Home Blog Page 1068

प्राण गेला तरी बेहत्तर, या हुकूमशहाच्या हाती महाराष्ट्र जाऊ देणार नाही.

पुणे: मराठी माणसाच्या बलिदानातून महाराष्ट्राची निर्मिती झाली. 1 मे रोजी महाराष्ट्रदिनी आपण त्या हुतात्म्यांना अभिवादन करतो. पण आता केवळ अभिवादन करून चालणार नाही. ते हुतात्मे आपल्याकडे बघताहेत.

कारण नरेंद्र मोदी नावाचा हुकूमशहा महाराष्ट्राची अस्मिता पायदळी तुडवत फिरतोय. आता शपथ घ्यावी लागेल आणि मी शपथ घेऊन सांगतो… हुतात्म्यांनो, तुम्ही ज्या पद्धतीने मुंबईसह महाराष्ट्र मिळवण्यासाठी गोळ्यांना सामोरे गेलात, तसेच प्राण गेला तरी बेहत्तर, या हुकूमशहाच्या हाती महाराष्ट्र जाऊ देणार नाही, अशी सिंहगर्जना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली. भाजपचे दोनाचे तीनशे खासदार झाले, आता तीनशेचे दोन झाल्याशिवाय राहणार नाहीत असे ठणकावून सांगतानाच, इंडिया आघाडीचे 300च्या वर खासदार निवडून येणारच असा जबरदस्त आत्मविश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

महाविकास आघाडीच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आज खडकवासला येथे विशाल सभा झाली. त्या सभेमध्ये मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार गटाचा समाचार घेतला.

उद्धव ठाकरे यांनी भाषणाच्या सुरूवातीलाच सुप्रिया सुळे यांच्या लढाऊ बाण्याचे कौतुक केले. सुप्रिया सुळे या महिला

असूनही वडिलांच्या मागे पहाडासारख्या उभ्या राहिल्या. मला त्यांचा अभिमान आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल पुण्यात रेसकोर्सवर सभा झाली. रेसकोर्सचे ठिकाण योग्यच होते, कारण मोदींना झोपेतही घोडेबाजारच दिसतो, अशी खिल्ली उद्धव ठाकरे यांनी उडवली. पण रेसकोर्सवरील घोडे वेगळे आहेत आणि मोदींनी विकत घेतलेले घोडे नव्हेत तर खेचरे आहेत, ओझे वाहणारी गाढवे आहेत हे त्यांना कुणीतरी सांगायला हवे होते, असा चिमटा उद्धव ठाकरे यांनी काढला.

भाजप आणि मोदींची आपल्याला कीव येते. कारण 2014 मध्ये मोदींबरोबर माझ्याही सभा झाल्या होत्या. पण त्यावेळी त्यांना इतक्या वेळा महाराष्ट्रात यावे लागल्याचे मला आठवत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. त्या सभांमध्ये मोदी यांनी माझा लहान भाऊ म्हणून उल्लेख केला होता, मग नाते का तोडलेत असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुत्रप्रेम आणि पुत्रीप्रेम हे शब्द वापरत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर टीका केली होती. उद्धव ठाकरे यांनी त्याचाही समाचार यावेळी घेतला. शरद पवार त्यांच्या मुलीला आणि मी माझ्या मुलाला आदित्यला मुख्यमंत्री बनवू पाहतोय असे शहा म्हणाले होते. मोदी-शहा फक्त स्वत:साठी लढताहेत, मी, माझा आणि माझ्यासाठी, बस्स. अरे, मुख्यमंत्रीपद इतके सोपे वाटले का. शहांनी एका फोनवर त्यांच्या मुलाला बीसीसीआयचे अध्यक्ष केले तसे मुख्यमंत्रीपद नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सुनावले.

– मोदी माझ्या वडिलोपार्जित शिवसेनेला नकली म्हणाले. कारण त्यांच्याबरोबर आहे ती गद्दारांची फौज, गाढवांची टोळी आहे. तिलाच ते शिवसेना म्हणताहेत.

– मोदींवर आता महाराष्ट्रात ठाण मांडून बसण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्र साधाभोळा आहे पण कृतघ्न आणि गद्दार नाही. महाराष्ट्राची परंपरा शूरांना वंदन करणारी आहे. भाजपचे काय चाललेय तर चोरा मी वंदिले. सगळ्या चोरांना वंदन करताहेत.

– आम्ही मोदींसारखे खोटं बोलत नाही, बोलतो ते करून दाखवतो

केंद्रीय कृषिमंत्री असताना शरद पवार यांनी काय केले होते अशी विचारणा पंतप्रधान मोदी यांनी कालच्या सभेत केली होती. तो धागा पकडून उद्धव ठाकरे म्हणाले की, शरद पवार यांनी कृषिमंत्री असताना देशातील शेतकऱयांचे कर्ज माफ केले होते आणि मी मुख्यमंत्री झाल्यानंतर कुणीही न मागताही महाविकास आघाडी सरकारने शेतकऱयांचे दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ केले होते. आम्ही मोदींसारखे खोटे बोललो नाही. जे बोललो ते करून दाखवले आणि जे करून दाखवले तेच बोलतो, असा पलटवार उद्धव ठाकरे यांनी केला.

महाविकास आघाडीच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आज खडकवासला येथे विशाल सभा झाली. त्या सभेमध्ये मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे.

मोदी म्हणजे वखवखलेला, बुभुक्षित आत्मा

भटकती आत्मावरून उद्धव ठाकरे यांनी मोदींवर हल्ला चढवला. ते म्हणाले की, मोदींच्या त्या सभेला अजित पवार हेसुद्धा उपस्थित होते. त्यांना मी विचारणार आहे की मोदी भटकती आत्मा कोणाला म्हणाले. कारण भटकती आत्मा असते तसाच वखवखलेला, बुभुक्षित आत्माही असतो जो सगळीकडे फिरत असतो. वखवखलेल्या आत्म्याला जरा जरी संवेदना असतील तर जिथे फिरताय ना तिथे तुमच्या नादानपणामुळे ज्या शेतकऱयांनी आत्महत्या केल्यात त्यांच्या घराकडे, त्यांच्या घरातल्या तुटलेल्या मंगळसूत्राकडे बघा, असा संताप उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. असाच वखवखलेला आत्मा औरंगजेब साडेतीनशे वर्षांपूर्वी गुजरातच्या दाहोदमध्ये जन्मला होता आणि महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेले स्वराज्य लुटायला आला होता. तो आग्य्राहून आला होता पण महाराष्ट्रातून परत गेलाच नाही. अजूनही त्याचा आत्मा इकडेच कुठेतरी भटकत असेल. अशी वखवख बरी नाही, असे उद्धव ठाकरे मोदींना उद्देशून म्हणाले.

बदल घडवण्याची जबाबदारी जनतेवर – शरद पवार

तरुणांमध्ये नोकरीबाबत अस्वस्थता आहे. दरवर्षी दोन कोटी नोकऱया निर्माण करू असे आश्वासन दिले होते. हे आश्वासन ते पुर्ण करू शकले नाही. सत्तेचा वापर करून विरोधकांना अडचणीत आणण्याचे काम केले जात आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शिक्षण आणि आरोग्य सेवेमध्ये अमुलाग्र बदल घडवून आणत लोकांना चांगली सेवा उपलब्ध करून दिली. त्यांना जेलमध्ये टाकले. देशात बदल घडवण्याची जबाबदारी आता जनतेवर आहे, असे आवाहन शरद पवार यांनी केले.देशात बिहारमध्ये 42 जागांसाठी एका टप्प्यात निवडणुका घेतल्या जात आहेत. उत्तर प्रदेशातही 62 जागांसाठी दोन टप्प्यात निवडणुका होत आहेत. मात्र, यंत्रणेचा अभाव, यश मिळण्याची शाश्वती नसल्याने 48 जागा असणाऱया महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका घेण्याची वेळ भाजपवर आली आहे. 2014 मध्ये काँग्रेसने महागाई वाढविल्याचा आरोप केला. आमची सत्ता आल्यावर पेट्रोल, डिझेल, सिलेंडरचे दर कमी करण्याचे आश्वासन मोदी यांनी जनतेला दिले. मात्र, भाजपच्या दहा वर्षांच्या काळात महागाईत आणखी भर पडली, असे पवार म्हणाले.

तुकोबारायांचे आशीर्वाद घेऊन बारणे यांचा मावळात प्रचार

देहूगाव, दि. 30 एप्रिल – जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (मंगळवारी) मावळ तालुक्यातील प्रचाराचा शुभारंभ केला.

खासदार बारणे यांनी आज मावळ तालुक्याच्या पूर्व भागात प्रचार दौरा केला. चिंचोली, किन्हई, झेंडेमळा, माळवाडी, देहूगाव, सुदुंबरे, सुदवडी, इंदोरी, नवलाख उंबरे, आंबी, वराळे, उर्से, परंदवडी, सोमाटणे, शिरगाव, गहुंजे, शेलारवाडी, मामुर्डी या गावांमध्ये प्रचार फेरी काढून मतदारांशी संपर्क साधला. प्रचार फेरीची सांगता देहूरोड येथे झाली. मोठ्या प्रमाणात पुष्पवृष्टी करून, फटाक्यांच्या आतषबाजीत बारणे यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. सुवासिनींनी औक्षण करून बारणे यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. भर उन्हात विजय रथावर उभे राहून मतदारांना अभिवादन केले. रणरणत्या उन्हात बारणे यांच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती.

खासदार बारणे यांच्या समवेत मावळचे आमदार सुनील शेळके, भाजपचे नेते व माजी मंत्री बाळा भेगडे, भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, भाजपाचे निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे, तालुकाध्यक्ष भाऊ गुंड, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, तालुकाप्रमुख राजू खांडभोर, जिल्हा संघटक अंकुश देशमुख, पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब नेवाळे, मावळ पंचायत समितीचे माजी सभापती विठ्ठल शिंदे तसेच प्रशांत ढोरे, लहुमामा शेलार, रघुवीर शेलार, प्रवीण झेंडे, अरुणाताई पिंजण, संजय पिंजण, ज्योतीताई पिंजण, बाळासाहेब जाधव, सतीश जाधव, सरला गायकवाड, ज्योती वैरागर, बंडोपंत बालघरे, विनायक जाधव, नवनाथ हारपुडे, कृष्णा दाभोळे, तुकाराम जाधव, सविता पिंजण, गुरुमित सिंग रत्तू, मदन सोनिगरा, विशाल खंडेलवाल, सारिका नाईकनवरे, प्रशासक ॲड. कैलास पानसरे आदी मान्यवर होते.

देहू येथील स्वागत कमानी जवळ खासदार बारणे यांना क्रेनद्वारे मोठा हार घालण्यात आला. त्यावेळी मोठ्या प्रमाणात फुलांच्या पाकळ्यांचा वर्षावही करण्यात आला. देहू शहराच्या वतीने नगराध्यक्ष पूजाताई दिवटे, नगरसेवक तसेच महायुतीतील सर्व घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी बारणे यांचे स्वागत केले. संत तुकाराम महाराज देवस्थानमध्ये जाऊन बारणे तुकोबारायांच्या चरणी नतमस्तक झाले. देवस्थानच्या वतीने अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे (इनामदार), विश्वस्त संजय महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख विशाल महाराज मोरे आदींनी खासदार बारणे यांचा सत्कार करून त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.

श्रीक्षेत्र सुदुंबरे येथे जाऊन संताजी महाराज जगनाडे यांच्या समाधीचे बारणे यांनी दर्शन घेतले. गावचे माजी सरपंच माणिक गाडे व विद्यमान उपसरपंच बापू बोरकर यांनी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे स्वागत केले.

इंदोरी येथील ग्रामदेवता कडजाई मातेच्या यात्रेनिमित्त मंदिरात जाऊन बारणे यांनी आशीर्वाद घेतले. त्यापूर्वी बैलगाडा शर्यतीच्या घाटावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला.

रामदास आठवले यांची पिंपरीत जाहीर सभा

खासदार बारणे यांच्या प्रचारासाठी उद्या आठवले यांची सभा

पिंपरी दि. 30 एप्रिल – मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी- आरपीआय- मनसे- रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले उद्या (मंगळवारी) पिंपरी येथे जाहीर सभा घेणार आहेत.

पुणे-मुंबई महामार्गावर पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या शेजारील मैदानावर संध्याकाळी पाच वाजता आठवले यांची सभा होणार आहे. या सभेला महायुतीतील सर्व घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत.

आठवले यांच्या सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे व शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर तसेच रिपब्लिकन पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

तुम्हाला मर्दुमकी दाखवायची असेल तर दिल्लीत जाऊन दाखवा, अमोल कोल्हेचे अजित दादांना खुले आव्हान

जुन्नर –  सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पोराला कसली मर्दुमकी दाखवता, मर्दुमकी दाखवायची असेल तर दिल्लीत जाऊन दाखवा. काहीही झालं तरी आमचा स्वाभिमान कधीच झुकणार नाही, अश्या कडक शब्दात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी जाहीर सभेत आव्हान दिल.

शिरुर मतदार संघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ  ओतूर येथे जेष्ठ नेते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार अशोक पवार, माजी आमदार ऍड. राम कांडगे, दिलीप ढमढेरे, शिवसेना उपनेते बबनराव थोरात माजी आमदार बाळासाहेब दांगट, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश भोर उपजिल्हाप्रमुख संभाजी तांबे,  बाबा परदेशी, अनंतराव चौगुले, सुनिल मेहेर, बाजीराव ढोले, शरद चोधरी, बाळासाहेब बाणखेले, अल्लूभाई ईनामदार,अनिल तांबे, दिपक औटी, बाबू पाटे, सुरेखा वेठेकर, राजश्री बोरकर, किशोर दांगट, शरद लेंढे, सुरज वाजगे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कोल्हे यांना पांडुनच दाखवतो. अस म्हटल्यानंतर आजच्या जाहीर सभेत डॉ.कोल्हेंनी त्यांच्यावर थेट निशाणा साधला. अजित दादा जेव्हा तुम्ही माझ्या सारख्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलाला पाडून दाखवतो असे म्हणता. तेव्हा माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला प्रश्न पडला मी काय चूक केली. शेतकऱ्यांचे, बिबट्यांचे, जनतेचे प्रश्न मांडले ही चूक केली? की स्वाभिमान गहाण ठेवला नाही ही चूक केली?

तुम्हाला मर्दुमकी दाखवायची असेल तर दिल्लीत जाऊन दाखवा ना मर्दुमकी.  शेतकऱ्यांच्या समस्या सोडवायला, बिबट्याच्या त्रासापासून मुक्त करायला मर्दुमकी दाखवा. मात्र, पाडापाडी करण्याची भाषा आणि दमदाटी करणं सोडा. काहीही झालं तरी आमचा स्वाभिमान कधीच झुकणार नाही, हे ही ठणकावून सांगितलं.

दरम्यान, आपल्या भाषणात विरोधी उमेदवारांचाही कोल्हेंनी चांगलाच समाचार घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी काल पुण्यात आले होते. या सभेत मोदी यायच्या आधी अधिकृत उमेदवार शिवाजी आढळराव यांना फक्त साडे तीन मिनिटं देण्यात आली. यात ही त्यांनी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जातात, यावर भाष्य केलं. शेतकरी धोरणाचे विरोधी उमेदवार कौतुक करतात. मात्र शेतकऱ्यांच्या पिकाला मिळणार भाव, दुधाचे दर, कांदा निर्यात, टोमॅटो याबद्दल ते बोलले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी ही कांदा निर्यात बद्दल बोलले नाहीत. दहा वर्षात ते पुण्यात अनेकदा आले, मात्र एकदा ही शिवजन्मभूमी आले नाहीत. त्यांना इथं येऊन नतमस्तक व्हावंसं वाटलं नाही.
होय, आमचे साहेब आमचा आत्मा आहेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातल्या सभेत शरद पवारांना भटकती आत्मा म्हणत टीका केली.  हो,  आमचे साहेब आत्मा आहेत. ते जनतेचा आत्मा आहेत. वाजपेयींच्या सत्ताकाळात भूकंप ग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी हाचं आत्मा पुढं आला होता., अस सांगत मोदींनी केलेल्या  टिकेला उत्तर दिलं. हा आत्मा शेतकऱ्यांच्या बांधावर, तरुणांना न्याय देण्यासाठी भटकतो. याला आम्ही पवित्र मानतो. आम्ही आमच्या आत्म्याला जपतो आणि कायम जपणार आहोत. आमचा आत्मा पक्ष, घरं फोडत नाही.

संरक्षण खात्याविषयी प्रश्न विचारत कोणाच्या कंपनीच भल केलं?

आपल्या भाषणात डॉ. कोल्हे यांनी, काही लोक फक्त व्यापार करण्यासाठी संसदेत गेले. संसदेत 60-70 प्रश्न फक्त संरक्षण खात्याविषयी विचारले गेले. हे प्रश्न विचारून कोणाच्या कंपनीच भल होतंय हे कळतय. अस म्हणत विरोधी उमेदवाराला लक्ष केलं.

अमोल कोल्हे लढायला तयार नव्हता, मग अचानक कसा तयार झाला. असं अजित दादा सर्वत्र म्हणतात. मात्र दादा ही विचारांची लढाई आहे, स्वाभिमानाची लढाई आहे. म्हणून ताठ मानेने जगायचं अन लढायचं ठरवलं.

काही लोकं फक्त व्यापार करण्यासाठी संसदेत गेले. डॉ. कोल्हेंचा आढळरावांवर घणाघात.

ओतूर – शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या जुन्नर तालुक्यातील ओतूर येथे नुकतीच डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची जाहीर सभा पार पडली यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी नाव न घेता माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर हल्ला केला आहे. माजी खासदार केवळ आपला व्यापार सांभाळण्यासाठी संसदेत निवडून जात होते असा आरोप डॉ. कोल्हे यांनी केला आहे.

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे उद्योजक असल्याने त्यांचे व्यवसाय संरक्षण खात्याशी निगडित आहेत. त्यामुळे आढळराव पाटील यांनी त्यांचे व्यवसाय सांभाळण्यासाठी संरक्षण खात्याविषयी संसदेत ७० पेक्षा अधिक प्रश्न विचारले आहेत ते केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी विचारले. कोणते सॉफ्टवेअर कधी खरेदी करणार ? कोणते कंत्राट कधी निघणार ? अशा प्रकारचे प्रश्न विचारून कोणत्या कंपनीचा फायदा करण्यासाठी हे प्रश्न विचारले, त्यामुळे कोणत्या कंपनीला फायदा झाला. याची माहिती घेतल्यावर समजले की, माजी खासदार आढळराव पाटील केवळ आपला व्यापार करण्यासाठी संसदेत गेले असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या भाषणात केला आहे.

२०१९ साली जेव्हा मी संसदेत मी निवडून गेलो तेव्हा मी नवीन होतो म्हणून मी माहिती घेतली की, यापूर्वी खासदार असलेल्या महोदयांनी नेमके संसदेत कोणते प्रश्न विचारले आहेत. तेव्हा समजलं की, काही लोकं केवळ आपला व्यवसाय करण्यासाठी संसदेत गेले. शिरुर, जुन्नर, आंबेगाव, खेड या भागात ज्या खात्याचा काहीही संबंध नाही त्या खात्याचे संसदेत प्रश्न मांडण्याचा नेमका हेतू काय असावा असा सवालही खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला. संसदेत सामान्य जनतेचे आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याची आवश्यकता असताना मात्र केवळ व्यापार करण्यासाठी माजी खासदार संसदेत गेले असल्याचे पुन्हा खासदार डॉ. अमोल कोल्हे नमूद केले.

जातनिहाय जनगणना अल्पसंख्याकांसाठी गरजेची काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे प्रतिपादन

पुणे : ‘जातनिहाय जनगणनेतून अल्पसंख्याकांचे प्रश्न मार्गी लागतील. मात्र, केंद्रात सध्या असलेल्या सरकारला ते करायचे नाही. त्यामुळे देशभरातील सर्व अल्पसंख्याकांनी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे,’ असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी केले. हे ढोंगी सरकार खाली खेचण्याची भावना देशभरातील जनतेत आहे, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली.

पुणे शहरातील अल्पसंख्याकांच्या शिष्टमंडळाने पटोले यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. त्यानंतर आयोजित बैठकीत ते बोलत होते. नॅशनल कॉन्फरन्स फॉर माइनॉरिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल डंबाळे यांच्या नेतृत्वाखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात शहरातील  मुस्लिम, ख्रिश्चन व बौद्ध समाजाच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, रिपब्लिकन युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा सुवर्णा डंबाळे, कारी मोहम्मद उद्रीस, मौलना काझमी, माजी नगरसेवक अजित दरेकर , रफिक शेख , रिजनल ख्रिश्चन समूहाचे लुकस केदारी, रिपाइंचे अशोक जगताप, शैलेंद्र मोरे, स्नेहा कांबळे, जीवन घोंगडे , सुफियान कुरैशी आदी उपस्थित होते.

नाना पाटोले पुढे म्हणाले की,‘सध्या देशभरात मोदी सरकारविरोधात वातावरण तयार झाले आहे. ते निर्माण करण्यात आपल्या सर्व समाजघटकांचा महत्त्वाचा वाटा आहे. आता आपण एकमेकांसोबत मतभेद व्यक्त करण्याची वेळ नाही. आपल्याला फक्त हुकूमशाही सत्तेला पायउतार करायचे आहे. कारण सध्या फक्त चारच लोक देश चालवत आहेत. त्यातील दोघे विकत आहेत, तर दोघे विकत घेत आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधातील प्रत्येक उमेदवार निवडून देण्याची जबाबदारी आपली आहे,’ असेही ते म्हणाले.   

प्रारंभी नॅशनल कॉन्फरन्स फॉर माइनॉरिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी भूमिका विशद केली. त्यानंतर वक्फ कमिटीचे अघ्यक्ष आमदार वजाहत मिर्जा, अरविंद शिंदे, सुवर्णा डंबाळे, लुकस केदारी यांच्यासह अनेक प्रतिनिधींनी मनोगते व्यक्त केली.

३ मे रोजी राहुल गांधींची पुण्यात सभा-पटोले यांच्या भेटीनंतर अनेक माइनॉरिटीच्या   संघटनांनी महाराष्ट्रातही काँग्रेस उमेदवारांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडीचे पुण्यातील उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे माजी अध्यक्ष, तसेच खासदार राहुल गांधी यांची ३ मे रोजी सायंकाळी चार वाजता एसएसपीएमएस कॉलेजच्या मैदानावर, पुणे रेल्वे स्टेशनच्या पाठीमागे जाहीर सभा होणार आहे. याचे जोरदार नियोजन सुरू असल्याचेही डंबाळे यांनी सांगितले.   

दहा लाख रुपयांच्या मर्यादेत जप्त रक्कम प्रकरणात दाद मागण्यासाठी त्रिसदस्यीय समिती गठित

मुंबई, दि. 30 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीअंतर्गत निवडणूक खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी लोकसभा मतदारसंघातील विधानसभा क्षेत्रात विविध पथके नियुक्त करण्यात आले आहेत. या पथकांकडून तसेच पोलीस पथकांच्या कार्यवाही दरम्यान 10 लाख रुपयांच्या मर्यादेत जप्त करण्यात आलेल्या प्रकरणांमध्ये निर्णय घेण्यासाठी त्रिसदस्यीय रोख रक्कम सोडवणूक समिती (कॅश  रिलीज कमिटी) गठित करण्यात आली आहे. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी ही गठित केली आहे. या रकमेच्या मर्यादेत जप्त करण्यात आलेल्या प्रकरणांमध्ये संबंधितांना या समितीकडे दाद मागता येईल.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार खर्च नियंत्रण विषयांतर्गत रोख रक्कम सोडवणुकीसाठी ही समिती गठित करण्यात आली असून त्यामध्ये अंबरनाथ खुले (सहआयुक्त) हे समन्वयक व अध्यक्ष आणि विश्वास मोटे (सहायक आयुक्त, एम/पश्चिम विभाग) आणि विलास गांगुर्डे (अधिदान व लेखाधिकारी) हे सदस्य असतील.

या समिती कार्यालयाचा पत्ता हा महसूल भवन सभागृह, गुरुनानक रुग्णालयाच्या पाठीमागे, वांद्रे (पूर्व), मुंबई -400051 असा असून समिती कार्यालयाचा संपर्क क्रमांक 8657010873 असा आहे. 

मोदींनी आत्मविश्वास गमावल्याची उल्हास पवार  यांची टीका

पुणे-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील सभेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा जो उल्लेख केला तो दुदैवी असून निषेधार्य आहे. शरद पवारांना त्यांनी यापूर्वी गुरू आहेत, असे संबोधिले होते. ते जर खरेच गुरू असतील तर गुरू बद्दल असे शब्द वापरणे योग्य नाही, अशी खंत काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी आमदार उल्हास पवार  यांनी व्यक्त केली. पवारांबद्दल मोदींनी वापरलेले शब्द पाहता राजकारणाचा स्थर किती घसरला आहे, हे कळते. मोदींची ही भाषा राजकी़य संस्कृतीसाठी दुदैवी असून गेल्या दहा वर्षात‌केवळ जुमलेबाजी केल्याने मोदींना नागरिकांचा प्रतिसाद मिळत नाही, त्यांच्या सभांना गर्दी होत नाही, खुर्च्या मोकळ्या असतात, त्यामुळे मोदी आत्मविश्वास गमावत आहेत, अशी टिकाही पवार यांनी केली.यावेळी प्रदेश उपाध्यक्ष व लोकसभा निवडणूक प्रचार प्रमुख मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस अॅड. अभय छाजेड,  राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी, राज अंबिके इत्यादी उपस्थित होते.

पुण्यातील रेसकोर्स मैदानावरील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांचे नाव न घेता, भटकती आत्मा असा उल्लेख करत हा आत्मा राज्य, घर आणि देश अस्थिर करत असल्याची टीका केली होती. या पार्श्वभूमीवर काँग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये उल्हास पवार यांनी मोदींच्या वक्तव्याचा निषेध करत खंत व्यक्त केली. तसेच मोदी व भाजपच्या कार्यपद्धतीवर सडकून टिका केली. ते म्हणाले, जुमलेबाजीमुळे त्यांच्या‌सभेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यांच्या‌ सभांना निम्म्यापेक्षा अधिक खुर्च्या मोकळ्या रहात आहेत. पंतप्रधान लोकसभा किंवा विधानसभेला एखाद्या राज्यात पाच सात‌ सभा घेतात, मात्र मोदी एका राज्यात  महापालिकेच्या निवडणुकीसारखे एका जिल्ह्यात दोन दोन सभा घेत आहेत. याचा अर्थ त्यांनी आत्मविश्वास गमावला आहे. स्वत:च्या राज्यात सभा घ्यावी लागते. सत्तर वर्षात काँग्रेसने काय‌ केले यापेक्षा गेल्या दहा वर्षात‌ त्यांनी काय केले, हे आता सांगावे. सातशे वीस शेकऱ्यांचा मृत्यू झाला, त्यांच्या श्रद्धांजलीचा प्रस्ताव नाकारला, हा असंवेदनशिलतेचा कळस आहे. मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यापासून आजपर्यंत एकही पत्रकार परिषद घेतली नाही.

मोदींचे‌ तीन तीन मंत्री आम्ही राज्य घटना बदलणार असल्याचे सांगतात, आणि मोदी म्हणतात, मी घटना बदलणार नाही. कालच्या सभेतील त्यांचे भाषण पायाखालची वाळू घरली आहे हे सिद्ध करणारे होते. त्यांचा अभ्यास नाही, त्यांना देशाच्या इतिहासाचे ज्ञान नाही, चुकीचा इतिहास‌ सांगतात, हा माणूस दहा वर्षात कधी‌ चीन शब्द उच्चारत नाहीत, ते‌ चिनला एवढे का भितात, कळत नाही.

मोदींनी प्रत्येकाच्या‌ डोक्यावर सव्वा लाखाचे कर्ज करून ठेवले आहे.

सत्तार हजार कोटीच्या भ्रष्टाचारावर मोदींनी पुण्यातील सभेत बोलायला हवे होते, ज्यांच्याबद्दल मोदी बोलले होते, ते काल त्यांच्या शेजारी बसले होते. देशात दुही माजवण्याचे‌ काम कोण करतंय ते जनतेला माहिती आहे. महिलांच्या अत्याचारावर पंतप्रधान बोलायला तयार नाहीत. महिलांवर अत्याचार करणारे त्यांचे आमदार, नेते अडकले आहेत.हिंदू धर्माचा उदो उदो करणाऱ्या मोदींनी श्री रामाच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या वेळी रामाचा व तिर्थाचा आपमान केला, असेही उल्हास पवार म्हणाले.

संजय काकडे मोहोळांच्या प्रचारात सहभागी

वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी चांदणी चौक प्रकल्प ठरेल पथदर्शी-मुरलीधर मोहोळ

पुणे- माजी खासदार संजय काकडे आज भाजपचे पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारात सहभागी झालेले दिसून आले दरम्यान शहराच्या बाजूने जाणाऱ्या महामार्गांमुळे शहराच्या प्रवेशद्वारांवर आणि अंतर्गत भागात होणारी वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी चांदणी चौकातील बहुमजली उड्डाणपूल प्रकल्प पथदर्शी ठरेल, त्यामुळे शहराच्या विकासचक्राला गती मिळेल असा विश्वास पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.

मोहोळ यांच्या प्रचारार्थ कोथरूड विधानसभेतील भेलकेनगर, गुजरात कॉलनी, आझादनगर, शास्त्री नगर, सुतारदरा, जय भवानीनगर, रामबाग कॉलनी, हनुमाननगर मार्गे मेगा सिटी परिसरात प्रचार फेरीचा समारोप झाला.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माजी खासदार संजय काकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर, मनसेचे नेते किशोर शिंदे, सुधीर धावडे, डॉ. संदीप बुटाला, माजी नगरसेविका छाया मारणे, वासंती जाधव, अल्पना वरपे, डॉ. श्रद्धा पाठक, दिलीप वेडे पाटील, किरण दगडे पाटील यांचा प्रमुख सहभाग होता.

मोहोळ म्हणाले, “शहर आणि परिसरातील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी आग्रही मागणी मी महापौर असताना केली होती. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण झाला.”

मोहोळ पुढे म्हणाले, “त्याच धर्तीवर गतिमान, सुरळीत आणि सुरक्षित वाहतुकीसाठी शहराच्या विविध भागात 21 ठिकाणी उड्डाणपूल, रेल्वे उड्डाणपूल किंवा ग्रेड सेपरेटर उभारण्यात येणार आहेत. शहराच्या वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी आणि अन्य प्रकल्पांसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या दोन हजार कोटी रुपयांच्या तरतुदीतून ही कामे केली जाणार आहेत.

नळस्टॉप चौकात पुण्यातील पहिला दुमजली उड्डाणपूल

“नळस्टॉप चौकात मेट्रो आणि महापालिकेचा संयुक्त प्रकल्पातून उभारलेल्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी दुमजली उड्डाणपुलामुळे कर्वे रस्ता परिसरातील वाहतूक सुसह्य झाली आहे. पुण्यातील हा पहिलाच दुमजली उड्डाणपूल असून, पुलावरून चार पदरी वाहतूक सुरू झाली आहे. त्यामुळे वाहतुकीचा आणि प्रवासाचा वेळ वाचण्यास मदत झाली आहे.”

लोकसभा निवडणूकीचा संग्राम हा देश एकसंघ मानणारे विरुध्द देशाचे उत्तर दक्षिण असा भेद करणार्‍यांमध्ये-माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर

पुणे: लोकसभेची निवडणूकाचा संग्राम हा देश एकसंघ मानणारे विरुध्द देशाचे उत्तर दक्षिण असा भेद निर्माण करणार्‍यांमध्ये आहे. राष्ट्र प्रथम विरुध्द परिवार प्रथम मानणार्‍यांमध्ये हा संघर्ष असल्याचे भाजपचे माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी महायुतीचे समन्वयक संदीप खर्डेकर प्रदेश प्रवक्ते संजय मयेकर, सहप्रसिध्दी हेमंत लेले,पुष्कर तुळजापुकर यावेळी उपस्थित होते.

जावडेकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षामध्ये केलेल्या कामामुळे देशाची आर्थिक प्रगती झाली आहे. जगामध्ये देशाची प्रतिष्ठा वाढली आहे. देशातील प्रत्येक नागरिकांपर्यंत मोदी सरकारच्या योजना पोहचल्या आहेत. त्यामुळे मोदींवर लोकांचा विश्‍वास अधिक वाढला असल्यामुळे यावेळी भाजपच्या नेतृत्वातील एनडीएला मोठे बहुमत मिळणार आहे. देशामध्ये रेल्वे, बंदरे, जलमार्ग आणि विमानतळे अशा पायाभुत सुविधांमध्ये मोदी सरकारने मोठे काम केले आहे. देशात प्रत्येक कुटूंबापर्यंत विकास पोहचला असल्याचे जावडेकर यांनी सांगितले.

देशामध्ये 77 लाख लोकांकडे आज इंटरनेटची सुविधा आहे. जगात सर्वात स्वस्त डेटा हा भारतात मिळतो.नागरिकांच्या थेट खात्यामध्ये विविध योजनांचे पैसे जमा केले जातात. 34 लाख कोटी रुपये मोदी सरकारने गरीबांच्या खात्यात जमा केले त्यामुळे मोदींना मत जनता देणार आहे. 35 कोटी युवक आणि महिलांना मुद्रा कर्ज योजनेमुळे 20 कोटीहून अधिक रोजगार निर्माण झाले. यामध्ये देशाची अर्थव्यवस्था अधिक बळकट झाली असल्याचे जावडेकर म्हणाले.

विरोधी पक्ष सध्या एनडीएला 272 पर्यंत रोखण्याची भाषा करत आहे. त्यांच्यामध्ये निराशा असून पराभव समोर दिसत असल्यामुळे अशा प्रकारची विधाने केली जातात. विरोधक खोटा प्रचार करत आहेत. विरोधकांच्या प्रचाराला हितसंबधी गट देशातून आणि विदेशातूनही मदत करीत आहेत. एका टूलकिटनुसार त्यांचा प्रचार सुरु आहे, परंतू त्याचा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही असे जावडेकर म्हणाले

डॉक्टरच्या बंगल्यातून ४४ लाखांचा ऐवज छोट्यांनी पळविला

पुणे- सिंहगड रस्त्यावर राहणाऱ्या पुण्यातील प्रख्यात डॉक्टरच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारला.बेडरूममधील कपाट उचकटून चोरट्यांनी तब्बल ७८२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केली. ही रक्कम ४४ लाख रुपयांच्या घरात आहे.शनिवारी (दि. २७) संध्याकाळी सव्वापाच ते रविवारी (दि. २८) दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान घडली. या प्रकरणी डॉ. चंद्रकांत मधुसूदन आठल्ये (वय ६८, रा. सफलानंद सोसायटी, संतोष हॉलजवळ, आनंदनगर, सिंहगड रोड) यांनी फिर्याद दिली आहे. त्याआधारे सिंहगड रोड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. चंद्रकांत आठल्ये आणि त्यांचा मुलगा डॉ. सचिन आठल्ये हे दोघेही व्यवसायाने डॉक्टर आहेत. फिर्यादी आठल्ये हे दंतरोगतज्ज्ञ आहेत. त्यांचा शिवाजीनगर येथील घोले रस्त्यावर दवाखाना आहे. तसेच, ते रुबी हॉल क्लिनिक आणि अन्य रुग्णालयांमध्येदेखील वैद्यकीय तज्ज्ञ म्हणून काम करतात. त्यांचा या क्षेत्रातील ४० वर्षांपेक्षा अधिकचा अनुभव आहे. डॉ. सचिन आठल्ये यांचादेखील शिवाजीनगर येथे दवाखाना आहे. ते नेत्ररोग तज्ज्ञ (आय सर्जन अँड कॉर्निया सपेशालिस्ट) आहेत. तेदेखील रुबी हॉल क्लिनिकसह अन्य रुग्णालयांमध्ये व्हिजिटिंग डॉक्टर म्हणून काम करतात. तसेच, आयरा आय केअर नावाने संस्था चालवतात.

डॉ. आठल्ये यांचे भोर-वेल्हा परिसरात फार्म हाऊस आहे. त्या ठिकाणी अधूनमधून कुटुंबातील सर्वजण राहण्यासाठी जात असतात. शनिवारी सर्व कुटुंबीय संध्याकाळी सव्वा पाचच्या सुमारास भोरला जाण्यासाठी घरामधून बाहेर पडले. एक दिवस फार्म हाऊसवर घालवल्यानंतर सर्वजण रविवारी घरी परतले. त्यावेळी त्यांना बेडरूममध्ये साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. बेडरूममधील कपाट उचकटल्याचे आणि आतील मौल्यवान ऐवज गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ याबाबत स्थानिक पोलिसांना आणि पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ निरीक्षक विजय कुंभार, पोलीस निरीक्षक क्षीरसागर, साहाय्यक निरीक्षक सचिन निकम, पोलीस उपनिरीक्षक जायभाय, लाड यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, पोलिसांनी पोलिसांचे ‘आय कार युनिट’ व ‘श्वान पथका’ला पाचारण केले. घटनास्थळावरून परिस्थितीजन्य पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

पोलिसांनी बंगल्याच्या आवारातील सीसीटीव्ही फुटेजदेखील तपासले. त्यामध्ये मोटारसायकलवरून तीन चोरटे येताना आणि चोरी करून जाताना दिसत आहेत. हे फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. परंतु, त्याची स्पष्टता नसल्याने तपासात अडथळे येत आहेत. पोलिसांनी बंगल्याच्या आसपासच्या भागातील तसेच रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे.

चोरट्यांनी बंगल्याच्या आवारात प्रवेश केल्यानंतर मागील बाजूस असलेल्या बेडरूमच्या बाजूला गेले. बेडरूमच्या खिडकीचे गज कापले. या खिडकीमधून बेडरूममध्ये प्रवेश केला. बेडरूममधील कपाट उचकटण्यात आले. कपाटातील कप्प्याचे लॉक तोडण्यात आले. या कप्प्यात ठेवण्यात आलेले दागिने काढून घेतले. त्यानंतर चोरट्यांनी डॉ. सचिन यांच्या बेडरूमकडे मोर्चा वळवला. त्यांच्या देखील कपाटातील कप्पा उचकटून सोन्याचे दागिने आणि रोकड चोरट्यांनी लांबवली.

याबाबत बोलताना सहायक निरीक्षक तथा तपास अधिकारी सचिन निकम यांनी माध्यमांना सांगितले की, ‘‘घरफोडी झालेल्या कुटुंबीयांच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार, पंचनामा करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांनी फिर्यादीच्या राहत्या घराच्या दोन बेडरूममधील कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोकड असा ४४ लाख १९ हजारांचा ऐवज चोरून नेण्यात आला आहे. आम्ही सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्यावरून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे. रेकॉर्डवरील चोरट्यांकडे चौकशी करण्यात येत आहे.’’

पुणे स्टेशनवरून आईच्या कुशीत झोपलेले ६ महिन्याचे बाळ पळविणाऱ्या टोळीला कर्नाटकात पकडले-बाळाची सुखरूप सुटका:पुणे पोलिसांची अभिमानास्पद कामगिरी

निवडणुकीच्या धामधुमीतही पुणे पोलिसांनी दाखविली कर्तव्य तत्परता -आयुक्तांनी तपास पथकाला दिले १ लाखाचे बक्षीस

गरीबाच्या बाळाचा पुणे पोलिसांनी घेतला तत्परतेने शोध

पुणे- अवघ्या ६ महिने वयाच्या बालकाचे अपहरण करून विक्री करणाऱ्या टोळीला विजापुर राज्य कर्नाटक येथे पकडून अपहरण झालेल्या बालकाची सुटका पुणे पोलिसांनी केली आहे. यासंदर्भात पोलिसांनी सांगितले की,’दिनांक २७/०४/२०२४ रोजी पुणे रेल्वे स्टेशन, समोरिल मोकळ्या जागेत आई सोबत झोपलेल्या ६ महिने वयाचे बालकाला पाहटे ०२.०० वाजताचे सुमारास अनोळखी इसमाने उचलुन अपहरण करून चोरी केल्याचे मुलाचे नातेवाईक वडील(वय ३४ वर्षे रा. यवतमाळ) यांनी पहाटे ०४/०० वाजताचे सुमारास यांनी समक्ष पोलीस ठाणेस येवून कळविल्याने बंडगार्डन पोलीस ठाणे गु.र.नं.११८/२०२४ भादंवि कलम ३६३,३७०,३४ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला होता .
या गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून पोलिसांनी त्वरीत ३ टीम तयार करून परिसरातील ५० पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासले असता एका ठिकाणी संशयीत इसम मुलास उचलुन घेवून जाताना अस्पष्टपणे दिसुन आले. त्यानंतर पुन्हा बारकाईने पाहिले असता सदरचा संशयीत इसम हा पुणे स्टेशन परिसरातुन कोणत्या मार्गाने गेला हे दिसुन आले नाही त्यामुळे सदर गुन्हयामध्ये चारचाकी वाहनाचा वापर झाला असावा तसेच गुन्हयात आरोपी १ पेक्षा जास्त असल्याचा संशय बळविल्याने या बाबत तांत्रिक विश्लेषण केल्यावर गुन्हयातील आरोपी हे चारचाकी गाडीने पुणे स्टेशन येथुन विजापुर राज्य कर्नाटक येथे गेल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर त्या अनुषंगाने बंडगार्डन पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे फौजदार रविंद्र गावडे व टीम वीजापुर राज्य कर्नाटक येथे तत्काळ रवाना करून तिकडच्या वेगवेगळया ठिकाणी छापा टाकुन चंद्रशेखर मलकाप्पा नडुगंड्डी वय २४ वर्षे रा. जंबगी ता. जि. वीजापुर याला त्याचे राहते घरातुन ताब्यात घेतले त्याचेकडे कौशल्य पुर्ण तपास केला असता त्याने अपहृत बालक हे त्याचे इतर ४ साथीदार यांचे मदतीने अपहरण करून त्यांचेडील इंडिका कार मधुन वीजापुर येथे नेवूनमे सुभाष सताप्पा कांबळे वय ५५ वर्षे रा. लांवगी सोलापुर यांना ३ लाख रुपयांना विक्री केल्याचे सांगितल्याने या पोलीस पथकाने विजापुर शहर येथे वेगवेगळया हॉटेलमध्ये पाहणी केली असता हॉटेल राजधानी, गांधी चौक वीजापुर येथे अपहरण झालेले बालक व आरोपी सुभाष कांबळे यांना ताब्यात घेतले आहे.

या तपास कामगिरीबाबतपोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी रोख एक लाख रुपये बक्षिस देवुन पोलिसांच्या या टिमचा गौरव केला आहे.
संबधित तपास कारवाई ही अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त परिमंडळ २. श्रीमती स्मार्तना पाटील, . सहा पोलीस आयुक्त लष्कर विभाग,संजय सुर्वे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीकांत निबांळकर यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सदिप मधाले, पोलीस उप-निरीक्षक रविंद्र गावडे, पोउपनि चेतन धनवडे, पोलीस अंमलदार सुधीर घोटकुले, ज्ञानेश्वर बडे, सागर घोरपडे, मंगेश बोराडे, शिवाजी सरक, मनोज भोकरे, ज्ञानेश्वर गायकवाड, राजु धुलगुडे, विलास केकान यांचे पथकाने केली.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ ,पौड रोड शाखेतर्फे सांस्कृतिक स्पर्धा संपन्न

पुणे-अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पौड रोड शाखा व कला संस्कृती आघाडी* यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 28 एप्रिल रोजी ABBM आयडॉल 2 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते..
लॉ कॉलेज रोड वरील आगाशे शाळेच्या हॉल मध्ये झालेल्या भरगच्च कार्यक्रमाला श्रोत्यांचा मोठा प्रतिसाद लाभला. गायन, वादन, नृत्य, नाट्यछटा या विभागात सुमारे *50 पेक्षा जास्त स्पर्धकांनी* भाग घेतला.आठ वर्षाच्या मुलापासून ते 84 वर्षाच्या जेष्ठापर्यंत सर्वांचा यात समावेश होता.महाराष्ट्राच्या पारंपरिक नृत्यशैली वर आधारीत वेशभूषा व त्याला साजेसा अविष्कार आपल्या नृत्यातून, गाण्यातून, नाट्यछटेतून सादर करण्यात आले. संतूर, कॅसिओ, पेटी, माऊथ ऑर्गन सारख्या वादकांनी या स्पर्धेला रांगत आणली. विशेष मुलीं (special child) स्पर्धकांनी रसिकांची मने जिंकली.

स्पर्धेचे विजेते गट 1 (16 वर्षापर्यंत)1. अद्वैत तांबेकर (नृत्य)2. ईश्वरी कुलकर्णी (गायन)3. ध्रुव वाघोलीकर (वादन) 
गट 2 (16 ते 50 वर्षे )1. प्रीती नगरकर (नृत्य)2. दीपिका तांबेकर (गायन)3. श्वेता लिमये (गायन)
गट 3 (50 वर्षाच्या पुढे)1. मीनल गानू (गायन)2. दयाकर दाबके (गायन)3. मेधा जोशी (वादन)
विशेष उल्लेखनीय 1. सुरेश फडणीस

प्रत्येकात एक कला दडलेली असते व अशा कलाकारांना एक व्यासपीठ मिळून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे उदगार पुणे जिल्हाध्यक्ष मंदार रेडे यांनी काढले.सौ केतकी कुलकर्णी (जिल्हाध्यक्षा महिला आघाडी) यांनी प्रास्ताविक केले,प्रदेश कार्याध्यक्ष निखिल लातूरकर यांनी नांदेड वरून येऊन आवर्जून या कार्यक्रमाला उपास्थिती लावली व स्पर्धेकांना शुभेच्छा दिल्या. गणेशस्तवन सौ सीमा रानडे यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ दीपा केळकर यांनी केले व आभार सौ. मंजुषा खिरवडकर यांनी मानले.
या यशस्वी कार्यक्रमाचे आयोजन विवेक खिरवडकर (पौड रोड शाखा अध्यक्ष), उदय सुभेदार (कला संस्कृती आघाडी अध्यक्ष), गीता देशमुख (उपाध्यक्ष), दीपक कुलकर्णी (उपाध्यक्ष),* रवींद्र रानडे, माधव तिळगूळकर, अनिरुद्ध पळशीकर यांनी केले.
कार्यक्रमाला मकरंद कुलकर्णी, दत्तात्रय देशपांडे, सौ.जयश्री घाटे, डॉ अरुण जोशी, सौ चित्रा जोशी,अजित खरे, अमोघ पाठक, ऋचा पाठक, अमोल व तृप्ती कुलकर्णी उपस्थित होते.
पाच परीक्षकांच्या टीम ने सर्व आवश्यक निकषावर स्पर्धेचा निकाल दिला. यात सौ गौरी शिकारपूर, सौ सानिका खरे, नीता शेबेकर, राजश्री महाजनी व मिलिंद कुलकर्णी यांचा समावेश होता.
शेवटपर्यंत उत्कंठा लागून राहिलेल्या स्पर्धेची यशस्वी सांगता झाली.

राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धा पुणे जिल्हा पुरूष तर भंडारा जिल्हा महिला संघाला विजेतेपद

पिंपरी, पुणे (दि. ३० एप्रिल २०२४) – महाराष्ट्र राज्य अँमॅच्युअर नेटबॉल संघटनेच्या मान्यतेने, पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय, निगडी, पुणे जिल्हा नेटबॉल संघटना व विठ्ठलशेठ सोमाजी काळभोर चॅरिटेबल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने २७ ते २९ एप्रिल या कालावधीत १७ वी वरीष्ठ गट (पुरुष व महिला) राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धा पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पीसीसीओई) येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये पुणे जिल्हा पुरुष संघ आणि भंडारा जिल्हा महिला संघाने विजेतेपद पटकावले.
पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात पुणे जिल्हा संघाने भंडारा जिल्हा संघाला २५/१५ गुण फरकाने व महिला गटामध्ये भंडारा जिल्हा संघाने धुळे संघाला १५/११ गुण फरकाने पराभव केला. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील २५ पुरुष संघ व २० महिला संघानी सहभाग घेतला.
तत्पूर्वी झालेल्या पुरुषांच्या उपांत्य सामन्यामध्ये पुणे जिल्हा संघाने गोंदिया जिल्हा संघाला, भंडारा जिल्हा संघाने संभाजीनगर जिल्हा संघाला, महिला गटामध्ये भंडारा जिल्ह्याने परभणी जिल्ह्याला व धुळे जिल्ह्याने चंद्रपूर जिल्ह्याला नमवून अंतिम फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेचा निकाल :- पुरुष गट – विजयी पुणे जिल्हा, उपविजेता – भंडारा जिल्हा, तृतीय क्रमांक – गोंदिया जिल्हा ; महिला गट – विजयी भंडारा जिल्हा, उपविजयी – धुळे जिल्हा, तृतीय क्रमांक – परभणी जिल्हा.
स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभ महाराष्ट्र अँमॅच्युअर नेटबॉल संघटनेचे सचिव डॉ. ललित जीवानी, पुणे जिल्हा नेटबॉल संघटनेचे सचिव मानसिंग वाबळे, पीसीसीओईचे एसडीडब्ल्यू असो. डीन डॉ. अजय गायकवाड, विठ्ठलशेठ सोमाजी काळभोर चॅरिटेबल फाऊंडेशनचे सदस्य पुरुषोत्तम गोळे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेतील विजयी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेचे आयोजन पीसीसीओईचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. संतोष पाचारणे, पुणे जिल्हा नेटबॉल संघटनेचे उपाध्यक्ष समीर सिकीलकर, अश्वजीत सोनवणे, सुनील मंडलिक यांनी केले.

भाजपच्या कारकिर्दीत पुण्याच्या विकासाला ब्रेक – रवींद्र धंगेकर

पुणे- गेल्या १० वर्षात पुण्याच्या विकासाला खीळ बसली आहे. १०० नगरसेवक शहरातील सहाही आमदार आणि १ खासदार याबरोबरच केंद्रात व राज्यात सत्ता एवढे असूनही पुण्याच्या विकासासाठी मोठा विकास निधी केंद्र व राज्य सरकारकडून भाजपने का नाही मिळवला असा प्रश्न महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आ. रवींद्र धंगेकर यांनी उपस्थित केला. कसबा मतदार संघातील पदयात्रेच्या सांगता वेळी ते बोलत होते. पदयात्रेस कार्यकर्ते व नागरिक यांनी मोठी गर्दी केली होती.

धंगेकर म्हणाले की, काँग्रेस पक्षाने सन १९९२ ते २०१७ या कालावधीत मित्र पक्षांच्या मदतीने पुण्याच्या विकासाचा सुवर्णकाळ निर्माण केला. ( पुणे पॅटर्नचा कालावधी सोडून). जवाहरलाल नेहरू योजनेतून पुण्याच्या विकासासाठी केंद्राकडून २५०० कोटी रुपयांचा विकासनिधी पुण्यासाठी आणला. त्यामुळे पुण्याच्या विकासात चांगली भर पडली. त्यानंतर मात्र भाजप सत्त्तेवर आल्यावर गेल्या ७ वर्षात पुण्याला कोणी वाली नाही असे चित्र उभे राहिले. याचे कारण म्हणजे पुण्याच्या विकासाबाबत भाजप निष्क्रिय राहिला. त्यामुळेच वाहतूक कोंडी, अपुरा पाणी पुरवठा, पर्यावरणाचे प्रश्न, बेकारी अशा अनेक प्रश्नांमुळे पुणेकर त्रस्त झाले. त्यासाठीच आता पर्वर्तन आवश्यक असून १३ मे या दिवशी महाविकास आघाडी व इंडिया आघाडी काँग्रेस पक्षाच्या चिन्हापुढील बटन दाबून काँग्रेसला विजयी करा असे धंगेकर यावेळी पुढे म्हणाले.

धंगेकरांच्या पूर्व भागातील पदयात्रेत जेसीपीतून फुलांचा वर्षाव

कसबा विधानसभा मतदार संघाची पदयात्रा महात्मा फुले स्मारकापासून सुरु झाली.आत्तापर्यंतच्या लोकसभा निवडणुकांमध्ये जीप यात्रा आयोजित केल्या जायच्या या लोकसभा निवडणुकीत उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर यांनी मात्र सर्वत्र पायी चालत पदायात्रेतून नागरिकांशी संवाद साधला ही विशेष बाब मानवी लागेल. ही पदयात्रा शहराच्या पूर्व भागात झगडे आळी, घोरपडे पेठ पोलीस चौकी, घसेटी पुल, कस्तुरे चौक, मोमीनपुरा, काची आळी, सुभानशा दर्गा, शितळा देवी चौक, गाडीखाना, पानघंटी चौक, राष्ट्रभुषण चौक मार्गे खडकमाळ आळी येथे समाप्त झाली.

या पदयात्रेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि आम आदमी पार्टी यांचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ढोल – ताशा सर्व पक्षांचे झेंडे, फटाक्यांचा धुमधडाका आणि जयघोषाच्या घोषणा अशा वातावरणात उमेदवार रवींद्र धंगेकर मार्गावरील शेकडो नागरिकांना भेटत होते. अनेक सार्वजनिक गणेश मंडळात त्यांनी श्री गणेशाची आरती केली, काँग्रेसचे चिन्ह हाताचा पंजा पदायत्रेत ठिकठिकाणी उंचावला जात होता विशेष म्हणजे घोरपडे पेठ पोलीस चौकी येथे हेमंत राजभोज आणि शाबीर खान यांनी जे सी पी मधून रवींद्र धंगेकरांवर फुलांचा वर्षाव केला. त्यावेळी टाळ्यांच्या कडकडाटामुळे वातावरण भरून गेले होते. मार्गावरील अनेक मंदिरे व प्रार्थना स्थळांना धंगेकरांनी भेट देऊन दर्शन घेतले. राजकीय दृष्ट्या अतिशय जागरूक असणाऱ्या शहराच्या पूर्व भागात धंगेकरांना   मोठा परतिसाद मिळत असल्याचे दिसून आले.

या पदयात्रेत उमेदवार आमदार धंगेकरांसोबत माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, माजी महापौर कमाल व्यवहारे, काँग्रेस उपाध्यक्ष अजित दरेकर, नेहरू स्टेडीयम ब्लॉक अध्यक्ष हेमंत राजभोज, शाबीर खान, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष गणेश नलावडे, संदीप गायकवाड, सुमित डांगे, निलेश बोरवडे, गणेश भंडारी, सागर कांबळे, शैलेश आंदेकर, रुपेश पवार, आयुब पठाण, रवी पाटोळे, सईद सय्यद, सौरव आमराळे, विक्रम खन्ना आदी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खडकीतही प्रतिसाद

शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातील खडकी व खडकी बाजार परिसरात रवींद्र धंगेकरांच्या पदयात्रेस प्रतिसाद मिळाला. काँग्रेस व मित्र पक्षांचे झेंडे, हाताच्या पंज्याच्या प्रतिकृती, ढोल ताशा आणि कार्यकर्त्यांनी उत्साहात दिलेल्या घोषणा यामुळे खडकीचा सारा परिसर दुमदुमून गेला होता. चौका चौकात फटाक्यांच्या माळा लागत होत्या. खडकी कॅन्टॉन्मेंटचे माजी उपाध्यक्ष मनीष आनंद आणि पुणे शहर महिला काँग्रेस अध्यक्ष पूजा आनंद यांनी आयोजित केलेल्या पदयात्रेत ७००-८०० हून अधिक कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते. पदयात्रेच्या दिवशीच पूजा आनंद यांचा वाढदिवस असल्याने खडकी व खडकी बाजार परिसरात चौकाचौकात कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या माळा लावल्या व ठिकठिकाणी केक कापले गेले यावेळी महाविकास आघाडीच्या जयजयकाराच्या घोषणांनी सारा परिसर दुमदुमून गेला होता. खडकी कचेरीचे उद्घाटनही यावेळी केले गेले. या पदयात्रेत शेकडो नागरिकांनी उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या बरोबर सेल्फी काढले. काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि आम आदमी पार्टी यांचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

 या पदयात्रेत खडकी कॅन्टॉन्मेंटचे माजी उपाध्यक्ष मनीष आनंद, पुणे शहर महिला काँग्रेस अध्यक्ष पूजा आंनद,माजी आमदार दीप्ती चवधरी, माजी नगरसेवक दत्ता बहिरट, माजी नगरसेवक कैलास गायकवाड, ज्ञानेश्वर उर्फ माउली यादव, शिवाजीनगर विधानसभा अध्यक्ष उदयभाऊ महाले, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष शिवाजीनगर कार्याध्यक्ष राजू साने, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पुणे शहर संघटक प्रशांत राणे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष खडकी विभाग प्रमुख हेमंत यादव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष उपविभाग प्रमुख प्रकाश चौरे, काँग्रेस खडकी ब्लॉक अध्यक्ष भगतसिंग ठाकूर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष खडकी विभाग अध्यक्ष निकित यादव, ब्लॉक अध्यक्ष विशाल जाधव,बंडू चव्हाण, प्रशांत गवळी, मनोज सूर्यवंशी, गिरीश सोनार, अजित जाधव, सुंदरताई ओव्हाळ, अक्षय शिंदे, रणजीत गायकवाड, संजय खडसे,शिवराज गुले,प्रियंका मधाळे,अशरफ तांबोळी, रोहिणी बोरसेआदी सहभागी झाले होते.