मुंबई- राज्यातील सरकार लोकशाही व संसदीय परंपरांच्या चिंधडया उडवत स्थापन झाले आहे. विश्वासघाताच्या पायावर स्थापन झालेले हे सरकार अद्याप विधिमान्य नाही. राज्याची सत्ता हाती घेण्याआधीपासून तसेच घेतल्यानंतरही सरकारच्या डोक्यावर सर्वोच्च न्यायालयाकडून अपात्र ठरण्याची टांगती तलवार कायम आहे. सरकारची वैधता संदिग्ध असल्याने, सरकारने आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमास उपस्थित राहणे म्हणजे भारतीय संविधानाशी, महाराष्ट्र राज्याशी व राज्यातील जनतेच्या हिताशी प्रतारणा ठरणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर आम्ही सर्वजण बहिष्कार टाकत असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. उद्यापासून सुरु होत असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज विरोधकांच्यावतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी चहापानावर बहिष्कार टाकत असून त्याची कारणे काय आहेत, याचे सविस्तर पत्र मुख्यमंत्र्यांना दिले असल्याचे अजितदादा यांनी सांगितले. तसेच यावेळी माजी आमदार विनायक मेटे आणि पहलगाम येथील अपघातात शहीद झालेल्या आयटीबीटी जवानांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली. महाराष्ट्रात प्रचंड अतिवृष्टी झालेली असून शेतकरी हवालदिल झालेला आहे. हे मुद्दे आम्ही सभागृहात मांडणार आहोत. अतिवृष्टी झालेल्या भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, अशी मागणी करणार आहोत. तसेच एनडीआरएफचे निकष कालबाह्य झालेले आहेत. महाविकास आघाडी सरकार असताना आम्ही शेतकऱ्यांना तिप्पट मदत दिली असल्याची आठवण मा. अजितदादांनी करुन दिली. या सरकारने दुप्पट मदत दिल्याचा दावा केला असला तरी त्यात तथ्य नाही, अशी टीका अजितदादा यांनी केली. राज्यात साधारण १५ लाख हेक्टर शेतजमिनीचे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले आहे. सरकार कुणाचेही असले तरी शेतकऱ्यांना भरीव मदत करुन ताठ मानेने त्यांना जगण्यासाठी मदत करायला हवी, अशी भूमिका अजितदादांनी मांडली. कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत बोलत असताना अजितदादा पवार यांनी सत्ताधारी आमदारांच्या वक्तव्यांवर ताशेरे ओढले. सत्ताधारी पक्षातले काही आमदार महाराष्ट्रात संघर्ष पेटावा, अशी भाषा वापरत आहेत. हात पाय तोडण्याची भाषा केली जात आहे. फुले, शाहू, आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे. स्व. यशवंतराव चव्हाण यांनी पहिले मुख्यमंत्री म्हणून सुसंस्कृत राजकारणाचा पाठ आपल्याला घालून दिला होता. त्यांच्या महाराष्ट्रात तोडफोडीची भाषा आपल्याला शोभते का? शिंदे-फडणवीस यांना ही भाषा योग्य वाटते का? शिंदे गटाच्या एका आमदाराने सरकारी कर्मचाऱ्याच्या कानशिलात पेटवली. तुम्हाला सत्तेची मस्ती आली का? असा परखड प्रश्न अजितदादांनी उपस्थित केला. राज्यातील महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यापेक्षा नको ते विषय पुढे आणून त्यावर चर्चा केली जात आहे. महाराष्ट्रात दोन व्यक्ती भेटल्यानंतर विविध प्रकारे अभिवादन केले जाते. मात्र आता वंदे मातरम् बोलण्यास सांगितले जात आहे. वंदे मातरमला विरोध असण्याचे काहीही कारण नाही. पण सरकारमध्ये नसताना ज्या मागण्या केल्या होत्या, त्या विसरुन जायचं, त्यावर काहीच बोलायचं नाही, राज्याच्या प्रश्नांवर बोलायचं नाही, अशी पद्धत अवलंबली गेली असल्याची टीका अजितदादांनी सरकारवर केली.
“आता त्यांच्या आमदारांसारखं कुणाला मारायला उठू का?
एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर हजरजबाबी म्हणून ख्याती असलेल्या अजित पवारांनी चांगलाच टोला लगावला ते म्हणाले,’“तुम्हाला कुणी सांगितलं विरोधी पक्ष कमकुवत आहे? त्यांच्यावर प्रभाव पाडायला आम्ही आता काय केलं पाहिजे? त्यांच्या आमदारांसारखं कुणाला मारायला उठू का काय? अवघडच काम आहे. आम्ही सगळे बसलोय. भूमिका मांडतोय. राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भेटलोय. त्यांना निवेदन दिलंय. धन्य आहे सगळ”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.
शेतकरी हवालदिल
अजित पवार म्हणाले की, “राज्यात अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी हवालदिल आहेत. राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत जाहीर करावी. एनडीआरएफचे निकष हे अतिशय तुटपुंजे आहेत. सरकारने ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे. शेतकरी असतील, विद्यार्थी असतील या सर्वांना तातडीने मदत जाहीर केली पाहिजे.”
तातडीने मदत करा
अजित पवार पुढे म्हणाले की, सरकार कुणाचेही असो शेतकऱ्याला तातडीने मदत दिली पाहिजे. पीक कर्जाचा आम्ही आढावा घेतला, ऑगस्ट उजाडूनही अनेक ठिकाणी ते देण्यात आलेले नाही. मराठवाड्यात गोगलगायीमुळे सोयाबीन पिकांचे नुकसान झाले आहे. त्यासंबंधी उपाययोजना आवश्यक आहेत. हे महत्त्वाचे विषय सोडून भलतेच अवांतर विषय काढले जात आहे. वंदे मातरमला विरोध असण्याचं कारण नाही, पण त्याचं औचित्य काय होतं? पेट्रोल-डिझेलचे दर निम्मे करणार असं हे म्हणत होते, पण यांनी दोन-तीन टक्केच दर कमी केले. यांच्यातील काही नेते महाराष्ट्र पेटेल अशी भाषा वापरतात, असेही अजित पवार म्हणाले.
मंत्रिमंडळाची बैठक
दरम्यान, चहापानाच्या कार्यक्रमानंतर राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. शिंदे सरकारच्या खातेवाटपानंतरची ही पहिलीच मंत्रिमंडळाची बैठक असणार आहे. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पत्रकार परिषद घेणार आहेत.
आठवडाभर अधिवेशन
शिंदे सरकार स्थापन झाल्यापासून त्यांचा हा पहिलाच पावसाळी अधिवेशन असणार आहे. 17 ऑगस्टपासून अधिवेशनाला सुरूवात होणार असून तो 25 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या शेवटच्या दिवशी पावसाळी अधिवेशन हे 18 जुलै रोजी होईल असे घोषित करण्यात आले होते. मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले आहे.
सदस्यांची यादी जाहीर
दरम्यान, 17 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनासाठी विधानसभा कामकाज सल्लागार समितीवरील सदस्यांची नामनियुक्त यादी जाहीर करण्यात आली. 17 ते 25 ऑगस्ट या कालावधीत जरी अधिवेशन होणार असले तरी यामध्ये तीन दिवसांच्या सुट्ट्या आहेत. त्यामुळे अधिवेशनाचे प्रत्यक्ष कामकाज हे सहा दिवसच चालणार आहे. 17 ते 25 ऑगस्ट या कालावधीत अधिवेशन होणार असून यामध्ये शुक्रवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी दहीहंडी सुट्टी आणि दिनांक 20, 21 ऑगस्ट या सार्वजनिक सुट्या आहेत. या दिवशी कामकाज होणार नाही. 24 ऑगस्ट रोजी विधिमंडळ कामकाजात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
अधिवेशनाचे कामकाज
पावसाळी अधिवेशन बुधवार 17 ऑगस्टपासून विधान भवन, मुंबई येथे होणार आहे. 17 ते 25 ऑगस्ट या कालावधीत अधिवेशनाचे कामकाज होणार असून विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या यापूर्वी झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.