Home Blog Page 112

ज्ञानोबा-तुकोबांच्या  गजरात “खेळ रंगला वारकर्‍यांचा’ महाराष्ट्रात प्रथमच

पुणे, २९ सप्टेंबर: ” पुंडलिक वरदा हरी विठ्ठल’, ‘जय जय रामकृष्ण हरी’ यां सारख्या जयघोषणाने “खेळ रंगला वारकर्‍यांचा” ने वारकऱ्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली.  वारकरी परंपरेचे विविध पैलू असणाऱ्या रिंगण, फुगडी, काटवट कणा, कांदा फोडी, तळ्यात मळ्यात, हरिनामाच्या जयघोषात उड्या मारणे यासारख्या खेळात प्रत्येक वारकरी दंग झाला होता.
वारकरी परंपरेला आणि संस्कृतीला अभिवादन म्हणून महाराष्ट्रात प्रथमच मुळशी येथील युवानेते मिलिंद दादा वाळंज युवा मंचाच्यावतीने  ‘खेळ रंगला वारकर्‍यांचा’ या भक्तिमय कार्यक्रमाचे सनीज वर्ल्ड, सूस येथे आयोजन करण्यात आले होते.  येथे वारकऱ्यांनी आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा अनुभव घेतला. या कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो वारकरी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदकुमार ( बाबूजी ) वाळंज हे होते. तसेच खासदार श्रीरंग बारणे , आमदार शंकर भाऊ मांडेकर, आमदार अतुल शेठ बेनके, सनी निम्हण, मुळशी येथील युवानेते व सामाजिक कार्यकर्ता मिलिंद वाळंज,  ह भ प पांडुरंग महाराज शास्त्री शितोळे, वारकरी सांप्रदाय समाज तालुका मुळशी दिंडी क्र. ९६ चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पहिल्या दहा जोडप्यांना म्हणजेच  रेणुका जोरी, नथाबाई दिनकर भरम, अंजना दत्तत्रय पळसकर, शंकर वाघू कंधारे, सुनंदा अंकुश शेडगे, लक्ष्मीबाई नारायण साठे, अशोक बाबूराव घोले, बबन बाबुराव वाळंज, बाळू संतोष हिलम ,अजय अशोक ओव्हाळ, मंगल पांडुरंग दाभाडे यांना  विमानाने काशी दर्शन घडविण्यात येईल.  याप्रसंगी अनेक वारकऱ्यांना बक्षीसे देण्यात आली. तसेच, सेवाधारी आशा वर्कर्सच्या नऊ दुर्गांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला
ह.भ.प. पांडुरंग महाराज शास्त्री म्हणाले, “अध्यात्म,  विज्ञान आणि राजकारण ज्यावेळी एकत्र येईल त्यावेळी भारत महासत्ता म्हणून उदयास येईल.  वारकरी संप्रदायातील तत्त्वज्ञान शांती प्रदान करणारे आहे.  यातील खेळ एकमेकांशी समन्वय साधत शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सुदृढ करणारे आहेत. या संप्रदायातील परंपरा जनतेला कळावी यासाठी खेळ रंगला वारकऱ्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मिलिंद वाळुंज म्हणाले” हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, असं सतत म्हणणारा तो वारकरी असतो.  जो वारीत जातो तो वारकरी असतो. पण विज्ञानालाही जे कळलं नाही आणि जो विनयशील आहे तो वारकरी आहे.  जो पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होऊन आभार व्यक्त करतो तो वारकरी. वारकरी संप्रदायाची परंपरा हे आमच्या घराण्यात सुरुवातीपासूनच होती. यात बाबूजींनी वारकऱ्यांसाठी केलेल्या कार्याचा अखंड वसा मी पुढे नेईन.”

हभप दशरथ महाराज वाहले म्हणाले, “विज्ञानाच्या युगात सर्व काही मिळालं पण सुख आणि समाधान नाही. या साठी वारकरी संप्रदायाची संगत आवश्यक आहे.  वारकरी संप्रदायाने एक विचार दिला, तसेच खेळाच्या माध्यमातून शरीर सुदृढ केले जाते. पहिला खेळ रिंगण, यामध्ये वारकरी उड्या मारतो नाचतो हरिनामाच्या जयघोषात हात वर खाली करतो त्यामुळे श्वसनाच्या क्रिया ह्या उत्तम होतात. फुगडी, काटवट कणा, कांदा फोडी असे वेगवेगळे खेळ खेळले जातात. हे खेळ समाज स्वास्थ्य बरोबरच मन सुदृढ ठेवते. “
अतुल शेठ बेनके म्हणाले, ” वाळंज परिवारामध्ये आजही अखंडपणे वारकरी परंपरा सुरू आहे. नव्या पिढीला संस्कारक्षम करणे  खूप कठीण झाले आहे. अशा वेळेस वारकरी संप्रदायच हे करू शकते.

याप्रसंगी आध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांबरोबर  सुनिल चांदेरे, शांताराम इंगवले , नंदुशेठ भोईर, अनंता आखाडे, गणपत मेंगडे , कोमल वाशिवले, अंकुश मोरे, बाळासाहेब चांदेरे,भगवान नाकती,कालिदास गोपलघारे, सचिन आमराळे,  सुनिल वाडकर , बाबा कंधारे, अमित कंधारे, विलास बेडेकर, सचिन आमराळे,सुखदेव मांडेकर,राजेश मेहता मुळशी तालुक्यातील वारकरी संप्रदायातील सर्व प्रमुख मंडळी, सर्व गावातील आजी-माजी सरपंच, उपसरपंच,  पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश मारणे यांनी केले.

जागतिक मराठी संमेलन पणजीत – अध्यक्षपदीशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर

पुणे-जागतिक स्तरावर पसरलेल्या मराठी गुणवंतांना एकत्र आणणारे आणि गोव्यातील सांस्कृतिक विश्वासाठी ऐतिहासिक ठरणारे “जागतिक मराठी संमेलन- शोध मराठी मनाचा २०२६’ यंदा गोव्याची राजधानी पणजी येथे होणार आहे. जागतिक मराठी अकादमी, गोवा मराठी अकादमी, गोमन्तक साहित्य सेवक मंडळ इन्स्टिट्यूट मिनिझेस ब्रागांझा (आयएमबी) व बिल्वदल परिवार या संस्थांच्या संयुक्त विद्यमान ९ ते ११ जानेवारी २०२६ मध्ये हे संमेलन पार पडणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रख्यात शास्त्रज्ञ आणि विचारवंत डॉ. अनिल काकोडकर यांची निवड करण्यात आली आहे. या निर्णयाची माहिती जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष व प्रख्यात कवी रामदास फुटाणे यांनी दिली.

यावेळी दशरथ परब, प्रा. अनिल सामंत, प्रा. डॉ. अशोक पाटील, रमेश वंसकर, सागर जावडेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संमेलनाची रूपरेषा, कार्यक्रमांचे स्वरूप व अपेक्षित सहभाग याबाबत यावेळी माहिती देण्यात आली.

प्रा. अनिल सामंत यांनी या संमेलनाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, जागतिक मराठी संमेलनाचे हे २१ वे वर्ष आहे. गोव्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात मराठी भाषेला मोलाचे स्थान आहे. गोव्यातील सांस्कृतिक परंपरा आणि मराठी यांचा संगम अधिक दृढ व्हावा, यासाठी हे संमेलन महत्त्वाचे ठरणार आहे. विविध उपक्रम, चर्चासत्रे व वैचारिक मैफलींमुळे मराठीचा विकास अधिक व्यापक प्रमाणावर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संमेलनादरम्यान परिसंवाद, काव्यवाचन, चर्चासत्रे, नाट्यप्रयोग तसेच मराठी संबंधित विविध उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. गोव्यातील विविध संस्था, लेखक, कवी, कलाकार आणि वाचक मोठ्या संख्येने या संमेलनात सहभागी होतील अशी अपेक्षा आहे.

मराठी उद्योग , कला व संस्कृती यांचा जागतिक स्तरावर गौरव व्हावा आणि नवीन पिढीला प्रेरणा मिळावी हा या संमेलनामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. परिणामी गोव्याच्या भूमीवर होणारे हे संमेलन जागतिक मराठी विश्वाला नवी दिशा देणारे ठरेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी देणारा विचार RSSच्या काळ्या टोपीचा; राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा.

संविधान व लोकशाही मुल्यांच्या रक्षणासाठी दीक्षाभूमी ते सेवाग्राम संविधान सत्याग्रह पदयात्राचा शुभारंभ.

महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी, मविआचे नेते व स्वयंसेवी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा पदयात्रेत सहभाग.

मुंबई/नागपूर, दि २९ सप्टेंबर २०२५.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आमचे निवेदन जाहिरपणे सांगितलेले आहे. निसर्ग, नियती त्यांना सुबुद्धी देवो ही प्रार्थना करत आहे. दसऱ्याला रावणाचे दहन केले जाते ते एका व्यक्तीचे नाही तर प्रवृत्तीचे दहन असते. संघाची दहा तोंडे दहा दिशेनेच नाही तर सर्व प्रतिगामित्वामध्ये दडलेली आहेत त्याचा धिक्कार व दहन करावे अशी आमची अपेक्षा आहे असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

नागपूर येथील दीक्षाभूमीवरून सकाळी ६ वाजता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धव सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली संविधान सत्यागग्रह पदयात्रेची सुरुवात झाली. यावेळी काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य व माजी मंत्री नसीम खान, सुनिल केदार, अनिस अहमद, राजेंद्र मुळक, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव प्रफुल्ल गुडधे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख, खा. नामदेव किरसान, खा. शामकुमार बर्वे, आमदार अभिजीत वंजारी, शहर काँग्रेस अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, शिवसेना नेत्या सुषमा अंधारे, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष नाना गावंडे, किशोर कान्हेरे, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, नागपूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अश्विन बैस, संदेश सिंघलकर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, संविधानाला अभिप्रेत असलेल्या भारतासाठी हातात हात घालून सर्वभारतीयांनी काम करावे आणि संविधानाचे सत्य सर्वदूर पसारावे हाच या पदयात्रेमागचा हेतू आहे असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना भाजपाच्या एका प्रवक्त्याने छातीत गोळ्या घालण्याची जाहीर धमकी दिली आहे त्याचा तीव्र शब्दात धिक्कार करत हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, महात्मा गांधी यांच्या छातीत गोळ्या घालणारी औलाद अजून जिवंत असून हा विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काळ्या टोपीतून आला आहे परंतु राहुल गांधींच्या केसाला जर धक्का लावाल तर याद राखा असा इशारा काँग्रेस प्रवक्ते हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.

यावेळी तुषार गांधी म्हणाले की, लोकशाही व संविधान व लोकांच्या सत्याग्रहाचा अधिकार यासाठी ही पदयात्रा आयोजित करण्यात आली असून हा जनतेचा आक्रोश आहे. या पदयात्रेत महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे नेते पदाधिकारी व सर्वसामान्य जनता यात सहभागी झालेली आहे.

या पदयात्रेने दुपारपर्यंत अशोकवन इथपर्यंतचा प्रवास तिथेच भोजन घेऊन विश्राम केला. आज सायंकाळी यात्रा बुटीबोर येथे पोहोचणार असून तिथे जाहीर सभा व यात्रेचा मुक्काम असणार आहे.

मलनिस्सारण प्रकल्पांमुळे नदी प्रदूषण होणार कमी : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ

  • मोहोळ यांचा सलग १२वा जनता दरबार नागरिकांच्या प्रतिसादात संपन्न
– खासदार जनसंपर्क सेवा अभियानाचा दुसरा टप्प्याच्या पर्वती विधानसभेत समारोप

पुणे : पुणे महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २३ गावांसाठी केंद्र सरकारने ३३२ कोटी रुपयांच्या मलनिस्सारण आराखड्याला नुकतीच मंजुरी दिली असून त्यामुळे पुणे शहरातील नदी प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास केंद्रीय सहकार राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.

पर्वती विधानसभा मतदारसंघात सिंहगड रस्ता परिसरातील कल्पना चावला इंग्रजी माध्यम शाळेत आयोजित करण्यात आलेल्या खासदार जनसंपर्क सेवा अभियान अर्थात जनता दरबार कार्यक्रमात मोहोळ बोलत होते. यावेळी नगरविकास राज्यमंत्री आमदार माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर यांच्यासह भाजपा पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

मोहोळ म्हणाले, “अटल मिशन फॉर रेज्युव्हनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन (अमृत) योजनेअंतर्गत या मलनिस्सारण प्रकल्पाची एकूण किंमत १,४३७.९४ कोटी रुपये असून, त्यापैकी ५३३.८५ कोटी रुपयांचे काम आधीच मंजूर झाले आहे. त्यात नव्याने ३३२.३० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून लवकरच कामाला गती मिळणार आहे.”

मोहोळ पुढे म्हणाले, “या आराखड्यांतर्गत जुन्या ड्रेनेज लाईन्स बदलण्यात येणार असून जवळपास ४७२ किलोमीटर नवीन पाइपलाईन टाकण्यात येणार आहे. यासोबतच ८ नवीन मलशुद्धीकरण केंद्रे (STPs) उभारली जाणार असून त्यांची एकत्रित क्षमता २०१ एमएलडी (मिलियन लिटर प्रति दिवस) इतकी असेल.”

खडकवासला, नऱ्हे, जांभुळवाडी, नांदोशी, किरकटवाडी पिसोळी, सणसनगर, कोंढवे धावडे, किर्कटवाडी, भिलारवाडी, सुस, म्हाळुंगे, गुजर निम्बाळकरवाडी, आणि मंगदेवाडी या गावांमध्ये या योजनेअंतर्गत कामांची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती ही मोहोळ यांनी दिली.

पुणेकर नागरिकांच्या मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी पायाभूत सुविधा उभारणीतील हा मोठा टप्पा आहे. समाविष्ट गावांमध्ये स्वच्छ व शास्त्रशुद्ध मलनिस्सारण यंत्रणा उपलब्ध होणार असून, त्यामुळे पुणे शहरातून वाहणाऱ्या मुळा-मुठा नद्यांचे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल असा विश्वास मोहोळ यांनी व्यक्त केला.

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाचा दुसरा टप्पा पूर्ण !

सामान्य पुणेकरांच्या समस्या प्रश्न अडीअडचणी सुटाव्यात यासाठी मोहोळ यांनी सुरू केलेल्या खासदार जनसंपर्क सेवा अभियानाचा दुसरा टप्पा पूर्ण झाला असून पुणे लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी दोन वेळा हे अभियान राबवण्यात आले आहे. पुढील महिन्यापासून या अभियानाचा तिसरा टप्पा सुरू होणार आहे. नागरिकांचे प्रश्न या अभियानाद्वारे सुटत असल्याने दिवसेंदिवस या उपक्रमात अधिकाधिक पुणेकर सहभागी होताना पाहायला मिळत आहेत.

शनिवारी जयमाला काळे-इनामदार यांचा सत्कार व लावण्यांचे कविसंमेलन


पुणे : ज्येष्ठ अभिनेत्री-नृत्यांगना जयमाला काळे-इनामदार यांच्या अभिनय-नृत्य कारकिर्दीला 65 वर्षे पूर्ण झाल्याप्रित्यर्थ रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे त्यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रम शनिवार, दि. 4 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता पत्रकार भवन, नवी पेठे येथे आयोजित करण्यात आला आहे. इनामदार यांचा सत्कार संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक, विचारवंत आणि महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. पूना गेस्ट हाऊसचे संचालक डॉ. किशोर सरपोतदार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‌‘लावण्य‌’ या विषयावर लावण्यांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले असून यात जयंत भिडे, डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी, प्रभा सोनवणे, वर्षा कुलकर्णी, मीना शिंदे, रूपाली अवचरे, विजय सातपुते, वासंती वैद्य, मनीषा सराफ, स्वप्नील पोरे, सुजाता पवार यांचा सहभाग असणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

पुणे नवरात्रौ महिला महोत्सवात म्युझिकल तंबोला स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे- पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाअंतर्गत आयोजित म्युझिकल तंबोला (हाऊजी) स्पर्धेला महिलांनी उत्साहाने प्रतिसाद दिला. सुरेल गाण्यांच्या साथीने खेळलेली ही स्पर्धा केवळ मनोरंजनापुरती मर्यादित न राहता, महिलांना आनंद, मैत्री आणि स्नेहबंध दृढ करण्याची संधी ठरली.

ही स्पर्धा पुण्यातील सुप्रसिद्ध गायिका आरती दीक्षित आणि आकाश सोळंकी यांच्या मधुर गायनाने घेण्यात आली. त्यांच्या गायनामुळे वातावरण अधिकच रंगतदार व सुरेल झाले.
शिवदर्शन–सहकारनगर येथील श्री लक्ष्मीमाता मंदिर प्रांगणात झालेल्या या स्पर्धा कार्यक्रमात प्रारंभी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक-अध्यक्ष आबा बागुल व पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा सौ. जयश्री बागुल यांनी सर्वांचे स्वागत केले. त्यानंतर सामूहिक आरती झल्यानंतर स्पर्धेला प्रारंभ झाला. यामध्ये २००हून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या.

स्पर्धेत विजयी ठरलेल्या महिला पुढीलप्रमाणे –

1st Row – रतन मोरे

2nd Row – नंदा भट्टड

3rd Row – शकुंतला सिकची

4 Corner – सुप्रिया पुरोहित

1st Five Songs – दीपाली घाटे

Full हाऊजी – वर्षा बेंद्रे

विजेत्या महिलांचा सत्कार करून त्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली.
या कार्यक्रमामुळे महोत्सवात उत्साह, हास्य आणि आनंदाची रंगत भरली. महिलांच्या जोशपूर्ण सहभागामुळे वातावरणात खऱ्या अर्थाने नवरात्रीचा उत्सव रंग चढला.
याप्रसंगी श्रुतिका बागुल, वृषाली बागुल आणि वैष्णवी वाघोलीकर यांची विशेष उपस्थिती होती.

राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण (NSS) चा ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यशाळा संपन्न

पुणे, दि. २९ : राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणचा ७५ वा वर्धापन दिन निमित्त NSO, FOD, MOSPI व अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद, बी विभाग, ४ था मजला येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेस अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी, जिल्हा परिषदेचे अधिकारी, महसूल, कृषी व सहकार विभागतील मान्यवर , अर्थ व सांख्यिकी संचालनालय, प्रादेशिक कार्यालय पुणे कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच विविध शासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यशाळेचे उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्या हस्ते झाले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात शासकीय कामकाजामध्ये माहिती आधारित निर्णय घेण्याचे व लोककल्याणासाठी उपयुक्त ठरणाऱ्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सांख्यिकी विभागाच्या कार्याची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली.
उपसंचालक, जिल्हा सांख्यिकी कार्यालय पुणे, श्रीमती प्रियंका बोकील यांनी राज्यातील व जिल्हास्तरावरील सांख्यिकी कार्यालयांच्या कार्याची माहिती दिली. तसेच सार्वजनिक जनजागृतीसाठी विविध योजनांतर्गत उपयुक्त ठरणाऱ्या आकडेवारीचे महत्व त्यांनी स्पष्ट केले. स्वागतपर भाषणात सहसंचालक, NSO, प्रादेशिक कार्यालय, पुणे डॉ. रूही कुलकर्णी यांनी राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणचे महत्व स्पष्ट केले.तसेच अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे सहसंचालक सुनिल जाधव यांनी नागरिकांमध्ये जागरूकता वाढविण्याची आवश्यकता असल्याचे सांगून उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन केले.
यावेळी ‘कामगार शक्ती सर्वेक्षण ‘असंघटित क्षेत्रातील वार्षिक सर्वेक्षण व ‘कृषी सांख्यिकी –योजना’ या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी उपसंचालक , अर्थ व सांख्यिकी संचालनालय सुप्रिया हजारे यांनी आभार प्रदर्शन केले.

माहिती मागण्याची गरज पडू नये अशी पारदर्शी व्यवस्था निर्माण व्हावी- ॲड. प्रल्हाद कचरे

पुणे, दि. २९: शासकीय विभागांनी अधिकाधिक माहिती सार्वजनिकरित्या पाहण्यासाठी व्यवस्थेत (पब्लिक डोमेन) उपलब्ध करुन दिल्यास माहितीचा अधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होईल. माहितीचा अधिकार कायद्याखाली माहिती मागण्याची गरजच पडू नये अशी पारदर्शी, गतीशील व्यवस्था निर्माण व्हावी, अशी अपेक्षा निवृत्त अपर जिल्हाधिकारी ॲड. प्रल्हाद कचरे यांनी व्यक्त केली.

आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन २८ सप्टेंबरच्या निमित्ताने विभागीय आयुक्त कार्यालय आणि पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने विधानभवन येथे आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी सामान्य प्रशासन अपर आयुक्त तुषार ठोंबरे, सह आयुक्त अरुण आनंदकर, संजीव पलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम आदी उपस्थित होते.

या वर्षाची आंतरराष्रीी य माहिती अधिकार दिनाची संकल्पना ‘डिजिटल युगात पर्यावरणीय माहितीची उपलब्धता निश्चित करणे’ अर्थात ‘इनशुअरिंग ॲक्सेस टू एन्व्हायर्नमेंटल इन्फर्मेशन इन द डिजिटल एज’ अशी असल्याचे सांगून पर्यावरणीय माहितीसाठा, वातावरणीय बदल, प्रदुषण, आपत्ती धोके आदींच्या अनुषंगाने माहितीची सुलभ उपलब्धता आदी या संकल्पनेमागील बाबी असल्याचे ॲड. कचरे यांनी सांगितले.

डिजिटल व्यक्तिगत डेटा संरक्षण अधिनियम, २०२३ च्या अनुषंगानेही संक्षिप्त माहिती देण्यात आली. माहितीचा अधिकार अधिनियम, लोकसेवा हक्क अधिनियम, महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५, तसेच सार्वजनिक अभिलेख अधिनियम, १९९७ हे कायदे शासकीय सेवा बजावत असताना खूप महत्त्वाचे असून नागरिकांना माहिती, सेवा पुरवताना ती वेळेत कशी मिळेल याकडे लक्ष देण्याची गरज आहे. प्रशासन हे जनतेला उत्तरदायी असावे या दृष्टीने या कायद्याची निर्मिती झाली आहे, असे त्यांनी सांगितले.

अभिलेखांचे डिजिटायझेशन करण्यात महाराष्ट्राचा महसूल विभाग देशात आघाडीवर असल्याने महसूलविषयक माहितीची सुलभ उपलब्धता होत असल्याचेही ॲड. कचरे यांनी सांगितले.

माहिती अधिकार कायद्याच्या अंमलबजवणीच्या अनुषंगाने विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली.

कार्यशाळेला विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शासनमान्य ग्रंथांच्या यादीसाठी २०२४ मध्ये प्रकाशित ग्रंथ पाठविण्याबाबत आवाहन

पुणे, दि. २९ सप्टेंबर :राज्यातील शासकीय व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना मार्गदर्शक ठरावी म्हणून दरवर्षी ग्रंथालय संचालनालयामार्फत ग्रंथ निवड समितीच्या शिफारशीवर आधारित “शासनमान्य ग्रंथांची यादी” प्रकाशित करण्यात येते.

सन २०२४ या कॅलेंडर वर्षात (दि. १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४) मराठी भाषेत प्रकाशित झालेल्या व प्रथम आवृत्ती असलेल्या ग्रंथांचा शासनमान्य ग्रंथांच्या यादीत समावेश होण्यासाठी संबंधित ग्रंथकार, प्रकाशक यांनी प्रत्येकी एक प्रत विनामूल्य ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, नगर भवन, टाऊन हॉल, मुंबई – ४०० ००१ या पत्त्यावर दि. १५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत पाठविणे आवश्यक आहे. प्रकाशित झालेले ग्रंथ यापूर्वीच संचालनालयास पाठविले असल्यास त्यांची पुन्हा प्रत पाठविण्याची आवश्यकता नाही. असे अशोक गाडेकर ग्रंथालय संचालक यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

हवामान बदल आणि पाणी संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या तरुणांचा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून गौरव

▪️ सीओईपी पुणे येथे राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात तरुण क्लायमेट चॅम्पियन्सचा सन्मान

पुणे, दि. २९ सप्टेंबर २०२५ –
हवामान बदल व पाणी संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या तरुणांचा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज पुण्यात गौरव करण्यात आला. उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन, युनिसेफ महाराष्ट्र, अॅक्वाडॅम आणि सीईई यांच्या सहकार्याने “राज्यस्तरीय पाणी संवर्धन उत्कृष्ट पुरस्कार समारंभ” सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ, शिवाजीनगर येथे संपन्न झाला.

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील विविध महाविद्यालये, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या उल्लेखनीय पाणी संवर्धन कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले, “तरुणांनी पुढाकार घेतलेले आंदोलन हे व्यापक सामाजिक बदल घडवण्यासाठी महत्त्वाचे असते. छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांच्या विचारांचे वारसदार असलेले आजचे युवक शास्त्रीय ज्ञान आणि ठोस कृतीतून हवामान बदलासारख्या गंभीर समस्यांना तोंड देत आहेत हे निश्चितच उत्साहवर्धक आहे.”

महाराष्ट्र शासन व युनिसेफ महाराष्ट्र यांनी २०२३ पासून “यूथ एंगेजमेंट अँड वॉटर स्टुअर्डशिप (YEWS)” ही राज्यव्यापी मोहिम राबवली आहे. या अंतर्गत १३ जिल्ह्यांतील १,५०० हून अधिक महाविद्यालयांमध्ये ग्रीन क्लब स्थापन करून पाणी बचतीसाठी वैयक्तिक, संस्थात्मक व सामुदायिक पातळीवर उपक्रम राबवले गेले आहेत.

विद्यार्थ्यांनी गळणारे नळ दुरुस्त करणे, आंघोळीसाठी शॉवरऐवजी बादलीचा वापर करणे, दात घासताना पाणी न वाहू देणे असे उपाय दैनंदिन जीवनात अंगीकारले. संस्था स्तरावर पावसाचे पाणी साठवणे, सोक पिट्स व रिचार्ज पिट्स तयार करणे आदी उपक्रमही राबवले गेले.

ऑगस्ट २०२३ पासून सुरू झालेल्या या मोहिमेत ७,९१,००० विद्यार्थ्यांनी दैनंदिन सवयींमध्ये बदल करून एकत्रितपणे सुमारे २५.८ दशलक्ष घनमीटर पाणी वाचवले असून ही माहिती “Why Waste YEWS” या मोबाईल अ‍ॅपद्वारे नोंदवली गेली आहे. याशिवाय, MahaYouthNet पोर्टलवर राज्य सरकारने हवामान बदल व पाणी व्यवस्थापन विषयक ऑनलाइन सेल्फ-पेस्ड कोर्स सुरू केला आहे. आतापर्यंत २,२५,३७८ विद्यार्थ्यांनी या कोर्समध्ये प्रवेश घेतला असून १,३१,२९१ विद्यार्थ्यांनी तो यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे.

शैक्षणिक वर्ष २०२३–२४ मधील उपक्रमांच्या मूल्यमापनाच्या आधारे “सर्वोत्कृष्ट ग्रीन क्लब”, “पाणी संवर्धनावर सर्वोत्तम पोस्टर” आणि “पाणी बचतीवर सर्वोत्तम शॉर्ट व्हिडीओ/रील” या गटांमध्ये पाच राज्यस्तरीय व तीन जिल्हास्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.

या सोहळ्यासाठी निवडलेल्या महाविद्यालयांचे प्राचार्य, ग्रीन क्लब फॅकल्टी कोऑर्डिनेटर्स व विद्यार्थी उपस्थित होते. अहमदनगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, पालघर, पुणे व सातारा जिल्ह्यांतील प्रतिनिधींनी सहभाग घेतला.

हा उपक्रम महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभाग, नॅशनल सर्व्हिस स्कीम (एनएसएस), युनिसेफ महाराष्ट्र, अॅक्वाडॅम, सेंटर फॉर एन्व्हायर्न्मेंट एज्युकेशन (सीईई), वाय वेस्ट आणि युवक नेटवर्क यांच्या सहकार्याने राबवण्यात आला.

जिल्ह्यात क्लस्टर स्तरावर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारणीचा निर्णय

पुणे दि. २९ –
जिल्ह्यात वाढत्या औद्योगिकीकरण व नागरीकरणामुळे घनकचऱ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत असून स्थानिक स्तरावर त्याचे व्यवस्थापन करणे कठीण होत आहे. गावस्तरावर प्रकल्प उभारणीसाठी आवश्यक जागा उपलब्ध न झाल्याने, एकत्रित क्लस्टर स्तरावर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

या अनुषंगाने आज महात्मा गांधी सभागृह, जिल्हा परिषद पुणे येथे बैठक घेण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस श्री. चंद्रकांत वाघमारे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी,
श्रीमती शालिनी कडू प्रकल्प संचालक (जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा), श्री. व्यंकटेश दुर्वास सहआयुक्त नगरपालिका शाखा, पुणे जिल्हाधिकारी कार्यालय, श्री. अनिल दौंडे उपविभागीय अधिकारी, खेड, श्री. नितीन गवळी प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी चाकण, श्री. भूषण जोशी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) श्री. अप्पासाहेब गुजर उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी-स्वच्छता विभाग, श्री. विशाल शिंदे गटविकास अधिकारी, पंचायत समिती खेड, श्री. अंकुश जाधव मुख्याधिकारी नगरपालिका चाकण, श्री. भांडगे कार्यकारी अभियंता, एमआयडीसी चाकण तसेच संबंधित ग्रामपंचायतींचे सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत चाकण नगरपालिका व एमआयडीसी लगतच्या ग्रामपंचायती म्हणजे कडाचीवाडी, मेदनकरवाडी, नाणेकरवाडी, कुरळी-खराबवाडी, खालुम्ब्रे, म्हाळुंगे, निगोजे, मोई तसेच आंबेठाण या गावांचा क्लस्टरमध्ये समावेश करण्यात आला आहे.

बैठकी दरम्यान प्रकल्पासाठी जागा उपलब्धता, अपेक्षित खर्च तसेच गावनिहाय निर्माण होणारा दररोजचा घनकचरा याबाबत माहिती सादर करण्यात आली. त्यानंतर सर्व संबंधित ग्रामपंचायतींच्या एकत्रित सहभागातून क्लस्टर स्तरावर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यासाठी पुढील कार्यवाहीचे सविस्तर नियोजन करण्यात आले.

मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहीम

पुणे, दि. २९ सप्टेंबर : राज्य शासनामार्फत “राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा” या कालावधीत मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये इयत्ता १२ वी विज्ञान शाखेत शिक्षण घेणाऱ्या तसेच १२ वी उत्तीर्ण होऊन वैद्यकीय, अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी, आदी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, विशेष मागास प्रवर्ग व शैक्षणिक व समाजिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (मराठा ) या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.

विद्यार्थ्यांनी आपले अर्ज COVIS प्रणाली किंवा www.barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन भरून त्याची हार्ड प्रत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, आळंदी रोड, पुणे येथे कार्यालयीन वेळेत सादर करावी. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२५ आहे.

व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या व अर्ज प्रलंबित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी दर बुधवारी व गुरुवारी विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले असून परिपूर्ण प्रकरणात तात्काळ जात वैधता प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, अशी माहिती संजय दाणे उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, पुणे यांनी दिली.

भारताचा इतिहास महात्मा गांधीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही- श्रीपाल सबनीस

महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित फोटो प्रदर्शनचे उद्घाटन
पुणे-

महात्मा गांधी यांचा विचार विश्वाची सुख_शांती आनंद,मानवता, माणुसकी यांचे प्रतीक होते. जगभरात विविध मान्यवरांनी त्यांचे नेतृत्वास मान्यता दिली. मात्र, भारतात वेगळी परिस्थिती आजकाल दिसून येत आहे. अध्यात्म,अहिंसा, सत्य या विचारांवर त्यांनी स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरोधात प्रखर लढा दिला, त्यामुळे भारताचा इतिहास गांधीं शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यांचे चारित्र्य व चिंतन देशाशी एकरूप झालेले होते,त्यामुळे ते भाजपसह कोणीही तोडू शकत नाही. “महात्मा” पद उगीच कोणाला प्राप्त होत नसते. गांधीतील “महात्मा” जिवंत असून त्याला उजाळा देणे महत्त्वाचे आहे असे मत ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी सोमवारी व्यक्त केले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभय छाजेड यांच्या संकल्पनेतून महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने त्यांचे जीवनचरित्र मांडणाऱ्या फोटो प्रदर्शनचे उद्घाटन सारसबाग जवळ स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कलादालन याठिकाणी श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते पार पडले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे,माजी महापौर कमल व्यवहारे,संजय बालगुडे,अभय छाजेड,सुनील शिंदे,विठ्ठल गायकवाड, नीता परदेशी, डॉ. विवेक शर्मा, अक्षय जैन उपस्थित होते.
सुरुवातीला महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित फोटो प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर आयोजित कार्यक्रमा दरम्यान सबनीस म्हणाले, अभय छाजेड आणि उल्हास पवार यांच्या निष्ठाकडे पाहून मला त्यांचा आदर वाटतो. आपली निष्ठा हीच आपल्या जीवनाच्या चारित्र्याला अर्थ देत असते. अभय छाजेड कायम गांधीवादी आणि काँग्रेस विचारांचे अनुयायी राहिलेले आहेत. महात्मा गांधी यांची शिकवण आजचे विद्वान, राजकारणी, कार्यकर्ते विसरत चालले असल्याचे दिसत आहे. मात्र,मागील 25 वर्षापेक्षा अधिक काळ गांधी यांच्या जीवनावर आधारित प्रदर्शन भरवणे हे निष्ठेचे प्रतिक आहे. महात्मा गांधी यांनी बॅरिस्टर होऊन सुद्धा सर्वसामान्यांमध्ये सहजरित्या मिसळत अहिंसा व असहकार याचे महत्व सामान्यांना प्रतिकूल परिस्थितीत पटवून दिले. राजकारणात सध्या स्वार्थ, धर्म आणि जातीयवाद वाढलेला दिसत असून राजकारण म्हणजे व्यभिचार, गचाळ असे स्वरूप त्याला प्राप्त झाले आहे. गांधी केवळ तोंडाच्या चवीपुरते मर्यादित नको असून त्यांचा विचार स्वदेशी, स्वधर्म आणि सर्वसमावेशक याप्रती अधिक होता हे जाणून घेणे महत्त्वपूर्ण आहे. गांधीतील महात्मा आजही जिवंत आहे कारण, त्यांचे हिंदुत्व उदारमतवादी होते. इतरांशी मतभेद असूनही त्यांनी व्यापक विचार करून भारतीय संस्कृतीचे पालन केले. नथुराम गोडसे या मारेकऱ्याला देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली मात्र, आज काही मूठभर लोक त्याला देशभक्त ठरवत आहेत. अशाप्रकारचा ग्रुप हा विखारी विचारधारेचा असून ते देशाचे आणि मानवतेचे गुन्हेगार आहेत. जगाचे आदर्श मॉडेल म्हणून महात्मा गांधी यांच्याकडे पाहिले जाते. सत्ता हे सेवेचे साधन आहे हे सिद्ध करणारे त्यांचे नेतृत्व होते. अस्पृश्यता, जातीभेद यांना त्यांनी कुठेही थारा दिला नाही. गांधींचे नाव घेण्याची आवश्यकता आज देखील निर्माण होत आहे यातच त्यांची महती आहे.

उल्हास पवार म्हणाले, महात्मा गांधींचे विचारांची त्याकाळी लोकांनी टिंगलटवाळी केली. मात्र, 1945 साली जपान मधील हिरोशिमा व नागासाकी येथे अणुबॉम्ब हल्ला झाला आणि हिंसेचा अनर्थ ज्यांना कळला नाही त्यांना हिंसेचा अर्थ समजला गेला. लालबहादूर शास्त्री हे देखील महात्मा गांधींचे अनुयायी होते. गांधींचे विचार त्यांनी प्रत्यक्षात आत्मसात केलेले दिसून येत आहे. आज अशाचप्रकारे कृतीशील नेतृत्वाची गरज भासत आहे. लडाखला राज्याचा दर्जा मिळावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते वांगचुक सनदशीर मार्गाने आंदोलन करत होते. मात्र, सत्ताधारी यांनी त्यांना अटक केली हा निंदनीय प्रकार आहे.

अभय छाजेड म्हणाले,आजचा काळ महात्मा गांधी यांचे विचार अनुकरण करण्याचा आहे. मात्र, दुर्दैवाने प्रतिगामी शक्ती त्यांचे विचार मारून नथुराम गोडसेचे विचार पुढे नेत आहे. आज जगभरात महात्मा गांधी यांच्या विचाराचे महत्व पोहोचवण्याची गरज आहे.त्याकाळात पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामुळे हिंसाचार मोठ्या प्रमाणात असताना देखील, गांधी यांनी अहिंसेचा विचार लोकांसमोर मांडून त्यामाध्यमातून त्यांना एकत्र करून ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला ही बाब अवघड गोष्ट होती. तेव्हाची आणि आजची परिस्थिती पुन्हा सारखी झालेली आहे. सत्ताधारी हे गांधींचे विचार मारण्यात धन्यता मानतात मात्र, सर्वांनी मिळून गांधीजींचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे महत्त्वपूर्ण आहे.
हे प्रदर्शन २ ऑक्टोबर पर्यंत सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले असेल.

आयटी हब खराडीतील बहुमजली इमारतीत मसाज पार्लरच्या आड वेश्याव्यवसाय


पुणे -मार्केट यार्ड आणि पुणे-सातारा रस्त्यावरील धनकवडी भागातील मसाज पार्लर नंतर आता शहराच्या आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खराडी परिसरात पोलिसांनी एका बहुमजली इमारतीवर पोलिसांनी छापा टाकला.यावेळी मसाज पार्लर च्या नावाखाली येथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे उघड झाले. या प्रकरणी एका महिलेसह चार आरोपींविरुद्ध चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हा दाखल झालेल्या आरोपींमध्ये संदीप चव्हाण, रोहित शिंदे, स्वाती उर्फ श्वेता विजय शिंदे आणि गोपाळ यांचा समावेश आहे. पोलिस शिपाई वर्षा सावंत यांनी या प्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदननगर-खराडी भागातील एका फिटनेस क्लब जवळ असलेल्या इमारतीत आरोपी मसाज पार्लर चालवत होते. या पार्लरमध्ये दलालांमार्फत छुप्या पद्धतीने वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहकाचा वापर केला.

खात्री पटल्यानंतर पोलिसांनी मसाज पार्लरवर अचानक छापा टाकून कारवाई केली. या छाप्यात पीडित तरुणींना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान, आरोपींनी या तरुणींना जास्त पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त केले आणि त्यातून स्वतःची उपजीविका भागवत असल्याचे समोर आले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सीमा ढाकणे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

पुणे शहर परिसरात मसाज पार्लर च्या नावाखाली सुरू असलेल्या गैरप्रकाराबाबत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत पोलिस आयुक्तांनी अशा गैरप्रकारावर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. गेल्या चार दिवसांत पोलिसांनी तीन मसाज पार्लरवर छापे टाकून कारवाई केली आहे.

रंगली सलग  १०१ गीतांची सुरेल विक्रमी मैफल   !

उपक्रमाची नोंद ‘ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये

पुणे :गानकोकिळा भारतरत्न स्व.लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात कोथरूड येथील अंबर हॉलमध्ये गाण्यांच्या  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ‘लतांजली’ या नावाने सादर झालेल्या या कार्यक्रमात सलग  १०१ गीतांची सुरेल मैफल रंगली. २८ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता सुरू झालेला हा कार्यक्रम रात्री ८ वाजेपर्यंत असा सलग दहा तास चालला. या उपक्रमाची नोंद ‘ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये झाली.

आरती दीक्षित यांच्या संकल्पनेतून, हार्मनी इव्हेंट्स मॅनेजमेंटचे संस्थापक आमोद देव आणि अपूर्वा देव यांच्या आयोजनातून पार पडलेल्या या संगीतमय आदरांजलीत ३५ हून अधिक कलाकारांनी एकल व द्वंद्व गीतांच्या माध्यमातून लतादीदींना अभिवादन केले.या कार्यक्रमाचे निवेदन प्रशांत कुलकर्णी यांनी केले.

कार्यक्रमाला खा.मेधा कुलकर्णी आणि ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक सुलभा तेरणीकर उपस्थित होत्या.त्यांच्या हस्ते सर्व सहभागी कलावंतांना प्रमाणपत्र  आणि पदक  देण्यात आले. लता मंगेशकर यांची १०६  गाणी  सलग गाऊन ‘ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड’ मधे या कार्यक्रमाची नोंदणी झाल्याचे डॉ.इंद्रजित मोरे यांनी जाहीर केले.कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.लतादीदींच्या गाण्यांनी  वातावरण भारून टाकले आणि पुणेकर संगीतप्रेमींनी एका दिवसात १०१ गाण्यांचा आनंद घेत अविस्मरणीय अनुभव घेतला.

या कार्यक्रमात संजीव टांकसाळी, मिलिंद दामले, तुषार साधले, अनिता तळेले, ममता नरहरी, मृणाल भिडे, सुजाता माळवे,निशी बोथे, स्वाती बोरावके, विद्या हजारे,गायत्री बेलसरे, अश्विनी दातार, शिल्पा,वसुधा कुलकर्णी, मीनाक्षी दुसाने,शुभांगी पांचाळ, मृणालिनी चव्हाण,वर्षा भालेराव, प्रेरणा जेऊरकर,दिशा वालावलकर, सुनीता जाधव,भावना शुक्ला, मीना अवचट, शमा देशपांडे,श्रद्धा चौधरी, संजय खटावकर,अनघा धोपाटे, जयश्री रोकडे,गायत्री लडकत, माधव राखेलकर, रवींद्र क्षीरसागर,सोमनाथ हिवराळे,आमोद देव, प्रकाश सावंत, मोहित पारखी,दिलीप करमरकर यांनी आरती दीक्षित यांना साथ देत कार्यक्रम यशस्वी करण्यास हातभार लावला