Home Blog Page 1065

उद्या हडपसर मध्ये महिला शिवसेना मेळावा

पुणे: जिल्ह्यातील महायुतीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर मोहोळ, शिवाजीराव आढळराव पाटील, सुनेत्रा पवार, श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ दिनांक ३ मे २०२४ रोजी हडपसर मधील हांडेवाडी रोड येथील हिंदुहद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे फुटबॉल मैदान येथे सायं ६वा आयोजीत करण्यात आला आहे. या मेळाव्यात महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, महिलांचे विविध प्रश्न मध्यवर्ती मेळाव्यात आणणे व महिलांचा राजकीय व सामाजिक सहभाग वाढविण्यासाठी मार्गदर्शन असणार आहे. स्नेह मेळाव्यास शिवसेनानेत्या, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे तसेच जिल्ह्यातील सर्व महिला संपर्कप्रमुख, जिल्हा संघटिका व शिवसेनेचे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती शिवसेना भवन पुणे येथील पत्रकार परिषदेत डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी दिली.

घरो घरी जाऊन प्रचार करत असताना कोणती काळजी घ्यावी, प्रसार माध्यम आणि सोशल मीडियावर पोस्ट करतांना काय सतर्कता आपण जपायला हवी या बद्दलचे मुद्दे आणि महिलांचे अनुभव एकमेकाला सांगता यावे. तसेच महिलांचे एक मतदार म्हणून, तसेच नागरीक म्हणून अथवा एक स्त्री या दृष्टीने अनेक प्रश्न असतात यात आरोग्य, पाणी, स्वच्छता, सुरक्षा यामुळे स्त्रियांचा सामाजिक आणि राजकीय सहभाग वाढविणे शिवसेना महिला आघाडी काम करत आहे त्याची माहिती सर्वांना व्हावी या दृष्टीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

धर्मावरून आरक्षण संदर्भात स्पष्टीकरण करताना डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, पुण्यामध्ये झालेल्या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्याही धर्माचा उल्लेख न करता धर्मावरून मिळणाऱ्या आरक्षण संदर्भात भाष्य केले होते. जर धर्म पाहून आरक्षण मिळाले तर अनेक जण धर्म परिवर्तन करून आरक्षणाची मागणी करतील. याचा अर्थ आपणच त्यांना धर्मांतर करण्याला प्रलोभन देतोय असा होईल..!

उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या, जेव्हा राजकीय परिवर्तन झालं; एकनाथ शिंदे यांच्या सहकाऱ्यांना घेऊन बाहेर पडले तेव्हापासूनच त्यांची टीका चालू आहे. लोकशाही मध्ये आधिकर आहे शेवटी कोणाला कोणता मुक प्राणी आठवतो हा त्याचा त्याचा प्रश्न आहे.

पुणे जिल्हा बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत स्टार बॉक्सिंग अकॅडमी, खडकीने सांघिक विजेतेपद पटकाविले.

पुणे जिल्हा बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन संपन्न.

पुणे – पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटना व स्व. तुकाराम भापकर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले, साहित्यरत्न शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त स्टार बॉक्सिंग अकॅडमी, रेंजहिल्स, खडकी येथे आयोजित भव्य पुणे जिल्हा बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत स्टार बॉक्सिंग अकॅडमी, खडकीने ८८ गुणांसह सांघिक विजेतेपद पटकावले तर मनोज पिंगळे स्पोर्ट्स अकॅडमी, लोणी यांनी ६३ गुणांसह सांघिक उपविजेतेपद मिळविले.

स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ स्व. तुकाराम भापकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मा. उपाध्यक्ष श्री. दुर्योधन भापकर यांच्या अध्यक्षतेखाली खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मा. उपाध्यक्ष सौ. कार्तिकीताई हिवरकर व पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे कार्याध्यक्ष श्री. भरतकुमार व्हावळ यांच्या शुभ हस्ते पार पडला. याप्रसंगी पोलीस निरीक्षक श्री. विकास जाधव, रोटरी क्लब ऑफ पुणे डायमंडचे अध्यक्ष श्री. रामदास जैद, रोटरी बिजनेसचे सेक्रेटरी श्री. आनंद कुलकर्णी, ॲड. राकेश भानु, ई. मान्यवरांच्या हस्ते बेस्ट बॉक्सरना पारितोषिके देण्यात आली.

पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे महासचिव मा.अभिमन्यू सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले व रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री. महेश पवार यांनी आभार प्रदर्शन केले.

पुणे जिल्हा बॉक्सिंग बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा – २०२४
▪️बेस्ट बॉक्सर:

  1. कब क्लास मुली:- रितिका दिवेकर (शिवपुजे बॉक्सिंग अकॅडमी, दौंड)
  2. कब क्लास मुले: विराट जाधव (एस.डी.बी.सी. शिरूर)
  3. कॅडेट मुली: अनया घारे (स्टार बॉक्सिंग अकॅडमी)
  4. कॅडेट मुले: उमर शेख (अभिमन्यू स्पोर्टस् अकॅडमी, उरुळी कांचन)
  5. कॅडेट मुले: वीर घोरपडे (एम.पी.एस.ए. हवेली)
  6. सबज्युनिअर मुले: राजवीर कौले – बारामती स्पोर्ट्स अकॅडमी
  7. सबज्युनिअर मुले: साद शेख (स्टार बॉक्सिंग अकॅडमी)
  8. ज्युनियर मुली:- महिमा वर्मा – बी.सी.ए.वालचंद नगर,इंदापूर
  9. ज्युनियर मुले: शार्दुल कुंभार (बी.सी.ए.वालचंद नगर, इंदापूर
  10. युथ महिला:- सिद्रा शेख – (एम.पी.एस.ए. हवेली)
  11. वरिष्ठ पुरुष :- फरदीन शेख (एम.आय.टी. लोणी काळभोर)

अंतिम फेरीचे सविस्तर निकाल पुढील प्रमाणे:- ▪️कब क्लास मुली :-
१. २४ ते २६ किलो: रितिका दिवेकर (शिवपूजे अकॅडमी, पाटस) वि.वि. सावी शितोळे (पाटस बॉक्सिंग अँकॅडमी, दौंड)

  1. २८ ते ३० किलो: परिनिधी बिवाल (स्टार अँकॅडमी, खडकी) वि. वि. वंदना शा (भापकर अँकॅडमी)
  2. ३८ ते ४० किलो: सावी यादव (स्टार अकॅडमी, खडकी) वि. ज्योती बहाजन (अजितसिंग अकॅडमी, खडक
    ▪️छोटा गट मुले :-
  3. २२ ते २४ किलो: मोक्षित घडवाल (स्टार अकॅडमी, खडकी) वि. वि. ओम काळे (पाटस अकॅडमी, दौंड)
    ▪️कब क्लास मुले :-
  4. २४ ते २६ किलो: विराज जाधव (सुर्यकांत डी.बी.सी. शिरूर) वि. वि. आराध्य शितोळे (पाटस अकॅडमी, दौंड)
  5. २६ ते २८ किलो: साईराज जाधव (एस.डी.बी.सी. शिरूर) वि.वि. शिवम ओव्हाळ (एस.बी.ए. भोर)
    ▪️कॅडेट मुली :-
  6. २८ ते ३० किलो: पूर्वा सातव (एस.डी.बी.सी शिरूर) वि.वि. जिया खैरनार (स्टार अकॅडमी, खडकी)
  7. ३० ते ३२ किलो: मुग्धा कुंभार (स्टार अकॅडमी) वि.वि. आरोही कुंभार (पाटस बॉक्सिंग अकॅडमी, दौंड)
  8. ३२ ते ३५ किलो: संध्या सोनवाल (स्टार अकॅडमी) वि.वि. श्रुतिका सातव (एस.डी.बी.सी. शिरूर)
  9. ३८ ते ४१ किलो: अनया घारे (स्टार अकॅडमी) वि.वि. अक्षरा गलांडे (पाटस बॉक्सिंग अँकॅडमी, दौंड)
  10. ४१ ते ४४ किलो: आर्य सातव (एस.डी.बी.सी. शिरूर) वि.वि. तनिष्का (स्टार अकॅडमी)
    ▪️कॅडेट मुले :-
  11. २६ ते २८ किलो: आयुष प्रसाद (अभिमन्यू एस. ए.,उरुळी) वि.वि. राजवीर गोटे (एस.डी.बी.सी.शिरूर)
  12. २८ ते ३० किलो: उमर शेख (अभिमन्यू स्पोर्ट्स अकॅडमी,उरुळी) वि.वि. इदु शहा (अजितसिंग अकॅडमी)
  13. ३० ते ३२ किलो: हुसेन शेख (स्टार बॉक्सिंग अकॅडमी) वि.वि. लक्षदीप मोरे (मनोज पिंगळे एस.ए. हवेली)
  14. ३८ ते ४१ किलो: साई भंडारी (डॉ. कराड अकॅडमी, लोणी) वि.वि. रुद्र घारे (स्टार बॉक्सिंग अकॅडमी)
  15. ४७ ते ५० किलो: वीर घोरपडे (मनोज पिंगळे एस.ए. हवेली) वि.वि. नवनीत यादव (स्टार बॉक्सिंग अकॅडमी)
    ▪️सबज्युनिअर मुली :-
  16. ३१ ते ३३ किलो: साक्षी मीना (स्टार बॉक्सिंग अकॅडमी) वि.वि. माही अडसूळ (अभिमन्यू स्पोर्ट्स अकॅडमी,उरुळी कांचन)
  17. ४० ते ४३ किलो: जिज्ञासा कुंभार (स्टार बॉक्सिंग अकॅडमी) वि.वि. चैत्राली एरंडे (एस.डी. बी.सी.शिरूर)
  18. ४३ ते ४६ किलो: दिव्या पवळे (एम.पी. एस.ए.हवेली) वि.वि. महेक शेख (बारामती बॉक्सिंग अकॅडमी)
  19. ४९ ते ५२ किलो: आयुष्यी शिंदे (एम.पी.एस.ए. हवेली) वि.वि. अनुश्री पाटील (एस.डी. बी.सी.शिरूर)
    ▪️सबज्युनिअर मुले :-
  20. ३३ ते ३५ किलो: राजवीर कौले (बारामती बॉक्सिंग अकॅडमी) वि.वि. अलकन शेख (स्टार बॉक्सिंग अकॅडमी)
  21. ३५ ते ३७ किलो: साई सिद्धे (एम.पी.एस.ए. हवेली) वि.वि. समीर शहा (स्टार बॉक्सिंग अकॅडमी)
  22. ४० ते ४३ किलो: अहद शेख (एम.पी.एस.ए. हवेली) वि.वि. यशराज बडेकर (अभिमन्यू स्पोर्ट्स अकॅडमी, उरुळी कांचन)
  23. ४३ ते ४६ किलो: साद खान (स्टार बॉक्सिंग अकॅडमी) वि.वि. अमन चौधरी (अभिमन्यू स्पोर्ट्स अँकॅडमी,उरुळी कांचन)
  24. ४९ ते ५२ किलो: उदय घोरपडे (एम पी एस ए हवेली) वि.वि. हर्ष चव्हाण (डॉ. कराड स्पोर्ट्स अँकॅडमी, लोणी काळभोर)
  25. ५२ ते ५५ किलो: आर्यन बोबडे (एम.पी.एस.ए. हवेली) वि.वि. मानस पाटील (एस.डी. बी.सी.शिरूर)
    ▪️ज्युनियर मुली:-
  26. ४२ ते ४४ किलो: जानवी सांगळे (स्टार बॉक्सिंग अँकॅडमी) वि.वि. अक्षदा जाधव (अजितसिंग बॉक्सिंग अँकॅडमी)
  27. ४४ ते ४६ किलो: वेदा शिंदे (एम.पी.एस ए. हवेली) वि.वि. आर्या पगारे (स्टार बॉक्सिंग अकॅडमी)
  28. ५७ ते ६०किलो: आकांक्षा पोलकम (स्टार बॉक्सिंग अकॅडमी) वि.वि. सानिया रॉय (अजितसिंग बॉक्सिंग अकॅडमी)
  29. ७५ ते८१ किलो: महिमा वर्मा (बी.सी.ए. वालचंद नगर, इंदापूर) वि.वि. पूर्वी दलगज (एम.पी.एस.ए. हवेली)
    ▪️ज्युनियर मुले :-
  30. ४४ ते ४६ किलो: रेहान शेख (अजितसिंग बॉक्सिंग अँकॅडमी) वि.वि. रोहन दोडके (एम.पी.एस.ए. हवेली)
  31. ४६ ते ४८ किलो: अपूर्व कर्णावत (स्टार बॉक्सिंग अँकॅडमी) वि.वि. साद शेख (एम.पी.एस.ए. हवेली)
  32. ५० ते ५२ किलो: यशदानी शेख (एम.पी.एस.ए. हवेली) वि.वि. अमन भोसले (एम.आय.टी. लोणी काळभोर)
  33. ५४ ते ५७ किलो: सार्थक तांगडे (बी.सी.ए. वालचंद नगर, इंदापूर) वि.वि. ध्रुव जाधव (एस.एस.ए. भोर)
  34. ५७ ते ६० किलो: शार्दुल कुंभार (बी.सी.ए. वालचंद नगर, इंदापूर) वि.वि. शार्दुल कुरे (एस.डी.बी.सी. शिरूर)
  35. ८० पेक्षा जास्त किलो: रुद्र मिठू (अजितसिंग बॉक्सिंग अकॅडमी) वि.वि. ऋषिकेश चंडालिया (स्टार बॉक्सिंग अकॅडमी)
    ▪️युथ मुली :-
  36. ४६ ते ४८ किलो: सिद्रा शेख (एम.पी.एस.ए. हवेली) वि.वि. समीक्षा सूर्यवंशी (अभिमन्यू स्पोर्ट्स अकॅडमी, उरुळी कांचन)
    ▪️युथ मुले :-
  37. ४८ ते ५१ किलो: दानिश चव्हाण (एम. पी.एस.ए.हवेली) वि.वि. अजय तिरेकर (पाटस बॉक्सिंग अकॅडमी,दौंड )
  38. ५१ ते ५४ किलो: शिवम मोरे (स्टार बॉक्सिंग अकॅडमी) वि.वि. आर्यन पवार (एस. एस.ए. भोर)
  39. ६३.५ ते ६७ किलो: ओमकार वाघमारे (एम.पी.एस. ए.हवेली) वि.वि. ओम पवार (डॉ. कराड स्पोर्ट्स अकॅडमी, लोणी काळभोर)
    ▪️ वरिष्ठ महिला:
  40. ६० ते ६३ किलो: तेजवीर सहोटा (स्टार बॉक्सिंग अकॅडमी) वि.वि. तेजल बोडके (बारामती बॉक्सिंग क्लब)
  41. ६६ ते ७० किलो: गीतांजली साठे (स्टार बॉक्सिंग अकॅडमी) वि.वि. वैष्णवी नाईक (एम.पी.एस.ए. हवेली)
    ▪️ वरिष्ठ पुरुष:-
  42. ४८ ते ५१ किलो: फरदीन शेख (एम.आय.टी. लोणी काळभोर) वि.वि. अमर यादव (अजितसिंग बॉक्सिंग अँकॅडमी)
  43. ५२ते५४ किलो: गौरव चव्हाण (स्टार बॉक्सिंग अँकॅडमी ) वि.वि. रुद्र बोरा (स्टार बॉक्सिंग अँकॅडमी)
  44. ५४ ते ५७ किलो: विशाल दहीकर (एस.डी.बी.सी शिरूर) वि.वि. आकाश तेलंगे (बारामती बॉक्सिंग अँकॅडमी)
  45. ६० ते ६३.५ किलो: यश गौड (एम.पी.एस. हवेली) वि.वि. तनुज अरोरा (डॉ.वी.कराड स्पोर्टस् अकॅडमी)

पद्म पुरस्कारांसाठी नामांकने मागविण्याचे आवाहन; १५ सप्टेंबरपर्यंत मुदत

नवी दिल्ली, ०२ : केंद्रसरकार प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करत असते. त्यास अनुसरून यावर्षीही पद्म पुरस्कार 2025 साठी ऑनलाईन नामांकन/ शिफारशीबाबतचे आवाहन केले आहे. याबाबतची निवेदने स्वीकारण्याची सुरुवात 1 मे 2024 पासून सरकारने केली असून, पद्म पुरस्कारांसाठी नामांकने स्वीकारण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2024आहे. पद्म पुरस्कारांसाठी नामांकन/ शिफारशी राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल (https://awards.gov.in) वर ऑनलाइन स्वीकारल्या जातील.

पद्म पुरस्कार, म्हणजे, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री, हे देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक आहेत. 1954 मध्ये सुरू झालेल्या या पुरस्कारांची घोषणा दरवर्षी गृह मंत्रालयाकडून प्रजासत्ताक दिनानिमित्त केली जाते. हे पुरस्कार ‘उत्कृष्ट कार्याच्या’ सन्मानार्थ तसेच कला, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, वैद्यक, सामाजिक कार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, सार्वजनिक व्यवहार, नागरी सेवा, व्यापार आणि उद्योग यांसारख्या सर्व क्षेत्रे / विषयांमध्ये विशिष्ट आणि अपवादात्मक कामगिरी / सेवेसाठी दिले जातात. वंश, व्यवसाय, पद किंवा स्त्री-पुरुष असा भेद न करता सर्व व्यक्ती या पुरस्कारांसाठी पात्र असतात. डॉक्टर आणि शास्त्रज्ञ वगळता सार्वजनिक उपक्रमांसोबत काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसह सरकारी कर्मचारी पद्म पुरस्कारांसाठी पात्र नाहीत.

पद्म पुरस्कारांचे रूपांतर “लोकांचे पद्म” मध्ये करण्यासाठी केंद्रसरकार वचनबद्ध आहे. यासाठी सर्व नागरिकांनी, त्यांनी त्यांच्या स्व-नामांकनासह नामांकन / शिफारशी सादर करण्याची गृह मंत्रालयाने विनंती केली आहे. महिला, समाजातील दुर्बल घटक, अनुसूचित जाती आणि जमाती, दिव्यांग व्यक्ती आणि समाजाची निःस्वार्थ सेवा करणाऱ्या प्रतिभावान व्यक्ती ओळखून त्यांचे असामान्यत्व आणि कर्तृत्वाची दखल घेण्यासाठी एकत्रित प्रयत्न केले जाऊ शकतात.

नामांकन/शिफारशींमध्ये उपरोक्त पोर्टलवर उपलब्ध असलेल्या नमुन्यात निर्दिष्ट केलेले सर्व संबंधित तपशील असावेत, ज्यात वर्णनात्मक स्वरूपात (जास्तीत जास्त 800 शब्द) शिफारस केलेल्या व्यक्तीची तिच्या किंवा त्याच्या संबंधित क्षेत्रातील/विद्याशाखेतील विशिष्ट आणि अपवादात्मक कामगिरी/सेवा स्पष्टपणे मांडणारा उल्लेख समाविष्ट असावा.

या संदर्भातील तपशील गृह मंत्रालयाच्या संकेतस्थळावर (https://mha.gov.in) आणि पद्म पुरस्कार पोर्टलवर (https://padmaawards.gov.in) पुरस्कार आणि पदके’ या शीर्षकाखाली देखील उपलब्ध आहे. या पुरस्कारांशी संबंधित कायदे आणि नियम https://padmaawards.gov.in/AboutAwards.aspx या लिंकसह संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; ९.२२ लाख किंमतीचा मद्य साठा जप्त

मुंबई, दि. 2 : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने सायन पूर्व येथील धीरज आयर्न अँड स्टील लि, ऑफीस नं. जी २१, लोकमान्य पान बाजार असोशिएशन, सोमय्या हॉस्पिटल रोड, पूर्व द्रुतगती मार्गाजवळ परदेशात निर्मित केलेल्या व गोव्यातून आयात करुन मुंबईत आणलेल्या विविध ब्रँन्डच्या विदेशी मद्याचा साठा छापा टाकीत जप्त केला आहे. हा मुद्देमाल एकूण 9 लाख 22 हजार 196 रूपये किंमतीचा दारूबंदी गुन्ह्यातील आहे.

या गुन्ह्यापोटी संतोष ऋषी घरबिडी (वय 42) या व्यक्तीस ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 165 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. उत्पादन शुल्क विभागाने यापूर्वीदेखील परदेशातून, दिल्ली आणि गोवा, महाराष्ट्रात आयात केलेल्या विविध बँन्डच्या विदेशी स्कॉच मद्याच्या सिलबंद बाटल्यांची मुंबई मध्ये विक्री करणाऱ्या इसमावर गुन्हे नोंद केलेले आहेत.

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, संचालक प्रसाद सुर्वे, कोकण विभागीय उप आयुक्त प्रदीप पवार, ठाणे शहर अधीक्षक प्रविण कुमार तांबे, मुंबई शहर  उपअधिक्षक सुधीर पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच लोकसभा निवडणूक आचार संहितेचे गांभीर्य लक्षात घेता उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकांनी ही कारवाई केली आहे. ही कारवाई मुंबई शहर पथक क्रमांक 1 या पथकातील निरीक्षक कैलास तरे यांनी केली असून दुय्यम निरीक्षक रवींद्र जाधव, दुय्यम निरीक्षक रोहित आदलिंगे तसेच जवान विक्रम कुंभार, नरेश वडमारे यांनी सहकार्य केले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक श्री. तरे करीत आहेत, असे कोकण उपआयुक्त प्रदीप पवार यांनी कळविले आहे.

000

पुरावे देतो, शब्द फिरवायचा नाही-खासदार डॉ. अमोल कोल्हेंनी स्वीकारलं आढळराव पाटलांचे आव्हान

0

शिरुर – ओतूरच्या सभेत जे बोललो त्याचं पुराव्यानिशी उत्तर देतो, मग शब्द फिरवायचा नाही, असं म्हणत महाविकास आघाडीचे शिरुरचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटलांचे आव्हान स्वीकारलं.

महाविकास आघाडीतील शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ओतूर मध्ये झालेल्या शरद पवारांच्या जाहीर सभेत आढळराव पाटील यांच्यावर थेट निशाणा साधला होता. काही लोक फक्त व्यापार करण्यासाठी संसदेत गेले. संसदेत 60-70 प्रश्न फक्त संरक्षण खात्याविषयी विचारले गेले. हे प्रश्न विचारून कोणाच्या कंपनीच भल होतंय हे कळतय, असं म्हणत काही प्रश्न उपस्थित केले.

यानंतर दोन दिवसांनी आढळराव पाटलांनी कोल्हे यांनी केलेले आरोप फेटाळत, पुरावे द्या, राजकारणातून बाजूला होतो, असं आव्हान दिले. डॉ. कोल्हे यांनी हे आव्हान स्वीकारत पुरावे देतो शब्द फिरवायचा नाही असं प्रति आव्हान आढळराव पाटलांना दिलय. आता डॉ. कोल्हे यांनी पुरावे दिल्यावर आढळराव आपल्या शब्दावर ठाम राहतात का याची उत्सुकता मतदारांमध्ये आहे.

मल्टिमोडल हबमुळे स्वारगेट चौकाचा कायापालट होणार-मुरलीधर मोहोळ

तरुणांच्या उत्साहात बाईक रॅली !कोथरूड विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या प्रचारार्थ बाईक रॅली काढली. भेलकेनगरपासून सुरू झालेली ही रॅली गुजरात कॉलनी, आझादनगर, शास्रीनगर, सागर कॉलनी, हमराज, परमहंसनगर, पेठकर साम्राज्य, सुतारदरा, जय भवानीनगर, रामबाग, कानिफनाथ मंडळ, साई मित्रमंडळ, मोरे विद्यालय चौक, हनुमाननगर, एआरआय रोड, श्रीराम चौक, विश्वशांती चौक, किशोर विटेकर चौकमार्गे गेली व मेगा सिटीजवळ तिचा समारोप झाला.उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार संजयनाना काकडे, दीपकभाऊ मानकर, किशोरभाऊ शिंदे, वर्षाताई डहाळे, पुनीत जोशी, मिलिंद बालवडकर, डॉ. संदीप बुटाला, बाळासाहेब खंकाळ, नगरसेवक दिलीप वेडे-पाटील, किरण दगडे-पाटील, माजी नगरसेविका वासंतीताई जाधव, हर्षलीताई माथवड, अल्पनाताई वर्पे, श्रद्धाताई प्रभुणे, छायाताई मारणे, श्री. प्रतिक देसरडा, मयूर पानसरे, कांचनताई कुंबरे यांच्यासह महायुतीतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते.

खडकमाळ आळी गावठाणचे ग्रामदैवत श्री नवलोबानाथ आणि श्री नर्मदेश्वर पालखी उत्सवामध्ये मोहोळ यांनी सहभागी होत दर्शन आणि आशीर्वाद घेतले. शहराध्यक्ष धीरजघाटे यांच्यासह माजी नगरसेवक अजय खेडेकर, सम्राट थोरात, विष्णू आप्पा हरिहर आणि भक्त परिवार यावेळी उपस्थित होता.

मल्टिमोडल हब या प्रकल्पामुळे स्वारगेटच्या केशवराव जेधे चौकाचा कायापालट होणार असून, परिसराचा चेहरामोहरा बदलणार आहे. मेट्रो-पीएमपी-एसटी अशा सर्व सेवांच्या प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा मिळणार असून, उद्योग व्यवसायांना गती मिळणार असल्याचे मत पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.

मोहोळ यांच्या प्रचारार्थ आज पर्वती मतदारसंघात तुळशीबाग कॉलनी, तळजाई वसाहत, चव्हाण नगर, पद्मावती, शिवदर्शन परिसरात प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले होते. आमदार माधुरी मिसाळ, दीपक मिसाळ, श्रीनाथ भिमाले, करण मिसाळ, राजू शिळीमकर, सुभाष जगताप, श्रीकांत पुजारी, अनिल जाधव, गणेश घोष, विशाल पवार, श्रुती नाझीरकर, विकास कांबळे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मोहोळ पुढे म्हणाले, या प्रकल्पामुळे भुयारी मेट्रो आणि स्वारगेटचे एसटी स्थानक एकमेकांशी जोडले जाणार आहे. मेट्रोच्या मल्टिमोडल हबमध्येच पीएमपीचे राजश्री शाहू बस स्थानक होणार आहे. कुठूनही कुठे जाण्यासाठी उत्तम कनेक्टिव्हिटी एकाच ठिकाणी मिळणार आहे. हबमध्ये व्यावसायिक जागा विकसित केल्या जाणार आहे. मॉल, मल्टिफ्लेक्स आणि इतर व्यवसायासाठी जागा दिली जाणार. त्यामुळे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.

व्यावसायिक विश्वासार्हता, कार्यक्षमता वाढीसाठी ‘आयएसओ’ प्रमाणीकरण महत्वाचे : रघुवंशी

डॉ. सुरेश माळी लिखित ‘आयएसओ ग्लोबल बेनिफिट्स’ पुस्तकाचे प्रकाशन

पुणे: “व्यावसायिक विश्वासार्हता, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवसायाची कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढण्यासाठी ‘आयएसओ’ प्रमाणीकरण महत्वाचे ठरते. त्रिभाषिक असलेल्या या पुस्तकाचे २४ पैलू आहेत. ‘आयएसओ’मुळे गुणवत्तेचा दर्जा कायम राखत ग्राहकांचे समाधान वाढण्यासह उत्पादनाची किंमत कमी होण्यास मदत होईल,” असे मत यूलिंक ऍग्रीटेक मुख्य कार्यपालन अधिकारी व ‘आयएनआय’चे संचालक अश्विनीकुमार रघुवंशी यांनी व्यक्त केले.’आयएसओ’ प्रमाणीकरण तज्ज्ञ डॉ. सुरेश दामोदर माळी उर्फ सुदामा यांनी लिहिलेल्या ‘आयएसओ ग्लोबल बेनिफिट्स’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच झाले. फर्ग्युसन रस्त्यावरील विद्यार्थी साहाय्यक समितीच्या मोडक सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कलाश्री ग्रुप ऑफ कंपनीचे उद्योजक कृष्णात अडसूळ होते. प्रसंगी डॉ. सुरेश माळी यांचे कुटुंबीय, समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत कुलकर्णी उपस्थित होते.

डॉ. सुरेश माळी म्हणाले, “एका दिवसात २४ तास असतात. कोणार्क सुर्यरथाला २४ चक्र आहेत आणि ‘आयएसओ ग्लोबल बेनिफिट्स’ पुस्तक २४ पैलूंवर आधारित आहे. त्याचे प्रकाशन २०२४ मध्ये होत आहे. २४ चा हा योग मला अभिमानास्पद आहे. तसेच पुस्तकात आयएसओ, व इतर ऑडिट्स व सर्टिफिकेशन्सचे वर्णन आहे. आपल्या व्यवसायाच्या गुणवत्ता व विश्वासार्हता वाढीसाठी आयएसओ प्रमाणीकरण करून घ्यायला प्रोत्साहन दिले पाहिजे.”

कृष्णात अडसूळ यांनी आयएसओ करताना ऑडिट्सचे महत्व सांगितले. यावेळी आयएसओ प्रामाणिकरणाच्या संचालिका शोभा माळी यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थी साहाय्यक समितीच्या कार्याचा लघुपट यावेळी दाखवण्यात आला. उमेश कणकवलीकर (मी विजेता होणारच) यांच्या कंपनीला आयएसओ मानांकन प्रदान करण्यात आले. पुस्तक घरपोच मिळण्यासाठी ८०८७०५९००१ / ७६२००२०४५९ या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन माळी यांनी केले.

पुणे शहराची वाढवू शान शंभर टक्के करू मतदान …पोवाड्यातून लोकजागृती

 शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, पुणे आणि प्रबोधन मंच, पुणे महानगर च्यावतीने पोवाड्याचे सादरीकरण
पुणे :  ‘लोकशाही करण्या बळकट, बांधूनी मोट, करू एकजूट, हक्काने तुम्ही करा मतदान पुणे शहराची वाढवू शान ..शंभर टक्के करू मतदान हा जी जी’ … असे सांगत पिढ्यानपिढ्या जनजागृती चे माध्यम असणाऱ्या पोवाड्याच्या माध्यमातून पुणेकरांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आली.

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, पुणे आणि प्रबोधन मंच, पुणे महानगर यांच्या संयुक्त विद्यमाने  जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी बागेसमोर मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आले. यावेळी शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे अध्यक्ष आचार्य शाहिर हेमंतराजे मावळे आणि पोवाडा प्रशिक्षण वर्गातील सेवाव्रती शाहीर यांनी यावेळी पोवाड्याचे सादरीकरण केले. यावेळी प्रा. संगीता मावळे, प्रा. रुपाली देशपांडे, प्रबोधिनीचे सचिव अरुणकुमार बाभुळगावकर यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.  युवा शाहीर होनराज मावळे, अक्षदा इनामदार, सक्षम जाधव यांनी साथसंगत केली.

सुजाण नागरिक बनुया, मतदान नक्की करुया…आम्ही नागरिक भारताचे, मतदान हे कर्तव्य आमुचे…शंभर टक्के करु मतदान, लोकशाहीची वाढवू शान… असा संदेश यावेळी देण्यात आला.

शाहीर हेमंत मावळे म्हणाले, तुम्हाला सरकारकडून अनेक अपेक्षा असतात, हक्काने अनेक गोष्टी मिळाव्यात असे वाटत असेल तर त्यासाठी हक्काने मतदान देखील केले पाहिजे. योग्य सरकार निवडण्याची ही संधी न गमावता मतदान केले पाहिजे असेही त्यांनी सांगितले. 

मनोज वाजपेयी यांचा नंद घर मोहिमेत सहभाग

·        ७ कोटी मुले आणि २ कोटी महिलांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याच्या उद्देशाने नंद घर हा सामाजिक प्रभाव प्रकल्प राबवला जातो.

·        सर्व मुलांना दर्जेदार पोषण मिळावे यासाठी सुरु केली #KhanaKhayaKya मोहीम 

मुंबई, : भारतभरातील १४ लाख अंगणवाड्यांमध्ये परिवर्तन घडवून आणण्याच्या उद्देशाने चालवण्यात येणाऱ्या नंद घरमध्ये राष्ट्रीय मोहीम सुरु करण्यात आली आहे – अगर बचपन से पूछा खाना खाया तो देश का कल बनाया. अभिनेता मनोज वाजपेयी यांचा नंद घरच्या राष्ट्रीय मोहिमेत सहभाग असणार आहे. भारताच्या भविष्यातील पिढीला दर्जेदार पोषण मिळावे, त्यांची सर्वसमावेशक आरोग्य देखभाल केली जावे व मुलांना सर्वोत्तम प्रीस्कुल शिक्षण मिळावे हा नंद घरचा उद्देश आहे.

या मोहिमेमध्ये मनोज वाजपेयी यांचे स्वागत करताना, वेदांताचे चेयरमन श्री अनिल अगरवाल यांनी सांगितले, “नंद घर ही राष्ट्रीय मोहीम आरोग्य आणि पोषणावर भर देत मुले व महिलांचे एकंदरीत कल्याण साधले जावे यासाठी साहाय्य करते. मोहिमेचा सातत्याने विस्तार होत असून, मनोज वाजपेयी जी यामध्ये सहभागी होत आहेत ही अतिशय आनंदाची बाब आहे. त्यांची स्वतःची जीवनगाथा आणि आपल्या भविष्यातील पिढ्यांना पोषण प्रदान करून त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याच्या नंद घरच्या उद्देशात भरपूर साम्य आहे.”

आज या मोहिमेची सुरुवात करण्यात आली, त्यावेळी मनोज वाजपेयी यांनी युवा थिएटर अभिनेत्यापासून आजपर्यंतचा प्रवास वर्णन केला, अभिनयाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असताना नियमितपणे पोषक आहार मिळावा यासाठी मित्रांकडून मौल्यवान साहाय्य दिले गेले हे देखील त्यांनी आवर्जून सांगितले. अभिनेत्याला किती संघर्ष करावा लागतो ते सांगताना वाजपेयी म्हणाले की, स्वप्न पूर्ण करण्यासाठी झगडण्याची शक्ती भरल्या पोटी व पोषक आहारामुळे मिळते. www.nandghar.org या वेबसाईटला भेट देऊन लोकांनी आपला पाठिंबा दर्शवावा, दान करून, स्वयंसेवा करून नंद घरला सहयोग प्रदान करावा असे आवाहन त्यांनी केले.

नंद घरसोबत आपल्या संबंधांविषयी श्री मनोज वाजपेयी म्हणाले, “पोटातली भूक काय असते हे माहिती असल्याने त्या भुकेचा शारीरिक, मानसिक आणि भावनिक प्रभाव किती तीव्र असू शकतो ते मला चांगलेच ठाऊक आहे. म्हणूनच नंद घर सारखे उपक्रम खूप महत्त्वाचे आहेत. या उपक्रमामुळे मुलांना सुयोग्य पोषण मिळते, शिवाय अधिक उज्वल भवितव्यासाठी आशा आणि संधी निर्माण करण्याचे काम देखील या उपक्रमामध्ये केले जाते. मुलांच्या क्षमतांना पोषणाचे बळ मिळावे यासाठी नंद घर मोहिमेसोबत हातमिळवणी करू या आणि आपण सर्वजण मिळून अधिक उज्वल भारत निर्माण करू या.”

मॅककॅन वर्ल्डग्रुप इंडियाचे सीईओ आणि सीसीओ व आशिया पॅसिफिकचे चेयरमन श्री प्रसून जोशी यांनी सांगितले, “मुलांना आपल्या खऱ्या क्षमतांचा वापर करता यावा यासाठी संधी द्यायच्या असतील तर सर्वसमावेशक पोषण पुरवणे गरजेचे आहे. ही बाब अधोरेखित करण्यासाठी आपल्या वैयक्तिक आयुष्यात अनेक अडीअडचणी ज्यांनी सहज केल्या आहेत अशा भारताच्या सर्वात लोकप्रिय मुलामुलींना पुढे आणणे हा सर्वात योग्य मार्ग आहे असे आम्हाला वाटते.”

नंद घर हा अनिल अगरवाल फाउंडेशनचा प्रमुख प्रकल्प आहे. एकाही मुलाला उपाशीपोटी झोपावे लागू नये हे फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल अगरवाल यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा प्रकल्प प्रयत्नशील आहे. भारतातील १४ राज्यांमध्ये नंद घरमध्ये प्रीस्कुल विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवून कुपोषण स्तर कमी करण्यात यश मिळवून नंद घरने एक महत्त्वाचा टप्पा पार केला. गेल्या वर्षी अनिल अगरवाल फाउंडेशनने मल्टी मिलेट न्यूट्री बार तयार केले आहेत जे सध्या वाराणसीमध्ये १३६४ अंगणवाड्यांमध्ये ३ ते ६ वर्षे वयोगटातील ५०,००० मुलांना दररोज वाटले जातात. या बारमध्ये प्रथिने, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असून त्यामुळे मुलांचे पोषण सेवन सुधारले आहे तसेच शाळेतील अनुपस्थिती देखील कमी झाली आहे. 

कोणत्याही परिस्थितीमध्ये संविधान बदलले जाणार नाही:केंद्रीयमंत्री रामदास आठवले

पुणे : संविधान धोक्यात असल्याचे बिनबुडाचे आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये संविधान बदलले जाणार नाही, तुमच्यामध्ये गैरसमज पसरवण्यात येत असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी बुधवारी सांगितले.

महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी आठवले पुण्यात आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आरपीआय आठवले गटाचे सचिव संघटक परशुराम वाडेकर, सचिव बाळासाहेब जानराव, आरपीआयचे अध्यक्ष संजय सोनावणे, मंदार जोशी, महायुतीचे समन्वयक संदीप खर्डेकर आदी यावेळी उपस्थित होते.

इंडि आघाडीकडुन संविधान बदलाची उलटसुलट चर्चा केली जात आहे. लोकशाही धोक्यात आली आहे असा प्रचार सुरु आहे. लोकशाही जर धोक्यात आली असती तर पंतप्रधान मोदी मत मागण्यासाठी देशभर फिरले असते का? संविधानावर देश चालणार आहे. विरोधकांनी कितीही बाता मारल्या तरी संविधानाप्रमाणेच देशाला चालवावे लागेल. देश म्हटला की,संविधानाची भुमिका, गीता, कुराण बायबल असे अनेक धर्माचे ग्रंथ आहेत. याचा आदर सर्वांना आहे. संविधानाने आपआपल्या धर्मा प्रमाणे चालण्याची परवानगी दिली आहे. देश म्हटला की, संविधान आणि या देशात त्यालाच राहण्याचा अधिकार आहे ज्याला बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान मान्य आहे. ज्यांना संविधान मान्य नसेल त्यांना आपण जसा इंग्रजांना चले जावचा नारा दिला होता. तशाच पध्दतीने ज्यांना संविधान मान्य नसणार्‍यांना चले जाव अशी आमची भुमिका राहणार असल्याचे आठवले म्हणाले.

देशभरामध्ये एनडीएचे वातावरण आहे. त्यामुळे चारशे पेक्षा जास्त जागा एनडीएच्या निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे. त्यादृष्टीने आमची वाटचाल सुरु आहे. राज्य आणि देशभरातील मोदींच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. एससी,एसटी आणि ओबीसी समाजाला न्याय देण्याची भुमिका मांडली जात आहे.त्यामुळे आम्हाला विश्‍वास आहे की, आमच्या महाराष्ट्रात 40 पेक्षा जास्त जागा निवडूण येतील.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुहाटीला गेल्यानंतर शिंदे यांना मुख्यमंत्री करतो अशी ऑफर माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिली होती. मात्र त्यांना अगोदर मुख्यमंत्री केले असते तर ही वेळ आली नसती. आदित्यला मुख्यमंत्री करण्याचा प्रयत्न ठाकरेंचा होता. महाराष्ट्राच्या विकासाचा आणि राजकारणाचा खेळखंडोबा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. महाविकास आघाडीचा आम्हाला खात्मा करायचा आहे. पुण्यातील चारही जागा निवडून येतील. त्याचबरोबर मुंबईच्या सर्व सहा जागा निवडूण येतील असा आम्हाला विश्‍वास आहे असे आठवले म्हणाले.

पुण्याचा इतिहास आणि वारसा मोहोळ यांनी जपला

मोहोळ यांच्या रॅलीत रामदास आठवलेंचा सहभाग

मुरलीधर मोहोळ यांनी कोरोना काळात चांगले काम केले. त्यामुळे पुणेकरांच्या मनात त्यांच्याबद्दल प्रेम आणि आत्मीयता आहे. कोरोना नंतर त्यांनी विकास कामांना गती दिली. त्याबरोबर शहराचा इतिहास आणि वारसा जपण्यासाठी त्यांनी केलेले काम कौतुकास्पद आहे. पुणे महापालिकेतील शिवाजी महाराजांचे स्मारक, महापालिकेत पहिल्यांदा स्थापन केलेला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अर्धपुतळा, माता रमाईचे स्मारक, फुले दांपत्याची समता भूमी, लहुजी वस्ताद साळवे यांचे समाधी स्मारक ही काही उदाहरणे आहेत. सर्व समग घटकांना बरोबर घेऊन जाणारा कार्यकर्ता अशी मोहोळ यांची प्रतिमा आहे, पुणेकरांनी त्यांना विक्रमी मताधिक्क्याने विजयी करावे असे आवाहन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले.

पुणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर आण्णा मोहोळ यांच्या प्रचारार्थ पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघामध्ये आयोजित केलेल्या प्रचार फेरीत केंद्रीय मंत्री रामदास जी आठवले यांनी सहभाग घेतला. आमदार सुनील भाऊ कांबळे, मंगला मंत्री, उमेश गायकवाड, हिमाली कांबळे, सुशांत निगडे, संदीप लडकत, सनी मेमाणे जयप्रकाश पुरोहित उपस्थित होते.

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण आयुक्तपदी अनिल कवडे यांची नियुक्ती

पुणे, दि.२ : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण आयुक्तपदी अनिल कवडे यांची नियुक्ती झाली आहे. सहकार व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव अनूप कुमार यांनी आज राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.

यावेळी माजी सहकारी प्राधिकरण निवडणूक आयुक्त जगदीश पाटील, साखर आयुक्त डॉ.कुणाल खेमनार, सहकार आयुक्त शैलेश कोतमिरे, सहकारी निवडणूक प्राधिकारणाचे सचिव अशोक गाडे, सहकार व पणन विभागाचे सह सचिव संतोष पाटील, अतिरिक्त निबंधक सहकारी संस्था श्रीकृष्ण वाडेकर आणि सहकारी निवडणूक प्राधिकरणातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
०००

मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी …..

जिल्हा निवडणूक प्रशासनाचे आवाहन

पुणे, दि. २: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीत मतदारांचे नाव आणि मतदान केंद्राची माहिती शोधण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने https://electoralsearch.eci.gov.in/ या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून दिली आहे, तसेच मतदार चिठ्ठीचे घरोघरी वाटप करण्यात येत असून मतदारांनी ही माहिती मिळविण्यासाठी समाजमाध्यमातून फिरणाऱ्या चुकीच्या संदेशावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

मतदारांना भ्रमणध्वनीवर पाठविण्यात येणारा 1950 क्रमांकावर मतदार क्रमांक पाठविल्यास 15 सेकंदात मतदार चिठ्ठी मिळेल असा संदेश पूर्णत: चुकीचा असून नागरिकांनी भारत निवडणूक आयोगातर्फे किंवा प्रशासनातर्फे यासाठी तयार करण्यात आलेल्या सुविधेचा लाभ घ्यावा. नागरिकांनी असे संदेश अग्रेषित करू नये. चुकीचे संदेश पसरविणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

मतदारांच्या मदतीसाठी जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात निवडणूक सहाय्यता कक्ष स्थापन करण्यात आला असून या कक्षाशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करता येणार आहे. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर किंवा वोटर हेल्पलाईन ॲपच्या माध्यमातूनही मतदार यादीतील नाव शोधण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

नागरिकांनी आपल्या विधानसभा मतदारसंघातील त्यांचे नाव मतदार यादीत शोधण्यासाठी अधिकृत सुविधांचा उपयोग करावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

यंदा २४, २५ व २६ मे रोजी होणार पेरा सीईटी-२०२४

१९ मे रोजी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस, ३१ मे’ला लागणार निकाल
पुणे : प्रीमिनेंट एजुकेशन अँण्ड रिसर्च असोसिएशन (PERA) अर्थात पेरा या खासगी विद्यापीठांच्या संघटनेच्या वतीने यंदा दि. २४, २५ व २६ मे २०२४ रोजी सीईटी परीक्षा घेण्यात येत आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस १९ मे असून, परीक्षेचा निकाल ३१ मे रोजी घोषित करण्यात येणार आहे, अशी माहिती `पेरा`चे अध्यक्ष व एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्याध्यक्ष प्रा. डॉ.मंगेश कराड यांनी दिली.
या परीक्षेसंदर्भात माहिती देण्यासाठी एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नालॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत प्रा. डॉ. कराड बोलत होते. याप्रसंगी जीएसपीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.बी.बी. अहुजा, डी.वाय पाटील विद्यापीठ अंबीच्या कुलगुरू डॉ.सायली गणकर, जी.एच.रायसोनी स्किल टेक विद्यापीठाचे कुलगरू  डॉ. एम.यू. खरात, प्र.कुलगुरू डॉ.मोहित दुबे, `पेरा`चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. हणमंत पवार, स्ट्रॅटेजिक सल्लागार प्रा. डॉ. सुराज भोयर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा. डॉ. कराड पुढे म्हणाले की, राज्यात स्थापित असलेल्या २५ नामांकित खासगी विद्यापीठांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम, जसे की, इंजीनियरिंग, बायोइंजीनियरिंग, फुड टेक्नोलॉजी, मरीन इंजीनियरिंग, अँग्रो इंजिनिअरिंग, फार्मसी, फाईन आर्ट्स, डिझाईन, मॅनेजमेंट, विधी (लॉ) आणि आर्किटेक्चर या विषयांसाठी प्रवेश घ्यायचा असेल तर ही परीक्षा देणे अनिवार्य आहे. या परीक्षेच्या आधारावर विद्यार्थ्यांना खासगी विद्यापीठांमध्ये प्रवेश प्राप्त होणार आहे. मागील वर्षीप्रमाणे या वर्षीदेखील पेरा-सीईटी कंम्पुटर बेस्ड टेस्ट(सीबीटी) द्वारे घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी दि. १९ मे पर्यंत ऑनलाईन नावनोंदणी करावी. विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी www.peraindia.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. गेल्या पाच वर्षांपासून पेराच्या वतीने अशाप्रकारची परीक्षा यशस्वीपणे घेण्यात येत आहे. या माध्यमातून आतापर्यंत राज्यात अडीच लाख विद्यार्थ्यांना विविध विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण प्राप्त करून त्यांचे व्यावसायिक करियर पूर्ण करण्याची संधी मिळाली आहे. या वर्षी देखील हजारो विद्यार्थ्यांना राज्यात या माध्यमातून उच्च शिक्षण प्राप्त करून एक उज्ज्वल प्रोफेशनल करियर प्राप्त करण्याची संधी मिळणार आहे.
पेरा या संघटनेची स्थापना ही खासगी विद्यापीठांच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्राला एका उंचीवर नेण्यासाठी आणि उच्च शिक्षणात नवनवीन प्रवाह, आधुनिक तंत्रज्ञान, पाठ्यक्रमांमध्ये नावीन्य आणि लवचिकता आणण्यासाठी झाली आहे. या संघटनेची उच्च शिक्षण, संशोधन आणि इतर अभ्यासक्रमेतर आणि सह-अभ्यासक्रम क्रियाकलापांना प्रोत्साहन देणे, उच्च शिक्षणाच्या सर्वांगीण अनुकूल उन्नतीसाठी आणि प्रगतीसाठी मदत करणे यासारखी महत्वाची उद्दिष्ठे आहेत.


पेरा अंतर्गत असलेली विद्यापीठे: एमआयटी-एडीटी, एमआयटी-डब्ल्यूपीयू, संजय घोडावत युनिव्हर्सिटी, संदीप युनिव्हर्सिटी, स्पायसर, डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी, डी. वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, अजिंक्य डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी, एमजीएम युनिव्हर्सिटी, सिंबायोसिस स्किल्स अॅण्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, सोमैया विद्याविहार युनिव्हर्सिटी, विजयभूमी युनिव्हर्सिटी, विश्वकर्मा युनिव्हर्सिटी, डी. वाय. पाटील अॅग्रीकल्चर अॅण्ड टेक्निकल युनिव्हर्सिटी, श्री बालाजी युनिव्हर्सिटी, फ्लेम युनिव्हर्सिटी, डॉ. पी. ए. ईनामदार युनिव्हर्सिटी, जेएसपीएम युनिव्हर्सिटी, एनआयसीएमएआर युनिव्हर्सिटी, पिंपरी-चिंचवड युनिव्हर्सिटी, डीईएस पुणे विद्यापीठ, एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठ, युनिव्हर्सल एआय विद्यापीठ, जी.एच. रायसोनी स्किल टेक विद्यापीठ आणि संजीवनी विद्यापीठ.


“महाराष्ट्र सीईटी परीक्षा आणि जेईई २०२४ सोबत, पेरा ही खाजगी विद्यापीठाची सीईटी परीक्षा आमच्यासाठी तितकीच महत्त्वाची आहे. मला एआय आणि एमएलमध्ये स्पेशलायझेशन सह बीटेकसाठी प्रवेश घ्यायचा आहे. त्यासाठी ‘पेरा’द्वारे जागतिक प्रदर्शनासह दर्जेदार शिक्षण देणाऱ्या काही सर्वोत्तम खाजगी विद्यापीठांच्या प्रवेश प्रक्रियेत भाग घेण्याची संधी या प्रवेश परिक्षेद्वारे मिळणार आहे.”
– दीया देशमुख, इयत्ता 12वी ची विद्यार्थिनी

कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी ‘आमचे कर्मचारी, आमचा अभिमान’ स्पर्धा

पुणे दि. २ : औद्योगिक व माहिती तंत्रज्ञान कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांनी लोकसभा निवडणूकीत मतदानाचा १०० टक्के हक्क बजाविणे अपेक्षित असून याकरिता किमान ५० कर्मचारी संख्या असलेल्या अस्थापनांसाठी ७ मे व १३ मे रोजी ‘आमचे कर्मचारी, आमचा अभिमान’ ही अभिनव स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून या स्पर्धेत सहभाग घेऊन कर्मचाऱ्यांनी १०० टक्के मतदान करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे.

पुणे जिल्ह्यात २१ मतदारसंघात कामगार मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. जिल्ह्यात किमान २०० कर्मचारी अस्थापनेवर असलेले बरेच औद्योगिक व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योग आहेत. उद्योगसंस्थेच्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांनी मतदान केल्यानंतर मतदान केंद्राच्या विहित १०० मीटर मर्यादेच्या बाहेर येवून आपला सेल्फी काढावा.

संबंधित कंपन्यांनी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांचे सेल्फी कर्मचारी यादीसह जिल्हा निवडणूक यंत्रणेच्या ९२७०१०५५९३ या व्हॉटसअॅप नंबरवर पाठवावेत. हे सेल्फी पाठवतांना कंपनीने कर्मचाऱ्याचे नाव, आडनाव, कंपनीचे नांव, विधानसभा मतदारसंघाचे नाव, मतदार यादी किंवा मतदार यादीभाग क्रमांक व मतदार यादीतील अनुक्रमांक इत्यादी माहिती द्यावी.

सर्व औद्योगिक व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी यांनी १०० टक्के मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होवून मतदान करण्याचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे व मतदान करण्याबाबत जनजागृती करावी. कर्मचाऱ्यांचे १०० टक्के मतदान झाल्यास उद्योगसंस्थांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येणार आहे.

याकरिता सर्व औद्योगिक व माहिती तंत्रज्ञान आस्थापनावर असलेले एकूण कर्मचारी संख्या तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी १०० टक्के मतदान केल्याचे प्रमाणपत्र इत्यादी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयास ७ व १३ मे रोजी slaopune13@gmail.com या ई-मेलवर सादर करावी, असेही जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘माय फस्ट सेल्फी वोट’ स्पर्धेचे आयोजन

पुणे, दि. २: जिल्ह्यात ७ व १३ मे रोजी होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत सर्व विधानसभा मतदारसंघात नवयुवा तसेच महिला, दिव्यांग व पारलिंगी (तृतीयपंथीय) वंचित घटकातील अधिकाधिक मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा याकरीता ‘माय फस्ट सेल्फी वोट’या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. निवडणुकीत अधिकाधिक नवयुवा मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे.

मतदानाच्या दिवशी (७ व १३ मे) रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रथम मतदान करणाऱ्या १८ ते १९ वयोगटातील नवयुवा तसेच महिला, दिव्यांग व पारलिंगी मतदारांने मतदान केल्यानंतर मतदान केंद्राच्या विहीत १०० मीटर मर्यादेच्या बाहेर येवून आपला सेल्फी काढावा. सदरचा सेल्फी जिल्हा निवडणूक यंत्रणेच्या ९२७०१०५५९३ या व्हॉटसअप क्रमांकावर पाठवावा. सेल्फी पाठवतांना मतदारांनी आपली माहिती व छायाचित्रे पाठवावे. माहितीमध्ये नाव, आडनाव, विधानसभा मतदारसंघाचे नाव, मतदान ओळखपत्र क्रमांक किंवा मतदार यादी भाग क्रमांक व मतदार यादीतील अनुक्रमांक याचा समावेश करावा. युवा, महिला, दिव्यांग, पारलिंगी बाबत उल्लेख करावा.

प्रथम मतदान करणाऱ्या नवयुवा, महिला, दिव्यांग व पारलिंगी मतदाराला फेसबुक व इंस्टाग्रामच्या माध्यमातूनदेखील या स्पर्धेत सहभाग घेता येणार आहे. याकरीता मतदाराने मतदान केल्याबाबतचा सेल्फी फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर ‘स्वीपपुणे’ ला टॅग करून पोस्ट करावा.

प्रत्येक विधानसभा मतदार संघात १० याप्रमाणे एकूण २१० मतदारांची निवड करण्यात येणार आहे. यामध्ये नवयुवा तरूण-तरुणीचे प्रमाण ५० टक्के असणार आहे. निवड झालेल्या प्रत्येक मतदाराला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची स्वाक्षरी असलेले सहभागी झाल्याबाबतचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या मतदारांची ‘नवमतदारांना’ विधानसभा-२०२४ साठी पुणे जिल्ह्याचे ‘नवयुवा मतदारदूत’ म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. तसेच या २१० मतदारांपैकी निवडक एकूण १० युवामतदारांना त्यांच्या महाविद्यालयात किंवा भागात स्टॅंडीज उभारुन सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांना ‘स्वीप’च्या कार्यक्रमात सहभागी करुन घेण्यात येणार आहे.

आगामी विधानसभा निवडणूकीच्या काळात या नवयुवादुतांमार्फत अधिकाधिक नवमतदारांची नोंदणी करण्यासाठी प्रयत्न करावे. या स्पर्धेविषयी मतदान केंद्र जनजागृती गट, चुनाव पाठशाला, मतदार जनजागृती मंच आदीमार्फत नागरिकांमध्ये जागृती करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी दिल्या आहेत.