Home Blog Page 113

लावणी कलावंताना लोकाश्रय मिळाला राजाश्रय देखील मिळावा – संदीप खर्डेकर.

“तुमच्यासाठी काय पण” लावणीचे सादरीकरण व कलावंतांचा सत्कार संपन्न.

पुणे:सुशिक्षित समाजाने “लावणी” ह्या लोककले कडे पाहण्याचा दृष्टिकोण बदलला पाहिजे असे मत क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केले. ह्या कलेला ग्रामीण भागात लोकाश्रय मिळाला मात्र शहरी भागात अजूनही “लावणी” चा कार्यक्रम म्हंटलं की नाकं मुरडली जातात याची खंत वाटते, लावणी कलावंतांना मिळणारी दीड हजार रुपयाची पेन्शन तुटपुंजी असून त्यांचे वय झाले की होणारी हेळसांड थोपविण्यासाठी योजना आखली पाहिजे असेही ते म्हणाले व ह्या कलेला राजाश्रय लाभावा असे मत ही खर्डेकर यांनी व्यक्त केले.
क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान च्या वतीने आयोजित कोथरूड नवरात्र महोत्सवात आज लावण्यांचा कार्यक्रम पार पडला त्या वेळी ते बोलत होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब दाभेकर,भाजपा चे शहर सरचिटणीस रवींद्र साळेगावकर,मा. नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान चे अध्यक्ष विशाल भेलके, उत्सव प्रमुख उमेश भेलके, सौ. अक्षदा भेलके, सौ. कल्याणी खर्डेकर,सौ. श्वेताली भेलके, सुधीर फाटक, चंदन बकरे, दिलीप ठोंबरे,राजेंद्र जाधव इ मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बाळासाहेब दाभेकर व रवींद्र साळेगावकर यांच्या हस्ते लावणी कलावंत पूनम कुडाळकर,रक्षा पुणेकर, काव्या पुणेकर, पियू मुंबईकर, वैशाली गायकवाड यांचा साडी देऊन सन्मान करण्यात आला.
आज यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सुशिक्षित आणि “व्हाईट कॉलर्ड” नागरिकांच्या भरगच्च उपस्थितीत लावणी चा बहारदार कार्यक्रम सादर करताना आनंद होतं आहे असे लावणी विषयात पी एच डी केलेले योगेश देशमुख म्हणाले.
रोजच वाघजाई देवी ला साडी नेसविणाऱ्या सौ.तन्वी सूर्यवंशी, सौ.वरदायीनी भेंडे यांचा देखील यावेळी कल्याणी खर्डेकर, अक्षदा भेलके व श्वेताली भेलके सत्कार करण्यात आला.
लावणी च्या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी केल्याबद्दल सौ. मंजुश्री खर्डेकर यांनी कोथरूडकरांचे आभार मानले.

मुळशी:रासायनिक कंपनीत आग आणि स्फोट

पुणे : मुळशी तालुक्यात अंबडबेट येथील एका रासायनिक कंपनीत रविवारी (ता. 28) दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली. दुपारी साधारण 12.15 च्या सुमारास लागलेल्या आगीसोबत स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

https://www.facebook.com/share/v/1LXLxpExE5/
या कंपनीत सोडियम क्लोराइडचे पॅकेजिंग केले जात असल्याचे समजते.आगीची माहिती मिळताच मारुंजी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तसेच पौड पोलिसही तातडीने घटनास्थळी दाखल होऊन परिसर सील करून बचावकार्याला सुरुवात केली. आगीमुळे मोठ्या प्रमाणात धुराचे लोट परिसरात पसरले होते. स्थानिक नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू असून, स्फोटामुळे कंपनीच्या परिसरात मोठे नुकसान झाले आहे.
या दुर्घटनेत दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश असलेल्या तिघा कामगारांना गंभीर दुखापत झाली आहे. जखमींमध्ये संदीप लक्ष्मण शेंडकर (49, जळीत सुमारे 60 टक्के), मोहित राज सुखन चौधरी (49, जळीत सुमारे 60 टक्के) आणि महिला रेणुका धनराज गायकवाड (40, जळीत अंदाजे 10 टक्के) यांचा समावेश आहे. तिघांनाही तातडीने घोटावडे फाटा येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू आहेत.
घटनेचं नेमकं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. रासायनिक स्फोटामुळे आग लागली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून अधिक तपास पौड पोलिस करीत आहेत. यासंदर्भात कंपनीतील इतर कर्मचारी आणि प्रत्यक्षदर्शींचेही जबाब घेतले जात आहेत.

३१ व्या पुणे नवरात्रौ महोत्सवात सलग १२ तासांचा लावणी धमाका

पुणे- घुंगरांचा आवाज आणि ढोलकीची थाप, लालित्यपूर्ण पदन्यास, सोबत गाण्यातील आर्जव, प्रेक्षकांचे ‘वन्स मोअर’चे नारे, टाळ्यांचा कडकडाट आणि हजारो रसिक प्रेक्षकांची गर्दी अशा लावणीमय वातावरणात ‘पुणे नवरात्रौ महोत्सवा’त रविवारी दुपारी १२ पासून सलग १२ तासांचा ‘लावणी धमाका’ श्री गणेश कला-क्रीडा रंगमंच येथे आयोजित केला गेला. “महाराष्ट्रात सलग १२ तासांचा धमाकेबाज ‘लावणी महोत्सव’ पुणे नवरात्रौ महोत्सवात आम्ही प्रथम ३१ वर्षांपूर्वी सुरू केला. गेली ३१ वर्षे त्यास चोखंदळ पुणेकरांनी प्रचंड मोठा प्रतिसाद दिला, याबद्दल सर्व लावणी कलावंत आणि रसिक पुणेकर यांचे मी आभार मानतो,” असे भावपूर्ण उद्गार पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक-अध्यक्ष व पुण्याचे माजी उपमहापौर आबा बागुल यांनी उद्घाटनप्रसंगी काढले.

विक्रमी लावणी महोत्सवात सीमा पोटे, भाग्यश्री बारामतीकर (पाव्हनं फक्त तुमच्यासाठी), रक्षा पुणेकर, काव्या पुणेकर (तुमच्यासाठी कायपण), रील स्टार कुकू, वर्षा मुंबईकर (लावणी सुपरस्टार), सिनेतारका अर्चना सावंत, ज्योती मुंबईकर (मदनाची मंजिरी), शलाका पुणेकर, सोनाली शिंदे (कैरी मी पाडाची) या नामवंत कलावंत सहकाऱ्यांसह सहभागी झाल्या होत्या. या सर्वांनी तब्बल १२ तास ठसकेबाज लावणी सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळविली.
प्रारंभी भारतरत्न स्वरसम्राज्ञी कै. लता मंगेशकर यांच्या २८ सप्टेंबर या जन्मदिनानिमित्त त्यांच्या तैलचित्रास आबा बागुल यांच्यासमवेत लावणी कलावंतांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केली. त्यानंतर लावणी महोत्सवास प्रारंभ झाला. महोत्सवाची सुरुवात गण-गवळण व मुजऱ्याने झाली. शंभरहून अधिक लावण्यवतींनी आपला नृत्याविष्कार सादर करून प्रत्येक लावणीत प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. श्री गणेश कला-क्रीडा रंगमंचाचे प्रेक्षागृह दुपारी १२पासून रसिक प्रेक्षकांनी अखेरपर्यंत गच्च भरले होते. यावेळी प्रेक्षकांनी शिट्ट्या, टाळ्या व नृत्य करून लावणीला ‘वन्स मोअर’ची दाद दिली. या लावणी महोत्सवात महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. त्यांचाही मोठा प्रतिसाद होता.

‘माझी मैंना गावाकडे राहिली’, ‘तुम्हावर केली मी मर्जी बहार’, ‘रात्र धुंदीत ही जागवा..’, ‘कैरी मी पाडाची….’, ‘पैलवान आला हो पैलवान आला…’, ‘तुमच्या पुढ्यात कूटते मी…’, तुमच्यासाठी जीव झाला वेडा पिसा’, ‘आंबा तोतापुरी’, ‘नाद खुळा’, ‘या रावजी बसा भावजी’, ‘फड सांभाळ तुऱ्याला’, ‘होऊ द्या दमानं’, ‘येऊ कशी तशी नांदायला’, ‘मला म्हनत्यात हो पुण्याची मैना’, ‘तुझ्या उसाला लागंल कोल्हा’ अशा अनेक लावण्यांच्या सादरीकरणाला रसिकांनी दाद दिली.

‘विचार काय आहे तुमचा पाहुनं…’, ‘मला वाटलं होतं तुम्ही याल…’, ‘शिट्टी वाजली गाडी सुटली….’, ’आजकाल पाटलाचा’, ’, ‘चंद्रा’ चित्रपटातील ‘बान नजंतला घेऊनि अवतरली चंद्रा’, ‘नटरंग’ चित्रपटातील ‘नटरंग उभा’ अशा एकाहून एक सरस अशा लावण्या व गवळणीच्या सादरीकरणाने रसिकांवर लावणी या लोकप्रिय लोककलेची भुरळ घातली.

याबरोबरच ‘बुगडी माझी सांडली गं…’ या लावणीने ‘वन्स मोअर’ची दाद मिळविली. ‘नाद एकच बैलगाडा शर्यत’ ही लावणी सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. ‘इंद्राची अप्सरा आली…’, ‘कान्हा वाजवितो बासरी’ यांसह ‘वाजले की बारा…’, ‘अप्सरा आली…’, या ‘नटरंग’ चित्रपटातील लावण्यांना रसिकांनी भरभरून दाद दिली.

‘पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा…’ या बैठकीच्या लावणीच्या सादरीकरणाने आपल्या हावभावातून लावण्यवतींनी रसिकांची मने जिंकली. ‘मी मेनका उर्वशी…’ आणि ‘छत्तीस नखरेवाली…’ या लावण्यांच्या सादरीकरणाने कार्यक्रमात बहार आणली. ‘केसात गुंफूनि गजरा तुम्हाला मानाचा मुजरा..’, ‘तुमच्या पुढ्यात बसले मी..’, ‘बाई माझी करंगळी मोडली’, ‘आई मला नेसव शालू नवा’ अशा ठसकेबाज जुन्या लावण्यांच्या सादरीकरणाला प्रेक्षकांनी टाळ्यांची दाद दिली.

हावभाव, पदन्यास आणि ढोलकीची थाप यांच्या एकत्रित सादरीकरणाने लावणी या लोककलेचा अप्रतिम कलाविष्कार रसिकांनी अनुभवला. तब्बल सलग १२ तास नृत्यांगनांनी आपली लावणी सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.

पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक-अध्यक्ष व माजी उपमहापौर आबा बागुल, पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा सौ. जयश्री बागुल यांनी मान्यवरांचा व कलाकारांचा सत्कार केला. अनेक राजकीय सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रांतील नामवंत कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते. यावेळी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे विश्वस्त घनश्याम सावंत, नंदकुमार बानगुडे, रमेश भंडारी, नंदकुमार कोंढाळकर, मुख्य संयोजक अमित बागुल आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घनश्याम सावंत यांनी केले. हा लावणी महोत्सव रात्री उशिरापर्यंत सुरू राहिला. लावणीरसिकांनी सारे प्रेक्षागृह तुडुंब भरले होते.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात व्यंगचित्रकार शि.द. फडणीस यांच्या नावाने अध्यासन सुरू करणार

सांस्कृतिक कार्यमंत्री एँड. आशिष शेलार यांची घोषणा

पुणे, दि. 28 सप्टेंबर
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि.द. फडणीस यांच्या नावाने व्यंगचित्र अध्यासन सुरू करण्यात येईल, अशी घोषणा आज सांस्कृतिक कार्य मंत्री एँड. आशिष शेलार यांनी पुणे येथे केली.

मंत्री आशिष शेलार हे आज पुणे दौऱ्यावर असून वयाची शंभरी पूर्ण केलेल्या व्यंगचित्रकार शि.द. फडणीस यांची त्यांनी निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दुर्मिळ पत्रांचे पुस्तक त्यांना शासनाच्या वतीने भेट देऊन त्यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या व्यंगचित्राची शैली व 100 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव याबाबत त्यांच्याशी चर्चा केली.
दरम्यान, यावेळी सोबत असलेले भाजपाचे पदाधिकारी राजेश पांडे यांनी पुणेकरांच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये व्यंगचित्र अध्यासन केंद्र असावे आणि त्याला शि.द. फडणीस यांचे नाव द्यावे अशी मागणी केली. त्यावर सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी तातडीने राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून याबाबत चर्चा केली. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याला तातडीने मान्यता देऊन आजच शी.द.फडणीस यांच्या घरूनच ही घोषणा करा, असे सूचित केले. त्यानुसार आज आशिष शेलार यांनी या अध्यासनाची घोषणा केली.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाअंतर्गत संबंधित सेवांचा घरबसल्या घेता येईल लाभ

पुणे (दि.२८) : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमानुसार पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून नागरिकांना सुलभ आण‍ि व‍िह‍ित कालमर्यादेत शासनाच्या सेवा – सुव‍िधा देण्यात येत आहे. पीएमआरडीएमधील एकूण २९ सेवांपैकी १९ सेवा ऑनलाइन देण्यात येत असून उर्वर‍ित सेवा कार्यालयात ऑफलाईन पद्धतीने सुरु आहे. आगामी काही द‍िवसात संबंध‍ित सेवा पण ऑनलाइन करण्यात येणार असून त्यांची प्रकिया सुरु आहे.

शासनाने १५० दिवसाच्या उपक्रमांतर्गत नागरिकांना ऑनलाईन शासकीय सेवा – सुव‍िधा देण्याचे निर्देश दिले आहे. त्याअनुषंगाने पीएमआरडीएच्या माध्यमातून शासनाच्या अधिसूचित सेवा पारदर्शक, गतिमान आणि विहित कालमर्यादेत देण्यात येत आहे. पीएमआरडीएने सुरू केलेल्या या ऑनलाईन सेवांची माह‍िती अर्जदारांनी आपल्या ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर कळणार आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीमधील नागरिकांना दिलासा देण्यासाठी या २९ सेवा देण्यात येत आहेत.

पीएमआरडीएच्या संबंध‍ित सेवांचा तपशील

विकास परवानगी विभाग : अभिन्यास / इमारत बांधकाम परवानगी, जोता मोजणी प्रमाणपत्र, भोगवटा प्रमाणपत्र, झोन दाखला, भाग नकाशा/नकाशा देणे, सुधारित बांधकाम परवानगी, तात्पुरते रेखांकन परवानगी, सुधारित तात्पुरते रेखांकन, अंतिम रेखांकन परवानगी, नूतनीकरण परवानगी, भागश: भोगवटा प्रमाणपत्र, साईट एलेवेशन प्रमाणपत्र ऑनलाईन देण्यात येत आहे. यासह अभियंता परवाना, स्ट्रक्चरल इंजिनिअर परवाना, सुपरवायझर परवाना, नगर रचनाकार परवाना, आकाशचिन्ह परवाना, आकाशचिन्ह नियमितीकरण परवाना, विकासाचे उद्दिष्टे प्रमाणपत्र (IOD) या सेवा ऑफलाईन कार्यालयात उपलब्ध आहे.

जमीन व मालमत्ता विभाग : वाटप भूखंडाचे / गृहयोजनेतील सदनिकांचे हस्तातंरण करणे, वाटप भूखंडावर / गृहयोजनेतील सदनिकांवर वारसानोंद करणे, वाटप भूखंडावर / गृहयोजनेतील सदनिकांवर कर्जासाठी ना- हरकत प्रमाणपत्र ऑनलाईन सुरु आहे. यासह प्राधिकरण मालकीच्या मोकळ्या जागा तात्पुरत्या स्वरूपात भाडेतत्त्वावर देणे, भाडेपट्ट्यानंतर भूखंडाचा ताबा देणे आण‍ि वाटप भूखंडाची फेरमोजणी करून देणे या सेवा ऑफलाईन आहे.

अग्निशमन विभाग : प्राथमिक अग्निशमन ना-हरकत दाखला अदा करणे, अंतिम अग्निशमन ना-हरकत दाखला अदा करणे, पर्यावरण मंजुरी प्रमाणपत्र, अग्निशमन बंदोबस्त या सेवा ऑनलाईन आहे. संबंध‍ित सेवा आपले सरकार https://aaplesarkar.mahaonline.gov.in आण‍ि पीएमआरडीएच्या https://www.pmrda.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

महाराष्ट्राची पारंपरिक लोककला जतन करणे आवश्यक – पृथ्वीराज नागवडे

ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा यांना जन्मशताब्दी वर्षानिमित्त आदरांजली

पुणे-बदलत्या काळात महाराष्ट्राची लोककला, नृत्य आणि सांस्कृतिक परंपरा जिवंत ठेवणे आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे महत्त्वचे आहे. महाराष्ट्राची संपन्न लोकपरंपरा, लोककला त्याच्या मूळ स्वरूपात सादर करण्यासाठी आणि याबाबतचा प्रसार करून लोकांना त्याच्याशी जोडण्यासाठी ‘अस्मिता महाराष्ट्राची’ या सांस्कृतिक समूहाची स्थापना करण्यात आली, असे मत निर्माते पृथ्वीराज नागवडे यांनी व्यक्त केले. ३१व्या पुणे नवरात्रौ महोत्सवात ‘अस्मिता महाराष्ट्राची’ कार्यक्रम सदर झाला. त्यावेळी ते बोलत होते. पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक-अध्यक्ष आबा बागुल यांनी सर्व कलाकारांचे कौतुक करून या महोत्सवाचे आधारस्तंभ बनलेले ‘राष्ट्रपती पुरस्कारा’ने सन्मानित ज्येष्ठ लोककलावंत कै. केशवराव बडगे यांचा आवर्जून उल्लेख केला. महाराष्ट्राची पारंपरिक लोककला जिवंत ठेवण्यासाठी असे कार्यक्रम होणे गरजेचे असल्याची भावना आबा बागुल यांनी यावेळी व्यक्त केली.
या कार्यक्रमात प्रारंभी दिवंगत ज्येष्ठ गायिका पद्यश्री माणिक वर्मा यांना जन्मशताब्दी वर्षानिमित्त महोत्सवाचे आयोजक-अध्यक्ष आबा बागुल, निर्माते पृथ्वीराज नागवडे आणि सर्व कलाकारांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. तसेच गायिका माणिक वर्मा यांनी गायलेले प्रसिद्ध ‘अमृताहूनि गोड..’ हे भावगीत गाऊन कार्यक्रमास सुरुवात झाली.
राज्यभरातील ५०पेक्षा अधिक नवोदित कलाकार मेहनतीने आणि निष्ठेने पारंपरिक लोककला आत्मसात करुन नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘अस्मिता महाराष्ट्राची’ माध्यमातून प्रयत्नशील असल्याचे यावेळी दिसून आले. पुरुष कलाकारांनी सदरा, धोतर आणि फेटा, तर महिला कलाकारांनी नऊवारी साडी नेसून हातात भगवा झेंडा फडकवीत जल्लोषपूर्ण पद्धतीने विठुरायाची पालखी थेट प्रेक्षकांमधून घेऊन येत कार्यक्रमाची दिमाखदार सुरुवात केली.
भारुड, गोंधळ, पोतराज, जोगवा, वासुदेव, बतावणी, वाघ्या-मुरळी या लोकनाटय आणि पारंपरिक कलाप्रकारांच्या सादरीकरणातून रसिकांना दुर्मिळ होत चाललेल्या ग्रामीण परंपरांची पुनर्आठवण कलाकारांकडून करून देण्यात आली. पारंपरिक ग्रामीण संस्कृती शहरातील लोकांना पुन्हा माहीत व्हावी, असा प्रयत्न याद्वारे करण्यात आला.
संगीत व नृत्यशैलीच्या माध्यमातून लावणी, कोळीनृत्य, मंगळागौर, ढोल-ताशा-लेझीम, गवळण, अंगाई गीत, शंकासुर, काठोळी आदी प्रकार सादर करण्यात आले. कोणत्याही आधुनिक फ्युजनशिवाय आध्यात्मिक व सांस्कृतिक परंपरांची महती गण, अभंग, वारी, धनगरी गजा, तुंबडी, भल्लरी, नंदीबैल सादरीकरणाद्वारे दाखविण्यात आली. प्रशांत मखरे यांनी अभ्यासपूर्ण आणि सहजरीत्या सर्वांना भावेल अशा भाषाशैलीत सूत्रसंचालन करीत कार्यक्रमात रंगत आणली. पुणे नवरात्रौ महोत्सवातील “अस्मिता महाराष्ट्राची” कार्यक्रमाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.

यावेळी कलाकारांना विविध लोकपरंपरा सादर करताना सिद्धेश उंडाळकर ( पखवाज), कृष्णा अवघडे (ढोलकी, संबळ), साहिल कांबळे (ड्रम), अनिकेत काळोखे, अभिषेक सुरडकर (पियानो) , श्रेया बऱ्हाटे (बासरी), जयेश म्हस्के ( ढोल), आफताब शाह ( हार्मोनियम ), ऋषिकेश उंडाळकर , शुभम मुकीर (साइड ऱ्हिदम) यांनी आपल्या वादनातील कौशल्य दाखवीत साथ दिली. तर, गायनासाठी गायक म्हणून ऋषिकेश आडे, प्रदीप लोंढे, सोपान कामगुणे, सौरव चव्हाण, रोहित शिंदे आणि गायिका सानिका अभंग, श्रद्धा गद्रे, जान्हवी गद्रे, पायल वारुंगसे, रुचिता शिरसाठ, जान्हवी खडपकर यांनी सहाय्य केले.
याप्रसंगी जयश्री बागुल, घनश्याम सावंत, रमेश भंडारी, नंदकुमार बानगुडे, नंदकुमार कोंढाळकर, अमित बागुल, हर्षदा बागुल, सागर बागुल उपस्थित होते.

उद्योग क्षेत्रातील नव दुर्गांचे विद्यार्थ्यांकडून पूजन 

संयुक्त स्त्री संस्थेच्या शाळेचा उपक्रम … 

पुणे – अडचणी आल्या तरी डगमगत नाहीत. संकटे आली तरी त्यांना ठामपणे सामोरे जातात त्याच खऱ्या उद्योजिका. कोणताही उद्योग करायचा तर त्यासाठी पैसे लागतातच पण पैसे असले म्हणजे तुम्ही यशस्वी उद्योजक व्हालच असे नाही. उद्योगात यशस्वी व्हायचे असेल तर पैसे म्हणजे भांडवल कमी असले तरी  समाजात चांगल्या भावनेने काम किंवा उद्योग केला तर त्याला समाज चांगला प्रतिसाद देतो आणि यशस्वी करतो. मात्र त्यासाठी तुमच्याकडे संयम, सातत्य, सकारात्मकता आणि साहस असणे आवश्यक आहे असे नवदुर्गांनी आज येथे सांगितले.

 शारदीय नवरात्रोत्सवात आदीशक्तीचा जागर केला जातो. हे औचित्य साधून संयुक्त स्त्री संस्थेच्या वतीने समाजातील आदीशक्ती असलेल्या नवदुर्गा पूजनाचा कार्यक्रम आयोजत करण्यात येतो. या निमित्ताने नविन पिढीला समाजातातूल कर्तृत्वंवान महिलांची आणि आपल्या परंपरांची ओळख करून देण्यासाठी हा कार्यक्रम गेली १४ वर्षे शाळेत करण्यात येत आहे. 

यंदा समाजातील आत्मनिर्भर उद्योजिका श्रीमती रोहिणी नाईक (कागदी पिशव्या, फाईल्स), श्रीमती शीला बानावळकर टोकेकर (टेलरिंग), श्रीमती सुवर्णा मुसळे (वाती, कापसाची वस्त्र), श्रीमती कुंदा पायगुडे (मसाजिस्ट), श्रीमती स्वाती नरगुंदे (सर्व प्रकारची पिठाची गिरणी), श्रीमती स्वाती ओतारी (वज्रलेपन), श्रीमती छाया जगदाळे (रसवंतीगृह), श्रीमती सुनंदा आंधळे (पर्स), श्रीमती सुवर्णा पारखी (दिवाळी फराळ) यां नवदुर्गांचा शारदीय नवरात्राचे औचित्य साधून सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांनी हळक कुंकू, अत्तर लावले, प्रसाद दिला. हातावर स्वस्तिक काढले. त्यानंतर त्यांना तांब्याचा कलश, त्यावर आंब्याच्या पानांवर श्रीफळ व त्यावर गरजा ठेवलेला मंगल कलश देऊन त्यांचे पूजन केले. अध्यक्षा नीता रजपूत, सचिव  मधुरा जोगळेकर, साधना अबिके आणि त्यांच्या सहकारी यावेळी उपस्थित होत्या. यावेळी विद्यार्थानी नव दुर्गाना प्रश्न विचारून बोलते केले. 

महिलाकडे अगभूत कौशल्य असते, गरज ते कौशल्य ओळखून त्यानुसार काम करण्याची असे नवदुर्गानी सांगितले. समाजात विविध क्षेत्रात काम करणा-या महिलांची, त्यांचा कामाची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी शारदीय नवरात्रात हा दुर्गा पूजनाचा उपक्रम गेली तेरा वर्षे संस्थेत सुरू आहे. पुण्यातील पानशेत पूराच्या आपत्तीत मदतीसाटी त्यावेळी पुण्यातील महिलांच्या 56 संस्था एकत्र आल्या होत्या. त्यांची संयुक्त स्त्री समिती स्थापन केली. त्यांनी मदत कार्यही केले. त्यानंतर ही समिती बरखास्त करू नका असे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण व आयुक्त स. गो. बर्वे यांनी सांगितले. त्यातून संयुक्त स्त्री संस्थेची स्थापना 31 मे 1963 या दिवशी झाली. या संस्थेच्यावतीने गरीब मुलांसाठी मराठी व इंग्रजी माध्यमाची शाळा चालवल्या जातात. त्यात 650 मुले शिक्षण घेत आहेत. याशिवाय पाच झोप़डपट्टयांमध्ये बालवाड्या चालवल्या जातात.

अध्यक्षा नीता रजपूत यांच्यासह उद्योजिका नवदुर्गांनी दीपप्रज्वलन केले. सामुहिक श्रीसूक्त पठणानंतर पाहुण्यांचा व नवदुर्गांचा परिचय करून देण्यात आला. अध्यक्षा नीता रजपूत यानी सांगितले की, समाजाचे चलनवलन चालवण्यासाठी नवदुर्गा हा महत्वाचा घटक आहे. आज एकत्र कुटुंब पध्दत गली. ती उणिव या नवदुर्गा भरून काढत आहेत. समाजात विविध क्षेत्रात काम करणा-या नव दुर्गांची आणि त्यांच्या कामाची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने विद्यार्थीच्या हातून दुर्गाचे पूजन करण्यात येते. उपक्रमाचे हे १४ वे वर्ष आहे. या निमित्ताने महिला समाजात का काय काम करू शकतात ? त्यासाठी कशी मेहनत घेतात अन यश मिळवता याची महिती मुलांना मिळते. यातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे हा यामागचा उद्देश आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सेनगुप्ता यांनी करून  शेवटी अश्विनी माने यांनी आभार मानले. 

बारामतीच्या सुपा मंडळात शेतांसाठी ९६ नवे रस्ते

विभागीय आयुक्तांनी भेट देऊन केले कौतुक

पुणे, दि. २८: छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत आयोजित सेवा पंधरवड्यात बारामती तालुक्यातील सुपा मंडळाचे मंडळ अधिकारी हंसध्वज मनाळे आणि त्यांच्या सर्व ग्राम महसूल अधिकारी किंवा तलाठी यांच्या टीमने अतिशय उत्कृष्ट कामगिरी करत पाच दिवसांमध्ये नव्याने ९६ रस्ते करून दिले आहेत. विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत फुलकुंडवार यांनी आज मंडल अधिकारी कार्यालयास भेट देऊन त्यांचे कौतुक केले.

सेवा पंधरवडामध्ये पहिला टप्पा रस्ते उपलब्ध करून देण्याबाबत याबाबतीत होता. या पहिल्या टप्प्यांमध्ये सुपा मंडळ करेला अंतर्गत चांगले काम झाले आहे. आता या रस्त्यांची नोंद गाव नकाशावर आणि अधिकार अभिलेखांमध्ये घेण्यात येत आहे. हे काम अत्यंत प्रशंसनीय असल्यामुळे डॉ. पुलकुंडवार यांनी महसूल अधिकाऱ्यांचे कौतुक केले आणि गावकऱ्यांशी संवाद साधला. गावकऱ्यांनीदेखील याबाबत समाधान व्यक्त केलं.

मंडळ अधिकारी कार्यालय परिसरामध्ये यावेळी वृक्षारोपणही करण्यात आले. यावेळी बारामतीचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार गणेश शिंदे आदी उपस्थित होते.

खरा छायाचित्रकार असतो किमयागार: डॉ. गो.बं.देगलूरकर

पुणे :

ज्येष्ठ नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. श्रीकांत केळकर यांचे ‘स्पिती व्हॅली’(हिमाचल प्रदेश) छायाचित्र प्रदर्शन २८ सप्टेंबर रोजी बालगंधर्व कलादालनात उत्साहात सुरू झाले. प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ पुरातत्त्वतज्ज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर आणि रोटरीचे माजी प्रांतपाल रवी धोत्रे यांच्या हस्ते झाले. उद्घाटन सोहळ्यास कला, साहित्य व संस्कृती क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.उद्घाटन प्रसंगी ‘संग्राहक श्री दिनकर (काका) केळकर छंदवेध पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. यावर्षी प्रा. सुहासचंद्र कुलकर्णी, श्रीनिवास जोगळेकर, मोहन शेट्ये, डॉ. आदित्य पोंक्षे आणि सौ. मोनिका कुलकर्णी यांना सन्मानित करण्यात आले. संग्रहाची आवड आणि छंद जोपासण्याच्या कार्यासाठी दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. यंदाचे हे सातवे वर्ष आहे.

‘स्पिती व्हॅली’ या प्रदर्शनात हिमाचल प्रदेशातील स्पिती दरीचे निसर्गसौंदर्य टिपलेली १२० छायाचित्रे मांडण्यात आली आहेत. उंच पर्वतरांगा, बर्फाच्छादित शिखरे, नद्या, तळी आणि स्थानिक संस्कृती यांचे अप्रतिम दर्शन या छायाचित्रांतून घडते. प्रदर्शनाला रसिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून दररोज सकाळी १० ते रात्री साडेआठपर्यंत ते विनामूल्य सर्वांसाठी खुले आहे. उदघाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश दामले यांनी केले. सौ.अरुणा केळकर, कुलदीप जोशी,डॉ. आदित्य केळकर, डॉ.जाई केळकर,सुरेश परदेशी, बडदे, सानिया केळकर,नाना बारवकर उपस्थित होते.डॉ.सुधन्वा रानडे यांनी आभार मानले.

डॉ.गो. बं.देगलूरकर म्हणाले,’ छायाचित्रातून छायाचित्रकाराची दृष्टी दिसते.जीवनाचे पैलू समोर येतात. डॉ.श्रीकांत केळकर हे हरहुन्नरी व्यक्तीमत्व आहे. त्यांनी मोबाईल कॅमेऱ्याने काढलेली छायाचित्रे थक्क करणारी आहेत. सौंदर्य टिपणे,प्रसंग टिपणे ही अनोखी कला आहे. त्यासाठी दृष्टी हवी,पण वृत्तीही महत्वाची आहे.मूर्ती मधील भाव न्याहाळणे,समजून घेणे आणि छायाचित्रातील भाव न्याहाळणे या सारख्याच गोष्टी आहेत. छंदवेध पुरस्कार देण्याचा उपक्रम पुण्यातच होऊ शकतो.उपक्रमातील गुणग्राहकता उल्लेखनीय आहे’. रवी धोत्रे यांनीही मनोगत व्यक्त करून प्रदर्शनाला शुभेच्छा दिल्या.डॉ. केळकर यांनी उद्घाटन प्रसंगी बोलताना सांगितले की, “स्पिती व्हॅली ही निसर्गाच्या कुशीत विसावलेली अद्वितीय दरी आहे. तिचे भव्य नैसर्गिक सौंदर्य, ताऱ्यांनी सजलेले आकाश आणि स्थानिक सांस्कृतिक वैभव प्रत्येकाला भुरळ घालते.कै. दिनकर (काका) केळकर हे पुण्याच्या संग्रह परंपरेचे महर्षी होते. त्यांचा ध्यास म्हणजेच पुण्याचे वैभव. पुणेकरांची संग्रहाची आवड वृद्धिंगत व्हावी यासाठी आम्ही हा पुरस्कार सुरू केला आहे,’ असेही डॉ. श्रीकांत केळकर यांनी स्पष्ट केले.‘स्पिती व्हॅली’ छायाचित्र प्रदर्शन ३० सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.

मानीव अभिहस्तांतरण प्रकरणे-अभिनिर्णय पुर्व तपासणी अभियानाचे रवींद्र बिनवडे यांच्या हस्ते उद्घाटन

पहिल्याच दिवशी 30 संस्थांना मार्गदर्शन, 2 हजार 325 सदनिकाधारकांना लाभ

पुणे, दि. 28: राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक रवींद्र बिनवडे यांच्या हस्ते “मानिव अभिहस्तांतरण प्रकरणे अभिनिर्णय पूर्व तपासणी” विशेष अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. या अभियानात 103 गृहनिर्माण संस्थांनी सहभाग नोंदविला असून पहिल्याच दिवशी 30 संस्थांची (2 हजार 325 सदनिका, दुकाने) प्रकरणे तपासून त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी सह नोंदणी महानिरीक्षक राजेंद्र मुठे, नोंदणी उपमहानिरीक्षक उदयराज चव्हाण, सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी पुणे शहर संतोष हिंगाणे, सह जिल्हा निबंधक पुणे ग्रामीण प्रविण देशपांडे आदी उपस्थित होते.

श्री. बिनवडे म्हणाले, विभागाच्यावतीने राबविण्यात आलेल्या ‘एक जिल्हा एक नोंदणी’, ‘सलोखा योजना’, ‘ई-प्रमाण, फेसलेस रजिस्ट्रेशन’ या सुविधा यशस्विरित्या अंमलबजावणी केली आहे. सह जिल्हा निबंधक पुणे शहरच्यावतीने राबविण्यात येणारे “मानिव अभिहस्तांतरण प्रकरणे-अभिनिर्णय पुर्व तपासणी” हे विशेष अभियान नागरिकाभिमुख असून अशा प्रकारचे उपक्रम स्वयंप्रेरणेने राबविणे हे कौतुकास्पद असल्याचे नमूद केले.

यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात अभियानात सहभागी संस्थांच्या वतीने शंकरकाया सोसायटी, म्हात्रे पुलाजवळ, कोथरूडच्या सभासदांनी राज्य शासन व विभागाचे आभार मानले.

शासनाच्या विविध विभागांतर्फे नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा गतिमान व सकारात्मकतेने दिल्या जाव्यात आणि लोकाभिमुख कामकाजाचे सुत्र अधिकाधिक अंगिकारले जावे, या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा उपक्रम राबविण्यात येत आहे. सेवा उपक्रमाअंतर्गत सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी पुणे शहर कार्यालयाने सहकारी गृहरचना संस्थांची मानीव अभिहस्तांतरणाची प्रकरणे सत्वर निकाली काढण्याच्या उद्देशाने “मानिव अभिहस्तांतरण प्रकरणे अभिनिर्णय पूर्व तपासणी” विशेष अभियानाचे 27 ते 30 सप्टेंबर या कालावधीत आयोजन करण्यात आले.

श्री. हिंगाणे यांनी या विशेष अभियानाचे स्वरुप, व्याप्ती आणि सर्व सामान्य नागरिकांना त्याचा कसा उपयोग होईल याबाबत माहिती दिली.

या अभियानामध्ये अधिकाधिक गृहनिर्माण संस्थांनी सहभाग नोंदवावा. कार्यालयाचा jdr.punecity@gmail.com ईमेलवर ईमेल करावा. वाढता प्रतिसाद विचारात घेता दिवाळीनंतर अशाप्रकारचे शिबीराचे आयोजन करण्यात येईल असेही, श्री. हिंगाणे यांनी सांगितले.

सांस्कृतिक मूल्यांची जपणूक करत चित्रपट निर्मिती करा : गश्मीर महाजनी

मुंबा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
पुणे : मराठी चित्रपट सृष्टीत आशयसंपन्नता आहे परंतु कल्पनाशक्ती आणि दृश्यात्मकतेचा अभाव आढळतो. दुसऱ्या सारखे करायला न जाता आपल्या सांस्कृतिक मूल्यांची जपणूक करत चित्रपट निर्मिती केल्यास मराठी चित्रपट सृष्टीलाही यश मिळेल, असा विश्वास प्रसिद्ध अभिनेते गश्मीर महाजनी यांनी व्यक्त केला.
मुंबा फिल्म फाऊंडेशनतर्फे केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालय तसेच नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या सहाव्या मुंबा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज (दि. 28) चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी महाजनी बोलत होते. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे हे चर्चासत्र झाले. केरळ येथील चित्रपट निर्माते अर्जुन अजित, लघुपट निर्माते मयूर कुलकर्णी, लेखक हेमंत बेळे, दिग्दर्शक सुजय डहाके आणि गश्मीर महाजनी यांचा सहभाग होता. त्यांच्याशी अभिषेक अवचार यांनी संवाद साधला.
गश्मीर महाजनी म्हणाले, मराठी चित्रपट सृष्टीने आपले क्षितीज रुंदावत काम केल्यास केल्यास सर्व स्तरातील प्रेक्षकांना आकर्षित करेल.
प्रत्येक क्षेत्रात समाजकारण आणि राजकारण..
सुजय डहाके म्हणाले, मला चित्रपट या विषयावर लिहायला आवडत होते. माझ्यातील सृजनशीलता मला पुस्तकी शिक्षण घेण्यापासून परावृत्त करत होती म्हणून मी या क्षेत्राकडे वळलो. अभिनेता किंवा दिग्दर्शक होण्याचे माझे स्वप्न नव्हते, परंतु या विषयावर सखोल अभ्यास करण्याची प्रचंड इच्छा असल्यामुळे मी दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकले. माझ्या कामावर राजकीय प्रभाव नाही; परंतु प्रत्येक क्षेत्रात समाजकारण आणि राजकारण आहे असे मी मानतो.
नवनवीन आशयांवर चित्रपट निर्मिती करणे आव्हानात्मक..
अर्जुन अजित म्हणाले, नवनवीन विषयांवर चित्रपट निर्मिती होणे आवश्यक आहे. त्याकरिता कथा, पटकथा, चित्रपटाचा विषय, आशय यावर काम व्हावे. चित्रपट निर्माते आशयाला महत्त्व देत नाहीत हे अयोग्य आहे. वैविध्यपूर्ण आशयांवर चित्रपट निर्मिती करणे आव्हानात्मक आहे.
सर्जनशीलतेसाठी चित्रपट निर्मिती करावी..
मयूर कुलकर्णी म्हणाले, जाहिरात क्षेत्रात काम करताना सर्जनशीलतेला पुरेसा वाव मिळत नसल्याने मी चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले. दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या हाताळल्या. आजच्या युवा पिढीने आर्थिक बाजू सक्षम करण्यासाठी जाहिरातीसारखी माध्यमे जरूर हाताळावीत; परंतु आपल्यातील सर्जनशीलता चित्रपट निर्मितीसाठी वापरावी.
कृत्रिम बुद्धिमत्तेचा धोका नाही..
हेमंत बेळे म्हणाले, आजचा काळ हा जाहिरात क्षेत्र आणि चित्रपट निर्मितीसाठी सुवर्णकाळ असून या क्षेत्रात अनेकविध संधी उपलब्ध आहेत. या क्षेत्रात आपण केलेले सर्जनशील काम दर्शविण्यासाठी आज अनेक माध्यमे सहजतेने उपलब्ध आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर झाला तरीही जो पर्यंत कलाकारात सर्जनशीलता आहे तो पर्यंत या क्षेत्राला धोका संभवत नाही.

सर्जनशील कलाकार आव्हाने पेलतो
‌‘द डायनामिक डुओ ॲण्ड आयकॉनिक पोझी‌’ या मुलाखतीअंतर्गत सुप्रसिद्ध गीतकार, कथाकार आणि दिग्दर्शक सिद्धार्थ सिंग आणि गरिमा वहाळ यांच्याशी अश्वनी अनिलकुमार यांनी संवाद साधला. अनेक सामाजिक घटना, माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्या यातून लेखकाच्या मनात एखाद्या कथेचे बीज रुजते आणि त्यातून उत्तम निर्मिती होते. परंतु चित्रपटासाठी गीते लिहिताना दिग्दर्शक आणि चित्रपट कथेच्या मागणीनुसार गीत लेखन करावे लागते. खूप मोठा आशय काही ओळींच्या गीतांमधून पोहचविणे आव्हानात्मक असते; परंतु सर्जनशील कलाकार ते आव्हान सहजतेने पेलू शकतो. एकत्रित काम करताना अनेकदा मतभेद होतात; परंतु एकमेकांच्या मतांचा आदर करत, अहम्‌‍ बाजूला ठेवून समोरच्याचे ऐकून घेत काम केल्यास वाटचाल सुकर होते. उत्तम निर्मिती करावयाची असल्यास लेखकाने स्वत:तील सृजनाचा आदर करत काम केल्यास आनंद मिळतो. काही न सुचण्याच्या काळात शांत राहणे, रागावर नियंत्रण मिळविणे आवश्यक असते.

चर्चासत्रात सहभागी कलाकार, लेखकांचा सन्मान वीरेंद्र चित्राव, विश्वास शेंबेकर, प्रियांका चौधरी, दत्ता गुंड, स्वप्नील कांबळे, नूतन कुलकर्णी यांनी केला.

नागरिकांशी समन्‍वय साधून योग्य निर्णय घ्या : उपमुख्यमंत्री अजित पवार

  • प्रभाग क्रमांक दोन मधील म्‍हाडा पुनर्विकासाबाबत बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना
  • माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी मांडल्‍या सूचना

पुणे-म्‍हाडाचा पुनर्विकास करताना संबंधित नागरिकांची गाळेधारकांची बैठक घ्या. त्‍यांच्‍या सूचना ऐका. त्‍यांच्‍याशी समन्‍वय साधून योग्य निर्णय घ्या, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी म्‍हाडा, पुणे महापालिकेच्‍या अधिकाऱ्यांना दिल्‍या.

पुणे महापालिकेच्‍या प्रभाग क्रमांक दोन मधील म्‍हाडाच्‍या सर्वे नंबर १९१ च्‍या भूखंडावरील ४० वर्षे जुन्‍या व मोडकळीस आलेल्‍या इमारतीच्‍या पुनर्विकासाचा आराखडा सादरीकरणाबाबत नुकतीच पुण्यातील कौन्‍सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्‍या सोबत नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत पवारांनी सूचना दिल्‍या.

या वेळी पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, माजी उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे, पुणे महानगरपालिका शहर अभियंता प्रशांत वाघमारे, पुणे म्‍हाडाचे मुख्य अधिकारी राहुल साकोरे, माजी आमदार सुनिल टिंगरे, अजय बल्लाळ, आदीसह अधिकारी, विविध प्रशासनातील अधिकारी उपस्‍थित होते.

या बैठकीत म्‍हाडा पुनर्वसनाच्‍या अनुषंगाने वास्‍तू विशारद शरद महाजन यांनी उपस्‍थितांसमोर आराखड्याचे सादरीकरण केले. आराखडा मंजूरीसाठी कायदेशीर बाबींचा त्‍यांनी उल्‍लेख केला. या भूखंडाच्‍या उत्‍तरेकडील बाजूस वायुसेनेची सीमाभिंत आहे. सुरक्षेच्‍या कारणास्‍तव त्‍या ठिकाणी बांधकामात अडथळे येऊ शकतात. हे गृहित धरून पुनर्विकास आराखड्याचे सादरीकरण केल्‍याचे महाजन यांनी सांगितले. वाढीव चटई क्षेत्राच्‍या अनुषंगाने काही बदल करणे अपेक्षित असल्‍याचे सुचविले. पाच टक्‍के पायभूत सुविधांसाठी म्‍हणजेच महावितरण, अग्निशामक आणि रस्‍ते २४ मीटर करणे आवश्‍यक असल्‍याचे सांगितले. पुर्वी पुनर्विकास करण्यासाठी ज्‍या नागरिकांनी म्‍हाडाकडे शुल्‍क जमा केले आहे. अशा एकल इमारतींचा विकास करताना जागेअभावी त्‍यांना सुविधा देणे अडचणीचे ठरत आहे.

सर्वानुमते म्‍हाडाच्‍या मुख्य अधिकाऱ्यांना दिलेल्‍या सूचना –

  • वसाहतींमधील सर्व इमारतींचे पुनर्वसन होण्यास म्हाडा बांधील आहे.
  • १०० मी प्रतिबंधित क्षेत्राबाबत संदिग्धता न ठेवता यामध्ये बाधित होणाऱ्या १९ इमारती ( सुमारे ५००+ सदनिका) यांचे उर्वरित बांधकाम योग्य जागेत पुनर्वसन करा.
  • स्वयंविकास वा विकासक सोबत करार केलेल्या ३-४ इमारती/ सोसायट्यांना त्यांचे हक्कानुसार समावेश करा.
  • सर्व समावेशक पध्दतीने सर्व इमारतींना प्रमाणित जमिनक्षेत्र व चटई क्षेत्र अनुज्ञेय करणेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
  • सुधारित आराखडा करताना उद्यान, शाळा, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स व मनपा पाणी पुरवठा योजनेच्या जागा वगळून तसेच अस्तित्वातील रस्ते रूंद करा.
  • रस्त्यांनी नैसर्गिकरित्या विभागणी झालेल्या भूखंडांवर त्या मधील इमारतींचे व बाधित होणाऱ्या इमारतींचे पुनर्वसन करा.
  • विद्युत पुरवठा यंत्रणा व अन्य आवश्यक सुविधा क्षेत्र राखीव ठेऊन विकसित करा.
  • सर्व भागधारकांच्या सूचना व नियमांतील तरतुदी नुसार म्हाडाचा आराखडा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात यावा.
  • सर्वांना समान न्यायाने प्रमाणित लाभ अनज्ञेयतेचा प्रस्ताव धोरणात्मक निर्णयासाठी मुंबई म्हाडाला त्वरित सादर करा.
  • पर्यावरण विभागाची ना हरकत, संरक्षण विभागाची ना हरकत व पुणे महापालिकेची आराखडा मंजूरीही म्हाडाने घ्यावी.


वायुसेनेच्‍या जवळील शंभर मीटर भागात पुनर्विकास करताना अडचणी येत असल्‍याबाबत लेखी पत्र घेणे आवश्‍यक आहे. तसे पत्र नागरिकांना उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी बैठकीत केली. अन्‍यथा ते वगळून उर्वरीत पुनर्विकासाचा आराखडा मांडण्यात तांत्रिक अडथळे निर्माण होतील. बांधकाम करता येणार नसेल तर ओपन स्‍पेस ठेवावी. त्‍या ऐवजी पायाभूत सुविधेत बदल करणे योग्य नसल्‍याचेही नमूद केले. या भागातील पाण्याची टाकी, दवाखाने, उद्याने, शाळा-महाविद्यालय हे पुर्वीपासूचन विकसीत आहेत. त्‍यामुळे पुन्‍हा एकात्‍मिक पुनर्विकास करताना या गोष्टींचा विचार व्‍हावा, अशा सूचना दिल्या आहेत.

  • डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर, पुणे महापालिका.

पुणे नवरात्रौ महिला महोत्सवात फॅन्सी ड्रेस स्पर्धा संपन्न

पुणे-२७व्या पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाअंतर्गत आज आयोजित केलेल्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. १३ ते २० वर्षे, २१ ते ४० वर्षे आणि ४१ वर्षांपुढील असे महिलांचे गट होते. महिलांनी पारंपरिक वेशभूषेचा सुंदर आविष्कार घडवीत देवीच्या विविध रूपांचे दर्शन घडविले.
शिवदर्शन-सहकारनगर येथील श्री लक्ष्मीमाता मंदिर प्रांगणात झालेल्या महिलांच्या या फॅन्सी ड्रेस स्पर्धेत विविध वयोगटांतील २००हून अधिक महिलांनी भाग घेतला होता. स्पर्धेत अनेक महिला कालीमाता, मीनाक्षी देवी यांच्या प्रभावी वेशभूषेत सहभागी झाल्या. त्याचप्रमाणे काहींनी भारत माता, जिजाबाई, सावित्रीबाई फुले, जनाबाई, शेतकरी स्त्री यांच्या रूपात अवतरून आपल्या सशक्त आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाची छाप सोडली. विशेष म्हणजे एका स्पर्धक महिलेने प्लॅस्टिकचे रूप धारण करून समाजात पर्यावरणसंवर्धनाचा संदेश दिला. त्याला प्रेक्षकांकडून दाद मिळाली.
संपूर्ण स्पर्धा रंगतदार वातावरणात पार पडली. सहभागी महिलांनी सादर केलेली वेशभूषा, आत्मविश्वास व आकर्षक प्रस्तुतीमुळे प्रेक्षक भारावून गेले. महिलांचा सहभाग व उत्साह यांमुळे नवरात्रौ महिला महोत्सवाचे सौंदर्य आणखीनच खुलून आले. प्रारंभी महिलांनी देवीची आरती केली.
या उपक्रमाबद्दल पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक-अध्यक्ष आबा बागुल, पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल यांनी समाधान व्यक्त केले. महिलांच्या अशा सहभागामुळे समाजात संस्कृती जपण्यासोबतच प्रेरणादायी ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वे आणि सामाजिक संदेश अधोरेखित होत आहेत, असे मत व्यक्त करण्यात आले.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :
४१ वर्षांपुढील वयोगट
प्रथम क्रमांक – रोहिणी टिळक
द्वितीय क्रमांक – नंदा जोशी
तृतीय क्रमांक – स्वाती पवार
चतुर्थ क्रमांक – रत्नमाला खिवंसरा

२१ ते ४० वयोगट
प्रथम क्रमांक – राजश्री हबीब
तृतीय क्रमांक – योगिता पिंपळगावकर
चतुर्थ क्रमांक – मयूरी देवकर

१३ ते २० वयोगट
प्रथम क्रमांक – श्रुती विश्वकर्मा
द्वितीय क्रमांक – स्वरांगीता जाधव
तृतीय क्रमांक – प्रांजल अवचिते
चतुर्थ क्रमांक – सृष्टी धस
बक्षिसे ३००० रुपये, २००० रुपये, १००० रुपये आणि ५०० रुपये अशी होती.

सर्व स्पर्धकांना प्रसाद व भेटवस्तू देण्यात आल्या.

२७व्या पुणे नवरात्रौ महिला महोत्सवातकन्यापूजानात १००० कन्या सहभागी

पुणे-वयोगट ३ ते १२ वर्षांमधील १०००हून अधिक कन्या, रंगीबेरंगी ड्रेस, कपाळावर चुनरी, चंद्रकोर, स्तोत्रपठण, लकी ड्रॉ, खाऊवाटप अशा उत्साही वातावरणात शिवदर्शन–सहकारनगर परिसरातील श्री लक्ष्मीमाता मंदिराच्या प्रांगणात ललिता पंचमीनिमित्त पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाअंतर्गत आज कन्यापूजन कार्यक्रम संपन्न झाला. प्रांगणात आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. सहभागी सर्व लहान मुलींच्या कपाळावर चुनरी, चंद्रकोर आणि कुमकुम तिलक पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा सौ. जयश्री बागुल यांनी लावले. या सर्व लहान कन्यांचे पाय धुऊन त्यावर स्वस्तिक चिन्ह काढण्यात आले. त्यानंतर औक्षण करून गजरे देण्यात आले. तसेच सामूहिक आरती करण्यात आली.

यावेळी बालगीते व नृत्याचा बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आला. यावेळी या मुलींनी नऊवारी साडी, घागरा, पंजाबी ड्रेस असे रंगीबेरंगी पोशाख परिधान केले होते. याशिवाय कालिका देवी, लक्ष्मी, सरस्वती, दुर्गा, अर्धनारी नटेश्वर, कमळातील देवी अशी रूपे वेशभूषेतून साकारली होती. याप्रसंगी अनेक मुलींनी गणपती स्तोत्र, श्रीसूक्तपठण, दुर्गास्तुती तोंडपाठ म्हणून दाखवली आणि उपस्थितांची मने जिंकली. यावेळी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लकी ड्रॉमधील विजेत्या दुर्वा जाधव, नंदिनी राजपूत, अक्षरा कदम, समृद्धी पवार, आरुषी भारती या मुलींना सायकल, ब्लँकेट, कॅरम इत्यादी बक्षिसे देण्यात आली. तसेच लकी ड्राॅमधील अन्य १० मुलींना स्कूल बॅग्ज व प्रवासी बॅग्ज देण्यात आल्या. सहभागी सर्व मुलींना वॉटरबॅग व खाऊ देण्यात आला.

याप्रसंगी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक-अध्यक्ष व माजी उपमहापौर आबा बागुल यांनी सर्वांचे स्वागत केले आणि प्रत्येकीला ‘’तू मोठी झाल्यावर काय होणार ?’’ असे विचारले. यावर अनेकींनी डॉक्टर, पोलीस इन्स्पेक्टर, शास्त्रज्ञ अशी उत्तरे दिली. यावर आबा बागुल म्हणाले की, ‘’मुलींना मोठी स्वप्ने बघू द्यात आणि त्यांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी पालकांनी विशेष मेहनत घेतली पाहिजे.’’

पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल यांनी स्त्रीभ्रूणहत्येविरुद्ध व सुरक्षेबाबत आवाज उठविण्याचे आवाहन करून म्हटले की, ‘’पालकांनी मुलगी झाली तरी आनंदच मानला पाहिजे. मुलीला खूप शिकवा किंवा विविध कलांमध्ये पारंगत करा. त्याचबरोबर आपले कुटुंब, नातेवाईक, मित्र, शेजारी या सर्वांमध्ये स्त्रीभ्रूणहत्येबद्दल व सुरक्षेबद्दल जागरण करा.’’

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता बागुल, नूपुर बागुल आणि योगिता निकम यांनी केले. यावेळी डॉ. सौ. रांका, सौ. सुचेता अण्णा थोरात, उद्योगपती सुधीर वाघोलीकर उपस्थित होते.

ऑक्टोबरमध्ये बँकाना एवढ्या सुट्ट्या … ATM मध्ये होईल गर्दी ..

0

मुंबई-
पुढील महिन्यात, ऑक्टोबरमध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये बँका एकूण २१ दिवस बंद राहतील. आरबीआय कॅलेंडरनुसार, चार रविवार आणि दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार व्यतिरिक्त, वेगवेगळ्या ठिकाणी बँका १५ दिवस बंद राहतील.

तर, जर पुढच्या महिन्यात तुमचे बँकेचे कोणतेही महत्त्वाचे काम असेल तर तुम्ही या सुट्ट्या वगळता बँकेला भेट देऊ शकता. ऑक्टोबरमध्ये तुमच्या राज्यात बँका कधी बंद राहतील ते लक्षात घ्या…
तारीख
बंद राहण्याचे कारण
कुठे बंद असणार

1 ऑक्टोबर महानवमी
आंध प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, ओडिशा, अरुणाचल प्रदेश, असम, झारखंड, सिक्किम, त्रिपुरा व पश्चिम बंगाल
2 ऑक्टोबर

गांधी जयंती /विजयादशमी दसरा
सर्व ठिकाणी

3 ऑक्टोबर
दुर्गा पूजा
सिक्किम
4 ऑक्टोबर
दुर्गा पूजा
सिक्किम
5 ऑक्टोबर
रविवार
सर्व ठिकाणी
6 ऑक्टोबर
लक्ष्मी पूजा
त्रिपुरा व पश्चिम बंगाल
7 ऑक्टोबर
महर्षि वाल्मिकी जयंती/कुमार पौर्णिमा
कर्नाटक, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश व ओडिशा
10 ऑक्टोबर
करवा चौथ
हिमाचल प्रदेश
11 ऑक्टोबर
दूसरा शनिवार
सर्व ठिकाणी
12 ऑक्टोबर
रविवार
सर्व ठिकाणी
18 ऑक्टोबर
काटी बिहू
आसाम
19 ऑक्टोबर
रविवार
सर्व ठिकाणी
20 ऑक्टोबर
दीपावली/नरक चतुर्दशी/काली पूजा लक्ष्मी पूजन/दीपावली/गोवर्धन पूजा
बहुतांश ठिकाणी
21 ऑक्टोबर
बहुतांश ठिकाणी
22 ऑक्टोबर
दीपावली (बली प्रतिपदा)/विक्रम संवंत नव वर्ष दिवस/गोवर्धन पूजा/लक्ष्मी पूजा
बहुतांश ठिकाणी
23 ऑक्टोबर
भाऊबीज/चित्रगुप्त जयंती/लक्ष्मी पूजा
बहुतांश ठिकाणी
25 ऑक्टोबर
चौथा शनिवार
सर्व ठिकाणी
26 ऑक्टोबर रविवार
सर्व ठिकाणी
27 ऑक्टोबर
छठ पूजा (सायंकाळची पूजा)
बिहार, झारखंड व पश्चिम बंगाल
28 ऑक्टोबर
छठ पूजा (सुबह (सकाळची पूजा)
बिहार व झारखंड
31 ऑक्टोबर
सरदार वल्लभभाई पटेल जयंती
गुजरात