Home Blog Page 116

नवीन पिढीने योग्य रीतीने धर्माची उपासना करावी-खासदार प्रा. मेधा कुलकर्णी

पौरोहित्य पुरोहित फाउंडेशन च्या वतीने सनातन वेद रक्षक आणि हिंदू स्वाभिमान रक्षक पुरस्कार प्रदान

पुणे : आपण आपसात भांडत बसलो तर त्याचा फायदा बाहेरचेच घेतील. म्हणून बंधुत्वाची भावना टिकवणे गरजेचे आहे. सण, उत्सव, जयंती आणि पुण्यतिथी आपण ज्या पद्धतीने साजरे करतो त्यावरून आपली संस्कृती टिकेल की नाही हे ठरते. आज नवरात्र उत्सवात द्विअर्थी गाणी लावली जातात, हे संतापजनक आहे. पुढील पिढी योग्य पद्धतीने धर्माची उपासना करणारी आणि संस्कारित व्हावी, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे मत खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

पौरोहित्य पुरोहित फाउंडेशन च्या वतीने सनातन वेद रक्षक व हिंदू स्वाभिमान रक्षक पुरस्कार वितरण सोहळा आणि धर्मचैतन्य मासिक प्रकाशन समारंभाचे आयोजन केसरी वाड्यातील लोकमान्य सभागृहात करण्यात आले होते. यावेळी सनातन वेद रक्षक पुरस्कार काळाराम मंदिर नाशिकचे गुरुवर्य महंत सुधीरदास महाराज यांना तर हिंदू स्वाभिमान रक्षक पुरस्कार आमदार महेश लांडगे यांना प्रदान करण्यात आला. कार्तिक लांडगे यांनी महेश लांडगे यांच्या वतीने पुरस्कार स्वीकारला. 

यावेळी अवधूत शास्त्री उंडे, अशोक कुलकर्णी, भालचंद्र कुलकर्णी, शिवाजी जांभळे, दत्तात्रय कामठे, कुंदन निकम, विश्वजीत देशपांडे, कुणाल टिळक, शाम कुलकर्णी,  मयुरेश अरगडे, मंदार रेडे, मनोज तारे, चैतन्य जोशी, दिवेकर गुरुजी, हेमंत कापरे उपस्थित होते. तसेच कार्यक्रम प्रसंगी महेश जोशी, राहुल भाले, अनिल पुराणिक, नंदकुमार अलाटे, चैतन्य कुलकर्णी, दिपाली कुलकर्णी, अश्विनी जोशी, नंदिनी पुरंदरे, मृण्मयी कुलकर्णी, तृप्ती लाळे, माधवी लाळे, सचिन कुलकर्णी हे देखील उपस्थित होते.  

प्रा.डॉ.मेधा कुलकर्णी म्हणाल्या, सनातन धर्मात मूळतः जातीव्यवस्था नव्हती. इंग्रजांच्या कारकिर्दीत त्याची विकृती झाली. जन्माने नव्हे तर विद्या आणि संस्कारांनीच कोणीही ब्राह्मण ठरतो. म्हणूनच आपल्याला बुद्धी सापेक्ष विचार करून धर्माशी प्रामाणिक राहायला हवं. आपला हिंदू धर्म नित्य नूतन सर्वांना सामावून घेणारा आहे. जगातील सगळ्यात प्राचीन धर्म हिंदू धर्मच आहे.

धर्म आहे तिथेच चैतन्य असते. बाकी कुठल्याही गोष्टीत इतके चैतन्य दिसत नाही. वक्फ बोर्डाच्या निमित्ताने किती भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे हे लक्षात आले आणि प्रश्न पडतो हिंदू इतके दिवस झोपले होते का? असा प्रश्न पडला.

महंत सुधीरदास महाराज म्हणाले, प्रत्येक शाखेला उपनिषद, ब्राह्मण, संहिता, श्रौतसूत्र, सामान्य सूत्र हे  नेमून दिलेले आहेत. त्या त्या शाखेच्या ब्राह्मणांनी गुरु शिष्य परंपरेतून ते शिकवले पाहिजेत म्हणजे ते सुरक्षित होतात.

पौरोहित्य पुरोहित फाऊंडेशन चे अध्यक्ष आणि धर्मचैतन्य मासिकाचे संपादक शामराव कुलकर्णी म्हणाले, मंदिरातील पुरोहितांना मानधन देण्यात यावे त्यामुळे पुरोहितांना बळ मिळेल. शहरातील पुरोहितांची परिस्थिती  ठीक असली तरी गावांमधील पुरोहितांची परिस्थिती अत्यंत अवघड आहे, त्यांना तिथे काम मिळत नाही. अशा परिस्थितीत त्यांना मानधन देणे किंवा पेन्शन सुरू करणे अत्यावश्यक आहे, अशी मागणी त्यांनी केली. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

कुख्यात गुंड नीलेश घायवळ लंडनला पळाल्याच्या वृत्ताने पोलीस दलात खळबळ,परदेशात जायला पासपोर्ट,व्हिसा मिळालाच कसा? चौकशी सुरु

हत्या, गोळीबारसह अनेक गंभीर गुन्हे दाखल
पुणे- शैक्षणिक, सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेले पेन्शनरांचे पुणे आता गुन्हेगारीचा अड्डा बनला असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपासून पुणे पोलिसांनी छोट्या-मोठ्या गुंडांची धिंड काढत अटक करण्याचे सत्र सुरू केले असतानाच कुख्यात गुंड नीलेश घायवळ मात्र परदेशात पळून गेल्याचे वृत्त पसरले आणि पोलीस दलात एकच खळबळ माजली काही दिवसांपूर्वी कोथरूड येथे गोळीबार झाला होता, या प्रकरणी नीलेश घायवळवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. मात्र, त्यापूर्वीच नीलेश घायवळ परदेशात पळून गेला असल्याचे वृत्त पसरले.

कोथरूड गोळीबार प्रकरणानंतर पुन्हा एकदा घायवळ टोळी सक्रिय झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. तसेच या टोळीचा म्होरक्या कुख्यात गुंड नीलेश घायवळ याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. परंतु, नीलेश घायवळ लंडनला पळून गेल्याची माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली असे सांगितले जाते आहे. पण या घटनेमुळे नीलेश घायवळला पासपोर्ट मिळाला तरी कसा? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर घायवळने पासपोर्ट जमाच केला नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

कोथरूड गोळीबार प्रकरणी नीलेश घायवळ याच्यासह इतर 10 जणांवर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी विरोधी कायद्यानुसार कारवाई केली आहे. कोथरूड पोलिस ठाण्यापासून अवघ्या 100 ते 200 मीटर अंतरावर एका तरुणावर गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणी आरोपी मयूर गुलाब कुंबरे, राऊत, चदिलकर, फाटक, व्यास यांना अटक करण्यात आली असून इतर आरोप फरार आहेत. त्यांचा तपास सुरू असून नीलेश घायवळ सुद्धा आता परदेशात पळून गेला असल्याचे वृत्त पसरले आहे.

नीलेश घायवळ याने आपले पासपोर्ट जमा केले नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. नीलेश घायवळ हा उच्चशिक्षित गुंड असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. हत्या, खंडणी, अपहरण, मारामारी यासारखे गंभीर गुन्ह्यांची नोंद घायवळवर आहे. आता नीलेश घायवळवर लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली असून भारतात परत येताच त्याला अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तसेच नीलेशने गुन्हेगारी क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर पैसा कमावला असून त्याचे लंडनमध्ये सुद्धा घर आहे. त्याचा मुलगा सुद्धा हायफाय शाळेत शिक्षण घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

कोथरुड येथे एका क्षुल्लक वादातून गोळीबाराची घटना घडली होती. मुठेश्वर मित्र मंडळासमोर 17 सप्टेंबर रोजी रात्री 11.40 वाजता रस्त्यावर गप्पा मारत थांबलेल्या लोकांनी दुचाकीला जाण्यासाठी जागा दिली नाही, या कारणावरून झालेल्या वादावादीतून प्रकाश मधुकर धुमाळ (36, रा. थेरगाव) नावाच्या तरुणावर गोळी झाडण्यात आली, ज्यात तो जखमी झाला. यानंतर, याच आरोपींनी एका जुन्या वादातून आणखी एका व्यक्तीच्या मानेवर कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी केले. या दोन्ही गंभीर घटनांप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी नीलेश घायवळसह इतर 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंसोबत नीलेश घायवळकोथरूड गोळीबार प्रकरणानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी टीका करत एक ट्विट केले होते. त्यांनी म्हटले होते की, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे ज्या गुंडाला राजरोसपणे विधानभवनात घेऊन फिरतात त्याच्या टोळीने गाडीला साईड न दिल्याच्या रागातून पुण्यात (कोथरुड) भर रस्त्यात गोळीबार करून एका वाहनचालकाला जखमी केले. आता गृहमंत्री आणि मुख्यमंत्री या गुंडाच्या टोळीवर काय कारवाई करतात की हा गुंड विधानपरिषदेच्या सभापती महोदयांचा खास माणूस आहे म्हणून त्याला हमखास पाठीशी घालतात, हेच पहायचे आहे! या कारवाईनंतर हे सरकार सामान्य माणसाचे आहे की गुंडांचे हे कळणार आहे, असे त्यांनी म्हटले होते.

भारतीय संस्कृतीत स्त्रीला प्रथम स्थान- मंत्री चंद्रकांतदादा पाटील

ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून कोथरुड मधील ३००० पेक्षा जास्त कन्यांचे पूजन

पुणे-भारतीय संस्कृतीत स्त्रीला प्रथम स्थान दिलं असून, तिची पूजा केली पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. तसेच, मुलींना वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे, असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.प्रतिवर्षी प्रमाणे नवरात्रौत्सवानिमित्त ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून कन्यापूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात ३००० पेक्षा जास्त कन्यांचे पूजन करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाच्या संयोजिका आणि पुणे शहर चिटणीस प्रा. डॉ. अनुराधा येडके, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य डॉ. संदीप बुटाला, भाजप कोथरुड मध्य मंडल महिला मोर्चा अध्यक्षा हर्षाली माथवड, माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, वासंती जाधव, वृषाली चौधरी, छाया मारणे, ॲड. मिताली सावळेकर, राज तांबोळी, गिरीश खत्री, अजित जगताप, दीपक पवार, अनिता तलाठी, प्राची बगाटे, पूनम कारखानिस, अपर्णा लोणारे, सुजाता जगताप यांच्यासह भाजपचे इतर पदाधिकारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

ना. पाटील म्हणाले की, भारतीय संस्कृतीत स्त्रीला प्रथम स्थान दिलं गेलं असून तिची पूजा केली जाते. आपण आजही बुद्धीची देवता सरस्वती, महालक्ष्मी, शक्तीस्वरुपा जगदंबेची नेहमीच पूजा करतो. ही सर्व स्त्रिचीच रुपे आहेत. पण पुरुषी मानसिकतेमुळे स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जाते. कारण, स्वातंत्र्यपूर्व काळात परकीय आक्रमकांपासून स्त्रियांचे रक्षण करण्यासाठी तिला घरातच बंदिस्त केले. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर तिला आपण पुन्हा बाहेर आणले नाही. चूल आणि मूल यामध्येच ती अडकली होती.

मात्र २०१४ पासून हे चित्र बदलते आहे. आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. तिला उच्च शिक्षणामध्ये प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने आर्थिक दुर्बल कुटुंबातील मुलींना फी माफीचा निर्णय घेतल्याने मुलींचे उच्च शिक्षणातील प्रमाण वाढते आहे. विविध विद्यापीठांमध्ये पीएचडी धारकांमध्ये मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे स्त्रियांना वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

ते पुढे म्हणाले की, कोथरुड मतदारसंघात मानसी उपक्रमाच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल कुटुंबातील मुलींच्या व्यक्तिमत्व विकासावर भरल दिला आहे. सुखदा उपक्रमाच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल कुटुंबातील गरोदर महिलांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. उद्योग सुरु करण्यासाठी महिला बचत गटांना मदत केली जात आहे, असे एकना अनेक उपक्रमाच्या माध्यमातून कोथरुड मधील महिलांना मदत केली जात आहे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

0
  • महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी मागितली केंद्राकडून मदत, निवेदन सादर
  • गडचिरोली पोलाद सिटी, 3 संरक्षण कॉरिडॉर्स, दहीसर जागेचे हस्तांतरण यावरही सकारात्मक चर्चा

नवी दिल्ली, 26 सप्टेंबर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नवी दिल्ली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली आणि त्यांना महाराष्ट्रातील पाऊस, पूरस्थिती आणि त्यातून शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानीची माहिती दिली. केंद्र सरकारकडून भरीव मदतीसाठी एक निवेदनही त्यांना सादर केले. महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या पाठिशी आम्ही खंबीरपणे उभे राहू, असे आश्वासन पंतप्रधानांनी यावेळी दिले. याशिवाय, महाराष्ट्रातील संरक्षण कॉरिडॉर, गडचिरोलीतील पोलाद उत्पादनासाठी सवलती, दहीसर येथील भारतीय विमानतळ प्राधीकरणाच्या जागेचे हस्तांतरण तसेच ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकार करीत असलेले उपाय इत्यादींबाबत अतिशय सविस्तर चर्चा मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी केली.

गडचिरोली पोलाद सिटी
गडचिरोली येथे पोलाद सिटीत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत असून, हा एक आकांक्षित जिल्हा आहे. महाराष्ट्र राज्य मायनिंग कॉर्पोरेशनला एरिया लिमिटमध्ये सवलत मिळावी, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. गडचिरोलीत पोलाद उत्पादनाची प्रचंड क्षमता असून, हे स्टील ग्रीन स्टील असणार आहे. चीनपेक्षाही कमी किंमतीत हे स्टील उपलब्ध होणार आहे. गडचिरोलीत सुमारे 1 लाख कोटींहून अधिकची गुंतवणूक यापूर्वीच आलेली आहे. हा जिल्हा नक्षलमुक्त करुन विकासाच्या अमाप संधी यातून निर्माण होणार आहेत.

3 संरक्षण कॉरिडॉर
संरक्षण आणि अंतरिक्ष क्षेत्रात महाराष्ट्र हा एक भक्कम भागिदार म्हणून काम करतो आहे. महाराष्ट्रात 10 ऑर्डिनन्स फॅक्टरी आहेत. भारताला लागणार्‍या एकूण शस्त्र आणि दारुगोळ्यापैकी 30 टक्के उत्पादन हे महाराष्ट्रात होते. त्यामुळे महाराष्ट्र हे संरक्षण कॉरिडॉरसाठी प्रभावी क्षेत्र आहे. त्यामुळे महाराष्ट्रात तीन संरक्षण कॉरिडॉरसंदर्भात एक तपशीलवार सादरीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले. यातील पहिला कॉरिडॉर पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, दुसरा कॉरिडॉर अमरावती, वर्धा, नागपूर, सावनेर आणि तिसरा कॉरिडॉर नाशिक-धुळे असा असेल. या तिन्ही कॉरिडॉरच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक राज्यात येणार असून, त्यामुळे मोठा रोजगार सुद्धा निर्माण होईल. राज्य सरकारने यासंदर्भात 60,000 कोटींचे सामंजस्य करार यापूर्वीच केले आहेत. त्यामुळे या कॉरिडॉरला मान्यता देण्यात यावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली.

दहीसर येथील जागेचे हस्तांतरण
दहीसर पूर्व येथील 58 एकर जागेची मालकी ही भारतीय विमानतळ प्राधीकरणाकडे आहे. या जागेचे मेट्रो कारशेडसाठी एमएमआरडीएला हस्तांतरण करण्याचा आधी निर्णय झाला होता. पण, डिझाईनमध्ये झालेल्या बदलांमुळे एमएमआरडीएने माघार घेतली. या जागेची मागणी आता मुंबई महापालिकेने केली आहे. या भागात एचएफ रिसिव्हींग स्टेशन असल्याने या भागाचा संपूर्ण विकास खोळंबला आहे. हे हस्तांतरण झाल्यास या जागेचा सार्वजनिक उपयोगासाठी आणि विकासासाठी करता येईल. यामुळे उंचीचे प्रश्न सुद्धा सुटतील. त्यामुळे ही जागा मुंबई महापालिकेला देण्यात यावी, अशी मागणी या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या 8 आणि 9 ऑक्टोबर रोजी फिनटेक परिषदेसाठी मुंबईत येणार असून, नवी मुंबई विमानतळ आणि मेट्रो-3 या प्रकल्पांचा शुभारंभ ते करतील. नवी मुंबईला दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात येईल, तसा प्रस्ताव आम्ही पाठविला आहे, अशीही माहितीही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

शिवदर्शन–सहकारनगर येथील श्री लक्ष्मीमाता मंदिरातभाविकांची अलोट गर्दी

पुणे – शिवदर्शन–सहकारनगर परिसरातील श्री लक्ष्मीमाता मंदिर नवरात्रौनिमित्त सजले असून, लक्षावधी दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघणारा ‘मीनाक्षीपुरम मंदिर’ देखावा विशेष आकर्षण बनला आहे. हजारो भक्तांची येथे गर्दी उसळत असून, श्री लक्ष्मीमाता मनोकामना पूर्ण करते अशी भाविकांची श्रद्धा आहे. संपूर्ण मंदिराला नव्या रंगाने झळाळी आली आहे. मंदिराभोवती आकर्षक भव्य कमानी उभारण्यात आल्या असून, प्रशस्त मंडपही उभारण्यात आला आहे. मंदिरावर एलईडी लाइट्ससह आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली असून, साकारण्यात आलेला ‘मीनाक्षीपुरम मंदिर’ देखावा १००हून अधिक कारागिरांनी सुमारे १ महिना कष्टपूर्वक तयार केला आहे. विविध नैसर्गिक सुवासिक लाखो फुलांची आरास मंदिरावर दररोज केली जाते आहे . मंदिराचे प्रांगण आकर्षक रांगोळीने रोज सजविले जाते आहे .

मंदिरातील श्री लक्ष्मीमातेची संगमरवरी मूर्ती अधिक तेजोमय दिसत आहे. येथे पूजा व आरती रोज होत असून, धूप व उदबत्त्यांच्या मधुर वासामुळे साऱ्या मंदिर परिसरात मांगल्याचे वातावरण निर्माण झाले आहे. घटस्थापनेच्या दिवशी येथे घटस्थापना पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल व पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा सौ. जयश्री बागुल यांच्या हस्ते विधिवत संपन्न झाली. तसेच मीनाक्षीपुरम मंदिराच्या प्रतिकृतीचेही उद्घाटन करण्यात आले. श्री लक्ष्मीमातेला सोन्याचा मुकुट, विविध सोन्याचे दागिने व सोन्याची आभूषणे यांसह चांदीची साडी यांनी सजविण्यात आले आहे.

येथे रोज सकाळी व संध्याकाळी श्री लक्ष्मीमातेची आरती, तसेच प्रसादवाटप होत असून, नवरात्रौच्या कालावधीत रोज अनेक महिला मंडळांची भजने संपन्न होत आहेत. अष्टमीला होमही करण्यात येणार आहे. हे मंदिर भाविकांसाठी रोज सकाळी ६.०० ते रात्री १०.००पर्यंत खुले असणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने येथे कॅमेरे बसविण्यात आले असून, पोलीस बंदोबस्तही चोख आहे. याच मंदिराच्या प्रांगणात पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाचे कार्यक्रम व स्पर्धा होत आहेत, अशी माहिती पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल यांनी दिली.

टिपु सत्तार पठाणचे अनाधिकृत कार्यालयाचे बांधकाम पोलिसांनी केले भुईसपाट

पुणे-येथील काळेपडळ पोलीसांनी वरीष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिकेच्या मदतीने कुख्यात गुंड रिझवान ऊर्फ टिपु सत्तार पठाण याच्या अनाधिकृत ऑफीसचे बांधकाम जेसीबी लावून भुईसपाट केले आहे
कुख्यात गुंड रिझवान ऊर्फ टिपू सत्तार पठाण, रा. सय्यदनगर, हडपसर, पुणे याचेवर काळेपडळ पोलीस स्टेशन येथे गु. र. नं. १००/२०२५ भा.न्या.स. कलम ३०८ (२), ३२९(३), ३५१(२), ३५२, १८९(१), १८९(२), १९१(२) महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) कलम ३(१) (II), ३(२), ३(४), २३ (१) अन्वये दाखल असून त्यास गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
कुख्यात गुंड टिपु पठाण याचे वर्चस्व असलेल्या हडपसर येथील सय्यदनगर भागात बेकायदेशीर बांधकाम केलेले ऑफीस, टपरी व इतर अनाधिकृत अतिक्रमण बाबत काळेपडळ पोलीसांनी माहिती प्राप्त करुन सय्यदनगर येथील ख्वाजा मंजील इमारतीवर त्याने अनाधिकृतपणे बांधकाम केलेले ऑफीस, टपरी व इतर अनाधिकृत बांधकामावर आज दिनांक २६/०९/२०२५ रोजी काळेपडळ पोलीस स्टेशन व अतिक्रमण विभाग, पुणे महानगरपालिका यांनी संयुक्त कारवाई करुन बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करुन जमीनदोस्त केले.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-५, पुणे शहर, सहा पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, पुणे शहर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन, पोलीस निरीक्षक (गुन्हे), काळेपडळ पोलीस स्टेशन व काळेपडळ पोलीस स्टेशनकडील अधिकारी व अंमलदार व अतिक्रमण विभाग, पुणे महानगरपालिका यांच्या मदतीने करण्यात आली आहे.


भाजपाच्या गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांवर त्वरीत कारवाई झालीच पाहिजे-अरविंद शिंदे

पुणे-गेल्या दोन दिवसांपूर्वी कल्याण येथे दुर्दैवी घटना घडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात पोस्ट व्‍हायलर केली म्हणून काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते (ज्येष्ठ नागरिक) प्रकाश उर्फ मामा पगारे यांच्यावर भारतीय जनता पक्षाशी संबधित असलेल्या ८ ते १० गुंड प्रवृतीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला व त्यांना भर रस्त्यात साडी नेसवून त्यांचा अपमान केला. पगारे हे मागासवर्गीय समाजाचे आहेत, त्यांना एकटे गाठून या भाजपाच्या गुंडानी त्यांच्यावर हल्ला केला ही गंभीर स्वरूपाची घटना असून पोलीसांनी कोणतीही कारवाई केली नाही ही अत्यंत दुर्दैवी व लाजिरवाणी बाब आहे. या घटनेचा काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला.

कल्याण सारखी घटना पुणे शहरामध्ये घडू नये व या गुंडावर तातडीने कडक कारवाई व्‍हावी यासाठी आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पुणे शहराचे जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त यांना निवेदन सादर करण्यात आले.निवासी जिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भाजपाच्या गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांवर त्वरीत कारवाई न झाल्यास पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी या निवेदनाद्वारे दिला आहे.

      यावेळी पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या समवेत माजी आमदार दिप्ती चवधरी, माजी नगरसेवक अजित दरेकर, रफिक शेख, अनुसूचीत जाती विभागाचे अध्यक्ष सुजित यादव, प्राची दुधाणे, राज अंबिके, फिरोज शेख, मुन्ना खंडेलवाल, कुणाल चव्‍हाण आदी उपस्थित होते. 

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेस ३ ऑक्टोबरला राज्यभर आंदोलन करणार.

0

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलढाणा जिल्ह्यातील नुकसानाची केली पाहणी.

मुंबई/बुलढाणा, दि २६ सप्टेंबर २०२५
महाराष्ट्रातील शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात सापडलेला आहे. मे महिन्यापासून सातत्याने पडत असलेल्या पावसाने खरीप हंगाम पूर्ण वाया गेला आहे आणि सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीने शेतकऱ्यांना पूर्णपणे उद्ध्वस्थ केले आहे. शेतकरी संकटात असताना भाजपा युतीचे सरकार मात्र फक्त घोषणाबाजी करत आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन फोटो काढून परतले पण मदतीची घोषणा केली नाही. आता मुख्यमंत्री दिल्लीत गेले पण तिथे त्यांनी पूरग्रस्तांना मदत करण्याऐवजी सुरजागड लोखंड खाणीसंदर्भात चर्चा केली हे अत्यंत त संतापजनक असून त्यांनी शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून भरीव पॅकेज घेऊनच परत यावे, अन्यथा तेथेच थांबावे, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज बुलढाण्याच्या मोताळा तालुक्यातील कामखेड, गुळभेली, राहेरा दाभोळ तांडा नळकुंड, व बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट, पाडळी या गावांमध्ये अतिवृष्ठी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली, यावेळी बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे, आमदार धीरज लिंगाडे होते. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपा सरकारवर तोफ डागली, ते म्हणाले की, अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार रुपये तसेच जमीन खरवडून गेली त्यासाठी एकरी २ लाख रुपये द्यावेत, रब्बी हंगामासाठी बियाणे व खते मोफत द्यावेत यासह शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, या मागण्या काँग्रेस पक्षाने केल्या आहेत. पण सरकारने जी मदत जाहीर केली आहे, ती अत्यंत तुटपुंजी असून हेक्टरी ३ हजार रुपयेही पदरात पडणार नाहीत. काँग्रेस पक्षाने याआधी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केले आहे. आता पुन्हा ३ ऑक्टोबर रोजी राज्यभर तीव्र आंदोलन करणार असल्याचे सपकाळ यांनी सांगितले..

काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांना नेहमीच मदत दिली मग आताच्या सरकारलाच काय अडचण आहे? असा प्रश्न विचारून पैशाचे सोंग आणता येत नाही. या अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधानाचा समाचार घेत, अजित पवार यांना लाज वाटली पाहिजे, अदानीच्या फाईलवर सही करताना, ८८ हजार कोटी रुपयांच्या शक्तीपीठ महामार्गाला मंजुरी देताना त्यांना हे सुचत नाही का? असा सवाल सपकाळ यांनी केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोणालातरी वादग्रस्त वक्तव्य करायला लावून ज्वलंत प्रश्नावरून दुसरीकडे लक्ष वळवण्याचा प्रयत्न करत असतात. आता भिडेंचे किडे वळवळले असून हा सुद्धा शेतकऱ्यांच्या मुळ प्रश्नांपासून लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न असू शकतो. पण भिडे हिजडे कोणाला म्हणाले. दांडिया खेळणारे तर हिंदूच आहेत, त्यांनाच भिडेंनी हांडगे म्हटले आहे का? असा प्रतिप्रश्न सपकाळ यांनी केला आहे.

कल्याण मधील ७२ वर्षांच्या दलित काँग्रेस कार्यकर्त्याला भाजपाच्या गुंडांनी जातीवाचक शिवीगाळ करून अशोभनीय कृत्य केले आहे. हे गुंड भाजपा प्रदेशाध्यक्ष यांच्या गावातीलच आहेत यावरून भाजपाची संस्कृती काय आहे हे स्पष्ट होते. या गुंडांवर कठोर कारवाई केली पाहिजे ही काँग्रेसची मागणी आहे. काँग्रेस पक्ष पगारे या कार्यकर्त्याच्या पाठीशी असून त्यांचा लवकरच मोठा गौरवही केला जाणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी दिली आहे.

पुणे नवरात्रौ महोत्सवात महिला गायिकांची जयमाला शिलेदारांना जन्मशताब्दी निमित्त आदरांजली

पुणे-संगीत नाटकांना पुनर्जिवन करून नवसंजीवनी देण्याचे महत्त्वपूर्ण काम जयमाला शिलेदार यांनी केले. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त स्मरण करताना त्यांचे अमूल्य योगदान मराठी रसिक सदैव लक्षात ठेवतील, अशा भावना ३१व्या पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल आणि गायिका राधिका अत्रे, राजेश्वरी पवार, कविता सेंगर, चारुलता पाटणकर यांनी व्यक्त केले. पुणे नवरात्रौ महोत्सवातील ‘स्वर सम्राज्ञीयाँ’ या कार्यक्रमाच्या प्रारंभी जयमाला शिलेदार यांना जन्मशताब्दी वर्षानिमित्त गणेश कला क्रीडा रंगमंचा येथे झालेल्या कार्यक्रमात आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी संयोजक आबा बागुल व गायिका राधिका अत्रे, राजेश्वरी पवार, कविता सेंगर, चारुलता पाटणकर यांनी जयमाला शिलेदार यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली वाहिली.

यानंतर नामांकित गायिका राधिका अत्रे निर्मित महिला गायिकांचा ‘स्वर सम्राज्ञीयाँ’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राधिका अत्रे, राजेश्वरी पवार, कविता सेंगर, चारुलता पाटणकर या प्रसिद्ध गायिकांनी विविध सुरेल गाण्यांचे माध्यमातून रसिकांची मने जिंकली.  शिलेदार यांचे प्रसिद्ध “पारिजात फुलला अंगणी..” हे गाणे गात गायिका राजेश्वरी पवार यांनी कार्यक्रमाची सुरेख सुरुवात केली. सरस्वती स्तोत्र गायन नंतर “सांचा नाम तेरा” …”बचपन के दिन भूला न देना”.. काहे तरसाये”.. “हुजुरेवाला”.. गाण्याने कार्यक्रमाची रंगत वाढत गेली.”तुमको पिया दिल दिया”..या गाण्यास रसिकांनी वन्स मोअर म्हणत कलाकारांचा उत्साह वाढवला. १९५५ सालच्या “आपलम चपलम” गाण्याला गायकांनी गाताच रसिकांच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या आणि सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. गायिका राधिका यांनी एकाचवेळी पहाडी आणि नाजूक अशा दोन आवाजात गायलेले ” तेरे महेफिल मे”.. गाणे प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरल्याचे पहावयास मिळाले. निवेदिका प्राजक्ता मांडके यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माध्यमातून विविध गाण्यांचे महत्त्व स्पष्ट करत संपूर्ण कार्यक्रमात रंगत आणली.या कार्यक्रमात वादक अमन सैय्यद,ओमकार पाटणकर (सिंथेसायझर), विशाल थेलकर (गिटार), निशित जैन (बासरी), केविन (ड्रम्स),अजय अत्रे (रीदम मशीन, ऑक्टोपॅड),हर्षद गनबोटे (तबला, परकशन),रोहित जाधव (ढोलक),अमित सोमण, राकेश जाधव (साऊंड इंजिनिअर) यांनी सहाय्य केले.

याप्रसंगी जयश्री बागुल, निवृत्त अभियंता सतीश मानकामे, घनश्याम सावंत, रमेश भंडारी, नंदकुमार बानगुडे, नंदकुमार कोंढाळकर,अमित बागुल, सागर बागुल उपस्थित होते.

लेह हिंसाचार- सोनम वांगचुक यांना अटक:2 दिवसांपूर्वी निदर्शकांनी भाजप कार्यालय जाळले

0

सलग तिसऱ्या दिवशी कर्फ्यू, शाळा-महाविद्यालये बंद

लेह-दोन दिवसांपूर्वी लेहमध्ये झालेल्या हिंसाचारासाठी सरकारने त्यांना जबाबदार धरल्यानंतर लडाखी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना शुक्रवारी अटक करण्यात आली.तथापि, त्यांना कोणत्या प्रकरणात अटक करण्यात आली हे अद्याप कळलेले नाही. २४ सप्टेंबर रोजी झालेल्या हिंसाचारानंतर लेहमध्ये सलग तिसऱ्या दिवशी कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. शाळा आणि महाविद्यालये शनिवारपर्यंत बंद आहेत.

लेहमध्ये पूर्ण राज्याचा दर्जा आणि सहाव्या अनुसूचीमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी झालेल्या निदर्शनादरम्यान हिंसाचार उसळला. यात चार तरुणांचा मृत्यू झाला आणि ४० पोलिस अधिकाऱ्यांसह ८० जण जखमी झाले. आतापर्यंत ६० आरोपींना अटक करण्यात आली आहे.
लेह हिंसाचारानंतर आतापर्यंत कोणती कारवाई करण्यात आली आहे?

गृह मंत्रालयाने वांगचुक यांच्या संस्थेचा, स्टुडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मूव्हमेंट ऑफ लडाख (SECMOL) परकीय निधी परवाना रद्द केला आहे. परदेशी अनुदान किंवा देणग्या मिळविण्यासाठी स्वयंसेवी संस्थांना परकीय योगदान (नियमन) कायद्याअंतर्गत नोंदणी करणे आवश्यक आहे. संस्थेने निधीचा गैरवापर केल्याचे आढळून आले.
सीबीआयने वांगचुक यांच्या मालकीच्या आणखी एका एनजीओ, हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह्ज लडाख (एचआयएएल) विरुद्ध परदेशी निधी (एफसीआरए) चौकशी सुरू केली आहे. एचआयएएलवर परदेशी योगदान कायद्याचे (एफसीआरए) उल्लंघन केल्याचाही आरोप आहे. सीबीआय टीम एनजीओचे खाते आणि रेकॉर्ड तपासत आहे.
सीबीआय चौकशीवर वांगचुक म्हणाले…

सीबीआयला फक्त २०२२ ते २०२४ पर्यंतच्या खात्यांची तपासणी करायची होती, पण ते आता २०२० आणि २०२१ मधील नोंदी तपासत आहेत. तक्रारीव्यतिरिक्त शाळांकडूनही कागदपत्रे मागवली जात आहेत.
स्थानिक पोलिसांनी सुरुवातीला त्याच्यावर देशद्रोहाचा आरोप लावला. कामगारांना वेतन न दिल्याचा आरोप करणारी चार वर्षांपूर्वीची जुनी तक्रारही पुन्हा उघडण्यात आली आहे.
सरकारने HIAL ला दिलेल्या जमिनीचा भाडेपट्टा रद्द केला कारण भाडेपट्टा रक्कम जमा झाली नाही, तर त्यांच्याकडे असे कागदपत्रे आहेत की सरकारने स्वतः म्हटले होते की कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
मला आयकर विभागाकडूनही एक नोटीस मिळाली आहे आणि आता सीबीआय चौकशी सुरू आहे. लडाखमध्ये कोणताही कर नाही, तरीही मी स्वेच्छेने कर भरतो. असे असूनही, नोटीस पाठवल्या जात आहेत.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे कोल्हापूर महालक्ष्मी देवी दर्शन व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन

0

शेतकऱ्यांच्या संकट निवारणासाठी प्रार्थना व महिलांच्या सक्षमीकरणावर भर

कोल्हापूर, दि. २५ सप्टेंबर २०२५ :
विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज कोल्हापूर येथील करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या संकट निवारणासाठी प्रार्थना केली. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीमुळे त्यांना यातून सावरण्याचे बळ मिळो अशी मनोकामना त्यांनी देवीसमोर व्यक्त केली. यावेळी त्यांनी देवीला महावस्त्र व पुरणपोळ्यांचा नैवेद्य अर्पण केला.

शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविणे केवळ आर्थिक मदतीपुरतेच मर्यादित नसून त्यांच्या जीवनमानाशी निगडित विषय मार्गी लावणे त्यांच्या भावी पिढ्यांच्या सुरक्षितते सोबतच शाश्वत शेतीसाठी गरजेचे असल्याचे आणि यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.“शेती हा महाराष्ट्राचा कणा आहे. शेतकऱ्यांचे संकट कमी करणे म्हणजे समाजाच्या प्रगतीला गती देणे होय.” महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार मदतीसाठी संवेदनशील भूमिका घेत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दर्शनानंतर डॉ. गोऱ्हे यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. स्थानिक स्वराज्य संस्था व महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी लोकांशी प्रत्यक्ष संवाद साधावा, सामाजिक प्रश्नांवर तत्परतेने उभे राहावे, असे मार्गदर्शन त्यांनी केले. महिलांना मिळालेल्या ५० टक्के राजकीय आरक्षणाचा लाभ घेऊन नेतृत्वाच्या आघाडीवर यावे, असे आवाहन करताना त्यांनी पक्षाच्या संघटनात्मक बळकटीवर भर दिला.

बैठकीत डॉ. गोऱ्हे यांनी पदाधिकाऱ्यांचे काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांकडे लक्ष वेधले. लोकांच्या दैनंदिन समस्या सोडविणे, शेतकरी व कष्टकरी वर्गाला मदतीच्या योजनांची माहिती पोहोचविणे, तरुणांना रोजगार व कौशल्यविकासाशी जोडणे, पर्यावरण संवर्धन व पूर-आपत्ती व्यवस्थापनावर कार्य करणे तसेच सामाजिक सलोखा जपणे या बाबींवर त्यांनी विशेष भर दिला.

या बैठकीस कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर प्रमुख उपस्थित होते. त्यांच्यासह शिवसेना उपनेत्या जयश्री जाधव, सातारा-कोल्हापूर संपर्कप्रमुख शारदा जाधव, सांगली संपर्कप्रमुख सुनिता मोरे, कोल्हापूर जिल्हाप्रमुख शुभांगी पवार, इचलकरंजी जिल्हाप्रमुख वैशाली डोंगरे, शहरप्रमुख अमरजा पाटील, उत्तर कोल्हापूर शहरप्रमुख पवित्रा रांगणेकर, युवती शहरप्रमुख नम्रता भोसले, जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण व विजय बलगुडे उपस्थित होते.

कोंढव्यात अतिक्रमण कारवाईचा धडाका सुरूच

पुणे- दसरा दिवाळीच्या तोंडावर महापालिकेच्या अतिक्रमण कारवाईने कोंढवा येथे वेग घेतला आहे. कोंढवा बुद्रुक व येवले वाडी येथील फ्रंट मार्जिन, साईड मार्जिन मधील पत्राशेड वजा दुकाने, लहान टपऱ्या तसेच अनधिकृत दुकाने व हॉटेलसारख्या अनधिकृत बांधकामांवर बांधकाम विकास विभाग झोन क्र. 02 व कोंढवा येवले वाडी क्षेत्रीय कार्यालय अतिक्रमण विभाग यांचे संयुक्त कारवाई च्या अनुषंगाने पोलिस कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बल च्या मदतीने कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान एकूण 17,800चौरस फूट फ्रंट मार्जिन, साईड मार्जिनअनधिकृत क्षेत्र पाडून टाकण्यात आले .
हा कारवाई महापालिकेचे अधीक्षक अभियंता व बांधकाम विभाग झोन क्र. 02 च्या कार्यकारी अभियंत्यांच्या मार्गदर्शनाखाली उप अभियंता, कनिष्ठ अभियंता तसेच सहाय्यक आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निरीक्षक, सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक व इतर कर्मचारी, सहाय्यक पोलिस निरीक्षकांनी केली.
यात 1 जेसीबी, एक गॅस कटर, १० अतिक्रमण कर्मचारी अशी यंत्रणा वापरण्यात आली.

एसटीच्या मोबाईल ॲपला प्रवाशांचा वाढता प्रतिसाद,सध्या १० लाख वापरकर्ते

0

–परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई — (२५ सप्टेंबर) राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) मोबाईल ॲपला अलीकडे प्रवाशांकडून वाढती पसंती मिळत असून सध्या या ॲप चे सुमारे १० लाख वापरकर्ते आहेत. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
मंत्री सरनाईक म्हणाले की, एस.टी. महामंडळाने मोबाईल ॲप काही महिन्यांपूर्वी सुधारणा करुन नवीन आवृत्ती (व्हर्जन) मध्ये सुरू केले आहे .त्याचा मुख्य हेतू प्रवाशांना बसची आरक्षण सेवा अधिक सुलभ पद्धतीने उपलब्ध करणे असा आहे. पारंपरिक तिकीट खरेदी व थेट बस स्थानकावर अवलंबून राहण्याऐवजी प्रवासी आता त्यांच्या स्मार्टफोनवरून तिकीट खरेदी करू शकतात, प्रवासाची माहिती तपासू शकतात.
१ एप्रिल २०२५ पासून सुरू केलेल्या नवीन MSRTC BUS RESERVATION ॲप ला
प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळत असून मार्च-२०२५ मध्ये ३ लाख ९४ हजार प्रवाशी जुन्या मोबाईल ॲपचा वापर करीत होते. सुधारित ॲप आल्यानंतर मे-२०२५ मध्ये सुमारे ६ लाख ७२ हजार प्रवाशांनी नवीन मोबाईल ॲपचा वापर केला आहे. सध्या १० लाख वापरकर्त्यापैकी सरासरी दरमहा ५ लाख प्रवासी सुधारित मोबाईल ॲपवरून तिकीट काढत आहेत.

तब्बल १ लाख २५ हजार प्रतिक्रिया

ॲप डाऊनलोड करणाऱ्या प्रवाशांनी आपला अनुभव, ॲप बद्दलच्या सुचना, तक्रारी या बाबतीत भरभरून प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. अर्थात , वापरकर्त्यांच्या तक्रारी व सूचना या संदर्भात काही आव्हानं आहेत. नेटवर्क कव्हरेज कमी असलेल्या ग्रामीण भागात रिअल-टाइम माहिती व डिजिटल पेमेंटची सेवा सतत उपलब्ध नसल्याचे तक्रारीत दिसून येतात. तसेच, ज्येष्ठ नागरिक किंवा तांत्रिकदृष्ट्या पारखी नसलेल्या प्रवाशांसाठी ॲपचा वापर अवघड असल्याचेही काही प्रतिक्रिया आहेत.
“ग्रामीण भागांतील नेटवर्क समस्या दूर करण्यासाठी एसटी महामंडळाने स्थानिक सुविधांचा विचार करून ॲपचे UI/UX अधिक सुलभ बनवण्याच्या दिशेने काम सुरू केले आहे.

एस.टी.च्या मोबाईल ॲपला प्ले स्टोअर ॲप मध्ये ४.६ स्टार चे रेटिंग मिळाले आहे. अर्थात, या ॲप ला मिळणारा प्रवाशांचा वाढता प्रतिसाद हा आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या एक महत्त्वाच्या टप्प्याचे संकेत देतो. तंत्रज्ञानाचा वापर योग्य नियोजन व स्थानिक अडचणींचा विचार करून केला तर प्रवाशांना अधिक सुलभ, सुरक्षित व पर्यावरणपूरक सेवा मिळण्याची शक्यता वाढते. हे सप्रमाण सिद्ध झाले आहे.

श्री. प्रताप सरनाईक

परिवहन मंत्री तथा अध्यक्ष, एस टी महामंडळ

सौर ऊर्जा प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मीती: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

0

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्यातील २४५८ मेगावॅट क्षमतेचे ४५४ सौर ऊर्जा प्रकल्पांचे लोकार्पण

प्रधानमंत्री यांनी सौर ऊर्जा प्रकल्पातील लाभार्थ्यांशी साधला संवाद

मुंबई,दि.२५ : सौर ऊर्जा प्रकल्पांमुळे शेतीला दिवसा वीज उपलब्ध होत आहे ज्यामुळे शेतक-यांचे आर्थिक उत्पन्न दुप्पट होत आहे. मात्र शेतक-यांनी नैसर्गिक शेतीवर भर देवून कमी खर्चात जास्त उत्पन्नावर आधारित पीक पध्दतीचा वापर करावा. शेतीचे आरोग्य संवर्धन उपाय होणे काळाची गरज आहे.. या सौर ऊर्जा प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मीती होत असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले. दूरदृश्य प्रणाली द्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्यातील २४५८ मेगावॅट क्षमतेचे ४५४ सौर ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण केले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते.

राजस्थान बौसंवाडा येथे ऊर्जा तसेच विविध विकास योजनांचा लोकार्पण कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रक्षेपण बांद्रा पूर्व प्रकाशगड येथून करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक वर राधाकृष्णन बी, राज्यातील पी एम कुसुम सी – मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 आणि पी एम कुसुम सी बी – मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचे लाभार्थी शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्यातील सौर ऊर्जा प्रकल्पातील विविध लाभार्थ्यांशी संवाद साधला. दूरदृश्य प्रणाली द्वारे राज्यातील २४५८ मेगावॅट क्षमतेचे ४५४ सौर ऊर्जा प्रकल्पाचे प्रधानमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण पार पडले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले की, सौर ऊर्जा प्रकल्पाचे खूप फायदे आहेत. शेतक-यांना शेतीला दिवसा वीज उपलब्ध होते आहे त्याच बरोबर बारमाही पाण्याची व्यवस्था झाली आहे. यामुळे शेतक-यांचे उत्पन्न वाढले आहे. आता शेतक-यांनी केमिकल मुक्त शेती करण्यासाठी भर दिला पाहिजे. झिरो कॉस्ट फार्मिंग ला देखील महत्त्व दिले पाहिजे. . झिरो बजेट नैसर्गिक शेती ही अशी शेती पद्धत आहे, ज्यामध्ये रासायनिक खते, कीटकनाशके यांचा वापर कमी करून खर्च कमी केला जातो, ज्यामुळे शेतकऱ्यांचे शेतीमध्ये आर्थिक गुंतवणूक वाचते आणि जमिनीचे आरोग्य सुधारते. त्याचबरोबर पारंपारिक शेती ऐवजी काळानुरूप बदलती शेती करणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले की,भारताला आज रोजी एक लाख करोड खाद्यतेलाच्या आयात करावी लागते. ही समस्या सोडवण्यासाठी शेतकऱ्यांनी खाद्यतेल बियांची लागवड करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर मिलेटची देखील सध्या खूप मागणी आहे हे लक्षात घेता त्या प्रकारच्या पद्धतीची पिके घेतली तर शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून शेतकऱ्यांनाआर्थिक स्वावलंबनाकडे वाटचाल होईल.राज्याचे राज्यपाल आर्चाय देवव्रत यांची नैसर्गिक शेतीवरील व्याख्यांनाचे शेतक-यांनी जरूर ऐकावे असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सौर उर्जा प्रकल्पातील विविध लाभार्थ्यी शेतक-यांचा परिचय करून दिला.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सौर ऊर्जा प्रकल्प लाभार्थ्यांशी संवाद साधत जाणून घेतल्या प्रकल्पाच्या यशोगाथा

सौर ऊर्जा प्रकल्पामुळे शेतक-यांचे वाढले उत्पन्न

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतक-यांना प्रकल्पाची यशोगाथा प्रत्यक्ष लाभार्थ्यांशी संवाद साधून जाणून घेतल्या.किकवारी,तालुका सटाणा जिल्हा नाशिक येथील शेतकरी सुनील सिताराम काकुलते यांनी पीएम कुसुम सी – मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत ४० एकर जमीन सिंचनाखाली आणली असून यामुळे दरवर्षी दोन लाख रुपये इन्कम वाढलेला आहे.५० ते ६० लोकांना यामुळे रोजगार प्राप्त झाला असल्याचे सांगितले. भेंडी महळ तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोला येथील शेतकरी तुषार वानखेडे यांनी १० मेगावॉट पी एम कुसुम सी – मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना मध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाची योजना ६.५ एकरं मध्ये राबवली.यापूर्वी रात्री वीज नसल्यामुळे अडचणी निमार्ण होत होत्या. शेतीला पाणी कमी पडत असल्यामुळे हरभरा सारखी पीक घेतली जात होती. आता पपई आणि केळीच पीक घेऊन ३५ हजार ऐवजी ८० हजार रुपयांचे उत्पन्न मिळत आहे त्यांनी सांगितले.

सतेफाड तालुका जाफराबाद जिल्हा जालना मधील सुरत जटाळे यांनी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेतून पाच एच पीचा पंप बसवला असल्याचे सांगून या योजनेमुळे त्यांच्या शेतीच्या उत्पन्नात भरघोस वाढ झाली असेल पंप बसवल्यापासून त्यांचा वार्षिक उत्पन्न साठ हजार रुपयांवरून दीड लाख रुपये पर्यंत गेले आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. शेतीमध्ये घरातीलच तीन व्यक्ती काम करत असून मुलाच्या शिक्षणासाठी आणि पुन्हा शेतीमध्ये उत्पन्न घेण्यासाठी आलेल्या नफ्याचा उपयोग करत असल्याचे त्यांनी सांगितले.

बापकाळ तालुका जिल्हा जालना येथील शेतकरी ताई किशोर सावंत म्हणाल्या की, पीएम कुसुम बी – मागील त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये २ एकर क्षेत्रात तीन एच. पी. चा सोलर पंप बसवला आहे.यामुळे सोयाबीन पिकाच्या उत्पादन वाढ झाली आहे. त्याचबरोबर उरलेल्या इन्वर्टर मध्ये च्या माध्यमातून घरात विज वापर केला जातो असेही त्यांनी सांगितले.

माई वस्ती पेठ तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथील माधुरी धुमाळ यांनी पीएम कुसुम सी – मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.0 या योजनेत दहा मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प 10 एकर मध्ये उभारला आहे.या परिसरातील शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वार्षिक पंधरा लाख उत्पन्न या प्रकल्पातून मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
वाकवड तालुका शिरपूर जिल्हा धुळे येथील चंदू पावरा या शेतकऱ्यांनी पीएम कुसुम बी- मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये 7.5 एचपी क्षमतेचा सौर कृषी पंप बसवला असून त्यामुळे दिवसा वीज उपलब्ध होऊन पाण्याच्या उपलब्धतेमुळे मका गहू भुईमूग या पिकांची पेरणी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्यातील गोपाळ महल्ले यांनी पीएम कुसुम सी- मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 या योजनेत लाभ घेतला आहे. या सर्व प्रकल्पामुळे ग्रामपंचायतीला दरवर्षी पाच लाख रुपये मिळत असून या शेतकऱ्यांनी सतराशे लोकांना वीज पुरवठा केल्यामुळे शेतकऱ्यांची विजेची समस्या मिटली असून या भागामध्ये शेतकरी दिवसा दिवसा वीज उपलब्ध होत असल्यामुळे आनंदी असल्याचे सांगितले.

पीएम कुसुम सी-मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 व पीएम कुसुम बी-मागेल त्याला सौर कृषी पंप योजना
पीएम कुसुम सी-मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 या योजनेत ६ लाख शेतक-यांना दिवसा वीज पुरवठा होत आहे.३२.०८ लाख एकर जमीन ओलिताखाली आली आहे. सह इतर विविध योजनेतून राज्यात आतापर्यंत ६ लाख ४६ ६९४ सौर कृषी पंप बसविण्यात आले असून राज्याने देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे.या योजनेमुळे २०.९५ लाख एकर जमीन ओलिताखाली आली आहे.

तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा सहप्रभारीपदी मुरलीधर मोहोळ !

0
  • पुढील वर्षीच्या एप्रिलमध्ये निवडणूक होण्याची शक्यता
  • भाजपा पक्ष संघटनेकडून मोहोळ यांच्यावर मोठी जबाबदारी

पुणे/दिल्ली
भारतीय जनता पार्टीच्या वतीने आगामी तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि बिहार निवडणुकीसाठी प्रभारी आणि सह-प्रभारी यांच्या नावांची घोषणा करण्यात आली असून यात पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची तामिळनाडू भाजपच्या निवडणूक सह-प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भातील घोषणा नवी दिल्ली येथील मुख्यालयातून पार्टीचे सचिव खासदार अरुण सिंह यांनी केली. केंद्रीय मंत्रीपदाची जबाबदारी दिल्यानंतर लगेचच मोठी संघटनात्मक जबाबदारी मोहोळ यांच्यावर पक्षाने सोपवली आहे.

पुढील वर्षीच्या एप्रिलमध्ये तामिळनाडू विधानसभाची मुदत संपत असून त्याच आसपास तमिळनाडू विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. दक्षिणेतील मोठे राज्य असलेल्या तामिळनाडूकडे भारतीय जनता पार्टीने विशेष लक्ष केंद्रित केले असून निवडणुकीच्या सात महिने आधीच प्रभारी आणि सह-प्रभारी यांच्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी भारतीय जनता पार्टीत बूथ स्तरावर कामाला सुरुवात केली होती. त्यानंतर युवा मोर्चा, शिक्षण मंडळ, नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, पुणे महापौर, प्रदेश महामंत्री, केंद्रीय मंत्री आणि आता तामिळनाडू विधानसभा निवडणूक भाजपा सहप्रमुख असा संघटनात्मक प्रवास केला आहे. सलग तीस वर्ष संघटनेसाठी समर्पित भावनेने केलेल्या कार्याची दखल पक्षाकडून घेतल्याचे चित्र आहे. शिवाय निवडीच्या निमित्ताने केंद्रीय नेतृत्वाचा मोहोळ यांच्यावर असलेला विश्वास पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे.

या नियुक्तीनंतर मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘मी भारतीय जनता पार्टीचा समर्पित आणि पूर्ण क्षमतेने कार्यरत असणारा कार्यकर्ता आहे. आजवर पार्टीने दिलेली प्रत्येक जबाबदारी ही पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे नवी जबाबदारीही या भूमिकेतून निभावणार आहे.

‘माझ्यासारख्या बूथ स्तरावर काम करणाऱ्या कार्यकर्त्याला एका राज्याच्या निवडणुकीसाठी सह-प्रभारी म्हणून काम करण्याची संधी मिळते, हे फक्त भारतीय जनता पार्टीतच होऊ शकते. नव्या जबाबदारीच्या रूपाने पार्टीने दाखवलेला विश्वास आगामी काळात सार्थ करण्यासाठी निश्चितच कार्यरत असेल. नव्या जबाबदारीबद्दल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा जी यांचे मनःपूर्वक धन्यवाद ! पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आणि केंद्रीय गृह व सहकार मंत्री श्री अमित शाह जी यांच्या नेतृत्वात नवी जबाबदारी पार पाडेल, हा विश्वास व्यक्त करतो’, असेही मोहोळ म्हणाले.