Home Blog Page 100

धर्मवीर आनंद दिघेसाहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाचे सभासद नोंदणीबाबत आवाहन

पुणे, दि. 9: जिल्ह्यातील ऑटोरिक्षा आणि मीटर्ड टॅक्सी धारकांकरिता धर्मवीर आनंद दिघेसाहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळाचे सभासद होण्याकरिता पात्र रिक्षा चालक व मालकांनी https://ananddighekalyankarimandal.org या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

नोंदणी करण्याकरिता अर्जदारांकडे अनुज्ञप्ती, बॅज, परवाना, शिधापत्रिका, आधार कार्ड, पॅन कार्डची आवश्यकता आहे. ऑनलाईन अर्ज भरतांना तांत्रिक अडचण आल्यास त्याचे निराकरण करण्याकरिता कर्मचाऱ्यांच्या विशेष नियुक्ता करण्यात आल्या आहेत. याकामी ते सोमवार ते शुक्रवार या कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत उपलब्ध असणार आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने देण्यात आली आहे.

सावित्रीबाई फुले यांच्यावर शेण फेकले त्याच प्रवृत्तीने सरन्यायाधीशांवर हल्ला – अरविंद शिंदे

सरन्यायाधीश यांच्यावर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पुणे काँग्रेस चे आंदोलन.

पुणे- पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भुषणजी गवई यांच्यावर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले.आंदोलन प्रसंगी आपल्या भाषणात अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘चप्पल भिर्रकावणारी प्रवृत्ती नक्की कोणती आहे? ही तीच प्रवृत्ती आहे जीणे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक नाकारला, ही तीच प्रवृत्ती आहे ज्यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्यावर शेण फेकले आणि दगडांचा मारा केला, ही तीच प्रवृत्ती आहे ज्यांनी आगरकर जिवंत असताना त्यांची अंतयात्रा काढली आणि ही तीच प्रवृत्ती आहे ज्यांनी शाहू महाराजांचा वेदोक्ताचा अधिकार नसल्याचे ठणकावून सांगितले.

हा हल्ला केवळ व्यक्तीवरचा किंवा पदावरचा नसून भारताच्या संविधानावर आणि सामाजिक समतेवर झालेला हल्ला आहे. हल्लेखोर खुलेआम आपल्या कृत्याचे समर्थन social media मधून करत आहे हे त्याहूनही दुर्दैवी आहे. हा न्यायव्यवस्थेला जाणीवपूर्वक धमकावण्याचा प्रयत्न असून हल्लेखोरावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली कारवाई करा, अशी मागणी आम्ही करत आहोत. तसेच या कृतीमागे अन्य कोणाचा हात नाही ना, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.’’

यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या समवेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे खजिनदार ॲड. अभय छाजेड, माजी महापौर कमल व्‍यवहारे, माजी नगरसेवक अजित दरेकर, रफिक शेख, राजेंद्र भुतडा, तानाजी निम्हण, युवक अध्यक्ष सौरभ अमराळे, प्राची दुधाणे, अनिता धिमधिमे, सिमा सावंत, उषा राजगुरू, सुंदर ओव्‍हाळ, ॲड. राजश्री अडसुळ, अनुसया गायकवाड, ब्लॉक अध्यक्ष हेमंत राजभोज, अक्षय माने, रमेश सकट, विशाल जाधव, रमेश सोनकांबळे, संतोष पाटोळे, द. स. पोळेकर, राजेश मोहिते, अनिल पवार, अविनाश अडसुळ, रवि पाटोळे, ॲड. शाबीर खान, ॲड. निलेश बोराटे, विनय ढेरे, ऋषीकेश बालगुडे,  सुनिल घाडगे, विल्सन चंदवेळ, चेतन पडवळ, संतोष सुपेकर, अमित कांबळे, सद्दाम शेख, ॲड. नंदलाल धिवार, राकेश नामेकर, सुरेश चौधरी, वीराज सोंडकर आदींसह असंख्य काँग्रेसजण सहभागी होते. 

पुणे काँग्रेस कमिटीच्या वतीने भारतीय जनता पक्षाच्या ‘वोट चोरी’ विरोधात स्वाक्षरी मोहिम.

पुणे- पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज राष्ट्रभुषण चौक येथे भारतीय जनता पक्षाच्या ‘वोट चोरी’ विरोधात स्वाक्षरी मोहिम राबविण्यात आली.

      काँग्रेस पक्षाचे नेते व लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्षाने वोट चोरी करून कशी सत्ता मिळविली याबद्दल जाहिरपणे पत्रकार परिषदेमध्ये मांडणी करून दाखविली. भारतीय नागरिकांना संविधानाने दिलेला सर्वोच्च अधिकार म्हणजे मताधिकार. याच मताची चोरी मागील निवडणुकांमध्ये भाजपाने करून सत्तेची फळे चाखत आहे. देशभर या विरोधात जनतेतून रोष व्‍यक्त केला जात आहे. या संदर्भात अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने देशभर वोट चोर, गद्दी छोडचा नारा देत त्या विरूध्द स्वाक्षऱ्या मोहिम राबविण्यात येत आहेत. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने देखील सर्व सामान्य नागरिकांचा दाबला जाणारा आवाज राष्ट्रीय निवडणूक आयोगापर्यंत पोहचविण्याकरीता स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे.

      यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘लोकशाहीने सर्वांना एकसमान मतदानाचा अधिकार दिला आहे. हा मताधिकार सर्व सामान्यांकडून हिसकावून सत्तेची हौस भागवून घेत भारतीय जनता पक्ष हुकूमशाही लादण्याचा प्रयत्न करीत आहे. या मत चोरीचा तीव्र निषेध आम्ही जनतेचा आवाज बनून या स्वाक्षरी मोहिमेच्या द्वारे करीत आहोत.’’

      यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या समवेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे खजिनदार ॲड. अभय छाजेड, माजी महापौर कमल व्‍यवहारे, माजी नगरसेवक अजित दरेकर, रफिक शेख, राजेंद्र भुतडा, तानाजी निम्हण, युवक अध्यक्ष सौरभ अमराळे, प्राची दुधाणे, अनिता धिमधिमे, सिमा सावंत, उषा राजगुरू, ब्लॉक अध्यक्ष हेमंत राजभोज, अक्षय माने, रमेश सकट, विशाल जाधव, रमेश सोनकांबळे, संतोष पाटोळे, सुंदर ओव्‍हाळ, ॲड. राजश्री अडसुळ, अनुसया गायकवाड, द. स. पोळेकर, राजेश मोहिते, अनिल पवार, अविनाश अडसुळ, रवि पाटोळे, ॲड. शाबीर खान, ॲड. निलेश बोराटे, विनय ढेरे, ऋषीकेश बालगुडे,  सुनिल घाडगे, विल्सन चंदवेळ, चेतन पडवळ, संतोष सुपेकर, अमित कांबळे, सद्दाम शेख, ॲड. नंदलाल धिवार, राकेश नामेकर, सुरेश चौधरी, वीराज सोंडकर आदींसह असंख्य काँग्रेसजण सहभागी होते. 

शोभेच्या दारू व फटाक्यांच्या दुकानांपासून १०० मीटर परिसरात धूम्रपानास, फटाके वाजविण्यास बंदी

पुणे, दि.९ : शोभेच्या दारू आणि फटाक्यांच्या दुकानांपासून १०० मीटर परिसरात धूम्रपानास बंदी घालण्याबाबतचे तसेच या परिसरात कोणत्याही प्रकारचे दारू काम करण्यास, फटाके उडविण्यास किंवा शोभेच्या दारूचे रॉकेट परिक्षणासाठी उडविण्यास मनाईचे आदेश मावळ-मुळशी उपविभागाचे उपविभागीय दंडाधिकारी सुरेंद्र नवले यांनी सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने जारी केले आहेत.

मुंबई पोलीस कायदा १९५१ च्या नियम ३३ (१) (ओ) (यु) अन्वये जारी केलेले हे आदेश ५ ते २३ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मावळ-मुळशी तालुक्यात (पोलिस आयुक्त, पुणे शहर व पिंपरी-चिंचवड कार्यक्षेत्र वगळता) लागू राहणार आहे. आदेशाचा भंग करणारी व्यक्ती मुंबई पोलीस कायदा १९५१ च्या कलम १३१ नुसार शिक्षेस पात्र राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य पदाकरिता १३ ऑक्टोबर रोजी आरक्षण सोडत

पुणे, दि.९: जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेतील ७३ सदस्य पदाकरिता आरक्षण सोडत १३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता, बहुउद्देशीय सभागृह, ५ वा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे. तसेच याच दिवशी पंचायत समिती सदस्य पदांकरिता आरक्षण सोडतीचे संबंधित तालुक्यात आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ व महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पद्धत व चक्रानुक्रम) नियम २०२५ नुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा आणि सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करावयाच्या आहेत. याकरिता सोडत कार्यक्रमाचे १३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता तालुकानिहाय आयोजन करण्यात आले आहे.

जुन्नर, आंबेगाव, खेड, मुळशी, वेल्हे आणि पुरंदर पंचायत समितीचे आरक्षण सोडत संबंधित पंचायत समिती कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. तर शिरूर पंचायत समितीची सोडत नवीन प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय, शिरूर, मावळ पंचायत समिती – भेगडे लॉन्स, वडगांव मावळ, ता.मावळ, हवेली – उद्यान प्रसाद कार्यालय, १७१२/१ बी, सी व्ही जोशी मार्ग, खजिना विहीर चौक, माडीवाले कॉलनी, सदाशिव पेठ, दौंड पंचायत समिती – बैठक सभागृह, दुसरा मजला, नविन प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय, दौंड, भोर – अभिजीत मंगल कार्यालय, भोर महाड रस्ता, भोर, बारामती पंचायत समिती- कवी मोरोपंत सभागृह, इंदापूर रस्ता, बारामती आणि इंदापूर पंचायत समितीची आरक्षण सोडत राधिका रेसिडेन्सी क्लब, इंदापूर येथे आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२५ तथा उपजिल्हाधिकारी (रोहयो) डॉ.चारुशीला देशमुख-मोहिते यांनी दिली आहे.

सरन्यायाधीश भूषण गवईंवरील हल्ला मनुवाद्यांचे कृत्य, हल्लेखोराचे आडनाव का लपवता?

महाराष्ट्राचा तालिबान करायचा आहे का? ढासळलेली कायदा सुव्यवस्था पाहता पूर्ण वेळ गृहमंत्र्यांची गरज

नाशिकच्या कुंभमेळाव्यातून मलई लाटण्याची महायुतीत स्पर्धा, पालकमंत्री नसलेल्या पिस्तुल्याची लुडबुड कशासाठी.

उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांची नाशिकमध्ये आढावा बैठक, स्थानिक निवडणुका व संघटनेवर सविस्तर चर्चा.

नाशिक, दि. ९ ऑक्टोबर २०२५..

मे महिन्यापासून राज्यात अतिवृष्टीने थैमान घातल्याने खरिप हंगाम पूर्णपणे वाया गेला असून शेतकऱ्यांचे मोठे नुसकान झाले आहे. मायबाप सरकार बळीराजाला भरीव मदत देईल अशी आशा असताना राज्य सरकारने जाहीर केलेले पॅकेज हे फसवे निघाले. हे पॅकेज शेतकऱ्यांची क्रूर थट्टा करणारे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या दौऱ्यावर आले पण शेतकऱ्यांसाठी एका दमडीचीही घोषणा केली नाही. बिहार, गुजरात व पंजाब राज्याला केंद्राचे पॅकेज देणाऱ्या नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राला मात्र वाऱ्यावर सोडले आहे. शेतकऱ्यांवरील संकट पाहता केंद्र सरकारने राज्यासाठी विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली उत्तर महाराष्ट्र विभागातील जिल्ह्यांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत येणाऱ्या आगामी निवडणुकी संदर्भातील रणनीती आणि त्या संदर्भातील आढावा, याबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीला काँग्रेस कार्य समितीचे सदस्य ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, खासदार शोभा बच्छाव, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप, वरिष्ठ उपाध्यक्ष संघटन आणि प्रशासन ऍड गणेश पाटील, वरिष्ठ उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाने, प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर, प्रदेश सरचिटणीस गुरबिंदरसिंग बच्छर, रामविजय बुरुंगले, वरिष्ठ प्रवक्ते व नाशिक जिल्ह्याचे प्रभारी सचिन सावंत, धुळे ग्रामीणचे अध्यक्ष प्रवीण चौरे, नाशिक ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल, माजी आमदार शिरीष नाईक, विधानसभा प्रभारी ब्रिजकिशोर दत्त, प्रदेश प्रदेश सचिव श्रुती म्हात्रे, शहराध्यक्ष आकाश छाजेड, ब्लॉक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले पॅकेज ही घोर फसवणूक आहे. पीकविमा काढलेला असतो, वीज कोसळून मृत्यू झाल्यास पैसे देण्याची तरतूद आहे, त्याचाही अंतर्भाव या पॅकेजमध्ये करण्यात आलेला आहे. ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये, जमीन खरडून गेली त्यासाठी हेक्टरी ५ लाख रुपये व कर्जमाफी करण्याची मागणी काँग्रेस पक्षाने पहिल्यापासून लावून धरली आहे. पंतप्रधान मुंबईत आले आणि मित्राच्या विमानतळाचे उद्घाटन करून गेले. पण महाराष्ट्रावर मोठे नैसर्गिक संकट कोसळलेले असताना त्यांनी त्यावर एक शब्दही उच्चारला नाही हा महाराष्ट्राचा घोर अपमान आहे. जनतेत सरकारविरुद्ध तीव्र असंतोष आहे, तो पंतप्रधानांच्या दौऱ्यात दिसू नये म्हणून एक फसवे पॅकेज जाहीर केले पण सरकारचे पॅकेज म्हणजे राजा उदार झाला व हाती भोपळा दिला, असा प्रकार आहे.

निवडणुकांवर डोळा ठेवून विमानतळाचे उद्घाटन..
नवी मुंबई विमानतळ प्रत्यक्षात सुरु होण्यास अजून अवधी आहे पण निवडणुकांवर डोळा ठेवून घाईघाईने उद्घाटन उरकण्यात आले आहे. याआधीही नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अरबी समुद्रातील भव्य शिवस्मारकाचे जलपूजन करण्यात आले, इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे उद्घाटनही करण्यात आले, त्याचे काय झाले. प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये, दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या, १०० स्मार्ट सिटी, कृषीवर आधारीत उद्योग याचे काय झाले, हे आपण पाहिले आहे.

महाराष्ट्राचा तालीबान करायचा आहे का…
राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळलेली आहे. महिला अत्याचार वाढले आहेत, ड्रग्जचा काळाबाजार खुलेआम सुरु आहे. नाशिकला प्रभू रामाच्या वास्तव्याची ओळख आहे, काळाराम मंदिर आहे, अधात्मिक, सांस्कृतीक व ऐतिहासिक ओळख असलेल्या शहरात ड्रग्जचे रॅकेट चालते हे गंभीर आहे. ड्रग्जच्या काळ्याधंद्याचा पर्दाफाश करण्यासाठी त्याचे गुजरात कनेक्शन तपासले पाहिजे. एकट्या नाशिक शहरात ९ महिन्यात ४४ खून झाले, हे अत्यंत गंभीर आहे. राज्यातील परिस्थिती पाहता महाराष्ट्राचा तालीबान करायचा आहे का, असा प्रश्न पडतो. कायदा सुव्यवस्था रसातळाला गेली असताना राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नाही. गृहराज्य मंत्र्याच्या आईच्या नावाने डान्स बार चालवला जातो, गुंडांना शस्त्र परवाना दिला जातो. अशा या वादग्रस्त गृहराज्य मंत्री योगेश कदम यांची हकालपट्टी केली पाहिजे पण मुख्यमंत्री अशा लोकांना पाठीशी घालतात. रमी खेळणाऱ्या कृषी मंत्र्यांचे जसे प्रमोशन झाले तसे योगश कदम यांचेही प्रमोशन होऊ शकते, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ म्हणाले.

सरन्यायाधीशांवरील हल्ला मनुवादी कृत्य..
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर कोर्टात झालेला हल्ला अत्यंत निषेधार्ह आहे. पण हल्ला करणाऱ्याचे आडनाव जाणीवपूर्वक लपवले जात आहे. अफजल खान भेटीवेळी छत्रपती शिवाजी महाराजांवर हल्ला करणाऱ्याचे नाव लपवले तसेच या हल्लेखोराचेही आडनाव लपवले जात आहे, हा हल्ला मनुवाद्यांचे कृत आहे. डोंबिवलीतही ७२ वर्षांच्या काँग्रेस कार्यकर्त्याला जातीवाचक शिव्या देऊन अपमानित केले, त्याचे पुढचे पावले सरन्यायाधीशांवरील हल्ला आहे. वेळीच कठोर पावले उचलली नाहीत तर याचे लोण सर्वत्र पसरेल, अशी भीती काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वैद्यकीय कक्ष राज्य प्रमुखपदी (विदर्भ वगळून) प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड यांची तर वैद्यकीय मदत कक्षाच्या विदर्भ प्रमुखपदी डॉ. अभ्युदय मेघे यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

ध्रुव ग्लोबल स्कूलला सीबीएसई राष्ट्रीय नेमबाजीत रौप्य पदक१० मीटर एअर रायफल स्पर्धेत १४ वर्षाखालील गटाने जिंकले पदक

पुणे, ९ ऑक्टोबरः उंड्री येथील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या  नेमबाजी
खेळाडूंनी सीबीएसई राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन करत
रौप्य पदकावर शिक्कामोर्तब केले. नुकतीच ही स्पर्धा उत्तर प्रदेश मधील
ग्रेटर नोएडा येथील जेपी पब्लिक स्कूल मध्ये संपन्न झाली. स्पर्धेत
चमकदार कामगिरी केल्यानंतर पुण्यात आगमन झाल्यावर ध्रुव ग्लोबल स्कूलचे
विश्वस्त यशवर्धन मालपाणी, संचालिका अनिष्का मालपाणी व प्राचार्या शारदा
राव यांनी सर्व खेळाडु तसेच प्रशिक्षकांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेत नेमबाजी खेळाडू गंधर्वी शिंदे, इवा मोदी, मैत्राई दाते,
अद्वैत शिंदे, अनन्या कांबळे, अहान कुमार, विक्रमादित्य सिंग परमार आणि
दिशांक टिटोरिया यांनी उत्कृष्ट कामगिरी करुन शाळेचे नाव उज्ज्वल केले.
या स्पर्धेत १४ वर्षाखालील मुलांच्या संघाने १० मीटर्स एअर रायफल
प्रकारात रौप्य पदक मिळविले. १४ वर्षाखालील मुलींच्या संघानेही दमदार
कामगिरी करताना याच क्रीडा प्रकारात सहावे स्थान पटकाविले. तसेच १७
वर्षाखालील मुलींच्या संघाने १० मीटर एअर रायफल प्रकारात १३वें स्थान
मिळवले.
शाळेने आपल्या विद्यार्थ्यांच्या कामगिरीबद्दल अभिमान व्यक्त केला.
संघाच्या यशात महत्वाची भूमिका बजावाणार्‍या प्रशिक्षक उज्ज्वला बोराडे
यांचे विशेष कौतुक करण्यात आले. या निकालांनी ध्रुव ग्लोबल स्कूलच्या
तरूण नेमबाजांची वाढती प्रतिभा आणि दृढनिश्चय अधोरेखित केले. तसेच
त्यांच्या समवयस्कांसाठी एक प्रेरणादायी उदाहण ठेवले.
प्राचार्य शारदा राव यांनी सांगितले की, संस्थेने खेळाडूंना उत्कृष्ट
क्रीडा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या आधुनिक सुविधा आणि डॉ. संजय
मालपाणी यांच्या आशीर्वादामुळे खेळाडू सातत्याने असाधारण कामगिरी करत
आहेत आणि नवीन उंची गाठत आहेत.

जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदाकरिता आरक्षण जाहीर

पुणे, दि.९: जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद क्षेत्रातील १३ पंचायत समित्यांच्या सभापती पदांची आरक्षण सोडत बहुउद्देशीय सभागृह, ५ वा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रक्रिया पूर्ण करुन जाहीर करण्यात आले.

यावेळी जिल्हा नोडल अधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२५ तथा उपजिल्हाधिकारी (रोहयो) डॉ.चारुशीला देशमुख-मोहिते, तहसीलदार जगदीश निंबाळकर, राहूल सारंग, जि. प. प्राथमिक शाळा लोणीकंदचे शिक्षक व विद्यार्थी, लोकप्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते.

पंचायत समितीनिहाय जाहीर करण्यात आलेल्या आरक्षणाबाबतचा तपशील
इंदापूर पंचायत समिती-अनुसूचित जाती, जुन्नर-अनुसूचित जमाती महिला, दौंड आणि पुरंदर-नागरिकांचा मागासवर्ग, शिरुर आणि मावळ-नागरिकांचा मागासवर्ग महिला, वेल्हे, मुळशी, भोर आणि खेड- सर्वसाधारण महिला, हवेली, बारामती आणि आंबेगाव- सर्वसाधारण याप्रमाणे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. यावेळी जि. प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या चिठ्ठी काढून आरक्षण जाहीर करण्यात आले. हे आरक्षण सभापती पदाकरिता सोडत अडीच वर्ष कालावधीकरिता असणार आहे.

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे आयोजित ‘स्वदेशी महोत्सव’ प्रदर्शनाचे उद्घाटन

खादीच्या स्वदेशी महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद-ग्रामीण उत्पादनांना प्रोत्साहन

पुणे, दि. ९ : ग्रामीण भागातील कारागीर, उद्योजक आणि महिला स्वयंसहायता गटांना व्यासपीठ मिळावे, यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ सातत्याने प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी केले.

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे पुना गोअन इन्स्टिट्यूट, नाना पेठ येथे आयोजित ‘स्वदेशी महोत्सव’ या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गीतांजली बाविस्कर, सह मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नित्यानंद पाटील, लेखा परीक्षण अधिकारी शैलेंद्र कोलथरकर, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी सुधीर केंजळे, मंडळाचे लेखापाल अमर राऊत तसेच विविध ग्रामोद्योग संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सभापती श्री. साठे म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी वस्तूंच्या वापराचे केलेले आवाहन लक्षात घेऊन महामंडळामार्फत हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. स्वदेशी वस्तूंचा वापर वाढविणे हे आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी गीतांजली बाविस्कर यांनी मंडळाची उद्दिष्टे आणि कार्ये याबद्दल माहिती दिली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा गांधीजींच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास मंडळाचे मुंबई व पुणे येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

‘स्वदेशी महोत्सव’ १४ ऑक्टोबरपर्यंत; खरेदीचे पुणेकरांना आवाहन

या प्रदर्शनात खादीचे कुर्ते, साड्या, पारंपरिक कपडे, मध, मसाले, पापड, लोणचे, कोल्हापुरी चप्पल, चामड्याच्या वस्तू, दिवाळी फराळ, कंदील, सेंद्रीय साबण, तेल, वनौषधी, तसेच लोकरीपासून तयार झालेल्या घोंगड्या अशा विविध स्वदेशी वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पुणेकर नागरिकांकडून या वस्तूंना मोठा प्रतिसाद मिळत असून, ग्रामीण उत्पादकांना थेट बाजारपेठ मिळत आहे.

हा स्वदेशी महोत्सव १४ ऑक्टोबर २०२५ पर्यंत दररोज सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुला राहणार आहे. नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन स्वदेशी वस्तूंच्या खरेदीतून ग्रामीण अर्थव्यवस्थेला हातभार लावावा, असे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.
0000

टायटनने आणले भारतातील पहिले वॉन्डरिंग अवर्स घड्याळ

होरोलॉजीच्या वाटचालीतील एक महत्त्वाचा टप्पा

स्टेलार . मध्ये प्रस्तुत केली तीन लिमिटेडएडिशन घड्याळे – सेलेस्टीयल इन्स्पिरेशनऍडव्हान्स्ड होरोलॉजी आणि रेअर मटेरियल्स

राष्ट्रीय, ९ ऑक्टोबर, २०२५:  टायटनने स्टेलार ३.० प्रस्तुत करून भारतातील घड्याळ बनवण्याच्या कलेमध्ये एक नवा अध्याय रचला आहे. टायटनने स्वतःच्या इन्फिनाईट या प्रमुख फेस्टिव कलेक्शनपासून प्रेरणा घेऊन स्टेलार ३.० तयार केले आहे. यातील ९ अतिशय अनोख्या घड्याळांपैकी ३ लिमिटेड एडिशन्स आहेत, ही तीनही घड्याळांचे वैशिष्ट्य म्हणजे वॉन्डरिंग अवर्स हा प्रकार भारतात पहिल्यांदा सादर केला जात आहे. या निमित्ताने टायटनने मुंबईतील बॅस्टियन ऍट द टॉप येथे एक विशेष लॉन्च शोकेसचे आयोजन केले होते.

स्टेलर ३.० ची कल्पना एका कॅनव्हास म्हणून करण्यात आली, असा कॅनव्हास ज्यावर अनेक खगोलीय चमत्कार आणि होरोलॉजिकल कल्पकता यांचा मिलाप होतो. द वॉन्डरिंग अवर्समध्ये हे व्हिजन प्रत्यक्षात साकार करण्यात आले आहे. चंद्र आणि प्रवास करणाऱ्या ताऱ्यांपासून, त्यांच्या खगोलीय मार्गांनी  प्रेरित होऊन हे कलेक्शन बनवण्यात आले आहे. स्फटिकीकृत टायटॅनियम, तांब्याच्या बेझल, ट्विन सॅटेलाइट डिस्क, मिनिट ट्रॅकवर प्रमाणबद्ध फिरणे ही सर्व या घड्याळांची वैशिष्ट्ये आहेत. टायटनच्या इन-हाऊस मुव्हमेंट्स यामध्ये वापरण्यात आल्या आहेत, या लिमिटेड-एडिशनमध्ये फक्त ५०० घड्याळे बनवण्यात आली आहेत. किंमत ₹१,७९,९९५

आइस मेटियोराइट, स्टेलर १ आणि २ ला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर तेच यश पुन्हा संपादन करण्यासाठी शानदार पुनरागमन करत आहे. आता यामध्ये एक कॉस्मिक आइस-ब्लू डायल है, जी खऱ्याखुऱ्या १,२०,००० वर्षे जुन्या म्यूओनियोनालुस्टा उल्केवर प्लेट करण्यात आली आहे. गहन अंतरिक्षाचा इतिहास आणि आधुनिक डिझाईन यांची ही सांगड अप्रतिम आहे. याची किंमत  ₹१,३९,९९५ आहे. ऑरोरा कैलमची किंमत ₹९५,९९५ आहे, चमकणारी हिरवी डायल नॉर्दन लाईट्सची आठवण करून देते आणि आपल्या सामंजस्यपूर्ण गतीने सूक्ष्म डिस्कला फ्रेम करते.

वॉचेस अँड वेयरेबल्सचे सीईओ, कुरुविल्ला मार्कोस यांनी सांगितले:

“टायटनने ४१ वर्षांपासून, सर्जनशीलता आणि कारीगरीच्या माध्यमातून भारतातील घड्याळ निर्मितीची व्याख्या रचली आहे. स्टेलार १.० ने डिझाईन विश्वात नव्या विषयांचा उदय घडवून आणला. स्टेलार २.० मध्ये अचूकता आणि बारकावे वाढवण्यात आले, आणि आता स्टेलार ३.० ने एका अज्ञात क्षेत्रात साहसी भरारी घेतली आहे. टायटनच्या इन-हाउस मूवमेंटचा वापर करून तयार करण्यात आलेले वॉन्डरिंग अवर्स एका निर्णायक क्षणाचे प्रतीक आहे, जे हे सिद्ध करते की आपण भारतीय घड्याळ निर्मितीला जागतिक पातळीवर मजबूत स्थान मिळवून देण्यासाठी सज्ज आहोत, जिथे नावीन्य, कलात्मकता आणि तंत्रज्ञान नैपुण्ये एक असाधारण अनुभव निर्माण करण्यासाठी एकत्र येतात. हा प्रारंभ आहे एका दूरवरच्या प्रवासाचा आणि आम्ही भारतीय घड्याळ निर्मितीला अधिकाधिक उंचीवर नेण्यासाठी वचनबद्ध आहोत.”

स्टेलार ३.० कलेक्शनचे तीन रचनात्मक आधारस्तंभ आहेत: आकाशात घडणाऱ्या घटना, ज्यांच्यामध्ये ब्रह्मांडीय चक्रांची लय पकडलेली असते; उच्च दर्जाची घड्याळ निर्मिती, ज्यामध्ये प्रगत तंत्रज्ञान आणि कथाकथन यांचे सघन मिश्रण आहे आणि दुर्मिळ सामग्री, जी ब्रह्मांडातील तत्त्वांना वेयरेबल कलेमध्ये साकार करते. नऊ घड्याळांमध्ये, हे विचार कलेक्टर्स आणि महत्त्वाकांक्षी व्यक्तींना अनंताची एक झलक दाखवण्यासाठी एकत्र आणले गेले आहेत.

निवडक टाइटन स्टोर्स आणि www.titan.co.in वर स्टेलार ३.० कलेक्शन खरेदी करता येईल. महत्त्वाकांक्षी आणि घड्याळप्रेमींना ब्रह्मांडाची सैर करता येईल, हे कलेक्शन तुम्हाला जाणीव करून देईल की अनंत, आश्चर्यकारक ब्रह्मांड तुमच्या मनगटावर सामावले जाणे शक्य आहे.

सरदार पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त २ नोव्हेंबरला ‘पुणे रन फॉर युनिटी’ महामॅरेथॉन

केंद्रीय राज्यमंत्री, खासदार मुरलीधर मोहोळ यांची पत्रकार परिषदेत माहिती

पुणे: भारताचे लोहपुरुष आणि राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांची यंदा १५० वी जयंती साजरी होत आहे. यानिमित्ताने संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने रविवार, दि. २ नोव्हेंबर २०२५ रोजी स. प. महाविद्यालय, टिळक रोड, पुणे येथे ‘पुणे रन फॉर युनिटी’, महामॅरेथॉनचे आयोजन केले आहे, अशी माहिती केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री, पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी दिली. प्रसंगी विशाल सातव, मनोज एरंडे, अमोल कविटकर, रमेश परदेशी, योगेश यावलकर, अरविंद बिजवे आदी उपस्थित होते.

मुरलीधर मोहोळ म्हणाले, “हा उपक्रम सर्व वयोगटातील नागरिकांना फिटनेस, एकता आणि राष्ट्रीय सलोखा या मूल्यांभोवती एकत्र आणणारा मोठा सार्वजनिक क्रीडा सोहळा ठरणार आहे. २०१४ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरदार पटेल यांची जयंती ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून साजरा होत आहे. त्यानिमित्ताने देशभरात ‘रन फॉर युनिटी’ (राष्ट्रीय एकता दौड) या उपक्रमाचे आयोजन केले जाते. सुरुवातीला नवी दिल्ली, त्यानंतर मुंबई, अहमदाबाद, बेंगळुरू, हैदराबाद, चंदीगड, जयपूर आणि लखनऊ या प्रमुख शहरांमध्ये हा उपक्रम घेण्यात आला आहे. यंदा पुण्यात प्रथमच राष्ट्रीय एकता दौड आयोजित करण्यात येत असून, या उपक्रमात सहभागी होण्यासाठी कुठलेही मूल्य आकारले जाणार नाही; परंतु आपले नाव रजिस्टर / नोंदवणे बंधनकारक आहे.”

यावर्षीच्या ‘पुणे रन फॉर युनिटी’मध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह अंदाजे २०,००० धावपटू सहभागी होणार आहेत. केनिया, इथिओपिया इत्यादी देशांतील आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन धावपटूंना आमंत्रित केले आहे व त्यातील काही धावपटूंचा सहभाग निश्चित झाला आहे. तसेच भारत देशातील नामांकित राष्ट्रीय धावपटूंना देखील आमंत्रित केले आहे. विजेत्यांसाठी एकूण १० लाखांचे रोख पारितोषिक ठेवण्यात आले आहे. २१ कि.मी. श्रेणीत विजेत्या पुरुष व महिला खेळाडूंना प्रथम परितोषिक प्रत्येकी १,००,००० देण्यात येणार आहे.

पुणेकरांसह संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ या ध्येयाला प्रत्यक्ष हातभार लावावा, तसेच सहभाग व नोंदणीसाठी सोबत दिलेल्या क्यूआर कोडचा उपयोग करावा, असे आवाहन मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.
————————————
मॅरेथॉनमध्ये चार मुख्य धाव श्रेणी
* २१ कि.मी.- हाफ मॅरेथॉन (टायमिंग चिपसह)
* १० कि.मी.- स्पर्धात्मक धाव (टायमिंग चिपसह)
* ५ कि.मी.– फन रन
* ३ कि.मी.– फॅमिली व बिगिनर रन

———————————–

मंत्रालयासमोर अर्ध नग्न लक्षवेधी चित्र आंदोलन ६ पासून;शासन व सत्ताधारी राजकीय मंडळी राहतील आत्महत्येस जबाबदारः चित्रकार माने यांचा इशारा

पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या आत्मनिर्भर भारत योजनेची अंमलबजावणी न करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करणे, व्यवसायासाठी आत्मनिर्भर भारत योजनेतून कर्ज मिळणे व शासकीय व राजकीय स्तरावर गेल्या ५ वर्षापासून माझी दखल का घेतली नाही. या सर्व मागण्यांसहित येत्या ६ ऑक्टोबर पासून मुंबई येथे मंत्रालयासमोर पंतप्रधान मोदी यांच्या चित्रासहित अर्ध नग्न लक्षवेधी चित्र आंदोलन करणार आहे. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही याची दखल घेतली नाही तर माझ्या आत्महत्यास शासन व राजकीय मंडळी जबाबदार राहतील. असा इशारा जगद्गुरू संत तुकाराम महाराज व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तैल चित्र काढणारे देहू येथील ज्येष्ठ चित्रकार प्रेम माने यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
वरील विषयाला अनुसरून २०२४ ला पुणे जिल्हाधिकारी यांना ३५ पानांचे निवेदन दिले होते. परंतू आजपर्यंत त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. प्रधानमंत्री मोदी यांच्या सुंदर स्वप्नातील विकसीत आत्मनिर्भर भारत या संकल्पनेला बँक व सत्ताधारी पार्टीतील काही पदाधिकारी यांच्याकडून प्रचंड विरोध होत असून पंतप्रधानांच्या आदेशाला पायदळी तुडविले जात आहे.
वास्तव आर्ट या बंद पडलेल्या व एनपीए झालेल्या माझ्या व्यवसायासाठी आत्मनिर्भर भारत योजनेतून १ कोटी रुपये कर्ज मागणी केली होती. बँकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत झालेल्या मिटींग मध्ये मला १० लाख रुपये कर्ज देण्याचे मान्य केले. परंतू स्थानिक बँक मॅनेजरने कर्ज मंजूर केले नाही. त्याच प्रमाणे माझा स्वर्गवासी मुलगा जो १०० टक्के दिव्यांग होता. त्याच्या नावे पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अपंग बिज भांडवल योजनेतून दिड लाख रुपयांची कर्ज मागणी केलेली बँकेनी नाकारली. याचे कारण अद्याप समझले नाही. २८ मे २०२४ रोजी पत्नी कामिनी माने हिने प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून बँक ऑफ महाराष्ट्र देहूगाव शाखेतून २ लाख रुपये कर्ज मागणी केली होती परंतू बँकेने ते ही नाकारले. अशा प्रकारे वारंवार बँकेने माझे कर्ज का नाकारले हे अद्याप कळाले नाही.
चित्रकार प्रेम माने यांनी आरोप केला की, बँकेच्या कर्ज अडवणुकीमुळे माझ्या व्यवसायाचे प्रत्यक्ष १० कोटी रूपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या आर्थिक नुकसानीमुळे उपचारा अभावी माझ्या दिव्यांग मुलाला गमवावे लागले. याची जबाबदारी कोण घेणार हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
यामुळे माझी मागणी आहे की बँकेने आमचे अडवून ठेवलेले कर्ज तातडीने मंजूर करावे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमच्या कर्जासाठी बँकेला हमी पत्र दयावे व तातडीने कर्ज मिळवून देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

मराठी माझा अभिमान असोसिएशनतर्फे१९ ऑक्टोबरला ‘सुरमयी दिवाळी पहाट’

पुणे: मराठी संस्कृती आणि मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्यरत मराठी माझा अभिमान असोसिएशनतर्फे सुरमयी दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. रविवार, दि. १९ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ६ वाजता सिम्बायोसिस ऑडिटोरियम, विमाननगर पुणे येथे ही संगीत मैफल रसिकांना अनुभवता येणार आहे, अशी माहिती असोसिएशनच्या उपाध्यक्षा अनिता लोखंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी सचिव रेखा वाबळे, खजिनदार वृषाली मिरजगांवकर, सदस्य अश्विनी देसाई, ऍड. नीलिमा चव्हाण, स्नेहा सांडभोर, अनिता नेवे, मुक्ता जगताप आदी उपस्थित होत्या.

अनिता लोखंडे म्हणाल्या, “असोसिएशनच्या संस्थापिका मिनल देशमुख यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली हा दिवाळी पहाटचा कार्यक्रम होत आहे. दिवाळीच्या मंगलमय पहाटेला, सुरांची उधळण, गाण्याची मैफल आणि आनंदाचा जल्लोष याची अनुभूती या कार्यक्रमातून मिळणार आहे. ऋषिकेश रानडे आणि प्राजक्ता रानडे यांचे बहारदार सादरीकरण, मिलिंद कुलकर्णी यांचे ओघवते निवेदन ऐकण्याची संधी रसिकांना मिळेल. हा कार्यक्रम विनामूल्य आहे.”

रेखा वाबळे म्हणाल्या, “पुणे हे संगीत, नाट्य, साहित्य आणि कलेचे माहेरघर आहे. सवाई गंधर्व संगीत महोत्सव, पुणे फेस्टिवल, गणेशोत्सव सांस्कृतिक आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. मराठी संस्कृती आणि मराठी भाषेचे संवर्धन व्हावे, यासाठी ‘मराठी माझा अभिमान असोसिएशन’ जून २०२४ पासून कार्यरत आहे.”

वृषाली मिरजगांवकर यांनी सांगितले की, श्रावणसरी, सामूहिक अथर्वशीर्ष पठण, सामूहिक श्रीसुक्त पठण, ढोलताशा, लेझीम, शंखनाद यांचे प्रशिक्षण असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. आषाढी वारीमध्ये शिधा वाटप व आपत्ती काळात गरजूंना मदत अशी सामाजिक कार्येही केली आहेत.”

संप बेकायदेशीर; कामांवर विनाविलंब रूजू व्हा,महावितरणकडून वीज कर्मचाऱ्यांना आवाहन

मुंबई, दि. ९ ऑक्टोबर २०२५: वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या सर्व मागण्यांशी सुसंगत भूमिका महावितरणच्या व्यवस्थापनाने यापूर्वीच बैठकीमध्ये स्पष्ट केली आहे. तरीही सात वीज कर्मचारी संघटनांनी दि. ९ ऑक्टोबरपासून ७२ तासांच्या संपाला सुरवात केली आहे.

वीज ही अत्यावश्यक सेवा आहे व नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षक अधिनियम म्हणजेच मेस्मालागू करण्यात आला आहे. त्यानुसार हा संप बेकायदेशीर असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्याच्या ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आणि महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी संयुक्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत स्वतंत्र बैठक घेतली आहे. तीत खाजगीकरण व पुनर्रचनेसह संयुक्त कृती समितीच्या इतर सर्व मुद्द्यांशी सुसंगत व सकारात्मक भूमिका व्यवस्थापनाने  स्पष्ट केली आहे. त्याचे लेखी इतिवृत्तही संयुक्त कृती समितीला देण्यात आले आहे.

हा संप टाळण्यासाठी संयुक्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत व्यवस्थापनाने वेळोवेळी प्रत्यक्ष चर्चा केली आहे. मात्र सर्वच मागण्यांशी पुरक असलेली स्पष्ट भूमिका जाहीर करूनही संयुक्त कृती समितीने संपावर जाण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.

सध्या महाराष्ट्र अतिवृष्टी व पूर परिस्थितीच्या संकटातून सावरत आहे. त्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत आहेत. दिवाळी सण देखील काही दिवसांवर आला आहे. या पार्श्वभूमिवर संपामध्ये सहभागी झालेल्या सर्वांनी शासकीय कर्तव्य बजावण्यासाठी आपापल्या कार्यालयांमध्ये विनाविलंब रूजू व्हावे. पूर परिस्थितीच्या संकट काळात तसेच सणासुदीच्या दिवसांत तत्पर वीज सेवा देत नागरिकांना सहकार्य करावे असे महावितरणच्या वतीने संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांनी संपकरी कर्मचाऱ्यांना केले आहे.

२०२६ पासून ब्रिटनमध्ये यशराज फिल्म्सच्या तीन मोठ्या चित्रपटांचे चित्रीकरण होणार, ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची घोषणा!

भारताची आघाडीची चित्रपट निर्मिती आणि वितरण कंपनी यशराज फिल्म्स (YRF) ने जाहीर केले आहे की ते २०२६  पासून आपले तीन प्रमुख चित्रपट युनायटेड किंगडममध्ये (UK) चित्रित करणार आहे. या निर्णयामुळे 3,000 हून अधिक रोजगारनिर्मिती होईल आणि ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला कोट्यवधी पौंडांचा फायदा होणार आहे, अशी घोषणा ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी आज मुंबईत केली.

या ऐतिहासिक प्रसंगी पंतप्रधानांनी यशराज स्टुडिओ, मुंबई येथे भेट दिली, त्यांच्या सोबत ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूटब्रिटिश फिल्म कमिशनपाइनवुड स्टुडिओएल्स्ट्री स्टुडिओ आणि सिविक स्टुडिओ यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. योगायोगाने यशराज स्टुडिओला या वर्षी भारतामध्ये 20 वर्षे पूर्ण होत आहेत (12 ऑक्टोबर).

पंतप्रधान स्टार्मर यांचा हा दोन दिवसांचा दौरा भारत आणि ब्रिटनमधील आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध मजबूत करण्यासाठी आहे.

ब्रिटनचा चित्रपट उद्योग दरवर्षी 12 अब्ज पौंडांचे योगदान देतो आणि 90,000 नोकऱ्या निर्माण करतो. भारत हा जगातील सर्वात मोठा चित्रपट निर्मिती करणारा देश आहे. यशराज फिल्म्स चा हा यूकेमधील पुनरागमन प्रकल्प भारत-ब्रिटन व्यापार कराराच्या सकारात्मक परिणामांचे प्रतीक मानला जात आहे.

कीर स्टार्मर म्हणाले —“बॉलिवूड परत ब्रिटनमध्ये आले आहे, आणि त्याच्यासोबत येत आहेत रोजगार, गुंतवणूक आणि नवे अवसर. हा करार भारत-ब्रिटन व्यापार संबंधांचा सर्वोत्तम नमुना आहे — जो विकासाला चालना देतो आणि दोन्ही देशांच्या सांस्कृतिक नात्यांना बळकट करतो.”

यशराज फिल्म्स चे सीईओ अक्षय विधानी म्हणाले —“यूके आमच्यासाठी सदैव खास राहिले आहे. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे (DDLJ) सारखे आमचे अनेक क्लासिक चित्रपट इथेच चित्रित झाले. पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे आमच्या स्टुडिओत स्वागत करणे आणि हा ऐतिहासिक करार साक्षीने पाहणे हा आमच्यासाठी सन्मान आहे. आम्ही भारत आणि ब्रिटनच्या सहकार्याने जागतिक कंटेंट निर्मितीला नवीन दिशा देऊ इच्छितो.”

“डीडीएलजे च्या 30व्या वर्षात यूकेमध्ये पुन्हा परतणे हे खूपच भावनिक आहे. आम्ही सध्या त्याच चित्रपटाचे इंग्रजी म्युझिकल रूपांतर कम फॉल इन लव (CFIL) यूकेमध्ये सादर करत आहोत. यूकेचे इन्फ्रास्ट्रक्चर, तंत्रज्ञान आणि टॅलेंट अप्रतिम आहे.”

यूके’च्या सांस्कृतिक सचिव लिसा नंदी म्हणाल्या , “भारत आणि ब्रिटनचे चित्रपट उद्योग खरोखरच जागतिक दर्जाचे आहेत. दोन्ही देशांच्या गाढ सांस्कृतिक नात्यामुळे बॉलिवूड आणि ब्रिटिश स्टुडिओंचे सहकार्य नैसर्गिकच आहे. या चित्रपटांचे चित्रीकरण ब्रिटनमध्ये झाल्याने आमच्या सर्जनशील क्षेत्राला आणखी बळ मिळेल.”

या निर्णयामुळे भारत-ब्रिटन सांस्कृतिक सहकार्याला नवीन उभारी मिळेल आणि दोन्ही देशांमध्ये नवीन रोजगार, गुंतवणूक आणि प्रतिभा विनिमयाचे अवसर निर्माण होतील.

याशिवाय, ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूट आणि नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NFDC) यांच्यात सहकार्य करार (MoU) होणार आहे, ज्यामुळे दोन्ही देशांचे निर्माते आणि कलाकार संसाधने आणि कौशल्य शेअर करू शकतील.

पूर्वी भारत-यूके सहकार्याने बनलेल्या  स्लमडॉग मिलेनियर या चित्रपटाने फक्त £12 मिलियन च्या बजेटवर £300 मिलियन ची कमाई केली होती — हे सिद्ध करत की ब्रिटिश तांत्रिक कौशल्य आणि भारतीय कथा सांगण्याची कला एकत्र आल्यास जगभरात चमत्कार घडू शकतो.