मुंबई-
मुंबईतील प्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. करोना व्हायरसच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून मंदिर व्यवस्थापनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिर बंद असताना नित्याचे धार्मिक विधी पूजाऱ्यांमार्फत केले जाणार असल्याची माहिती आहे.
पुढील सूचना मिळेपर्यंत मंदिर बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती न्यासाचे प्रमुख आदेश बांदकेर यांनी दिली. सिद्धीविनायक मंदिरात अनेक भाविक वैद्यकीय मदतीसाठी येतात. तो मदत कक्ष सुरु राहणार आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले तुळजाभवानी मंदिरही ३१ मार्चपर्यंत बंद राहणार आहे.
गर्दीच्या ठिकाणाहून करोना व्हायरसचा फैलाव जास्त प्रमाणात होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच राज्य सरकारने चित्रपटगृह, मॉल, शाळा, जीम बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तीर्थस्थळांवर लोक मोठया संख्येने दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे खबरदारी म्हणून तुळजाभवानी आणि सिद्धीविनायक मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.