मुंबई -संपकरी शेतकर्यांसोबत पहाटे सव्वातीन पर्यंत झालेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रपरिषदेत या चर्चेतील निर्णयांची माहिती दिली आणि त्याचवेळी शेतकरी नेत्यांनी संप मागे घेत असल्याची घोषणा केली.
या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले निर्णय असे:
1. कर्जमाफी : राज्यातील अल्पभूधारक आणि कर्ज थकित असलेल्या, अडचणीत असलेल्या शेतकर्यांना कर्जमाफी देण्यात येईल. यासंदर्भात एक समिती गठीत करून ती यासंदर्भातील प्रारूप/कार्यपद्धती निश्चित करेल. 31 ऑक्टोबरपर्यंत हा निर्णय अंमलात आणला जाईल. या समितीत शेतकर्यांचे प्रतिनिधी असतील.
2. हमीभाव: हमीभावापेक्षा कमी किंमतीत शेतमाल खरेदी करणे, हा गुन्हा ठरविणारा कायदा येत्या पावसाळी अधिवेशनात करण्यात येईल. असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असेल. याशिवाय, राज्य कृषीमूल्य आयोग एक महिन्यात गठीत करण्यात येईल.
3. दूध : दुधाचे दर वाढविण्यास सरकार तयार आहे. 20 जूनपर्यंत यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल. दूधाचे दर ठरविण्यासंदर्भात नियामकाची (रेग्यूलेटर) नियुक्ती करण्याची शक्यता पडताळून पाहण्यात येईल.
4. वीजदराचा फेरविचार करण्यात येईल. जुन्या थकित रकमेसंदर्भात योजना तयार करण्यात येईल.
5. गोडाऊन-कोल्डस्टोरेज, वेअरहाऊस चेन वाढविण्यासाठी जोरकस प्रयत्न सरकारतर्फे करण्यात येईल.
6. या आंदोलनादरम्यान, ज्या शेतकर्यांवर गुन्हे दाखल झाले, ते गुन्हे परत घेण्यात येतील. परंतू ज्यांनी केवळ हिंसा केली आणि जे शेतकरी नाहीत, त्यांच्यावरील गुन्हे परत घेण्यात येणार नाहीत.
7. या आंदोलनादरम्यान, अशोक मोरे यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांना सरकारतर्फे मदत देण्यात येईल.