डोंगरी परिसरात सर्च ऑपरेशन सुरू-मुंबईसह देशभरात एकूण 15 ठिकाणी ही छापेमारी मुंबई: ईडीने सलीम डोलाच्या ड्रग्ज नेटवर्कवर मोठी कारवाई करत ८ ठिकाणी छापेमारी केली आहे. सलीम डोला हा दाऊद इब्राहिमचा सहकारी असून, संशय आहे की त्याच्या माध्यमातून ड्रग्सचा मोठ्या प्रमाणावर व्यवहार होत होता. छापेमारीदरम्यान महत्वाचे दस्तऐवज आणि काही निधी जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित असलेल्या सलीम डोलाच्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेटवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज पहाटेपासून मोठी कारवाई सुरू केली आहे. मुंबई झोन वनच्या ईडी पथकाकडून मुंबईसह देशभरात एकूण 15 ठिकाणी ही छापेमारीची कारवाई करण्यात आली आहे.दरम्यान ड्रग्ज तस्करी मधील मोठं नाव असलेला सलीम डोला सध्या भारताबाहेर आहे. मात्र, त्याच्या नेटवर्कच्या माध्यमातून एमडी ड्रग्जची तस्करी सुरू होती. या प्रकरणी ईडीने मनी लॉन्ड्रींगचा गुन्हा दाखल केला आहे. डोला हा दाऊद टोळीशी संबंधित असून, त्याच्यावर आधीपासून अनेक गुन्हे दाखल आहेत.
ईडीकडून मुंबईतील डोंगरी परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे. मुंबईत एकूण आठ ठिकाणी छापेमारीची कारवाई करण्यात आली. फैजल शेख आणि अल्फिया शेख यांच्याशी संबंधित डोंगरी येथील ठिकाणांवर ईडीचा तपास सुरू आहे. तपास यंत्रणा सध्या डोलाच्या मागावर असून, त्याचे भारतात प्रत्यार्पण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.मुंबई व्यतिरिक्त नवी दिल्ली आणि गुरुग्राम (गुरगाव) येथेही आज पहाटेपासून छापे मारी करण्यात आली. देशभरातील एकूण 15 ठिकाणी ही कारवाई झाली. ड्रग्ज विक्रीतून मिळालेला पैसा मनी लॉन्ड्रींगच्या माध्यमातून फिरवल्याचा ईडीला संशय आहे. या कारवाई दरम्यान बनावट कॉल सेंटर प्रकरणीही तपासणी सुरू असून, डिजिटल पुरावे गोळा करण्यावर तपास यंत्रणांनी भर दिला आहे.
बिलासपूर-मंगळवारी संध्याकाळी हिमाचल प्रदेशातील बिलासपूर जिल्ह्यात एका प्रवासी बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला. वृत्तसंस्था पीटीआयने १८ जणांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे, तर पोलिस अधीक्षकांनी १५ जणांची पुष्टी केली आहे. बसमध्ये अडकलेल्या दोन मुलांना वाचवण्यात आले. अपघातानंतर लगेचच एसडीआरएफ, पोलिस आणि स्थानिक रहिवासी मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत.
बिलासपूरचे पोलिस अधीक्षक संदीप धवल यांनी सांगितले की, बहुतेक ढिगारा हटवण्यात आला आहे. बसमध्ये आणखी काही प्रवासी अडकले आहेत का याची खात्री करण्यासाठी काही उरलेले दगड जलदगतीने काढण्यात येत आहेत. तथापि, असे दिसते की, बसमध्ये फक्त १८-१९ लोक होते.
खरं तर, मंगळवारी सकाळपासून बिलासपूरसह हिमाचल प्रदेशातील बहुतेक भागात पाऊस पडत आहे. यामुळे सायंकाळी ६:२५ वाजता बर्थिनजवळील भालू येथे अचानक डोंगराचा ढिगारा बसवर कोसळला. बस मारोटनहून घुमरविनला जात होती.
अपघातानंतर बसचे फक्त छतच दिसत होते. स्थानिक रहिवाशांकडून माहिती मिळताच पोलिस आणि प्रशासन घटनास्थळी पोहोचले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. त्यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, “हिमाचल प्रदेशातील बिलासपूर येथील अपघातात झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या नुकसानीबद्दल मनापासून दुःख झाले आहे. या कठीण काळात पीडित लोक आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत.”
त्यांनी पुढे लिहिले की, “पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाख रुपये मदत दिली जाईल. जखमींना प्रत्येकी ५०,००० रुपये मदत दिली जाईल.”
RTOच्या भीतीने केमिकल टँकर चालकाची LPG ट्रकला धडक जयपूर: मंगळवारी रात्री १० वाजता जयपूर-अजमेर महामार्गावर एका रासायनिक टँकरची एलपीजी गॅस सिलिंडरने भरलेल्या ट्रकशी टक्कर झाली. यामुळे टँकरच्या केबिनमध्ये आग लागली. आग सिलिंडरपर्यंत पोहोचताच त्यांचा स्फोट झाला.एकामागून एक २०० सिलिंडरचा स्फोट झाला. काही ५०० मीटर अंतरावर शेतात पडले. १० किलोमीटर अंतरापर्यंत स्फोटांचे आवाज ऐकू आले. सुमारे दोन तास सिलिंडरचा स्फोट होत राहिला.
#WATCH | Dudu, Rajasthan | Jaipur Range IG Rahul Prakash says, "There's a dhaba on the national highway where truck drivers stop. Some trucks and trailers were parked there. From what we've seen and the information we've received, a truck carrying LPG cylinders was parked on the… https://t.co/St6YfTI3qQpic.twitter.com/pU52OYRnDp
या अपघातात एक व्यक्ती जिवंत जळाली. १२ अग्निशमन दलाच्या गाड्यांनी तीन तासांनंतर आग आटोक्यात आणली. ट्रकमध्ये अंदाजे ३३० सिलेंडर होते. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, “आरटीओ गाडी पाहून टँकर चालकाने गाडी ढाब्याकडे वळवली. यादरम्यान, ती गॅस सिलेंडरने भरलेल्या ट्रकला धडकली.”
जयपूरमधील डुडू येथील मोखमपुराजवळ हा अपघात झाला. पाच पार्क केलेल्या वाहनांनाही आग लागली. या घटनेनंतर महामार्गाच्या दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली. बुधवारी पहाटे ४:३० च्या सुमारास महामार्ग पुन्हा सुरू करण्यात आला.
सांगलीकरांची ताराबाईच्या सन्मानार्थ दिला साहित्य – मैफीलतृप्तीचा आनंद! :राजा माने
राष्ट्रीय पातळीवर एखाद्या क्षेत्रात अतुल्य योगदान देणारे व्यक्तिमत्त्व हे त्या गावाचे केवळ भूषण नसते तर ती त्या गावाची संपत्ती असते.सांगली जिल्हा तर अशा व्यक्तिमत्त्वाच्या हिऱ्यांची खाणच !त्याच संपत्तीच्या वैभवाची अनुभूती मागील आठवड्यात आली.साधी राहणी,प्रत्येक शब्दात आपलेपणा ओसंडून वाहत ठेवणारी निर्मळ वक्तृत्वशैली आणि आपल्या थेट विचारांनी अखिल भारतीय शंभराव्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ऐतिहासिक बनवून दिल्ली गाजविणाऱ्या डॉ. तारा भवाळकर यांचा नागरी सत्कार आयोजिला होता.योगायोगाने माझे मित्र प्रा.पद्माकर जगदाळे, त्यांच्या पत्नी व लेखिका प्रतिभा जगदाळे आणि सोहळ्याच्या यजमानांपैकी एक माझे मित्र कवी महेश कराडकर यांच्या मुळे या आनंद सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मला व माझी पत्नी सौ. मंदाला मिळाली.या नेटक्या आणि अप्रतिम सोहळ्याची उंची प्रत्येक वक्त्याने उंचावत ठेवली.माझे मित्र प्रा. अविनाश सप्रे असो,संयोजक चौगुले असो,की कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी अशोक काकडे असोत प्रत्येकाने उत्तम भाषण केले.७ जून १९६७ रोजी सांगलीत पहिले पाऊल राजवाड्यात कसे पडले इथं पासून जीवनात आलेल्या प्रत्येक वळणावर काय घडले, हे ताराबाईंनी मनमोकळेपणाने त्यांच्या शैलीत सांगितला.त्यांच्याच “नाबाद ८७”या कार्यक्रमात त्यांच्या मिश्कीलपणाची साक्ष मिळत होती.तंजावर संस्थानशी असलेल्या त्यांच्या आठवणींना उजळा देताना दक्षिण भारतात मराठी भाषा संस्थानने मराठी भाषा कशी जतन केली याचे “उदंड” किस्से त्यांनी सांगितले.या बहारदार मैफिलीच्या कोंदणात हिरा बसविण्याची कामगिरी साहित्यिक,विचारवंत व शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनिलकुमार लवटे यांनी केली.राणी ताराराणी आणि ताराबाईंच्या पराक्रमाची तुलना केली.त्याहून महत्त्वाचे म्हणजे ताराबाईच्या साहित्य सेवा प्रवासाचे वर्णन करताना त्यांनी डॉ. हरिवंशराय बच्चन यांच्या “मधुशाला” या काव्य संग्रहाचा ताराबाईंनी केलेला अनुवाद या बद्दल बोलताना “१९३५ नंतर उत्तर भारताला हरिवंशराय यांच्या”मधुशाला ” प्रेम करायला शिकविले”, हे भाष्य उपस्थिताना विशेष भावले. ताराबाईची साहित्या सेवा आणि “मधुशाला” चे जीवन तत्त्वज्ञान यांची अप्रतिम मांडणी त्यांनी केली.
“मधुशाला ” प्रत्यक्ष मद्य किंवा दारूच्या ठिकाणाविषयी नाही, तर ती जीवन, तत्त्वज्ञान, आणि मानवी अनुभूतीचे प्रतीकात्मक चित्रण करते.
“मदिरा” म्हणजे जीवनाचे आनंद, प्रेरणा, आत्मिक अनुभूती.
“साकी” म्हणजे गुरु, प्रेमिका किंवा देव, जो जीवनाचे सौंदर्य दाखवतो.
“प्याला” म्हणजे हृदय किंवा मन, जे अनुभव घेते.
आणि “मधुशाला” म्हणजे हे संपूर्ण जग — जीवनाची रंगलेली मैफील!. “मृदु भावों के अंगूरों की आज बना लाया हाला प्रियतम, अपने ही हाथों से आज पिलाऊँगा प्याला, प्रथम तुम्हें अर्पित है मैंने मदिरालय का प्याला, फिर सबको मदहोश कर दे ऐसी मेरी मधुशाला॥ आदरणीय डॉ. ताराबाईं भवाळकर यांना कोटी कोटी शुभेच्छा. त्यांना आरोग्यदायी उदंड आयुष्य लाभो, ही प्रार्थना! राजा माने, संपादक, माध्यम तज्ज्ञ व राजकीय विश्लेषक. अध्यक्ष, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र, मुंबई. सदस्य, शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समिती, महाराष्ट्र शासन. अध्यक्ष, प्रतिबिंब प्रतिष्ठान, मुंबई.
हजारो नागरिकांना दिलासा,तुकडेबंदी कायद्याच्या विरुद्ध झालेल्या ४९ लाख जमिनींच्या तुकड्यांचे व्यवहार नियमित म्हणून मान्यता
मुंबई : राज्यातील महानगरपालिका, नगर परिषदा व नगरपंचायती यांच्या हद्दीमधील क्षेत्र तसेच महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, 1966 अन्वये स्थापन केलेली महानगर प्रदेश विकास प्राधिकरणे व विशेष नियोजन प्राधिकरणे यांच्या अधिकार क्षेत्रातील क्षेत्रे तसेच प्रादेशिक योजनेमध्ये निवासी, वाणिज्यिक, औद्योगिक किंवा इतर कोणत्याही अकृषिक वापरासाठी नेमून दिलेल्या क्षेत्रांमधील जमिनींसाठी आता तुकडे बंदीचा कायदा लागू राहणार नाही. त्यासाठी महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण अधिनियम, 1947 या तुकडेबंदीच्या अधिनियमात सुधारणा करण्याचा तसेच अशा तुकड्यांचे व्यवहार विनाशुल्क नियमित करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
या निर्णयामुळे राज्यातील 49 लाख तुकड्यांचे नियमितीकरण होणार आहे. राज्यात प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्र असलेल्या तुकड्यांची संख्या सुमारे 49 लाख 12 हजार 157 इतकी आहे. त्या तुलनेत केवळ 10 हजार 489 प्रकरणे नियमितीकरणासाठी दाखल झाली आहे.
‘महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध घालणे आणि त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम हा शेतीयोग्य जमिनींचे लहान लहान तुकडे होण्यापासून रोखण्यासाठी आणि त्यांचे एकत्रीकरण करून शेती अधिक फायदेशीर बनवण्यासाठी तयार करण्यात आला. परंतु, शहरी भागातील किंवा नियोजित विकासासाठी आरक्षित केलेल्या जमिनींचा उद्देश हा शेती नसून शहरी विकास, गृहनिर्माण, उद्योगधंदे इत्यादी असतो. तुकडेबंदी नियमामुळे शहरी विकास प्रकल्पांना मोठा अडथळा निर्माण होत असल्याचे लक्षात आले. मालकी हक्काअभावी सर्वसामान्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्याचा परिणाम अभिलेख, उतारे अद्ययावतीकरणावरही होत आहे. या सर्व गोष्टींचा साकल्याने विचार करून या अधिनियमात सुधारणा करण्यात येत आहे.
त्यामुळे राज्यातील महानगरपालिका, नगर परिषदा व नगरपंचायती यांच्या हद्दीमधील क्षेत्र तसेच महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, 1966 अन्वये स्थापन केलेली महानगर प्रदेश विकास प्राधिकरणे व विशेष नियोजन प्राधिकरणे यांच्या अधिकारक्षेत्रातील क्षेत्रे तसेच प्रादेशिक योजनेमध्ये निवासी, वाणिज्यिक, औद्योगिक किंवा इतर कोणत्याही अकृषिक वापरासाठी नेमून दिलेली क्षेत्रांमधील जमिनींना आता तुकडेबंदीचा हा नियम लागू राहणार नाही. या कायद्याच्या तरतुदीमध्ये अशा क्षेत्रामध्ये निवासी, वाणिज्यिक, औद्योगिक, सार्वजनिक किंवा निमसार्वजनिक किंवा कोणत्याही अकृषिक वापराकरिता वाटप केले असेल किंवा अशी जमीन, कोणत्याही खऱ्याखुऱ्या अकृषिक वापराकरिता वापरण्याचे उद्देशित केले असेल तर, अशा जमिनीचे हस्तांतरण अथवा विभाजन हे कोणतेही शुल्क आकारणी न करता मानीव नियमित झाले आहेत असे समजण्यात येईल, अशी सुधारणा करण्यात येणार आहे.
या सुधारणेमुळे कायद्याचे ज्ञान नसताना किंवा कायद्याची कठोरता न समजता झालेल्या जमिनीच्या व्यवहारांना एक वेळची संधी देऊन ते नियमित करण्यात येणार आहेत. अशा जमिनींवरील वाद संपुष्टात येऊन त्यांना कायदेशीर दर्जा मिळणार आहे. यातून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले भूमापन आणि महसूल नोंदीमधील अडचणी दूर होणार आहेत. नागरिकांना या तुकड्यांचा कायदेशीर वापर करता येणार आहे, किंवा त्यांची विक्री करता येणार आहे.
‘फिक्की फ्रेम्स – अ सिल्वर जुबली ऑफ व्हिजन’ मुलाखत प्रसंगी केले आश्वस्त
सायबर क्राईम विरोधात “डिजिटल वॉरफेअर” मध्ये सहभागी होण्याचे चित्रपट उद्योगाला आवाहन
मराठी नाटक व सिनेमा आशयघन दर्जेदार; मराठी चित्रपटांना चांगले दिवस
मुंबई, दिनांक ७ ऑक्टोबर :- मनोरंजनाची राजधानी असलेल्या मुंबई मध्ये चित्रपट उद्योगासाठी आवश्यक परिसंस्था संपूर्ण विकसित झाली असून मुंबई चित्रनगरीचा येत्या चार वर्षात संपूर्णपणे कायापालट करण्यात येईल. चित्रपट निर्मिती क्षेत्रासाठी आवश्यक निर्मिती पासून प्रदर्शना पर्यंत आवश्यक सुविधासह चित्रपट नगरीचा विकास असेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
फिक्की फ्रेम्स – अ सिल्वर जुबली ऑफ व्हिजन’ कार्यक्रमात अभिनेते अभिनेते अक्षय कुमार यांनी त्यांचे मुलाखत घेतली. यावेळी मराठी व हिंदी चित्रपटसृष्टी आणि चित्रनगरीच्या विकासाबाबत प्रश्नांना उत्तर दिली.
चित्रपट क्षेत्रातील विखुरलेल्या घटकांसाठी चित्रनगरीला आयकॉनिक स्वरूप
मुख्यमंत्री म्हणाले, सिनेमाच्या आणि चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात मुंबईचे महत्त्वपूर्ण स्थान असून येथे चित्रपट उद्योगासाठी आवश्यक परिसंस्था विकसित झाली आहे. सळसळत्या उत्साहाने भारावलेल्या या क्षेत्रातील निर्मिती पासून प्रदर्शना पर्यंत आवश्यक संकलन, चित्रीकरण याचे संबंधित तंत्रज्ञान याचा मोठा विस्तार झाला आहे. मुंबई शहरालगत कर्जत , मीरा-भाईंदर असे अनेक ठिकाणी चित्रीकरण साठी स्टुडिओ निर्माण झाले आहेत. विखुरलेल्या स्वरूपात असलेल्या या चित्रपट उद्योगाला आधुनिक रूप देण्याचे काम येत्या काळात चित्रनगरीच्या माध्यमातून केले जाईल. चित्रपट क्षेत्रातील विखुरलेल्या घटकांसाठी सुविधा व कायापालट द्वारे चित्रनगरीला आयकॉनिक स्वरूप आयकॉनिक स्वरूप देण्यासाठी पाऊल टाकली जात आहेत.
दर्जेदार मराठी चित्रपट आणि नाटके अभिनव निर्मितीमुळे सक्षम
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले ,आशयघन व दर्जेदार मराठी चित्रपट आणि मराठी नाटके दर्शकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असून त्यातील प्रयोगाशीलता आणि अभिनव निर्मितीमुळे सक्षम ठरत आहे. मराठी सिनेमागृह न मिळण्याचा काळ मागे पडला असून आता एकाच वेळी दोन दोन मराठी सिनेमे प्रदर्शित होतात आणि हाउसफुल होतात असे सांगून नटरंग, सखाराम बाईंडर यासह आत्ताचा दशावतार या चित्रपटांचा उल्लेख त्यांनी केला.
भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी येथे चित्रपट मुहूर्तमेढ रोवली. आज पर्यंतच्या काळात असंख्य हिंदी व मराठी चित्रपटांनी भावनाप्रधान कथानकातून मनामध्ये विशिष्ट स्थान निर्माण केले आहे. सर्व सामान्य दर्शकांना जीवन जगण्याची प्रेरणा देण्याचे काम केले आहे. आत्ताच्या पिढीस ( gen – z) भावणारे व आवडणारे चित्रपट येण्यासाठी प्रयत्न केले जावेत. यातून ते चित्रपटांशी जोडले जातील.
“डिजिटल वॉरफेअर” मध्ये सहभागी होण्याचे चित्रपट उद्योगाला आवाहन
माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात सायबर क्राईम च्या रूपाने आव्हान उभे राहत आहेत. शासन अशा गुन्हेगारी प्रकारांना आळा घालण्यासाठी यंत्रणांच्या कामकाजात अमूलाग्र बदल घडवत आहे. गैरप्रकार नियंत्रित करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज अशा यंत्रणा कार्यान्वित केल्या जात आहेत. चित्रपट हे उत्कृष्ट समाजमाध्यम आहेत, या बदलाचा साक्षीदार होऊन अशा विषयांवर आधारित कथा आधारित सिनेमे निर्माण केले जावेत, यामधून या प्रयत्नांना बळ मिळेल. सायबर क्राईम, सेक्सटॉर्शन, सायबर फ्रॉड अशा बाबत जनसामान्यांना जागृत करणाऱ्या चित्रपटांतून हे घडू शकेल. यासाठी सायबर क्राईम विरोधात "डिजिटल वॉरफेअर" मध्ये सहभागी होण्याचे चित्रपट उद्योगाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी आवाहन केले.
यावेळी त्यांनी मुंबई शहरातील रस्ते विकास कामे, पोलिस दल, पायाभूत सुविधांची कामे, भुयारी मार्ग, मेट्रो, शहरातील वाहतूक व्यवस्था या अनुषंगाने प्रश्नांची उत्तरे देत, मुंबई शहरातील विकास कामे पूर्ण झाल्यानंतर 59 मिनिटात शहरातील एका ठिकाणावरून दुसऱ्या कोणत्याही ठिकाणावर जाता येईल, मुंबईकरांच्या प्रवास वेळेत बचत होईल, असे सांगितले.
या प्रकट मुलाखत प्रसंगी ‘ फिक्की’ चे अनंत गोयंका,’ मेटा’ च्या संध्या देवनाथन, आशिष कुलकर्णी, अर्जुन लोहार , दीपेंद्र सिंह कुशवाह उपस्थित होते. तसेच चित्रपट, प्रसार आणि समाज माध्यम क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 00000
पुणे, दि. ७ ऑक्टोबर २०२५ – जसे मनपा प्रशासन दररोज आपल्या अधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा घेते, तसेच ठेकदारांच्या कामाचा देखील नियमित आढावा घेणे आवश्यक आहे, असे परखड मत पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी व्यक्त केले.
ही भूमिका त्यांनी कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) व पुणे मनपा सुरक्षा विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आरोग्य शिबिरात मांडली. सदर कार्यक्रम ESIC लोकल कमिटी सदस्य सुनील शिंदे यांच्या सहकार्याने पार पडला.
आयुक्त राम म्हणाले, “पुणे मनपाच्या विविध ठिकाणी भेट दिल्यानंतर कंत्राटी कामगारांना वेळेवर पगाराची स्लिप न मिळणे, युनिफॉर्मचा अभाव, तसेच सुरक्षा व स्वच्छतेसाठी आवश्यक साहित्य न मिळणे अशा अनेक अडचणी आढळून आल्या. सर्व कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळणे हे माझे प्राधान्य आहे. याच उद्देशाने मी स्वतः या कार्यक्रमाला हजेरी लावली.”
ते पुढे म्हणाले, “पुणे मनपाची सीमा वाढली आहे, पण कर्मचारी संख्या पूर्वीप्रमाणेच असून तीही कमी झाली आहे. मात्र मी कधीच कंत्राटी व कायम कामगारांमध्ये भेदभाव करत नाही. सर्व कामगारांना त्यांच्या हक्कांचे रक्षण मिळाले पाहिजे. त्यामुळे यंदा कंत्राटी कामगारांनाही कायद्यानुसार बोनस दिला जाणार असून त्यांची दिवाळी गोड होणार, याबाबत मी सर्वांना आश्वस्त करतो.”
या वेळी ESIC वैद्यकीय अधीक्षक डॉ. अभिमन्यू पांडा यांनी रुग्णालयाच्या कार्यपद्धतीबाबत माहिती दिली, तर ESIC चे संयुक्त निदेशक श्री. सुकांता दास यांनी ‘SPREE’ योजनांची माहिती उपस्थितांना दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनपा शाखा व्यवस्थापक सौ. तृप्ती घोडके यांनी केले. कार्यक्रमाची सांगता सुरक्षा अधिकारी राकेश विटकर यांनी आभारप्रदर्शनाने केली.
पुणे:आपल्या देशातील व्यवस्था दर्शवणारी तीन नाटके मला करता आली. कोणती व्यवस्था कुठे वळते आणि काय करते हे नेमकेपणाने दाखवता आले. राजकारणात कोणावर लक्ष्य ठेवून गळ लावला जातो हे दिसून येते.१९७५ साली “सामना” चित्रपट लेखन विजय तेंडुलकर यांनी केले आणि त्या चित्रपटाची निर्मिती झाली. “मारुती कांबळेचे काय झाले” पात्र त्यावेळी खूप प्रसिद्ध झाले. काळाचे संदर्भानुसार दलीत राजकारण आता बदलले आहे. देश स्वातंत्र्य करण्यास महात्मा गांधी यांनी प्रचंड कष्ट घेतले आहे. एका अंगावरील कपड्यावर त्यांनी प्रचंड ब्रिटिश सत्ता विरोधात लढा दिला ही असामान्य बाब आहे. नंतर जन्मलेल्या लोकांनी त्यांनी स्वातंत्र्य कसे मिळवले हे विचारणे योग्य नाही असे मत ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ.जब्बार पटेल यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी तर्फे ” राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहाचे” आयोजन गांधी भवन कोथरूड याठिकाणी करण्यात आले आहे. याप्रसंगी ज्येष्ठ अभिनेते डॉ.मोहन आगाशे, गांधी समितीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी,साधना मासिकाचे संपादक विनोद शिरसाठ , डॉ.शिवाजी कदम, लक्ष्मीकांत देशमुख, सचिव अन्वर राजन , डॉ.एम एस जाधव, स्वप्नील तोंडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला संविधान उद्देशिका वाचन करण्यात आले. याप्रसंगी विनोद शिरसाठ यांनी डॉ.जब्बार पटेल आणि डॉ.मोहन आगाशे यांची मुलाखत घेतली.
डॉ.जब्बार पटेल म्हणाले, माझे वडील रेल्वे मध्ये गार्ड म्हणून काम करत होते. सोलापूर सारख्या ठिकाणी घरात कोणती संगीत पार्श्वभूमी नव्हती. मात्र, घरासमोर गणपती उत्सव साजरा होत. त्याठिकाणी एका नाटक मध्ये काम केले. अभिनेता होणे ही एक प्रक्रिया आहे. आरशा समोर बसून मेकअप करणे, संबंधित व्यक्तीरेखाचे कपडे घालणे त्यावेळी कलाकाराचे व्यक्तिमत्व घडत जाते. लहानपणीची रंगभूमी, स्टेज आणि मेकअप गंध अनेक वर्षांनंतर देखील आज माझ्या मनात आठवणीत आहे. वयाच्या १२ व्या वर्षी नाटक बाबत माहिती मिळाली.साहित्य, संस्कृती याची जाण असणे गरजेचे असते. विजय तेंडुलकर यांचे ” माणूस नावाचे एक बेट” नाटक लेखन मला खूप भावले. पुण्यात बी.जे.मेडिकल महाविद्यालयात मी शिक्षण घेताना वास्तव्यास असताना, मोहन आगाशे आणि कुमार सप्तर्षी माझ्या सोबत शिक्षण घेत होते.त्याकाळी सप्तर्षी यांच्यात चळवळीत काम करत असल्याने पुढारीपण होते तर आगाशे यांच्याकडे कलागुण होते. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत पहिले नाटक “बळी” केले आणि त्याला चांगले यश मिळाले. विजय तेंडुलकर यांनी घाशीराम कोतवाल नाटकाचे लेखन केले.विजय तेंडुलकर यांना नाटक लिहिताना अनेक दबाव होता पण त्यांनी तटस्थ लेखन केले.प्रत्येक राज्य व्यवस्था मध्ये एक प्रमुख व्यक्ती असते आणि ती घाशीराम कोतवाल निर्माण करतात. त्यांचा वापर झाला की, त्या लोकांना फेकून देतात अशी सर्वत्र परिस्थिती आहे हे वास्तव नाटक मधून मांडले.१९ प्रयोग झाल्यावर प्रखर विरोध सुरू झाला आणि संस्थेचे प्रमुख यांनी राजीनामा दिल्याने हे क्लेशदायक असल्याने नाटक बंद केले. त्यानंतर आम्ही थिएटर अकॅडमी सुरू केली. एक वर्षाने ते नाटक आम्ही परत सुरू केले.लोकांनी ते नाटक डोक्यावर घेतले आणि त्याचे ८०० पेक्षा अधिक प्रयोग देश परदेशात झाले. महाराष्ट्राच्या माती मध्ये एक गुण आहे ज्या माणसाने कष्ट केले त्याचे मूळ तो कोणत्याही क्षेत्रात असला तरी त्याला लोक विसरत नाही. त्याकाळी नाटक करण्यासाठी तरुणाईने अनेकजण जिद्दीने पेटलेले होते. आम्ही राजकारण बद्दल कधी बोलत नाही, आम्हाला नाटक, दिग्दर्शन आवडते. प्रत्येक माणसात एक चांगलेपण असते. अटलबिहारी वाजपेयी यांनीं “उंबरठा ” हा माझा चित्रपट पाहून अभिनेत्री स्मिता पाटील हिला फोन करून त्यांनी सविस्तर चर्चा करत “तू मला खूप रडवले” म्हणाले. घाशीराम कोतवाल नाटक त्यांना हिंदीपेक्षा मराठी भाषा मध्ये आवडले होते. अरुण सरनाईक यांनी मला सामना चित्रपट शूटिंगवेळी ” गोडबोले” नाव यांनी ठेवले होते.
डॉ.मोहन आगाशे म्हणाले, बी जे मेडिकल कॉलेज मध्ये जब्बार हे नाटक करण्यामध्ये प्रसिद्ध होते. कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये जब्बार यांच्याकडे सर्व विद्यार्थी नाटक शिकण्यासाठी गळ घालण्यास जात. जब्बार शिस्तप्रिय होता. दिग्दर्शक म्हणून तो कडक भूमिका घेत असल्याने त्याची दहशत होती. त्याच्या सांगण्यानुसार मी काम करत गेलो. हॉस्पिटल मध्ये काम करतानाच नाटक सराव मध्ये आम्ही गुंतलेले असत. घाशीराम कोतवाल नाटक नंतर जो सामाजिक विरोध झाला त्याकाळात कसे सामंजस्यपणे जब्बार वागला आणि मन स्थिर ठेवून परत नवीन नाटक सुरवात केली हे मला समजत नव्हते. नाटक, साहित्य,संगीत, कला या गोष्टी समाजातील विविध लोकांना एकत्रित आणतात. घाशीराम हे विशिष्ट परिस्थिती मधील व्यक्तिरेखा आहे.”मारुती कांबळेचे काय झाले” हा नेहमी वेगवेगळ्या प्रवृत्ती मध्ये असणार आहे. त्यामुळे ५० वर्षा नंतर देखील हा प्रश्न कायम राहणार आहे.
कुमार सप्तर्षी म्हणाले, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनावेळी जातीवाद संपुष्टात येऊन भाषावाद निर्माण झाला.कलाकार असला तरी त्याची वैचारिक बैठक महत्वाची असते. कला ही आभासी असते ती प्रत्यक्ष वस्तुस्थिती मध्ये दिसत नाही.
वॉशिंग्टन -संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) काश्मीरवर खोटा प्रचार केल्याबद्दल भारताने मंगळवारी पाकिस्तानवर जोरदार टीका केली. खुल्या चर्चेदरम्यान, संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे राजदूत पर्वतनेनी हरीश म्हणाले, “पाकिस्तान हा असा देश आहे जो स्वतःच्या लोकांवर बॉम्बस्फोट करतो आणि नरसंहार करतो.”हरीश म्हणाले, “जो कोणी स्वतःच्या लोकांवर बॉम्बस्फोट करतो आणि ४,००,००० महिलांवर बलात्कार करण्यासारखे अमानुष गुन्हे करतो त्याला इतरांना शिकवण्याचा अधिकार नाही. ते म्हणाले की, पाकिस्तान जगाचे लक्ष विचलित करण्यासाठी आणि दिशाभूल करण्यासाठी खोटेपणा आणि अतिशयोक्ती वापरतो.”
काश्मिरी महिलांना गेल्या अनेक दशकांपासून लैंगिक हिंसाचाराचा सामना करावा लागत असल्याचा आरोप एका पाकिस्तानी अधिकाऱ्याने केल्यानंतर हरीश यांनी हे विधान केले. जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि नेहमीच राहील, असा पुनरुच्चार भारताने केला.
हरीश म्हणाले, “पाकिस्तान हा तोच देश आहे ज्याने १९७१ मध्ये ऑपरेशन सर्चलाइट सुरू केले आणि आपल्या सैन्याला ४,००,००० महिला नागरिकांच्या हत्याकांड आणि सामूहिक बलात्काराची पद्धतशीर मोहीम राबवण्याची परवानगी दिली.” ते पुढे म्हणाले, “जगाला पाकिस्तानचा हा खोटा प्रचार चांगलाच समजला आहे.”
"A country that bombs its own people, conducts systematic genocide can only attempt to distract the world with misdirection and hyperbole", India's envoy to UN @IndiaUNNewYork@AmbHarishP slams Pakistan after the country rakes anti India issues at UNSC pic.twitter.com/t80HYwJlVz
१९७१ मध्ये ऑपरेशन सर्चलाइट अंतर्गत पाकिस्तानी सैन्याने पूर्व पाकिस्तानमध्ये (आता बांगलादेश) क्रूर कारवाई सुरू केली, ज्यामध्ये ३० लाख लोक मारले गेले आणि महिला नागरिकांवर बलात्कार केले गेले. २२ सप्टेंबर रोजी, पाकिस्तानी सैन्याने पाकिस्तानातील वझिरीस्तानमधील खैबर पख्तूनख्वा येथील तिरह खोऱ्यात कोणतीही पूर्वसूचना न देता बॉम्ब टाकले. या हल्ल्यात तीस लोक ठार झाले.
स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, पाकिस्तानी हवाई दल या हल्ल्यांद्वारे दहशतवादी संघटना तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) ला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत होते. तथापि, या हल्ल्यांमध्ये दहशतवाद्यांपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला.
गेल्या आठवड्यात भारतानेही पाकिस्तानला फटकारले. जिनेव्हा येथे झालेल्या मानवाधिकार परिषदेच्या बैठकीत भारतीय अधिकारी के.एस. मोहम्मद हुसेन म्हणाले की, पाकिस्तानचा मानवी हक्कांचा जगातील सर्वात वाईट रेकॉर्ड आहे.
ते म्हणाले, “जो देश स्वतःच्या धार्मिक आणि वांशिक अल्पसंख्याकांवर अत्याचार करतो तो इतरांना मानवी हक्कांवर व्याख्यान देऊ शकत नाही. पाकिस्तानचा खरा चेहरा आता जगासमोर आला आहे.”
ATMमधून पैसे काढण्यासाठी आणि UPI पिन सेट करण्यासाठी देखील फिंगरप्रिंटचा होणार वापर
नवी दिल्ली- UPI वापरकर्ते आता त्यांच्या चेहऱ्याचा आणि फिंगरप्रिंटचा वापर करून पेमेंट करू शकतील. केंद्र सरकारने आज, ७ ऑक्टोबर रोजी UPI चालवणारी एजन्सी NPCI च्या नवीन बायोमेट्रिक फीचर्सना मान्यता दिली.NPCI लवकरच त्यांच्या वापरकर्ता पुस्तिका आणि अंमलबजावणी तारखेची माहिती जाहीर करेल. त्यात म्हटले आहे की, ही नवीन पद्धत UPI पेमेंट सोपे, सुरक्षित आणि अधिक वापरकर्ता-अनुकूल बनवेल. नवीन फीचर्समुळे UPI पेमेंट पर्यायी करण्यासाठी पिनची आवश्यकता कमी होईल.
जरी तुम्ही नवीन यूपीआय वापरकर्ता असाल किंवा तुमचा पिन विसरला असाल, तरीही तुम्ही तुमचे फिंगरप्रिंट वापरू शकाल. नवीन वैशिष्ट्यांसह, तुम्हाला तुमची डेबिट कार्ड माहिती प्रविष्ट करण्याची किंवा ओटीपीवर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही. तुम्ही तुमच्या फिंगरप्रिंटने थेट तुमचा यूपीआय पिन सेट किंवा रीसेट करू शकता. जेव्हा तुम्ही यूपीआय वापरून एटीएममधून पैसे काढता तेव्हा तुमच्या पिन व्यतिरिक्त बायोमेट्रिक प्रमाणीकरण वापरले जाईल. यामुळे कार्ड बाळगण्याची किंवा तुमचा पिन लक्षात ठेवण्याची गरज नाही. प्रश्नोत्तरातील संपूर्ण माहिती येथे जाणून घ्या…
प्रश्न १: हे बायोमेट्रिक पेमेंट काय आहे?
उत्तर: बायोमेट्रिक पेमेंटमध्ये फिंगरप्रिंट्स आणि फेस आयडी सारख्या अद्वितीय भौतिक वैशिष्ट्यांचा वापर केला जातो. हे पिन किंवा पासवर्डपेक्षा अधिक सुरक्षित आणि सोपे आहेत. कारण ते कॉपी करणे कठीण आहे. उदाहरणार्थ, तुम्ही तुमचा स्मार्टफोन तुमच्या फिंगरप्रिंट किंवा फेस आयडी वापरून अनलॉक करू शकता.
प्रश्न २: नवीन प्रणाली कशी काम करेल?
उत्तर: जेव्हा एखादा वापरकर्ता UPI वापरून पेमेंट करतो, तेव्हा पिन टाकण्याऐवजी, त्यांचा फोन त्यांना चेहऱ्याची ओळख किंवा फिंगरप्रिंट स्कॅनिंगसाठी विचारेल. ते त्यांच्या अंगठ्याचा ठसा किंवा चेहऱ्याचा वापर करून UPI पेमेंट करू शकतात. प्रश्न ३: नवीन वैशिष्ट्ये किती सुरक्षित असतील?
उत्तर: नवीन पेमेंट सिस्टमसाठी बायोमेट्रिक डेटा थेट भारत सरकारच्या आधार सिस्टममधून काढला जाईल. याचा अर्थ असा की पेमेंट मंजूर करण्यासाठी तुमचा डेटा तुमच्या आधार कार्डमध्ये साठवलेल्या बायोमेट्रिक माहितीशी जुळवून घेतला जाईल. ही पद्धत सुरक्षित मानली जाते कारण ती आधारशी जोडलेली आहे.
प्रश्न ४: बायोमेट्रिक पेमेंट का सुरू केले जात आहे?
उत्तर: बायोमेट्रिक प्रमाणीकरणामुळे पिनपेक्षा फसवणुकीचा धोका कमी असतो. तज्ञांचा असा विश्वास आहे की, यामुळे ग्रामीण भागात डिजिटल पेमेंटचा वापर लक्षणीयरीत्या वाढेल, जिथे स्मार्टफोनची सुविधा सामान्य आहे, परंतु पिन लक्षात ठेवणे किंवा टाइप करणे कठीण आहे.
प्रश्न ५: नवीन फीचर्स कधी लाँच केली जातील?
उत्तर: एनपीसीआय मुंबईत सुरू असलेल्या ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हलमध्ये हे नवीन बायोमेट्रिक फीचर्स जगासमोर आणण्याची योजना आखत आहे. ते उद्या, ८ ऑक्टोबर रोजी लाँच केले जाऊ शकते.
प्रश्न ६: सर्व UPI अॅप्समध्ये हे फीचर्स असेल का?
उत्तर: हो, जवळजवळ सर्व UPI अॅप्स याला सपोर्ट करतात. सुरुवातीला, हे फीचर Google Pay, PhonePe आणि Paytm सारख्या प्रमुख UPI अॅप्समध्ये उपलब्ध असू शकते.
पुणे ग्रँड चॅलेंज टूर सायकल स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा तयार कराव्यात – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार
पुणे, दि. ७: पुणे ग्रँड चॅलेंज टूर सायकल स्पर्धा देशाच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. स्पर्धेसाठीचे रस्ते, आरोग्य व्यवस्था आदी पायाभूत सुविधा आणि सुरक्षितता या बाबी आंतराष्ट्रीय स्पर्धेच्या निकषानुसार आणि दर्जेदार तयार कराव्यात. या कामांना सर्व संबंधित यंत्रणांनी सर्वाधिक महत्त्व द्यावे; गुणवत्तेच्या बाबतीत कोणतीही तडजोड होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले. ही स्पर्धा १९ ते २३ जानेवारीदरम्यान होणार आहे.
पुणे ग्रँड चॅलेंज टूर सायकल स्पर्धेत संदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील (दूरदृश्यप्रणालीद्वारे), पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल आदी उपस्थित होते.
डॉ. पुलकुंडवार म्हणाले, पुणे ग्रँड चॅलेंज टूर ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा पुण्यात प्रथमच होत असून अभिमानाची बाब आहे. ही आपल्यासाठी आणि देशासाठी अत्यंत महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. स्पर्धेच्या आयोजनासाठी दर १५ दिवसांनी बैठक घेऊन कामकाजाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात येणार आहे. आपल्याला भविष्यात ऑलिम्पिक स्पर्धा भरविण्याच्यादृष्टीने ही सायकलिंग स्पर्धा महत्त्वाची आहे, असेही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, स्पर्धेसाठीचे रस्ते आंतरराष्ट्रीय सायकलिंग असोसिएशनच्या (युसीआय) मानकांनुसार तयार करायचे आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी या रस्त्यांची कामे करुन घेताना सर्वत्र एकसमानता राहील याकडे लक्ष द्यावे. त्रयस्थ संस्था नेमून केलेल्या कामांचे वेळोवेळी परिक्षण करण्यात यावे. रस्त्यांचे काम पुढील आठवड्यापासूनच सुरू होईल याची दक्षता घ्यावी.
सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (सीएफआय) यांनी स्पर्धेच्या मार्गावरील अपघात होऊ शकतात अशी ठिकाणे निश्चित करुन दिली असून तेथे आवश्यक त्या उपाययोजना पोलीस तसेच संबंधित विभागांनी कराव्यात. मार्गावर दुचाकी, अन्य वाहने, व्यक्ती, प्राणी येऊ शकतील अशी ठिकाणे शोधून स्पर्धेपूर्वी ती प्रवेशासाठी बंद करण्याच्या सर्व उपाययोजना कराव्यात. आरोग्य विभागाने मार्गावरील शासकीय रुग्णालये अद्ययावत करावीत तसेच जवळची खासगी रुग्णालये अत्यावश्यक सुविधेसाठी निश्चित करावीत. आपत्तकालीन परिस्थिती, अपघातप्रसंगी सावधानता म्हणून हेलिकॉप्टर सेवा घेण्याची तयारी असावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
पोलीस विभागाने बंदोबस्त आराखडा तयार करून नेमण्यात येणारे मनुष्यबळाचे प्रशिक्षण तसेच रंगीत तालिम सुरू करावी. सर्वच विभागांनी संबंधित स्पर्धेच्या अनुषंगाने नेमण्यात येणाऱ्या मनुष्यबळाची स्पर्धा संपेपर्यंत बदली करु नये. याबाबत शासनालाही विनंती करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
जिल्हाधिकारी श्री. डूडी म्हणाले, १९ ते २३ जानेवारीदरम्यान ही स्पर्धा होणार असून स्पर्धेला आंतरराष्ट्रीय सायकलिंग असोसिएशनची मान्यता मिळाली आहे. त्यांच्या संकेतस्थळावरील दैनंदिनीमध्ये या स्पर्धेची नोंद घेण्यात आली असून त्यावर आपल्या स्पर्धेच्या संकेतस्थळाची लिंक देण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत ६ ते ७ देशांनी आपला सहभाग नोंदविण्याच्यादृष्टीने संपर्क केला असून जवळपास ५० देश सहभागी होण्याची अपेक्षा आहे.
ऑलिम्पिक स्पर्धा भरविण्याच्या दावेदारीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील सायकलिंग, जलतरण, जिम्नॅस्टिक्स, ॲथलेटिक्स स्पर्धा यशस्वीपणे आयोजित करणे आवश्यक असून त्यादृष्टीने या स्पर्धेचे महत्त्व आहे. ही स्पर्धा पुढे दरवर्षी भरविण्याच्यादृष्टीने यशस्वी करणे महत्त्वाचे आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी डॉ. म्हसे यांनीही विविध सूचना केल्या. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर यांनी तसेच पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी रस्त्यांच्या तयारीच्या अनुषंगाने माहिती दिली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ येमपल्ले यांनी आरोग्य सुविधेविषयक सादरीकरण केले.
पुणे, दि. 7: गोवा राज्य सरकारच्या दिव्यांगजन सक्षमीकरण विभागातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट गोवा २०२५’ सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ‘पर्पल फेस्ट गोवा एक्सपेडिशन’च्या वाहनाला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी हिरवी झेंडी दाखवून मोहिमेला शुभेच्छा दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात झालेल्या या कार्यक्रमास जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी राधाकिसन देवढे आदी उपस्थित होते.
भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या दिव्यांगजन सक्षमीकरण विभाग आणि संयुक्त राष्ट्र संघ भारतातील कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने गोवा राज्य सरकारच्या दिव्यांगजन सक्षमीकरण विभागातर्फे ‘आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट गोवा २०२५’ सोहळ्याचे ९ ते १२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत पणजी, गोवा येथे आयोजन करण्यात येणार आहे.
सोहळ्याला अधिक समावेशक स्वरूप देण्यासाठी कानपूर येथील सुनील मंगल यांच्या नेतृत्वाखाली ‘पर्पल फेस्ट गोवा एक्सपेडिशन’ या विशेष मोहिमेचे कानपूर येथून आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्यासोबत ग्वाल्हेर आणि चंदीगड येथूनही दोन वाहने सहभागी झाली आहेत.
दिव्यांग व्यक्तीच्या क्षमतांचा सन्मान करण्यासाठी, तसेच त्यांच्या हक्कांचे समर्थन करण्यासाठी सर्व स्तरातील नागरिकांना एकत्र आणून या माहिमेला सर्व नागरिकांनी, संस्था, व्यावसायिक संस्था आणि सामाजिक संस्थांनी पाठिंबा देण्याकरिता ‘आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट गोवा २०२५’ आयोजित केला जातो. यामध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले.
पुणे : तुमको देखा तो ये खयाल आया.., स्वप्नांचे वय कायम सोळा.., सलोना सा साजन.., रंजीशे जो है.., अशा मराठी हिंदी, नव्या – जुन्या गाजलांचा सुरेख मिलाफ असलेल्या “ग़ज़लियत” दिल की दास्ता’ ची मैफल कोजागरी पौर्णिमेनिमित्त एम ई एस सभागृह, बाल शिक्षण मंदिर, कोथरूड येथे रंगली. सन्मिता धापटे शिंदे यांनी सादर केलेल्या का कार्यक्रमाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमास महिला व बालविकास विभागाचे सहआयुक्त राहूल मोरे, (अधीक्षक, कस्टम) सुरेश सोनावणे, सहसंचालक साखर आयुक्तालंय सचिन रावळ,निर्माता निलेश नवलाखा, उदय जगताप, सोनाली तनपुरे,माजी नगरसेववक विजय खळदकर , नवनाथ जाधव,भारती दरेकर, विजयसिंह गायकवाड, लेखक शरद तांदळे, सुरेश वैराळकर ,महेश थोरवे, विनोद गलांडे, दर्शना सूर्यवंशी आदि मान्यवर उपस्थित होते.
कोजागरी पौर्णिमेनिमित्त सादर झालेल्या या कार्यक्रमांमध्ये सन्मिता धापटे शिंदे यांनी विविध गझल सादर करत उपस्थितांची मने जिंकली. ‘सूर नवा ध्यास नवा’ या स्पर्धेमध्ये त्यांना महागायिका या उपाधी सह विजयी घोषित केले गेले आहे. त्यांना दीप्ती कुलकर्णी, अपूर्व द्रविड, अपूर्व गोखले, कार्तिकस्वामी, रोहित कुलकर्णी यांनी साथ संगत केली. या कार्यक्रमामधून रुहान आणि उल्मेघ यांनी रसिकांसोबत संवाद साधत रंगत भरली.
पुणे, ७ ऑक्टोबर २०२५ :नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (एनएमआयएएल) उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असलेले उद्घाटन केवळ मुंबईकरांसाठीच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रासाठी एक ऐतिहासिक क्षण आहे. या विमानतळामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, सातारा, सोलापूरसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र विभागाला नव्या आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटीच्या, रोजगाराच्या आणि गुंतवणुकीच्या संधी निर्माण होतील, असे केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
मोहोळ म्हणाले, “नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड (एनएमआयएएल) ही महाराष्ट्रातील नवी मुंबई येथील ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाची रचना, विकास, बांधकाम, कामकाज, देखभाल, व्यवस्थापन व विस्तार आदी कामांसाठी स्थापन करण्यात आलेली कंपनी (स्पेशल पर्पज व्हेइकल) आहे. हा संपूर्ण विमानतळाचा प्रकल्प मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड आणि सिडको यांच्यातील सार्वजनिक-खासगी भागीदारीतील (पीपीपी) उभारण्यात येत आहे. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी पाहिलेल्या विकसित भारत २०४७ या उद्दिष्टपूर्तीसाठी महत्त्वाचा ठरणारा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भविष्यवेधी व्हिजनमुळे विमानतळाचे काम पूर्णत्वास आले असून, त्याचा फायदा संपूर्ण महाराष्ट्राला विविध क्षेत्रात होणार आहे.पुणेकरांना या विमानतळामुळे दुहेरी लाभ मिळणार आहेत. मुंबई विमानतळावरील गर्दीमुळे आंतरराष्ट्रीय उड्डाणांच्या स्लॉट्स मर्यादित आहेत, त्यामुळे आता नवी मुंबई विमानतळामुळे अधिक आंतरराष्ट्रीय फ्लाईट्सची उपलब्धता वाढेल. तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड आणि बारामती परिसरातील उद्योगांना निर्यातीसाठी जवळचे आणि आधुनिक मालवाहतूक केंद्र मिळेल.”
विमानतळावर उभारण्यात आलेले अत्याधुनिक मालवाहतूक टर्मिनल वर्षाला सुमारे ३.२ दशलक्ष मेट्रिक टन माल हाताळण्यास सक्षम आहे. यामुळे पुणे जिल्ह्यातील ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, फार्मा आणि एग्री-प्रोसेसिंग उद्योगांना निर्यात सुलभ होईल, असे मोहोळ यांनी सांगितले.
नवी मुंबई विमानतळ ठाणे, भिवंडी आणि जेएनपीटी बंदराच्या जवळ असल्यामुळे मुंबई ट्रान्स हार्बर लिंकमार्गे पुण्याहून थेट २.५ ते ३ तासांत पोहोचता येईल. यामुळे हवाई मालवाहतुकीचा कालावधी कमी होईल आणि निर्यात खर्चात घट होईल.
मोहोळ यांनी सांगितले की, “मुंबईच्या विस्ताराची नैसर्गिक दिशा आता पुण्याकडे येत आहे. या विमानतळामुळे पुणे-मुंबई महानगर प्रदेशात नव्या औद्योगिक कॉरिडॉरचा विकास वेगाने होईल. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा देशातील सर्वात प्रगत आणि शाश्वत विमानतळ म्हणून उभारण्यात आला आहे. ४७ मेगावॉट सौरऊर्जा निर्मिती, पावसाचे पाणी साठवण, आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर या सुविधांमुळे तो खऱ्या अर्थाने ‘ग्रीन एअरपोर्ट’ ठरणार आहे.”
मोहोळ यांनी नमूद केले की, “हा प्रकल्प महाराष्ट्राच्या शाश्वत विकासाच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. पुणेकरांसाठी हे पर्यावरणासह विकासाचे आदर्श उदाहरण ठरेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील हवाई प्रवास सामान्य नागरिकांसाठी सुलभ करण्याचा ‘उडान’ हा संकल्प प्रत्यक्षात उतरवला आहे. नवी मुंबई विमानतळ हे त्याच दृष्टीकोनाचे पुढचे पाऊल आहे. हा केवळ विमानतळ नाही, तर भारताच्या नव्या आर्थिक क्षितिजाचा प्रवेशद्वार आहे.” पुणे, पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील लोकांसाठी हा विमानतळ म्हणजे ‘ग्लोबल गेटवे टू ग्रोथ’ असल्याचे मोहोळ म्हणाले. “पुण्याच्या उद्योगांना, पर्यटन क्षेत्राला आणि नागरिकांना या विमानतळामुळे जागतिक स्तरावर पोहोचण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या दृष्टीने महाराष्ट्र नव्या विकासाच्या उंचीवर पोहोचेल,” असे त्यांनी नमूद केले.
तळेगाव आणि चाकण परिसरात अनेक बहुराष्ट्रीय उत्पादक कंपन्या ; तसेच वाहन उद्योग आहेत. त्याचप्रमाणे हिंजवडी, मारुंजी परिसरात नामांकित आयटी कंपन्यांची कार्यालये आहेत. या सर्व कंपन्यांना आणि कर्मचाऱ्यांना विमानतळाचा फायदा होणार आहे. या विमानतळामुळे पिंपरी चिंचवडमधील पुनावळे, किवळे, गहुंजे परिसराला महत्त्व प्राप्त होणार आहे
मुंबई : अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि पूरामुळे महाराष्ट्रातील २९ जिल्हे व २५३ तालुक्यांतील तब्बल ६८ लाख ६९ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांचे पिकाशी असलेले नाते हे पोटच्या लेकरासारखे असते. मात्र या आपत्तीमुळे जमीन खरडून गेली, पुन्हा पेरणी करण्याची स्थितीच उरली नाही आणि शेतकरी आर्थिक व मानसिकदृष्ट्या उध्वस्त झाले. या गंभीर परिस्थितीची दखल घेत राज्य मंत्रिमंडळाने आज ३१,६२८ कोटी रुपयांच्या ऐतिहासिक मदत पॅकेजला मंजुरी दिली आहे.
विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या निर्णयाचे स्वागत करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, संपूर्ण मंत्रिमंडळ तसेच केंद्र सरकारचे मनःपूर्वक आभार मानले. त्या म्हणाल्या – “शेतकऱ्यांचे नुकसान शंभर टक्के कुणीही भरून काढू शकत नाही. मात्र शेतकरी पुन्हा उभा राहावा, आत्मविश्वासाने शेतीला नवा श्वास द्यावा यासाठी हे पॅकेज नवसंजीवनी ठरेल. विरोधकांचे आरोप निराधार आहेत. राज्य-केंद्राने एकत्र येऊन घेतलेले हे ठोस पाऊल खऱ्या अर्थाने शेतकरीहिताचे आहे.”
या पॅकेजमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना थेट ₹६,१७५ कोटींची मदत, कोरडवाहू शेतीसाठी प्रति हेक्टर ₹१८,५००, हंगामी बागायतीसाठी ₹२७,०००, तर कायम बागायतीसाठी ₹३२,५०० अशी तरतूद आहे. सर्व शेतकऱ्यांना बियाणे व इतर कामांसाठी ₹१०,००० प्रति हेक्टर मदत मिळणार आहे. विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना विम्यामधून प्रति हेक्टर ₹१७,००० दिले जाणार आहे. खरडून गेलेल्या जमिनींसाठी ₹४७,००० रोख व ₹३ लाख नरेगामार्फत प्रति हेक्टर मदत दिली जाईल. जनावरांच्या नुकसानीसाठी ₹३७,५०० प्रती जनावर (अट रद्द करून), दुकानदारांना ₹५०,०००, तर विहिरींच्या नुकसानीसाठी ₹३०,००० प्रति विहीर भरपाई करण्यात येईल. तसेच पायाभूत सुविधांच्या दुरुस्तीसाठी तब्बल ₹१०,००० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.दुष्काळी उपाययोजना मधील कर्ज वसुलीसाठी स्थगिती, फी माफी सुद्धा लागू करण्यात आली आहे.पिकविम्याचे पैसेसुध्दा वेगळे देण्यात येणार आहेत.
विरोधकांकडून केंद्र सरकारने मदत केली नाही असे आरोप होत असतानाच डॉ. गोऱ्हे यांनी ठामपणे स्पष्ट केले की, “गेल्या दहा वर्षांत राज्य सरकारने अनेक वेळा केंद्राकडे मदतीसाठी मागणी केली आहे. केंद्र सरकार मदत करत नाही, असे म्हणणारे वस्तुस्थितीपासून दूर आहेत. प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी वेळ लागतो हे त्यांनाही ठाऊक आहे. तरीसुद्धा अज्ञानातून किंवा जाणूनबुजून दिशाभूल करण्यासाठी अशी टीका केली जाते. प्रत्यक्षात केंद्र आणि राज्य मिळून शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत, हे आजच्या निर्णयातून स्पष्ट झाले आहे.”
शेवटी डॉ. गोऱ्हे म्हणाल्या – “शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.हा निर्णय महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी आहे. ग्रामीण भाग पुन्हा उभारी घेईल आणि शेतकरी आत्मविश्वासाने शेतीत झोकून देईल, अशी मला खात्री आहे.”