Home Blog Page 108

गांधी भवन मध्ये माजी न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते ‘गांधी सप्ताहा’चे उद्घाटन


पुणे _
२१ व्या शतकात विज्ञाननिष्ठ दृष्टी अंगीकारणे महत्वाची आहे. विज्ञानाने आज आपले दैनंदिन जीवन व्यापून टाकले आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन हा प्रत्येक गोष्ट शोधक वृत्ती आणि सुधारणावाद यामुळे पुढे येतो. वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे म्हणजे धार्मिक विरोध नाही. जसा काळ बदलला आहे त्याप्रमाणे धर्मात देखील वेळोवेळी सुधारणा झाल्या आहे. मानवाच्या कल्याण आणि सुसंस्कृत जगण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन आवश्यक आहे असे मत सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक यांनी व्यक्त केले.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोबर रोजी ‘जागतिक अहिंसा दिन’ म्हणून साजरी केली जाते. त्यानिमित्त महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत गांधी भवन, कोथरूड येथे आठ दिवसांचा ‘गांधी सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाचे यंदाचे १४वे वर्ष आहे. याचे उद्घाटन बुधवारी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते गांधी भवन येथे करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सिम्बायोसिसचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार,अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी, जेष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख, विश्वस्त अन्वर राजन, उल्हास पवार, अभय छाजेड, एम.एस.जाधव, गोपाळ गुणले ,बौद्ध धर्मगुरू भंते सुदर्शन, मुस्लिम धर्मगुरू इसाक शेख, जैन श्रावक रेणुका कांकरिया, शीख धर्मगुरू पुनीत कौर, ख्रिश्चन धर्मगुरू प्रदीप चांदेकर, ज्यू धर्मगुरू योसेफ नोगावकर, हिंदू धर्मगुरू घैसास गुरुजी उपस्थित होते.
संविधान उद्देशिका अभिवादन नंतर सर्वधर्म प्रार्थना याप्रसंगी पार पडली.लेखक मामासाहेब देवगिरीकर लिखित ” सरदार वल्लभभाई पटेल” पुस्तक आणि लेखक जे.आर.कोकंडाकर लिखित ” गांधी विचारांचे महत्व” या पुस्तकांचे प्रकाशन यावेळी पार पडले.याप्रसंगी ‘नागरिकांची संविधानिक कर्तव्ये’ या विषयावर न्या. ओक यांचे व्याख्यान पार पडले.

न्या. ओक म्हणाले,महात्मा गांधी यांच्या वागणूकी मधून दुसऱ्याचा विचारांचा सन्मान करणे हे दिसून येते. हल्ली आपण रामराज्य म्हणतो त्यावेळी वेगळा विचार मांडला जातो. राम हे प्रतीक म्हणून गांधी यांनी शब्द वापरला, “हिंदू राज्य” असे त्यांना अभिप्रेत नव्हते. आदर्श राज्याची कल्पना त्यांनी मांडली होती. कराची काँग्रेसने १९३१ मध्ये फाशीची शिक्षा असू नये असा ठराव केला होता. मी अनेक वर्ष न्यायालयात काम केल्यामुळे सांगू शकतो की, फाशीची शिक्षा असू नये. मूलभूत कलम घटनेत आणले गेले ते मूलभूत स्वातंत्र्य कमी करण्यासाठी आणले गेले अशी काही चर्चा आहे. परंतु ५१ अ कलम मध्ये मूलभूत कर्तव्याचा समावेश असल्याने ते खूप महत्त्वपूर्ण आहे त्यात संविधान पालन करण्यास सांगण्यात आले आहे. व्यक्ती स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य घटनेने दिले आहे. आपले विचार मांडणे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मध्ये येते. सन्मानाने जगण्यासाठी अर्थपूर्ण स्वातंत्र्य करिता नाटक, सिनेमा, व्याख्यान हे हवे आहे. माझ्या स्वातंत्र्य प्रमाणे दुसऱ्याच्या स्वातंत्र्याचा देखील विचार करून मानसन्मान केला पाहिजे.घटनेचा सन्मान करणे हे शासन व्यवस्थेचे सामूहिक कर्तव्य आहे. विचारांचे स्वातंत्र्य नसेल तर कलम ३१ ला कोणता अर्थ राहत नाही.गांधी यांचा विचारा बद्दल वेडेवाकडे विचार आज मांडले जातात कारण, आपल्याकडे विचार स्वातंत्र्य आहे त्यामुळे प्रत्येकजण आपली भावना मांडतो.घटनेचे पालन केले गेले पाहिजे त्याचा विसर पडला नाही पाहिजे. सामंजस्य आणि बंधुभाव हे तत्व गांधी यांनी सांगितले होते.ध्वनी, पाणी ,वायू , पर्यावरण प्रदूषण आहे तसे विचार प्रदूषण आहे त्याबाबत देखील विचार व्हावा. नदी प्रदूषण हे धार्मिक कारणाने होते याबाबत अनुभव आपल्याला मागील वर्षी पाहावयास मिळाले. कोणत्याही धर्मात नदीचे प्रदूषणबाबत सांगण्यात आले नाही. आपल्या अवतीभोवती किती हवा प्रदूषित झाली आहे त्याचा अनेकांना त्रास होत आहे. आपण पर्यावरणाचा ऱ्हास करतो कारण विकासाच्या कल्पना आपल्या चुकीच्या आहे. खरा विकास म्हणजे शहरात सर्वसामान्य व्यक्ती स्वस्तात घरे विकत घेऊ शकतो, सार्वजनिक वाहतूक सक्षम, आरोग्य सुविधा चांगल्या, उत्तम राहण्यासाठी वातावरण या गोष्टी महत्वाच्या आहे. अनेक तलाव नष्ट होत असून शहरा बाहेर कचरा डोंगर सध्या उभे केले जात आहे त्यामुळे रोगराई वाढून प्रदूषण वाढते. प्रदूषण टाळून पर्यावरण संवर्धन करणे आवश्यक आहे.

डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी सांगितले की, माझा आणि कुमार सप्तर्षी यांचा संबंध जुना असून त्यावेळी ते गांधीवादी नव्हते. युक्रांद संस्था मध्ये ते आक्रमक काम करत होते. अनेक न्यायाधीश निवृत्ती नंतर आराम करतात किंवा विविध ठिकाणी फिरतात. पण न्या. ओक हे लोकात फिरून त्यांच्या भावना जाणून घेत आहे ही उल्लेखनीय बाब आहे. सन १९२० ते १९४७ दरम्यान महात्मा गांधी देशातील प्रमुख घटनेत अग्रेसर होते. ब्रिटिशपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सत्य,अहिंसा,उपोषण, सत्याग्रह याचा शस्त्रासारखा अवलंब करून त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. गांधी हे दूरदर्शी नेते होते त्यांनी आपल्या विचारांचे चांगल्या प्रकारे मार्केटिंग केले. स्वतःचा वेश बदल केला, शेळीचे दूध पिणे सुरू केले, आश्रमात राहण्यास गेले, चरखा वापर, स्वदेशी वापर सुरू केला. टिळक, सावरकर काळात महिला स्वातंत्र्य चळवळीत दिसून येत नव्हत्या पण गांधी यांनी महिलांचा सहभाग स्वातंत्र्य चळवळीत प्रभातफेरीद्वारे करून घेतला. गांधी विचारांना देश विसरत चालला आहे. आपले पाश्चातीकरण केवळ ब्रिटिश यांच्यामुळे झाले नाही तर इतर देशांमुळे देखील झाले. गांधी हे मोठे नेते होते आणि आपण त्यांच्याकडून काय शिकवण घेतली हे पाहणे महत्वाचे आहे.

कुमार सप्तर्षी म्हणाले, धर्म म्हणजे माणसाला माणसासाठी जे सांगितले जाते तो असतो. त्याविरुद्ध वागणे म्हणजे अधर्म आहे. न्याय सामान्य माणसांना समजेल असे सांगणे हे काम सध्या न्या.ओक करत आहे. हिंदू म्हणजे अहिंसा आणि प्रेम आहे. पण राष्ट्रवाद म्हणून सध्या वेगळे स्वरूप अंधभक्तद्वारे स्पष्ट होत आहे.

सोनम वांगचुक यांची लवकर सुटका व्हावी

लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, गांधी हत्या नंतर देशातील प्रमुख नेत्यांची बैठक झाली आणि देशभरात गांधी भवन उभारण्याचा निर्णय झाला. गांधी विचार समाजात रुजवा यासाठी याद्वारे प्रयत्न करण्यात आले. पुण्यातील गांधी भवन एक सांस्कृतिक भवन म्हणून नावारूपास आले. आजच्या काळातील प्रश्नांचे उत्तर गांधी विचार मधून मिळवण्याचा प्रयत्न जागर द्वारे करण्यात येत आहे.
गांधी विचार यासाठी काम करणारे आजचे नेते सोनम वांगचुक यांना बेकायदेशीर अटक झाली आहे. त्यांची लवकर सुटका झाली पाहिजे. गांधी विचार अमर असून सत्याचा नेहमी विजय होत असतो. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक म्हस्के यांनी तर आभार प्रदर्शन अन्वर राजन यांनी केले. मोहिनी पवार यांनी पसायदान गाऊन कार्यक्रमाची सांगता केली.

रंगकर्मींनी शस्त्रांचे नव्हे तर शब्दांचे पूजन करावे

प्रसिद्ध रंगकर्मी अतुल पेठे यांचे प्रतिपादन

‘भरत करंडक एकांकिका स्पर्धे’चा पारितोषिक वितरण सोहळा

पुणे : जगभरात आज कित्येक ठिकाणी शस्त्रास्त्रांचा वापर होत आहे. निवडक धनाढ्यांच्या गरजेसाठी लढाया केल्या जात आहेत. पण रंगकर्मींचे शस्त्र म्हणजे शब्द आहे. त्यामुळे आपण शस्त्रांचे नव्हे तर शब्दांचे पूजन केले पाहिजे, असे प्रतिपादन प्रसिद्ध रंगकर्मी अतुल पेठे यांनी बुधवारी येथे केले.
भरत नाट्य मंदिर संशोधन मंदिर ही संस्था विजयादशमीच्या दिवशी कलाप्रवासाची १३१ वर्षे पूर्ण करत आहे. या वर्धापनदिनाचे औचित्य साधून भरत करंडक एकांकिका स्पर्धेचे पारितोषिक वितरण आणि संस्थेचे दसरा महोत्सवांतर्गत देण्यात येणारे संस्था कलाकार पुरस्कार, अशा दुहेरी समारंभात ते बोलत होते. ज्येष्ठ सनदी लेखापाल विजयकांत कुलकर्णी हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
संस्थेच्या सदाशिव पेठ येथील नाट्यगृहात सायंकाळी हा कौतुक सोहळा साजरा झाला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग मुखडे, कार्याध्यक्ष अभय जबडे, उपाध्यक्ष भाग्यश्री देसाई आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

चिन्मय कटके (उत्कृष्ट नाट्य कलाकार), स्वानंद नेने (उत्कृष्ट संगीत वादक), रावी पागे (सर्वोत्कृष्ट बालकलाकार), दीपकराज दंडवते (संस्था कलाकार – नियोजन), प्रियांका गोगटे (गुणवंत संस्था कलाकार), राजन कुलकर्णी (संस्था नाट्य कलाकार), भालचंद्र कुलकर्णी (नाट्यसमीक्षक – अभ्यासक) आणि रवींद्र खरे (नाट्यविषय़क कारकीर्द) या पुरस्कारांचे या समारंभाच्या पूर्वार्धात वितरण करण्यात आले. तसेच पडद्यामागील कलाकारांच्या सुतार आणि सुधीर फडतरे यांच्या पाल्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले. सामाजिक सेवाभावी संस्थांना देण्यात येणारे प्रत्येकी २५ हजार रुपयांचे अनुदान मुख्यमंत्री सहायता निधी आणि रेणू गावस्कर यांच्या एकलव्य न्यास यांना देण्यात आले. नेमिनाथ मरसुते यांना रसिक सन्मान तर विश्वास पांगारकर यांना कार्यसन्मान देऊन गौरव करण्यात आला.

अतुल पेठे पुढे म्हणाले, “तेच ते करत राहिलो तर कुणीच पाहणार नाही. त्यामुळे नाटकात प्रयोग असलेच पाहिजेत. नव्या नाटकवाल्यांनी प्रयोग करायला शिकले पाहिजे. मात्र, अलीकडे नाटकाची ही जाण आणि जाणीव, दोन्ही दिसत नाही. एक विचित्र झिंग समाजाला आली आहे, असे वाटते. आपला ८० टक्के समाज मानसिकदृष्ट्या आजारी आहे. ताणतणावग्रस्त, दडपण, दबाव, स्पर्धा, आव्हाने… त्यांचे समुपदेशन करण्याची गरज आहे, त्यासाठी नाटक ही उत्तम थेरपी आहे. फक्त नाटकातच तुम्हाला स्वतःमध्ये डोकावण्याची संधी मिळते. असे आत शिरणे शिकण्यासाठी नाटक करायचे असते. नाविन्याचे स्वागत करणे, नाविन्याला सामोरे जाणे, नव्या गोष्टींचे अर्थनिर्णयन करणे, आवश्यक आहे. आज पुण्या-मुंबईसारख्या मोठ्या शहरांचा अपवाद करता, राज्यात इतरत्र नाटकाची अवस्था भीषण आहे. त्यामुळे स्पर्धांमधून मोठ्या संख्येने भाग घ्या, नाटक करत राहा. त्यातील सबटेक्स्ट समजून घ्या. समकालीन संदर्भ ताजे ठेवा. नाटकाची आणि नव्या प्रयोगांची जोपासना आवश्यक आहे”.

सीए विजयकांत कुलकर्णी म्हणाले, “भरत नाट्य संशोधन मंदिरासारखी संस्था माईलस्टोन आहे. त्यामुळे नाटकाला, रंगकर्मींना दिशा मिळते. कुठलीही कला एका दिवसात अवगत होत नाही. वर्षानुवर्षांची साधना आणि परंपरेचे संचित त्यासाठी लागते. तब्बल १३१ वर्षांचा असा वारसा भरतकडे आहे. संस्था आपल्या कलाकारांचा असा सन्मान करते, सामाजिक सेवा पुरस्कार देते, हे लक्षणीय आहे. संस्थेने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिलेल्या निधीत मी २६ हजारांची भर घालून, एकूण ५१ हजारांचा निधी या कार्यासाठी देऊ”, असे ते म्हणाले.

परीक्षकांच्या वतीने अरुण पटवर्धन आणि गौरी लोंढे यांनी मनोगत मांडले. ‘स्पर्धकांनी एकांकिकेची रंगीत तालीम मोठ्या प्रमाणात केली पाहिजे, नेपथ्य, संगीत या पूरक घटकांचा योग्य वापर केला पाहिजे. ज्येष्ठ स्पर्धकांनी आधी तरुणाईचे काम पाहिले पाहिजे’, असे त्यांनी सुचवले.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व एकलव्य न्यासाच्या रेणू गावस्कर म्हणाल्या, ‘४० वर्षांपासून हे कार्य सुरू आहे, ते समाजातील संवेदनशील मनांमुळेच. मदतीचे हात वेळोवेळी मिळत गेले आहेत. मात्र, आजही आपल्या संस्थेत थोड्याच मुलांसाठी आपण काम करू शकतो. अजूनही कित्येक मुले रस्त्यावरच आहेत. ती समाजाच्या मुख्य धारेत कशी येतील, हा विचार सतत असतो. पण समाजाविषयी कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक वाटते’.

संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग मुखडे यांनी स्वागतपर प्रास्ताविक केले.अभय जबडे यांनी परिचय करून दिला. स्पर्धेचे परीक्षक अरुण पटवर्धन, सुप्रिया गोसावी, गौरी लोंढे यांचा सत्कार करण्यात आला. अविनाश ओगले यांनी आभार मानले. वैद्य प्रचीती सुरू यांनी सूत्रसंचालन केले.


वामन आख्यान ठरले करंडकाचे मानकरी

भरत करंडक एकांकिका स्पर्धेत मॉडर्न महाविद्यालयाच्या वामन आख्यान या एकांकिकेने प्रथम क्रमांकाचा मान पटकावला. १० हजार रुपये, प्रशस्तिपत्रक आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. रेवन एन्टरटेन्मेंट च्या पेडल टू द मेडल, या एकांकिकेला द्वितीय क्रमांक मिळाला. ७ हजार रुपये, प्रशस्तिपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पीव्हीजी अभियांत्रिकी तंत्रज्ञान व्यवस्थापन महाविद्यालयाच्या कोयता या एकांकिकेने तृतीय क्रमांक मिळवला. ५ हजार रुपये, प्रशस्तिपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. याशिवाय सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या झांगडगुत्ता या एकांकिकेला सांघिक उत्तेजनार्थ आणि वसंतदादा पाटील इन्स्टिटूट ऑफ टेक्नालाॅजीच्या देव रोकडा सज्जनी या एकांकिकेला सांघिक उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.

वैयक्तिक पारितोषिकांचे मानकरी असे –

अन्वी बनकर, अनिकेत सकपाळ (लेखन प्रथम), प्राज्वल पडळकर (लेखन द्वितीय) मुकुल ढेकळे (लेखन उत्तेजनार्थ)

अनिकेत खरात व विराज दिघे (दिग्दर्शन प्रथम), रूपेश रवींद्र (दिग्दर्शन द्वितीय), अथर्व किरवे (दिग्दर्शन उत्तेजनार्थ)

प्राज्वल पडळकर (अभिनय पुरुष प्रथम), पार्थ खंडागळे (अभिनय पुरुष द्वितीय), श्रीपाद दुचके (लक्षवेधी अभिनय), केतकी भालवणकर (अभिनय स्त्री प्रथम) आणि अन्वी बनकर (अभिनय स्त्री द्वितीय)

मगरपट्टा मार्वल फिगो इमारतीतील कॉल सेंटरवर छापा;चालक-मालकांसह ३२ कर्मचारी ताब्यात


पुणे: अमेरिकन नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या मगरपट्टा रस्त्यावरील अनधिकृत कॉल सेंटरवर छापा टाकून पोलिसांनी मुख्य चालक-मालकांसह ३२ जणांना ताब्यात घेतले आहे. गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या पथकाने केलेल्या या कारवाईत बुधवारी (ता.३०) मार्वल फिगो इमारतीमधील तीन कार्यालयांमधून १५ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मगरपट्टा परिसरातील मार्वल फिगो इमारतीमध्ये कॉल सेंटरमधून नागरिकांची फसवणूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे आणि सहाय्यक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली.

या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॉल सेंटरचे चालक-मालक निर्मल अजय शहा (वय ३८, रा. कुमार पिकासो सोसायटी, हडपसर), अतुल प्रवीण श्रीमाळी (वय ३०, रा. लेबरनम पार्क सोसायटी, मगरपट्टा) आणि युगंधर संजय हादगे (वय ३४, रा. शिवकृष्ण हाउसिंग सोसायटी, मांजरी बुद्रूक) अशी गुन्हा दाखल केलेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी कॉल सेंटरमधील २९ कर्मचाऱ्यांसह ३२ जणांना ताब्यात घेतले असून, इतर दोघांचा शोध सुरू आहे.

सीझन मॉलजवळील मार्वल फिगो इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील ४०१०, ४०२० आणि ४०३० या क्रमांकांच्या कार्यालयात अवैधरीत्या कॉल सेंटर सुरू होते. या सेंटरचे चालक आणि कर्मचारी अमेरिकेतील ज्येष्ठ नागरिकांच्या मोबाईल, लॅपटॉप व संगणकात मालवेअर (पॉपअप) टाकून त्यांना घाबरवत असत.

नंतर त्यांना कॉल करून बँक खात्यांमधील माहिती व क्रेडिट कार्ड तपशील चोरीची भीती दाखवून अँटिव्हायरस अॅप, प्रोटेक्शन सेटिंग्जच्या नावाखाली क्रिप्टोकरन्सी स्वरूपात पैसे उकळत असत. या छाप्यात २९ लॅपटॉप, २० संगणक, ४१ मोबाईल, ७ राऊटर आणि इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य असा १५ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

युनिट पाचचे पोलिस निरीक्षक संजय पतंगे यांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक अमोल रसाळ, छबू बेरड, प्रमोद खरात, संतोष तानवडे, अभिजित पवार यांच्यासह २५ हून अधिक पोलिस अंमलदारांनी कारवाईत सहभाग घेतला. अशा सायबर गुन्ह्यांवर प्रतिबंध घालण्यासाठी संबंधित आर्थिक व्यवहार, क्रिप्टो वॉलेट्स आणि आरोपींचे परदेशी कनेक्शन तपासण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांच्या दामिनी पथकाने सातवीतील मुलीच्या लग्नाचा विचार करणार्‍या कुटुंबीयांचे केले मनपरिवर्तन…

पुणे : मुलीने उच्च शिक्षण घेऊन स्वतः च्या पायावर उभे राहावे, यासाठी केंद्र आणि राज्य सरकारमार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. मात्र तरी देखील शहरी आणि ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी महागाई आणि घरची परिस्थिती हलाखी ची असल्याने आणि शिक्षणही महाग झालेले आहे मुलींना एक तर घरातील काम किंवा लग्न लावून दिल्याच्या घटनासमोर आल्या आहेत.

अशीच घटना विद्येच माहेरघर म्हणून ओळख असणार्‍या पुण्यात होता होता राहून गेली आहे. इयत्ता ७ वी मध्ये शिक्षण घेणार्‍या मुलीच्या शिक्षणाचा खर्च परवडत नाही. त्यामुळे तिचे शिक्षण बंद करून दिवाळीनंतर लग्न लावून देण्याच्या विचारात तिचे कुटुंबीय होते. पण त्या कुटुंबीयांचे पुणे पोलिसांच्या शिवाजीनगर पोलिस स्टेशनमधील दामिनी पथकातील सोनाली हिंगे यांनी समुपदेशन केल्याने लग्न रोखणे शक्य झाले आहे. यामुळे ती मुलगी आता पुन्हा एकदा शाळेत जाऊ शकणार आहे. तर दुसर्‍या बाजूला सोनाली हिंगे यांच्या कार्याच सर्व स्तरातून विशेष कौतुक केल जात आहे.

याबाबत सोनाली हिंगे यांच्याशी संवाद साधला असता त्या म्हणाल्या, आमच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका शाळेतील शिक्षकांचा फोन आला की, आमच्या शाळेत इयत्ता ७ वी मध्ये एक मुलगी आहे. ती खूप हुशार आहे. पण मागील आठ ते दहा दिवसापासून ती शाळेत आली नाही. तिच्या मैत्रिणीकडून समजले की, तिचे लग्न लावण्याचा तिचे आई आणि वडील विचार करीत आहे. याबाबत माहिती मिळताच,आमचे वरीष्ठ निरीक्षक महेश बोळकोटगी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या मुलीच्या घरी गेलो.त्या कुटुंबीयाकडे चौकशी केली असता ते कुटुंब बीड येथून चार वर्षांपूर्वी कामानिमित्त पुण्यात आले. त्यानंतर शहरातील फुटपाथवर मुलीचे वडील वस्तू विक्री आणि आई घरकाम करते.त्यातून त्यांचे घर चालते,तर त्यांना चार मुली असून चार मुलीपैकी मोठी मुलगी ही इयत्ता 7 वी मध्ये आहे. तर तिचेच लग्न ठरविण्याचे नियोजन दसरा झाल्यावर गावी जाऊन दिवाळीमध्ये लग्न करणार होते, अशी माहितीसमोर आली. मुलींच्या शिक्षणाचा खर्च परवडत नसल्याने तिला शाळेत पाठवण्यापेक्षा तिला मुलगा शोधून लग्न लावून देण्याचा सल्ला तिच्या पालकांना त्यांच्या नातेवाईकांनी दिला होता.त्यामुळे आम्ही तिची शाळा बंद करुन तिला घरी ठेवले,अशी कबुली मुलीचे वडील आणि आईने दिली.

शिक्षणाने एक पिढी घडते, परिस्थिती सुधारते. जर तुम्ही चुकीचा निर्णय घेतला,तर मुलींच आयुष्य सुद्धा मोल मजुरीमध्ये जाईल हे सांगितले.कमी वयात लग्न लावून दिल्यास आम्ही आई आणि वडील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक करू असे सांगितले असता, ती मुलगी रडायला लागली आणि माझ्या पप्पाना पकडून घेऊन जाऊ नका, असे म्हणू लागली. त्यावेळी मुलगी आपला एवढा विचार करते आणि आपण तीच भविष्य उध्वस्त करत आहोत, या गोष्टीची जाणीव तिच्या वडिलांना झाली आणि ते देखील रडायला लागले. त्यानंतर त्यांनी त्या मुलीला आणि इतर तीन मुलींना हवे तेवढे कष्ट करु,पण मुलींना शिकवू असा निर्णय घेतला, लग्ना बाबत देखील मुलीचे शिक्षण पूर्ण होऊन नोकरीला लागल्याशिवाय लग्न करणार नाहीत अशी ग्वाही दिल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

पैठणच्या शेतकऱ्याने KBC मध्ये जिंकले 50 लाख

मुंबई :\ पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या वेदनेने महाराष्ट्र हळहळत असताना, त्याच महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याने हलकं का असेना, आपल्या यशाने सर्वांच्या चेहऱ्यावर स्मित आणलं आहे. अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात भल्याभल्यांना न जमणारी गोष्ट या पठ्ठ्याने करुन दाखवली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील शेतकरी कैलास रामभाऊ कुंटेवाड यांनी एकही लाईफलाईन न वापरता, तब्बल 50 लाख रुपये जिंकले आहेत. कौन बनेगा करोडपतीच्या सोमवारी प्रदर्शित झालेल्या भागात कैलास कुंटेवाड यांची कमाल दाखवण्यात आली. कैलास यांनी तब्बल 14 प्रश्नांची उत्तर बिनचूक दिली. पुढे 1 कोटी रुपयांसाठी त्यांना 15 वा प्रश्न विचारण्यात आला.


कैलास कुंटेवाड यांनी पहिल्या प्रश्नापासूनच धडाकेबाज सुरुवात केली. कैलास यांनी 10 प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली. त्यानंतर त्यांनी साडेसात लाखांच्या 11 व्या प्रश्नांचंही उत्तर त्यांनी बरोबर दिलं. मग 12 व्या प्रश्नावेळी त्यांना ऑडियन्स पोल घ्यावा लागला, त्यांनी उपस्थित प्रेक्षकांची मदत घेऊन उत्तर बरोबर दिलं. एक लाईफलाईन संपली असताना, पुढची उत्तरं बरोबर दिल्याने त्यांची ती लाईफलाईनही जिवंत झाली

कैलास हे शेती करतात. महिन्याला 3-4 हजार रुपये अशी त्यांची कमाई. कैलास यांना क्रिकेटचं प्रचंड वेड. क्रिकेटपटू होऊन राष्ट्रीय संघात खेळण्याचं त्यांचं स्वप्न. पण घरची परिस्थिती गरिबीची, त्यात शेतकरी कुटुंब आणि ग्रामीण जीवन, त्यामुळे क्रिकेट हे फक्त मनोरंजनापुरतंच राहिलं. आता कैलास यांनी आपलं स्वप्न मुलांकरवी पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे. त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना क्रिकेट अकॅडमीत प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे.

अमिताभ बच्चन यांनी ज्यावेळी कैलास कुंटेवाड यांना 13 वा प्रश्न विचारला, त्यावेळी ते थोडे संदिग्ध झाल्याचं दिसून आलं. परंतु त्यांनी एक पर्याय निवडला आणि तो अचूक आला. त्यानंतर 50 लाखांसाठीचा 14 वा प्रश्न विचारला आणि तोही बरोबर आला.

अमिताभ बच्चन यांनी कैलास यांना एक कोटी रुपयांसाठी 15 वा प्रश्न विचारला. त्यासाठी कैलास यांनी संकेत सूचक लाईफलाईन वापरली. त्यातून हिंट मिळाल्यानंतरही कैलास त्या उत्तराबाबत साशंक होते. त्यामुळे त्यांनी 50-50 लाईफलाईन वापरली. दोन ऑप्शन गायब झाल्यानंतरही कैलास त्यांच्या उत्तराबाबत ठाम नव्हते. शेवटी 50 लाखांच्या रकमेसह कैलास यांनी गेम क्विट करण्याचा निर्णय घेतला.

लाडकी बहीण :महिलांना पती किंवा वडिलांचाही आधार,पॅन क्रमांक नोंदवावा लागणार;  ई-केवायसीसाठी दोन महिन्यांची मुदत

मुंबई- लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिलांच्या नावावर फारसं उत्पन्न नसल्याने, जवळपास सर्वच अर्ज पात्र ठरत होते. अनेक महिला गृहिणी असल्याने त्यांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी किंवा शून्य असल्याचे नोंदीत दिसत होते. परंतु या महिलांचे पती किंवा वडील उच्च उत्पन्नाचे असल्याचे लक्षात आल्यानंतर सरकारला मोठा आर्थिक फटका बसला. त्यामुळे आता योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे.

यामध्ये महिलांसोबत त्यांचे पती किंवा वडिलांचीही माहिती मागवली जाणार आहे. जर पती अथवा वडिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असल्यास संबंधित महिला थेट अपात्र ठरणार आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर अपात्र लाभार्थ्यांची छाननी होऊन योजना फक्त खरी पात्र असणाऱ्यांपुरतीच मर्यादित राहणार आहे.

राज्यातील महिलांना आर्थिक मदतीचा हात देण्यासाठी लागू करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरुवातीपासूनच चर्चेत राहिली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकृष्ट करण्यासाठी या योजनेची घोषणा करण्यात आली होती. 1500 रुपयांची थेट आर्थिक मदत मिळत असल्याने लाखो महिलांनी या योजनेत नोंदणी केली.

सुरुवातीला योजनेचे निकष शिथिल ठेवण्यात आले होते. त्यामुळे पात्र–अपात्र असे मिश्र स्वरूपात अनेकांनी अर्ज केले. राज्य सरकारच्या तिजोरीवर यामुळे प्रचंड आर्थिक भार पडत असल्याचे लवकरच स्पष्ट झाले. आता सरकारनेच योजनेच्या अंमलबजावणीत काटेकोरपणा आणला असून, मोठ्या प्रमाणात बोगस लाभार्थ्यांची छाननी केली जात आहे.

ई-केवायसी प्रक्रियेसाठी लाभार्थ्यांना ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी लागणार आहे. मुखपृष्ठावर असलेल्या ई-केवायसी बॅनरवर क्लिक करून फॉर्म भरावा लागतो. सर्वप्रथम स्वतःचा आधार क्रमांक टाकून ओटीपीद्वारे पडताळणी करावी लागते. जर लाभार्थी पात्र यादीत असेल, तर पुढील टप्प्यात पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक नोंदवावा लागतो. त्यानंतर पुन्हा ओटीपीद्वारे प्रमाणीकरण पूर्ण होते.

जात प्रवर्ग, कुटुंबातील शासकीय सेवेत कार्यरत सदस्य नसल्याची खात्री, तसेच एका कुटुंबातील फक्त एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेते आहे, याची नोंद करून सबमिट करावे लागते. शेवटी ‘ई-केवायसी यशस्वीपणे पूर्ण झाली’ असा संदेश दिसतो आणि लाभार्थ्याचे नाव अंतिम यादीत नोंदवले जाते. या कठोर छाननीमुळे लाडकी बहीण योजनेतील लाखो अपात्र लाभार्थ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाण्याची शक्यता आहे. निवडणूक काळात योजनेच्या निकषांकडे दुर्लक्ष करण्यात आले होते, मात्र आता आर्थिक भार असह्य झाल्याने सरकारने नवे नियम आणले आहेत.

यामुळे खरी पात्र महिला आणि गरीब कुटुंबांना दिलासा मिळणार असला, तरी ज्या महिलांनी आतापर्यंत दरमहा 1500 रुपये घेतले आहेत, त्यांना पुढे अपात्र ठरवले जाऊ शकते. यामुळे अनेक कुटुंबांच्या आर्थिक नियोजनावर मोठा परिणाम होणार आहे. काही ठिकाणी महिलांकडून नाराजीही व्यक्त होताना दिसत आहे.

राजकीयदृष्ट्या निवडणुकीत या योजनेमुळे मोठ्या प्रमाणावर मतं खेचता आली, मात्र आता तिच्या कडक अंमलबजावणीमुळे विरोधकांना टीका करण्याची संधी मिळाली आहे. सरकारने मतांसाठी योजना खुली ठेवली आणि आता महिलांनाच बाहेरचा रस्ता दाखवतोय अशी टीका केली जात आहे. मात्र सरकारकडून स्पष्टीकरण दिलं जातं की, खरी पात्र महिला लाभार्थ्यांनाच न्याय मिळावा, हीच खरी भूमिका आहे. पुढील काही महिन्यांत ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या योजनेचा आवाका किती घटतो, हे स्पष्ट होईल.

‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ ३१ ऑक्टोबरला होणार प्रदर्शित

चित्रपटाचा नवीन टीझर आला प्रेक्षकांच्या भेटीला !

‘’स्वराज्याचं रक्षण करायला राजे पुन्हा येत आहेत!’’या दमदार घोषणेने महाराष्ट्रात एका विलक्षण चित्रपटाची चाहूल लागली आहे. महेश मांजरेकर लिखित-दिग्दर्शित, ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट येत्या ३१ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचा टिझर नुकताच एका दिमाखदार सोहळ्यात प्रदर्शित करण्यात आला. आजवर कधीच दिसलं नाही असं छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रखर रूप यात दिसणार असून मराठीची अस्मिता, बळीराजाच्या आत्महत्येचा मुद्दा, मराठी माणसांचं मुंबईतील स्थान, परप्रांतीयांची मुजोरी अशा अनेक विषयांवर महाराजांचं भाष्य आणि कृती यातून बघायला मिळणार आहे.

या चित्रपटात सिद्धार्थ बोडके छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुख्य भूमिकेत असून त्यांच्या सोबतीला विक्रम गायकवाड, शशांक शेंडे, मंगेश देसाई, पृथ्वीक प्रताप, रोहित माने, नित्यश्री अशी कलाकारांची तगडी फौज आहे. याशिवाय राष्ट्रीय पुरस्कार विजेते बाल कलाकार त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप यांच्याही यात महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाची कथा – पटकथा महेश मांजरेकर यांची असून संवादलेखन सिद्धार्थ साळवी यांनी केले आहे. निर्मिती राहुल पुराणिक आणि राहुल सुगंध यांनी केली असून प्रस्तुती झी स्टुडिओजची आहे. हा चित्रपट केवळ ऐतिहासिक व्यक्तिरेखेचा गौरव न करता, आजच्या महाराष्ट्राशी आणि त्याच्या अनुत्तरित प्रश्नांशी संवाद साधत असल्याचे टीझरवरून कळतेय.

याप्रसंगी बोलताना दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणाले की, ‘’माझ्यासाठी हा चित्रपट म्हणजे आजच्या समाजाशी भिडण्याचा प्रयत्न आहे. शिवाजी महाराजांच्या विचारांनी केवळ स्वराज्य उभं राहिलं नाही, तर एक जनमानस जागृत झाले. आजच्या पिढीपुढे असलेल्या प्रश्नांकडे पाहाताना, त्याच विचारांचा प्रकाश पडद्यावर आणायचा आहे. ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा प्रवास इतिहास सांगणारा असेलच, त्याचबरोबर वर्तमानाला प्रश्न विचारणारा, त्याला जागवणारा आणि दिशा दाखवणारा ठरेल. कलाकार म्हणून मी गप्प बसू शकत नाही आणि हा सिनेमा माझ्या अस्वस्थतेचा, माझ्या जिव्हाळ्याचा आवाज आहे.”

झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणाले, ‘’झी स्टुडिओज आणि महेश मांजरेकर हे समीकरण कायमच यशस्वी राहिलेलं आहे. मराठीसाठी ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा केवळ एक चित्रपट नसून महाराष्ट्राच्या इतिहासाशी आणि संस्कृतीशी पुन्हा नातं जोडणारा प्रवास आहे. या चित्रपटाशी जोडल्या गेल्याचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे. या चित्रपटातून महाराज बोलणार आहेत, त्यामुळे हा चित्रपट बघण्यासाठी आणि ऐकण्यासाठी नसून जगण्याचा प्रयत्न करण्यास भाग पाडणारा आहे. ”

आपल्या भूमिकेविषयी बोलताना सिद्धार्थ बोडके म्हणाले, ‘’ छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणं ही एक मोठी जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी मी पार पाडू शकेन, असा विश्वास महेश सरांनी माझ्यावर दाखवला, यासाठी मी मनापासून कृतज्ञ आहे. प्रत्येक भूमिकेसाठी आपण अभ्यास करतोच, परंतु या चित्रपटातील माझा प्रवास विशेष होता. यात दाखवलेले शिवाजी महाराज हे प्रचंड संतप्त आहेत. कारण आज आपल्या महाराष्ट्राची, मराठी माणसाची जी स्थिती आहे ती पाहून कोणाच्याही मनात राग निर्माण होईल. हे वास्तव जेव्हा या चित्रपटाच्या माध्यमातून माझ्या समोर आलं, तेव्हा मी अस्वस्थ झालो, जर आज महाराजांनी ही परिस्थिती पाहिली असती, तर त्यांची भूमिका काय असती? हाच भाव मी या चित्रपटातील माझ्या अभिनयातून प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.’’

या चित्रपटाची प्रतीक्षा प्रेक्षक आता उत्सुकतेने करत असून, पहिली झलक पाहून हा चित्रपट वर्षातील सर्वात चर्चेचा ठरणार आहे, हे स्पष्ट झालं आहे. द ग्रेट मराठा एंटरटेनमेंट, सत्य सई फिल्म्स आणि क्रिझोल्ह निर्मित महेश मांजरेकर लिखित-दिग्दर्शित ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट ३१ ऑक्टोबर रोजी झी स्टुडिओजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग सीझन २ मध्ये केटीएम रेसिंग बनले अनन्य नामांकन अधिकार आणि ट्रायकलर मोटरस्पोर्ट्सचे बाइक पार्टनर

*      पहिल्यांदाच, एका जागतिक मोटारसायकल दिग्गज कंपनीने भारतीय मोटरस्पोर्ट फ्रँचायझीसोबत नाव देण्याचे अधिकार मिळवले आहेत.

*      जागतिक कामगिरीतील आघाडीची कंपनी केटीएम रेसिंग ट्रायकलर मोटरस्पोर्ट्सला बळ देते, ज्यामुळे इंडियन सुपरक्रॉसला जागतिक दर्जाच्या दर्जापर्यंत नेण्याचे आयएसआरएलचे ध्येय बळकट होते.

*      अमेरिकेने समर्थित ट्रायकलरचे केटीएम ट्रायकलर मोटरस्पोर्ट्स असे नाव बदलले आहे, ज्यामुळे भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या रेसिंग लीगमध्ये जागतिक मोटरस्पोर्ट वंशावळ येते.

मुंबई  – इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग (ISRL) ने KTM रेसिंग आणि ट्रायकलर मोटरस्पोर्ट्स यांच्यातील एका ऐतिहासिक भागीदारीची अभिमानाने घोषणा केली आहे, ज्या अंतर्गत KTM ISRL सीझन २ मध्ये संघासाठी एक्सक्लुझिव्ह नेमिंग राइट्स पार्टनर आणि ऑफिशियल बाइक पार्टनर बनले आहे. ब्रँड अॅम्बेसेडर आणि गुंतवणूकदार म्हणून बॉलीवूड मेगास्टार सलमान खानच्या पाठिंब्याने, ISRL आंतरराष्ट्रीय ब्रँड, भारतीय फ्रँचायझी आणि जागतिक दर्जाच्या रेसिंग प्रतिभेला एकत्र आणत आहे.

या सहकार्यामुळे, या टीमला केटीएम ट्रायकलर मोटरस्पोर्ट्स म्हणून ओळखले जाईल, जे पहिल्यांदाच जागतिक मोटारसायकल उत्पादक कंपनीने भारतीय मोटरस्पोर्ट फ्रँचायझीसोबत नाव देण्याचे अधिकार घेतले आहेत. हे पाऊल केटीएमच्या भारतातील मोटरस्पोर्ट्सच्या वाढीला चालना देण्याच्या दीर्घकालीन दृष्टिकोनाला बळकटी देते आणि त्याचबरोबर आयएसआरएल ग्रिडमध्ये जागतिक वंशावळ जोडते.

केटीएम रेसिंगमध्ये अतुलनीय जागतिक कौशल्य देखील आहे, मोटोक्रॉस आणि सुपरक्रॉसमध्ये अनेक जागतिक अजिंक्यपद विजेतेपदांसह, केटीएम ट्रायकलर मोटरस्पोर्ट्स आयएसआरएल सीझन २ मध्ये प्रवेश करते ज्याची वंशावळ फार कमी लोकांशी स्पर्धा करू शकतात.

केटीएम नॉर्थ अमेरिका इंक, केटीएम रेसिंग इंडियाचे कार्यकारी संचालक श्री. सेल्वराज नारायण म्हणाले, “केटीएम नेहमीच मोटरस्पोर्ट्समध्ये शुद्धता, कामगिरी, साहस आणि अतिरेकी या मूलभूत मूल्यांसाठी उभा राहिला आहे. आयएसआरएल सीझन २ साठी ट्रायकलर मोटरस्पोर्ट्ससोबतची आमची भागीदारी आम्हाला ही मूल्ये थेट भारतातील वाढत्या सुपरक्रॉस चाहत्यांपर्यंत पोहोचवण्यास अनुमती देते. केटीएम ट्रायकलर मोटरस्पोर्ट्ससोबत, आम्ही केवळ उच्च स्तरावर स्पर्धा करण्यासच नव्हे तर पुढच्या पिढीतील रायडर्स आणि चाहत्यांना प्रेरणा देण्यास उत्सुक आहोत.”

ट्रायकलर मोटरस्पोर्ट्सचे सह-मालक आणि सीईओ श्री प्रदीप लाला म्हणाले, “केटीएम इंडियाला आमचा नेमिंग राईट्स पार्टनर म्हणून मिळाल्याने आम्हाला खूप आनंद होत आहे. केटीएम आणि ट्रायकलर मोटरस्पोर्ट्स दोघेही भारतातील मोटरस्पोर्ट्सना उन्नत करण्याचे स्वप्न सामायिक करतात म्हणून ही भागीदारी स्वाभाविक आहे. या सहकार्याने, आमचा संघ नवीन उर्जेसह आणि कामगिरी आणि उत्कृष्टतेसह एक मजबूत ब्रँड ओळख घेऊन सीझन 2 मध्ये प्रवेश करतो.”

इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगचे प्रवर्तक श्री. वीर पटेल म्हणाले, “ही भागीदारी जागतिक दर्जाचे क्रीडा परिसंस्था तयार करण्यासाठी जागतिक ब्रँड्सना भारतीय संघांसह एकत्र करण्याच्या ISRL च्या दृष्टिकोनाचे प्रतिबिंबित करते. KTM ट्रायकलर मोटरस्पोर्ट्ससह, सीझन 2 भारतीय मोटरस्पोर्ट्समध्ये उत्साह आणि स्पर्धात्मकतेसाठी नवीन बेंचमार्क स्थापित करेल.”

टीव्ही आणि ओटीटीवर २० दशलक्षाहून अधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेल्या पहिल्या सीझननंतर, ISRL आता त्याच्या सर्वात महत्त्वाकांक्षी अध्यायात प्रवेश करत आहे. सीझन २ २५-२६ ऑक्टोबर २०२५ रोजी सुरू होईल, त्यानंतर ६-७ डिसेंबर आणि २०-२१ डिसेंबर रोजी तीन वेगवेगळ्या ठिकाणी शर्यती होतील.

सीझन २ कॅलेंडर

व्ही  पुणे – २६ ऑक्टोबर २०२५ – श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी

व्ही  हैदराबाद – 7 डिसेंबर 2025 – गचीबावली स्टेडियम

व्ही  टीबीए (ग्रँड फिनाले) – २१ डिसेंबर २०२५

पुस्तकांचे तोरण देवीला बांधत सेवा मित्र मंडळाने बीड मधील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना दिला शैक्षणिक मदतीचा हात

पुणे : नवरात्र उत्सवात देवीला नारळाचे तोरण बांधण्याची परंपरा आहे परंतु शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळाने महाराष्ट्रावरील पुराचे संकट लक्षात घेऊन उत्सवाला सामाजिक जोड देत शैक्षणिक साहित्याचे तोरण बांधले. या आगळ्यावेगळ्या तोरणातून बीड जिल्ह्यातील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना हिंमत देत शिक्षणाची नवी आशा जागवण्यात आली आहे.

काळी जोगेश्वरी मंदिराचे विश्वस्त वदन भिडे व मिलन भिडे यांच्या हस्ते डॉ. मिलिंद भोई यांना शैक्षणिक साहित्य सुपूर्द करण्यात आले. त्यानंतर साहित्याचे वितरण स्थानिक पातळीवर करण्यात येणार आहे. काही पूरग्रस्त कुटुंबांकरिता धान्य आणि कपडे देखील सेवा मित्र मंडळातर्फे पाठविण्यात आले आहेत.

मंडळाचे नितीन होले, सचिन ससाने, अमर लांडे, विक्रांत मोहिते, राजेंद्र कांचन, प्रदुम्न पंडित, कुणाल जाधव, ओम पासलकर, साहिल चव्हाण, यश सावंत आणि अथर्व बांदल यांनी उपक्रमाचे संयोजन केले.

शिरीष मोहिते म्हणाले, पुरामुळे बीडमधील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. अनेकांचे संसार उध्वस्त झाले, विद्यार्थ्यांचे दप्तर व शैक्षणिक साहित्य वाहून गेले. या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सवानिमित्त सेवा मित्र मंडळाने विद्यार्थ्यांसाठी शालेय  साहित्याच्या मदतीला सुरुवात केली आहे. पूरस्थिती ओसरल्यानंतर देखील उस्मानाबादमधील लोकांना आवश्यकतेप्रमाणे धान्य,कपडे आणि शैक्षणिक साहित्याची मदत केली जाणार आहे, या संदर्भात देखील मंडळाचे नियोजन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियानांतर्गत विभागीय आयुक्त कार्यालयातील महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

पुणे, दि. १ ऑक्टोबर : शासनाच्या स्वस्थ नारी, सशक्त परिवार या राष्ट्रीय अभियानाअंतर्गत विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे येथे कार्यरत महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात विभागीय आयुक्त कार्यालय तसेच नवीन प्रशासकीय इमारतीतील विविध कार्यालयांमधील एकूण २३५ महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली.

सदर शिबिराचे उद्घाटन डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार , विभागीय आयुक्त, पुणे विभाग यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी गजानन पाटील , मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे, डॉ. भगवान पवार, उपसंचालक आरोग्य सेवा, पुणे, डॉ. रामचंद्र हंकारे, जिल्हा आरोग्य अधिकारी, पुणे, दिपाली देशपांडे-सावेडकर, अपर आयुक्त (विकास), पुणे विभाग, नितीन माने, अपर आयुक्त (आस्थापना), पुणे विभाग तसेच ससून, औंध सर्वोपचार रुग्णालय आणि प्रादेशिक मनोरुग्णालय, येरवडा येथील वैद्यकीय तज्ञ उपस्थित होते.

डॉ. रामचंद्र हंकारे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, या अभियानांतर्गत पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागात आतापर्यंत सुमारे ३१०० शिबिरे घेण्यात आली असून, तब्बल २.५० लाख महिलांची तपासणी पूर्ण झाली आहे. उच्च रक्तदाब, मधुमेह, स्तनाचा व गर्भाशयाचा कर्करोग यांसारख्या आजारांचे निदान झालेल्या महिलांना शासनामार्फत मोफत उपचार दिले जात आहेत.

या अभियानाचे कौतुक करताना श्री.गजानन पाटील यांनी सांगितले की, “शासनाच्या आरोग्य विभागाकडील या अभियानाचा लाभ शासकीय कार्यालयांनी अधिकाधिक घेतल्यामुळे अभियानाला जनआंदोलनाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.” तसेच, महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तपासणीबरोबरच एकल महिलांची तपासणी आणि आयुष्मान भारत कार्ड काढण्याचे आवाहन त्यांनी केले.

अपर आयुक्त श्री. नितीन माने यांनी शिबिर यशस्वी होण्यासाठी मा. विभागीय आयुक्त यांच्या मार्गदर्शनाची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे सांगून आरोग्य विभाग व जिल्हा परिषदेच्या सहकार्याबद्दल आभार मानले. दरम्यान, डॉ. भगवान पवार यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते जिल्हा रुग्णालयांपर्यंत सर्व महिला व बालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात मा. विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी महिलांच्या आरोग्याची काळजी घेणे ही प्राथमिक जबाबदारी असल्याचे सांगितले. कामाच्या ताणतणावातून मुक्त राहण्यासाठी नियमित योगाभ्यास व संतुलित आहाराचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. तसेच, सोशल मीडियावरील जाहिराती वा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय उपचार टाळावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. शिबिरादरम्यान विविध तज्ज्ञांचा सत्कार करून त्यांचे आभार मानण्यात आले.

आदिशक्ती माता सच्चीयाय देवीच्या चरणी मान्यवरांची हजेरी

पुणे : पुण्यनगरीच्या वैभवशाली सांस्कृतिक परंपरेत या वर्षी आदिशक्ती माता सच्चीयाय देवीच्या नवरात्री पावन पर्वानिमित्त श्रीमद् भागवत कथा तथा नवरात्री कीर्तन महोत्सव भव्यदिव्य स्वरूपात आयोजित करण्यात येत आहे. नाम-ज्ञान-प्रेम-दानाचा संगम घडविणाऱ्या या धार्मिक उत्सवात भक्तीसंगीत, पारायण, हरिपाठ, कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन श्री दुगड जीवदया संस्था जवळ,आगम जैन मंदिर समोर, कात्रज,पुणे येथे करण्यात आले आहे. नवरात्रोत्सवानिमित्त शहरासह जिल्ह्यातील मान्यवरांनी आदिशक्ती माता सच्चीयाय देवीच्या दर्शनासाठी हजेरी लावली होती.

यावेळीराज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार डॉ. अमोल कोल्हे,सहपोलिस आयुक्त रंजन कुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील ,राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, श्री सुसवाणीमाता सच्चीयायमाता चॅरिटेबल ट्रस्टचे आयोजक प्रमोद दुगड, गौरव दुगड,मोनल दुगड,आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या, दुगड परिवाराने मंदिर बांधले तेंव्हापासून मी आदिशक्ती माता सच्चीयाय देवीच्या दर्शनाला येत आहे. नावरात्रोत्सवानिमित्त संपूर्ण राज्याला सुख, समृद्धी आणि आरोग्य लाभो अशी देवी चरणी प्रार्थना केली.

खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, महाराष्ट्रात ओल्या दुष्काळात बळीराजा सापडला आहे, या बळीराजाला लढण्याचे बळ दे हीच प्रार्थना सणाच्या निमित्ताने मी आदिशक्ती माता सच्चीयाय देवीच्या चरणी केली आहे. मानवतेच्या दृष्टिकोनातून आपल्याला जी काही मदत या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला करणे शक्य आहे ती करूया, हीच मदत देवीसाठी सर्वात मोठी सेवा ठरेल.

सहपोलिस आयुक्त रंजन कुमार म्हणाले, पुणेकरांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा ,आज दुगड परिवाराच्या निमंत्रणांवरून माता सच्चीयाय देवीची आरती करण्याचा योग आला, राज्यात आज ओला दुष्काळ पडला आहे, या सणाच्या निमित्ताने संकतावर माता करण्यासाठी आपण सर्व मिळून शेतकऱ्याला मदत करूया हीच खरी प्रार्थना ठरेल.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील म्हणाले, दुगड परिवाराच्या निमंत्रणांवरून आज माता सच्चीयाय देवीची आरती करण्याचा योग आला, सध्या राज्यात ओल्या दुष्काळाचे संकट आहे, या संकतावर मात करण्याची शेतकऱ्याला शक्ति द्यावी हीच प्रार्थना देवीच्या चरणी केली.

लायन्स इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्ड सोहळा १२ ऑक्टोबर रोजी पुण्यात

पुणे: लायन्स इंटरनॅशनल प्रांत 3234 D2 तर्फे लायन्स इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्ड सोहळा १२ ऑक्टोबर २०२५ रोजी पुण्यातील हॉटेल शेराटन येथे आयोजित करण्यात आला आहे.

या आंतरराष्ट्रीय सोहळ्यात प्रसिद्ध सिनेतारका संगीता बिजलानी तसेच अन्य मान्यवर अतिथी समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ५० व्यक्तींना सन्मानित करणार आहेत. सन्मान मिळविणाऱ्यांमध्ये उद्योग, व्यापार, वैद्यकीय, शिक्षण, कला, क्रीडा, विज्ञान, महिला आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश असेल. यामध्ये श्री. अनिल बांगडिया, रवि अग्रवाल, डॉ. अभिजीत सोनवणे, लायन सलीम शिकलगार, डॉ. अशोक अग्रवाल, ऋतुजा जाधव, डॉ. शिवप्रसाद पाटील, डॉ. रश्मी आणि डॉ. सिद्धार्थ टंडन यांचा विशेष समावेश आहे.

प्रेस कॉन्फरन्समध्ये लायन्स डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन राजेश अग्रवाल यांनी सांगितले की हा सोहळा केवळ सन्मानाचा मंच नसून समाजोपयोगी प्रकल्पांसाठी आर्थिक सहकार्य मिळविण्याचे एक माध्यमदेखील आहे. या प्रसंगी लायन रवि अग्रवाल, लायन अविनाश साकुंडे, लायन गिरीश संभ्याल आणि लायन सुशांत झवेरी उपस्थित होते.

लायन्स क्लबच्या सामाजिक सेवा
लायन्स इंटरनॅशनल गेल्या १०८ वर्षांपासून २०० पेक्षा अधिक देशांमध्ये कार्यरत असून दरवर्षी ३० कोटींहून अधिक लोकांचे जीवन समृद्ध करण्याचे कार्य करते. प्रांत 3234 D2 (पुणे, अहमदनगर, नाशिक) तर्फे डायबिटीस, कर्करोग, शिक्षण, पर्यावरण, सांस्कृतिक व मानसिक आरोग्य या क्षेत्रांत उल्लेखनीय उपक्रम राबविले जात आहेत.

लवकरच धर्मपुत्र अभियान (अकेले राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मानसिक आधार) तसेच नवा सवेरा (अंधत्व निर्मूलनासाठी नेत्रदान अभियान) सुरु केले जाणार असून हे उपक्रम समाजाला नवी दिशा देणारे ठरणार आहेत.

गांधी विचाराला विरोधाच्या वृत्तीने देशाची स्थिती व भवितव्य धोक्यात-ज्येष्ठ पत्रकार अविनाश गोडबोले

गांधी विचारानेच जगात शांती आणि समृद्धी नांदू शकेल -गांधीवादी विचारवंत उल्हासदादा पवार

पुणे-

कर्तुत्ववान महिलांचा गौरव आणि उद्योजकांसाठी ब्रँड मार्गदर्शन.

पुणे – बिझनेस आयकॉन तर्फे आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा (नवदुर्गांचा) सन्मान करण्यात आला. या विशेष सोहळ्यात समाज, शिक्षण, सुरक्षा, उद्योग व व्यवसाय क्षेत्रात आपली छाप पाडणाऱ्या महिलांच्या कार्याचा स्मृतिचिन्ह देवून गौरव करण्यात आला. कार्यक्रमा दरम्यान “असा घडतो ब्रँड” या विशेष सदरात बिझनेस आयकॉनचे पराग गोरे यांनी चितळे बंधूंचे इंद्रनील चितळे आणि प्रख्यात बिझनेस कोच व मेंटोर चकोर गांधी यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत ब्रँड निर्मितीचे विविध टप्पे ,उद्योजकांना येणारी आव्हाने व त्या पार करत व्यवसायाचे यशस्वी ब्रँडमध्ये रुपांतर कसे करता येते याबाबत सखोल चर्चा झाली. या कार्याक्रमाल्ला उद्योजक, व्यावसायिक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली. महिलांच्या सन्मानासह ब्रँड जर्नीवरील चर्चा या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. महिलांच्या कर्तुत्वाचा सन्मान आणि ब्रँड प्रवासाच्या कथा या दोन्ही गोष्टींनी उद्योजकांना केवळ प्रेरणा नाही तर नवा उत्साह आणि दिशा दिली.

पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाची सांगता…एक हजार महिलांनी केली महाआरती

पुणे -पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाची सांगता आज महाआरतीने संपन्न झाली. शिवदर्शन-सहकारनगर परिसरातील श्री लक्ष्मीमाता मंदिरात एक हजारहून अधिक महिलांनी श्री लक्ष्मीमातेची महाआरती केली. प्रारंभी देवीची गाणी सादर केली गेली. वेदिका निकम हिने जोगवा सादर केला. त्यानंतर महाआरती संपन्न झाली. तेव्हा सारे वातावरण मंगलमय झाले होते. त्यानंतर लकी ड्रॉ काढण्यात आला. एस. सरोदे (प्रथम क्रमांक), माला कांबळे (द्वितीय क्रमांक), पद्मा धनगर ( तृतीय क्रमांक) याशिवाय असंख्य उत्तेजनार्थ ५०हून अधिक महिलांना बक्षिसे देण्यात आली.

अशा प्रकारे हा २७वा पुणे नवरात्रौ महिला महोत्सव यशस्वी झाला. विविध स्पर्धांमध्ये ५०००हून अधिक महिला सहभागी झाल्या आणि हा महोत्सव यशस्वी केला, याबद्दल पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक-अध्यक्ष आबा बागुल आणि पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा सौ. जयश्री बागुल यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमानंतर सर्वांना प्रसाद देण्यात आला.