अभिनयासोबतच आपल्या बहारदार नृत्याविष्कारांनी रसिकांना घायाळ करणारी अभिनेत्री दिपाली सय्यद प्रथमच एका हिंदी-मराठी फ्युजन असलेल्या जुगलबंदी गीतावर थिरकताना दिसणार आहे. ‘आर.पी.जी प्रॉडक्शन’ प्रस्तुत व राजश्री गायकवाड निर्मित ‘हिरो’ या आगामी मराठी सिनेमात आपल्याला हे गाणं पहायला मिळणार आहे. दिपाली सय्यद सोबत शास्त्रीय नृत्यात तरबेज अभिनेत्री सुखदा खांडकेकर यांचा भन्नाट नृत्याविष्कार पहायला मिळणार आहे. एन.एन सिद्दिकी दिग्दर्शित ‘हिरो’ चित्रपटातील हे गीत नुकतंच चित्रीत करण्यात आलं आहे.
‘धिनक धिन आग लगा दू मे’.. ‘गं बाई माझा तोरा नखरेल’..
असे बोल असलेल्या या गीताला ख्यातनाम ज्येष्ठ गायिका आशा भोसले आणि साधना सरगम यांनी मखमली स्वरसाज दिला आहे. गीतकार असलम सयानी व कौस्तुभ पंत यांनी लिहिलेल्या या हिंदी-मराठी फ्युजन गीताला संगीताची साथ संगीतकार राजा अली यांनी दिली आहे तर नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकर यांनी केलं आहे.
दिपाली सय्यद यांना आजवर असंख्य गीतांवर नृत्य सादर करताना पाहिले आहे; परंतु ‘हिरो’ चित्रपटातील या गीताच्या निमित्ताने प्रथमच दिपाली व सुखदा यांची अफलातून अदाकारी एकत्रित पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. अनिस मोराब सहनिर्मित ‘हिरो’ चित्रपटात रमेश देव, विजय पाटकर, उदय टिकेकर, सुखदा खांडकेकर, भूषण पाटील, वैष्णवी कर्मारकर यांच्या भूमिका आहेत.