Home Blog Page 111

जागतिक पर्यटन दिनानिमित्त सिंहगड किल्ला हेरिटेज वॉकचे आयोजन

पुणे, दि. 30 सप्टेंबर : संयुक्त राष्ट्र संघाच्या युनायटेड नेशन्स वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन मार्फत २७ सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात येतो. पर्यटनाचे सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक व पर्यावरणीय महत्त्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी हा दिवस जागतिक स्तरावर पाळला जातो. यंदा २०२५ सालच्या दिनाचे घोषवाक्य “Tourism and Sustainable Transformation” असे असून शाश्वत पर्यटन विकासास चालना देणे हा प्रमुख उद्देश आहे.

या निमित्ताने दिशा हॉलिडेज व पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग येथील १०० विद्यार्थ्यांसाठी सिंहगड हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले.

सिंहगड किल्ल्याची निवड ही केवळ सहलीसाठी नसून विद्यार्थ्यांना इतिहास, संस्कार व प्रेरणांचा जिवंत धडा मिळावा या हेतूने करण्यात आली होती. स्वराज्याच्या इतिहासातील सिंहगडाचे महत्त्व अधोरेखित करताना नरवीर तानाजी मालुसरे यांच्या बलिदानाची आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी उच्चारलेले “गड आला, पण सिंह गेला” हे अमर वचन विद्यार्थ्यांसमोर उलगडण्यात आले.

या वॉकदरम्यान विद्यार्थ्यांनी इतिहासाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला व त्यातील सत्य, त्याग, कर्तव्य आणि सन्मान या मूल्यांचे महत्त्व जाणून घेतले. सदर सहल विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे विनामूल्य आयोजित करण्यात आली होती.

महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळात लिपिक पदासाठी माजी सैनिकांना रोजगाराची संधी

पुणे, दि. 30 सप्टेंबर : महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्या. (मेस्को), महाराष्ट्र राज्य, पुणे येथे भारतीय संरक्षण दलांतून निवृत्त झालेल्या माजी सैनिकांना करार पध्दतीने लिपिक पदावर नियुक्ती करण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

उमेदवार सशस्त्र सेना दलातील निवृत्त जेसीओ, ओआर किंवा विधवा, युद्ध विधवा असावा. वय मर्यादा – कमाल ६२ वर्षे. अकाऊंटिंग, एमएस-ऑफिस तसेच मराठी व इंग्रजी टायपिंगचे ज्ञान असावे व त्याचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक. मराठी भाषेचे ज्ञान (वाचन, लेखन व संभाषण) आवश्यक. अकाऊंटिंग, एमएस-ऑफिस तसेच मराठी व इंग्रजी टायपिंगचे ज्ञान असावे व त्याचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल.

अर्जाचा नमुना www.mescoltd.co.in या मेस्कोच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून अर्ज ईमेलद्वारे अथवा प्रत्यक्ष, पोस्टाद्वारे मेस्को मुख्यालय, पुणे contact@mescoltd.co.in व क्षेत्रीय कार्यालय, पुणे ro-pune@mescoltd.co.in येथे १७ ऑक्टोबर २०२५ पर्यंत अर्ज करणे आवश्यक आहे. असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.) यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

मद्यपीडितांसाठी 1 ऑक्टोबर रोजी जनजागृती

पुणे, दि. ३० सप्टेंबर : मद्यासक्त व्यक्तींना मद्यमुक्त होण्यासाठी विनामूल्य मदत करणारी अल्कोहोलीक्स अनोनिमस (ए. ए.) ही विश्वव्यापी संस्था दिनांक १ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत शासकीय व खाजगी रुग्णालयांच्या बाह्यरुग्ण विभागात (ओ.पी.डी.) मोफत जनजागरण स्टॉल आयोजित करणार आहे.

ससून हॉस्पिटल, कमला नेहरु हॉस्पिटल, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, डी. वाय. पाटील हॉस्पिटल (चिंचवड), औंध हॉस्पिटल, येरवडा मेंटल हॉस्पिटल, वायसीएम हॉस्पिटल, आंबेडकर हॉस्पिटल (खडकी), प्राथमिक आरोग्य केंद्र वाघोली, राजीव गांधी रुग्णालय यांसह जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील इतर शासकीय व खाजगी रुग्णालयांत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

या जनजागरण स्टॉलवर मद्यपीडित रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोफत मार्गदर्शन, समुपदेशन तसेच अल्कोहोलीक्स अनोनिमस (ए. ए.) संदर्भातील माहितीपत्रकांचे वाटप करण्यात येईल.

मोफत मद्यमुक्तीची मदत व माहिती मिळविण्यासाठी ९७६५३५७७५७ किंवा ९०४९४५७७५७ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहयोगी प्राध्यापक, बै. जी. शा. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी केले आहे.

पदवीधर व शिक्षक मतदार याद्यांमध्ये नाव नोंदविण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांचे आवाहन

पुणे, दि. ३०: पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी १ नोव्हेंबर २०२५ या अर्हता दिनांकावर आधारित नव्याने मतदार याद्या (डी – नोव्हो) तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला असून मतदार नोंदणीची सुरुवात झाली आहे. अधिकाधिक पात्र मतदारांनी मतदार यादीमध्ये नाव नोंदवावे, असे आवाहन विभागीय आयुक्त तथा पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले.

पदवीधर व शिक्षक मतदार याद्यांमध्ये नव्याने नाव नोंदणी करण्यासंदर्भात जाहीर झालेल्या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी विधानभवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी गजानन पाटील, अपर आयुक्त तुषार ठोंबरे, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी मीनल कळसकर आदी उपस्थित होते.

डॉ.पुलकुंडवार म्हणाले, २०२० मधील मतदार नाव नोंदणी असली तरी पदवीधर व शिक्षकांना पुन्हा नव्याने नावनोंदणी करणे आवश्यक आहे. पदवीधर नाव नोंदणीसाठी नमुना क्रमांक १८ व शिक्षक नाव नोंदणीसाठी नमुना क्रमांक १९ भरुन देणे आवश्यक आहे. याकरिता भारत निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या यादीतील विद्यापीठातून १ नोव्हेंबर २०२५ पूर्वी किमान ३ वर्षापूर्वी पदवीधर झालेला किंवा पदवीशी समकक्ष शैक्षणिक पात्रता धारण करणारे पदवीधर पात्र राहतील. सर्व कार्यालय प्रमुखांना त्यांच्या कार्यालयातील पदवीधर कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयातील पदवीधर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मतदार यादीत नाव नोंदणी करावी.

शिक्षक मतदार नोंदणीसाठी २०१९ ते २०२५ या कालावधीत किमान ३ वर्षे शिक्षक पदावर कार्यरत असलेला, माध्यमिक व त्यावरील दर्जाच्या मान्यताप्राप्त शाळांमधील पूर्णवेळ शिक्षक नाव नोंदणीसाठी पात्र राहील. शैक्षणिक संस्थांचे प्रमुख (मुख्याध्यापक/प्राचार्य) एकत्रितरित्या सर्व शिक्षकांचे नोंदणी अर्ज संबंधित तहसील कार्यालयात जमा करू शकतात. शैक्षणिक संस्थांनी नमुना क्रमांक २ मधील शिफारशीसह अर्ज सादर करावेत असेही ते म्हणाले.

कोणत्याही राजकीय पक्षामार्फत, पक्षांचे मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी, नागरीक कल्याण संघटना आदींकडून एक गठ्ठा पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. तथापि, एकाच कुटुंबातील एकत्र राहणाऱ्या कुटुबियांचे अर्ज कुटुंबातील कोणतीही व्यक्ती एकत्रित सादर करू शकते, असेही त्यांनी सांगितले.

मतदार नोंदणी प्रक्रियेसाठी ऑनलाइन प्रणाली तयार करण्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे प्रयत्न सुरू आहेत. प्रणाली सुरू झाल्यानंतर त्याची माहिती प्रसिद्धीमाध्यमातून जाहीर करण्यात येईल. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी यांच्यासह उपविभागीय अधिकारी अशी पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, सांगली अशा पाच जिल्ह्यात मिळून ६३ सहायक निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहेत. त्याशिवाय ५८४ पद निर्देशित अधिकारी आणि १२२ अतिरिक्त पद निर्देशित अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे, असेही डॉ. पुलकुंडवार यांनी सांगितले.

मतदार नोंदणीचा कार्यक्रम
जाहीर सूचना ३० सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झाली असून त्यानुसार मतदार नोंदणीची सुरुवात झाली आहे. वर्तमानपत्रातील जाहीर सूचना प्रथम पुनर्प्रसिद्धी- बुधवार १५ ऑक्टोबर, द्वितीय पुनर्प्रसिद्धी- शनिवार २५ ऑक्टोबर, नमुना क्रमांक १८ किंवा १९ द्वारे अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक-गुरूवार ६ नोव्हेंबर, हस्तलिखिते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई- गुरुवार २० नोव्हेंबर, प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी- मंगळवार २५ नोव्हेंबर, दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी- २५ नोव्हेंबर ते १० डिसेंबर, दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक, पुरवणी यादी तयार करणे व छपाई करणे- गुरुवार २५ डिसेंबर व मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी- मंगळवार ३० डिसेंबर २०२५.
0000

माजी न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते १ ऑक्टोबर रोजी ‘गांधी सप्ताहा’चे उद्घाटन

पुणे-

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोबर रोजी ‘जागतिक अहिंसा दिन’ म्हणून साजरी केली जाते. त्यानिमित्त महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत गांधी भवन, कोथरूड येथे आठ दिवसांचा ‘गांधी सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाचे यंदाचे १४वे वर्ष आहे. याचे उद्घाटन बुधवार, दि. १ ऑक्टोबर रोजी सांय. ५.३० वाजता सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते गांधी भवन, कोथरूड, पुणे येथे होईल. यावेळी ‘नागरिकांची संविधानिक कर्तव्ये’ या विषयावर न्या. ओक यांचे व्याख्यान होईल. सिम्बायोसिसचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. डॉ. कुमार सप्तर्षी याचे अध्यक्षस्थान भूषवतील.

सप्ताहात गांधी जयंतीच्या दिवशी ‘शांती मार्च’, दररोज सायंकाळी ६ वाजता नामवंतांची व्याख्याने, तसेच ‘चित्रपट कसे बघावेत?’ यावर अभ्यासक सुहास किर्लोस्कर यांचे दृक्-श्राव्य चित्रफितींसह व्याख्यान, ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांची प्रकट मुलाखत आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांचे व्याख्यान असे कार्यक्रम होणार आहेत. या सर्व कार्यक्रमांना आवर्जून यावे, असे आवाहन संयोजक डॉ. कुमार सप्तर्षी यांनी केले आहे.

कळस म्हस्के वस्ती येथे शारदीय नवरात्र उत्सवात कोल्हापूर महालक्ष्मी मंदिराची भव्य प्रतिकृती

पुणे :
ह.भ.प. कै. गेनबा म्हस्के मेमोरियल ट्रस्ट, कळस म्हस्के वस्ती, आळंदी रोड पुणे-१५ यांच्या वतीने आयोजित शारदीय नवरात्र उत्सव २०२५ मध्ये यंदा कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी स्थायी स्वरूपात मंदिरामध्ये देवीची मूर्ती असून गेल्या २८ वर्षांपासून ट्रस्ट धार्मिक व सामाजिक क्षेत्रात सातत्याने उपक्रम राबवत आहे.

कोल्हापूर महालक्ष्मी मंदिराचा देखावा साकारल्यानंतर परिसरातील तसेच शहरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन घेतले. भव्य सजावट व अप्रतिम देखाव्यामुळे भाविकांच्या मनामध्ये नवरात्र उत्सवाचे धार्मिक वातावरण अधिक रंगतदार झाले आहे.

या देखाव्याच्या यशामध्ये ट्रस्टचे अध्यक्ष प्रतापराव रमेश म्हस्के यांच्यासह खजिनदार दर्शन डांगे, वैभव सकट, राज चौधरी, आईनुर खान, चेतन तिवनकर, रितिक थोरात, अक्षय वर्मा, तन्मय विचारे, सुरज बिराजदार, किरण साठे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.

स्थानिक नागरिक व भाविकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे यंदाचा नवरात्र उत्सव अधिकच भव्य व भक्तिमय वातावरणात पार पडत असल्याचे चित्र दिसून आले.

ओला दुष्काळाच्या सर्व सवलती लागू,प्रत्येक जिल्ह्यात कॅन्सर हॉस्पिटल:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई- महाराष्ट्रभर झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यामुळे विरोधकांकडून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज यापूर्वी राज्यात केव्हाही ओला दुष्काळ जाहीर झाला नसल्याचे स्पष्ट केले. तसेच दुष्काळ काळात लागू करण्यात येणाऱ्या सर्व उपाययोजना सध्याच्या काळात लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे ते म्हणाले. सरकारकडून करण्यात येणारी मदत शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पोहोचती केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी प्रामुख्याने अधोरेखित केले.राज्याच्या मंत्रिमंडळाने आणखी काही महत्त्वाचे निर्णय घेतलेत. यात राज्याची एक सर्वंकष कॅन्सर सेवा पॉलिसी आपण तयार केली आहे. या पॉलिसीअंतर्गत राज्यातील सर्व जिल्ह्यांना कॅन्सरचे उपचार उपलब्ध झाले पाहिजे, अशा पद्धतीची याची रचना करण्यात आली आहे. यात एल-1 अपेक्स सेंटर, एल-2 व एल-3 सेंटर्सचे जाळे तयार केले जात आहे. यामुळे कॅन्सरचा सामना करताना पीडितांना त्यांच्या जिल्ह्यांतच मुलभूत उपचार उपलब्ध होतील. काहींना एल-2 सेंटर्सना जावे लागेल. पण यामुळे खूप मोठ्या प्रमाणात कॅन्सर रोग निदान व उपचार यांची सुलभा व खर्च कमी करणे हा यामागील उद्देश आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी यावेळी राज्य मंत्रिमंडळाने आजच्या बैठकीत राज्याच्या जीसीसी पॉलिसीलाही मंजुरी दिल्याची माहिती दिली. या पॉलिसी अंतर्गत गुंतवणूक मोठ्या प्रमाणात राज्यात आणण्याचा प्रयत्न असेल, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीनंतर बोलताना फडणवीसांनी उपरोक्त माहिती दिली. ते म्हणाले, मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. गेल्या काही महिन्यांत महाराष्ट्रात सातत्याने अतिवृष्टी झाली. त्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या प्रकरणी लाखो हेक्टरचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सरकारने ऑगस्टपर्यंतच्या नुकसानीसाटी 2215 कोटी रुपये वितरित करणे सुरू केले आहे. ई-केवायसीची अट शिथिल करून हे पैसे देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यासंदर्भातील कारवाई सरकारने सुरू केली आहे.

ते पुढे म्हणाले, पावसामुळे झालेल्या नुकसानीची आकडेवारी पुढील दोन-तीन दिवसांत आमच्यापर्यंत पोहोचेल. काही ठिकाणी पाणी असल्यामुळे योग्य प्रकारे असेसमेंट करता येत नव्हते. पण पुढच्या 2-3 दिवसांत ही संपूर्ण माहिती आच्यापर्यंत पोहोचले. त्यानंतर शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे एक सर्वंकष धोरण तयार करून त्यांना योग्य ती मदत केली जाईल. या सर्व मदतीची घोषणा पुढच्या आठवड्यात केली जाईल. विशेषतः शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी सर्व मदत मिळावी असा सरकारचा प्रयत्न आहे.

फडणवीस पुढे म्हणाले, राज्यात सातत्याने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असते. पण मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळ कुठेही नाही. आजपर्यंत कधीही ओला दुष्काळ जाहीर झाला नाही. तथापि, सरकारने हा निर्णय घेतला आहे की, ज्यावेळी दुष्काळ पडतो, ज्यावेळी ज्या – ज्या उपाययोजना व सवलती आप देतो, त्या सगळ्या सवलती आत्ता लागू केल्या जातील. मुळात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीचा अर्थच असा असतो की, दुष्काळ काळातील सवलती लागू झाल्या पाहिजेत. सरकारने या सर्व सवलती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

मी याहून अधिक सांगणार नाही. सध्या राज्यात झालेल्या सर्व नुकसानीची आकडेवारी जमा होत आहे. ती पुढील 2-4 दिवसांत जमा होईल. ती जमा झाल्यानंतर लवकरात लवकर, पण पुढच्या आठवड्याच्या आत यासंबंधी योग्य तो निर्णय घेऊन घोषणा केली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

महिन्याभरात प्राध्यापकांच्या भरतीचा प्रश्न मार्गी लावणार: चंद्रकांतदादा

पुणे :सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात १११ प्राध्यापकांच्या भरतीला मान्यता देऊन दीड वर्ष झाले. पण नियमांच्या काही अडचणी आल्या आहेत. या सगळ्यांवर मात करून महिन्याभरात प्राध्यापकांच्या भरतीचा प्रश्न मार्गी लागेल,” अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या १२६व्या पदवीप्रदान सोहळ्यात पाटील बोलत होते. या वेळी राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. प्रभाकर देसाई उपस्थित होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे, सुवर्णपदके देण्यात आली.

पाटील म्हणाले, ”विद्यापीठाच्या राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखड्यात (एनआयआरएफ) मानांकनासाठी तेवढा एकच निकष असतो का? विद्यापीठांच्या क्रमवारीबाबत मुख्यमंत्रीही चिंतेत पडले आहेत. या मूल्यांकनात वेगवेगळे २० निकष आहेत. त्यातील एक विद्यापीठाबद्दलचा ‘समज’ (परसेप्शन) आहे. मी ही विद्यार्थी चळवळीतून आलो आहे. विद्यार्थी, प्रश्न, आंदोलन या विरोधात मी नाही.

पण आंदोलनांचे स्वरूप कसे असावे, समन्वयाने प्रश्न सोडवता येतील का, याबाबत विद्यापीठानेही प्रयत्न करावा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात कधी आंदोलने झालीच नाहीत. याचे कारण रयतेला काय हवे आहे, हे त्यांना आधीच कळायचे. त्यामुळे विद्यापीठालाही ते समजायला हवे. सोशल मीडियातून देशभर आणि जगभर काय संदेश जातो, याचाही विचार केला पाहिजे. या विद्यापीठात सतत आंदोलनेच होत आहेत, तर देशातील विद्यार्थी विद्यापीठात कशाला येतील?”

एखाद्या प्रश्नाबाबत किती आक्रमक व्हायचे हे जनतेलाही कळले पाहिजे ना! विद्यापीठात आंदोलकांच्या शिष्टमंडळाने येऊन संबंधितांशी एकदा-दोनदा चर्चा करावी. तरीही, मार्ग नाही निघाला तर आम्हीदेखील आहोत ना, असा सल्ला पाटील यांनी दिला.

विदेशातील विद्यार्थी आपल्याकडे येण्यासाठी आपण एक संस्था नियुक्त केली. त्याचा उत्तम परिणाम दिसून आला आहे. परदेशातून विद्यार्थी आल्यानंतर ते टिकायलाही हवेत. त्यासाठी शैक्षणिक गुणवत्ता वाढली पाहिजे, तसेच प्राध्यापक भरती, विद्यापीठाला निधी मिळावा, यासाठी प्रयत्न व्हावेत. औद्योगिक क्षेत्राची सामाजिक जबाबदारी (सीएसआर) यातून निधी मिळविण्यासाठी मदत करण्यात येईल.

  • चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री

कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा-उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

डीईएस पुणे विद्यापीठाच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

पुणे : जर्मनी आणि जपान या देशांना मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्यासाठी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारशी करार केला आहे. ही कौशल्य असणारी नवी पिढी भारतात निर्माण होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी खासगी विद्यापीठांनी पुढाकार घेऊन, रोजगाराभिमुख पिढी निर्माण करण्याची जबाबदारी उचलावी, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी केले.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या ‘डीईएस पुणे विद्यापीठा’च्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मंत्री पाटील बोलत होते. यावेळी डीईएसचे अध्यक्ष प्रमोद रावत, डीईएस पुणे विद्यापीठाचे अध्यक्ष प्रा. रवींद्र आचार्य, डीईएसचे उपाध्यक्ष अ‍ॅड. अशोक पलांडे, डीईएस संस्थेचे कार्यवाह प्रा. डॉ. आनंद काटीकर आणि डीईएस पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. राजेश इंगळे उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले, “आपल्या देशाची अर्थव्यवस्था आता चौथ्या क्रमांकावर आहे. येत्या काही दिवसात ती तिसऱ्या क्रमांकावर जाणार आहे. त्यासाठी विद्यापीठांचे कार्य महत्त्वाचे राहणार आहे. पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांचा प्रयत्न आहे की, २०४७ मध्ये हा देश जगात सर्व क्षेत्रामध्ये पहिल्या क्रमांकावर राहायला हवा. त्यासाठी आपल्याला विकसित भारत २०४७ या उद्देशाला पूर्णत्वास न्यायचे आहे. आपल्याला हा उद्देश तीन टप्प्यात पूर्ण करायचा आहे. यासाठी आपल्या प्रत्येकाला आपल्या क्षेत्रातील सर्वोत्तम काम करायचे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार शिक्षणाला स्वायत्त करण्याचे धोरण आपण स्वीकारले आहे. त्याचप्रमाणे नवीन विद्यापीठे स्थापन करण्याला पाठिंबा दिला आहे. या विद्यापीठांनी स्थानिक गरजांना ओळखून, चांगली कामगिरी करायला सुरुवात केली. या विद्यापीठातून जगासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे.”

डीईएस पुणे विद्यापीठाला नवीन इमारत, प्रयोगशाळा, कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल, अशी ग्वाही पाटील यांनी दिली. पाटील यांनी डीईएस पुणे विद्यापीठाच्या स्थापनेच्या मागील घडामोडी उपस्थितांना सांगत, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे तिसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने विद्यापीठाला अधिक उंचीवर नेण्यासाठी आणि अद्ययावत सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे आवाहन मंत्री पाटील यांनी केले.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. डीईएस पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. राजेश इंगळे यांनी स्वागतासाठीचे भाषण केले आणि विद्यापीठाच्या कार्याचा आढावा घेतला. डीईएसचे अध्यक्ष प्रमोद रावत यांनी उपस्थितांना संबोधित केले. या कार्यक्रमात शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यापीठाचे अध्यक्ष प्रा. रवींद्र आचार्य यांनी संस्थेबद्दलचे त्यांचे दृष्टिकोन आणि भविष्यातील योजना सांगितल्या. डीईएसचे विश्वस्त अनंत जोशी यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.


शैक्षणिक संस्थांमध्ये पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी कोणतीही अडचण नाही. राज्य सरकार वसतिगृह, प्रयोगशाळा निर्मितीसाठी खर्च करीत आहोत. हे कार्य पाहून केंद्र सरकारने ३५० कोटी रुपये दिले. त्यातून ४२ पॉलिटेक्निक आणि ८ सरकारी इंजिनीअरिंग महाविद्यालयांमध्ये इनोव्हेशन सेंटरची स्थापना करण्यात येणार आहे. त्यानुसार प्रत्येक महाविद्यालयाला सुमारे ८ कोटी रुपये देण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

कचरा वेचकाचा प्रामाणिकपणा, हरवलेली २ लाख ९० हजारांची बॅग मालकाच्या स्वाधीन

पुणे-स्वच्छ सहकारी संस्थेची सभासद बायडा गायकवाड गेल्या २० वर्षांपासून सनसिटी परिसरात दारोदार कचरा संकलनाचे काम करत आहेत. २४ सप्टेंबर रोजी नियमित कामकाजादरम्यान त्यांच्या ढकलगाडीत एक बॅग सापडली. सुरुवातीला ती कपड्यांची पिशवी आहे असे समजून त्यांनी सॉर्टिंग सुरू केले असता, त्यात मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम असल्याचे लक्षात आले.

तत्काळ बायडा गायकवाड यांनी सहकारी दत्ता वाघमारे आणि दीपाली वाघमारे यांच्या मदतीने पॅराडाईस-२ सोसायटीचे चेअरमन अजित टिंबे यांच्याशी संपर्क साधला. या तिघांनी ती बॅग थेट पोलिसांकडे सुपूर्त केली.

दुपारच्या वेळी स्क्रॅप वर्गीकरण करत असताना हेमंत माद्रीकर काहीतरी शोधत असल्याचे बायडा गायकवाड यांच्या निदर्शनास आले. चौकशीअंती त्यांनी हरवलेली बॅग शोधत असल्याचे समजले. त्यावेळी बायडा गायकवाड यांनी बॅग पोलिसांकडे दिल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी ती बॅग मूळ मालक हेमंत माद्रीकर यांच्याकडे परत दिली.

बॅगमध्ये तब्बल २,९०,४२०/- रुपये इतकी रक्कम जसच्या तशी असल्याचे माद्रीकर यांनी पाहिले. बायडा गायकवाड यांच्या या प्रामाणिकपणाने प्रभावित होऊन त्यांनी ३,०००/- रुपये बक्षीस म्हणून दिले.

एवढी मोठी रक्कम हरवल्यानंतर ती पुन्हा मिळेल, अशी मला अजिबात अपेक्षा नव्हती. पण आजच्या काळात बायडा ताईंसारखा प्रामाणिक लाखातून एकच माणूस असतो. त्यांच्या या प्रमाणिकटेबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे.हेमंत माद्रीकर

कचरा संकलन करणाऱ्या घंटागाडीच्या धडकेने महिला कचरावेचकाला गंभीर दुखापत

पुणे -एकीकडे कचरावेचकांचे काम व आरोग्य जपण्याचे आश्वासन देणाऱ्या विश्वास २०२५ या घंटागाडी आधारित कचरा संकलन मॉडेलचा प्रचार करणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या घंटागाडीची धडक बसल्याने सहकारनगर भागात काम करणाऱ्या स्वच्छ च्या कचरावेचक संगीता जाधव (वय ४५) यांना हातापायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्या हाताला टाके घालण्याची गरज आहे व डाव्या गुडघ्याला गंभीर जखम झाली आहे. या घटनेमुळे महानगरपालिकेच्या घंटागाडीवर आधारित कचरा संकलन पद्धत ‘विश्वास २०२५’ मोहिमेवर ‘विश्वास’ कसा ठेवायचा हा प्रश्न कचरावेचकांना पडला आहे.

घरोघरी जाऊन कचरा घेतल्यानंतर मनपाच्या घंटागाडीला कचरा दिल्यानंतर त्याच गाडीची धडक जाधव यांना बसली. “गाडीला कचरा दिल्यानंतर मी उलट दिशेने चालत निघाले आणि अचानक घंटागाडी रिव्हर्स घेत माझ्या दिशेने आली व काही कळायच्या आत मला गाडीचा मोठा धक्का लागला व मी गाडीखाली पडले. नशीब माझ्या पूर्ण शरीरावरून गाडीचे चाक गेले नाही, पण माझ्या डाव्या हातापायावरून गाडी गेली. लगेचच स्थानिक नागरिक व गाडीच्या ड्रायव्हरने मला गाडीखालून ओढून बाहेर काढले व प्रथमोपचारासाठी दवाखान्यात नेले.”, असे जाधव यांनी सांगितले.

या अपघातानंतर जाधव यांच्या हाताला चार टाके घालण्याची गरज आहे व त्यांच्या गुडघ्याला आणि छातीला देखील गंभीर इजा झाली आहे. विश्वास 2025 या घंटागाडी मॉडेल मुळे जाधव यांच्यासारख्या कचरावेचकांचे आरोग्य जपले जाईल व काम सोपे होईल असा दावा महानगरपालिकेतर्फे सातत्याने केला जात आहे. परंतु, प्रत्यक्षात गाड्यांमुळे कचरावेचकांच्या केवळ कामालाच नाही तर जीवालाही धोका निर्माण होत असल्याचे आशा घटनांमधून स्पष्ट होत आहे.

स्वच्छ च्या बोर्ड मेंबर विद्या नाईकनवरे म्हणाल्या, “मनपाच्या घंटागाड्यांना मागच्या बाजूला असलेल्या 5 फूट उंचीच्या टिपरला कचऱ्याने भरलेल्या जड बादल्या दररोज उचलून देताना कचरावेचकांचे शारीरिक कष्ट वाढत आहेत.
आम्हाला अशा अपघातांचा सामना करावा लागत आहे तेव्हा या नव्या विश्वास मोहिमेवर कचरावेचकांनी विश्वास तरी कसा ठेवायचा? महानगरपालिकेला आमचे आरोग्य खरंच जपायचे असेल तर आम्हाला करारानुसार महानगरपालिकेने वेळच्या वेळी हातमोजे, रेनकोट, चपला, साबण इ. साहित्य द्यावे. गाडींवर मदतीसाठी बिगारी असावेत. आम्ही नागरिकांना दारोदार जी सेवा देतो तिला अधिक सक्षम करावे. आमच्या कामाला आणि आरोग्याला धोका निर्माण होत असेल, नागरिकांना सोयीची सेवा मिळणार नसेल तर शहरासाठी ही विश्वास नाही विश्वासघात मोहीम ठरेल.”

कचरावेचकांना त्यांच्या सद्यस्थितीतील कामामध्ये त्रास होतो अशी मांडणी करणारा व्हिडिओ मनपाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून प्रसारित केला. या व्हिडिओ मधील कचरावेचक नंदा आल्हाट यानी हा व्हिडिओ कसा बनवण्यात आला याविषयी सांगितले, “कसलीही माहिती न देता मला विचारण्यात आले तुम्हाला काय त्रास होतो आणि व्हिडिओ घेतला. मी सांगितले होते की महानगरपालिकेच्या गाडीवर मदत करायला बिगारी नसल्याने आम्हाला जड बादल्या उचलून द्याव्या लागतात, ज्यामुळे कंबरदुखी, खांदेदुखी सारखे त्रास होतात. माझ बोलणं अर्धवट दाखवून कचरावेचकांना घंटागाडीवर काम करणे सोपे आहे असं सांगितलं. घंटागाडीवर काम करणे महिला कचरावेचकांसाठी कधीही सोयीचे नसेल.”

शहरात घंटागाड्यांची संख्या हजारोने वाढली तर कचरावेचकांना गाड्यांवर काम करताना अशा अपघातांचा सामना नेहमीच करावा लागेल. ही बाब पुण्यातील स्वच्छ च्या 4000 कचरावेचकांची काळजी वाढवणारी आहे. आणि रस्त्यांवर ट्रॅफिक वाढवून असे अपघात भविष्यात नागरिकांसोबतही होऊ शकतील अशी देखील भीती आहे.

मुक्ता बर्वे, प्रसाद कुलकर्णी यांना यंदाचा युवा कलाकार व युवा उद्योजक पुरस्कार

याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान (युवा) वर्धापन दिन सोहळा ; माजी खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, खासदार प्रा.डॉ. मेधा कुलकर्णी यांची उपस्थिती
पुणे : शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाचा उपक्रम असलेल्या याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान (युवा) च्या १८ व्या वर्धापनदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्यांतर्गत वितरित होणारे सृजन आर्ट गॅलरी पुरस्कृत सृजन युवा कलाकार पुरस्कार व स्व. चंद्रकांत जोशी स्मृतिप्रित्यर्थ युवा उद्योजक पुरस्कार अनुक्रमे सुप्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि उद्योजक प्रसाद कुलकर्णी यांना प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे उपेंद्र केळकर, सचिन पंडित यांनी पत्रकार परिषदेत दिली.



पत्रकार परिषदेला संस्थेचे श्रीकांत जोशी, मंजुषा वैद्य, प्रतिभा संगमनेरकर, उपेंद्र केळकर, सचिन पंडित, अंजली दारव्हेकर, मिलिंद दारव्हेकर आदी उपस्थित होते.

टिळक स्मारक मंदिर येथे शनिवार, दिनांक ४ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. माजी खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. यावेळी संस्थेच्या युवा महिला अध्यक्ष व खासदार प्रा.डॉ. मेधा कुलकर्णी या देखील उपस्थित राहणार आहेत. सन्मानचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. यापूर्वी युवा कलाकार पुरस्कार स्वप्नील जोशी, मनोज जोशी, बेला शेंडे, संदीप खरे, संकर्षण क-हाडे, प्रसाद ओक आदींना देण्यात आला आहे.

पुरस्कार वितरण सोहळा, वर्धापन दिन कार्यक्रमासह ब्राह्मण उद्योजकांचे एकत्रीकरण हा देखील कार्यक्रमाचा उद्देश आहे. सोहळ्याचे आयोजन संस्थेच्या युवा कार्यकारिणीने केले आहे. पुरस्कार वितरण समारंभानंतर पुरस्कारार्थींची प्रकट मुलाखत देखील होणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून पुणेकरांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ ही संस्था १९४० साली स्थापन करण्यात आली. युवा हा उपक्रम २००४ साली स्व. चंद्रकांत जोशी यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर येथील अधिवेशनात सुरु करण्यात आला होता.

सामाजिक कार्यकर्ते उदय जगताप यांना समर्थ गौरव पुरस्कार

समर्थ प्रतिष्ठानचा २६ वा वर्धापन दिन सोहळा : चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ यांची उपस्थिती

पुणे : समर्थ प्रतिष्ठानच्या २६ व्या वर्धापनदिनानिमित्त समर्थ गौरव पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते उदय जगताप यांना प्रदान करण्यात येणार आहे. गुरुवार, दि.२ आॅक्टोबर रोजी नवी पेठेतील एस.एम.जोशी सभागृह येथे पुरस्कार वितरण आणि विविध संस्थांना मदतनिधी प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सातपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक पुनीत बालन हे असणार आहेत. तर, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार हेमंत रासने, सिद्धार्थ शिरोळे, खासदार प्रा.डॉ.मेधा कुलकर्णी, माजी आमदार रवींद्र धंगेकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. पुरस्कार वितरण सोहळ्याचे यंदा १६ वे वर्ष आहे. रुपये ११ हजार रोख, सन्मानचिन्ह, पुणेरी पगडी, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

गडचिरोली येथील नक्षलवादी भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुण्यातील आदर्श मित्र मंडळ उदय जगताप यांच्या नेतृत्वाखाली कार्य करीत आहे. नक्षलवाद्यानी दिलेली गांधी विचारांची अहिंसावादी परिक्षा आणि स्वातंत्र्यानंतर ५०० घरात व ५ शाळेत पहिल्यांदाच अश्या दुर्गम भागात सौरऊर्जा द्वारे वीज उपलब्ध करून देणे यांसह नक्षलवादी यांच्या विधवा महिलांना रोजगार निर्मिती, इ लर्निंग शाळा ,टू व्हीलर अ‍ॅम्ब्युलन्स, मुलांसाठी खेळाचे साहित्य. अशा विविध माध्यमातून कार्य करून तेथील लोकांना जगताप यांनी शांततेचा संदेश दिला आहे. पुण्यातील आदर्श गणपती मंडळाचा कार्यकर्ता गडचिरोलीत काम करतोय हीच खरं खूप हिमतीची आणि अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे त्यांना यंदा गौरविण्यात येणार आहे.

सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांचे सर्व साहित्य वाहून गेले आहे, त्यासाठी खारीचा वाट म्हणून माढा तालुक्यातील लव्हे या गावातील १४० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात येणार आहे. याशिवाय वृद्धेश्वर सिद्धेश्वर देवस्थान जीर्णोद्धार करिता रुपये ७५ हजार, हिरामण बनकर विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदत म्हणून रुपये रुपये ११ हजार, पुणे विद्यार्थी गृह संस्थेला रुपये ११ हजार अशा देणग्या देण्यात येणार आहेत. आजपर्यंत समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने १ कोटी ३० लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. तसेच वर्धापनदिनानिमित्त नटरंग अकॅडमी यांचे वतीने सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित केला जाणार आहे.

आठपैकी एका भारतीयाला मधुमेहाची बाधा, न्यूबर्ग डायग्नोस्टिकची माहिती

 २९ सप्टेंबर २०२५ – जागतिक हृदयदिनानिमित्ताने न्यूबर्ग डायग्नोस्टिक्सने भारतीयांमधील तरुण वयोगटातील वाढत्या हृदय आणि चयापचयासंबंधित आजारांविषयी विदारक सत्य मांडणारे संशोधन पूर्ण केले आहे. जगभरातील हृदय आणि रक्तासंबंधीच्या आजारांमुळे होणा-या मृत्यूंमध्ये भारतात एक पंचमांश मृत्यू होत आहेत. जागतिक आकडेवारीसह देशात झालेल्या अभ्यासानुसार ११ टक्के तरुणांचा हृदय आणि रक्तासंबंधित आजारामुळे मृत्यू होतो. मधुमेह आणि शरीरातील चरबीच्या पातळीत होणारी अनियमित वाढ या दोन प्रमुख कारणांमुळे तरुण भारतीयांमध्ये मृत्यू ओढावू लागला आहे.

न्यूबर्ग लॅबोरेटरीजने गेल्या वर्षभरात बंगळुरु, चेन्नई, अहमदाबाद, मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि केरळ या राज्यांतील तब्बल १२.५ रहिवाशांच्या रक्तांचे नमुने तपासणीसाठी घेतले. या नमुन्यांची मधुमेहदर्शक आणि लिपीड प्रोफाईल तपासणी करण्यात आली. प्रयोगशाळेत वार्षिक आरोग्य तपासणीसाठी आलेल्या ग्राहकांच्या नमुन्यांतून ही तपासणी करण्यात आली. देशभरातील संपूर्ण लोकसंख्येची तपासणी झालेली नसल्याने ही आकडेवारी केवळ प्रयोगशाळेतील नमुन्यांमधून उघडकीस आलेला अहवाल सादर करते. रक्ततपासणीसाठी २५ ते ३५ वयोगटातील २.२ लाख व्यक्तींचा समावेश होता. या विश्लेषणातून समोर आलेले निष्कर्ष चिंताजनक असल्याचे अहवालाअंती स्पष्ट करण्यात आले:

  • १३ टक्के तरुणांना अगोदरपासूनच मधुमेहाची बाधा
  • २५ टक्के तरुण मधुमेहाच्या प्राथमिक स्तरावर
  • २८ टक्के तरुणांच्या शरीरात चरबीची अनियमित पातळी

प्रादेशिक भागांनुसार, या अहवालातील तरुण वयोगटांचे वर्गीकरण केल्यास दक्षिण आणि पश्चिम भारतातील तरुणांमध्ये हे प्रमाण १४ टक्क्यांपर्यंत आढळले. उत्तर भारतातील ९ टक्के तरुणांना ही बाधा होती. ही टक्केवारी चयापचय आरोग्याच्या धोक्याची संभाव्यता दर्शवते. भौगोलिक पातळीवर ही टक्केवारी असमान असली तरीही चिंताजनक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. न्यूबर्ग डायग्नोस्टिक्सच्या बायोकेमिस्ट्री विभाग प्रमुख डॉ. प्रज्ज्वल ए.एम डी आणि टीमने या आकडेवारीचे विश्लेषण केले.

तरुणांमधील वाढता मधुमेह आणि वाढत्या चरबीच्या पातळीबद्दल न्यूबर्ग डायग्नोस्टिक्सचे वैद्यकीय संचालक डॉ. सुजय प्रसाद यांनी चिंता व्यक्त केली. ‘‘संशोधनातून समोर आलेली माहिती भयावह आहे. आम्ही तपासलेल्या प्रत्येकी ८ तरुणांपैकी एकाला मधुमेहाची बाधा होती. चारपैकी एक तरुण मधुमेहाच्या प्राथमिक अवस्थेत होता. मधुमेह हा भारतात चुकीच्या जीवनशैलीमुळे शांतपणे परंतु वेगाने पसरणारा आजार ठरु लागला आहे. वेळेवर वैद्यकीय उपचार घेणे आता ऐच्छिक पर्याय राहिलेला नाही. तरुणांचे आरोग्य जपण्यासाठी तसेच वेळेआधी होणा-या हृदयविकाराचा आजार प्रतिबंधित करण्यासाठी आता वैद्यकीय उपचाराला दिरंगाई करता कामा नये.’’

डॉ. सुजय प्रसाद म्हणाले, “प्रतिबंधात्मक आरोग्य तपासण्या हे हृदयविकारापासून बचावाचे पहिले पाऊल आहे. या तपासण्यातून आजारासंबंधी कल्पना येते. तपासण्या टाळल्यास हृदय तसेच रक्तासंबंधीच्या आजार गंभीर अवस्थेत पोहोचल्यावर ध्यानात येतील. भारतातील तरुणांचे भविष्य निरोगी ठेवायचे असल्यास या तपासण्या तातडीने करणे महत्त्वाचे ठरते. या तपासण्या सर्वार्थाने आजारांवर मात करण्यासाठी शक्तिशाली ठरतात.”

यंदाच्या वर्षी जागतिक हृदयदिनानिमित्ताने हृदय वापराहृदय समजून घ्या’ ही संकल्पना राबवली जात आहे. हृदयविकाराची लक्षणे दिसण्यापूर्वीच तुमच्या आरोग्य जाणून घ्या याकरिता ही संकल्पना अंमलात आणली जाईल. मधुमेह, उच्च रक्तदाब, शरीरातील वाढत्या चरबीतील अनियमितता हे आजार शांतपणे शरीरभर पसरतात. हृदय व रक्तवाहिन्यांचे नुकसान करतात. ही प्रक्रिया सुरु होऊनही शरीर कोणतेही संकेत देत नाही. म्हणून प्रतिबंधात्मक आरोग्य तपासण्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. नियमित तपासणीमुळे प्राथमिक पातळीवरील मधुमेहाची लागण झाल्यास त्यासंदर्भात माहिती मिळते. शरीरातील अनावश्यक चरबीमुळे होणा-या धोक्यांवर मर्यादा आणता येते. जीवनशैलीत वेळेत सकारात्मक बदल केल्यास, वेळेवर प्रतिबंधात्मक उपचार केल्यास या आजारांवर प्रभावीपणे नियंत्रण मिळवता येते. २५ ते ३५ वयोगटातील वाढता मधुमेह आणि रक्तासंबंधीच्या आजारांमुळे आता हे आजार केवळ वृद्धांपुरती मर्यादित नसल्याचे दिसून आले आहे. शरीरातील साखरेची पातळी दर्शवणारे एचबीएवनसी, कोलेस्ट्रॉल किंवा रक्तदाब यासंबंधित माहिती घेतल्यास लोकांना आरोग्याच्या निरोगी सवयी बाळगण्यास बळ मिळते. हृदयाचे दीर्घकाळ संरक्षण करण्यासाठी माहिती पूर्ण पाऊले उचलण्यासाठी आवश्यक कार्यवाही करता येते.

जागतिक हृदय दिन साजरा करताना न्यूबर्ग डायग्नोस्टिक्स तरुणांनाआरोग्यसेवकांना तसेच धोरणकार्यकर्त्यांना हृदयासंबंधी आरोग्य धोरण जपण्याचे आवाहन करत आहे.

महिला वीज कर्मचाऱ्यांनी आरोग्य सांभाळून काम करावे- सौ. मेघना बोर्डीकर

पुणे, दि. २९ सप्टेंबर, २०२५ मुख्यमंत्री . देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सरकारमध्ये प्रमुख पदांवर महिलांना संधी दिली आहे. राज्याच्या मुख्य सचिव पदांसह अनेक विभागांच्या अपर मुख्य सचिव महिलाच आहेत. विजेच्या क्षेत्रांत तर महिला आघाडीवर आहेत. कारण महिला घर सांभाळून ऑफिस सुद्धा तितक्याच ताकदीने सांभाळतात. एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या पार पाडतात. तेंव्हा महिला कर्मचाऱ्यांनी त्यांचे आरोग्य सांभाळून केले पाहिजे असे प्रतिपादन ऊर्जा राज्यमंत्री सौ. मेघना बोर्डीकर यांनी आज पुणे येथे केले.

गणेशखिंड पुणे येथील महावितरणच्या प्रकाशभवन येथे सोमवारी ( दि. २९) दुपारी आयोजित ‘सन्मान सौदामिनींचा’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. नवरात्रानिमित्ताने स्त्री शक्तीचा सन्मान करण्यासाठी महावितरण पुणे परिमंडलाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे तर मुख्य अभियंता सुनिल काकडे व धर्मराज पेठकर, अधीक्षक अभियंते ज्ञानदेव पडळकर, सिंहाजीराव गायकवाड, युवराज जरग, अमित कुलकर्णी, विजयानंद काळे, संजीव नेहते व अनिल घोगरे, यांचेसह सर्व महिला अभियंता, अधिकारी व कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

मार्गदर्शन करताना ऊर्जा राज्यमंत्री सौ. बोर्डीकर म्हणाल्या, ‘ महिलांना त्यांच्या घरातून जर चांगले वातावरण मिळाले तर त्या अधिक कार्यक्षमतेने काम करु शकतात. विजेसारख्या जोखमीच्या क्षेत्रात महिलांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. तसेच त्यांना त्यांच्या वैयक्तिक अडचणींवरही मात करावी लागते. मात्र महावितरणने महिला कर्मचाऱ्यांना अतिशय चांगले वातावरण तयार करुन दिले आहे. म्हणूनच महिला पुरुषांप्रमाणे त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. अशावेळी महिलांनीही स्वत:च्या आरोग्याची काळजी घेऊन ग्राहकसेवेसाठी तत्पर राहावे.’

कार्यक्रमात ऊर्जा राज्यमंत्र्यांच्या हस्ते उपस्थित महिला कर्मचाऱ्यांचा पुस्तक व गुलाबपुष्प देऊन प्रातिनिधीक स्वरुपात गौरव करण्यात आला. तर वर्षा कारंडे, भक्ती जोशी, स्वागती सोळंकुरे व पूजा मेश्राम या महिला कर्मचाऱ्यांनी मनोगत व्यक्त करत महावितरणमध्ये महिला कर्मचारी करत असलेल्या कामांवर प्रकाश टाकला. प्रास्ताविक अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड यांनी तर सूत्रसंचालन दिपश्री सरोदे व सोनाली राठोड-चव्हाण यांनी केले. याप्रसंगी महिला कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.