नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून (NDA) द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) या देशाच्या नव्या राष्ट्रपती झाल्या आहेत. त्यांनी यूपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव केला आहे. आज राष्ट्रपतिपदासाठीच्या निवडणुकीची मतमोजणी पार पडली. त्यामध्ये द्रौपदी मुर्मू या मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाल्या आहेत. त्या देशातील पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत. त्या देशाच्या १५ व्या राष्ट्रपती ठरल्या आहेत. या निवडणुकीसाठी ९९ टक्के लोकप्रतिनिधींनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला होता. देशातील १० राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात १०० टक्के मतदान पार पडले होते. राष्ट्रपतीपदासाठी ७७१ खासदार आणि ४०२५ आमदारांसह ४७९६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच मुर्मू आघाडीवर होत्या. तिसऱ्या फेरीपर्यंत मुर्मू यांना वैध मतांमधील ५० टक्के मते मिळाली.मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीपासूनच द्रौपदी मुर्मू आघाडीवर होत्या. मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीत त्या ८१२ मतांच्या फरकाने आघाडीवर आहेत. मुर्मू यांना दुसऱ्या फेरीपर्यंत १३४९ मते मिळाली. या मतांचे मूल्य ४,८३,२९९ आहे. तर दुसऱ्या फेरीपर्यंत सिन्हा यांना ५३७ मते मिळाली होती. या मतांचे मुल्य १,८९, ८७६ आहे.
राष्ट्रपतीपदाच्या या निवडणुकीत देशभरातील एकूण १७ खासदारांची मतं फुटली आहेत. या खासदारांनी एनडीए पुरस्कृत उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या बाजूने मतदान केला. परिणामी मुर्मू शेवटपर्यंत आघाडीवर राहिल्या आणि त्यांचा विजय झाला.
25 रोजी शपथविधी
21 जुलै रोजी मतमोजणी झाल्यानंतर देशाच्या नव्या राष्ट्रपतींची घोषणा केली जाईल. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलैच्या मध्यरात्री संपत आहे. 25 जुलै रोजी नवीन राष्ट्रपतींचा शपथविधी होणार आहे.
द्रौपदी मुर्मू : कनिष्ठ सहायक, शिक्षिका होत्या… आता राष्ट्रपतिपदाची जबाबदारी
- 20 जून 1958 रोजी ओडिशातील एका खेडेगावात जन्म. पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले.
- 1979 ते 1983 या काळात पाटबंधारे विभागात कनिष्ठ सहायक झाल्या. 1994 ते 1997 या काळात त्या शिक्षिका होत्या.
- 1997 मध्ये राजकारणात प्रवेश केला. रायरंगपूर नगरपालिकेतून भाजपच्या नगरसेविका झाल्या. त्या अध्यक्षाही झाल्या.
- पती बँकेत कर्मचारी होते. पती आणि दोन मुलांच्या मृत्यूनंतर मुलगी इतिश्री मुर्मू सोबत आहेत. इतिश्रीही बँक कर्मचारी आहेत.
सर्वाधिक मताधिक्याने विजयी राष्ट्रपती
- वर्ष – 1957
- राष्ट्रपती- राजेंद्र प्रसाद
- बाजूने – 99.3%
- विरुद्ध – 0.4%