Home Blog Page 114

आंदेकरांनी केलेल्या १६ विकसन करारनाम्यांची चौकशी सुरु

पुणे- आंदेकर टोळीतील टोळीप्रमुख सुर्यकांत उर्फ बंडु रानोजी आंदेकर याचेसह एकूण १६ आरोपींना आयुष कोमकर खुन प्रकरणात अटक करण्यात आली असुन त्यामध्ये आंदेकर कुटुंबातील ०३ महिलांचा गुन्हयात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना गुन्हयात अटक करण्यात आली आहे.या प्रकरणाच्या चौकशी दरम्यान आता आंदेकरांनी केलेल्या १६ विकसन करारनाम्यांची चौकशी सुरु करण्यात आली असून आंदेकर टोळीतील सदस्य व नातेवाईक यांची ३७ बँक खात्यातील १,४७,००,०००/- रक्कम (डेबीट फ्रिज) करण्यात आली आहे.आणि त्यांच्या मालमत्तेचा पोलीस शोध घेत नोंदवून घेतली जाते आहे.


समर्थ पोलीस स्टेशन मध्फिये यार्दी सौ. कल्याणी गणेश कोमकर, वय-३७ वर्षे, काम-गृहिणी, रा. ५ वा मजला, लक्ष्मी कॉम्प्लेक्स, खाकसार मस्जीदरच्या पाठीमागे, नवरंग मित्र मंडळजवळ, भवानी पेठ, पुणे यांचा मुलगा आयुष कोमकर वय १८ वर्षे यास दि. ०५/०९/२०२५ रोजी रहाते सोसायटीचे पार्कीगमध्ये आंदेकर टोळीतील सदस्य अमन पठाण व यश पाटील यांनी पिस्टलमधुन फायरींग करुन त्याचा खुन केला आहे.
या गुन्हयाचे तपासात गुन्हयाचे तपासात आरोपी- मुनाफ पठाण याने गुन्हयातील व राउंड कृष्णा आंदेकर यास पुरविल्याने तसेच सोनाली वनराज आंदेकर हिचा गुन्हयात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना देखील गुन्हयात अटक करण्यात आली आहे. बंडु आंदेकर व त्याची मुलगी वृंदावणी वाडेकर यांचे घरातील सीसीटिव्ही फुटेज डिलीट करणारा त्यांचे टोळीचा विश्वासु सदस्य मोहन चंद्रकांत गाडेकर यास दि. २६/०९/२०२५ रोजी अटक केली असुन त्यास न्यायालयात हजर केले असता त्याची दि. १०/१०/२०२५ रोजी पर्यत न्यायालयीन कस्टडी दिली आहे. गुन्हयाचे तपासात ०२ पिस्टल, ०४ चारचाकी, ०४ दुचाकी वाहने, आरोपींचे वापरते व घरात मिळुन एकूण २८ मोबाईल फोन, सोन्याचे व चांदीचे दागिनेरोख रक्कम असा एकुण ९५,२९,४००/- रू. चा माल जप्त करण्यात आला असुन आंदेकर टोळीतील सदस्य व नातेवाईक यांची ३७ बँक खात्यातील १,४७,००,०००/- रक्कम (डेबीट फ्रिज) करण्यात आली आहे.
आंदेकर कुटुंबाची निष्पन्न मालमत्ता
१) बंडु आंदेकर याची फुरसुंगी येथील २४.५ गुंठे जागा, कोथरूड येथील फ्लॅट, दोन दुकान गाळे, ३ मजली घर, नाना पेठेतील एक फ्लॅट, लोहियानगर येथील २ खोल्या, साईनाथ झोपडपट्टी हडपसर एक खोली २) वृंदावनी वाडेकर हिचे तीन मजली राहते घर, एक टपरी, साईनाथ झोपडपट्टी हडपसर येथे एक खोली ३) शिवम आंदेकर अगळांबे गाव, मुळशी येथे २२ गुंठे जागा, कोथरूड व नाना पेठ येथील फ्लॅट व दुकान ४) शिवराज आंदेकर नाना पेठ येथे फ्लॅट ५) सोनाली आंदेकरः नाना पेठ येथे दोन दुकान गाळे आंदेकर टोळीचे अंदाजे १७,९८,९३,०००/- रू. रक्कमेच्या निष्पन्न मालमत्तेचा तपास सुरू आहे. त्याचप्रमाणे १६ विकसन करारनामे तसेच त्यांचे हितसंबधित यांचे नावे असलेले मालमत्तेबाबत माहिती प्राप्त करण्याची कारवाई सुरू आहे. आंदेकर टोळीचे निष्पन्न मालमत्तेबाबत मोका कायदयातंर्गत कलम ४ प्रमाणे कारवाई करण्याची प्रकीया चालु आहे. नमुद गुन्हा दाखल झालेनंतर बंडु आंदेकर टोळीविरुध्द खंडणी मागितल्याचे प्रकरणात फरासखाना पो. स्टशेन येथे गुन्हा रजि. नं. १८२/२०२५ व सरकारी कामात अडथळा आणलेबाबत समर्थ पोलिस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं. २०४/२०२५ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच आंदेकर टोळीविरुध्द नागरीकांच्या तक्रारी प्राप्त होताच कारवाई करण्याची प्रक्रीया चालु आहे. गुन्हयाचा तपास पोलीस आयुक्त अमितेश कुमार व सह पोलिस आयुक्त रंजन कुमार ,अपर पोलीस आयुक्त, गुन्हे पंकज देशमुख, यांच्या मागदर्शनाखाली सहायक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा शंकर खटके व अधिकारी व अंमलदार हे करीत आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवर: हर्षवर्धन सपकाळ.

पुण्यात पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांची आढावा बैठक संपन्न, स्थानिक निवडणुका व नैसर्गिक आपत्तीवर चर्चा.

पुणे –

महाराष्ट्रावर प्रचंड मोठे नैसर्गिक संकट ओढवले आहे, ५० लाख हेक्टर पेक्षा जास्त शेतीचे नुकसान झाले आहे, १०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला तर शेकडो जनावरे दगावली आहेत. राज्यात अत्यंत विदारक चित्र असताना महायुती सरकार त्याकडे गांभिर्याने पहात नाही. महाराष्ट्र संकटात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारमधील एकही मंत्री महाराष्ट्रातील नुकसानीची पाहणी करण्यास आला नाही, शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यास आले नाहीत. पुढील महिन्यात पंतप्रधान महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यावेळी तरी ते शेतकऱ्यांचे अश्रू पुसणार आहेत का? असा रोखठोक सवाल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी विचारला आहे.
पुण्यात पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांची आढावी बैठक प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीला काँग्रेस कार्यसमितीच्या सदस्य़ खासदार प्रणिती शिंदे, विधान परिषदेचे गटनेते सतेज बंटी पाटील, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप, पृथ्वीराज साठे, कोषाध्यक्ष अभय छाजेड, वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, शहराध्यक्ष अरविंद शिंदे आदी उपस्थित होते.

यावेळी पत्रकारांशी बोलताना रमेश चेन्नीथला पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील शेतकरी संकटात असताना सरकारची मदत मात्र अद्याप मिळालेली नाही. हेक्टरी ५० हजार रुपये देण्याची मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे पण सरकारने एक दमडीही दिलेली नाही. फक्त मदतीच्या पोकळ घोषणा करण्यात आल्या आहेत. महायुतीने निवडणुकीत शेतकरी कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते. आता हीच योग्य वेळ आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची पण सरकार मात्र त्यावर काहीच बोलत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कालच दिल्लीत जाऊन पंतप्रधानांना भेटले. यावेळी त्यांनी राज्यातील गंभीर परिस्थितीची माहिती देऊन भरीव पॅकेज घेऊन येणे क्रमप्राप्त होते पण मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या मदतीपेक्षा गडचिरोलीतील खाण उद्योगपतीचीच जास्त चिंता आहे. मुख्यमंत्र्यांनीही पंतप्रधान मोदी यांच्याशीही खाण उद्योग व मुंबईतील फिनटेक परिषदेसंदर्भातच चर्चा केली आणि शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज न घेताच रिकाम्या हाताने महाराष्ट्रात परतले.

शेतकरी संकटात पण जिल्ह्याधिकारी नाचण्यात मस्त..
मराठवाड्यात अत्यंत गंभीर परिस्थिती आहे, शेतकरी संकटात आहे, दुखःत आहे असे असतानाही धाराशिवचे जिल्हाधिकारी व तहसिलदार मात्र बॉलिवूडच्या गाण्यावर नाचत आहेत, हे असंवेदनशिल असून हे काय चालले आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांना परिस्थितीचे काही गांभीर्य आहे का नाही, असा सवाल रमेश चेन्नीथला यांनी विचारला..

निवडणूक आयोगाची भूमिका भाजपधार्जिणी..
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत VV Pat वापरणार नाही असा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे, हा निर्णय भाजपाला मदत करणारा आहे त्यावर काँग्रेसला हरकत आहे व त्याची रितसर तक्रार केली जाणार आहे. स्थानिक निवडणुका घ्या असे सुप्रीम कोर्टाला सांगावे लागले कारण राज्य सरकारला या निवडणुका घेण्यात स्वारस्य नाही. निवडणूक आयोग निष्पक्ष असायला हवे पण ते सत्ताधारी भाजपाकडे पूर्णपणे झुकले आहे. लोकांना निवडणुकांवर संशय येऊ लागला आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दोन पत्रकार परिषद घेऊन पुराव्यासह मतचोरीचा पर्दाफाश केला पण निवडणूक आयोग मात्र त्यावर खुलासा करु शकला नाही, असेही रमेश चेन्नीथला म्हणाले.

आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवर-
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेश हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, निवडणुका हा विषय समोर येताच आघाडीचा प्रश्न विचारला जातो परंतु आपला पक्ष वाढला पाहिजे ही प्रत्येक पक्षाची भूमिका असते. युती, आघाडीमुळे संघटनेला फटका बसत असतो पण संघटनेचा विस्तार झाला पाहिजे यादृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आघाडी व युती संदर्भातला निर्णय स्थानिक पातळीवर घेण्याचे अधिकार दिले आहेत आणि याबाबत आमच्या मित्रपक्षांनाही अवगत करण्यात आले आहे असेही सपकाळ म्हणाले.

पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांची आढावा बैठक…
पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक पुण्यात पार पडली, यावेळी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यात आला. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, मुल्यांकन, नियोजन व अंमलबजावणी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्तीवर, शेतकऱ्यांच्या मदतीवरही यावेळी चर्चा करण्यात आली.

विद्यार्थ्यांनो, तक्रारखोर नको; एकाग्र, आनंदी आणि सकारात्मक राहा

पद्मभूषण डाॅ. ज्येष्ठराज जोशी यांचे आवाहन; विद्यार्थी सहायक समितीतर्फे आयोजित विशेष व्याख्यान

पुणे: “आर्थिक समृद्धीचे मार्ग प्रामुख्याने विज्ञान-तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपलब्ध होतात. त्यासाठी व्यक्ती आणि समाज, दोन्ही घटक महत्त्वाचे असतात. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी समतोल समाज गरजेचा असतो. त्यातूनच वैज्ञानिक व तांत्रिक संशोधनाला पूरक ठरणाऱ्या सर्जनशील वातावरणाची निर्मिती होते. समाजाचा समतोल व्यक्तींच्या मनाची एकाग्रता, सकारात्मकता आणि आनंदी मनोवस्थेवर अवलंबून असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तक्रारखोर न होता सकारात्मक, एकाग्र आणि आनंदी राहावे,” असा सल्ला मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष, प्रख्यात रासायनिक अभियंता, अणुशास्त्रज्ञ आणि अध्यापक पद्मभूषण डाॅ. ज्येष्ठराज जोशी यांनी विद्यार्थ्यांना दिला.

विद्यार्थी सहायक समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विशेष व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते. यावेळी समितीचे कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर, मराठी विज्ञान परिषदेच्या विश्वस्त शशिताई भाटे, परिषदेचे विनय र. र. व्यासपीठावर उपस्थित होते. ‘हवामान बदल, तापमानवाढ – अभिनव संशोधन आणि सर्जनशीलता’, असा डाॅ. जोशी यांच्या व्याख्यानाचा विषय होता. विद्यार्थी सहायक समितीच्या सेनापती बापट रस्त्यावरील शिवाजी हौसिंग सोसायटी संकुलात हे व्याख्यान झाले.

रंगीत पारदर्शिकांच्या साह्याने डाॅ. जोशी  विषयाची मांडणी केली. कार्बनडाय ऑक्साईड, नायट्रोजन, मिथेन आणि फ्लोरिमेटेज वायू, यांचे प्रमाण वातावरणात अतिरिक्त झाल्याने जागतिक तापमानवाढीचे संकट घोंघावत आहे. त्यामध्ये कोळसा, तेल आणि नैसर्गिक वायू (गॅस) यांच्यामुळे सर्वाधिक प्रदूषण होते. कार्बन उत्सर्जन कमी करणे, हाच उपाय आहे. मात्र, वास्तवात हे प्रदूषणकारी घटक अधिकाधिक वापरले जात असल्याचे चित्र, डाॅ. जोशी यांनी सर्वांसमोर ठेवले.

उद्योग, शेती आणि सेवाक्षेत्र हे देशाचे संपत्ती निर्माण करणारे प्रमुख स्रोत असतात. त्यापैकी उद्योग या क्षेत्रात आपला वाटा जागतिक पातळीवर एक टक्काही नाही. सेवा क्षेत्राद्वारा आपण प्रामुख्याने जगाची हमाली करतो. शेतीविषयी न बोललेले बरे, अशी अवस्था आहे. उद्योग क्षेत्र आणि शैक्षणिक क्षेत्र, यांच्यात समन्वय नाही. शेतकरी तर कायमच नाडलेला असतो. प्रत्येक क्षेत्राचा सूर सदैव तक्रारीचा असतो आणि तक्रारी करणारा देश कधीच प्रगती करू शकत नाही, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे, असे सांगून डाॅ. जोशी म्हणाले, ‘तक्रारीचे सूर बंद करण्यासाठी स्वतःमधील एकाग्रता वाढवत न्या, स्वतःला आनंदी ठेवा, सकारात्मक राहा. तक्रारखोर माणसे कुठलीही नवनिर्मिती करू शकत नाहीत. केंद्र शासनाने भावी काळासाठी ५ अमृतबिंदू, ही भारताची बांधीलकी राहील, असे जाहीर केले आहे. २०३० पर्यंत भारत ५०० गिगावॅट बिगरजीवाश्म इंधन कमी वापरेल, अक्षय उर्जेद्वारा ५० टक्के उर्जेची बचत करेल, कार्बन उत्सर्जनात एक अब्ज टनांनी कपात करेल, कार्बन तीव्रता ४५ टक्क्यांपेक्षा कमी करेल आणि २०७० पर्यंत नेट झीरोचे उद्दिष्ट गाठेल, अशी ही पाच आश्वासने आहेत. बायोमास, रिफायनरीज त्याचप्रमाणे टायटॅनियम धातूच्या निर्यातीमधील मोठ्या शक्यता, कार्बन नॅनो ट्यूब्सची निर्मिती याविषयीचे विवेचनही डाॅ. जोशी यांनी केले. त्यातून बुलेटप्रूफ जॅकेट्सची आयात पूर्ण बंद करणे शक्य झाले असून, आता आपण ही जॅकेट्स निर्यात करू शकतो, अशी माहिती त्यांनी दिली.

समितीच्या कार्याची माहिती देणारी दृकश्राव्यफीत सुरवातीला दाखविण्यात आली. समितीच्या डाॅ. ज्योती गोगटे यांनी व्याख्यानविषयाची माहिती दिली. भाटे यांनी मराठी विज्ञान परिषदेच्या उपक्रमांची माहिती सांगितली. पल्लवी भोसले यांनी परिचय करून दिला. विनय र. र. यांनी आभार मानले, तर अमोल झीरमिले यांनी सूत्रसंचालन केले.

अणुउर्जा आणि रिअक्टर्स
अणुऊर्जा हा सर्वांत मोठा, सुरक्षित उर्जास्रोत आहे. त्यासाठी आपल्या संशोधकांनी स्माॅल आणि मायक्रो माॅड्यूलर रिॲक्टर्सची निर्मिती केली आहे. कमी गुंतवणूक पण परतावा लवकर आणि अधिक, उभारणीसाठी कमीत कमी बांधकाम, मेक इन इंडियाचा उद्देश सफल आणि चांगल्या संख्येने रोजगारनिर्मिती, असे या रिॲक्टर्सचे फायदे आहेत. अर्थसंकल्पातही अणुउर्जा मिशन अंतर्गत अशा रिॲक्टर्सच्या निर्मितीसाठी २० हजार कोटींची तरतूद केली आहे. तसेच या रिॲक्टर्सची ५ स्वदेशी डिझाईन्स तयार करण्यासाठी भरीव तरतूद आहे. अणुउर्जा कायद्यात दुरुस्ती करण्यात आली आहे. ३० गिगावॅट अणुउर्जा निर्मितीसाठी ६२ अब्ज डॉलर्स गुंतवणुकीची घोषणा करण्यात आली आहे.

प्रशांत दामले हे “नट” म्हणून आणि “माणूस” म्हणून ही श्रेष्ठ – त्यांचे समाज कार्य उल्लेखनीय – संदीप खर्डेकर

अभिनेते “प्रशांत दामले” यांचा विक्रमी 13333 वा प्रयोग 16 नोव्हेंबरला होणार – ना. चंद्रकांतदादा पाटील.

“कोथरूड नवरात्र उत्सवात क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे विविध संस्थांना लोकोपयोगी वस्तू भेट”

पुणे-प्रशांत दामले हे अत्यंत लोकप्रिय अभिनेते असून 16 नोव्हेंबर ला त्यांचा विक्रमी असा 13333 वा नाट्य प्रयोग सादर होईल त्यासाठी आपली तारीख राखून ठेवा असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान आयोजित कोथरूड नवरात्र महोत्सवात ” शिकायला गेलो एक” ह्या अफलातून विनोदी नाटकाच्या मोफत प्रयोगाच्या वेळी प्रशांत दामले यांचा पुणेरी पगडी, शाल व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी रंगमंचावर राज्यमंत्री माधुरी मिसाळ, क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, माजी नगरसेविका व शिक्षण समिती अध्यक्ष मंजुश्री खर्डेकर, कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान चे अध्यक्ष विशाल भेलके,सौ. श्वेताली भेलके,सांस्कृतिक महोत्सवाचे संयोजक उमेश भेलके,सौ. अक्षदा भेलके,कोथरूड दक्षिण मंडल अध्यक्ष कुलदीप सावळेकर, कोथरूड मध्य चे भाजपा मंडल अध्यक्ष निलेश कोंढाळकर, क्रिएटिव्ह फौंडेशन चे विश्वस्त प्रतीक खर्डेकर,सौ. कल्याणी खर्डेकर व इतर मान्यवर उपस्थित होते. क्रिएटिव्ह फाउंडेशन चे कार्य गौरवास्पद असून मी संदीप खर्डेकर यांची वाटचाल व त्यांचे कार्य गेली 35 वर्षे बघत आली आहे असे माधुरी मिसाळ म्हणाल्या.नवरात्रीतच नव्हे तर कायमच स्त्री शक्ती चा सन्मान केला पाहिजे असेही त्या म्हणाल्या.
यावेळी चंद्रकांतदादा करत असलेल्या सामाजिक कार्याबद्दल एक संवेदनशील नेतृत्व म्हणून त्यांचा विशाल भेलके, उमेश भेलके व प्रतीक खर्डेकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सन्मान करण्यात आला तर संघर्षातून उभं राहिलेलं नेतृत्व म्हणून माधुरी मिसाळ यांचा सौ. मंजुश्री खर्डेकर, सौ. श्वेताली भेलके व सौ. अक्षदा भेलके यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने श्रमदान मारुती मंडळ ग्रंथालयास अजय कोंढरे व मोहनीश सावंत यांना अकरा हजाराची मदत देण्यात आली, तसेच कुंबरे गार्डन गणेशोत्सव मंडळाचे ऋषिकेश कुंबरे व स्वर्गीय रखमाबाई ताडगे प्रतिष्ठान चे अध्यक्ष अनिल ताडगे यांना स्पीकर सेट भेट देण्यात आली.बाहेर मुसळधार पाऊस आणि
तुडुंब भरलेल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात ” शिकायला गेलो एक ” च्या प्रयोगात हास्याचा धबधबा कोसळत होता असे संयोजक संदीप खर्डेकर म्हणाले. अश्या पावसात देखील कोथरूडकर सर्व कार्यक्रमांना गर्दी करत आहेत यावरूनच दर्दी प्रेक्षकांची पारख होते असेही खर्डेकर म्हणाले. यापुढील काळात अधिक व्यापक स्वरूपात सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करणार असल्याचे मंजुश्री खर्डेकर, श्वेताली भेलके व अक्षदा भेलके यांनी जाहीर केले.

550 कोटीच्या भूखंडाचे श्रीखंड लाटले कोणी ? आरक्षण उठविण्यास महापालिकेतील कोणी केले कट कारस्थान

पुणे- बाणेर मधील हॉटेल सदानंद शेजारील सुमारे दीड एकराच्या म्हणजे ५५० कोटी रुपयांच्या भूखंडावरील आरक्षण उठविण्यासाठी कोर्टात न लढता शांत बसून सहाय्य करणाऱ्या महापालिकेतील अधिकाऱ्यांची नावे आता जाहीर करा आणि या भूखंडावरील आरक्षण पुन्हा पूर्ववत करा अशी मागणी आता महापालिका आयुक्तांकडे करण्यात येते आहे.

या संदर्भात आपले पुणे आपला परिसर चे आणि महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते उज्वल केसकर , सुहास कुलकर्णी आणि माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी महापालिका आयुक्तांना याबाबत त्वरित अभ्यास करून निर्णय घ्यावा असे आवाहन केले आहे

त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे कि,’पीएमपीएमएल यांनी पुणे महानगरपालिकेला आरक्षणाच्या जागा मागितल्या आहेत.
बाणेर येथील सर्व्हे नंबर 105, 106, 110 पैकी. क्षेत्रफळ 7115 चौरस मीटर ही जमीन आरक्षण क्रमांक PMT -1 नियोजन प्राधिकरण पीएमसी असून या आरक्षणातील सर्व्हे नंबर 105(3) पैकी क्षेत्रफळ 7115 चौरस मीटर म्हणजे जवळपास 76 हजार चौरस फूट (दिड एकर) ही जमीन बांधकाम व्यावसायिक मालक, महानगरपालिकेचे अधिकारी आणि राज्य सरकारच्या नगर विकास विभागातील अधिकारी यांच्या संगनमताने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी असणारे आरक्षण व्यपगत (उठविण्यात आले ) झाले आहे.हे फार मोठे कटकारस्थान असून
महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी महानगरपालिकेचे हित न सांभाळता बांधकाम व्यवसायिकाचे हित सांभाळले आहे.
महानगरपालिकेने यासाठी आर्थिक तरतूद देखील केलेली होती परंतु मोजणीला उशीर लागल्यामुळे संबंधित व्यक्ती ही हायकोर्टामध्ये गेली त्यावेळी महानगरपालिकेने हायकोर्टामध्ये आपली बाजू देखील मांडली नाही त्यामुळे हायकोर्टाने निर्णय दिला हायकोर्टाच्या या निर्णयाला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान देण्याची आवश्यकता होती दुर्दैवाने पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनाने तेही काम केले नाही आणि बाणेर येथील जवळपास साडेपाचशे कोटी रुपयाचा भूखंड जो पीएमटी साठी आरक्षित होता तो मोकळा झालाय.
अजूनही वेळ गेलेली नाही. महानगरपालिका व पीएमपीएमएल हे हायकोर्टामध्ये Review Petition दाखल करू शकतात आणि गरज भासल्यास सुप्रीम कोर्टामध्ये देखील दाद मागू शकतात दुर्दैवाने महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी याकडे सोयीस्कर “दुर्लक्ष” केले
हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा असून पुणेकर जनतेवर केलेला अन्याय आहे.ही पीएमटी साठी आरक्षित असणारी जमीन जनहितासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी आणि पुणेकरांसाठी मिळाली पाहिजे अशा प्रकारची आमची भूमिका आहे.
पुणे मनपा ने राज्य सरकार कडे अपील करून हा आदेश बदलून घेऊन ही जमीन मोकळी केली पाहिजे हे पाप पुणेकर कधीच विसरणार नाही.
कोणा व्यक्तीचे हित न सांभाळता पुणेकरांचे हित बघितले पाहिजे असे आमचे महापालिका आयुक्तांना आवाहन आहे.
बांधकाम व्यावसायिकांची हिंम्मत कशी होते “सार्वजनिक वाहतूक” व्यवस्थेचे आरक्षण उठवण्याची.नवीन आयुक्त नवल किशोर राम यांनी याबाबत सर्व फाईल मागवून यावर योग्य ती कार्यवाही करावी अशी आमची मागणी आहे. पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी योग्य ती पावले उचलणे आवश्यक आहे.डबल डेकरसह नवीन दोनशे बस येणार आहेत परंतु डेपोसाठी जागा नसेल तर काय? हा प्रश्न आहे तसेच डेपोसाठी आरक्षित असणाऱ्या जागा व्यावसायिक कारणासाठी विकसित करण्याचा निर्णय देखील अनाकलनीय आहे. आरक्षित जागा नुकसान भरपाई देऊन महानगरपालिकेने ताब्यात घ्यायच्या आणि त्यात जागा महापालिका आणि पीएमपीएमएल यांनी त्या बांधकाम व्यवसायिकांच्या ताब्यात द्यायच्या हे षडयंत्र आहे.गरज भासल्यास नागरिकांच्या वतीने Review Petition दाखल करू.
असे केसकर,कुलकर्णी आणि बधे यांनी म्हटले आहे .

मशाल मोर्चातून महाराष्ट्र युवक काँग्रेसचा मतदान चोरी आणि बेरोजगारीविरोधात सरकारला इशारा!

पुणे : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे आज पुण्यात भव्य मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले. शेकडो युवकांनी हातात मशाली घेऊन “मतदान चोरी बंद करा”, “तरुणांना नोकरी द्या”, “लोकशाही वाचवा” अशा आक्रमक घोषणा युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवाजी मोरे यांच्या नेतृत्वात देत रस्त्यावर उतरून सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.

या मोर्चामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संताप व्यक्त करत म्हटले की –”सरकारने लोकशाहीची गळचेपी करून निवडणुकांमध्ये उघडपणे मतदान चोरी केली आहे. बेरोजगारीचा राक्षस प्रत्येक तरुणाच्या आयुष्याशी खेळत आहे. युवकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न झाला तरी आम्ही गप्प बसणार नाही. ही मशाल आता तरुणांच्या हातून उठलेली ज्वाला आहे, जी भ्रष्ट सत्तेला राखेत मिळवेल.”

त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांनी आक्रमक भाषेत सरकारला इशारा देत म्हटले “युवकांच्या भविष्याशी गद्दारी करणाऱ्या या सरकारला आम्ही रस्त्यावर उतरून सणसणीत उत्तर देत आहोत. मतदान चोरी करून सत्तेत आलेले लोकशाहीचे खुनी आम्ही कधीच स्वीकारणार नाही. रोजगार, शिक्षण आणि हक्कासाठी लढणाऱ्या प्रत्येक तरुणाचा आवाज आज मशालीतून पेटला आहे. ही लढाई आता रस्त्यावरून संसदेत जाईल आणि जनता हुकूमशाही पाडूनच थांबेल.”

या मशाल मोर्चामध्ये हर्षवर्धन सपकाळ, डॉ विश्वजीत कदम, प्रदेश प्रभारी अजय चिकारा, युवक प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे,माजी मंत्री सतेज (बंटी) पाटील,  अभय छाजेड, अरविंद शिंदे,मोहन जोशी मीडिया विभाग प्रमुख व युवक सरचिटणीस अक्षय जैन, सौरभ अमराळे आदी मान्यवर उपस्थित होते.

दिल्ली लैंगिक अत्याचार प्रकरण: आरोपी चैतन्यानंद​​​​​​​ला आग्रा येथून अटक

0

दिल्लीतील वसंत कुंज येथील श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंट-रिसर्चचे प्रमुख स्वामी चैतन्यनंद सरस्वती उर्फ ​​पार्थसारथी यांना शनिवारी रात्री उशिरा दिल्ली पोलिसांनी आग्रा येथून अटक केली. चैतन्यानंदवर अनेक विद्यार्थिनींच्या लैंगिक छळाचे गंभीर आरोप आहेत.

चैतन्यानंद फरार होता आणि त्याचे शेवटचे ठिकाण आग्रा येथे सापडले. दिल्ली पोलिसांच्या अनेक पथकांनी छापे टाकले होते. पोलिसांच्या मते,

आरोपी विद्यार्थिनींना धमक्या देऊन, अश्लील मेसेज पाठवून आणि परदेश दौऱ्याचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात अडकवत असे. तो अनेकदा रात्री उशिरा विद्यार्थ्यांना त्याच्या खोलीत बोलावून कमी गुण देण्याची धमकी देत ​​असे.


तपासादरम्यान सापडलेल्या व्हॉट्सअॅप मेसेजेसमधून असे दिसून आले की चैतन्यानंद विद्यार्थिनींना “बेबी,” “आय लव्ह यू,” आणि “आय अ‍ॅडॉर यू” असे मेसेज पाठवत असे आणि त्यांच्या केसांचे आणि कपड्यांचे कौतुकही करत असे.

पोलिस तपासात असेही आढळून आले की तीन महिला वॉर्डन आणि प्राध्यापक देखील आरोपीला मदत करत होते. त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या चॅट्स डिलीट करण्यास दबाव आणला आणि त्यांना गप्प राहण्यास सांगितले.
आरोपींनी आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या आणि शिष्यवृत्तीवर शिक्षण घेत असलेल्या EWS श्रेणीतील विद्यार्थिनींना लक्ष्य केले. पोलिसांनी सांगितले की, ३२ विद्यार्थिनींच्या मुलाखती घेण्यात आल्या, त्यापैकी १७ जणांनी थेट लैंगिक छळ आणि मानसिक छळाची तक्रार केली.

आतापर्यंत १६ विद्यार्थ्यांनी दंडाधिकाऱ्यांसमोर त्यांचे जबाब नोंदवले आहेत. काही विद्यार्थ्यांना आरोपींनी परदेशी दौऱ्यांचे आमिष दाखवून फसवल्याचेही उघड झाले.

विद्यार्थिनींना त्याच्या खोलीत बोलावून कमी गुण देण्याची धमकी द्यायचा

पोलिस तपासात असे दिसून आले की चैतन्यानंदने विद्यार्थिनींना धमकावण्याची आणि लाच देण्याची रणनीती वापरली. तो वारंवार अश्लील संदेश पाठवत असे.

त्याचे मेसेज असे असायचे की, “माझ्या खोलीत ये, मी तुला परदेशात घेऊन जाईन, तुला काहीही खर्च करावा लागणार नाही. जर तू माझे ऐकले नाहीस तर मी तुला परीक्षेत नापास करेन.” आरोपी रात्रीच्या वेळी महिला विद्यार्थिनींना त्याच्या खोलीत बोलावत असे आणि नकार दिल्यास त्यांना कमी गुण देण्याची धमकी देत ​​असे.

आरोपींविरुद्ध आधीच गुन्हे दाखल आहेत

स्वामी चैतन्यनंद सरस्वतीवर आधीच अनेक गुन्हेगारी खटले दाखल आहेत. २००९ मध्ये दिल्लीच्या डिफेन्स कॉलनीमध्ये त्याच्याविरुद्ध फसवणूक आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

२०१६ मध्ये वसंत कुंजमधील एका महिलेने त्याच्याविरुद्ध विनयभंगाचा खटला दाखल केला होता. तथापि, चैतन्यनंदच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारशी माहिती समोर आलेली नाही.

कला अनुभवाने जीवनात  येते समृद्धी : डॉ.मेधा कुलकर्णी

पुणे :

भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस्, पुणे आणि सेंटर फॉर कल्चरल रिसोर्सेस अँड ट्रेनिंग (मिनिस्ट्री ऑफ कल्चर), दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सेवा पर्व २०२५’ अंतर्गत आयोजित ‘विकसित भारत के रंग, कला के संग’  या चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शनिवार, २७ सप्टेंबर २०२५ रोजी एरंडवणे शैक्षणिक संकुलात पार पडलेल्या या स्पर्धेत शालेय गटात ७०० हून अधिक आणि महाविद्यालयीन गटात ३५० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले. एकूण १०८५ विद्यार्थ्यांनी  भाग घेतला.

या उपक्रमाचे उद्घाटन सकाळी १० वाजता भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेज सभागृहात झाले. यावेळी खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, सीसीआरटीचे अध्यक्ष डॉ. विनोद इंदुरकर, उपसंचालक दिबकर दास, स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस् चे संचालक प्रा. शारंगधर साठे आदी मान्यवर उपस्थित होते.र्धा शालेय गटासाठी सकाळी ११ ते दुपारी १ आणि महाविद्यालयीन गटासाठी दुपारी ३ ते ५ या वेळेत पार पडली. रंग, कल्पनाशक्ती आणि सृजनशीलतेने परिपूर्ण कलाकृतींमुळे वातावरण रंगतदार झाले. प्रत्येक विद्यार्थ्याला सीसीआरटी तर्फे प्रमाणपत्र देण्यात आले.संध्याकाळी ६ वाजता पारितोषिक वितरण व समारोप सोहळा संपन्न झाला. यावेळी विजेत्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे निवडक चित्रकृती दिल्ली येथील कला अकादमीमध्ये प्रदर्शित होणार आहेत.या उपक्रमामुळे पुण्यातील विद्यार्थी, शिक्षक आणि कलाकारांना कला व संस्कृतीच्या उत्सवाचा अविस्मरणीय अनुभव घेता आला.

  कार्यक्रमात अध्यक्षीय भाषण करताना डॉ. मेधा कुलकर्णी यांनी प्रथमत: अशा प्रकारची चित्रकला स्पर्धा आयोजित केल्याबद्दल भारती विद्यापीठाच्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस् आणि CCRT यांना शुभेच्छा दिल्या. विद्यार्थी व कला शिक्षकांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या की, उत्कृष्ट कला शिक्षकच खऱ्या अर्थाने विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व व भवितव्य घडवू शकतात. आज शालेय शिक्षणात कला विषयांना मिळालेल्या महत्त्वामुळे ही जबाबदारी कला शिक्षक अतिशय उत्तम रित्या पार पाडत असल्याचे दिसून येते. डॉ. कुलकर्णी पुढे म्हणाल्या, उद्याची पिढी ही या अनुभवांमुळे अतिशय समृद्ध असणार आहे.

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ. इंदुरकरांनी जीवनातील कलेचे महत्व अधोरेखित केले आणि मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. शालेय शिक्षणातील इतर व कला विषय हे वेगळे करताच येणार नाहीत. कलेच्या माध्यमातूनच इतर विषय अधिक उत्तमरीत्या समजू शकतात. संगीत, नृत्य, कीर्तन शिक्षण क्षेत्रातील दर्जा, कलेचे कार्य करण्याची धडाडी लक्षात घेता डॉ. इंदुरकर म्हणाले की, भारती विद्यापीठाच्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस् सोबत केलेला कराराअंतर्गत आता वर्षभर विविध उपक्रम राबविले जातील आणि याचा आम्हाला विशेष आनंद होत आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रा. शारंगधर साठे यांनी स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस् ची माहिती दिली. ते म्हणाले , ‘स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस् चे कलेतील कार्य बघून CCRT, नवी दिल्ली ने आमच्याशी सामंजस्य करार केला आहे. आजचा कार्यक्रम या करारातील पहिला कार्यक्रम होता. यातून विदयार्थ्यांना संधी मिळणार आहे’.

मुंबई,पुण्यात रात्रभर पाऊस,मुंबई- पुण्याला रेड अलर्ट

0

मुंबई: राज्यात मागील आठवडाभरापासून पावसाचा धुमाकूळ सुरू असून राजधानी मुंबईतही जोरदार सरी बरसत आहेत. हवामान खात्याने आज पुन्हा एकदा मुंबई शहराला रेड अलर्ट जारी केला असून मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई शहर आणि उपनगरात आज साधारणतः आकाश ढगाळ राहील. तसंच जोरदार ते अतिजोरदार पावसासह ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सोमवारी रत्नागिरी, सिंधुदुर्गातील पवासाचा जोर कमी होईल अशी शक्यता आहे. नाशिक घाट परिसराला रविवारी आणि सोमवारी दोन्ही दिवस रेड ॲलर्ट आहे. आज, रविवारी मात्र महामुंबईला रेड ॲलर्ट देण्यात आल्याने मुंबईकर धास्तावले असून, मेगा ब्लॉकच्या दिवशी पावसामुळे आणखी किती खोळंबा होतो, अशी चिंता निर्माण झाली आहे. दक्षतेचे आवाहन करण्यात आले.मुंबईत शनिवारी सकाळपासून रात्री आठ वाजेपर्यंतच्या १२ तासांमध्ये दिंडोशी येथे ३२.२, के पूर्व महापालिका विभाग कार्यालय येथे २४.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर शनिवारी रात्री आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये बेलापूर येथे ७२ मिलीमीटर, नेरुळ येथे ९१ मिलीमीटर, महापालिका मुख्यालय येथे ७२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

तमिळनाडूमध्ये अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, 36 जणांचा मृत्यू

0

शनिवारी संध्याकाळी तामिळनाडूतील करूर येथे अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी झाली, ज्यामध्ये ३६ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये १६ महिला आणि ८ मुलांचा समावेश आहे, असे तामिळनाडूचे आरोग्यमंत्री एम.ए. सुब्रमण्यम यांनी सांगितले. या अपघातात ५८ हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपये भरपाई जाहीर केली आहे. जखमींना प्रत्येकी १ लाख रुपये मिळतील.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता-राजकारणी विजय यांच्या पक्षाच्या तमिळगा वेट्टी कझगम (टीव्हीके) च्या रॅलीसाठी मोठ्या संख्येने लोक जमले होते. ९ वर्षांची एक मुलगी बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे. विजयने तिला शोधण्यासाठी मंचावरून पोलिस आणि त्याच्या समर्थकांना आवाहन केले, ज्यामुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली.

गर्दीत अडकल्यामुळे अनेकांना श्वास घेण्यास त्रास होत होता आणि अनेक लोक आणि कार्यकर्ते बेशुद्ध पडू लागले. परिस्थिती बिकट होताना पाहून विजयने आपले भाषण थांबवले आणि लोकांना शांततेचे आवाहन केले. त्यानंतर ते भाषण सोडून गेले.

विजयच्या रॅलीला १०,००० लोकांसाठी परवानगी होती. प्रशासनाने अंदाज लावला होता की, ५० हजार लोक जमतील. परंतु, तिथे सुमारे १ लाख २० हजार लोक जमले होते.

लोकमान्यनगरचे पुनर्वसन थांबविण्यामागे नेमकं रहस्य दडलंय काय ?

‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठा’च्या व्यवस्थापन परिषदेवर प्रसेनजीत फडणवीस

0

पुणे –

प्रसेनजीत फडणवीस यांची यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या (वायसीएमओयू, नाशिक) व्यवस्थापन परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

विद्यार्थी दशेपासून फडणवीस अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. २०१७-२०२२ या कालावधीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे ते सदस्य होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेचे सदस्य म्हणून गेली आठ वर्षे ते कार्यरत आहेत. अधिसभेत विविध विषयांवर त्यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली. ‘एसपीपीयू एज्युटेक फाऊंडेशन’च्या संचालक मंडळाचे ते सदस्य आहेत.

फडणवीस म्हणाले, “यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र असल्याने व्यापक स्वरूपात काम करण्याची संधी मिळणार आहे. सर्वांसाठी शिक्षण, मुक्त व दूरस्थ शिक्षण पद्धतीचा प्रसार, समाजातील सर्व घटकांसाठी अभ्यासक्रमांची उपलब्धता, स्वयंअध्ययन आणि लवचिकता, आजीवन शिक्षणाचा प्रचार कौशल्य विकास व व्यावसायिक शिक्षण ही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून काम करणार आहे.”

आयआयटी बॉम्बे येथील संशोधक प्राध्यापक डॉ. अक्षय निकूंभ आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर कॉलेजचे मनोहर गुजराथी यांचीही विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून निवड झाली आहे.

नवरात्रोत्सवानिमित्त ‘वर्दीतील नवदुर्गां’चा चित्रपट आणि नाट्य संस्थेतर्फे सन्मान

पुणे: नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून चित्रपट आणि नाट्य संस्था (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘वर्दीतील नवदुर्गा’ या उपक्रमांतर्गत पुणे शहरातील शिवाजीनगर, डेक्कन, कोथरूड, फरासखाना, खडक, स्वारगेट, चंदननगर, येरवडा व विमाननगर या नऊ पोलीस ठाण्यांमधील कर्तव्यदक्ष महिला पोलिस अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी सर्व महिला पोलिस अधिकाऱ्यांना सन्मानपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देत मिठाईचे वाटपही करण्यात आले.

या उपक्रमाला संस्थापक अध्यक्ष शुभम शशिकांत मोरे, सचिव अभिनेता चेतन दशरथ गिरी, बालगंधर्व टॅलेंट कट्टा अध्यक्ष निलेंद्र यादव, उपाध्यक्ष अभिनेता कुणाल देशमुख, संचालिका अभिनेत्री रश्मी बांदल, संचालिका अभिनेत्री अनुश्री ढम, आनंदी फाउंडेशनचे गणेश विटकर, सामाजिक कार्यकर्ते रोहित भिसे, दीपक भारती, रंगभूषाकार बालाजी गोरे, अनिल गायकवाड, सुधीर भालेराव, ओमकार जाधव, अनिकेत जगताप, मयूर कांबळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

शुभम मोरे म्हणाले, “आपल्या समाजजीवनात पोलिसांची भूमिका अत्यंत मोलाची आहे. २४ तास कर्तव्य बजावताना घरातील जबाबदाऱ्या आणि व्यावसायिक आयुष्याचा समतोल राखणाऱ्या महिला पोलिस अधिकारी खऱ्या अर्थाने आधुनिक नवदुर्गा आहेत. त्यांच्या त्याग, धैर्य आणि कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी हा उपक्रम गेली आठ वर्षे सातत्याने राबविला जात आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून पोलिस दलातील महिलांना एक वेगळी ऊर्जा व प्रेरणा मिळावी, हीच अपेक्षा आहे.”

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बीएसएनएलच्या स्वदेशी निर्मित ‘4जी’ सेवेचे लोकार्पण

बीएसएनएलच्या स्वदेशी 4जी सेवेमुळे महाराष्ट्र शासनाच्या अकराशे ऑनलाईन सेवा गावागावात मिळण्यात मदत होणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

▪ राज्यात नवीन ९ हजार ३० ‘4जी’ टॉवर्सच्या माध्यमातून लाखो लोकांना मिळणार सेवा

▪ स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित 4जी विकसित करणारा जगातला भारत पाचवा देश

पुणे, दि. २७: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या ‘4G’ तंत्रज्ञानाधारित सेवेचे लोकार्पण झारसुगुडा ओडिशा येथून दूरदृष्य प्रणालीद्वारे झाले. याअंतर्गत बीएसएनएलच्या ९२ हजार ६३३ टॉवर्सचे लोकार्पण झाले असून, यापैकी ९ हजार ३० टॉवर्स महाराष्ट्रात उभारले गेले आहेत. या माध्यमातून देशातील तसेच राज्यातील लाखो लोकांपर्यंत 4जी तंत्रज्ञान पोहोचणार असून महाराष्ट्र शासनाच्या अकराशे ऑनलाईन सेवा गावागावात पोहोचण्यात या कनेक्टिव्हिटीचा फायदा होणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते ‘4G’ नेटवर्कच्या दूरदृष्य प्रणालीद्वारे लोकार्पणानिमित्त साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक कला मंदीर येरवडा येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय युवक कार्य व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, भारती एअरटेलचे संस्थापक अध्यक्ष सुनील मित्तल, खासदार मेधा कुलकर्णी, बीएसएनएलचे मुख्य महाव्यवस्थापक हरिंदर कुमार, दूरसंचार विभागाचे विशेष महासंचालक आर. के. गोयल दी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्रात राज्य शासनाकडून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या अकराशे सेवा ऑनलाईन आणि व्हॉट्सॲपवर उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यातील ९० टक्के सेवा एन्ड टू एन्ड डिजीटल करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना बसल्या जागी त्याच्या अर्जाची माहिती मिळणार आहे. सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी खऱ्या अर्थाने करण्यात येत आहे. नागरिकांना आपल्या मोबाईलवरून सेवा उपलब्ध करून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासाठी कनेक्टिव्हिटी असणे आवश्यक आहे. गावोगावी भारतनेटच्या माध्यमातून फायबर सेवा उपलब्ध करून देण्यात येत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना धन्यवाद दिले आणि बीएसएनएलचे अभिनंदन केले.

बीएसएनएलच्या ९२ हजार ६३३ टॉवर्सचे लोकार्पण होणे ही आनंदाची बाब असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, यातील ९ हजार ३० टॉवर्स महाराष्ट्रातील आहे. देशातील २४ हजार ६८० हजार गावांना या टावर्सच्या माध्यमातून ‘4जी’ नेटवर्क उपलब्ध होणार आहे. देशाला विकसीत करण्यासाठी परस्पर दळणवळण (कम्युनिकेशन) महत्वाचे आहे. २१ व्या शतकाच्या सुरुवातीला तत्कालीन प्रधानमंत्री स्व. अटलबिहारी वाजपेयी यांनी विकासाचा मार्ग हा दळणवळण असल्याचे म्हटले होते. त्यांनी दळणवळणाच्या दृष्टीने देशाला आणि गावांना रस्त्यांच्या माध्यमातून जोडण्यासाठी सुवर्ण चतुष्कोन योजना आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सुरू केल्या. आता २१ व्या शतकात विकासासाठी केवळ रस्तेच नाही तर कनेक्टिव्हिटी महत्वाची असल्याचे लक्षात आले. मोबाईल कनेक्टीव्हीटी आणि इंटरनेट गावात पोहोचविल्याशिवाय या शतकातील विकास गावापर्यंत पोहोचविता येत नाही. त्यामुळे गावागावात हे तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी 4जी टॉवर्सची निर्मिती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात झाली.

सुरूवातीला स्वतःचे 4जी तंत्रज्ञान फिनलँड, स्वीडन, चीन आणि दक्षिण कोरिया या चार देशांकडे होते. चीन हे तंत्रज्ञान देण्यासाठी सहकार्य करणार नव्हते. त्यामुळे आत्मनिर्भर भारत करण्यासाठी तंत्रज्ञान निर्मितीसाठी देशातील कंपन्यांना एकत्रित करून प्रयत्न सुरू झाले. सी-डॉट, तेजस, आयआयटी, तेजस, टीएसएस आणि बीएसएनएल यांनी शुद्ध, देशी तंत्रज्ञानावर आधारित 4जी तंत्रज्ञानाची निर्मिती करून भारत या क्षेत्रातील पाचवा देश बनला आहे. भारताला ज्या-ज्यावेळी कोणी आव्हान दिले त्यावेळी भारताने आपली क्षमता दाखवून दिली आहे. भारतातील ज्ञान, तेज, कर्मण्यते्द्वारे आपण जगाला उत्तर देऊ शकतो आणि आजचा कार्यक्रम त्याचाच एक भाग आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

गावात इंटरनेट पोहोचते तेव्हा आपण गावाला जगाशी जोडत असतो. आरोग्य, शिक्षण क्षेत्रासाठी कनेक्टीव्हीटी महत्वाची आहे. शेतकऱ्यांना हवामानाची, वातावरण बदलाची माहिती देवून त्यांचे नुकसान टाळता येते. स्मार्ट व्हिलेजच्या सहाय्याने गावातील सर्व व्यवस्था उत्तम करता येतात. उद्योग, शेती, बाजारासाठी कनेक्टीव्हीटी महत्वाची आहे. कनेक्टीव्हीटीमुळे व्यवस्थेत परिवर्तन होण्यासोबत पारदर्शकता येते. तंत्रज्ञान ही भेदरहित व्यवस्था आहे. ते गावापर्यंत पोहोचविण्याचे साधन म्हणजे ही 4जी कनेक्टिव्हिटी आहे. या टॉवर्समध्ये 5जी मध्ये अद्ययावत होण्याची क्षमता आहे. तंत्रज्ञान निर्माण करण्यात यश आल्याने जगाच्या एक पाऊल पुढे जाण्याची आपली तयारी आहे, असे श्री. फडणवीस यांनी सांगितले.

बीएसएनएलची स्वदेशी ‘4जी’ची यशोगाथा जगात उल्लेखनीय ठरेल-एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, आत्मनिर्भर सशक्त भारताच्या दृष्टीने आजचा क्षण अत्यंत महत्वाचा आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने आपली ओळख निर्माण केली आहे. औद्योगिक क्रांतीच्या नंतरचे हे सर्वात मोठे अभियान आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारताने एक महासत्ता म्हणून आपले स्थान पक्के केले आहे.

बीएसएनएल आता नफ्यात आले असून पुढे जात असल्याचा आनंद आहे. स्वदेशी ‘4जी’ तंत्रज्ञान विकसित करून डिजिटल भारताकडे आपली वाटचाल सुरू आहे. बीएसएनएल पुढे जाण्यासाठी हे तंत्रज्ञान म्हणजे महत्वाचे पाऊल आहे. जे अमेरिकेला साध्य झाले नाही ते भारताने करून दाखविले आहे. ग्रामीण भागाला, ग्रामीण भागात शिक्षण, दूरस्थ आरोग्य सेवा (टेलिमिडेसिन), पर्यटन आदीला याचा फायदा होईल. बीएसएनएलची स्वदेशी ‘4जी’ची यशोगाथा जगात उल्लेखनीय ठरेल. या तंत्रज्ञानामुळे बीएसएनएलचा नवा प्रवास सुरू होत आहे. २०४७ पर्यंत विकसित भारताचे प्रधानमंत्री श्री. मोदी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे जे सहाय्य लागेल ते महाराष्ट्र करेल, असेही श्री. शिंदे म्हणाले.

केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती खडसे म्हणाल्या, प्रधानमंत्री यांचे आत्मनिर्भरतेचे स्वप्न बीएसएनएलच्या माध्यमातून पूर्ण होताना दिसत आहे. स्वदेशी 4जी तंत्रज्ञान फक्त २२ महिन्यात विकसित करून भारताने जगात नवी ओळख निर्माण केली आहे. नेटवर्किंग, संरक्षण क्षेत्र, अवकाश विज्ञान, माहिती तंत्रज्ञान आदी क्षेत्रात भारताची क्षमता जगासमोर येऊ लागली आहे. पुढील काळात आपण 5जी आणि 6जी कडे जाणार आहोत. या नेटवर्कच्या माध्यमातून ग्रामीण, आदिवासी भागात जाणार असून २५ हजार ठिकाणी पोहोचणार आहोत. स्वतःचे तंत्रज्ञान विकसित झाल्याने राष्ट्रीय सुरक्षेसाठी हे अत्यंत महत्वाचे पाऊल आहे, असेही त्या म्हणाल्या.

प्रास्ताविकात हरिंदर कुमार यांनी महाराष्ट्रात ९ हजार ३० टॉवर्सचे उद्घाटन होत असून त्यात डिजीटल भारत निधी 4जी प्रकल्पांतर्गत २ हजार १७४ टॉवर्सचा समावेश आहे. राज्य शासनाने २ हजार ७५१ टॉवर्ससाठी विनामूल्य जमीन उपलब्ध करून दिली असून वीजेची व्यवस्था, टॉवर्सपर्यंत पोहोचण्याचा रस्त्यांचा अधिकार (राईट ऑफ वे) आदी सुविधांद्वारे सहकार्य केले आहे. आगामी काळात ९३० अतिरिक्त टॉवर्सद्वारे जोडणी नसलेल्या गावांपर्यंत पोहणार असल्याची माहिती दिली.

महावितरणच्या महिला संघाला ४७व्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक; दुहेरीतही सुवर्ण

0

पुरुष संघाने केली कांस्यपदकाची कमाई

मुंबई, दि. २७ सप्टेंबर २०२५: अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या ४७ व्या राष्ट्रीय बॅडमिंटन २०२५ च्या स्पर्धेत महावितरणच्या महिला संघाने सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक पटकावले तर पुरुष संघ कांस्यपदकाचे विजेते ठरले. यासह महिला खेळाडूंनी दुहेरीत सुवर्ण, एकेरीमध्ये रौप्यपदक जिंकत राष्ट्रीय स्पर्धेत वर्चस्व गाजवले. या सर्व खेळाडूंचे महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी अभिनंदन केले आहे.

हिसार (हरियाणा) येथे तीन दिवसीय ४७ व्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचा शुक्रवारी (दि. २६) समारोप झाला. देशभरातली विविध वीज कंपन्यांचे संघ या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाले होते. महावितरणच्या महिला संघाने स्पर्धेत एकतर्फी वर्चस्व गाजवत अंतिम फेरीत गुजरात संघाला २-० ने पराभूत केले आणि सलग दुसऱ्या सुवर्णपदकाचा मान मिळवला. महावितरणच्या रितिका नायडू (कर्णधार), अनिता कुलकर्णी, चैत्रा पै, वैष्णवी गांगरकर, राणी पानसरे या खेळाडूंनी ही कामगिरी केली. तर चैत्रा पै व रितिका नायडू यांनी दुहेरी महिला गटात सुवर्णपदकाची तर अनिता कुलकर्णी यांनी एकेरी गटात रौप्यपदकाची कमाई केली.

महावितरणच्या पुरुष संघातील भरत वशिष्ठ (कर्णधार), पंकज पाठक, रोहन पाटील, सुरेश जाधव, दिपक नाईकवाडे यांनी चुरशीच्या सामन्यांमध्ये उपांत्य फेरीपर्यंत धडक दिली व स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. महावितरणच्या महिला व पुरुष बॅडमिंटन संघाचे प्रशिक्षक म्हणून गुणवंत इप्पर तर संघ व्यवस्थापक म्हणून उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी भूपेंद्र वाघमारे यांनी काम पाहिले. महिला व पुरुष बॅडमिंटन संघातील खेळाडूंना पुणे येथे विशेष प्रशिक्षण देण्यात आले. त्यासाठी पुणे प्रादेशिक संचालक श्री. भुजंग खंदारे व पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. सुनील काकडे यांनी पुढाकार घेतला व संवाद साधून खेळाडूंचे मनोबल वाढवले.