पुणे- बिबवेवाडी येथील एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावल्याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून संबंधित प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रोहिणी ढवळे, बालविकास प्रकल्प अधिकारी सुधीर ढाकणे तसेच जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मंगेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. बालविकास प्रकल्प कार्यालयातील मुख्यसेविका स्वाती राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाइल्ड हेल्पलाइन 1098 कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार या घटनेचा उलगडा झाला.
सुपरवायझर मोनिका जाधव आणि संबंधित पथकाने घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली असता मुलीचा विवाह झाल्याचे आढळून आले. त्यानंतर मुलीचे वय निश्चित करण्यासाठी शाळेचा दाखला तपासण्यात आला असता ती अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. संबंधितांनी जाणीवपूर्वक बालविवाह घडवून आणल्याचा निष्कर्ष अधिकाऱ्यांनी नोंदवला.
या प्रकरणी बालविवाह प्रतिबंधक कायद्यातील कलम 9, 10 आणि 11 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मुलीच्या नातेवाईकांची भूमिका तपासण्यास सुरुवात केली असून संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक अमोल माने करत आहेत.
दरम्यान, अशा प्रकारच्या घटना आढळल्यास नागरिकांनी तत्काळ 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून माहिती देण्याचे आवाहन जिल्हा समन्वयक अली अख्तर अन्सार यांनी केले आहे. माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवण्यात येते, असेही त्यांनी स्पष्ट केले
नाशिक- जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात अत्यंत धक्कादायक अपघात घडला आहे. पाण्याने भरलेल्या विहिरीत कार कोसळल्याने 9 जणांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना दिंडोरी शहरातील शिवाजीनगर परिसरात घडली. संबंधित कार थेट विहिरीत पडल्याने प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.या दुर्घटनेत मृतांची नावे अशी आहेत: सुनील दत्तात्रय दरगोडे (32), रेशमा सुनील दरगोडे (27), आशा अनिल दरगोडे (32), गुणवती सुनील दरगोडे (11), श्रेयश अनिल दरगोडे (11), श्रावणी अनिल दरगोडे (11), सृष्टी अनिल दरगोडे (14), समृद्धी राजेंद्र दरगोडे (7) आणि श्रद्धा अनिल दरगोडे (13). सर्वजण इंदोरे, ता. दिंडोरी येथील रहिवासी होते. मिळालेल्या माहितीनुसार, इंदोर गावातील सुनील दत्तू दरगोडे यांच्या कुटुंबीयांसह नातेवाईक एका खासगी क्लासच्या स्नेहसंमेलन कार्यक्रमावरून परतत होते. याच दरम्यान चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार रस्त्याबाहेर जाऊन पाण्याने भरलेल्या विहिरीत कोसळली. हा अपघात इतका भीषण होता की, कार थेट पाण्यात बुडाली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात लहान मुलांसह महिलांचाही समावेश असल्याने दुःख व्यक्त केले जात आहे. मृतांमध्ये तीन चिमुकल्यांचा आणि दोन महिलांचा समावेश आहे. तसेच, एकाच कुटुंबातील पाच जणांचा या घटनेत मृत्यू झाला आहे. मृतांची ओळख राखी सुनील दरगोडे, श्रद्धा अनिल दरगोडे, श्रावणी अनिल दरगोडे, सुनील दत्तू दरगोडे, उषा अनिल दरगोडे आणि त्यांच्या चार नातेवाईक अशी झाली आहे. हे सर्वजण दिंडोरी तालुक्यातील इंदोर गावचे रहिवासी होते.
दरम्यान, अपघातानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. स्थानिक नागरिकांसह प्रशासनानेही मदतकार्य हाती घेतले. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या मोहिमेत क्रेनच्या सहाय्याने कार विहिरीतून बाहेर काढण्यात आली. मात्र, तोपर्यंत कारमधील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला होता. अंधारामुळे आणि विहिरीत पाणी असल्यामुळे बचावकार्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या. घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्याचे काम केले. संबंधित कार ही मारुती सुझुकी अर्टिगा (MH15-JS-1053) असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून अपघाताचे नेमके कारण शोधले जात आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण दिंडोरी परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, विहीर मालकाच्या नातेवाईकांनीही आपली बाजू मांडली. ॲड. विक्रम राजे यांनी सांगितले की, ही विहीर 1972 पासून अस्तित्वात असून दुष्काळाच्या काळात गावासाठी पाण्याचा महत्त्वाचा स्रोत ठरली होती. विहिरीवर पूर्वी जाळी आणि अँगल बसवण्यात आले होते, मात्र ते कोणीतरी काढून नेल्याचा दावा त्यांनी केला. तसेच या रस्त्यावर संरक्षणासाठी जाळी बसवण्याची मागणी त्यांनीही नगरपंचायतीकडे केली होती, असे त्यांनी स्पष्ट केले.
पुणेकरांच्या विकासासाठी सामूहिक प्रयत्न : महापौर मंजुषा नागपुरे
पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महामाता रमाई यांनी केवळ एका समाजासाठी कार्य केले नाही तर सर्व मानव जातीसाठी कार्य केले. प्रत्येकाचे आयुष्य प्रकाशमान होईल यादृष्टीने प्रयत्न केले. पुण्यातील सर्व जनेताचा विकास व्हावा असा आमचाही सामूहिक प्रयत्न असेल, अशी ग्वाही महापौर मंजुषा नागपुरे यांनी दिला.स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले म्हणाले, स्मारकाच्या विकासासाठी निधी देण्याची संधी मिळाल्याने मी स्वत:ला भाग्यवान समजतो. कर्तव्याच्या भावनेतूनच कार्य करत राहणार आहे.
महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या सुशोभिकरणासाठी महापालिकेने अर्थसंकल्पात एक कोटी रुपयांची तरतूद केल्याबद्दल महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकातर्फे महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांचा आज (दि. ३) नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी महापौर नागपुरे बोलत होत्या. सत्कार ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते करण्यात आला. रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी रमाई महोत्सवाचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर होते.
कर्तव्याच्या भावनेतून महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या सुशोभिकरणासाठी निधी मंजूर केल्याचे सांगून महापौर मंजुषा नागपुरे पुढे म्हणाल्या, सामाजिक कार्य करताना कौतुक स्वीकारणे योग्य वाटत नाही. समाजहितासाठी कार्य करत रहावे याच भावनेने आमचे प्रयत्न आहेत.
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, लोकशाहीच्या विकासासाठी संवाद महत्त्वाचा असतो, त्याच भूमिकेतून महापौर, उपमहापौर वाटचाल करीत आहेत याचा मनस्वी आनंद आहे. त्यांच्या कारकिर्दीतील विकासाचे पर्व महत्त्वाचे ठरणार आहे.
महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या उपक्रमांची माहिती ॲड. प्रमोद आडकर यांनी प्रास्ताविकात दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल गायकवाड यांनी केले तर आभार लता राजगुरू यांनी मानले.
सकल हिंदू समाज मानाजी नगर आयोजित विराट हिंदू संमेलन पुणे : भीती वाटावे असे वातावरण देशात असताना २०१४ साली स्वातंत्र्याची कल्पना देशात आली. हिंदूंची दैन्यवस्था करण्याचे काम हिंदूंनीच केले आहे. म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हिंदू समाजाचे संघटन करण्याचे ठरवले.घराणे शाही मोडून काढण्याचे काम संघाने केले आहे. कर्तृत्ववान कार्यकर्ते संघात निर्माण झाले आणि ते संघाने समाजासाठी दिले. फक्त देशभक्त या देशाचे प्रश्न सोडवू शकतील आणि देशभक्त फक्त संघातच घडू शकतो. संघात व्यक्तीला नाही तर विचारांना महत्त्व आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यकारणी सदस्य हेमंत हरहरे यांनी व्यक्त केले.
सकल हिंदू समाज मानाजी नगर नऱ्हे परिसर तर्फे विराट हिंदू संमेलनाचे आयोजन प्रा. डॉ. सुधाकर राव जाधवर कॅम्पस येथे करण्यात आले होते. यावेळी ह.भ.प. राजेंद्र येप्रे महाराज, सेवा भारती वैभव श्री आयाम प्रमुख पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या रेखाताई सोनुने, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे उपाध्यक्ष ऍड. शार्दूल जाधवर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमात भारुड सादरीकरण करण्यात आले.
राजेंद्र येप्रे म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समजून घ्यायचा असेल तर संस्थापक हेडगेवार यांना समजून घेणे गरजेचे आहे. या संमेलनाचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश हा हिंदूंना संघटित करणे आहे. हिंदूंना संघटित करणे म्हणजे वाळूतून तेल काढण्यासारखे आहे. ज्या ठिकाणी धर्म आहे त्या ठिकाणी ज्ञान विज्ञान आणि शांती आहे.
मराठी संगीतविश्वात आपल्या मधुर, भावस्पर्शी आणि ताकदीच्या आवाजाने वेगळी ओळख निर्माण करणारी राष्ट्रीय पुरस्कार विजेती पार्श्वगायिका सावनी रवींद्र आता एका नव्या भूमिकेतून संगीतप्रेमींसमोर आली आहे. तिच्या आवाजातील गोडवा, अभिव्यक्तीची ताकद आणि प्रत्येक गाण्यातून जाणवणारी भावना यामुळे सावनीने रसिकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे आणि आता हाच सुरेल प्रवास पुढे नेत ती स्वतःचं म्युझिक लेबल घेऊन सज्ज झाली आहे. ‘सावनी रेकॉर्डझ्’ या नावाने तिने आपल्या म्युझिक लेबलची अधिकृत घोषणा नुकत्याच पार पडलेल्या सोहळ्यात केली. मराठी संगीतविश्वातील दिग्गज गायक पद्मश्री सुरेश वाडकर यांच्या हस्ते या म्युझिक लेबलचे लाँच करण्यात आले. यावेळी संगीत सृष्टीतील अवधूत गुप्ते, अभिजीत सावंत, कौशल इनामदार, अविनाश – विश्वजीत, नंदेश उमप, ऋषिकेश कामेरकर, मंगेश बोरगावकर, निहार शेंबेकर यांच्यासह लावणी सम्राज्ञी मेघा घाडगे ही उपस्थित होत्या. विशेष म्हणजे लेबल अंतर्गत तिचं पहिलं गाणंही प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करत सावनी रवींद्रने ‘मुजरा शिवबाला’ हे पहिले गाणे सादर केले आहे. वैभव देशमुख यांच्या ओजस्वी शब्दांना विजय नारायण गवंडे यांचे दमदार संगीत लाभले असून सावनीच्या आवाजाने या गाण्याला वेगळीच उंची मिळाली आहे. या गाण्यात सावनी रवींद्रने गायनासह लावणीही सादर केली आहे. हे गाणे लावण्यवतींनाही खूप भावले व या निमित्ताने सर्व लावण्यवतींचा सन्मान करण्यात आला.
आजपर्यंत सावनीने संगीतामध्ये सातत्याने निरनिराळे प्रयोग केले आहेत. ‘सावनी ओरिजिनल्स’ या तिच्या यूट्यूबवरील सिरीजअंतर्गत तिने विविध भाषांमध्येही गायन केले आहे. चित्रपटांच्या गाण्यांबरोबरच ती तिच्या संगीतिक प्रयोगांसाठीही ओळखली जाते.
या नव्या उपक्रमाबद्दल सावनी म्हणते, ”सर्व अडचणींवर मात करत कुटुंब आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सहकाऱ्यांच्या पाठिंब्यामुळे मी इथपर्यंत पोहोचले आहे. संगीत हेच माझं बळ आहे आणि त्याच बळावर स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. ‘सावनी रेकॉर्डझ्’ हे केवळ म्युझिक लेबल नसून ते माझं स्वप्न आहे. एक असं व्यासपीठ जिथे दर्जेदार, अर्थपूर्ण आणि मनाला भिडणारे संगीत साकारेल. जिथे पोहोचण्याचा विचारही अनेकांसाठी धाडसी वाटतो, त्या वाटेवर चालण्याची हिंमत मी केली आहे. कलेच्या प्रेमापोटी सावनी रेकॉर्ड ही मोठी पायरी मी चढते आहे. या निमित्ताने मी सांगू इच्छिते की माझी गाणी अर्थातच या लेबलवर प्रदर्शित होतील त्याचबरोबर संगीत क्षेत्रातील प्रतिष्ठित गायकांची व नवीन काही करू पाहाणाऱ्यांची गाणी प्रभावीपणे पोहोचवता येतील. पुढच्या काळात नव्या कलाकारांना संधी देत, संगीताच्या माध्यमातून काहीतरी वेगळं आणि अभिमानास्पद घडवण्याचा माझा प्रयत्न असेल.”
सुरेश वाडकर म्हणतात, “सावनीने तिच्या ‘मुजरा शिवबाला’ या गाण्यातून खरंच आपल्याला जुन्या काळात नेलं. पूर्वी ज्या ताकदीने आणि ठसक्यात लावण्या सादर केल्या जायच्या, तोच अनुभव या गाण्यातून मिळतो. सावनीने लावणीची परंपरा अत्यंत सुंदरपणे जपली आहे. गाण्याची चाल, शब्द आणि एकूणच सादरीकरण खूपच प्रभावी आहे. विशेष म्हणजे तिने स्वतः गायन करतानाच या गाण्यात उत्कृष्ट परफॉर्मन्सही दिला आहे, त्यामुळे स्क्रीनवर तिचं काम खूप सहज आणि उठून दिसतं. सावनीला संगीताचा उत्तम वारसा लाभला आहे. तिच्या या नव्या म्युझिक लेबलसाठी आणि पुढील वाटचालीसाठी मी मनापासून शुभेच्छा देतो.”
‘सावनी रेकॉर्डझ्’चा लोगोही तितकाच अर्थपूर्ण आहे. महाराष्ट्रातील महिलांच्या ओळखीचं प्रतीक असलेल्या ‘चंद्रकोर’ आणि व्हिनाइल रेकॉर्ड डिस्क यांचा सुंदर संगम या लोगोमध्ये पाहायला मिळतो. हा लोगो केवळ डिझाइन नसून जिंकण्याची वृत्ती, संगीताची परंपरा आणि भविष्यकालीन दर्जेदार कामाची हमी दर्शवतो. मराठी स्त्री गायिकांमध्ये स्वतःचे म्युझिक लेबल सुरू करून त्याअंतर्गत गाणी प्रदर्शित करण्याचं धाडस फार कमी जणी करताना दिसतात
मुंबई-नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणात आता लेखिका अरुणा सबाने यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून महिलांनाही दोषी धरून कारवाई करण्याची मागणी केली आहे. नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या या प्रकरणात अशोक खरात नावाचा व्यक्ती स्वतःला ज्योतिषी म्हणवत महिलांना आपल्या जाळ्यात ओढत असल्याचा आरोप आहे. गोड बोलून, कधी धमकी देऊन तो महिलांना आपल्या कार्यालयात बोलावत असे. तेथे त्यांना पेढा आणि कडवट चवीचे पेय देऊन त्यांच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे. एवढंच नव्हे तर या सर्व घटनांचे चित्रीकरणही केल्याचे तपासात समोर आले आहे.
एका महिलेच्या तक्रारीनंतर 17 मार्च रोजी पोलिसांनी खरातला अटक केली असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडून सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणात लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या अरुणा सबाने यांनी नवा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून, ज्या महिला स्वेच्छेने खरातकडे गेल्या त्यांना ‘पीडित’ न म्हणता दोषी मानून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
डॉ. अरुणा सबाने यांनी पत्रात काय लिहिलं? भोंदूबाबा खरात ने जो पराक्रम गाजवला तो आता बऱ्यापैकी जगासमोर आलेला आहे. अद्यापही जगासमोर न आलेला इतिहास नक्कीच खूप मोठा असेल. तो पोलिसांच्या कस्टडीत आहे. त्याचा कसून तपास सुरू आहे, अशा बातम्या आपण वाचल्या. त्याच्या नादी लागलेल्या स्त्रिया फार मोठ्या प्रमाणात आहेत. त्या सुशिक्षित, श्रीमंत वर्गातल्या, राजकारणातल्या, प्रशासनातल्या, गर्भ श्रीमंत पुरुषांच्या बायका अशा सगळ्या कॅटेगरीतल्या आहेत. अनेक पुरुष त्याच्या ध्यानी लागलेले आहेत. यांना कोणी गळ घालून तिथे नेले किंवा यांच्यावर कोणी बळजबरी केली अशा अवस्थेत त्या कोणत्याच व्हिडिओमध्ये किंवा फोटोमध्ये दिसत नाहीत. याचा अर्थ या स्त्रिया स्वेच्छेने खरातपर्यंत पोचल्या. किंवा खरातने त्यांना भुरळ पाडली आणि त्या तिथपर्यंत पोहोचल्या. सुशिक्षित स्त्रिया सुद्धा या अशा कर्मकांडाला कशा काय भुलू शकतात हे आजच्या तांत्रिक युगामधलं फार मोठं आश्चर्य आहे. मंत्र, जप याच्यापलीकडे जाऊन त्याचे मूत्र पिऊन त्यांच्या आयुष्यात काही बदल घडतो असं या स्त्रियांना वाटणं हे जगातलं नववं आश्चर्य आहे. मुल हे केवळ स्त्री आणि पुरुष संबंधातूनच निर्माण होऊ शकतं .कुठल्याही आशीर्वादातून, राखेतून, गंडे, धागेदोरे यातून होऊच शकत नाही इतकी साधी अक्कल या शिकलेल्या बायांना अजूनही का येत नाही याचे आश्चर्य वाटते. आणि भोंदू बाबा तुमच्याशी शरीर संबंध ठेवून तुम्हाला मूल देऊ इच्छित असेल तर हा प्रसाद नसून सरळ सरळ बलात्कार आहे हे या स्त्रियांच्या का लक्षात येत नाही?
योनीपूजा किंवा योनीला शूचिर्भूत करणे वगैरे हाही एक प्रकार वाचला. स्त्रीची योनी (Vagina) कुणीही शुद्ध वगैरे करू शकत नाही. तिला शुद्ध, स्वच्छ करणे ही आपली स्वतःची जबाबदारी आहे. योनी शुद्धीकरण ही वैज्ञानिक नव्हे, धार्मिक संकल्पना आहे, हे माहिती नसण्याइतपत स्त्रिया मूर्ख असतील तर यांनाही कडक शिक्षा झालीच पाहिजे.
चाकणकरांना कायद्याने शिक्षा व्हायला पाहिजे रूपाली चाकणकर सारखी बाई स्वतः त्या भोंदूच्या अधीन होतेच बरोबर इतरही स्त्रियांना त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य करते. ही बातमी उघड करणाऱ्या पत्रकाराला धमकावते पोलीस यंत्रणेवर दबाव आणण्यासाठी स्वतःच्या महिला आयोग अध्यक्ष पदाचा वापर करते. अशा स्त्रीला तर जास्तीत जास्त कडक शिक्षा व्हायलाच पाहिजे. महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हटवणे ही काही शिक्षा नाही. तिला कायद्याने शिक्षा व्हायला पाहिजे आणि अशा ज्या ज्या स्त्रिया आहेत; ज्या स्त्रिया या सर्व प्रकाराला खतपाणी घालणाऱ्या आहेत यात काही शंका नाही. त्यामुळे खरातला तर फाशीची शिक्षा व्हावीच पण त्यासोबतच त्याच्या नादी लागून समाजामध्ये ही जी गैरसमजाची फार मोठ्या प्रमाणात पेरणी केलेली आहे यांनाही कडक शासन व्हायलाच हवे. खरात काय किंवा चाकणकर काय ही एक प्रवृत्ती आहे. तिला वेळीच ठेचले पाहिजे.
स्त्रिया इतक्या मूर्ख कशा काय असू शकतात? आजच्या काळातल्या स्त्रिया इतक्या मूर्ख कशा काय असू शकतात हे जगातले नववे आश्चर्य आहे. यांना अशा सर्व गोष्टींसाठी जर आपण जबाबदार धरले नाही तर ही वृत्ती वाढत जाणार आहे. या अंधश्रद्धांना कुठेतरी आळा घालणं गरजेचे आहे. या सगळ्या प्रकारात खूप घाणेरडे राजकारण आहे, याची मला जाणीव आहे. तरीही जे समाजाच्या समोर आले ते भयानक आहे. त्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे केवळ खरात तर दोषी आहेच यात काहीही शंका नाही. त्याला तर फाशीचीच शिक्षा व्हायला हवी, आमची मागणी आहे. पण त्याच्या नादी लागणाऱ्या बायाही तेवढ्याच दोषी आहेत हे मी परत परत म्हणेन. म्हणून त्यांनाही कडक शासन व्हायलाच हवे. जेणेकरून यानंतर अशा भोंदू बाबांच्या आहारी स्त्रिया जाताना दहादा विचार करतील. हीही माझी मागणी आहे.
अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणावर घट, विक्रमी मालवाहतूक आणि विशेष गाड्यांच्या संचालनाबद्दल रेल्वे मंत्र्यांनी रेल्वे परिवाराचे केले अभिनंदन
रेल्वे स्थानके ही भारतीय रेल्वेचा चेहरा आहेत;अधिकाऱ्यांनी समर्पित प्रयत्नांनी स्वच्छता सुनिश्चित करावी: अश्विनी वैष्णव
नवी दिल्ली, 3 एप्रिल 2026
केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण, इलेक्ट्रॉनिक्स तसेच माहिती तंत्रज्ञान मंत्री, अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीतील रेल भवन येथे देशभरातील रेल्वे अधिकाऱ्यांची एक आढावा बैठक झाली.
गरीब आणि मध्यमवर्गीयांना चांगल्या प्रवासाचा अनुभव देणे, याला भारतीय रेल्वेचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी अधोरेखित केले. त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना या उद्दिष्टासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले. अश्विनी वैष्णव यांनी गेल्या वर्षीच्या प्रशंसनीय कामगिरीबद्दल संपूर्ण रेल्वे परिवाराचे अभिनंदनही केले. रेल्वे अपघातांमध्ये झालेली ऐतिहासिक घट आणि विक्रमी मालवाहतुकीमुळे देशभरात भारतीय रेल्वेची प्रतिमा लक्षणीय सुधारली आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. सणासुदीच्या काळात मोठ्या संख्येने विशेष गाड्यांच्या प्रभावी संचालनाचेही त्यांनी कौतुक केले. या सेवेमुळे प्रवासाची वाढलेली मागणी पूर्ण करण्यास मदत झाली.
केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी गाड्यांचे वेळेवर संचालन सुनिश्चित करण्याच्या बाबतीत विभागांच्या (झोन्सच्या) कामगिरीचेही कौतुक केले. त्यांनी वक्तशीरपणाचा उच्च स्तर राखणाऱ्या विभागांचे अभिनंदन केले आणि विशेषतः ज्या मार्गावर परिचालनसंबंधी आव्हाने होती, तरीही 85% पेक्षा जास्त वक्तशीरपणा सुनिश्चित करून आपल्या कामगिरीत सुधारणा केली आहे, त्यांचे कौतुक केले.
प्रवाशांच्या अनुभवाचे महत्त्व अधोरेखित करताना, केंद्रीय मंत्री म्हणाले की, रेल्वे स्थानके म्हणजे जनतेसमोर असलेला भारतीय रेल्वेचा चेहरा आहे आणि ती स्वच्छ तसेच सुस्थितीत ठेवली पाहिजेत. त्यांनी अधिकाऱ्यांना सर्व स्थानकांवर स्वच्छता आणि सुधारित प्रवासी सुविधा सुनिश्चित करण्यासाठी पूर्ण समर्पणाने काम करण्याचे आवाहन केले. गेल्या दशकात रेल्वे आधुनिकीकरणासाठी झालेल्या विक्रमी निधी वाटपाचा संदर्भ देवून , त्यांनी यावर जोर दिला की,रेल्वे स्थानकांचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि प्रवासी सुविधा वाढवण्यासाठी अधिकाऱ्यांनी निधीचा पुरेपूर वापर सुनिश्चित केला पाहिजे.
गर्दीच्या काळात, विशेषतः सणासुदीच्या वेळी, गर्दीचे नियोजन अशा प्रकारे केले जावे जेणेकरून प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर पोहोचणे आणि रेल्वेगाडीमध्ये चढणे कोणत्याही अडचणीशिवाय सुलभ होईल,यावर वैष्णव यांनी भर दिला . प्रवासी सुविधा आणि सुलभता सुधारण्यासाठी वाटप केलेल्या निधीच्या वापराला प्राधान्य देण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
विद्यमान रेल्वे प्रकल्पांसाठी प्रलंबित जमीन संपादनाच्या मुद्द्यावरही चर्चा करण्यात आली. ही प्रक्रिया वेगवान करण्याचे आणि आवश्यक असल्यास, तांत्रिक अडथळे दूर करण्यासाठी राज्य महसूल आणि वन विभागाच्या अनुभवी निवृत्त अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
रेल्वे रुळांजवळ राहणाऱ्या लोकांशी संबंधित संवेदनशील मुद्द्यावर बोलताना केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या उपजीविकेवर कोणताही विपरीत परिणाम होऊ नये. अशा प्रकरणांचे निराकरण करताना राज्य सरकारांशी समन्वय साधून मानवी आणि संवेदनशील दृष्टिकोन अवलंबण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली. हा अनेक शहरी भागांतील एक मोठा प्रश्न असून याचे वेळेवर आणि सहानुभूतीपूर्वक निराकरण करणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले.
या बैठकीत रेल्वे अंडरपास बांधण्याबाबतच्या आधीच्या निर्णयाचाही आढावा घेण्यात आला असून जिथे शक्य असेल तिथे, रेल्वे रुळ ओलांडण्यासाठी स्टेशनच्या आवारात आणि बाहेरही, फूट ओव्हरब्रिजऐवजी सोयीस्कर आणि सुलभ अंडरपासला प्राधान्य दिले जावे. अंडरपास हे वापरकर्त्यांसाठी अधिक सोयीचे आहेत आणि लोकांकडून त्यांचा वापर होण्याची शक्यता जास्त आहे, असे त्यांनी नमूद केले. असे अंडरपास बांधण्यासाठी देशाच्या विविध भागात प्रायोगिक प्रकल्प हाती घेण्याचेही निश्चित करण्यात आले. हे अंडरपास केवळ पादचाऱ्यांसाठीच नव्हे तर सायकल, स्कूटर आणि मोटारसायकलच्या वाहतुकीसाठी देखील सुलभ असतील; तसेच काही ठिकाणी मोठ्या संरचनेमुळे ट्रॅक्टर आणि इतर वाहनांची वर्दळही शक्य होईल. शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांच्या गरजांनुसार त्यांची रचना केली जाईल.
अविरत प्रयत्न, कार्यक्षम नियोजन आणि प्रवासी-केंद्रित दृष्टिकोनामुळे भारतीय रेल्वे देशभरातील प्रवाशांसाठी सुरक्षा, दर्जेदार सेवा आणि एकूण प्रवासाचा अनुभव अधिक समृद्ध करत राहील, याचा वैष्णव यांनी पुनरुच्चार केला.
आज पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट) या पदाचा पदभार प्रजित नायर यांनी स्वीकारला. ते २०१७ च्या बॅचचे भाप्रसे अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद, उप विभागीय अधिकारी, जव्हार (पालघर) तसेच जिल्हाधिकारी, गोंदिया या पदांवर कामकाज केलेले आहे. पुण्याच्या विकासाच्या दृष्टीकोनातून नवीन योजना राबविण्यात येतील असे त्यांनी याप्रसंगी सांगितले.
पुणे- महानगरपालिकेच्या ड्रेनेज विभागामार्फत गेल्या चार वर्षांत झालेल्या हजारो कोटी रुपयांच्या खर्चाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी महापौर मंजुषा नागपुरे यांच्याकडे तातडीने नैमित्तिक समिती स्थापन करण्याची मागणी केली आहे.
या संदर्भात महापौरांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रशासक काळात ड्रेनेज विभागाचे वार्षिक बजेट सुमारे साडेसातशे कोटी रुपये होते. त्यामुळे गेल्या चार वर्षांत तब्बल ३००० कोटी रुपयांचा खर्च झाल्याचा अंदाज आहे. याशिवाय, ‘जायका’ प्रकल्पासाठी या वर्षाअखेर ९०० कोटी रुपये खर्च झाले असून, चालू वर्षात इतर कामे कमी करून २८९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
तसेच, राष्ट्रीय पूर नियंत्रण अभियानांतर्गत केंद्र सरकारकडून २८० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. त्यापैकी १२५ कोटी रुपये पूरप्रवण भागांसाठी खर्च करण्याचे निर्देश होते. मात्र, या निधीच्या वापराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. गेल्या चार वर्षांत ड्रेनेज विभागाने साधारण ४२ कोटी रुपये खर्च केल्याचेही निवेदनात नमूद आहे.
मोठ्या प्रकल्पांसाठी सल्लागार नेमून त्यांना मोबदला देण्यात आला, तसेच विविध कामांची बिले काढण्यात आली. मात्र, प्रत्यक्ष कामांच्या गुणवत्तेबाबत शंका उपस्थित होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. विशेषतः, नव्याने समाविष्ट नऊ गावांमध्ये ड्रेनेज व्यवस्थेची दयनीय अवस्था असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
निवेदनात मुंबई महानगरपालिका कायदा कलम ३१ नुसार, महानगरपालिकेला विशेष विषयांच्या चौकशीसाठी नैमित्तिक समिती स्थापन करण्याचा अधिकार असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. या समितीत निवडून आलेले सदस्य तसेच विषयातील तज्ज्ञ अशा व्यक्तींना सहभागी करून सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
लोकनियुक्त प्रतिनिधी नसल्यामुळे प्रशासनाची मनमानी वाढली असून, हजारो कोटींच्या खर्चाची पारदर्शक चौकशी होणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे ड्रेनेज विभागासाठी स्वतंत्र नैमित्तिक समिती स्थापन करून संपूर्ण प्रकरणाची तपासणी करावी, अशी मागणी संबंधित पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी समन्वयाने काम करण्याचा निर्धार
पुणे: पुणे जिल्हा परिषदेतील भाजपा, शिवसेना (एकनाथजी शिंदे), शिवसेना (उबाठा गट) यांच्या नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्यांची संयुक्त बैठक आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत झाली. पुणे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हेच आपले सर्वांचे ध्येय असल्याने जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी समन्वयाने काम करण्याबाबत चर्चा झाली.
या बैठकीला आ. राहुल कुल, आ. शरद सोनावणे, आ. बाबाजी काळे, भाजप प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, जिल्हाध्यक्ष शेखर वढणे, प्रदीप कंद, माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे, माजी आ. संजय जगताप, संग्राम थोपटे यांच्यासह जिल्हा परिषदेचे सर्व नवनियुक्त सदस्य उपस्थित होते.
फेब्रुवारी २०२६ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपचे १०, शिवसेना (शिंदे गट) ४, शिवसेना (उबाठा गट) ६, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शप) १ सदस्य निवडून आले. ह्या सर्व सदस्यांची बैठक आज संपन्न झाली. यावेळी जिल्ह्यातील विविध समस्यांबाबत चर्चा झाली. तसेच, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी समन्वयाने काम करण्याचा
पुणे, दि. 3 – प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (पीएमजेएवाय) व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना (एमजेपीजेएवाय) यांच्या अंमलबजावणीचा विभागीय आढावा आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच सर्किट हाऊस, पुणे येथे घेण्यात आला.
बैठकीस पुणे विभागाचे आरोग्य संचालक डॉ. भगवान पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ येमपल्ले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हनकारे, योजनेचे क्षेत्रीय व्यवस्थापक डॉ. वैभव गायकवाड तसेच पुणे जिल्हा समन्वयक डॉ. प्रीती लोखंडे उपस्थित होत्या.
बैठकीत जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होत आहे का, याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. सर्व शासकीय रुग्णालयांनी अंगीकृत होऊन प्रत्येक पात्र रुग्णावर उपचार योजनेंतर्गतच करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या.
प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी (PHC) योजनेंतर्गत २५ उपचार प्रक्रियांची तरतूद असून, त्या प्रक्रियांमध्ये बसणाऱ्या रुग्णांचे प्री-ऑथोरायझेशन योजनेच्या पोर्टलवरून पाठविल्यास संबंधित पीएचसीला क्लेम मिळणार आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांना निधी उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
योजनेतील २२३ ‘गव्हर्नमेंट रिझर्व्ह्ड’ प्रक्रियांतर्गत उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांनी पात्र रुग्णांचे प्री-ऑथोरायझेशन करणे अनिवार्य असल्याचेही बैठकीत सांगण्यात आले.
पुणे विभागातील सर्व उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालये तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांनी पुढील एका महिन्यात योजनेंतर्गत रुग्णांवर उपचार सुरू करावेत, त्याचा आढावा महिन्यानंतर घेण्यात येईल, असे सांगण्यात आले. योजनेंतर्गत उपचार न करणाऱ्या रुग्णालयांच्या नोडल अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मंत्र्यांनी दिले.
अंगीकृत खासगी रुग्णालयांविषयी तक्रारी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच प्रत्येक जिल्ह्यात किमान १०० किंवा त्याहून अधिक खाटांची रुग्णालये अंगीकृत करण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देशही देण्यात आले.
पुणे विभागातील सर्व शासकीय रुग्णालये पीएमजेएवाय व एमजेपीजेएवाय योजनांची अंमलबजावणी अधिक गतिमान करतील, असा विश्वास आरोग्य संचालक डॉ. भगवान पवार यांनी व्यक्त केला.
पुणे, दि. ०३ एप्रिल २०२६ : आगामी मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने सध्याच्या मतदारांची २००२ च्या मतदार यादीशी पडताळणी (मॅपिंग) करण्यात येत आहे. तसेच मतदारांच्या तपशीलातील (नाव, लिंग, वय, फोटो, पत्ता इ.) आवश्यक दुरुस्त्या करण्याची कार्यवाही सुरू आहे. या कामाचा नियमित आढावा घेण्यासाठी केंद्रस्तरीय अधिकारी व पर्यवेक्षक यांच्या बैठका घेतल्या जात आहेत.
मात्र, कामात कोणतीही प्रगती न करणाऱ्या, हलगर्जीपणा करणाऱ्या तसेच मतदारांना प्रतिसाद न देणाऱ्या २१४ पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघातील यादी भाग क्र. २२८ व २३० येथील मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांविरोधात उपजिल्हाधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी कठोर पावले उचलली आहेत.
त्याअनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध लोकप्रतिनिधित्व अधिनियमांतर्गत बंडगार्डन पोलिस ठाण्यात दि. ०२ एप्रिल २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आगामी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने कॅन्टोन्मेंट मतदारसंघात ४-५ एप्रिलला विशेष शिबिर
आगामी मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने विद्यमान मतदार यादीतील नोंदींची पडताळणी २००२ च्या मतदार यादीशी करण्यात येत आहे. तसेच मतदारांच्या तपशीलांमध्ये (नाव, लिंग, वय, फोटो, पत्ता इ.) आवश्यक दुरुस्त्या करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर २१४ पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवर दि. ०४ एप्रिल २०२६ व ०५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११.०० ते सायं. ५.०० या वेळेत विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.
मतदारांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याशी संपर्क साधून संपर्क साधून आपले मॅपिंग व आवश्यक दुरुस्तीची कामे करून घ्यावीत, असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी, २१४ पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ सिद्धार्थ भंडारे यांनी केले आहे.
पुढारी असतील किंवा अधिकारी ज्यांचा – ज्यांचा या प्रकरणात समावेश असेल, त्या सर्वांवर कारवाई केली जाणार
मुंबई-भोंदू अशोक खरात हे प्रकरण केवळ बलात्कार किंवा फसवणुकीपुरते मर्यादित नाही. या प्रकरणात काही लोकांनी जीव दिल्याचाही प्रकार समोर येत आहे, असा दावा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. त्यांच्या या माहितीमुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अशोक खरातला तब्बल 17 वेळा फोन केल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे राज्यात एकच खळबळ माजली आहे. पत्रकारांनी याविषयी मंत्री संजय शिरसाट यांना छेडले असता त्यांनी थोडी कळ काढा या प्रकरणी सर्व पर्दाफाश होईल असे स्पष्ट केले. ते म्हणाले, भोंदू अशोक खरात प्रकरणाचा तपास पोलिस यंत्रणा करत आहे. एका महिला अधिकाऱ्याने हे सर्व प्रकरण उजेडात आणले आहे. त्याची चौकशी अत्यंत योग्य पद्धतीने सुरू आहे.
हा भोंदू बाबा एका प्रकरणात अडकलेला नाही, तर अनेक प्रकरणांत अडकलेला नाही. बलात्कार व मनी लाँड्रिंगच नाही, तर आणखी काही प्रकरणे पुढे येत आहेत. काही लोकांनी जीव देण्याचेही प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे मी सर्वांना विनंती करत आहे की, त्याला राजकारणाकडे वळण देऊ नका. हे सर्व पाहता आपण खरातला वाचवतो की काय? असे वाटते.संजय शिरसाट म्हणाले, प्रस्तुत प्रकरणात अशोक खरात राहिला बाजूला आणि इतरांवरच आरोप प्रत्यारोप होत आहेत. जे काही चौकशीत समोर येईल, मग तो कोणत्याही पक्षाचा असू द्या, कोणताही नेता असू द्या. सरकार त्याच्यावर कारवाई करेल. त्याची कुणीही चिंता करू नये. सध्या रोज एकच विषय चालू आहे खरात व त्याच्याशी संबंधित असणाऱ्या पुढाऱ्यांचा. पुढारी असतील किंवा अधिकारी ज्यांचा – ज्यांचा या प्रकरणात समावेश असेल, त्या सर्वांवर कारवाई केली जाणार आहे. या प्रकरणात हात असलेल्या लोकांवर 100 टक्के गुन्हा दाखल केला जाईल हे मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे आपण प्रतिक्षा केली पाहिजे.
कशाचे फोन होते, काय होते हे पाहावे लागेल. माझेही फोटो आहेत. याचा अर्थ मी गुन्हेगार असेल तर मी सुद्धा जेलमध्ये गेले पाहिजे. मी कुणालाही स्पेअर करा असे म्हणत नाही. पण खरातने ज्या पद्धतीचे गुन्हे गेलेत, ते महाराष्ट्राच्या इतिसात असे करणारा तो पहिला गुन्हेगार असावा. त्यामुळे त्याच्यावर कडक कारवाई व्हावी ही सर्वसामान्य लोकांसह आमचीही इच्छा आहे. थोडी कळ काढा सर्व पर्दाफाश येईल, असे शिरसाट म्हणाले.
पश्चिम आशियातील बदलत्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि भारतावर होणारा परिणाम कमीत कमी करण्यासाठी सक्रिय उपाययोजना सुचवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या अनौपचारिक आंतर मंत्रालयीन गटाची (आयजीओएम) दुसरी बैठक 2,एप्रिल 2026 रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीतील कर्तव्य भवन-2 येथे पार पडली. या मंत्रिगटाने, बदलत्या परिस्थितीचा आणि त्याचा भारतातील विविध क्षेत्रांवर होणारा प्रतिकूल परिणाम कमी करण्यासाठी सरकारद्वारे उचलल्या जाणाऱ्या पुढील पावलांबाबत विचारविनिमय करण्यात आला.
“अनिश्चित परिस्थिती”च्या पार्श्वभूमीवर, संरक्षण मंत्र्यांनी परिस्थितीवर चोवीस तास लक्ष ठेवण्याचे आणि कोणत्याही संभाव्य परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सुनियोजित प्रतिसाद देण्याच्या गरजेवर भर दिला. देशातील जनतेवर या संघर्षाचा कमीत कमी प्रभाव पडेल हे सुनिश्चित करण्यात कोणतीही कसर सोडू नये, यावर त्यांनी भर दिला.”
बैठकीदरम्यान, सचिवांच्या सात अधिकारप्राप्त गटांनी परिस्थिती हाताळण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती आयजीओएमला दिली. जागतिक व्यापारातील व्यत्ययांमुळे निर्माण झालेल्या समस्या दूर करण्यासाठी, उद्योगाला, विशेषतः उत्पादन क्षेत्राला, दिलासा व मदत देण्यासाठी तसेच गुंतवणूकदारांचा विश्वास वाढवण्यासाठी अर्थ मंत्रालयाने केलेल्या उपाययोजनांची माहिती आयजीओएमला देण्यात आली. यामध्ये खालील बाबींचा समावेश आहे:
01, एप्रिल 2026 रोजी अधिसूचना जारी करण्यात आली, त्यानुसार 40 महत्त्वपूर्ण पेट्रोकेमिकल उत्पादनांवर 30,जून 2026 पर्यंत संपूर्ण सीमा शुल्क सूट लागू करण्यात आली आहे.
विशेष आर्थिक क्षेत्रांमधील (सेझ ) पात्र युनिट्सना देशांतर्गत शुल्क क्षेत्रात (डीटीए ) सवलतीच्या सीमा शुल्क दराने उत्पादित वस्तू विकण्यासाठी एका विशेष एक-वेळच्या सवलतीच्या उपाययोजनेची घोषणा करण्यात आली जी 01,एप्रिल 2026 ते 31,मार्च 2027 पर्यंत लागू राहील.
महसूल विभागाने 31, मार्च 2026 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, 01, एप्रिल 2017 पूर्वी केलेल्या गुंतवणुकीच्या बाबतीत करचुकवेगिरी प्रतिबंधक कायद्याच्या (GAAR) तरतुदी लागू राहणार नाहीत असे स्पष्ट करण्यात आले आहे.
या उपाययोजनांमुळे वस्त्रोद्योग, पॅकेजिंग आणि औषधनिर्माण यांसारख्या क्षेत्रांवरील खर्चाचा दबाव कमी होईल, देशातील पुरवठ्यात स्थिरता येईल आणि भारतात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांना आवश्यक स्पष्टता मिळेल.
राजनाथ सिंह यांनी देशांतर्गत विमान वाहतुकीसाठी एव्हिएशन टर्बाइन इंधनाच्या दरातील मासिक वाढीवर 01, एप्रिल 2026 पासून 25% ची मर्यादा आकारण्याच्या सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले. या निर्णयामुळे लोकांना विमानप्रवास भाड्यांमध्ये होणाऱ्या अचानक वाढीपासून संरक्षण मिळण्यास मदत होईल असे ते म्हणाले.
केंद्र सरकारने देशांतर्गत एलपीजी पुरवठ्याला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. वापरासाठी आवश्यक गरज पूर्णतः भागवण्यासाठी शुद्धीकरण केंद्रांमधील उत्पादनात वाढ करण्यात आली आहे. एलपीजी वितरकांकडे साठा संपल्याचे कोणती नोंद नसल्याचे तसेच घरगुती एलपीजी सिलिंडरचे वितरण सामान्य वेळापत्रकानुसार सुरू असल्याची माहिती आंतर-मंत्रालयीन गटाला (IGoM) दिली गेली. साठेबाजी आणि काळाबाजारामुळे पुरवठ्याबाबत तात्पुरती समस्या निर्माण झाली होती. यामुळेच काही भागात भितीमुळे ताणात येऊन खरेदी करणे सुरू झाले होते याबाबतही त्यांना अवगत केले गेले.
एलपीजीची साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी अंमलबजावणी विषयक कारवाया कठोरपणे केल्या जात आहे, त्यासोबतच अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये छापे टाकले जात असल्याची माहितीही संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना दिली गेली. गैरप्रकार करत असलेल्या काही एलपीजी वितरकांवरही कारवाई करण्यात आली आहे.
स्थलांतरित मजूर आणि कमी वापर असलेल्या कुटुंबांना पाठबळ देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार मुक्त व्यापार तत्वावरील 5 किलोचे एलपीजी सिलिंडर पुरेशा प्रमाणात उपलब्ध असतील याचीही सुनिश्चित करत आहे. 23 मार्च 2026 पासून अशा 4.3 लाख पेक्षा जास्त सिलिंडरची विक्री झाली आहे. ज्या राज्यांमध्ये जास्त मागणी आहे, त्या तिथे विशेषत्वाने लक्ष दिले जात आहे.
व्यावसायिक एलपीजीवर अवलंबून असलेल्या औद्योगिक गरजाही भागवल्या जात आहेत. त्याचबरोबर कार्यान्वयन आणि काममकज सातत्यपूर्णतेने सुरु राहावे याची सुनिश्चिती करण्याकरता, या बाबतीतील संकटपूर्व काळातील पुरवठ्याच्या तुलनेत, 80% पेक्षा जास्त पुरवठा राखला जात असल्याची माहितीही आंतर मंत्रालयीन गटाला दिली गेली. उद्योग जगताची मागणी समजून घेण्यासाठी आणि त्यांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी विविध मंत्रालये आणि संबंधित भागधारकांसोबत विशेष बैठकाही घेतल्या गेल्या आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून देशभरात मोटारवाहनांसाठीच्या एलपीजीचा पुरवठा विना अडथळा सुरू राहील याचीही सुनिश्चिती केली जात जात आहे. मात्र, खाजगी चालकांना त्यांच्या खरेदीप्रक्रियेशी संबंधीत काही समस्या जाणवत असल्याने पुरवठ्याच्या बाबतीत काही मर्यादांनाही सामोरे जावे लागत आहे. याच कारणामुळे सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या मोटार वाहनांसाठीच्या एलपीजी पंपांवर रांगा पाहायला मिळत आहेत. ज्या ठिकाणी ड्युअल फीड (इंधनाचे दोन पर्याय असलेल्या) प्रणालीवर चालणाऱ्या रिक्षा आहेत आणि जर त्या पेट्रोलवर चालू शकत आहेत, तर अशावेळी चालकांनी पेट्रोलचा वापर करावा यासाठी त्यांना प्रोत्साहित केले जात आहे.
भितीमुळे ताणात येऊन नागरिकांनी केलेल्या खरेदीच्या पार्श्वभूमीवर वाढलेली मागणी पूर्ण करण्याकरता दररोजच्या एलपीजी वितरणाच्या संख्येतही लक्षणीय वाढ केली गेली असल्याची माहितीही संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना दिली गेली. यासोबतच ग्राहकांना कोणत्याही प्रकारे तुटवडा भासणार नाही याची ग्वाही संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना दिली गेली. जिथे शक्य असेल त्या ठिकाणी औद्योगिक वापरासाठी पीएनजी हा एक विश्वासार्ह पर्याय असल्याबाबत प्रचार प्रसार केला जात आहे. ज्या क्षेत्रांमध्ये पीएनजीचा वापर आधीपासूनच सुरु आहे, अशा ठिकाणी औद्योगिक वापरासाठी त्याचा पुरवठा होत राहील याची सुनिश्चिती केली जात आहे, त्यासोबतच कामकाज आणि कार्यान्वयही सुरुळीत राखले जात आहे.
काही समाजकंटक समाज माध्यमांवर जाणीवपूर्वक फोटोशॉप केलेले आणि मॉर्फ केलेले फोटो, तसेच दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करून भितीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याबद्दलही आंतर मंत्रालयीन गटाला सांगितले गेले. अशा घडामोडींवर यंत्रणेद्वारे बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांनी कोणत्याही पडताळणी न केलेल्या माहितीवर विश्वास ठेवू नये, अथवा ती प्रसारित करू नये, तसेच योग्य आणि अचूक माहितीसाठी केवळ अधिकृत स्त्रोतांवरच अवलंबून राहावे, अशी सल्लाही जारी केला गेला आहे.
‘प्रकल्प 17-ए’ श्रेणीतील चौथी शक्तिशाली युद्धनौका असलेली ‘आयएनएस तारागिरी’, आज 3 एप्रिल, 2026 रोजी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झाली. आधुनिक युध्दनौकाबांधणी क्षेत्रातील एक उत्कृष्ट नमुना असलेली ही अद्ययावत स्टेल्थ फ्रिगेटचे वजन अंदाजे 6,670 टन आहे. या युद्धनौकेची रचना ‘वॉरशिप डिझाइन ब्युरो’ने केली असून, ‘माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड’ने सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या सहकार्याने तिची बांधणी केली आहे. शत्रूच्या रडारवर सहजपणे दृष्टीस पडू शकणार नाही, अशा (कमी ‘रडार सिग्नेचर’ राखण्यासाठी) अतिप्रगत ‘स्टेल्थ तंत्रज्ञाना’चा वापर या युध्दनौकेच्या बांधणीसाठी करण्यात आला आहे. यामुळे संघर्षप्रवण वातावरणात या युद्धनौकेकडे शत्रूवर वर्चस्व गाजवण्याची क्षमता आहे.
‘तारागिरी’ ची बांधणी करताना 75 टक्क्यांहून अधिक स्वदेशी घटकांचा वापर केला असून, अत्यंत कमी कालावधीत तिची बांधण्यात आली आहे. ‘तारागिरी’ ही युद्धनौका, भारताचे नौकाबांधणी क्षेत्रातील नैपुण्य आणि सार्वजनिक-खाजगी क्षेत्रांमधील भक्कम सहकार्याचे उत्तम उदाहरण आहे. आपल्या भाषणात संरक्षणमंत्र्यांनी ‘आयएनएस तारागिरी’चे वर्णन केवळ एक युद्धनौका म्हणून न करता, भारताची वाढती तांत्रिक क्षमता, आत्मनिर्भरता आणि नौदलाच्या अदम्य सामर्थ्याचे प्रतीक असे केले.
“ही युद्धनौका अत्यंत वेगाने प्रवास करण्यास सक्षम असून, दीर्घकाळापर्यंत समुद्रात तैनात राहू शकते. शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवणे, स्वतःच्या सुरक्षेची खात्री करणे आणि गरज भासल्यास त्वरित प्रत्युत्तर देणे, या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या प्रणालींनी ही युद्धनौका सुसज्ज आहे. यात आधुनिक रडार, सोनार आणि ‘ब्रह्मोस’ सारखी ‘पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी’ क्षेपणास्त्रे यांसारख्या अद्ययावत क्षेपणास्त्र प्रणालींचा समावेश आहे. या सर्व आधुनिक साधनांमुळे ‘तारागिरी’ची क्षमता आणखी वाढली आहे. तीव्र स्वरूपाच्या लढायांपासून ते सागरी सुरक्षा, चाचेगिरीविरोधी मोहिमा, किनारपट्टीवर देखरेख ठेवणे आणि मानवतावादी मोहिमांपर्यंत—प्रत्येक भूमिकेत ही युद्धनौका अगदी चपखलपणे सामावून जावू शकणार आहे, त्यामुळे ‘तारागिरी’ एक अद्वितीय नौदल मंच ठरते,” असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नमूद केले.
सुमारे अकरा हजार किलोमीटरहून अधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभलेल्या आणि तीनही बाजूंनी समुद्राने वेढलेल्या भारताचा विकास, समुद्राला वेगळे ठेवून पाहता येणार नाही; यावर संरक्षणमंत्र्यांनी भर देऊन, पुढे नमूद केले की, देशाचा सुमारे 95 टक्के व्यापार सागरी मार्गांद्वारे चालतो आणि देशाची ऊर्जा सुरक्षा समुद्रावर अवलंबून आहे. यामुळेच एक सामर्थ्यवान आणि सक्षम नौदल उभारणे ही केवळ एक निवड अथवा पर्याय राहिलेले नाही तर, ती एक नितांत आवश्यकता बनली आहे.
बदलत्या सुरक्षा परिस्थितीमध्ये सागरी क्षेत्राला असलेल्या अपार महत्त्वावर प्रकाश टाकताना, राजनाथ सिंह यांनी सांगितले की, जागतिक स्तरावरील अनिश्चिततेच्या काळात भारतीय नौदल संपूर्ण हिंदी महासागर क्षेत्रात अहोरात्र आपली उपस्थिती कायम राखून असते. ” या विशाल महासागरात अनेक संवेदनशील ठिकाणे आहेत. यामध्ये मालाची वाहतूक सुरळीतपणे सुरू राहावी, हे सुनिश्चित करण्यासाठी आमचे नौदल सातत्याने आपली सक्रिय उपस्थिती राखून असते. ज्यावेळी तणाव निर्माण होतो, त्यावेळी व्यापारी जहाजे आणि तेलवाहू टँकर्स यांना सुरक्षेची हमी देण्यासाठी भारतीय नौदल तत्परतेने पुढे सरसावते.”भारताचे नौदल आपल्या राष्ट्रीय हितसंबंधांचे रक्षण करण्यासोबतच, जगभरातील आपले नागरिक आणि व्यापार मार्गांच्या सुरक्षेसाठी गरजेचे असलेले प्रत्येक पाऊल उचलण्यासाठी सज्ज असल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले. नौदलाच्या याच क्षमतेने भारताला एक उत्तरदायी आणि सामर्थ्यवान सागरी शक्ती म्हणून भक्कम स्थान मिळवून दिले असल्याचे ते म्हणाले.
आजच्या आधुनिक डिजिटल युगात जगातील बहुतांश माहितीसाठ्याची देवाणघेवाण ही समुद्राखालील इंटरनेट केबल्सच्या माध्यमातून होत असते. त्यांना कोणतेही नुकसान झाले तर जागतिक व्यवस्थेला बाधा निर्माण होऊ शकते असे ते म्हणाले. त्यामुळेच सागरी सुरक्षेकडे केवळ पारंपारिक दृष्टिकोनातून न पाहता, त्याकडे एक सर्वसमावेशक आणि भविष्यासाठीची सज्जता अशा दृष्टीकोनातून पाहायला हवे असे आवाहन त्यांनी केले. आपण केवळ आपल्या किनारपट्टी प्रदेशांचे रक्षण करण्यापुरते मर्यादित राहून चालणार नाही, तर आपल्या राष्ट्रीय हितसंबंधांशी अविभाज्यपणे जोडले असलेले महत्त्वाचे समुद्री मार्ग, मोक्याची ठिकाणे आणि डिजिटल पायाभूत सुविधांच्या सुरक्षेची सुनिश्चितीही आपण केली पाहिजे असं ते म्हणाले. यासंबंधीच्या सर्व सुरक्षा विषयक प्रयत्नांमध्ये भारतीय नौदल सक्रियपणे सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले. अशा दृष्टिकोनामुळेच आपण भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज होत असतो असे त्यांनी सांगितले. जेव्हा जेव्हा भारत आयएनएस तारागिरी सारखी प्रगत जहाजे तयार करतो आणि तैनात करतो, तेव्हा तेव्हा अशी जहाजे संपूर्ण प्रदेशासाठी शांतता आणि समृद्धीची हमी ठरत असतात ही बाब त्यांनी अधोरेखीत केली.
जेव्हा कोणतेही संकट उद्भवते, तेव्हा नागरिकांच्या सुटकेशी संबंधीत मोहीमा असोत, अथवा मानवतावादी मदत असो, भारतीय नौदल सदैव आघाडीवर असते, ते भारताची मूळ गाभ्याशी जोडलेली मूल्ये आणि अटळ वचनबद्धतेचे प्रतिनिधीत्व करत असते असे ते म्हणाले. आयएनएस तारागिरी आपल्या नौदलाचे सामर्थ्य, मूल्ये आणि वचनबद्धता अधिक वृद्धींगत करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
येत्या काळात स्वदेशी उद्योगाच्या पाठबळावर भारतीय नौदलाला, जगातील सर्वात शक्तिशाली नौदलांपैकी एक म्हणून स्थान मिळवून देण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचे संरक्षणमंत्री म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील संरक्षण उत्पादन क्षेत्र, एखाद्या राष्ट्रीय मोहिमेप्रमाणेच पुढे वाटचाल करते आहे. आज आपण केवळ स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यापुरते मर्यादित राहिलेलो नाही, तर जागतिक पुरवठा साखळीतील आपले स्थानही अधिक भक्कम करू लागलो आहोत असे ते म्हणाले. अशा उत्पादनांचे डिझाईन तयार करण्यापासून ते विकसित करण्यासह, ते प्रत्यक्ष तैनात करण्यापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर भारताचा सहभाग अविभाज्य झाला असल्याचे ते म्हणाले. यातूनच आज भारताकडे स्वतःच्या सुरक्षेसोबतच, तर स्वतःच्या भविष्याचे डिझाईन करण्याची क्षमता असल्याचा आत्मविश्वास मिळतो असे ते म्हणाले. आयएनएस तारागिरी हे याच दूरदृष्टीचे मूर्त रूप आहे, असे ते म्हणाले.
गेल्या दशकभरात देशात घडून आलेल्या परिवर्तनाबद्दलही त्यांनी सांगितले. केंद्र सरकारने युवा वर्ग आणि उद्योग जगतासाठी, सातत्यपूर्णतेने नवोन्मेष, उत्पादन आणि निर्यातीला प्रोत्साहन देणारी परिसंस्था उभी केली असल्याचे त्यांनी सांगितले. सध्याच्या अनिश्चिततेच्या काळात प्रत्येक गोष्टीसाठी सज्ज असावे, याकरता भारताला संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याशिवाय दुसरा पर्याय नाही ही बाब त्यांनी अधोरेखीत केली. सुरक्षेच्या अनुषंगाने होत असलेले प्रयत्न केवळ जमीन, समुद्र आणि हवाई क्षेत्रापुरते मर्यादित असता कामा नयेत , तर त्यासोबतच अंतराळ, सायबर क्षेत्र आणि आर्थिक क्षेत्रांपर्यंत या प्रयत्नांची व्याप्ती विस्तारायला हवी असे ते म्हणाले. याच दृष्टीकोनापासून प्रेरित होऊन केंद्र सरकारने अनेक महत्वाचे धोरणात्मक निर्णय घेतले असून, त्यांचे परिणाम आता दिसून येऊ लागल्याचे त्यांनी नमूद केले.
संरक्षणमंत्र्यांनी भारताची सुरक्षा यंत्रणा बळकट करण्याच्या दिशेने माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड आणि इतर संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या सातत्यपूर्ण सकारात्मक योगदानाचे कौतुक केले. त्यांनी 16 संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना संरक्षणातील आत्मनिर्भरतेची केंद्रे असे संबोधले. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये संरक्षण निर्यात 38,424 कोटी रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर नेल्याबद्दल संरक्षणमंत्र्यांनी सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील प्रयत्नांची प्रशंसा केली. ते म्हणाले की, 13-14 वर्षांपूर्वी आपण 1,200 कोटी रुपयांच्या संरक्षण साहित्याची निर्यात करत होतो. आज त्यात वाढ होऊन ती जवळपास 39,000 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. भारताची आत्मनिर्भरता सातत्याने वाढत असल्याचा हा पुरावा असून आपण आपल्या पायावर उभे राहत आहोत, याचे हे प्रतीक आहे.
याप्रसंगी बोलताना नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांनी राष्ट्रीय सागरी हितसंबंधांचे कधीही, कुठेही आणि कोणत्याही परिस्थितीत संरक्षण करण्यासाठी भारतीय नौदल सदैव युद्धसज्ज, विश्वासार्ह, सुसंगत आणि भविष्यवेधी दल म्हणून राहण्यासाठी वचनबद्ध असल्याचे अधोरेखित केले.
आयएनएस तारागिरी विषयी :
ही युद्धनौका जुन्या संरचनेच्या तुलनेत मोठी झेप असून, तिचे स्वरूप अधिक डौलदार आणि रडार क्रॉस – सेक्शन लक्षणीयरीत्या कमी आहे. यामुळे ही नौका शत्रूच्या नजरेत न येता अत्यंत घातकपणे आणि गुप्तपणे कामगिरी करण्यास सक्षम आहे. 75 टक्क्याहून अधिक स्वदेशी बनावटीचे साहित्य असलेली ही युद्धनौका देशांतर्गत औद्योगिक परिसंस्थेच्या परिपक्वतेचे दर्शन घडवते. यामध्ये 200 हून अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचा समावेश असून, यामुळे सरकारच्या ‘आत्मनिर्भरता’ उपक्रमाला चालना मिळण्यासोबतच हजारो भारतीयांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
या जहाजाची लढाऊ क्षमता जागतिक दर्जाची असून, यामध्ये पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारी सुपरसॉनिक क्षेपणास्त्रे, मध्यम पल्ल्याची पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि प्रगत स्वदेशी पाणबुडीविरोधी यंत्रणेचा समावेश आहे.