पुणे: अवैधपणे गुटख्याची निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून अन्न व औषध प्रशासन विभागाने १३ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला. राज्याचे अन्न,औषध व प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी यासंबंधीचे निर्देश दिले होते.
भोर तालुक्यातील संगमनेर येथे गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू तयार करण्याचा कारखाना सुरु असल्याची माहिती बापट यांना प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे, अन्न औषध प्रशासनास कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. या माहितीच्या आधारे छापा टाकला असता, संगमनेर येथे सचिन बांदल यांच्या शेतात असलेल्या पत्राच्या शेडमध्ये प्रतिबंधित केलेला गुटखा व सुंगधित तंबाखूचे उत्पादन सुरु असल्याचे आढळून आले.
या कारखान्यातून अन्न,औषध व प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी १० लाख ८० हजाराचा गुटखा, ५९ हजार ५२० रुपयांचा कच्चा माल, ५० हजाराची तंबाखू आणि १ लाख २८ हजार रुपयांची कात पावडर असा एकूण १३ लाख १७ हजार ५२०रुपयांचा माल जप्त केला. तसेच यासाठी वापरण्यात येत असलेली यंत्र-सामुग्रीही अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली. सदर प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.
राज्यात गुटखा, पानमसाला, इत्यादी प्रतिबंधक अन्न पदार्थाबाबत कडक मोहीम राबविण्याचे आदेश प्रशासनास बापट यांनी दिले होते त्यानंतर ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. गेल्या पाच महिन्यात अवैधपणे विक्री व निर्मिती करणाऱ्या ८८० ठिकाणी छापे टाकले. यातून सुमारे १५ कोटी ९३ लाख किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.