‘रेसिफ्रेश टी.आर.’ किंवा ‘रिलाइफ’ या नावाने विकले जाणारे कोणतेही कफ सिरप वापरू नये.
हे सिरप विक्रीसाठी आढळल्यास स्थानिक एफडीए कार्यालयाला किंवा जवळच्या पोलिस ठाण्यात तात्काळ कळवावे
पुणे-खोकल्यावर उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या दोन कंपन्यांच्या कफ सिरपमध्ये धोकादायक रसायन ‘डायथिलीन ग्लायकॉल’ प्रमाणापेक्षा जास्त आढळल्याचे उघड झाल्यानंतर महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. ‘रेडनेक्स फार्मास्युटिकल्स प्रा. लि.’ आणि ‘शेप फार्मा प्रा. लि.’ या गुजरातमधील दोन कंपन्यांच्या सिरपमध्ये हे विषारी रसायन आढळले असून, एफडीएकडून 13 लाख रुपयांचा कफ सिरप साठा जप्त करण्यात आला असून, त्याची विक्री आणि वितरण तातडीने थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.एफडीएने तातडीने हालचाल करत ‘रेसिफ्रेश टी.आर.’ आणि ‘रिलाइफ’या कफ सिरपवर कारवाई केली. पुण्यातील साठ्यांवर छापे टाकून अंदाजे 13 लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. याशिवाय, संबंधित कंपन्यांना विक्री, वितरण आणि पुरवठा तात्काळ थांबविण्याचे लेखी आदेश देण्यात आले.
या प्रकरणामुळे केवळ औषध उत्पादक कंपन्यांमध्येच नव्हे, तर वैद्यकीय क्षेत्रातही मोठी खळबळ उडाली आहे. ‘रेडनेक्स फार्मास्युटिकल्स प्रा. लि.’ आणि ‘शेप फार्मा प्रा. लि.’ या गुजरातमधील दोन कंपन्यांच्या सिरपमध्ये हे विषारी रसायन आढळले असून, ही कारवाई सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.एफडीएकडून अलीकडेच पुणे विभागातून विविध कफ सिरपचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या नमुन्यांपैकी दोन कंपन्यांच्या सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकॉलचे प्रमाण अत्याधिक असल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालातून समोर आले. हे रसायन अत्यंत विषारी असून, मानवाच्या मूत्रपिंड, यकृत आणि मज्जासंस्थेवर गंभीर परिणाम करू शकते. काही प्रकरणांत या रसायनामुळे मृत्यूसुद्धा होऊ शकतो, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.
महाराष्ट्र राज्य अन्न व औषध प्रशासनाचे औषध नियंत्रक डी.आर. गव्हाणे यांनी सांगितले की, या दोन्ही उत्पादनांना दर्जाहीन आणि मानवासाठी धोकादायक घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यभरातील सर्व वितरक, घाऊक व्यापारी, विक्रेते, तसेच दवाखाने आणि डॉक्टरांना ही उत्पादने विकणे अथवा वापरणे पूर्णपणे बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या कफ सिरपच्या संबंधित बॅचचा साठा जर कोणाकडे असेल, तर तो स्थानिक एफडीए अधिकाऱ्यांना तातडीने कळवावा. अन्यथा त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. एफडीएच्या तपासानुसार, दोन्ही कंपन्यांची उत्पादन केंद्रे गुजरात राज्यात आहेत, मात्र त्यांचा साठा पुण्यातील घाऊक बाजारात आणि वितरकांकडे उपलब्ध होता. या ठिकाणी झडती घेऊन नमुने गोळा करण्यात आले. प्राथमिक तपासणीनंतर हा साठा जप्त करण्यात आला असून, आणखी ठिकाणीही तपास सुरू आहे.
डायथिलीन ग्लायकॉल हे औद्योगिक वापरासाठी वापरले जाणारे रसायन असून, ते कूलंट, अँटीफ्रिझ, ब्रेक फ्लुइड आणि इतर औद्योगिक द्रवांमध्ये वापरले जाते. हे रसायन मानवासाठी विषारी आहे आणि औषधांमध्ये त्याचा वापर अत्यल्प प्रमाणातसुद्धा घातक ठरू शकतो. कफ सिरप तयार करताना ग्लिसरीन किंवा प्रोपिलीन ग्लायकॉल यांचा वापर सॉल्व्हेंट म्हणून केला जातो. मात्र, काही वेळा उत्पादन प्रक्रियेत निष्काळजीपणा झाल्यास डायथिलीन ग्लायकॉल मिसळला जाण्याची शक्यता असते. यामुळे मानवी शरीरात गंभीर विषबाधा होऊ शकते. पूर्वीही या रसायनामुळे अनेक देशांमध्ये मोठे घोटाळे आणि मृत्यूच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे औषध निर्मितीत यावर कडक नियंत्रण ठेवले जाते.
एफडीएकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, ‘रेसिफ्रेश टी.आर.’ किंवा ‘रिलाइफ’ या नावाने विकले जाणारे कोणतेही कफ सिरप वापरू नये. तसेच, हे सिरप विक्रीसाठी आढळल्यास स्थानिक एफडीए कार्यालयाला किंवा जवळच्या पोलिस ठाण्यात तात्काळ कळवावे. एफडीएचे पुणे विभागाचे सहआयुक्त गिरीश हुकरे यांनी सांगितले की, ही कारवाई सार्वजनिक आरोग्याच्या सुरक्षेसाठी करण्यात आली आहे. आम्ही विविध ठिकाणांहून नऊ वेगवेगळ्या कफ सिरपचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. त्यापैकी दोन नमुन्यांमध्ये हे विषारी रसायन आढळल्याने कारवाई अपरिहार्य ठरली.
दोन्ही कंपन्यांविरुद्ध औषध व सौंदर्यप्रसाधने कायदा 1940 अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कंपन्यांच्या उत्पादन प्रक्रियेची तपासणी, वापरलेले कच्चे साहित्य, पुरवठादार आणि गुणवत्ता तपासणी प्रणाली याबाबत एफडीए सखोल चौकशी करत आहे. दरम्यान, पुण्यातील वितरक आणि घाऊक विक्रेत्यांकडील साठे जप्त करण्याची मोहीम सुरू असून, एफडीएचे पथक संपूर्ण राज्यभरातील औषध वितरण केंद्रांची तपासणी करत आहे. या घटनेमुळे औषध निर्मात्यांमध्ये सावधगिरी बाळगण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
एफडीए अधिकारी म्हणाले की, औषधांच्या गुणवत्तेच्या बाबतीत राज्य सरकार कोणतीही तडजोड करणार नाही. रुग्णांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनीही अधिकृत परवानाधारक कंपन्यांची उत्पादनेच वापरावीत. या घटनेनंतर पुणे तसेच राज्यातील वैद्यकीय क्षेत्रात सतर्कता वाढवण्यात आली आहे. सर्व औषध वितरकांना गुणवत्तेचे प्रमाणपत्र आणि प्रयोगशाळेचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पुणे-कोंढवा परिसरात मध्यरात्रीपासून मोठ्या प्रमाणावर सर्च ऑपरेशन सुरू असून, 18 ठिकाणी झडती घेण्यात येत आहे. या कारवाईत महाराष्ट्र पोलिस, पुणे पोलिस आणि केंद्र सरकारच्या तपास यंत्रणा सहभागी आहेत. काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या अचानक सुरू झालेल्या कारवाईमुळे केवळ पुणेच नव्हे, तर संपूर्ण राज्यात आणि देशभरातही खळबळ उडाली आहे.
Maharashtra | Multiple enforcement agencies, including Pune Police, are conducting searches in Pune’s Kondhwa area to trace suspects allegedly involved in anti-national activities: Pune City Police
कोंढवा परिसरात यापूर्वीही अशाच स्वरूपाची कारवाई झाली होती. दोन वर्षांपूर्वी बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनेच्या तिघांना पुणे पोलिसांनी याच भागातून अटक केली होती. त्या कारवाईनंतर देशातील मोठा संभाव्य दहशतवादी कट उधळण्यात पोलिसांना यश आले होते. आता पुन्हा एकदा त्याच भागात संयुक्त कारवाई सुरू असल्याने तपास यंत्रणा सावध झाल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून कोंढवा आणि आसपासच्या भागात काही संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मध्यरात्रीपासून शोधमोहीम राबवण्यात आली. पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्या संपर्कातील लोकांचीही माहिती घेतली जात आहे. परिसरात सुरक्षा तसेच पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
मुंबई – गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी कुख्यात गुंड नीलेश घायवळच्या भावाला, सचिन बन्सीलाल घायवळ याला शस्त्र परवाना दिल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीस परवाना देणे हे कायदा व सुव्यवस्थेला धक्का देणारे असल्याची टीका करत, अंधारे यांनी योगेश कदम यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून गुन्हेगाराला बळ दिले असल्याचा आरोप केला. त्यामुळे योगेश कदम यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी ट्विटर वरून केली आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, योगेश कदम यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करत एका गुंडाला अभय देण्याचा आणि त्याला बळ पुरवण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे त्यांना पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही.
काल कुख्यात गुंड निलेश घायवळ चा भाऊ सचिन बन्सीलाल घायवळ शस्त्र परवाना प्रकरणांमध्ये गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, शस्त्रपरवाना देत असताना कुठलाही गुन्हा दाखल नव्हता. सचिन घायवळ याच्यावर फक्त खुनाचा गुन्हा नाही तर मोक्का अंतर्गत सुद्धा गुन्हे दाखल होते. विशेष अशा… pic.twitter.com/8WA5lqh611
सुषमा अंधारे यांनी ट्विटर वर पोस्ट करत म्हटलंय की, काल कुख्यात गुंड नीलेश घायवळचा भाऊ सचिन बन्सीलाल घायवळ शस्त्र परवाना प्रकरणांमध्ये गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, शस्त्रपरवाना देत असताना कुठलाही गुन्हा दाखल नव्हता. सचिन घायवळ याच्यावर फक्त खुनाचा गुन्हा नाही तर मकोका अंतर्गत सुद्धा गुन्हे दाखल होते. विशेष अशा व्यक्तीला शस्त्र परवाना दिला जाऊ नये असा पोलिसांचा अहवाल होता. तरीसुद्धा योगेश कदम यांनी स्वतःच्या अधिकार कक्षेमध्ये हा विशेष परवाना देऊ केला. सुषमा अंधारे म्हणाल्या की, योगेश कदम यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करत एका गुंडाला अभय देण्याचा आणि त्याला बळ पुरवण्याचा प्रयत्न केला आहे सबब योगेश कदम तुम्हाला पदावर राहण्याचा अधिकार नाही तात्काळ गृहराज्यमंत्री पदाचा राजीनामा द्या. 1) कोथरूड पोलिस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 118 /2010 भा द वि कलम 143 147 ,148, 149 , 307, 427, 428 सह शस्त्र अधिनियम 1959 मधील कलम 3 4 25 व महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम 37 एक ,135 ,142 अन्वये गुन्हा दाखल आहे. 2) दत्तवाडी पोलिस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 82 ऑब्लिक 2010 भारतीय दंड विधान कलम 120 व 302 , 307, 343, 147, 148 , 149 सह शस्त्र अधिनियम 1959 मधील कलम 3, 4, 25 व महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम 37 1 सह 135 मोका कलम 3 (1)(१), 3 (1) (२) , 3(4) अन्वये गुन्हा दाखल आहे. 3) शिवाजीनगर पोलिस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 3082/2025 महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
शिक्षक व व्यावसायिक सचिन घायवळ यांनी माझ्याकडे केलेल्या शस्त्र परवाना अपील प्रकरणात, पोलिस विभागाकडून आलेल्या अहवालानुसार, सुनावणीच्या दिवशीपर्यंत त्यांच्या विरोधात कोणतेही गुन्हे प्रलंबित नव्हते.
उपलब्ध कागदपत्रे आणि मा. न्यायालयाच्या न्यायनिर्णयाने निर्दोष मुक्त केल्याच्या…
या आरोपानंतर आता गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी ट्वविटरवर पोस्ट-करत म्हटलंय की, शिक्षक व व्यावसायिक सचिन घायवळ यांनी माझ्याकडे केलेल्या शस्त्र परवाना अपील प्रकरणात, पोलिस विभागाकडून आलेल्या अहवालानुसार, सुनावणीच्या दिवशी पर्यंत त्यांच्या विरोधात कोणतेही गुन्हे प्रलंबित नव्हते. उपलब्ध कागदपत्रे आणि मा. न्यायालयाच्या न्याय निर्णयाने निर्दोष मुक्त केल्याच्या आदेशाचे अवलोकन करून, नियमानुसार सदर प्रकरणात आवश्यक ती कार्यवाही करण्यात आलेली आहे, म्हणूनच, सध्या चर्चेत असलेल्या अन्य प्रकरणाशी अपीला संदर्भात माझ्या नियमानुसार केलेल्या कारवाईला जोडणे हे पूर्णपणे चुकीचे व दिशाभूल करणारे आहे.
मध्य प्रदेशात २३ मुलांच्या मृत्यूला कारणीभूत कोल्ड्रिफ कफ सिरपची निर्मिती करणारी कंपनी श्रीसन फार्माचे संचालक गोविंदन रंगनाथन यांना अटक करण्यात आली आहे. मध्य प्रदेश सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) बुधवार आणि गुरुवारी मध्यरात्री तामिळनाडूतील चेन्नई येथे छापा टाकला आणि रंगनाथन यांना अटक केली.रंगनाथनवर २०,००० रुपयांचे बक्षीस होते. तो त्याच्या पत्नीसह फरार होता. चेन्नईमध्ये, चेन्नई-बेंगळुरू महामार्गावरील रंगनाथनचे २००० चौरस फूट क्षेत्रफळाचे अपार्टमेंट सील करण्यात आले, तर कोडंबक्कममधील त्याचे नोंदणीकृत कार्यालय बंद आढळले.
दरम्यान, कोल्ड्रिफ सिरपच्या चौकशीत एक मोठा खुलासा झाला आहे. तामिळनाडूच्या ड्रग्ज कंट्रोल डायरेक्टरच्या अहवालात हे सिरप नॉन-फार्मास्युटिकल ग्रेड केमिकल्सपासून बनवल्याचे उघड झाले आहे.चौकशीदरम्यान, कंपनीच्या मालकाने तोंडी कबूल केले की त्याने दोन शिपमेंटमध्ये प्रोपीलीन ग्लायकॉलच्या ५० किलोच्या दोन पिशव्या खरेदी केल्या होत्या. याचा अर्थ कंपनीने १०० किलो विषारी रसायन खरेदी केले होते. चौकशीदरम्यान कोणतेही बिल आढळले नाही, किंवा खरेदीची कोणतीही नोंद नोंदवण्यात आली नाही. चौकशीदरम्यान, तपास अधिकाऱ्यांना सांगण्यात आले की पैसे कधी रोखीने तर कधी जी-पे द्वारे दिले जात होते. औषध कंपनीने निकृष्ट दर्जाचे प्रोपीलीन ग्लायकॉल खरेदी केले. त्याची कधीही चाचणीही करण्यात आली नाही. धक्कादायक म्हणजे, कंपनीकडे खरेदीचे बिल किंवा वापरलेल्या रसायनांचे रेकॉर्ड नाहीत.
प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये असेही आढळून आले की सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकॉल (DEG) आणि इथिलीन ग्लायकॉल (EG) सारख्या विषारी रसायनांची उपस्थिती निर्धारित मर्यादेपेक्षा 486 पट जास्त होती.येथे, एका तज्ज्ञाने नाव न सांगण्याच्या अटीवर म्हटले आहे की हे प्रमाण केवळ मुलांसाठी घातक नाही तर ते हत्तीसारख्या मोठ्या प्राण्याचे मूत्रपिंड आणि मेंदूदेखील नष्ट करू शकते.चौकशी अहवालानुसार, कंपनीने २५ मार्च २०२५ रोजी चेन्नईतील सनराइज बायोटेककडून प्रोपीलीन ग्लायकॉल खरेदी केले. ते नॉन-फार्मास्युटिकल ग्रेडचे होते, म्हणजेच ते औषध निर्मितीसाठी योग्य नव्हते. असे असूनही, कंपनीने त्याची शुद्धता पडताळली नाही किंवा त्यात डायथिलीन ग्लायकॉल किंवा इथिलीन ग्लायकॉलचे प्रमाण तपासले नाही.
तामिळनाडू ड्रग्ज कंट्रोल डिपार्टमेंटला असे आढळून आले की या निकृष्ट दर्जाच्या रसायनाचा वापर करून अनेक औषधे तयार केली जात होती. तपासणी दरम्यान, तपास पथकाने त्यांची चौकशी सुरू ठेवली आणि त्यावेळी कंपनीकडे प्रोपीलीन ग्लायकॉलचा साठा नसल्याचे आढळून आले. यामुळे कंपनीने हे रसायन जलद गतीने काढून टाकून कागदपत्रे लपवण्याचा प्रयत्न केल्याचा संशय आणखी बळावला.तामिळनाडू ड्रग कंट्रोल अथॉरिटीने म्हटले आहे की सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने ही तपासणी अत्यंत आवश्यक आहे, कारण नॉन-फार्मास्युटिकल ग्रेड रसायनांचा वापर करून बनवलेली औषधे मुलांसाठी आणि प्रौढांसाठी घातक ठरू शकतात. ५८९ बाटल्या थंड पेय छिंदवाडा येथे पाठवल्या जाणार होत्या तपास पथकाला श्रीसन फार्मास्युटिकल्समध्ये कोल्ड्रिफ सिरपच्या ५८९ ६० मिली बाटल्या, बॅच क्रमांक SR-१३ आढळल्या. त्या छिंदवाडा येथे पाठवण्यासाठी तयार करण्यात आल्या होत्या. सिरपचा हा बॅच प्यायल्याने मुलांमध्ये मूत्रपिंड निकामी झाले आणि मेंदूला सूज आली, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. हे सिरप मे २०२५ मध्ये तयार करण्यात आले होते, ज्याची मुदत एप्रिल २०२७ होती.औषध कंपनीच्या उत्पादन स्थळावर कोल्ड्रिफ व्यतिरिक्त इतर चार सिरप आढळले. यामध्ये रेस्पोलाइट डीच्या १,५३४ बाटल्या, रेस्पोलाइट जीएलच्या २,८०० बाटल्या, रेस्पोलाइट एसटीच्या ७३६ बाटल्या आणि हेप्सँडिन सिरपच्या ८०० बाटल्यांचा समावेश होता. तथापि, तपासणीनंतर, हे प्रमाणित दर्जाचे आढळले.
पुणे _ धर्म हा धंदा सध्या जोरात सुरू आहे. सुशिक्षित लोकांच्या सोशल मीडियावर पोस्ट वाचून ते कसे शिकार होतात हे पाहणे दुःखदायक आहे. त्यांनी पुढाकार घेऊन धर्म आणि जाती मधील वाद मिटविला पाहिजे. छत्रपती संभाजीनगर येथील रामनवमी पूर्वीची दंगल ही राज्य पुरस्कृत होती आणि पोलिसांना तशा सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे पोलीस घटनास्थळी उपस्थित नव्हते. निवडणूक जिंकण्यासाठी हिंदू आणि मुस्लिम दंगल करून भयाचे वातावरण निर्माण केले जाते. पैसे खर्च न करता दबाव निर्माण केला जाऊन वातावरण अशांत केले जात आहे. आयुष्यात सत्यासाठी लढणे महत्वाचे असल्याचे मत छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल यांच्या वतीने गांधी भवन, कोथरूड, पुणे येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महात्मा गांधी आणि राष्ट्रीय एकात्मता विषयावर माजी खासदार इम्तियाज जलील यांनी विचार व्यक्त केले. याप्रसंगी महाराष्ट्र गांधी स्मारक निधी अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी, डॉ.शिवाजी कदम, सचिव अन्वर राजन , डॉ.एम एस जाधव, स्वप्नील तोंडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला संविधान उद्देशिका वाचन करण्यात आले.
इम्तियाज जलील म्हणाले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,दोन उपमुख्यमंत्री यांनी छत्रपती संभाजीनगर ते पुणे प्रवास एकदा करून दाखवावा त्यांना मी २० हजार रुपये बक्षीस देतो. मला या रस्त्यावरून येण्यास आज आठ तास वेळ लागला. विकासाच्या नावावर गप्पा मारणारे साधा रस्ता देखील विकसित करू शकत नाही हे दिसून येते. माझ्यावर अनेक केसेस दाखल करण्यात आला असून हर्सूल कारागृहात पाठविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. २४ वर्षाचा पत्रकारिता अनुभव मला आहे. महात्मा गांधी यांनी जी शिकवण दिली त्यानुसार आपण वाटचाल करतो आहे का हे तपासून पाहणे गरजेचे आहे. देशात राजकारण स्तर ज्याप्रकारे घसरत आहे त्याने परिस्थिती चिंताजनक होत असल्याचे दिसून येत आहे. सत्ताधारी यांच्याकडून खुर्ची टिकवण्यासाठी जाती धर्मात भांडणे लावली जात आहे. देशात काही लोक चांगले आहे म्हणून देश चालला आहे. देशातील चांगल्या लोकांनी गप्प न बसता आता आवाज उठवण्याची वेळ आली आहे. हाताला काम मागितले तर दगड देण्यात येतो, एकता मागितले तर जातीधर्मात तेढ निर्माण केला जात आहे आणि शांतता हवी तर दंगल दिली जात आहे. शहरातील जातीचे विष आज ग्रामीण भागात पोहचले आहे. एकत्र राहणारे लोक आज विभक्त झाले आहे. आपल्या देशात आणि राज्यात जातीय तेढ नेमके कोण निर्माण करते तपासून पहिले पाहिजे. लोकांच्या विश्वासावर मी २८ दिवसात आमदार आणि २२ दिवसात खासदार झालो होतो. त्यानंतर संसदेत मी प्रथम गेलो तेव्हा मला मोठ्या लोकांसोबत काम करता येईल असे वाटले. पण ज्या लोकप्रतिनिधी यांना आपण निवडून देतो ते शिक्षित हवे तरच ते संसदेत मुद्दा नीट मांडू शकतात. ८५ टक्के लोक संसदेत मुद्दा नीट मांडण्यात कमी पडतात. मुस्लिम खासदार यांना वेगळ्या प्रकारचे वाईट अनुभव संसद परिसरात येतात. विरोधी पक्ष यांच्यावर टाकला जाणारा दबाव, अस्वस्थ नागरिक, पत्रकारांवर दडपण हे भयाण चित्र आहे. “आय लव्ह मोहम्मद” काही जण म्हणत आहे त्यावर मोठा गोंधळ सध्या सुरू आहे. मुस्लिम तरुणांनी जो आपल्याला सदमार्ग सांगितला त्या रस्त्याने चालणे आवश्यक आहे. केवळ पोस्टर हातात धरून आपण काही करू शकतो हे वागणे चुकीचे आहे.निवडणूक येतील आणि जातील देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी एकात्मता भावना हवी आहे. सर्व लोक विकास करतील तरच देश पुढे जाऊ शकेल. देश आपल्या सर्वांचा आहे, कोणा एकाचा नाही. देशाला स्वातंत्र्य देताना कोणी जातीधर्म विचार केला नाही सर्वजण एकत्रित लढले. सातत्याने देशभक्ती प्रमाणपत्र एका धर्माच्या लोकांना मागितले जाते. मी एक कट्टर भारतीय असून त्याचा मला अभिमान आहे. देशात कुठे औरंगजेब जन्मदिवस साजरा केला जात नाही. त्याच्याशी कोणाला काही घेणे देणे नाही. पण सतत आम्हाला त्याबाबत प्रश्न विचाराने खेदजनक आहे. जाती धर्म मधील भिंती तोडल्या गेल्या नाही तर त्या विनाशाचा सर्वांनाच त्रास होईल. यानंतर कुमार सप्तर्षी यांनी महात्मा गांधी सप्ताह मोठ्या प्रमाणात सर्वांनी प्रतिसाद दिला याबद्दल आभार मानले तसेच गांधी सप्ताह उत्साह त पार पडल्याची भावना यावेळी व्यक्त केली.
५ वर्षापर्यंतच्या सर्व बालकांचे लसीकरण करुन घेण्याचे आवाहन
पुणे, दि. ८ : पुणे जिल्हा परिषद आरोग्य विभाग, जिल्हा रुग्णालय औंध आणि पुणे महानगरपालिका यांच्या सयुंक्त विद्यमाने जिल्ह्यात रविवार १२ ऑक्टोबर २०२५ रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे, यामध्ये ० ते ५ वर्षे वयोगटातील सर्व बालकांचे पल्स पोलिओ प्रतिबंधक लसीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांनी दिली आहे.
‘पोलिओमुक्त भारत’ या उद्दिष्टासाठी सर्व ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांचे ग्रामीण ५ लाख ६ हजार ८०९ जिल्हा रुग्णालय औंध येथे भागातील शहरी ६९ हजार ६९० एकूण लाभार्थी ५७ लाख ६ हजार ४९७ बालकांचे पोलिओ प्रतिबंधक लसीकरण करण्यात येणार आहे. शहरी व ग्रामीण भागात मिळून एकूण पोलिओ लसीकरणासाठी ४ हजार २२३ पोलिओ लसीकरण केंद्र (बूथ) आणि याकरिता आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका असे एकूण १० हजार ३१८ कर्मचारी तसेच स्थानिक स्वयंसेवी संस्था सहभाग घेण्यात येणार आहे. पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेअंतर्गत वंचित राहिलेल्या सर्व बालकांचे १४ ते १६ ऑक्टोबर या कालावधीत घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रांवर विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले. लसींचा पुरेसा साठा व वाहतूक व्यवस्थाही उपलब्ध करण्यात आली आहे. या मोहिमेत आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, पालक, स्वयंसेवक, सुजाण नागरिक, समाजसेवी संस्थांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन डॉ. हंकारे यांनी केले आहे.
श्री. गजानन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे: ‘आपल्या परिसरातील प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब पाजणे ही आदर्श आणि जबाबदार पालक म्हणून प्रत्येकाची जबाबदारी आहे. या मोहिमेत एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याकरिता आरोग्य विभाग दक्षता घेत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ० ते ५ वयोगटातील सर्व बालकांचे पल्स पोलिओ प्रतिबंधक लसीकरण करुन घ्यावे.’ 000
मुंबई शहरात उत्साहाचे वातावरण आहे, कारण युनायटेड किंगडमचे (UK) प्रधानमंत्री केअर स्टारमर यांच्या दुसऱ्या दिवसाच्या दौऱ्यामुळे सर्वांचे लक्ष या शहराकडे लागून राहिले आहे. ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट’च्या भव्य समारोपाकडे सगळ्यांच्या नजरा खिळल्या आहेत. भारत आणि यूके यांच्यातील वाढत्या मैत्रीचे हे जोरदार प्रदर्शन आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि प्रधानमंत्री स्टारमर आज एकत्र मुख्य भाषण देणार आहेत. ही भेट केवळ एक औपचारिक राजनयिक शिष्टाचार नाही, तर शतकानुशतके चाललेल्या सहकार्याच्या विकासाचा आणि दोन्ही देशांमधील जुन्या नात्यातील एका महत्त्वाच्या अध्यायाचा कळस आहे….
ऐतिहासिक वळण: ‘कॉम्प्रेहेन्सिव्ह स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’ (Comprehensive Strategic Partnership)
२०२५ हे वर्ष भारत आणि यूकेच्या संबंधांसाठी एक निर्णायक वळण ठरले आहे. अनेक शतकांचा इतिहास असलेल्या या संबंधाला आता औपचारिक ‘कॉम्प्रेहेन्सिव्ह स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’चे रूप मिळाले आहे. ‘भारत-यूके व्हिजन २०३५’ या भागीदारीला मार्गदर्शन करत आहे, ज्यात दोन्ही देशांसाठी समान विकास आणि समृद्धीची योजना आहे. दोन्ही राष्ट्रांमध्ये भक्कम राजकीय इच्छाशक्ती असल्याने हे संबंध अधिक दृढ झाले आहेत. यावर्षी जुलैमध्ये प्रधानमंत्री मोदी यांनी यूकेचा दौरा केला, त्यानंतर प्रधानमंत्री स्टारमर यांचा भारत दौरा या भागीदारीला नवी गती देत आहे. हा दौरा दोन्ही देशांतील नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण आणि मूर्त फायदे देण्याचे वचन देतो. उद्याचे (आजचे) भाषण, ज्यात १,००,००० हून अधिक जागतिक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत, एका महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय मंचावर या भागीदारीची अविश्वसनीय क्षमता दर्शवणारा एक निर्णायक क्षण ठरेल.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींसाठी, ज्यांच्या राजनयिक प्रवासात जगभरातील धोरणात्मक भागीदारांशी संबंध अधिक घट्ट करण्याचा समावेश आहे, हा क्षण भारताच्या जागतिक महासत्ता म्हणून उदयास येण्याचे प्रतीक आहे. देशांतर्गत आर्थिक सुधारणांना पाठिंबा देण्यापासून ते जागतिक लोकशाही भागीदारांशी जोडणी साधण्यापर्यंत, प्रधानमंत्री मोदी यांच्या प्रयत्नांमुळे यूकेसोबतच्या या नूतनीकृत अध्यायाचा पाया रचला गेला आहे. यूके, ज्याचा भारताशी ऐतिहासिक आणि बहुआयामी संबंध आहे, आता समान भागीदार म्हणून पुढे आले आहे.
आर्थिक वाढ आणि संधींसाठी इंजिन
मुंबईतील या बहुप्रतिक्षित घोषणांचा आधार याच वर्षाच्या सुरुवातीला, २४ जुलै २०२५ रोजी, स्वाक्षरी झालेला ‘व्यापक आर्थिक आणि व्यापार करार’ (CETA – Comprehensive Economic and Trade Agreement) आहे. अनेक वर्षांच्या तीव्र वाटाघाटीनंतर हा महत्त्वपूर्ण करार व्यापार क्षेत्राचे स्वरूप बदलणार आहे. भारतीय ग्राहक, उत्पादक आणि निर्यातदारांसाठी हा करार नवीन संधींचे दरवाजे उघडेल, ज्यामुळे अनेक उद्योग आणि लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येतील.
या करारामुळे यूकेच्या बाजारपेठेत प्रवेश करणाऱ्या ९९ टक्के भारतीय वस्तूंवरील सीमाशुल्क (Tariffs) संपुष्टात येईल. यात पारंपरिक भारतीय वस्त्रोद्योग, चामड्याच्या वस्तू, कृषी उत्पादने आणि ऑटोमोटिव्ह घटकांचा समावेश आहे. केवळ आकडेवारीच्या पलीकडे, या कराराचा उद्देश रोजगार निर्मिती करणे, नावीन्यपूर्णतेला (Innovation) प्रोत्साहन देणे आणि सर्व क्षेत्रांमध्ये समृद्धी वाढवणे आहे.
हा करार महत्त्वपूर्ण आकडेवारी दर्शवतो. द्विपक्षीय व्यापार सध्याच्या ४३ अब्ज पौंडांवरून वर्षाला २५.५ अब्ज पौंडांनी वाढण्याचा अंदाज आहे. याहूनही महत्त्वाचे म्हणजे, या करारामुळे कालांतराने भारताच्या वार्षिक सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) ५.१ अब्ज पौंडांची भर पडू शकते. या आकडेवारीमागे कारागिरांपासून ते तंत्रज्ञान स्टार्टअप्सपर्यंत, जागतिक बाजारपेठांमध्ये पोहोचण्याची कोट्यवधी भारतीयांची स्वप्ने दडलेली आहेत.
हा करार ४८ तासांच्या आत मालाच्या मंजुरीसाठी सीमाशुल्क प्रक्रिया सुलभ करण्याचे वचन देतो, ज्यामुळे लहान आणि मध्यम उद्योगांना (SME’s) सामोरे जाव्या लागणाऱ्या लाल फितीच्या (Red Tape) अडचणी कमी होतील. हे प्रधानमंत्री मोदी यांच्या ‘व्यवसाय सुलभतेचे’ (Ease of Doing Business) भारताला जगातील शीर्ष जागतिक व्यापार आणि गुंतवणूक केंद्र बनवण्याच्या दीर्घकाळच्या प्रयत्नांना प्रतिबिंबित करते.
प्रधानमंत्री मोदी यांच्या धोरणात्मक भाषणांमध्ये अनेकदा उद्धृत केले जाणारे ‘व्यवसाय सुलभतेचे’ हे सूत्र या करारामुळे नव्याने महत्त्वाचे ठरते, कारण हा करार केवळ मोठ्या उद्योगांनाच नव्हे, तर विशेषतः भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या लहान आणि मध्यम उद्योगांनाही आधार देतो.
या कराराला यूकेमध्ये द्विपक्षीय पाठिंबा असल्याने राजकीय स्थैर्य सुनिश्चित होते, ज्यामुळे निवडणुकीच्या पलीकडेही या भागीदारीचे दीर्घायुष्य स्पष्ट होते. यूके ब्रेक्झिटनंतरच्या जागतिक दृष्टिकोनात भारताला किती महत्त्व देते, हे यातून दिसून येते.
हिंद-प्रशांतमध्ये (Indo-Pacific) सुरक्षा बंधन मजबूत करणे
ही भागीदारी केवळ अर्थव्यवस्थेपुरती मर्यादित नसून, संरक्षण आणि सुरक्षेच्या क्षेत्रातही पोहोचली आहे – जे ‘व्हिजन २०३५’च्या रोडमॅपचा आधारस्तंभ आहे. हिंद-प्रशांत (Indo-Pacific) धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र बनत असताना, दोन्ही देशांनी मुक्त, खुले आणि स्थिर प्रदेशासाठी एक समान दृष्टिकोन जपला आहे.
अलीकडील नौदल सराव ‘कोंकण २०२५’मध्ये हे चित्र स्पष्टपणे दिसले, जिथे भारताची आयएनएस विक्रांत आणि यूकेची एचएमएस प्रिन्स ऑफ वेल्स समन्वय साधून कार्यरत होती. ही कार्यात्मक समन्वयता दोन्ही सशस्त्र दलांमध्ये वाढती आंतरकार्यक्षमता (Interoperability) आणि प्रादेशिक शांततेसाठी त्यांची दृढ वचनबद्धता दर्शवते.
भारतीय वायुसेनेसोबतच्या हवाई संरक्षण सरावाने (Aerial Defence Exercise) या सहकार्याला पूरक बनवले आहे. ही त्रि-सेवा समन्वयता (Tri-service coordination) या भागीदारीच्या खोलीचे दुर्मिळ उदाहरण आहे.
याव्यतिरिक्त, जुलै २०२५ चा ‘संरक्षण औद्योगिक रोडमॅप’ (Defence Industrial Roadmap) खरेदीदार-विक्रेता गतिशीलता बदलून सह-विकास (Co-development) आणि संयुक्त उत्पादनाकडे एक मूलभूत बदल दर्शवतो. प्रधानमंत्री मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेशी जुळलेला हा रोडमॅप तंत्रज्ञान हस्तांतरण, संयुक्त संशोधन आणि भारताची देशांतर्गत संरक्षण उत्पादन क्षमता वाढवण्यावर लक्ष केंद्रित करतो. यातून भारताला जागतिक संरक्षण नवोपक्रम (Innovation) आणि धोरणात्मक स्वायत्ततेत अग्रेसर भूमिका घेता येईल, तसेच मोठ्या प्रमाणात उच्च-कुशल रोजगार निर्माण होतील.
‘लिव्हिंग ब्रिज’: चिरस्थायी लोक-ते-लोक जोडणी
धोरणात्मक करारांपलीकडे, ‘लोक-ते-लोक जोडणीचा चिरस्थायी ‘लिव्हिंग ब्रिज’ या भागीदारीचे हृदय आहे. यूकेमधील भारतीय डायस्पोरा (Diaspora – स्थलांतरित भारतीय समुदाय), जो तेथील लोकसंख्येच्या २.६ टक्के आहे आणि ६५,००० हून अधिक व्यवसायांचे मालक आहेत, हे अमूल्य सामाजिक-आर्थिक बंधन दृढ करतात.
२०२५ मध्ये पुन्हा पुष्टी झालेली उच्च शिक्षण पात्रतेची परस्पर मान्यता भारतीय विद्यार्थी आणि व्यावसायिकांसमोरील अडथळे दूर करते, प्रतिभा गतिशीलता (Talent Mobility) आणि शैक्षणिक देवाणघेवाण वाढवते. जागतिकीकरणाच्या जगात जिथे कौशल्ये आणि ज्ञान सीमा ओलांडतात, तिथे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
‘व्हिजन २०३५’च्या शैक्षणिक विस्ताराचे उदाहरण युनिव्हर्सिटी ऑफ साउथम्प्टनच्या गुरुग्राम कॅम्पसच्या जून २०२५ मधील उद्घाटनातून दिसते. हा उपक्रम जागतिक प्रतिभेचे संगोपन करतो आणि दूरदृष्टीच्या शैक्षणिक सहकार्याचे प्रतीक आहे.
याला पूरक म्हणून, भारत-यूके ‘ग्रीन स्किल्स’ भागीदारी नवीकरणीय ऊर्जा, शाश्वत शेती आणि पर्यावरणीय लवचिकतेमध्ये (Environmental Resilience) तरुणांची क्षमता विकसित करते – ज्यामुळे भविष्यातील जागतिक आव्हानांसाठी तयारी सुनिश्चित होते.
तंत्रज्ञान, नावीन्य आणि मुंबईच्या फिनटेक फेस्टमधील सामायिक भविष्य
या भागीदारीचे भविष्यवेधी लक्ष तंत्रज्ञान आणि नावीन्य आहे, जे ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. १०० हून अधिक देशांतील ८०० हून अधिक स्पीकर्ससह, हा उत्सव प्रधानमंत्री मोदी आणि स्टारमर यांच्या दृष्टिकोनासाठी एक आदर्श मंच प्रदान करतो.
डिजिटल पेमेंट आणि आर्थिक समावेशनात (Financial Inclusion) भारताची अग्रणी भूमिका यूकेच्या जागतिक वित्तीय परिसंस्थेचे (Global Financial Ecosystem) पूरक आहे, ज्यामुळे अधिक गहन तांत्रिक सहकार्याचा मार्ग मोकळा होतो.
‘तंत्रज्ञान सुरक्षा उपक्रमा’ (Technology Security Initiative) द्वारे, दोन्ही देश दूरसंचार, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मध्ये संयुक्त उपक्रम आणि सेमीकंडक्टर आणि खनिजांसाठी महत्त्वपूर्ण पुरवठा साखळी सुरक्षित करण्यावर भर देतात. लवचिक, अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणाली तयार करणे आता राष्ट्रीय सुरक्षा आणि आर्थिक वाढ जपण्यासाठी केंद्रस्थानी आहे.
हवामान कृती (Climate Action) हा एक मुख्य आधारस्तंभ राहिला आहे. दोन्ही देश स्वच्छ ऊर्जा स्वीकार आणि ग्रीन फायनान्स बाजारपेठांना कुशल बनवण्यास गती देतात. बीपी (BP) आणि शेल (Shell) यांसारख्या यूकेच्या कंपन्यांची भारतातील स्वच्छ इंधन आणि इलेक्ट्रिक वाहन पायाभूत सुविधांमध्ये केलेली गुंतवणूक या उद्दिष्टांच्या दिशेने उचललेली व्यावहारिक पाऊले दर्शवते.
हवामान आणि नावीन्य यावरील आपल्या अनेक भाषणांमध्ये, प्रधानमंत्री मोदी यांनी असा दृष्टिकोन मांडला आहे जिथे आर्थिक वाढ आणि शाश्वतता (Sustainability) हातात हात घालून चालतात. ही द्विपक्षीय भागीदारी त्या दृष्टिकोनाला प्रतिबिंबित करते, ज्यामुळे ती जागतिक सहकार्यासाठी एक दीपस्तंभ ठरते.
नव्या युगाची सुरुवात
प्रधानमंत्री मोदी आणि स्टारमर आज आपले मुख्य भाषण देण्यासाठी सज्ज असताना, त्यांचा संयुक्त संदेश सामायिक मूल्ये आणि परस्पर लाभावर आधारित एका परिपक्व भागीदारीचे प्रतीक असेल. ही युती त्यांची एकत्रित आर्थिक ताकद, सुरक्षा सहकार्य, सांस्कृतिक संबंध आणि नावीन्यपूर्ण भावना यांचा फायदा घेते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अटळ धोरणात्मक दृष्टिकोनाच्या मार्गदर्शनाखाली, ही भागीदारी केवळ पुनरुज्जीवित झालेली नाही—तर एका नवीन युगासाठी तिची पुनर्कल्पना केली गेली आहे. एकत्र येऊन, भारत आणि युनायटेड किंगडम समृद्धी देण्यासाठी, सुरक्षा वाढवण्यासाठी आणि स्थिर आणि मुक्त जागतिक व्यवस्थेचे (Global Order) आधारस्तंभ टिकवून ठेवण्यासाठी सज्ज आहेत. त्यांची नूतनीकृत युती केवळ त्यांच्या लोकांचे भविष्यच नव्हे, तर आगामी दशकांमध्ये आंतरराष्ट्रीय संबंधांचा मार्गही निश्चित करण्याचे वचन देते.
ब्रिजेश सिंह (भा.पो.से.), प्रधान सचिव तथा महासंचालक (माहिती व जनसंपर्क)
मुंबई, दि. ८ ऑक्टोबर २०२५: महावितरणमधील सात वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने दि. ९ ते ११ ऑक्टोबरपर्यंत संप पुकारला आहे. या तीन दिवसीय संपाच्या कालावधीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडून आपत्कालिन नियोजन बुधवारी (दि. ८) पूर्ण झाले असून राज्यभरातील यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. तसेच गंभीर कारणास्तव घेतलेल्या रजा वगळून सर्व अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत. रजेवरील कर्मचाऱ्यांना तातडीने कामावर रूजू होण्याची सूचना देण्यात आली आहे.
दरम्यान, व्यवस्थापनाकडून वारंवार सकारात्मक चर्चा व आवाहन करूनही संयुक्त कृती समितीने संपाचा निर्णय कायम ठेवला आहे. वीज ही अत्यावश्यक सेवा असल्याने नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षक अधिनियम (मेस्मा) लागू करण्यात आल्याने हा संप बेकायदेशीर ठरला आहे.
संपकाळात नागरिकांनी वीजपुरवठ्याबाबत कोणत्याही नकारात्मक व चुकीच्या संदेशावर विश्वास ठेवू नये. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी यंत्रणा युद्धपातळीवर रात्रंदिवस सज्ज राहणार आहे. वीजपुरवठ्याबाबत काही तक्रारी किंवा शंका असल्यास २४ तास सुरु असलेल्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा व संपाच्या कालावधीत सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
खासगीकरण व पुनर्रचनेच्या मुद्द्यांवर वीज कर्मचाऱ्यांच्या ७ संघटनांच्या संयुक्त कृती समितीने तीन दिवसांच्या संपाची नोटीस दिली. हा संप टाळण्यासाठी व्यवस्थापनाकडून वेळोवेळी चर्चा करण्यात आली. राज्याच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला आणि महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी सोमवारी (दि. ६०) स्वतंत्र बैठक घेऊन कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. कोणत्याही प्रकारचे खासगीकरण होणार नाही अशी निःसंदिग्धपणे ग्वाही या बैठकींमध्ये देण्यात आली.
महावितरण कंपनीचे ३२९ उपकेंद्र कंत्राटी पद्धतीने चालविण्यास सुरवात केल्याचा आरोपही चुकीचा असल्याचे व्यवस्थापनाकडून स्पष्ट करण्यात आले. एप्रिल २०१९ नंतर तयार झालेल्या ३२९ उपकेंद्रांचे खासगीकरण करण्यात आलेले नाही. ही उपकेंद्र महावितरणच्या संबंधित कार्यालयांच्या अधिपत्याखालीच आहेत. या उपकेंद्रातील केवळ बाह्यस्त्रोत कुशल मनुष्यबळासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली व त्यासंदर्भात संबंधित एजन्सींना कार्यादेश देण्यात आले. यात कोणत्याही प्रकारचे खासगीकरण नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
कर्मचारी संघटनांकडून आलेल्या मागणीनुसार प्रामुख्याने थेट ग्राहकसेवा देणाऱ्या उपविभाग व शाखा कार्यालयांमध्ये कार्यपद्धती सुधारणा करण्यात आली आहे. या कार्यालयांच्या फेररचनेत ग्राहकसंख्येनुसार अभियंता व तांत्रिक कर्मचाऱ्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. त्यासाठी २ विभाग कार्यालय, ३७ उपविभाग आणि ३० शाखा कार्यालयांची नव्याने निर्मिती करण्यात आली आहे. या कार्यालयांमुळे ८७६ अभियंता व तांत्रिक कर्मचाऱ्यांची पदसंख्या देखील वाढली आहे. तर या फेररचनेत सध्या अस्त्तित्वात असलेल्या पदसंख्येत कोणतीही कपात होणार नाही. कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधाला व आरक्षणाला कोणताही धक्का बसणार नाही याची काळजी घेण्यात आल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या फेररचनेची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी सुरू झाली आहे. प्रायोगिक कालावधीत येणाऱ्या अडचणी किंवा सूचनांचा स्वीकार करून त्यानुसार अंतीम आदेश काढण्याचे धोरण स्वीकारण्यात आले आहे, हेही स्पष्ट करण्यात आले.
कृती समितीच्या सर्व मागण्यांबाबत व्यवस्थापनाकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला. नियमित संवाद व चर्चा करण्यासाठी दर महिन्यात प्रत्येक चौथ्या सोमवारी सर्व संघटनासोबत बैठक आयोजित करण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले. तरीही संप मागे घेण्याबाबत कृती समितीकडून निर्णय होऊ शकला नाही. बुधवारी (दि. ८) दुपारी संचालक श्री. सचिन तालेवार (संचालन/प्रकल्प) व श्री. राजेंद्र पवार (मानव संसाधन) यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. अतिवृष्टी व पूरपरिस्थितीच्या तसेच सणासुदीच्या पार्श्वभूमिवर नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी संप करू नये असे आवाहन केले. मात्र त्यास कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
त्यानंतर संचालक श्री. तालेवार व श्री. पवार यांनी राज्यभरातील मुख्य अभियंते, अधीक्षक अभियंते व वरिष्ठ अधिकाऱ्यांची व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपकालीन उपाययोजना व तयारीचा आढावा घेतला. यावेळी कार्यकारी संचालक श्री. धनजंय औंढेकर, श्री. परेश भागवत, श्री. दत्तात्रेय पडळकर, मुख्य महाव्यवस्थापक श्री. भूषण कुलकर्णी यांची उपस्थिती होती.
संपात सहभागी झाल्यास कारवाईचा इशारा – वीज ही अत्यावश्यक सेवा असल्याने नागरिकांची कोणताही गैरसोय होऊ नये यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षक अधिनियम (मेस्मा) लागू केलेला आहे. त्यामुळे महावितरणमधील २३ पैकी ७ वीज कर्मचारी संघटनांची तब्बल तीन दिवसांचा संप बेकायदेशीर ठरला आहे. ज्यांची सेवा एक वर्षापेक्षा कमी झाली आहे किंवा ज्यांची नुकतीच थेट भरती प्रक्रियेत निवड झाली आहे ते संपात सहभागी झाल्यास त्यांची सेवा तात्काळ संपुष्टात येणार आहे. तसेच सुरवातीचे तीन वर्ष कंत्राटी म्हणून कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची सेवा, संपात सहभागी झाल्यास रद्द होणार आहे. सेवेमध्ये नियमित झालेले कर्मचारी सेवेत सहभागी झाल्यास त्यांच्या सेवेत खंड देण्याच्या कारवाईची तरतूद आहे.
आपत्कालिन नियोजन व पर्यायी मनुष्यबळ उपलब्ध- या तीन दिवसीय संप काळासाठी महावितरणकडून आपत्कालीन व्यवस्था उभारण्यात आली आहे. यामध्ये मुख्यालय व क्षेत्रीय परिमंडल कार्यालयांमध्ये स्वतंत्र नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. दर तासाला राज्यातील वीजपुरवठ्याची स्थिती वरिष्ठ अधिकारी व मुख्यालयास कळविण्यात येणार आहे.
संपकाळात प्राधान्याने सुरळीत वीजपुरवठ्यासाठी पर्यायी मनुष्यबळ उपलब्ध करण्यात येत असून संपात सहभागी नसलेले महावितरणचे कर्मचारी, बाह्य स्त्रोत कर्मचारी, महावितरणच्या निवड सूचीवरील कंत्राटदार व कर्मचारी यांची सुरळीत वीजपुरवठ्यासाठी स्थानिक कार्यालय, उपकेंद्र आदी ठिकाणी तात्पुरत्या नियुक्ती करण्यात आली आहे. आवश्यकतेनुसार बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांच्या कंत्राटदारांना अतिरिक्त मनुष्यबळाची मागणी करण्यात आली आहे. या सर्वांसाठी वाहन व्यवस्था व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. याबाबतच्या लेखी सूचना क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आल्या आहेत.
रोहीत्र, वीजवाहिन्यांसह इतर साधनसामुग्री उपलब्ध- संपकाळामध्ये सुरळीत वीजपुरवठ्यासाठी सर्व क्षेत्रीय विभाग कार्यालयांच्या निवडसूचीवर असलेल्या सर्व कंत्राटदारांना आवश्यक साधनसामुग्री, मनुष्यबळ व वाहनांसह संबधीत कार्यालयांमध्ये उपलब्ध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सोबतच महावितरणकडून वितरण रोहीत्र, ऑईल, वीजतारा, केबल्स, वीजखांब, फिडर पिलर्स, डिस्ट्रीब्यूशन बॉक्सेस, वाहतुकीसाठी वाहने आदी आवश्यक साधनसामुग्री महावितरणच्या विविध कार्यालयांमध्ये उपलब्ध ठेवण्यात आली आहे.
घरगुतीसह अत्यावश्यक क्षेत्रात वीजपुरवठ्याची खबरदारी- संपकाळात प्रामुख्याने घरगुती ग्राहकांसह पाणी पुरवठा योजना, रुग्णालये, मोबाईल टॉवर्स, शासकीय कार्यालये आदींचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. ज्या ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला त्या ठिकाणी सर्वप्रथम पर्यायी व्यवस्थेतून (बॅकफिड) वीजपुरवठा सुरू करण्यात येईल.
येथे साधा कधीही संपर्क- संपकाळात वीजसेवा देणारे अभियंते व कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. वीजपुरवठा संदर्भात काही तक्रारी असल्यास शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राचे १९१२ किंवा १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ हे टोल फ्री क्रमांक २४ तास उपलब्ध आहेत.
मुंबईतल्या विविध विकास प्रकल्पांचे देखील केले उद्घाटन आणि लोकार्पण
नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि भुयारी मेट्रो मुंबईतील प्रवास आणि कनेक्टिव्हिटीमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी सज्ज: पंतप्रधान
विकसित भारत म्हणजे जिथे गती आणि प्रगती दोन्ही आहे , जिथे लोकहित सर्वोपरि आहे आणि सरकारी योजना प्रत्येक नागरिकाचे जीवन सुखकर बनवत आहे : पंतप्रधान
उडान योजनेमुळे, गेल्या दशकात लाखो लोकांनी प्रथमच विमानातून प्रवास केला आहे आणि आपली स्वप्ने पूर्ण केली : पंतप्रधान
नवीन विमानतळ आणि उडान योजनेने विमान प्रवास सुलभ केला आहे तसेच भारत जगातील तिसरी सर्वात मोठी देशांतर्गत विमान वाहतूक बाजारपेठ बनला आहे: पंतप्रधान
आज, भारत जगातील सर्वात तरुण देश आहे, आपली ताकद आपले युवक आहेत : पंतप्रधान
आमच्यासाठी आपल्या देशाच्या आणि नागरिकांच्या सुरक्षिततेपेक्षा अन्य काहीही महत्त्वाचे नाही: पंतप्रधान
मुंबई-, 8 ऑक्टोबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले तसेच मुंबईतील विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण केले. सर्व मान्यवरांचे स्वागत करत, मोदी यांनी उपस्थितांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.अलिकडेच पार पडलेल्या विजयादशमी आणि कोजागरी पौर्णिमेच्या उत्सवाचा उल्लेख करत त्यांनी आगामी दिवाळी सणासाठी शुभेच्छा दिल्या.
मुंबईची दीर्घकाळची प्रतीक्षा संपली असून शहराला आता दुसरा आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळाला आहे असे सांगून पंतप्रधानांनी अधोरेखित केले की हा विमानतळ आशियातील सर्वात मोठ्या कनेक्टिव्हिटी हबपैकी एक म्हणून या प्रदेशाला प्रस्थापित करण्यात मोठी भूमिका बजावेल. मुंबईला आता पूर्णपणे भुयारी मेट्रो मिळाली आहे, ज्यामुळे प्रवास सोपा होईल आणि प्रवाशांचा वेळ वाचेल असे ते म्हणाले. मोदी यांनी भुयारी मेट्रोचा उल्लेख विकसनशील भारताचे जिवंत प्रतीक असा केला आणि नमूद केले की मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात, ऐतिहासिक इमारतींचे जतन करत या भुयारी मेट्रो सेवेचे बांधकाम करण्यात आले आहे. त्यांनी या प्रकल्पात सहभागी कामगार आणि अभियंत्यांचे अभिनंदन केले.
भारत येथील युवकांसाठी असंख्य संधी प्रदान करतो हे अधोरेखित करत, पंतप्रधानांनी देशभरातील असंख्य आयटीआयना उद्योगाशी जोडण्याच्या उद्देशाने अलिकडेच शुभारंभ करण्यात आलेल्या 60,000 कोटींच्या पीएम सेतू योजनेचा उल्लेख केला. त्यांनी नमूद केले की आजपासून महाराष्ट्र सरकारने शेकडो आयटीआय आणि तंत्र विद्यालयांमध्ये नवीन कार्यक्रम सुरू केले आहेत. या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना ड्रोन, रोबोटिक्स, इलेक्ट्रिक वाहने, सौर ऊर्जा आणि हरित हायड्रोजन सारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण मिळेल, असे मोदी म्हणाले. त्यांनी महाराष्ट्रातील युवकांना शुभेच्छा दिल्या.
मोदी यांनी महाराष्ट्राचे सुपुत्र, लोकनेते दि. बा. पाटील यांना आदरांजली वाहिली आणि समाज आणि शेतकऱ्यांप्रति त्यांच्या समर्पित सेवेचे स्मरण केले. ते म्हणाले की पाटील यांचा सेवा भाव सर्वांसाठी प्रेरणादायी आहे आणि त्यांचे जीवन सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्यांना सतत प्रेरणा देत राहील.
“आज,संपूर्ण देश विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध आहे – असा भारत जिथे गती आणि प्रगती दोन्ही आहे , जिथे लोकहित सर्वोपरि आहे आणि सरकारी योजना प्रत्येक नागरिकाचे जीवन सुखकर बनवत आहेत असे नमूद करून मोदी यांनी अधोरेखित केले की गेल्या अकरा वर्षांमध्ये या भावनेने देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात विकास प्रयत्नांना मार्गदर्शन केले आहे.
जेव्हा वंदे भारत सेमी हाय-स्पीड गाड्या रुळांवर धावतात, जेव्हा बुलेट ट्रेन प्रकल्पांना गती मिळते, जेव्हा प्रशस्त महामार्ग आणि एक्सप्रेसवे नवीन शहरांना जोडतात, जेव्हा पर्वतरांगांमधून लांब बोगदे खोदले जातात आणि जेव्हा उंच सागरी पूल दूरवरच्या किनाऱ्यांना जोडतात तेव्हा भारताचा वेग आणि प्रगती दिसून येते. अशा प्रगतीमुळे भारताच्या युवकांच्या आकांक्षांना नवीन बळ मिळते असे त्यांनी अधोरेखित केले.
आजच्या कार्यक्रमाने भारताच्या विकासाच्या प्रवासाची गती कायम ठेवली आहे असे मोदी म्हणाले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा विकसित भारताचा दृष्टीकोन प्रतिबिंबित करणारा प्रकल्प असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीवर बांधलेल्या या विमानतळाचा आकार कमळाच्या फुलासारखा असून, तो संस्कृती आणि समृद्धीचे प्रतीक आहे, असे ते म्हणाले. पंतप्रधान म्हणाले की, हा नवीन विमानतळ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना युरोप आणि मध्य पूर्वेतील सुपरमार्केटशी जोडेल, त्यामुळे ताजी उत्पादने, फळे, भाज्या आणि मत्स्य उत्पादने जागतिक बाजारपेठेत जलद पोहोचू शकतील. या विमानतळामुळे आजुबाजूच्या लघु आणि मध्यम उद्योगांचा निर्यात खर्च कमी होईल, गुंतवणुकीला चालना मिळेल आणि नवीन उद्योगांच्या स्थापनेला चालना मिळेल, असे त्यांनी नमूद केले. त्यांनी नवीन विमानतळासाठी महाराष्ट्र आणि मुंबईच्या जनतेचे अभिनंदन केले.
स्वप्ने पूर्ण करण्याचा संकल्प असतो आणि नागरिकांना जलद विकास देण्याची प्रबळ इच्छाशक्ती असते तेव्हा त्याचे परिणाम निश्चित असतात, असे नमूद करून, भारताचे हवाई क्षेत्र या प्रगतीचा प्रमुख दाखला आहे, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. 2014 साली पदभार स्वीकारल्यानंतर केलेल्या आपल्या भाषणाचा संदर्भ देत, हवाई चप्पल घालणाऱ्यांनाही विमानाने प्रवास करता यावा, या आपल्या दृष्टिकोनाचा त्यांनी पुनरुच्चार केला. हे स्वप्न साकार करण्यासाठी देशभरात नवीन विमानतळ उभारणे आवश्यक होते, असे ते म्हणाले. सरकारने ही मोहीम गांभीर्याने घेतली आणि गेल्या अकरा वर्षांत एकापाठोपाठ एक नवीन विमानतळ बांधले जात असल्याचे त्यांनी सांगितले. 2014 मध्ये भारतात केवळ 74 विमानतळ होते. आज ही संख्या 160 च्या पुढे गेली आहे, असे ते म्हणाले.
लहान शहरांमध्ये विमानतळाच्या बांधकामामुळे रहिवाशांना हवाई प्रवासाचा नवा पर्याय उपलब्ध झाला आहे, असे पंतप्रधान म्हणाले. आर्थिक अडचण दूर करण्यासाठी, सरकारने सामान्य नागरिकांना परवडणारी विमान तिकिटे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘उडान’ (UDAN) योजना सुरू केली. गेल्या दशकभरात, लाखो लोकांनी या योजनेंतर्गत आपला पहिला हवाई प्रवास केला, आणि दीर्घ काळापासूनचे आपले स्वप्न पूर्ण केले, असे ते म्हणाले.
नवीन विमानतळांचे बांधकाम आणि उडान योजनेमुळे नागरिकांना सुविधा मिळाल्या आहेत यावर भर देऊन, मोदी यांनी, भारत आता जगातील तिसरी सर्वात मोठी देशांतर्गत विमान वाहतूक बाजारपेठ बनला आहे हे अधोरेखित केले. भारतीय विमान कंपन्या सातत्याने विस्तार करत असून शेकडो नवीन विमानांसाठी मागणी नोंदवत आहेत, असे त्यांनी नमूद केले. ही वाढ पायलट, केबिन क्रू, अभियंते आणि ग्राउंड वर्कर्ससाठी नवीन संधी निर्माण करत आहे असे ते म्हणाले.
विमानांची संख्या वाढते, तशी देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांची मागणी देखील वाढते, हे निदर्शनास आणून, ही गरज पूर्ण करण्यासाठी भारत देशांतर्गत नवीन सुविधा विकसित करत असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. या दशकाच्या अखेरीपर्यंत भारताला एक प्रमुख एमआरओ (देखभाल, दुरुस्ती आणि ओव्हरहाल) केंद्र म्हणून स्थापित करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमामुळे भारतातील तरुणांसाठी रोजगाराच्या असंख्य नवीन संधीही निर्माण होत आहेत, असे त्यांनी नमूद केले.
“भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे आणि त्याची ताकद त्याच्या तरुणाईत आहे”, पंतप्रधान म्हणाले. सरकारचे प्रत्येक धोरण तरुणांसाठी जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर केंद्रित आहे, यावर त्यांनी भर दिला. पायाभूत सुविधांमधील वाढत्या गुंतवणुकीमुळे रोजगार निर्मिती होते, असे त्यांनी नमूद करून, त्यांनी 76,000 कोटी रुपयांच्या वाढवण बंदर प्रकल्पाचे उदाहरण दिले. ते पुढे म्हणाले की जेव्हा व्यापार वाढतो आणि लॉजिस्टिक्स क्षेत्राला गती मिळते तेव्हा रोजगार निर्माण होतो.
राष्ट्रीय धोरण हे राजकारणाचा पाया असणाऱ्या मूल्यांनी भारताची जडणघडण झाली आहे असे मोदींनी ठोसपणे सांगितले. सरकारसाठी, पायाभूत सुविधांवर खर्च केलेला प्रत्येक रुपया नागरिकांच्या सोयी आणि क्षमता वाढवण्याचे साधन आहे. सार्वजनिक कल्याणापेक्षा सत्तेला प्राधान्य देणाऱ्या देशातील राजकीय प्रवाहाशी त्यांनी याची तुलना केली. अशा व्यक्ती विकासकामात अडथळा आणतात आणि घोटाळे आणि भ्रष्टाचाराद्वारे प्रकल्प प्रलंबित ठेवतात आणि देशाने अनेक दशकांपासून अशा कुशासनाची अनुभूती घेतली आहे, असे त्यांनी नमूद केले.
आज उद्घाटन झालेली मेट्रो मार्गिका काही मागील प्रशासनांच्या कृतींची आठवण करून देते याकडे लक्ष वेधत तिच्या पायाभरणी समारंभात सहभागी झाल्याचे स्मरण मोदींनी केले, त्यावेळी लाखो मुंबई कुटुंबांमध्ये हालअपेष्टा कमी होण्याची आशा निर्माण झाली होती. तथापि, त्यानंतरच्या सरकारने हा प्रकल्प थांबवला, ज्यामुळे देशाला हजारो कोटींचे नुकसान झाले आणि अनेक वर्षे दीर्घकाळ त्रास सहन करावा लागला असे त्यांनी निदर्शनास आणले. ही मेट्रो मार्गिका पूर्ण झाल्यानंतर, दोन ते अडीच तासांचा प्रवास आता फक्त 30 ते 40 मिनिटांवर येईल असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. प्रत्येक मिनिट महत्त्वाचे असणाऱ्या मुंबईसारख्या शहरात नागरिकांना तीन ते चार वर्षे या सुविधेपासून वंचित ठेवले गेले जो एक गंभीर अन्याय आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
“गेल्या अकरा वर्षांपासून, सरकारने नागरिकांचे जीवनमान सुलभ करण्यावर भर दिला आहे”, असे पंतप्रधान म्हणाले. रेल्वे, रस्ते, विमानतळ, मेट्रो आणि इलेक्ट्रिक बसेससारख्या सुविधांमध्ये अभूतपूर्व गुंतवणूक केली जात आहे यावर त्यांनी भर दिला. या विकासाची उदाहरणे म्हणून त्यांनी अटल सेतू आणि कोस्टल रोड सारख्या प्रकल्पांचा उल्लेख केला.
सुरळीत प्रवास सुनिश्चित करण्यासाठी सर्व प्रकारची वाहतूक एकात्मिक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, ज्यामुळे प्रवाशांना हाल सहन करून मार्ग बदलण्याची गरज नाही, असे मोदींनी नमूद केले. भारत, एक राष्ट्र- एक गतिशीलता या दृष्टिकोनाकडे प्रगती करत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘मुंबई १’ अॅप हे या दिशेने आणखी एक पाऊल आहे, ज्यामुळे नागरिकांना तिकिटांसाठी लांब रांगा लावणे टाळता येईल. या अॅपद्वारे, स्थानिक गाड्या, बस, मेट्रो आणि टॅक्सीमध्ये एकच तिकीट वापरता येईल, अशी नोंद त्यांनी भाषणात केली.
पंतप्रधानांनी सांगितले की, भारताची आर्थिक राजधानी आणि सर्वात उत्साही शहरांपैकी एक असलेल्या मुंबईला 2008 च्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते. त्यावेळी सत्तेत असलेल्या सरकारने दुबळेपणा दाखवत दहशतवादासमोर शरणागती पत्करली, ही टिप्पणी त्यांनी यावेळी केली. मोदी यांनी सध्याचे विरोधी पक्षाचे वरिष्ठ नेते आणि माजी गृहमंत्र्यांनी अलिकडेच केलेल्या खुलाशाचा उल्लेख केला, ज्यांनी असा दावा केला होता की मुंबई हल्ल्यानंतर भारताचे सशस्त्र दल पाकिस्तानवर हल्ला करण्यास तयार होते. त्यांनी नमूद केले की संपूर्ण देश अशा कारवाईला पाठिंबा देतो. तथापि, विरोधी पक्षनेत्याच्या मते, सरकारने परकीय देशाच्या दबावामुळे लष्करी कारवाई थांबवली. मुंबई आणि देशवासीयांच्या भावना दुखावणाऱ्या या निर्णयावर कोणाचा प्रभाव होता हे विरोधकांनी स्पष्ट करावे, अशी मागणी पंतप्रधानांनी केली. विरोधी पक्षाच्या कमकुवतपणामुळे दहशतवाद्यांना प्रोत्साहन मिळाले आणि राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड झाली, ज्याची किंमत देशाला निष्पाप जीवांनी मोजावी लागली, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
“आमच्या सरकारसाठी, देश आणि नागरिकांच्या सुरक्षेपेक्षा काहीही महत्त्वाचे नाही”, अशी पुष्टी करताना पंतप्रधानांनी सांगितले की आजचा भारत ताकदीने प्रत्युत्तर देतो आणि शत्रूच्या प्रदेशात प्रत्युत्तर देतो, जे ऑपरेशन सिंदूर दरम्यान जागतिक स्तरावर अनुभवले गेले आणि ज्याची दखल घेतली गेली.
गरीब, नव – मध्यम वर्ग आणि मध्यम वर्ग यांना सक्षम करणे, हे राष्ट्रीय प्राधान्यक्रमावर असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठळकपणे अधोरेखित केले. जेव्हा अशा कुटुंबांना सोयी सुविधा उपलब्ध होतात, तसेच सन्मान मिळतो, तेव्हा त्यांच्या क्षमतांमध्ये वद्धी घडून येते, आणि पर्यायाने नागरिकांची सामूहिक शक्ती देशाला अधिक मजबूत करते, ही बाबही त्यांनी नमूद केली. वस्तू आणि सेवा करात अलीकडेच करण्यात आलेल्या नव्या अर्थात नेक्स्ट जेन सुधारणांमुळे अनेक वस्तू अधिक परवडणाऱ्या दरात उपलब्ध झाल्या आहेत आणि यामुळे लोकांची क्रयशक्ती आणखी वाढली आहे, असे ते म्हणाले. याच अनुषंगाने त्यांनी बाजारातील आकडेवारीचा संदर्भही दिला. अलिकडच्याच नवरात्री सणाच्या हंगामात अनेक वर्षांचे विक्रीचे विक्रम मोडले गेल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी विक्रमी संख्येने स्कूटर, बाईक, दूरचित्रवाणी संच, वातानुकुलन यंत्रे आणि कपडे धुण्याची यंत्रे खरेदी केली असल्याची माहिती त्यांनी दिली.
सरकार नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि देशाला बळकट करण्यासाठी सातत्याने पाऊले उचलत राहील, याची ग्वाही त्यांनी दिली. सर्व नागरिकांनी स्वदेशीचा अवलंब करावा आणि अभिमानाने “हे स्वदेशी आहे ” , असे म्हणावे असे आवाहनही त्यांनी केले. हा मंत्र प्रत्येक घर आणि बाजारपेठेत निनादायला हवा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. जेव्हा प्रत्येक नागरिक स्वदेशी कपडे आणि बूट विकत घेतो, घरी स्वदेशी उत्पादने आणतो आणि स्वदेशी भेटवस्तू देतो, तेव्हा देशाची संपत्ती देशातच राहते ही बाब त्यांनी अधोरेखित केली. यामुळे भारतीय कामगारांसाठी रोजगार निर्माण होईल आणि युवा वर्गासाठीही नोकऱ्यांची निर्मिती होईल असे ते म्हणाले. संपूर्ण देश जेव्हा स्वदेशीचा अवलंब करेल, तेव्हा भारताला किती प्रचंड ताकद मिळेल, याची कल्पना करून पाहण्याचे आवाहनही पंतप्रधानांनी उपस्थितांना केले.
भारताच्या विकासाला गती देण्याच्या प्रक्रियेत महाराष्ट्र कायमच आघाडीवर राहिला असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी आपल्या संबोधनाच्या समारोपात केला. महाराष्ट्रातील प्रत्येक शहरांच्या तसेच गावांच्या क्षमतावृद्धीसाठी केंद्र आणि राज्यातील आपली सरकारे अविरतपणे काम करत राहतील अशी ग्वाही त्यांनी दिली. यानिमित्ताने त्यांनी विकास कामांशी संबंधित सर्व उपक्रमांसाठी सर्वांचे अभिनंदन करून शुभेच्छाही दिल्या.
या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राममोहन नायडू किंजरापू, मुरलीधर मोहोळ आणि जपानचे भारतातील राजदूत केईची ओनो यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
पार्श्वभूमी
भारताला जागतिक विमान वाहतूकीचे केंद्र म्हणून स्थान मिळववून देण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडला आहे. यालाच अनुसरून पंतप्रधानांनी आज सुमारे 19,650 कोटी रुपये खर्चाने बांधलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा सार्वजनिक – खाजगी भागीदारी अंतर्गत विकसित केलेला भारतातील सर्वात मोठा हरितक्षेत्र विमानतळ प्रकल्प आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मुंबई महानगर प्रदेशासाठी स्वतःचे दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल, त्याचबरोबर या विमानतळामुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील गर्दी कमी होण्यातही मदत होणार आहे. या विमानतळामुळे मुंबईचा जागतिक बहु-विमानतळ व्यवस्था असलेल्या प्रदेशांमध्ये समावेश होणार आहे. हे विमानतळ 1160 हेक्टर क्षेत्रफळ इतक्या क्षेत्रात विस्तारलेले असून, त्याची रचना – संरचना आखणी आणि नियोजन हे ते जगातील कार्यक्षम विमानतळांपैकी एक असेल अशा दृष्टीनेच केली गेली आहे. या विमानतळावरून वार्षिक 90 दशलक्ष प्रवासी आणि 3.25 दशलक्ष मेट्रिक टन मालवाहतूकीची हाताळणी केली जाणार आहे. स्वयंचलित परम प्रवासी वाहक व्यवस्था हे या विमानतळाच्या खास वैशिष्ट्यांपैकी एक आहे. चारही प्रवासी टर्मिनल्ससोबत मोठया प्रमाणात प्रवाशांचे विनाअडथळा आणि सुरळीतपणे आंतर टर्मिनल हस्तांतरण होऊ शकेल अशा पद्धतीनेच याची रचना आणि नियोजन केले गेले आहे. यासोबतच प्रवासी आल्यानंतर विमानामध्ये चढण्यापूर्वी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वापरात येणाऱ्या टर्मिनल इमारतीच्या बाहेरील परिसरातील पायाभूत सुविधांना जोडणारी स्वयंचलित परम प्रवासी वाहक व्यवस्थेची सोयही या विमानतळावर करण्यात आली आहे. शाश्वत कार्यपद्धतींचे भान ठेवत, या विमानतळावर शाश्वत विमान इंधनासाठीची समर्पित साठवणूक सुविधा, सुमारे 47 मेगावॉट सौर ऊर्जा निर्मितीची सुविधा तसेच संपूर्ण शहरासोबतच्या सार्वजनिक दळणवळणीय जोडणीसाठी इलेक्ट्रिक बस सेवेची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासोबतच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे जल टॅक्सीद्वारे जोडले जाणारे देशातील पहिले विमानतळ असणार आहे.
या दौऱ्यात पंतप्रधानांच्या हस्ते आचार्य अत्रे चौक ते कफ परेडपर्यंतच्या सुमारे 12,200 कोटी रुपये खर्चाच्या मुंबई मेट्रो मार्गिका -3 च्या 2बी या टप्प्याचे उदघाटनही झाले. यासह, 37,270 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या संपूर्ण मुंबई मेट्रो मार्गिका 3 चे (अॅक्वा लाईन) राष्ट्रार्पण त्यांनीकेले. ही मेट्रो मार्गिका शहरी वाहतूक परिवर्तनातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
मुंबईची पहिली आणि एकमेव पूर्णपणे भूमिगत मेट्रो मार्गिका म्हणून हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) प्रवासाची पुनर्परिभाषा करण्यासाठी सज्ज आहे, जो लाखो रहिवाशांसाठी वेगवान, अधिक कार्यक्षम आणि आधुनिक वाहतूक उपाय प्रदान करेल.
कफ परेड ते आरे जेव्हीएलआर पर्यंत 27 स्थानके असलेली 33.5 किमी लांबीची मुंबई मेट्रो मार्गिका -3 दररोज 13 लाख प्रवाशांना सेवा देईल. प्रकल्पाचा शेवटचा टप्पा 2 ब दक्षिण मुंबईतील फोर्ट, काळा घोडा आणि मरीन ड्राइव्ह या वारसा आणि सांस्कृतिक स्थळांशी, अविरत आणि सुलभ जोडणी प्रदान करेल. तसेच यामुळे मुंबई उच्च न्यायालय, मंत्रालय, भारतीय रिझर्व्ह बँक, मुंबई शेअर बाजार आणि नरिमन पॉइंट यासारख्या प्रमुख प्रशासकीय आणि आर्थिक केंद्रांपर्यंत थेट पोहोचणे शक्य होईल.
रेल्वे, विमानतळ, इतर मेट्रो मार्गिका आणि मोनोरेल सेवा या आणि अशा वाहतुकीच्या इतर पर्यायांसोबत कार्यक्षम एकत्रीकरण सुनिश्चित करता येईल, अशा पध्दतीने मेट्रो मार्गिका-3 ची रचना केली गेली गेली आहे. यामुळे अगदी शेवटच्या टोकापर्यंतची संपर्क जोडणी वाढेल आणि संपूर्ण महानगरीय प्रदेशातील वाहतूक कोंडी कमी होईल.
पंतप्रधानांनी मुंबई वन या ‘इंटिग्रेटेड कॉमन मोबिलिटी ॲप’ चा प्रारंभही केला. हे ॲप मेट्रो, मोनोरेल, उपनगरीय रेल्वे आणि बस अशा सर्व प्रकारच्या सार्वजनिक परिवहन सेवा वापरणाऱ्या प्रवाशांसाठी असणार आहे. यामध्ये मुंबई मेट्रो मार्गिका 2A आणि 7, मुंबई मेट्रो मार्गिका 3, मुंबई मेट्रो मार्गिका 1, मुंबई मोनोरेल, नवी मुंबई मेट्रो, मुंबई उपनगरीय रेल्वे, बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन, ठाणे महानगरपालिका परिवहन, मीरा भाईंदर महानगरपालिका परिवहन, कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन आणि नवी मुंबई महानगरपालिका परिवहन सेवेचा अंतर्भाव असणार आहे.
मुंबई वन ॲपमुळे प्रवाशांना अनेक लाभ होतील. याअंतर्गत अनेक सार्वजनिक परिवहन सेवा पुरवठादारांच्या सेवेचे तिकीट काढता येईल, डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन मिळेल आणि रांगेत उभे राहण्याची गरज उरणार नाही, एकापेक्षा अधिक वाहतूक पर्यायांची गरज असलेल्या प्रवासासाठी एकाच बहुआयामी तिकिटाची उपलब्धता अशा सोयींचा यात समावेश आहे. विलंब होत असेल तर त्याबद्दलची माहिती, पर्यायी मार्ग आणि अंदाजित आगमनाच्या वेळेबद्दल वास्तविक वेळेतील प्रवासाची माहितीही या ॲपच्या माध्यमातून मिळू शकणार आहे. यासोबतच जवळपासची स्थानके, आकर्षक आणि महत्त्वाची ठिकाणे यांबद्दलची नकाशासह माहिती, तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेची सुनिश्चिती करण्यासाठी आपत्कालीन किंवा आणीबाणीच्या घटनांची पूर्वसूचना देणाची सुविधाही यात आहेत. या सर्व सोयी सुविधा एकाच ठिकाणी एकात्मिकपणे उपलब्ध होणार असल्याने कार्यक्षमता आणि सुरक्षिततेत वाढ होईल, आणि संपूर्ण मुंबईतील सार्वजनिक परिवहन सेवेच्या अनुभवातही बदल घडून येतील.
यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते महाराष्ट्रातील कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोन्मेष विभागाचा पथदर्शी उपक्रम असलेल्या ‘स्टेप’अर्थात अल्प – मुदतीच्या रोजगार कार्यक्रमाचे देखील उद्घाटन झाले. राज्यातील 400 सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि 150 सरकारी तांत्रिक उच्च विद्यालयांमध्ये या कार्यक्रमाचा प्रारंभ केला जाईल. हा कार्यक्रम रोजगारक्षमता वाढवण्याच्या उद्देशाने कौशल्य विकासाला उद्योग जगतांच्या गरजांसोबत जोडण्याच्या दिशेने टाकलेले एक मोठे पाऊल ठरणार आहे. स्टेप या कार्यक्रमाअंतर्गत 2,500 नवीन प्रशिक्षण तुकड्या सुरू केल्या जातील, यात महिलांसाठी 364 विशेष तुकड्या आणि कृत्रिम प्रज्ञा, इंटरनेट ऑफ थिंग्ज, इलेक्ट्रिक वाहने, सौर आणि ऍडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग इत्यादीसारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञान अभ्यासक्रमांच्या 408 तुकड्या असणार आहेत.
पुणे-शहरात गुटखा बंदी असूनही छुप्या पद्धतीने गुटख्याची विक्री होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुटखा विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. नागरिकांनी पानपट्टी आणि किराणा दुकानात होणाऱ्या गुटखा विक्रीची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला कळवावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
नागरिकांनी पोलिस आयुक्तांकडे केलेल्या तक्रारींनुसार, शहरातील पानपट्टी आणि किराणा दुकानांमध्ये गुटख्याची सर्रास विक्री सुरू आहे. विशेषतः शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरातही तंबाखूजन्य पदार्थांची आणि गुटख्याची विक्री होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.राज्यात गुटखा बंदी लागू असली तरी, परराज्यातून छुप्या मार्गाने गुटखा शहरात आणला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. उपनगरातील गोदामांमध्ये गुटख्याचा साठा करून तेथून शहरातील छोट्या दुकानांमध्ये विक्रीसाठी पाठवला जातो. यापूर्वी पोलिसांनी महामार्गावर गुटखा तस्करी करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली होती, मात्र तरीही छुप्या पद्धतीने विक्री सुरूच असल्याचे दिसून आले आहे.या गंभीर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुन्हा एकदा नागरिकांना गुटखा विक्री करणाऱ्यांची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला देण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी स्थानिक पोलिस ठाण्यातील अधिकारी आणि गुन्हे शाखेच्या पथकांना गुटखा विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
गुटखा विक्रीबाबतची माहिती डायल ११२ किंवा १०० या क्रमांकावर कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे, जेणेकरून नागरिक निर्भयपणे माहिती देऊ शकतील.
पुणे-कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या सख्ख्या भावाला शस्त्र परवाना देण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे. निलेश घायवळ याचा सख्खा भाऊ सचिन बन्सीलाल घायवळ याला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या स्वाक्षरीने शस्त्र परवाना देण्यात आल्याची मोठी माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे यापूर्वी सचिन घायवळवर अर्म्स ऍक्टनुसार गुन्हा दाखल आहे. सचिन घायवळ याला 20 जून रोजी शस्त्र परवाना देण्यात आला होता. त्याला शस्त्र परवाना देण्यास पोलिसांचा विरोध होता. पण हा विरोध डावलून त्याला शस्त्र परवाना देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. सचिन घायवळ याच्यावर पुण्यात अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत गेलेले माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी यापूर्वी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयात कार्यरत असलेले समीर पाटील यांचं नाव घेतलं होतं. धंगेकर यांनी समीर पाटील यांचं नाव घेत आरोप केले होते. पण त्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्र्याचं नाव समोर आलं आहे.
गुंड निलेश घायवळ याच्या विरोधात पुणे पोलिसांची धडाकेबाज कारवाई केली जात आहे. पुणे पोलिसांकडून निलेश घायवळच्या मालमत्तांवर छापा टाकला जात आहे. निलेश घायवळची जामखेड, अहिल्यानगर, धाराशिव येथे 40 ठिकाणी संपत्ती असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. याच प्रकरणात तपास करत असताना आता धक्कादायक माहिती समोर येत आहे. निलेश घायवळच्या सख्ख्या भावाला शस्त्र परवाना देण्यात आला. विशेष म्हणजे पोलिसांचा विरोध असताना हा परवाना देण्यात आल्याचं उघड झालं आहे. या संबंधित प्रतवर खुद्द गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची स्वाक्षरी आहे.
मुंबई- महापालिका रुग्णालयांची दयनीय अवस्था दिवसेंदिवस उघड होत असून, महापालिकेचा 7 हजार कोटी रुपयांचा आरोग्य विभागाचा निधी नेमका जातो कुठे? असा संतप्त सवाल मुंबई काँग्रेस अध्यक्षा आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी आज विलेपार्ले येथील आर. एन. कूपर रुग्णालयाला भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. रुग्णालयातील अस्वच्छता, औषधांचा तुटवडा आणि कर्मचारीसंख्येची कमतरता पाहून त्यांनी राज्य सरकारवर तीव्र शब्दात निशाणा साधला.
भेटीदरम्यान गायकवाड यांच्यासोबत माजी आमदार अशोक जाधव, मोहसिन हैदर, अशरफ आझमी, अवनीश सिंग, सुरेशचंद्र राजहंस, जयकांत शुक्ला यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी रुग्णालयातील विविध वॉर्ड, औषध वितरण केंद्र, प्रयोगशाळा आणि आपत्कालीन विभागाची पाहणी केली.
यानंतर माध्यमांशी बोलताना गायकवाड म्हणाल्या की, कूपर रुग्णालयाची अवस्था गेल्या अनेक महिन्यांपासून अत्यंत दयनीय आहे. रुग्णांसाठी योग्य सुविधा नाहीत, औषधांचा तुटवडा आहे, कर्मचारीसंख्या अपुरी आहे आणि मूलभूत सुविधांचा अभाव आहे. इतकेच नव्हे तर अस्वच्छतेमुळे रुग्णालयात उंदरांचा सुळसुळाट झाला असून, गेल्या दोन महिन्यांत सहा रुग्णांना उंदरांनी चावा घेतल्याचे धक्कादायक प्रकार घडले आहेत.
खासदार गायकवाड म्हणाल्या की, मुंबई महानगरपालिकेकडे दरवर्षी आरोग्य विभागासाठी 7 हजार कोटी रुपयांचा प्रचंड निधी मंजूर केला जातो. मात्र, या निधीतून रुग्णालयांना काहीच मिळत नाही. औषधे नाहीत, उपकरणे बिघडलेली आहेत, आणि रुग्णांना बेडसाठी विनवण्या कराव्या लागत आहेत. हा निधी नक्की खर्च होतो कुठे? ही चौकशी व्हायला हवी. त्यांनी सरकारवर आरोप करताना सांगितले की, भाजप-महायुती सरकार आणि बीएमसी प्रशासन मुंबईकरांच्या जीवाशी खेळत आहे. ही केवळ निष्काळजीपणा नाही, तर एक प्रकारचा गुन्हा आहे. गरीब आणि मध्यमवर्गीय मुंबईकरांना सरकारी रुग्णालयांवरच अवलंबून राहावे लागते. त्यांचा विश्वासच आता उडाला असल्याचा आरोप त्यांनी केला.
गायकवाड यांनी सांगितले की, त्यांनी यापूर्वी कुर्ला, वांद्रे, गोवंडी आणि घाटकोपर येथील उपनगरी रुग्णालयांनाही भेट दिली होती. सर्वत्र एकच चित्र दिसते, औषधांचा तुटवडा, डॉक्टरांची कमतरता आणि रुग्णांची अमानुष अवस्था. प्रशासनाकडे वारंवार लक्ष वेधल्यानंतरही परिस्थितीत काहीच सुधारणा झालेली नाही. हे सर्व जाणीवपूर्वक केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
महापालिकेच्या रुग्णालयांची दुरवस्था करून त्यांच्या खासगीकरणाचा डाव सरकार खेळत आहे. बीएमसीच्या माध्यमातून चालणाऱ्या आरोग्य यंत्रणेला जाणीवपूर्वक दुर्बल बनवले जात आहे, जेणेकरून खासगी हॉस्पिटल्सना फायदा मिळेल. पण आम्ही तसे होऊ देणार नाही. सार्वजनिक आरोग्य ही सरकार आणि महापालिकेची जबाबदारी आहे. त्याचे खासगीकरण आम्ही कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, असा इशारा खासदार गायकवाड यांनी दिला.
गायकवाड यांनी सांगितले की, या सरकारमध्ये थोडीशी नीतिमत्ता शिल्लक असेल तर त्यांनी तत्काळ सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळणे थांबवावे. रुग्णालयांमध्ये औषधांचा पुरवठा, स्वच्छता आणि कर्मचाऱ्यांची भरती त्वरित सुरू करावी. अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून जनआंदोलन छेडू. त्यांनी शेवटी असा इशाराही दिला की, बीएमसी आणि राज्य सरकारकडून जर मुंबईकरांच्या आरोग्याशी केलेली ही प्रतारणा सुरूच राहिली, तर काँग्रेस मुंबईभर तीव्र आंदोलन उभारेल. गरीब आणि रुग्णांच्या बाजूने आम्ही ठाम आहोत.
पुणे दि. ८ :-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी वस्तूंचा वापर करण्याबाबत केलेल्या आवाहनानुसार महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे ९ ते १४ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत पुणे येथील पुना गोअन इन्स्टिट्यूट, नाना पेठ येथील सभागृहात खादी व कुटिरोद्योगातून तयार झालेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन (स्वदेशी महोत्सव) आयोजन करण्यात आले आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांच्या हस्ते होणार आहे. प्रसंगी मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गीतांजली बाविस्कर उपस्थित राहणार आहेत. प्रदर्शनात खादीचे कुर्ते , साड्या, अन्य कपडे, मध व त्यापासून तयार वस्तू तसेच ग्रामोद्योगातून तयार केलेले मसाले, पापड, लोणचे, कोल्हापूरी चप्पल, पारंपारिक चामड्याच्या वस्तू, दिवाळी फराळ व कंदील, सेंद्रीय साबण, तेल, वनऔषधे, लोकर पासून तयार केलेली घोंगडी आदी वस्तू विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.
सदर प्रदर्शन रोज सकाळी ११.०० ते रात्री ८.०० वाजेपर्यंत खुले असणार आहे. नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन ग्रामीण भागातील उत्पादनांची खरेदी करुन स्वदेशी वस्तूंच्या प्रसाराला हातभार लावावा, असे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे. प्रदर्शनासंबंधी अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी सुधीर केंजळे ८२९१९१६६५१ यांच्याशी संपर्क साधावा, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नित्यानंद पाटील यांनी सांगितले आहे.
पुणे, दि.०८ ऑक्टोबर : आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या तरुणांना सक्षम उद्योजक बनविण्याच्या उद्देशाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने बँक कर्जावरील व्याज परतावा योजना राबविण्यापुरते मर्यादित न राहता, लाभार्थ्यांना त्यांच्या व्यवसायासाठी आवश्यक असलेले उद्योजकता प्रशिक्षण व मार्गदर्शन देखील उपलब्ध करून देणार आहे, अशी माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये दिली.
याअंतर्गत उद्योग-सारथी प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत दि. २४ सप्टेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. या वेबिनारमध्ये “पशुपालन व दुग्ध व्यवसाय” या विषयावर पुणे कृषी विद्यालयाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने यांनी मार्गदर्शन केले.
या वेबिनारमध्ये दुग्धव्यवसायासाठी योग्य जातीच्या जनावरांची निवड, संतुलित आहार व्यवस्थापन, आरोग्य काळजी, प्रतिबंधात्मक उपाययोजना, आर्थिक नियोजन तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या विषयांवर सविस्तर माहिती देण्यात आली. उपस्थित लाभार्थ्यांनी थेट शंका विचारून तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळवले.
महामंडळाच्या वतीने राज्यभरातील युवक, महिला उद्योजिका व स्वयं-सहायता गटांसाठी अशा प्रकारच्या ऑनलाईन प्रशिक्षण कार्यशाळांचे सातत्याने आयोजन करण्यात येणार असून, या उपक्रमामुळे उद्योजकांच्या व्यवसाय वृद्धीस चालना मिळणार आहे, असे मत महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी व्यक्त केले.
पुणे, दि. 8 ऑक्टोबर : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ अंतर्गत पदवीधर तसेच शिक्षक मतदार नोंदणी करण्यास सुरुवात झाली असून शिवाजीनगर मतदार संघातील पात्र मतदारांनी ६ नोव्हेंबरपूर्वी मतदार यादीमध्ये आपल्या नावाची नोंदणी करावी असे आवाहन सहायक मतदार नोंदणी अधिकारी पदवीधर व शिक्षक मतदरासंघ तथा २०९ शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी गजानन गुरव यांनी केले आहे.
शिवाजीनगर मतदार संघाकरीता एकूण ९ मतदान केंद्रे आहेत. शिक्षक मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्याकरिता शिक्षक मतदारांसाठी नमुना क्र. १९ व पदवीधर मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्याकरिता नमुना क्र. १८ उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
पदवीधर मतदार नोंदणीसाठी भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून १ नोव्हेंबर २०२५ पूर्वी किमान ३ वर्षापूर्वी पदवीधर झालेला किंवा पदवीशी समकक्ष शैक्षणिक पात्रता धारण करणारा पदवीधर पात्र राहील. १ नोव्हेंबर २०२५ च्या लगत पूर्वीच्या सहा वर्षांतील किमान तीन वर्ष माध्यमिक शाळेच्या दर्जापेक्षा कमी नसलेल्या अशा राज्यातील कोणत्याही मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेत अध्यापन केलेल्या प्रत्येक शिक्षक मतदार यादीत नाव नोंदविण्यास पात्र आहेत.
मतदान केंद्रांसाठी पदनिर्देशित अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे, अशी माहिती श्री. गुरव यांनी प्रसिद्धी पत्रकानव्ये दिली आहे.