Home Blog Page 110

प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, पुणे मार्फत संवाद सत्राचे (ओपन हाऊस) आयोजन

पुणे, 30 सप्टेंबर 2025

प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, पुणे यांच्यामार्फत पासपोर्ट सेवा केंद्र मुंढवा येथे ‘ओपन हाऊस’ सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

हे सत्र बुधवार, दिनांक 1 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 ते 5 या वेळेत पासपोर्ट सेवा केंद्र, झिरो वन, सर्व्हे नंबर ७९/१, घोरपडी, मुंढवा रोड, पिंगळे वस्ती, गंगा ऑर्किड समोर, पुणे येथे होईल.

सत्रादरम्यान पासपोर्ट अर्जदार प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय पुणे येथील अधिकाऱ्यांना भेटून आपल्या पासपोर्ट अर्जासंदर्भातील शंकानिरसन अथवा तक्रारनिवारण करू शकतील.

ज्या अर्जदारांना पासपोर्ट सेवा केंद्र येथील ओपन हाऊसमध्ये सहभागी व्हायचे आहे, त्यांनी आगाऊ स्वरुपात rpo.pune@mea.gov.in या मेल आयडीवर खालील माहिती पाठवून द्यावी.

फाइल क्रमांक 
नवीनतम पासपोर्ट क्रमांक (जर असेल तर) 
नाव 
प्रश्न थोडक्यात 

आपल्या मेलनंतर प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय पुणे यांच्यामार्फत ओपन हाऊसमधील प्रवेशाच्या परवानगीसंदर्भातील पुष्टीकरण मेल आपणास पाठवण्यात येईल. हा पुष्टीकरण ईमेल सादर केल्यानंतरच संवाद सत्र मध्ये प्रवेश दिला जाईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी.

तारीख – १ ऑक्टोबर २०२५ (बुधवार)

स्थळ – पासपोर्ट सेवा केंद्र, झिरो वन, सर्व्हे नंबर ७९/१, घोरपडी, मुंढवा रोड, पिंगळे वस्ती, गंगा ऑर्किड समोर, पुणे

वेळ – दुपारी ३ ते ५.

शुक्रवारी ‌‘जागर अभिजात मराठीचा‌’

मराठी अभिजात दर्जा वर्षपूर्ती : महापालिकेतर्फे गाणी, गोष्टी, प्रवचन,
कविसंमेलन आणि अभिवाचन
पुणे : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पुणे महानगरपालिका, सांस्कृतिक केंद्र आणि शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‌‘जागर अभिजात मराठीचा‌’ हा गाणी, गोष्टी, प्रवचन, कविसंमेलन आणि अभिवाचन यांचा संगम असलेल्या विशेष कार्यक्रमाचे शुक्रवार, दि. 3 ऑक्टोबर 2025 रोजी आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिरात होणार असून पुस्तक प्रदर्शन व कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी 10:30 वाजता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते होणार आहे. बालसाहित्य अकादमी पुरस्कार विजेते ल. म. कडू, ज्येष्ठ कथाकार भारत सासणे, डॉ. संगीता बर्वे, राजीव तांबे तसेच महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., एम. जे. प्रदीपचंद्रन, ओमप्रकाश दिवटे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती बालगंधर्व रंगमंदिराचे व्यवस्थापक आणि महापालिका सांस्कृतिक विभाग प्रमुख राजेश कामठे यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. कार्यक्रमाचे संयोजन संवाद, पुणेचे सुनील महाजन करीत आहेत. मराठी भाषेचा जागर करणारा हा उत्सव सर्वांसाठी खुला आहे.
छत्रपती संभाजी प्राथमिक विद्यालय, मनपा शाळा क्र. 47 कोथरूडच्यावतीने बालगंधर्व रंगमंदिरात सकाळी 10 ते रात्री 10 या वेळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्याचे नियोजन मुख्याध्यापिका ज्योती मानकर करीत आहेत.
सकाळी 10 वाजता मराठी बालसाहित्य मेळावा व उद्घाटन सत्र आयोजित करण्यात आले आहे. यात महाराष्ट्र गीत, राज्यभाषा नृत्य, काव्यवाचन, अभिवाचन, भाषा विषयी मुलांचे मनोगत असे कार्यक्रम होणार आहेत.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशताब्दी सुवर्णमहोत्सवानिमित्त ‌‘माझ्या मराठीची बोलु कौतुकें, परि अमृतातेहि पैजासी जिंके‌’ या विषयावर दुपारी 12 वाजता श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त ह. भ. प. चैतन्य केशवराव लोंढे यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले आहे.
दुपारी 2 वाजता ‌‘नाच गं घुमा‌’ हा महिलांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून मंगळागौर, भोंडला या पारंपरिक खेळांबरोबरच स्त्री शक्तीचा रंगोत्सव, ऋतूप्रमाणे येणारे सण, संस्कृतीचे रंग उलगडणारी गाणी, नृत्य आणि खेळांचा यात समावेश आहे.
सायंकाळी 5 वाजता मराठी हास्यकवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून यात प्रसिद्ध वात्रटिकाकार रामदास फुटाणे, अंजली ढमाळ, प्रकाश होळकर, प्रशांत मोरे, नितीन देशमुख, नारायण पुरी, भरत दौंडकर, अनिल दीक्षित, गुंजन पाटील यांचा समावेश आहे.
युवा पिढीला मराठी साहित्याची ओळख करून देत साहित्य वाचनाची गोडी लावणारा मराठी गाणी, कविता, विनोद यांच्या सादरीकरणाचा ‌‘अक्षरगाणी‌’ हा कार्यक्रम पार्श्वगायक त्यागराज खाडिलकर आणि दीपिका जोग सादर करणार आहेत.
रात्री 9 वाजता पु. ल. देशपांडे आणि सुनीतबाई देशपांडे यांच्यातील संवादांवर आधारित असलेला ‌‘प्रिय भाई : एक कविता हवी आहे‌’ हा रूपक निर्मित कार्यक्रम सादर होणार आहे. प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे, अमित वझे, मानसी वझे, अंजली मराठे, निनाद सोलापूरकर, पार्थ उमराणी यांचा सहभाग आहे. कार्यक्रमाची संहिता आणि रंगावृत्ती डॉ. समीर कुलकर्णी यांची असून दिग्दर्शन अमित वझे यांचे आहे तर संगीत दिग्दर्शन निनाद सोलापूरकर, जयदीप वैद्य, अपर्णा केळकर यांचे आहे. चित्रे प्रसिद्ध चित्रकार मिलिंद मुळीक यांनी रेखाटलेली आहेत.

राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, राहुलजींच्या सुरक्षेत वाढ करा.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते, माजी मंत्री नसीम खान यांचे लोकसभेच्या अध्यक्षांना पत्र.

मुंबई, दि. ३० सप्टेंबर २५

काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांना गोळ्या घालून मारण्याची धमकी सत्ताधारी भाजपाचे प्रवक्ते प्रिंटो महादेवनने दिली असून हे अत्यंत गंभीर व चिंताजनक आहे, त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे व राहुलजी गांधी, सोनियाजी गांधी व प्रियंकाजी गांधी यांच्या जीवाला असलेला गंभीर धोका पाहता त्यांना एसपीजी सुरक्षा देण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी काँग्रेस कार्य समितीचे सदस्य तथा माजी मंत्री नसीम खान यांनी केली आहे.

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पाठवलेल्या पत्रात नसीम खान पुढे असे म्हणतात की, राहुलजी गांधी हे समाजातील वंचित, मागास, आदिवासी व अल्पसंख्याक समाजाच्या रक्षणासाठी तसेच लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी सातत्याने आवाज उठवत आहेत. सामाजिक न्याय, एकता व बंधुत्वाची भाषा ते करतात. गांधी कुटुंबाला नेहमीच धोका राहिलेला आहे, आता तर गोळ्या घालण्याची थेट धमकी देण्यात आली आहे, ही अत्यंत गंभीर घटना असून याचे गांभिर्य पाहता राहुल गांधी यांच्यासह गांधी कुटुंबाची सुरक्षा वाढवण्याची गरज आहे. अशा गुन्हेगारावर गंभीर कारवाई करा आणि लोकशाहीत अशा कृती खपवून घेतल्या जाणार नाहीत असा कडक संदेश द्या तसेच लोकप्रतिनिधींना निर्भयपणे त्यांचे कर्तव्य पार पाडता आले पाहिजे असेही नसीम खान यांनी म्हटले आहे.

बालकॅन्सर जनजागृतीसाठी ‘गोल्डन इव्हिनिंग’ सोहळा..आगाखान पॅलेस सुवर्ण प्रकाशात उजळला

पुणे,
सप्टेंबर महिना हा आंतरराष्ट्रीय बाल कॅन्सर जनजागृती महिना म्हणून साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय बालकॅन्सर जनजागृती महिन्यानिमित्त एक्सेस लाईफ असिस्टंट फाउंडेशन तर्फे पुण्यात सलग तिसऱ्या वर्षी ‘गोल्डन इव्हिनिंग’ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या निमित्ताने ऐतिहासिक आगाखान पॅलेसवर सुवर्ण प्रकाशात योजना केल्याने परिसर उजळून निघाला होता, आणि शहरात एक वेगळीच उर्जा व आशेचा संदेश पसरला.

या रंगतदार सोहळ्याला अर्जुन पुरस्कार विजेते कॅप्टन गोपाल देवांग आणि बॉक्सिंग चॅम्पियन प्रकाश काकडे यांची विशेष उपस्थिती लाभली, त्यांनी बालयोद्ध्यांना “ ढिशुम टू कॅन्सर!” चा मौल्यवान संदेश दिला. त्यांच्या उपस्थितीने संपूर्ण वातावरणात धैर्य, सकारात्मकता व लढण्याची ताकद संचारली.

कार्यक्रमात कल्याणी सालेलकर आणि त्यांच्या समूहाने आकर्षक नृत्यसादर केले. या प्रसंगी बिशप्स स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून या उपक्रमाला मोठ्या उत्साहात प्रोत्साहन दिले.

या कार्यक्रमातील सर्वात भावनिक क्षण म्हणजे लहान शूरवीर आणि त्यांच्या कुटुंबियांसोबतचे संवाद – त्यांचे हास्य, त्यांची ताकद आणि त्यांचे धैर्य हेच सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले.

या प्रसंगी एक्सेस लाईफ चे संस्थापक गिरीश नायर आणि अंकीत दवे, तसेच एक्सेस लाईफ पुणे केंद्र व्यवस्थापक डॉ. चंदन धर्मराज उपस्थित होते. यांच्या नेतृत्वाने आणि पाठबळामुळे हा उपक्रम अधिक भक्कम आणि प्रभावीपणे यशस्वी करण्यात आला.

ऍक्सेस लाईफ पुणे केंद्राच्या वाढीबरोबरच स्वयंसेवक, पुणेकर समर्थकांची मिळालेली साथीमुळे हा उपक्रम अधिक व्यापक व प्रभावी झाला.
‘घरापासून दूर पण घरासारखे’ या उद्दिष्टाने बालकॅन्सरशी लढणाऱ्या मुलांना सुरक्षित, स्वच्छ व आपुलकीचे निवासस्थान देणे हा ॲक्सेस लाईफचा प्रमुख उद्देश आहे.

राज्यात ४०० केंद्रांच्या माध्यमातूनचार लाख रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक येणार

0

मुंबई-शहरी आणि ग्रामीण भागात सर्वसमावेशक विकास करण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे आणि प्रशासकीय गतीमानतेवर भर देणारे महाराष्ट्र जागतिक क्षमता केंद्र धोरण २०२५ (Global Capability Centre) आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

या धोरणामुळे राज्यात ५० हजार ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक व त्यातून सुमारे चार लाख रोजगार निर्मिती होईल, असे अपेक्षित आहे. या धोरणाचा कालावधी २०२५ ते २०३० असा राहणार आहे.
भारतातील जागतिक क्षमता केंद्रे उद्योगांच्या गरजा पुरविण्यात महत्त्वाची भूमिका बजावित आहेत. सन २०२१ मध्ये भारतातील जागतिक क्षमता केंद्रांची संख्या सुमारे १२०० होती आता ती १९०० पेक्षा जास्त झाली आहे. या केंद्रातून सुमारे १९ लाख लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. राज्यात सध्या ४०० जागतिक क्षमता केंद्रे असून त्यामधून सुमारे ४ लाख लोकांना रोजगार मिळालेला आहे. या धोरण कालावधीत आणखी ४०० नवीन जागतिक क्षमता केंद्रे स्थापन करणे, चार लाख कुशल रोजगार निर्मिती करणे, उच्चमूल्याची जागतिक गुंतवणूक आकर्षित करणे, जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र आणि डिजिटल डेटाबँक निर्माण करणे आणि राज्यातील नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या सारख्या टिअर-२, टिअर-३ शहरामध्ये जागतिक क्षमता केंद्रांचा विस्तार करणे ही या धोरणाची मुख्य वैशिष्ट्ये आहेत.
जागतिक क्षमता केंद्र डिजिटल परिवर्तन, नवोपक्रम, तंत्रज्ञान, वित्तीय सेवा, अभियांत्रिकी, विपणन, संशोधन आणि विकास या क्षेत्रातील सेवा प्रदान करतात. यामुळे भारताला जागतिक स्तरावर मजबूत स्थान मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत २०४७ दृष्टिकोनाशी सुसंगत ३० ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था असलेले राष्ट्र बनविण्याचे उद्दिष्टे आहे. हे उद्दिष्टे साध्य करण्यासाठी नवीन जागतिक क्षमता केंद्र आकर्षित करणे, संशोधनाला चालना देणे, उच्च मूल्यवान ज्ञानकेंद्रीत गुंतवणूक आकर्षित करणे, डिजिटल डेटाबँक विकसित करणे, वित्तीय आणि बिगरवित्तीय प्रोत्साहने, व्यवसाय सुलभता, संस्थात्मक संरचना आणि केंद्र आणि राज्य शासनाच्या धोरणाचे एकत्रिकरण करणे आवश्यक आहे. यासाठी जागतिक क्षमता केंद्र धोरण २०२५ निश्चित करण्यात आले आहे.
या धोरणामुळे अवकाश आणि संरक्षण, कृषी आणि अन्न प्रक्रिया, रत्ने व दागिने, लॉजिस्टिक्स, धातू खाणकाम, औषध निर्माण व रसायने, अक्षय आणि हरित ऊर्जा, वस्त्रोद्योग, माहिती तंत्रज्ञान, ऑटोमोटिव्ह अशा प्राधान्य क्षेत्रांना गती मिळणार आहे.
कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि गुजरात या राज्यांनी स्वतंत्र जागतिक क्षमता केंद्र धोरण जाहीर केले आहे. महाराष्ट्राचे उद्योग आणि नवतंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील अग्रस्थान कायम टिकविण्यासाठी हे धोरण सहाय्यभूत ठरेल. जागतिक क्षमता केंद्रामध्ये औद्योगिक प्रकल्प सुरु करण्यासाठी अतिरिक्त चटई क्षेत्र, अत्यावश्यक पायाभूत सुविधा निधी, औद्योगिक वसाहतीतील राखीव भूखंड, अखंडित पाणी व वीजपुरवठा, कामकाजाच्या वेळामध्ये शिथिलता आणि मालमत्ता करांबाबत प्रोत्साहन दिले जाण्याची तरतूद आहे.

‘महाजिओटेक” महामंडळाची स्थापना
विकास नियोजनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड

राज्याच्या विकासाला आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जोड जेऊन एकात्मिक आणि नियोजनबद्ध गती देण्यासाठी महाजिओटेक महांडळ स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या महामंडळाची कंपनी कायद्यांतर्गत स्थापना करण्यात येणार असून यासाठी १०६ पदांच्या निर्मितीसही मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अँप्लीकेशन सेंटर (एमआरएसी) अर्थात महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्राचे अस्तित्व कायम ठेवून हे महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे.
भूस्थानिक तंत्रज्ञनाचा वापर आता जागतिक स्तरावर केला जात आहे. त्यामुळे प्रशासनाला नियोजन करणे आणि निर्णय घेण्यास मोठी मदत होत आहे. राज्याने १९८८ मध्ये महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अँप्लीकेशन सेंटरची स्थापना केली आहे. एमआरएसीने राबविलेल्या प्रकल्पांमध्ये भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) आधारित रस्ते माहिती प्रणाली, नगररचना प्रादेशिक योजना, जलयुक्त शिवार व पाणलोट विकास योजना, डोंगरी विकास योजना, ई- पंचनामा, महाअँग्री टेक, कांदळवन अभ्यास भूजल व्यवस्थापन, खनिज व खाणींचा अभ्यास आदींचा समावेश आहे. हीच यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी आणि एमआरएसी पुढे भविष्यात येणारी आव्हाने आणि तंत्रज्ञानात होणाऱ्या झपाट्याने बदलाचे आव्हान पेलण्यासाठी महाजिओटेक महांडळाची स्थापना करण्यात येणार आहे. महासंचालकासह, संचालक, उपसंचालक अशा एकूण १०६ पदांच्या निर्मितीसही मान्यता देण्यात आली.
संस्थेच्या मुख्य कार्यालयाकरिता मुंबईतील जीएसटी भवन, वडाळा येथे सुमारे पाच हजार चौरस फूट जागा आरक्षित ठेवण्यात येणार असून ही जागा बांधून हस्तांतरित होईपर्यंत दक्षिण मुंबई परिसरात भाड्याने जागा घेण्यासही मान्यता देण्यात आली आहे. या महामंडळाच्या खर्चासाठी २५ कोटी रूपयांची तरतूद करण्यास मान्यता देण्यात आली.

प्रधानमंत्री कुसूम घटक-ब योजनेच्या निधी उपलब्धतेसाठी अतिरिक्त वीज विक्री कर दरात वाढ
राज्यातील वीज कंपन्यांनी विक्री केलेल्या विजेवर अतिरिक्त विक्री कर लागू करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यातून प्रधानमंत्री कुसूम घटक-ब योजनेला निधी मिळविता येणार असून, त्यातून राज्यातील कृषि पंपाना पुरेशी वीज उपलब्ध होण्याने शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करता येणार आहे
शहरी भागातील रिलायन्स एनर्जी, टाटा पॉवर व बेस्ट या कंपन्यांकडील औद्योगिक, वाणिज्यिक व इतर वर्गवारीतील ग्राहकांकडून, महावितरण कंपनीकडील शहरी भागातील औद्योगिक व वाणिज्यिक वर्गवारीतील ग्राहकांकडून व राज्यातील अन्य क्षेत्रातील वीज विक्रीबाबत औद्योगिक व व्यापारी ग्राहकांकडून अतिरिक्त वीज विक्रीकरापोटी (Additional ToSE) यापूर्वी प्रत्येक युनीटमागे ११.०४ पैसे वसूल केले जात होते. त्यात दर युनिटमागे ९.९० पैसे इतकी वाढ करून एकूण २०.९४ पैसे इतका अतिरिक्त वीज विक्रीकर आकारण्यास मान्यता देण्यात आली आहे.
राज्यात कुसूम योजनेंतर्गत साडे सहा लाख सौर कृषि पंप बसवले जात आहेत. आतापर्यंत राज्यात ४ लाख २३ हजारांहून अधिक सौर कृषिपंप बसवण्यात आले आहेत. ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध व्हावा यासाठी कंपन्यांनी विक्री केलेल्या युनीटस् वर अतिरिक्त वीज विक्री कराच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

फलटण येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय
सातारा जिल्ह्यातील फलटण येथे दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्तर स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
फलटण येथे सध्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय, दिवाणी न्यायालय, कनिष्ठ स्तर अशी दोन न्यायालये कार्यरत आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी फलटण येथे दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्तर न्यायालयाची स्थापना करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मंजुरी दिलेली आहे. यानुसार दिवाणी न्यायालय,वरिष्ठ स्तर न्यायालय स्थापन करण्यास आज मंजुरी देण्यात आली.
या न्यायालयासाठी २१ नियमित पदे मंजूर करण्यात आली आहेत व ४ पदांसाठी मनुष्यबळाच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यास मान्यता देण्यात आली. यासाठी वेतन व वेतनेत्तर खर्चासह १ कोटी ८४ लाख २१ हजार ३१२ रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली.

कर्करोग: राज्यभरातील १८ रुग्णालयांमध्ये मिळणार दर्जेदार उपचार

राज्यातील कर्करोगग्रस्तांना दर्जेदार उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी सर्वसमावेशक कर्करोग सेवा धोरण निश्चित करण्यात आले आहे. यासाठी महाराष्ट्र कॅन्सर केअर, रिसर्च अँड एज्युकेशन फाऊंडेशन (महाकेअर फाऊंडेशन – MAHACARE Foundation) कंपनी स्थापन करण्यास तसेच या माध्यमातून राज्यभरातील १८ रुग्णालयांतून कर्करोगाशी निगडीत विशेषोपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यामुळे राज्यात कर्करोगाशी संबंधित डे-केअर केंद्रांच्या संख्येत मोठी वाढ होणार आहे.

या धोरणानुसार कर्करोग रुग्णालयांची एल-१, एल- २, आणि एल – ३ (LI, L2 व L3) अशी त्रिस्तरीय रचना करण्यात आली आहे. या केंद्राच्या माध्यमातून रेडिओथेरपी, किमोथेरपी तसेच पदव्युत्तर व अतिविशेषोपचार शिक्षण, सर्व प्रकारच्या कर्करोगांचे निदान, शस्त्रक्रिया, भौतिकोपचार, मानसिक आधार व उपचार, संशोधन यांसह पॅलेटिव्ह उपचार, औषध सुविधा यांची उपलब्धता तसेच जनजागृतीचे उपक्रम राबविले जाणार आहेत.
यात टाटा स्मारक रुग्णालय ही संस्था एल – १ स्तरावरील शिखर संस्था म्हणून निश्चित करण्यात आली आहे. तर छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, नागपूर, सर ज. जी. वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मुंबई (जे. जे.), छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय कोल्हापूर, बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे, येथील ६ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रूग्णालये तसेच नाशिक व अमरावती येथील सार्वजनिक आरोग्य विभागाची दोन संदर्भ सेवा रुग्णालये अशी एकूण आठ केंद्र ही एल – २ केंद्र म्हणून निश्चित करण्यात आली आहेत. तर अंबाजोगाई (बीड), नांदेड, यवतमाळ, मुंबई (कामा व आल्ब्लेस रुग्णालय), सातारा, बारामती, जळगांव व रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्नित ८ रूग्णालये व शिर्डी संस्थानचे रुग्णालय अशी एकूण नऊ रुग्णालये एल – ३ स्तर केंद्र म्हणून निश्चित करण्यात आली आहेत.
या धोरणानुसार छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, नागपूर, मुंबई (जे. जे.), कोल्हापूर, पुणे ( बी.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय) येथील ६ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न तसेच नाशिक व अमरावती येथील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारितील संदर्भ सेवा रुग्णालये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना संलग्न करून या एल-२ स्तर रूग्णालयांमध्ये कर्करोगासंबधी पदव्युत्तर व अतिविशेषोपचार शिक्षण म्हणजेच एमडी, एमएएस, डीएम-एमसीएच, डीएनबीसाठी फेलोशिप उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या एल -२, एल – ३ केंद्रांना आवश्यकतेनुसार मनुष्यबळ, निधी उपलब्धता, मार्गदर्शन या अनुषंगाने “महाराष्ट्र कॅन्सर केअर, रिसर्च अँड एज्युकेशन फांउडेशन” (MAHACARE Foundation) ही कंपनी स्थापन करण्यात येणार आहे. याशिवाय या सर्व केंद्रांमधील समन्वयासाठी कमांड अँड कंट्रोल सेंटर स्थापन करण्यात येणार आहे.
या फाऊंडेशनच्या दैनंदिन व्यवस्थापनासाठी तज्ज्ञ कार्यकारी मंडळ नियुक्त केले जाईल. फाऊंडेशनला कर्करोगावर उपचारासाठी पॅलिटिव्ह केअर उपक्रमात स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेता येणार आहे. कर्करोगावर नवनवीन उपचार पध्दती विकसित करण्याबरोबरच, स्थानिक पातळीवर कर्करोगासह सुयोग्य व किफायतशीर अशा आरोग्यविषयक कार्यक्रमांची आखणी केली जाणार आहे. आरोग्य सेवांमध्ये संशोधन आणि आजार टाळण्यासाठी जीवनशैलीतील बदलांबाबत जागरूकता वाढवण्याचे उपक्रम राबविले जाणार आहेत. देशातील व राज्यातील आरोग्य सेवा केंद्रांमध्ये माहितीचे देवाणघेवाण सुलभ व्हावी यासाठी फाऊंडेशन काम करणार आहे.
महाकेअर फाऊंडेशनला भागभांडवल म्हणून सुरुवातीला शंभर कोटी इतका निधी म्हणून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत कर्करोग रुग्णालयांना मिळणाऱ्या शुल्कापैकी २० टक्के शुल्क महाकेअर फाऊंडेशनला देण्यास आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
याशिवाय फाऊंडेशन क्लिनिकल ट्रायल्समधून निधीची उभारणी करणार आहे. तसेच या फाऊंडेशनला आवश्यकतेनुसार आंतरराष्ट्रीय संस्थांमार्फ़त तसेच देणग्या, अनुदाने, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) अंतर्गत निधी उभारता येणार आहे. यामुळे फाऊंडेशनला कर्करोगाव्यतिरिक्त वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभागांतर्गत इतर प्रकल्पांसाठी देखील निधी उभा करता येणार आहे.
महाकेअर फाऊंडेशनमार्फत एल- ३ स्तरावरील केंद्रांसाठी यंत्रसामुग्रीची खरेदी, मनुष्यबळ व व्यवस्थापन सार्वजनिक खाजगी भागीदारी (PPP) धोरणानुसार करण्यात येईल. केवळ शिर्डी संस्थान कर्करोग रुग्णालयाचा बांधकाम, यंत्रसामुग्री व मनुष्यबळासाठीचा खर्च संस्थानमार्फत करण्यात येईल. तर एल –२ स्तरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी पदभरती शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्याकडून होणार आहे. यातील उच्चस्तरीय समितीच्या मान्यतेची अट शिथील करण्यात आली आहे. या एल – २ स्तरीय केंद्रांच्या खर्चासाठी सुमारे १ हजार ५२९ कोटी ३८ लाख रुपयांच्या तरतुदीस एल – ३ स्तरीय केंद्राच्या खर्चासाठी १४७ कोटी ७० लाख रुपयांची तरतूद करण्यास आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
महाकेअर फाऊंडेशनच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री, उपाध्यक्षपदी दोन्ही उपमुख्यमंत्री राहतील. तर वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये मंत्री, आरोग्य मंत्री, या दोन्ही खात्यांचे राज्यमंत्री, वित्त विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये, सार्वजनिक आरोग्य विभाग यांचे अतिरिक्त मुख्य सचिव, वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त, आरोग्य सेवा संचालनालयाचे आयुक्त हे संचालक असतील. याशिवाय आरोग्य सेवा क्षेत्रातील तज्ज्ञ अशा व्यक्तीची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली जाईल. वैद्यकीय शिक्षण विभागाचे उपसचिव, राज्य कॅन्सर केअर प्रकल्प, टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे नामनिर्देशित व्यक्ती याशिवाय अन्य क्षेत्रातील तज्ज्ञ, प्रशासकीय अधिकारी, खासगी क्षेत्रांशी संबधित अधिकारी या चौघांसह अठरा जणांचा या फाऊंडेशनमध्ये समावेश असेल.
अलिकडे कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. ही समस्या येणाऱ्या काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) आणि राष्ट्रीय रोग डेटा केंद्र (NCDIR) यांचा २०२५ मधील अहवाल राज्यातील कर्करोग रुग्ण संख्येत २०२० च्या तुलनेत ११ टक्क्यांची वाढ दर्शवितो. देशात एक लाख लोकसंख्येमागे सुमारे १०० कर्करोग रुग्ण आढळून येतात. देशातील कर्करोगाचे गांभीर्य लक्षात घेता, केंद्र सरकारने २०२५-२६ च्या अर्थसंकल्पामध्ये देशातील सर्व जिल्हा रूग्णालयांत पुढील ३ वर्षात कर्करोग उपचाराकरिता डे केअर सेंटर स्थापन करण्याचे जाहीर केले आहे. तसेच केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने राज्यांना आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यानुसार महाराष्ट्र शासनाने हे धोरण निश्चित केले आहे.

राज्यात यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबर पासून सुरू करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५ रुपये कपातीचा निर्णय

मुंबई, दि. ३०: राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने नुकसान झाले आहे. तसेच अजूनही काही भागात पूरस्थिती आहे. त्यामुळे सन २०२५-२६ या वर्षीचा ऊस गाळप हंगाम राज्यात दि. १ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यासह मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रतिटन १० रुपये कपात आणि
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रतिटन ५ रुपये कपात करण्याचा निर्णयही घेण्यात आला.

याबाबत आज मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सन २०२४ -२५ ऊस गाळप हंगामाचा आढावा आणि सन २०२५-२६ मधील नवीन गाळप हंगामाचे धोरण ठरविण्यासाठी मंत्री समितीच्या बैठकीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जलसंपदा मंत्री (विदर्भ,तापी आणि कोकण विकास महामंडळ) मंत्री गिरीश महाजन, जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, सामजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, सहकार आयुक्त दीपक तावरे आणि साखर संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, यंदा गाळप होणाऱ्या ऊसासाठी प्रति मेट्रीक टन ३ हजार ५५० रुपये एफआरपी तर बेसिक उताऱ्यासाठी १०.२५ टक्के देण्यात येणार आहे.
गेल्या हंगामात सुमारे २०० साखर कारखान्यांनी गाळप घेतले असून यामध्ये ९९ सहकारी व १०१ खाजगी कारखान्यांचा समावेश होता. शेतकऱ्यांना ३१ हजार ३०१ कोटी रुपयांची एफआरपी अदा करण्यात आली आहे.

राज्याने ९९.०६ टक्के एफआरपी अदा केली आहे. यामध्ये १०० टक्के एफआरपी केलेल्या कारखान्यांची संख्या १४८ आहे. सहवीज निर्मिती प्रकल्पात सन २०२४ -२५ मध्ये कारखान्यांनी निर्यात केलेली वीज २९८ कोटी युनिट्स असून कारखान्यांना वीज निर्यातीपासून प्राप्त उत्पन्न १९७९ कोटी आहे. कारखान्यांना इथेनॉल विक्रीपासून उत्पन्न ६ हजार ३७८ कोटी आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

बैठकीत ऊस तोडणीसाठी यांत्रिकीकरण आणि सहवीज निर्मिती विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी सादरीकरण केले. बैठकीपूर्वी केंद्रशासनाने घोषित केलेल्या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्ताने, राज्यातील सहकार क्षेत्राची वाटचाल दर्शविणारे चित्रफितीचे सादरीकरण करण्यात आले.

सत्याचा शोध घेणारी ‘नारीशक्ती’

नारीशक्तीमुळे मिळाला हजारो व्यक्तींना खऱ्या अर्थाने ‘न्याय’

पुणे : गुप्तहेरगिरी हा तसा पारंपरिक पुरुषप्रधान व्यवसाय, परंतु पुण्यातील प्रिया काकडेंनी या समजाला छेद देत सत्याचा शोध घेणाऱ्या नारीशक्तीचा अमीट ठसा उमटविला आहे. खासगी तपासाचे अनवट करिअर निवडलेल्या प्रिया यांनी आतापर्यंत विवाहबाह्य संबंध, विवाहपूर्व पडताळणी, आर्थिक फसवणूक, बेपत्ता व्यक्तींचा शोध अशा विविध प्रकारच्या तब्बल १०९८ प्रकरणांचा यशस्वी उलगडा केला आहे. एखाद्या गोष्टींच्या मूळापर्यंत जाण्याची उत्सुकता आणि सत्य उलगडण्याच्या ध्यासातून त्यांनी पुण्यासह देशभरातील हजारो व्यक्तींना खऱ्या अर्थाने ‘न्याय’ मिळवून दिला आहे.

मूळच्या पुणेकर असलेल्या प्रिया वाणिज्य शाखेच्या पदवीधर आहेत. विद्यार्थी दशेपासूनच त्यांना गुप्तहेरगिरीचे आकर्षण होते. त्याबाबत त्या सांगतात, ‘माझ्या घरातून पाचशे रुपये चोरीला गेले होते. शेजारच्या मुलीने ही चोरी केल्याचे मी शोधून काढले. तिचा कबुलीजबाब टेपरेकॉर्डरवर नोंदवून घेतला होता. तेव्हापासूनच एखाद्या गोष्टीचा छडा लावण्याची उत्सुकता माझ्यात निर्माण झाली. त्यानंतर तपास कसा करायचा, याचे रीतसर प्रशिक्षण घेऊन वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी मी ‘स्विफ्ट डिटेक्टिव्ह एजन्सी’ स्थापन केली. त्यानंतर २००६ मध्ये रीतसर नोंदणी करून खासगी तपासाचा व्यवसाय सुरू केला.’

प्रिया काकडे यांनी विवाहपूर्व पडताळणी, विवाहबाह्य संबंध, वैवाहिक संकेतस्थळावरून होणारी फसवणूक, कौटुंबिक वाद, घटस्फोट, पोटगी, विश्वासघाताचे पुरावे संकलित करणे, बनावट प्रोफाइल्सचा शोध, आर्थिक व सायबर फसवणूक, बेपत्ता व्यक्तींचा शोध, वडिलोपार्जित जागा-संपत्ती शोधणे, समन्स बजावणे अशी विविध कामे करतात. त्यांच्या कंपनीत ३५ कर्मचारी गोपनीय तपासाचे काम करतात. एखादे प्रकरण आल्यावर त्याची पूर्णपणे पडताळणी करतात. निष्पक्ष तपास, गुप्तता, कायदेशीर मर्यादा आणि ग्राहकांचा विश्वास जपणे हे आमचे ब्रीदवाक्य असल्याचे त्या आवर्जून नमूद करतात.

काही प्रकरणांचा खासगी तपास करताना त्यांना जीवावर बेतल्याच्या आव्हानांचाही सामना करावा लागला. ‘दिल्लीत एका डॉक्टरशी संबंधित अडीच कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा तपास करताना माझे अपहरण करून अमली पदार्थांचा डोस देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, धैर्याने मी स्वतःची सुटका करून घेतली. त्यानंतर ते प्रकरण आम्ही यशस्वीपणे उलगडले होते. येरवड्यात एका तपासादरम्यान मारामारीही करावी लागली होती. अशा आव्हानांनी मला अजूनच सक्षम केले,’ असे त्यांनी सांगितले. प्रिया यांच्या या व्यवसायाला कुटुंबियांनी सुरुवातीला कडाडून विरोध केला. मात्र, त्यांनी निग्रहाने आपले ‘पॅशन’ जपले. ‘आता एखादे प्रकरण सुटल्यावर न्याय मिळालेले पक्षकार आभार मानून कृतज्ञता व्यक्त करतात. ते पाहून घरच्यांना समाधान वाटते. ते आता मला पाठबळ देतात,’ असेही त्या सांगतात.

पोलिस दलातील सर्व पदांवर महिला सर्वोत्तम कामगिरी करतात. लष्करात आता लढाऊ भूमिकांमध्येही महिला यशस्वीपणे कार्यरत आहेत. मग खासगी तपासाचे करिअरही महिला निवडू शकतात. प्रत्येक क्षेत्रात महिला स्वतःची ओळख निर्माण करू शकतात. प्रिया काकडे

अखंड सावधानता आवश्यक

घटस्थापना करताना आपण मातीत बीज रोवतो, त्याप्रमाणे माणुसकी जपत समाजात सत्याचे बीज पेरल्यास न्यायाचे नवीन अंकुर उगवेल, यावर प्रिया काकडेंचा दृढ विश्वास आहे. ‘आयुष्यात कोणताही निर्णय घेताना, मग तो जीवनसाथी निवडणे असो वा आर्थिक गुंतवणूक करणे असो, त्याची पारख-पडताळणी व्यवस्थित केली पाहिजे; तसेच अखंड सावध राहिले पाहिजे. त्यामुळे फसवणूक होत नाही,’ असेही त्या आवर्जून नमूद करतात.

पुणे लोकमान्य फेस्टिवलमध्ये नृत्यातून आदिशक्तीचा लोकजागर

नृत्याच्या माध्यमातून आदिशक्तीचा लोकजागर

पुणे – पुणे लोकमान्य फेस्टिवलच्या वतीने गेल्या ७ दिवसांपासून लोकमान्यनगर येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे. प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी माया खुटेगावकर प्रस्तुत “रूपानं देखणी” या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सदरील कार्यक्रमात नृत्याच्या माध्यमातून आदिशक्तीचा लोकजागर करण्यात आला. देवीची वेशभूषा परिधान करून मंचावर देवीचा जागर करण्यात आला. सदरील कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद देवून आदिशक्तीच्या रुपाची “याची देही याची डोळा” अनुभूती घेतली.

सातपुते म्हणाले की, महिलांना जिजाऊच्या लेकी म्हणतात ते उगीच नाही. जिजाऊने अपार कष्ट करून आपल्या संस्काराने व निष्ठेने शिवबा घडवला. शिवबाने स्वराज्याच्या निर्मितीचा ध्यास घेत तडीस नेला. आईची माया रुपी ताकदच या कामी आली. आज तंत्रज्ञानाची पाऊले विकासाकडे झपाट्याने चालली आहे. याच तंत्रज्ञान विकासामध्ये स्री ही झपाट्याने आपला सहभाग नोंदवत आहे. आपली कुटुंब व्यवस्था सांभाळत आज देशाच्या विकासात आपली प्रमुख भूमिका बजावतांना दिसत आहे.

आज व्यवसायामध्ये स्त्री आणि पुरुष असा भेद -भाव मुळातच कमी होऊ लागला आहे. आज प्रत्येक क्षेत्रात म्हणजे देशाचे रक्षण कार्य, अभियंता, डॉक्टर, वकील व शिक्षण यात महिला या मोठ्या जिगरीने आपला सहभाग नोंदवित असतांना एक उत्तम गृहिणी म्हणूनही आपले कर्तव्य पार पाडीत आहे आणि हे केवळ आणि केवळ माता जगदंबेच्या आशीर्वादानेच होत आहे यात शंका नाही. अशा भावना पुणे लोकमान्य फेस्टिव्हलचे संस्थापक अध्यक्ष ॲड. गणेश सातपुते यांनी व्यक्त केल्या. यावेळी उत्सव प्रमुख डॉ. नरेश मित्तल, निमंत्रक शुभांगी सातपुते आदी मान्यवर उपस्थित होते.

आर्मी वेलफेअर गृहनिर्माण संस्थेने छतावर उभारला ३६५ किलोवॅट क्षमतेचा सूर्यघर प्रकल्प

महावितरणचे मुख्य अभियंता सुनिल काकडे यांच्या हस्ते शुभारंभ

पुणे, दि. ३० सप्टेंबर २०२५- शहरातील साळुंके विहार येथील आर्मी वेलफेअर सहकारी गृहनिर्माण संस्थेने प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून सोसायटीच्या छतावर ३६५ किलोवॅट क्षमतेचा सौर प्रकल्प उभारुन विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याचे दिशेने पाऊल टाकले आहे. या प्रकल्पाचा महावितरण पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनिल काकडे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

            महावितरण १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत सेवा पर्व राबवित आहे. त्यानिमित्ताने मंगळवारी (दि. ३०) साळुंके विहार येथील आर्मी वेलफेअर सोसायटीच्या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला.  यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, कार्यकारी अभियंता चंद्रकांत दिघे यांचेसह गृहनिर्माण संस्थेचे चेअरमन ब्रिगेडियर एस.टी. नटराजन, सचिव कर्नल बी.डी. शिंदे, व्यवस्थापक ले. कर्नल बी.सी. जोगळेकर, तांत्रिक सदस्य कर्नल आर. मनोहरन, महावितरणचे अति. कार्यकारी अभियंता निलेश रोहनकर, राजेंद्र भुजबळ, किशोर शिंदे, सहा. अभियंता रमाकांत गर्जे व वीज कर्मचारी उपस्थित होते.

            महावितरणच्या रास्तापेठ विभागांतर्गत सैन्यदलातील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची साळुंके विहार येथे ३३ एकर क्षेत्रात विस्तीर्ण अशी गृहनिर्माण संस्था आहे. या ठिकाणी ८६७ वीज जोडण्या आहेत. यात ७४६ घरगुती तर इतर १२१ जोडण्यांचा समावेश आहे. सूर्यघर योजनेत १०७ वैयक्तिक ग्राहकांनी त्यांच्या छतावर ३१० किलोवॅट क्षमतेचे प्रकल्प बसविले आहेत. तर पाणीपुरवठ्याचे ४५ किलोवॅट व पथदिव्यांसाठी १० किलोवॅट असा एकूण ३६५ किलोवॅट क्षमतेचा प्रकल्प या संस्थेने साकारला आहे. उर्वरित ग्राहकही लवकरच सौर ऊर्जेकडे वळणार आहेत.

            यावेळी मार्गदर्शन करताना मुख्य अभियंता काकडे म्हणाले, ‘सैन्यदलातील या सोसायटीने हरित ऊर्जेच्या दिशेने पाऊल टाकले असून, ते इतरांना प्रेरणा देणारे आहे. येणाऱ्या काळात या संस्थेने विजेच्या बाबतीत पूर्णत: स्वावलंबी व्हावे. यासाठी उर्वरित इमारतींच्या छतावरही सौर प्रकल्प बसविण्यास प्राधान्य द्यावे. याकामी महावितरण सर्वोतोपरी सहकार्य करेल.’

टीओडी मीटरमुळे दिवसा वापरलेल्या विजेपोटी ८० पैसे प्रतियुनिटची सवलत मिळते. त्यामुळे गृहनिर्माण संस्थेतर्फे अध्यक्ष नटराजन व तांत्रिक सदस्य आर. मनोहरन यांनी थ्री फेज व टीओडी मीटर बसविण्याची मागणी केली. तेंव्हा मुख्य अभियंता काकडे यांनी तातडीने मीटर बदलण्यासह आवश्यक देखभाल दुरुस्तीचे कामे करणे तसेच वीजभार वाढविण्याच्या सूचना संबंधिताना दिल्या.

·         सरिता वैभव सोसायटीच्या छतावर १०९ किलोवॅटचा सौर प्रकल्प

महावितरणच्या पर्वती विभागातील सिंहगडरोड दत्तवाडी शाखेंगतर्गत सरिता वैभव हाऊसिंग सोसायटीच्या ४३ सदस्यांनी एकत्र येऊन पंतप्रधान सूर्यघर योजनेतून १०९ किलोवॅटचा सौर प्रकल्प साकारला आहे. महावितरण रास्तापेठ मंडलाचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांच्या हस्ते या प्रकल्पाचा शुभारंभ मंगळवारी (दि. ३०) करण्यात आला. यावेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता निलेश फलके, अति. कार्यकारी अभियंता उमेश कवडे, मंगेश केंद्रे यांचेसह सोसायटीचे चेअरमन मनोज जोशी, सचिव अमेय जोशी, श्रीकृष्ण बापट, अमित कळसूर, उपेंद्र काळे यांची उपस्थिती होती. आता ही सोसायटी विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाली आहे.

मुंबईतील मालमत्ता नोंदणी आणि महसूल ऐतिहासिक उच्चांकावर …..

मुंबईतील रिअल इस्टेट बाजारपेठेचा वरचा प्रवास सुरूच आहे, २०२५ मध्ये मालमत्ता नोंदणी आणि सरकारी महसूल या दोन्ही बाबतीत नवीन बेंचमार्क स्थापित केले आहेत. जानेवारी ते सप्टेंबर २०२५ पर्यंतच्या आयजीआर डेटामध्ये वर्षानुवर्षे चांगली वाढ आणि स्पष्ट दीर्घकालीन वाढीचा कल दिसून येतो, जो या क्षेत्राची लवचिकता आणि भारताच्या अर्थव्यवस्थेत वाढणारे महत्त्व अधोरेखित करतो.

जानेवारी ते सप्टेंबर २०२५ दरम्यान, १,११,३८८ मालमत्ता नोंदणी नोंदल्या गेल्या – गेल्या सात वर्षांतील हा सर्वाधिक आकडा आहे. २०२४ च्या तुलनेत (१,०५,६०७ नोंदणी) ५.५% वाढ आणि २०२३ च्या तुलनेत (९४,३०७ नोंदणी) १८.१% वाढ , ज्यामुळे खरेदीदारांच्या मागणीची शाश्वत ताकद आणखी मजबूत झाली आहे.

महामारीपूर्वीच्या क्रियाकलापांशी तुलना केल्यास, वाढीचे प्रमाण आणखी धक्कादायक आहे. २०२५ मधील नोंदणी २०१९ च्या पातळीपेक्षा (५०,०४५, १२२.६% ने वाढ) दुप्पट आहे आणि २०२० च्या पातळीपेक्षा (२८,८२२, २८६.६% ने वाढ) जवळजवळ चार पट आहे , जेव्हा कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे बाजारावर खोलवर परिणाम झाला होता.

महसूल संकलन पहिल्यांदाच ₹१०,००० कोटी ओलांडले:

नोंदणींमध्ये ही वाढ स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी शुल्क संकलनातून दिसून आली. २०२५ च्या पहिल्या नऊ महिन्यांत, महसूल विक्रमी १०,०९४.२२ कोटींवर पोहोचला, जो २०२४ मध्ये ८,८७६.४२ कोटी रुपयांचा मागील उच्चांक ओलांडला.

हे वर्षानुवर्षे १३.७% वाढ दर्शवते आणि २०२० च्या तुलनेत ४२१% ची नाट्यमय पाचपट वाढ (₹१,९३७.३२ कोटी) साथीच्या मंदी दरम्यान.

पुनर्प्राप्ती आणि वाढीचा मार्ग:

या आकडेवारीवरून रिअल इस्टेट क्षेत्राच्या उल्लेखनीय पुनर्प्राप्तीचे दर्शन घडते:

  • २०१९-२०२०: साथीच्या आजारामुळे नोंदणी आणि महसूलात मोठी घट झाली.
  • २०२१: ८६,०७२ नोंदणींसह बाजार पुनरुज्जीवन सुरू झाले आणि महसूल ₹४,२५२ कोटींपेक्षा जास्त झाला.
  • २०२२: महसूलाने ₹६,६०० कोटींचा टप्पा ओलांडला, जो २०२१ च्या तुलनेत ५५% जास्त आहे, जो नवीन गती दर्शवितो.
  • २०२३-२०२५: बाजार केवळ स्थिर झाला नाही तर तो वाढला, सलग वर्षांमध्ये विक्रम मोडत.
वर्षनोंदणींची संख्या (जानेवारी ते सप्टेंबर)महसूल (भारतीय रुपये कोटींमध्ये) (जानेवारी ते सप्टेंबरमध्ये)
२०१९५०,०४५४,०३२.५३ रुपये
२०२०२८,८२२१,९३७.३२ रुपये
२०२१८६,०७२४,२५२.१२ रुपये
२०२२९५,२८०६,६५३.२९ रुपये
२०२३९४,३०७८,३८७.०३ रुपये
२०२४१,०५,६०७८,८७६.४२ रुपये
२०२५१,११,३८८१०,०९४.२२ रुपये
नोंदणींची संख्यामहसूल (भारतीय रुपये कोटींमध्ये)
सप्टेंबर २०१९’४,०३२₹ ३४७.६
सप्टेंबर २०२०’५,५९७₹ १८०.५
सप्टेंबर २०२१’७,८०४₹ ५२९.०
सप्टेंबर २०२२’८,६२८₹ ७३४.२
सप्टेंबर २०२३’१०,६९३₹ १,१२६.८
सप्टेंबर २०२४’९,१११₹ ८७६.७
सप्टेंबर २०२५’११,७४४₹ १,२५६.१

३० सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३:४३ वाजेपर्यंतचा डेटा.

ANAROCK ग्रुपचे अध्यक्ष अनुज पुरी म्हणतात, “ही सातत्यपूर्ण वाढ मजबूत गृहनिर्माण मागणी, वेगवान पायाभूत सुविधा विकास, प्रीमियम प्रकल्प लाँच आणि स्थिर धोरणात्मक चौकटी यांच्या संयोजनामुळे आहे. २०२५ ने केवळ नऊ महिन्यांतच १०,००० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे, त्यामुळे हे वर्ष मालमत्ता नोंदणी आणि संकलनासाठी आतापर्यंतचे सर्वात यशस्वी वर्ष बनण्याच्या मार्गावर आहे. सातत्यपूर्ण कामगिरी स्ट्रक्चरलदृष्ट्या मजबूत रिअल इस्टेट मार्केटकडे निर्देश करते, जे अंतिम वापरकर्ते आणि गुंतवणूकदार दोघांद्वारे चालवले जाते, जे पुढील वर्षांत सतत विस्तारासाठी पायाभूत सुविधा तयार करते.”


राज्यात भूकरमापक संवर्गातील ९०३ पदांची भरती; १ ते २४ ऑक्टोबरदरम्यान ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, दि. ३०: भूमी अभिलेख विभागातील गट क भूकरमापक संवर्गातील ९०३ रिक्त पदे भरण्यासाठी परीक्षेचे आयोजन करण्यात येणार असून १ ते २४ ऑक्टोबर २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यात भूकरमापक संवर्गातील एकूण १ हजार १६० पदे रिक्त असून त्यापैकी ९०३ पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. यामध्ये पुणे विभागातील ८३ पदे, कोकण (मुंबई) विभाग – २५९, नाशिक – १२४, छ. संभाजीनगर – २१०, अमरावती – ११७ आणि नागपूर विभागातील ११० पदांचा समावेश आहे.

उमेदवारांचे अर्ज https://ibpsreg.ibps.in/gomsep25/ आणि https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळांवर ऑनलाईनरित्या स्वीकारण्यात येणार आहेत. सदर भरतीसाठी १३ व १४ नोव्हेंबर २०२५ रोजी ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहे.

परीक्षेसाठीची पात्रता :

मान्यताप्राप्त महाविद्यालयातील किंवा संस्थेकडील स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरींग) धारक, किंवा माध्यमिक शालांत परीक्षेनंतर मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सर्वेक्षक व्यवसायाचे प्रमाणपत्र (आयटीआय सर्व्हेअर) धारक उमेदवारांना अर्ज करता येईल.

आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे विभागनिहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर सामाजिक व समांतर आरक्षणानुसार कागदपत्र पडताळणी करून विभागनिहाय अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात येईल, असे राज्याचे जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख यांनी कळविले आहे.
0000

प्राथमिक शिक्षकांना केंद्र प्रमुख विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, दि. ३० : राज्यातील जिल्हा परिषद मधील कार्यरत प्राथमिक शिक्षकांना ‘समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख)’ पदावर नियुक्ती देण्यासाठी विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात येणार असून त्यासाठी २५ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर दरम्यान ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

‘समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२५’ ही स्पर्धा परीक्षा १ ते ५ डिसेंबर २०२५ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात येणार आहे. राज्यात भरावयाची ही पदे एकूण २ हजार ४१० इतकी आहेत. या स्पर्धा परीक्षेसाठी सन २०२३ मध्ये ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना ८ ते १८ ऑक्टोबर या कालावधीत आपल्या अर्जात दुरूस्ती करता येईल. नवीन उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी २५ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर असा राहील. परीक्षेबाबतची अधिसूचना, वेळापत्रक, ऑनलाईन आवेदनपत्राबाबत सविस्तर माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे, असे परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविले आहे.
0000

केफिन टेक्नॉलॉजीजने इग्नाइटचा केला शुभारंभ

: भारतातील म्युच्युअल फंड वितरकांना सक्षम करण्यासाठी एक धोरणात्मक उपक्रम

मुंबई: जागतिक गुंतवणूकदार आणि उपाय अमलात आणण्यातील अग्रगण्य प्रदाता असलेल्या केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेडने (“केफिन टेक्नॉलॉजीज”) आज IGNITE” हा प्रमुख कार्यक्रम लाँच करण्याची घोषणा केली. म्युच्युअल फंड वितरक आणि संबंधित सेवा पुरवणाऱ्या प्लॅटफॉर्ममधील संवादात परिवर्तनकारी बदल घडवणारा असा हा कार्यक्रम आहे. बँकाराष्ट्रीय वितरकम्युच्युअल फंड वितरक (MFDs) आणि नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार (RIAs) अशा वितरक परिसंस्थांना समर्थनडिजिटल साधने आणि सहयोगी समस्या-निराकरणासह सक्षम करण्यासाठी इग्नाइटची रचना केली गेली आहे. ज्यामुळे ते अधिक कार्यक्षमतेनेउत्तम प्रतिसाद देत विश्वासाने स्केल करण्यास सक्षम होतात.

भारताच्या वित्तीय बाजारपेठांना सक्षम करण्याचा तब्बल चार दशकांचा वारसा केफिनटेककडे आहे. याच पाठबळावर इग्नाइट कंपनीच्या उत्क्रांतीच्या पुढील टप्प्याचे प्रतिनिधित्व करते, आणि तो आहे वितरकांसाठी व्यवहार भागीदार ते परिवर्तन सहयोगी. या कार्यक्रमाचा उद्देश ग्राहक – कंपनी संबंध व्यवस्थापन आणि सेवा वितरणाची पुनर्परिभाषा करणे हा आहे. तसेच भारताच्या वाढत्या गुंतवणूकदार संख्येला सेवा देण्यासाठी एएमसी आणि वितरक कशी भागीदारी करतात यासाठी नवीन बेंचमार्क स्थापित करणे यासाठी देखील हे कार्यरत आहे.

आधुनिक काळातील वितरकांच्या गरजांनुसार तयार केलेल्या सर्वसमावेशक ऑफर्स देणे हे इग्नाइटच्या केंद्रस्थानी आहे:

• समर्पित रिलेशनशिप मॅनेजर वितरकांच्या श्रेणींमधून सातत्यपूर्ण आणि वैयक्तिक समर्थन देतील

• सुधारित प्रतिसाद आणि समस्या निराकरण यंत्रणेसह जलद सेवा उपलब्ध होतील

• आर्थिक मध्यस्थांसाठी केफिनचे एकात्मिक सुपर ऍप केफिन केआरएआयआरआयएस आणि सीमलेस ऑनबोर्डिंग प्लॅटफॉर्मसारखे अत्याधुनिक प्लॅटफॉर्म ऑपरेशन्स सुलभ करतील तसेच डिजिटल स्केल वाढवतील

• नियोजनबद्ध फीडबॅक चॅनेलद्वारे, वितरकांच्या गरजांनुसार केफिनटेक त्यांच्या ऑफर विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवते.  

हा एकात्मिक दृष्टिकोन वितरकांना केवळ साधनांसह नव्हे तर विश्वासार्ह भागीदार परिसंस्थेसह सक्षम बनवतो – जो त्यांना कार्यक्षमता वाढवण्यास, गुंतवणूकदारांचा विश्वास निर्माण करण्यास आणि त्यांची पोहोच वाढविण्यास मदत करतो.

या लाँचबद्दल केफिन टेक्नॉलॉजीजचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ श्रीकांत नाडेला म्हणाले, “वितरकांच्या समस्यांना समजून घेणाऱ्या आणि त्यांच्या वाढीला चालना देणाऱ्या एखाद्या मंचाची खूप पूर्वीपासून आवश्यकता होती. यासाठीच IGNITE ही आमची वचनबद्धता आहे. केवळ ऑपरेशनल सपोर्टच नाही तर भागीदारांची मानसिकता लक्षात घेऊन, वेगाने विकसित होणाऱ्या, डिजिटली नेतृत्वाखालील गुंतवणूक क्षेत्रात भरभराट करण्यास आम्ही वितरकांना सक्षम करत आहोत. हा केवळ एक कार्यक्रम नाही तर वितरणाचे भविष्य सह-निर्मित करण्यासाठी राबवलेला एक दीर्घकालीन प्रवास आहे.”

इग्नाइटची सुरुवात एका अत्यंत महत्त्वाच्या वेळी झाली आहे. भारतातील म्युच्युअल फंड उद्योगात सातत्यपूर्ण वाढ होत आहे. 2030 पर्यंत AUM 80 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकेल, असा अंदाज आहे. अर्थात या वाढीसोबत कमी खर्च, जलद डिजिटल अनुभव, वैयक्तिकृत ऑफरिंग आणि पारदर्शक सेवा अशा अपेक्षाही वाढतात. PwC च्या अलीकडील म्युच्युअल फंड्स 2030 च्या अहवालात, स्पर्धात्मकतेचा मार्ग ऑपरेशनल लेयर्समध्ये बदल आणि क्लायंट एंगेजमेंट सुधारण्यात असल्याचे म्हटले आहे. वितरकांना गुंतवणूकदारांच्या या मागण्या पूर्ण करण्यासाठी सक्षम करून, खंडित सुधारणांद्वारे नव्हे तर एकात्मिक एंगेजमेंट मॉडेलद्वारे अचूकपणे परिवर्तन करण्यास इग्नाइट सक्षम करते.

तात्काळ कार्यक्षमता वाढण्याव्यतिरिक्त, IGNITE चा व्यापक भांडवली मार्केट इकोसिस्टीमवर मोठा प्रभाव पडण्याचा अंदाज आहे. चांगली सेवा देणारे वितरक हे चांगले गुंतवणूकदार घडवतात — विशेषतः उदयोन्मुख टियर 2 आणि टियर 3 मार्केटमध्ये. जिथे या सगळ्या आर्थिक बाबींमधील प्रवेश अजूनही तेवढा सुलभ नाही तसेच या व्यवहारांबाबतचा विश्वास अजूनही निर्माण होतो आहे. आवश्यक त्या पायाभूत सुविधा पुरवून वितरकांना मजबूत करून केफिन टेक्नॉलॉजीजचे लक्ष्य गुंतवणूकदारांचा समावेश वाढवणे हे आहे. मार्केटची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवून अधिक पारदर्शक आणि स्केलेबल वित्तीय प्रणालीमध्ये योगदान देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत पसंतीच्या वाहन नोंदणी क्रमांकाची फेसलेस सेवा सुरु

पुणे, दि. 30 सप्टेंबर : प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे नविन वाहनांसाठी पसंतीचे, आकर्षक नोंदणी क्रमांक आरक्षित करण्याची सोय आता पूर्णपणे ऑनलाईन व फेसलेस पध्दतीने करण्यात आली आहे. सदर सेवा दिनांक २५ नोव्हेंबर २०२४ पासून कार्यान्वित असून अर्जदारास कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही.

नवीन मालिका एमएच 12 वायआर मधील पसंतीचे नोंदणी क्रमांक आरक्षित करण्याची सेवा दिनांक ०१ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२.०० वाजता सुरु होणार आहे. कार्यालयामध्ये ऑफलाईन पध्दतीने कोणतेही शुल्क स्विकारले जाणार नाही.

अर्जदाराने https://fancy.parivahan.gov.in/ या संकेतस्थळावर नोंदणी करून OTP च्या साहाय्याने लॉगिन करावे, पसंतीचा क्रमांक निवडावा आणि SBI e-pay गेटवेच्या माध्यमातून ऑनलाईन शुल्क भरावे. त्यानंतर ई-रसीद प्रिंट करून संबंधित वाहन विक्रेत्याकडे सादर करणे आवश्यक आहे. ही सोय वैयक्तिक मालकीच्या वाहनांकरिता उपलब्ध असून इतर प्रकारच्या (Company, Firm इ.) वाहनांसाठी पसंती क्रमांक कार्यालयामार्फतच जारी करण्यात येतील. असे उप प्रादेशिक अधिकारी, पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.