मुंबई -राज्यातील आजपर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी देण्याची घोषणा करताना सर्वच शेतकऱ्यांना निकषावर आधारित सरसकट कर्जमाफी करण्यात येईल आणि अल्प तसेच मध्यम भूधारक शेतकऱ्यांना त्वरित नवीन कर्ज देण्यास सुरूवात होईल. आज यासंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीनंतर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.
श्री. पाटील यांनी सांगितले की, शेतकरी आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांपैकी ज्यात मुद्देमाल जप्त झाला आहे, असे गुन्हे वगळता सर्व प्रकारचे गुन्हे मागे घेण्यात येतील. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करणे हा प्रश्न केंद्राच्या अखत्यारित येत असल्याने मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ प्रधानमंत्री महोदयांची लवकरच भेट घेऊन राज्याची बाजू जोरकसपणे मांडली जाईल, दुधाचे दर वाढविण्यात येतील तसेच शेतकऱ्यांच्या अन्य मागण्यांवर लेखी उत्तर देण्यात येईल.
राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी शासनाने नेमलेल्या उच्चस्तरीय मंत्रिगट समितीने रविवारी शेतकऱ्यांच्या विविध संघटनांच्या नेत्यांशी मुंबईत बैठक घेऊन त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या व त्यावर चर्चा केली. महसूल मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखालील या उच्चस्तरीय समितीचे सदस्य कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, सहकार मंत्री सुभाष देशमुख,जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व परिवहन मंत्री दिवाकर रावते तसेच शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी खासदार राजू शेट्टी, आमदार जयंत पाटील, आमदार बच्चू कडू, रघुनाथदादा पाटील, अजित नवले, माजी न्यायमूर्ती बी.व्ही. कोळसे-पाटील व अन्य नेते बैठकीला उपस्थित होते.
आजपासून महाराष्ट्रातल्या अल्प भू धारक शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या कर्जमाफीमुळे राज्यातल्या अल्प भू धारक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच या सगळ्या शेतकऱ्यांना उद्यापासून नवे कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शेतकरी आंदोलनाचा हा सर्वात मोठा विजय आहे. या निर्णयानंतर उद्या होणाऱ्या आंदोलनाला स्थगिती देण्यात आली आहे. आजपासून शेतकरी आंदोलनाची सांगता झाली अशी घोषणा रघुनाथ पाटील यांनी केली
या आंदोलनात सगळे शेतकरी एकत्र आले ही सर्वात अभिमानास्पद बाब आहे अशी प्रतिक्रिया शेतकरी नेत्यांनी दिली आहे. अल्प भू धारक शेतकऱ्यांना मिळालेली कर्जमाफी हा सर्वात मोठा विजय आहे. उर्वरित शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत २५ जुलैपर्यंत सरकारचे प्रतिनिधी आणि सुकाणू समितीचे प्रतिनिधी निर्णय घेतील. २५ जुलैपर्यंत उर्वरित शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही तर मात्र पुन्हा एकदा आंदोलनासाठी महाराष्ट्रातले शेतकरी रस्त्यावर उतरू असेही सुकाणू समितीने स्पष्ट केले आहे. २५ जुलैपर्यंत सुकाणू समिती आणि शेतकऱ्यांचे प्रतिनिधी शेतकऱ्यांची एक यादी तयार करतील. ज्या कुटुंबाचा उदरनिर्वाह फक्त आणि फक्त शेतीवरच अवलंबून आहे अशा सगळ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या नावाखाली बिगर शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा मिळणार नाही याची काळजी आम्ही घेऊ असे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे.
पुणतांबे गावातल्या शेतकऱ्यांपासून आम्हाला प्रेरणा मिळाली. त्यामुळे त्यांचेही सुकाणू समितीने आभार मानले आहेत. स्वामिनाथन आयोगाबाबत मुख्यमंत्री आणि सुकाणू समितीचे सदस्य पंतप्रधानांना भेटणार आहेत. त्यांच्याकडे स्वामिनाथन समितीच्या शिफारसी लागू करण्यासाठी मागणी करणार आहोत अशी माहिती खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे. शेतकऱ्यांनी कायम सरकारवर अवलंबून राहू नये, त्याने स्वयंपूर्ण बनावे यासाठी स्वामिनाथ समितीच्या शिफारसी कशा आवश्यक आहेत, त्या लवकरात लवकर कशा लागू करता येतील याबाबत आम्ही पंतप्रधानांना साकडे घालणार आहोत असेही शेट्टी यांनी म्हटले आहे. तसेच मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे, उच्चाधिकार मंत्रिगट या सगळ्यांचे कर्जमाफीबाबत सुकाणू समितीने आभार मानले आहेत.
महाराष्ट्रात आजवरचा सर्वात मोठा लढा शेतकऱ्यांनी उभारला. या आंदोलनात काही प्रमाणात हिंसेचे प्रकार घडले. मात्र या सगळ्या आंदोलनाचे फलित चांगले मिळाले आम्ही आनंदी आहोत अशी प्रतिक्रिया शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी दिली आहे. तसेच काळे कपडे घालून सुकाणू समिती आणि मंत्रिगटाच्या बैठकीला आलो होतो. मात्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे आनंदी झालो आहे. आता सुतळी बॉम्ब वर्षा बंगल्यासमोर नाही तर गावागावात फोडून हा निर्णयाचे स्वागत करू अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे. तसेच स्वामिनाथन समितीच्या शिफारसी लागू होण्यासाठी आमचा लढा सुरूच राहणार आहे असेही बच्चू कडू यांनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रातले शेतकरी १ जून पासून संपावर गेले होते. आज झालेल्या सुकाणू समिती आणि उच्चाधिकार मंत्रिगटाच्या बैठकीवर उद्या काय होणार हे ठरणार होते. मात्र आज सरकारने कर्जमाफीची मुख्य मागणी मान्य केल्याने शेतकरी आंदोलनाची सांगता झाली आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला शेतकरी संपामुळे जो त्रास झाला त्याबद्दल सगळ्याच शेतकरी नेत्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.