बासरीचे स्वर्गीय स्वर, मोहिनी अट्टमची मोहिनी आणि सुश्राव्य गायनातून रसिक आनंदले
एसएनबीपी आयोजित ‘स्वरयज्ञ’ संगीत महोत्सव
पुणे : पद्मविभूषण हरिप्रसाद चौरासिया यांच्या बासरीच्या स्वर्गीय स्वरवर्षाव, मोहिनीअट्टम नृत्याची मोहिनी तर बनारसी घराण्याचे सुश्राव्य गायनाने ‘स्वरयज्ञ’ सांगीतिक मैफल रंगली. पूर्व पुण्यातील यंदाचा महोत्सव सांगीतिक पर्वणी ठरला आहे.
एसएनबीपी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि एस. ई. सोसायटी या येरवडा परिसरातील प्रतिष्ठीत शैक्षणिक संस्थेतर्फे ‘स्वरयज्ञ’ संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. गेली अनेक दशके ज्यांच्या बासरीच्या सुरांनी रसिकांना स्वर्गीय आनंद दिला आहे, अशा जगविख्यात बासरी वादक पद्विभूषण पंडित हरिप्रसाद चौरासिया यांच्या बासरी वादनाची मैफल ही या ‘स्वरयज्ञा’चा कळसाध्याय ठरली.
सुरुवातीस प्रसिद्ध समाजसेवक पद्श्री गिरिश प्रभुणे, एसएनबीपी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूच्या अध्यक्ष डॉ. वृषली भोसले, संचालिका देवयानी भोसले, ॲड. ऋतुजा भोसले, पंडित अरविंदकुमार आझाद, डॉ. रिटा देव, तुषार केळकर, प्रिन्सिपल रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन झाले.
कार्यक्रमाची सुरुवात त्रिवेंद्रम (केरळ) येथील नाट्यविध महाविद्यालयाच्या कलाकारांनी मोहिनीअट्टम नृत्याविष्कारातून गणेश वंदना सादर केली. त्यानंतर आदिशक्तीच शाश्वत स्त्रोत दर्शविणारी नृत्यप्रस्तुती करण्यात आली. सुकुमार भगवान श्रीकृष्ण आणि गोपिकांच्या शृंगाराचे दर्शन घडविणारे नृत्य सादरीकरण रसिकांना विशेष भावले. नृत्यप्रस्तुतीची सांगता करताना ऋतुचक्राचे महत्त्व अधोरेखीत करत आजच्या काळात निसर्गाचा होत असलेला ऱ्हास त्यातून निर्माण झालेले पर्यावरणारचे प्रश्न या विषयी प्रभावी सादरीकरण करण्यात आले. लास्य आणि भावांचे सुंदर मिश्रण असणाऱ्या या नृत्याविष्कारात पद्मा, रश्मी, चित्रा, उमा, नवमी यांचा सहभाग होता.
दुसऱ्या सत्रात बनारस घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका डॉ. रिटा देव यांचे सुमधुर गायन झाले. त्यांनी राग बिहाग मधील खयाल सादर करताना ‘परि हो पिया’ ही बंदिश सादर केली. द्रुत लयीत ‘झनन झनन मोरि बाजे पायलिया’ ही पारंपरिक रचना बहारदारपणे सादर केली. मिश्र खमाजमधील ‘का रे मतवारी मन हर ली ना शाम, मद के भरे तोरे नैना’ ही श्रीकृष्णाच्या डोळ्यांचे समर्पक वर्णन करणारी ठुमरी ऐकवून डॉ. रिटा देव यांनी आपल्या गायनाची भुरळ रसिकांच्या मनावर अच्छादिली. त्यांना पांडुरंग पवार (तबला), तुषार केळकर (संवादिनी) यांनी सुरेल साथसंगत केली.
स्वरयज्ञाची सांगता होत असताना स्वरमंचावर पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरासिया यांचे आगमन झाले तेव्हा श्रोत्यांमधील प्रत्येक व्यक्तीने आदराने उभे राहून त्यांना टाळ्यांच्या गजरात मानवंदना दिली. पंडित हरिप्रसाद चौरासिया यांनी मारू बिहाग रागतील आलाप, झपताल आणि तीन तालात निबद्ध रचना ऐकवून रसिकांना संमोहित केले. त्यांच्या बासरीचे सुर रसिकांच्या मनात रेंगाळत राहिले आणि या मैफलीची सांगताच होऊ नये असे भाव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उमटले म्हणूनच खास रसिकांच्या आग्रहावरून पंडित चौरासिया यांनी ‘ॐ जय जगदिश हरे’ या भजनाची धून रसिकांना ऐकविली. त्याला रसिकांनी टाळ्यांच्या गजरात साथ दिली. पंडित अरविंदकुमार आझाद यांनी तबल्यावर समर्पक साथसंगत केली. ‘स्वरयज्ञाना’ला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
पद्श्री गिरिश प्रभुणे म्हणाले, इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना या महोत्सवाच्या माध्यमातून रागदारीवर आधारित उत्तम भारतीय शास्त्रीय संगीत अनुभवायला मिळते आहे ही समाधानाची गोष्ट आहे. या स्वरयज्ञानाच्या माध्यमातून संस्कृतीची पाळेमुळे रूजण्यास मदत होईल.
कलाकारांचा सत्कार डॉ. वृषली भोसले, देवयानी भोसले, डॉ. ॲड. ऋतुजा भोसले, रश्मी शुक्ला यांनी केला.
पूर्व पुणे भागातील रसिकांसाठी ‘स्वरयज्ञ’ ठरली सांगीतिक पर्वणी
ढोले पाटील जूनियर कॉलेजच्या गौरी गरुड हिला शालेय जिल्हा स्तर ज्युदो स्पर्धेत द्वितीय क्रमांक
पुणे : ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय चेअरमन मा. सागर जी ढोले पाटील सर यांच्या मार्गदर्शनाने प्रेरणा घेऊन महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
पुणे महानगरपालिका शिक्षण विभाग व जिल्हा क्रीडा परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय जिल्हा स्तर ज्युदो स्पर्धा (सन २०२५-२६) बालेवाडी,पुणे येथे पार पडली. या स्पर्धेत ढोले पाटील जूनियर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, खराडी, पुणे येथील विद्यार्थीनी कु. गौरी गरुड हिने उत्तम कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला.
या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य
प्रा .विठ्ठल गायकवाड सर, विभाग प्रमुख व सर्व अध्यापकांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
जागतिक पातळीवर सांस्कृतिक राष्ट्रकुलाचा विचार व्हावा : विनय सहस्रबुद्धे
‘पार्थसूत्र’ आणि ‘बो ॲण्ड बियाँड’ पुस्तकांचे प्रकाशन
पुणे : आपल्या संस्कृतिक संचिताचा अविभाज्य आणि अनमोल ठेवा असलेल्या रामायण आणि महाभारताच्या प्रवाभाखाली जगाच्या पाठीवरील खूप मोठी लोकसंख्या आहे. सध्याच्या काळातील संघर्षाची परिस्थिती बघता जगातील सगळ्या घटनांकडे सांस्कृतिकदृष्टीकोनातून बघण्यासाठी सांस्कृतिक राष्ट्रकुलाचा विचार झाला पाहिजे, अशी अपेक्षा माजी खासदार विनय सहस्रबुद्ध यांनी व्यक्त केली.
दिलीपराज प्रकाशन प्रकाशित, वैभव केळकर व डॉ. मेघना दलाल लिखित पार्थसूत्र आणि बो ॲण्ड बियाँड या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, कर्वेनगर येथे आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी विनय सहस्रबुद्धे बोलत होते. खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. पर्सिस्टंटचे संस्थापक आनंद देशपांडे, प्रकाशक मधुर बर्वे उपस्थित होते.
महाभारतातील अर्जुन ही व्यक्तिरेखा केंद्रस्थानी ठेवून ‘पार्थसूत्र’ या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. लेखनाची प्रभावीपणे केलेली मांडणी हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल, असे नमूद करून विनय सहस्रबुद्धे पुढे म्हणाले, ललित पद्धतीने पुस्तकाचे लिखाण करण्यात आले असल्याने वेगळेपणा जाणवतो.
प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, रामायण-महाभारत हे आपल्या संस्कृतीचा ठेवा आहेत. आपल्या आयुष्यात अर्जुनावस्था येते तेव्हा मनातील वैचारिक धागे कृष्ण बनून मार्गदर्शन करीत असतात. अर्जुन आणि श्रीकृष्णाच्या नात्यात खूप वेगळेपण आहे. अर्जुनाने प्रश्न विचारले पण श्रीकृष्णाने उत्तर देणे सोडले नाही. संवाद न तुटणे हे दोघांच्या नात्यातील वैशिष्ट्य आहे.
पुस्तक लेखनाविषयी बोलताना मेघना दलाल म्हणाल्या, अर्जुन आणि त्या भोवतीचे महाभारत असे लिखाणाचे कथासूत्र आहे. आजच्या काळाशी अन्वयार्थ लावत केलेले लिखाण म्हणजे हे पुस्तक होय. नायक म्हणून अर्जुनाची निवड का केली याविषयी वैभव केळकर यांनी मनोगत व्यक्त केले.
छायाचित्रकार मंगेश पवार यांचे निधन
पुणे श्रमिक पत्रकार संघाचे माजी सदस्य आणि छायाचित्रकार मंगेश विलास पवार (वय 40) यांचे रविवारी पहाटे पुण्यात आकस्मिक निधन झाले. पवार यांच्यावर रविवारी रात्री ता. माढा, जि. सोलापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि भाऊ असा परिवार आहे. पुण्यातील विविध वृतपत्रे आणि वृत्तवाहिन्यांमध्ये छायाचित्रकार आणि कॅमेरामन म्हणून त्यांनी काम पाहिले.
ब्राह्मण जागृती सेवा संघातर्फे एकनाथ शिंदेंना समाजस्नेह पुरस्कार
पुणे : ब्राह्मण जागृती सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्ताने देण्यात येणारा ‘समाजस्नेह पुरस्कार’ राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना जाहीर करण्यात आला आहे. दत्त संप्रदायातील महत्त्वाचे क्षेत्र असणाऱ्या कर्नाटकातील श्री माणिकप्रभू संस्थानचे पीठाधीश ज्ञानराज माणिकप्रभू महाराज यांच्या हस्ते पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात रविवारी (ता. १२) सायंकाळी सहा वाजता हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ‘या पुरस्कारासोबतच समाजभूषण, युवा गौरव पुरस्काराचे वितरण देखील याप्रसंगी होणार आहे.
‘‘समर्थ रामदास स्वामींचे भक्त असणाऱ्या शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री असताना आणि आता उपमुख्यमंत्री पदावर करत असलेले कार्य कौतुकास्पद आहे. सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारे ते नेते आहेत. त्यांच्या या कार्याचा गौरव ब्राह्मण समाजातर्फे व्हावा, अशी पुरस्कार निवड समितीची मनापासून इच्छा आहे. शिंदेंच्या या सन्मानामुळे समाजातील एकोपा अधिक वाढण्यास मदत होईल’’ असे मत संस्थेचे कार्याध्यक्ष पं. अतुलशास्त्री भगरे यांनी व्यक्त केले.
याआधी हा पुरस्कार उज्वल निकम, शेषराव मोरे, भरतकुमार राऊत, देशाचे माहिती आयुक्त उदय माहूरकर आदी मान्यवरांना देण्यात आला आहे. कार्यक्रमास जास्तीतजास्त समाजबांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक अंकित काणे यांनी केले आहे.
महिलांना पाठिंबा आणि सन्मान देणे गरजेचे
राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे मत : श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबागतर्फे ‘नारी तू नारायणी’ या पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन
पुणे : नवरात्रीत देवीने असुर शक्तीशी लढा दिला तेव्हा सर्व देवतांनी तिला आपापले शस्त्र दिले आणि लढ्यात पाठिंबा दिला. लढा संपल्यानंतर तिच्या उग्र रूपाला शांत करण्यासाठी भगवान शंकर तिच्या पायाखाली आले. या कथेतून हे स्पष्ट होते की देवी ही सर्व शक्तींची मूळ आहे आणि तिच्या पायाखाली भगवान शंकर येणे हे शक्ती, भक्ती आणि सन्मान याचे प्रतीक आहे. त्याचप्रमाणे, आज अहंकार बाजूला ठेवून महिलांना पाठिंबा देण्याची आणि त्यांचा सन्मान करण्याची गरज आहे, असे मत राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केले.
सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिराच्या वतीने नारी तू नारायणी या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यंदाचा पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्या मीरा बडवे, सिस्टर ल्युसी कुरियन आणि पूजा मिसाळ यांना प्रदान करण्यात आला. यावेळी खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त भरत अग्रवाल, डॉ.तृप्ती अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर आदी उपस्थित होते.
खासदार डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, पूर्वी महिलांचे कर्तृत्व अनेक अडथळ्यांमुळे मर्यादित होते, पण आज स्त्री प्रत्येक क्षेत्रात आपली क्षमता सिद्ध करत आहे. आज महिला पैसे कमवायला शिकल्या आहेत, पण ते कसे वापरायचे हे शिकणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आजही अनेक महिलांचे सर्व आर्थिक व्यवहार त्यांच्या घरातील पुरुष पाहतात. महिलांनी केवळ आर्थिकदृष्ट्या सक्षम न होता, आर्थिक व्यवहारात स्वावलंबी झाले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
पुरस्कार स्वीकारताना ल्युसी कुरियन म्हणाल्या, जेव्हा मला पुरस्कार मिळतो, तेव्हा मी परमेश्वराला विचारते की मी या योग्यतेची आहे का? ही गोष्ट मला प्रेरणा देते आणि मी आणखी मेहनत करते. आज माझं वय ७० आहे, तरीही मी पुढे काम करत राहणार आहे.
मीरा बडवे म्हणाल्या, माझ्या प्रत्येक मुली वेगवेगळ्या क्षेत्रात सक्षमपणे काम करत आहेत. मग त्यांना अनाथ किंवा अंध का म्हणावे? त्यांची प्रगती बघून मला आणखी काम करण्याची प्रेरणा मिळते. पूजा मिसाळ म्हणाल्या, आज पुरस्कार मिळाल्यावर वाटतं की आपण योग्य मार्गावर आहोत. आज ज्यांना पुरस्कार मिळाले आणि ज्यांनी ते पुरस्कार दिले, त्या दोघीही समाजातील इतरांसाठी काम करत आहेत. अशा व्यक्तींची प्रेरणा घेवून पुढे आणखी काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.
मंदिराचे संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अॅड. प्रताप परदेशी, डॉ. तृप्ती अग्रवाल, भरत अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, नारायण काबरा, निलेश लद्दड, मुरली चौधरी, राजेश सांकला आदींनी उत्सवाचे आयोजन केले होते.
राज्यातील 247 नगरपरिषदा आणि 147 नगर पंचायतींच्यानगराध्यक्ष पदांची आरक्षण सोडत जाहीर
मुंबई, दि. 6 : राज्यातील 247 नगरपरिषदा आणि 147 नगर पंचायतींच्या नगराध्यक्ष पदांची आरक्षण सोडत नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी नगर विकास विभागांचे अपर मुख्य सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, उपसचिव प्रियांका कुलकर्णी, छापवाले, उपसचिव विद्या हम्पय्या, अनिरुद्ध जेवळीकर, यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
राज्यातील 247 नगरपरिषदेपैकी 33 पदे अनुसूचित जातींसाठी व 11 पदे अनुसूचित जमातीसाठी आणि 67 पदे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाली आहेत. तर 136 पदे खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत.
नगरपरिषद आरक्षण पुढील प्रमाणे :-
नगर परिषदांमधील अनुसूचित जातीसाठी आरक्षित पदे (एकूण 33 पदे)
• अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित नगरपरिषद (17 पदे)-
- देऊळगाव राजा, 2. मोहोळ, 3. तेल्हारा, 4. ओझर, 5. वाना डोंगरी (नागपूर), 6. भुसावळ, 7. घुग्घुस, 8. चिमूर, 9. शिर्डी, 10. सावदा, 11. मैंदर्गी, 12. डिगडोह(देवी), 13. दिग्रस (यवतमाळ), 14. अकलूज, 15. परतूर, 16. बीड, 17. शिरोळ
• अनुसूचित जाती प्रवर्गासाठी (सर्वसाधारण) आरक्षित नगरपरिषद (16 पदे) - पांचगणी, 2. हुपरी, 3. कळमेश्वर, 4. फुरसुंगी ऊरुळी-देवाची, 5. शेगांव, 6. लोणावळा, 7. बुटीबोरी, 8. आरमोरी, 9. मलकापूर, जि.सातारा, 10. नागभिड, 11. चांदवड, 12. अंजनगांवसूर्जी, 13. आर्णी, 14. सेलू, 15. गडहिंग्लज, 16. जळगांव-जामोद,
अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी आरक्षित नगर परिषदा :-
अनुसुचित जमातीसाठी एकूण 11 पदांपैकी 6 पदे महिलांसाठी आरक्षित आहेत.
• अनुसुचित जमाती महिलांसाठी आरक्षित (6 पदे) - पिंपळनेर, 2. शेंदूरजनाघाट, 3. भडगांव, 4. यवतमाळ, 5. उमरी, 6. वणी
• अनुसुचित जमाती सर्वसाधारण प्रवर्ग (5 पदे) - पिंपळगांव-बसवंत, 2. राहुरी, 3. एरंडोल, 4. अमळनेर, 5. वरुड
नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी नगर परिषदा :-
एकूण 247 नगरपरिषदांमधून 67 पदे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित ठेवण्यात आली आहेत.
• नागरिकांचा मागास प्रवर्गातील (सर्वसाधारण) आरक्षित पदे (33 पदे)
- तिरोडा, 2. वाशिम, 3. भद्रावती, 4. परांडा, 5. नंदुरबार, 6. खापा, 7. शहादा, 8. नवापूर, 9.त्र्यंबक, 10. कोपरगांव, 11. मंगरुळपीर, 12. कन्हान-पिंपरी, 13. पाथर्डी, 14. रामटेक, 15, नशिराबाद, 16.पालघर, 17. वरणगांव, 18. मलकापूर, जि.बुलडाणा, 19. इस्लामपूर, 20. मोहपा, 21. तुमसर, 22. महाड, 23. राहता, 24. श्रीवर्धन, 25. ब्रम्हपूरी, 26. दर्यापूर, 27. वैजापूर, 28. गोंदिया, 29. सांगोला, 30. वर्धा, 31. येवला, 32. कंधार, 33. शिरपूर-वरवाडे.
• नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलांसाठी राखीव पदे (34 पदे) - धामणगांव रेल्वे, 2. भोकरदन, 3. भगूर , 4. मालवण , 5. वरोरा , 6. हिंगोली , 7. मोर्शी , 8. उमरेड , 9. हिवरखेड , 10. बाळापूर , 11. शिरुर , 12. कुळगांव-बदलापूर , 13. देगलूर , 14. नेर-नबाबपूर , 15. धाराशिव , 16. इगतपूरी , 17. माजलगांव , 18. मुल , 19. बल्लारपूर , 20. जुन्नर , 21. कुर्डूवाडी , 22. औसा , 23. मुरुड-जंजिरा , 24. अकोट , 25. विटा , 26. चोपडा , 27. सटाणा , 28. काटोल , 29. दौंड , 30. रोहा , 31. देसाईगंज , 32. पुलगांव , 33. कर्जत, जि.रायगड , 34. दोंडाईचा-वरवाडे.
खुल्या प्रवर्गातील नगर परिषदांचे आरक्षित
एकूण 247 पैकी 136 पदे ही खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असून यापैकी 68 पदे ही महिलांसाठी राखीव आहेत.
खुला प्रवर्ग (सर्वसाधारण)
1 फलटण, 2 अहमदपूर, 3 पाथरी, 4 चाळीसगांव, 5 तळोदा, 6 वाई, 7 नांदगांव, 8 जयसिंगपूर, 9 निलंगा, 10 लोहा, 11 खोपोली, 12 राजगुरूनगर
13 कराड, 14 जेजुरी, 15 उमरगा, 16 आळंदी, 17 पुसद, 18 बारामती
19 जत, 20. पारोळा, 21 तळेगांव-दाभाडे, 22 सासवड, 23 गडचांदुर, 24 रिसोड, 25 वेंगुर्ला, 26 पातूर, 27 किल्लेधारुर, 28 चिखली, 29 मेहकर, 30 दारव्हा, 31 सिल्लोड, 32 सिन्नर, 33 देवळी, 34 मुरूम, 35 वडगांव, 36 महाबळेश्वर, 37 आष्टा, 38 दुधणी, 39 कुंडलवाडी, 40 खुलताबाद, 41 नरखेड, 42 राजूरा, 43 सिंदखेडराजा, 44 वाडी, 45 डहाणू, 46 देवळाली-प्रवरा, 47 कामठी, 48 अक्कलकोट, 49 सातारा, 50 भोर, 51 इंदापूर, 52 चिपळून, 53 माथेरान, 54 श्रीगोंदा, 55 श्रीरामपूर, 56 मनमाड, 57 नळदुर्ग, 58 भोकर, 59 बिलोली, 60 अंबेजोगाई, 61 जिंतूर, 62 सोनपेठ, 63 गंगापूर, 64 पांढरकवडा, 65 घाटंजी, 66 मुर्तीजापूर, 67 चिखलदरा, 68 तुळजापूर.
खुला प्रवर्गाताली महिलांसाठी नगरपरिषदा - परळी-वैजनाथ, 2. मुखेड, 3. अंबरनाथ, 4. अचलपूर ,5. मुदखेड 6. पवणी 7. कन्नड , 8. मलकापूर, जि.कोल्हापूर , 9. मोवाड , 10. पंढरपूर , 11. खामगांव , 12. गंगाखेड , 13. धरणगांव , 14. बार्शी , 15. अंबड , 16. गेवराई , 17. म्हसवड , 18. गडचिरोली , 19. भंडारा , 20. उरण , 21. बुलडाणा , 22. पैठण , 23. कारंजा , 24. नांदुरा , 25. सावनेर , 26. मंगळवेढा , 27. कळमनूरी , 28. आर्वी , 29. किनवट , 30. कागल , 31. संगमनेर , 32 मुरगुड , 33 साकोली , 34 कुरुदंवाड , 35 पुर्णा , 36 कळंब , 37 चांदुररेल्वे , 38 चांदुरबाजार , 39 भुम , 40 रत्नागिरी , 41 रहिमतपूर , 42 खेड , 43 करमाळा , 44 वसमत, 45 हिंगणघाट , 46 रावेर , 47 जामनेर , 48 पलुस , 49 यावल , 50 सावंतवाडी , 51 जव्हार, 52 तासगांव , 53 राजापूर , 54 सिंधीरेल्वे , 55 जामखेड , 56 चाकण , 57 शेवगांव, 58 लोणार, 59 हदगांव, 60 पन्हाळा, 61 धर्माबाद, 62 उमरखेड, 63 मानवत, 64 पाचोरा , 65 पेण , 66 फैजपूर , 67 उदगीर, 68 अलीबाग.
नगर पंचायतीचे आरक्षण
राज्यातील 147 नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण आज काढण्यात आले. यामध्ये अनुसूचित जातीसाठी एकूण 18 जागा आरक्षित असून यामध्ये महिलांसाठी 9 व सर्वसाधारण साठी 9 पदे आरक्षित आहेत. तर अनुसूचित जमातीसाठी 13 जागा असून त्यामध्ये 7 जागा महिलांसाठी व 6 जागा सर्वसाधारण गटासाठी आहेत. तर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी एकूण 40 पदे आरक्षित असून त्यामध्ये 20 जागा महिलांसाठी व 20 जागा सर्वसाधारण गटासाठी आहेत. खुल्या प्रवर्गासाठी एकूण 76 जागा असून 38 जागा महिलांसाठी व 38 जागा या सर्वसाधारण गटासाठी आरक्षित आहेत.
अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी राखीव :-
महिलांसाठी आरक्षित नगरपंचायती (9 पदे)
1 .निलडोह, 2. गोधनी(रेल्वे), 3. कोरची, 4. बहादुरा , 5. धानोरा, 6. गौंडपिंपरी, 7. ढाणकी , 8. अहेरी , 9. बेसा-पिपळा अनुसूचित जाती प्रवर्ग (सर्वसाधारण)
येरखेडा, कांद्री (कन्हान), भिसी, कुरखेडा, देवरी, माळेगांव(ब्रु.), बिडगांव-तरोडी (खुर्द)-पांढुर्णा, भातकुली, दहीवडी.
अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी राखीव:-
महिलांसाठी आरक्षित नगर पंचायती (7 पदे)
भिवापूर, अर्जुनी-मोरगांव, सिरोंचा , हिंगणा, समुद्रपूर, पाली, देवळा.
अनुसूचित जमाती (सर्वसाधारण) (6 पदे)
कोरपणा, कळंब, माणगांव, गोरेगांव, सेलू , सिंदेवाही
नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी राखीव (40 पदे) :-
• सर्वसाधारण गटासाठी आरक्षित (20 पदे)
पारनेर, तळा, खानापूर, पालम, मंठा, कोंढाळी, माळशिरस , एटापल्ली, झरी-जामणी, पोंभूर्णा , माहूर, आटपाडी, मालेगांव-जहांगिर, तिर्थपूरी, कणकवली, शिरुर-कासार, विक्रमगड, अकोले , मोखाडा, सुरगणा.
• नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित (20 पदे)
घनसावंगी, भामरागड, मंचर, पाटोदा, माढा, कळवण, सावली, मानोरा, मारेगांव, आष्टी, जि.वर्धा, तलासरी, वडवणी, पोलादपूर, खालापूर, शिरुर-अनंतपाळ, जाफ्राबाद, चाकूर, आष्टी, जि.बीड, जिवती, कर्जत, जि.अहिल्यानगर.
खुल्या प्रवर्गासाठी नगर पंचायती (एकूण 76 पदे)
• खुला (सर्वसाधारण) (38 पदे)
शेंदूर्णी , साक्री, सालेकसा, कवठे-महांकाळ, देवणी, मोताळा, अर्धापूर, बोदवड, हिमायतनगर, कसई-दोडामार्ग, मुलचेरा, धडगांव-वडफळ्या, कुडाळ, कोरेगांव, दापोली, वाभवे-वैभववाडी, निफाड, चंदगड, चार्मोर्शी, बदनापूर, कारंजा, धारणी, फुलंब्री, हातकणंगले, लोहारा (ब्रु.), मुरबाड, केज, आजरा, संग्रामपूर, खंडाळा, वडूज, देवगड-जमसंडे, नेवासा, मौदा, शिराळा (जि.सांगली), नायगाव, सेनगाव, महागाव.
• खुला प्रवर्गातील महिलांसाठी :- (पदे 38)
- बाभुळगांव, 2. मुक्ताईनगर, 3. कुही, 4. देहू, 5. शहापूर, 6. पारशिवनी, 7. वडगांव-मावळ, 8. तिवसा, 9. मंडणगड, 10. शिंदखेडा, 11. लांजा, 12. देवरुख, 13. वाडा, 14. लोणंद, 15. मेढा, 16. जळकोट, 17. दिंडोरी, 18. सडक-अर्जुनी, 19. म्हसळा, 20. नातेपुते, 21. रेणापूर, 22. लाखणी, 23. औंढा-नागनाथ, 24. पाटण, 25. पेठ, 26. कडेगांव, 27. अनगर, 28. महादूला, 29. सोयगांव, 30. वैराग, 31. लाखांदूर, 32. राळेगांव, 33. गुहागर, 34. नांदगांव-खडेश्वर, 35. महाळुंग-श्रीपूर, 36. वाशी, जि.धाराशिव, 37. बार्शी-टाकळी, 38. मोहाडी.
आरक्षण सोडत पारदर्शकपणे राबविली – राज्यमंत्री माधुरी मिसाळ
राज्यातील नगरपरिषदा व नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदांची आरक्षण सोडत प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात आली, असे सांगून महिला प्रवर्गासाठी आरक्षित जागांवर निवडणूक लढविणाऱ्या भगिनींना तसेच या निवडणुकीसाठी सर्वांना नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी शुभेच्छा दिल्या.
कट्टर शिवसैनिक संजय लोणकर यांचे निधन
पुणे- नगर जिल्ह्यात शिवसेनेचा जोरदार प्रसार करणारे,शिवसेनेचे पहिले संपर्क प्रमुख संजय निवृत्ती लोणकर यांचे रविवारी (दि.५) पहाटे निधन झाले. ते ६४ वर्षे वयाचे होते.त्यांच्या मागे पत्नी, दोन भाऊ, दोन विवाहित बहिणी, दोन मुले, नात असा परिवार आहे.धनकवडी स्मशान भूमी येथे काल सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शिवसेनेचे नगर जिल्ह्याचे माजी उपजिल्हाप्रमुख अरुण पाटील तसेच पुण्यातील रमेश बोडके,रघुनाथ कुचिक,उमेश वाघ यांच्या सह अभय छाजेड,संदीप खर्डेकर, अप्पा परांडे आणि नगर जिल्ह्यातील अनेक जुन्या जाणत्या शिवसैनिकांनी त्यांच्या निधनाबद्दल हळ हळ व्यक्त केली आहे.
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर शिवसैनिक अशी ओळख असणारे संजय लोणकर यांनी तत्कालीन अहमदनगर आणि आताचा अहिल्यानगर जिल्हा शिवसेनेचे पहिले संपर्क प्रमुख होते जेव्हा सुहास वहाडणे हे जिल्हाप्रमुख होते या दोघांच्या निवडी शिवसेनेत खुद्द बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने पहिल्या वहिल्या नियुक्त्या होत्या.लोणकर यांच्या नंतर साबिरभाई शेख नगर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख झाले होते,त्यानंतर युतीच्या राज्यात साबीर भाई कामगार मंत्री देखील झाले..श्रीरामपूर जिल्हा व्हावा म्हणून स्थापन करण्यात आलेल्या श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष पद लोणकर यांनी भूषविले होते.नगर जिल्ह्यातील पहिला मोर्चा लोणकर यांच्या नेतृत्वाखाली राहुरी येथे काढला गेला. शिवसेनेच्या नगर जिल्ह्यातील इतिहासातील या पहिल्या खुणा ठरल्या. ‘युक्रांद’ चे संस्थापक माजी आमदार डॉ.कुमार सप्तर्षी, बबनराव पाचपुते यांच्या बरोबर लोणकर यांनी काही काळ राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम केले आहे.ज्येष्ठ पत्रकार अरुण लोणकर आणि शरद लोणकर यांचे ते थोरले बंधू होत.
बिहारमध्ये दोन टप्प्यात विधानसभा निवडणुका:6 आणि 11 नोव्हेंबर रोजी मतदान, 14 नोव्हेंबरला निकाल
पाटणा – बिहारमधील २४३ विधानसभेच्या जागांसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे आणि १४ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होतील. निवडणूक आयोगाने सोमवारी दुपारी ४ वाजता पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

निवडणुकीच्या घोषणेपासून मतमोजणीपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया एकूण ४० दिवस चालेल. २०१० मध्ये निवडणूक प्रक्रिया ६१ दिवस, २०१५ मध्ये ६० दिवस आणि २०२० मध्ये ४७ दिवस चालली. अशा प्रकारे, यावेळी गेल्या १५ वर्षातील सर्वात कमी कालावधीत निवडणुका पूर्ण होतील.
बिहारमध्ये मतदानाचा पहिला टप्पा छठ नंतर आठ दिवसांनी होईल. सर्व राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाला दिवाळी आणि छठ नंतर मतदानाच्या तारखा ठेवण्याचे आवाहन केले होते.बिहारमध्ये ४० वर्षांनंतर दोन टप्प्यात निवडणुका होत आहेत. यापूर्वी १९८५ मध्ये दोन टप्प्यात निवडणुका झाल्या होत्या. राज्यात २४३ जागा आहेत, ज्यामध्ये अंदाजे ७४.२ दशलक्ष मतदार आहेत, ज्यात १०० वर्षांवरील १४,००० मतदारांचा समावेश आहे. मतदान केंद्रांवर प्रवास करण्यास असमर्थ असलेले लोक फॉर्म १२डी भरून घरून मतदान करू शकतील. राज्यातील १४ लाख लोक पहिल्यांदाच मतदान करतील. बिहारमध्ये मतदान केंद्रांवर मोबाईल फोन घेऊन जाण्याची परवानगी असेल.
२०२० मध्ये बिहारच्या निवडणुका तीन टप्प्यात झाल्या. २० ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर या कालावधीत मतदान झाले. निकाल १० नोव्हेंबर रोजी जाहीर झाले. यापूर्वी २०१५ मध्ये पाच टप्प्यात मतदान झाले. १२ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत मतदान झाले. निवडणुकीचे निकाल ८ नोव्हेंबर रोजी जाहीर झाले.
महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेला वाढती पसंती,गेल्या ३ महिन्यांत २ लाखांवर ग्राहकांचा सहभाग
पर्यावरणस्नेही ७ लाखांवर ग्राहकांना ८ कोटींचा फायदा
मुंबई, दि. ६ ऑक्टोबर २०२५: वीजबिलांच्या छापील कागदांचा वापर बंद करण्यासाठी महावितरणने सुरू केलेल्या ‘गो-ग्रीन’ योजनेला वीजग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये तब्बल २ लाख ३ हजार ३४० वीजग्राहकांनी या योजनेत सहभाग घेतला आहे.
वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करीत केवळ ‘इमेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडून सोमवार (दि. ६) पर्यंत लघुदाब वर्गवारीतील पर्यावरणस्नेही ७ लाख ६ हजार ९२४ ग्राहक या योजनेत सहभागी झाले आहे व त्यांना ८ कोटी ४८ लाख ३० हजार ८८० रुपयांचा वार्षिक फायदा होत आहे.
‘गो-ग्रीन योजनेतील वीजग्राहकांचा वाढता प्रतिसाद सहभाग स्वागतार्ह आहे. त्यांना वीजबिल डिजिटल स्वरुपात पाठवले जात आहे. पर्यावरणाला हातभार लावण्यासाठी वीजग्राहकांनी या योजनेत सहभागी व्हावे’, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी केले आहे.
गेल्या तीन महिन्यांत २ लाखांवर ग्राहकांचा सहभाग – वीजग्राहकांसाठी ऐच्छिक असलेल्या गो-ग्रीन योजनेला राज्यात प्रतिसाद वाढत आहे. विशेष म्हणजे जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या तीन महिन्यांमध्ये २ लाख ३ हजार ३४० ग्राहकांची या योजनेत भर पडली आहे. यात सर्वाधिक पुणे प्रादेशिक विभागातील ८७ हजार ४० ग्राहकांचा तर कोकण प्रादेशिक विभागातील ७८ हजार ८२९ ग्राहकांचा समावेश आहे.
या योजनेत आतापर्यंत ७ लाख ६ हजार ९२४ पर्यावरणस्नेही वीजग्राहक सहभागी झाले आहेत. या ग्राहकांना ८ कोटी ४८ लाख ३० हजार ८८० रुपयांचा वार्षिक फायदा होत आहे. यामध्ये (कंसात आर्थिक फायदा रूपयांत) पुणे प्रादेशिक विभागात सर्वाधिक २ लाख ८८ हजार २३८ (३.४६ कोटी), कोकण- २ लाख ६२ हजार २३७ (३.१५ कोटी), नागपूर प्रादेशिक विभाग- ८४ हजार ५३१ (१.०१ कोटी) आणि छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक विभागामध्ये योजनेत सहभागी ७१ हजार ९१८ वीजग्राहकांना ८६ लाख ३० हजार रूपयांचा वार्षिक फायदा होत आहे.
असे व्हा योजनेत सहभागी – गो-ग्रीन योजनेसाठी महावितरणच्या www.mahadiscom.in या वेबसाइटवर किंवा मोबाईल अॅपवर नोंदणी करण्याची स्वतंत्र सोय उपलब्ध आहे. केवळ ग्राहक क्रमांक सबमीट करावे लागेल व छापील बिलाची प्रत रद्द करून संबंधितांना नोंदणीकृत मोबाईल क्रमांक व इमेलवर दरमहा बिल पाठविण्यात येईल. नोंदणीकृत मोबाईल किंवा इमेल बदलण्याची सोय देखील त्याच ठिकाणी उपलब्ध आहे.
वार्षिक १२० रूपयांचा फायदा – महावितरणकडून गो-ग्रीनचा पर्याय निवडल्यास प्रतिबिलात १० रुपये सवलत देण्यात येत आहे. यात ग्राहकांचा वीजबिलामध्ये वार्षिक १२० रुपयांचा फायदा होत आहे. विशेष म्हणजे गो-ग्रीन योजनेचा पर्याय निवडल्यानंतर संबंधित ग्राहकांच्या पहिल्याच वीजबिलामध्ये पुढील १२ महिन्यांची म्हणजे १२० रुपयांची सवलत एकरकमी देण्यात येत आहे.
गो-ग्रीन योजनेचे फायदे – गो-ग्रीन सहभागी झालेल्या ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत ‘इमेल’वर व मोबाईल ‘एसएमएस’द्वारे दरमहा वीजबिल पाठविण्यात येत आहे. वीजबिलांच्या तारखेपासून सात दिवसांमध्ये रकमेचा तत्पर भरणा केल्यास एक टक्के सवलत दिली जाते. त्यासाठीही ऑनलाईन बिल भरणे सोयीचे झाले आहे. इमेलद्वारे प्राप्त झालेले दरमहा वीजबिल संगणक किंवा मोबाइलमध्ये जतन करून ठेवता येते. आवश्यकतेप्रमाणे वीजग्रा
काश्मीर मध्ये आतंकवाद संपविण्यासाठी महिलांचे शिक्षण आणि सक्षमीकरण महत्वाचे – अधिक कदम
“राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहाचे” आयोजन
पुणे-जम्मू काश्मीर मध्ये आतंकवादाचा परिणाम हा थेट महिला आणि मुले यांच्यावर होत असतो. एक महिलाच घराला स्थैर्य देऊ शकते. ज्याठिकाणी महिलेस प्राधान्य मिळत नाही ती अस्वस्थ होते आणि त्याजागी अशांतता नांदत असते. आतंकवाद संपविण्यासाठी महिलांचे शिक्षण आणि सक्षमीकरण महत्वाचे आहे. महिलांनी शिक्षण घेऊन पुन्हा काश्मीर मध्ये जाऊन वास्तव्य केले पाहिजे यासाठी “बसेरा ई तबस्सुम “हा उपक्रम काश्मीर मध्ये आम्ही राबवत आहे.याद्वारे अनेक मुली शिक्षण घेऊन कुटुंब सुव्यवस्थित करू शकतील. पुढील पिढीतील मुलांच्या मागे खंबीरपणे पाठबळ देण्यासाठी हे आवश्यक आहे. काश्मीर मध्ये बदल घडवण्यासाठी ही दीर्घकालीन योजना असल्याचे मत बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनचे प्रमुख अधिक कदम यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी तर्फे ” राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहाचे” आयोजन गांधी भवन कोथरूड याठिकाणी करण्यात आले आहे. यामध्ये” काश्मीर आणि मी “या विषयावर बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनचे प्रमुख अधिक कदम यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी माजी सनदी अधिकारी आणि ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख, महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी, विश्वस्त सचिव अन्वर राजन, एम एस जाधव,नीलिमा जोशी, स्वप्नील तोंडे, तेजस भालेराव उपस्थित होते.
अधिक कदम म्हणाले, १९९७ मध्ये मी काश्मीर मध्ये कुपवाडा जिल्ह्यात एका गावात युनिसेफ प्रकल्प होता त्यासाठी बहिणी भारती सोबत गेलो होतो. त्यावेळी एका संध्याकाळी आम्ही दुचाकी गाडीवर जात असताना तीन जण मला रस्त्यात भेटले आणि त्यांच्या हातात एके ४७ सारखे काहीतरी संशयास्पद दिसले लवकरच ते आतंकवादी असल्याचे स्पष्ट झाले. माझी गाडी काहीजणांनी अडवली आणि सामानाची तपासणी केली. त्यांच्याशी बोलताना त्यातील एकजण पुण्यात भारती महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षणास प्रवेश घेण्यासाठी आला होता असे समजले. नंतर तो काश्मीर मध्ये गेल्यावर काहीजणांच्या संपर्कात येऊन पाकिस्तानला गेला आणि त्याचा आयुष्याचा मार्ग बदलला. त्यांनी आम्हाला जीवे मारणार नाही असे सांगितले. मात्र, या घटनेमुळे माझे देखील जीवन बदलले. काश्मीर माझ्यासाठी गुरू स्थानी आहे. वयाच्या १८ व्या वर्षी मी काश्मीरला गेलो.त्यानंतर मागील २९ वर्षात मी काश्मीर मध्ये अनेकवेळा गेलो पण कधी हॉटेल मध्ये राहिलो नाही तर स्थानिक लोकांच्या घरी राहिलो. वेगवेगळ्या गावात जाऊन लोकांच्या घरात राहून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. काश्मीर आणि मी विषयावर बोलताना मला जाणवते की, “मी” हा अहंकारी शब्द असून प्रत्येकजण आपापल्या परीने काश्मीर मध्ये लक्ष्य घालत असल्याने अनेक अडचणी वाढल्या आहे.बुलेटचा कोणता धर्म नसून त्याला केवळ लक्ष्य भेद करणे माहिती असते. मला जीवे मारण्यासाठी दोन ते तीन वेळा प्रयत्न झाला पण माझ्या कामामुळे आणि स्थानिक सहकार्य यामुळे माझी सुटका झाली. काश्मीर मधील माझ्या कामाचा प्रवास हा त्या त्याक्षणी उभे राहण्याची क्षमता यामुळे लोकांची कामे करू शकत आहे. काश्मीर मध्ये बोगस स्वयंसेवी संस्था यामुळे खराब परिस्थिती काही प्रमाणात झाली आहे. त्याठिकाणी आम्ही चांगले काम उभे करू शकलो. काश्मीर मध्ये सध्या तीन तुकडे झाले असून पाकिस्तान, भारत आणि चीन सगळेच आपापले हक्क सांगत आहे. भारताकडे काश्मीरचा मोठा भाग आहे. आपल्याला जम्मू काश्मीर माणसे सोबत असेल तरच तो प्रदेश आपल्याकडे आहे. माणसेच संस्कृती पुढे नेण्याचे काम करतात त्यामुळे ते टिकवणे आवश्यक आहे. काश्मीर मधील संस्कृती पुरातन आहे. विविधता त्याठिकाणी दिसून येते कारण हिंदू, मुस्लिम, बौद्ध, शिया असे विविध लोक दिसून येतात. कलम ३७० तरतूद ही त्यावेळी तो भाग सोबत रहावा यासाठी केली होती. पण नंतरच्या काळात त्याचा वेगळा अर्थ घेतला गेला. कायम हा भाग वादाचा राहिलेला असून त्याचा सर्वांगीण विचार करून बदल घडणे महत्वपूर्ण आहे.
कुमार सप्तर्षी म्हणाले, निःस्वार्थ सेवा काहीजण करतात मात्र, आता स्वार्थी काही लोक दिसून येतात. अधिक कदम यांना काश्मीर वेदनाची तार छेडली गेली आणि त्यातून आदर्श काम उभे राहत आहे हे महत्वपूर्ण आहे. धर्म हा माणसाला जीवन जगण्यास मदत करत असतो पण, धर्माच्या नावाने कोणी हिंसा करणे योग्य नाही.
लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, कागदावर आपण देश निर्माण करतो पण प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी असते. त्यामुळे बॉर्डरलेस काम करणे महत्त्वपूर्ण आहे. काश्मीर प्रश्न हा जुना असून जटिल आहे. काश्मीर बाबत मी दोन कादंबरी लिखाण सध्या करत आहे. भारतात काश्मीर हा तत्कालीन परिस्थितीमुळे राजा हरिसिंग यांच्या पुढाकाराने आला. काश्मीर मध्ये सध्याच्या काळात शांतता राहणे गरजेचे आहे.
सरहद पुणे ने साकारलेल्या संगीतकार स्व. श्रीकांत ठाकरे म्युझिक स्टुडिओचे उद्धव ठाकरेंनी केले उद्घाटन
पुणे – शिवसेना ही केवळ सत्तेसाठी जन्माला आलेली नाही. त्यामुळे सत्ताप्राप्तीसाठी राजकारण करायचे नाही हे सूत्र बाळासाहेबांपासून आम्ही पाळत आलो आहेत, असे प्रतिपादन शिवसेना (उबाठा)चे पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
सरहद, पुणेच्या वतीने गुजर निंबाळकरवाडी येथे साकारण्यात आलेल्या संगीतकार स्व. श्रीकांत ठाकरे म्युझिक स्टुडिओचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. या वेळी शिवसेना नेते आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, सरहदचे संस्थापक संजय नहार, संतसिंग मोखा, वसंत मोरे, शैलेश वाडेकर, शैलेश पगारिया आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना उद्धव ठाकरे यांनी वडील बाळासाहेब ठाकरे आणि काका श्रीकांत ठाकरे यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, माझे काका श्रीकांत ठाकरे यांच्या नावाने स्टुडिओ साकारला याचा मला खूप आनंद आहे. त्यांच्या मनात सतत संगीत सुरू असायचे. माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आघाडीवर होते. त्यांच्यासमवेत त्यांची ही दोन मुले बाळासाहेब आणि श्रीकांत यांनी मार्मिकच्या माध्यमातून सर्व मदत केली होती. असे काका आणि वडील लाभले यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. शिवसेनेची खरी ताकद शिवसैनिकामध्ये आहे. त्यामुळे बाळासाहेबांनीसुद्धा सत्तेसाठी कधी राजकारण केले नाही. वेळ आली तेव्हा सत्तेवर लाथ मारली. शिवसेना सत्तेसाठी जन्माला आलेली नाही तर सत्ता शिवसेनेसाठी जन्माला आलेली आहे.
मणिपूरमधील एका मुलीने माझा सन्मान केला त्याने मी निःशब्द झालो आणि मला गहिवरून आले असे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले, २०१४ नंतर खरे तर युतीचे सरकार आले. पण आज परिस्थिती काय आहे. मणिपूर पेटलेले आहे. लेह-लडाखमध्ये संघर्ष सुरू आहे. गावागावात जवान तैनात केलेले आहेत. आसाममध्येही परिस्थिती पेटलेली आहे. काश्मीरमध्येही अशांतता आहे, हे सगळे चित्र चांगले नाही. ७५ वर्षे झाली आता हेच का स्वातंत्र्य असा प्रश्न मनात आल्यावाचून राहत नाही. अशा परिस्थितीत सूर जुळवायचे कसे आणि मैफिल रंगवायची कशी हा प्रश्न पडतो असे उद्धव ठाकरे म्हणाले.
या वेळी संजय राऊत म्हणाले, श्रीकांत ठाकरे हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व होते. ते उत्तम संगीतकार, व्यंगचित्रकार, वक्ते, संपादक, लेखक होते. बाळासाहेब आणि त्यांची राम-लक्ष्मणाची जोडी होती. संगीतक्षेत्राला त्या काळात ५० वर्षे पुढे नेण्याचे काम श्रीकांत ठाकरे यांनी केले. आज जे मोठे गायक दिसतात त्यातील अनेकांना पहिल्यांदा गाण्याची संधी ठाकरे यांनीच दिली होती.
प्रास्ताविक करताना संजय नहार यांनी बाळासाहेबांच्या अनेक मौलिक आठवणींना उजाळा दिला. काश्मीरमधील कुपवाडा येथील मुले मातोश्रीवर आलेली होती त्यावेळी आत येताना ती घाबरत होती पण बाहेर पडल्यानंतर आमच्या आजोबांना भेटल्यासारखे आम्हाला वाटले अशा भावना मुलांनी व्यक्त केल्या होत्या ही आठवण नहार यांनी सांगितली. बाळासाहेब हे महाराष्ट्राच्या मातीतील उमदे व्यक्तिमत्त्व होते असे सांगून त्यांनी आठवणी जागवल्या.
या वेळी गुजरवाडी व कात्रज ग्रामस्थांच्या हस्ते उद्धव ठाकरे यांचा सन्मान करण्यात आला. सरहदचे संस्थापक संजय नहार यांनी प्रास्ताविक केले. शैलेश वाडेकर यांनी आभारप्रदर्शन केले.
महमंद रफींसाठी मराठी गाणे लिहिले ऊर्दूत – ठाकरे …
मजहर सिद्दीका यांनी शोधिशी मानवा हे गीत सादर केले त्याचे अभिनंदन करून उद्धव ठाकरे यांनी श्रीकांत ठाकरे यांची एक सुंदर आठवण सांगितली. श्रीकांत ठाकरे यांनी महंमद रफी यांच्याकडून हे गीत गाऊन घेतले होते. पण विशेष म्हणजे श्रीकांत ठाकरे यांना उत्तम ऊर्दू येत असते. त्यामुळे महंमद रफी यांना त्यातील शब्द कळावेत म्हणून ते मराठी गाणे त्यांनी महंमद रफी यांना ऊर्दूत लिहून दिले होते. ठाकरे यांनी सांगितलेल्या या आठवणीला उपस्थितांनी दाद दिली.

ख्यातनाम, ज्येष्ठ अभिनेत्री संध्या यांचे निधन
मुंबई- -मराठीतील पिंजरा सिनेमातील संध्या आणि आधा ही चंद्रमा रात आधी या गाण्यातील संध्या सर्वांना आठवत असेल ,अत्यंत उत्कृष्ट नर्तकी आणि अभिनेत्री म्हणून आपली प्रत्येक भूमिका साकारलेली व्ही शांताराम यांची पत्नी संध्या शांताराम यांचे आज निधन झाले वयाच्या 87 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे.
1972 साली प्रदर्शित झालेला व्ही. शांताराम दिग्दर्शित ‘पिंजरा’ हा मराठी चित्रपटसृष्टीतील अमर कलाकृती मानली जाते. एका आदर्श शिक्षक आणि तमाशा कलावंत यांच्यातील प्रेम कथेवर आधारित या चित्रपटात संध्या यांनी साकारलेली तमाशातील नर्तिकेची भूमिका प्रचंड गाजली. या भूमिकेमुळे त्या संपूर्ण महाराष्ट्राच्या लाडक्या अभिनेत्री बनल्या. आजही ‘पिंजरा’ आणि संध्या यांची भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.
संध्या यांचा जन्म.२७ सप्टेंबर १९३२ रोजी चा. त्यांचे संपूर्ण नाव विजया श्रीधर देशमुख. त्यांचे वडील श्रीधर देशमुख हे रंगभूमीवरील कलाकार होते. ते देशी नाटक समाज या गुजराती नाटक कंपनीत काम करत असत. भांगवाडी थिएटरमध्ये त्या कंपनीची नाटके होत असत. विजया म्हणजेच संध्या आणि त्यांची मोठी बहीण वत्सला या दोघी लहानपणापासून त्या कंपनीच्या गुजराती नाटकातून भूमिका करत. नाटकातून अभिनय करता करता संध्या यांनी गुजराती चित्रपटातून काम करण्यास सुरुवात केली.
या सुमारास व्ही शांताराम मौज दिवाळी अंकात आलेल्या ‘श्रीमंताकडचे बोलावणे’ या चि. य. मराठे यांच्या कथेवर चित्रपट काढण्याच्या तयारीत होते. त्यासाठी त्यांनी विजया देशमुख या नव्या नटीची निवड केली, तो चित्रपट होता ‘अमर भूपाळी’. या चित्रपटासाठी विजया यांचे ‘संध्या’ असे नाव ठेवण्यात आले. ‘अमर भूपाळी’ चित्रपटातील त्यांची भूमिका ही तमासगिरिणीची होती व नाव होते गुणवती. या चित्रपटात त्यांना बरीच नृत्ये करावयाची होती व त्यासाठी संध्या यांनी अपार कष्ट घेऊन नृत्याचे धडे गिरवले आणि आपली भूमिका पार पाडली. चित्रपट खूपच चालला आणि नायिका संध्या यांचे नाव झाले. होनाजी बाळांवरचा हा चित्रपट पुढे बंगाली भाषेत पण झाला.
संध्या यांचा पुढचा चित्रपट होता ‘परछाई’. हा फक्त हिंदी भाषेत होता आणि त्यात त्यांच्या वाट्यास खलनायिकेची भूमिका आली होती. चित्रपटात नायक आणि नायिका म्हणून खुद्द व्ही.शांताराम आणि जयश्रीबाई होत्या. या चित्रपटामुळे संध्या हे नाव तमाम हिंदी भाषिक प्रांतातून प्रसिद्ध झाले. त्यांचा पुढचा चित्रपट होता ‘तीन बत्ती चार रास्ता’. हा चित्रपट भाषिक प्रांतवादावर आधारित होता. त्यानंतर व्ही शांताराम यांनी नृत्याला प्राधान्य असणारा रंगीत चित्रपट काढण्याचे ठरवले. हा चित्रपट होता ‘झनक झनक पायल बाजे’. नायिका म्हणून संध्या हे नाव जाहीर झाले. त्या प्रसंगी सुप्रसिद्ध दिग्दर्शक मेहबूब खान शांतारामबापूंना म्हणाले, ‘देखो, आप ये फिल्म कलरमें बना रहे हो, तो बडी नामवाली हिरॉईन – जैसे वैजयंतीमाला, पद्मिनी को लिजिये|’’ पण शांतारामबापू बधले नाहीत आणि संध्या यांनी चित्रपटात काम करून इतिहास घडवला. पुढे ‘दो आँखे बारह हाथ’, ‘नवरंग’ या चित्रपटांनी राजकमल चित्रपट संस्थेला मालामाल करुन टाकले. ‘दो आँखे बारह हाथ’ ने बर्लिनच्या चित्रपट महोत्सवात पारितोषिक पटकविण्याचा मान मिळवला. हॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक सेसील बी. डिमेल यांनी त्यांच्यातर्फे एक पारितोषिक दिले. त्यानंतर संध्याबाईंनी ‘स्त्री’, ‘सेहरा’, ‘लडकी सह्याद्री की’, ‘जल बिन मछली नृत्य बिन बिजली’ यांसारखे चित्रपट शांतारामबापूंसाठी केले.
१९७२ सालात त्यांचा मराठी चित्रपट ‘पिंजरा’ पडद्यावर झळकला आणि त्या चित्रपटाने सर्व विक्रम मोडले. ‘चंदनाची चोळी अंग अंग जाळी’ आणि वर्ष होते १९७५. ‘अमर भूपाळी’नंतर तब्बल पंधरा वर्षांनी संध्या यांनी ‘इथे मराठीचिया नगरी’ या व्ही. शांताराम दिग्दर्शित चित्रपटात भूमिका केली. संध्या यांनी ‘राजकमल’ खेरीज दुसऱ्या कुठल्याही चित्रपट संस्थेत काम केले नाही. राजकमल आणि व्ही. शांताराम यांच्याशी संध्या यांची निष्ठा होती, हे सर्वज्ञात आहे. महाराष्ट्र शासनाने संध्या यांचा राज कपूर जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव केला होता.
ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक व्ही. शांताराम यांनी त्यांच्या आयुष्यात तीन विवाह केले होते. संध्या या त्यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या. दुसरी पत्नी, अभिनेत्री जयश्री यांच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर अवघ्या एका महिन्यातच शांताराम यांनी संध्या यांच्याशी विवाह केला होता. संध्या यांनी मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केले असले, तरी त्यांच्या भूमिका अविस्मरणीय ठरल्या. अभिनयासोबतच त्या एक कुशल नृत्यांगना म्हणूनही ओळखल्या जात.
संध्या यांनी 1959 मध्ये आलेल्या ‘नवरंग’ सिनेमातून कमाल दाखवली होती. व्ही. शांताराम यांचा हा चित्रपट होता. “अरे जा रे हट नटखट” हे त्यांचे गाणे आजही तुफान लोकप्रिय आहे. संध्या शांताराम, यांचे खरे नाव विजया देशमुख होते. अरे जा रे हट नटखट या गाण्यासाठी त्या विशेषतः शास्त्रीय नृत्य शिकल्या. त्यावेळी कोणतेही नृत्यदिग्दर्शक नव्हते; गाण्यात तुम्हाला दिसणारी स्टेप संध्या स्वतः किंवा दिग्दर्शक व्ही. शांताराम यांनी सादर केली होती.
दिग्दर्शक व्ही. शांताराम यांना हे गाणे खरोखरच खास बनवायचे होते, म्हणून त्यांनी खऱ्या हत्ती आणि घोड्यांची व्यवस्था केली. सेटवर खऱ्या प्राण्यांमध्ये संध्या निर्भयपणे नाचत होत्या. अभिनेत्री संध्यांना माहित होते की हे सोपे नाही, कारण प्राणी आवाज आणि माणसांमुळे अस्वस्थ होऊ शकतात. पण त्या घाबरल्या नाहीत. त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. त्यांनी बॉडी डबलही वापरला नाही. गाण्याच्या शूटिंगपूर्वी, त्यांनी हत्ती आणि घोड्यांशी मैत्री केली, त्यांना स्वतःच्या हातांनी केळी आणि नारळ खायला दिले आणि पाणी पाजले. संध्याच्या समर्पणाने आणि धाडसाने दिग्दर्शक प्रभावित झाले.
पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर,१३२९ हरकती पूर्णतः मान्य ,४५२४ हरकती फेटाळल्या
पुणे : पुणे महापालिकेच्या आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना आज जाहीर करण्यात आली. १३२९ हरकती पूर्णतः मान्य ,४५२४ हरकती फेटाळल्या , तर ६९ हरकती अंशतः मान्य करून आता तिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. प्रारूप प्रभाग रचनेवर मोठ्या प्रमाणावर हरकती आल्याने निवडणूक आयोगाने या हरकतींचा विचार करून काही प्रभागांमध्ये बदल केले असून प्रभागांची नावेही बदलली आहे. काही प्रभागातील हद्दीत बदल झाला आहे.

प्रभाग रचना तयार करताना नैसर्गिक हद्दी ओलांडल्या होत्या, तसेच निवडणूक आयोगाच्या नियमांचे पालन केले नव्हते. असा आरोप करण्यात आला होता. त्यावर पुणेकरांनी हरकती आणि सूचना नोंदविल्या होत्या.
प्रभाग क्रमांक 15 चा थिटे वस्ती चा भाग प्रभाग क्रमांक चारला जोडला आहे. अंतिम प्रभाग रचनेमध्ये वानवडी शिंदे वस्ती या प्रभागातील शिंदे वस्तीचा काही भाग प्रभाग क्रमांक 14 ला जोडण्यात आला आहे. प्रारूप मध्ये रस्त्याने शिंदे वस्ती विभागल्याने मोठ्या प्रमाणावर हरकती दाखल झाल्या होत्या. प्रभाग क्रमांक 14 चा मगरपट्टा सिटी समोरील रस्त्याचा पलीकडचा भाग हा प्रभाग क्रमांक 17 ला जोडण्यात आला आहे.
बिबवेवाडी महेश सोसायटी या प्रभागाचे नावही बदलले असून बिबवेवाडी शंकर महाराज मठ असे करण्यात आले आहे. या प्रभागातील के के मार्केट येथील पुण्याई नगर हा भाग प्रभाग क्रमांक 38 अप्पर सुपर इंदिरानगर ला जोडण्यात आला आहे. तर प्रभाग क्रमांक 34 धनकवडी चा आंबेगाव दाभाडी हा भाग पाच सदस्य प्रभाग 38 ला जोडण्यात आला आहे.तसेच कोळेवाडी जांभूळवाडी हा भाग देखील 38 ला जोडण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक 38 चा सुखसागर नगरचा भाग प्रभाग 39 कोंडवा येवलेवाडी ला जोडण्यात आला आहे. विशेष असे की या प्रभागावरी सर्वाधिक हरकती आल्या होत्या.
प्रभाग रचनेत रडीचा डाव केला तऱी जनता निवडणुकीत न्याय करणार- प्रशांत जगताप
प्रभाग रचनेतील हरकतींना केराची टोपली, राष्ट्रवादी आक्रमक
पुणे- प्रभाग रचनेतील हरकतींना केराची टोपली दाखवून प्रभाग रचनेत रडीचा डाव केला तऱी जनता निवडणुकीत न्याय करेल असे आज येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी म्हटले आहे
पुणे महापालिकेच्या आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना आज जाहीर करण्यात आली. त्यावर तातडीने जगताप यांनी प्रतिक्रिया देत संतापही व्यक्त केला आहे. ते म्हणाले,’महाराष्ट्राचे नगररचना खाते नावापुरते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असले, तरी या खात्याची सूत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनच हलवले जातात. आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीतील इतर घटकपक्षांना विश्वासात न घेता देवेंद्र फडणवीस यांनी रडीचा डाव खेळत भाजपने प्रभाग रचना केली. या प्रभाग रचनेवर हजारो पुणेकरांनी आक्षेप नोंदवला होता, मात्र प्रत्यक्षात प्रभाग रचनेत काहीही बदल न करता केवळ प्रभागांच्या नावांमध्ये बदल करून भाजपने पुणेकरांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे.
भारतीय जनता पक्षाने सत्तेच्या बळावर हा रडीचा डाव खेळला. पुणेकरांना ही सत्तेची मस्ती आजिबात आवडलेली नाही. वाहतूक कोंडीच्या बाबतीत जगात पाचवा नंबर, गुन्हेगारीच्या बाबतीत भारतात पहिला नंबर, भ्रष्टाचाराच्या बाबतीत भारतात पहिला नंबर मिळवून सत्ताधाऱ्यांनी पुणेकरांच्या लौकिकाला गालबोट लावला आहे. याचे उत्तर पुणेकर नागरिक आपल्या मतदानातून नक्कीच व्यक्त करतील. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष जनतेच्या पसंतीचे दमदार उमेदवार घेऊन मैदानात उतरणार आहे. महानगरपालिका निवडणुकीत जनतेचा पाठिंबा नक्कीच महाविकास आघाडीला मिळेल.
