने चुकून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून माझ्या नावाचा उल्लेख केला. नंतर त्यांनी त्यावर खेदही व्यक्त केला. मी पक्षाचा कार्याध्यक्ष आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या निधनानंतरच्या सर्व प्रक्रिया व्यवस्थित पार पाडण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. विधीमंडळ किंवा राष्ट्रीय अध्यक्षाचा विषय मार्गी लावण्याची जबाबदारी व प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. महाराष्ट्रात ही जबाबदारी सुनील तटकरे यांच्यावर आहे.

आम्हाला सर्वांच्या भावना समजतात. त्यानुसार आम्ही सुनेत्राताईंचा निर्णय घेतला. आता पक्षाचाही निर्णय त्यानुसारच घेतला जाईल. सध्या काही लोक ज्यांचा पक्षाशी कोणताही संबंध नाही, ते आमच्याविषयी उलटसुलट चर्चा करत आहेत. माझ्या वडिलांना महाराष्ट्राच्या जनतेने निवडून दिले होते. मी स्वतःही महाराष्ट्राच्या जनतेच्या बळावर लोकसभेवर निवडून गेलो. आमच्या बद्दल व आमच्या पार्श्वभूमीविषयी कुणी कमेंट्स करत असेल, तर त्याला लाज वाटली पाहिजे. मी महाराष्ट्राचा एक लोकप्रतिनिधी म्हणून येथे बसलो आहे, असे ते म्हणाले.

प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी पक्षाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत आपण नसल्याचेही स्पष्ट केले. ते म्हणाले, पक्षाचा निर्णय योग्य पद्धतीनेच होईल. योग्य दिशेनेच होईल. योग्य व्यक्तीचाच होईल व माझ्याशिवायच होईल. आता याहून अधिक काय बोलू. आमच्याकडून एकही विधान आले नसताना उगीच या प्रकरणी वादळ निर्माण करणे व आमच्या पक्षामध्ये संशय निर्माण करणे ही अत्यंत घाणेरडी गोष्ट आहे. मला याविषयी अजिबात फार काही बोलायचे नाही. आम्ही या प्रकरणी योग्य तो निर्णय घेऊ, असे ते म्हणालेत. पत्रकारांनी यावेळी त्यांना तुम्ही अध्यक्षपदाच्या शर्यतीत नाही का? असा प्रश्न केला. त्यावर त्यांनी सकारात्मक उत्तर दिले.

प्रफुल्ल पटेल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पोस्टवर बोलताना म्हणाले, राज ठाकरे वाकरे हे माझ्या पक्षाशी संबंधित आहेत का? माझ्या पक्षाचा विधीमंडळ नेता कोण व अध्यक्ष कोण हे आम्ही ठरवणार. राज ठाकरे किंवा सकाळी 9 वाजताचे बुलेटिन यांनी आम्ही काय करावे हे सांगू नये. आम्ही योग्य निर्णय घेण्याच्या प्रोसेसमध्ये आहोत. या लोकांनी आम्ही आमच्या पक्षात काय करावे हे सांगू नये. आम्ही पहिला निर्णय योग्य निर्णय घेतला असून, दुसरा निर्णयही योग्यच घेण्याच्या प्रक्रियेत आहोत.
विलीनीकरणावर काय म्हणाले?

पत्रकारांनी यावेळी प्रफुल्ल पटेल यांना दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात प्रश्न केला. त्यावर ते म्हणाले, हा विषय सध्या आमच्यापुढे नाही. सध्या आमच्यापुढे आमचा पक्ष, आमचे घर, आमचे विधीमंडळ हे प्रश्न आहेत. हे प्रश्न निकाली निघाल्यानंतर बाकीच्या विषयांवर विचार केला जाईल. आज तो विषय आमच्यापुढे नाही. आज आमच्यापुढे आमच्या पक्षाचा निर्णय आहे. पुढील सर्व प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी माझी आहे. मी हे करत असताना लोकं उलटसुलट बातम्या चालवत आहेत. मी कोणत्याही शर्यतीत नाही. मी कधी याविषयी विधानही केले नाही. माझ्या पक्षाच्या एकाही नेत्याने यासंबंधी माझे नाव घेतले नाही, असे ते म्हणाले.

घरोघरी जाऊन प्रचार करा-भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण

पुणे :भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आज पुणे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.

घरोघरी जाऊन प्रचार करा, छोट्या बैठका व मेळाव्यांवर भर द्या, स्थानिक पातळीवर प्रचार करा, असे स्पष्ट निर्देश चव्हाण यांनी दिले.

प्रदेश स्तरावरील कोणताही मंत्री किंवा पदाधिकारी प्रचारासाठी येणार नाही. स्थानिक कार्यकर्त्यांनीच प्रचाराची धुरा सांभाळावी, असेही त्यांनी नमूद केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमांतून झालेली विविध विकासकामे आणि शासकीय योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन चव्हाण यांनी केले.

भाजपची बूथ यंत्रणा सक्षम असून, त्या माध्यमातून प्रचार यंत्रणा अधिक प्रभावीपणे राबवावी असे निर्देश चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.

संघटनात्मक ताकद, कार्यकर्त्यांची मेहनत आणि विकासाच्या मुद्द्यांवर आधारित प्रचार यामुळे पक्षाला मोठे यश मिळेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, आमदार राहुल कुल, भीमराव तापकीर, पुणे दक्षिण जिल्हाध्यक्ष शेखर वढणे, पुणे उत्तर जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद, माजी आमदार संजय जगताप आणि संग्राम थोपटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

राजेश पांडे यांनी सूत्रसंचालन केले.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना बैठकीत श्रद्धांजली वाहण्यात आली.

पुण्याच्या महापौरपदी भाजपकडून मंजूषा नागपुरे,काँग्रेस कडून अश्विनी लांडगे

0

पुणे:पुण्याच्या महापौरपदी मंजूषा नागपुरे यांची निवड भाजपाने केल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज आज नगरसचिव योगिता भोसले यांच्याकडे दाखल करण्यात येत आहे. दरम्यान 119 एवढी भाजप संख्या असल्याने भाजपच्याच महापौर होतील हे निश्चित आहे.काँग्रेसकडून महापौर पदासाठी अश्विनी लांडगे,आणि उपमहापौर पदासाठी साहिल केदारी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. त्यामुळे 9 तारखेला निवडणूक होणारच आहे.

योगेश टिळेकर यांना आमदारकी दिल्याने त्यांच्या मातोश्री रंजना टिळेकर यांचा पत्ता कट करण्यात आला. तर मानसी देशपांडे या आमदार, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या भावजयी आहेत. त्यामुळे त्यांना पद देण्यात आले नसल्याची माहिती आहे. वर्षा तापकीर यांना सव्वा वर्षानंतर महापौर पद देण्याचे आश्वासन देण्यात आल्याची माहिती आहे.

सिंहगड रोडला प्रथमच महापौर पदाचा मान मिळाला आहे. नागपुरे सलग तिसऱ्यांदा नगरसेवक झाल्या, यंदाच्या निवडणुकीतही त्या बिनविरोध निवडून आल्या आहेत.

पुणे महापालिकेची निवडणूक मैत्रीपूर्ण लढली गेली. देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांच्यात झालेल्या चर्चेनुसार महापौर-उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध होईल ठरले होते. त्यामुळे या निवडणुकीत उमेदवार दिला जाणार नाही, अशी माहिती राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिली.

मंजूषा नागपुरे या कडव्या हिंदुत्ववादी विचारसरणी, भाजपच्या निष्ठावंत नगरसेविका म्हणून ओळखल्या जातात. महापालिकेच्या कामाच त्यांचा चांगला अनुभव आहे. स्थायी समितीसारख्या महत्त्वाच्या समितीवर त्यांनी काम केले आहे. महापौरपदासाठी रंजना टिळेकर, वर्षा तापकीर आणि मानसी देशपांडे यांच्या नावांची चर्चा होती

पक्षीय बलाबल

​भाजप :119​

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) : 27​

काँग्रेस : 15​

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) : 3​

शिवसेना (UBT) : 01

अमेरिकेने भारतावरील टॅरिफ 50% वरून 18% पर्यंत कमी केला;रशियाकडून तेल खरेदी करणार नाही,व्हेनेझुएलाकडून घेईल-भारताकडून ग्वाही

भारत आणि अमेरिकेदरम्यान ज्या व्यापार कराराची दीर्घकाळापासून प्रतीक्षा होती, त्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी केली. ट्रम्प म्हणाले की, अमेरिकेने भारतावरील रेसिप्रोकल टॅरिफ (परस्पर कर) 25% वरून 18% पर्यंत कमी केले आहे.ट्रम्प यांनी सोमवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यानंतर रात्री सुमारे 10:30 वाजता ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्यापार कराराची घोषणा केली. ट्रम्प यांनी दावा केला की, मोदी रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवून अमेरिकेकडून अधिक तेल खरेदी करण्यास सहमत झाले आहेत.ट्रम्प यांच्या मते, गरज पडल्यास भारत व्हेनेझुएलाकडून तेल घेईल. भारत ‘बाय अमेरिकन’ धोरणांतर्गत अमेरिकेकडून 46 लाख कोटी रुपये (500 अब्ज डॉलर) पेक्षा जास्त किमतीचा माल खरेदी करेल. तर, ट्रम्प यांच्या घोषणेनंतर पंतप्रधानांनी X वर लिहिले – भारताच्या 1.4 अब्ज लोकांच्या वतीने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे आभार.

ट्रम्पने 25 एप्रिल रोजी भारतावर 25% रेसिप्रोकल टॅरिफ आणि नंतर रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे ऑगस्टमध्ये 25% दंड जाहीर केला होता. व्हाइट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने न्यूज एजन्सी ANI ला सांगितले की, भारतावर फक्त 18% टॅरिफच लागेल. अमेरिका रशियन तेल खरेदी केल्यामुळे लावलेला 25% टॅरिफ काढून टाकेल.


ट्रम्प यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये काय लिहिले, वाचा…


आज सकाळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट होती. आम्ही रशिया-युक्रेन युद्धासह अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. पंतप्रधान मोदींनी रशियाकडून तेल खरेदी थांबवण्यास सहमती दर्शवली. भारत आता अमेरिकेकडून अधिक तेल खरेदी करेल. याव्यतिरिक्त, व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करण्याच्या शक्यतेवरही चर्चा झाली. यामुळे युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध संपवण्यास मदत होईल, जिथे दर आठवड्याला हजारो लोकांचा जीव जात आहे. पंतप्रधान मोदींच्या मैत्री, सन्मान आणि त्यांच्या विनंतीवरून, आम्ही अमेरिका आणि भारत यांच्यात त्वरित एका व्यापार करारावर सहमती दर्शवली आहे. या अंतर्गत, अमेरिका भारतावर लादले जाणारे रेसिप्रोकल टॅरिफ २५% वरून १८% पर्यंत कमी करेल. तर भारतही अमेरिकेविरुद्धचे आपले टॅरिफ आणि गैर-टॅरिफ अडथळे कमी करून शून्य करण्याच्या दिशेने वाटचाल करेल. पंतप्रधान मोदींनी ‘बाय अमेरिकन’ (Buy American) संदर्भातही मोठी वचनबद्धता दर्शवली आहे. या अंतर्गत, भारत अमेरिकेकडून ५०० अब्ज डॉलरपेक्षा जास्त किमतीची ऊर्जा, तंत्रज्ञान, कृषी, कोळसा आणि इतर उत्पादने खरेदी करेल. मला पूर्ण विश्वास आहे की भारत आणि अमेरिकेचे संबंध भविष्यात आणखी मजबूत होतील.


मोदी म्हणाले- आमची भागीदारी नव्या उंचीवर नेण्यासाठी उत्सुकपंतप्रधान मोदींनी लिहिले- मला राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी बोलून खूप आनंद झाला. मेड इन इंडिया उत्पादनांवरील शुल्क आता १८% पर्यंत कमी करण्यात आले आहे, हे जाणून खूप समाधान वाटले. या शानदार निर्णयासाठी भारताच्या १.४ अब्ज लोकांच्या वतीने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे मनःपूर्वक आभार.मोदींनी पुढे लिहिले- जेव्हा दोन मोठ्या अर्थव्यवस्था आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही एकत्र काम करतात, तेव्हा आपल्या लोकांना फायदा होतो आणि परस्पर सहकार्याच्या नवीन आणि मोठ्या संधी निर्माण होतात. मी त्यांच्यासोबत काम करण्यास आणि आमची भागीदारी अभूतपूर्व उंचीवर नेण्यास उत्सुक आहे.

आता भारत त्या देशांमध्ये समाविष्ट आहे, ज्यांच्यावर सर्वात कमी शुल्क आहे भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांनी NDTV शी बोलताना भारत-अमेरिका यांच्यातील व्यापार करार निश्चित झाल्याची पुष्टी केली. ते म्हणाले – काही तांत्रिक कागदपत्रांवर पुढील काही दिवसांत स्वाक्षऱ्या होतील, परंतु करार जवळपास निश्चित आहे.गोर म्हणाले – हा शुल्क करार पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यातील अनेक वर्षांपासूनच्या मजबूत मैत्रीचा परिणाम आहे. हे शुल्क इतर देशांच्या तुलनेत खूप कमी आहे. आधी भारतावर खूप जास्त शुल्क लागत होते, पण आता भारत त्या देशांमध्ये आला आहे ज्यांच्यावर कमी शुल्क आहे.राजदूत गोर यांच्या मते, ट्रम्प आणि मोदी यांची मैत्री हा करार पूर्ण होण्यामागील सर्वात मोठे कारण ठरली. गोर म्हणाले की, अमेरिका आणि भारताच्या संबंधांमध्ये खूप मोठ्या शक्यता आहेत. या व्यापार करारानंतर दोन्ही देशांच्या संबंधांचा पुढील टप्पा सुरू होईल.दरम्यान, व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने न्यूयॉर्क टाइम्सला सांगितले आहे की, अमेरिका भारताकडून येणाऱ्या वस्तूंवर लावलेला तो अतिरिक्त शुल्क काढून टाकेल, जो रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल शिक्षा म्हणून लावला गेला होता. ब्रिक्स देशांवर आणि इतरांवर किती शुल्क? रशिया- 50%ब्राझील- 50%चीन- 34%दक्षिण आफ्रिका- 30%दक्षिण कोरिया- 25%थायलंड- 23%मलेशिया- 22%फिलिपिन्स- 21%बांगलादेश- 20%व्हिएतनाम- 20%पाकिस्तान- 19%इंडोनेशिया- 19%भारत- 18%युरोपीय संघ- 15%जपान- 15%President Trump just spoke with Prime Minister Modi. STAY TUNED… pic.twitter.com/IFcxrJj04m— Ambassador Sergio Gor (@USAmbIndia) February 2, 2026 ट्रम्प यांनी इंडिया गेट आणि मोदींसोबत फोटो शेअर केलेमोदींशी फोनवर बोलण्यापूर्वी ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडियावर भारताशी संबंधित दोन फोटो पोस्ट केले होते. एका फोटोमध्ये त्यांनी इंडिया गेटचा फोटो शेअर केला होता, तर दुसऱ्या फोटोमध्ये एका भारतीय मासिकाचे मुखपृष्ठ शेअर केले होते, ज्यावर पंतप्रधान मोदींसोबत त्यांचा फोटो छापला होता.इंडिया गेटचा फोटो शेअर करताना ट्रम्प यांनी लिहिले- भारताचा ट्रायम्फल आर्च (इंडिया गेट) खूप सुंदर आहे. आमचा वाला या सर्वांमध्ये सर्वात शानदार असेल!खरं तर, ट्रम्प राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये स्वतःच्या नावाने एक भव्य दरवाजा बांधण्याची योजना आखत आहेत. या स्मारकाला ‘आर्क डी ट्रम्प’ असे नाव देण्यात आले आहे. याचा वापर व्हर्जिनिया राज्यातून राजधानीत प्रवेश करण्यासाठी केला जाईल.याची रचना पॅरिसमधील आर्क डी ट्रायम्फसारखी आहे. व्हाईट हाऊसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने काही महिन्यांपूर्वी सीएनएनला सांगितले होते की, या आर्कची कल्पना स्वतः ट्रम्प यांची होती. ट्रम्प या आर्कच्या डिझाइन तयार करण्याच्या प्रक्रियेतही सहभागी होते. ट्रम्प-मोदी 13 महिन्यांत 7 वेळा फोनवर बोललेपंतप्रधान मोदी यांनी ट्रम्प यांच्याशी आजच्या आधी डिसेंबरमध्ये फोनवर संवाद साधला होता. तेव्हा पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर पोस्ट करून याची माहिती दिली होती. मोदी म्हणाले होते की, त्यांची चर्चा सौहार्दपूर्ण आणि सकारात्मक होती.त्यांनी सांगितले होते की, दोन्ही नेत्यांनी दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला. यासोबतच प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरही चर्चा केली. मोदी म्हणाले की, भारत आणि अमेरिका जागतिक शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी एकत्र काम करत राहतील.संवादात दोन्ही देशांमधील व्यापार वाढवण्याच्या गरजेवर भर देण्यात आला. त्याचबरोबर महत्त्वाचे तंत्रज्ञान, ऊर्जा, संरक्षण आणि सुरक्षा यांसारख्या क्षेत्रांमध्ये भागीदारी पुढे नेण्यावरही सहमती झाली.ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून त्यांची आणि पंतप्रधान मोदींची आतापर्यंत 7 वेळा फोनवर चर्चा झाली आहे. सर्वात आधी 27 जानेवारी 2025 रोजी पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्ष झाल्याबद्दल अभिनंदन करण्यासाठी फोन केला होता.22 एप्रिल रोजी ट्रम्प यांनी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मोदींना फोन करून दुःख व्यक्त केले होते. त्यानंतर ट्रम्प यांनी 17 जून रोजी मोदींना निमंत्रण देण्यासाठी, 17 सप्टेंबर रोजी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि 21 ऑक्टोबर रोजी दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन केला होता. पुन्हा 11 डिसेंबर रोजी दोन्ही नेत्यांनी चर्चा केली होती. 1 फेब्रुवारी: ट्रम्प म्हणाले होते- भारत इराणऐवजी व्हेनेझुएलामधून तेल खरेदी करेल ट्रम्प यांनी 1 फेब्रुवारी रोजीच भारताबाबत विधान केले होते. ते म्हणाले होते की, भारत आता इराणकडून कच्चे तेल खरेदी करण्याऐवजी व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करेल. ट्रम्प यांनी दावा केला होता की, भारताने व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करण्याचा करार केला आहे.हे विधान ट्रम्प यांनी वॉशिंग्टन डीसीमधून एअर फोर्स वनमध्ये पत्रकारांशी बोलताना केले होते. मात्र, भारत सरकारकडून यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.ट्रम्प यांनी काल म्हटले होते, “आम्ही आधीच एक करार केला आहे. भारत व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करेल, इराणकडून नाही.”त्यांनी असेही म्हटले की, भारतासोबत या कराराची संकल्पना निश्चित झाली आहे. ट्रम्प यांच्या मते, चीनलाही हवे असल्यास व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करता येईल.

भोसरी व पिंपरी विभागातील वीज पुरवठ्यावर परिणाम

महावितरणकडून वीज ग्राहकांना सहकार्याचे आवाहन

पुणे, दि. २ फेब्रुवारी,२०२६ : महापारेषण कंपनीच्या २२० के.व्ही. भोसरी अतिउच्चदाब उपकेंद्रातील ८० एमव्हीए (MVA) क्षमतेच्या अतिउच्चदाब रोहित्रामध्ये सोमवारी (दि.२) दुपारी तीन वाजेच्या सुमारास अंतर्गत बिघाड झाला आहे. महापारेषण व महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी त्याच्या दुरुस्तीसाठी अथक परिश्रम घेतले मात्र ते दुरुस्त होऊ शकले नाही. परिणामी या अतिउच्चदाब रोहित्रावर अवलंबून असलेला ८० एमव्हीएचा वीजभार बाधित झाला असून भोसरी व पिंपरी विभागातील वीज ग्राहकांवर त्याचा परिणाम होणार आहे.

खालील परिसरातील वीजपुरवठा बाधित राहणार 

• भोसरी गावठाण

• टी ब्लॉक

• जनरल ब्लॉक

• एस ब्लॉक

• शांतीनगर

• धावडे वस्ती

• गुळवे वस्ती

• आळंदी रोड परिसर

• चक्रपाणी वसाहत

पर्यायी व्यवस्थेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न

महावितरणच्या भोसरी व पिंपरी  विभागामार्फत पर्यायी व्यवस्थेच्या माध्यमातून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर दुसऱ्या वीज वाहिनीवर भार टाकावा लागणार असल्यामुळे वीजपुरवठा सुरळीत करताना त्यात अडचणी येऊ शकतात. त्यावर मात करण्यासाठी महावितरणतर्फे त्वरीत उपाययोजना करण्यात येणारच आहेत. 

वीज ग्राहकांना सहकार्याचे आवाहन

अचानक उद्भवलेल्या या वीज संकटावर मात करण्यासाठी महावितरणचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. अशावेळी वीज ग्राहकांनीही महावितरणला सहकार्य करावे, विजेचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन महावितरण प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

अजित पवारांचा मृत्यू संशयास्पद, उच्चस्तरीय चौकशी करा!:भाजपच्या घोटाळ्याच्या फाइलचा उल्लेख करत संजय राऊतांची राज्यसभेत मागणी

… आणि 10 दिवसांनी अजित पवारांचा मृत्यू झाला

नवी दिल्ली-संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चा सत्रात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताचा मुद्दा उपस्थित करत या विमान अपघाताची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच केंद्र सरकारवर जोरदार आरोप केले.

आज मला अजित पवारांची आठवण येत आहे. त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आम्ही सगळे अजूनही धक्क्यात आहोत, आम्हाला अजूनही कळत नाहीये की हे झाले कसे? अजित पवारांवर 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप सरकारने केला होता. पण ते भारतीय जनता पक्षासोबत आले आणि पवित्र झाले, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

पुढे संजय राऊत म्हणाले, 15 जानेवारी रोजी अजित पवारांनी एक वक्तव्य केले होते आणि भाजपला उद्देशून म्हटले होते की ‘माझ्यावर सिंचन घोटाळ्याचा आरोप करत असाल तर त्यातला पैसा फक्त आम्हीच नाही खाल्ला, भाजपने सुद्धा या घोटाळ्यात पैसा खाल्ला आहे आणि त्यांची फाइल सुद्धा माझ्याकडे आहे’. हे त्यांनी 15 जानेवारी रोजी म्हटले होते आणि 10 दिवसांनी अजित पवारांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाला. मी आरोप करत नाहीये, पण हा मृत्यू संशयास्पद आहे.

मला जस्टीस लोया यांची सुद्धा आठवण आली

संजय राऊत म्हणाले, अजित पवार हे नेहमी ती फाइल सोबत ठेवत होते. ते जेव्हा मुंबईहून निघाले होते, तेव्हा सुद्धा ती फाइल त्यांच्या सोबत होती. त्यानंतर अर्ध्या तासात त्यांचा मृत्यू होतो. याची चौकशी झाली पाहिजे. आता तर मला जस्टीस लोया यांची सुद्धा आठवण आली आहे. अजित पवारांचा मृत्यू पाहिल्यानंतर जस्टीस लोया यांची आठवण आली, असे म्हणत संजय राऊत यांनी सरकारला आरोप केले.

सोनम वांगचूक कुठे आहे?

संजय राऊत यांनी संसदेत बोलताना सरकारवर देखील जोरदार आरोप केले. हे सरकार बेजबाबदार आहे. लोकशाही या देशात आता राहिलेली नाही. न्यायालय असो किंवा निवडणूक आयोग या सरकारी कंपन्या बनल्या आहेत. सोनम वांगचूक कुठे आहे? त्यांचा अपराध काय आहे? त्यांनी सांगितले होते की आमची जमीन चीनने घेतली, तर त्यांना राष्ट्रद्रोही ठरवत तुरुंगात टाकले. कुठे आहे लोकशाही? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.

पुढे बोलताना संजय राऊत यांनी ‘मनरेगा’च्या मुद्द्यावरून टीका केली. मनरेगाचे नाव तर बदलले, पण रोजगार कुठून आणणार? शेतकऱ्यांना रोजगार मिळायचा, तो तुम्ही बंद केला. मराठवाड्यात 2025 साली 3 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. हे सरकार भ्रष्टाचाराने व्यापली आहे. देशभरातील भ्रष्टाचारी एकत्र आणतात आणि सरकार बनवतात, तोडतात. आधी नेत्यांना घडवले जायचे, आज नेत्यांना विकत घेतले जात असल्याचा आरोप राऊत यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ राजीनामा द्यावा:EpsteinFiles प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसचे निषेध आंदोलन

एपस्टीन फाईल्समधील खुलासे भारताच्या परराष्ट्र धोरण, राष्ट्रीय हित आणि सत्तेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित करतात : झीनत शबरीन

मुंबई, दि. २ फेब्रुवारी

EpsteinFiles मधील खुलासे आणि पंतप्रधानांचे नाव या प्रकरणाशी जोडले जाणे हे भारतासाठी अत्यंत गंभीर व चिंताजनक आहे. या प्रकरणामुळे भारत सरकारची आंतरराष्ट्रीय प्रतिमा मलिन होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांनी केली आहे.
EpsteinFiles प्रकरणात पंतप्रधानांच्या बाबीत झालेल्या खुलाशामुळे जगात देशाची प्रतिमा मलिन झाली आहे याच्या निषेधार्थ मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी मुंबई युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष हुसेन शेख, पंकज चौधरी, सरचिटणीस अब्दुल समद, अजय मिश्रा, अमनदीप सैनी, तेजस चांदुरकर, दक्षिण मुंबई युवक जिल्हाध्यक्ष शेखर जगताप, दक्षिण मध्य मुंबई युवक जिल्हाध्यक्ष फरहान मन्सुरी यांच्यासह युवक काँग्रेसचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनादरम्यान मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी बोलताना झीनत शबरीन म्हणाल्या की, एपस्टीन प्रकरणाचा वापर भारताच्या धोरणांवर दबाव आणण्यासाठी करण्यात आला होता का? पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या वैयक्तिक प्रतिमा आणि राजकीय अस्तित्वासाठी देशाच्या दीर्घकालीन धोरणात्मक हितांशी तडजोड करत आहेत का, हा प्रश्न आज देशासमोर उभा आहे. हा केवळ आरोप नसून, जर निर्णय स्वतंत्र, संस्थात्मक आणि राष्ट्रीय हिताचे असतील तर सरकारने तात्काळ स्पष्ट करावे की परराष्ट्र धोरण, ऊर्जा आणि सुरक्षेशी संबंधित निर्णय कोणत्या आधारावर, कोणत्या प्रक्रियेद्वारे आणि कोणाच्या फायद्यासाठी घेण्यात आले.

EpsteinFiles मधून उघड झालेल्या तथ्यांमुळे भारत सरकारची कार्यपद्धती, परराष्ट्र धोरण आणि निर्णयप्रक्रिया यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांना एका कुख्यात आंतरराष्ट्रीय गुन्हेगाराची मदत मिळाल्याचे उल्लेख, तसेच अमेरिकन सत्तास्थानांपर्यंत पोहोचण्यासाठी खाजगी उद्योगपतींची भूमिका, हे राष्ट्रीय प्रतिष्ठा आणि संस्थात्मक राजनैतिक व्यवस्थेवर थेट आघात करणारे आहेत.

या खुलाशांच्या पार्श्वभूमीवर सरकारचे अलीकडील धोरणात्मक निर्णय अधिक संशयास्पद वाटत असल्याचे शबरीन यांनी नमूद केले. रणनीतीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या चाबहार बंदर प्रकल्पाला कमकुवत करणे, रशियाकडून मिळणाऱ्या स्वस्त ऊर्जा पर्यायांपासून माघार घेणे आणि भारताच्या ऊर्जा धोरणाचे अमेरिकन हितसंबंधांनुसार समायोजन करणे, हे सर्व निर्णय राष्ट्रीय हितांपेक्षा बाह्य दबावाकडे निर्देश करणारे आहेत.

अशा परिस्थितीत या सर्व बाबींवर संपूर्ण आणि पारदर्शक खुलासा होणे अत्यावश्यक आहे, असेही झीनत शबरीन यांनी स्पष्ट केले.