Home Blog Page 109

लेफ्टनंट जनरल संदीप जैन(AVSM),(SM) यांनी दक्षिण कमांडच्या प्रमुखपदाचा स्वीकारला कार्यभार

लेफ्टनंट जनरल संदीप जैन(AVSM),(SM) यांनी 1 एप्रिल 2026 रोजी दक्षिण कमांडचे ‘जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणून सूत्रे हाती घेतली. त्यांनी लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची जागा घेतली असून, लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी आजच ‘उप-लष्कर प्रमुख’ म्हणून पदभार स्वीकारला आहे.राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी असलेले लेफ्टनंट जनरल संदीप जैन, जून 1988 मध्ये ‘महार रेजिमेंट’मध्ये नियुक्त झाले. जवळपास चार दशकांच्या प्रदीर्घ आणि गौरवशाली कारकिर्दीत, त्यांनी विविध ठिकाणी आणि वेगवेगळ्या अधिकारपदांवर महत्वाची कामगिरी बजावली आहे.

जैन यांनी निम-विकसित भूप्रदेशासह, दक्षिण सुदानमधील संयुक्त राष्ट्र मिशनमध्ये एका सैनिकांच्या तुकडीचे, स्ट्राइक कोअरमधील एका पायदळ ब्रिगेडचे, दहशतवादविरोधी दलाचे आणि उत्तर कमांडमधील एका महत्त्वाच्या  कोअरचे नेतृत्व केले आहे.

ऑपरेशन पवन मधील सहभाग, इथिओपियामधील संयुक्त राष्ट्र मिशनमध्ये लष्करी निरीक्षक म्हणून केलेली सेवा आणि नियंत्रण रेषेसह ईशान्य भारतामध्ये उंचीवरील क्षेत्रात आणि दहशतवादविरोधी कारवायांमध्ये बजावलेल्या अनेक मोहिमांचा त्यांना अनुभव आहे. ते महार रेजिमेंटचे कर्नल म्हणूनही कार्यरत आहेत.

दक्षिण कमांडचे नेतृत्व स्वीकारण्यापूर्वी त्यांनी मुख्यालय दक्षिण कमांड येथे चीफ ऑफ स्टाफ म्हणून काम पाहिले होते. या पदावर असताना त्यांनी लष्करी क्षमतावृद्धी, दलाची पुनर्रचना आणि एकूणच कार्यसज्जता वाढविण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

त्यांनी आर्मी वॉर कॉलेज येथून उच्च कमांड अभ्यासक्रम, तसेच केनियाच्या नॅशनल डिफेन्स कॉलेजमधून नॅशनल डिफेन्स कोर्स पूर्ण केला आहे. त्यांच्या उल्लेखनीय आणि उत्कृष्ट सेवेसाठी त्यांना अतिविशिष्ट सेवा पदक(AVSM) आणि सेना पदक(SM) प्रदान करण्यात आले आहे.

कमांडची सूत्रे स्वीकारल्यानंतर लेफ्टनंट जनरल संदीप जैन यांनी युद्धात हौतात्म्य पत्करणाऱ्या सैनिकांना दक्षिण कमांडच्या युद्ध स्मारकावर आदरांजली अर्पण केली आणि मुख्यालय दक्षिण कमांड येथे गार्ड ऑफ ऑनर स्वीकारला.वाळवंट क्षेत्र, रण व खाडी प्रदेश, किनारपट्टी, बेटे तसेच अंतर्गत भाग अशा विविध कार्यक्षेत्रांमध्ये परिचालनात्मक सज्जतेवर कमांडचा सातत्याने भर राहील, असे ते म्हणाले.

तसेच त्यांनी ‘JAI’ या चौकटीअंतर्गत संयुक्त कार्यपद्धती (jointness) अधिक मजबूत करणे, स्वदेशी क्षमताविकास आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यावर विशेष भर देण्याचे सांगितले. बदलत्या कार्यात्मक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर सर्व स्तरांवरील अधिकाऱ्यांनी व जवानांनी उच्च दर्जाची सज्जता, व्यावसायिकता आणि लढाऊ तत्परता कायम राखावी, असेही त्यांनी निर्देश दिले.

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात:7 मजुरांचा जागीच मृत्यू; सफाईचे काम उरकून पिकअपमध्ये बसताना ट्रकने दिली धडक

नागपूर-मुंबई महामार्गावर जालना जिल्ह्यातील कडवंची शिवारात भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. सफाईचे काम उरकून मजूर पिकअप वाहनात बसत असताना या वाहनाला ट्रकने जोरदार धडक दिली आहे. ही धडक इतकी भीषण होती की यात मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर कडवंची गावाच्या हद्दीत साफसफाईचे काम सुरू होते सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मजूर काम संपून पिकपमध्ये बसून आपल्या घराकडे जात असताना ट्रकने त्यांना धडक दिली. अपघात झाला तेव्हा मजूर पिकपमध्ये बसतच होते. ठार झालेले सर्वजण बदलापूर तालुक्यातील खादगाव आणि केळीगव्हाण या गावातील आहेत.

जालन्यातील कडवंचीजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात झाला आहे. समृद्धी महामार्गावर काम करणाऱ्या कामगारांच्या महिंद्रा पिकपला ट्रकची जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाल्याची महिती समोर आली आहे. या अपघातात सात कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून चालकासह ८ ते ९ जण गंभीर जखमी असल्याने त्यांना उपचारासाठी जालन्यातील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बदनापूर तालुक्यातील केळीगव्हाण आणि खादगाव परिसरातील 15 कामगार एबी इंटरप्राईजेस या कंपनीकडून समृद्धी महामार्गावरील स्वच्छता करण्यासाठी रोज जातात. महिला कामगारांना घेऊन जात असताना हा अपघात झाला. या परिसरातील 15 महिला कामगार महिंद्रा पिकअपमध्ये बसून जात असताना भरधाव येणाऱ्या ट्रकने महिंद्रा पिकअपला धडक दिली. यात 7 महिला कामगारांचा जागेवर मृत्यू झाला आहे. 8 ते 10 महिला कामगार आणि चालक गंभीर जखमी असल्याने त्यांना उपचारासाठी जालन्यातील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातात मृत्यूची संख्या वाढण्याची शक्यता असून अपघातातील मृत्यू झालेले कामगार बदनापूर तालुक्यातील केळीगव्हाण आणि खादगाव परिसरातील असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच नागरिकांसह जालना पोलीस आणि समृद्धी महामार्गावरील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी जालन्यातील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

‘मिनर्वा’ मध्ये युवा ऊर्जेचे  दर्शन -डॉ.प्रमोद कुमार यांचे विचार


आयएसबीएम कॉलेज ऑफ कॉमर्स च्या ‘ मिनर्वा’ मध्ये युवा प्रतिभा व नेतृत्वाचा दिसला आत्मविश्वास

पुणे :” विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोरबच  सर्जनशीलता , नावीन्य आणि युवा ऊर्जेचे  दर्शन घडावे. यासाठी शैक्षणिक अभ्यासा पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी मिनर्वा  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. ”  असे विचार आएसबीअ‍ॅडएम चे अध्यक्ष डॉ.प्रमोद कुमार यांनी व्यक्त केले.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयएसबीएम कॉलेज ऑफ कॉमर्स यांच्या वतिने आयोजित करण्यात आलेल्या मिनर्वा  २०२६ च्या प्रसंगी ते बोलत होते.

या वेळी प्राचार्य डॉ.मनीष सिंह, विभाग प्रमुख प्रा. दीप्ती देशपांडे, कलाकार  सबाली द बँड चे कलाकार विद्यार्थी प्रतिनिधी ब्रायन सायमन  आणि वेदांत ढोरे उपस्थित होते.

सर्जनशीलता,  नाविन्य  आणि तरुणाईचा उत्साह साजरा करण्यासाठी मिनर्वा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  मिनर्वा च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलात्मक, सांस्कृतिक आणि स्पर्धात्मक गुणांना वाव देण्यासाठी एक चैतन्यमय व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात आले. या कार्यक्रमामध्ये 87 महाविद्यालये, 200 संघ सहभागी झाले होते. या मध्ये एमआयटी,  सिम्बॉयसिस,  अण्णासाहेब मगर कॉलेज, जेएसपीएम,  इंदिरा,  दिल्ली युनिव्हर्सिटी आणि ग्वाल्हेर येथील माधव म्युझिक कॉलेजचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

मिनर्वा महोत्सवामध्ये  विविध प्रकारच्या स्पर्धा आणि कार्यक्रमांचा समावेश होता. अभिनय, गायन (एकल, द्वंद आणि समूह), नृत्य (एकल, द्वंद आणि समूह), फॅशन शो, बॅटल ऑफ बँडस, बाईक शो, बीजीएमआय गेमिंंग स्पर्धा, नुक्कड  नाटक आणि ओपन डीजे सह एका अत्यंत जोशपूर्ण  आर्टिस्ट नाईट चा समावेश होता.

या संदर्भात डॉ.मनीष सिंह यांनी सांगितले  की, “विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, सांघिक भावना, नेतृत्व गुण आणि स्पर्धात्मक वृत्ती जोपासणे तसेच विविध  महाविद्यालयांमधील परस्पर सहकार्याला प्रोत्साहन देणे हेच मिनर्वाचे मुख्य उद्दिष्ट  आहे.”

प्रा. दीप्ती देशपांडे म्हणाल्या,” सहभागी सर्व विद्यार्थ्यांसाठी हा अनुभव अविस्मरणीय आणि समृद्ध असेल.  यासाठी  महोत्सवाच्या आयोजनात अत्यंत बारकाईने आणि नियोजन बद्ध पद्धतीने काम करण्यात आले आहे.

२ ते ६ एप्रिल, २०२६ दरम्यान पाटण येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल- ॲड आशिष शेलार

मुंबई, दि. १ मार्च २०२६ : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम रसिकांसाठी एक संस्मरणीय सांस्कृतिक पर्व ठरणार आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण येथे दि. २ ते ६ एप्रिल २०२६ या कालावधीत ‘कोयना दौलत डोंगरी महोत्सव २०२६’ चे आयोजन करण्यात येणार आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या सातारा जिल्ह्यातील निसर्गसंपन्न पर्यटन स्थळांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अधिक ठळक स्थान मिळावे, हा या महोत्सवामागील प्रमुख उद्देश आहे. या महोत्सवामुळे स्थानिक पर्यटनाला चालना मिळून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार आहे. नागरिक, शेतकरी, पर्यटक आणि उद्योजकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

महोत्सवामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. दि. २ एप्रिल रोजी शाहिरी पोवाडा, ३ एप्रिलला भजनी मंडळ, ४ एप्रिलला ब्रास बँड पथकाचा थरार आणि ५ एप्रिलला लावणी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. स्थानिक लोककला, पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम आणि नामांकित कलाकारांचे विशेष सादरीकरण यामुळे महोत्सव अधिक रंगतदार होणार आहे.

या कार्यक्रमांबरोबरच आनंदमेळा, बोटींग, घोडेस्वारी, पॅराग्लायडिंग, उंट सफारी, इलेक्ट्रिक बग्गी, कार्निवल परेड, कृषी प्रदर्शन, खाद्यजत्रा, पशु-पक्षी प्रदर्शन आणि शस्त्र प्रदर्शन यांसारखे विविध आकर्षक उपक्रम पर्यटकांना अनुभवता येणार आहेत. महिला बचत गटांना विशेष दालने उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यांच्या हस्तकला आणि कलाकृतींचे प्रदर्शन व विक्री हे महोत्सवाचे खास आकर्षण ठरणार आहे.

मनोरंजन विश्वातील अनेक नामवंत कलाकार या महोत्सवात सहभागी होणार आहेत. यामध्ये संस्कृती बालगुडे, जान्हवी किल्लेकर, स्पृहा जोशी, भाऊ कदम, भारत गणेशपुरे, प्रियदर्शन जाधव, कुशल बद्रिके, हेमांगी कवी, गायक रोहित राऊत, गायिका जुईली जोगळेकर तसेच अभिजीत जाधव – आमु जाधव यांचा समावेश आहे.

डोंगरी पर्यटन महोत्सवादरम्यान पर्यटकांना स्थानिक संस्कृती, परंपरा आणि पर्यटनाची विविध रूपे अनुभवता येणार आहेत. ग्रामीण जीवनशैलीचा जवळून परिचय करून देण्यासाठी कृषी पर्यटनाशी संबंधित उपक्रम, सातारा जिल्ह्यातील पारंपरिक खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडविणारे पाककृती प्रदर्शन, तसेच बोटींग शर्यती, छायाचित्र आणि चित्रकला स्पर्धा व विविध कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत.

राज्याच्या पर्यटन धोरणाच्या अनुषंगाने महिला सशक्तीकरण, युवा पर्यटन आणि साहसी पर्यटन यांना चालना देण्यासाठी मार्गदर्शनपर चर्चासत्रे आयोजित केली जातील. सह्याद्रीतील ऐतिहासिक गड-किल्ल्यांचा वारसा, परिसरातील प्रेक्षणीय स्थळे आणि प्राचीन मंदिरांच्या भेटींच्या विशेष पर्यटन सहली हेही महोत्सवाचे वैशिष्ट्य ठरणार आहे.

सदर कार्यक्रम मा. श्री. ॲड. आशिष शेलार, मंत्री (सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान), महाराष्ट्र राज्य आणि मा. श्री. शंभूराज देसाई, मंत्री (पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण विभाग), महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून, तसेच मा. श्री. डॉ. किरण कुलकर्णी, सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येत आहे.

हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून सातारा, पुणे, मुंबई तसेच राज्यभरातील पर्यटक, साहित्यप्रेमी, सांस्कृतिक रसिक आणि निसर्गप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अनोख्या सांस्कृतिक व पर्यटन पर्वाचा अनुभव घ्यावा, असे आवाहन श्री. बिभीषण चवरे, संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने करण्यात आले आहे.

पुण्याच्या बाप्पू मानकरांनंतर मुंबईचे नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांचे संपूर्ण वेतन व भत्ते महापौर निधीसाठी समर्पित

जनहितासाठी निर्णय:

मुंबई- पुणे महापालिकेतील नगरसेवक राग्वेंद्र उर्फ बाप्पू मानकर यांनी आपले पहिल्या महिन्यापासुन चे मानधन लोकोपयोगी अर्थसहाय्यसाठी महापौर निधीला अर्पण केल्यानंतर आता अशाच प्रकारचा निर्णय बृहन्मुंबई महापालिकेतील नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांनीही घेतला आहे.
जनसेवा आणि जनकल्याणाप्रती आपली अटळ बांधिलकी दर्शवत नगरसेवक, स्थायी व विधी समिती सदस्य तेजिंदर सिंग तिवाना यांनी प्रेरणादायी पाऊल उचलत आपले संपूर्ण वेतन जनसेवेसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.
तिवाना हे नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत वॉर्ड ४७ मधून विजयी झाले असून त्यांनी आपल्या पुढील ५ वर्षांच्या कार्यकाळातील संपूर्ण मानधन तसेच विविध समिती बैठकींसाठी मिळणारे सर्व भत्ते महापौर निधीसाठी समर्पित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी महापौर यांना निवेदनही सादर केले आहे.
यावेळी तिवाना म्हणाले, “नगरसेवक म्हणजे जो नगराची सेवा करतो, आणि ही सेवा निस्वार्थ भावनेने व्हायला हवी. जनसेवा ही माझ्यासाठी एक संकल्प आहे. जनप्रतिनिधीचे पहिले कर्तव्य म्हणजे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहोचवणे. याच भावनेतून मी माझ्या संपूर्ण कार्यकाळातील मानधन आणि सर्व भत्ते महापौर निधीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.”
त्यांनी विश्वास व्यक्त केला की ही रक्कम गरजू मुंबईकरांच्या मदतीसाठी आणि विविध जनकल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उपयोगी ठरेल.
भारतीय जनता पक्षाने यंदाच्या महापालिका निवडणुकांमध्ये युवा उमेदवारांना प्राधान्य देत नव्या ऊर्जेसह आणि नव्या विचारसरणीसह महानगरपालिकेत सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबईच्या विकासाला नवी दिशा देण्याच्या उद्देशाने घेतलेले हे पाऊल महत्त्वाचे ठरत आहे.
तेजिंदर सिंग तिवाना यांची ही पुढाकार केवळ त्यांच्या जनसेवेतील निष्ठेचे प्रतीक नाही, तर इतर जनप्रतिनिधींसाठीही एक प्रेरणादायी उदाहरण ठरते आहे .

नवी मुंबईत जागतिक दर्जाचे स्टेडियम उभारण्याचे नियोजन– मंत्री आशिष शेलार

मुंबई, दि. 1 : नवी मुंबईत जागतिक दर्जाचे आधुनिक स्टेडियम उभारण्यासाठी आवश्यक नियोजन तातडीने पूर्ण करून स्टेडियमसाठी योग्य जागेची निवड करताना कनेक्टिव्हिटी, वाहतूक व्यवस्था, पार्किंग सुविधा आणि आवश्यक पायाभूत सुविधांचा सर्वंकष विचार करावा, असे निर्देश निर्देश सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री तथा मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिले.

नवी मुंबई येथे जागतिक दर्जाचे स्टेडियम उभारण्यासंदर्भात मंत्रालयात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बाल्दी तसेच सिडकोचे अधिकारी उपस्थित होते.

नवी मुंबईत स्पोर्ट्स सिटीच्या प्रस्तावित क्षेत्रामध्ये स्टेडियम उभारणीचा पर्यायही विचाराधीन असून, त्या ठिकाणी सुमारे 50 टक्के जमीन आधीच संपादित झालेली आहे. उर्वरित जमीन टप्प्याटप्प्याने संपादित करून प्रकल्पाला गती देण्याचे निर्देश मंत्री अँड.शेलार यांनी दिले. स्टेडियमसाठी सुमारे 40 एकर जागा आणि इतर पूरक सुविधांसाठी अतिरिक्त 30 एकर जागेची आवश्यकता भासू शकते, असा अंदाजही यावेळी व्यक्त करण्यात आला.
या प्रकल्पासाठी आवश्यक आराखडा तयार करण्याबरोबरच प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचेही निर्देश देण्यात आले. मात्र, त्यापूर्वी जागेचे निश्चितीकरण आणि मूलभूत नियोजन पूर्ण करण्यावर भर देण्याचे निर्देश मंत्री शेलार यांनी दिले.

दरम्यान, या प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत प्राथमिक अहवाल सादर करून त्यानंतर पुनरावलोकन बैठक घेण्यात येणार आहे. स्टेडियम प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याचेही निर्देश मंत्री ॲड.शेलार यांनी दिले.

१८०० कोटीचा महसूल बुडवून ३६०० किलोमीटर केबलचे बेकायदा जाळे पुणेकरांच्या डोक्यावर:स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले ऍक्शन मोड वर..

अनधिकृत ओव्हरहेड केबल्स विरोधात महापालिकेची आजपासून धडक कारवाई

पुणे, दि. १ : स्वतंत्र पथकांची स्थापना करून शहरात पसरलेल्या अनधिकृत आणि धोकादायक ओव्हरहेड केबल्स हटविण्याची धडक मोहीम महापालिकेने आजपासून सुरू केली.विशेषतः गायरोप केबल्स आणि विविध टेलिफोन कंपन्यांच्या केबल्स अनियमित पद्धतीने टाकल्यामुळे शहराचे सौंदर्य बाधित झाले असून, जीवित हानी होण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे ही कारवाई करत असून, ती दर आठवड्याला विविध भागात राबविले जाईल अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.

महानगरपालिकेचा विद्युत विभाग, अतिक्रमण विभाग आणि अग्निशमन विभाग यांच्या संयुक्त कारवाईतून आज पुणे सातारा रस्त्यावरील आदिनाथ सोसायटी परिसरातील अनधिकृत केबल्सवर कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर भिमाले पत्रकारांशी बोलत होते.

विद्युत विभागाच्या मुख्य अभियंता मनिषा शेकटकर, कार्यकारी अभियंता योगेश माळी, उप अभियंता जयदीप अडसूळ, अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सोमनाथ बनकर, मुख्य अग्निशमन अधिकारी पोटफोडे, सहाय्यक विभागीय अधिकारी विजय भिलारे, स्टेशन ऑफिसर प्रभाकर उमरकर, समीर शेख, प्रदीप खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.

भिमाले म्हणाले, “नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात महानगरपालिका क्षेत्रात ३,६०० किलोमीटर लांबीच्या केबल्स अनधिकृत असल्याचे निदर्शनास आले आहे. नियमांनुसार केवळ भूमिगत केबल टाकण्याची परवानगी असतानाही अनेक कंपन्यांनी अनधिकृतपणे खांबांवर केबल्स टाकून शहराचे विद्रुपीकरण केले आहे. शहरातील अनेक रस्ते, तसेच चौक आणि इमारतींवर गुंतागुंतीचे अनधिकृत केबलचे जाळे निर्माण झाले असून, त्यामुळे अपघात झाले आहेत. काही कंपन्या गाईडरोपचा वापर करतात. त्यात ॲल्युमिनियम तारांचा समावेश असल्याने प्रवाही विजेचा शॉक बसून मनुष्यहानी होण्याची भीती आहे. त्यामुळे या अनधिकृत केबल्सवर टप्प्याटप्प्याने धडक कारवाई केली जाणार आहे.

भिमाले पुढे म्हणाले, केबल्स टाकण्यासाठी महापालिकेची पूर्वपरवानगी आणि शुल्क अनिवार्य करण्यात आलेले आहे. विविध प्रकारच्या सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांनी महानगरपालिकेकडून रितसर परवानगी घेऊन भूमिगत केबलच टाकाव्यात. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर पुढील काळात कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.”

विद्युत विभागाच्या मुख्य अभियंता मनीषा शेकटकर म्हणाल्या, “जानेवारीपासूनच काही भागांतील प्राथमिक कारवाईत आतापर्यंत १२३.६ किलोमीटर लांबीच्या अनधिकृत केबल्स हटविण्यात आल्या आहेत. आता ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे.”

“केबल्सवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. अनधिकृत केबल्स मुळे धोका वाढला आहे. त्यामुळे अशा सर्व कंपन्यांनी नियमांचे पालन करून भूमिगत केबल टाकण्यास प्राधान्य द्यावे. यामुळे शहर अधिक सुंदर आणि सुरक्षित होईल.”

श्रीनाथ भिमाले,
स्थायी समिती अध्यक्ष,
पुणे महानगरपालिका

अशोक खरात प्रकरण:कोणाला अटक करायची हे फडणवीसांच्या मर्जीवर, खरात प्रकरणात शरद पवार गटाचा खळबळजनक आरोप

मुंबई-अशोक खरात प्रकरणी कोणाला आरोपी करायचे आणि कोणाला अटक करायची हे देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीवर आहे. त्यांच्या पक्षातील अनेक लोक यामध्ये गुंतलेले आहेत. फडणवीसांनी या प्रकरणी कोणालाही पाठिशी घालू नये आणि राजकीय हेतू ठेवू नये, असे शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी म्हटले आहे.

विकास लवांडे म्हणाले की, खरात प्रकरणी नेमलेली एसआयटी ही संथ गतीने काम करत आहे. त्यांनी केवळ अशोक खरात आणि त्याच्या मुलाला अटक केली आहे. संस्थेचे बाकी विश्वस्त अजूनही मोकळेच आहेत. ते फरार होऊ शकतात. एसआयटीने अनेकांना या प्रकरणी आरोपी करणे गरजेचे आहे. माणिकराव कोकाटेंना मंत्री करू नये असे फोन खरातने तटकरेंना केले होते. तटकरे, चाकणकर यांना बोटाला जखम होते हे सगळं रॅकेट आहे. सिन्नरमध्ये हे सर्व सुरू आहे त्याबद्दल माणिकराव कोकाटेंना बरेच काही माहिती असणार आहेत. कोकाटेंनी सर्व माहिती समोर आणली पाहिजे.

रोहित पवारांचे ट्विट गंभीर

विकास लवांडे म्हणाले की, अशोक खरात प्रकरणी रोहित पवार यांनी केलेले ट्वि्ट पाहिले तर ते अतिशय गंभीर आहे. ते वाचल्यावर मन सुन्न झाले. गॅगस्टर जसे फुली मारत त्यांच्याविरोधातील एका-एका व्यक्तीला संपवत असतो. कर्मकांडाकडे महाराष्ट्र कधी झुकणार नाही. पण काही लोकांची त्यावर श्रद्धा असते. त्या लोकांनी अजित पवार यांच्या बंगल्यासमोरही काही काळ्या भावल्या टाकल्या होत्या. त्यातीलच काही लोकं इथे होते. कारण अशोक खरात यांच्या मंदिरात रुपाली चाकणकर या ट्रस्टी होत्या. त्यांच्यासोबत सुनील तटकरे तिथे वारंवार जात होते. पक्ष विलीनीकरणाच्या चर्चा त्याच काळात सुरू होत्या, हे सर्व सुरू असताना तिथे काय सुरू होते हे चाकणकरांना माहिती असेल त्यांना सहआरोपी केल्यानंतरच याबद्दल माहिती पुढे येईल. अजित पवार नको असलेले कोण लोकं तिथे जात होते याचा शोध घेणं गरजेचे आहे.

विकास लवांडे म्हणाले की, रुपाली चाकणकर आणि सुनील तटकरे यांना सहआरोपी करावे यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दोन दिवसांपूर्वीच मेल केला आहे. याचे कारण असे आहे की, चाकणकर या त्या संस्थेच्या विश्चस्त होत्या. अशोक खरात, रुपाली चाकणकर, सुनील तटकरे यांनी अनेक आर्थिक व्यवहार सुद्धा केलेले आहेत. ज्यांची संपत्ती रायगडपासून अनेक ठिकाणी आहे. हवाला मार्फत काही व्यवहार झाले आहेत, ते पुढे येऊ शकतात. अनेक महिलांचे शोषण झाले आहे हे एकटा अशोक खरात करू शकतो का प्रश्न अनेकांना पडतो. यामागे एक टीम होतीच. काही पत्रकारांनी याविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला जात होता पण रुपाली चाकणकर यांच्यासह तटकरेंची तिथे उठबस असल्याने हे प्रकरण दाबण्यात येत होते, हे मोठे कांड आहे.

विकास लवांडे म्हणाले की, ताराराणीबद्दल वक्तव्य करणाऱ्या मुनींना भगवान महावीरांचे विचार समजलेले दिसत नाहीत. बुआबाबा खूप तयार होत आहे आणि ते काहीही बरळत असतात. महापुरुष हे समाज हितासाठी काम करत होते ते जातीयवादी नव्हते. अनेक जण जातीय आणि धार्मिक द्वेष पसरवण्याचे काम करत असतात. सर्वच धर्मांत असे लोकं तयार झाले त्यांचा आम्ही निषेध करतो. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष कसा चालवावा हा त्यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा निर्णय आहे. रोहित पवारांनी अजित पवार यांच्या अपघाताबद्दल पुरावे दिले, म्हणून महायुतीच्या लोकांनी रोहित पवारांवर टीका केली. काही लोकांना अजित पवारांचा पक्ष ताब्यात घ्यायचा होता, म्हणून त्यांनी पक्षाची घटना बदलली. आणि सर्व अधिकार कार्यकारी अध्यक्षांना दिले.

महापालिकेतील अधिकाऱ्याची अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती करा

पुणे -पुणे महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त इस्टेट पृथ्वीराज बी.पी. यांची बदली झाल्यावर त्यांच्या जागेवर आता तरी महापालिकेतील अधिकाऱ्याची अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती करा अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर,सुहास कुलकर्णी,माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी केली आहे.

ते म्हणाले,’महानगरपालिकेमध्ये महानगरपालिका सेवेतून एक अतिरिक्त आयुक्त पदाची नेमणूक करण्याची तरतूद आहे.पुणे महानगरपालिकेमध्ये तीन अतिरिक्त आयुक्त यांच्या जागा आहेत.दोन अतिरिक्त आयुक्त हे राज्य शासनाकडून नेमणुकीला प्रतिनियुक्तीवर येतात.
एक अतिरिक्त आयुक्त पुणे महानगरपालिकेच्या सेवेतून भरला जातो यापूर्वी ज्ञानेश्वर मोळक, सुरेश जगताप हे यापूर्वी अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होते.मागच्या वेळेला पुणे महानगरपालिकेकडून तीन नावे गेली होती परंतु शासनाने ती मान्य केली नाही आणि ओमप्रकाश दिवटे साहेब यांची नियुक्ती केली.कालच अतिरिक्त आयुक्त इस्टेट पृथ्वीराज बी.पी. यांची बदली केली आहे, यामुळे आम्ही आयुक्त आणि राज्य शासनाला विनंती केली आहे की आता रिक्त असणाऱ्या पुणे महानगरपालिकेतील या पदावर अधिकारी पात्र असतील त्यांची नेमणूक करावी.


शीला फाटक, सीमा पवार यांचा तपस्या पुरस्काराने गौरव

मूल्यहीनतेच्या काळात मातृशक्तीचा गौरव होणे कौतुकास्पद : गिरीश कुलकर्णी

स्वानंदी क्रिएशन, केळकर गंगोत्री डेव्हलपर्सतर्फे सन्मान सोहळा

पुणे : समाजासाठी काहीतरी करू पाहणाऱ्या व्यक्तींच्या पाठीशी स्वत:चा लोप करून खंबीरपणे उभे राहणाऱ्या, व्यक्ती आणि समाज एकत्र येण्यासाठी, कुटुंबातील व्यक्तींमध्ये सुसंवाद निर्माण करण्यासाठी निरलसपणे कार्य करणाऱ्या मातृशक्तीचा तपस्या पुरस्काराने सन्मान होणे ही अत्यंत देखणी गोष्ट वाटते, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते गिरीश कुलकर्णी यांनी केले.

कला, साहित्य आणि सामाजिक कार्यात नावलौकिक मिळविलेल्या व्यक्तींच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असलेल्या प्रसिद्धी पराङ्मुख स्त्रीशक्तीला महिला दिनानिमित्त ‘स्वानंदी क्रिएशन’ पुणे आणि ‘केळकर गंगोत्री डेव्हलपर्सतर्फे’ ‌‘तपस्या पुरस्काराने’ २००९ पासून सन्मानित करण्यात येते. यंदा प्रसिद्ध तबलावादक निखिल फाटक, आयटी क्षेत्रात असलेल्या योगेश फाटक यांच्या मातोश्री शीला रत्नाकार फाटक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून  सेवाकार्यात स्वत:ला वाहून घेतलेल्या सुमित आणि अमित पवार यांच्या मातोश्री सीमा सुभाष पवार यांना सन्मानित करण्यात आले. पुरस्कारांचे वितरण प्रसिद्ध अभिनेते गिरीश कुलकर्णी आणि हिंदीच्या गाढ्या अभ्यासक प्रा. डॉ. शुभदा सुधीर मोघे यांच्या हस्ते आज (दि. ३१) झाले. त्या वेळी गिरीश कुलकर्णी बोलत होते. टिळक रस्त्यावरील गणेश सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वानंदी क्रिएशन पुणेच्या अपर्णा केळकर, केळकर गंगोत्री डेव्हलपर्सचे मकरंद केळकर मंचावर होते. रोख रक्कम, शाल आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.

सुरुवातीस प्रास्ताविकात अपर्णा केळकर यांनी तपस्या पुरस्कारामागील भूमिका मांडताना हा पुरस्कार म्हणजे एक कृतज्ञता सोहळा असून कलाकार आणि समाजसेवकामागे खंबीरपणे उभ्या असलेल्या, त्यांच्या कार्यात प्रेरणा देणाऱ्या स्त्री शक्तीचा गौरव आहे. या पुरस्कारातून कुटुंब अधिक जवळ येत आहेत याचा विशेष आनंद असून या जाणिवेची ज्योत तेवत ठेवावी अशी सदिच्छा व्यक्त केली.

गिरीश कुलकर्णी पुढे म्हणाले, आजच्या सामाजिक काळात मूल्यहीनता जाणवत असताना, माणसे एकटी पडत असताना, शहरे बकाल होत असताना, कुटुंब पातळीवर संवाद कमी होत असताना खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या स्त्रीशक्तीचे कार्य कौतुकास्पद आहे.  

प्रा. डॉ. शुभदा सुधीर मोघे म्हणाल्या, एखाद्या व्यक्तीचे, कुटुंबाचे यश समाजासमोर लखलखीतपणे जाणवते, पण त्या यशामागे घरातील कुणी एक स्त्री शक्ती खंबीरपणे उभी राहिलेली असते. या व्यक्तीला गृहीत धरले जाते. परंतु तपस्या पुरस्काराच्या माध्यमातून अशा स्त्री शक्तीचे कर्तृत्व हेरून सन्मान केला जातो ही अभिमानास्पद गोष्ट आहे.

सत्काराला उत्तर देताना शीला फाटक म्हणाल्या, घरामध्ये सांस्कृतिक वातावरण होते; परंतु कुणी कलेच्या क्षेत्रात कार्यरत नव्हते. निखिलचा तबलावादनाकडे असणारा ओढा, कलागुण लक्षात घेऊन त्याला घरातून कायमच प्रोत्साहन दिले. त्याच्या यशात त्याने केलेल्या मेहनतीचा, गुरूंच्या शिकवणुकीचा मोठा वाटा आहे. सांसारिक जबाबदाऱ्या संपल्यानंतर माझ्या मनात असलेल्या नवनवीन गोष्टी करण्याच्या इच्छा जिद्दीने पूर्ण करून जीवनाचा रसरशीत आनंद उपभोगत आहे. निखिलला मिळालेली शर्वरीची साथ एकमेकांना पूरक असल्यामुळे दोघांची कलेच्या क्षेत्रातील प्रगती उत्तम आहे, याविषयी आनंद आहे.

आईला मिळालेला तपस्या पुरस्कार हा फक्त तिचा वैयक्तिक नसून राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील सर्व कार्यकर्त्यांच्या घरातील स्त्री शक्तीला समर्पित आहे, अशा भावना सीमा पवार यांचे चिरंजीव सुमित पवार यांनी व्यक्त केल्या.

मान्यवरांचे स्वागत अपर्णा केळकर यांनी केले. कार्यक्रमाचे निवेदन डॉ. वंदना बोकील कुलकर्णी यांचे होते तर आभार मकरंद केळकर यांनी मानले.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात निखिल फाटक आणि प्रसिद्ध कथक नृत्यांगना शर्वरी जमेनीस यांनी ‘लयाकृती’ हा सांगीतिक कार्यक्रम सादर केला. त्यांना अथर्व कुलकर्णी (संवादिनी), आर्या फणसळकर (पढंत) यांनी साथसंगत केली. कलाकारांचा सन्मान पंडित सत्यशील देशपांडे, पंडिता मनिषा साठे यांनी केला.

राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांसाठी अर्ज करण्यास १५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

पुणे, दि. १: राज्यशासनाच्या कृषी विभागामार्फत २०२५ च्या राज्यस्तरीय विविध कृषी पुरस्कारांसाठी ऑनलाईन संगणकप्रणालीद्वारे अर्ज करण्याची मुदत आता १५ एप्रिल २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, संस्था आणि कृषी विस्तारकांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, उद्यानपंडित पुरस्कार, कृषिभूषण (सेंद्रिय शेती), युवा शेतकरी पुरस्कार तसेच कृषि विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कारांनी सन्मानित केले जाते. पूर्वी ही प्रक्रिया ऑफलाइन स्वरूपात असल्याने शेतकऱ्यांना कागदपत्रांच्या चार प्रती तयार करण्यासाठी मोठा खर्च आणि वेळ लागत असे. ही प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी सरकारने यंदापासून स्वतंत्र ऑनलाइन पोर्टल विकसित केले आहे.

ऑनलाइन प्रणालीचे हे पहिलेच वर्ष असल्याने तसेच अर्जासोबत जोडवा लागणारा ‘जिल्हा पोलीस अधीक्षकांचा चारित्र्य पडताळणी दाखला’ मिळविण्यासाठी लागणारा कालावधी पाहता क्षेत्रीय स्तरावरून शेतकऱ्यांनी केलेली मागणी विचारात घेऊन, कृषी विभागाने ही मुदत १५ दिवसांनी वाढवून दिली आहे. यापूर्वी ही मुदत ३१ मार्च रोजी संपणार होती.

पुरस्कारांसाठी इच्छुक उमेदवारांनी कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://krishi.maharashtra.gov.in जाऊन ‘कृषी पुरस्कार’ या टॅबवर आपले प्रस्ताव सादर करायचे आहेत. या डिजिटल प्रणालीमुळे मूल्यांकन आणि अहवाल निर्मितीची प्रक्रिया अधिक विश्वासार्ह होणार आहे. पात्र शेतकरी आणि संस्थांनी या वाढीव संधीचा लाभ घेऊन आपले अर्ज त्वरित सादर करावेत, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी:पत्नी फरार, मुलगा ताब्यात…

नाशिक-भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यापूर्वी त्याची पोलिस कोठडी संपत असल्याने विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) पुन्हा कोठडी वाढवण्याची मागणी केली गेली. मात्र न्यायालयाने न्यायालयीन कोठडी देत तपासाच्या पुढील टप्प्याला वेगळे वळण दिले आहे. त्याच्याविरोधात लैंगिक अत्याचार, आर्थिक फसवणूक आणि इतर गुन्ह्यांच्या तक्रारी सातत्याने वाढत आहेत.

दरम्यान, काल रात्री उशिरापर्यंत खरातच्या घराबाहेर नाट्यमय घडामोडी घडल्या. शिर्डी येथील जमीन फसवणूक प्रकरणात अशोक खरातसह त्याची पत्नी कल्पना खरात हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र एसआयटीचे पथक पोहोचण्यापूर्वीच कल्पना खरात फरार झाली. दुसरीकडे, खरातचा मुलगा हर्षवर्धन याला पोलिसांनी घरातून ताब्यात घेतल्याने या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले आहे.

तपासादरम्यान अशोक खरात अपेक्षित सहकार्य करत नसल्याचा आरोप एसआयटीकडून करण्यात आला आहे. त्यामुळे तपास पुढे नेण्यासाठी त्याच्या मुलासमोरच चौकशी करण्याची तयारी होती. खरातकडून अधिक माहिती मिळवून फरार पत्नीचा शोध घेण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे. सुरुवातीला लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून त्यानंतर आर्थिक व्यवहार आणि फसवणुकीच्या बाबींची सखोल चौकशी टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे.

याचवेळी एसआयटीने तपासाचा फास अधिक घट्ट करत विविध संबंधितांची चौकशी सुरू ठेवली आहे. खरातचा चार्टर्ड अकाउंटंट, ईशान्येश्वर मंदिराचा पुजारी आणि एका सराफ व्यावसायिकाची कसून चौकशी करण्यात आली. आर्थिक व्यवहार, मंदिरातील हालचाली आणि संभाव्य गैरव्यवहार याबाबत महत्त्वाचे धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

दरम्यान, न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे पुढील तपासाची दिशा ठरणार आहे. पोलिसांनी जमा केलेले पुरावे आणि साक्षीदारांच्या माहितीच्या आधारे प्रकरण अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कुटुंबातील सदस्यांवर कारवाई, वाढत्या तक्रारी आणि आता मिळालेली न्यायालयीन कोठडी यामुळे अशोक खरातच्या अडचणी दिवसेंदिवस अधिकच वाढताना दिसत आहेत.

भोंदू खरातच्या 3500 व्हिडिओ लिंक्स व्हायरल:पोलिसांनी सर्व लिंक्स सोशल मिडियावरून हटवल्या; पीडितांना घराबाहेर पडणे झाले अवघड

नाशिक-भोंदू अशोक खरातचे महिलांसोबतचे 3500 हून अधिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने या सर्व व्हिडिओच्या लिंक्स सोशल मीडियावरून हटवल्या आहेत. पोलिसांनी या प्रकरणी राज्यभरात 100 हून अधिक गुन्हे दाखल केले आहे. दरम्यान, या व्हायरल व्हिडिओमुळे पीडित महिला व त्यांच्या कुटुंबीयांना घराबाहेर पडणेही अवघड झाले आहे. हे सर्वजण सध्या वर्क फ्रॉम होमवर भर देत असल्याची माहिती एका पीडितेच्या नातेवाईकाने दिली आहे.

भोंदू अशोक खरातवर आतापर्यंत 10 गुन्हे दाखल झालेत. यापैकी 8 गुन्हे हे महिलांचे लैंगिक शोषण, फसवणूक व जादूटोण्याशी संबंधित आहेत. तर इतर 2 गुन्हे आर्थिक फसवणुकीशी संबंधित आहेत. या प्रकरणी विशेष तपास पथक त्याची कसून चौकशी करत आहे. पण अशोक खरातचे दररोज व्हायरल होणारे व्हिडिओ पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. यासंबंधीच्या माहितीनुसार, अशोक खरात व पीडित महिलांच्या व्हिडिओच्या तब्बल 3500 लिंक्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. पोलिसांनी या सर्व लिंक्स सोशल मीडियावरून हटवल्या आहेत. पण त्यात आणखी काही लिंक्सची भर पडत आहे.

पोलिसांनी लिंक्स व्हायरल केल्याप्रकरणी नाशिकसह कोपरगाव, बीड, अहिल्यानगर व राज्यातील इतर जिल्ह्यांत गुन्हे दाखल केलेत. हे गुन्हे दाखल झालेल्या व्यक्तींमध्ये सामान्य नागरिकांसह सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या काही विशिष्ट युजर्सचा समावेश आहे. ज्यांच्या मोबाईलमध्ये असे व्हिडिओ असतील त्यांच्यावरही या प्रकरणी कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधितांनी ते व्हिडिओ किंवा लिंक्स तत्काळ डिलिट कराव्यात असे आवाहन पोलिसांनी केले आहे. सोशल मीडियावर अश्लील किंवा गोपनीय व्हिडिओ शेअर करणे कायद्याने गुन्हा आहे. यामुळे पीडित महिलांना त्रास होत आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

अधिकाऱ्यांच्या मते, अशोक खरातच्या व्हिडिओचा वेगाने होणारा प्रसार केवळ पीडितांच्या कुटुंबीयांना मानसिक आघातच पोहोचवत नाही, तर संभाव्य साक्षीदारांना पुढे येण्यापासून परावृत्तही करत आहे. त्यामुळे तपास प्रक्रियेत अडथळा निर्माण होत आहे. हे व्हिडिओ सोशल मीडियाच नव्हे तर अश्लील संकेतस्थळांवरही पोहोचले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 23 मार्चच्या निर्देशांनंतर, प्रशासनाने अशा प्रकारच्या सामग्रीविरोधात कडक कारवाई केली आहे. या संदर्भात अनेक वृत्तवाहिन्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. एसआयटीच्या माहितीनुसार, हे व्हिडिओ 170 संकेतस्थळांवरून यापूर्वीच काढून टाकण्यात आले आहेत.

सोशल मीडियावर लीक झालेल्या व्हिडिओमुळे अनेक महिलाचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. पीडित महिलांसह त्यांच्या कुटुंबीयांना घराबाहेर पाऊल टाकणेही कठीण झाले आहे; परिणामी, संबंधित महिला आणि त्यांचे कुटुंबीय सध्या ‘वर्क फ्रॉम होम’ (घरून काम) करत आहेत. एका पीडितेच्या नातेवाईकाने ही गोष्ट सांगितली आहे. पीडितेच्या चुलत भावाने या प्रकरणी इंडिया टुडेशी बोलताना सांगितले की, असे काही घडेल, याची आम्ही कधी कल्पनाही केली नव्हती. आम्ही अत्यंत व्यथित झालो आहोत. मी गेल्या 7 दिवसांपासून कार्यालयात जाणे टाळले होते. आता जोपर्यंत हे प्रकरण निवळत नाही तोपर्यंत मी ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याची परवानगी मागितली आहे.

( टीप :असे व्हिडीओ माय मराठी ने कधीही प्रसारित केलेले नाही.करत नाही )

पुण्यातील मॉडेल कॉलनीत खरातच्या मुलीच्या नावावर कॅश व्यवहारातून 3 BHK, 1.20 कोटींचा फ्लॅट

नाशिक- भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे नवे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. आता पुण्यातील मॉडेल कॉलनी परिसरात त्याच्या मुलीच्या नावावर आलिशान फ्लॅट असल्याची माहिती उघड झाली आहे. ‘24 रत्नम’ या उच्चभ्रू सोसायटीतील सातव्या मजल्यावर सुमारे 1055 चौरस फुटांचा 3 बीएचके फ्लॅट 13 सप्टेंबर 2023 रोजी खरेदी करण्यात आल्याचे समोर आले आहे. या मालमत्तेमुळे खरातच्या आर्थिक व्यवहारांबाबत संशय अधिक गडद झाला आहे.

या फ्लॅटच्या खरेदीत सर्वात मोठा मुद्दा म्हणजे व्यवहाराची पद्धत. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, या व्यवहारासाठी संबंधित बिल्डरला 1 कोटी 20 लाख रुपये पूर्णपणे रोख स्वरूपात देण्यात आले. सेल डीडमध्ये कोणत्याही प्रकारच्या चेक किंवा बँक व्यवहाराचा उल्लेख नसल्याने संशय आणखी वाढला आहे. लोकांना घाबरवून किंवा फसवून पैसे उकळून विविध शहरांमध्ये मालमत्ता खरेदी केल्याचा आरोपही तपासात पुढे येत आहे.

दरम्यान, अशोक खरातच्या उत्पन्न आणि संपत्तीमध्ये मोठा तफावत असल्याचंही उघड झालं आहे. तो आयकर विभागाकडे केवळ सुमारे 12 लाखांचे वार्षिक उत्पन्न दाखवत होता, मात्र प्रत्यक्षात त्याची संपत्ती शेकडो कोटींच्या घरात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कंपन्या, बांधकाम प्रकल्प आणि हार्डवेअर व्यवसायातून जीएसटी बुडवल्याचा संशयही आयकर विभागाने व्यक्त केला असून मोठी कारवाई होण्याची चिन्हे आहेत.

या सगळ्या पार्श्वभूमीवर खरातविरोधातील गुन्ह्यांची मालिका वाढतच आहे. आज त्याला पुन्हा नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार असून त्याची पोलिस कोठडी संपत आहे. अत्याचार आणि फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये आधीच तीन वेळा कोठडी मिळालेल्या खरातसाठी एसआयटी पुन्हा कोठडी वाढवण्याची मागणी करणार आहे. दरम्यान, त्याच्या पत्नीवरही गुन्हा दाखल असून ती फरार झाली आहे, तर मुलगा हर्षवर्धन याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मुलासमोरच चौकशी करण्याची तयारी

तपासात सहकार्य न केल्यामुळे आता अशोक खरातची चौकशी त्याच्या मुलासमोरच करण्याची तयारी सुरू आहे. त्याच्याकडून अधिक माहिती मिळवून फरार आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. सुरुवातीला लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित करून पुढे आर्थिक व्यवहारांची चौकशी केली जाणार आहे. आज न्यायालयात सादर होणाऱ्या पुराव्यांमुळे या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुणे वाहतूक पोलिसांकडून नियमभंगावर कारवाई:तीन दिवसांत 51.54 लाख रुपयांचा दंड वसूल, 852 वाहने जप्त

0

पुणे-पुणे शहर वाहतूक पोलिसांनी २७ ते २९ मार्च या कालावधीत वाहतूक नियमभंगाविरोधात विशेष मोहीम राबवली. या तीन दिवसांच्या कारवाईत ट्रिपल सीट प्रवास, मद्यपान करून वाहन चालवणे आणि मॉडिफाईड सायलेन्सर वापरणाऱ्या वाहनधारकांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. या मोहिमेतून ५१.५४ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून, ८५२ वाहने जप्त करण्यात आली आहेत.

या तपासणी मोहिमेदरम्यान सर्वाधिक कारवाई दुचाकीस्वारांवर करण्यात आली. क्षमतेपेक्षा जास्त म्हणजेच तिघांनी प्रवास करणाऱ्या तब्बल १२६५ दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच, ध्वनी प्रदूषणास कारणीभूत ठरणारे आणि बेकायदेशीररित्या मॉडिफाईड सायलेन्सर बसवलेल्या ३२० वाहनांवरही कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी २३४ सायलेन्सर जप्त केले.

केवळ दंड आकारून न थांबता पोलिसांनी कठोर पावले उचलत मोठ्या प्रमाणात वाहने जप्त केली. या मोहिमेत एकूण ८५२ वाहने पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आली. नियमभंग करणाऱ्यांना वचक बसावा आणि भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळाव्यात, यासाठी ही कारवाई निर्णायक ठरल्याचे पोलिसांनी सांगितले.

मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांविरोधातही विशेष मोहीम राबवण्यात आली. शहरातील विविध भागांत सुमारे ३० ठिकाणी नाकाबंदी करून तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान १८६ मद्यपी चालकांना पकडण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रात्रीच्या वेळेस मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवण्याचे प्रमाण वाढत असल्याने ही कारवाई महत्त्वाची ठरली.

या तीन दिवसांच्या कारवाईत विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात दंड वसूल करण्यात आला. सुरुवातीच्या आकडेवारीनुसार काही लाखांचा दंड आकारण्यात आला असला, तरी एकूण वसुलीचा आकडा तब्बल ५१.५४ लाख रुपयांपर्यंत पोहोचला आहे. यावरून शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन किती मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे स्पष्ट होते.

पोलिसांच्या या मोहिमेमागे रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करणे, ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे आणि वाहतुकीत शिस्त निर्माण करणे हा मुख्य उद्देश आहे. विशेषतः मॉडिफाईड सायलेन्सरमुळे होणारा कर्कश आवाज नागरिकांसाठी त्रासदायक ठरत होता. त्यामुळे अशा वाहनांवर कठोर कारवाई करण्यात आली.

वाहतूक पोलिसांनी नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. हेल्मेटचा वापर, मद्यपान करून वाहन न चालवणे, वाहनात कोणतेही बेकायदेशीर बदल न करणे आणि निर्धारित नियमांचे पालन करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने नियम पाळल्यास शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित आणि सुरळीत होऊ शकते, असेही पोलिसांनी नमूद केले.