Home Blog Page 114

ऊर्जा परिवर्तनातून स्वस्त, शाश्वत विजेकडे वाटचाल; महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार

मुंबई, दि. २९ मार्च २०२६: मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ऊर्जा परिवर्तनाद्वारे विद्युत क्षेत्राला नवी दिशा मिळाली आहे. त्यातून स्वस्त व शाश्वत विजेकडे वाटचाल सुरु झाली आहे. या कामगिरीचा सन्मान म्हणून नवी दिल्ली येथे शनिवारी (दि. २८) स्कोच समूहाच्या वतीने महावितरणला राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. कार्यकारी संचालक श्री. भुजंग खंदारे व कार्यकारी अभियंता श्री. रोहित जोगदंड यांनी हा पुरस्कार स्विकारला.

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलिअन डॉलर्सची करण्यासाठी आगामी काळातील ऊर्जेची मागणी लक्षात घेता मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांनी रिसोर्स अॅडेक्वेसी प्लॅन तयार केला आहे. त्यानुसार सन २०३० पर्यंत तब्बल ३९ हजार ५०० हजार मेगावॅट हरित ऊर्जेसह ४५ हजार मेगावॅट विजेची आणखी भर पडणार आहे. त्यामुळे नवीकरणीय ऊर्जेची क्षमता १३ टक्क्यांवरून ५२ टक्के होईल. तसेच सुमारे ३ लाख ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून सुमारे ७ लाख रोजगार निर्माण होणार आहेत. पुढील पाच वर्षांमध्ये वीज खरेदीमध्ये ८२ हजार कोटी रुपयांची बचत होणार असल्याने सर्व वर्गवारीचे वीज दर कमी होत जाणार आहे. यात सन २०२९-३० पर्यंत सर्व वर्गवारीतील वीज दर कमी करण्यास मा. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने नुकतीच मंजुरी दिली आहे.

रिसोर्स अॅडेक्वेसी प्लॅनला अनुसरून महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी ऊर्जा परिवर्तनाला मोठा वेग दिला आहे. महावितरणने प्राधान्य दरांवर सर्व ऊर्जा स्त्रोतांमध्ये आतापर्यंत ७२ हजार ९१८ मेगावॅट क्षमतेच्या वीज खरेदीचे दीर्घकालीन करार (पीपीए) केले आहेत. यामध्ये ४७ हजार ३४७ मेगावॅट (६५ ट्क्के) अपारंपरिक ऊर्जेचा समावेश आहे. महावितरणच्या वीज खरेदीमध्ये १० हजार कोटींच्या वार्षिक बचतीसोबतच क्रॉस सबसिडीमध्ये १३ हजार ५०० कोटींनी वार्षिक बोजा कमी होणार आहे. त्यामुळे प्रामुख्याने औद्योगिक व व्यावसायिक विजेचे दर स्वस्त होत जाणार आहेत.

ऊर्जा परिवर्तनामध्ये प्रामुख्याने सौर ऊर्जा क्षेत्रात महावितरणने मोठी आघाडी घेतली आहे. शेतकऱ्यांना प्रामुख्याने दिवसा व शाश्वत वीजपुरवठा करणे, वीज खरेदीचा व पर्यायाने अनुदानाचा बोजा कमी करणे, औद्योगिक व व्यावसायिक वीजदर कमी करणे यासाठी जगातील सर्वात मोठ्या १६ हजार मेगावॅट क्षमतेच्या विक्रेंद्रीत सौर ऊर्जा प्रकल्पांची ‘मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.०’ सुरु करण्यात आली. या योजनेतून ११ लाख ५६ हजार आणि मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेतून ८ लाख ८० हजार अशा एकूण २० लाख ३६ हजार शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा सुरू झाला आहे. यासह प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत आतापर्यंत राज्यात ५ लाख २ हजारांवर घरगुती ग्राहकांकडे १९०४ मेगावॅट क्षमतेचे छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले आहे व त्यांचे मासिक वीजबिल देखील शून्यवत झाले आहे.

रामनवमीच्या दिवशी रस्त्यावर उतरलेल्या DJ च्या रावणी अवताराने घेतला ज्येष्ठ महिलेचा बळी

राम जन्माला ग सखे ..राम जन्मला … स्वये श्री रामप्रभू ऐकते .. कुश लव रामायण गाती, प्रभू श्रीरामा प्रभात झाली ,पूर्व दिशा उगवली , उभी घेई कलश दुधाचा कौसल्या माऊली … अशा सुरेख , भक्तीचा गोडवा कानातून हदयाला पोहोचविणाऱ्या राम जन्म सोहळ्याचे यंदा रस्तोरस्ती DJ ने एवढे वाट्टोळे केले कि … यंदाची रामनवमी खूपच वेगळी बनून धोक्याचा इशारा देऊन गेली . तुळशीबागेतील आणि अन्य राम मंदिरातील राम जन्म सोहळा आपल्या पारंपारिक पद्धतीने सुखावणारा होताच ,पण रस्त्यावर उतरलेल्या या रामनमवी ने जणू रावणराज अवतरले काय ? असा प्रश्न उपस्थित केला .

पुणे- श्रीराम जन्मोत्सवाची डीजेच्या तालावरील मिरवणूकीतिला आवाजाच्या दणदणाटाने लष्कराच्या कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग (सीएमई) एका निवृत्त महिलेला हृदयविकाराझटका आला आणि तिला घेऊन रुग्णालयात निघालेल्या रिक्षाला टोळक्यांच्या गर्दीतून वाटकाढता काढता एवढा विलंब झाला कि अखेरीस या महिलेचा मृत्यू झाला. रंजना रवींद्र जाधव (वय-६५, रा. लेन नंबर १२, ससाणेनगर) असे या महिलेचे नाव असून ससाणेनगर येथे रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पातळी ओलांडून सुरू असलेल्या डीजेच्या अति आवाजामुळे ही घटना घडली असल्याचा आरोप संबंधीत महिलेच्या मुलाने केला आहे.

दरम्यान, डीजेच्या अति तीव्र आवाजामुळे आईला त्रास होऊन तिचा मृत्यू झाला असल्याचा आरोप श्रीमती जाधव यांचा मुलगा सौरभ यांनी केला आहे. या ठिकाणी पोलीस असूनही आवाजावर नियंत्रण नव्हते. याशिवाय आईला त्रास झाल्यानंतर मिरवणुकीमुळे झालेल्या वाहतूक कोंडीतून तिला रुग्णालयात नेईपर्यंत मोठा वेळ गेल्यानेही तिचा मृत्यू झाला आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.ससाणेनगर परिसरात या घटनेनंतर संतापाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून मिरवणूक आयोजक व पोलिसांवर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच, ध्वनी प्रदूषणासह वाहतूक कोंडी करणाऱ्या मिरवणुकांवर तातडीने बंदी व कठोर कारवाई करण्याची मागणीही होत आहे.या केवळ कर्णकर्कश्शच नव्हे तर हृदय व मेंदू हलवणाऱ्या मिरवणूकीतील डीजेच्या आवाजामुळे परिसरातील रूग्णालयातील ठरलेली एखादी शस्त्रक्रियाही थांबवावी लागत असल्याचे एका डॉक्टरने सांगितले.

३० मार्च ते ४ एप्रिल दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज

शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस, गारपीट आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे

मुंबई, दि. २८ : ३० मार्चपासून राज्यात आभाळी हवामान आणि दुपारनंतर होणाऱ्या वादळी पावसाचे नवीन सत्र सुरू होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ३० मार्च रोजी प्रामुख्याने खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. उर्वरित विदर्भात देखील काही प्रमाणात हवामानात बदल दिसून येऊ शकतो.

३० मार्चच्या तुलनेत ३१ मार्च रोजी एकंदरीत वादळी पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, या भागांमध्ये काही प्रमाणात अस्थिर हवामान आणि वादळी पाऊस पडू शकतो.

त्यानंतर १ ते ४ एप्रिल दरम्यान वादळी पावसाचे प्रमाण वाढण्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे या कालावधीत मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भातील ठिकठिकाणी आभाळी हवामान, दुपारनंतरचा वादळी पाऊस, आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या या स्थितीनुसार शेतीची कामे नियोजित करावीत. सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. तसेच वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपीटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी व शेतकऱ्यांनी स्वतःची तसेच पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी. अशा वेळी झाडाखाली, टिनशेडखाली तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभे राहणे टाळावे, असेही आवाहन करण्यात येत आहे.

गॅस एजन्सीवर ही कारवाई, गॅस सिलेंडरचा काळा बाजार

गॅस एजन्सीचा पुरवठा आणि वितरण तात्काळ प्रभावाने बंद ; नियमभंगावर जिल्हा प्रशासनाची कारवाई

पुणे:जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिलेल्या आदेशानुसार हिंजवडी येथील मे. श्री लक्ष्मी भारतगॅस या गॅस एजन्सीला व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचा पुरवठा व वितरण तात्काळ प्रभावाने बंद करण्यात आला आहे.

जिल्हा पुरवठा शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार, या एजन्सीकडे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) मार्फत व्यावसायिक एलपीजी सिलेंडर विक्रीचा अधिकृत परवाना आहे. मात्र, दि. २६ मार्च २०२६ रोजी सिलेंडर वितरण करताना शासनाने ठरवून दिलेल्या प्राधान्यक्रमाचे पालन न करता अनधिकृत व नोंदणी नसलेल्या व्यक्तींना सिलेंडर वाटप केल्याचे आढळले. तसेच अधिक नफा मिळविण्याच्या उद्देशाने जादा दराने सिलेंडर विक्री केल्याचेही निदर्शनास आले आहे.

या प्रकारामुळे नागरिकांमध्ये एलपीजी पुरवठ्याबाबत गैरसमज निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांनी तात्काळ कारवाईचे निर्देश दिले. त्यानुसार संबंधित एजन्सीचा परवाना निलंबित करण्यात येत आहे.

तसेच, या आदेशांची तातडीने अंमलबजावणी करून त्याबाबतचा अनुपालन अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर यांनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) यांना दिले आहेत.

श्रीरामराज्याभिषेक व पायघडी सोहळा तुळशीबागेत उत्साहात साजरा

पुणे : श्रीराम जय राम जय जय राम…  रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम… च्या अखंड गजरात प्रभू श्रीरामांच्या गाभा-यातील मूर्तीपासून पाऊले उमटलेली शुभ्रवस्त्रे तुळशीबाग श्रीराम मंदिराच्या सभामंडपात आली. पुणेकरांनी त्यावर फुलांची उधळण करीत श्रीरामराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा केला. संपूर्ण भारतात पायघड्यांचा हा सोहळा पुण्यातील तुळशीबागेतील श्रीराम मंदिरात साजरा होतो.

श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने तुळशीबाग येथील श्रीराम मंदिरात लळीत पायघडीचे कीर्तन व श्रीराम राज्याभिषेकाच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. संस्थानचे कार्यकारी विश्वस्त डॉ. रामचंद्र तुळशीबागवाले, विश्वस्त भरत तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवार उपस्थित होता. पुणे प्रांताचे सरसुभेदार श्रीमंत नारो अप्पाजी तुळशीबागवाले यांनी सन १७६१ साली स्थापन केलेल्या देखण्या मंदिरामध्ये यंदाचे श्रीरामनवमी उत्सवाचे अखंडीत २६५ वे वर्ष साजरे होत आहे.

लळीत पायघडीचे कीर्तन सुरु असताना राज्याभिषेक सोहळा अनुभविण्यासोबतच रत्नजडित सिंहासन वरी शोभे रघुनंदन… ही पदे देखील तुळशीबागवाले कुटुंबियांकडून म्हणण्यात आली. कुटुंबातील सदस्य व कार्यकारी विश्वस्त डॉ. रामचंद्र तुळशीबागवाले यांच्या हस्ते श्रीराम राज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उत्सवकाळातील मानक-यांचा सन्मान देखील करण्यात आला. कीर्तनकार ह.भ.प. दर्शन बुवा वझे यांचे कीर्तनही झाले.

डॉ. रामचंद्र तुळशीबागवाले म्हणाले, श्रीरामजन्माननंतर पायघड्यांचा हा सोहळा फक्त तुळशीबागेतील राम मंदिरात साजरा केला जातो. नविन पांढ-या शुभ्र वस्त्रावर श्रीरामांच्या पावलांचे ठसे उमटविले जातात आणि हे वस्त्र गाभा-यापासून सभामंडपापर्यंत आणले जाते. यावेळी लळीत पायघड्यांचे कीर्तन करण्यात येते. त्यानंतर श्रीरामांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न होतो. सोहळ््यानंतर उत्सवकाळातील मानक-यांचा पुष्पहार व श्रीफळ देवून सन्मान करण्यात येतो, असे ही त्यांनी सांगितले.  

देशभरातील 76 रेल्वे स्थानकांवर सर्व अत्याधुनिक सुविधांमधे वाढ – अश्विनी वैष्णव


सर्व विभाग आणि यंत्रणा, एकाच स्थानक संचालकांच्या हाताखाली काम करणार, संचालकांना रेल्वेस्थानक आणि रेल्वे क्षमतेनुसार तिकीटांची विक्री करण्यावर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार दिल्याने प्रभावी व्यवस्थापन होणार शक्य

नवी दिल्‍ली, 28 मार्च 2026

भारतीय रेल्वेगाड्यांमध्ये, प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी, काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत, ते पुढीलप्रमाणे: –

1. प्रवाशांच्या गर्दीसाठी व्यवस्थित जागा असेल, अशा कायमस्वरूपी मोकळ्या जागांची व्यवस्था, निश्चित करण्यात आलेल्या 76  स्थानकांवर केली जात आहे:

निवडक, 76 रेल्वेस्थानकांवर कायम असणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रवासी थांबू शकतील, अशा मोकळ्या जागांची व्यवस्था करण्याचे काम रेल्वेने हाती घेतले आहे. ही जागा आरामदायक, सुनियोजित असेल, तसेच, तिथे बसण्याची, पाणी पिण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे, तिकीट काढण्याची व्यवस्था, माहिती फलक आणि सुरक्षा व्यवस्था, अशा सर्व सुविधा असतील, ज्यामुळे प्रचंड गर्दीच्या वेळांमध्येही नीट व्यवस्थापन होऊ शकेल.

नवी दिल्ली स्थानकावर अशी मोकळी बसण्याची जागा निर्माण करण्यात आली आहे, ज्यामुळे गर्दीचा त्रास कमी झाला असून, प्रवाशांना, अतिरिक्त तिकीट खिडक्या, एटीव्हीएम्स, पीएएस, इलेक्ट्रॉनिक ट्रेन माहिती बोर्ड, सीसीटीव्ही, सामान तपासणी व्यवस्था, डीएफएमडी, अखंड वीजपुरवठा, सुधारित दिवेव्यवस्था, एचव्हीएलएस पंखे, अग्निशमन व्यवस्था आणि वीज संरक्षक प्रणाली, आरओ पेयजल तसेच स्त्री-पुरुष- दिव्यांगांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, अशी सगळी व्यवस्था करण्यात आली आहे.

इतर स्थानकांवरही अशाच प्रकारची कामे सुरू असून, ती कुठे नियोजन आराखडा तर कुठे अंमलबजावणीच्या स्तरावर आहेत. ही सर्व कामे, नियोजित वेळेत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. 

2. प्रवाशांच्या सहज प्रवेशावर नियंत्रण:

ज्या प्रवाशांकडे, कन्फर्म आरक्षण आहे, त्यांना स्थानकावर सहज प्रवेश मिळून थेट फलाटापर्यंत जाता येईल, असे नियोजन केले जात आहे, जेणेकरून, सर्व प्रवाशांना सहज प्रवेश मिळू शकेल. तर ज्यांच्याकडे तिकीट नाही, किंवा प्रतीक्षा यादीत नावे आहेत, अशा प्रवाशांना, बाहेर ठराविक प्रतीक्षा कक्षात सामावून घेतले जाईल. सहज प्रवेश नियंत्रण सुविधा देऊन, आरक्षण असलेले प्रवासी आणि विनातिकीट अथवा प्रतीक्षा यादीतले प्रवासी अशा दोघांचीही व्यवस्था वेगवेगळी केली जाईल.

3. रुंद पादचारी पूल (FOB)

रेल्वेच्या पादचारी पुलांसाठी 12 मीटर (40 फूट) आणि 6 मीटर (20 फूट)  अशा दोन, प्रमाणित मानकांनुसारच्या संरचना तयार करण्यात आल्या आहेत. हे असे पादचारी पूल सर्व रेल्वेस्थानकांवर बांधले जाणार आहेत. 

4. सीसीटीव्ही कॅमेरे

एआय- क्षमता असलेले सीसीटीव्ही कॅमेरे सर्व रेल्वे स्थानकांवर आणि आसपासच्या परिसरात लावले जात आहेत. ज्याद्वारे, गर्दीवर देखरेख ठेवता येईल तसेच, गर्दीचे प्रभावी व्यवस्थापन करता येईल.

5. वॉर रूम

महत्वाच्या स्थानकांवर वॉर रूम्स स्थापन केल्या जात आहेत, जिथे सर्व विभागाचे अधिकारी परस्पर समन्वय ठेवून काम करतील आणि गर्दीच्या वेळी अधिक प्रभावीपणे व्यवस्थापन होऊ शकेल.

6. अत्याधुनिक संपर्क-संवाद उपकरणे

अत्याधुनिक डिझाईनची डिजिटल संवाद उपकरणे- जसे की वॉकी-टॉकीज, उद्घोषणा प्रणाली देखील अत्युच्च गर्दीच्या स्थानकांवर लावल्या जातील.

7. नव्या रचनेची ओळखपत्रे

रेल्वेचे सर्व कर्मचारी आणि सेवा कामगारांना क्यू आर कोड आधारित नवी ओळखपत्रे दिली जातील, जेणेकरून, त्यांना रेल्वे स्थानकांवर कुठेही सहज प्रवेश मिळू शकेल.

8. रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी नवे गणवेश

सर्व कर्मचाऱ्यांना, नव्या रचनेचे गणवेश दिले जातील, ज्यामुळे कोणतेही संकट अथवा महत्वाच्या वेळी, त्यांची ओळख सहज पटू शकेल.

9. स्थानक संचालक पद उन्नत करणे

सर्व महत्वाच्या स्थानकांवर, एका वरिष्ठ अधिकाऱ्याची स्थानक संचालक म्हणून नेमणूक केली जाईल. त्यांच्याकडे, स्थानक सुधारणेसाठी, तत्क्षणी निर्णय घेण्याचे वित्तीय आणि इतर अधिकार असतील. तसेच, सर्व इतर विभाग या स्थानक संचालकांना रिपोर्ट करतील. ज्यामुळे, स्थानकावर एकसूत्री अधिकार आणि प्रभावी व्यवस्थापन शक्य होईल.

10. तिकीटांची क्षमतेनुसार विक्री

स्थानक संचालकांना, स्थानकांची क्षमता आणि उपलब्ध गाड्या लक्षात घेऊन, तिकीट विक्री क्षमतेचे नियंत्रण करण्याचा अधिकार असेल.

ही माहिती, रेल्वे, माहिती आणि प्रसारण तसेच इलेक्ट्रॉनिक आणि माहीती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना दिली.

“अंबाजोगाईत चिमुरडीचा धक्कादायक मृत्यू; अत्याचाराचा पर्दाफाश – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची कडक भूमिका”

मुंबई, दि. २८ मार्च २०२६ : बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात घडलेल्या २ वर्षे ५ महिने वयाच्या चिमुरडीवरील अत्याचार व मृत्यूची घटना अत्यंत संतापजनक असल्याचे सांगत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रशासनाला तातडीने कठोर कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत.

प्राथमिक तपासात मृत्यू अपघाती असल्याचे सांगण्यात आले होते; मात्र शवविच्छेदन अहवालातून लैंगिक अत्याचार स्पष्ट झाल्याने प्रकरण गंभीर झाले असून, हा अहवाल महत्त्वाचा पुरावा ठरत आहे. पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले असून गुन्ह्याची नोंद भारतीय न्याय संहिता २०२३ व बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (POCSO) कायद्यानुसार करण्यात आली आहे.

घटनेची गांभीर्याने दखल घेत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे या प्रकरणाचा तपास जलदगती न्यायालयात चालवून आरोपीस कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. तसेच तपास पारदर्शक ठेवून सर्व वैद्यकीय व भौतिक पुरावे भक्कमपणे सादर करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

आरोपी अल्पवयीन असल्याने त्याच्यावर कायद्यानुसार बाल सुधारगृहात ठेवण्याची प्रक्रिया काटेकोरपणे राबवावी, असे त्यांनी नमूद केले.

पीडित कुटुंबाला समुपदेशन व सुरक्षा देण्याबरोबरच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी बालसुरक्षा व जनजागृती मोहिमा राबविण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

नवजात बाळाच्या उपचाराकरिता आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबाला नीलम गोऱ्हेंनी मिळवून दिला मोठा दिलासा;”सव्वा लाखांचे बिल १५ हजारांवर”

डॉ. रिंकू मोरे-बावसकर यांची यशस्वी मदत

पुणे, दि. २८ मार्च २०२६ :
विधानपरिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गरजू रुग्णांना मदत करण्याच्या उपक्रमांतर्गत एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. श्रीमती पूजा रोहित मुळे यांच्या नवजात बाळाला गंभीर अवस्थेमुळे NICU मध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान बाळाचे एकूण बिल सुमारे ₹१,२५,००० इतके झाले होते, जे त्यांच्या कुटुंबासाठी परवडणारे नव्हते. या कठीण परिस्थितीत डॉ. रिंकू मोरे-बावसकर (वैद्यकीय अधिकारी व डॉक्टर सेल अध्यक्ष, पुणे) यांनी तत्परतेने पुढाकार घेतला.

उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली, संबंधित अधिकाऱ्यांशी सातत्याने चर्चा करत आणि मानवी दृष्टिकोनातून प्रकरण मांडत त्यांनी बिलामध्ये सवलत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत अखेरीस हॉस्पिटल प्रशासनाने मोठी सवलत दिली. ₹१,२५,००० इतके बिल कमी होऊन केवळ ₹१५,००० इतकीच रक्कम कुटुंबाला भरावी लागली.

दरम्यान, सर्वात दिलासादायक बाब म्हणजे नवजात बाळाची प्रकृती सुधारली असून बाळाला यशस्वीरित्या डिस्चार्ज देण्यात आला आहे. या मदतीमुळे मुळे कुटुंबाने उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे व डॉ. रिंकू मोरे-बावसकर यांचे मनापासून आभार मानले आहेत.

रोहित मुळे (नवजात बाळाचे वडील) यांनी भावना व्यक्त करत सांगितले की, “अत्यंत कठीण प्रसंगी, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे व डॉ. रिंकू मोरे-बावसकर यांनी आम्हाला मोठा आधार दिला. त्यांच्या मदतीमुळे आमच्या बाळाला नवजीवन मिळाले आणि आम्हाला आर्थिक दिलासा मिळाला.”

ही घटना वैद्यकीय क्षेत्रातील सेवाभाव, संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरली आहे.

ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम: पुणे महानगरपालिकेचा राज्यात द्वितीय क्रमांक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) पवनीत कौर यांनी स्वीकारला पुरस्कार

पुणे, दि.२८: मुख्यमंत्री यांच्या १५० दिवस ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत झालेल्या स्पर्धेत २९ महापालिकांच्या झालेल्या मूल्यमापनात पुणे महानगरपालिकेचा २०० पैकी १८६.२५ गुण मिळवून द्वितीय क्रमांक आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि मा. माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) पवनीत कौर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

१५० दिवस ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत पुणे महानगरपालिकेने महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त(ज) पवनीत कौर, अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट) पृथ्वीराज बी. पी., मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त(विशेष) ओमप्रकाश दिवटे यांच्या नेतृत्वामध्ये आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नवीन संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. तसेच ऑनलाइन सेवा पोर्टल, तक्रारींचे विश्लेषण व व्यवस्थापन, व्हॉटसअॅप यांचा सेवा, तक्रार निवारण, माहिती उपलब्ध करून देणे यासाठी नागरिकाभिमुख वापर करण्यात येत आहे. पालिकेच्या वतीने AI व GIS आधारित प्रकल्पांचा व तंत्रज्ञानाचा विविध प्रकल्पांमध्ये वापर सुरु करण्यात आला आहे. सदर उपक्रम राबविण्यासाठी महापालिकेतील सर्व विभागामार्फत कामकाज करण्यात आले तसेच माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख राहुल जगताप यांच्या विभागामार्फत या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली

१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी केलेल्या कामगिरीचे अंतिम मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषदतर्फे करण्यात आले. त्यामध्ये पुणे महानगरपालिकेने मिळवलेल्या उज्ज्वल यशामुळे महापालिकेचे सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

ई-गव्हर्नन्समध्ये उत्कृष्ट कामगिरी; क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे राज्यात सातव्या क्रमांकावर

▪️कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व ब्लॉकचेन तंत्रज्ञानाची प्रभावी अंमलबजावणी ठरली ठळक वैशिष्ट्य

▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते क्रीडा आयुक्त श्रीमती शीतल तेली-उगले यांचा गौरव

पुणे, दि.२६ – महाराष्ट्र शासनाच्या ‘१५० दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम’ अंतर्गत क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे या कार्यालयाने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात सातवा क्रमांक मिळविला आहे. विशेष म्हणजे, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानाची प्रभावी अंमलबजावणी हे या यशाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले आहे. या उत्कृष्ट कार्याबद्दल आयुक्त श्रीमती शीतल तेली-उगले व त्यांच्या चमूचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

राज्यातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये ई-गव्हर्नन्स प्रणाली अधिक प्रभावी, पारदर्शक व तंत्रज्ञानाधिष्ठित करण्याच्या उद्देशाने हा १५० दिवसांचा विशेष कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत कार्यालयांचे संकेतस्थळ, ‘आपले सरकार’ प्रणाली, ई-ऑफीस, कार्यालयाचा डॅशबोर्ड, व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ब्लॉकचेन तंत्रज्ञान तसेच भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) या सात घटकांवर आधारित मूल्यमापन करण्यात आले.

दोन टप्प्यांत पार पडलेल्या या मूल्यमापन प्रक्रियेत राज्यातील ६८ आयुक्तालये व संचालनालयांचा समावेश होता. त्यामध्ये क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांनी AI आधारित सेवा सुलभीकरण, डेटा पारदर्शकता वाढविणारे ब्लॉकचेन उपाय आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या जोरावर सातवा क्रमांक मिळवून राज्यस्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली.

या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र प्रदान करून आयुक्त शीतल तेली-उगले व त्यांच्या टीमचा सन्मान करण्यात आला.

भाजप नेत्याच्या पेट्रोलपंपानेच अफवा पसरविल्याने पंपाचा पुरवठा केला स्थगित : डीलरशिप रद्द करण्याचा इशारा

हायवे पेट्रोलियम सेंटरचा इंधन पुरवठा तात्काळ स्थगित

पुणे, दि. २८ मार्च २०२६ इंधन उपलब्धतेबाबत अप्रमाणित माहिती पसरवून नागरिकांमध्ये घबराट निर्माण केल्याप्रकरणी पुणे कॅन्टोनमेंट परिसरातील हायवे पेट्रोलियम सेंटर (पूलगेट) या पेट्रोल पंपावरील विक्री व इंधन पुरवठा तात्काळ प्रभावाने स्थगित करण्यात आला आहे.
तेल कंपनीकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, संबंधित पेट्रोल पंपाकडून पेट्रोल व डिझेल तुटवड्याबाबत निराधार अफवा पसरविण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब मार्केटिंग डिसिप्लिन गाईडलाइन्स (MDG) २०२४ अंतर्गत “गंभीर अनियमितता” (Major Irregularity) म्हणून गणली जाते. डीलरशिप करारातील अटींचे उल्लंघन झाल्याने संबंधित कारवाई करण्यात आली आहे.

सध्याच्या परिस्थितीत तेल विपणन कंपन्यांकडून इंधनाचा पुरवठा सुरळीत सुरू असल्याबाबत जनजागृती केली जात असताना, अप्रमाणित माहिती प्रसारित केल्यामुळे इतर पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी व गोंधळ निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.

सदर पेट्रोल पंप चालकास २४ तासांच्या आत लेखी स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून, समाधानकारक उत्तर न मिळाल्यास डीलरशिप रद्द करण्यासह पुढील कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे तेल कंपनीच्या पुणे प्रादेशिक कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून देण्यात आली.संबंधित पेट्रोल पंप हा भाजप नेते आणि ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे कोर कमिटी मेंबर अली दारूवाला यांचा आहे. याबाबत अली दारूवाला यांना विचारणा केली असता, त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांचा गौरव

पुणे ग्रामीण पोलीस दलाला ई-गव्हर्नन्स १५० दिवस कार्यक्रमात घवघवीत यश; कोल्हापूर परिक्षेत्रात प्रथम क्रमांक

पुणे, दि.२८: महाराष्ट्र शासनाच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेल्या मूल्यमापनात पुणे ग्रामीण पोलीस दलाने एकूण २०० पैकी १४५ गुण मिळवत उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात चौथा क्रमांक पटकावला असून, कोल्हापूर परिक्षेत्रात प्रथम क्रमांक मिळविण्याचा मान पटकावला आहे.

मुंबई येथील सह्याद्री सभागृहात आयोजित समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांना सन्मानित करण्यात आले.

या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमांतर्गत पोलीस विभागातील कार्यक्षमता, पारदर्शकता आणि नागरिकाभिमुख सेवा यांचे मूल्यमापन करण्यात आले. यामध्ये डिजिटल प्रणालींचा वापर, ऑनलाइन सेवा, डेटा व्यवस्थापन, डॅशबोर्ड मॉनिटरिंग आणि तंत्रज्ञानाधारित निर्णयप्रक्रिया या घटकांवर विशेष भर देण्यात आला.
पुणे ग्रामीण पोलीस दलाने विविध डिजिटल प्रणालींची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. सीसीटी एनएस प्रणालीद्वारे एफआयआर नोंदणी, गुन्ह्यांची माहिती, तपास प्रगती आणि आरोपींची माहिती एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्यात आली असून, सर्व पोलीस ठाण्यांमध्ये रिअल-टाइम डेटा शेअरिंग सुलभ झाले आहे.
‘आपले सरकार’ पोर्टल अंतर्गत पुणे ग्रामीण पोलीस दलाने नागरिकांसाठी १७ विविध सेवा ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या आहेत. नागरिकांना घरबसल्या अर्ज करणे, प्रमाणपत्रे मिळवणे व विविध सेवा सहजपणे घेणे शक्य झाले आहे. तसेच ‘आपले सरकार ग्रीव्हन्स’ प्रणालीद्वारे प्राप्त होणाऱ्या तक्रारी व अर्जांचा १४ दिवसांच्या आत निपटारा करण्यात येत आहे.

ई-ऑफिस प्रणालीमुळे कागदविरहित प्रशासनाला गती मिळाली असून, सर्वाधिक प्रकरणांचा जलद निपटारा करण्यात पुणे ग्रामीण पोलीस दल अग्रस्थानी राहिले आहे. यामुळे कार्यालयीन कामकाजात पारदर्शकता व कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट प्रणालीद्वारे नागरिकांना २४x७ तत्काळ माहिती, तक्रार नोंदणीची सुविधा आणि सेवा स्थिती तपासण्याची सोय उपलब्ध झाली आहे, ज्यामुळे संवाद अधिक जलद व सुलभ झाला आहे.
इंटिग्रेटेड डॅशबोर्ड आणि अधिकृत वेबसाईट यांच्या माध्यमातून पुणे ग्रामीण पोलीस दलाची संपूर्ण माहिती, कामगिरी, गुन्हेगारी आकडेवारी आणि विविध सेवा नागरिकांना एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, ज्यामुळे पारदर्शकता अधिक बळकट झाली आहे.

जीआयएस प्रणालीअंतर्गत रात्रगस्त दरम्यान अधिकारी व अमलदारांचे अचूक लोकेशन ट्रॅक करणे शक्य झाले असून, नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत जवळचे पोलीस ठाणे सहज ओळखता येऊन तात्काळ मदत मिळण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.

तसेच, डायल 112 आपत्कालीन सेवा अंतर्गत उत्कृष्ट व भरिव कामगिरी करत कमी वेळेत नागरिकांना प्रतिसाद देण्यावर विशेष भर देण्यात आला असून, त्यामुळे आपत्कालीन सेवांची कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या “पोलीस पॅड” प्रणालीद्वारे ४ ते १० हजार लोकसंख्या असलेल्या मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये अचूक मनुष्यबळ नियोजन करण्यात आले. या प्रणालीमुळे योग्य ठिकाणी योग्य पोलीस कर्मचारी तैनात करणे शक्य झाले असून, भीमा-कोरेगाव तसेच संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा यांसारखे मोठे बंदोबस्त अत्यंत नियोजनबद्ध व यशस्वीरीत्या पार पाडण्यात आले.

संदीप सिंह गिल, पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली “६० Days” आणि “९० Days” पायलट प्रकल्प राबविण्यात आले. या उपक्रमांतर्गत प्रलंबित प्रकरणांचा जलद निपटारा, सेवा वितरणातील गती आणि अंतर्गत समन्वय सुधारण्यात महत्त्वाची प्रगती झाली आहे.

पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक करत, “तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नागरिकाभिमुख, पारदर्शक आणि कार्यक्षम पोलीस प्रशासन उभारणे ही काळाची गरज असून, पुणे ग्रामीण पोलीस दल या दिशेने सातत्याने प्रयत्नशील राहील. ”

ही कामगिरी संपूर्ण पुणे ग्रामीण पोलीस दलासाठी अभिमानास्पद असून, राज्यातील इतर पोलीस दलांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे,असेही श्री. गिल म्हणाले.

खगोल संशोधकांनी वापरली ब्रम्हांडाच्या मापनासाठी एक अभिनव भूमितीय चाचणी

0

मुंबई, 28 मार्च 2026

फार दूरवरच्या आकाशगंगांमधून येणाऱ्या अतिशय क्षीण प्रकाशाच्या आधारे विश्वाचा इतिहास आणि रचना उलगडण्याचा महत्त्वाचा प्रयत्न खगोलशास्त्रज्ञ करत आहेत. या पार्श्वभूमीतील आकाशगंगांचा प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचताना मार्गातील जवळच्या आकाशगंगांच्या गुरुत्वाकर्षणामुळे वाकतो व विकृत होतो. या प्रक्रियेला ‘गुरुत्वीय लेन्सिंग’ (gravitational lensing) असे म्हटले जाते. या तंत्राच्या साहाय्याने विश्वातील पदार्थांचे, विशेषतः अदृश्य ‘डार्क मॅटर’चे नकाशे तयार केले जातात आणि विश्वातील रचनांची वाढ कशी होते, याचा अभ्यास केला जातो.

गुरुत्वीय लेन्सिंग निर्माण करणारा आकाशगंगांचा एक मोठा समूह (credit : NAOJ)

या संशोधनात ‘रेडशिफ्ट’ ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची ठरते. विश्वाच्या प्रसरणामुळे प्रकाश किती ताणला गेला आहे, याचे मोजमाप म्हणजे रेडशिफ्ट. मात्र, यातील अनिश्चिततेमुळे विश्वाच्या विविध वैश्विक परिमाणांच्या (cosmological parameters) मोजमापात पूर्वग्रह (bias)  निर्माण होण्याची शक्यता असते. प्रत्येक आकाशगंगेचा अचूक रेडशिफ्ट मोजणे वेळखाऊ असल्याने, शास्त्रज्ञ प्रामुख्याने आकाशगंगांच्या रंगांवरून त्याचा अंदाज लावतात. ही पद्धत पूर्णतः अचूक नसून त्यात लहान प्रमाणात पद्धतशीर त्रुटी राहतात.

आयुका (IUCAA), पुणे या संस्थेशी संबंधित खगोलशास्त्रज्ञांनी याच समस्येवर उपाय म्हणून एक अभिनव भूमितीय पद्धत, ‘शिअर रेशियो’ चा वापर केला आहे. नेदरलँड मधील लाईडन विद्यापीठातील संशोधक डॉ. दिव्य राणा (माजी विद्यार्थी, IUCAA), प्रा. सुहृद मोरे (IUCAA संशोधक) आणि त्यांच्या आंतरराष्ट्रीय सहकाऱ्यांनी ‘Physical Review D’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात यासंदर्भातील संशोधन नुकतेच प्रसिद्ध झाले आहे.

या पद्धतीत, एका पार्श्वभूमी संचामधल्या आकाशगंगांवरच लक्ष केंद्रित न करता, समोरील एकाच आकाशगंगांच्या संचानी वेगवेगळ्या रेडशिफ्टवर असलेल्या पार्श्वभूमी आकाशगंगांच्या प्रकाशाला कशा प्रकारे वाकवले,  याची तुलना केली जाते. या तुलनेमुळे वायू, तारे आणि आकाशगंगा निर्मितीशी संबंधित गुंतागुंतीचे घटक आपोआप नगण्य ठरतात आणि विश्वाच्या भूमितीचे एक ‘स्वच्छ’ मोजमाप मिळते. ही भूमितीचा रेडशिफ्टच्या अंदाजातील त्रुटी अचूकपणे शोधून तिचा ब्रह्माण्ड मापनासाठी वापर करता येतो.

ही पद्धत Subaru Hyper Suprime-Cam (HSC) ह्या आकाशगंगांच्या सर्वेक्षणातील डेटावर यशस्वीपणे वापरण्यात आली. या प्रकल्पाच्या माध्यमातून आकाशातील पदार्थांचे व्यापक नकाशांकन केले जात आहे. संशोधकांनी रेडशिफ्टमधील त्रुटी दुरुस्त करताना विश्वातील पदार्थाची घनता आणि असमानतेची तीव्रता यासंबंधित महत्त्वाचे निष्कर्ष नोंदवले.

“भविष्यातील मोठ्या खगोलशास्त्रीय सर्वेक्षणांमध्ये रेडशिफ्टमधील अनिश्चितता ही एक मोठी अडचण ठरण्याची शक्यता आहे. या अभ्यासातून ‘शिअर रेशियो’ पद्धत रेडशिफ्ट मोजमापांची पडताळणी करण्यासाठी प्रभावी आणि स्वतंत्र साधन ठरू शकते, हे स्पष्ट झाले आहे.” – असे प्रा. सुहृद मोरे म्हणालेत.

निकट भविष्यात  व्हेरा सी. रुबिन वेधशाळा (LSST), रोमन अवकाश दुर्बीण (Roman Space Telescope), युक्लिड (Euclid) मोहिमेसारख्या प्रगत वेधशाळा कोट्यवधी आकाशगंगांचे नकाशे तयार करणार आहेत. डार्क एनर्जी आणि विश्वाच्या उत्क्रांतीचा सखोल अभ्यास करण्यासाठी या सर्वेक्षणांना अचूक आणि विश्वासार्ह डेटाची गरज भासणार असून, ‘शिअर रेशियो’ ही पद्धत त्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

लॉकडाऊनच्या अफवा पसरवणाऱ्यांवर होणार कडक कारवाई:मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा, म्हणाले – देशात इंधनाचा तुटवडा नाही

मुंबई- भारताच्या इंधन पुरवठ्यावर होत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यातच देशात पुन्हा ‘लॉकडाऊन’ लागणार असल्याच्या अफवांनी नागरिक धास्तावले असून पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आपली भूमिका स्पष्ट करत सर्व संभ्रम दूर केला आहे. “देशात किंवा राज्यात कोणताही लॉकडाऊन लागणार नाही; अशा खोट्या बातम्या पसरवणे हे देशद्रोहासारखेच आहे,” अशा कडक शब्दांत त्यांनी अफवा पसरवणाऱ्यांना फटकारले आहे. तसेच अशा अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करू, असा सूचक इशाराही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धाचे पडसाद भारतीय बाजारपेठेत उमटत आहेत. एलपीजी सिलेंडर मिळण्यास होणारा विलंब यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातच देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार असल्याच्या अफवा पसरत आहेत. यावर मुख्यमंत्री म्हणाले, “देशात आणि राज्यात इंधनाचा तुटवडा नाही, एलपीजी गॅस आणि पेट्रोल-डिझेलचा मुबलक साठा आहे. आपल्या देशाच्या डिप्लोमॅटिक रिलेशनशीपमुळे, पंतप्रधानांच्या नीतीमुळे इंधनाचा तुटवडा निर्माण होणार नाही, त्याची काळजी घेतली जात आहे. अशा अफवा पसरवून जर कुणी गोंधळाची स्थिती निर्माण करत असेल तर ते देशविरोधी काम आहे. अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करणार,” असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “भविष्यात गॅस सिलेंडरचा तुटवडा भासू नये, यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. राज्यात गॅस सिलिंडरची टंचाई जाणवू नये म्हणून सगळीकडे पीएनजी कनेक्शन घेण्याच्या प्रक्रियेला वेग देण्यात आला आहे. पाईप गॅस लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न आहे. त्याबाबतचा एक शासन निर्णय काढण्यात आला आहे. सगळ्या महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रात गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी अटी-शर्ती शिथील केलेल्या आहेत. या गॅस पाईप लान टाकल्या तर एलपीजीची गरज भासणार नाही.”
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आजूबाजूच्या देशात लॉकडाऊन सुरू असताना आपल्या देशात मात्र त्यावर कोणताही नकारात्मक परिणाम झाला नाही. तेलाच्या किमती वाढल्या असल्या तरी त्याचा परिणाम सामान्य ग्राहकांवर पडू दिला नाही. एलपीजी गॅसचाही कुठेही तुटवडा नाही. देशात जर कुणी अफवा पसरवून गोंधळाची स्थिती निर्माण करत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.”

जागतिक घडामोडींमुळे इंधनाच्या किमतींवर किंवा पुरवठ्यावर तात्पुरता परिणाम होऊ शकतो, मात्र परिस्थिती नियंत्रणात असल्याचे आश्वासन सरकारने दिले आहे. “नागरिकांनी कोणत्याही अपुऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नये किंवा घाबरून जाऊन साठा करू नये. प्रशासन परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे,” असे आवाहनही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.

शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्यांचा श्रीराम कर्तव्यपूर्ती पुरस्काराने गौरव

पुणे : कसबा पेठेतील श्रीराम चव्हाण मंदिरातर्फे श्रीराम नवमीनिमित्त शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्यांचा श्रीराम कर्तव्यपूर्ती पुरस्कराने गौरव करण्यात आला. मंदिर परिसरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, निवृत्त पोलीस अधिकारी भानुप्रसाद बर्गे, माजी महापौर अंकुश काकडे, गौरी गणेश बिडकर, अप्पासाहेब गायकवाड, नगरसेवक देवेंद्र वडके, दत्ताभाऊ सागरे, संयोजक गणेश चव्हाण, भोला वांजळे यांची प्रमुख उपस्थिती होती. चव्हाण परिवार, श्रीराम अभिमन्यू मंडळ ट्रस्ट, चक्रवर्ती अशोक मंडळ ट्रस्ट यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

वंचित मुलांसाठी कार्य करणाऱ्या डॉ. अनुराधा सहस्त्रबुद्धे, वृक्षारोपणाचे कार्य करणारे राज देशमुख, महिला, मुलींचे पुनर्वसन करणाऱ्या शिला शेट्टी, समाजसेवक दिनेश शहा, सामाजिक कार्यकर्त्या वनिता अंबिके, संध्या गायकवाड, सारिका अगज्ञान, ॲड. परेश खाडिलकर यांचा या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि सामाजिक कार्यातील योगदानासाठी म्हणून अकरा हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते.

प्रास्ताविकात गणेश चव्हाण म्हणाले, प्रभू श्रीरामांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रसेवा आणि समाजसेवेत योगदान देणाऱ्या व्यक्तींचा दरवर्षी श्रीराम कर्तव्यपूर्वी पुरस्काराने सन्मान करण्यात येतो.

मान्यवरांचे स्वागत राहुल पारखी, रणजीत चौधरी, भारती चव्हाण, देवेंद्र वडके, दिलीप मोरे, हर्षल परदेशी, राजेश जोशी, दत्ताभाऊ सागरे यांनी केला.