पुणे: मराठे शाहीचे ज्येष्ठ इतिहासकार व ज्यांनी तथ्यांवर आधारित इतिहास लेखन करून महाराष्ट्रातील मराठ्यांच्या इतिहासाला एक वेगळी दिशा दिली असे थोर इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांचे नुकतेच कोल्हापूर येथे निधन झाले. त्यांच्या निधनापूर्वी पुण्यात गुजर-निंबाळकरवाडी कात्रज येथील रस्त्याला महाराणी ताराराणी पथ असे नामकरण त्यांच्या हस्ते करण्याच्या समारंभात तसेच नंतर झालेल्या भेटीत त्यांनी माझ्या हयातीत किल्ले पन्हाळा येथे महाराणी ताराराणी यांचा त्यांच्या 351व्या जयंती वर्षात अश्वारूढ पुतळा आणि यथोचित स्मारक व्हावे ही इच्छा व्यक्त केली होती. त्यांनी त्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे सातत्याने पाठपूरावाही केला होता. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी याबाबत त्यांना आश्वासनही दिले होते.
औरंगजेबाने जेव्हा मराठा स्वराज्य नष्ट करण्यासाठी प्रयत्न चालू केले, तेव्हा ताराराणींनी किल्ले पन्हाळ्याला आपली राजधानी बनवून लढा दिला होता. सन १७०० ते १७०१ या काळात औरंगजेबाने पन्हाळ्याला वेढा दिला होता. महाराणी ताराराणींच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी तो किल्ला ९ वर्षे (१६९२-१७०१) झुंजवला. ताराराणींनी अतिशय कौशल्याने आणि धैर्याने मोगलांना टक्कर दिली, ज्यामुळे किल्ले पन्हाळा हा त्या काळातील मराठा सत्तेचा बळकट आधारस्तंभ बनला. किल्ले पन्हाळ्यावर आजही महाराणी ताराराणींचा वाडा, सुसज्ज तटबंदी आणि ऐतिहासिक स्थळे त्यांच्या पराक्रमाची साक्ष देतात म्हणूनच पन्हाळा किल्ल्यावर छत्रपती महाराणी ताराराणी बाईसाहेब यांचे जागतिक दर्जाचे स्मारक व्हावे असे डॉ. जयसिंगराव पवार यांचे स्वप्न होते. दुर्दैवाने त्यांच्या हयातीत हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.
आता त्यांच्या निधनानंतर त्यांचे हे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार पुण्यातील शिव शंभू प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश कदम आणि सरहद परिवाराचे मयुर मसूरकर यांनी आज एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केला. या स्मारकात छत्रपती महाराणी ताराराणी यांचा अश्वारूढ पुतळा आणि स्मारक उभारण्यात येणार असून यासाठी छत्रपती शाहू महाराज आणि याविषयातील तज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात येईल. या स्मारक उभारणीस शासनाने विलंब न लावता परवानगी द्यावी असे आवाहन महेश कदम आणि मयुर मसूरकर यांनी केले आहे
“ किल्ले पन्हाळा येथे छत्रपती महाराणी ताराराणी बाईसाहेब यांचा अश्वारुढ पुतळा आणि स्मारक उभारणार “ शिवंशभु प्रतिष्ठाण आणि सरहद संस्थेचा निर्धार
सरहदच्या वतीने,ज्याेतिरादित्य शिंदे यांना महाराजा यशवंतराव हाेळकर राष्ट्रगाैरव पुरस्कार मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते दिल्लीत प्रदान करणार.
दिल्ली:
महाराजा यशवंतराव हाेळकर यांच्या 250 व्या जयंती वर्षानिमित्त विशेष “महाराजा यशवंतराव हाेळकर राष्ट्रगाैरव पुरस्कार” भारत सरकारचे केंद्रीय मंत्री मा. ज्याेतिरादित्य माधवराव शिंदे यांना प्रदान करण्यात येणार आहे. सरहद संस्थेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री श्री, देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान केला जाणार आहे.
या पुरस्कारासाठीची निवड डाॅ. सदानंद माेरे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने एकमताने केली असून, समितीत महाराजा यशवंतराव हाेळकर गाैरव प्रतिष्ठानचे संजय साेनवणी आणि प्रकाश खाडे यांचा समावेश हाेता. समितीने हा निर्णय घेताना शिंदे घराण्याने हाेळकर घराण्याच्या खांद्याला खांदा लावून मराठेशाहीचा उत्तरेत विस्तार करण्यात बजावलेल्या माेलाच्या कामगिरीचा सन्मान यांचा विचार केला आहे. मराठा इतिहासात शिंदे आणि हाेळकर ही दाेन घराणी अनेक निर्णायक प्रसंगी परस्पर सहकार्य, सामूहिक युद्धकाैशल्य आणि राष्ट्रदृष्टिकाेनाची प्रतीके हाेती.
इतिहासात राणाेजी शिंदे आणि मल्हारराव हाेळकर यांनी दिल्लीतील मराठा प्रभाव दृढ करण्यासाठी एकत्रित भूमिका बजावली; पुढे महादजी शिंदे यांनी मराठा मुत्सद्देगिरीला सर्वाेच्च शिखरावर नेले; तर पानिपतपूर्व आणि पानिपतनंतरच्या अनेक लढायांत शिंदे-हाेळकर सहकार्याचे अनेक संदर्भ आढळतात. काही बखरींमुळे आणि नंतरच्या किरकाेळ संघर्षांमुळे निर्माण झालेल्या गैरसमजांपलीकडे जाऊन या दाेन घराण्यांच्या व्यापक ऐतिहासिक याेगदानाकडे नव्या दृष्टीने पाहण्याची आवश्यकता आहे.
छत्रपती महाराणी ताराराणी यांच्या 351 व्या जयंती वर्षात दिल्लीत सरहद संस्था आयाेजित, महाराष्ट्र सदन – दिल्ली आणि मराठी भाषा विभाग – महाराष्ट्र शासन यांच्या वतीने आयाेजित केलेल्या पहिल्या महिला प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी शनिवार, दि. 11 एप्रिल 2026 राेजी महाराजा यशवंतराव हाेळकर यांच्या स्वातंत्र्यनिष्ठ परंपरेचा आणि शिंदे घराण्याच्या ऐतिहासिक राष्ट्रकार्यातील याेगदानाचा सन्मान एकाच व्यासपीठावर हाेणे, हा राष्ट्रीय ऐक्याचा महत्त्वपूर्ण क्षण ठरणार आहे.
ज्याेतिरादित्य शिंदे यांनी लाेकसभा सदस्य, संसदीय कार्यातील सक्रिय सहभाग, विविध केंद्रीय जबाबदाऱ्या आणि सध्या भारत सरकारचे केंद्रीय मंत्री म्हणून सार्वजनिक जीवनात सातत्य, शिस्त आणि कार्यक्षमतेची छाप निर्माण केली आहे. परंपरेचा अभिमान आणि आधुनिक राष्ट्रकार्यातील सक्रिय सहभाग यांचा संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसून येत असल्याचे समितीने म्हटले आहे.
पुरस्कार वितरण समारंभ दिल्ली येथे महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. हि माहिती सरहद संस्थेचे समन्वयक लेशपाल जवळगे यांनी आज दिल्ली येथे एका प्रसिद्धीपत्रकाव्दारे दिली.
स्मार्ट सिटी पुणे आता वॉटर किंगडम:पुणेकरांना फुकटात वॉटर सफारी, अजून किती विकास हवा? विजय वडेट्टीवार यांचा उपरोधिक टोला
पुणे- येथे कालगुरुवारी अर्धा तास तुफान पाऊस झाला. यामुळे शहरातील अनेक सखल भागांत कंबरेपर्यंत पाणी साचले. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सत्ताधारी भाजपवर निशाणा साधत ‘स्मार्ट सिटी पुणे आता वॉटर किंगडम’ झाल्याचा टोला हाणला.
पुण्यात 2 एप्रिल रोजी 130 वर्षांनंतरचा विक्रमी पाऊस झाला. यापूर्वी 1896 साली एका दिवसात 51.1 मिलिमीटर पाऊस झाला होता. त्यानंतर काल गुरुवारी एकाच दिवसात 65 मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली. वादळी वाऱ्यासह झालेल्या या मुसळधार पावसाचा अनेकांना फटका बसला. शहरातील गंगाधाम चौकातील एक मोठी होर्डिंग पावसामुळे कोसळली. पण सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही. पण यामुळे रस्ते वाहतूक मंदावली. दुसरीकडे, अन्य एका ठिकाणी झाड कोसळून 1 महिला दगावली. या घटनेत 2 जण बालंबाल बचावले. या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला आहे.
पुणेकरांनी भाजपला अगदी भरभरून दिलं…
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) April 3, 2026
६ आमदार, ११९ नगरसेवक, १ खासदार, भाजपाचे एक केंद्रीय मंत्री, राज्यातील एक कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री या पुणे शहरात राहतात. असं असताना काल अवघ्या अर्ध्या तासाच्या पावसात हे शहर अक्षरशः बुडालं…
स्मार्ट सिटी पुणे आता वॉटर किंगडमकडे वाटचाल करत… pic.twitter.com/gE1GGl1ujh
विजय वडेट्टीवार या प्रकरणी आपल्या एका पोस्टमध्ये म्हणाले, पुणेकरांनी भाजपला अगदी भरभरून दिलं. 6 आमदार, 119 नगरसेवक, 1 खासदार, भाजपाचे एक केंद्रीय मंत्री, राज्यातील एक कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री या पुणे शहरात राहतात. असं असताना काल अवघ्या अर्ध्या तासाच्या पावसात हे शहर अक्षरशः बुडालं. स्मार्ट सिटी पुणे आता वॉटर किंगडमकडे वाटचाल करत आहे.
इतरवेळी क्रेडिट घेण्यासाठी पुढे येणारे पुण्याचे स्वयंघोषित शिल्पकार यांनाच याचे श्रेय दिले पाहिजे. पुणेकरांना फुकटात वॉटर सफारी मिळाली.. अजून किती विकास पुणेकरांना हवा आहे? असा प्रश्न वडेट्टीवारांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे.
विजय वडेट्टीवार व विकास लवांडे या दोघांनीही देवेंद्र फडणवीस यांचे होर्डिंग असलेले एक बॅनर पोस्ट केले आहे. रस्त्याच्या अगदी शेजारी लावण्यात आलेले हे बॅनर पावसाच्या पाण्यात बुडाल्याचे दिसून येत आहे. या होर्डिंगवर फडणवीस यांचा उल्लेख पुण्याचे शिल्पकार व महाराष्ट्राचे नवे नेतृत्व म्हणून करण्यात आला आहे.
स्वतःला पुण्याचे शिल्पकार म्हणवणारे @Dev_Fadnavis आपण पुण्यातील कालचे चित्र पाहिले की नाही ? स्मार्ट सिटी होणार होती , मेट्रो सिटी असे स्वप्न दाखवण्यापेक्षा दररोजच्या सांडपाण्याचे आणि कचऱ्याचे प्रश्न जर सरकारला सोडवता येणार नसतील आणि दर पावसाळ्यामध्ये पुण्यातील रस्ते,… pic.twitter.com/iAuoTGHtrV
— Vikas Lawande (@VikasLawande1) April 3, 2026
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनीही या प्रकरणी सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, स्वतःला पुण्याचे शिल्पकार म्हणवणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपण पुण्यातील कालचे चित्र पाहिले की नाही? स्मार्ट सिटी होणार होती, मेट्रो सिटी असे स्वप्न दाखवण्यापेक्षा दररोजच्या सांडपाण्याचे आणि कचऱ्याचे प्रश्न जर सरकारला सोडवता येणार नसतील आणि दर पावसाळ्यामध्ये पुण्यातील रस्ते, नाले,गल्ल्या तुडुंब भरणार असतील त्यात दरवर्षी लोकांचे मालमत्तेचे नुकसान होणार असेल तर आपले सरकार नेमके काय करते?
मागील दहा वर्षात पुणे महानगरपालिकेने आलेले कोट्यवधी रुपयांच्या विविध अनुदानाचे काय केले ? त्या पैशाची विल्हेवाट कुठे लावली की फक्त कंत्राटदारांना कामे देऊन कमिशन खाल्ले? असा प्रश्न पडतो, असे ते म्हणालेत.
पुण्यातील नदी – नाल्यांवरील अतिक्रमणे काढणार:महापौर मंजुषा नागपुरे यांची घोषणा; मृत महिलेच्या कुटुंबाला मदत
पुणे-पुणे शहरात झालेल्या अतिवृष्टीनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर पुणे महानगरपालिकेने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यानुसार, नदी आणि नाल्यांच्या बाजूला असलेल्या बेकायदा बांधकामांचे नव्याने सर्वेक्षण करून ती अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत.महापौर मंजुषा नागपुरे यांनी याविषयी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, सध्याचा पाऊस अनिश्चित स्वरूपाचा असून कमी वेळेत अधिक पाऊस होत आहे. यामुळे शहरातील विविध भागांत पाणी साचले, ज्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली. एका ज्येष्ठ महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी महापालिकेत आपत्कालीन बैठक घेण्यात आली.
महापालिकेने स्ट्रॉम वॉटरलाइन ड्रेनेज सफाईच्या कामाला सुरुवात केली आहे. पावसाचे पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढवण्यासाठी पाइपलाइनचा आकार वाढवण्यात येणार आहे. झाडे छाटणीचे काम केवळ पावसाळ्यापूर्वीचे नसून वर्षभराचे आहे, असे सांगत नियमानुसार परवानगी देऊन कामाला सुरुवात झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. धोकादायक झाडे पावसाळ्यापूर्वी काढली जातील.
ज्यांच्या घरात पाणी शिरले आहे, त्याबाबत पंचनामा करण्यात येईल. झाड पडून मयत झालेल्या महिलेच्या कुटुंबाला पाच लाखांची आर्थिक मदत आणि अतिरिक्त दोन लाख रुपये निधी देण्यात येणार असल्याची घोषणा महापौर नागपुरे यांनी केली.
यावेळी उपस्थित असलेले पुणे मनपा आयुक्त नवलकिशोर राम यांनी माहिती दिली की, नुकताच एका तासात १०४ मिमी पाऊस झाला, ज्यामुळे दोन ठिकाणी ढगफुटीसदृश घटना घडल्या. मनपा प्रशासन सातत्याने काम करत असून, शहराचा विस्तार वाढल्याने आव्हाने वाढली आहेत.
शहरात २२७ ठिकाणी कामे करण्याची गरज असून, ती तीन विभागांत विभागून केली जातील. यापैकी १२० ठिकाणी जूनपूर्वी सर्व आवश्यक कामे पूर्ण करण्यात येतील. वर्षानुवर्षे काही ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडत आहेत, त्या ठिकाणांचा यात समावेश आहे.
झाड छाटणीसाठी २४ तासांत परवानगी देण्यात येईल. प्रत्येक वॉर्डला कामांसाठी दहा लाख निधी दिला जातो, परंतु खर्चात कमी-अधिकता असल्याने तशा सूचना दिल्या आहेत. शहरातील ३२ धोकादायक वाड्यांमधील रहिवाशांचे एप्रिलपूर्वी स्थलांतर करण्यात येणार आहे. क्षेत्रीय अधिकारी दररोज कामावर येण्यापूर्वी दोन तास फिरून त्यांच्या भागातील अडचणींचा आढावा घेतील, असे आयुक्त राम यांनी सांगितले.
पुणे शहर देशातील एक महत्वपूर्ण शहर आहे. दुबई, सिंगापूर मध्ये देखील १०० मिमी पाऊस एक तासात झाला तर पाणी जमा होते. त्यामुळे त्रास सर्वच ठिकाणी होत असतो. पाऊस न साचता ते तात्काळ निघून गेले पाहिजे याचे प्रयत्न करण्यात येत आहे. पुणे शहरात जुनी स्ट्रॉम वॉटर पाइपलाइन केवळ १६ टक्के असून ती ११३ मिमी अपेक्षित असल्याने त्याबाबत काम सुरू आहे. बेकायदा होर्डिंग्ज बाबत ऑडिट करून नवीन गाईड लाइननुसार काम करण्यात येईल.
एकनाथ शिंदेंचे भोंदू खरातला तब्बल 17 फोन:रूपाली चाकणकरांचेही 177 कॉल; सुनील तटकरे, दीपक केसरकरांचेही कॉल्स
मुंबई- सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भोंदू अशोक खरात यांच्यात तब्बल 17 वेळा फोनवरून बोलणे झाल्याचा धक्कादायक दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. एकनाथ शिंदे व अशोक खरात यांच्यात 17 वेळा फोनवरून बोलणे झाले. एवढेच नाही तर राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही खरातला एक-दोन नव्हे तर तब्बल 177 वेळा फोन केले होते. हे एवढे कॉल त्यांनी का केले होते? याचे उत्तर त्यांनी द्यावे, असे दमानिया यांनी म्हटले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री आशिष शेलार व शिंदे गटाचे माजी मंत्री दीपक केसरकर हे ही वेळोवेळी भोंदू खरातच्या संपर्कात होते, असे दमानिया यांनी स्पष्ट केले आहे.
अंजली दमानिया शुक्रवारी यासंबंधी बोलताना म्हणाल्या, कोणताही विषय लढण्यास सुरुवात केल्यानंतर माझ्याकडे बरीच माहिती येते. असाच काहीसा प्रकार आत्ता झाला आहे. अशोक खरातच्या प्रकरणाची खूप मोठी माहिती माझ्याकडे येत आहे. ती मी माध्यमांनाही देत आहे. पण काही कारणामुळे मी आता चंदीगडला आले आहे. लग्नानिमित्त रविवारपर्यंत मी परत येणार नव्हते, म्हणून मला वाटले की ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी. मला एक सीडीआरची कॉपी मिळाली आहे. ही कॉपी व्हॉट्सएपवर ज्यांनी पाठवली, त्यांना मी ओळखत नाही. पण मी ती पोलिस महासंचालक व मुख्यमंत्र्यांना पाठवली. एसआयटीच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांनाही मी ही माहिती दिली.
काल दिवसभरात मी माहिती थोडीशी संकलित केली. त्यात मला धक्कादायक माहिती मिळाली. रुपाली चाकणकर आतापर्यंत म्हणायच्या की अशोक खरात हे माझे गुरू आहेत. मला त्यांच्याविषयी फार काही माहिती. पण चाकणकरांनी खरातला सुमारे 177 कॉल्स केल्याची माहिती माझ्याकडे आहे. एवढेच नाही तर त्यांच्या भगिणी प्रतिभा चाकणकर यांचेही तब्बल 236 कॉल्स खरातला गेले.
एकनाथ शिंदे – खरातमध्ये 17 वेळा बोलणे
अंजली दमानिया म्हणाल्या, प्रस्तुत प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आतापर्यंत केवळ फोटो व व्हिडिओ पाहिले. पण शिंदे यांनी अशोक खरातला तब्बल 17 कॉल केल्याची माहिती माझ्याकडे आहे. हे सर्व नॉर्मल फोन कॉल्स आहेत. त्यांच्यात व्हॉट्सएप किंवा इतर माध्यमातून किती कॉल झाले याची माहिती मला नाही. पण 17 पैकी 10 इनकमिंग व 7 आऊटगोईंग कॉल होते. त्यात एकदा दोघांत तब्बल 21 मिनिटांचे संभाषण झाले. ही सगळी माहिती एक जबाबदार नागरीक म्हणून मी यंत्रणांना दिली. माझी ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याची इ्च्छा होती. त्यामुळे ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवत आहे. यात माझा दुसरा कोणताही हेतू नाही.
चंद्रकांत पाटील, तटकरे, शेलारचाही फोन
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अशोक खरातसारख्या व्यक्तीशी 17 वेळा फोन करत असतील तर त्यांनी ते कशासाठी केले याचे उत्तर त्यांनी देण्याची गरज आहे. भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे 8 कॉल्स आहेत. सुनील तटकरे यांचे 8 कॉल्स आहेत. आशिष शेलार यांचाही 1 कॉल आहे. हे सर्व नॉर्मल कॉल्स आहेत. कारण, व्हॉट्सएप कॉल्सची माहिती आपल्याला मिळू शकत नाही. या लोकांनी एकमेकांशी नॉर्मल कॉल एवढे केले असतील तर व्हॉट्सएपवरून किती संभाषण केले असेल हे सांगता येत नाही, असे त्या म्हणाल्या.
चाकणकर- खरात यांच्यात 33,727 सेकंद संभाषण
अंजली दमानिया पुढे म्हणाल्या, प्रस्तुत सीडीआरमध्ये अशोक खरात व तृप्ती खरात यांच्यात सर्वाधिक वेळा बोलणे झाल्याचे नमूद आहे. कुटुंबातील व्यक्तीशी जास्त बोलणे होते, हे आपण समजू शकतो. पण त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर रुपाली चाकणकर यांचे नाव आहे. त्यांनी सुमारे 33 हजार 727 सेकंद एवढे संभाषण खरातशी साधले आहे. त्यामुळे चाकणकरांना अटक करून त्यांची चौकशी झाली पाहिजे. सर्वप्रथम त्यांच्यावर एफआयआर दाखल करून अटक झाली पाहिजे. एवढा वेळ कुणीही आपल्या गुरुशी बोलू शकत नाही. दोघांमध्ये एवढे मोठे संभाषण होत असेल, तर ती काय बोलत होती? याची चौकशी डेफिनेटली झाली पाहिजे.
केसरकरांच्या विश्वासूचे 189 कॉल्स
या प्रकरणात तिसरे नाव दीपक लोंढे यांचे आहे. हे माजी मंत्री दीपक केसरकर यांचे अतिशय जवळचे व्यक्ती आहेत. त्यांचे 189 कॉल्स खरातला झाले होते. त्यांनी 30 हजार 579 सेकंद बोलले होते. ही सर्व माहिती धक्कादायक आहेत. अशोक खरातला देश व परदेशातून फोन यायचे. त्याला कतार, यूएई, ऑस्ट्रेलिया, यूएस व्हर्जिन आयलँड, ओमान, ख्रिसमस आयलँड येथूनही खरातला फोन येत होते. ही सर्व माहिती एसआयटीला दिली आहे. त्यावर पूर्ण चौकशी झाली पाहिजे. माझ्याकडे जी-जी माहिती येईल, ती माहिती मी यंत्रणेला देईल, असे दमानिया म्हणाल्या.
एमएनजीएलचे कनेक्शन तात्काळ उपलब्ध करुन द्या!
आवश्यकता असल्यास लोकसहभागातून १०० कर्मचारी उपलब्ध करुन देऊ!
ना. चंद्रकांतदादा पाटील यांचे निर्देश
युद्धामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे पाईप नॅचरल गॅस (PNG) ची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही वाढती गरज ओळखून नागरिकांना तात्काळ नवीन कनेक्शन उपलब्ध करून देण्याचे आदेश ना. पाटील यांनी दिले. तसेच, मनुष्यबळाची कमतरता भासत असल्यास लोकसहभागातून १०० कर्मचारी उपलब्ध करुन देऊ, अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.
आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे नैसर्गिक गॅसच्या मागणीत वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज ना. पाटील यांची एमएनजीएलच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली. कोथरुड विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण पुणे शहरात पीएनजी पुरवठा विनाव्यत्यय सुरू राहण्याबाबत त्यांनी आढावा घेतला.
यावेळी एमएनजीएलचे डायरेक्टर कुमार शंकर, कमर्शियल डायरेक्टर शंकर करजगी, स्वतंत्र डायरेक्टर बागेश्री मंठाळकर, व्हाईस प्रेसिडेंट शत्रुघ्न सिंह, रितेश इंगोले, ओंकार डुबल, लोकेश सरोदे आदी उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीला ना. पाटील यांनी एमएनजीएलच्या शहरातील पुरवठा, तांत्रिक अडचणी याबबतचा सविस्तर आढावा घेतला. तसेच, मागणी आणि पुरवठ्याबाबत ही सविस्तर माहिती जाणून घेतली. युद्धजन्य परिस्थितीमुळे अचानक मागणी वाढल्याने नागरिकांशी समन्वय साधून भागांत पाईप लाईन पोहोचवण्याचे काम जलदगतीने पुरवावे. तसेच, कामाला गती देण्यासाठी जर मनुष्यबळाची कमतरता भासत असेल, तर लोकसहभागातून १०० कर्मचारी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
“शिवरायांच्या स्वराज्य संकल्पनेतून नव्या पिढीला ऊर्जा व दिशा मिळेल; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे प्रतिपादन”
मुंबई, दि. ३ एप्रिल २०२६ : स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४६ व्या पुण्यतिथीनिमित्त मुंबईतील विधानभवन परिसरात त्यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.
यावेळी बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची संकल्पना आजही अत्यंत प्रेरणादायी आहे. ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वांना शक्ती व बळ मिळावे, तसेच तुळजाभवानीचे आशीर्वाद लाभावेत, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.
विधानमंडळात थोर विभूतींच्या जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्याची परंपरा सातत्याने जपली जात असल्याचे त्यांनी नमूद केले. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महान व्यक्तींच्या कार्याची आठवण करून देणारे हे क्षण समाजाला नवी दिशा देणारे ठरतात, असे त्या म्हणाल्या.
यावेळी विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे, जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने, खासगी सचिव अविनाश रणखांब, विशेष कार्यकारी अधिकारी संतोष उडतेवार तसेच विधिमंडळ कर्मचारी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचे पुण्यस्मरण महाराष्ट्रासह देश-विदेशात मोठ्या प्रमाणात होत असून, त्यांच्या कार्यातून पुढील पिढ्यांना प्रेरणा, ऊर्जा आणि स्फूर्ती मिळत राहील, असा विश्वासही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला.
‘व्हॉईस ऑफ पीएमआरडीए’ ई-न्यूजलेटरचे शानदार प्रकाशन
- ‘डिजिटल जनसंवाद ही काळाची गरज’ – महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी
पुणे: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) कामकाज अधिक पारदर्शक करण्यासाठी आणि नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी ‘व्हॉईस ऑफ पीएमआरडीए’ या डिजिटल ई-न्यूजलेटरचा गुरुवारी (दि. २ एप्रिल) शानदार शुभारंभ करण्यात आला. “बदलत्या तांत्रिक युगात डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करून जनतेशी जोडले जाणे, ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी यावेळी केले.
आकुर्डी येथील पीएमआरडीए मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात हा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी सहआयुक्त (प्रशासन) रूपाली आवले-डंबे, मुख्य अभियंता रिनाज पठाण, सहआयुक्त (जमीन व मालमत्ता) पूनम मेहता, उपायुक्त हिंमत खराडे, विकास परवानगी विभागाचे संचालक अविनाश पाटील, वित्तीय नियंत्रक जितेंद्र कोळंबे, मुख्य अभियंता शिवप्रसाद बागडी, अग्निशमन विभागाचे प्रमुख देवेंद्र पोटफाडे, उपायुक्त (प्रशासन) राजेश माशेरे, तहसीलदार अभिजित जगताप यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
पीएमआरडीएचे धोरणात्मक निर्णय, राबविण्यात येणारे विविध प्रकल्प आणि विकासकामांची अधिकृत माहिती नागरिकांपर्यंत त्वरित पोहोचावी यासाठी हे ई-न्यूजलेटर महत्त्वाचे माध्यम ठरेल. या उपक्रमामुळे पीएमआरडीएच्या कामात अधिक सुसूत्रता आणि पारदर्शकता येईल, असा विश्वास महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना पीएमआरडीएच्या सहआयुक्त (प्रशासन) रूपाली आवले-डंबे यांनी या उपक्रमाची भूमिका विशद केली. पीएमआरडीएच्या योजना आणि जनहितार्थ निर्णय थेट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे डिजिटल व्यासपीठ कार्यान्वित करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. माहिती व जनसंपर्क अधिकारी पुरुषोत्तम सांगळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
ट्रम्प म्हणाले- मी सांगितले तर युद्ध थांबेल,इराणने म्हटले- शत्रूंनी शरणागती पत्करेपर्यंत युद्ध सुरू राहील; होर्मुझवर आज संयुक्त राष्ट्रांत मतदान
वॉशिंग्टन:
ट्रम्प यांनी म्हटले आहे की, जर त्यांनी इराणविरुद्ध सुरू असलेले युद्ध संपवण्याचा निर्णय घेतला, तर इस्रायलही त्यांच्या सांगण्यावरून लगेच हल्ला थांबवेल. त्यांनी टाइम मॅगझिनशी बोलताना सांगितले.
टाइम्स ऑफ इस्रायलच्या अहवालानुसार, नेतन्याहू यांच्याकडे ट्रम्प यांच्या पाठिंब्याशिवाय जास्त पर्याय नाहीत. दुसरीकडे, इराणच्या सैन्याने स्पष्टपणे सांगितले आहे की, हे युद्ध तोपर्यंत सुरू राहील, जोपर्यंत त्याचे शत्रू शरणागती पत्करत नाहीत.
दरम्यान, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) आज म्हणजेच शुक्रवारी बहरीनच्या प्रस्तावावर मतदान होणार आहे. या प्रस्तावात देशांना होर्मुझमधून जहाजांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सर्व पावले उचलण्याची परवानगी देण्याबाबत म्हटले आहे.
ब्रिटनच्या पुढाकाराने होर्मुज सामुद्रधुनी पुन्हा उघडण्यासाठी गुरुवारी एक ऑनलाइन बैठक झाली, ज्यात 60 हून अधिक देशांनी भाग घेतला. या बैठकीत भारताकडून परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी सहभागी झाले होते.
बैठकीत विक्रम मिसरी म्हणाले की, होर्मुज संकटात आतापर्यंत केवळ भारताचेच नागरिक मारले गेले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, होर्मुज संकटात आतापर्यंत 3 भारतीय खलाशी मारले गेले आहेत, हे सर्व परदेशी जहाजांवर काम करत होते.
भारताने सांगितले की, या संपूर्ण संकटावर केवळ चर्चा आणि शांततेनेच तोडगा निघू शकतो. भारताने सर्व देशांना आवाहन केले की, तणाव कमी करा आणि आपापसात चर्चा करून मार्ग काढा.
इराणी सैन्याने म्हटले आहे की जोपर्यंत शत्रू शरण येत नाही तोपर्यंत युद्ध सुरूच राहील
इराणी सैन्याने स्पष्टपणे सांगितले आहे की जोपर्यंत त्यांचे शत्रू शरणागती पत्करत नाहीत तोपर्यंत हे युद्ध सुरूच राहील.
अल जझीराच्या वृत्तानुसार, इराणी लष्करी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, ते पूर्ण ताकदीनिशी लढा सुरू ठेवतील आणि कोणत्याही दबावापुढे झुकणार नाहीत.
इराणने अमेरिकेला जमिनीवरून हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र प्रत्युत्तर देण्याचा इशाराही दिला आहे. वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, कोणत्याही हल्ल्यामुळे शत्रू सैन्याचे मोठे नुकसान होईल.
फ्लाइटमध्ये पसंतीच्या 60% जागा अतिरिक्त शुल्काविना निर्णयाला स्थगिती:विमान वाहतूक मंत्रालयाने 15 दिवसांत निर्णय बदलला
केंद्रीय मंत्री म्हणाले- भारत जगातील तिसरा सर्वात मोठा देशांतर्गत विमान वाहतूक बाजार
नवी दिल्ली:केंद्र सरकारने एअरलाइन्सना विमानात 60% जागा अतिरिक्त शुल्क न घेता निवडण्याची परवानगी देणारा निर्देश तात्पुरता थांबवला आहे. वृत्तसंस्था पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, हा नियम 20 एप्रिलपासून लागू होणार होता, परंतु आता तो पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आला आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने 15 दिवसांपूर्वी 18 मार्च रोजी सांगितले होते की, डीजीसीएला निर्देश देण्यात आले आहेत की, कोणत्याही विमानात सीट निवडण्यासाठी किमान 60% जागा शुल्क न घेता उपलब्ध करून द्याव्यात. याचा उद्देश प्रवाशांना सीट निवडण्यात समान संधी देणे हा असल्याचे सांगण्यात आले होते.
मंत्रालयाच्या मते, या मुद्द्याच्या पुनरावलोकनादरम्यान फेडरेशन ऑफ इंडियन एअरलाइन्सकडून आक्षेप पाठवण्यात आले. यामध्ये ऑपरेशनल परिणाम, भाड्यावर परिणाम आणि सध्याच्या अनियंत्रित भाडे प्रणालीशी सुसंगतता यांसारखे मुद्दे उपस्थित करण्यात आले. मंत्रालयाने सांगितले की, सखोल चौकशी पूर्ण होईपर्यंत 60% जागा मोफत देण्याची तरतूद लागू केली जाणार नाही.
सध्याच्या नियमांनुसार, प्रवाशांसाठी 20% जागाच अतिरिक्त शुल्क न देता बुक करता येतात, तर उर्वरित जागांसाठी पैसे द्यावे लागतात. अहवालानुसार, सध्या एअरलाईन्स पसंतीच्या जागा निवडण्यासाठी 500 ते 3000 रुपयांपर्यंत अतिरिक्त शुल्क आकारतात.
अनेकदा असे दिसून येते की, तिकीट बुकिंगनंतर जेव्हा प्रवासी वेब चेक-इन करतात, तेव्हा त्यांना मोफत सीटच्या नावाखाली केवळ 20% पर्यायच मिळतात. उर्वरित जागांसाठी कंपन्या ‘प्रेफर्ड सीट’च्या नावाखाली मोठी रक्कम वसूल करतात. DGCA च्या 15 दिवसांपूर्वीच्या आदेशात म्हटले होते की, प्रत्येक विमानात 60% जागा अशा असाव्यात, ज्या प्रवासी कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय निवडू शकतील. मात्र, सध्या हे लागू होणार नाही.
नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी सांगितले की, भारत जगातील तिसरा सर्वात मोठा देशांतर्गत विमान वाहतूक बाजार बनला आहे. भारतीय विमानतळे आता दररोज 5 लाखांहून अधिक प्रवाशांना हाताळत आहेत. उडान योजनेमुळे भारतात हवाई प्रवास आता केवळ श्रीमंत लोकांचा अधिकार न राहता, सर्वांसाठी सुलभ झाला आहे.
देशात हवाई प्रवास आणखी सोपा करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत, जसे की उडान प्रवासी कॅफे, जिथे परवडणारे अन्न मिळते, फ्लायब्ररीमध्ये पुस्तके विनामूल्य वाचायला मिळतात आणि टर्मिनलवर मोफत वाय-फाय उपलब्ध करून देणे
अनेकदा असे दिसून येते की, तिकीट बुकिंगनंतर जेव्हा प्रवासी वेब चेक-इन करतात, तेव्हा त्यांना मोफत सीटच्या नावाखाली केवळ 20% पर्यायच मिळतात. उर्वरित जागांसाठी कंपन्या ‘प्रेफर्ड सीट’च्या नावाखाली मोठी रक्कम वसूल करतात. DGCA च्या 15 दिवसांपूर्वीच्या आदेशात म्हटले होते की, प्रत्येक विमानात 60% जागा अशा असाव्यात, ज्या प्रवासी कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय निवडू शकतील. मात्र, सध्या हे लागू होणार नाही.
केंद्रीय मंत्री म्हणाले- भारत जगातील तिसरा सर्वात मोठा देशांतर्गत विमान वाहतूक बाजार
नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी सांगितले की, भारत जगातील तिसरा सर्वात मोठा देशांतर्गत विमान वाहतूक बाजार बनला आहे. भारतीय विमानतळे आता दररोज 5 लाखांहून अधिक प्रवाशांना हाताळत आहेत. उडान योजनेमुळे भारतात हवाई प्रवास आता केवळ श्रीमंत लोकांचा अधिकार न राहता, सर्वांसाठी सुलभ झाला आहे.
देशात हवाई प्रवास आणखी सोपा करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत, जसे की उडान प्रवासी कॅफे, जिथे परवडणारे अन्न मिळते, फ्लायब्ररीमध्ये पुस्तके विनामूल्य वाचायला मिळतात आणि टर्मिनलवर मोफत वाय-फाय.
पुण्यात ‘सीएनजी’ही चे दर वाढले.. आघातावर आघात
पुणे :पेट्रोल आणि एलपीजी गॅसच्या दरवाढीनंतर आता सीएनजीचे दर वाढले आहेत. पुण्यामध्ये सीएनजीचे नवे भाव स्पष्ट झाले आहेत.पुण्यामध्ये सीएनजीचे दर दोन रुपयांनी वाढले असून 94.50 रुपये प्रति किलो, असे नवीन दर असतील. शुक्रवारी रात्री बारा वाजल्यापासून नवीन दर लागू होणार आहेत. 92.50 रुपये प्रति किलो मिळणारा सीएनजी आता २ रुपयांनी महाग खरेदी करावा लागणार आहे.
दरम्यान, बुधवार, दि. १ एप्रिलरोजी ‘इंडियन ऑइल कॉर्पोरेशन’ने आपल्या ‘प्रीमियम’ इंधनांच्या किमती वाढवल्या आहेत. कंपनीने ‘१००-ऑक्टेन’ पेट्रोलचे दर वाढवले आहेत; हे पेट्रोल ‘XP100′ या नावाने बाजारात उपलब्ध आहे. दिल्लीमध्ये, या पेट्रोलचा दर प्रति लिटर ₹१४९ वरून वाढवून १६० रुपये करण्यात आला आहे. तसेच’एक्स्ट्रा ग्रीन’ ही प्रीमियम श्रेणीतील डिझेल देखील महाग झाले आहे. याचा दर प्रति लिटर ₹९१.४९ वरून वाढून ९२.९९ रुपये इतका झाला झाला आहे. हे नवीन दर IOCL च्या सर्व विक्री केंद्रांवर लागू करण्यात आले आहेत.
मागील आठवड्यात केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरांबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकारने पेट्रोलवरील विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क कमी करून ते प्रति लिटर ३ रुपये इतके केले आहे, तर डिझेलवरील हे शुल्क पूर्णपणे रद्द करण्यात आले आहे. यापूर्वी, पेट्रोलवर प्रति लिटर १३ आणि डिझेलवर प्रति लिटर १० रुपये इतके विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क आकारले जात होते.
पश्चिम आशियातील सध्याचा तणाव आणि कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेली प्रचंड वाढ यामुळे भारतासारख्या आयातीवर अवलंबून असलेल्या देशांवरील दबाव अधिकच वाढला आहे. या पार्श्वभूमीवर, करांमध्ये कपात करून सामान्य जनतेला दिलासा देण्याचा आणि महागाई नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. पण तज्ञांचे असे म्हणणे आहे की, जर जागतिक कच्च्या तेलाच्या किमती उच्च पातळीवरच राहिल्या, तर भविष्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती पुन्हा एकदा वाढू शकतात.
गल्लीबोळात सिमेंटच्या रस्त्यांना बंदी: आयुक्तांच्या निर्णयाचे स्वागत पण..
बैल गेला अन् झोपा केला….प्रशासनाचा कारभार
पुणे: रस्त्यांच्या काँक्रीटीकरणास सातत्याने विरोध होत असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून शहर परिसरात गल्लीबोळातील रस्ते सिमेंट काँक्रिटचे करून त्यातून मजबूत टक्केवारी कमविण्याची ट्रिक वर्षानुवर्षे सुरू आहे. पण या सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यामुळे पाणी तुंबण्याचे प्रमाण वाढत असून, थेट वस्त्यांमध्ये पाणी घुसत असल्याचे आता कुठे महापालिकेला खरे वाटू लागले आहे.
त्यामुळे ९ मीटरपेक्षा कमी रस्त्यांचे सिमेंट कांँक्रिटीकरण केले जाणार नाही, तेथे केवळ डांबरी रस्ते केले जाईल असे आयुक्त नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले आहे.
शहरात सुमारे ९०० किलोमीटर लांबीचे सहा ते १२ मीटर रुंदीचे अरुंद अंतर्गत रस्ते आहेत. या रस्त्यांवर पावसाळी गटारे आणि पाणी वाहून नेणारी यंत्रणा अपुरी असल्याने मुसळधार पावसात या रस्त्यांचे नाल्यात रूपांतर होते. सखल भागांमध्ये पाणी साचून ते थेट घरांमध्ये व इमारतींच्या पार्किंगमध्ये शिरत असल्याच्या तक्रारी सातत्याने वाढत आहेत.
यंदाच्या अवकाळी पावसाने या समस्येची तीव्रता पुन्हा समोर आणली असून सिमेंट कॉंक्रीटमुळे पाण्याचा नैसर्गिक निचरा थांबत असल्याचे स्पष्ट झाले आहे. डांबरी रस्त्यापेक्षा सिमेंटच्या रस्त्यांचा खर्च जास्त आहे. बहुतांश नगरसेवक हे ‘स’ यादीत विविध ठिकाणी सिमेंट काँक्रिटचे रस्ते करण्यासाठी म्हणून निधीची तरतूद करतात. त्यातून मिळणारी टक्केवारी जास्त असल्याने नगरसेवकांच्या दृष्टीने सिमेंटचे रस्ते महत्वाचे आहेत.
जलवाहिनी, सांडपाणी वाहिनी, पावसाळी गटार, केबल आणि इतर सेवा वाहिन्यांसाठी वारंवार खोदकाम करावे लागत आहे. सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याची डांबरी रस्त्यासाठी मोठी खर्च होतो. पण हे कॉंक्रीट रस्ते तयार केल्यानंतर त्यांची पुन्हा खोदाई केल्याने रस्ते पुन्हा दुरुस्त होत नाहीत. त्यामुळे निधी वाया जात आहे. सिमेंट रस्त्यांमुळे उष्णतेत भर पडत आहे. शहरात कमी वेळात जास्त पाऊस पडल्यानंतर लहान रस्त्यावर सिमेंटच्या रस्त्यामुळे रस्त्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाहते.
त्याचा परिणाम दाट लोकवस्ती असलेल्या भागात होत असून, घरांमध्ये पार्किंगमध्ये पाणी घुसत आहे. याचा विचार करून आयुक्त नवल किशोर राम यांनी गल्लीबोळातील रस्ते सिमेंटचे न करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात परिपत्रक काढण्याचे आदेश शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांना दिले आहेत. दरम्यान, साडेसात मीटरपर्यंतच्या रस्त्यांवर आता डांबरीकरणावर भर दिला जाणार असून, त्याबाबतचे आदेश लवकरच काढले जाणार आहेत.
डांबरी रस्ते – ९०० किलोमीटर
सिमेंट काँक्रिटचे रस्ते – ४०० किलोमीटर
विकसित न झालेले रस्ते – १०० किलोमीटर
समाविष्ट गावातील रस्ते – ७०० किलोमीटर
सिमेंट रस्ता तयार करण्याचा प्रति चौरस मिटर खर्च – ६००० रुपये
डांबरी रस्ता तयार करण्याचा प्रति चौरस मिटर खर्च – ४५०० रुपये
जुन्या हद्दीतील शहरातील रस्त्यांची रुंदी आणि लांबी (किलोमीटरमध्ये)
१२ मीटरपेक्षा लहान रस्ते -९७०.८६
१२ ते २४ मीटरचे रस्ते – ३१४
२४ ते ३० मीटरचे रस्ते – ६०.५४
३० ते ३६ मीटरचे रस्ते – २९.९६
३६ ते ६१ मीटरचे रस्ते – २३.२९
मराठी माणसाच्या असंख्य आठवणींचे गाठोडे म्हणजे भारतमाता
सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार
मुंबई, दि. 2 एप्रिल 2026
लालबाग, परळ आणि गिरणगावातील असंख्य मराठी माणसाच्या आठवणींचे एक मोठे गाठोडे घेऊन भारतमाता सिनेमागृह उभे आहे. सरकार म्हणून त्याचे आम्ही जतन करण्याचे पुर्ण प्रयत्न करीत आहोत, आपण सगळ्यांचे पाठबळ असू द्या, असे आवाहन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार यांनी आज येथे केले.
मराठी सिनेमाचे माहेर घर अशी ओळख असलेल्या लालबागच्या नाक्यावरील भारतमाता सिनेमागृहाचा डागडुजीनंतर आज पुन्हा राज्याचे माहिती तंत्रज्ञान तथा सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार यांच्या उपस्थितीत पडदा उघडला. झी टाँकीज निर्मित ” सुपर डूपर” सिनेमाच्या शुभारंभाचा प्रयोगाच्या निमित्ताने हा उद्घाटन सोहळा पार पडला. दादासाहेब फाळके चित्रनगरीचे सह व्यवस्थापक प्रशांत साजणीकर,
अभिनेत्री निर्मिती सावंत, ऋषिकेश जोशी, लेखक समीर पाटील, निर्माते विजय शिंदे यांच्या सह सुपर डूपरचे कलाकार यावेळी उपस्थितीत होते.
यावेळी मंत्री आशिष शेलार म्हणाले की, माझे आजोळ लालबाग असल्याने मी आई सोबत या सिनेमागृहात सिनेमा पाहिला त्याच्या आठवणी आज ताज्या झाल्या. आज माझ्या सारख्या असंख्य मराठी माणसाच्या आठवणी या सिनेमागृहाशी जोडलेल्या आहेत. हा नका सुध्दा चळवळी आणि आंदोलनाचे केंद्र होते. या भारतमाता मध्ये उभा असताना मोठा भूतकाळ माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो आहे. आज एक पडदा सिनेमागृह चालवणे आव्हान आहे अशावेळी आम्ही सरकार म्हणून उभे आहोतच पण मराठी प्रेक्षकांनी सुध्दा या सिनेमागृहाच्या पाठीशी उभे रहायला हवे. रंगमंच्या जागेचे नियोजन जमले तर सरकारचा चित्रपट पुरस्कार सोहळा सुध्दा आम्ही याच सिनेमागृहात घेऊ, असेही मंत्री शेलार यांनी घोषीत केले.
या ऐतिहासिक सिनेमागृहाचे पुनरुज्जीवन वन सिनेमाज यांनी केले असून, मुक्ता A2 सिनेमाज यांच्या सहकार्याने सिंगल स्क्रीन सिनेमाचा अनुभव पुन्हा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश आहे.
नवीन भारतमाता सिनेमा आता डॉल्बी सराउंड साउंड, 2K लेझर प्रोजेक्शन, लक्झरी रीक्लायनर्स आणि सोफा सीटिंग तसेच सुधारित खाद्यपदार्थ सुविधा अशा आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे, ज्यामुळे प्रेक्षकांना अधिक मोठा आणि उत्कृष्ट सिनेमाचा अनुभव मिळेल. तांत्रिक सुधारणा करताना सिनेमाचा वारसा आणि त्याची ओळख कायम ठेवण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.
प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याबद्दल येणार्या बातम्या निराधार आणि तर्क-वितर्क हे निव्वळ काल्पनिक – पार्थ पवार
मुंबई दि. २ एप्रिल – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्याबद्दलच्या येणार्या बातम्या निराधार आणि तर्क-वितर्क हे निव्वळ काल्पनिक आहेत अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते खासदार पार्थ पवार यांनी ‘एक्स’ वर ट्वीट करुन विरोधकांची हवा काढून टाकली आहे.
प्रफुल पटेल आणि सुनिल तटकरे यांची दशकांहून अधिक काळाची निष्ठा आणि नेतृत्व आपल्या सर्वांना नेहमीच दिशा देत आले आहे. अशा ज्येष्ठ नेत्यांना मुद्दामहून ओढून-ताणून निर्माण केलेल्या वादात गोवणे हे अत्यंत दुर्दैवी असून, याचा जाहीर निषेध खासदार पार्थ पवार यांनी केला आहे.
पावसाने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून मदत देण्याचे महापौरांचे आदेश,दिड तासात पुण्यात ३६ ते १०४ मिमी पाऊस
पुणे- महानगरपालिका कार्यक्षेत्रात दि.०२/०४/२०२६ रोजी सायंकाळी ३.३० ते ०५.०० वाजेपर्यंत किमान ३६ ते १०४ मिमी पाउस पडल्याची माहिती महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. महापौर यांनी शहरातील वस्तीभागामध्ये पाणी शिरलेले ठिकाणी व पावसामुळे आलेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून मदत देण्याविषयीचे आदेश दिले आहेत.असेही या विभागाने स्पष्ट केले आहे
पहा दीड तासात महापालिकेच्या म्हणण्यानुसार कुठे किती झाला पाउस
१खडकवासला
104.2
२सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालय
100.2
३कोंढवा – येवलेवाडी क्षेत्रिय कार्यालय
92.2
४बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालय
81.4
५कोथरूड-बावधन क्षेत्रिय कार्यालय
66.6
६वारजे- कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालय
59.2
७वानवडी – रामटेकडी क्षेत्रिय कार्यालय
54.6
८येरवडा- कळस धानोरी क्षेत्रिय कार्यालय
54
९भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालय
54
१०कसबा – विश्रामबाग क्षेत्रिय कार्यालय
53
११ढोले पाटील रोड क्षेत्रिय कार्यालय
50.2
१२शिवाजीनगर घोले रोड क्षेत्रिय कार्यालय
48
१३औंध-वाणेर क्षेत्रिय कार्यालय
43
१४हडपसर-मुंढवा क्षेत्रिय कार्यालय
37
१५नगर रोड वडगाव शेरी क्षेत्रिय कार्यालय
36.4
महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने असेही म्हटले आहे कि,’ दि.०२/०४/२०२६ रोजी पुणे महानगरपालिका क्षेत्रात अवकाळी पावसामुळे आपत्कालीन कक्षाकडे पाणी साठण्याच्या, चेंबर तुंबलेबाबत, घरामध्ये पाणी घुसलेबाबत साधारण १४५ व झाडे पडण्याच्या साधारण २१ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. प्राप्त आलेल्या तक्रारी संबंधित क्षेत्रिय कार्यालयामार्फत मनुष्यबळ पाठवून तात्काळ मदत पुरविण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सर्व विभागांसमवेत समन्वय ठेऊन तात्काळ मदतीविषयी माहिती दिली त्याचप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय यांना पाणी शिरलेल्या ठिकाणी तात्काळ पंचनामा करणेविषयी व महापालिका सहाय्यक आयुक्त स्तरावर कळविण्यात आले आहे.
नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये संपर्काकरिता पुणे महानगरपालिका आपत्कालीन कक्ष संपर्क क्रमांक (२४x७) कार्यरत आहे.
१) ०२०-२५५०१२६९
२) ०२०-२५५०६८००
उप आयुक्त (परिमंडळ), महापालिका सहाय्यक आयुक्त, उप अभियंता, क्षेत्रिय स्तरावरील कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक पाणी साठणाऱ्या ठिकाणी तात्काळ आवश्यक असणारी मदतीकरिता पोहचले. या ठिकाणी नागरिकांना आवश्यक असणारी व पाणी साठणाऱ्या ठिकाणी मदतीकरिता अग्रिशमन दलाकडील कर्मचारी व आरोग्य विभागाचे कर्मचारी हे प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी उपस्थित होते. क्षेत्रिय स्तरावरील JCB, युटीलिटी व्हॅन, झाडपडी गाडी, डंपर, इलेक्ट्रीकल वाहन व त्याचप्रमाणे कटर्स, रीसायक्लर मशीन इत्यादीचा वापर करून पाण्याचा निचरा करण्यात आला. सदर ठिकाणी प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयाकडील सर्व सेवक या ठिकाणी उपस्थित होते.
पुणे शहरामध्ये प्रामुख्याने खडकवासला परिसर, सिंहगड रोड, बिबवेवाडी पुणे शहराच्या पेठेचा भाग कोंढवा, विश्रामबाग वाडा, फर्गुसन कॉलेज रोड, स्वारगेट, समतानगर, कोरेगाव पार्क, गुंजन चौक, पुणे विद्यापीठ, उंड्री, हडपसर गाडीतळ, वारजे या भागातून पाणीसाठले बाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्याचप्रमाणे सिंहगड रस्ता येथे आड पडून महिलेचा मृत्यू आल्याची माहिती प्राप्त आली आहे.
सर्व उप आयुक्त, महापालिका सहाय्यक आयुक्त बांधकाम विभाग, पथ विभाग, मोटर वाहन विभाग, मलनिस्सारण विभाग, पाणीपुरवठा, विद्युत विभाग, अग्निशमन विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग यांनी समन्वय साधून तात्काळ पाणी साठणाऱ्या ठिकाणी तसेच शहरातील अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीस प्रतिसाद दिला व तात्काळ मदत करण्यात आली.
महापालिका आयुक्त, अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) व (वि), शहर अभियंता, मुख्य अभियंता (मलनिस्सारण), मुख्य अभियंता (विद्युत), मुख्य अभियंता (पथ), अधिक्षक अभियंता (भवन रचना विभाग), उप आयुक्त (कर आकरणी व करसंकलन) यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्ष, पुणे महानगरपालिका या ठिकाणी भेट देऊन पुणे शहरातील पावसामुळे उदभवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. महापालिका आयुक्त यांनी शहरातील पाणी साठलेल्या ठिकाणी व शहरातील विविध घडलेल्या घटनांबाबत तात्काळ आवश्यक असणारी सर्व कार्यवाही करणेबाबतचे आदेश सर्व खातेप्रमुख व विभागप्रमुखांना दिले.
महापौर, पदाधिकारी व सभासद यांनी क्षेत्रिय स्तरावर शहरातील परिस्थितीची माहिती घेतली व तात्काळ मदत करणेविषयी सूचना केल्या. तसेच महापौर यांनी शहरातील वस्तीभागामध्ये पाणी शिरलेले ठिकाणी व पावसामुळे आलेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून मदत देण्याविषयीचे आदेश दिले आहेत.
