Home Blog Page 106

मएसो सीनियर कॉलेजमध्ये ग्रीन क्लब अंतर्गत माती दान उपक्रम 

मएसो सीनियर कॉलेज ग्रीन क्लबच्या आणि पूर्णम इकोव्हिजनच्या सहकार्याने उपक्रम

पुणे: मएसो सीनियर कॉलेजच्या ग्रीन क्लबच्या पुढाकाराने आणि पूर्णम इकोव्हिजनच्या सहकार्याने पुनर्वापर संकल्पनेवर आधारित माती दान उपक्रम  यशस्वीपणे पार पडला. या उपक्रमात परिसरातील नागरिकांनी माती दान करून उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

मातीच्या मूर्तीचे विसर्जन केल्याने जलाशयांमध्ये गाळ निर्माण होतो. शाडू मातीचा पुनर्वापर शक्य असल्याने नागरिकांनी साधी पद्धत अवलंबावी. मूर्तीचे विसर्जन घरी स्वच्छ पाण्यात करावे, तयार झालेला गाळ गोळा करून कोरडा करावा आणि जवळच्या माती संकलन केंद्रात जमा करावा. ही माती नंतर कलाकारांना विनामूल्य उपलब्ध करून दिली जाते, ज्यामुळे पर्यावरण संवर्धनास हातभार लागतो.

मएसो सीनियर कॉलेजचे प्राचार्य डॉ. रवींद्र वैद्य यांनी ग्रीन क्लबच्या या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच विद्यार्थ्यांना या उपक्रमातून मिळालेलं ज्ञान व अनुभव दैनंदिन जीवनातही अंमलात आणण्याचे आवाहन केले. या उपक्रमासाठी कॉलेजच्या प्रा. प्रतिभा पाटील आणि आयएमसीसी कॉलेजच्या प्रा. स्नेहा गवारे यांनी समन्वयक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. ग्रीन क्लबने चालू शैक्षणिक वर्षातही विविध पर्यावरणपूरक उपक्रमांचे नियोजन केले असून, मएसो सीनियर कॉलेजला एक आदर्श पर्यावरणपूरक परिसर बनविण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.

लोककलांचे विकृतीकरण थांबणे आवश्यक : डॉ. सदानंद मोरे

0

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ अभिनेत्री-नृत्यांगना जयमाला काळे-इनामदार यांचा सन्मान

पुणे : कला हे संस्कृतीचे अंग आहे. लोकनाट्य, वगनाट्य, लावणी, चित्रपट अशा सांस्कृतिक क्षेत्रात सर्वच कलाकारांचे मोठे योगदान आहे. ही संस्कृती, कलांचे जतन व्हावे व तिचा अस्सलपणा रसिकांपर्यंत पोहोचावा तसेच लावणी सारख्या लोककलांचे चाललेले विकृतीकरण थांबवावे या करिता प्रयत्न होणे आवश्यक आहेत, असे प्रतिपादन संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक, विचारवंत आणि महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी केले.

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ अभिनेत्री-नृत्यांगना जयमाला काळे-इनामदार यांच्या अभिनय-नृत्य कारकिर्दीस ६५ वर्षे पूर्ण झाल्याप्रित्यर्थ डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्या प्रसंगी डॉ. मोरे बोलत होते. पूना गेस्ट हाऊसचे संचालक डॉ. किशोर सरपोतदार यांची प्रमुख उपस्थिती होती. रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, रंगत संगत प्रतिष्ठान काव्य विभागाच्या कार्याध्यक्ष मैथिली आडकर मंचावर होते. पत्रकार भवन, नवी पेठ येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सन्मापत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.

डॉ. मोरे पुढे म्हणाले, जयमाला इनामदार यांनी एकलव्याच्या भूमिकेतून कलेचे शिक्षण घेत स्वत:चे व्यक्तिमत्व स्वत: घडविलेले आहे. लावणीची व्याप्ती मोठी असल्यामुळेच लावणीत ‘ज्ञानेशाची ओवी, जनीचे अभंगा गाना’  असे शब्दही येतात. लावणी ही फक्त शृंगारापुरती मर्यादित नसून सैनिकांची करमणूक, विरंगुळा म्हणूनही तिचा वापर झाला आहे.

सत्काराला उत्तर देताना जयमाला काळे-इनामदार म्हणाल्या, मला लहानपणापासूनच नृत्याची विशेष आवड होती. मी कोणाकडेही नृत्य न शिकता माझ्यातील कला जोपसत गेले. कलेशिवाय मी जगू शकत नाही. घरातील अडचणींमुळे मी या कलेला व्यवसाय म्हणून स्वीकारले. यातूनच परदेशातही सादरीकरण करण्याची संधी मिळाली. पंडित रविशंकर यांच्यासारख्या जगविख्यात कलाकारांना भेटण्याची संधी मिळाली. याचा विशेष आनंद आहे.

कलेनेच मला मान-मरातब-पैसा मिळवून दिला पण मी कधीच कलेचे हिडीस दर्शन मांडले नाही, असे सांगून जयमाला काळे-इनामदार पुढे म्हणाल्या, सातत्यपूर्ण रियाज, तालमी, कष्ट यात मी कधीच मागे हटले नाही. मंचावर लावणी, वगनाट्य, लोककला सादर करताना त्यातील घरंदाजपणा, शालीनता जपली, प्रेक्षकांच्या नजरेला नजर दिली नाही की कधीही इशारे केले नाहीत. काही ठराविक कलावंतामुळे आजच्या काळात लावणीचा दर्जा घसरला असून लावणी या कलेचा मान कमी झाल्याचे जाणवते, या विषयी त्यांनी खंत व्यक्त केली.  

जयमाला इनामदार यांनी कलेशी-नृत्याशी आपले इमान, प्रामाणिकपणा जपला असल्याचे सांगून किशोर सरपोतदार म्हणाले, जयमालाबाई यांनी नृत्यकलेवर जय मिळविला आहे. कलाकारांचे माहेर घर असणाऱ्या पूना गेस्ट हाऊसचा संचालक म्हणून माझ्या उपस्थितीत जयमालाबाईंचा सन्मान होणे म्हणजे एका माहेरवाशीणीचा सत्कार आहे. रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणे हे समाजापुढे आदर्शवत ठरणारे कार्य आहे.

प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त करताता मान्यवर व्यक्ती आणि रसिक श्रोत्यांमुळे संस्था मोठी होते, असे सांगून ॲड. आडकर म्हणाले, गेली ६५ वर्षे कलेच्या क्षेत्रात योगदान देणाऱ्या जयमाला इनामदार यांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‘लावण्य‌’या विषयावर लावण्यांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. यात जयंत भिडे, डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी, प्रभा सोनवणे, वर्षा कुलकर्णी, मीना शिंदे, रूपाली अवचरे, विजय सातपुते, वासंती वैद्य, मनीषा सराफ, स्वप्नील पोरे, सुजाता पवार यांचा सहभाग होता.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैजयंती आपटे यांनी केले.

श्री रामायण कथेच्या टीझरमध्ये देव शर्मा आणि अंजली अरोरा ने वेधले लक्ष

दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर ‘श्री रामायण कथा’चा बहुप्रतिक्षित टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे, जो प्रेक्षकांना कालातीत महाकाव्याच्या भव्य सिनेमॅटिक पुनर्कथनाची पहिली झलक देतो. देव शर्मा आणि अंजली अरोरा यांच्या प्रमुख भूमिकांसह, शील वर्मा, निर्भय वाधवा आणि रजनीश दुग्गल यांचा समावेश असलेला हा टीझर श्री रामाच्या प्रवासातील भक्ती, शौर्य आणि भावनिक सार टिपतो.

या टीझरमध्ये रामायणातील मुख्य विषयांवर – धर्म, त्याग, भक्ती आणि धैर्य – भर देण्यात आला आहे आणि त्यांना एका ताज्या, आधुनिक चित्रपट शैलीत सादर करण्यात आले आहे. पात्रांमधील भावनिक संबंध, विशेषतः श्री रामाच्या प्रवासाचे चित्रण, टीझरचे हृदय म्हणून उभे आहे.

हा चित्रपट श्री रामांच्या जीवनातील घटना अशा प्रकारे मांडत आहे की ज्या यापूर्वी कधीही पडद्यावर पाहिल्या नव्हत्या.

प्रकाश महोबिया आणि संजय बुंदेला निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक सिंग यांनी केले आहे, ज्यांनी कथा देखील लिहिली आहे. पटकथा आणि संवाद सचिन कुमार सिंग यांनी लिहिले आहेत, तर छायांकन कुणाल व्ही. कदम यांनी केले आहे. संगीत देव आणि आशिष यांनी दिले आहे, गीते जयदेव जोनवाल आणि नंदलाल सिंग यांनी लिहिली आहेत.

देव शर्मा, अंजली अरोरा, शील वर्मा, निर्भय वाधवा आणि रजनीश दुग्गल हे दिग्गज कलाकार या चित्रपटात महाकाव्य पात्रांना ताज्या तीव्रतेने आणि भव्यतेने जिवंत करतात.

टीझर लाँच प्रसंगी बोलताना दिग्दर्शक अभिषेक सिंह म्हणाले की, श्री रामायण कथा ही केवळ रामायणाची पुनरावृत्ती नाही तर एक हृदयस्पर्शी सिनेमॅटिक अनुभव आहे जो भक्ती आणि भव्यतेचे मिश्रण करतो. आम्हाला श्री रामाच्या प्रवासाचे भावनिक सार टिपायचे होते आणि ते दृश्यात्मकदृष्ट्या भव्य पद्धतीने सादर करायचे होते.

निर्माते प्रकाश महोबिया म्हणाले की, हा प्रकल्प आमच्या हृदयाच्या खूप जवळचा आहे. आम्हाला असा चित्रपट बनवायचा होता जो आमच्या परंपरांचा आदर करतो आणि आजच्या प्रेक्षकांशी संवाद साधतो. टीझरला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की हा चित्रपट या डिसेंबरमध्ये प्रदर्शित होईल तेव्हा तो खूप लोकप्रिय होईल.

मुंबई, छत्तीसगड, अयोध्या आणि रामोजी फिल्म सिटीमध्ये चित्रित झालेल्या या चित्रपटाचे चित्रीकरण आधीच पूर्ण झाले आहे आणि आता ते पोस्ट-प्रॉडक्शनमध्ये आहे. फ्लेमिंगो व्हीएफएक्सच्या उच्च-गुणवत्तेच्या व्हीएफएक्स, आफ्टरप्ले स्टुडिओचे प्रभावी ध्वनी डिझाइन आणि पोस्ट मॅन स्टुडिओचे व्हिज्युअल प्रमोशन यांच्या मदतीने, हा चित्रपट प्रेक्षकांना आध्यात्मिक आणि सिनेमॅटिक दृश्ये देण्यासाठी सज्ज आहे.

श्री रामायण कथा डिसेंबर २०२५ मध्ये छत्तीसगढी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

श्री रामायण कथा ही महोबिया फिल्म प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या बॅनरखाली तयार केली जाते आणि संजय बुंदेला सह-निर्माते आहेत.
दसऱ्याच्या दिवशी टीझर लाँच झाल्यामुळे, निर्मात्यांना श्री रामाची कहाणी आजही प्रेरणा देत असलेल्या भक्ती, शक्ती आणि कालातीत मूल्यांची झलक प्रेक्षकांना देण्याची आशा आहे.

टीझर लिंक 👇

राजीव बर्वे लिखित ‘मनातील पत्रे’ या दिलीपराज प्रकाशनच्या ३०००व्या पुस्तकाचे प्रकाशन

पुणे : प्रकाशक आणि विक्रेता यांच्यातील सुंदर नाते दिलीपराज प्रकाशनने जपले आहे. एका ग्रंथविक्रेत्याचा सत्कार होणे ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. ग्रंथविक्री व्यवसायात यश मिळविण्यासाठी विक्रेत्याने वाचकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. आजच्या काळात वाचक नाही, असे सांगितले जाते; परंतु अशी परिस्थिती नाही. युवा पिढीदेखील आज वाचते आहे, फक्त त्यांचे माध्यम बदललेले असू शकते, असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक संजय भास्कर जोशी यांनी केले.

पुण्यातील दिलीपराज प्रकाशनच्या ५४व्या वर्धापनदिनानिमित्त दिलीपराज सुवर्णस्मृती ग्रंथोत्तेजक पुरस्काराने आज (दि. ३) अनिल बुक एजन्सीचे संचालक (नागपूर), ज्येष्ठ ग्रंथ वितरक अनिल टांकसाळे यांचा गौरव करण्यात आला. पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ निरुपणकार उल्हास पवार, ज्येष्ठ पत्रकार प्रवीण टोकेकर आणि ज्येष्ठ समीक्षक संजय भास्कर जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्या वेळी संजय भास्कर जोशी बोलत होते. पुरस्काराचे यंदाचे पाचवे वर्ष असून मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि ११ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते. एस. एम. जोशी सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष आणि दिलीपराज प्रकाशनचे संचालक राजीव बर्वे लिखित ‘मनातील पत्रे’ या दिलीपराज प्रकाशनच्या गौरवशाली ३०००व्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. दिलीपराज प्रकाशनचे संचालक मधुर बर्वे मंचावर होते.

लेखकाइतकीच वाचकांची प्रतिभा महत्त्वाची वाटते असे आवर्जून नमूद करून संजय भास्कर जोशी म्हणाले, राजीव बर्वे यांच्या पुस्तकातून त्यांनी न पाठविलेली पत्रे हा हाताळलेला वाङ्‌मयीन प्रकार अतिशय सुंदर आणि प्रभावशाली आहे.

‘दिलीपराज’ची पुस्तके मराठी भाषेला सकस करणारी : प्रवीण टोकेकर..

प्रवीण टोकेकर म्हणाले, अनिल टांकसाळे हे भाषासंस्कार करणारे लोभस व्यक्तिमत्त्व आहे. ‘मनातील पत्रे’ या पुस्तकाविषयी बोलताना टोकेकर म्हणाले, ही पत्रे एखाद्या दृश्याप्रमाणे उलगडत जातात. या पत्रांमधून लेखकाच्या पारदर्शक मनाचे सर्जनशील दर्शन घडते. दिलीपराज प्रकाशनतर्फे प्रकाशित पुस्तके मराठी भाषेला सकस करणारी आहेत. तंत्रज्ञान बदलले तरी शब्द हे एकमेव माध्यम आहे जे बोलेल आणि लिहिले जाईल. दिलीपराज प्रकाशनतर्फे पुढील काळात तंत्रज्ञानात होणारे बदल स्वीकारून कार्य घडावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

पुस्तकविक्री चळवळ म्हणूनच स्वीकारली : अनिल टांकसाळे..

सत्काराला उत्तर देताना अनिल टांकसाळे म्हणाले, मराठी वाचकाला काय हवे जाणून घेण्यासाठी मी सातत्याने ग्रंथप्रदर्शने भरवत गेलो. यातूनच पुस्तकांचे दुकान थाटले आणि व्यवसाय वाढत गेला. आजच्या सन्मानाने पुस्तकविक्रेता उपेक्षित नाही हा भाव निर्माण झाला आहे. पुस्तक विक्रीचा व्यवसाय आज संक्रमण काळातून जात आहे, तंत्रज्ञानाच्या विकासामुळे वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी खूप परिश्रम करावे लागत आहेत. आज नवे लेखक, नवे साहित्य निर्माण होत आहे, परंतु वाचक सिमित झाला आहे. पुस्तकविक्री हा व्यवसाय न समजता ती चळवळ म्हणूनच स्वीकारली आहे.

‘मनातील पत्रे’तून उत्तम मनसंवाद : उल्हास पवार..

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना उल्हास पवार म्हणाले, आजच्या काळात कुटंबव्यवस्थेची वीण उसवत चालेली असताना ‘मनातील पत्रे’ या पुस्तकातील पत्रांचे महत्त्व आहे. अनेकांच्या मनातील कल्लोळ व्यक्त होत नाही परंतु राजीव बर्वे यांनी आपल्या लेखणीतून तो उत्तम प्रकारे मांडला आहे. या पत्रांमधून सप्रेम मनसंवाद व्यक्त होत असून यातील कल्पनाशक्ती, सुंदर वर्णने अंतर्मुख करणारी आहेत. विज्ञान युगामुळे पत्र लिखाण मागे पडले आहे अशा काळात कृत्रिमता नाहीशी होण्यासाठी या पत्रांचा नक्कीच उपयोग होईल. या पुस्तकातून साहित्याला वेगळा आयाम मिळाला आहे.

‘मनातील पत्रे’ : मनातील भावनांचा उद्रेक : राजीव बर्वे..

लेखनाविषयी मनेगत व्यक्त करताना राजीव बर्वे म्हणाले, पत्र लेखनाचे बाळकडू मला वडिलांकडून मिळाले आहे. मनातील भावभावना कुठल्यातरी प्रकारे बाहेर याव्यात या करिता मी लिहिता झालो. पत्र रूपाने लिखाण करण्याचे माध्यम मला आवडल्याने मनातील भावनांचा उद्रेक या पुस्तकातून वाचकांसमोर आला आहे.

स्वागतपर प्रास्ताविक मधुर बर्वे यांनी केले. मान्यवरांचे स्वागत मधुर बर्वे, मधुमिता बर्वे यांनी केले. अंजली टांकसाळे यांचाही या वेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल दामले यांनी केले.

गौतमी पाटीलच्या गाडीकडून रिक्षाचालकाला धडक प्रकरण:दोषींवर कठोर कारवाई करा

ना. चंद्रकांतदादा पाटील यांचे डीसीपी संभाजी पाटील यांना निर्देश

पुणे : नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कारमुळे झालेल्या अपघात प्रकरणी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आक्रमक झाले असून, सदर प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करावी अशा सूचना ना. पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या.

नृत्यांगना गौतमी पाटीलच्या वाहनाने 30 सप्टेंबर रोजी एका रिक्षाला वडगाव पुलाजवळ मागूनजोरदार धडक दिली. त्यामध्ये रिक्षाचालक मरगळे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सदर प्रकरणी आज मरगळे कुटुंबियांनी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित जनता दरबारात भेट घेऊन; मदतीची मागणी केली. त्यावर ना. पाटील यांनी डीसीपी संभाजी पाटील यांना दूरध्वनीवरुन संपर्क साधून दोषींवर कठोर कारवाई करा, असे निर्देश दिले.

पुणे नवरात्राै महोत्सवाची हजोरांच्या उपस्थित सांगता.

पुणे-नवरात्रात सलग १० दिवस दर्जेदार संगीत राजनींचे आयोजन करून हजारो संगीत प्रेमींना आनंद देणाऱ्या ३१ व्या पुणे नवरात्राै महोत्सवाची विजयादशमीच्या संध्येला सुप्रसिद्ध गायक किशोर कुमार यांच्या गाण्यांची संगीतरजनी कार्यक्रमाने हजारोंच्या उपस्थित सांगता झाली. सुरवातीला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुणे नवरात्र महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल, गायक जितेंद्र भुरुक, गायिका रुपाली आनंद,प्रिशीता पांडे यांनी पूजन करून आदरांजली वाहिली. यावेळी प्रेक्षकांनी सभागृह तुडुंब भरले होते.

“सपनोकी राणी”..”जिंदगी एक सफर”…”मेरे सामनेवली खिडकी में एक चांद का तुकडा रहता है” अशी असंख्य गाणी गाऊन ‘सोलफुल किशोर कुमार’ या कार्यक्रमाची जल्लोषात सुरवात गायक जितेंद्र भुरुक यांनी केली. जितेंद्र आणि गायिका रुपाली यांनी एकत्रित गात श्रोत्यांना जुन्या काळातील आठवणीत नेले

यावेळी गायकांना वादक रशीद शेख, अमन सय्यद ( की बोर्ड),सचिन वाघमारे (बासरी), मुकेश देढिया (गिटार), बाबा खान ( सॅक्सिफोन), कांचन निंबाळकर ( बास गिटार), नंदू डेव्हिड (रिदम मशीन), सोमनाथ फाटक ( तुंबा), अभिषेक भुरुक (ड्रम), स्वरन्वय ( कोरस ) यांनी आपले कौशल्य सादर करत कार्यक्रमात रंगत आणली.

पुणे नवरात्राै महोत्सव पार पडण्यासाठी अनेकांनी सहकार्य केले त्यामुळे कार्यक्रम यशस्वी होऊ शकला असल्याने विविध हितचिंतक यांचे आभार यावेळी महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल यांनी मानले.

भारतरत्न डाॅ.भूपेन हजारिका यांच्या स्मृत्तीस मानवंदना

आदल्या दिवशी लाेकप्रिय गायक, गीतकार, संगीतकार, वादक असे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले डाॅ.भूपेन हजारिका यांना देशातील सर्वाेच्च पुरस्कार भारतरत्न, संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त झाला हाेता. त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त ३१ व्या पुणे नवरात्राै महाेत्सवात त्यांचे प्रतिमेचे पूजन, पुणे नवरात्राै महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल आणि गायक अभिषेक सराफ, गायिका तन्वी दाते आणि गायिका अवंतीका धुमणे, निवेदक आर.जे.बंडया यांच्या हस्ते करून आदरांजली वाहण्यात आली. भूपेन हजारिका यांचे प्रसिध्द ‘दिल हुम हुम करे..’ हे गाणे गायक अभिषेक सराफ यांनी गात त्यांच्या आठवणी पुनर्जागृत करण्यात आल्या.
स्वारगेट येथील गणेश कलाक्रिडा रंगमंदिर येथे याअनुषंगाने ‘हदयात वाजे स्मथिंग’ या विशेष कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले. यावेळी निर्माते व गायक अभिषेक सराफ, गायिका तन्वी दाते आणि गायिका अवंतीका धुमणे यांनी बहारदार राेमाँटिक गाणी सादर केली. प्रसिध्द निवेदक आर.जे.बंडया याने विविध अनुभवांचे किस्से सांगत कार्यक्रमात रंगत वाढवली.

‘चुरा लिया है तुमने जाे दिलकाे…’ हे गाणे गायिका अवंतिका हिने सुरेल आवाजात गात कार्यक्रमाची जाेरदार सुरुवात केली. त्यानंतर गायिका तन्वी हिने गायलेले ‘सैय्या..’ गाणे तर गायक अभिषेकचे ‘मितवा..’ गाणे ऐकून रसिकांनी टाळयांचा कडकडाट केला. जीव रंगला..तेरे मेरे मिलने की..गुलाबी आँखें..अशी एकामागाेमाग एक प्रसिध्द गाण्यांचे गायनामुळे कार्यक्रम रंगत गेला.

यावेळी गायकांना विविध गाण्यांना आवश्यकतेनुसार अभिजीत भदे (ड्रम), ओमकार इंगवले (ऑक्टाेपॅड व ढाेलक), अजय थाेरात (गिटार), शंतनु जहागिरदार (की-बाेर्ड), भारत ढाेरे (की-बाेर्ड), मंगेश जाेशी (तबला आणि बाँगाे) या वादकांनी विविध वाद्य साधनांचा वापर करुन सुरेख साथ देत आपले कौशल्य दाखवून दिले.

आंतरराष्ट्रीय खेळाडू श्रुतिका सरोदे आणि विशेष दिव्यांग विद्यार्थी आर्या भालेराव यांचा खास सन्मान मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आला.

याप्रसंगी पुणे नवरात्राै महिला महाेत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल, घनश्याम सावंत ,उद्योगपती दिलीपराव ढमाले, रमेश भंडारी, नंदकुमार बानगुडे, विशाल कोंढाळकर, संजय काळोखे, विलास आवटे, निर्मला जगताप,अमित बागुल, नुपूर बागुल, प्राजक्ता ढवळे, प्रांजल गांधी, वृषाली बागुल, हर्षदा बागुल, सागर बागुल उपस्थित होते.

पुण्यात11 वर्षीय मुलगा खेळता खेळता लिफ्टमध्ये अडकला, वेळेवर मदत न मिळाल्याने मृत्यू

पुणे-पुण्यातील पिंपरी-चिंचवड भागातील चोवीसवाडी येथे एका 11 वर्षीय चिमुकल्याचा लिफ्टमध्ये अडकून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अमेय फडतरे असे या मुलाचे नाव होते. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून लिफ्टमध्ये काही दोष आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या प्रकरणाची अधिकची माहिती अशी की, अमेय हा लिफ्टसोबत खळत होता. जिन्याने वर जायचा आणि खाली येताना लिफ्टने यायचा. काही वेळ हा खेळ सुरू राहिला. मात्र, खेळत असतानाच लिफ्टच्या मधल्या जागेत अमेय अडकला. यात तो गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत बराच वेळ त्याने मदतीसाठी आरडा-ओरड केली. मात्र, वेळेवर मदतीला कोणीच आले नाही. अमेय हा लिफ्टमध्ये अडकला आहे हे बराच वेळ कोणाच्याच लक्षात आले नाही.

काही वेळाने अमेय हा लिफ्टमध्ये अडकला असल्याचे लक्षात येताच याची माहिती तातडीने अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी अमेयला लिफ्टमधून बाहेर काढले व लगेच नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच अमेयचा मृत्यू झाला. या घटनेमुळे फडतरे कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. तसेच अमेयला वेळेवर मदत मिळाली असती तर त्याचा जीव वाचू शकला असता अशी माहिती अग्निशमनच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

दरम्यान, लिफ्टमध्ये अडकून मृत्यू झाल्याचे अनेक घटना वारंवार समोर येत असतात. यावर आळा घालणे महत्त्वाचे झाले आहे. यासाठी आपण लिफ्टचे मेंटेनन्स वेळोवेळी केले पाहिजे. तसेच लहान मुलांना एकट्याने लिफ्टमध्ये जण्यापासून रोखावे. तसेच मोठी सोसायटी असल्यास एक व्यक्ती लिफ्टची ने-आण करण्यासाठी नेमण्यात यावा.

अस्वस्थ जगाला विश्वात्मक म. गांधींच्या तत्वाची गरज-डॉ.श्रीपाल सबनीस

एमआयटी डब्ल्यूपीयूत राष्ट्रपिता म.गांधी व भारतरत्न लालबहाद्दूर शास्त्री जयंती साजरी

पुणे ३ ऑक्टोबरः “ राष्ट्रपिता म. गांधी यांच्या आंदोलनात हिंसा नसल्याने संपूर्ण विश्वाने त्यांना सामावलेले आहे. परंतू वर्तमान काळात डोनाल्ड ट्रम्प, पुतीन, किंग जोन आणि चिनचे जिनपींग हे  सर्व हिटलरच्या भूमिकेतच आहेत. यांच्यामुळे विभाजीत झालेल्या जगात ‘जगा आणि जगू दया’ अशा घोषणा ऐकू येत आहेत. इस्त्रायल-पॅलेस्टाईन यांच्यातील युध्द व अमानुषता ही युनोच्या साक्षीनेच होत आहेत कारण असाह्य युनोच्या पायात बेड्या घालण्यात आल्या आहेत. त्यामुळे विश्वात्मक म. गांधी यांच्या विश्वशांतीच्या तत्वांची गरज भासत आहे.” असे विचार ८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व थोर विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
 मानवतेचे पूजारी राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी व माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाच्या वतीने ‘स्मरण महामानवांचे’ या अभिवादन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळ व ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत उल्हासदादा पवार हे अध्यक्षस्थानी होते. माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते.
तसेच माईर्स एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टिटयूशन्सच्या सह व्यवस्थापकीय विश्वस्त आणि कार्यकारी संचालक डॉ. सुचित्रा कराड-नागरे, सौ. ललिता सबनीस, माईर्सचे कुलसचिव डॉ. रत्नदीप जोशी, प्रसिद्ध गप्पाष्टक कार डॉ. संजय उपाध्ये, डब्ल्यूपीयूचे सीएओ डॉ. प्रसाद खांडेकर, एडीटी विद्यापीठाचा कुलसचिव डॉ. महेश चोपडे व डॉ. महेश थोरवे उपस्थित होते.
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले,“ पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा बाहेर देशात गेल्यावर भगवान गौतम बुद्ध आणि म. गांधी यांच्या नावांचा उल्लेख करतात. परंतू देशात म. गांधी यांच्या नावाने गलिच्छ राजकारण चालले आहे. लोकशाहीत स्वातंत्र्य जरी असले तरी या देशात मारेकरी हे देशभक्त ठरत आहेत ही सर्वात मोठी शोकांतीका आहे.”
 “सत्याचे सातत्य टिकविणारे म. गांधी हे वंचितांसाठी सेवा व समर्पण, द्वेष आणि हिंसेला उत्तर देणारे, प्रेम आणि बंधुता, साध्य व साधन मधील विवेक बाळगणारे आणि हिंसेला अहिंसेने उत्तर देणार होते.”
डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ सत्य, अहिंसा आणि शांती हेच खरे मानवत जीवनाचे तत्व आहे. सर्व धर्म ग्रंथ हेच जीवन ग्रंथ आहेत हे म. गांधींनी ओळखून सतत शांतीच्या दिशेने वाटचाल करीत होते. संपूर्ण जगात भारताची ओळख गौतम बुद्ध आणि म. गांधी यांच्या नावाने ओळखले जाते. आज संपूर्ण जगात वाढत जाणार्‍या अशांत आणि हिंसेला उत्तर म्हणजे म. गांधी यांनी दिलेला शांतीचा संदेश आहे.”
डॉ. उल्हास पवार म्हणाले,“ संयम आणि अहंकार यावर नियंत्रण ठेवले तर म. गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री या दोघांची जयंती खर्‍या अर्थाने साजरी केली असे म्हणू शकतो. कस्तूरबा गांधी यांनी अफ्रिकेत म. गांधी यांना असहकाराचा पहिला धडा दिला. तसेच मानवता, समता व नैतिकता या तीन पायांवर संघर्ष उभा राहण्याचे तत्व न्या. रानडे यांनी म. गांधी यांना दिले. त्याच प्रमाणे लाल बहाद्दूर शास्त्री यांचे साधेपण आणि आचरण या तत्वाचे पालन ही संपूर्ण देशाने केले. अहंकारातून हिंसा आणि शत्रू निर्माण होतात त्यामुळे अहंकार सोडण्याचे तत्व या दोघांनी संपूर्ण मानवजातीला दिले आहे.”
डॉ. सुचित्रा कराड नागरे म्हणाल्या,“या वर्षी नैसर्गिक आपत्ती पाहता शेतकरी व जवानांसाठी  पुन्हा जय जवान, जय किसान नारा देण्याची वेळ आली आहे. शांती हीच खरी ताकद असून भारत एकमेव देश असेल जो संपूर्ण जगाला शांतीचा मार्ग दाखवेल.”
विद्यार्थी आयशी बासू, दिप्ती मिश्रा, निष्ठा मांडलिया, दिव्या थोरवे, कोमल नेवसे, खुशबू अवस्थी, शैलजा इनामदार यांनी आपल्या भाषणातून म.गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांनी सत्य, अहिंसा, शांती आणि मानवकल्याणासाठी केलेल्या कार्यावर विस्तृत विवेचन केले.
डॉ. रत्नदीप जोशी यांनी स्वागत पर भाषण केले.
डॉ. मिलिंद पात्रे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. महेश थोरवे यांनी आभार मानले.

सिंधुदुर्ग -शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बुडाले

सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग -शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बुडाले आहेत. यापैकी तिघांचे मृतदेह हाती लागले असून, अन्य पाच जणांचा शोध सुरू आहे. सर्व पर्यटक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे.

शिरोडा वेळागर येथे पर्यटनासाठी आलेल्या एकूण आठ पर्यटकांपैकी आठ जण समुद्रात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेत तात्काळ मदतकार्यानंतर तीन जणांना समुद्रातून बाहेर काढण्यात यश आले असून, त्यांना उपचारासाठी शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, या दुर्घटनेतील तीन जणांचे मृतदेहही सापडले आहेत. बुडालेल्या उर्वरित पर्यटकांचा शोध घेण्याची प्रक्रिया घटनास्थळी सुरु आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हे पर्यटक कुडाळ आणि बेळगाव येथील असल्याची शक्यता आहे.

प्रगल्भ लोकशाहीसाठी बंधुतेचा विचार महत्वपूर्ण-चंद्रकांत दळवी

सांगोलेकर लिखित ‘विश्वबंधुतेची प्रकाशवाट’ पुस्तकाचे प्रकाशन

पुणे: “स्वातंत्र्य आणि समतेला बंधुतेची जोड नसेल, तर लोकशाहीचे स्वरूप अपूर्ण राहते. समाजातील तणाव, दुभंगलेली मने आणि विषमता दूर सार्याची असेल, तर बंधुतेचा विचार जनमानसात रुजणे अत्यंत महत्वाचे आहे. कारण बंधुता ही केवळ एक सामाजिक मूल्य नसून, प्रगल्भ लोकशाहीचा प्राण आहे,” असे मत रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन व माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी व्यक्त केले.

महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनानिमित्त ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अविनाश सांगोलेकर लिखित आणि बंधुता प्रकाशन प्रकाशित ‘विश्वबंधुतेची प्रकाशवाट’ या पुस्तकाचे प्रकाशन चंद्रकांत दळवी यांचे हस्ते झाले. रयत शिक्षण संस्थेच्या औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात झालेल्या प्रकाशन  सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजनिष्ठ उद्योजक कृष्णकुमार गोयल होते. प्रसंगी बंधुताचार्य प्रकाश रोकडे, मंदाकिनी रोकडे, स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, प्रा. चंद्रकांत वानखेडे, प्रा. शंकर आथरे, संगीता झिंजुरके, दत्तात्रय गायकवाड, डॉ. प्रभंजन चव्हाण आदी उपस्थित होते.

चंद्रकांत दळवी म्हणाले, “बंधुता चळवळीचा हा प्रवास ५१ वर्षांचा आहे. विविध साहित्य संमेलने, काव्य महोत्सव, बंधुता पुरस्कारांतून बंधुतेचे मूल्य खोलवर रुजवण्याचा रोकडे यांचा प्रयत्न स्तुत्य आहे. समाजाला एकसंध ठेवण्यासाठी आवश्यक बंधुता विचार व्यापक करण्याचा हा प्रवास यापुढेही चालू राहावा.”

कृष्णकुमार गोयल म्हणाले, “विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत. ध्येयासक्तीने ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी परिश्रम घ्यावेत. आपल्यातील सुप्त गुण ओळखून करिअर घडवण्यासाठी कठोर मेहनत, जिद्द, प्रामाणिकपणा अंगीकारावा. परस्परांचा सन्मान, बंधुभाव जोपासून एकमेकांच्या साथीने राष्ट्राच्या विकासात योगदान द्यावे.

बंधुताचार्य प्रकाश रोकडे म्हणाले, “महामानवांच्या मूल्यविचारांचे बळ, प्रज्ञावंताची दृष्टी, विचारवंतांचे विचार, धनवंतांचे धन आणि सहकारी कार्यकर्त्यांची कृतिशील साथ हे बंधुता चळवळीच्या यशाचे गमक आहे. ही चळवळ अधिक व्यापक होण्यासाठी सर्वानी मिळून प्रयत्न करावेत.”

डॉ. अविनाश सांगोलेकर म्हणाले, “बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी पाच दशकांहून अधिक काळ बंधुता, राष्ट्रबंधुता आणि विश्वबंधुता या तीन टप्प्यांवर केलेल्या यशदायी आणि प्रेरणादायी कार्याचे दस्तावेजीकरण म्हणजे हे पुस्तक आहे.”

महात्मा गांधी, माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. महात्मा गांधी आणि रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

डॉ. अरुण आंधळे यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. संगीता झिंजुरके यांनी सूत्रसंचालन केले. मंदाकिनी रोकडे यांनी आभार मानले.

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ‘आली मोठी शहाणी’ची घोषणा

हृता दुर्गुळे- सारंग साठ्ये पहिल्यांदाच झळकणार एकत्र

मराठी चित्रपटसृष्टीत सतत नवनवीन प्रयोग होत आहेत. दमदार कथा, हटके विषय आणि फ्रेश जोड्या यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता कायमच वाढत असते. याच पार्श्वभूमीवर दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर एका खास चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. ‘आली मोठी शहाणी’ या चित्रपटातून प्रेक्षकांना एक आगळीवेगळी ऑनस्क्रीन जोडी पाहायला मिळणार आहे. नोव्हेंबरमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होणार असून या चित्रपटात पहिल्यांदाच हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये एकत्र झळकणार आहेत. त्यांच्या ताज्या केमिस्ट्रीकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ या चित्रपटातून सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांची जोडी प्रेक्षकांसमोर घेऊन येणारे दिग्दर्शक आनंद दिलीप गोखले यावेळी या नव्या जोडीला घेऊन येत आहेत.

दिग्दर्शक आनंद दिलीप गोखले म्हणाले, “लवकरच प्रेक्षकांसाठी एक मनोरंजक चित्रपट घेऊन येत आहोत. या चित्रपटाची कथा लवकरच समोर येईल, इतकं नक्की की, हृता आणि सारंग यांच्या जोडीला प्रेक्षक भरभरून प्रेम देतील, याची मला खात्री आहे.”

फाईन ब्रू प्रॉडक्शन्स प्रस्तुत व ट्रू होप फिल्म वर्क्स यांच्या सहयोगाने प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन आनंद दिलीप गोखले यांनी केले असून ईशा मूठे, श्रुती साठे व जयकुमार मुनोत हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.

स्वामी रामानंद तीर्थ यांच्या कार्याला समर्पित राहून समाजासाठी काम करणे हेच आमचे कर्तव्य : डॉ नीलम गोऱ्हे

मुंबई, दि. ३ ऑक्टोबर २०२५ :
थोर स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या १२२ व्या जयंतीनिमित्त विधान भवन, मुंबई येथे आज शुक्रवार, दि. ३ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष मा. राहुल नार्वेकर व महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती मा. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले . या वेळी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या सचिव (२) श्रीमती मेघना तळेकर, सचिव (४) श्री. शिवदर्शन साठये, उप सचिव श्री. विजय कोमटवार तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना विधानपरिषदेच्या उपसभापती मा. डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “स्वामी रामानंद तीर्थ यांनी मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक व शैक्षणिक सुधारणा घडवून आणण्यासाठी मोलाचे योगदान दिले. मराठवाडा मुक्ती संग्रामात त्यांचा सिंहाचा वाटा होता. स्वातंत्र्य संग्राम, मराठवाडा मुक्ती संग्राम आणि शिक्षण चळवळीच्या माध्यमातून त्यांनी दिलेले योगदान अमूल्य आहे. आजही मराठवाड्यातील गावागावांमध्ये त्यांचे विचार जिवंत आहेत आणि त्यातून समाजकार्याला दिशा मिळते. विधानमंडळामार्फत आम्ही त्यांच्या कार्याला समर्पित राहून समाजासाठी काम करणे हेच आमचे कर्तव्य आहे.”

कार्यक्रमास उपस्थित सर्वांनी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या कार्याचे स्मरण केले व त्यांच्या प्रेरणादायी कार्याचा आदर्श घेण्याचा संकल्प व्यक्त केला.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी काँग्रेसचे राज्यभर आंदोलन.

ओला दुष्काळ जाहीर करा, नुकसानग्रस्तांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत तातडीने द्या.

मुंबई, दि. ३ ऑक्टोबर २०२५

अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असतानाही भाजपा महायुतीचे सरकार फक्त घोषणाबाजी करत असून शेतकऱ्यांना अद्याप कसलीच मदत मिळालेली नाही. सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी ५० हजार रुपये द्यावेत, सरसकट कर्ज माफ करावे, वीज बिलाची थकबाकी माफ करावी आणि खरवडून गेलेल्या शेत जमिनीला अतिरिक्त नुकसान भरपाई द्यावी, या मागण्यांसाठी काँग्रेस पक्षाने आज राज्यभर तीव्र आंदोलन केले.

छत्रपती संभाजीनगर जिल्हा व शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले. यावेळी खासदार डॉ कल्याण काळे, जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, शहराध्यक्ष शेख युसूफ, माजी आमदार नामदेवराव पवार, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे यांच्यासह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.
चंद्रपूरच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी वरोरा येथे भव्य चक्काजाम आंदोलन करण्यात आले. नागपूर-चंद्रपूर महामार्गावर झालेल्या या आंदोलनाला हजारो शेतकरी बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत हजेरी लावली. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करण्याची आणि कापूस उत्पादकांना प्रति हेक्टर १ लाख रुपयांची तर सोयाबीन उत्पादकांना प्रति हेक्टर २.५ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याची ठाम भूमिका आंदोलनातून मांडण्यात आली. यावेळी चंद्रपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश तिवारी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर ग्रामीण, जालना, लातूर, वर्धा, रत्नागिरी सह राज्यातील इतर जिल्ह्यात व तालुकास्तरावरही आंदोलन करून शेतकरी विरोधी भाजपा महायुती सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या व प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची नागपुरात ४ व ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा.

काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते कार्याशाळेचे उद्घाटन, विजय वडेट्टीवार व डॉ. नितीन राऊत यांचेही मार्गदर्शनपर संबोधन.

मुंबई, दि. ३ ऑक्टोबर २०२५

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने महानगरपालिका क्षेत्रातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसाठी दोन दिवसांची कार्यशाळा आयोजित केली आहे. नागपूरमध्ये होणाऱ्या या कार्यशाळेचे उद्घाटन काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ करणार आहेत. दिनांक ४ ऑक्टोबरला सकाळी १० वाजता उद्घाटन होणार असून संविधानाला अभिप्रेत विकेंद्रित लोकशाही व महानगरपालिकांमधील राजकारण, या विषयावर प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मार्गदर्शनपर संबोधन करतील.

शहरी प्रश्न, सक्रियता आणि राजकारण, या विषयावर विवेक वेलणकर मार्गदर्शन करतील तर सत्र संचलन संग्राम खोपडे करतील. आजचे बदलते शहरी राजकारण आणि आपण, या विषयावर आशितोष शिर्के, राजू भिसे, संग्राम खोपडे हे सत्र संचालन करतील. घरपट्ट्यांची चळवळ या विषयावर संवाद व शहरांकरता भविष्यातील कार्यक्रम या मुद्द्यांवर चर्चा होईल. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव प्रफुल्ल गुडदे पाटील आणि नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे हे स्वागत करणार आहेत तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी करणार आहेत.

कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार व माजी मंत्री डॉ. नितीन राऊत मार्गदर्शन करणार आहेत. शहरातील सांस्कृतिक राजकारण, शहरी नॅरेटीव व लोकसंवादातून लोकचळवळ या मुदद्यांचाही यावेळी उहापोह केला जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने दिली आहे..

महापालिका आयोजित ‌‘जागर अभिजात मराठीचा‌’ कार्यक्रमाचे उद्घाटन

पुणे : मोठ्या शहरांमध्ये मराठी भाषेची गळचेपी होताना दिसत आहे. सर्व स्तरातील बहुतांश विद्यार्थी इंग्रजी माध्यमात शिकत आहेत. हे चित्र बदलण्यासाठी महापालिकेच्या मराठी शाळांमध्ये उत्तम शिक्षण द्यावे, योग्य पद्धतीने कला-क्रीडा आणि साहित्याला प्रोत्साहन देणारे वातावरण निर्माण व्हावे, प्रत्येक शाळा आदर्श शाळा बनविण्यासाठी प्रयत्नशील रहावे, ज्या योगे इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांचा प्रभाव कमी होईल, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, राज्याच्या मराठी भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले. वाचनसंस्कृती निर्माण होण्यासाठी शाळांमध्ये ग्रंथालये निर्माण करून तेथे उत्तम ग्रंथसंपदा उपलब्ध करून द्यावी, अशी सूचनाही त्यांनी केली.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पुणे महानगरपालिका, सांस्कृतिक केंद्र आणि शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‌‘जागर अभिजात मराठीचा‌’ हा गाणी, गोष्टी, प्रवचन, कविसंमेलन आणि अभिवाचन यांचा संगम असलेल्या एक दिवसीय विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमाचे उद्घाटन आज (दि. 3) लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. बालगंधर्व रंगमंदिर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

बालसाहित्य अकादमी पुरस्कार विजेते ल. म. कडू, डॉ. संगीता बर्वे, राजीव तांबे तसेच महापालिका अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, उपायुक्त किशोरी शिंदे, बालगंधर्व रंगमंदिराचे व्यवस्थापक आणि महापालिका सांस्कृतिक विभाग प्रमुख राजेश कामठे, संवाद पुणेचे अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे संयोजक सुनील महाजन, माजी नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, कामगार विभाग आयुक्त नितीन केंजळे, उपायुक्त वसुंधरा बारवे, प्रशासकीय अधिकारी सुनंदा वाखारे, आशा उबाळे मंचावर होते. रोपट्यास जलार्पण करून आणि फलकावर मराठी भाषेत स्वाक्षरी करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

भाविष्यात मराठी भाषा प्रवाहित होण्यासाठी महापालिकेच्या स्तरावर काय उपाययोजना करणे अपेक्षित आहे या विषयी लक्ष्मीकांत देशमुख पुढे म्हणाले, महापालिकेच्या शाळांमधील प्रत्येक शिक्षकाने विद्यार्थ्यांना मराठी भाषा लिहिणे, बोलणे व वाचण्यासाठी प्रोत्साहित करावे. मुलांच्या अंगातील कला-क्रीडा गुण ओळखून त्यांना मार्गदर्शन करावे आणि या करिता शासनाच्या शिक्षण, सांस्कृतिक व क्रीडा विभागाने एकत्रितपणे प्रयत्न करावेत. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, वाचन हे निरंतर शिक्षण असते, त्यामुळे भरपूर वाचा, वाचनाची गोडी लावून घ्या आणि जे वाचाल ते तुमच्या भाषेमध्ये सारांश रूपात लिहित रहा. कविता वाचा, गुणगुणा आणि हसतखेळत अभ्यास करा.

ओमप्रकाश दिवटे म्हणाले, मराठी भाषा टिकविण्यासाठी तसेच भाषेचे आदान प्रदन व्हावे या करिता विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ल. म. कडू म्हणाले, आपण जे पाहतो ते आपल्या शब्दात मांडत, गंमत जंमत अनुभवत शब्दचित्र कागदावर उमटविण्याचा प्रयत्न करा.

‌‘भाषेमुळे आपण घडतो, भाषेला आपण घडवितो‌’ ही कविता विद्यार्थ्यांकडून सामूहिकरित्या गाऊन घेत डॉ. संगीत बर्वे म्हणाल्या, प्रत्येकाने मराठी वाचायला, बोलायला आणि लिहायला प्रयत्न करून प्रोत्साहित करणे आवश्यक आहे.

गोष्टीतून मुलांशी संवाद साधत राजीव तांबे म्हणाले, भाषा जेव्हा मुलांकडून मोठ्या व्यक्ती शिकतात आणि मुले मोठ्यांकडून शिकतात म्हणजेच भाषेचे आदानप्रदान होते तेव्हाच भाषा अभिजात होते.

स्वागतपर प्रास्ताविकात किशोरी शिंदे म्हणाल्या, महानगरपालिकेचा अमृत महोत्सव आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त सांस्कृतिक व शिक्षण विभाग एकत्र येऊन हा उपक्रम करीत आहे. मराठी भाषेची मुळे खोलवर रुजलेली आहेत. या कार्यक्रमातून शालेय विद्यार्थ्यांपर्यंत मराठी भाषा प्रवाहित होण्यास मदत होईल.

वसुंधरा बारवे यांनी शुभेच्छा संदेश दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रत्ना दहिवेलकर यांनी केले तर आभार आशा उबाळे यांनी मानले.