Home Blog Page 11

विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे व उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या नेतृत्वात हिवाळी अधिवेशन तयारीचा सविस्तर आढावा

“वीजपुरवठा, पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थापनात कोणतीही त्रुटी राहणार नाही याची खात्री करा”- सभापती प्रा. राम शिंदे

“दूरध्वनी–इंटरनेट सेवा अखंडित ठेवा; आरोग्य, अॅम्ब्युलन्स व आपत्कालीन पथके सदैव सज्ज असावीत” – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

नागपूर, दि. ७ डिसेंबर २०२५ : महाराष्ट्र विधिमंडळाच्या २०२५ च्या (हिवाळी) अधिवेशनासाठी आवश्यक सर्व यंत्रणा सज्ज आहेत याची खात्री करण्यासाठी विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे व उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज विधानभवनात सविस्तर आढावा बैठक घेतली. सोमवार, दि. ८ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या बैठकीत अधिवेशन काळात कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी तातडीने आणि सक्षम नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी सर्व संबंधित विभागांना दिल्या.

मंत्रीपरिषद सभागृहात झालेल्या या बैठकीला विधानमंडळाचे सचिव श्री. जितेंद्र भोळे, श्रीमती मेघना तळेकर, श्री. वि. गो. आठवले, शिवदर्शन साठे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अधिवेशनामध्ये सहभागी होणारे मंत्री, आमदार, तसेच विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी यांना आवश्यक सर्व सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही वेगाने करण्याचे निर्देश सभापती व उपसभापती यांनी दिले. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्कृष्ट नियोजनातून अधिवेशन निर्विघ्न पार पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विधानभवनासह अधिवेशनाशी संबंधित सर्व इमारतींच्या वीजपुरवठ्याची चाचणी पूर्ण झाली असून, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी विशेष मनुष्यबळ तसेच पर्यायी जनरेटर प्रणाली उभारण्यात आली आहे. विधानमंडळ परिसरात पार्किंग स्लॉटची व्यवस्था करण्यात आली असून वाहतूक सुसूत्रिकरणाबाबत संबंधित यंत्रणांना स्पष्ट दिशा देण्यात आली. विधानभवनात हिरकणी कक्षाचीही व्यवस्था आहे.

अधिवेशन कालावधीत दूरध्वनी, इंटरनेट व वायफाय सेवा अखंडित सुरू राहतील. नागभवन, रविभवन व आमदार निवास येथे २४ तास अॅम्ब्युलन्स तसेच अतिरिक्त वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षा यंत्रणांनी विधानभवन परिसरातील आतल्या-बाहेरच्या सुरक्षा बंदोबस्ताचा आढावा घेऊन आवश्यक पोलिस पथके तैनात केली आहेत. अधिवेशनात व्हीआयपींना भेटण्यासाठी येणाऱ्या अभ्यागतांसाठी ‘पास’ सक्तीने घ्यावा लागेल, असे स्पष्ट करतानाच विनापास प्रवेशाची समस्या रोखण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची असल्याचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी सांगितले.

अधिवेशनादरम्यान निवास व्यवस्थेबाबतही कोणतीही तडजोड न करता शहरातील अनेक ठिकाणी असलेल्या निवासस्थानी स्वच्छता, रंगरंगोटी, दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या माध्यमातून पाणीपुरवठा, स्वच्छता आणि अग्निशमन सेवांसाठी विशेष पथके नेमण्यात आली आहेत. विधानभवनसह नागपुरातील विविध महत्त्वाच्या ठिकाणी आरोग्य केंद्र उभारण्यात आले असून आवश्यक डॉक्टर, औषधे आणि अॅम्ब्युलन्स यांचीही उपलब्धता सुनिश्चित केली आहे. सर्व इमारतींचे फायर ऑडिट पूर्ण झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

पत्रकारांसाठी सुयोग इमारतीतील ३८ कक्ष अत्याधुनिक सुविधांनी सज्ज करण्यात आले असून अधिवेशन काळात त्यांना कोणतीही अडचण भासू नये यासाठी स्वतंत्र पथक कार्यरत राहणार आहे. तसेच यावेळी सभापती व उपसभापती यांनी विधानभवनातील नव्याने तयार करण्यात आलेल्या मंत्री दालनाचीही पाहणी केली.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘लोकराज्य’ दुर्मिळ अंक प्रदर्शनाला भेट देत त्यांनी प्रदर्शनातील विविध महत्त्वपूर्ण दस्तऐवजांची माहिती घेतली.

बैठकीनंतर सभापती प्रा. राम शिंदे आणि उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी विधानपरिषद व विधानसभेच्या सभागृहांना प्रत्यक्ष भेट देऊन कामकाजासाठी आवश्यक सर्व तांत्रिक व भौतिक सुविधा तयार आहेत का याची सखोल तपासणी केली.

हिवाळी अधिवेशन आयोजनाच्या प्रत्येक टप्प्यात काटेकोर नियोजन आणि समन्वय राखत सर्व विभागांनी एकत्रितपणे काम करावे, असा ठाम संदेश सभापती आणि उपसभापती यांनी यावेळी दिला.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सभापती व उपसभापतींकडून ‘भारतीय राज्यघटनेच्या अमृतमहोत्सवी पुस्तक प्रकाशन’ सोहळ्याचे निमंत्रण

नागपूर, दि. ७ डिसेंबर २०२५ :
मुख्यमंत्री महोदयांच्या भारतीय राज्यघटनेच्या गौरवशाली अमृतमहोत्सवी वाटचालीवरील वैशिष्ट्यपूर्ण भाषणाचे पुस्तक स्वरूपात प्रकाशन माननीय राज्यपाल महोदयांच्या शुभहस्ते ९ डिसेंबर रोजी होणार आहे. या प्रकाशन सोहळ्याचे निमंत्रण आज माननीय केंद्रीय मंत्री, ज्येष्ठ नेते श्री. नितीनजी गडकरी यांना विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे व उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नागपूर येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन दिले.

या भेटीदरम्यान राज्यकारभार, विकासकामे आणि विधानपरिषदेच्या उपक्रमांशी संबंधित अनेक महत्त्वाच्या विषयांवर फलदायी चर्चा झाली. भेटीदरम्यान सभापती व उपसभापती यांनी ‘महाराष्ट्र विधानपरिषद शतक महोत्सव, वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता व महत्त्व’ या विषयावरील पुस्तक माननीय गडकरीजी यांना भेट दिले.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्यांचे नुकतेच प्रकाशित झालेले ‘दाही दिशा’ हे पुस्तक देखील केंद्रीय मंत्री गडकरी यांना भेट स्वरूपात प्रदान केले. यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन केंद्रीय मंत्र्यांचे मन:पूर्वक स्वागत केले.

या सदिच्छा भेटीमुळे भावी सहकार्य, संसदीय परंपरा आणि संवाद वृद्धिंगत होण्यास निश्चितच सकारात्मक दिशा मिळाली, असे यावेळी बोलताना सभापती आणि उपसभापती यांनी सांगितले.

‘देवगांधार : अमृत-स्वर’ सांगितीक महोत्सवात पंडित डॉ. एम. व्यंकटेश कुमार, शिवानी मारुलकर-दसककर यांचे गायन

पुणे : किराणा आणि ग्वाल्हेर घराण्याचा सुंदर मिलाफ दाखविणारे पद्मश्री पंडित डॉ. एम. व्यंकटेश कुमार यांचे प्रगल्भ तर आश्वासक युवा गायिका शिवानी मारुलकर-दसककर यांच्या प्रभावी गायनाने रसिकांची सकाळ संस्मणीय ठरली.

निमित्त होते निनादिनी आणि ललित कला केंद्र गुरुकुल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे आयोजित ‘देवगांधार : अमृत-स्वर’ या सांगितीक महोत्सवाचे. एस. एम. जोशी सभागृहात कार्यक्रम झाला. महोत्सवाचे यंदाचे १७वे वर्ष आहे.

प्रथम सत्रात ग्वाल्हेर, किराणा आणि जयपूर घराण्याचा वारसा जपणाऱ्या सुप्रसिद्ध गायिका विदुषी अलका देव-मारुलकर यांच्या शिष्या व कन्या शिवानी मारुलकर-दसककर यांची गायन मैफल रंगली. त्यांनी आपल्या सादरीकरणाची सुरुवात राग गुजरी तोडीतील विलंबित तीन तालातील ‘सुघर बन री’ या पारंपरिक बंदिशीने केली. मध्य द्रुत अध्धामधील ‘मै जानत तोहे’ ही रचना सादर करून द्रुत एकतालातील ‘भर डारुंगी रंग सो’ ही बंदिश प्रभावीपणे सादर केली. कोमल धैवताचा विभास ऐकविताना त्यांनी डॉ. अलका देव-मारुलकर रचित मध्य रूपकातील ‘हे करो मंगल’ ही भक्तीरचना सादर केली. संपूर्ण जगाचे कल्याण होऊ दे, सर्वत्र सकारात्मकता पसरू दे या आशयाच्या बंदिशीच्या सादरीकरणातून शिवानी यांनी भक्तीरसाची जागृती करत भावपूर्ण गायनातून रसिकांना आनंदित केले. अमेय बिचू (संवादिनी), प्रणव गुरव (तबला), शिवानी मोघे-लाड, निधी अगरवाल (तानपुरा, सहगायन) यांनी साथसंगत केली.

‘समझा मना कोई नही अपना’..

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात भारतीय शास्त्रीय संगीतातील ओजस्वी आवाज असलेले तसेच भक्तीभाव आणि अवघड ताना, सरगम लिलया सादर करणारे सुप्रसिद्ध गायक पद्मश्री पंडित डॉ. एम. व्यंकटेश कुमार यांची गायन मैफल रंगली. त्यांनी आपल्या मैफलीची सुरुवात राग जौनपुरीमधील ‘बाजे झनन पायलिया मोरी’ या बंदिशीने केली. द्रुत लयित ‘नाम लेलो हरदम मौला’ रचना सादर केल्यानंतर पंडित व्यंकटेश कुमार यांनी अतिशय क्लिष्ट समजला जाणारा देसकार राग ‘हुतो तोरे कारन जागी रे’ या बंदिशीतून प्रभावीपणे मांडला. ‘काज किजिए हररोज’ ही रचना कोमल रिषभ आसावरीत सादर करून रसिकांसाठी ‘तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल’ ही मराठी भक्तीरचना सादर केली. त्यानंतर ‘तोरे बुजिस बहुदे’ ही कन्नड भाषेतील भक्तीचरना रसिकांच्या आग्रहास्तव ऐकविली. मैफलीची सांगता भैरवीतील ‘समझा मना कोई नही अपना’ या रचनेने करत रसिकांना मंत्रमुग्ध केले. पंडित व्यंकटेश कुमार यांच्या अमृतस्वरांच्या स्वरवर्षावात रसिक चिंब झाले. भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (संवादिनी), शिवराज पाटील, कैवल्य पाटील (तानपुरा आणि सहगायन) यांनी साथसंगत केली.

मैफल के राजा बने रहे…

डॉ. अलका देव-मारुलकर यांनी पंडित व्यंकटेशकुमार यांच्या सादरीकरणाचे कौतुक करत ‘मैफल के राज बने  रहे’ अशा शब्दात शुभचिंतन केले. पंडित व्यंकटेशकुमार यांचे गायन हा फक्त स्वराविष्कार नसून तो स्वरावतार असल्याचेही त्या म्हणाल्या.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस भा. रा. तांबे यांनी लिहिलेल्या व डॉ. अलका देव-मारुलकर यांनी स्वरसाज चढविलेल्या ‘जय जय जननी देवी’ या गीताच्या सादरीकरणाने झाली. डॉ. मारुलकर यांच्या शिष्यांनी हे गीत सादर केले. कलाकारांचा सत्कार मधुवंती देव, प्रफुल्ल देव, किरण जाधव यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजिरी धामणकर यांनी केले.

अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून सोमवारपासून तर कॉंग्रेस पक्षाकडून मंगळवार पासून इच्छुकांचे अर्ज स्वीकारणार

पुणे -महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छूक उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – महाराष्ट्र प्रदेश यांच्या सुचनेनुसार, पुणे महापालिका सार्वत्रिक निवडणूक साठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावरून निवडणूक लढविण्याची इच्छा असलेल्या सर्व आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाने निर्धारित केलेला विहित नमुन्यातील इच्छूक उमेदवारी अर्ज 8 डिसेंबर 2025 ते 18 डिसेंबर 2025 या कालावधीत भरावयाचा आहे.अशी माहिती येथे राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष सुनील टिंगरे यांनी कळविली आहे . राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पुणे शहर “मध्यवर्ती कार्यालय” येथे निर्धारित कालावधीतच इच्छूकांचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. पक्षाच्या सूचनेनुसार अर्ज पूर्ण तपशीलांसह दिलेल्या मुदतीतच सादर करावेत, असेही आवाहन त्यांनी केले आहे

तर महापालिका निवडणुकीसाठी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीकडून उमेदवारी अर्ज मागविण्यात येत आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून इच्छुक उमेदवारांचे अर्ज मंगळवार ९ डिसेंबर पासून देण्यास सुरूवात करण्यात येणार आहे.मंगळवार ९ डिसेंबर ते शनिवार १३ डिसेंबर या कालावधीत इच्छुक उमेदवारांनी अर्ज घेऊन व भरून पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय, काँग्रेस भवन, शिवाजीनगर, पुणे ५ येथे सकाळी ११.०० ते सायं. ५.०० या कालावधीत जमा करावेत. अशी माहिती या पत्रकाद्वारे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी दिली.

मुरलीधर मोहोळ यांच्या नेतृत्वात लढणार महापालिका निवडणूक : मंत्री चंद्रकांत पाटील यांची स्पष्टोक्ती

‘पुणेकरांशी संवाद साधून निवडणुकीसाठी वचननामा तयार करणार’मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखालील कोअर कमिटीत निर्णय

पुणे –
‘आगामी महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे वचननामा तयार केला जात आहे. त्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते घरोघर जाऊन पुण्याच्या पुढील २५-५० वर्षातील विकास व भविष्याबाबत पुणेकरांचे मत जाणून घेतील. त्यातून हा वचनमाना तयार केला जाईल, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी रविवारी दिली. तर ही निवडणूक मोहोळ यांच्या नेतृत्वात लढणार असल्याची घोषणा कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.

लवकरच महापालिका निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणुकीसाठीच्या पुणे शहर कोअर कमिटीची बैठक रविवारी मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील, पश्चिम महाराष्ट्राचे संघटन मंत्री मकरंद देशपांडे, शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, ज्येष्ठ नेते दिलीप कांबळे, खासदार मेधा कुलकर्णी, निवडणूक प्रमुख गणेश बिडकर, आमदार भिमराव तापकीर, आमदार सुनिल कांबळे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार योगेश टिळेकर, श्रीनाथ भिमाले यांच्यासह विस्तारित कोअर कमिटीचे सदस्य उपस्थित होते.

‘महापालिका निवडणुकांच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या नियमित प्रक्रियेचा भाग म्हणून ही प्राथमिक बैठक झाली. भाजपची यंत्रणा बाराही महिने कार्यरत असते. परंतु, निवडणुकीच्या दृष्टीने शहर पातळीवर आणखी काय करता येईल, याचे प्राथमिक नियोजन या बैठकीत झाले. पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठी संख्या पाहता इच्छुकांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजपासून दोन दिवस शहर कार्यालयात अर्ज मागवले जातील. हे अर्ज प्रदेश कार्यालयाकडे पाठवले जातील. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार कोअर कमिटी चर्चा करून पुढील निर्णय घेईल,’ असे मोहोळ म्हणाले.

​‘भाजपचा वचननामा तयार करण्याचे कामही सुरू झाले आहे. त्यासाठी प्रत्येक प्रभागात कार्यकर्ते घरोघर जातील, पुणेकरांशी चर्चा करतील. पुढील २५-५० वर्षातील पुण्याचे भवितव्य, पुण्याच्या विकासाबाबत पुणेकरांच्या अपेक्षा जाणून घेतील. यात सर्वसामान्यांच्या अपेक्षांबरोबरच विविध विषयातील तज्ज्ञांशीही संवाद साधून त्यांचे मतही विचारात घेतले जाईल. त्यावर आधारित वचननामा तयार केला जाईल. पुढील पाच वर्षात आम्ही त्याची १०० टक्के अंमलबजावणी करू,’ असे मोहोळ म्हणाले. याशिवाय शहराध्यक्षांच्या स्तरावर प्रमुख पदाधिकाऱ्यांसह प्रत्येक प्रभागात संघटनात्मक बैठका घेण्यात येतील. कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांच्या भावनाही जाणून घेतल्या जातील.

‘आम्ही महायुतीचे घटक आहोत. ‘युतीधर्म’ पाळा, अशी भूमिका आमच्या नेत्यांनी मांडली आहे. स्थानिक परिस्थिती पाहून सामंजस्याने जिथे शक्य असेल तिथे महायुती म्हणून निवडणूक लढू जिथे शक्य नाही तिथे मैत्रीपूर्ण लढाई होईल. वरिष्ठांच्या आदेशानुसार पुढील भूमिका स्पष्ट केली जाईल,’असे मोहोळ यांनी नमूद केले.

अन्य पक्षातील माजी नगरसेवकांना, नेत्यांना प्रवेश देण्याबाबत प्रवेशाचे धोरण ठरेल, तेव्हा चर्चा होईल. एकमताने पक्षप्रवेशाबाबत निर्णय घेतला जाईल. जिथे संबंधित कार्यकर्त्यांना प्रवेश दिल्याने पक्षाची ताकद वाढेल, तिथे प्रवेश दिला जाईल. माात्र, जिथे भाजपचा कार्यकर्ता, संघटना सक्षम असेल तिथे कार्यकर्त्यांनाच प्राधान्य राहील, असेही मोहोळ यांनी स्पष्ट केले.

मतदारयादीतील त्रुटी, गोंधळ यावर भारतीय जनता पक्ष गांभीर्याने काम करत आहे. मतदार यादीतील चुका सुधारल्या गेल्याच पाहिजेत. परंतु, त्यावर राजकारण करता कामा नये, असेही मोहोळ यांनी सांगितले.

सुप्रिया सुळे, कंगना रणौत अन् महुआ मोईत्रांचा एकत्र डान्सचा व्हिडीओ व्हायरल

मुंबई- नेहमी एकमेकींच्या विरोधात आगपाखड करणाऱ्या आणि विचारधारांच्या भिंती उभ्या असणाऱ्या नेत्या जेव्हा खासगी कार्यक्रमात ‘डान्स फ्लोअर’वर एकत्र येतात, तेव्हा भुवया उंचावणे साहजिक आहे. भाजप खासदार नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नसमारंभात असाच एक प्रसंग घडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, तृणमूलच्या महुआ मोईत्रा आणि भाजप खासदार कंगना रणौत यांनी एकाच गाण्यावर ठेका धरला असून, त्यांच्या या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.त्याचबरोबर नेटकऱ्यांचा संताप देखील ‘जनतेला मूर्ख बनवताय का?’ या शब्दात व्यक्त होतो आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून नेत्यांनी एकत्र येणे ही चांगली बाब असली तरी, या व्हिडिओवरून सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. ‘राजकीय वैर फक्त जनतेला दाखविण्यासाठी असते, प्रत्यक्षात हे सर्वजण एकच आहेत,’ अशा शब्दांत नेटकरी आपला रोष व्यक्त करत आहेत.

काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे, कंगना रनौट आणि महुआ मोईत्रा यांचा नृत्याची रिहर्सल करतानाचा फोटो समोर आला होता. आता प्रत्यक्ष कार्यक्रमाचा व्हिडिओ समोर आला आहे. यात या तिन्ही नेत्या ‘ओम शांती ओम’ चित्रपटातील गाण्यावर उत्साहात नृत्य करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे यजमान आणि भाजप खासदार नवीन जिंदाल हेदेखील व्यासपीठाच्या मध्यभागी उपस्थित असून त्यांनीही या आनंदाच्या क्षणी ठेका धरल्याचे पाहायला मिळाले.
‘राजकीय वैर फक्त जनतेला दाखविण्यासाठी असते, प्रत्यक्षात हे सर्वजण एकच आहेत,’ अशा शब्दांत नेटकरी आपला रोष व्यक्त करत आहेत.विशेषतः कंगना रणौतने यापूर्वी शेतकरी आंदोलनाबाबत केलेल्या वादग्रस्त विधानांचे पडसाद या व्हिडिओच्या निमित्ताने पुन्हा उमटले आहेत. सोशल मीडियावरील ‘डॉ. निमो यादव’ आणि ‘अमॉक’ या हँडल्सवरून या प्रकारावर सडकून टीका करण्यात आली आहे. “ज्या कंगनाने शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटले होते, त्याच कंगनासोबत भाजपविरोधी बाकांवरील सुप्रिया सुळे आणि महुआ मोईत्रा डान्स कसा करू शकतात?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. हा राजकारण्यांच्या दुटप्पीपणाचा कळस असून, सामान्य जनतेला मूर्ख बनवण्याचा हा प्रकार असल्याची भावना सोशल मीडियावर व्यक्त होत आहे.लग्नापूर्वी कंगना रणौतने आपल्या सोशल मीडिया खात्यावरून नृत्याच्या तालीमचा फोटो शेअर केला होता. ‘सहकारी खासदारांसोबत सिनेमातील क्षण अनुभवले,’ असे कॅप्शन तिने दिले होते. तेव्हापासूनच या अनोख्या ‘राजकीय जुगलबंदी’ची चर्चा रंगली होती.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी युवक काँग्रेसचे एकदिवसीय प्रशिक्षण शिबीर

मुंबई, दि. ७ डिसेंबर २०२५

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या पुढाकाराने दादर येथील टिळक भवनमध्ये एकदिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. निवडणूक व्यवस्थापन, महापालिका प्रशासन आणि माहिती अधिकार (RTI) या महत्त्वाच्या विषयांवर मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई महानगरपालिका व आरटीआयसंदर्भात सविस्तर माहिती दिली. “माहिती कशी मिळवायची आणि जनहितासाठी तिचा प्रभावी वापर कसा करायचा” याबाबत त्यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. तसेच “बूथ मजबूत करा, मग बाकीचे सर्व होऊ शकते,” असा ठाम संदेश त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.

प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. संदेश कोंडविलकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रिया, आवश्यक अटी आणि काळजीपूर्वक पाळावयाच्या बाबींची माहिती दिली.

माजी नगरसेवक आसिफ झकेरिया यांनी मुंबई महानगरपालिकेची रचना, विभागनिहाय जबाबदाऱ्या आणि कामकाजाची पद्धत यावर विस्तृत प्रकाश टाकला. “कोणत्या विभागाचे कोणते काम आहे आणि नागरिकांच्या सेवेत जनप्रतिनिधींनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात” याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.

भारतीय युवक काँग्रेसचे सोशल मीडिया चेअरमन मनु जैन यांनी महापालिका निवडणुकीत सोशल मीडियाचा प्रभावी वापर कसा करावा याबाबत प्रशिक्षण दिले. डिजिटल प्लॅटफॉर्मवरून प्रचार, संवाद आणि मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या विविध रणनीती बाबत मार्गदर्शन केले.

या शिबिरात युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुरभी द्विवेदी, सचिव प्रभारी पवन मजेठिया, सचिव हरगुन सिंह यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

मुंबई युवक काँग्रेसतर्फे आयोजित हे प्रशिक्षण शिबीर नव्या कार्यकर्त्यांसाठी ज्ञानवर्धक ठरले. आगामी निवडणुकीत प्रभावीपणे काम करण्यासाठी आवश्यक दिशा, माहिती आणि आत्मविश्वास मिळाल्याची प्रतिक्रिया सहभागी झालेल्या पदाधिका-यांकडून व्यक्त करण्यात आली.

चित्रपट निर्माता विक्रम भट्ट यांना अटक:30 कोटींच्या फसवणुकीचा आरोप

0

मुंबई-चित्रपट निर्माता विक्रम भट्ट यांना मुंबई आणि राजस्थान पोलिसांनी रविवारी अटक केली आहे. त्यांच्यावर उदयपूरमधील एका व्यापाऱ्याची 30 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. पोलीस पथकाने त्यांना मुंबईतील यारी रोड परिसरातील गंगा भवन अपार्टमेंटमधून पकडले, हे घर त्यांच्या मेहुणीचे आहे.

आता राजस्थान पोलीस त्यांना आपल्यासोबत उदयपूरला घेऊन जाण्यासाठी वांद्रे न्यायालयात ट्रान्झिट रिमांडसाठी अर्ज करतील.
राजस्थानमधील इंदिरा ग्रुप ऑफ कंपनीजचे मालक डॉ. अजय मुर्डिया यांनी 17 नोव्हेंबर रोजी विक्रम भट्ट यांच्यासह 8 लोकांविरुद्ध 30 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा एफआयआर (FIR) दाखल केला होता. त्यांचा आरोप आहे की एका कार्यक्रमात त्यांची भेट दिनेश कटारिया यांच्याशी झाली होती. दिनेश कटारिया यांनी त्यांना पत्नीचे बायोपिक बनवण्याचा प्रस्ताव दिला आणि सांगितले की चित्रपटाद्वारे संपूर्ण देशाला त्यांच्या पत्नीच्या योगदानाची माहिती मिळेल. या संदर्भात दिनेश कटारिया यांनी 24 एप्रिल 2024 रोजी मुंबईतील वृंदावन स्टुडिओमध्ये बोलावले होते.
येथे त्यांची भेट चित्रपट निर्माता विक्रम भट्ट यांच्याशी करून देण्यात आली होती. त्यांनी बायोपिक बनवण्यावर चर्चा केली होती. चर्चेदरम्यान हे ठरले होते की चित्रपट बनवण्याची संपूर्ण जबाबदारी विक्रम भट्ट घेतील आणि त्यांना फक्त पैसे पाठवत राहावे लागेल.

विक्रम भट्ट यांनी अजय मुर्डिया यांना सांगितले की त्यांची पत्नी श्वेतांबरी आणि मुलगी कृष्णा देखील चित्रपट निर्मितीशी संबंधित आहेत. विक्रम भट्ट यांनी पत्नी श्वेतांबरीच्या VSB LLP फर्मला भागीदार बनवले होते. त्यांच्यात ‘बायोनिक’ आणि ‘महाराणा’ नावाच्या दोन चित्रपटांसाठी 40 कोटी रुपयांचा करार झाला होता.

31 मे 2024 रोजी विक्रम भट्ट यांना 2.5 कोटी रुपये RTGS द्वारे पाठवण्यात आले. काही दिवसांनंतर 7 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आणि सांगितले गेले की 47 कोटी रुपयांमध्ये 4 चित्रपट बनवले जातील, ज्यामुळे सुमारे 100-200 कोटी रुपयांपर्यंत नफा होईल. विक्रम भट्ट आणि त्यांच्या पत्नीच्या सांगण्यावरून अजय मुर्डिया यांनी त्यांनी सांगितलेल्या विक्रेत्यांना ऑनलाइन पेमेंट केले.

2 जुलै 2024 रोजी अजय मुर्डिया यांनी इंदिरा एंटरटेनमेंट LLP ची नोंदणी केली होती. या फर्मच्या खात्यातून सुमारे 3 लाख रुपयांचे पेमेंट करण्यात आले होते.

प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीत असे समोर आले की, ज्या विक्रेत्यांना इंदिरा एंटरटेनमेंटच्या खात्यातून पेमेंट करण्यात आले होते, ते बनावट होते. ज्या विक्रेत्यांना पेमेंट झाले, ते रंगारी किंवा ऑटोवाले निघाले. पेमेंटनंतर रकमेचा एक मोठा भाग विक्रम भट्ट यांच्या पत्नीच्या खात्यात हस्तांतरित केला जात असे.

गेल्या आठवड्यात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली होती

सात दिवसांपूर्वी विक्रम भट्ट, त्यांची पत्नी श्वेतांबरी भट्ट यांच्यासह 6 आरोपींविरुद्ध उदयपूर पोलिसांनी लुकआउट नोटीस जारी केली होती. सर्व आरोपींना 8 डिसेंबरपर्यंत उदयपूर पोलिसांसमोर हजर राहण्यासाठी नोटीस देण्यात आली होती. याशिवाय, यापैकी कोणताही आरोपी आता परवानगीशिवाय परदेशात जाऊ शकणार नाही.

दरम्यान, हे प्रकरण समोर आल्यानंतर चित्रपट निर्मात्याने सांगितले होते की, त्यांना अद्याप या प्रकरणात कोणतीही नोटीस मिळालेली नाही. त्यांना या प्रकरणाची माहिती माध्यमांद्वारे मिळाली आहे.

विक्रम भट्ट यांनी एएनआयशी बोलताना सांगितले होते-मला वाटते की राजस्थान पोलिसांची दिशाभूल केली जात आहे. मला कोणतेही पत्र मिळाले नाही, नोटीस नाही, काहीही नाही. जर तक्रारदाराने असे दावे केले असतील, तर त्यांच्याकडे त्याचे काहीतरी लेखी पुरावे असले पाहिजेत. नाहीतर पोलीस असे गुन्हे दाखल करत नाहीत. जर त्यांना इंडस्ट्रीची समज नव्हती, तर त्यांनी स्वतःच इतके चित्रपट का सुरू केले? आणि जर मी त्यांची फसवणूक करत होतो, तर त्यांनी माझ्यासोबत तिसरा चित्रपट का बनवला?
विक्रम भट्ट यांनी असेही सांगितले की ते गेल्या 30 वर्षांपासून चित्रपट उद्योगाचा भाग आहेत आणि त्यांनी असा अनुभव कधीच घेतला नाही. चित्रपट निर्मात्याने सांगितले की त्यांचा एक चित्रपट ‘विराट’ अर्ध्यावर थांबवण्यात आला, ज्याचे कारण त्यांच्या कंपनीचे व्यावसायिक निर्णय होते, विशेषतः येणारा IPO.

की तक्रारदार अजय मुर्डिया निर्मित चित्रपटास उशीर यासाठी झाला, कारण त्यांनी चित्रपटाशी संबंधित तंत्रज्ञांना पैसे दिले नव्हते. त्यांच्याकडे ईमेल्स आणि करारांसह आपली बाजू सिद्ध करण्यासाठी ठोस पुरावे आहेत.

धार्मिक ध्रुवीकरण आणि मतचोरी करणे हा भाजपाचा मुख्य फंडा – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

लोकशाही वाचवण्यासाठी पुणेकरांनी पुढे यावे

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

पुणे : सत्तेत राहण्यासाठी भाजपकडून कोणत्याही थराचे राजकारण केले जात असून ईव्हीएम प्रक्रियेबाबत गंभीर शंका निर्माण झाल्या आहेत. धार्मिक ध्रुवीकरण आणि मतचोरी करणे हा भाजपाचा मुख्य फंडा बनला आहे. लोकशाहीचा मूलभूत ढाचा वाचवण्यासाठी सर्वांनीच पुढे येणे आवश्यक असल्याचे मत माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात पुणेकरांचे मोठे योगदान आहे. आज लोकशाही वाचवण्यासाठी पुणेकरांनी पुढे आले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित ‘सेवा, कर्तव्य, त्याग’ सप्ताह कार्यक्रमात ‘लोकशाहीची हत्या व वोटचोरी’ या विदारक सत्यावर आधारित विशेष प्रदर्शनाचे उद्घाटन थोरात यांच्या हस्ते झाले. या वेळी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजक आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख संजय मोरे, प्रदेश काँग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारी, माजी नगरसेवक वीरेंद्र किराड, अविनाश बागवे, महिला काँग्रेस अध्यक्षा स्वाती शिंदे, लता राजगुरू, कैलास गायकवाड, अनिल सोडकर, प्रथमेश आबनावे आणि चेतन अग्रवाल उपस्थित होते.

आपल्या भाषणात थोरात म्हणाले की, २००४ ते २०१४ या काळात काँग्रेस सरकारने अन्न सुरक्षा कायदा, शैक्षणिक योजना, भू-अधिग्रहण कायद्यात सुधारणा, तसेच जागतिक स्तरावर गाजलेल्या पोलिओ निर्मूलन मोहिमेसह अनेक लोककल्याणकारी उपक्रम राबवले. मात्र २०१४ नंतर भाजपने तांत्रिक साधने, अफवा आणि जातीय ध्रुवीकरणाचा वापर करून सत्ता काबीज केली आणि देशाची दिशा भरकटवली. महाराष्ट्र हा संतांची परंपरा जपणारा प्रदेश असताना, आज धर्माचे उघडपणे राजकारण केले जात आहे. सोनम वंगचुक, हरियाण्यातील शेतकरी आंदोलन, महिला ऑलिम्पिक विजेत्यांचे आंदोलन, मुख्य न्यायाधीशांवर फेकलेला बूट—या घटनांनंतरही समाज उदासीन राहणे म्हणजे लोकशाहीची हत्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे म्हणाले की, मोदी सरकार मतचोरीच्या ठरावीक पॅटर्नवर सत्तेत आले असून ही जनतेची व लोकशाहीची मोठी फसवणूक आहे. निवडणुका झाल्यानंतर निकाल पुढे ढकलणे आणि नंतर ईव्हीएमच्या जोरावर सत्ता मिळवणे ही पद्धत लोकशाहीस घातक आहे. मोदी सरकारला रोखण्यासाठी जनआंदोलन उभारण्याची वेळ आली असून सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे म्हणाले की, विविध राष्ट्रीय मुद्द्यांवर राहुल गांधी यांनी आवाज उठविल्यामुळे जनजागृतीला गती मिळाली आहे. आपले मत नक्की कुठे आणि कसे जाते याचा शोध घेण्याचा प्रयत्न या प्रदर्शनातून करण्यात आला असून आर्थिक भ्रष्टाचारासोबत मतचोरी ही भाजपची मोठी चाल असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

माजी महापौर प्रशांत जगताप यांनी म्हटले की, लोकशाहीची हत्या आणि मतचोरीचे विदारक वास्तव दाखवणारे हे प्रदर्शन लोकशाही रक्षणासाठी महत्त्वाचा उपक्रम आहे. केंद्र सरकारविरुद्ध लोकांमध्ये वाढता असंतोष दिसत असून मतचोरीची प्रक्रिया लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. मतदार याद्यांतील घोळही तातडीने दूर करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रम संयोजक मोहन जोशी म्हणाले की, पुण्याच्या सर्वांगीण विकासाचे श्रेय काँग्रेसचेच आहे. आजवर २५ पेक्षा जास्त प्रकल्प राबवून शहराचा विकास साधला. ‘सेवा, कर्तव्य, त्याग’ सप्ताहातून जनजागृती, सामाजिक बांधिलकी आणि लोकशाहीचे महत्त्व अधोरेखित करणे हा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
अविनाश बागवे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रथमेश आबनावे यांनी केले, तर सुनील मलके यांनी आभार मानले.

39वी पुणे अंतरराष्ट्रीय  मॅरेथॉन: पूर्ण मेरेथॉन पुरुष विजेता – टेरेफे हैमानोत (इथोपिया),पूर्ण मॅरेथॉन महिला विजेती साक्षी जडियाला

पुणे-39व्या पुणे अंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये रविवार दि. 7 डिसेंबर रोजी सपन्न झालेल्या पूर्ण मेरेथॉन स्पर्धेत पुरुष गटात इथोपियाचा टेरेफे हैमानोत ( 2तास 20 मिनिटे 08 सेकंद) आणि पूर्ण मेरेथॉन महिला गटात भारताची साक्षी जडियाला ( 2 तास 39 मिनिटे 37 सेकंद ) यांनी प्रथम क्रमांक मिळवला. 42. 195 किमीच्या पूर्ण मेरेथॉन पुरुष गटात द्वितीय क्रमांक इथोपियच्या मिको देरेजे अलेनू (2तास 20 मिनिटे 09 सेकंद) आणि तृतीया क्रमांक भारताच्या त्रिथा पुन (2 तास 20 मिनटे 17 सेकंद) यांनी मिळवला.
पूर्ण मेरेथॉन महिला गटात द्वितीय क्रमांक इथोपियाच्या इडो टूलो (2तास 40 मिनटे 56 सेकेंद) आणि तृतीय क्रमांक इथोपियाची वारे डेमिसी (2तास 50 मिनटे 46 सेकेंद) यांनी मिळवला.

पूर्ण मेरेथॉन महिला गटात भारताची साक्षी जडियाला यांनी प्रथम क्रमांक मिळवला.


अर्ध मेरेथॉनमध्ये पुरुष गटात प्रथम क्रमांक भारताच्या सचिन यादव (1तास 3 मिनिटे 43 सेकेंद), द्वितीय क्रमांक भारताच्या राज तिवारी (1 तास 3 मिनिटे 44 सेकंद) आणि तृतीय क्रमांक भारताच्या मुकेश कुमार (1 तास 4 मिनटे 3 सेकंद) यांनी मिळवला
.मिहालांच्या अर्ध मेरेथॉनमध्ये भारताच्या भारती (1 तास 13 मिनटे 59 सेकंद), द्वितीय क्रमांक भारताची रविणा गायकवाड (1तास 15 मिनटे 58 सेकंद) आणि तृतीय क्रमांक भारताची तसेहय देसजन (1 तास 18 मिनटे 19 सेकंद) यांनी मिळवला. 

39वी पुणे अंतरराष्ट्रीय मॅरेथॉन
पूर्ण मेरेथॉन पुरुष विजेता – टेरेफे हैमानोत (इथोपिया)

याशिवाय 10 किमी, 5 किमी आणि व्हीलचेअर स्पर्धाही उत्सहात पार पडली.
पहाटे 3 वाजता ऍड. अभय छाजेड यांच्या हस्ते फ्लेग ऑफ करून स्पर्धेचा प्रारंभ सणस मैदान जवळील हॉटेल कल्पना – विश्व चौकातून झाला. सर्व गटातील सर्व स्पर्धक परंतल्यानंतर सणस मैदान येथे बक्षीस वितरण समारंभ पार पडला. यावेळी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, पोलीस सहआयुक्त रंजनकुमार, अरविंद शिंदे, बाळासाहेब शिवरकर, विशाल चोरडिया,  दीप्ती चवधरी, कमल व्यवहारे, आबा बागुल, प्रशांत जगताप, संजय मोरे, सुनील शिंदे, लता राजगुरू, डॉ. सतीश देसाई, संगीता तिवारी, डॉ. राजेंद्र जगताप, सचिन आडेकर, यासिन शेख, अक्षय जैन, रेस डायरेक्टर सुमंत वायकर, जॉईंट रेस डायरेक्टर रोहन मोरे व गुरुबंस कौर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.


प्रारंभी पुणे अंतरराष्ट्रीय मेरेथॉनचे विश्वस्त ऍड. अभय छाजेड यांनी स्वागत केले. प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले कि, आपण आपल्या देशाला भारतमाता म्हणतो. मातृभूमीला माता म्हणणे ही आपली संस्कृती आहे. जात, धर्म, भाषा, प्रांत, यापेक्षाही खेळाडू म्हणून सगळे येथे एकत्र आले आहेत याचा आनंद आहे. हा उद्याचा भारत आहे. त्यासाठी बघ्याची भूमिका न घेता नागरिक म्हणून प्रत्येकाने पाऊल पुढे टाकावे. आजची मेरेथॉनची गर्दी त्यादृष्टीने खूप आश्वास्क आहे असे सांगून त्यांनी आयोजक अभय छाजेड व संयोजकांचे कौतुक केले.यास्पर्धेला पुणे महानगरपालिकेने 35 लाख रुपयांची बक्षिसे दिली. स्पर्धा पूर्ण करणाऱ्या सर्व गटातील सर्व खेळाडूंना फिनिशिंग मेडल देण्यात आले. 15 हजारहून अधिक धावपटू यात सहभागी झाले होते. कार्यक्रमच्या शेवटी रेस डायरेक्टर सुमंत वायकर यांनी आभार मानले.

विमान वाहतूक कोसळली: काय म्हणाले मंत्री मोहोळ

इंडिगोने पायलटच्या कामाची वेळ पाळली नाही: ४ सदस्यीय चौकशी समितीच्या रिपोर्टनुसार कारवाई होईल- मंत्री मोहोळ

पुणे : गेल्या चार ते पाच दिवसांपासून इंडिगो एअरलाइन्सची सेवा विस्कळीत झाल्याने पुणे विमानतळावर प्रवाशांचा मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले आहे. शुक्रवारी ५ डिसेंबर रोजी इंडिगोची पुण्यात येणारी २१ आणि येथून जाणारी २१ अशी एकूण ४२ उड्डाणे रद्द झाल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. या विस्कळीत सेवेचा गैरफायदा घेत इतर कंपन्यांनी तिकीट दर तिप्पट वाढवले आहेत. या सर्व घटनेबाबत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी भाष्य केलं आहे. गेले काही दिवस विमानप्रवाशांना खूप त्रास झाला आहे. इंडिगोने गेल्या 2-3 महिन्यांत करायच्या तांत्रिक गोष्टी होत्या, त्या केल्या नाही. त्याचा हा परिणाम आहे. अहमदाबाद दुर्घटनेनंतर पायलट असोसिएशनने मागणी केली होती की, आमचा ड्युटी टाईम 10 तासांवरून 8 तास करावा. हायकोर्टाने तसे आदेशही दिले होते, डीजीसीएने तशी अंमलबजावणी करण्यास सांगितले होते, इंडिगोने मात्र वेळ तशी पाळली नाही, असं मुरलीधर मोहोळ म्हणालेत.
तर, इंडिगो देशातली 65 टक्के विमानसेवा देते. आधीच पायलटची कमतरता आणि त्यातून ड्युटीचे तास दोन तासांनी कमी झाल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. भारत सरकारने या सगळ्याची गंभीर दखल घेतली आहे. इंडिगोला सगळी सिस्टीम रेग्युलेट करण्यास थोडा वेळ लागेल म्हणून त्यांना थोडी मुदत दिली आहे. 4 सदस्यीय चौकशी समिती त्यासंदर्भात नेमली आहे. डीजीसीएने इंडिगोच्या प्रमुखांना नोटिस पाठवली आहे. इतर विमान कंपन्यांच्या किमतींवर कॅप लावली आहे. शिवाय ज्यांची विमानं रद्द झाली, त्यांना संपूर्ण रिफंड ४८ तासांच्या आत देण्याचे आदेश दिले आहेत. ४ सदस्यीय चौकशी समितीच्या रिपोर्टमध्ये जे काही येईल त्यानुसार कारवाई करण्यात येईल. कालपासून परिणाम थोडा-थोडा कमी व्हायला लागला आहे. पुणे विमानतळावरून इंडिगोच्या ५७ विमानसेवा होत्या. त्यातील आज ३७ विमानसेवा सुरू झाल्या आहेत. मात्र आधीच्या चुकांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती देखील मुरलीधर मोहोळ यांनी दिला आहे.
इंडिगोनं फ्लाईट रद्द कराव्या लागल्या त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची कारणं सांगितली. त्यामध्ये सॉफ्टवेअरमधील ग्लिच, हिवाळ्यामुळं वेळापत्रकातील बदल, वातावरण या कारणामुळं फ्लाईट रद्द कराव्या लागल्याचं कारणं सांगितलं गेलं. मात्र, हवाई उद्योगातील जाणकारांच्या मते फ्लाईट रद्द कराव्या लागण्याचं प्रमुख कारण फ्लाईट ड्यूटी टाईम लिमिटेशनची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाल्यानं ही समस्या निर्माण झाली. एफडीटीएलच्या अंमलबजावणीमुळं पायलट आणि क्रू मेंबर्सच्या विश्रांतीचे आणि कामाचे तास निश्चित करण्यात आले होते.

सध्या तरी पुणे विमानतळावर परिस्थती नियंत्रणात आहे. इंडिगो वगळता इतर विमानांची उड्डाणे आणि आगमन सुरळीत असल्याची माहिती आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून विमानतळ व्यवस्थापनाकडून आत मध्ये २०० अधिक खुर्च्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. आतमध्ये असलेल्या सगळ्या उपाहारगृहात खाद्य पदार्थांचा मुबलकसाठा करण्यात आला आहे. पुणे विमानतळावरून काल दिवसभरात 69 विमानाचे उड्डाणे रद्द करण्यात आली आहे. सलग पाचव्या दिवशीही प्रवाशांना विमानसेवेचा फटका बसला आले. पुणे विमानतळावर काल दिवसभरात 22 विमानांचे आगमन तर 25 विमानांचे उड्डाणे झाले. इंडिगोचे आगमन होणारी ३४ तर उड्डाणे घेणारे ३५ अशी एकूण ६९ विमाने काल रद्द झाली आहे.

महापौर, नगरसेवक पदांचे थेट ‘लिलाव’च करा:गुंड, गुन्हेगारांना संधी द्या, अधिवेशनात विधेयक मांडा-मुख्यमंत्र्यांकडे सत्ताधारी कार्यकर्त्याचीच मागणी

पुणे-
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युती आणि आघाडीची गणिते बिघडलेली असतानाच, आता खुद्द सत्ताधारी पक्षातूनच एक अजब मागणी पुढे आली आहे. निवडणुकांमध्ये होणारा वारेमाप खर्च आणि पैशांचा पाऊस पाहता, ‘निवडणुका घेण्याऐवजी महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि नगरसेवक पदांचे थेट जाहीर लिलावच करावेत,’ अशी मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या एका नेत्याने केली आहे. सांगलीतील शिंदे गटाचे पदाधिकारी वीर कुदळे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हा ‘घरचा आहेर’ दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

आष्टा नगरपालिकेतील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आणि वाळवा तालुका संघटक असणारे वीर कुदळे यांनी मुख्यमंत्र्यांसह निवडणूक आयोग आणि राष्ट्रपतींना हे पत्र पाठवले आहे. नुकत्याच झालेल्या नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांमध्ये मते मिळवण्यासाठी पैशांचे वाटप झाल्याचे आरोप होत असताना, कुदळे यांनी लोकशाही प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. निष्ठावंतांना डावलले जात असल्याने आणि पैशांच्या जोरावरच सर्व चालत असल्याने, निवडणुकांचा हा सोहळा नको, त्यापेक्षा थेट लिलाव पुकारून ज्याच्याकडे पैसा आहे, त्याला पद द्यावे, असा उपरोधिक टोला वीर कुदळे यांनी लगावला आहे.

एवढ्यावरच न थांबता नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सरकारने या लिलाव प्रक्रियेचे विधेयकच सादर करून ते मंजूर करून घ्यावे, अशी खोचक मागणी कुदळे यांनी केली आहे. जेणेकरून, राजकारणापासून वंचित असलेल्या गुंड आणि गुन्हेगारांनाही अधिकृतपणे संधी मिळेल, असे मत त्यांनी आपल्या पत्रातून मांडले आहे. त्यांनी या मागणीचे निवदेन निवडणूक आयोग आणि राष्ट्रपतींनाही पाठवले आहे. स्वतःच्याच पक्षाच्या नेत्याने व्यवस्थेचे वाभाडे काढल्याने शिंदे गटाची चांगलीच अडचण झाली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून नागपूर येथे सुरू होत आहे. मात्र, 58 वर्षांनंतर पहिल्यांदाच विधिमंडळाचे अधिवेशन विरोधी पक्षनेत्यांविना होणार आहे. त्यामुळे विरोधकांची सरकारविरुद्धची लढाई नेतृत्वहीन होण्याची भीती राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. ​अधिवेशनात विरोधकांकडे नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोड, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि मतदार यादीतील त्रुटींवरून राज्य निवडणूक आयोगावर हल्लाबोल करण्यासाठी अनेक मुद्दे आहेत. परंतु, विधानसभेतील संख्याबळ महायुती सरकारच्या बाजूने असल्याने हे ज्वलंत मुद्दे किती प्रभावीपणे मांडले जातात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अनेक निर्णयही बहुतमताच्या बळावर रेटून नेले जाऊ शकतात.

अजित पवारांबरोबर नाहीच , महाविकास आघाडी म्हणूनच लढणार, खुद्द शरद पवारांची मान्यता – प्रशांत जगताप

0

पुणे- गेल्या काही दिवसांपासून पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष महायुतीतील एखाद्या पक्षासोबत आघाडी करणार अशी चर्चा माध्यमांमध्ये पेरण्यात आली होती. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी काल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांची मोदी बागेत भेट घेतली. या भेटीत प्रशांत जगताप यांनी शहरातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे म्हणणे नेतृत्वासमोर मांडले. कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतर पुणे शहरात आपण महाविकास आघाडी सोबत लढणार असे निर्देश शरद पवार यांनी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना दिले आहेत. याबाबत प्रशांत जगताप यांनी स्वतः माध्यमांना सविस्तर माहिती दिली.

या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या पुणे शहरातील सर्व ज्येष्ठ नेत्यांची बैठक रास्ता पेठेतील शांताई हॉटेल येथे पार पडली. या बैठकीतही बहुतांश नेत्यांनी आपण महायुतीतील कोणत्याही पक्षासोबत न जाता महाविकास आघाडी म्हणून शहरात लढावे अशी भूमिका मांडली. या बैठकीचा वृत्तांत उद्या पत्राद्वारे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब, कार्याध्यक्ष खा. सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांना पाठवला जाईल. पक्ष नेतृत्व जो निर्णय घेतील तो मान्य केला जाईल हे सर्वानुमते मान्य करण्यात आले. शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी खासदार वंदना चव्हाण, आमदार बापूसाहेब पठारे, माजी आमदार जयदेवराव गायकवाड, कमलनानी ढोले पाटील, जगन्नाथबापू शेवाळे, अंकुश काकडे, प्रकाशआप्पा म्हस्के, रवींद्र माळवदकर, अश्विनी कदम, सुरेंद्र पठारे, पंडित कांबळे, डॉ. सुनील जगताप, विशाल तांबे, काकासाहेब चव्हाण, श्रीकांत पाटील, उदय महाले यांच्यासह इतरही नेते या बैठकीस उपस्थित होते.यानंतर पुढील दोन दिवसात इच्छुकांच्या मुलाखतींचा कार्यक्रम व पक्षाच्या जाहीरनामा बाबत कार्यक्रम जाहीर केला जाईल अशी माहिती प्रशांत जगताप यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

ही दिवसांपूर्वी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेवर आता पूर्णविराम मिळाला आहे.पुणे महापालिकेच्या निवडणूकीत दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्रित लढल्यास केवळ अजित पवारांच्या पक्षाचा फायदा होईल आणि आपल्या पक्षाच नुकसान होईल हे आपण शरद पवारांना पटवून दिल्याचा दावा प्रशांत जगताप यांनी केला आहे. दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पुण्यात एकत्र आल्यास अजित पवारांच्या पक्षाच्या ४० ते ४५ जागा निवडून येतील मात्र आमच्या फक्त तीन ते अकराच जागा निवडून येतील‌. मात्र दोन्ही राष्ट्रवादी स्वतंत्र लढल्यास शरद पवारांच्या पक्षाच्या २३ ते ४७ जागा निवडून येतील असं प्रशांत जगतापांच म्हणणं आहे. त्यामुळे त्यांनी अजित पवारांच्या पक्षासोबत पुण्यात आघाडी करण्यास विरोध केला आहे. प्रशांत जगतापांनी हे आकडेवारीनीशी शरद पवारांना पटवून दिल्यानंतर शरद पवारांनी त्यांना पाठिंबा दिल्याचं त्यांचं म्हणणं आहे. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी अजित पवार आग्रही असून शरद पवारांच्या पक्षात असलेल्या अंकुश काकडेंना त्यासाठी अजित पवारांनी फोन देखील केला होता. मात्र अंकुश काकडेंना आपण आपली बाजु पटवून दिल्याचं प्रशांत जगताप यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर निवडणूकीनंतर अजित पवार पुन्हा पुणे महापालिकेत भाजपसोबत युती करतील असही भाकित जगताप यांनी वर्तवलंय.

मुंबई, दिल्ली, पुणे, हावडा, हैदराबाद इत्यादी मोठ्या शहरांमध्ये येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी विशेष गाड्या; एनईआर दिल्ली आणि मुंबई दरम्यान 6 फेऱ्या चालवणार

0

हिवाळ्याच्या हंगामात मोठ्या प्रमाणात उड्डाणे रद्द होणे आणि अतिरिक्त गर्दीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणातील मागणी लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने सुरळीत प्रवासाला पाठिंबा देण्यास सुरुवात केली आहे. आजपासून पुढील तीन दिवस विविध विभागांमध्ये 89 विशेष रेल्वे सेवा (100 हून अधिक फेऱ्या) चालवल्या जातील. यामुळे सुरळीत प्रवासाला मदत होईल आणि रेल्वे प्रवासाच्या वाढत्या मागणीदरम्यान पुरेशी कनेक्टिव्हिटी सुनिश्चित होईल.

प्रवाशांची वाढती मागणी  पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वे 14  विशेष गाड्या चालवणार आहे. यामध्ये  पुढील गाड्यांचा समावेश आहे.  6 आणि 7 डिसेंबर रोजी पुणे-बेंगळुरू-पुणे गाडी क्रमांक 01413/01414 ; 7 आणि 9 डिसेंबर रोजी पुणे-हजरत निजामुद्दीन-पुणे गाडी क्रमांक 01409/01410, 7 आणि 8 डिसेंबर रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी)-मडगाव-एलटीटी गाडी क्रमांक 01019/01020, 6 आणि 7 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)-हजरत निजामुद्दीन-सीएसएमटी गाडी क्र. 01077/01078; 6 आणि 7 डिसेंबर रोजी एलटीटी-लखनऊ-एलटीटी गाडी क्र. 01015/01016; 6 आणि 7 डिसेंबर रोजी नागपूर-सीएसएमटी-नागपूर 01012/01011; 7 आणि 9 डिसेंबर रोजी गोरखपूर-एलटीटी-गोरखपूर 05587/05588; आणि 10 आणि 12 डिसेंबर रोजी 08245/08246 बिलासपूर-एलटीटी-बिलासपूर.

गेल्या काही दिवसांमध्ये विमान उड्डाणे रद्द झाल्यामुळे वाढलेली मागणी लक्षात घेऊन दक्षिण-पूर्व रेल्वेने विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. यामध्ये गाडी क्रमांक 08073/08074 संत्रागाची-येल्हांका-संत्रागाची यांचा समावेश आहे, 7 डिसेंबर रोजी संत्रागाची येथून 08073 गाडी निघेल  आणि 9 डिसेंबर रोजी येलाहंका येथून 08074 गाडी परतीचा प्रवास सुरु करेल. गाडी क्रमांक 02870/02869  हावडा-सीएसएमटी-हावडा विशेष गाडी क्रमांक 02870 हावडा येथून 6 डिसेंबर रोजी सुटेल आणि 02869 सीएसएमटी येथून 8 डिसेंबर रोजी सुटेल. गाडी क्रमांक 07148/07149  चेरलापल्ली-शालिमार-चेरलापल्ली 07148 ही गाडी 6 डिसेंबर रोजी चेरलापल्लीहून सुटेल आणि 07149 शालिमारहून 8 डिसेंबर रोजी सुटेल.

प्रवाशांच्या अतिरिक्त गर्दीचे व्यवस्थापन  करण्यासाठी, दक्षिण मध्य रेल्वे आज, 6 डिसेंबर 2025 रोजी तीन विशेष गाड्या चालवत आहे. चेरलापल्ली ते शालीमार गाडी क्रमांक 07148, सिकंदराबाद ते चेन्नई एग्मोर गाडी क्रमांक 07146 आणि हैदराबाद ते मुंबई एलटीटी गाडी क्रमांक 07150 आज रवाना झाली.

पूर्व रेल्वे हावडा, सियालदाह आणि प्रमुख ठिकाणांदरम्यान विशेष रेल्वे सेवा चालवेल. 03009/03010 हावडा-नवी दिल्ली-हावडा विशेष गाडी क्रमांक 03009 हावडा येथून 6 डिसेंबर रोजी सुटेल आणि 03010 नवी दिल्ली येथून 8 डिसेंबर रोजी सुटेल. 03127/03128 सियालदाह-एलटीटी-सियालदाह विशेष ट्रेन क्रमांक 03127 सियालदाह येथून 6 डिसेंबर रोजी सुटेल आणि 03128 एलटीटी येथून 9 डिसेंबर रोजी सुटेल.

प्रवासाची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी पश्चिम रेल्वे सात विशेष गाड्या चालवणार आहे. यामध्ये गाडी क्रमांक 09001/09002  मुंबई सेंट्रल-भिवानी सुपरफास्ट स्पेशल (आठवड्यातून दोनदा), मुंबई सेंट्रल येथून 9 ते 30 डिसेंबर दरम्यान दर मंगळवार आणि शुक्रवारी तर भिवानी येथून 10 ते  31  डिसेंबर दरम्यान दर बुधवारी  आणि शनिवारी  एकूण 14 फेऱ्या चालवल्या जातील. या दरम्यान  ही गाडी बोरिवली, पालघर, वापी, वलसाड, सुरत, भरूच, वडोदरा, रतलाम, मंदसोर, निमच, चित्तौडगड, भिलवाडा, बिजयनगर, नशिराबाद, अजमेर, किशनगढ, जयपूर, गांधी नगर जयपूर, बांदीकुई, अलवार, रेवाडी, चरखी दादरी स्थानकांवर दोन्ही दिशांना थांबेल.

गाडी  क्रमांक  09003/09004  मुंबई सेंट्रल-शकूर बस्ती सुपरफास्ट स्पेशल 8 ते  29  डिसेंबर दरम्यान मुंबई सेंट्रलवरून मंगळवार आणि शुक्रवार वगळता दररोज आणि  9 ते  30 डिसेंबर दरम्यान शकूर बस्तीवरून बुधवार आणि शनिवार वगळता दररोज धावेल, एकूण ३२ फेऱ्या असतील, ज्यांचे आरक्षण  6 डिसेंबर रोजी सुरू होईल. ट्रेन क्रमांक 09730/09729  वांद्रे टर्मिनस-दुर्गापुरा सुपरफास्ट स्पेशल 09730 वांद्रे टर्मिनसवरून 8 डिसेंबर रोजी निघेल आणि 09729  दुर्गापुरा येथून 7 डिसेंबर रोजी निघेल, ज्यांचे आरक्षण 6 डिसेंबर रोजी सुरू होईल. या ट्रेनमध्ये फर्स्ट एसी, एसी –  2  टियर, एसी – 3 टियर, स्लीपर क्लास आणि जनरल सेकंड क्लास कोच आहेत.

प्रवाशांच्या वाढत्या मागणीला प्रतिसाद म्हणून, भारतीय रेल्वे गोरखपूर येथून अतिरिक्त सेवा चालवणार आहे. ट्रेन क्रमांक 05591/05592  गोरखपूर-आनंद विहार टर्मिनल-गोरखपूर अशा  दोन फेऱ्या चालवेल, 7 आणि  8 डिसेंबर रोजी गोरखपूरहून आणि  8 आणि  9 डिसेंबर रोजी आनंद विहार टर्मिनलवरून निघेल. गाडी  क्रमांक05587/05588 गोरखपूर-एलटीटी-गोरखपूर ही 7 डिसेंबर रोजी गोरखपूरहून आणि 9 डिसेंबर रोजी एलटीटीवरून निघेल.बिहारहून हिवाळी प्रवास सुलभ करण्यासाठी, पूर्व मध्य रेल्वे पाटणा आणि दरभंगा येथून आनंद विहार टर्मिनलपर्यंत विशेष गाड्या चालवेल. गाडी  क्रमांक  02309/02310 पाटणा-आनंद विहार टर्मिनल-पाटणा ही 6 आणि 8 डिसेंबर रोजी पाटणा येथून आणि 7 आणि  9 डिसेंबर रोजी आनंद विहार टर्मिनलवरून निघेल. गाडी  क्रमांक 02395/02396 पाटणा-आनंद विहार टर्मिनल-पाटणा ही गाडी  क्रमांक  02395  7  डिसेंबर रोजी पाटणा येथून आणि 02396 ही गाडी  8 डिसेंबर रोजी आनंद विहार टर्मिनल येथून सुटेल. ट्रेन क्रमांक 05563/05564 दरभंगा-आनंद विहार टर्मिनल-दरभंगा ही गाडी  क्रमांक 05563 दरभंगा येथून 7 डिसेंबर रोजी  सुटेल आणि 05564 ही गाडी 9 डिसेंबर रोजी आनंद विहार टर्मिनल येथून सुटेल.

आगामी दिवसांमध्ये प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी उत्तर पश्चिम रेल्वे एक-ट्रिप पद्धतीने दोन विशेष भाडे गाड्या चालवणार आहे. गाडी  क्रमांक  04725 हिसार-खडकी विशेष ट्रेन 7 डिसेंबर  2025 रोजी हिसारहून सुटेल, तर परतीची गाडी  क्रमांक  04726 खडकी-हिसार विशेष, 8 डिसेंबर 2025 रोजी खडकीहून सुटेल. उत्तर पश्चिम रेल्वे 7 डिसेंबर 2025 रोजी दुर्गापुराहून निघणारी एक-ट्रिप विशेष भाडे विशेष ट्रेन क्रमांक 09729 दुर्गापुरा-वांद्रे टर्मिनस विशेष गाडी चालवेल. परतीची गाडी क्रमांक 09730 वांद्रे टर्मिनस-दुर्गापुरा विशेष, 8 डिसेंबर 2025 रोजी वांद्रे टर्मिनसहून सुटेल.

प्रवाशांच्या सोयीसाठी, उत्तर मध्य रेल्वे प्रयागराज आणि नवी दिल्ली दरम्यान विशेष गाड्या चालवेल. ट्रेन क्रमांक 02417 ही गाडी 6 आणि 8 डिसेंबर रोजी प्रयागराजहून निघेल आणि 7 आणि 9 डिसेंबर रोजी नवी दिल्लीहून 02418 या क्रमांकासह परत येईल आणि दोन्ही दिशेने एकूण दोन फेऱ्या करेल. त्याचप्रमाणे, ट्रेन क्रमांक 02275 प्रयागराजहून 7 डिसेंबर रोजी  निघेल आणि 8 डिसेंबर रोजी नवी दिल्लीहून  02276 या क्रमांकासह परत येईल आणि प्रत्येक दिशेने एक फेरी करेल.

उत्तर रेल्वे 6  डिसेंबर 2025 रोजी 02439 नवी दिल्ली-शहीद कॅप्टन तुषार महाजन उधमपूर वंदे भारत आणि त्याच दिवशी 02440 उधमपूर-नवी दिल्ली वंदे भारत ही गाडी चालवेल, ज्यामुळे राष्ट्रीय राजधानी आणि जम्मू आणि काश्मीर दरम्यान जलद आणि अधिक आरामदायी प्रवास होईल. उत्तर आणि पश्चिम रेल्वे दरम्यान लांब पल्ल्याची वाहतूक सुलभ करण्यासाठी 04002 नवी दिल्ली-मुंबई सेंट्रल ही ट्रेन 6 डिसेंबर 2025 रोजी धावेल, तर 04001 मुंबईसेंट्रल-नवी दिल्ली ही परतीची गाडी  7 डिसेंबर  2025 रोजी धावेल. उत्तर रेल्वे 6 डिसेंबर 2025 रोजी नियोजित 04080  हजरत निजामुद्दीन-तिरुवनंतपुरम सेंट्रल विशेष ट्रेनद्वारे दिल्लीला दक्षिण रेल्वेशी जोडेल. दक्षिण मध्य रेल्वे नेटवर्कमध्ये प्रादेशिक गतिशीलता मजबूत करण्यासाठी, ट्रेन 07703 चालीपल्ली-जालीमार 7 डिसेंबर २०२५ रोजी धावेल.

हिवाळ्यातील गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी, दुर्ग आणि हजरत निजामुद्दीन दरम्यान एक विशेष ट्रेन धावेल. ट्रेन क्रमांक 08760  दुर्ग येथून 7 डिसेंबर  2025 रोजी निघेल आणि ट्रेन क्रमांक 08761 हजरत निजामुद्दीन येथून 8 डिसेंबर 2025 रोजी निघेल.

कोर्टाच्या आवारातच महिलेवर कारमध्ये सामूहिक अत्याचार


ठाणे- आर्थिक विषमता , सामाजिक विषमता या बरोबर राज्यात वाढत्या गुन्हेगारीने हैदोस घातला आहे. आता ठाणे फॅमिली कोर्टाच्या आवारात माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. ‘बर्थडे’ सेलिब्रेशनच्या बहाण्याने एका विवाहित महिलेला कारमध्ये बोलावून, तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. पीडितेने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून, हिरालाल केदार या आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर रवी पवार हा फरार आहे. पोलिस उपायुक्त सुभाष बुरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पथके त्याचा शोध घेत आहेत. न्यायालयाच्या आवारातच अशी घटना घडल्याने सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

25 ऑगस्ट 2025 रोजी घडलेल्या या संतापजनक प्रकाराचा उलगडा तब्बल तीन महिन्यांनी झाला असून, पीडितेने हिंमत एकवटून तक्रार दाखल केल्यानंतर ठाणे नगर पोलिसांनी एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.पीडित विवाहितेने सोशल मीडियावर कामासंदर्भातील जाहिरात पाहिली होती. चांगल्या पगाराची नोकरी मिळेल या आशेने तिने संबंधित नंबरवर संपर्क साधला. संशयित आरोपींनी तिचा विश्वास संपादन करत तिला ठाण्यातील एका स्पा सेंटरमध्ये काम मिळवून दिले.घटनेच्या दिवशी, म्हणजेच 25 ऑगस्ट 2025 रोजी रात्री साडेआठच्या सुमारास एका आरोपीने स्पा सेंटरमध्ये जाऊन पीडितेकडून मसाज करून घेतला. त्यानंतर ‘आज माझा वाढदिवस आहे, केक कापायचा आहे’ असे सांगून तिला बाहेर उभा असलेल्या ‘इर्टिगा’ कारमध्ये बोलावले. आरोपींनी गाडी थेट ठाणे फॅमिली कोर्टाच्या अंधाऱ्या पार्किंगमध्ये नेली. तिथे केक कापताना त्यांनी त्यात आधीच गुंगीचे औषध मिसळले होते. हा केक खाल्ल्यानंतर पीडितेची शुद्ध हरपली. याच संधीचा फायदा घेत गाडीतील दोन्ही नराधमांनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. इतकेच नाही, तर या पाशवी कृत्याचे त्यांनी मोबाईलमध्ये चित्रीकरणही केले.

रात्री 11 वाजता पीडितेला रस्त्यावर सोडून देताना, “वाच्यता केलीस तर व्हिडिओ व्हायरल करू,” अशी धमकी आरोपींनी दिली. बदनामीच्या भीतीने पीडितेने तीन महिने हे दुःख मनात दाबून ठेवले. मात्र, आरोपींनी या व्हिडिओचा आधार घेत तिला सातत्याने ब्लॅकमेल करणे सुरूच ठेवले. अखेर हा त्रास सहन न झाल्याने पीडितेने 5 डिसेंबर 2025 रोजी एका वकिलाच्या आणि मैत्रिणीच्या मदतीने ठाणे नगर पोलिस ठाणे गाठले आणि आपबीती सांगितली.