Home Blog Page 109

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्यासर्वांगीण विकासासाठी कार्यरत राहीन-आमदार सिद्धार्थ शिरोळे


‎पुणे : विद्यार्थ्यांचे हित, अध्यापनातील गुणवत्ता, संशोधनास चालना आणि उच्च शिक्षणाचा सर्वांगीण विकास यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा सिनेट सदस्य म्हणून कार्यरत राहीन, अशी ग्वाही आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (बुधवारी) सत्कार प्रसंगी बोलताना दिली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांनी पुणे विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य म्हणून नेमणूक झाल्याबद्दल आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचा विशेष सत्कार केला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.

‎या प्रसंगी बोलताना कुलगुरू डॉ.गोसावी म्हणाले, आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची सिनेट सदस्य म्हणून झालेली नेमणूक ही विद्यापीठासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या अनुभवातून आणि दूरदृष्टीतून विद्यापीठाच्या शैक्षणिक, संशोधन आणि विकासात्मक कामकाजाला निश्चितच नवी दिशा मिळेल.”

‎या गौरवाबद्दल आमदार शिरोळे यांनी कुलगुरूंचे आभार मानले. सिनेट सदस्य या नात्याने विद्यापीठातील शैक्षणिक, प्रशासकीय व विकासात्मक कामकाजामध्ये माझे सक्रीय योगदान राहील, असे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले.

‎या कार्यक्रमाला विद्यापीठातील सिनेट सदस्य, प्राध्यापक, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

भारतातील अवघ्या 1687 लोकांकडे देशाची अर्धी संपत्ती..पहा यात कोणाची किती संपत्ती

हुरुन इंडियाने आज, १ ऑक्टोबर रोजी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची M3M हुरुन रिच लिस्ट २०२५ जाहीर केली. यादीनुसार, मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंब ₹९.५५ लाख कोटींच्या एकूण संपत्तीसह यादीत अव्वल स्थानावर आहेत. गौतम अदानी आणि त्यांचे कुटुंब ₹८.१५ लाख कोटींच्या एकूण संपत्तीसह दुसऱ्या स्थानावर आहेत.

यावेळी यादीत १,६८७ व्यक्तींचा समावेश आहे. सर्व श्रीमंतांची एकत्रित संपत्ती १६७ लाख कोटी रुपये आहे, जी भारताच्या जीडीपीच्या जवळपास निम्मी आहे.

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मुकेश अंबानी अव्वल स्थानावर

कुटुंब/व्यक्तीमालमत्ताएका वर्षात मालमत्ता किती वाढली किंवा कमी झाली?
मुकेश अंबानी कुटुंब९,५५,४१० कोटी-६%
गौतम अदानी कुटुंब८,१४,७२० कोटी-३०%
रोशनी नादर मल्होत्रा ​​कुटुंब२,८४,१२० कोटीनवीन एंट्री
सायरस पूनावाला कुटुंब२,४६,४६० कोटी-१५%
कुमार मंगलम बिर्ला कुटुंब२,३२,८५० कोटी-१%
नीरज बजाज कुटुंब२,३२,६८० कोटी+४३%
दिलीप संघवी२,३०,५६० कोटी-८%
अझीम प्रेमजी कुटुंब२,२१,२५० कोटी+१६%
गोपीचंद हिंदुजा कुटुंब१,८५,३१० कोटी-४%
राधाकिशन दमाणी कुटुंब१,८२,९८० कोटी-४%

स्रोत: एम३एम हुरुन रिच लिस्ट २०२५

शाहरुख खान पहिल्यांदाच अब्जाधीशांच्या यादीत सामील झाला

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान पहिल्यांदाच अब्जाधीशांच्या यादीत सामील झाला आहे. त्याची संपत्ती ₹१२,४९० कोटी इतकी आहे. पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा पुन्हा एकदा अब्जाधीश झाले आहेत. या वर्षी भारतात १३ नवीन अब्जाधीशांची भर पडली असून एकूण संख्या २८४ झाली आहे.

या यादीतील सर्वाधिक ४५१ लोक मुंबईतील आहेत

यावेळी, १,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता असलेल्या १,६८७ व्यक्तींचा समावेश करण्यात आला. त्यापैकी २८४ नवीन नावे होती. यादीत मुंबईतील सर्वाधिक ४५१ लोक होते, त्यानंतर दिल्ली (२२३) आणि बंगळुरू (११६) यांचा क्रमांक लागतो. यादीत १०१ महिलांचाही समावेश आहे.

पुणे लोकमान्य फेस्टिवलच्या वतीने दसऱ्यानिमित्त तीस फुटी रावणाच्या प्रतिकृतीचे होणार दहन

पुणे-रावण दहनाची पूर्व तयारी म्हणून रावणाच्या मुखवट्यांचे काम लोकमान्य नगर येथील जॉगिंग पार्क या ठिकाणी सुरू आहे. यंदा 30 फुटी रावण असणार असून ओला दुष्काळ, अत्याचारी, वाढती गुन्हेगारी, बेरोजगारी अशा रूपात्मक रावणाच्या प्रतिकृतीचे दहन पुणे लोकमान्य फेस्टिवलच्या वतीने दसऱ्याच्या निमित्ताने गुरुवार २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७. ०० वा. लोकमान्य नगर जॉगिंग पार्क जवळ करण्यात येणार आहे.

अशी माहिती पुणे लोकमान्य फेस्टिव्हलचे संस्थापक अध्यक्ष ॲड. गणेश सातपुते यांनी दिली. उत्सव प्रमुख डॉ. नरेश मित्तल, निमंत्रक शुभांगी सातपुते आहेत.

शिशुपालाप्रमाणे आरएसएसचीही शंभरी भरली, मनुस्मृती व बंच ऑफ थॉटचे दहन करून संघ विसर्जित करा: हर्षवर्धन सपकाळ

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार रुपये तातडीची मदत द्या व दिवाळीच्या आधी कर्जमाफी करा.

मुंबई, दि. १ ऑक्टोबर २०२५

संविधानाने सर्व जाती धर्माच्या लोकांना, महिलांना व्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य देत सर्व क्षेत्राची दारे उघडी केली आहेत. पण भाजपाच्या राजवटीत संविधानाची पायमल्ली केली जात आहे. गरीब अधिक गरीब तर श्रीमंत अधिक श्रीमंत करण्याची व्यवस्था भाजपा केली असून त्याचे मुळ आरएसएस आहे. बहुजन समाजाचे फक्त शोषण सुरु आहे. मुठभर लोकांच्या हातात धर्मसत्ता व राजसत्ता असावी हे त्यांचे धोरण आहे. त्यांच्या या धोरणाचा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०० वर्षाच्या काळ्याकुट्ट कारभाराचा आम्ही जाहीर निषेध व धिक्कार करतो. संघाला १०० वर्षे होत आहेत, शिशुपालाप्रमाणे आरएसएसचीही शंभरी भरली आहे आता त्यांनी ‘मनुस्मृती’ व ‘बंच ऑफ थॉट’ चे दहन करून रा. स्व. संघ विसर्जित करावा, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

संविधान सत्याग्रह पदयात्रेचा आज वर्धा जिल्ह्यात प्रवेश झाला. तिसऱ्या दिवशीची पदयात्रा खडकीपासून सुरू होऊन लालवानी, वर्धा येथे पोहचणार आहे. या यात्रेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. उद्या २ ऑक्टोबर रोजी ही पदयात्रा सेवाग्राम आश्रमात दाखल होत आहे. महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरु असलेल्या या पदयात्रेत माजी मंत्री राजेंद्र मुळक, काँग्रेस नेत्या चारुलता टोकस, शेखर शेंडे वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज चांदूरकर, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अनंत मोहोड, राजेंद्र तिडके, संदेश सिंघलकर, कवी ज्ञानेश वाकुडकर, कराळे गुरुजी, शैलेश अग्रवाल, फिरोज मिठीबोरवाला, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श.प.) यांच्यासह स्वयंसेवी संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले आहेत.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला भारताचे संविधान मान्य नाही, स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष संघाच्या कार्यालयावर राष्ट्रध्वज तिरंगा फडकवला नाही. मनुस्मृतीवर देश चालावा हा त्यांचा आग्रह आहे. संविधानाने प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य दिले पण संघाने मात्र जाती धर्मात द्वेष वाढवला, त्यांनी विविधतेत एकता गुंडाळून ठेवली आहे. १०० वर्षात विषारी व विखारी विचार पेरला, माणसा-माणसात भेद केला, मंदिर प्रवेश नाकारला, स्त्री-पुरुष समानता नाकारली. संघाच्या विषारी झाडाच्या छायेत भ्रष्टाचार वाढला, बहुजन समाज नागवला गेला. आम्ही भारताचे सर्व जाती पंथाचे लोक रा. स्व. संघाच्या या १०० वर्षाच्या काळ्या कारकिर्दीचा धिक्कार करतो, निषेध करतो. १०० वर्ष पूर्ण करताना संघाने आता संविधान अंगिकारावे, महात्मा गांधींचा फोटो व संविधान संघ कार्यालयात ठेवावे तसेच रा. स्व. संघाची नोंदणी करावी, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले..

दिवाळीआधी शेतकरी कर्जमाफी द्या.
राज्यातील अतिवृष्टी व महापुरावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, शेतकरी हवालदिल आहे, पिकं नष्ट झाली आहेत. महायुती सरकारने शेतकऱ्याला दिलासा देण्याची गरज आहे, त्यांना तात्काळ मदत देणे गरजेचे आहे पण सर्वे व पंचनाम्याच्या नावाखाली सरकार वेळकाढूपणा करत आहे. सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ हेक्टरी ५० हजार रुपये द्यावेत, तर जमीन खरडून गेली आहे त्यापोटी हेक्टरी ५ लाख रुपये द्यावेत. महायुतीने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याची हीच योग्य वेळ असून दिवाळी पूर्वी कर्जमाफी करावी असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिना निमित्त कार्यक्रम व आरोग्य शिबिराचे आयोजन

पुणे, दि. १ ऑक्टोबर : ज्येष्ठ नागरिकांचे समाजातील स्थान विचारात घेता त्यांना वृद्धापकाळात सुस्थितीत जीवन व्यतीत करता यावे, तसेच त्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुस्थितीत राहावे, या उद्देशाने ऑक्टोंबर महिना राज्यात जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

याचे औचित्य साधून दि. 6 ऑक्टोबर रोजी दुपारी ११ ते २ वाजेपर्यंत, प्रादेशिक उपायुक्त, समाजकल्याण पुणे विभाग व सहायक आयुक्त, समाजकल्याण पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, येरवडा येथे “ज्येष्ठ नागरिक दिन” कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. कार्यक्रमामध्ये दोन पिढ्यांमध्ये सुसंवाद साधण्यासाठी ज्येष्ठ नागरिक व युवक यांचा मेळावा आयोजित केला जाणार आहे. तसेच, समाजकल्याण विभागाच्या वतीने विशेष कार्य केलेल्या ज्येष्ठांचा तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या बिगर-सरकारी संस्थांचा सत्कार व गौरव करण्यात येईल.

यावेळी सामाजिक न्याय भवन येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिर देखील आयोजित करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ नागरिक व संबंधित संघटनांना कार्यक्रमास व आरोग्य शिबिरासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन विशाल लोंढे, सहायक आयुक्त, समाजकल्याण पुणे यांनी केले आहे.

युनिट मुख्यालय कोटा सैनिक तांत्रिक भरती मेळावा

पुणे, दि. १ ऑक्टोबर : सेना चिकित्सा संगठन प्रशिक्षण केंद्र एवं कॉलेज, लखनऊ येथे युनिट हेडक्वार्टर्स कोटा अंतर्गत सन २०२५-२६ साठी सैनिक तांत्रिक (नर्सिंग असिस्टंट) पदाकरिता भरती मेळावा दिनांक ०४ नोव्हेंबर ते ०९ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.

ही भरती सर्व्हिसमन, माजी सैनिक , युद्ध विधवा, विधवा तसेच सेवारत जवानांचे खरे भाऊ, माजी सैनिक आणि संरक्षण सुरक्षा कोर कर्मचाऱ्यांचा मुलगा, बंधू (जे सेना चिकित्सा संगठन मधून निवृत्त झालेले आहेत) यांच्यासाठी राहणार आहे.

भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी २० ऑक्टोबर २०२५ पर्यंत uhq2025@joinamc.in या ई-मेल आयडीवर नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी झाल्यानंतर उमेदवारांना तात्पुरत्या स्वीकृतीबाबत ई-मेलद्वारे माहिती देण्यात येईल. सूचित केलेल्या दिवशी उमेदवारांनी सेना चिकित्सा संगठन स्टेडियम, लखनऊ-रायबरेली रोड येथे उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे येथे संपर्क साधावा, असे आवाहन लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै (नि.), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये केले आहे.

शालेय विद्यार्थ्यांनी केले पाटीपूजन

पुणे : विजयादशमी अर्थात दसऱ्याचे औचित्य साधून साईनाथ मंडळ ट्रस्टच्या वतीने आयोजित कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेषभूषेत सहभागी होत पाटीपूजन केले. शनिवार पेठेतील न्या. रानडे बालक मंदिराच्या सभागृहात आज (दि. 1) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

साईनाथ मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष पियूष शहा यांच्या संकल्पनेतून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दसऱ्याला पाटी-पुस्तकांचे पूजन हे ज्ञान, सरस्वती देवी आणि शिक्षणाची देवता यांचे स्मरण करण्यासाठी केले जाते. कारण हा दिवस शारदीय नवरात्रीचा एक भाग असून महासरस्वतीची उपासना केली जाते. पूजनासाठी आठ फुटी सरस्वती पाटीची रांगोळी रेखाटण्यात आली होती. त्या भोवती बसून विद्यार्थ्यांनी सामूहिक पूजा केली. राष्ट्रीय कला अकॅडमीचे अमर लांडे, रोमा लांडे यांनी रांगोळी रेखाटली होती.

पाटी पूजन अर्थात सरस्वती पूजनाद्वारे आपली संस्कृती, परंपरा जपत उत्तम आचार-विचारांचे सोने विद्यार्थांनी लुटावे, देवी सरस्वतीची कृपा असावी या करिता विद्या आणि कलेची देवता सरस्वती मातेस वंदन करावे या हेतूने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, असे मंडळाचे अध्यक्ष पियूष शहा यांनी प्रास्ताविकात सांगितले.

गंधाली शाह, वज्रलेपनकार स्वाती ओतारी, अभिषेक मारणे, सतीश नाहर, न्या. रानडे बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका अमिता दाते तसेच शिक्षिका शिल्पा पराडकर, मेघा रोंघे, रूपाली शुक्ल, सायली फाटक, सुवर्णा ढवळे उपस्थित होत्या.

अल्फा इव्हेंटस्‌‍तर्फे शनिवारी ‌‘स्वरार्चना‌’ : सायंकालीन रागांची मैफल

पुणे : अल्फा इव्हेंटस्‌‍तर्फे ‌‘स्वरार्चना‌’ ही सायंकालीन रागांची मैफल आयोजित करण्यात आली आहे. मैफल शनिवार, दि. 4 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता सेवा भवन, सी. डी. एस. एस. चौक, एरंडवणे येथे होणार आहे.

या मैफलीत ग्वाल्हेर घराण्याच्या प्रसिद्ध गायिका अपर्णा पणशीकर, ग्वाल्हेर, किराणा आणि आग्रा घराण्याची तालीम लाभलेल्या प्रसिद्ध गायिका स्मिता देशपांडे यांचे गायन होणार आहे.

संगीत कुटुंबात जन्मलेल्या स्मिता देशपांडे यांना प्रसिद्ध गायिका अलका देव-मारुलकर तसेच पंडित विवेक जोशी यांच्याकडून मार्गदर्शन लाभले आहे. पारंपरिक ग्वाल्हेर, किराणा आणि आग्रा घराण्याच्या गायकीचे सुमधुर मिश्रण हे त्यांच्या गायनाचे वैशिष्ट्य आहे.

भारतीय शास्त्रीय गायन क्षेत्रात तीन दशकांहून अधिक अनुभव असलेल्या अपर्णा पणशीकर यांना सुरुवातीस पंडित भास्करबुवा जोशी यांचे मार्गदर्शन मिळालेले असून सध्या त्या त्यांच्या मातोश्री विदुषी मीरा पणशीकर यांच्याकडे गायनाचे प्रशिक्षण घेत आहेत.

कलाकारांना लीलाधर चक्रदेव (संवादिनी), संजय देशपांडे (तबला) साथसंगत करणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. 

महावितरणमधील ग्राहकसेवेच्या कार्यालयांच्या पुनर्रचनेला आजपासून प्रायोगिक तत्वावर प्रारंभ

0

» तत्पर ग्राहकसेवा अन् कर्मचाऱ्यांच्या कामांचे विभाजन
» राज्यात १०३ नवीन कार्यालय तर ८७६ पदांची निर्मिती
» शहरी-ग्रामीणमध्ये ग्राहकसंख्येनुसार अभियंता, कर्मचारी
» कर्मचाऱ्यांना कामाचा ताण कमी, कामकाजात सुसूत्रता

मुंबई, दि. ३० सप्टेंबर २०२५: महावितरण अंतर्गत थेट ग्राहकसेवा देणाऱ्या उपविभाग व शाखा कार्यालयांची पुनर्रचना करण्यात आली आहे. या पुर्नरचनेला प्रायोगिक तत्त्वावर बुधवारी (दि. १) प्रारंभ होत आहे. येत्या महिन्याभरात कामाकाजाचा आढावा घेऊन पुर्नरचनेचा मसूदा अंतिम करण्यात येईल व दि. १ नोव्हेंबरपासून ही पुनर्रचना लागू करण्यात येईल. दरम्यान, या पुनर्रचनेच्या अंमलबजावणीच्या कालावधीत वीजग्राहकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याबाबत आवश्यक उपाययोजना करण्याचे सर्वाधिकार परिमंडलांच्या मुख्य अभियंत्यांना देण्यात आले आहेत.

महावितरण अंतर्गत १६ परिमंडलांमध्ये १४७ विभाग, ६५२ उपविभाग व ३२७४ शाखा कार्यालय तसेच ४,१८८ उपकेंद्रांमध्ये सुमारे ४४ हजार अभियंते व तांत्रिक कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये प्रामुख्याने उपविभाग व शाखा कार्यालयांद्वारे नवीन वीजजोडणी, मासिक वीजबिल, सुरळीत वीजपुरवठ्यासाठी वीज यंत्रणेची नियमित देखभाल, तांत्रिक बिघाडांची दुरुस्ती, वीजबिलांची थकबाकी वसूली, वीजहानी कमी करणे आदी कामे करण्यात येतात. त्यामुळे अभियंते व तांत्रिक कर्मचाऱ्यांना एकाच वेळी १० ते १२ प्रकारची कामे करावी लागत आहे. ही रचना सुमारे २५ वर्षांपूर्वीची आहे व त्यावेळच्या ग्राहकसंख्येनुसार करण्यात आली होती.

पूर्वीच्या रचनेचा परिणाम गेल्या काही वर्षांपासून कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर आणि ग्राहकसेवेवर देखील झालेला दिसून येत आहे. त्यामुळे सरसकट कामांचा ताण कमी करून निवडक कामांची जबाबदारी द्या अशी मागणी गेल्या १० वर्षांपासून अभियंता व कर्मचाऱ्यांच्या संघटनांद्वारे करण्यात येत होती. व्यवस्थापनाने त्यासाठी विशेष समिती स्थापन करून कर्मचारी संघटनांशी वेळोवेळी चर्चा करून पुनर्रचनेचे प्रारूप तयार केले आहे.

प्रामुख्याने थेट ग्राहकसेवा देणाऱ्या उपविभाग व शाखा कार्यालयांच्या पुनर्रचनेवर भर देण्यात आला आहे. विशेष म्हणजे शहरी, ग्रामीण व दुर्गम भागांतील ग्राहकसंख्या व भौगोलिक क्षेत्रानुसार संबंधित उपविभाग व शाखा कार्यालयांची फेररचना करण्यात आली आहे. सोबतच ग्राहकसंख्येनुसार अभियंता व तांत्रिक कर्मचाऱ्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात आणखी २ विभाग कार्यालय, ३७ उपविभाग आणि ३० शाखा कार्यालयांची नव्याने निर्मिती करण्यात आली आहे. या कार्यालयांमुळे ८७६ अभियंता व तांत्रिक कर्मचाऱ्यांची पदसंख्या देखील वाढली आहे. तर सध्या अस्त्तित्वात असलेल्या पदसंख्येत कोणतीही कपात होणार नाही. कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधाला व आरक्षणाला कोणताही धक्का बसणार नाही याची काळजी घेण्यात आल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच परिमंडल, मंडल कार्यालयांसह संलग्न इतर कोणत्याही विभागांचा या पुनर्रचनेत समावेश करण्यात आलेला नाही.

अशी आहे पुनर्रचना – महावितरणच्या विभाग कार्यालयांमध्ये कोणताही बदल न करता त्यात विभागीय देखभाल व दुरुस्ती पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. या १० सदस्यीय पथकात अतिरिक्त कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता व तांत्रिक कर्मचाऱ्यांचा समावेश असेल. विभागातील सर्व उपकेंद्र व ३३ केव्ही वीजवाहिन्यांची देखभाल व दुरुस्तीचे काम या पथकाकडे राहणार आहे. तसेच प्रत्येक विभागात सध्या अस्त्तित्वात सर्व उपविभागांचे महसूल व देयके तसेच देखभाल व दुरुस्ती अशी विभागणी करण्यात येईल. म्हणजे एका विभागात सध्या चार उपविभाग कार्यालय असल्यास पुनर्रचनेत देखभाल व दुरुस्ती तसेच महसूल व देयके असे प्रत्येकी दोन उपविभाग राहतील. देखभाल व दुरुस्ती उपविभागातील अभियंते व तांत्रिक कर्मचारी वीजयंत्रणेची देखभाल व दुरूस्तीचे कामे, नवीन वीजयंत्रणा उभारणे, वीजपुरवठ्याच्या तक्रारींचे निवारण आणि वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे कामे करतील. तर महसूल व देयके उपविभागातील अभियंते, कर्मचारी नवीन वीजजोडणी, अचूक बिलींग, बिलिंग तक्रारींचे निवारण, थकबाकी वसूली ही कामे करणार आहेत.

ग्राहकसेवेसाठी देखभाल व दुरुस्ती आणि महसूल व देयके अशी विभागणी करण्यात आल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कामांमध्ये आणखी सुसूत्रता येणार आहे. त्यांच्यावरील कामांचा ताण कमी होणार असून ग्राहकांना अधिक तत्परतेने महावितरणची सेवा मिळणार आहे. शहरी भागातील शाखा कार्य़ालयांमध्ये पुर्नरचनेत फेरबदल करण्यात आला आहे. तर ग्रामीण भागातील शाखा कार्यालयांच्या कार्यपद्धतीत अंशतः बदल करण्यात आला आहे.

या पुनर्रचनेमुळे महसूल व देयकांच्या ग्राहकसेवेसाठी तसेच सुरळीत वीजपुरवठ्यासाठी स्वतंत्र उपविभाग कार्यालयांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे अभियंते व तांत्रिक कर्मचाऱ्यांना सरसकट सर्वच कामे एकाचवेळी करण्याऐवजी आता अधिक केंद्रीत (फोकस) पद्धतीने निश्चित केलेली निवडक कामे करता येईल. कामाचे नियमानुसार तास निश्चित होतील व कामाचा ताण देखील कमी होणार आहे. कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होणार आहे. पर्यायाने वीजग्राहकांना मिळणारी ग्राहकसेवा आणखी दर्जेदार होणार आहे.

या पुनर्रचनेमधून सद्यस्थितीत कमी ग्राहकसंख्येच्या नंदुरबार, वाशीम, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यांसह ३५ उपविभागांना या पुर्नरचेनमधून वगळण्यात आले आहे. तर सध्याच्या अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे बीड, नांदेड, धाराशिव व सोलापूर जिल्ह्यांमध्ये पुनर्रचनेची अंमलबजावणी पूरग्रस्त वीज यंत्रणेची उभारणी झाल्यानंतर होणार आहे.

भुलभुलैय्या – हवेत उडणाऱ्या बसेस आणि कात्रज ते येरवडा भुयारी वाहतूक मार्ग ..

पुणे : केंद्रात कित्येक वर्षे असलेले भाजपचे नामांकित मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यात येऊन हवेत उडणाऱ्या बसेस आणण्याची वल्गना करत त्याबाबतचा डीपी महापालिका आयुक्तांना करण्यास सांगितले होते या हवेत उडणाऱ्या बसेस जशा भुलभुलैय्या ठरल्या तशाच पद्धतीने येरवडा ते कात्रज दरम्यानच्या बोगद्याची २० कि.मी. लांबीच्या बुयारी मार्गाची ७५०० कोटी रुपये खर्चाची संकल्पना देखील भूलभूलैय्या असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी येरवडा ते कात्रज दरम्यानच्या बोगद्याची संकल्पना महापालिका स्तरावर गुंडाळण्यात आली आहे. व्यवहार्यदृष्टया या बोगद्याची उपयुक्तता आणि खर्चही परवडणारा नसल्याने आम्ही या बोगद्याच्या कामाला विरोध केला असल्याची माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. या निर्णयामुळे सारसबाग ते शनिवार वाडा आणि शनिवार वाडा ते स्वारगेट दरम्यान बोगद्याची संकल्पनाही संकल्पनाच राहाणार असल्यावर यानिमित्ताने स्पष्ट होत आहे.

शहरातील वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येरवडा ते कात्रज दरम्यान भुयारी मार्गाची संकल्पना मांडली होती. पीएमआरडीएला यासंदर्भातील विस्तृत अहवाल तयार करण्याची जबाबदारी दिली होती. पीएमआरडीएने प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी मोनार्क नावाची एजन्सी नेमली आहे. नुकतेच झालेल्या पुम्टाच्या बैठकीमध्ये या अहवालाच्या प्राथमिक बाबींवर चर्चा झाली. त्यामध्ये सुमारे १८ ते २० कि.मी.लांबीच्या सहा लेन रस्त्याच्या दोन बोगद्यांच्या कामासाठी ७५०० कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे समोर आले आहे.केवळ २० कि.मी. रस्त्यासाठी ७५०० कोटी रुपये खर्च ही महापालिकेच्या दृष्टीने प्रचंड मोठा आहे. या रस्त्याचा वापर आणि उपयोगही खर्चाच्या तुलनेने अगदी कमी वाहनांना होणार असल्याने व्यावहारीकदृष्टया हा प्रकल्प परवडणारा नसल्याची माहिती अधिकारी सूत्रांनी दिली. यासंदर्भात महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी येरवडा ते कात्रज बोगदा फिजिबल नसल्याचे स्पष्ट केले. यामुळे हा प्रकल्प जवळपास गुंडाळण्यात आल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

दरम्यान, कसबा विधानसभा मतदार संघाचे आमदार हेमंत रासने यांनी देखिल मध्यवर्ती पेठांतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी बाजीराव रस्त्यावर सारसबाग ते शनिवार वाडा तसेच शिवाजी रस्त्यावर शनिवार वाडा ते स्वारगेट अशा दोन बोगद्यांतील मार्गांची संकल्पना मांडली आहे. सुरवातीला सार्वजनिक बांधकाम विभागाला या कामाचा अहवाल तयार करण्याचे आदेश देण्यात आले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने नंतर हे काम महापालिकेकडे सोपविले आहे. रासने यांनी या नियोजीत बोगद्यांच्या मार्गांची पाहाणी करण्यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना दोन महिन्यांपुर्वी कसबा मतदार संघामध्ये आणले होते. परंतू शनिवार वाड्याजवळील वाहतूक कोंडीमध्ये गडकरी यांचा ताफा अडकला. त्यामुळे गाडीतून न उतराच गडकरी तेथून परत गेले. शनिवार वाडा ही हेरीटेज वास्तू असून वाड्याच्या १०० मीटर परिसरात खोदाई तर सोडाच परंतू बांधकामाला देखिल बंदी आहे. त्यामुळे अगोदरच अडचणींचा डोंगर असलेला आणि सुमारे दोन ते अडीच हजार कोटींच्या या प्रकल्पालाही महापालिकेकडून रेड सिग्नल मिळणार हे स्पष्ट होत आहे.

पुढील पिढ्या बरबाद होऊ द्यायच्या नसतील तर मोदींच्या ‘जादू’तून बाहेर पडा- खा. असदुद्दीन ओवेसींचे भारतीयांना आवाहन

पुणे- एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जादुगारीमुळे लोकशाहीचे आणि देशाचे नुकसान होत आहे, त्यांच्या ‘जादू’ तून बाहेर पडा असे आवाहन भारतीयांना केले.असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, दिल्लीत बसून एक ‘जादूगार’ जादूचे प्रयोग करत आहे, ज्यामुळे लोकशाहीचे नुकसान होत आहे. त्यांच्या धोरणांमुळे मिलेनियल्स आणि जेनझी या दोन पिढ्या बरबाद होतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. भविष्यात या पिढ्यांना त्यांच्या चुका लक्षात येतील, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल, असेही ते म्हणाले.पुणे श्रमिक पत्रकार संघाने आयोजित केलेल्या या वार्तालाप समयी ते बोलत होते यावेळी संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील आणि सरचिटणीस मंगेश फल्ले उपस्थित होते.

युवकांना योग्य शिक्षण आणि नोकऱ्या मिळत नसून, त्यांना पेपरफुटी, पूल कोसळणे आणि भ्रष्टाचारासारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे, असे ओवेसींनी नमूद केले. श्रीमंत अधिक श्रीमंत होत असून गरीब अधिक गरीब होत आहेत. देशातील ६५ टक्के नागरिक ४० वर्षांपेक्षा कमी वयाचे असून, सध्या त्यांना ‘जादूगार’ आकर्षित करत असले तरी, भविष्यात जेव्हा हे युवक प्रश्न विचारतील, तेव्हा परिस्थिती कठीण होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

पाकिस्तानसोबतच्या क्रिकेट सामन्यावरही ओवेसींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबत व्यापार, पाणी आणि सीमा बंद केली, तरीही क्रिकेट सामना खेळवला गेला, ज्यामुळे पाकिस्तानला आर्थिक फायदा झाला, असे ते म्हणाले. क्रिकेट सामना जिंकल्यावर पंतप्रधान मोदींनी ‘ऑपरेशन सिंदूर ३.०’ असे म्हटले, यावर त्यांनी आक्षेप घेतला. शहीद जवानांच्या बलिदानाची तुलना क्रिकेट सामन्याशी करता येणार नाही, असे सांगत, भारतीय लष्कराला निधीची गरज आहे का, असा सवालही त्यांनी केला. लष्करासाठी निधी गोळा करण्याची वेळ आल्यास आपण पुण्यातून त्यापेक्षा जास्त निधी जमा करू, असेही ओवेसी म्हणाले.

गांधर्व महाविद्यालय ,अष्टभुजा देवी मंदिरात नवदुर्गेचा सांगीतिक जागर

पुणे: शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिदात्री या देवीस्तुतीतील नऊ देवींच्या रुपांचे साजेसे वर्णन करत नवदुर्गेचा सांगीतिक जागर रसिकांनी अनुभवला. रागदारी, दोन वेगवेगळ्या शैलीतून चितारलेल्या देवींच्या बालरूपातील आणि तरुणरूपातील मनमोहक चित्रांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

निमित्त होते, भाग्यश्री गोडबोले यांच्या देवींवरील स्वरचित बंदिशींच्या ‘नवदुर्गा’ सादरीकरणाचे! नवरात्रीनिमित्त अविष्कार क्रिएशन्सतर्फे शनिवार पेठेतील गांधर्व महाविद्यालय, तसेच अष्टभुजा देवी मंदिरात कलाकारांनी शास्त्रीय संगीतातील विविध रागांमधे बंदिशी सादर करीत नवदुर्गेचा जागर केला. कर्णमधुर व भावपूर्ण रागदारीने नटलेल्या या बंदिशी ऐकून श्रोते मंत्रमुग्ध झाले.

भाग्यश्री गोडबोले, प्रज्ञा देशपांडे, तेजश्री पिटके यांनी बंदिशींचे सादरीकरण केले. ज्येष्ठ संवादिनीवादक प्रमोद मराठे, तसेच त्यांची शिष्या दीप्ती कुलकर्णी यांनी संवादिनीवर, अमित जोशी यांनी तबल्यावर साथसंगत केली. अपर्णा जोशी यांनी निवेदन केले. प्रत्येक देवीचे रुप, स्वभाव लक्षात घेऊन भाग्यश्री यांनी हंसध्वनी, सरस्वती, यमन, कलावती, गौरी, हिंडोल, परमेश्वरी, नारायणी, भीमपलास या रागांत विविध तालांत बांधलेल्या बंदिशींनी रसिकांना मोहिनी घातली. माजी नगरसेविका गायत्री खडके यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

तरुणांनी पथनाट्याच्या माध्यमातून दिला मानवाधिकार जनजागृतीचा संदेश

‘मानवी हक्कांची संस्कृती रुजवावी’ – न्यायमूर्ती ए. एम. बदर

डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटीचे डॉ. डी. वाय. पाटील लॉ कॉलेज, पिंपरी मध्ये राष्ट्रीय स्तरावरील पथनाट्य स्पर्धा आणि कार्यशाळा संपन्न
पुणे – डॉ. डी. वाय. पाटील लॉ कॉलेज, पिंपरी मध्ये दोन दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील पथनाट्य स्पर्धा आणि कार्यशाळा उत्साहात पार पडली. महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग,मुंबई व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या सहकार्याने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. मानवाधिकारांविषयी जागरूकता निर्माण करण्याचा उद्देश असलेल्या या उपक्रमाला विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या दोन दिवसीय कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्राला महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाचे सदस्य (सेवानिवृत्त आयपीएस) श्री. संजय कुमार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यकारी निबंधक प्रा.(डॉ.) ज्योती भाकरे व डी वाय पाटील कला वाणिज्य विज्ञान, पिंपरी चे प्राचार्य उपस्थित होते. समारोप सत्राला राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती ए. एम. बदर यांच्यासह  प्र. कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ डॉ. पराग काळकर आणि राज्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अतिरिक्त आयुक्त श्री. संदीप दिवाण आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी महाराष्ट्र मानव हक्क आयोगाचे निबंधक श्री. विजय केदार आणि डॉ. डी. वाय. पाटील लॉ कॉलेज, पिंपरी चे प्राचार्य, डॉ. एस. एस. 

गोपाकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजक समितीचे सचिव सहा. प्रा. अर्जुन सोमवंशी, इतर आयोजक समितीचे सदस्य सहा. प्रा. डॉ विजेता चौधरी, सहा. प्रा.समृद्धी शाह, सहा. प्रा. प्रदीप केंद्रे, सहा. प्रा. डॉ. अंजुम अजमेरी,ऍड. विवेक भरगुडे व इतर सर्व शिक्षकांनी  विशेष मेहनत घेतली.पथनाट्याच्या माध्यमातून, विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणिवा अधोरेखित करणारी आणि समाजात न्याय, समानता व समावेशकतेचे महत्त्व सांगणारी कथानके मोठ्या ताकदीने सादर केली. त्यांनी जटिल कायदेशीर संकल्पना आणि मानवी हक्कांचे महत्त्व आकर्षक आणि थेट संवादातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवून उत्स्फूर्त दाद मिळवली. या स्पर्धेने युवकांना रंगभूमीच्या प्रभावी वापराद्वारे सामाजिक बदलाचे वाहक बनण्याचा संदेश दिला.या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेची मध्यवर्ती थीम ‘बदलत्या जगात मानवी हक्क: नवीन आव्हानांना तोंड देणे आणि सामायिक जबाबदाऱ्या स्वीकारणे’ ही होती. सहभागी विद्यार्थ्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य, लिंग समानता, सामाजिक-आर्थिक हक्क, लोकशाही मूल्ये आणि तंत्रज्ञानामुळे निर्माण होणारी आव्हाने यांसारख्या गंभीर उपविषयांवर आधारित प्रभावी पथनाट्ये सादर केली.

‘मानवी हक्कांची संस्कृती रुजवावी’ – न्यायमूर्ती ए. एम. बदर
कार्यक्रमाच्या समारोप सत्रात महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती ए. एम. बदर यांनी पथनाट्याचे महत्त्व स्पष्ट केले. ते म्हणाले, “मानवी हक्क हा न्याय्य आणि लोकशाही समाजाचा आधारस्तंभ आहेत. ते प्रत्येक व्यक्तीच्या प्रतिष्ठेचे, समानतेचे आणि स्वातंत्र्याचे प्रतिनिधित्व करतात. कायद्याचे आणि संस्थांचे अस्तित्व या अधिकारांच्या संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण आहे, परंतु प्रत्येक नागरिक त्यांच्या हक्कांना ओळखण्यास, आदर करण्यास आणि त्यांचे संरक्षण करण्यास सक्षम व्हावा यासाठी तळागाळापर्यंत जागरूकता पसरवणे तितकेच महत्त्वाचे आहे. सामाजिक जाणीव निर्माण करण्यात पथनाट्याने ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. हे माध्यम भाषा, साक्षरता आणि वर्ग-भेद यांसारख्या अडथळ्यांना भेदून जटिल समस्या सामान्य लोकांसाठी सुगम बनवते. ही स्पर्धा केवळ कलात्मक प्रतिभा दर्शवणारी न ठरावी, तर आपल्या समाजात मानवी हक्कांची संस्कृती रुजवणारी ठरावी.”डॉ. डी. वाय. पाटील लॉ कॉलेजचे प्राचार्य, डॉ. एस. एस. गोपाकुमार यांनी या उपक्रमाच्या उद्देशाबद्दल बोलताना सांगितले की, “पथनाट्य विद्यार्थ्यांना कायदेशीर हक्क आणि कर्तव्यांच्या गुंतागुंती सर्जनशीलपणे व्यक्त करण्यासाठी एक गतिमान व्यासपीठ प्रदान करते. या माध्यमातून विद्यार्थी केवळ त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन करत नाहीत, तर सकारात्मक बदलांना प्रेरणा देऊन आपल्या समवयस्कांना सक्षम बनविण्यात हातभार लावतात.”या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमाने तरुण पिढीला न्याय, समानता आणि मानवी सन्मानाचे मूल्ये समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रेरित केले, ज्यामुळे मानवी हक्कांचे संरक्षण ही सामूहिक जबाबदारी आहे, हा संदेश अधिक ठळकपणे अधोरेखित झाला.

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांतील महाराष्ट्राच्या खेळाडूंना वैद्यकीय विमा कवच देण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करा

0
  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला क्रीडा विभागाच्या विविध योजनांचा आढावा

मुंबई, दि. 30 : महाराष्ट्रातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्याची सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या राज्यातील क्रीडापटूंना वैद्यकीय विमा कवच उपलब्ध करून देण्यासाठी क्रीडा विभागाने तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात क्रीडा विभागाची आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, क्रीडा आयुक्त शितल तेली-उगले, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील (दूरदृष्यप्रणालीद्वारे), क्रीडा विभागाचे पुणे विभागाचे उपसंचालक माणिक पाटील, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगावकर, असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रदीप गंधे, जय कवळी, अदिल सुमारिवाला यांच्यासह विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, क्रीडा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या विविध विभागांच्या ताब्यात असलेली खेळांची मैदाने क्रीडा विभागाकडे वर्ग करण्याचा प्रस्ताव तयार करून तो मंत्रिमंडळासमोर मांडावा. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी प्रावीण्य प्राप्त खेळाडू व क्रीडा संघटनांचा समावेश करण्यासाठी शासन निर्णयात सुधारणा कराव्यात. तसेच महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन आणि राज्यातील मान्यताप्राप्त क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी शासनाच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घ्यावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात प्रतिभासंपन्न खेळाडू घडविण्यासाठी तसेच खेळाडूंची राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी सुधारण्यासाठी क्रीडा क्षेत्राला पायाभूत सुविधा, अत्याधुनिक साहित्यांसह मार्गदर्शकांसाठी आवश्यक असणारा निधी कमी पडू दिला जाणार नाही. राज्यात क्रीडा सुविधा निर्मितीसाठी सर्वसमावेशक धोरण तयार करणे आवश्यक आहे. क्रीडा क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या राज्याप्रमाणे महाराष्ट्रात मिशन लक्षवेध’ योजना प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

टपाल विभागाने इनलॅंड स्पीड पोस्ट दरात बदल जाहीर केला आणि नवीन सुविधा सादर केल्या

0

मुंबई, 30 सप्‍टेंबर 2025

भारतीय टपाल खात्याने स्पीड पोस्ट ही सेवा ०१  ऑगस्ट १९८६  रोजी सुरू केली. देशभरातील पत्रे व पार्सल जलद व विश्वासार्ह पद्धतीने पोहोचविण्याच्या उद्देशाने ही सेवा आरंभ करण्यात आली. इंडिया पोस्टच्या आधुनिकीकरणाच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून सुरू झालेल्या या सेवेमुळे वेळेत, कार्यक्षम व सुरक्षित पद्धतीने मेल वितरण शक्य झाले. कालांतराने स्पीड पोस्ट ही भारतातील सर्वाधिक लोकप्रिय आणि विश्वासार्ह टपाल सेवा ठरली असून खाजगी कुरिअर कंपन्यांना समर्थपणे टक्कर देत आहे.

आरंभापासूनच स्पीड पोस्टने ग्राहकांच्या बदलत्या गरजांनुसार स्वतःमध्ये सातत्याने सुधारणा केल्या आहेत. देशातील पसंतीची वितरण सेवा म्हणून स्थान अधिक दृढ करण्यासाठी आता या सेवेत खालील नव्या सुविधा समाविष्ट करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे विश्वसनीयता, सुरक्षा आणि ग्राहकसुविधा आणखी वाढतील:

  • ओटीपीआधारित सुरक्षित वितरण
  • ऑनलाईन पेमेंट सुविधा
  • लघु संदेशाद्वारे (एसएमएसवितरण सूचना
  • सोयीस्कर ऑनलाईन बुकिंग सुविधा
  • रिअल टाईम वितरण माहिती
  • ग्राहक नोंदणीची सुविधा

इनलॅंड स्पीड पोस्ट पत्र पाठविण्याचा दर ऑक्टोबर २०१२  मध्ये सुधारित करण्यात आला होता. सातत्याने सुधारणा घडवून आणणे, वाढत्या कार्यकारी खर्चाची पूर्तता करणे आणि नवीन नवोन्मेषात गुंतवणूक करण्यासाठी स्पीड पोस्ट चे दर आता तर्कसंगत रीतीने पुनर्निर्धारित करण्यात आले आहेत. सुधारित दर ०१ ऑक्टोबर २०२५ पासून लागू होतील, याबाबतची अधिसूचना गॅझेट नोटिफिकेशन क्र4256 दि25.09.2025 द्वारे जारी करण्यात आलेली आहे.

सुधारित दर संरचना पुढीलप्रमाणे आहे:

वजन / अंतरस्थानिक200 कि.मीपर्यंत201–500 कि.मी.501–1000 कि.मी.1001–2000 कि.मी.2000 कि.मीपेक्षा जास्त
५० ग्रॅमपर्यंत194747474747
५१ – २५० ग्रॅम245963687277
२५१ – ५०० ग्रॅम287075828693

स्पीड पोस्ट अंतर्गत मूल्यवर्धित सेवेत ‘नोंदणी’ (रजिस्ट्रेशनची सुविधा देखील उपलब्ध आहे. ही सेवा कागदपत्रे व पार्सल दोन्हींसाठी लागू आहे. ग्राहकांना प्राप्तकर्त्यासाठी विशेषतः पत्यामध्ये दिलेल्या प्राप्तकर्त्यास सुरक्षित वितरणाची सुविधा मिळेल, जी विश्वास व गती यांचा संगम घडवून आणण्यासाठी डिझाईन करण्यात आलेली आहे.  प्रत्येक स्पीड पोस्ट वस्तूसाठी (कागदपत्र/पार्सल) ₹ /- इतका नाममात्र शुल्क तसेच लागू असलेला जीएसटी आकारला जाईल. ‘नोंदणी’ या मूल्यवर्धित सेवेअंतर्गत संबंधित वस्तू केवळ प्राप्तकर्त्यास किंवा त्याने विधिवत अधिकृत केलेल्या व्यक्तीसच सुपूर्द केली जाईल.

याचप्रमाणे, ‘वनटाईम पासवर्ड (ओटीपीडिलिव्हरी या मूल्यवर्धित सेवेअंतर्गत देखील प्रत्येक स्पीड पोस्ट वस्तूसाठी (कागदपत्र/पार्सल) ₹ /- तसेच लागू जीएसटी आकारला जाईल. या सुविधेत वितरण कर्मचारी प्राप्तकर्त्यास दिलेला ओटीपी यशस्वीरीत्या पडताळल्या नंतरच वस्तू सुपूर्द केली जाईल.

विद्यार्थ्यांसाठी स्पीड पोस्ट सेवांची उपलब्धता वाढविण्यासाठीस्पीड पोस्ट दरांवर १०सवलत देण्यात आली आहे. याशिवाय, नवीन मोठ्या ग्राहकांसाठी विशेष सवलत उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या सर्व उपक्रमांचा उद्देश इंडिया पोस्टला अधिक सुरक्षितपारदर्शक आणि तंत्रज्ञानसक्षम सेवा प्रदाता म्हणून विकसित करणे हा आहे. शाश्वत नवोन्मेष व विश्वास दृढ करणाऱ्या सुविधांची अंमलबजावणी करून, स्पीड पोस्ट ग्राहकांच्या बदलत्या गरजेनुसार स्वतःला अनुकूल करत राहील आणि देशातील सर्वात विश्वासार्ह व परवडणारा वितरण भागीदार म्हणून आपले स्थान पुनःप्रस्थापित करील.