पुणे : गुरू रोशन दात्ये यांच्या रोचित कथक अकादमीतर्फे “काव्य कुसुमांजली” या कार्यक्रमाचे आयोजन येत्या रविवारी (दि.१) करण्यात आले आहे. कवि कुसुमाग्रज, बालकवी, इंदिरा संत, शांता शेळके यांच्या काही निवडक व अजरामर कवितांचे सादरीकरण कथक नृत्याच्या माध्यमातून यात होणार आहे. टिळक स्मारक मंदिर येथे सकाळी ९ वाजता हा कार्यक्रम होईल.
रोचित कथक अकादमीच्या ४०व्या वर्षपूर्तीनिमित्त वर्षभर सुरू असलेल्या ‘परितोष’ या शृंखलेतील “काव्य कुसुमांजली” हे ४थे पुष्प आहे. यातून साज-श्रृंगार लावणी, अभंग, पोवाडा अश्या अनोख्या रचना कथकच्या माध्यमातून सादर होणार आहेत. या संपूर्ण कार्यक्रमाची संकल्पना व नृत्य दिग्दर्शन गुरू रोशन दात्ये यांचे असून डाॅ.माधुरी जोशी यांच्या निवेदनातून कवी व कवितांविषयीच्या खास आठवणी उलगडल्या जाणार आहेत.
मराठीभाषा दिनानिमित्त ज्येष्ठ साहित्यिक आणि कवी कुसुमाग्रज यांना आदरांजली म्हणून ही मैफल होत असून प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक व गीतकार श्री सुनिल सुकथनकर यावेळी उपस्थित राहणार आहेत. .