मुंबई, : ‘अल अदील ट्रेडिंग’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, तथा ‘मसालाकिंग’ या लोकप्रिय नावाने ओळखल्या जाणाऱ्या डॉ. धनंजय (जय) दातार यांचा ‘एनडीटीव्ही’तर्फे ‘गल्फ इंडियन एक्सलन्स ॲवॉर्ड’ हा पुरस्कार देऊन नुकताच सन्मान करण्यात आला. दुबई क्रीक हाईट्स येथील हयात रीजन्सी हॉटेलमध्ये झालेल्या शानदार समारंभात ‘ओम्नियत प्रॉपर्टीज’ या मालमत्ता विकास कंपनीचे विक्री व विपणन संचालक मोहम्मद हमीद यांच्या हस्ते हा पुरस्कार श्री. दातार यांना प्रदान करण्यात आला. आखाती प्रदेशातील नामवंत व्यक्ती, आघाडीचे भारतीय उद्योजक व व्यावसायिक याप्रसंगी उपस्थित होते.
डॉ. दातार यांनी संयुक्त अरब अमिरातीत (युएई) रीटेल क्षेत्र सेवांमध्ये दिलेल्या योगदानाच्या गौरवस्वरुप त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. ‘एनडीटीव्ही’सारख्या जागतिक प्रतिष्ठेच्या माध्यमगृहाकडून जागतिक व्यासपीठावर माझ्या कामगिरीची दखल घेतली जाणे सन्मानाचे असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करताना डॉ. दातार म्हणाले, की आम्ही आमचे कामकाज भक्कम बनवून व्यवसायाचा मोठ्या प्रमाणावर विस्तार करत असताना अगदी योग्य टप्प्यावर हा पुरस्कार मिळाला आहे. पुरस्कार व गौरवामुळे अंगीकृत कार्यातील आपली जबाबदारी आणखी वाढत असते. आमच्या ग्राहकांना सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून अधिक मूल्य मिळवून देण्यासाठी आम्ही यापुढेही प्रयत्नशील राहू. या पुरस्काराचे श्रेय माझ्या एकट्याचे नसून ते अल अदील समूहातील सर्व कर्मचाऱ्यांच्या समर्पित व सांघिक प्रयत्नांचे प्रतिबिंब आहे. संयुक्त अरब अमिरातीच्या नेतृत्वाने आमच्या कार्याला सातत्याने पाठिंबा आणि प्रोत्साहन दिला असून त्याबद्दल मी कृतज्ञ आहे.
‘अल अदील ट्रेडिंग’ने डॉ. धनंजय दातार यांच्या चैतन्यशील नेतृत्वाखाली ‘पिकॉक’ ब्रँडखाली ९००० भारतीय उत्पादने संयुक्त अरब अमिरातीत आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मसाले व पिठे तयार करुन पॅकबंद करण्यासाठी डॉ. दातार यांनी दुबई इन्व्हेस्टमेंट पार्कमध्ये दीड लाख चौरस फुटांचा भव्य प्रकल्प उभारला आहे. त्यांच्या उद्योगाची भारतीय शाखा ‘मसाला किंग एक्स्पोर्ट्स’ या नावाने मुंबईत कार्यरत आहे. ‘अल अदील’ समूहाची ३४ सुपर मार्केट्स, २ पिठाच्या गिरण्या व २ मसाल्याच्या गिरण्या असे जाळे दुबई, अबू धाबी, शारजा व अजमान येथे विस्तारले असून मुंबई निर्यात विभागाची शाखा ‘मसाला किंग एक्स्पोर्ट्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड’ नावाने मुंबईत आहे.
‘अल अदील’ समूह सक्रिय विस्ताराच्या टप्प्यात असून त्याने अलिकडच्या काळात ओमान व बहारीनमध्ये नवी आऊटलेट्स उघडली आहेत. चालू महिन्यात बार दुबई भागात या समूहाचे ३४ वे आऊटलेट कार्यान्वित झाले आहे. कंपनीने अमेरिका, कॅनडा, टांझानिया, केनया, स्वित्झर्लंड, इटली व एरित्रिया, तसेच कुवेत, ओमान व संयुक्त अरब अमिरातीत विशेष व्यापारी मार्ग स्थापन करुन आयात व निर्यात क्षेत्रातही विस्तार साधला आहे. डॉ. दातार यांना व्यवसाय क्षेत्रातील नेतृत्व व योगदानाबद्दल आजवर अनेक प्रतिष्ठित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. दुबईसह आखाती देशांत भारतीय संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी पुढाकारांतही डॉ. दातार अग्रेसर आहेत.
‘गल्फ इंडियन एक्सलन्स ॲवॉर्ड्स’च्या माध्यमातून अशा नामवंत भारतीय उद्योजकांना सन्मानित केले जाते, ज्यांनी स्वतः निवडलेल्या व्यवसाय क्षेत्रात विविध उद्योगांद्वारे मोठी प्रगती करण्यात योगदान दिले आहे. हे पुरस्कार संयुक्त अरब अमिरातीतील पहिलेच बिझनेस लीडरशिप ॲवॉर्ड्स आहेत.